Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उन्हाळ कांदा दराची ७०० रुपयांनी उसळी

0
0

कमाल दर ३५१० रुपये; ग्राहकाला रडविणार

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कांदा कधी शेतकऱ्याला रडवणार तर कधी ग्राहकाला. सध्या कांदा शेतकऱ्यांना हसवतोय, तर ग्राहकाच्या डोळ्यात पाणी आणतोय. कांदा दराने तिशी ओलांडल्याने सरकारचे धाबे दणाणले आहे, तर हॉटेलमधून कांदा गायब होऊ लागला आहे. कांद्याचा दर दिवसागणिक वाढतच असून, बुधवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याने ७०० रुपयांनी उसळी घेत क्विंटलला सरासरी ३००० रुपयांचा पल्ला गाठला.

कांद्याचे दर वाढण्याचे कारण म्हणजे उन्हाळ कांदा आता संपत आला आहे. खरं तर उन्हाळ कांदा दरवर्षी ऑक्टोबरमध्येच संपतो. परंतु, यावर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळीबाहेर काढला नाही. आता हा कांदा थोड्याच प्रमाणात शिल्लक आहे. दुसऱ्या बाजूला पावसाने नुकसान झाल्याने लाल कांद्याच्या उत्पादनात घट राहणार आहे. यामुळे कांद्याला मागणी वाढल्याने सध्या दरात वाढ झाली आहे. बुधवारी कांद्याला कमाल ३५१० रुपये भाव मिळाला. एका महिन्याच्या कालावधीत कांदा १३०० रुपयांनी वधारला आहे.

शेतकरी सुखावला

परतीच्या पावसाने लाल कांद्याचे लांबलेले पीक आणि उत्पादन कमी येणार अशी शक्यता असल्याने सध्या मार्केटमध्ये लिलावासाठी येत असलेला उन्हाळ कांदा तेजीत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडत आहेत. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होत असलेल्या लिलावात कांद्याचे भाव सरासरी ३०००च्या वर गेले आहेत. चार-पाच दिवसांपासून हा दर टिकून आहे. बुधवारी झालेल्या लिलावात उन्हाळ कांद्याने ७०० आणि लाल कांद्याने २०० रुपयांची उसळी घेतली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी समाधानी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला अंतिम नोटीस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरात धूर व औषध फवारणीचा तब्बल १९ कोटींचा ठेका देऊनही डेंग्यूचा प्रकोप थांबत नसल्याने आरोग्य विभाग आणि ठेकेदाराच्या कामगिरीवर सत्ताधाऱ्यांचा प्रकोप वाढला आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी झालेल्या बैठकीत ठेकेदारांवर कारवाईचा आदेश देण्यात आला होता. ऑक्टोबरपाठोपाठ नोव्हेंबरमध्येही डेंग्यू आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र समोर येताच आता आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला आरोग्य विभागाच्या वतीने अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ठेका रद्द करण्याच्या दिशेने पालिकेची वाटचाल सुरू झाली आहे.

शहरात १७६ कोटींचा घंटागाडी ठेका आणि १९ कोटींचा पेस्ट कंट्रोलचा ठेका देऊनही अस्वच्छता आणि रोगराई आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. डेंग्यूबरोबरच इतरही साथीच्या आजारांनी थैमान घातले असताना पेस्ट कंट्रोलच्या उपाययोजना कुचकामी ठरत आहेत. गेल्या चार मह‌िन्यांच्या आकडेवारीनुसार डेंग्यू कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र आहे. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९७ रुग्ण सापडले होते. सप्टेंबर महिन्यात हा आकडा आणखी वाढून १०५ वर पोहोचला होता. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू संशय‌ितांचा आकडा ४७७ पर्यंत पोहचला आहे. नोव्हेंबरमध्ये पहिल्या बारा दिवसांतच शहरात डेंग्यूचे १२६ रुग्ण पॉझ‌िटिव्ह आढळून आले आहेत. संशय‌ितांचा आकडा २७१ पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांनी पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराला जबाबदार धरत, त्यावर कारवाईचे आदेश दिले होते.

मंगळवारी महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनुसार बुधवारी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी पेस्ट कंट्रोलचे ठेकेदार मे. दिग्व‌िजय एंटरप्रायजेस कंपनीला अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापूर्वी संबंधित ठेकेदारास दोन नोट‌िसा बजावल्या आहेत. त्यामुळे बुधवारी अंतिम नोटीस बजावण्यात येऊन डेंग्यूचे प्रमाण वाढल्याने ठेका रद्द का करू नये, यासाठी सात दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे. ठेकेदार काय खुलासा करतो याकडे लक्ष लागून आहे.

आरोग्य विभागाची चतुराई

पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला अंतिम नोटीस देताना आरोग्य विभागाने चातुर्य दाखवले आहे. संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावतांना मंगळवारी महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या तक्रारींचा संदर्भ देण्यात आला आहे. नोटीशीसंदर्भात ठेकेदार कोर्टात गेला तर, संबंधित प्रकरण आरोग्य विभागाच्या अंगलट येऊ नये, याची पुरेपूर दक्षता आरोग्य विभागाने घेतली आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या आधारेच नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदाराला त्याचा फायदा मिळण्याची शक्यता असून, पदाधिकारीही तोंडघशी पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीबीएसमध्ये नाशिकच्या दोघांना १६ सुवर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठेची पदवी असणाऱ्या एमबीबीएस विद्याशाखेत सुलतान आणि मानसी या दोन विद्यार्थ्यांनी अनुक्रमे तब्बल ९ आणि ७ सुवर्णपदके पटकावित आरोग्य विद्यापीठाच्या कॅम्पसचे लक्ष वेधून घेतले. विशेष बाब म्हणजे हा विक्रम करणारे हे दोन्हीही विद्यार्थी नाशिकमधील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये अंतिम वर्षात पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. हे दोघेही विद्यार्थी आरोग्य विद्यापीठाच्या सतराव्या दीक्षांत सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले होते.

दीक्षांत सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर विद्वज्जन मिरवणूक, मानदंड स्थापना, विद्यापीठ गीताची मानवंदना आदी नियोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर पीएच. डी. आणि त्यानंतर सुवर्णपदकांची यादी वाचन तसेच पदक प्रदान करण्याचा मुख्य सोहळा सुरू झाला. यावेळी डॉ. पवार मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी सुलतान मोईनुद्दीन शौकतअली आणि याच कॉलेजची विद्यार्थिनी मानसी मयूर गुजराथी या दोघांच्या नावांसमोरील सुवर्णपदकांची यादी शिक्षक प्रबोधिनी हॉलमध्ये उपस्थित प्रेक्षकांचा श्वास रोखून धरणारी होती. कारण सुलतानच्या नावासमोर तब्बल ९ तर मानसीच्या नावासमोर तब्बल ७ सुवर्णपदके होती. मान्यवरांच्या हस्ते एकामागून एक पदक गळ्यात पडल्यानंतर हे दोघेही हरखून गेले होते. या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी सभागृहात मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार याही उपस्थित होत्या. त्यांनीही उभे राहून प्रोत्साहन देत या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सुलतान शौकतअली हा शिक्षणासाठी पाच वर्षांपासून नाशिकमध्ये आहे. तो मूळ ठाणे शहरातील रहिवाशी आहे. त्याचे वडिल बिल्डिंग मटेरिअल पुरवठ्याच्या व्यवसायात आहेत. तर मानसी गुजराथी हिचे आई आणि वडिल वैद्यकीय व्यवसायातच कार्यरत आहेत.

विविध सुवर्णपदकांवर नाव कोरण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रचंड मेहनत घ्यावी लागली. कुटुंबात आई-वडिल आणि कॉलेजमध्ये संस्था परिवारातील सर्व घटकांकडून ‌मिळालेला विश्वास आणि प्रेम यामुळेच येथवर मजल मारू शकलो. यापुढे ‘मेडिसीन’ विषयात मला पदव्युत्तर पदवी घेऊन रुग्णसेवा करायची आहे.

- डॉ. सुलतान शौकतअली, नऊ सुवर्णपदक विजेता विद्यार्थी


वैद्यकीय विद्याशाखेसारख्या आव्हानात्मक अभ्यासक्रमात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सर्व क्षमता पणाला लावावी लागली. सुवर्णपदकांसाठी अभ्यास केला नाही. रुग्णांसाठी अभ्यास केला होता. पण मन लावून केलेल्या प्रयत्नाचे चांगले फळ मिळाले. आज मिळालेली सुवर्णपदके आयुष्यभर प्रेरणा देतील. ‘मेडिस‌िन’ या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवून मला रुग्णसेवेसाठी झोकून द्यायचे आहे.

- डॉ. मानसी गुजराथी, सात सुवर्णपदक विजेती विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांबाबतच्या सात याचिका फेटाळल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे हटवू नयेत, यासाठी जिल्हा कोर्टात धाव घेतलेल्या जुने नाशिक तथा पूर्व विभागातील सातही धार्मिक स्थळांची याचिका जिल्हा कोर्टाचे दिवाणी न्यायाधीश जे. डब्ल्यू. गायकवाड यांनी बुधवारी (दि. १५) फेटाळून लावली. हायकोर्टात दाद मागण्यासाठी मुदत मागत याचिकाकर्त्यांनी तोपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा अर्जही केला होता. हा अर्ज नामंजूर करण्यात आल्याने धार्मिक स्थळांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

महापालिकेने शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. मोहिमेंतर्गत पूर्व विभागातील मुंबई नाका पोल‌िस स्टेशन हद्दीतील धार्मिक स्थळे महापालिकेकडून हटविली जाणार होती. मात्र, तत्पूर्वीच या परिसरातील सात धार्मिक स्थळांबाबत जिल्हा कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे १३ नोव्हेंबरपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. याचिकाकर्त्यांच्या वत‌ीने अ‍ॅड. पिंजारी यांनी, तर महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. आर. पी. पगार यांनी मंगळवारी (द‌ि. १४) युक्त‌िवाद केला. बुधवारी (दि. १५) या युक्त‌िवादावर सुनावणी ठेवण्यात आली होती. कोर्टात दाखल सात याचिका बुधवारी फेटाळून लावण्यात आल्या. कोर्टाने पूर्वी दिलेला परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा अर्जही नामंजूर करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात जाण्यासाठी मुदत माग‌ितली होती. तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा अर्जही दिला होता. कोर्टाने तोही फेटाळला. त्यामुळे अशी धार्मिक स्थळे हटविण्याबाबतची कारवाई महापालिकेकडून केली जाणार आहे.

पंचवटीतील मंदिरांवर जेसीबीचा पंजा

शहर परिसरात आठ दिवसांपासून अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवारी (दि. १५) पंचवटी परिसरातील २२ पेक्षा अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मोहीम शांततेत पार पडली.

येथील दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी सिनेमागृहालगत असलेले दक्षिणमुखी हनुमान मंदिर हटवत सकाळी दहाच्या सुमारास मोह‌िमेस प्रारंभ करण्यात आला. यानंतर वज्रेश्वरी झोपडपट्टी, आरटीओ कार्यालयाजवळ, फुले नगर, गणेशवाडी, वाल्म‌िकनगर आदी भागातील २२ पेक्षा जास्त धार्मिक स्थळे हटविण्यात आली. या मोहिमेत २०० पोल‌िस कर्मचारी, १५० मनपा कर्मचारी, ६ जेसीबी, १० ट्रक, ट्रॅक्टर यांसह दंगा नियंत्रक वाहन, अग्निशामक वाहन,अॅम्ब्युलन्स, शीघ्र कृती दल पथक सहभागी झाले होते. नोटिसा बजावण्यात आलेल्यांपैकी काही धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांनी व नागरिकांनी पेठरोडवरील शनिमंदिराचे शेड, खंडोबा मंदिर, मल्हारी राजा मंदिर स्वयंस्फूर्तीने दोन दिवस आधीच काढून घेतले.

अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात येत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोल‌िसांनीदेखील नियोजन केले होते. मनपा उपायुक्त रोहिदास बहिरम, किशोर बोर्डे, सहाय्यक पोल‌िस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोल‌िस ठाण्याचे वरिष्ठ पोल‌िस निरीक्षक दिनेश बर्डेकर, वाहतूक शाखेचे पोल‌िस निरीक्षक सदानंद इनामदार, मनपा विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी (पंचवटी), निर्मला गावित (सातपूर), जयश्री सोनवणे (पूर्व), नितीन नेर (पश्चिम), सुनीता कुमावत (सिडको), संतोष वाडेकर (नाशिकरोड) यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वागत कमान धोकादायक

0
0

स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सभापतींची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने सन २००२ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात शहरात प्रवेश करताना भव्य अशा स्वागत कमानी उभारल्या होत्या. त्यापैकी सातपूर भागातील त्र्यंबकेश्वर रोडवर स्वागत कमान उभारण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या स्वागत कमानीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. कमानीच्या काही भागाला तडे गेल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने तत्काळ स्ट्रक्चर ऑडिट करावे, अशी मागणी सातपूरच्या सभापती माधूरी बोलकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. भविष्यात तडे पडलेल्या कमानीचा काही भाग कोसळून दुर्घटना झाल्यास त्याच जबाबदार कोण, असाही सवाल सभापती बोलकर यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक शहरात प्रवेश करताना प्रत्येकाचे जोरदार स्वागत व्हावे याहेतूने महापालिकेने सहा विभागांत भव्य स्वागत कमानी उभारल्या आहेत. त्र्यंबकेश्वर रोडवरदेखील पपया नर्सरीच्या बाजूला भव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली होती. सुंदर असे वृक्षांची लागवडही कमानीच्या समोर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात भरेल असा सुंदर परिसर आहे. परंतु, स्वागत कमानीची गेल्या काही वर्षांपासून पडझड झाली असल्याने याकडे महापालिकेचे दुर्लक्षच असल्याचे चित्र आहे.

गेल्याच वर्षी या स्वागत कमानीचा एका बाजूचा घुमट पावसाळ्यात कोसळला होता. मात्र सुदैवाने जोरदार पाऊस असल्याने कमानीखाली कोणीही नसल्याने मोठा अपघात टळला होता. परंतु, सद्य:स्थितीत कमानीची सुरक्षा ऐरणीवर आल्याने त्याकडे कोण लक्ष देणार, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. कमानीच्या दोनही बाजूंच्या स्तंभांना तडे गेल्याने भविष्यात दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

संभाव्य धोका रोखावा

काही वर्षांपूर्वी देवळालीतील लामरोडवरील उभारलेल्या स्वागत कमान कोसळल्याने दोन जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे ही घटना पुन्हा होऊ नये त्यासाठी महापालिकेच्या बांधकाम प्रशासनाने तातडीने याबाबत पावले उचलण्याची गरज आहे. तसेच येत्या काळात स्वागत कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने दुरुस्ती केल्यास संभाव्य धोका रोखता येईल.

तीन महिने उलटूनही दुर्लक्ष

दरम्यान, या कमानीच्या दुरवस्थेबाबत महापालिकेच्या सातपूर विभागाच्या सभापती बोलकर यांनी बांधकाम विभागाला लेखी निवेदन दिले होते. निवेदनात स्वागत कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. परंतु, गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ होऊनदेखील कमानीच्या तड्यांकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने तत्काळ कमानीच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी बोलकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहो आश्चर्यम्! सर्व घंटागाड्या हजर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अस्वच्छता आणि अनियमित घंटागाड्यांवरून आरोग्य विभागासह घंटागाडी ठेकेदारावर नेहमीच तोंडसुख घेणाऱ्या महापौरांसह पालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांना बुधवारी आरोग्य विभागाने तोंडघशी पाडले. महापौरांच्या आदेशानुसार बुधवारी घेण्यात आलेल्या घंटागाड्यांच्या ओळख परेडमध्ये सहा विभागांत सर्वच्या सर्व २१७ घंटागाड्या हजर केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे महापौरांच्या आरोपांमध्ये तथ्य नसून, घंटागाड्यांबाबत ओरड निरर्थक ठरली आहे. आरोग्य विभागानेच सर्व घंटागाड्या हजर करून सत्ताधाऱ्यांचे तोंड बंद केल्याने सत्ताधारी यापुढे काय पवित्रा घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

मंगळवारी महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील सहा विभागांत असलेल्या सर्व घंटागाड्यांची बुधवारी नगरसेवक तसेच सहा प्रभाग समित्यांचे सभापती यांनी तपासणी केली. महापालिकेच्या एकूण २१७ घंटागाड्या असून, आरोग्य विभागाने घंटागाड्यांचे दिलेले आकडे आणि प्रत्यक्ष फिरणाऱ्या घंटागाड्यांमध्ये तफावत आढळल्यास थेट आरोग्य अधिकाऱ्यांनाच निलंबित करण्याचा इशारा महापौर रंजना भानसी यांनी दिला होता. त्यानुसार आरोग्य विभागाने जय्यत तयारी करत, बुधवारी प्रभाग समित्यांचे सभापती व तक्रारदार नगरसेवकांसमोर घंटागाड्यांची ओळख परेड केली. यात सहा विभागांत घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या १६७ घंटागाड्या उपस्थित होत्या, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यात नाशिक पूर्व ३०, नाशिक पश्चिम २२, पंचवटी ३४, सिडको ३३, नाशिकरोड २६ आणि सातपूरमध्ये २२ अशा १६७ गाड्या आढळून आल्या. तसेच लहान घंटागाड्या १९, हॉटेलसाठीच्या ७, गार्डनसाठीच्या ६, ड्रेब्रिससाठीच्या ६ गाड्या आढळून आल्या. ठेकेदाराकडे एकही घंटागाडी कमी भरली नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला. विशेष म्हणजे प्रभाग समित्यांचे सभापती, तक्रारदार नगरसेवकांसमोरच ही ओळख परेड केल्याने आता तक्रारदारांची तोंडे बंद होतील, अशी आरोग्य विभागाला आशा आहे.

बोंबाबोंब कशासाठी?

प्रभाग समिती असो, आरोग्य समिती असो, स्थायी समिती वा महासभ. प्रत्येक ठिकाणी घंटागाडी व अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर येतच असतो. प्रभागात घंटागाड्या येतच नसल्याचा आरोप नगरसेवक करत असतात. विशेष म्हणजे घंटागाड्यांची संख्याही पुरेशी नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून वारंवार केला जातो. त्यामुळे बुधवारी घंटागाड्यांचा बुधवारी रिअॅलिटी चेक करण्यात आले. त्यात सर्वच्या सर्व १६७ घंटागाड्या हजर असल्याचा दावा आरोग्य विभागाने केल्याने महापौरांसह अन्य पदाधिकारी व नगरसेवकांची बोंबाबोब कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योग केंद्र बनले गोडाऊन

0
0

खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून वापर; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने सातपूर विभागात महिलांसाठी काही दिवसांपूर्वी भव्य अशा महिला उद्योग केंद्राची उभारणी केली. परंतु, महापालिकेने उभारलेल्या महिला उद्योग केंद्राच्या जागेवर आता खासगी व्यावसायिकांचा डोळा असल्याचे चित्र दिसत आहे. या खासगी बांधकाम व्यावसायिकाने या केंद्राचा वापर गोडाऊन म्हणून केलेला दिसून येत आहे. त्यामुळे आता या जागेवर सामाजिक उपक्रम राबविले जात नसून, केवळ या साहित्यांना साठविण्यासाठी वापर होत आहे. तरी मनपा प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलत त्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

सातपूर विभागात असलेल्या या महिला उद्योग केंद्रात एका खासगी बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या कामाचे साहित्य ठेवले असल्याने याकडे लक्ष कोण देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे उर्वरित असलेल्या जागेवरदेखील झोपड्यांचे अतिक्रमण वाढले असल्याने महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. महापालिकेचा बांधकाम विभाग यावर कधी कारवाई करणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महिलांसाठी महापालिकेने सुंदर असे महिला उद्योग केंद्र उभारले होते. परंतु, या केंद्राच्या जागेवर अनेक चुकीचे प्रकार होत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरात अनेक देवस्थानांची अतिक्रमण महापालिका काढत असताना स्वतःच्या जागेवरील अतिक्रमण केव्हा काढणार.

-आबा शिंदे, स्थानिक रहिवाशी

मोकळ्या जागेवर झोपड्यांचे अतिक्रमण

जिल्हा महिला उद्योग केंद्रांच्या जागेवर प्रत्यक्ष पाहणी केल्यावर त्याठिकाणी बांधकामाचे साहित्य ठेवले असल्याचे दिसून आले. याबाबत महापालिका व स्थानिक नगरसेवकांकडे रहिवाशांनी तक्रार केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले. तसेच या जिल्हा महिला उद्योग केंद्राच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर काही झोपड्यांचे अतिक्रमणही वाढलेले आहे. अशा परिस्थितीत एकीकडे रस्त्यात येणारी देवस्थाने महापालिका हटवत असताना त्यांच्याच जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालावे अशी मागणी कामगारांनी केली आहे.

सामाजिक उपक्रमही बंद

महापालिकेने सातपूर कॉलनीतील कामगार वस्तीत सुंदर असे महिला उद्योग केंद्र उभारले होते. दिवंगत नगरसेवक अशोककाका गवळी यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या महिला उद्योग केंद्रात काही दिवस अनेक सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. परंतु, कालांतराने केंद्राकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. यानंतर माजी नगरसेविका उषा शेळके व मनसे गटनेते सलिम शेख यांनी महिला उद्योग केंद्रात विविध उपक्रम सुरू केले होते. मात्र काही महिने महिलांसाठी उपक्रम राबविण्यात आले. त्यानंतर पुन्हा ते बंद झाल्याने सद्य:स्थितीत महिला उद्योग केंद्राच्या जागेचा गोडाऊन म्हणून वापर केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कट प्रॅक्ट‌ीस’ला लागणार चाप; महिन्याभरात कायदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे शहरे प्रगती करत असताना राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला आरोग्याच्या प्राथमिक सुविधांसाठीही झगडावे लागते, हा विरोधाभास आहे. सामान्य जनतेच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेऊन वैद्यकीय व्यवसायात ग्रामीण भागातही सुमारे ५० टक्के कट प्रॅक्ट‌िस चालते, हे कटूसत्य आहे. हे रोखण्यासाठी पुढील महिन्यातच आम्ही विधानसभेत कायदा आणणार आहोत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र कुलपती गिरीश महाजन यांनी दिली.

विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. महाजन म्हणाले, ‘डॉक्टवरांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या, ही दुर्दैवाची बाब आहे. पण यासाठी डॉक्टरांनीही सावध असायला हवे. त्यांनी समाजाशी विश्वासाचे आणि संवादाचे नाते जोडायला हवे. तसे नाते प्रस्थापित करण्यात डॉक्टर कमी पडतात. संवादाची दरी सांधण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातूनही नवीन डॉक्टरांना धडे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रंदीप गुलेरिया यावेळी म्हणाले, वेगाने प्रगती करणाऱ्या भारतामध्ये जीवनशैलीतून उद्भवणाऱ्या रोगांची संख्या वाढते आहे. यावर नियंत्रण मिळविणे हे भारतीय आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आहे. तंत्रज्ञानाचे जग झपाट्याने बदलते आहे. या बदलांचे प्रतिबिंब वैद्यकीय क्षेत्रातही पडत आहे. नव्या पिढ्यांनी हे बदल वेगाने आत्मसात करावेत. आपल्याकडील आयटी क्षेत्राच्या मदतीने दुर्गम आणि ग्रामीण भारताला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

यावेळी टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले, ‘सध्या वैद्यकीय पेशा व्यवसायाच्या अंगाने झुकत असला तरीही त्यामध्ये नीतिमत्ता जपणाऱ्या तत्वांचा अंतर्भाव आवश्यक आहे. त्याशिवाय समाजात विश्वासार्हता मिळविणे शक्य नाही. कठोर परिश्रमांमधील सातत्य हाच यशाचा मूलमंत्र आहे, असे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. विद्यापीठाची नवी उद्द‌िष्टे आणि आव्हाने या मुद्द्यांवरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. यावेळी डॉ. मोहन खामगांवकर व कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.

नऊ हजार डॉक्टरांची फौज सेवेत!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सतराव्या दीक्षांत समारंभाद्वारे पावणेनऊ हजार नव्या डॉक्टरांनी वैद्यकीय सेवेत पदार्पण केले आहे. यामध्ये राज्यभरातील ३०० कॉलेजेसमधून गोल्ड मेडल्स मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७४ तर पीएच. डी. मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २२ आहे. विविध आरोग्य शाखांच्या सुमारे ८ हजार ८८३ विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि पॅरामेडिकल क्षेत्रातील पदवी या समारंभात प्रदान करण्यात आली.

विद्वज्जन मिरवणुकीने या पदवीदान सोहळ्यास सुरुवात झाली. मिरवणुकीत प्रमुख पाहूणे, अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेचे सदस्य आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. दीक्षांत समांरभात आरोग्य विज्ञान पदवी आणि पदव्युत्तरच्या विविध विद्याशाखांतील अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, विविध विषयांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यामध्ये नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी सुलतान मोईनुद्दीन शौकतअली याने तब्बल ९ सुवर्णपदके मिळविली. तर याच कॉलेजची विद्यार्थिनी मानसी मयूर गुजराथी हिनेही तब्बल ७ सुवर्णपदके पटकावली. या विद्यार्थ्यांनी समारंभात लक्ष वेधून घेतले. वैद्यकीय विद्याशाखेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही मेरिट स्कॉलरशिप अॅवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

शाखानिहाय पदव्या

विविध विद्याशाखा आणि त्यात पदवी मिळविण्यास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुढील प्रमाणे : आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवी : ६०५, दंत विद्याशाखा पदवी : १६६०, आयुर्वेद विद्याशाखा : ५५९, युनानी विद्याशाखा : ३३, होमिओपॅथी विद्याशाखा : ९५३, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे ३४८, बेसिक बी. एस्सी. नर्सिंग विद्याशाखा : १२०७, बी.पी.टी.एच. विद्याशाखा : १२२, बी. ओ. टी. एच. विद्याशाखा : १४, बी. ए. एस. एल. पी. विद्याशाखा ३५, बी. पी. ओ. विद्याशाखा : ३, डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक सायन्स विद्याशाखा : ३८, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे : ३२, पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एम.डी.मेडिकल विद्याशाखा : ८६९, एम.एस.मेडिकल विद्याशाखा : ४४७, डी. एम. मेडिकल विद्याशाखा : ४६, एम. सी. एच. मेडिकल विद्याशाखा : ५६ , पी. जी. डिप्लोमा विद्याशाखा : ३०३, पॅरामेडिकल डिप्लोमा विद्याशाखा : ७६, पी. जी. डी. एम. एल. टी. विद्याशाखा : ७३, एम. एस्सी. फार्मास्युटिकल मेडिसिन विद्याशाखेचे १३ , एम. एस्सी. मेडिकल बायोकेमिस्ट्री विद्याशाखा : २, एम. बी. ए. विद्याशाखा : १८, एम. पी. एच. एन. विद्याशाखा : ११, एम. डी. एस. विद्याशाखा : ३६१, एम. डी. आयुर्वेद विद्याशाखा : ४८१, एम. एस. आयुर्वेद विद्याशाखेचे १७२, एम. डी. युनानी विद्याशाखेचे १०, एम .एस. युनानी विद्याशाखा : ३, पी. जी. डिप्लोमा आयुर्वेद विद्याशाखेचे १२, एम. डी. होमिओपॅथी विद्याशाखेचे ३८, एम. ए. एस. एल. पी. विद्याशाखा : १७, एम. एस्सी. नर्सिंग विद्याशाखा १५०, एम.पी.टी.एच. विद्याशाखा : १०४, एम. ओ. टी. एच. विद्याशाखा : १२, एम. पी. ओ. विद्याशाखा : ३, ए. डी. एच. एम. विद्याशाखा : २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छतेच्या अभावाने विद्यार्थिनींची कोंडी

0
0

सुविधा असूनही देखभालीचा प्रश्न

ठिकाण - नाईक शिक्षण संस्था

टीम मटा

शहराच्या मध्यवस्तीत डोंगरे वसतिगृह मैदानालगत क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचा कॅम्पस आहे. येथे एकूण तीन कॉलेजेस असून, याठिकाणी स्वच्छतागृह असले तरी त्याच्या देखभालीचा प्रश्न कायम आहे. येथील स्वच्छता योग्य राहत नसल्याने विद्यार्थिनींची कोंडी होत आहे. मात्र, दररोज योग्य ती स्वच्छता केली जात असल्याचा संस्थेचा दावा आहे.

नॅपकिन मशिन नाही

आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमध्ये एकूण १२०० विद्यार्थिनी शिक्षण घेतात. त्यासाठी त्यांना ८ महिला स्वच्छतागृहांची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक स्वच्छतागृहात कमोड आहे. पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीनची व्यवस्था नाही. तसेच तेथे स्वच्छतागृहाची स्वच्छता वेळोवेळी केल्याचा कुठलाही तक्ता लावण्यात आलेला नाही. कॉलेजने स्वच्छतेसाठी हाऊस किपिंग या संस्थेकडे स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचा ठेका दिला आहे. कॉलेज स्टाफसाठी स्वतंत्र ३ स्वच्छतागृहे आहेत. स्वच्छतेचा प्रश्न अनेकवेळा असतो. याबाबत विद्यार्थिनी तक्रार करतात. त्यानंतर दखल घेतली जाते.

भंगार वस्तू ठेवल्या

पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एकूण ५०० विद्यार्थिनी शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी एकूण सहा महिला स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. काही स्वच्छतागृहांमध्ये कमोड बसविण्यात आले असले तरी ते वापरण्यासाठी उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्याठिकाणी विविध वस्तू व विनाउपयोगी साहित्य ठेवण्यात आल्याचे दिसून येते. स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन आहे. या स्वच्छतागृहांमध्येही स्वच्छता करण्यात आल्याबाबतचा तक्ता लावण्यात आलेला नाही. स्टाफसाठी दोन वेगळे स्वच्छतागृहे आहेत. अधूनमधून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो.

कमोडची सुविधा नाही

गोपीनाथजी मुंडे इंजिनीअरींग कॉलेजमध्ये ३५० विद्यार्थिनी शिक्षण घेतात. याठिकाणी सहा महिला स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. प्रत्येक स्वच्छतागृहात कमोडची सुविधा उपलब्ध नाही. मात्र पाणी पुरेशा प्रमाणात आहे. तसेच विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहामध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन असून, स्वच्छतेसाठी सी. एस. एन्टरप्रायझेस या संस्थेकडे ठेका देण्यात आलेला आहे. येथील स्टाफसाठी दोन वेगळे स्वच्छतागृहे आहेत. पण, याठिकाणी अनेकवेळा स्वच्छतेचा अभाव दिसून येतो.

स्वच्छतागृहे ही स्वच्छ असून, त्यांची दिवसातून दोनवेळा साफसफाई केली जाते. याचाही शिक्षण संस्थेने ठेका दिलेला आहे. यासोबतच कॉलेजच्या सर्व शिक्षक वर्गासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे देण्यात आलेली आहेत. कॉलेज कॅम्पसमधील सर्व स्वच्छतागृहे नियंत्रणाखाली स्वच्छ ठेवली जातात.

-कैलास गीते, उपप्राचार्य, व्ही. एन. नाईक कॉलेज

आमच्या कॉलेजमध्ये दररोज स्वच्छता केली जाते. सॅनिटरी व्हेंडिंग मशीनसुद्धा नुकतेच लावण्यात आले आहे. त्यांची स्वच्छता खासगी ठेकेदाराकडून करण्यात येते. तर शिक्षकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे देण्यात आलेली आहेत. प्रत्येक स्वच्छतागृहात एक कचराकुंडी ठेवण्यात आली आहे.

-टी. एच. सुतार, प्रभारी प्राचार्य, इंजिनीअरिंग कॉलेज

याठिकाणी स्वच्छतागृहांची स्वच्छता दररोज केली जात नाही. कधी स्वच्छतागृहे स्वच्छ असतात तर कधी स्वच्छ नसतात. त्यामुळे या अस्वच्छतेचा विद्यार्थिनींच्या आरोग्यावर परिणाम होतो. तरी स्वच्छता नियमित करावी.

-वैष्णवी कांबळे, विद्यार्थिनी

सॅनिटरी व्हेंडिंग मशीन आहे परंतु, स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेचा प्रश्न कायम आहे. स्वच्छतागृहात कचराकुंडी उपलब्ध नसून, स्वच्छतागृहाची स्वच्छता कुठल्या वेळी केली जाते त्याचा कुठलाही फलक तेथे लावण्यात आलेला नाही.

-स्वाती सोनवणे, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंडी खाताहेत भाव

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

थंडीच्या हंगामात मांसाहार जास्त केला जात असल्याने अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. बॉयलर अथवा देशी कोंबड्यांच्या अंड्यांना मागणी जास्त आहे. मात्र, त्या तुलनेत आवक कमी आहे. अंड्यांच्या उत्पादनखर्चातही वाढ झाल्याने दर वाढले आहेत.

कांदा, टोमॅटोसह सर्वच भाज्यांच्या दरवाढीने सामान्य माणूस हवालदिल झाला असताना गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी भरविणाऱ्या थंडीमुळे खाद्यप्रेमींकडून मांसाहाराबरोबर अंड्यांनाही विशेष पसंती दिली जात आहे. त्यामुळे, गेल्या चार-पाच दिवसांत शहरात अंड्यांची मागणी वाढली आहे. सध्या शहरातील बाजारपेठेत जिल्ह्याच्या विविध भागांतून व परराज्यातूनदेखील आवक होत आहे. नाशिक शहरात दिवसाकाठी ८ ते १० लाख अंड्यांची मागणी आहे. परंतु, हिवाळ्यात ती थेट १२ ते १५ लाख इतकी होते. किमतीही १ रुपयाने वाढ झाली आहे. यामुळे डझनाच्या भावातदेखील वाढ झाली असली असून, आधी ६० रुपये डझनाने मिळणारे अंडे आता ७ रुपये नग झाले आहे. ‘गावठी’ अंड्याचे भाव १० ते १२ रुपयांवर आहेत. गेल्या आठवड्यापासून भाज्यांच्या चढत्या दराने शाकाहारी लोकांची जमा-खर्चाशी हातमिळवणी सुरू असतानाच, मांसाहारींना प्रिय असलेले अंडे ऐन थंडीच्या दिवसात महाग झाले आहे. होलसेल विक्रीचा शेकडा दर ५०० रुपये असताना तो ५५० ते ५७५ रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे रिटेल बाजारात अंडी दराने चांगलीच उचल घेतली आहे. गेल्या वर्षी जानेवारीत होलसेल भावात एका अंड्याची किंमत चार रुपये होती. यात चढउतार होत डिसेंबरमध्ये अंड्याने पाच रुपयांची मजल गाठली होती. आता दिवाळी संपताच अंड्याच्या उत्पादनात घट होत असते व नियमित व्यायाम व जिम करणाऱ्या युवकांसह खेळाडू यांच्याकडून कच्च्या किंवा उकडलेल्या अंड्यांचा खुराक घेण्यासाठी मागणी वाढते. परिणामी, बाजारात दरही वाढतात. होलसेल दरात वाढ होऊ लागली कि त्याचा परिणाम किरकोळ विक्रीवरदेखील होतो. गत आठवड्यात ५.२० पैशांवर स्थिरावलेल्या अंड्याने रविवरानंतर ६ रुपये दर गाठला आहे.

गावरान अंड्याच्या तुलनेत इंग्लिश अंड्याला ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे. येत्या काळात गावरान अंड्याचे दर स्थिर राहणार असून, इंग्लिश अंड्याच्या दरात किंचितशी वाढ होण्याची शक्‍यता आहे.

- वासुदेव तुलस‌ियानी, होलसेल विक्रेते

युवक या दिवसात व्यायामासोबत अंडी खाण्याला पसंती देतात. एक रुपयाने जरी भाववाढ झाली असली तरी शेकड्यामागे पूर्ण १०० रुपयांची नोट खर्च होणार आहे.

- तौसिफ शेख, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियतीच्या लीला दाखविणारे ‘इडिपस रेक्स’

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

माणसाचे मन, त्याच्या मूलभूत प्रेरणा, त्याच्या आयुष्यावर अधिसत्ता कुणाची, त्याची की अदृश्य नियतीची हे दाखविण्याचा प्रयत्न करणारे तसेच माणूस नियतीच्या हातातील खेळणे कसे आहे याचे विदारक दर्शन ‘इडिपस रेक्स’ या नाटकातून घडविले.

राजा लुईस याची हत्या झाल्यानंतर त्या राज्यावर दुसऱ्या राजाची निवड करायची असते. या राजगादीवर बसणाऱ्याला स्पीच देवीच्या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक असते. या राज्यावर देवीचा कोप झालेला आहे. हे आरिष्ट दूर करण्यासाठी राजा नेमणे आवश्यक असल्याचे राज्यातील आचार्य सांगतात. परदेशातून आलेला मुसाफिर इडिपस हा देवीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो आणि राजराजेश्वर होतो. तो आपल्या शक्तीचे प्रदर्शन घडविण्याचा प्रयत्न करतो. आचार्य त्याला सुनावतात. राजगादीवर बसल्यानंतर कारभार करताना पुन्हा देवीचा कोप होतो. देवीचे कोड्यातील बोलणे त्याला कळत नाही, ते समजून घेण्याचा त्याचा प्रयत्न या नाटकातून दाखविण्यात आला.

मेनली अम्युचर्स या संस्थेने या नाटकाचे सादरीकरण केले. अभय सदावर्ते यांनी अनुवाद केलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन महेश डोकफोडे यांनी केले. प्रा. रवींद्र कदम निर्मिती सूत्रधार तर प्रफुल्ल लेले सूत्रधार होते. सुनील परमार यांचे नेपथ्य, तेजस बिल्दीकर यांचे संगीत, विनोद राठोड यांची प्रकाशयोजना, माणिक कानडे यांचे रंगभूषा तर नेहा मुडावदकर यांची वेशभूषा होती.

नाटकात अमेय कुलकर्णी, अक्षय मुडावदकर, जयदीप लखलानी, आशिष चंद्रचूड, डॉ. प्राजक्ता लेले, महेश डोकफोडे, अनिकेत कुलकर्णी, प्रतीश शर्मा, सुरभी पाटील, हर्षल भट, कैवल्य एखंडे, नेहा मुडावदकर, चिन्मय खोचे, वैभव दीक्षित, शुभम मोगरे, सुरज बोरसे, सुनील परमार, सुयोग भालेराव, विनय सारंधर, भूषण क्षीरे यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक : वंशभेद
स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह
वेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर चुकविणे हा सर्वांत मोठा गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने सरकारने ठरवून दिलेले कर वेळेवर भरणे गरजेचे आहे. करचोरी हा सर्वांत मोठा गुन्हा आहे, असे प्रतिपादन प्रधान आयकर आयुक्त (पुणे) ए. सी. शुक्ला यांनी केले.
सातपूर एमआयडीसीतील निवेक क्लबच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी औरंगाबादचे आयकर आयुक्त के. पी. राव, नाशिकचे आयकर आयुक्त राजेश कुंदन, शंकरलाल मीना, डॉ. नवलजीत कपूर, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, सीए संघटनेचे जयप्रकाश गिरासे यांसह विविध संघटानांचे पदाधिकारी चर्चासत्राला उपस्थित होते.
सीए मंडळींकडूनच व्यावसायिकांना कर चुकविण्याचे अनेक मार्ग दाखविले जातात. सीए यांनीच कर योग्य भरण्यासाठी व्यावसायिकांना प्रोत्साहित केले पाहिजे. तसेच प्रत्येकाने कर भरल्यास देशाच्या आर्थिक विकासात नक्कीच भर पडेल. करचोरी म्हणजे देशाचे आर्थिक नुकसान करणेच आहे. यामुळे प्राप्तिकर चुकविणे हा मोठा गुन्हा असल्याचेही चर्चासत्रात शुक्ला यांनी सांगितले. याप्रसंगी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्राप्तिकर अधिकाऱ्यांपुढे आपले मुद्दे मांडले. यावर प्रधान प्राप्तिकर आयुक्तांनी संघटनांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग समित्यांवर सत्ताधारी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या चार प्रभाग समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया बुधवारी पार पडली. यातील प्रभाग एकच्या सभापदीपदासाठी शिवसेनेच्या कविता किशोर बच्छाव यांचा एकमेव अर्ज आल्याने मंगळवारीच त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे चारपैकी तीन प्रभाग समितीच्या सभापतीपदी काँग्रेसला दोन, शिवसेना व एमआयएमला प्रत्येकी एक सभापदीपद मिळाले.

या प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. पाटील यांच्यासह पालिका आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे, मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बुधवारी दिवसभर ही निवडप्रक्रिया पार पडली. प्रभाग समिती एकच्या कार्यालयात सेनेच्या कविता बच्छाव यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. यावेळी उपमहापौर सखाराम घोडके, ज्योतिबा पाटील, आयुक्त धायगुडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
प्रभाग एक

प्रभाग एकच्या सभापदीपदासाठी शिवसेनेच्या कविता किशोर बच्छाव यांचा एकमेव अर्ज आल्याने मंगळवारीच त्यांची बिनविरोध निवड झाली.

प्रभाग दोन

प्रभाग समिती दोनसाठी काँग्रेसचे विठ्ठल बर्वे तर महागठबंधन आघाडीचे शेख जाहीर शेह जाफिर यांनी अर्ज दाखल केला होता. यात बर्वे यांना सर्वाधिक ११ मते मिळाल्याने त्यांची निवड करण्यात आली. शेख जाहीर यांना ८ मते मिळाली. छाया शिंदे या नगरसेविका अनुपस्थित होत्या.

प्रभाग तीन

या प्रभागासाठी काँग्रेसचे फारूक खान फैजुल्लाह खान यांना सर्वाधिक १३ मते मिळाल्याने ते सभापदीपदी निवडून आले. तर महागठबंधन आघाडीचे अन्सारी साजेदा रशीद यांना १० मते मिळाली एक सदस्य अनुपस्थित होते.

प्रभाग चार

या प्रभागाच्या सभापतीपदी एमआयएमचे शेख मजीद शेख युनुस यांची वर्णी लागली आहे. मजीद यांना ११ मते मिळालीत. तर महागठबंधनचे शेख नसरीन अल्ताफ यांना ६ मते मिळाली. काँग्रेसचे दोन नगरसेवक अनुपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिव्हिल’ला अखेर गवसला दुर्मिळ रक्तदाता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अतिशय दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या बॉम्बे ब्लॅड ग्रुपच्या रुग्ण महिलेला अथक प्रयत्नानंतर नाशिक येथेच रक्तदाता उपलब्ध करून देण्याच सिव्हिल हॉस्प‌िटलमधील यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे या महिलेस जीवदान मिळू शकले आहे.

मूळची निफाड येथील रहिवाशी असलेल्या पूजा सांगळे ही विवाहिता प्रसूतीसाठी सिव्हिलमध्ये दाखल झाल्या. काही वैद्यकीय अडचणींमुळे तिची प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करावी लागणार होती. ती नाजूक असल्याने शस्त्रक्रियेदरम्यान ‌तिला रक्ताची गरज भासली. रक्तगट तपासला असता तिचा अत्यंत दुर्मिळ असा बॉम्बे रक्तगट असल्याचे आढळून आले. जगात १० लाख व्यक्तींमध्ये एखाद्याचाच असा रक्तगट असतो. रक्त देऊ शकेल अशा व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान सिव्हिल प्रशासनापुढे उभे ठाकले. महिलेच्या नातेवाइकांनी प्रयत्न सुरू केले. या गटाचे रक्त मिळविण्याची विनंती मेट्रो रक्तपेढीचे रक्तदूत गौरव शितोळे यांना करण्यात आली. त्यांनी इतर जिल्ह्यांसह मुंबईतही संपर्क साधला. मात्र, रक्त उपलब्ध होऊ शकले नाही. नाशिकमध्येच या रक्तगटाचा एकच तरुण असल्याची माहिती त्यांना मिळाली. शितोळे यांनी त्याच्याशी फोनवर संपर्क साधला. रुग्ण महिलेची माहिती देत रक्तदानातून तिला जीवदान देण्याची विनंती केली. सुशील आरोटे यांनी प्रत्यक्ष रुग्ण महिला व तिच्या नातेवाइकांची भेट घेतली. आणि सिव्हिलमधील मेट्रो रक्तपेढीमध्ये रक्त दिले. यापुढेही गरज भासल्यास गरजू रुग्णांना रक्त देईन, अशी ग्वाही त्यांनी दिली. मानवतेचे दर्शन घडविल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या हस्ते आरोटे यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन वर्षांत राज्याचे ‘सिंचन’

0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

आजपर्यंत पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे प्रतीक्षा करावी लागणार नाही, असे नियोजन प्रगतीपथावर आहे. सुमारे २ हजार ६५ कोटी रुपयांचे ८३ लघुप्रकल्प येत्या दीड वर्षात पूर्ण करू, याप्रमाणेच उर्वरित मध्यम व मोठे मिळून एकूण १०४ सिंचन प्रकल्प तीन वर्षांत पूर्णत्वाला जातील, अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री गिरीष महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आरोग्य विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाजन म्हणाले, राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये अधिकाधिक सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राने १० हजार कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. सिंचन प्रकल्पांसाठी पुरेसा निधी असल्याने राज्यात दीड लाख हेक्टर जमिन क्षेत्र हे ओलीताखाली आणण्याचे उद्द‌ष्टि आहे. येत्या दोन वर्षांत राज्यातील प्रत्येक बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहचविण्याचे सरकारचे नियोजन आहे.

अर्थसंकल्पातील तरतूद, प्रधानमंत्री कृषी सिंचनाद्वारे मिळणारा १७ हजार कोटी रुपयांचा निधी आणि केंद्रात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मान्यता मिळालेला १० हजार कोटी रुपयांचा निधी असे एकत्रित निधीसहाय्य सिंचनाच्या उद्द‌ष्टिाच्या पाठीशी उभे आहे.

भाजप प्रवेशासाठी कुणालाही ऑफर नाही!

भाजपात येण्यासाठी ऑफर मिळाल्याचा दावा औरंगाबादेतील एका आमदारांनी केला असल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना महाजन यांनी अनभिज्ञता दर्शविली. असा कुठलाही प्रकार कानावर नसल्याचे सांगत आमचा पक्ष गल्ली ते दिल्ली सध्या भक्कम स्थितीत असल्याने आम्हाला असल्या ऑफर्स कुणापुढेही ठेवण्याची गरज नाही. याऊलट स्वत:हून पक्षात यायला बाहेरील अनेक दिग्गज तयार आहेत. वेटिंग लिस्ट मोठी आहे. तेथेच विचार करताना आम्हाला वेळ घ्यावा लागतो, तर भाजप इतरांना कशासाठी ऑफर देणार, असाही प्रतिसवाल महाजन यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छता अभियानात माळेगाव प्रथम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील जिल्ह्यातील पहिले पाच लाखाचे पारितोषिक सिन्नर तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांकाचे तीन लाखांचे पारितोषिक दिंडोरी तालुक्यातील अवनखेड व तृतीय क्रमांकाचे दोन लाखाचे पारितोषिक नाशिक येथील दरी ग्रामपंचायतीला मिळाले. बुधवारी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.

जिल्हा परिषदेतर्फे गायकवाड सभागृहात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हा व तालुकास्तरीय पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिलत सांगळे या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनिल कदम, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन.बी. उपस्थित होते. २५ हजाराचा विशेष पुरस्कार चांदवडच्या शिरसाणे, कळवण तालुक्यातील पाळे बु. ,देवळा तालुक्यातील कणकापूर यांना देण्यात आले.

इगतपुरी - उभाडे - बोरटेंभे - पिंपळगाव डुकरा

सिन्नर - माळेगाव - विंचुरदळवी- भाटगाव

निफाड - आहेरगाव - विष्णूनगर - शिवरे

देवळा - कणकापूर - सावकी लो. - भऊर

बागलाण - दहिंदुले - रातीर - जोरण

मालेगाव - सातमाने - निमगांव खु.- मांजरे

दिंडोरी - अवनखेड - लखमापूर - जऊळके वणी

कळवण - पाळे बु.- आठंबे - मानुर

सुरगाणा - धोडांबे - प्रतापगड - रंगतविहिर

नाशिक - दरी - ओढा - वाडगाव

त्र्यंबकेश्वर - कोटंबी हरसुल - अंबई - हिर्डी

पेठ - आडगाव भुवन - बोरवट - हनुमंतपाडा

चांदवड - शिरसाणे- हिरापूर- डोंगरगाव

नांदगाव - गंगाधरी - बोराळे - दहेगाव

येवला - एरंडगाव - बल्हेगाव - नांदुर

हागणदारी मुक्त तालुका पुरस्कार

देवळा, कळवण, नाशिक, निफाड, पेठ, त्र्यंबकेश्वर यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपकडून जनतेची दिशाभूल

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

भाजप सरकार पैशांचा वापर करून जाहिरातबाजीने जनतेची दिशाभूल करीत असल्याचा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी तथा राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी त्र्यंबकेश्वर येथे केला. नगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारी राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यात आला. त्यात पाटील यांनी कार्यकर्त्यांना मागर्दशन केले.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे येथे राजकीय धुराळा उडत आहे. कार्यक्रर्त्यांना मार्गदर्शन करतांना पाटील म्हणाले, माजी सार्वजन‌कि बांधकाम मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी चौपदरी रस्त्यासह विकासकामे केली आहेत. तसेच नोटाबंदीनंतर आयकर खात्याने पुरोहितांवर केलेल्या कारवायांचा राष्ट्रवादीने विरोध करत आवाज उठवला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून चरित्रसंपन्न उमेदवार देऊन निवडणूक

लढव‌लिी जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

आघाडीबाबत मौन

या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होईल की नाही याबाबत त्यांनी स्पष्ट मत न देता सर्वानुमते वरिष्ठ पातळीवर हे ठरविण्यात येईल असे सांग‌तिले. तालुक्याचा आणि शहराचा आढावा घेत असतांना त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या आणि विविध सेलप्रमुखांच्या अल्प उपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान या बैठकीसाठी कार्यकर्त्यांसह पदाधिकारी दुपारी एक वाजेपासून वेटिंगवर होते. ती बैठक चार वाजता सुरू झाली. जयंत पाटील यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली. या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, शहराध्यक्ष मनोज काण्णव, अरूण मेढे, जिल्हायुवक अध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत आज बैठक

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिकपाठोपाठ आता मालेगाव शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील एकूण ९ मंदिरांच्या व्यवस्थापक व विश्वस्तांसोबत आयुक्त धायगुडे यांनी बैठक घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र बैठकीत रात्री उशिरापर्यंत कुठलाही निर्णय न झाल्यामुळे गुरुवारी शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी, मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

बुधवारी सायंकाळपर्यंत ही मंदिरे तशीच असल्याने गुरुवारी पालिका प्रशासनाकडून अधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात येवून अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

प्रशासन सज्ज

सर्वेक्षणानुसार शहरातील १७ मंदिरे २००९ नंतर अतिक्रमित जागेत असल्याचा अहवाल देण्यात आला होता. यातील सहा मंदिरे विश्वस्तांनी विधिवत हटविली होती तर दोन मंदिरांचे अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र उर्वरित ९ मंदिरे अनधिकृत धार्मिक स्थळे असून देखील हटविण्यात आले नव्हते. अखेर या ९ मंदिरांवर बुलडोजर चालवण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत याआधीही अनेकवेळा कारवाईची तयारी करण्यात आली होती. मात्र विविध कारणांनी या कारवाईला थोपविण्यात आले.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याबाबत गुरुवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नादुरुस्त वाहनांचा ठिय्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनेक रस्ते नादुरुस्त वाहने उभी करण्याचे जणू हक्काचे ठिकाण बनत असून त्यामुळे रहदारीलाही अडथळा निर्माण होऊ लागला आहे. या वाहनांचा वाली कोण? आणि या वाहनांना हटविण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थ‌ित होऊ लागला आहे.
हल्ली वाहन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. त्यामुळे घरोघरी आणि बहुतांश नागरिकांकडे किमान मोटारसायकल तरी असते. कार व तत्सम वाहने खरेदी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. परंतु, ही वाहने जुनी झाली की कालांतराने अनेकदा नादुरुस्तदेखील होतात. अशा वाहनांची जागा मग नवीन वाहने घेतात. त्यामुळे जुन्या वाहनांना सांभाळायचे कसे? असा प्रश्नही उपस्थ‌ित होतो. ती उभी करण्यासाठी वाहन मालकांकडे पुरेशी जागाही नसते. अशा वाहनांसाठी सार्वजनिक रस्तेच आधार ठरू लागले आहेत. नादुरुस्त वाहनांचे इंजिन काम करीत नसले तरी त्यामधील अन्य स्पेअर पार्टस मात्र उपयुक्त असतात. म्हणूनच अशी वाहने सरसकट भंगार जमा करण्याऐवजी ती रस्त्यांवरच उभी करून त्यावर येता जाता लक्ष ठेवण्याचे प्रकारही निदर्शनास येऊ लागले आहेत.
सर्वच प्रकारची अनेक वाहने शहरातील रस्त्यांवर महिनोनमहिने बेवारस अवस्थेत पहावयास मिळतात. विशेष म्हणजे भंगार व्यावसायिकांनी किलोच्या भावाने खरेदी केलेली किंवा गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली वाहनेही सार्वजनिक रस्त्यांलगत उभी केली जात असून त्यामुळेही रहदारीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे.

सर्व्ह‌िस रोड बनले हक्काचे ठिकाण
वाहने उभी करताना वाहनमालक, भंगार तसेच गॅरेज व्यावसायिकांनी शहरातील सर्व्ह‌िसरोडचा अधिक प्रमाणात वापर केला आहे. पाथर्डी फाट्यापासून जत्रा हॉटेलपर्यंतच्या सर्व्ह‌िस रस्त्यावर अशी वाहने मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. याखेरीज मुंबई नाका, शिंगाडा तलाव, एन. डी. पटेल रोड, नाशिक-पुणे, नाशिक-त्र्यंबक, नाशिक-औरंगाबाद अशा महामार्गावरही वाहने बेवारस अवस्थेत उभी केल्याचे पहावयास मिळते.

द्वारका, पंचवटीत सर्वाधिक वर्दळ
शहरातील रस्त्यांवर कारपासून रोडरोलरपर्यंतची वाहने अनेक महिन्यांपासून धूळखात पडून आहेत. काही ठिकाणी केवळ पत्र्याच्या सांगाड्याच्या रुपात ही वाहने तर काही वाहने इंजिनासह नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत. विशेष म्हणजे द्वारका, पंचवटी यासारख्या वर्दळीच्या परिसरांतही अशी वाहने असून त्यामुळे वाहतुकीच्या समस्येलाही हातभार लागतो आहे. ही वाहने दुरुस्त करण्याचा खर्च अधिक असल्याने स्पेअर पार्टससाठी ती तशीच सांभाळली जात असल्याचेही सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरूणावर प्राणघातक हल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुन्या वादाची कुरापत काढून एका तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. शिवाजीनगर परिसरात हा प्रकार घडला. तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चौघांना गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आकाश पवार, सागर खाडे, विजय उर्फ पप्पू बागुल (रा. सर्व शिवाजीनगर) आणि कमलेश पाटील (रा. यशोधन अपा. गंगापूर) अशी अटक केलेल्या संशय‌ितांची नावे आहेत. किशोर प्रकाश पाटील (२८, रा. रु‌ख्मिणी मंदिराजवळ, शिवाजीनगर) या तरूणाने फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री तो घरी असताना संशय‌ितांनी संपर्क साधून त्याला बाहेर बोलावले. यावेळी आकाश पवार याने ‘‘तू मला ओळखत नाही का? माझ्या मित्रांना का नडतो?’’ असा प्रश्न करीत जुन्या भांडणाची कुरापत काढली. त्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पोटावर, छातीवर चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. गंगापूर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून चारही संशय‌ितांना ताब्यात घेतले आहे.

सरस्वतीनगरला भरदिवसा चोरी
सरस्वतीनगर परिसरात भरदिवसा चोरीची घटना घडली असून ८४ हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे. मागील दरवाजातून घरात शिरलेल्या चोरट्याने रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुशांत तानाजी मगर (रा. श्रीपाद कॉलनी, आडगाव लिंक रोड, सरस्वतीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. दुशांत व त्याची आई मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यावेळी आईने पुढील दरवाजास आतून कडी लावून पाठीमागील दरवाजा ओढून घेतला होता. चोरट्यांनी मागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधत कपाटातील अडीच हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ८४ हजार २५० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सावतानगरमध्ये मारहाण
कामावरून घरी परतणाऱ्या तरूणास रस्त्यामध्ये अडवून टोळक्याने बेदम मारहाण केली. सिडकोतील सावतानगर परिसरात ही घटना घडली. खिशातील २० हजार रुपयांची रोकड गहाळ झाल्याचे तरूणाने अंबड पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सुभाष मदन राठोड (२७, रा. गुरूदत्त चौक, सावतानगर) याने फिर्याद दिली आहे. तो सोमवारी (दि. १३) रात्री घराकडे पायी जात असताना ही घटना घडली. सावतानगर येथील पिठाच्या गिरणीजवळ उभ्या असलेल्या टोळक्याने काही एक कारण नसताना राठोड यांचा रस्ता अडवून बेदम मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत राठोड यांच्या खिशातील २० हजार रुपयांची रोकड गहाळ झाली.

मेडिकल दुकानदारास मारहाण
चॉकलेटचे पैसे मागितल्याचा राग आल्याने टोळक्याने दुकानात शिरून मेडिकल दुकानदारास मारहाण केली. कामटवाडा परिसरात ही घटना घडली असून अंबड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
अभिषेक सुदाम जायखेडकर (रा. बंदावणेनगर, कामटवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे कामटवाडा परिसरात सदगुरू नावाचे मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स आहे. दर्शन दोंदे व त्याच्या काही साथीदारांनी मंगळवारी (दि. १४) रात्री किंडर जॉय नावाचे चॉकलेट खरेदी केले. जायखेडकर यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले. त्यामुळे संतप्त झालेल्या टोळक्याने शिवीगाळ करीत दुकानात शिरून जायखेडकर यांना जबर मारहाण केली.

बिबट्याचा जनावरांवर हल्ला

देवळाली कॅम्प : दारणा गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार अनेक नागरिकांना अनुभवला आहे. बिबट्याकडून परिसरातील पाळीव जनावरांवर हल्ला केला जात आहे. तरी या घटनांची वन विभागाने लवकर दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शेवगे दारणा येथील ढोकणे आणि पाळदे वस्तीवर भरत ढोकणे आणि ज्ञानेश्वर पाळदे यांचे वासरू व पारडू मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने फस्त केले. यानंतर परिसरात बिबट्यांची दहशत पसरली आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्याला लवकर जेरबंद करावा अशी मागणी भाजप सरचिटणीस शरद कासार यांच्यासह किरण पाळदे, ज्ञानेश्वर पाळदे, नारायण पाळदे, भरत ढोकणे, अनंत कासार आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images