Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आज ‘द मॅन विदाउट पास्ट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. १८) सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फिनलँडचे दिग्दर्शक अकी कौरीस्माकी यांचा ‘द मॅन विदाउट पास्ट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे दाखविण्यात येणार आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

फिनलँडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अकी कौरीस्माकी हे त्यांच्या सहज सुंदर, हलक्या फुलक्या, नर्मविनोदी परंतु तितक्याच चमत्कृतीपूर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची प्रमुख पात्रे सर्व सामान्य फिनलँडर असतात. सर्व सामान्यांची सुख दुखे:, त्यांच्या जीवनातील चढउतार ते तटस्थपणे नेटकेपणाने टिपतात. हा चित्रपट एका वेल्डरची गोष्ट आहे. काही चोरटे पार्कमध्ये त्याच्यावर हल्ला करतात. डोक्यावरील आघाताने मृत्यू व नंतर तात्पुरती विस्मृती आलेला चित्रपटाचा नायक जणू पुर्नजन्म घेऊन नवे आयुष्य शोधतो. त्यात गत आयुष्याच्या खुणा सापडतात का? हे जाणून घेण्यासाठी ‘द मॅन विदाउट पास्ट’ हा चित्रपट पाहणे रंजक ठरणार आहे. फिनलँड येथे २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९७ मिनिटांचा आहे. चित्रपट बघण्यास अधिकाधिक रसिकांनी यावे, असे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन युवतीचा स्टेशनवाडीत विनयभंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवागीळ केल्याचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या तरुणाने अल्पवयीन युवतीचा विनयभंग केला. ही घटना सिन्नर फाटा परिसरातील स्टेशनवाडी भागात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तरुणास अटक केली असून, त्याच्याविरूध्द विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इकबाल शेरू शेख (रा. गोदरेजवाडी, सिन्नरफाटा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. विष्णूनगर येथील स्टेशनवाडी भागात राहणाऱ्या १७ वर्षीय युवतीच्या फिर्यादीनुसार, संशयित तरुण बुधवारी (दि. १५) सायंकाळी शिवागाळ करीत युवतीच्या घराच्या दरवाजाजवळ आला. आमच्या घरासमोर कोणास शिवीगाळ करतो, असा जाब युवतीने विचारल्याने ही घटना घडली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोमवार पेठेतील दिल्ली दरवाजा परिसरात राहणाऱ्या गणेश जनार्दन पवार (२५, रा. नारायण निवास, दिल्ली दरवाजा) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवारने अज्ञात कारणातून शुक्रवारी सकाळी आपल्या राहत्या घरातील लाकडी आड्याला बेडशिट बांधून गळफास लावून घेतला होता. घटनेचा अधिक तपास हवालदार पाळदे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दुचाकींची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरातून तीन दुचाकी चोरीस गेल्या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. शिवाजी केशवराव जाधव (रा. बाळकृष्ण अपा, हनुमानवाडी) यांची सुमारे एक लाख रुपयांची बुलेट (एमएच १५ एफएक्‍स ००८७) सोमवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरी गेली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
दुसरी घटना नवीन आडगावनाका परिसरातील स्वामी नारायण नगर भागात घडली. निवृत्ती कुशाबा आहेर (रा. शिवनंदन बंगला) यांची स्प्लेंडर (एमएच १५ बीके ११३८) शनिवारी (दि. ११) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. आडगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत. दरम्यान, उत्तमनगर येथील राजेंद्र वामन नहिरे (रा. आनंद अपा. बुरकुले हॉलजवळ) यांची डिओ (एमएच १५ जीबी ६९१९) शुक्रवारी रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी हातोहात लांबवली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाली गावात दोघांना लुटले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोघा सख्या भावांना रस्त्यात अडवून तिघांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना देवळाली गावात घडली. घटना घडून गेल्यानंतर तीन महिन्याच्या अंतराने या प्रकरणी कोर्टाच्या आदेशान्वये उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.
कुणाल अनिलगिरी गोसावी (३१), सागर अनिलगिरी गोसावी (२९) आणि राम अनिलगिरी गोसावी (२७ रा. तिघे गोसावी बिल्डींग, एमजीरोड, म्हसोबा मंदिर देवळालीगाव) अशी संशयितांची नावे आहेत. दत्तमंदिर परिसरातील गिरीराम अरविंद क्षीरसागर आणि मयुराम गिरीराम अरविंद क्षीरसागर हे दोघे भाऊ २८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास देवळाली गावात गेले होते. काम आटोपून म्हसोबा मंदिर परिसरातून जात असतांना संशयितांनी दोघा भावांचा रस्ता अडवला. तसेच बेदम मारहाण केली. त्यात मयुराम गंभीर जखमी झाले होते. यावेळी संबंधितांनी गिरीराम यांच्या गळ्यातील सोनसाखळी, हातातील अंगठी आणि महागडा मोबाइल असा सुमारे ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल काढून घेत पोबारा केला होता. या घटनेनंतर दोघा भावांनी पोलिसाकडे धाव घेतली. मात्र, संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेत संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पी. बी. बाकले करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदनगरमध्ये उद्या बुद्धिबळ स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे चेस फेस्टिव्हल २०१७ अंतर्गत २२ ते ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या यू-११, बिलो १६०० येलो व तसेच ओपन रेटिंग स्पर्धेसाठी नाशिकमधील खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणात खेळण्याची तयारी करण्यासाठी रविवारी (दि. १९) फ्रेंड्स सर्कल बुद्धिबळ स्पर्धा भरविण्यात आली आहे.

बुद्धिबळ स्पर्धा सकाळी नऊ वाजता होणार आहे. खालील प्रमाणे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. खुल्या गटात रोख स्वरुपाचे पारितोषिक देण्यात येईल. अनुक्रमे प्रथम क्रमांक २१०० रुपये, द्वितीय : १५०० रुपये, तृतीय : १००० रुपये व चौथ्या क्रमांकाला ७०० रुपये तर पाचव्या क्रमांकाला ५०० रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. नवीन खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी प्रत्येक गटासाठी ५ ट्रॉफी पारितोषिक म्हणून देण्यात येतील. स्पर्धा गोविंदनगर येथील सागर स्वीटच्याजवळील जिजाऊ हॉलमध्ये होणार आहे. स्पर्धेत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी गणेश ताजणे (९७६७७२८५८१) श्रेया चिटणीस, अर्चना कुलकर्णी, वेदांत आमडेकर यांच्याशी संपर्क साधावा. राज्य व जिल्हा संघटना यांच्या सहकायाने ही स्पर्धा भरविली असून ख्यातनाम बुद्धिबळ खेळाडु गणेश ताजणे, संघटनेचे संदीप नागरे, ख्यातनाम कोच ओंकार जाधव यांनी जिल्हा संघटनेने अधिकृत केलेल्या स्पर्धा खेळाव्या असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अक्षरमानव’तर्फे साहित्य कार्यशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या अक्षर मानव या साहित्य चळवळीतर्फे शनिवारपासून (दि. १८) शहरात दोन दिवसीय साहित्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत साहित्याच्या विविध प्रकारांवर विविध मान्यवर सहभागींशी संवाद साधणार आहेत.

अक्षर मानवतर्फे विश्वास लॉन्सच्या बोटक्लब हाऊस येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत शनिवारी (दि. १८) आणि रविवारी (दि. १९) अशी दोन दिवस ही कार्यशाळा रंगणार आहे. यात ‘कथा’ या विषयावर ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे हे सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. तर ‘रिपोर्ताज आणि अनुवाद’ या विषयावर पत्रकार अपर्णा वेलणकर या संवाद साधतील. ‘कविता’ या विषयावर प्रकाश होळकर आणि किशोर वाघ गप्पा मारणार आहेत. तर एकूण साहित्य या विषयावर राजन खान हे मार्गदर्शन करणार आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्यांच्या निवास व भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाधिक तरुण लेखक, कवींनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अपर्णा क्षेमकल्याणी (९४२०६९५००४) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांविरोधात मुंबईत आज बैठक

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाभिक समाजाबद्दल कथित बदनामीकारक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाभिक समाजाच्या सर्व संघटनांनी एकजूट करत एल्गार करण्याचा निर्णय घेतला आहे. नाभिक समाज संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी (दि. १८) दुपारी २ वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिर, बांद्रा वेस्ट, मुंबई येथे होणार आहे.

आगामी काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी समाजाच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची ही बैठक होत आहे. बैठकीनंतरपुढील ध्येय-धोरण ठरविण्यात येणार आहे. बैठकीस सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भगवानराव बिडवे, कल्याण दळे, दत्ता अनारसे, शशिकांत चव्हाण, पुंडलिकराव केळझकर आदींनी केले आहे.

आंदोलनाची रुपरेषा ठरविणार
मुख्यमंत्री नाभिक समाजाची जाहीरपणे माफी मागत नाही तोपर्यंत निषेध नोंदविण्याबरोबर भाजप सरकारविरोधी प्रचार करण्याचा निर्णय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. समाज प्रति‌निधींच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठीच्या आंदोलनाची रुपरेषा ठरविली जाणार आहे.

दुकाने बंदचा निर्णय मागे
महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी एकत्र येत दुकाने बंद ठेऊन तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत जाहीर निषेध व्यक्त करण्याबाबत सोशल मीडियाच्या मेसेज फिरत आहे. मात्र, या मेसेजमधील ‘दुकाने बंद’चा निर्णय मागे घेण्यात आला असल्याची माहिती भगवान बिडवे यांनी ‘मटा’शी बोलतांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नाशिक शहर आणि जिल्ह्यातील नाभिक बांधवांनी तीव्र निषेध नोंदविला. नाभिक व्यावसायिकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले ते त्यांनी सिद्ध करून दाखवावे नाहीतर समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात फडणवीस यांनी ‘एक न्हावी चार-पाच गिऱ्हाईकांची‌ अर्धी-अर्धी हजामत करतो आणि त्यांना बसवून ठेवतो’, असे नाभिक समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यात ठिकठिकाणी नाभिक समाज बांधवांच्या वतीने निषेध केला जातो आहे. नाशिकमध्येही शुक्रवारी दुपारी नाभिक बांधव काळ्या फित बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित जमले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निषेधाबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि त्यापूर्वीपासून नाभिक समाज प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि विश्वासू म्हणून ओळखला जातो. अशा इमानदार म्हणून नावलौकिक असलेल्या समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या फडणवीस यांचा यावेळी तीव्र शब्दांमध्ये धिक्कार करण्यात आला. कोणत्याही सलूनमध्ये व्यावसायिक एकाचवेळी चार-पाच ग्राहकांची अर्धी हजामत करून त्यांना बसवून ठेवत नाही. फडणवीस यांनी त्यांचे वक्तव्य सिद्ध करून दाखवावे, असे खुले आव्हान समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिले. फडणवीस यांनी त्यांचे वक्तव्य सिद्ध केल्यास सकल नाभिक समाजातर्फे त्यांचा भव्य सत्कार घडवून आणू, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. मात्र, ते त्यांचे वक्तव्य सिद्ध करणार नसतील तर त्यांनी जाहीरपणे नाभिक समाज बांधवांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामध्ये समाजातील पदाधिकारी नारायण यादव, दिलीप तुपे, अशोक सूर्यवंशी, सुभाष बिडवई, राजेंद्र तासकर, संजय वाघ, पंकज पगारे, अरुण सैंदाणे, दिलीप बोरसे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यमल्हार स्पर्धेत बोरस्ते विद्यालय प्रथम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि सह्याद्री वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नृत्यमल्हार या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेसाठी नाशिकच्या ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयाचा संघ पात्र ठरला आहे.

भाभानगर परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात नुकतीच विभागीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बोरस्ते विद्यालयाच्या मोठ्या गटाने आदिवासी (पावरी) नृत्य सादर करत विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत प्रतीक्षा भरवीरकर, वेदिका हुजरे, पूनम गायकवाड, झोया शेख, गौरी कहार, इच्छा मोरे, प्रज्ञा, रोहन, प्रकाश, ऋषी चौधरी, साहिल यशवंते, नाहीद खाटिक, मोहम्मद खाटीक या विद्यार्थ्यांना सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख मोरे, एस. आर, आगळे, एस. एम. आहेर यांचे मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य आर. जी. ढिकले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रक्रिया वेळकाढू, घोटाळे गतिमान!

0
0

मटा मालिका ः वणवण ठेवीदारांची

भाग ३

---

प्रक्रिया वेळकाढू, घोटाळे गतिमान!

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT



नाशिक : महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) वर्षाकाठी सहा ते सात गुन्हे दाखल होतात. हळूहळू हे प्रमाण वाढत असून, गुंतवणूकादारांनीच घोटाळेबाज कंपन्या अथवा एजंटांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.

एमपीआयडी कायदा आला, त्यावर्षी म्हणजे १९९९ मध्ये तीन गुन्हे दाखल झाले होते. त्यातील चेअरमन, लॉइड फायनान्स लिमिटेड कंपनीविरोधात दाखल झालेल्या खटल्याचा अद्याप निकाल लागलेला नाही. त्यानंतर सन २००० मध्ये तीन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. २००१ आणि २००२ मध्ये प्रत्येकी सहा गुन्हे पोलिसांकडे नोंदविण्यात आले. २००३ मध्ये एमपीआयडी कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या आठच्या घरात पोहोचली. यात इंडिया नागरी सहकारी पतसंस्था, मध्य प्रदेश इलेक्ट्रिसिटी बोर्ड, सुमन मोटेल्स, महाराष्ट्र अॅग्रिटेक लिमिटेड कंपनी, चेअरमन पीअरसेल फायनान्स अॅण्ड इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड अशा मोठ्या प्रकरणांचा समावेश होता.

२००४ मध्ये गुन्ह्यांची संख्या खाली सरकून पाच झाली. २००५ मध्ये सर्वाधिक म्हणजे १० मोठे घोटाळे समोर येऊन त्यांची पोलिसांनी नोंद केली. मोठ्या प्रमाणावर फसवणुकीची प्रकरणे समोर येत असताना संशयित आरोपी किंवा गुंतवणूकदारांवर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. २००६ मध्ये सहा गुन्हे दाखल झाले. २००७ ते २०१३ या काळात नाशिक जिल्हा कोर्टात एकही प्रकरण दाखल झाले नाही. २०१४ मध्ये महाराष्ट्रात गाजलेल्या केबीसी घोटाळ्यासह एकूण पाच प्रकरणे समोर आली. २०१६ मध्ये मैत्रीयसह सहा आणि २०१७ मध्ये हाऊस ऑफ इन्व्हेसमेंट, प्रमोद भाईचंद रायसोनी, विनय प्रभाकर फडणीस यांच्यासह नऊ गुन्हे एमपीआयडी कायद्यानुसार दाखल करण्यात आले आहेत.

--

तपासातील त्रुटींचा गैरफायदा

एमपीआयडी कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांतर्गत २००३ पर्यंत एखादा अपवाद वगळता बऱ्याचशा खटल्यांची निर्गती झालेली दिसते. म्हणजे २००३ नंतर बहुतांश दाखल खटले अद्याप निकालासाठी प्रलंबित आहेत. गुन्ह्याची निर्गती होण्याचा कालावधी मोठा असून, गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याचे प्रमाण अवघे ३० टक्केच आहे. बहुतांश गुंतवणूकदार पैसे आणले कोठून व दिले कसे हेच सिद्ध करू शकत नाहीत. अनेकदा तपासकामातदेखील त्रुटी राहत असल्याचा गैरफायदा उचलला जातो.

क्रमशः

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी बँकांमधूनही आवास योजनेचा लाभ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता लीड बॅँकेबरोबरच सहकारी आणि खासगी बॅँकांमधूनही घरकुल लाभार्थ्यांना कर्जासह अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. कागदपत्रांच्या जाचक अटी-शर्तींमुळे लीड बँकांकडून लाभार्थ्यांना कर्ज देताना टाळाटाळ केली जात असल्याने पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीसाठी आता सहकारी बँकांचीही दारे आता उघड करण्यात आली आहे. राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी नाशिक येथे आयोजित बैठकीत या संदर्भातील निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.

केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे देण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ सुरू केली आहे. मुंबईसह राज्यातील ५१ शहरांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची आढावा बैठक शनिवारी प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत विभागीय महसूल आयुक्तालयात पार पडली. या योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी चार घटक ठरविण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या घटकात झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत झोपड्या आहे, त्याच जागेवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. ही योजना फक्त आर्थिक दुर्बल घटकांसाठी असून, त्यातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून १ लाख रुपये व राज्य सरकारकडून १ लाख रुपये असे दोन लाख रुपये अनुदान मिळणार आहे. दुसरा घटक हा कर्जसंलग्न अनुदान योजनेचा आहे. तिसऱ्या घटकात गृहप्रकल्पात ३५ टक्के घरे गरिबांसाठी राखीव ठेवण्यात येतात. त्यात त्यांनाही अडीच लाखाचे अनुदान दिले जाते. चौथा घटक हा वैयक्तिक घरबांधणीसंबंधी आहे. स्वत:च्या मालकीच्या जागेवर नवीन घर बांधणे किंवा जुन्या घराची वाढ करणे यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून २.५० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आवास योजनेची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी या बैठकीत सादर केली. मात्र, बँकांची अडचण येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर लीड बॅँकेबरोबरच सहकारी, तसेच खासगी बॅँकांमार्फतही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे म्हैसकर यांनी स्पष्ट केले. यासाठी महापालिकेने संबंधित बॅँकांकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा. खासगी जागांवरील झोपडीधारकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारच्या वतीने लवकरच धोरण जाहीर केले जाईल, अशी माहितीही या वेळी म्हैसकर यांनी दिली आहे.

घरकुलांसाठी अर्जांचा पाऊस

झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणात ४५ हजार २४८ लाभार्थी आढळून आले आहेत. याशिवाय मागणी सर्वेक्षणात अर्ज सादर करणाऱ्या ५० हजार ९६३ पैकी ४४ हजार ४७४ लाभार्थी छाननीअंती पात्र ठरले आहेत. यात कर्जसंलग्न अनुदान योजनेसाठी १०,१५७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९३२० लाभार्थी पात्र ठरले आहेत. खासगी विकासक किंवा खासगी कंपन्यांच्या सहभागातून बांधण्यात येणाऱ्या गटाकरिता प्राप्त ३८,७५७ अर्जांपैकी ३४,५४० लाभार्थी पात्र ठरले आहेत, तर खासगी जागेवर वैयक्तिक घरबांधणीसाठी प्राप्त २०४९ पैकी ६११ लाभार्थी पात्र ठरले आहेत. त्यामुळे पालिकेची घरकुल योजना राबवताना कसरत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरे ग्रामपंचायत टेक्नोसॅव्हीच्या दिशेने

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नागरिकांना आपल्या समस्या व तक्रारी घरबसल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडे मांडता याव्यात यासाठी हेल्पलाइन क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देत एकलहरे ग्रामपंचायत आता टेक्नोसॅव्ही झाली आहे.

एकलहरेच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ग्रामपंचायत हेल्पलाइन क्रमांकाचेही उद्घाटन करण्यात आले. एकलहरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा सरपंच प्रथमच थेट जनतेतून निवडून देण्यात आला. ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी जाधव यांना सरपंचपदाचा मान मिळाला असला, तरी या पॅनलला बहुमत प्राप्त करता आलेले नव्हते. या ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी पदभार स्वीकारला. या कार्यक्रमात माजी सरपंच राजाराम धनवटे, जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे, नगरसेवक प्रशांत दिवे, दीक्षा लोंढे, हरीश भडांगे, दिनेश जाधव, राहुल खाडे आदींच्या उपस्थितीत ग्रामपंचायत हेल्पलाइन क्रमांकाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सदस्या वैशाली धनवटे, नीलेश धनवटे, निर्मला इंगळे, सुरेखा जाधव, कांता पगारे, रुपाली कोकाटे, विश्वनाथ होलीन, बबन राजोळे, दिलीप राजोळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

पहिली ग्रामपंचायत

अशी हेल्पलाइन क्रमांक सुरू करणारी एकलहरे ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. ७ हजार ४६९ लोकसंख्या असलेल्या एकलहरेतील नागरिकांना या सुविधेमुळे आता आपल्या समस्या मांडण्यासाठी थेट ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही. ९८२२८२३७८९ हा एकलहरे ग्रामपंचायतीचा हेल्पलाइन क्रमांक असून, या क्रमांकावर नागरिकांनी समस्या नोंदविल्यास या समस्यांची ग्रामपंचायत प्रशासनाकडून तात्काळ दखल घेऊन सोडवणूक केली जाणार आहे.

सरपंचांचा पुढाकार

एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांनी नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. पाणीपुरवठा व गुणवत्ता, गटार योजना, स्वच्छता, पथदीप, आरोग्य, रस्ते यांसारख्या नागरी सुविधांविषयक प्रश्नांसह ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवांविषयक समस्या या हेल्पलाइनद्वारे नागरिकांना मांडता येणार आहेत. सरपंच स्वतः या हेल्पलाइनद्वारे मिळालेल्या समस्यांची सोडवणूक करण्यावर भर देणार आहेत.

--

एकलहरे ग्रामपंचायत हद्दीचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे नागरिकांना आपापल्या भागातील समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधणे गैरसोयीचे व वेळखाऊ ठरत होते. नागरिकांना आपली तक्रार, समस्या सहज व कमी वेळेत घरबसल्या मांडता यावी, या उद्देशाने हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.-

-मोहिनी जाधव, सरपंच, एकलहरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडीक जागांवर पीकपेरा!

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

सरकारच्या कूळ कायदा नियम १९६३ नुसार तीन वर्षांहून अधिक काळ पडून असलेली शेतजमीन महसूल विभागाकडून ताब्यात घेतली जाते. मात्र, नाशिक जिल्ह्यात पीकपेरा लावा अन् गुंतवणूक करा, अशीच काहीशी स्थिती दिसून येत आहे. हजारो एकर शेतजमीन केवळ पीकपेरा लावून पडून असल्याने याप्रश्नी महसूल विभाग कारवाई करणार केव्हा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे धनदांडगे व राजकीय पुढाऱ्यांच्याच शेतजमिनी वर्षांनुवर्षे पडून राहत असल्याने त्याकडे महसूल विभागच कानाडोळा करीत असल्याचा आरोप होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. देशात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश आहे. त्यातच केंद्र सरकारने नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश केला आहे. त्यामुळे साहजिकच नाशिक शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने गुंतवणूकदारांची संख्याही वाढली आहे. उद्योग, व्यवसाय व शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे नाशिक जिल्ह्यात पसरत असल्याने अनेक मोठे गुंतवणूकदार जिल्ह्यात गुंतणूक करण्यावर भर देताना दिसतात. गुंतणूक वाढत असल्याने नाशिक जिल्ह्याचीही भरभराट होताना दिसत आहे.

अर्थकारणातून दुर्लक्ष?

एकीकडे उद्योगांसाठी जमिनी अधिग्रहित करण्यासाठी संघर्ष सुरू आहे, तर समृद्धी महामार्गाला लागणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी प्रशासनाची मोठी कसरत पाहायला मिळत आहे. त्यातच दुसरीकडे हजारो एकर शेतजमिनी पडून असल्याने महसूल विभागाने त्या तात्काळ ताब्यात घ्याव्यात, अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे शहरालगत पडून असलेल्या जमिनींवर चक्क गहू, ज्वारी, बाजरी व इतर पिके लावलेली असल्याची तलाठ्यांकडे नोंद केली जाते. परंतु, प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचे पीक या शेतजमिनींवर घेतले जात नसूनदेखील महसूल विभाग अर्थकारणातून याप्रश्नी डोळेझाक करताना दिसत आहे.


कागदोपत्री शेतीची नोंद

अनेक गुंतवणूकदारांकडून खरेदी करण्यात आलेल्या शेतजमिनी वर्षानुवर्षे रानमाळासारख्या पडून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकारच्या कूळ कायदा अधिनियम १९६३ नुसार तीन वर्षांहून अधिक काळ पडून असलेली शेतजमीन महसूल विभागाकडून नोटीस देत ताब्यात घेण्यात येते. परंतु, नाशिक शहर व जिल्ह्यात हजारो एकर शेतजमीन गेल्या अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहे. गुंतवणूकदारांकडून केवळ पीकपेरा लावत शेती असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात येते. त्यामुळे पडून असलेल्या शेतजमिनींना बकाल रूप आल्याचे चित्र आहे.

---

कूळ कायदा अधिनियम १९६३ नुसार तीन वर्षांहून अधिक काळ पडून असलेली शेतजमीन महसूल विभागाला ताब्यात घेण्याचा अधिकार आहे. परंतु, महसूल विभागाकडूनच अशा जमिनींवर पीकपेरा लावत हात झटकण्याचे काम केले जाते.

- बाळासाहेब बंदावणे, शेतकरी

---

शहराला लागून असलेल्या २३ खेड्यांचा समावेश महापालिकेत करण्यात आला आहे. खासगी विकसकांनी शेतकऱ्यांकडून शेतजमिनी खरेदी केल्या. परंतु, वर्षानुवर्षे त्या पडून अाहेत. त्याकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

- संदीप पवार, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक्स असोसिएशन अध्यक्षपदी अजय ब्रह्मेचा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजय ब्रह्मेचा यांची निवड झाली. नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांची कार्याध्यक्षपदी, तर यशवंत अमृतकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गोविंदनगर येथे असोसिएशनच्या प्रशासकीय कार्यालयात उपनिबंधक संजय गिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड झाली.

या निवडीनंतर ब्रह्मेचा यांनी नागरी सहकारी सभासद बँकांच्या सध्या असलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, तसेच नोटाबंदी व त्यानंतर अलीकडेच लागू करण्यात आलेला वस्तू व सेवाकर यामुळे नागरी सहकारी बँकांना व सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यादृष्टीने असोसिएशनमार्फत आवश्यक ते मार्गदर्शन करून मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे नागरी सहकारी बँकांमध्ये आवश्यक असणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सहकारी बँकांना त्यांच्या ग्राहकांसाठी तत्पर व दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

या बैठकीत असोसिएशनचे माजी अध्यक्ष भास्करराव कोठावदे, विश्वास ठाकूर, दत्ता गायकवाड, यशवंत अमृतकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ संचालक किसनलाल बोरा, अॅड. लक्ष्मण उगावकर, डाॅ. शशीताई अहिरे, नानासाहेब सोनवणे, अशोक व्यवहारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्टाचे ट्रेनिंग सेंटर नाशिकला

0
0

नाशिक ः नाशिकला विविध प्रकल्प सुरू व्हावेत यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असताना पोस्ट खात्याने महाराष्ट्र व गोव्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नाशिक येथे ट्रेनिंग सेंट्रर सुरू केले आहे. त्याचे उदघाटन सोमवारी होणार आहे. याअगोदर गुजरातमधील बडोदा येथे हे ट्रेनिंग सेंटर होते. आता ही सुविधा महाराष्ट्रात उपलब्ध करून दिली असून, त्यात नाशिकची निवड केली आहे. पोस्ट खात्याने विविध योजना सुरू केल्या असून, त्यात नवनवे सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्याचे ट्रेनिंग येथे दिले जाणार आहे.

उपनगरमध्ये ३५ हजार चौरस फूट जागेवर हे ट्रेनिंग सेंटर सुरू होणार असून, त्यात एक कॉन्फरन्स हॉल, तीन कम्प्युटर लॅब, मेस व स्टाफ रूमसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दोन इमारतींत निवासाची व्यवस्थाही केली आहे. पोस्टाच्या १० एकर जागेत याअगोदर स्टॅम्प डेपो, स्टोअर डेपोसह निवासी इमारत या जागेवर आहेत. त्यातच या ट्रेनिंग सेंटरची भर त्यात पडणार आहे. एकाच वेळी १०० जणांना येथे ट्रेनिंग घेता येणार आहे. पोस्टात बचत बँक, आरडी, मुदतठेव, ज्येष्ठ नागरिक योजना, पीपीएफ, मंथली इन्कम स्किम, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या, पीएफ या योजना आहे. त्यातून ग्राहकांना चांगली सेवा देता यावी, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथे प्रशिक्षित केले जाणार आहे.

पोस्ट बँकेचे ट्रेनिंग तूर्त नाही

भारतीय टपाल खात्याची इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) सुरू होणार असली तरी त्याचे ट्रेनिंग येथे दिले जाईल का, हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे आता तूर्त पोस्ट सर्व्हिसच्या सुविधांचे ट्रेनिंग येथे देण्यात येणार आहे. या ठिकाणी मात्र पोस्टातील नवीन कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नव्या सॉफ्टवेअर व बदलाची ट्रेनिंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

आधार कार्डापासून सुरुवात

आधार कार्ड काढण्याची सुविधा पोस्ट कार्यालयात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या ट्रेनिंग सेंटरमधून पहिले ट्रेनिंग हे आधार कार्डाशी संबधित असणार आहे. उपनगर येथील या रिजनल ट्रेनिंग सेंटरचा प्रारंभ सोमवारी महाराष्ट्र पोस्ट सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी.अग्रवाल यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात ते पोस्टाच्या आगामी योजनांची माहिती देणार आहे.

४१ डिव्हिजन ऑफिस

महाराष्ट्र रिजनलमध्ये औरंगाबाद, गोवा, नागपूर, पुणे या रिजनलमध्ये ४१ डिव्हिजन आहेत. त्यात महाराष्ट्रात हेड ऑफिस, सब पोस्ट ऑफिस व विविध कार्यालयांची संख्या १२ हजार ५९८ आहे, तर गोव्यात हीच संख्या २५८ आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या

पोस्टात गॅझेटेड अधिकाऱ्यांची संख्या ५२४ असून नॉन गॅझेटेड अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यात ग्रुप बीचे ३४० अधिकारी, ग्रुप सीचे २४ हजार १५८ अधिकारी व मल्टिटास्किंग स्टाफ म्हणून ७ हजार १५१ कर्मचारी आहेत, त्याचप्रमाणे एजंट व इतर कर्मचाऱ्यांची संख्याही २० हजार आहे. त्यामुळे एकूण स्टाफ ५२ हजारांच्या आसपास आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण बैठकीकडे आमदारांची पाठ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरणीय समस्या शोधून त्यावर उपाययोजना शिफारस करण्यासाठी जिल्हा पर्यावरण समितीचे गठण जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केल्यानंतर पहिल्याच बैठकीत आमदारांनी पाठ फिरवली. या सभेला शासकीय अधिकारी व पर्यावरण क्षेत्रातील नामनिर्देशित केलेल्या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व जनमानसात पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, पर्यावरणाशी संबंधित सर्व विभागांशी समन्वय ठेवून स्थानिक विषयावर ही समिती नुकतीच नियुक्त करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांच्या बैठकीत दर महिन्याला किंवा दोन महिन्यांत एकदा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, ही समिती नियुक्त करण्यात आली असून, त्यात जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या समितीवर विविध खात्यांतील अधिकारी व चार पर्यावरण क्षेत्रांत काम करणारे नामनिर्देशित सदस्य व सर्व आमदारही सदस्य आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उद्योग अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याबरोबरच जलसंपदाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, माहिती अधिकारी, वनाधिकारी यांचा समावेश असलेल्या या समितीत हे अधिकारी मात्र उपस्थित होते. समितीमध्ये पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या दोन तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून, त्यात एम. एम. कुलकर्णी, डॉ. किशोर पवार यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या जिल्हास्तरीय अशासकीय संस्थेच्या प्रतिनिधींमध्ये महाराष्ट्र इन्व्हायर्न्मेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संदीप सोनवणे, मानव उत्थान मंचचे जगबीरसिंग यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ही समिती महत्त्वाची असूनही त्यात पहिल्या बैठकीत आमदारांची पर्यावरण विषयावर असलेली उदासीनता पुन्हा एकदा दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरुपम यांचा निषेध

0
0

निफाड ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्तव्यदक्ष सचिव प्रवीण दराडे यांच्यावर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी टोइंग कंत्राटाबाबत बिनबुडाचे व हेतुपुरस्सर वैयक्तिक आरोप केले आहेत. या आरोपांचा अखिल महाराष्ट्र वंजारी समाजाच्या वतीने निषेध करण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांच्याकडे निवेदन दिले. दराडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांवर राजकीय हेतूने आरोप करणे निंदनीय असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या सर्व आरोपांचा वंजारी समाजाने निषेध व संताप व्यक्त केला आहे. या वेळी अखिल महाराष्ट्र वंजारी समाज सेवा समितीच्या नाशिक शाखेचे सुनील कातकाडे, विक्रम कातकाडे, दिनकर बोडके, सुदाम केदार, मारुती सांगळे, शांताराम सांगळे, विजय सानप, राजेंद्र सांगळे, विनोद बोडके, संतोष सानप यांच्यासह वंजारी समाजबांधव उपस्थित होते.

वसुली ५४ टक्के

नाशिक ः महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसंदर्भात केलेले दावे चुकीचे असून, या दोन्ही विभागांची ५४ टक्क्यांपर्यंत गेल्याचा दावा विविध कर विभागाने केला आहे. या दोन्ही विभागांची वसुली ४५ टक्के असल्याचा दावा लेखापरीक्षण विभागाने केला होता. हा दावा खोडून काढत यंदा घरपट्टी, पाणीपट्टीची वसुली ११० कोटींपैकी ५९ कोटी झाली आहे.

मनपातर्फे हेल्पलाइन

नाशिक ः डेंग्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आता हेल्पलाइन सुरू केली आहे. सहा विभागांत सहा मोबाइल नंबर जाहीर करण्यात आले असून, फवारणीसाठी या नंबरवर कॉल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या क्रमांकांवर प्रतिसाद मिळाला नाही तर ९४२३१७५७३१, ९९२२४४५२५३ या नंबरवर संपर्क साधण्याचे आ‍वाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेमंत शेट्टींना वाचवण्यासाठी भाजपचा आटापिटा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतल्या एका खून प्रकरणात सध्या नाशिकरोडच्या कारागृहात असलेले भाजपचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेट्टी सहा महिन्यांपासून कारागृहात असल्याने गेल्या पाच महासभांना ते उपस्थित राहू शकलेले नाहीत. येत्या सोमवारच्या महासभेत शेट्टी अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर नगरसेवकपद गमावण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे त्यांचे पद वाचवण्यासाठी भाजपकडून धावपळ सुरू झाली असून, कारागृहातून त्यांना महासभेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या महासभेत त्यांच्या नावाचे प्रस्तावही दाखल करण्यात आले असून, त्यांनी कारागृहासह हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आले आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हेमंत शेट्टी यांना भाजपने महापालिका निवडणुकीत उमेदवारी देऊन निवडून आणले. मात्र, निवडणुकीनंतर दोन महिन्यांतच त्यांचा पंचवटीतल्या एका खुनाच्या प्रकरणात समावेश असल्याचे उघड झाले. त्यामुळे गेल्या २६ मे रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे अगोदरच ते गोत्यात आले होते. मात्र, महापालिकेच्या एका नियमामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. नगरसेवकाला आपले पद टिकविण्यासाठी महासभेला उपस्थिती लावावी लागते. सतत सहा महासभांना नगरसेवकाची अनुपस्थित राहिली तर त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची तरतूद आहे. शेट्टी गेल्या पाच महासभांपासून अनुपस्थित आहेत.

महासभेची महासभा येत्या २० नोव्हेंबर रोजी होत आहे. सभेत शेट्टी अनुपस्थित राहिल्यास त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेट्टींचे नगरसेवकपद वाचवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू आहेत. शेट्टींना एक दिवसासाठी कारागृहातून बाहेर काढण्यासाठी आटापिटा सुरू झाला आहे. त्यासाठी महासभेवर त्यांच्या नावाचे प्रस्ताव सादर केले असून, त्यावर चर्चा करण्यासाठी शेट्टींना महासभेत यायचे आहे. त्यामुळे त्यांना महासभेसाठी बाहेर येण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज शेट्टींच्या वतीने कारागृह अधीक्षकांना करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वीणा गवाणकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ चरित्र आणि निसर्ग लेखिका वीणा गवाणकर यांची जळगाव येथे १० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या साहित्य संमेलनाचे आयोजन वसुंधरा महोत्सवाला जोडून समर्पण संस्था संचालित पर्यावरण शाळेतर्फे करण्यात आले आहे. जैन उद्योग समूह आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ते पुरस्कृत केले आहे.

‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या लिखाणानंतर वीणा गवाणकर यांचे नाव साहित्यजगतात पुढे आले. त्यानंतर डॉ. आयडा स्कडर, सर्पतज्ज्ञ रेमंड डिट्मार्स, पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली, महान क्रांतिकारक आणि कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे, जलतज्ज्ञ विलासराव साळुंके यांच्या जीवनावर त्यांनी पुस्तके लिहिली. कृषी, निसर्ग, पर्यावरण आणि पाणी या क्षेत्रांत व्यापक कार्य करणाऱ्या मान्यवर तज्ज्ञांच्या चरित्रावर आधारित ललित लेखन त्या करतात. त्यांना तीन वेळा महाराष्ट्र शासनाच्या वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचा धनंजय कीर पुरस्कार आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा कै. प्रा. वि. ह. कुलकर्णी पुरस्कार आदी पुरस्कारांसह २०१४ मध्ये एसएनडीटी विद्यापीठातर्फे वूमन ऑफ दी इयर पुरस्कार मिळाला आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. विज्ञाननिष्ठ लेखक आणि किल्ल्यांचे अभ्यासक प्र. के. घाणेकर संमेलनाचा समारोप करणार आहेत.

--

परिसंवाद अन् चर्चासत्र

या संमेलनामध्ये पर्यावरण आणि निसर्ग साहित्याचा लोकजागर, पर्यावरण चळवळ आणि शासनाच्या धोरणावर पडणारा प्रभाव, या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात डॉ. वरद गिरी (बेंगळूरू), संतोष गोंधळेकर (पुणे), डॉ. सुरेश चोपणे (पुणे), प्रा. विद्याधर वालावलकर (ठाणे) सहभागी होणार आहेत. ललित लेखन, स्तंभलेखन आणि वर्तमानपत्रांतील लेखन, संशोधन आणि पेपर सादरीकरण, समाजमाध्यम (सोशल मीडिया) या चार गटांत चर्चासत्र होणार आहे. पर्यावरण आणि निसर्गसंवर्धन चळवळ कशी गतिमान होऊ शकेल, याविषयी चर्चासत्रातून विचारविनिमय केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images