Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

२१ व २३ रोजी रेल्वेचा ‘ब्लॉक’

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मनमाड रेल्वे स्टेशनवर नवा पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. त्यासाठीचे काम मंगळवारी (दि. २१) व गुरुवारी (दि. २३) रोजी होणार आहे. त्यामुळे या दिवशी पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी ७.४० ते १२.३५ आणि गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी भुसावळ-मुंबई पॅसेंजर (५११५४) आणि बुधवारी (दि. २२) मुंबई-भुसावळ (५११५३) गाडी रद्द होईल. एलटीटी-गोरखपूर (१५०१७) गाडी समीट स्टेशनवर १०.५० ते १२.२५ पर्यंत थांबविली जाईल. शिर्डी-कालका एक्स्प्रेस (२२४५५) गाडी अनकई स्टेशनवर ११.२० ते १२.२०) पर्यंत थांबविली जाईल. एलटीटी-भागलपूर (१२३३६) गाडी लासलगाव स्टेशनवर १२.०५ ते १२.४० पर्यंत थांबविली जाईल. पुणे-मनमाड-पुणे (५१४०१ / ५१४०२) व मनमाड-इगतपुरी-मनमाड (५१४२४ / ५१४२३) या गाड्या २१ आणि २३ नोव्हेंबरला धावणार नाहीत. शिर्डी-जालना (७७६५८ / ७७६५७) गाडी दि. २१ व २३ नोव्हेंबरला नागरकाईलपर्यंतच येईल. तेथून ती परत जालन्याला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीनशे जणांना गॅस्ट्रोची लागण

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील देवळीकराड गावातील तीनशेपेक्षा अधिक आदिवासी बांधवांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. कळवण तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधाही तत्काळ उपलब्ध न झाल्याने आज शनिवारी देवळीकराड येथील आदीवासी बांधवांना दिवसभर धावपळ करावी लागली.

गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांना तिर्हळ प्राथमिक आरोग्य केंद्रात व अभोणा ग्रामीण रुग्णालयात गॅस्ट्रो लागण झालेल्या रुग्णांना दाखल करण्यात आले, तर उर्वरित रुग्णांना देवळीकराड येथील ग्रामपंचायत कार्यालय व सभामंडपामध्ये १०० ते १२५ आदिवासी रुग्णांवर उपचार करण्यात आले.

गॅस्ट्रो लागण झालेल्या रुग्णांना सकाळी अभोणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून न घेतल्यामुळे अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रांत दाखल करण्यात आले. अभोणा ग्रामीण रुग्णालयात रुग्ण घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याची तक्रार आदिवासी बांधवांनी केली.

देवळीकराड येथे गॅस्ट्रो लागण झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार व सदस्य नितीन पवार यांनी तत्काळ देवळीकराड येथे भेट देऊन आदिवासी बांधवांची विचारपूस केली. अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन गॅस्ट्रो लागण झालेल्या रुग्णांची भेट घेतली व जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या यंत्रणेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिल्याने नाशिक येथून देवळीकराड येथे तातडीने औषधपुरवठा पाठविण्यात आला. देवळीकराड गावाला होणारा पाणीपुरवठा दूषित आहे हे लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले. देवळीकराड येथील आदिवासी बांधवांना गॅस्ट्रोची लागण झाली असून या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-नागपूर अंतिम फेरीत

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारीही चुरशीचा खेळ झाला. धावण्याच्या स्पर्धेत पुरुषांमधून पुण्याच्या गुलाबसिंग वसावे आणि महिलांमधून भांडुपच्या प्रिया पाटील यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवत पदकांची लयलूट केली. क्रिकेटच्या सामन्यात कोल्हापूर आणि नागपूरच्या संघाने अंतिम फेरी गाठली असून, रविवारी (दि. १९) विजेतेपदासाठी दोन्ही संघांत लढत रंगणार आहे. रविवारी दुपारी चार वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा स्व. मातोश्री मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे होणार आहे.

स्पर्धा उद््घाटनाच्या वेळी शुक्रवारी (दि. १७) शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत वसावे आणि पाटील यांनी अव्वल क्रमांक पटकावला होता, तर शनिवारी दुसऱ्या दिवशीही वसावे या खेळाडूने धावण्याच्या स्पर्धेत एकतर्फी कामगिरी करत २००, ४०० आणि ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत नागपूरच्या राकेश बालपांडे अव्वल क्रमांक पटकावला. महिलांमध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रिया पाटीलने शुक्रवारी सुवर्णपदकाची कमाई केली होती. याच कामगिरीत सातत्य ठेवत २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले. क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात नागपूरच्या संघाने औरंगाबादला, तर कोल्हापूरच्या संघाने भांडूपच्या संघाला नमवत अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी नागपूर विरुद्ध कोल्हापूर हे तुल्यबळ संघ रविवारी मैदानात उतरतील.

स्पर्धेचा निकाल (कंसात परिमंडल) ः लांब उडी ः प्रथम- शुभम निंबाळकर (कोल्हापूर), द्वितीय- सरिता सराटे (नागपूर), उंच उडी ः प्रथम- अनिल बने (भांडुप), द्वितीय- योगिता बानप (भांडुप). भालाफेक ः प्रथम- रघुनाथ परदेशी (भांडुप), द्वितीय- अश्विनी जाधव (पुणे), गोळाफेक ः प्रथम- नितीन देशमुख (भांडुप), द्वितीय- प्रियांका शेळके (नाशिक). थाळीफेक ः प्रथम- इम्रान मुजावर (कोल्हापूर), द्वितीय- प्रियांका शेळके (नाशिक).

नाशिकचीही चमकदार कामगिरी

नाशिक परिमंडल संघातील प्रियांका शेळके या खेळाडुने शनिवारी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. गोळाफेक आणि थाळीफेक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तिने हे पदक पटकावले. तर टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या संघाने उपांत्य फेरी जिंकत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विद्यापीठ सिनेटसाठी आज मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथमच पार पडणाऱ्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी आज, १९ नोव्हेंबर रोजी नाशिकसह नगर आणि पुणे जिल्ह्यात मतदान होणार आहे. अधिसभेतील १० जागांसाठी एकूण ३७ उमेदवार रिंगणात आहेत. या तिन्ही जिल्ह्यांतून सुमारे ४८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यात २१ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरू राहील. २७ नोव्हेंबर रोजी मतमोजणीद्वारे निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे. विद्यापीठात यंदा तिरंगी लढत होत आहे. यामध्ये एकता पॅनलसोबतच परिवर्तनवादी आणि जयकर ग्रुप प्रणीत विद्यापीठ विकास मंडळाचे उमेदवार रिंगणात आहेत. यातील विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनलने दहा उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. यात जिल्ह्यातील तीन उमेदवार आहेत, तर प्रगती पॅनलनेही नाशिकमधून उमेदवार दिले आहेत. विद्यापीठ विकास मंडळाच्या वतीने पदवीधर गटातून एक सदस्य रिंगणात आहे.

दहा हजार मतदार

पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पुण्यासह नाशिक आणि नगर जिल्ह्यात आहे. या कार्यक्षेत्रात ४८ हजार मतदारांनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून सुमारे १० हजार मतदार आहेत. मतदानासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एका केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे, तर नाशिक शहरासाठी सहा केंद्रे देण्यात आली आहेत. यामध्ये भोंसला कॉलेज (गंगापूर रोड), के. के. वाघ कॉलेज (पंचवटी), व्ही. एन. नाईक कॉलेज (कॅनडा कॉर्नर), बिटको कॉलेज (नाशिक), एचपीटी कॉलेज (कॉलेज रोड) आणि शांताराम बापू वावरे कॉलेज (सिडको) या केंद्रांचा समावेश आहे.

नाशिकचे उमेदवार रिंगणात

पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि या विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांची संख्या नाशिक जिल्ह्यातून लक्षणीय आहे. त्यानुसार या जिल्ह्याला अधिसभेत योग्य प्रतिनिधित्वाची गरज आहे. मात्र, आजवर नाशिककरांच्या वाट्याला विद्यापीठात उपेक्षाच आली आहे. हे चित्र बदलण्यासाठी नाशिकमधून यंदा इच्छुक उमेदवारांचीही संख्या जास्त आहे. या निवडणुकीसाठी नाशिकमधून व्यवस्थापन गटातून अशोक सावंत रिंगणात आहेत. पदवीधर सदस्यपदासाठी एकता पॅनलच्या वतीने मविप्रचे डॉ. तानाजी वाघ, राखीव गटातून मविप्रच्या तीसगाव शाळेतील मुख्याध्यापक विश्वनाथ पाडवी, व्ही. एन. नाईक संस्थेचे विजय सोनवणे, तर प्रगती पॅनलच्या वतीने हेमंत दिघोळे रिंगणात आहेत. जयकर ग्रुप प्रणीत विद्यापीठ विकास मंडळातर्फे बाकेराव बस्ते हे उमेदवार नाशिकचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यजमान नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे ३० वी परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत पुरुष गटांत नाशिक ग्रामीण, तर महिला गटात नाशिक शहराने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. पोलिस आयुक्तालयाच्या परेड ग्राउंडवर १२ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा समारोप शनिवारी सायंकाळी झाला. या वेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल प्रमुख पाहुणे होते.

नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर या संघांचे शानदार संचलन झाले. या वेळी नंदुरबार मुख्यालयाच्या एसआरपीएफ कर्मचाऱ्यांनी, तसेच इतर आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळी नाशिक ग्रामीणचे सावळीराम शिंदे बेस्ट अॅथलेटिक्स व मनीषा निमानकर यांना ५० हजार रुपये किमतीची सायकल बक्षीस देण्यात आली.
डॉ. वायुनंदन म्हणाले, की सध्याचे नाशिक पोलिस फिटनेसकडेही लक्ष देत असल्याचे या स्पर्धांतील विजेतेपदावरून दिसून येत आहे. आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले, की सर्व पोलिस कर्मचारी सध्या फिटनेसकडे गांभीर्याने पाहत असल्याचे दिसते. फिटनेस राखल्याने मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती कायम राहते. विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांनीदेखील मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की नाशिक परिक्षेत्राचे नाव स्पोर्टमध्ये सध्या उंचावत आहे. त्याचप्रमाणे देशपातळीवरही ते उंचवायचे आहे. नाशिक पोलिस अधीक्षक संजय दराडे, जळगाव एसपी दत्तात्रेय कराळे, अहमदनगर एसपी रंजनकुमार शर्मा, नंदुरबारचे एसपी संजय पाटील, धुळे एसपी एम. राजकुमार व नाशिक आयुक्त डॉ. सिंगल यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

पुढचे यजमानपद धुळ्याला

२०१८ मध्ये होणाऱ्या ३१ व्या नाशिक परिक्षेत्र पोलिस क्रीडा स्पर्धेचे यजमानपद धुळे जिल्ह्याला जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेतील रेकॉर्ड ब्रेक नंदुरबारचे हेमंत बारी (४८) व भूषण चित्ते (४७.३१) यांचा गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच रस्सीखेच स्पर्धा व म्युझिकल ग्रुपमधील स्पर्धकांना पुस्तके भेट देण्यात आली.

हे आहेत विजेते

फुटबॉल : प्रथम– जळगाव, द्वितीय– नाशिक ग्रामीण

हॉकी : प्रथम– नाशिक शहर, द्वितीय- जळगाव

व्हॉलीबॉल (पुरुष) : प्रथम– जळगाव, द्वितीय– नंदुरबार

व्हॉलीबॉल (महिला) : प्रथम– नाशिक शहर, द्वितीय– जळगाव

बास्केटबॉल (पुरुष) : प्रथम– नाशिक शहर, द्वितीय– अहमदनगर

बास्केटबॉल (महिला) : प्रथम– नाशिक शहर, द्वितीय– नाशिक ग्रामीण

हँडबॉल : प्रथम– नाशिक शहर, द्वितीय– नंदुरबार

कबड्डी (पुरुष) : प्रथम– नाशिक ग्रामीण, द्वितीय– अहमदनगर

कबड्डी (महिला) : प्रथम– नाशिक ग्रामीण, द्वितीय– जळगाव

खो-खो (पुरुष) : प्रथम– अहमदनगर, द्वितीय– नाशिक ग्रामीण

खो-खो (महिला) : प्रथम– धुळे, द्वितीय– नाशिक ग्रामीण

जलतरण ः नाशिक ग्रामीण

कुस्ती (पुरुष) ः नाशिक ग्रामीण, महिला ः नाशिक शहर

ज्यूदो (पुरुष) ः नाशिक ग्रामीण, महिला ः नाशिक ग्रामीण

बॉक्सिंग (पुरुष) ः नाशिक ग्रामीण, महिला ः नाशिक शहर

वेटलिफ्टिंग (पुरुष) ः नाशिक ग्रामीण, महिला ः नाशिक शहर

१०० मीटर शर्यत (महिला) ः प्रथम- प्रियंका झाल्टे (नाशिक शहर), द्वितीय- प्रीती वसावे (नंदुरबार), तृतीय– अपेक्षा आग्रे (जळगाव).

१०० मी. रिले ः प्रथम- जळगाव, द्वितीय- नाशिक शहर, तृतीय– अहमदनगर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ पीएसआय कारागृहात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुरवणी दोषारोपपत्र कोर्टात दाखल करताना आरोपी म्हणून नाव न लावण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्यूरोने (एसीबी) अटक केलेल्या निवांत जगजितसिंह जाधव या पोलिस उपनिरीक्षकाची शनिवारी नाशिकरोड सेंट्रल जेलला रवानगी करण्यात आली.

शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पीएसआय जाधव यांना एसीबीने शुक्रवारी टाकळीरोड येथे सापळा लावून जेरबंद केले होते. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये मार्च २०१७ मध्ये दाखल गुन्ह्यात तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी जाधव यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे या केसमध्ये सुरुवातीस दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. पुरवणी दोषारोपपत्र दाखल करताना जाधव यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास आर्थिक घोटाळ्याच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्याची धमकी दिली होती. तक्रारदाराने या प्रकरणी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पीएसआय जाधव यांना अटक झाली. त्यांच्या घराची एसीबीच्या पथकाने झडती घेतली. मात्र, त्यात काही आढळून आले नसल्याचे एसीबीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. शनिवारी संशयित जाधव यांना कोर्टात हजर करण्यात आले. बचाव, तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने जाधव यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

--

तक्रारी करण्याचे आवाहन

आर्थिक गुन्हे शाखा महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास करते. फसवणूक झालेल्या हजारो गुंतवणुकदारांचे लक्ष आर्थिक गुन्हे शाखेच्या कामगिरीकडे असते. त्याच शाखेतील पीएसआय लाचखोरीच्या गुन्ह्यात सापडल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याची गंभीर दखल पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी घेतली आहे. पोलिस खात्याशी संबंधित अधिकारी वा कर्मचारी तपास कामानिमित्त, चौकशीनिमित्त आर्थिक किंवा मानसिक पिळवणूक करीत असल्यास थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदार ९७६२१००१०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहस्रक मतदार होणार अम्बॅसॅडर

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

एकविसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या आणि १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील तरुणांचा शोध घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सहस्रक मतदार म्हणून अशा तरुणांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, महाविद्यालयांमध्ये कॅम्पस अॅम्बॅसॅडर म्हणून त्यांना नियुक्ती दिली जाणार आहे.

मतदानास पात्र होणाऱ्या युवा पिढीला निवडणूकप्रक्रियेची माहिती होणे आवश्यक आहे. नवमतदारांनी निवडणूकप्रक्रियेकडे सकारात्मकतेने पाहावे यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून निवडणूक आयोग सहस्त्रक मतदारांचा शोध घेऊन त्यांची मतदार यादीमध्ये नोंदणी करणार आहे. देशामध्ये दररोज ७४ हजार बालकांचा जन्म होतो. प्रत्येक राज्यात सरासरी दोन हजार, तर जिल्ह्यात १०० बालकांचा जन्म होतो. एक जानेवारी २००० रोजी जिल्ह्यात जन्मलेल्या १०० बालकांचा शोध घ्यावा. याकामी ग्रामपंचायत, रुग्णालये तसेच जन्म-मृत्यूचे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे निर्देश आयोगाने दिले आहेत. सहस्त्रक मतदार म्हणून नोंदणी केलेल्या मतदारांचा राष्ट्रीय मतदारदिनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्याची जबाबदारी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पार पाडावी लागणार आहे. संबंधित मतदारांची त्यांच्या महाविद्यालयांमध्ये कॅम्पस अम्बॅसॅडर म्हणून नेमणूक करावी, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जेएनपीटी’ पथक करणार पाहणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड सहकारी साखर कारखान्याच्या ११० एकर जागेवर केंद्राची मान्यता मिळालेल्या ८०० कोटी गुंतवणुकीच्या ड्रायपोर्टमुळे नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. लवकरच जेनपीटीच्या चार तज्ज्ञांचे पथक निसाकाच्या संभाव्य जागेची पाहणी व इतर माहिती घेण्यासाठी येणार असल्याची माहिती भाजपचे वरिष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांनी कुंदेवाडी येथे पत्रकार पारिषदेत दिली.

ड्रायपोर्टबद्दल माहिती देतांना पाटील पुढे म्हणाले, निसाकाच्या पड‌िक जागेवर ड्रायपोर्ट उभारल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. शिवाय ड्रायपोर्टसाठी निसाकाची जागा विकत घेतल्यास त्याचा फायदा निसाका चालू करण्यासाठी होईल. या दृष्टीकोणातून मी स्वतः मागील काही वर्षांपासून प्रयत्नशील होतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वेळोवेळी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि ड्रायपोर्टला मंजुरी मिळाली.

आठ महिन्यांपूर्वी या जागेचा सर्व्हे झाला आहे. निसाकापासून नाशिक-औरंगाबाद महामार्ग अवघा एक किलोमीटर अंतरावर, ओझर विमानतळ कार्गो हब अवघ्या दहा कि.मी.वर आणि कारखान्याच्या जागेला खेटून असलेली मुंबई-भुसावळ रेल्वेमार्ग या सर्व सुविधांमुळे या जागेची निवड झाली आहे.

सध्या निफाड कारखान्याची सर्व जमीन नाशिक जिल्हा बँकेकडे तारण आहे. त्यामुळे या प्रोजेक्टचा सर्वात जास्त फायदा करखान्याला होऊ शकतो. पाहणीसाठी येणाऱ्या जेनपीटीच्या पथकात रेल्वे इंजिनियर, अकाऊंटंट, प्रशासन अधिकारी यांचा समावेश असणार आहे. पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा चिटणीस शंकरराव वाघ, संजय वाबळे, लक्ष्मण निकम, विलास मत्सगार उपस्थित होते.

मनमाड-नाशिकरोड-कसारा तिसरी लाइन

या ड्रायपोर्टला नव्याने होणारा इंदूर-धुळे-मनमाड, मनमाड-नाशिक-कसारा आणि कसारा ते जेनएनपीटी बंदर अशी लिंक होऊन तीन टप्प्यांत स्वतंत्र रेल्वेमार्ग केंद्र सरकार तीन वर्षांत पूर्ण करणार असल्याचे दिल्ली येथील चर्चेत ठरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जखमी हर्षदाला पालकमंत्र्यांचा मदतीचा हात

0
0

वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिसाच्या मारुती कारने दिलेल्या धडकेत सॉफ्टबॉल खेळाडू हर्षदा माळवे व तिची आई गंभीर जखमी झाली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्यावरील शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी ‘मटा’शी बोलताना दाखवली. पालकमंत्री महाजन महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचेही अध्यक्ष असल्याने त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

टाकळीतील नव्या पुलावर एका पोलिसाच्या मारुती कारने राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू हर्षदा शिवकुमार माळवे हिच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आईसह ती गंभीर जखमी झाली होती. यात तिच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. तसेच आईवरही शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, हलाखीच्या परिस्थितीमुळे हर्षदाच्या कुटुंबाला उपचाराचा सुमारे पाच ते सहा लाखांचा खर्च पेलवणार नाही. याबाबत ‘मटा’ने (१७ नोव्हेंबर) वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेने ही माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांना दिली. त्यावर महाजन यांनी तातडीने हर्षदाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शवली.

पोलिसाची चौकशी होणार

बेफिकीरपणे धडक देऊन उपचाराचा खर्च नाकारणाऱ्या पोलिसावर आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करता केवळ अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करून संशयिताला पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पालकमंत्री महाजन यांनी गंभीर दखल घेतली असून, त्या पोलिसाची चौकशी करण्यास लावू, असेही मंत्री महाजन यानी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ दिवसांत होणार कळवण शहर वायफाय

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

भारत दूरसंचार विभागाकडून (बीएसएनएल ) प्रशाकीय इमारत, कळवण नगर पंचायत आणि कळवण शहरात आठ दिवसांत मोफत वायफाय सेवा सुरू होणार असल्याची माहिती भारत दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य व भाजपचे कळवण तालुका सरचिटणीस सचिन सोनवणे यांनी दिली. सप्तशृंगी गड येथे वायफाय व हॉटस्पॉट सेवा सुरू झाली आहे.

नाशिक येथे दूरसंचार कार्यालयात सल्लगार समितीचे सहअध्यक्ष खासदार हरिशचंद्र चव्हाण, सहअध्यक्ष खासदार हेमंत गोडसे, दूरसंचार विभागाचे महाप्रबंधक नितीन महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. सचिन सोनवणे यांनी कळवण तालुक्यात नरुळ, पिंपळे खुर्द व प्रस्तावित गणोरे येथे भारत दूरसंचार विभागाच्या भ्रमणध्वनीचे मनोरे तत्काळ उभारावेत व सप्तशृंगी गड येथे नवीन जास्त क्षमतेची ओएफसी केबल टाकावी अशी मागणी मागच्या बैठकीत केली होती. त्यानुसार ही मागणी मंजूर करून संबंधित विभागाने सप्तशृंगी गड येथे ओएफसी केबल टाकली आहे. त्यामुळे येथील नेटवर्कमध्ये सुधारणा झाली आहे. तसेच येथे मोफत वायफाय व हॉटस्पॉट सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. गणोरे, नरुळ व पिंपळे खुर्द येथे लवकरच मनोरे उभारण्याच काम सुरू होणार आहे. तसेच सर्वच ग्रामपंचायत कार्यालयात मोफत वायफाय व हॉटस्पॉट सेवा सुरू होणार आहे. या बैठकीला सर्व जिल्ह्यातील सदेव सदस्य उपस्थित होते.

कळवण शहराप्रमाणे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयांना मोफत वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकांनी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रे दूरसंचार कार्यालयात जमा करावीत.

- सचिन सोनवणे, सदस्य दूरसंचार सल्लगार समिती सदस्य.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरुषोत्तम स्कूलमध्ये उद्या करिअर फेअर

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त सोमवारी (दि. २०) सकाळी नऊ ते दुपारी चार यावेळेत नाशिकरोडच्या पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये करिअर फेअर होणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर माजी विद्यार्थी आपला अनुभव विद्यार्थ्यांना सांगणार असल्याची माहिती प्राचार्य प्र. ल. ठोके यांनी दिली.

शतक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले असून, करिअर फेअर हा त्यापैकीच एक आहे. माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात प्राप्त केलेल्या विशेष लौकिकाचा लेखाजोखा माजी विद्यार्थी प्रकट मुलाखतीतून मांडणार आहेत. विद्यार्थ्याना प्रेरणा मिळून स्वतःचे करिअर निवडण्याची संधी मिळावी हा उद्देश आहे.

संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य मधुकर जगताप, नाशिकरोड संकुल प्रमुख वसंत जोशी, मानव विकास संस्थेचे प्रकाश कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती राहील. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांची मुलाखत वृत्त वाहिनीचे निवेदक विशाल परदेशी तर नाट्य कलावंत महेश डोकफोडे यांची मुलाखत कवी प्रशांत केंदळे घेतील. नालंदा कॅपिटल मुंबईचे संचालक मुकुंद धोंडगे यांची मुलाखत आकाशवाणीचे निवेदक धनेश जोशी तर हायकोर्टाचे वकील प्रवर्तक पाठक यांची मुलाखत डॉ. अमोल कुलकर्णी घेतील. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी यांची ही संकल्पना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लर्न अॅण्ड डान्स वर्कशॉप आज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
कुठलीही गोष्ट शिकायला वयाचे बंधन नसते. एखादा लहानगा शास्त्रीय संगीतातले राग खुबीने आळवतो तर एखादे जख्खड आजोबा वयाच्या ८० व्या वर्षीही पदवी संपादन करतात. अशा प्रकारे कुठलेही वयाचे बंधन न ठेवता नवीन गोष्ट शिकण्याची संधी तुम्हाला महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबने उपलब्ध करून दिली आहे.
कल्चर क्लब सदस्यांसाठी रविवारी (दि. १९) लर्न अॅण्ड डान्स वर्कशॉप आयोजित करण्यात आला आहे. कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत हॉलमध्ये दुपारी तीन वाजता वर्कशॉप होईल. यामध्ये देशभरातील लोकगीतांवर आयोजित डान्स फोक फिटनेस प्रकार शिकविला जाणार आहे. विशेष म्हणजे तुमच्याकडून डान्सही करवून घेतला जाणार आहे. या वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचे बंधन नाही. पाच वर्षाच्या लहानग्यापासून ८० वर्षांचे आजी आजोबांपर्यंत कोणीही त्यामध्ये सहभागी होऊ शकणार आहे. फोक फिटनेस या डान्स प्रकारातून आपला फिटनेस कसा ठेवायचा याबद्दलही प्रज्ञा तोरसकर मार्गदर्शन करणार आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असून ऐनवेळीही नोंदणी करता येणार आहे.

रजिस्ट्रेशनसाठी संपर्क : ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा शाळा हुश्शार!

0
0

ashwini.kawale@timesgroup.com
Tweet : ashwinikawaleMT

नाशिक : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या १२७ पैकी ३३ शाळांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. तर ‘क’ श्रेणीत सर्वाधिक ४८ शाळांचा समावेश आहे. २०११-१२ पासून गेल्या वर्षापर्यंत ‘अ’ श्रेणीत पाचवर असलेली शाळांची संख्या वाढल्याने महापालिका शाळांमध्ये गुणवत्तेबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहेत.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या राज्य शिक्षण विभागाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातून राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणीसारखे उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यभरात श्रेणी तपासण्यासाठी मूल्यमापन प्रक्रियाही राबविण्यात येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाधिक शाळा ‘अ’ श्रेणीत असाव्यात यासाठीही विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहे. सामूदायिक सादरीकरण, सामूदायिक धडा वाचन, दिलेल्या विषयावर पाच वाक्य लिहिणे, वर्गातील वस्तूंवर वाक्य लिहिणे, शाळा स्वच्छता, तंत्रज्ञानाचा वापर आदी निकषांच्या आधारे मूल्यमापन करून शाळांना श्रेणी दिली जात आहे. यामध्ये पाच-सहा वर्षांपासून महापालिकेच्या ‘अ’ श्रेणीत केवळ पाच असलेली शाळांची संख्या यंदा ३३ झाली आहे. महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांच्यातर्फे पार पाडले जात असलेल्या या सर्वेक्षणात ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील शाळांची प्रगती धिम्या गतीने होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या भागातील विशेष लक्ष केंद्रीत केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

असे होते गुणांकन
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळांचे विशिष्ट प्रकारे गुणांकन केले जाते. १२५ पेक्षा ८० आणि त्यापुढील गुण असलेल्या शाळांना ‘अ’ श्रेणी, ६१ ते ८० ‘ब’ श्रेणी, ६० ते ४१ ‘क’ श्रेणी व त्याखालील गुण असलेल्या शाळांना ‘ड’ श्रेणी प्राप्त होत असते.

महापालिकेच्या ‘अ’ श्रेणीतील शाळांची संख्या गेल्या वर्षीपर्यंत पाच इतकीच होती. आता सर्व निकषांची पूर्तता करून गुणवत्तेवर भर देऊन ही संख्या ३३ पर्यंत पोहोचू शकली आहे. पुढील वर्षापर्यंत महापालिकेच्या शंभर टक्के शाळा ‘अ’ श्रेणीत असाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विशेषतः ‘ड’ श्रेणीतील शाळांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे.
- नितीन उपासनी,
प्रशासनाधिकारी, महापा‌लिका शिक्षण समिती

मनपा शाळांची ‘गुण’वत्ता
श्रेणी शाळा संख्या
अ ३३
ब २२
क ४८
ड २४
एकूण १२७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ अखेर मिळाला ‘आधार’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार कार्डशी संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी नागरिकांची वणवण सुरूच आहे. याकामी प्रशासनासाठी मुख्य अडसर ठरणारा जागेचा तिढा सुटला असून १४ आधार केंद्रांसाठी जागा उपलब्ध झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळेच शहरात कार्यरत आधार केंद्रांची संख्या आता १६ झाली आहे.
महा-ऑनलाइनने शहरात पहिल्या टप्यात १६ आधार केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने केंद्र सुरू करण्यासाठी जागा, वीज तसेच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला. मात्र, महापालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने केंद्र सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात होते. परिणामी नागरिकांना आधारबाबतची कामे मार्गी लावण्यासाठी केंद्रांची शोधाशोध करावी लागत होती. जिल्हा प्रशासनाने तीन केंद्र तात्काळ सुरू केले. जिल्हाधिकारी कार्यालय दोन तर महापालिका मुख्यालय तसेच विभागीय कार्यालयात प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्यात आले. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ एकच आधार केंद्र होते. आता एक अतिरिक्त केंद्र सुरू होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आधारकार्ड काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अति‌रिक्त पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहे.

आणखी २५ केंद्रांचा प्रस्ताव
शहरातील महापालिका शाळा तसेच विविध सरकारी कार्यालयांमध्ये जागा उपलब्ध झाल्याने प्रशासनाने १४ केंद्र सुरू केले आहेत. यासर्व ठिकाणी आधार नोंदणी किटसह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळेच आधारसाठी नाशिककरांना करावी लागणारी पायपीट काहीशी कमी होऊ शकणार आहे. आणखी २५ केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने महा-ऑनलाईनमार्फत केंद्र सरकारच्या यूआयडी विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे.

असे आहेत नवीन केंद्र
- जिल्हाधिकारी कार्यालय आवार
- मनपा शाळा क्र. ९९, शिवाजीनगर, सातपूर
- सेतू कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड
- मनपा शाळा शॉपिंग सेंटर, आनंदवल्ली बसस्टॉप, आनंदवल्ली
- मखमलाबाद सर्कल कार्यालय, मखमलाबाद
- मनपा शाळा क्र. ६५, विडी कामगार नगर, पंचवटी
- जयदुर्गा समाज हॉल, दुर्गानगर, क. का. वाघ कॉलेजमागे
- मनपा शाळा क्र. २२, बी.डी. भाकेकर, विश्वासनगर नगर, सातपूर
- मनपा शाळा क्र. १५७, चेहडी, नाशिककरोड
- मनपा शाळा क्र. ३४, उपविभागीय कार्यालय, नांदूर, पंचवटी
- मनपा शाळा क्र. १०७, टागोर नगर, महाकाली मैदानाजवळ, नवीन सिडको
- माडसांगवी सर्कल कार्यालय, माडसांगवी
- मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूरोड
- ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मुलांसाठी एक फिरते किट राखीव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरप्रश्नी राजकारण

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरतील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी भायगावातील आजोंद्या बाबा मंदिर हटव‌िण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने अखेर सायंकाळी भाजप नेते अद्वय हिरे यांनी मंदिरास पर्यायी जागा देण्याची तयारी दर्शव‌िली. मात्र, शनिवारी राज्यमंत्री दादा भुसे यांनी स्थानिकांची भेट घेतली असता स्थानिकांनी हिरे यांनी जमीन मंदिराच्या नावे करून द्यावी, अशी मागणी केल्याने या मंदिराचा प्रश्न पुन्हा चिघळला.

शुक्रवारी मंदिर तोडू देणार नाही, असा पवित्रा घेत स्थानिकांनी ठिय्या मांडला होता. अखेर सायंकाळी भाजप नेते अद्वय हिरे यांनी मंदिरासाठी संस्थेची जागा उपलब्ध करून देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान मंदिरातील मूर्तीचे स्थलांतरण करण्यासाठी हिरे यांनी दिलेल्या जागेवर तात्पुरते शेड उभारण्यात येत होते.

मात्र या निर्णयानंतर पालिका प्रशासनाकडून मंदिर हटव‌िण्यात न आल्याने शनिवारी या प्रश्नी राजकारण सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शनिवारी दिवसभर अतिक्रमण निर्मूलन पथक याबाबत हतबल झाले होते.

पालिका पथकाला विरोध

सकाळी पालिका पथक मंदिर हटवण्यासाठी गेले असता स्थानिकांनी पुन्हा विरोध केला. दरम्यान राज्यमंत्री दादा भुसे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पालिका अधिकारी व स्थानिकांशी चर्चा केली. यावेळी मंदिरास हिरे यांच्याकडून देण्यात येत असलेल्या जागेबाबत लेखी देण्यात यावे. मंदिर स्थलांतरित होईपर्यंत ते तोडू नये, असा पवित्रा स्थानिकांनी घेतल्याने वाद वाढला. अखेर दादा भुसे यांनी या प्रश्नी पालिका प्रशासनाकडून गंभीर चुका झाल्याचे ताशेर ओढले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असून याबाबत पालिका, पोल‌िस प्रशासन व स्थानिकांनी संयुक्त बैठक घेवून मंदिर स्थलांतरणाबाबत निर्णय घ्यावा अशा सूचना केल्या.

श्रेयवादाची लढाई

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई सुरू झाली असून याबाबत शिवसेना व भाजपात श्रेयवाद सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजोंद्या बाबा मंदिराच्या प्रश्नी प्रशासन हतबल झालेले पाहायला मिळत असताना भाजप नेते अद्वय हिरे यांनी आपल्या संस्थेची जमीन देण्यास होकार दिला. शिवसेनेकडून देखील याबाबत हालचाली सुरू झाल्या. भुसे यांनी शनिवारी स्थानिकांची भेट घेतल्याने मंदिर प्रश्नांवर राजकारण सुरू झाल्याची चर्चा शहरात रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्यात बुधवारी कुस्ती चाचणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि नाशिक जिल्हा तालीम संघ यांच्या आदेशानुसार येवला तालुका तालीम संघाच्या वतीने येत्या बुधवारी (दि. २२) येवला शहरातील कै. भाऊलाल पहिलवान लोणारी क्रीडा संकुलात येवला तालुका चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कुमार व वरिष्ठ या दोन विभागात ही चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार असून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मल्लांचे वजन बुधवारी सकाळी ८ ते ११ यावेळेत क्रीडा संकुलात घेतली जाणार आहेत. यादिवशी दुपारी ३ वाजेनंतर गादी व माती विभागातील विविधगटात सहभागी झालेल्या मल्लांच्या कुस्त्या रंगणार आहेत. यंदापासून राज्य कुस्तीगीर परिषदेने कुस्ती नियमात बदल केलेला असून, या नव्या नियमानुसारच चाचणी कुस्ती स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेत मल्लांना सहभागी होण्याचे आवाहन उपमहाराष्ट्र केसरी पैलवान राजेंद्र लोणारी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरी, त्र्यंबकमध्ये मनसेला मिळाले बळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यभर मनसेचे कार्यकर्ते पक्ष सोडून जात असताना इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिवसेना व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मनसेत प्रवेश केला. नव्याने आलेले हे तरुण कार्यकर्ते जिल्हा परिषद गटातील असले तरी या दोन्ही तालुक्यांत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने मनसेला बळ मिळणार आहे.

नाशिक महापालिका निवडणुकी अगोदरच मनसेच्या अनेक नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली होती. त्यानंतर मनसेचा नाशिकमधील जनाधारही कमी झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीत तीन आमदार व नंतर महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवणाऱ्या मनसेला यामुळे घरघर लागली. पण, रविवारी या कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यामुळे मनसेला थोडासा दिलासा मिळाला आहे. मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, माजी गटनेते अनिल मटाले, जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, इगतपुरी तालुकाध्यक्ष मुळचंद भगत, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यांनी केला प्रवेश

मनसेमध्ये आलेल्या या कार्यकर्त्यांत योगेश बरबडे, धनंजय मोरे, सागर मोरे, योगेश मोरे, राहुल मते, ओमकार मोरे, तुषार मोरे, किरण मोरे, विजय गाढवे, मंगेश गाढवे, सुभाष गाढवे, विशाल गाढवे, विनोद गाढवे, रुपेश पांढरे, संपत वाघचौरे, नामदेव बोऱ्हाडे, विक्रम पुंढे यांच्यासह इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील असंख्य कार्यकर्ते होते.

इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिवसेना व इतर पक्षातून आलेल्या तरुण कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. जिल्हा परिषद गटातील हे कार्यकर्ते आहेत. यामुळे पक्षाला बळ मिळाले आहे.

- अशोक मुर्तडक, माजी महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'ड्रायपोर्ट'द्वारे निसाकाला बूस्ट?

0
0

राजेंद्र डोखळेंचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, निफाड

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात निफाड साखर कारखान्याच्या पडिक जमिनीवर ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा करून प्रस्तावित प्रकल्पाला आठशे कोटी रुपये जाहीर करून मान्यता दिली. यावर आता निफाड तालुक्यातील नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून, लासलगाव बाजार समितीचे संचालक राजेंद्र डोखळे यांनी या प्रस्तावित प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

भाजपनेते सुरेशबाबा पाटील यांनीही ड्रायपोर्टमुळे नाशिक जिल्ह्याच्या कृषी आणि औद्योगिक विकासाला कशी चालना मिळेल आणि कर्जामुळे बंद असलेला निफाड साखर कारखाना सुरू होईल, असे आशादायक चित्र मांडले. ड्रायपोर्टच्या माध्यमातून निफाड साखर कारखान्याला कितपत बूस्ट मिळणार, असा प्रश्नही यामुळे आता उभा राहिला आहे. याबाबत डोखळे यांनी नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी ड्रायपोर्टचा प्रकल्प निफाड तालुक्यात होत असून, या प्रकल्पाचे निश्चितच स्वागत आहे. परंतु, त्यामुळे निसाकाची बंद असलेली चाके सुरू कशी होणार, निसाकावर सर्व कर्ज ३०० कोटी रुपये इतके आहे. त्यात नाशिक जिल्हा बँकेचे १६० कोटी इतके कर्ज व्याजासह आहे. निसाकाकडे २६३ एकर इतकी जमीन आहे. त्यापैकी ९० एकर वसाहतीसाठी के. के. वाघ विद्यालय व इतर संस्थांसाठी ४० एकर एकूण जवळपास १३० एकर आहे. यापैकी शिल्लक १३३ एकर पैकी ११० एकर अतिरिक्त जमीन ड्रायपोर्टला हवी आहे. त्यामुळे निसाकाचे कर्ज फिटणार असेल तर ती द्यायलाही हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सर्वांना विश्वासात घ्यावे

आज जवळपास २०० कोटी रुपये लागणार आहेत ते केंद्र सरकार देणार आहे का? देणार असेल तर जमीन ११० एकरच काय १५० एकरसुद्धा द्यायला हरकत नाही पण देणार नसेल तर मात्र जमीन देऊन निसाकाचा काय फायदा? याची स्पष्ट कल्पना सभासद व जनतेला दिली पाहिजे. त्यामुळे ड्रायपोर्टला जमीन जाईल पण त्यामुळे निसाका कसा सुरू होणार, त्याची चाके कशी फिरणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सगळे नाटक करता येते पण पैशाचे नाटक करता येत नाही. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध नाही मात्र या सर्व प्रकल्पाबाबत सर्व निर्णय हे लोकांना विश्वासात घेऊन घ्यावे. त्यासाठी माझ्यासह इतरांना पडणाऱ्या प्रश्नाचे निरसन व्हावे, तसे प्रॅक्टिकली चित्र मांडले जावे अशीच अपेक्षा या पोर्टसाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व घटकांना आहे असे डोखळे यांनी म्हटले आहे.


आमदारांची भूमिका गुलदस्त्यात

या प्रकल्पाबाबत निफाडचे आमदार अनिल कदम यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असा प्रकल्प निफाड तालुक्यात होणार असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र याबाबत आपण अजून पूर्ण माहिती घेतली नसल्याने अधिक बोलणे उचित होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तर माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते दिलीप बनकर यांनीही अजून याबाबत आपली जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे निफाड तालुक्याचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सर्वांना विश्वासात व सोबत घेऊन प्रकल्पाची महती पटवून द्यावी लागेल हे स्पष्ट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगाळ हवामानामुळे द्राक्षउत्पादक चिंताक्रांत

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या दोन दिवसांपासून वातावरण पुन्हा बदलले आहे. निफाड तालुक्यात ढगाळ हवामान झाल्याने सर्वात जास्त फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. परिणामी, त्यांना औषध फवारणी करावी लागत असल्याचे चित्र आहे.

गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने धिंगाणा घातल्याने फुलण्यासाठी तयार असणाऱ्या अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अगदी हातात आलेले पीक गेले असल्याने द्राक्ष उत्पादकांना महागडी औषधे फवारणी करावी लागली होती. आता द्राक्ष १२० ते १५० रुपये दराने विकली जात आहे, अशा परिस्थितीत आता पुन्हा वातावरण बदलल्याने ढगाळ हवामान असल्याने डावणीसह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या औषध फवारणीसाठी खर्च वाढत आहे एक एकरी फवारणी ४ ते ५ हजार रुपयाला जाते. तालुक्यातील वातावरण बदलल्याने सातत्याने फवारणी करावी लागत असल्याने द्राक्ष पिकाच्या उत्पादनासाठी खर्च वाढणार आहे, असेही जाणकारांचे मत आहे. शिवाय खर्च करूनही पीक जर

चांगले आले नाही तर खर्चही फिटत नाही, असे उत्पादकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी द्विधा मनःस्थितीत असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य कर्मचारी धारेवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या सातपूर विभागात आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी दुसऱ्याच प्रभागात काम करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांनी अचानक केलेल्या पाहणी दौऱ्यात या प्रकारासह इतरही त्रुटी आढळल्याने सभापतींनी संबंधितांवर धारेवर धरून कारवाई करण्याचा इशारा दिला.

शहर परिसरासह सातपूर भागातदेखील साथींचे विकार फैलावत असताना आणि डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत असतानाही ठराविक ठिकाणी नेमलेले आरोग्य विभागाचे कर्मचारी दुसऱ्याच ठिकाणी काम करीत असल्याने आरोग्य अधिकारी करतात तरी काय, असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी नेमणूक केलेल्या ठिकाणीच वेळेवर हजर झाले नाहीत, तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारही सभापती बोलकर यांनी दिला. सातपूर भागात असलेल्या पाच प्रभागांत आरोग्य कर्मचारी नेमलेल्या ठिकाणी काम करीत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. त्यासाठी आरोग्य कर्मचारी नेमके कुठल्या प्रभागात काम करतात याची माहिती घेण्यासाठी अचानक पाहणी केल्याची माहिती सभापतींनी दिली.

शहरातील अनेक मोकळ्या भूखंडांवर पडलेल्या घाण, कचऱ्यावरून आरोग्य विभागावर आरोप केले जातात. मात्र, असे असतानादेखील आरोग्य विभागाकडून योग्य काळजी घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जाते. त्यातच आरोग्याचे अनेक कर्मचारी नेमणूक केलेल्या प्रभागात काम न करता दुसऱ्याच प्रभागात काम करीत असल्याचा आरोप प्रभाग सभापती बोलकर यांनी केला. त्यासाठी सभापती बोलकर यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करीत आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती घेत संबंधितांना खडे बोल सुनावले. नेमणूक केलेल्या ठिकाणीच आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले काम व्यवस्थित करावे, असे आदेश सभापतींनी यावेळी दिले.

--

कर्मचारी पळविण्याची स्पर्धा

सातपूर विभागात आरोग्य कर्मचारी पळविण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये नेमणूक केलेले तब्बल ११ कर्मचारी प्रभाग ११ मध्ये काम करीत असल्याचे उघड झाल्याने प्रभाग सभापती यांनी नाराजी व्यक्त केली. यात आर्थिक देवाणघेवाणीतून आरोग्य कर्मचारी दुसऱ्याच प्रभागात कामासाठी नेले जात असल्याचा संशय असून, सभापती बोलकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती घेत नेमलेल्या ठिकाणीच काम करण्याचे आदेश केले.

--

सदस्यांच्या तक्रारींनंतर अचानक केलेल्या पाहणी दौऱ्यात नेमलेल्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी कामच करीत नसल्याचे निर्दशनास आले. याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहे.

-माधुरी बोलकर, सभापती, सातपूर प्रभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images