Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शहर, परिसरात डेंग्यूचा उद्रेक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेकडून स्वाइन फ्लू आणि डेंग्यूबाबत विविध प्रकारची जागृती, उपाययोजना करण्यात येत असल्या, तरी त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबरच्या १ तारखेपासून महापालिका हद्दीत डेंग्यूसदृश रुग्णांच्या आकड्याने शंभरी पार केली असून, पॉझ‌िट‌िव्ह रुग्णांचा आकडा १८१ वर गेला आहे. मात्र, तरीही आरोग्य यंत्रणा मात्र सुस्तावलेलीच दिसत आहे.

शहरी व ग्रामीण परिसरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. डेंग्यूच्या रुग्णांतही वाढ होत असल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मोठ्या प्रमाणात संशयित रुग्णांची नोंद झाली होती. दुसऱ्या आठवड्यात हा आकडा आता शंभरच्या पार गेला आहे. मागील महिन्याच्या अहवालात एकूण ९७ रुग्ण डेंग्यूचे आढळले होते. अद्याप महापालिकेकडून सरकारी, तसेच खासगी दवाखान्यांत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशय‌ित रुग्णांचा आकडा शंभरच्या वर गेल्याने डेंग्यू मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी घटलेली स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या नोव्हेंबरमध्ये पुन्हा काहीशी वाढल्याची स्थिती आहे. महापालिकेच्या सर्वच प्रमुख रुग्णालयांत स्वाइन फ्लू कक्ष उभारण्यात आलेला आहे. याशिवाय या रुग्णांच्या सर्वेक्षणाबाबत डॉक्टरांना सूचना देण्यात आलेल्या असल्या, तरी वातावरणातील बदल, पाऊस यामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत.

--

विशेष स्वच्छता मोहीम

महापालिकेतर्फे शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहिमेत महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह, संघटनांचे सहकार्य घेतले जाणार आहे. शहरातील रस्ते, गोदाघाट, कॉलनी, महापालिका मुख्यालय, विभागीय कार्यालये, महत्त्वाचे चौक, सार्वजनिक ठिकाणे आदी सर्वच ठिकाणी स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या संस्था व नागरिकांना महापालिकेकडून झाडू व मास्क पुरविण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त शालेय, तसेच कॉलेजचे विद्यार्थी सहभागी व्हावेत, यासाठी शैक्षणिक संस्थांना अावाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विंटर फिटनेस फेस्टिवलची धूम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि नवीन डान्स अॅकॅडमीतर्फे खास कल्चर क्लब सदस्यांसाठी विंटर फिटनेस फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि. २७ नोव्हेंबर) ते ६ डिसेंबर असे दहा दिवस हा फिटनेस फेस्टिवल रंगणार आहे.

हिवाळा ऋतू आला, की अनेक जण सकाळी जॉगिंगला जाण्याचा संकल्प करतात. पण, थंडीमुळे हा संकल्प काही प्रत्यक्षात उतरत नाही आणि फिटनेस फक्त विचारांपुरताच मर्यदित राहतो. पण, यंदा फिटनेस विचारांपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी सर्वांना उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब तुम्हाला ही संधी उपलब्ध करून देत आहे. कॉलेजरोडवरील फिटनेस लाऊंज या ठिकाणी हा विंटर फिटनेस फेस्टिवल होणार आहे. सकाळी ८ ते ९, ११ ते १२, सायंकाळी ५ ते ६ आणि रात्री ८ ते ९ या वेळेत तुम्हाला त्यात सहभागी येईल. पूर्ण दहा दिवस या फिटनेससंदर्भातल्या बॅचेस असतील, त्यामुळे त्याचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

या विंटर फिटनेस फेस्टिवलमध्ये झुम्बा, बोकवा, स्टेप एरोबिक्स, बूट कॅम्प या डान्स प्रकारांचे कॉम्बिनेशन शिकविले जाणार आहेत. डाएटसंदर्भातील टिप्स आणि योगासंदर्भातही प्रशिक्षण दिले जाईल. कल्चर क्लब सदस्यांना यासाठी कुठलेही शुल्क नसून, इतरांसाठी ४०० रुपये रजिस्ट्रेशन फी ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असून, कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश देण्यात येणार नाही. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७ आणि ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देखणी ती बाला, ऐवज लंपास झाला!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐन पंचविशीतली देखणी तरुणी. व्यवसायाने ब्युटिशियन. कॉस्मेटिक उत्पादनेही ग्राहकाच्या गळी उतरवण्याचे कौशल्य. मात्र, तिच्या दिसण्यातलं सौंदर्य तिच्या विचारात एक टक्काही उतरलेलं नाही. तिने चक्क चोरीचा उद्योग सुरू केला. तब्बल चार ते पाच ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन तिने हातोहात लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने महिनाभर पाळत ठेवून या ब्युटीशियनचा पर्दाफाश करीत तिला गजाआड केले. या संशयित तरुणीचे नाव आहे धनश्री प्रकाश विसपुते (रा. म्हाडा कॉलनी, सामनगावरोड).

धनश्री विवाहित असून, तिच्या पतीकडे कार आहे. ती तो भाड्याने देतो. धनश्रीचेही ब्युटीपार्लर असून, अनेक मोठ्या कामांची जबाबदारी तिने पार पाडली आहे. वर वर पाहता धनश्रीसह तिच्या पतीला आर्थिक चणचण असल्याचे दिसत नाही. मात्र, सहज मिळणाऱ्या पैशांमुळे धनश्रीने चोरीचा मार्ग स्वीकारला. सतत वर्दळ असलेल्या ब्युटीपार्लरमध्ये धनश्री कॉस्मेटिक उत्पादनांची विक्री करण्यासाठी जात होती. ब्युटीपार्लरमध्ये आलेल्या महिलांच्या पर्स ज्या ठिकाणी ठेवलेल्या असायच्या, त्याच ठिकाणी ती आपले सामान ठेवायची. उत्पादनांची माहिती देताना बोलण्यात गुंग करणारी धनश्री हातोहात महिलांच्या पर्समधील लाखो रुपयांचे दागिने चोरी करीत होती. अशाच प्रकारच्या एका गुन्ह्यात काही महिन्यांपूर्वी धनश्रीला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली होती. तीन दिवस पोलिस कोठडीत, तर चार दिवस सेंट्रलमध्ये मुक्कामी राहून ती जामिनावर सुटली. हा गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच धनश्रीने गोविंदनगरमधील एका ब्युटीपार्लरमध्ये, तसेच पंचवटी, भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीत चोरी केली होती. कॉलेजरोड परिसरातील विद्या येवले ७ जुलै २०१६ रोजी सायंकाळच्या सुमारास गोविंदनगरमधील सौंदर्या ब्युटीपार्लरमध्ये गेल्या होत्या. ब्लिच फेशियल करण्यासाठी त्यांनी काढून ठेवलेले गळ्यातील सुमारे ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरी झाले होते. या गुन्ह्याचा तपास क्राइम ब्रँचच्या युनिट एककडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली पद्धत लक्षात घेत धनश्रीकडे लक्ष केंद्रित केले. काही दिवस तिच्यावर पाळत ठेवून तिच्या आर्थिक उत्पन्नाची माहिती मिळवली. संशयास्पद माहिती समोर आल्याने पोलिसांनी तिला अटक केली. धनश्रीने लागलीच गुन्ह्यांची कबुली दिली.

सोने गहाण ठेवून घेतले पैसे

चोरी केलेल्या सोन्याच्या बांगड्या एका फायनान्स कंपनीकडे, तर सोन्याची पोत एका खासगी व्यक्तीकडे गहाण ठेवून धनश्रीने पैसे घेतले होते. पोलिसांनी ४१ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या आणि ३५ ग्रॅम वजनाची लगड असा दोन लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. धनश्रीला २१ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तिला आज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पंचवटी, भद्रकालीसह मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी कोर्टाच्या आदेशाने पुन्हा तिला पोलिस कोठडीत घेण्यात येऊ शकते, असे युनिट एकचे पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता वृक्षजन्य तेलबिया अभियान

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक उपविभागात २०१७-१८ मध्ये पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात वृक्षजन्य तेलबिया अभियान कृषी विभागातर्फे राबवण्यिात येत असून, त्याअंतर्गत करंज, कोकम, महुआ या वृक्षजन्य तेलबिया पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वृद्धीचा अंतर्भाव आहे. करंज पिकासाठी प्रतिहेक्टर ५०० रोपे आणि २० हजार रुपये लागवडखर्च अनुदान देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षापासून देखभाल कालावधी चार वर्षे असून, प्रतिवर्ष देखभाल अनुदानमर्यादा दोन हजार रुपये आहे.

महुआ पिकासाठी प्रतिहेक्टर २०० रोपे आणि १५ हजार रुपये लागवडखर्च अनुदान देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षापासून देखभाल कालावधी आठ वर्षे असून, प्रतिवर्ष देखभाल अनुदानमर्यादा दोन हजार रुपये आहे. कोकम पिकासाठी प्रतिहेक्टर २५० रोपे आणि १५ हजार रुपये लागवडखर्च अनुदान देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षापासून देखभाल कालावधी सहा वर्षे असूनस प्रतिवर्ष देखभाल अनुदानमर्यादा दोन हजार रुपये आहे.

रोपांची उपलब्धता कृषी विद्यापीठ किंवा सामाजिक वनीकरणाकडून निर्धारित दराने खरेदी करून शेतकऱ्यांनी लागवड करावयाची आहे. शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावे सातबारा व ८ अ असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्यांची निवड पंचायतराज संस्थेच्या सहभागाने करावी. विहित केलेल्या प्रमाणानुसार अनुसूचित जाती-जमाती, तसेच महिला लाभार्थ्यांचा समावेश असणार असून, कार्यक्रमांतर्गत किमान ३० टक्के महिला व ३ टक्के अपंग लाभार्थींची निवड केली जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन, उपविभागीय कृषी विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान! लुटारू महिलांची टोळी नाशिकमध्ये

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करून सात महिलांच्या एका टोळीने सिन्नर फाटा येथील एका खते व बी-बियाण्यांच्या दुकानातून तब्बल दीड लाख रुपये हातोहात लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. विशेष म्हणजे या महिलांच्या टोळीतील काही महिलांकडे लहान मुलेही आहेत.

सिन्नर फाटा येथील तेजस अॅग्रो सर्व्हिसेस या दुकानाचे मालक बंडू जाधव यांचा मुलगा तेजस बंडू जाधव याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात नमूद करण्यात आले आहे, की गुरुवारी दुपारी तेजसचे वडील बंडू जाधव कामानिमित्त नाशिकला गेल्याने तेजस दुकानाचे कामकाज सांभाळत होता. दुपारी तीनच्या सुमारास सात महिला या दुकानात आल्या व पिण्यासाठी पाणी मागितले. या महिलांच्या टोळीने थेट काउंटरपर्यंत येऊन पाण्यासाठी आग्रह केला. मात्र, तेजस जाधव व दुकानातील कामगारांनी या महिलांना दुकानाबाहेर जाण्यास सांगितले. सुरुवातीला या महिलांनी दाद दिली नाही. त्यामुळे या महिलांना दरडावून बाहेर जाण्यास सांगावे लागले. त्यामुळे ही महिलांची टोळी दुकानाबाहेर गेली. या प्रकारानंतर तेजसचे वडील नाशिकहून परत दुकानात आले. त्यांनी दुकानातील ड्रॉवर पाहिले असता पैसे अस्ताव्यस्त पडलेले आढळले. त्यांनी पैशांची मोजदाद केली असता पैसे कमी असल्याचे लक्षात येताच त्यांनी तेजसला त्याबद्दल विचारणा केली. तेजसने काही वेळापूर्वी आलेल्या महिलांच्या टोळीबद्दल सांगितले. या महिलांनीच पैसे लंपास केल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता या टोळीतील एक महिला खाली बसून पैशांच्या ड्रॉवरकडे सरकत ड्रॉवरमधील पैसे लंपास करीत असल्याचे उघड झाले. त्यानंतर तेजसने नाशिकरोड पोलिस ठाण्यात या अनोळखी महिलांच्या टोळीबाबत दीड लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद दाखल केली.

लहान मुलांचा गैरवापर

टोळीतील महिला अंदाजे २० ते ३० वर्षांच्या असून त्यांच्याकडे लहान मुलेही आहेत. या महिला कडेवरील लहान मुलांचा वापर सहानुभूती मिळविण्यासाठी करीत असल्याचे सिन्नर फाटा येथील चोरीच्या प्रकरावरून उघड झाले आहे. त्यामुळे या महिलांकडून आणखी काही व्यावसायिकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या चोरीच्या प्रकरणातील महिलांच्या टोळीचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांकडून अचानक दप्तर तपासणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दफ्तर तपासणी ही सरकारी यंत्रणेची जबाबदारी असून, विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह यंत्रणेला दफ्तर तपासणीचे आदेश दिले आहेत. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करीत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयातील विविध शाखांची अचानक पाहणी करून तेथील दप्तरे तपासली.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अंतर्गत जम‌िनींच्या अधिग्रहणाची जबाबदारी महसूल यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. त्यावरच स्थावर मालमत्तेसंबंधीच्या बाबी अवलंबून असतात. गावपातळीवरील तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या यंत्रणेला याबाबतच्या जबाबदाऱ्या ठरवून देण्यात आल्या आहेत. या दफ्तरातील त्रुटींमुळे भविष्यात न्यायालयीन वाद उद्भवतात. हे वाढते प्रकार लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना दफ्तर तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त महेश झगडे स्वत: येत्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक कार्यालयातील विव‌िध विभागांची पाहणी केली. ज कार्यालयांमधील टेबलांवर ठेवलेल्या फाइल्स यावेळी चाळण्यात आल्या. संबंधितांना त्याबाबत विचारणा करण्यात आली. सोमवारी (दि.२७ ) रोजी विभागीय आयुक्तांकडून पाहणी केली जाणार आहे. दफ्तर तपासणीमध्ये त्रुटी आढळल्या आणि त्या दूर करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याकडे पाठविल्या गेल्या नसतील, तर संबंधितांची चौकशी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नारपारच्या श्रेयासाठी भुसे यांची धडपड’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्वी नारपारला आरपार खोटी दिशाभूल करणारी योजना म्हणून हिणवणारे विद्यमान ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आता प्रकल्प मंजुरीनंतर या पाण्याचे महत्त्व व उपयुक्तता पटवून देण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहेत. नारपार-दमणगंगाचे कुठलेच श्रेय मिळत नाही, म्हणूनच हा सर्व हास्यास्पद प्रकार ते करीत असल्याची टीका आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी केली आहे.

दमणगंगा-नारपार नद्यांधील बहुमूल्य जलसंपत्ती वर्षानुवर्षे वाया जात असल्याने हे पाणी पूर्वेकडे वळवावे आणि पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचे निवारण करावे, अशी मागणी डॉ. प्रशांत हिरे यांनी सातत्याने उचलून धरली आहे. हा प्रकल्प दुष्काळी शेतकरी तुषार्त जनता, उद्योग, कारखानदारीसाठी दुरगामी हिताचा ठरणार आहे. ‘तुला न मला’ या रडक्या नीतीचा व पोटदुखीचा खेळ मांडून भुसेंनी जनतेची दिशाभूल करू नये, अशी टीका हिरे यांनी केली आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून, विकासपर्वाला चालना मिळेल, असा विश्वास हिरे यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुढीपाडव्यापासून प्लास्टिकबंदी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी कडक कायदा बनवला जाणार आहे. मात्र, हा कायदा सर्वांना आपला वाटावा म्हणून राज्यातील प्रदेश विभागातील अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले जात आहे. आतापर्यंत विधिमंडळात कायदा बनवला जात होता व अधिकारी त्याची अंमलबजावणी करीत होते. मात्र, आता अधिकाऱ्यांचे मत अगोदर जाणून घेतले जाईल, नंतर कायदा बनवला जाणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या मताबरोबरच देशातील प्लास्टिकबंदी घातलेल्या १७ राज्यांतील कायदा व तेथील अंमलबजावणी कशी झाली, याची माहिती घेण्यात येत असून, त्यासाठी चार टीम बनवल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे प्लास्टिकबंदी धोरण राबविण्यासाठी नाशिकरोड येथील महाराष्ट्र इन्व्हायर्न्मेंटल इंजिनीअरिंग सेंटरच्या मित्रा सभागृहात बैठक झाली. या वेळी प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे सदस्य सचिव पी. एन. अनबलगन, विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. उपस्थित होते. या वेळी रामदास कदम मार्गदर्शन करताना म्हणाले, की सर्वांना विश्वासात घेऊन कायदा बनवला जात आहे. प्लास्टिक कचरा हा विषय गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व आदित्य ठाकरे यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधले. त्यानंतर मच्छिमारांनी जाळ्यात ४० टक्के मासे येत असल्याचे सांगितले. समुद्रात तर प्लास्टिकचे बेट होत असल्याचे दिसू लागले. त्यामुळे हा विषय गंभीर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईला अतिवृष्टी झाल्यानंतर प्लास्टिक कचऱ्याचा विषय पुढे आला. राज्यात सर्वत्र प्लास्टिक कचरा ही गंभीर समस्या झाली असून, त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

नाशिकला तिसरी बैठक

आतापर्यंत प्लास्टिकबंदीसाठी सूचना व चर्चा करण्यासाठी मुंबई, औरंगाबादनंतर नाशिक विभागाची बैठक घेण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री कदम यांनी दिली. बैठकीत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी अधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या. राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, तर कधी दुष्काळ पडतो. त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसतो. निसर्गाचा तोल ढासळत चालला असून, त्यामुळे पर्यावरण या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कार्यालयात बंदी

मंत्रालयापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पाण्याच्या प्लास्टिक बाटलीला बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पहिली सुरुवात आपल्यापासून होणार आहे. पाणी बॉटल तयार करणाऱ्या कंपन्यांना रिकाम्या बाटल्या रिसायकलिंग कारखाना सुरू करावा लागेल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलयुक्तमध्ये विभाग अपयशी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

कायमस्वरूपी टंचाईमुक्तीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे २०१६-१७ या वर्षीचे भौतिक उद्दिष्ट साध्य करण्यात नाशिक विभाग अपयशी ठरला आहे. या वर्षासाठीचे केवळ ५६ टक्केच आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात प्रशासनाला यश आलेले आहे. या वर्षासाठी ८५८ कोटी ६४ लाख रुपयांचा आर्थिक आराखडा होता. त्यापैकी अवघे ४८२ कोटी १९ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात केवळ ७३ टक्के निधीतच शंभर टक्के भौतिक आराखड्यातील लक्ष्य साध्य झाल्याने उर्वरित निधीचे नियोजन कशासाठी करण्यात आले होते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या योजनेच्या आर्थिक आराखड्यात नक्कीच मोठे गौडबंगाल असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या आकडेवारीत ताळमेळ नसल्याचेही उघड झाले आहे.

दरवर्षी पाच हजार टंचाईग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने डिसेंबर २०१४ पासून जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित केली. या योजनेमुळे टंचाईमुक्तीबरोबरच पाणीसाठवण क्षमतेत वाढ करणे व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यावरही भर दिला जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. विभागातील प्रशासनाच्या थंड कामकाजामुळे २०१६-१७ या वर्षीच्या आर्थिक आराखड्यानुसार निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट साध्य होऊ शकलेले नाही. केवळ ५६ टक्के निधीचा विनियोग करण्यात आलेला असून, ४४ टक्के निधी खर्च करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. याचा परिणाम विभागातील टंचाईमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यावर झाला असण्याची शक्यता आहे.

नाशिक अव्वल, तर धुळे तळाला

जलयुक्त शिवार योजनेच्या २०१६-१७ या वर्षीच्या अंमलबजावणीकामी विभागातील नाशिक जिल्ह्याने ७३ टक्के उद्दिष्ट साध्य करून विभागात अव्वल स्थान पटकावले आहे, तर धुळे जिल्ह्याने ४२ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. उर्वरित नंदुरबार, जळगाव आणि नगर जिल्ह्यांनी अनुक्रमे ५९, ५१ आणि ५३ टक्के इतकेच आर्थिक उद्दिष्ट साध्य केले आहे.

कामे होऊनही निधी शिल्लक!

जिल्ह्यात गेल्या वर्षी ६०६९ कामांचे भौतिक आराखडा लक्ष्य होते. त्यासाठी प्रशासनाने १९४ कोटी ९५ लाख रुपयांचा आर्थिक उद्दिष्टाचा आराखडा तयार केलेला होता. गेल्या वर्षी जिल्ह्यात भौतिक आराखड्यातील उद्दिष्टापेक्षा जास्त कामे झाली. जिल्ह्यात तब्बल ६१०६ कामे झाली. त्यासाठी अवघा १४३ कोटी २५ लाख रुपये इतकाच खर्च आला. शंभर टक्के भौतिक उद्दिष्ट अवघ्या ७३ टक्के निधीतच साध्य झाले, तर उर्वरित २७ टक्के अतिरिक्त निधीचे आर्थिक आराखड्यात नियोजन कुणासाठी करण्यात आले होते, असा सवाल आता केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगच शिकवणार प्रात्यक्षिके

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औषधनिर्माण क्षेत्रात वापरली जाणारी महागडी उपकरणे दरवेळी कॉलेजांच्या लॅबोरॅटरीमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे शक्य होतेच असे नाही. या समस्येवर तोडगा काढत सपकाळ फार्मसी कॉलेजने दिंडोरीतील न्युट्रालायटिका रिसर्चवर कंपनीसोबतच नुकताच एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार लॅबोरॅटरीमधील प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण या कंपनीद्वारे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना दिले जाणार आहे.

‘रिसर्च हायपिनेटेड अॅनॅलॉटिकल इन्स्ट्रुमेंट ट्रेनिंग’ अशा मथळ्याखाली हा करार करण्यात आला आहे. करार करण्यात आलेली कंपनी नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरॅटरीज (एनएबीएल) मान्यताप्राप्त आहे. या करारानुसार कंपनीत प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी एक दिवसापासून चार आठवड्यांपर्यंत विविध प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येतात.

प्रशिक्षणामध्ये प्रयोगशाळेतील उपकरणे उपयोगात आणण्याचे शिक्षण दिले जाणार आहे. या उपकरणांमध्ये एलसीएमएस, एचपीएलसी, जीसीएमएस, आयसीपी एमएस, यूव्ही, जीसी, एफटीआयआर आणि एएएस आदी उपकरणांचा समावेश आहे. ही उपकरणे महागड्या किमतीची असल्याने त्यांची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे ज्ञानसंवर्धन, प्रयोगशाळा, प्रात्यक्षिके आणि संशोधन क्षेत्रातील महत्त्वाच्या बाबींची देवाण-घेवाण करण्यास मदत होणार आहे. दिंडोरीतील न्युट्रालायटिका रिसर्चचे संस्थापक तथा कार्यकारी संचालक पवन मोहटा, राहुल गेडाम आणि सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जी. सपकाळ, उपाध्यक्षा कल्याणी सपकाळ, संचालक डॉ. बी. बी. रायते, प्राचार्य डॉ. आर. बी. सौदागर, प्रा. दीप्ती फडतरे यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याचे दर स्थिरच!

0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांद्याच्या निर्यातमूल्य शून्य डॉलरवरून ८५० डॉलरवर केले असले त्याचे फारसे परिणाम शुक्रवारी दिसले नाही. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याचे दर २५० रुपयांची घसरले, असले तरी कांद्याने चार हजार रुपयांचा टप्पा गाठला होता.

चालू वर्षी चांगला पाऊस आणि पोषक हवामान यामुळे रब्बी (उन्हाळ) कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. अतिवृष्टीमुळे गुजरात, कर्नाटक, राजस्थान इ. राज्यातील कांदा पिकाचे नुकसान झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी वाढली. त्यामुळे राज्यातील कांदा दरात वाढ होऊन कांद्याने चार हजार रुपयांचा टप्पा गाठला होता.

कांदा दरात होत असलेल्या दरवाढीमुळे किरकोळ बाजारात कांद्याचे दर आणखी वाढू नये म्हणून केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर ८५० डॉलर प्रत‌ि टन निर्यातमूल्य लावण्याचा निर्णय घेतला असून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल, अशी आशा जरी शासनाला वाटत असली तरी शासनाचा हा निर्णय शेतकरी विरोधी असून, केवळ शहरी ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी व गुजरातमधील निवडणुकीत मतदारांकडून कोणताही धोका पोहोचू नये म्हणून केंद्राची खेळी असल्याचे बोलले जात आहे.

वास्तविक आता रब्बी (उन्हाळ) कांदा संपत आला असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये खरीप (लाल) कांद्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सदर कांद्याचे आयुष्य कमी असल्याने शेतकऱ्यांना हा कांदा काढलेनंतर लगेचच विक्री केल्याशिवाय पर्याय नसतो. अशा परीस्थितीत अत्यंत काबाडकष्ट व खर्च करून हाती आलेल्या कांदा विक्रीतून दोन पैसे मिळण्याची संधी येथील उत्पादकांना असतांना केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंधने आणणेच्या दृष्टीने कांद्यावर किमान निर्यातमूल्य लागू केल्याने कांदा दर कमी होण्याची शक्यता आहे. सदर निर्णयामुळे शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सर्वसाधारण दरात अडीचशे प्रत‌ि क्विंटलने घसरण झाली आहे.

चांदवडला कांद्याचा ‘चौकार’

मनमाड ः शुक्रवारी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याला आजवरचा सर्वात विक्रमी म्हणजे ४४४४ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांत खुशीची लहर उसळली. कांद्याच्या भावाने चांदवड बाजार समितीत मारलेला हा आगळा चौकार चर्चेचा विषय ठरला. चांदवड बाजार समितीतील हा भाव मोसमातील उच्चांक आहे उन्हाळी कांद्या बरोबरच लाल कांद्यानेही चांदवड मध्ये ३९०० पर्यंत मजल मारली. चांदवड मध्ये शुक्रवारी कांद्याचे १२०० ट्रॅक्टर दाखल झाले. तर तब्बल २१ ते २२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.
नांदगावात ३८५० भाव

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांद्याला चांगला भाव मिळाला. उन्हाळ कांदा ३८५३ भावाने तर लाल कांदा ३८५२ भावाने विकला गेला. शेतकरी वर्गात समाधान पसरले नांदगाव मनमाड बाजार समितीत कांद्याची चांगली आवक झाली. गेल्या आठ दिवसात उन्हाळ कांद्याने तीन हजारांपासून चार हजारांपर्यंत टप्पा गाठला आहे. नांदगाव बाजार समितीती शुक्रवारी मोठ्या प्रमाणात कांदा आला होता. दिवसभर बाजार समिती आवारात वाहनांची गर्दी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाकी वर्दीने दिला मुलींना मायेचा हात

0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पालक रागावल्याने नाराज होऊन घर सोडून मध्य प्रदेशातून थेट मनमाड रेल्वे स्थानकात आलेल्या तीन अल्पवयीन मुलींना खाकी वर्दीतील माणुसकीने सुखरुप पालकांपर्यंत पोहचवले. मनमाड रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांच्या या माणूसपणाने मुलींच्या चेहऱ्यावर हसू तर फुललेच शिवय त्यांच्या पालकांना मुली सापडल्याचा अवर्णनीय आनंद झाला. पोलिसांकडून मुलींना ताब्यात घेताना पालकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. विविध कारणांनी प्रसिद्ध असलेल्या मनमाड जंक्शनमधील पोलिसांच्या या चांगल्या कामाने मनमाडची प्रतिमा मात्र उंचावली आहे.

मनमाड रेल्वे सुरक्षाबलाचे राकेशकुमार व एस. ए. वाणी हे दोघे मनमाड स्थानकात फलाट ५ व ६ वर गुरुवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना आशू काळे (वय १०), खुशी आनंद मिलिंद (वय ९), पूजा प्रताप ठाकूर (वय १४) या तिघी अल्पवयीन मुली घाबरलेल्या अवस्थेत दिसून आल्या. या तिघींनी त्यांनी मायेने विचारपूस केली. त्यावर मुलींनी मध्य प्रदेशातील सुंदरनगर येथून आल्याने सांगितले.

राकेश कुमार व श्री. वाणी यांनी केलेले माणुसकीचे काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांची चांगली प्रतिमा दूरच्या राज्यात गेली आहे.

- के. डी. मोरे, पोल‌सि निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका मालमत्तेवर जप्तीची टांगती तलवार

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील भूसंपादन प्रकरणातील दाव्यांचा वेळीच निपटारा न केल्याने येथील महापालिकेवर वारंवार जप्तीची नामुष्की ओढवत आहे. शहरातील एका भूसंपादन दाव्यापोटी जमीनमालकास फेब्रुवारी २०१४ मध्ये न्यायालयीन आदेश होवूनही रक्कम अदा न केल्याने पालिकेची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. लांडगे यांनी दिले आहेत . १८ डिसेंबरपर्यंत सुमारे ९५ लाख रु जमीनमालकास अदा न केल्यास आयुक्तांचे वाहन जप्त करण्यात येणार आहे.

पालिकेने नवीन बसस्थानक परिसरातील सर्वे नंबर ४१ हा भूखंड बेघरांसाठी संपादन केला होता. या भूसंपादनासाठी ८७ लाख रुपये मिळण्यासाठी जमीनमालक अमिना अब्दुल हाफिज यांच्यामार्फत अब्दुल रशीद अब्दुल हाफिज यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणी २४ फेब्रुवारी २०१४ रोजी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत पालिकेला रक्कम अदा करण्याचे आदेश दिले होते. मात्र याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर अब्दूल रशीद यांनी न्यायालयात धाव घेत थकीत रक्कम व जप्तीची परवानगी मागितली होती. न्यायालयाने याबाबत १८ डिसेंबर पर्यंत थकीत रक्कम व व्याजासह एकूण ९३ ते १५ लाख रु अदा करायचे आहेत अन्यथा आयुक्तांचे वाहन जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

यापूर्वी टाळली जप्तीची नामुष्की

शहरातील भूसंपादन दाव्यापोटी रक्कम अदा करण्याचे अनेक प्रकरणे प्रलंबित असून यापूर्वी देखील शहरातील क्रीडांगणासाठी संपादित जमिनीची वाढीव नुकसान भरपाई देण्याप्रकरणी जप्तीची नामुष्की ओढवली होती मात्र ७५ लाखाचा धनादेश तातडीने देत ही नामुष्की टाळली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लावणी अन् अभंगाची सिन्नरमध्ये जुगलबंदी

0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

‘लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘श्रीअनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा’ या आणि अशा लावणी-अभंगाच्या जुगलबंदीने सिन्नरकर मंत्रमुग्ध झाले.

येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयात ४५ वा ग्रंथालय सप्ताह संपन्न झाला. चारुदत्त दीक्षित निर्मित संकल्पना, निवेदन व लेखन असलेल्या ‘लावणी भुलली अभंगाला’ या विषयावर शेवटचे पुष्प गुंफताना मधुरा गोरे यांनी लावणी अन् अभंग यातील नाते विषद केले.

व्यासपिठावर वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, नरेंद्र वैद्य, कार्यवाह हेमंतनाना वाजे, संचालिका निर्मल खिवंसरा आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. ज्याकाळी मोबाइल, टीव्ही ही साधने नव्हती, काही बंधनकारक चाली-रिती रुढी-परंपरा होत्या. त्यावेळी माणसांच्या समूहाने व संतानी अभंग, कीर्तन, भजनातून जनप्रबोधन केले, असे चारुदत्त दीक्षित व मथुरा गोरे यांनी सांगितले. पारंपरिक लावण्या लोकगीतांचे प्रकार हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहे. काही कविता कुणी केल्या हे माहित नसले तरी अभंग व लावणी इतक्या वर्षांपासून आजही जीवंत आहे, असे सांगत ‘बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला’ अशा बहारदार लावणी सादर करून श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.

अनेक संतांचे महंतांचे देव-देवतांचे अभंग म्हणताना अभंगांमधील सार त्यांनी सांगितला, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ यासारखे अभंग आणि लावणी यांची जुगलबंदी साधत त्यांनी श्रोत्यांना पंढरीच्या विठू माऊलीच्या व संतांच्या सहवासात नेले. ग्रंथालय सप्ताहाचे पहिले पुष्प वेदश्री थिगळे यांनी ‘उमलूया जगण्याच्या

खूणा’, दुसरे पुष्प भारत दौंडकर व अरुण पवार यांनी ‘मायमातीच्या कविता’, तिसरे पुष्प कल्याण पेरे यांनी ‘महिला सबलीकरण’, चौथे पुष्प प्रकाश पाठक यांनी ‘आई’, पाचवे पुष्प डॉ. भरत केळकर यांनी ‘डॉक्टर विदाऊट बॉर्डर’, सहावे पुष्प विवेक घळसासी यांनी ‘नवे तंत्रज्ञान-पालक आणि मुलांपुढे आव्हान’ तर सातवे पुष्प स्मितल मोरे यांनी ‘मानसिक ताणतणावातून सुटका’ या विषयावर गुंफले. या कार्यक्रमाला शहरातील रसीक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब! ११०० ग्रॅमचे सीताफळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुम्ही किती प्रकारची सीताफळे पाहिली असतील. एक किंवा दोन. फारतर चार प्रकारची. परंतु, कृषीथॉन प्रदर्शनामध्ये तब्बल २३ जातींची सीताफळे पहावयास मिळत आहेत. विशेष म्हणजे ११०० ग्रॅम वजनाचे एनएमके १ (गोल्डन) जातीचे सिताफळ सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे.

सोलापूर तालुक्यातील बार्शी तालुक्यामध्ये या सीताफळांचे उत्पादन घेण्यात आले असून अॅनोना, चॉंदसिली, आर्कासहान, लाल सीताफळ १, लाल सीताफल २, अॅनोना ७, अॅटमोया, बाळानगर, पिंक मेमॉथ, अॅनोना म्युरिकाटा, अॅनोना ग्लॅब्रा, हैद्राबाद सिलेक्शन, फिंगर प्र‌िंट, चेरीमोया, वॉशिंग्टन जेम आणि अॅनोनाल मॉन्टेना या जातींची सीताफळे पहावयास मिळत आहेत. याखेरीज लाल रंगाचे तसेच बी विरहित (सीडलेस) सीताफळे पहाण्यासाठी नागरिकांची येथे गर्दी वाढू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रसिद्ध वाईन कंपनीवर आयकर विभागाची धाड

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाईन टुरिझम वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नाशिकच्या एका प्रसिद्ध वाईन कंपनीवर आयकर विभागाने धाड टाकल्याने वाईनरी कंपनीमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे ही धाड मुंबईच्या आयकर विभागाने टाकल्याचे समजते. तब्बल १० ते १५ गाड्यांचा ताफा वाईन कंपनीच्या विविध प्रतिष्ठाण व निवासावर गेला आणि त्यांनी तेथे झाडाझडती घेतल्याचे वृत्त आहे. आयकर विभागाने दिवसभर या वाईन कंपनीच्या हिशोबाची तपासणी करून माहिती संकलित केली. या कंपनीचे कार्पोरेट कार्यालय मुंबईत असून आयकरचे रिटर्नही हे मुंबईत भरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईच्या आयकर विभागाला हिशोबात संशय आल्याने ही धाड टाकण्यात आल्याचे समजते. याबाबत आयकर विभागाने गोपनीयता पाळत त्याबद्दलची माहिती देणेही टाळले. काही दिवसात नाशिकच्या आयकर विभागाने कांदा व सोने व्यापाऱ्यांवर धाड टाकली. पण, मुंबईच्या आयकर विभागाने वायनरीला लक्ष्य केले आहे. त्याची माहिती अधिकृतरित्या अद्याप पुढे आलेली नसली तरी आयकर विभागाला घबाड मिळाल्याची चर्चा आहे. या आयकर धाडी बद्दल वायनरी कंपीनीच्या विविध प्रमुखांशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांचे फोनही दिवसभर बंद होते. त्यामुळे नेमके काय झाले, हेदेखील अद्याप गुलदस्त्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समकालीन वास्तवाचे उमटले अर्क

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाटकाने इतिहासाला भिडताना त्यातील समकालीन अर्क काढायाचा असतो. समकालाचा आवाका म्हणजे मूळाशी जाऊन भिडलेले संदर्भ. जगातील कोणत्याही इतिहासाचे सजगतेने भान ठेवले तर त्यातूनच लेखक-दिग्दर्शकाला समकालीन वास्तवाचा अर्क काढणारी कलाकृती देता येते. याचे प्रत्यंतर देणारे नाटक म्हणजे प्राजक्त देशमुख लिखित, सचिन शिंदे दिग्दर्शित ‘मून विदाउट स्काय’.

‘मून विदाउट स्काय’ हे नाटक शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात सादर करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत अश्वमेध थिएटर्स संस्थेतर्फे ‘मून विदाउट स्काय’ हे नाटक सादर झाले. पडदा उघडल्यांनतरच्या तुकड्यामध्ये काळजाचे ठोके चुकवणारे काही प्रसंग श्वास रोखून धरायला लावतात. देशाच्या सीमांचे बंधन झुगारून एकूणच मानवतेला खाली मान घालणारी महत्त्वाची घटना दुसऱ्या महायुद्धात जगाने पाहिली. हॉलोकॉस्ट अर्थात छळछावणी. त्याच काळ्या इतिहासाच्या छळछावण्यांचा चटका देणारा अनुभव या नाटकाने दिला. नशिबाच्या फेऱ्यात अडकलेल्या काही प्रवाशांची रवानगी छळछावणीत होत असते. रेल्वे वॅगनमध्ये कोंबले जाणे, ते छावणीपर्यंतचा प्रवास म्हणजे हे नाटक. नाटक तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर ,वर्तमान आणि भूतकाळांमध्ये झोके घेत पुढे सरकते. अनेकांना या कत्तलींची फक्त इतिहासाच्या नोंदीपुरतीच माहिती आहे पण नाटकात हा पूर्ण पट अक्षरश: एखाद्या डॉक्युमेंटरीसारखा उलगडत जातो आणि अनेक प्रसंगात काळीज पिळवटून टाकतो. हेलन, लिओ आणि जुलिअन या पात्रांभोवती फिरत हा प्रवास सुरू असतो आणि इतर प्रवाशांच्या भूतकाळातले ठिपके एकत्र होत शेवटच्या अत्युच्च धक्कादायक क्षणावर येऊन नाटक थांबते आणि पुन्हा दोन पावलं मागे जाऊन उंचावरून देहार्पण करावे तसे स्वत:ला झोकून देते. हा पूर्ण पट गुंतागुंतीने परंतु सोप्या पद्धतीने लेखकाने उलगडला आहे.

अश्वमेध थिएटर्सतर्फे प्रस्तुत या नाटकाचे लेखन प्राजक्त देशमुख यांनी केले होते. दिग्दर्शन सचिन शिंदे यांचे होते. रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा राहुल, उर्वराज यांची होती. नेपथ्य लक्ष्मण कोकणे यांचे होते. संगीत रोहित सरोदे यांचे होते. प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित व राजेश भुसारे यांची होती. रंगमंच व तांत्रिक सहाय्य गिरिश गर्गे, हृतिक तिडके, राम नवले यांचे होते. निर्मिती प्रमुख श्रीपाद देशपांडे होते. सूत्रधार दत्ता पाटील व सदानंद जोशी होते. नाटकात नुपूर सावजी, धनंजय गोसावी, शुभांगी पाठक, राहुल गायकवाड, प्रशांत साठे, उर्वराज गायकवाड, श्रद्धा पाटील, कार्तिकेय कत्रोजवार, अक्षदा लाखे, चेतन बर्वे, सनी मिश्रा, प्रथमेश देशपांडे, आतिश डोंगरे, पार्थ बागूल, प्रतिक कुलकर्णी आणि प्रणव प्रभाकर यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक : उत्तरदायित्व
वेळ : सकाळी ११.३० वाजता
आजचे नाटक : चाहूल
वेळ : सायंकाळी ७ वाजता
स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घिरट्या घालणाऱ्या असुरक्षितपणाचे ‘एक्झिट’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रथितयश झाले की त्यापाठोपाठ भावनां व अपेक्षांचे ओझे येते. एखादी प्रथितयश अभिनेत्री काम नसल्याने नैराश्याच्या गर्तेत ओढावली जाते तेव्हा रसिकांना ते मान्य होत नाही त्यांना तिच्यातील अभिनेत्रीचा कायम वावर आसपास हवा असतो. त्यासाठीची धडपड म्हणजे ‘एक्झिट’ हे नाटक शुक्रवारी सकाळच्या सत्रात सादर करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत बाबाज थिएटर संस्थेतर्फे एक्झिट हे नाटक सादर झाले. देविका प्रधान ही प्रथितयश अभिनेत्री आहे. चित्रपटातील दुनियेच्या ती आधीन गेलेली आहे. तिला तेथील माहोल भावतो, नेहमीच प्रसिद्धीच्या शिखरावर राहणे तिला आवडते. ४० वर्षे तिने जी प्रसिद्धी अनुभवली आहे त्याला कुठेतरी तडा जातोय हे तिला कळल्यावर दु:ख होते. तिला काम मिळत नाही, याचे तिला फार वैषम्य असते. त्यामुळे ती आपण फार बिझी आहोत हे सतत दाखवण्याचा प्रयत्न करीत असते. ती निराशेच्या गर्तेत प्रचंड खोल गेली आहे, हे मानसोपचारतज्ज्ञ कारखानीस यांना समजते. तिचा एकेकाळचा मित्र निरंजन देसाई याच्या मदतीने ते तिला पुन्हा एकदा या सर्व वातावरणात घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी निरंजन तिची मुलाखत आयोजित करतो. या मुलाखतीत ती अंधारगर्भ या नाटकाच्या बाबत काही दडवलेल्या गोष्टी बोलून जाते, त्याचा गिरीश साळवणकरला, नाटकाच्या दिग्दर्शकाला राग येतो, तो तिला धमकावतो; मात्र ती त्याला भीक घालत नाही. मुलाखत घेणारा निरंजन तिला या नाटकातील काही स्वगत म्हणायला लावतो; मात्र ती स्वगत विसरून जाते. काही दिवसांनी देविकाचा वाढदिवस असतो तेव्हा मुलाखत घेणारा निरंजन तिला भेटायला येतो. ती त्याला वेळ देण्याचे टाळते. परंतु, तो काही योजना करून घरात प्रवेश मिळवतो आणि तिला त्याच्या नवीन नाटकासाठी नायिका म्हणून काम करण्याची ऑफर देतो. मात्र, हे सर्व त्याच्याकडून मानसोपचार तज्ज्ञ करून घेत असतात. हे तो फोनवर कबूल करताना देविका ऐकते. परंतु निरंजन त्याच्या कामात यशस्वी होतो. त्या नाटकाच्या माध्यमातून तिला तो पुन्हा त्या जगात घेऊन येतो. त्यामुळे ही एक्झिट न ठरता एन्ट्री ठरते. अशा आशयाची ही कथा होती.

बाबाज थिएटर्सतर्फे प्रस्तुत नाटकाचे लेखन अरविंद लिमये यांनी केले होते. दिग्दर्शन आरती प्रभू हिरे यांचे होते. रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा किशोरी शेळके यांची होती. नेपथ्य वैशाली खाटीकमारे, एकता आढाव यांचे होते. संगीत प्रणिल तिवडे यांचे होते. प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती. रंगमंच सहाय्य नितीन आहेर यांचे होते. नाटकात विनोद राठोड, अमोल थोरात, अर्चना काळे आणि लक्ष्मी गाडेकर-पिंपळे यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशवाडीत कचऱ्याचा मुक्काम

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदाकाठी दर बुधवारी सकाळपासून भरणारा हा बाजार रात्री ९ वाजेपर्यंत आटोपतो. मात्र, या बाजाराचा सडलेल्या भाजीपाल्यासह कचरा तसाच टाकण्यात येतो. तो उचलला जात नाही. विशेषतः गणेशवाडी रस्त्यावरील कचरा पडून राहतो. बुधवारी (दि. २२) भरलेल्या बाजाराचा कचरा शुक्रवारपर्यंत (दि. २४) पडून होता.

बुधवारी भरणाऱ्या नाशिकच्या आठवडे बाजारात विविध वस्तूंच्या विक्री करणारे तसेच भाजीपाला विक्रेते येतात. त्यांची दुकाने म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण आणि रोकडोबा पटांगण यांच्यासह गोदाकाठाच्या विविध भागात मांडण्यात येतात. आठवडे बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांची संख्या वाढत गेल्याने बाजाराची जागा कमी पडू लागली आहे. हा बाजार थेट गणेशवाडीच्या रस्त्यावर भरू लागला आहे. रस्त्यात भरणाऱ्या या बाजारामुळे रहदारीला अडथळ्यापासून अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागते. बाजारासाठी येथे पर्यायी व्यवस्था म्हणून येथे बांधण्यात आलेल्या भाजीमार्केट आहे. मात्र, त्याचा वापर केला जात नाही. गंगाघाटावरील भाजी विक्रेते आणि महापालिका यांच्या वादात अडकलेल्या या भाजी मार्केटची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा बाजार रस्त्यावर भरत आहे. तो उठविण्याचा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने अनेकदा प्रयत्न केला, तो प्रयत्न विक्रेत्यांनी हाणून पाडला.

विक्रेत्यांकडून खर्च वसुली करावी
गणेशवाडीच्या रस्त्यावर भरलेल्या भाजीबाजारानंतर त्या भाज्यांच्या उर्वरित अंश तसेच खराब भाजीपाला येथेच टाकून देण्यात येतो. तो उचलला जात नसल्याने त्याचा कचरा पडून राहतो. दोन-दोन दिवस अशीच स्थिती प्रत्येक बुधवारनंतर दिसते. हा कचरा करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी किंवा निदान हा कचरा उचलण्याचा खर्च तरी येथे बसणाऱ्या विक्रेत्यांकडून वसूल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भाविकांसमोर ‘शोभा’
चंपाषष्ठीनिमित्त गोदाकाठावरील खंडेरायाच्या मंदिरातील यात्रोत्सवासाठी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली. नाशिकच्या या रस्त्यावरील अशा प्रकारे पडलेल्या कचऱ्याचे दर्शन घेण्याची वेळ आली असल्याची खंत भाविकांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको बसस्टॉप धोकादायक स्थितीत

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बिटको कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोरील बसस्टॉपचे शेड कधीही कोसळण्याच्या बेतात आहे. शेजारीच असलेल्या नव्या बसस्टॉपचे स्टीलचे पाइप व बैठक व्यवस्था चोरीस गेलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही बसस्टॉपचा उपयोग होत नाही. एखादी दुर्घटना होण्याआधी जुना बसस्टॉप हलविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी केली आहे.

बिटको कॉलेजच्या प्रवेशद्वारावर बससाठी विद्यार्थ्यांची गर्दी असते. विद्यार्थ्यांसाठी काही वर्षांपूर्वी पत्र्याचा बसस्टॉप उभारण्यात आला होता. तो कालांतराने खराब झाला आहे. त्याचे पत्र सडले असून चार-पाच ठिकाणी ते फाटले आहेत. पावसाळ्यात त्यातून पाणी गळते. पत्र्यांवर कचरा साचला आहे. बसस्टापमध्ये भटक्या लोकांच्या गोधड्या आहेत. पत्र्याला टेकू दिलेले पिलर वाकलेले आहेत. हा बसस्टॉप कधीही कोसळू शकतो. विद्यार्थी बसस्टॉपमध्ये उभे असतात. बसस्टॉपचा शेड कोसळल्यास दुर्घटना घडू शकते.

नव्याची दुरवस्था
जुन्या बसस्टॉप शेजारीच नवीन बसस्टॉप शेड उभारण्यात आला आहे. हा बसस्टॉप आधुनिक आहे. त्याला स्टीलचे पाइप व बैठक व्यवस्था होती. मात्र, बसस्टॉप तयार होऊन वर्ष होत नाही तोच त्याचे स्टीलचे पाइप, बैठक व्यवस्था चोरांनी गायब केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन्ही बसस्टॉपचा वापर होत नाही. असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

विद्यार्थी रस्त्यावर
जुना व नवा बसस्टॉप निरुपयोगी झाल्याने विद्यार्थी तेथे थांबत नाहीत. ते नाशिक-पुणे मार्गावर येऊन बसची वाट पाहतात. या रस्त्यावर दिवसरात्र प्रचंड वाहतूक असते. वाहने वेगात धावत असतात. ते एकमेकांना ओव्हरटेक करतात. त्या प्रयत्नात रस्त्यावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना धडक बसून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे दोन्ही बसस्टॉपची दुरवस्था दूर केल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका राहणार नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

मनसेचा इशारा
नवीन बसस्टॉपची दुरवस्था दूर करावी तसेच जुना बसस्टॉप हटवावा किंवा त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी मनविसेचे शाम गोहाड, नितीन धानापुणे, सागर दाणी प्रवीण पवार, उमेश भोई, धनश्री ढोले, सचिन शिसोदिया, बाजीराव मते, तुषार वाडिले, साजिद शेख, विलास कदम, अशोक ठाकरे, भाऊसाहेब ठाकरे स्वप्निल शिंदे, महेश म्हस्के, बंटी ठाकरे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images