Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तपोवनात पुन्हा अतिक्रमण

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तपोवनातील साधुग्रामसाठी असलेल्या महापालिकेच्या खुल्या जागेवर पुन्हा झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. या जागेवरील झोपड्या एक महिन्यापूर्वीच काढण्यात आल्या होत्या. पुन्हा त्याच जागेवर झोपड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. येथे वारंवार होणाऱ्या अतिक्रमणावर कायम स्वरुपीची उपाय योजना का केली जात नाही असा प्रश्न पडत आहे.

तपोवनातील महापालिकेची जागा सिंहस्थ कुंभमेळा संपल्यानंतर मोकळीच पडून असते. या मोकळ्या जागेवर जडीबुटी विक्री करणारे, विविध ठिकाणी मजुरी करणारे तसेच म्हैशी, उंट असे प्राणी पाळणारे लोक येथे पाल टाकण्यास सुरुवात करतात. या पालांची संख्या वाढत जाऊन येथील सर्वच परिसर व्यापून टाकतात. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला कधी तरी जाग येते आणि ते येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवतात. येथील पाल काढले जातात. मात्र, थोड्याच दिवसात पुन्हा ते उभेही राहतात. भुछत्रांसारखी त्यांची संख्या वाढत जाते.

तपोवनात वाढलेल्या झोपड्यांमुळे त्यांना लागणारे पाणी, स्वच्छता आदींच्या समस्या निर्माण होतात. एकीकडे शहर पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्याच्या घोषणा केल्या जातात. तर अशा अनधिकृतपणे झोपड्यांमधील नागरिकांच्या उघड्यावरील शौचास बसल्याने होणाऱ्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाण्यासाठी हे लोक जनार्दन स्वामी आश्रमाच्या पश्चिमेला असलेल्या सार्वजनिक नळाकडे जातात. त्यासाठी त्यांना रस्ता ओलांडून ये-जा करावी लागते. तपोवनाच्या मुख्य मार्गाने वाहतुकीची वर्दळ वाढलेली आहे. या झोपड्यांमधील महिला, लहान मुले हा रस्ता सतत ओलांडतात. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे.

जागेचा करा सदुपयोग
मोकळ्या जागेचा उपयोग महापालिकेने चांगले उपक्रम राबविण्यासाठी केला पाहिजे. जेणेकरून त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळू शकेल. एक ते दीड वर्ष या जागेचा वापर आणि त्यानंतर सिंहस्थ येईपर्यंत ही जागा नुसती पडून असते. त्यामुळे तेथे अशा प्रकारचे अतिक्रमण होतच राहणार आणि ते काढण्यासाठी पुन्हा महापालिकेची यंत्रणेचे वेळ वाया जाणार अशीच स्थिती बघायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महा-ई-सेवा केंद्रचालकांचा संप

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

आधारकार्ड सर्वत्र लिंक करण्याची सक्‍ती केल्याने ऑनलाइन कामांचे महत्त्व वाढले आहे. त्यासाठी सरकारकडून सुरू केलेल्या महा-ई-सेवा केंद्रचालकांनी राज्य सरकारने सुरू केलेल्या संग्राम योजनेविरोधात आंदोलन करून कामबंद ठेवले. पहिल्या टप्प्यात हा बंद पाळण्यात आला असला तरी भविष्यात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महा-ई-सेवा केंद्रचालकांनी विविध मागण्यासाठी काळ्या फिती लावून शुक्रवारी काम न करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या लोकहितकारी योजनांची तसेच महसूल विभागांतर्गत सेवांची माहिती व सेवा जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम २००८ पासून महा-ई-सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली. हे केंद्र सुरू करतांना मोठ्या प्रमाणावर अनामत रक्‍कम जमा केलेली असते. तसेच केंद्र उभारणीसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, आता राज्य सरकारने आपल्याच धोरणात बदल करून महा-ई-सेवा केंद्र बंद पाडण्याचे शडयंत्र सुरू केल्याचा आरोप केंद्रचालकांनी केला आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे साडेपाचशे अधिक केंद्रचालक असून सेवा संग्राम आणि सीएससीद्वारे या व्यवस्था सुरू केल्यास या केंद्रचालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारच्या २०१७ च्या परिपत्रकानुसार यात सुधारणा व्हावी, अशीही मागणी या केंद्रचालकांनी केली आहे.

अशा आहेत मागण्या
महा-ई-सेवा केंद्रांकडे कामकाज कायमस्वरूपी चालू ठेवावे, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व शहरातील नगरपालिका व महापालिकेतील अंतर्गत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा महा-ई-सेवा केंद्रांमार्फत कार्यान्वित कराव्यात. महाऑनलाइन लिंक सीएससी व संग्राम केंद्रांना देऊ नये. महा-ई-सेवा केंद्रे संचालकांना संगणक परिचालकाप्रमाणे मानधन व इतर पायाभूत सुविधा द्याव्यात, अशा विविध मागण्या केंद्रचालकांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरच्या पोस्टमनला सायकलचे ‘गिफ्ट’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर, अशोकनगर परिसरात घरोघरी टपाल वाटणाऱ्या पोस्टमन काशिनाथ गायकवाड यांना चक्क सायकल गिफ्ट म्हणून देण्यात आली. परिसरातील बांधकाम व्यावसायिक संदीप पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्चाला फाटा देत हा अनोखा उपक्रम राबविला.

पवार यांनी सायकल दिल्याने पायपीट दूर झाल्याचे मत पोस्टमन गायकवाड यांनी व्यक्त केले. वाढदिवसाचा खर्च मौजमजेवर वाया घालविण्यापेक्षा समाजातील उपेक्षित व गरजू घटनांना मदत करणे आनंददायी असल्याचे पवार यांनी सांगितले. अशोकनगरच्या राज्य कर्मचारी वसाहतीमधील पोस्ट ऑफिसमध्ये काशिनाथ गायकवाड अनेक वर्षांपासून पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत. टपाल पोच करण्यासाठी सायकलच नसल्याने त्यांना अशोकनगर भागात पायपीट करावी लागत होती. राज्य कर्मचारी वसाहत, वास्तूनगर, विश्वासनगर, पवार संकुल, राधाकृष्णनगर व श्रमिकनगर या आपल्या कार्यक्षेत्रात ते पारी फिरून घरोघरी टपालांचे वाटप करीत होते. पवार यांच्या घरीही ते नेहमी टपाल देण्यासाठी जात. वडील तानाजी पवार यांनी पोस्टमन गायकवाड यांच्याकडे वाहन नसल्याची संदीप पवार यांनी माहिती दिली. पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने नवीन सायकल खरेदी करून पोस्टमन गायकवाड यांना गिफ्ट दिली. आता गायकवाड मोठ्या उत्साहाने परिसरात टपालचे वाटप करीत आहेत. सामाजिक दृष्टीकोन ठेवत पवार कुंटुंबीयांनी सायकल दिल्याने पोस्टमन गायकवाड यांनी आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारपासून मुंबईसाठी शिवशाही

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुणे मार्गावर धावणाऱ्या नाशिक-पुणे शिवशाही बसेसला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मुंबई मार्गावरही एसटीने या बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून चार शिवशाही बसेस मुंबई मार्गावरून बोरीवलीपर्यंत धावणार आहे.

मुंबई मार्गावरील शिवशाही बसचे वेळापत्रक एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. एक बस मंगळवारी (दि. २८) मंत्रालायापर्यंत सोडण्याचे एसटीचे नियोजन असून त्याचे वेळापत्रक मात्र अद्याप आले नाही. नाशिक येथून सकाळी साडेपाच वाजेपासून या बस तासाभराच्या अंतराने सुटणार आहे. त्यानंतर दुपारी पुन्हा बोरीवली येथून या बसेस येतील त्यानंतर त्या पुन्हा नाशिकहून सोडण्यात येणार आहे. नाशिकहून सकाळी साडेसहा त्यानंतर साडेसात आणि साडेआठ असे बसचे बोरीवली येथे जाणार आहे. त्याचप्रमाणे दुपारी अडीच, साडेतीन व सायंकाळी साडेचार या वेळेतही या बस धावणार आहे. बोरीवलीहून या बस सकाळी ९.५०, १०.५० ११.५० या वेळेत आहे. तसेच दुपारी १२.५० सायंकाळी सात आणि रात्री आठ वाजताही या बसेस असणार आहेत. यातील एक बस ठाणेसाठी ठेवण्यात आली आहे.

नाशिक-पुणे या मार्गावर एसटीने याअगोदर १७ बसेस सुरू केल्या. त्यानंतर या चार बसेसची भर पडणार आहे. या बसेस बरोबरच एसटीला लांब पल्याच्या मार्गावर स्लिपर कोच बसेसची प्रतीक्षा आहे. नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी नाशिकरोडहून अनेक रेल्वे गाड्या आहे. पण, यात गर्दी असल्याने बरेच जण वाहनाने जाणे पसंत करतात. त्यात या वातानुकूलित बसची सुविधा झाल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी वादातून जावयाचा खून

0
0


म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

प्रॉपर्टीवरून जावई व सासुरवाडीच्या मंडळींमध्ये सुरू असलेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन अखेरीस जावयाला यात जीवच गमवावा लागला. या प्रकरणी संशयित मेव्हणा व सासू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत बाळू खुर्दळ (रा. दिंडोरी) हे दुपारी पाथर्डी फाटा येथील सासुरवाडी आले होते. यावेळी सासू सुनंदा आनंदा मगर व मेव्हणा सुनील आनंदा मगर यांच्यात सुरू असलेल्या प्रॉपर्टीवरून वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला गेला की शशिकांत याने सुनंदा हिच्यावर हात उगारला. या घटनेचा राग आल्यावर सुनीलने थेट शशिकांत यांच्या डोक्‍यात फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेला शशिकांत हे जागीच ठार झाले. हा घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोघाही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची अतिरिक्त कामे कमी करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अशैक्षणिक कामे बंद करावीत, यासाठी अनेक वर्षांपासून शिक्षक संघटना लढत आहेत. त्यामुळे या कामांचा बोजा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी नाशिकमध्ये दिली.

अगोदरच शाळाबाह्य कामांनी पिचलेल्या शिक्षकांच्या डोक्यावर ऑनलाइन कामांचा भार पडत असल्याची कबुली तावडे यांनी दिली. या विरोधात शिक्षक संघटना एकवटत असल्या तरीही ती कामे फडणवीस किंवा तावडे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली नाही. ती पूर्वीपासून आहेत. मग तेव्हा चुप्पी का साधली, असा सवाल करतानाच, शिक्षकांची ऑनलाइन कामे आटोक्यात आणण्यासाठी शिक्षण खात्याकडून याबाबतचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यांची अतिरिक्त कामेही नियंत्रणात आणू, असे तावडे यांनी सांगितले.

राज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यादृष्टीने नियोजन सुरू आहे. जागतिक स्तरावरील दर्जाची मानांकने पूर्ण करण्याची क्षमता आपल्याकडील पारंपरिक शाळांकडे नक्कीच आहे. पण त्या शाळा त्या मानांकनांपर्यंत पोहोचू शकत नाही. अशा १०० शाळांना बळ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याच प्रयत्नातून उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार येथे शासनाची पहिली आंतरराष्ट्रीय शाळा पुढील महिन्यात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी तावडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणसंस्थांचे स्वायत्त बोर्ड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षणाच्या गुणवत्तेचा स्तर उंचविण्यासाठी राज्यातील जुन्या आणि बड्या शिक्षणसंस्थांना स्वायत्त बोर्डाचा दर्जा देण्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी नाशिकमध्ये केले. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शिक्षण महामंडळाचे विकेंद्रीकरण करण्याचे हे संकेत समजले जात आहेत.

शतकपूर्ती करणाऱ्या राज्यातील शिक्षण संस्थांच्या संवाद संमेलनाच्या उद्घाटनासाठी तावडे नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तावडे म्हणाले, ‘राज्यात अलीकडेच ११ नव्या खासगी विद्यापीठांना सरकारने मान्यता दिली आहे. या धर्तीवर राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे मोठे योगदान देणाऱ्या संस्थांची यादी मोठी आहे. जागतिक स्पर्धेत विद्यार्थी उतरविताना स्पर्धा जितकी वाढेल, तितकाच दर्जा उंचावला जाईल, या न्यायाने जुन्या आणि बड्या शिक्षणसंस्थांना स्वायत्त बोर्डाचा दर्जा देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. हा दर्जा संबंधित संस्थांना मिळताना त्यांच्या सध्या मिळणाऱ्या अनुदानावर कुठल्याही प्रकारचे संकट ओढवणार नाही, याची काळजी सरकार घेईल’, असे आश्वासनही त्यांनी दिले. कुठल्या संस्थेला बोर्डाचा दर्जा मिळावा, यासाठीचे निकष काय असावेत, त्या शिक्षणसंस्थांचे नेमके वय आणि व्याप्ती किती असावी, याबाबतचे निकष तज्ज्ञांशी बोलून ठरविण्यात येतील. अशा प्रकारच्या शक्यतेवर जनतेनेही त्यांची मते सुचवावी’, असेही ते आवर्जून म्हणाले.

‘बालभारती’त पेन्शनवाढ

‘बालभारती’च्या कर्मचाऱ्यांना खूष करण्यासाठी दहा हजार रुपयांची पेन्शनवाढ करण्याची घोषणा तावडे यांनी केली. पण एक हजाराऐवजी दहा हजार बोलल्याची चूक त्यांच्या लागलीच लक्षात आली. नंतर त्यांनी पेन्शनवाढ एक हजार रुपयांचीच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

शिक्षकेतर पदांची भरती

अर्थ विभागाने हिरवा कंदील दाखविताच शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा होणे येत्या महिनाभरातच अपेक्षित असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. हा अडसर दिवाळीपूर्वीच दूर होणे अपेक्षित असतानाही याबाबत शिक्षणमंत्र्यांनी आश्वासनच दिले आहे. तर शिक्षक भरती ही केंद्रीय प्रक्रियेद्वारेच भविष्यात होईल. यामध्ये संस्थाचालकांच्या अधिकारांवर गदा येणार नाही. केवळ शासनाने सुचविलेल्या एकूण उमेदवारांपैकी संस्थेस योग्य वाटणाऱ्या निवडीचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात येईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कावळ्याने केली तीन तास बत्ती गुल!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

परिसरात विजेच्या तारांचे घर्षण होऊ स्फोट होतो.. अफवांचे पेव फुटते.. महावितरणतर्फे सातपूर भागातील वीजपुरवठा सरसकट खंडित केला जातो... नंतर नेमक्या कारणाचा अधिकारी व कर्मचारी शोध घेतात, तेव्हा कावळ्यामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास येते...

अशोकनगर भागात शुक्रवारी हा प्रकार घडला. कावळ्यामुळे विजेच्या तारा एकमेकांना स्पर्शून छोटासा स्फोट झाल्याने महावितरणला वीजपुरवठा खंडित करावा लागल्याचे निदर्शनास आले. केवळ कावळ्यामुळे तीन तास वीज खंडित करण्याची नामुष्की महावितरणवर ओढावली अन् नागरिकांना सहन गैरसोय सहन करावी लागली. या स्फोटाची पूर्ण शहानिशा न करताच संपूर्ण सातपूर विभागाचाच वीजपुरवठा बंद करण्याच्या प्रकारबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. अशोकनगर भागात महिंद्रा कंपनीला लागून असलेल्या विजेच्या खांबावर स्फोट झाल्याने महावितरण कंपनीकडून तात्काळ सातपूरचा वीजपुरवठा खंडित केला गेला. महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यामागील कारणाचा शोध घेतानाच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जोमाने कामाला लागले होते. मात्र, विजेच्या खांबावरून एकमेकांवरून गेलेल्या वीजतारांवर कावळा बसल्याने वरील तारा खालील वीजतारांना चिकटल्याने शॉर्ट सर्किट झाल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. मात्र, त्यामुळे सातपूरकरांना तब्बल तीन तास खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागला. महावितरण कंपनीने अगोदर शहानिशा करूनच संपूर्ण वीजपुरवठा खंडित करावा, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

भूमिगत तारा ऐरणीवर

महावितरण कंपनी अनेक नवीन योजना अंमलात आणत असताना ओव्हरहेड तारांचा प्रश्न मात्र आजही सुटत नसल्याने त्याचा त्रास नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. वाढलेल्या वृक्षांच्या फांद्यांमुळे वीजतारांना अडथळा होऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनीकडून वीजतारांच्या वर असलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्याचे काम केले जाते.

शहरातील रहिवासी भागात अनेक ठिकाणी वीजतारांना वृक्षांच्या फांद्यांचा अडथळा होताना दिसतो. त्यामुळे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेहमीच धावपळ करावी लागते. त्यामुळे परिसरातील वीजतारा भूमिगत करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशोकनगरला कायमच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. वेळेवर वीजबिल भरूनदेखील अचानक खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने ग्राहक हैराण झाले आहेत. याबाबत महावितरण कंपनीच्यावरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य काळजी घेण्याची गरज आहे.
-सुनील पाटील, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीड लाखाच्या बुलेटची ३० हजारांत विक्री!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात चोरी केलेल्या महागड्या बुलेट जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अवघ्या ३० हजारांत विक्री करणाऱ्या संशयित चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. संशयिताने चोरी केलेल्या पाच बुलेटसह आणखी तीन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. दरम्यान, चोरीचे वाहन खरेदी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, उर्वरित खरेदीदारांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

हेमंत राजेंद्र भदाणे (वय २३, रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. हेमंत सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. शहरातून चोरी जाणाऱ्या बुलेट जळगाव जिल्ह्यात विक्री होत असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक के. डी. पाटील, उपनिरीक्षक एस. एस. वाघ, हवालदार माणिक गायकर, विष्णू उगले, नितीन नेटारे, तुषार देसले, केशव ढगे, सचिन सुपले आदींनी जळगाव गाठून तपास केला. त्यात अशा वाहनांचे कनेक्शन पाचोरा येथे असल्याचे समोर आले. पोलिसांनी पाचोरा येथे पोहोचून भदाणेने त्याच्या दोन साथीदारांसह विक्री केलेल्या पाच बुलेट आणि तीन दुचाकी हस्तगत केल्या. यात एमएच ४१ एजे ०८७१, एमएच १४ एफव्ही ५७५९, एमएच १५ एफडी ४००५, एमएच १५ एफ आर ३१३३, एमएच १५ एफएक्स ९३२१ या बुलेटसह एमएच १५ एफ झेड ५५८०, एमएच १५ एफएल ८२६१ आणि एका स्प्लेंडरचा समावेश आहे. सुमारे आठ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दुचाकी चोरट्यांनी अगदी स्वस्तात विक्री केल्या होत्या.

दोन मिनिटांत बुलेट स्टार्ट

संशयित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, एक अॅलनकी आणि स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने तो बुलेटचे लॉक तोडीत असे. अॅलनकीच्या मदतीने नटबोल्ट काढल्यानंतर तो स्क्रू ड्रायव्हार लॉकमध्ये ढकलतो. लॉक तुटले, की स्वीचमधील दोन वायर तोडून त्या तो जोडतो. दुचाकी डायरेक्ट केली, की सुरू करून तो थेट पाचोऱ्याचा रस्ता पकडायचा. असे प्रकार टाळण्यासाठी वाहनचालकांनी अतिरिक्त लॉकिंग सिस्टिम वापरणे आवश्यक असल्याचे सहायक आयुक्त राजू भुजबळ यांनी सांगितले.

खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा

संशयित आरोपी हेमंतकडून एकाच व्यक्तीने ३० हजार रुपयांत तीन बुलेट खरेदी केल्या होत्या. या व्यक्तीवर चोरीचा मुद्देमाल खरेदी केला म्हणून कलम ४११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित खरेदीदारांवरदेखील कारवाई होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. संशयित आरोपीकडे सध्या चौकशी सुरू असून, चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी प्रसंगी आंदोलन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप-शिवसेना युती सरकारमुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती झाली आहे. सध्या सर्वाधिक दुःखी घटक

असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन समितीच्या शिफारसी व अन्य

मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार नाशिक

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन

येथे झाली. भाजप-शिवसेना युती सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी पक्षाची

पूर्णपणे बांधीलकी आहे. राष्ट्रवादीतर्फे जिल्ह्यात विविध आंदोलने करून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य

जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष पक्षाने वेधले आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या

आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले असतानाही सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना

सरसकट कर्जमाफी देऊन सात-बारा कोरा करणे गरजेचे आहे. शेतीमालाचे पडलेले भाव, सततचा अवकाळी पाऊस

व गारपिटीमुळे होणारे नुकसान भरून काढणेसुद्धा अशक्य झाले आहे. सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

---

यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, ज्येष्ठ नेते अॅड. भगीरथ शिंदे,

आमदार जयंत जाधव, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, शांताराम आहेर, गजानन शेलार,

अर्जुन टिळे, जिल्हा परिषदेच्या सभापती अपर्णा खोसकर, विष्णुपंत म्हैसधुणे, डॉ. भारती पवार, माणिकराव शिंदे,

राजेंद्र भोसले, डॉ. भाऊसाहेब मोरे, हिरामण खोसकर, बाळासाहेब कर्डक, उषाताई बच्छाव, प्रेरणा बलकवडे,

पुरुषोत्तम कडलग, नंदन भास्करे, योगेश गोसावी, राजेंद्र जाधव, यशवंत शिरसाठ, रामा पाटील आदी उपस्थित

होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघात थांबणार कधी?

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गेल्या काही वर्षांत नाशिक महापालिकेचा विस्तार झपाट्याने वाढला आहे. वाढलेल्या लोकवस्तीत वाहनांची संख्या अधिक झाल्याने रस्ते कमी पडू लागले आहेत. त्यातच आरक्षित असलेले अनेक डीपीरोड महापालिकेने तयार केले नसल्याने जुन्या रोडवर रोजच वाहतूक कोंडी व अपघातांचे सत्र सुरूच आहे. वाढलेल्या अपघातांमुळे रोजच दुचाकी अथवा पादचाऱ्यांना आपले प्राण गमविण्याची वेळ येत आहे.

शनिवारी (दि. २५) सातपूर भागातील अशोकनगर रस्त्यावर दुचाकी चालकाने चारचाकीला जोरदार धडक दिल्याने चारचाकीच्या वाहनाची ऑइल टँक फुटल्याची घटना घडली. विशेष म्हणजे दुचाकीचालकाने जोरदार धडक देऊनही सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही. त्यातच अशोकनगर पोलिस चौकीच्यासमोर नेहमी अपघात होत असल्याने यावर वाहतूक पोलिसांनी उपाय शोधावा अशीही मागणी होत आहे.

डीपी रोडची मागणी

शहरातील वाढलेल्या वाहनांच्या संख्येत रस्ते मात्र जुनेच असल्याने रोजच अपघात होत असल्याचे चित्र आहे. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे बोलले जाते. परंतु, यावर महापालिका व पोलिसांकडून योग्य उपाययोजना केली जात नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळते.

नुकतीच त्र्यंबकेश्वर रोड व जेलरोडच्या सैलानी बाबाच्या ठिकाणी अपघातात मृत्यू झाल्याची घटना झाली. असे असतानादेखील अपघात थांबण्याचे नाव घेत नसल्याचे रोजच झालेल्या अपघातातून दिसून येते. विशेष म्हणजे महापालिकेची स्थापना झाल्यापासून आरक्षित केलेले अनेक डीपीरोड आजही झाले नसल्याने जुन्याच रस्त्यांवर वाहनांची गर्दी होत असते. सातपूरच्या अशोकनगर भागात वास्तूनगर, विश्वासनगर, पवार संकूल, राधाकृष्णनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर व ध्रुवनगर भागाकडे जाणाऱ्या वाहनांची रोजच वर्दळ असते.

वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे अशोकनगर रोडवर नेहमीच अपघात होत असल्याने अशोकनगरच्या रस्त्याला पर्यायी असलेल्या डीपी रोडची उभारणी करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेक पोस्टचा फंडा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने आधार लिंक करण्याची घोषणा केल्यानंतर आता काही खासगी कंपन्यांनी नवा फेक फंडा वापरत

डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे. देशात सर्वाधिक पाॅलिसी असलेल्या

एलआयसीच्या नावाने काही खासगी कंपन्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ग्राहकांची फसवणूक केल्याचे

प्रकारही समोर आले आहेत.

शहर परिसरातील एलआयसी पॉलिसीधारकांना काही इन्शुरन्स कंपन्यांकडून आधार कार्ड व पॅन कार्डची माहिती व

पाॅलिसी नंबर ५६१६१ या नंबरवर पाठविण्याचे आवाहन एलआयसीच्या नावाने केले जात आहे. त्याचप्रमाणे

अनेकांना फोन करूनही ही माहिती गोळा केली जात आहे. या माहितीच्या आधारे फसवणूक करण्याचा प्रकार

गंभीर असून, एलआयसीने त्याची दखल घेतली आहे. अशा पोस्ट फेक असल्याच्या पोस्टही एलआयसीच्या काही

कर्मचाऱ्यांनी व्हायरल केल्या आहेत. त्याचप्रमाणे पोर्टलवरही याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर

एलआयसी यासंदर्भात जाहिरातही प्रसिद्ध करणार आहे.

केंद्राने आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम उघडल्यानंतर एलआयसीने त्यासाठी आपल्या पोर्टलवर आॅनलाइन

जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी

एलआयसीच्या कार्यालयात जाऊन फाॅर्म भरण्याची सुविधा दिली आहे. पण, असे असताना काही खासगी

इन्शुरन्स कंपन्यांचा फेक फंडा सुरूच आहे.

--

माहिती न देण्याचे आवाहन

देशभर लाइफ इन्शुरन्समध्ये एलआयसीने खासगी कंपन्यांशी स्पर्धा करूनही आपला टक्का कायम ठेवला आहे.

त्याचप्रमाणे नाशिक विभागात एलआयसीचे अनेक पाॅलिसीधारक आहेत. त्यामुळे त्यांच्या माहितीचा दुरुपयोग

होऊ नये यासाठी कोणीही फोनवर आपली पाॅलिसीबद्दलची माहिती व आधार, पॅन कार्डची माहिती देऊ नये, असे

आवाहन एलआयसीने केले आहे.

--

सोशल मीडियाचा वापर करून काही खासगी इन्शुरन्स कंपन्या एलआयसीच्या नावाखाली फेक पोस्ट करीत

आहेत. त्याचप्रमाणे फोनही करीत आहेत. पाॅलिसीधारकांनी अशी माहिती देऊ नये. एलआयसीचे अधिकृत पोर्टल

असून, कार्यालयातही फाॅर्म भरून माहिती देता येणार आहे.

-शेखर मोघे, पदाधिकारी, एलआयसी फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होर्डिंग्जद्वारे चमकोगिरी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड परिसरात सध्या शुभेच्छापर होर्डिंग्जचे पेव फुटले असून, ‘पार्टी विथ डिफरंट’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. भाजपसह इतरही काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची ही चमकोगिरी सार्वजनिक रहदारीला अडथळा ठरू लागली आहे.

सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनीही होर्डिंग्जची नियमावली पायदळी तुडविली असून, भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात चक्क सिग्नल अन् हायमास्टच्या खांबांनाच होर्डिंग्ज लावले असल्याची स्थिती आहे. महापालिकेत सत्तेत असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी होर्डिंग्जविषयीचे नियम तोडण्याचा सपाटाच लावला असल्याने शहरात विद्रुपीकरण वाढले आहे.

सध्या नाशिकरोडमधील वर्दळीच्या मुख्य चौकांत बेकायदेशीर होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील शिवाजी पुतळा, उड्डाणपुलाखालील परिसर, विभागीय आयुक्तालय रस्ता, बिटको चौक, दत्त मंदिर सिग्नल, एकलहरे टी पॉइंट, सिन्नर फाटा अशा ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणांशिवाय इतरत्र होर्डिंग्ज लावण्यास मनाई असतानाही महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनीच या नियमाला केराची टोपली दाखवत शहरात ठिकठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज उभारल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

--

खांबांचा सर्रास वापर

शहरातील मुख्य चौकांतील सिग्नल आणि हायमास्ट दिव्यांच्या खांबांनाही चमकोगिरी करण्यासाठी भाजपासह इतर काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंग्ज लावले आहेत. याशिवाय काही ठिकाणच्या होर्डिंग्जमुळे सार्वजनिक रहदारीलाही अडथळा होत आहे. मुख्य रस्त्यांवरही लोखंडी खिळे ठोकून बांबू बांधण्यात आल्याने रस्त्यांचीही नासधूस झाली आहे.

--

प्रशासनाचा कानाडोळा

शहरातील बहुतांश होर्डिंग्ज महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनीच लावलेले असल्याने महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग या बेकायदेशीत होर्डिंग्जप्रश्नी बघ्याची भूमिका घेत आहे. महापालिका प्रशासनाच्या या धोरणामुळे शहराचे विद्रुपीकरण वाढले असून, होर्डिंग्जबाबतच्या न्यायालयीन निर्देशांचेही उल्लंघन झालेले आहे. काही ठिकाणचे होर्डिंग्ज वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमोदे आश्रमशाळेला ‘आयएसओ’

0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील श्री साई शिक्षण संस्था संचलित ज्ञानदीप प्राथमिक व कै वामनराव सोनुजी पगार माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. आदिवासी विभागाच्या कळवण प्रकल्पांतर्गत अशा प्रकारचे मानांकन मिळविणारी ही प्रकल्पातील दुसरी आश्रमशाळा असून, यापूर्वी बाभुळणे येथील शाळेला हे मानांकन मिळाले आहे. शिवाय नांदगाव तालुक्यातील अशा प्रकारचे मानांकन मिळविणारी पहिलीच आश्रमशाळा ठरली आहे.

मानांकन मिळविल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी संस्थेचे सरचिटणीस अण्णासाहेब पगार व त्यांच्या मुख्याध्यापक,अधीक्षक सहकारी शिक्षक यांचे अभिनंदन केले. संस्थेचे सरचिटणीस आण्णासाहेब पगार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्राचार्य एस. ए. पाटील व त्यांच्या सर्व शाखांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यासाठी परिश्रम घेतले. शाळेला कंपाऊंड, इमारतीची रंगरंगोटी परिसर स्वच्छ ठेवण्यसाबोतच शैक्षणिक आमूलाग्र बदल घडविणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शालेय दप्तर व व्यवस्थापन याबाबत विशेष नियोजन, प्रत्येक झाडाला नामफलक, कुंड्या, सुविधादर्शक फलक पाण्याचे व्यवस्थापन, पोषण आहार, दर्जेदार सुविधा, पूर्णपणाने संगणीकृत शालेय कामकाज, इ-लर्निंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह व अध्ययनासाठी स्वतंत्र वेगळी इमारत अशा प्रकारच्या नेटक्या नियोजनामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना प्रगत आधुनिक शैक्षणिक प्रवाहात सहभागी होता आले.

२८ वर्षांपासून कार्यरत

गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून श्री साई शिक्षण संस्था आश्रमशाळेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना अविरतपणे ज्ञानदानाचे काम करीत आहे. शाळेची गुणवत्ता व दर्जा टिकवून त्यात आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा हेतू ठेवून संस्थेचे काम सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपची आज बैठक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी आैरंगाबाद येथे भाजपच्या आढावा बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार, असे संकेत दिल्यानंतर नाशिकला ते काय मंत्रा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपची उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज, रविवारी (दि. २६) सकाळी ९.३० वाजेपासून गंजमाळ येथील हाॅटेल रॉयल हेरिटेज येथे होणार आहे. त्यासाठी भाजपचे विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यांतील पदाधिकारी व खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

राज्यभर भाजपातर्फे आढावा बैठक घेण्याचे सत्र दानवे यांनी सुरू केले असून, रविवारी नाशिक येथेही आढावा बैठक होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. या बैठकीत संघटना बांधणीवर भर देण्याबरोबरच बूथ यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी काय करता येईल यावर दानवे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे वर्षभराच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून, दिलेल्या कार्यक्रमानुसार पदाधिकाऱ्यांनी कामे केली किंवा नाहीत याची माहिती ते घेणार आहेत. त्याचप्रमाणे भाजपच्या विविध आघाड्यांच्या कामाची ते माहिती घेणार आहेत. नाशिकचे भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी स्वागत करणार आहेत.

--

कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दानवे यांचे खास स्वागत करण्याचे नियोजन करून बेशरमचा हार आणला होता. त्यामुळे रविवारी ते काही करतात का यावर पोलिसांची बारीक नजर असणार आहे. बैठकीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तपोवन पुलाची अखेर दुरुस्ती

0
0

कित्येक दिवसांपासूनची मागणी पूर्ण

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे नादुरुस्त झालेल्या तपोवनातील पुलाजवळ या पुलावरून जाऊ नये, असा फलक लावण्याची वेळ महापालिकेवर आली होती. या पुलाची आता दुरुस्ती करण्यात आली आहे. या पूलावर लाकडी बल्ल्या बसविण्यात आल्यामुळे पुलावरून पलीकडच्या बाजूला जाणे शक्य होऊ लागले आहे. दुरुस्तीनंतर आता तपोवनात येणारे भाविक आणि पर्यटक हा पूल ओलांडून जाऊ लागले आहेत. त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

तपोवनातील मुख्य आकर्षण असलेल्या कपिला संगमाकडे दुर्लक्ष झालेले होते. गेल्या कित्येक दिवसांपासून याबाबत नागरिकांसह पर्यटकांनीही या पुलाच्या दुरुस्तीची मागणी लावून धरली होती. मात्र त्याकडे प्रशासन लक्ष देत नव्हते.

मात्र पावसाळ्यानंतर प्रशासनाकडून या नादुरुस्त पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने अखेर या पुलाच्या दुरुस्तीला मुहूर्त लागला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांना तपोवन परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांना पाहता येणे शक्य झाले आहे. तसेच त्यांच्या या मागणीचाही प्रशासनाने विचार केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे पर्यटकांची वाट सुकर होणार आहे.

स्वच्छतेकडेही लक्ष द्या

प्रत्येक सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर हा भाग ओसाड पडल्यासारखा होत असतो. याठिकाणी असलेल्या श्रीराम पर्णकुटी, लक्ष्मण मंदिर, शूर्पणखा मंदिर, संगमावरील अग्निकुंड बघण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. यावेळी कपिला संगमावर स्नान करण्याचीही भाविकांची इच्छा असते. मात्र, येथे येणारा पाण्याचा प्रवाह हा घाण आणि दुर्गंधीयुक्त असल्यामुळे त्याचा त्रास येथे येणाऱ्यांना होत असतो. त्यामुळे हे पाहून भाविक आणि पर्यटक लगेच काढता पाय घेतात. तरी, याबाबतही प्रशासनाने याकडेही लक्ष देत ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवघेण्या विहिरी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको आणि इंदिरानगर हा भाग मुळातच सर्व शेती, मळे विभागांचा होता. शहराच्या विस्तारात या भागाचा विकास झपाट्याने झाला असला तरी सिडको व इंदिरानगर भागात आजही अनेक धोकादायक विहिरी नजरेत पडत असून, या विहिरींमुळे अनेकांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे.

सध्या तर या विहिरी म्हणजे सिडको आणि इंदिरानगर परिसरातील कचराकुंडीच बनल्या आहेत. त्यांना या कचऱ्यामुळे बकाल स्वरुप प्राप्त झाले असून, स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना या विहिरींकडे लक्ष देण्यास स्थानिक नगरसेवकही दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाला तर याबाबत काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. अनेक विहिरी या आजसुद्धा रस्त्याच्या मधोमध येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातही होत असल्याचे दिसत आहे. नाशिकच्या शहराच्या विकासात झपाट्याने विकसित झालेला भाग म्हणजे सिडको व इंदिरानगर हा होय. सिडको व इंदिरानगर भाग हा पूर्वीपासून मळे विभाग म्हणून ओळखला जात होता. मळ्यांचे रुपांतर प्लॉटमध्ये झाले आणि त्याठिकाणी टोलेजंग इमारती व बंगले उभे राहिले आहेत. या भागाचा आता विकास झाला असला तरी याठिकाणी अनेक समस्या आजही प्रलंबित राहिल्या आहेत. महापालिकेत निवडून गेलेले नगरसेवक व महापालिकेतील प्रशासनाच्या अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.

रुंदीकरणास अडथळा

इंदिरा नगरातील पूर्वीच्या विहिरी आजही तशाच असून, या विहिरी आता परिसरातील नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. इंदिरानगर येथील शंभर फुटी रस्त्यावर मधोमध एक विहीर असून, या विहिरीमुळे रस्ता रुंदीकरणास अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणी चार रस्ते एकत्र येत असल्याने व ही विहीर रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतूक कोंडी होऊन अनेक अपघातही झालेले आहेत. येथील अपघातांमध्ये अजूनपर्यंत एकही जीवितहानी झालेली नसली तरी ही हानी होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. ही विहीर पूर्वी याठिकाणी असलेल्या शेती कामासाठी वापरली जात होती, मात्र आता सर्वत्र रहिवास क्षेत्र झाल्याने या विहिरीचा फारसा वापर होत नाही. नागरिकांनी महापालिकेला कळवून विहीर बंद करण्याची मागणी केली आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या या विहिरीचा कोणताही वापर होत नसला तरी आजूबाजूचे किंवा या रस्त्याने ये-जा करणारे अनेक नागरिक या विहीरीत सर्रासपणे कचरा टाकत असतात. त्यामुळे या विहिरीला आता कचराकुंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या विहिरीच्या आजूबाजूला काही झाडे लावून ठेवले असल्यामुळे याठिकाणी विहीर असल्याचे तरी लक्षात येत असते.

अपघाताला निमंत्रण

सिडको परिसरातही बरेच मळे विभाग असून, येथील विहिरीसुद्धा अशाच पद्धतीने धोकादायक झालेल्या आहेत. काही विहिरींजवळ तर कचराच असल्याने याठिकाणी विहीर असल्याचेच लक्षात येत नाही व त्यामुळे वारंवार अपघात होत असतात. त्याचबरोबर अंबड येथील फडोळ मळा परिसराचाही दिवसेंदिवस विकास होत असताना याठिकाणी असलेली विहीर म्हणजे या परिसराची कचराकुंडी म्हणून तयार झाली आहे. ही विहीर रस्त्याच्या कडेला असून यात असलेल्या कचऱ्यामुळे या ठिकाणी विहीर आहे की नाही याबाबत लक्षातच येत नसल्याने अनेक अपघात झाले आहेत.

एकेकाळी पाणी देणाऱ्या अत्यंत गरजेच्या असलेल्या या विहिरी आता जीवघेण्या ठरत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. सिडको व इंदिरानगर परिसरात असलेल्या विहिरींबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. तसेच प्रत्येक विहिरीला संरक्षण भिंत बांधणे, त्याठिकाणी विहीर असल्याचा फलक लावणे यासारख्या गोष्टी केल्या पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षक भिंत कोसळल्याने अपघाताचा धोका

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील आनंद रोडवर असणाऱ्या उघड्या नाल्यावरील संरक्षक भिंत गेल्या अनेक वर्षांपासून तुटली आहे. यामुळे रात्रीच्या समयी एखादा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या ३० वर्षापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाने या उघड्या नाल्याच्या बाजूला संरक्षक भिंत उभारली होती. तिला एवढ्या वर्षात कधीही दुरुस्त करण्यात न आल्यामुळे आता जागोजागी सिमेंटमध्ये बांधण्यात आलेले दगड निघाले आहेत. तर काही ठिकाणी संपूर्ण भिंतच कोलमडली आहे.

आनंद रोड रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया, पोलिस स्टेशन, हिल रेंज परिसर अशी महत्त्वाची ठिकाणे असल्याने या रस्त्याचा वापर वाढला आहे. पहाटेच्या सुमारास आनंद रोड मैदानावर मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने घराबाहेर पडणारे अनेक नागरिक व व्यायामासाठी खंडेराव टेकडी, सह्याद्री नगर, आनंद रोड मैदानावर येणारे खेळाडू, जवळच्या डायमंड लॉज येथील मोफत दवाखान्यात येणारे रुग्ण व साईबाबा मंदिरात येणारे भक्तगण यांची या भागात सतत वर्दळ असते.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कुल व प्रायमरी शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच आर्टिलरी सेंटरला लामरोडशी जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने वाहतुकीची वर्दळ असते. या रस्त्यावर दिवसाकाठी एकदा अपघात होत असतो. शिवाय नाल्यावर संरक्षक भिंत नसल्याने कोणी नाल्यात पडून जीवितहानी होण्याची भीती राहते. स्वच्छ व सुंदर असा डंका मिरवणाऱ्या कॅन्टोन्मेंटची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होताना अशा परिस्थितीत संकल्पनेला खीळ बसण्याची शक्यता आहे.

नाला भूमिगत होण्याची नागरिकांना प्रतीक्षाच

गेल्या अनेक वर्षांपासून आनंद रोडवरील नाला भूमिगत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष करीत आहेत. यासाठी कॅन्टोमेंट बोर्डाने गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या शहराच्या विकासकामांमध्ये हा नाला भूमिगत करून त्यावर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाक व बगीचा बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. मात्र दोन वर्षांपासून हा नाला भूमिगत करण्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. यामुळे परिसरातील नागरिकांना त्यासाठी प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे.

नागरिकच टाकतात घाण

कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून पावसाळ्यापूर्वी व दिवाळीच्या सुमारास या नाल्याची स्वच्छता करण्यात येते. मात्र दर दोन महिन्याला नाला स्वच्छ होणे गरजेचे आहे. मात्र या नाल्यामध्ये परिसरातील नागरिकच कचरा आणून टाकत असतात त्यावर प्रशासनाने बंदी करणे गरजेचे आहे.
दूषित पाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास

त्रिमूर्ती चौकातून वाहत असणाऱ्या नाल्यात आजूबाजूच्या रहिवासी भागातून टाकण्यात आलेल्या भूमिगत गटारांचे पाणी सोडण्यात आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या पसरलेल्या दुर्गंधीने अनेकजण नाकाला रुमाल लावून ये-जा करतात. अनेकदा स्थानिक नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत सूचितदेखील करण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यवाही होत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रीमियम दरवाढीसाठी साकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षणात गेल्या असून, त्यांच्या ‘टीडीआर’ला मातीमोल भाव मिळत आहे. महापालिका आयुक्तांनी रहिवासी वापरासाठी ७० टक्के, तर व्यावसायिक वापरासाठी ८० टक्क्यांप्रमाणे दरवाढ सुचविली असून, सरकारने त्यास मान्यता द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली.

पालकमंत्री महाजन शनिवारी नाशिकमध्ये आले असता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. भूखंडांच्या सरकारीदराच्या ४० टक्के दराने अतिरिक्त बांधकाम क्षेत्र महापालिकेने बिल्डर्सना विकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु, सरकारच्या या निर्णयामुळे आरक्षणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या ‘टीडीआर’ला मातीमोल भाव मिळणार आहे. तसे होऊ नये यासाठी रहिवासी वापराकरिता ७०, तर व्यावसायिक वापरासाठी ८० टक्के याप्रमाणे दरवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी असून, महापालिकेने सुचविलेली प्रीमियम दरवाढ मंजूर करावी, अशी मागणी महाजन यांच्याकडे करण्यात आली. आरक्षणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावून बिल्डरांचे भले करण्याचा डाव काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून आखला जात आहे. परंतु, त्यांच्या दबावाखाली येऊन प्रस्तावात सुचविलेली दरवाढ रद्द होऊ देऊ नका, अशी विनंती शेतकऱ्यांनी महाजन यांना केली. यावेळी दिलीप दातीर, सोमनाथ बोराडे, सचिन काठे, कुंदन मौले, सुभाष नागरे आदी उपस्थ‌ित होते.

--

प्रस्तावच प्रलंबित

महापालिकेतील २०० ते २५० अतितातडीचे भूसंपादन प्रस्तावच वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. भूसंपादनासाठी १५० कोटींची तरतूद आर्थिक वर्षात केली असली, तरी महापालिकेच्या तिजोरीत पैसेच शिल्लक नाहीत. महापालिकेवर आधीच ६०० कोटींपेक्षा अधिकचे दायित्व प्रलंबित आहे. त्यामुळे अशा प्रीमियम दरवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेऊन प्रस्तावित दरवाढीनुसार अंमलबजावणी होणेच शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंद्रिय दूध निर्मितीला प्राधान्य द्यावे

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

सेंद्रिय शेतीइतकेच सेंद्रिय दूध निर्मितीलाही महत्त्व असून, अशा दूध निर्मितीचा हिस्सा वाढवायला हवा असा सूर कृषीथॉनमध्ये आयोजित चर्चासत्रात शनिवारी उमटला.

ठक्कर डोम येथे कृषीथॉन प्रदर्शनात सकाळी दूग्ध व्यवसायावर परिसंवाद झाला. त्यामध्ये पांजरापोळात नीर गायींवर संशोधन करणारे डॉ. सुरेश गंगावणे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, उपायुक्त डॉ. विसे, डॉ. प्रकाश धामणे, डॉ. शंतनु पाटील आदी सहभागी झाले. यावेळी पोल‌सि अधीक्षक संजय दराडे, जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे यांसह अनेक मान्यवर उपस्थ‌ति होते.

डॉ. गंगावणे म्हणाले, केवळ दुधाचे भाव वाढवून द्या अशी मागणी करून शेतकरी आणि दूध उत्पादकांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यांना गाय आणि म्हशींशी संवाद देखील साधता यायला हवा. दुधाचा दर्जा, प्रत व उत्पादन वाढविण्यासाठी अनेक उपाय असून, त्याची माहितीही या चर्चासत्रामध्ये देण्यात आली. सेंद्रिय दूध निर्मिती वाढवितानाच आदर्श दूध उत्पादकांची यशोगाथा अन्य उत्पादकांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

गोवंश हत्याबंदी विधेयकानंतर वाहनांची कडक तपासणी केली जाते. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई होते. मात्र कारवाईत शेतकऱ्यांची अडवणूक होत नाही. शेतकऱ्यांनी गायी व गुरांची वाहतुक करताना ओळखपत्र जवळ बाळगावे असे आवाहन दराडे यांनी केले. साहिल व संजय न्याहारकर यांनी आभार मानले.

दूध उत्पादकांचा गौरव

या चर्चासत्रात आदर्श दुध उत्पादक राकेश निकम (मालेगाव), राजेंद्र मोरे (नगर), सारिका पोतले (पुणे) यांचा सत्कार करण्यात आला. पांडुरंग भामरे (सटाणा), उषा देशमुख (परभणी) यांना आदर्श देशी गोवंश संगोपक पुरस्कार देण्यात आला. अॅड. अंकुश कच्छवे (परभणी), शोभा राजपूत (औरंगाबाद) यांना आदर्श शेळी पालक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अर्जुन कांबळे, डॉ. मधुकर बावके यांना पशुवैद्यक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदर्श दूध प्रक्र‌यिा उद्योजक पुरस्कार दिलीप गागरे व अंकुश अंकाराम यांना प्रदान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images