Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फीसाठी विद्यार्थिनींना कोंडले

$
0
0

चेकऐवजी रोखीने रकमेची मागणी; जेलरोडवरील शाळेतील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

रोखीने शालेय फी भरली नाही म्हणून दोन चिमुकल्या विद्यार्थिनींना एका स्वतंत्र वर्गात दिवसभर कोंडून ठेवण्याची शिक्षा करण्याचा प्रकार जेलरोडवरील होली फ्लॉवर इंग्लिश स्कूलमध्ये घडला आहे. या प्रकाराबद्दल वैभव एकनाथ ताकटे (रा.जगतापमळा, नाशिकरोड) या पालकाने उपनगर पोलिस ठाण्यात शाळेविरोधात तक्रारही केली आहे. शाळेच्या अमानवी वागणुकीमुळे संबंधित पालकाच्या मुलींनी आता शाळेत जाण्यासही नकार दिला आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून विद्यार्थ्यांना फीच्या वसुलीसाठी शारीरिक शिक्षा करण्यासोबतच मानसिक त्रास देण्याचे प्रकार यापूर्वीही शहरात घडले आहेत. त्याचाच कित्ता जेलरोडच्या होली फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेकडूनही गिरवला आहे. पालकाने पोलिसांत तक्रार करून या प्रकाराला वाचा फोडली आहे. इतरही काही विद्यार्थ्यांच्या

बाबतीत हा प्रकार घडला असून, पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने कोणीही पालक या शाळेच्या विरोधात तक्रार करण्यास धजावत नसल्याचीही माहिती पुढे आली आहे. वैभव ताकटे यांनी शाळेची फी चेकद्वारे स्वीकारण्याची विनंती मुख्याध्यापिका सुप्रिया देव यांना केली होती. मात्र, त्यांनी या पालकाला रोख स्वरुपातच फी भरण्यास सांगितले. पालकाने शाळेची ही मागणी मान्य न केल्याने या पालकाच्या दुसरी व चौथीच्या वर्गात शिकणा-या दोन्ही मुलींना रेग्युलर वर्गात बसण्यास मनाई करून त्यांना एका स्वतंत्र वर्गात बसविण्यात आले. या वर्गात मुली पूर्णवेळ एकट्याच्या राहिल्याने त्या घाबरल्या असून, शाळेत जाण्यास नकार देत असल्याचे पालकाचे म्हणणे आहे. मुलींना शाळेत न पाठविण्याचा निरोप या शाळेने वाहनचालकामार्फत पालकांना दिला.

या प्रकाराची अधिकारी व केंद्र प्रमुखांमार्फत तात्काळ चौकशी केली जाईल. संबंधित विद्यार्थी शाळेतील त्यांच्याच वर्गात बसतील. चेकने फी स्वीकारणे कायदेशीरच आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्याचा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयालाही पाठविला जाईल.

-नितीन उपासणी, शिक्षणाधिकारी, मनपा, नाशिक

रोख फी न भरल्याच्या कारणास्तव ज्या वर्गात शिक्षक नसतात तेथे माझ्या दोन्ही पाल्यांना वेगळ्या रुममध्ये बसवले जात आहे. न्याय मिळण्यासाठी या शाळेच्या गेटवर मी कुटूंबासह धरणे आंदोलन करणार आहे.

-वैभव ताकटे, पालक, होली फ्लॉवर स्कूल,

सध्या अठरा महिन्याची फी बाकी आहे. चेक बाऊन्सच्या कारणास्तव त्यांच्याकडून आता चेकद्वारे फी घेण्यास नकार दिला आहे. मात्र, फीच्या कारणास्तव त्यांच्या पाल्याला कोणत्याही स्वरुपाचा त्रास शाळेकडून दिलेला नाही.

- सुदीप देव, संस्थापक, होली फ्लॉवर स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार कोटींचा निधी खड्ड्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

प्रभागातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी मिळालेला सुमारे चार कोटी रुपयांचा निधी खड्ड्यात गेल्याचे मंगळवारी झालेल्या प्रभाग समिती सभेत उघड झाले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रस्ते दुरुस्तीसाठी मिळणारा कोट्यवधींच्या निधीतही घोळ झाला असण्याची शक्यता आहे. या निधीचा विनियोग कशा प्रकारे झाला, याचा खुद्द पालिका अधिकाऱ्यांनाच थांगपत्ता नसल्याची धक्कादायक बाब सभेत उघड झाली. नगरसेविका संगीता गायकवाड यांनी सभागृहात रस्ते दुरुस्ती निधीचा मुद्दा उपस्थित केला होता. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून घरचा आहेर दिला.

येथील पालिका विभागीय कार्यालयात काल नाशिकरोड प्रभाग समितीची सभा सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या सभेत फुटपाथवरील अतिक्रमण, पाणीपुरवठा, बाजार कर वसुली, बेकायदेशीर पार्किंग, जॉगिंग ट्रॅक, कचरा, ड्रेनेज, उद्याने दुर्दशा या प्रश्नांवर नगरसेवकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. आर्टिलरी सेंटरमधून येणारे ड्रेनेजचे पाणी वालदेवी नदीत मिसळत असल्याचा मुद्दा सरोज आहिरे यांनी, तर देवळाली गावातील बाजार पटांगणावर शेतकऱ्यांकडून स्थानिक गुंड हप्ता वसुली करीत असल्याचा मुद्दा सत्यभामा गाडेकर यांनी उपस्थित केला. प्रभागात स्वच्छता होत नसल्याचा व स्वच्छता कर्मचारी केवळ सहीपुरते हजेरी लावत असल्याचा आरोप नगरसेवक शरद मोरे व ज्योती खोले यांनी केला.

‘मटा’च्या वृत्ताचे पडसाद

चेहेडी पंपिंग स्टेशन येथील पालिकेच्या साठवण बंधाऱ्यात वालदेवी नदीपात्रातील दूषित पाणी मिसळत असल्याने नाशिकरोड जलकुंभाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात ‘मटा’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताचे पडसाद प्रभाग समिती सभागृहात उमटले. नगरसेविका जयश्री खर्जुल यांनी या प्रश्नावर काय उपाययोजना केली, असा सवाल सभागृहाला विचारत ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

खर्चाचा हिशेब द्या

विभागात रस्ते दुरुस्तीकामी आलेल्या ३ कोटी ८६ लाख रुपये निधी कोणत्या प्रभागात किती खर्च झाला याचा हिशेब संगीता गायकवाड यांनी मागितला. परंतु, पालिका अधिकाऱ्यांकडे या निधी खर्चाबाबत काही माहिती उपलब्ध नव्हती. अतिक्रमण का काढले जात नाही, फुटपाथवरील बेकायदेशीर टपऱ्या का काढल्या जात नाहीत, या प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली. विभागीय अधिकाऱ्यांचा प्रशासनावर अंकुशच राहिला नसल्याचा आरोपही नगरसेविका गायकवाड यांनी यावेळी केला.

विकासनिधीच्या नावाखाली फसवणूक

गुंठेवारी क्षेत्रातील नागरिकांकडून नळ कनेक्शनसाठी विकासनिधीच्या नावाखाली सहा हजार रुपये पालिकेकडून उकळले जात असल्याचा आरोप नगरसेवक संतोष साळवे यांनी केला. अशा प्रकारचा विकास निधी पालिकेच्या उर्वरित विभागांत घेतला जात नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. डिपॉझिटच्या रकमेतही इतर विभाग व नाशिकरोड विभागात फरक का, असा सवाल करुन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणीही केली.

दिनकर आढावांचा आक्षेप

प्रभाग समितीची सभा सुरू झाल्यावर सहाय्यक नगर विकास सचिव आव्हाळे यांनी विषयपत्रिकेवरील विषय एकामागोमाग एक याप्रमाणे वाचण्यास सुरुवात केली. या विषयांवर चर्चेला वेळ न देताच मंजूर झाल्याचे सांगताच ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव यांनी यावर आक्षेप नोंदवला. ‘सभागृहाचे कामकाज कसे चालते’ असा सवालच त्यांनी सभापतींना विचारल्याने काही वेळ सभागृहात शांता पसरली.

मौनी नगरसेवक

विशाल संगमनेरे, संभाजी मोरुस्कर, कोमल मेहरोलिया, केशव पोरजे, पंडित आवारे, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, सुनीता कोठुळे, अंबादास पगारे, मीरा हांडगे आदी नगरसेवकांनी कालच्या प्रभाग समितीच्या सभेतील चर्चेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे या नगरसेवकांच्या प्रभागात एकही समस्या नाही का, असा प्रश्न त्यांच्या मौनी भूमिकेमुळे निर्माण झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कल्चर क्लब’चे रविवारी गेट टुगेदर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सभासदांसाठी डिसेंबर महिना मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. गेट टुगेदर, म्युझिकल प्रोग्रामसमवेत स्नॅक्सचा आनंद असा हा महिना एन्जॉयमेंटचा राहणार आहे. या एन्जॉयमेंटमध्ये सहभागी व्हायचे असेल तर कल्चर क्लबचे सभासद होण्याची संधी चालून आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी गेट टुगेदर होणार आहे. रविवारी, ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था या ठिकाणी हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाची सुरुवात म्युझिकल प्रोग्रामने होईल. यात मराठी भावगीते, हिंदी चित्रपटांतील गाणी, तसेच सोबत स्नॅक्स अशी मेजवानी सभासदांना मिळणार आहे. त्यामुळे आजच कल्चर क्लबचे सभासदत्व मिळवले तर तुम्हीही या वेगवगेळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकणार आहात. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी आधीच रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन केवळ कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी असल्याने आजच कल्चर क्लबचे सभासद व्हा. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क ः ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com वर लॉगइन करा.

कल्चर क्लबचे सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक ः
https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक ः https://twitter.com/MTCultureClub
टीप ः कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, जाणून घेऊया गोदेचे वैभव!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी पात्रातील काँक्रिटीकरणावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पूर्वी गोदापात्र कुंडांच्या वैभवाने बहरलेला होता. प्रत्येक कुंड वेगवेगळ्या कारणांसाठी वापरात होते. ही व्यवस्था निर्माण करण्यामागेही कारणे होती. मात्र दरम्यानच्या काळात ही कुंडे तोडून पात्राचे काँक्रिटीकरण झाले. ही कुंडे नेमकी कुठे आणि कशी होती. त्यांचा इतिहास काय हे समजून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे गोदाघाटावर रविवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक हे धार्मिक शहर आहे. याच्या नोंदी अगदी पुराणांपासून ते दोन हजार वर्षांच्या शिलालेखांमधूनही हे स्पष्ट होते. या शहरात दररोज हजारो पर्यटक गोदापात्रातील रामकुंडाच्या दर्शनासाठी देशभरातून येतात. गोदापात्रातील विविध कुंडांचे महत्त्व त्यामुळेच अनन्यसाधारण आहे. रामकुंड, गोपिकाबाईंचा तास, लक्ष्मण कुंड, धनुष कुंड, सीता कुंड, अहिल्याबाई कुंड, सारंगपाणी कुंड, दुतोंड्या मारूती कुंड, सूर्य कुंड (पाच देऊळ कुंड), अनामिक कुंड, दशाश्वमेध कुंड, रामगया कुंड, पेशवा कुंड अथवा शिंतोडे महादेव कुंड, खंडोबा कुंड, ओक कुंड, वैशंपायन कुंड, मुक्तेश्वर कुंड अशा अनेक कुंडांनी गोदावरी पात्र मंत्रमुग्ध झाले होते. प्रत्येक कुंडाचा वापर आणि महत्त्व ठरलेले होते. दरम्यानच्या काळात ही कुंडे तोडण्यात आली. मात्र ही कुंड पुन्हा निर्माण झाल्यास पाण्याचे स्त्रोत जिवंत होतील व गोदावरी पुन्हा खळखळू लागेल, असा अनेकांचा विश्वास आहे. यावर कोर्टात कायदेशीर लढादेखील सुरू आहे. त्यामुळे या कुंडांचे महत्त्व आणि गरज जाणून घेण्यासाठी ‘मटा’तर्फे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. कुंडांविषयी सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी, इतिहास अभ्यासक प्रा. रामनाथ रावळ माहिती करून देणार आहेत.


गोदापात्रातील ही कुंडे म्हणजे पाण्याचे जीवंत स्त्रोत होते. ते बुजविले गेल्याने गोदेची ही अवस्था आहे. त्यामुळे हेरिटेज वॉकच्या निमित्ताने या कुंडांबाबत माहिती नाशिककरांपर्यंत गेली तर जनजागृती व्हायला मदत होईल.

- देवांग जानी, सामाजिक कार्यकर्ते

नावनोंदणी आवश्यक

‘मटा’ हेरिटेज वॉक ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल. यासाठी यशवंतराव महाराज मंदिरासमोर एकत्र‌ित जमायचे आहे. वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी रमेश पडवळ यांच्या ८३८००९८१०७ या क्रमांकावरील व्हॉटसअॅपवर आपले नाव व सोबत येणाऱ्यांची संख्या मॅसेज करायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगपूरला होणार उपबाजाराची निर्मिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायखेडा उपबाजार आवाराला उर्जितावस्था देत गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार औरंगपूर येथे उपबाजार आवार पूर्णवेळ सुरू करणार असल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी केले.

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने राजाभाऊ सांगळे यांनी औरंगपूर येथे रविवार व गुरुवारसह आठवडाभर उपबाजार आवार सुरू ठेवण्याची मागणी केली. तसेच, कार्यक्षेत्रातील सर्व गावांत सौरऊर्जेचे दिवे लावण्याची मागणी केली. व्यापारीवर्गाच्या वतीने सोहनलाल भंडारी यांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढीवर भर देऊन दूध डेअरी, कोल्ड स्टोअर, पेट्रोल पंप आदी योजना राबविण्याची मागणी केली.

सायखेडा उपबाजार आवार कायम ठेवून तेथील सुटीच्या दोन दिवस औरंगपूर येथे उपबाजार आवार शेतकरी बांधवाच्या मागणीनुसार सुरू केला आहे. आता संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार असून, सायखेडा मार्केटवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. याबाबतीत गोदाकाठ परिसरात सायखेडा मार्केट स्‍थलांतरित केले जात असल्याची अफवा पसरवली जात आहे. केवळ शेतकऱ्यांच्या सोयीसाठी औरंगपूर येथे रविवार व गुरुवार असे दोन दिवस मार्केट भरवणार असून, या बाबतीत अफवा पसरू नये, असे सभापती बनकर म्हणाले. संचालक सुरेश खोडे यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन सचिव संजय पाटील यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती धनवटे, विजय कारे, नारायण पोटे, संजय मोरे, सोहनलाल भंडारी, शंकरलाल ठक्कर, सुरेश खोडे, गुरुदेव कांदे, गोकुळ गिते, साहेबराव खालकर, चिंतामण सोनवणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी हिताच्या निर्णयांना प्राधान्य

बाजार समितीचे उत्पन्नाचे स्रोत वाढवताना शेतकरी हितावह निर्णय घेऊन बिसलरी पाण्याचा बीओटी तत्त्वावर सौर विद्युत प्रकल्प, दूध डेअरी, पेट्रोल पंप आणखी अनेक उपक्रम असल्याचे सभापती बनकर यांनी सांगितले. पिंपळगाव ते दिंडोरी २६ कोटींच्या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करत असून, तोपर्यंत शासनाकडून रस्त्याची डागडुजी न झाल्यास बाजार समिती ती करेल. प्रवेशद्वारावर छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम हाती घेतल्याचे सांगून अडचणीच्या काळातही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रोख पैसे अदा करण्याची परंपरा व्यापारी, आडतदारांनी ठेवल्याबद्दल आभार मानतो, असे बनकर यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यात गेलं नाशिकरोड!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरात खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने मोहीम राबवल्याचा दावा केला असला तरी अनेक प्रमुख ठिकाणी रस्त्यांवर जीवघेणे खड्डे कायम आहेत. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. यंदा पावसाळा जास्तच लांबला. जोरदार पावसामुळे नाशिकरोड, जेलरोड, उपनगर आदी भागांत रस्त्यांवर खड्डे पडले होते. आंबेडकर सिग्नलपुढील पोलिस उपायुक्त कार्यालयापुढे पाच फुटांचा खड्डा पडला होता. द्वारका ते बिटकोदरम्यान अनेक ठिकाणी खड्डे झाले होते. त्यातील बहुतांश बुजवून डांबरीकरण झाले असले तरी काही प्रमुख ठिकाणी खड्डे तसेच आहेत.

पुलाखाली खड्डा

नाशिकरोड उड्डाणपुलाखाली बिटको चौकातील वाहतूक बेटाभोवतीचे खड्डे बुजविलेले नाहीत. येथे वाहनचालक घसरून पडू शकतो. सिन्नर फाट्याकडे जाताना जो छोटा पूल सुरू होता. तेथेच मोठा खड्डा आहे. त्यामध्ये दुचाकीच नव्हे, तर चारचाकी आदळून अपघाताची भीती असल्याने नागरिकांनी त्यात फांद्या रोऊन धोक्याचा इशारा दिला आहे. बिटको कॉलेजशेजारील के. जे. मेहता शाळेकडे जाणाऱ्या भा. वि. जोशी मार्गाच्या कोपऱ्यावरच रस्ता खोदून अनेक दिवस झाले. मात्र, दुरुस्ती झालेली नाही. ओढ्याहून नांदूरनाक्यावर आल्यावर जेलरोडकडे वळताना असलेला खड्डा कायम आहे. उपनगरांमधील खड्डेही कायम आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेटवर नाशिकचे तिघे

$
0
0

डॉ. वाघ, पाडवी, सोनवणे यांची निवड; व्यवस्थापनातून पीछेहाट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने पार पडलेल्या सिनेट निवडणुकीत नाशिकची व्यवस्थापन गटातून पीछेहाट झाली असली तरीही पदवीधर गटासाठी पार पडलेल्या सिनेट निवडणुकीत मात्र तीन नाशिककरांना यश मिळाले आहे. यामुळे आगामी काळात विद्यापीठात नाशिकच्या परिघातील शैक्षणिक प्रश्न विद्यापीठात पोहचविण्यासाठी नेतृत्व मिळाले आहे. विद्यापीठात व्यवस्थापन गटात विद्यापीठ प्रगती पॅनलने ५ पैकी ३ जागा मिळवत वर्चस्व राखले. तर सिनेट गटातून एकूण १० पैकी ८ जागांवर यश मिळवत विद्यापीठ एकता पॅनलने वर्चस्व राखले.

या निवडणुकीत पदवीधर सदस्यपदासाठी एकता पॅनलतर्फे उभे असलेले मविप्रचे डॉ. तानाजी वाघ, राखीव गटातून मविप्रच्या तीसगाव शाळेतील मुख्याध्यापक विश्वनाथ पाडवी आणि व्ही. एन. नाईक संस्थेचे विजय सोनवणे यांची निवड सिनेट सदस्य पदासाठी झाली आहे. तर प्रगती पॅनलतर्फे निवडणूक लढविणारे हेमंत दिघोळे, जयकर ग्रुप प्रणीत विद्यापीठ विकास मंडळातर्फे बाकेराव बस्ते आणि व्यवस्थापन गटातून अशोक सावंत हे पराभूत झाले आहेत.

काळ्या शाईचा फटका

पदवीधर गटासाठी २३ हजार २५८ मतदान होते. पैकी तब्बल ४०२ मते बाद ठरली. हे प्रमाण सुमारे १० टक्क्यांच्या घरात आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदार नोंदणी ते प्रत्यक्षात मतदान करण्याची प्रक्रिया याबाबत मतदात्यांचे प्रबोधन न करण्यात आल्याचा फटका बाद मतदानाच्या रूपाने बसल्याची चर्चा आहे. अनेक मते बाद होण्यास काळी शाई कारण ठरली. या काळ्या शाईने केलेले मतदानही नियमात बसत नसल्याने ते बाद ठरवले गेले. अनेकांचा चुकलेला पसंतीक्रम, मतपत्रिकेवर करण्यात आलेल्या सह्या आणि काळ्या स्केच पेनचा वापर या प्रमुख कारणांमुळे ही मते बाद ठरली आहे.


कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांच्या समस्या मांडणार

विद्यापीठात नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी आणि कॉलेजेसची संख्या मोठी आहे. वर्षभरात परीक्षांचे लागणारे निकाल, निकालांमधील त्रुटी, ऑनलाइन सेवांमधील अडसर, विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांसंदर्भातील कामे, परीक्षांचे नियोजन असे अनेक विषयांशी निगडित प्रश्न विद्यार्थ्यांच्या बाजूने आहेत. याशिवाय जिल्ह्यात आदिवासीबहुल तालुक्यांमध्येही विद्यापीठाचे कॉलेजेस मोठ्या संख्येने आहेत. या कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांच्याही अनेक समस्या आहे. या समस्या विद्यापीठाच्या सिनेट पर्यंत पोहचविण्यासाठी नाशिककरांना प्रतिनिधित्व अपेक्षित होते. ते आता डॉ. वाघ, पाडवी आणि सोनवणे यांच्यारुपाने मिळाल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूर परिसरात गुंडाची दहशत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भगूर परिसरात रात्री-अपरात्री महिलांवर अत्याचार करून दहशत निर्माण करणाऱ्या योगेश पोटाळे उर्फ टिपऱ्या या सराईत संशयितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. पोटाळेने एका व्यक्तीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आल्याचा प्रकारही या निमित्ताने समोर आला आहे.

नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल पिंगळ यांचा मुलगा विलास पिंगळ (वय ५०) यांना १५ नोव्हेंबर रोजी मागील कुरापत काढून पोटाळेने गंभीररीत्या जखमी केले होते. पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने जखमी पिंगळ यांच्या पत्नी रेश्मा पिंगळ यांच्यासह परिसरातील नागरिकांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, भगूर परिसरातील लक्ष्मीनारायण रोडवर राहत असलेला योगेश उर्फ टिपऱ्या रात्रीच्या वेळी घरात घुसून महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो. १५ नोव्हेंबर रोजी दारू पिऊन तो विलास पिंगळ यांच्या घरात घुसू पाहत होता. पिंगळ यांनी त्याला जाब विचारला असता, त्याने लोखंडी रॉडने पिंगळ यांच्या डोक्यावर वार केले. त्याने रेश्मा पिंगळ यांनाही मारहाण केली. आराडाओरड ऐकून काही नागरिक मदतीला धावले. मात्र, तो त्यांनाही जुमानत नव्हता. जखमी पिंगळ यांना कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराची सुविधा नसल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ठार मारण्याचा प्रयत्न झालेला असताना टिपऱ्याविरोधात कारवाई होत नसल्याची तक्रार रेश्मा पिंगळ यांच्यासह अॅड. विशाल बलकवडे, सुनील जाधव, बाळासाहेब हेंबाडे, कविता शेजवळ, सचिन शेजवळ, चंद्रकला देशमुख, ममता खैरनार आदींनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैद्यकीय अधीक्षकांची चौकशी

$
0
0

रजेसाठी नियमबाह्य वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याची तक्रार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील रावळगाव येथील ग्रामसेवकास जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाची परवानगी न घेता रजा मंजुरीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारीवरून येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. देवराज गरुड यांनी यासंबंधी आरोग्य उपसंचालक तसेच जे. जे. रुग्णालय वैद्यकीय मंडळाकडे तक्रार केली होती.

रावळगाव येथील ग्रामसेवकास गंभीर आजारामुळे चार महिन्यांची रजा मंजूर करण्यात आली आहे. मात्र यासाठी देण्यात आलेले वैद्यकीय प्रमाणपत्र नियमबाह्य असल्याची तक्रार गरुड यांनी केली होती. शासकीय कर्मचाऱ्यास गंभीर आजाराबाबत दोन महिन्यांची रजा गटविकास अधिकारी देऊ शकतात. मात्र त्याहून अधिकची रजा आवश्यक असल्यास त्यासाठी संबंधितास मुंबई येथील जे. जे. रुग्णालयातील वैद्यक मंडळाकडून तपासणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. यानंतरच वाढीव राजा मंजूर होते. असे असताना संबंधित ग्रामसेवकास डॉ. डांगे यांनी रजेसाठी नियमबाह्य वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याची तक्रार गरुड यांनी केल्यानंतर याबाबत त्यांची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. एल. आर. घोडके यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आल्याची माहिती गरुड यांनी दिली. पदाचा गैरवापर करून डॉ. डांगे यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र दिले असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी तक्रारदार देवराज गरुड यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफवाय बीएच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आई-वडील घरात नसताना एका २० वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कॉलेजरोडवरील बीवायके कॉलेजजवळील परिषद भवन येथे मंगळवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली. युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी गंगापूररोड पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला आहे.

अद्वैत मनीष सांगळे (२०, रा. परिषद भवन, कॉलेजरोड) असे या युवकाचे नाव आहे. व्ही. एन. नाईक कॉलेजमध्ये एफवाय बीए या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अद्वैतची सध्या परीक्षा सुरू होती. अद्वैतचे वडील जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी असून, सध्या नंदूरबार येथे कार्यरत आहेत, तर आई गृह‌िणी आहे. सोमवारी एका कार्यक्रमासाठी अद्वैतची आई पाथर्डी फाटा भागात गेली होती. वडील मनीष सांगळे हे प्रकृती अस्वास्‍थ्यामुळे घरी आले नाहीत. अद्वैत घरी एकटाच होता. सोमवारी रात्री किंवा मंगळवारी पहाटेच्या सुमारास अद्वैतने बेडरूममध्ये गळफास लावून घेतला. दरम्यान, अद्वैतच्या मोबाइलवर त्याच्या आई किंवा वड‌िलांचा संपर्क होत नव्हता. मंगळवारी सकाळी मनीष सांगळे घरी पोहचले. अनेकवेळा दार ठोठावूनही त्यांना आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी ताकद लावून दरवाजा तोडला. यावेळी सर्वात शेवटच्या खोलीत गळफास घेतलेला अद्वैत त्यांच्या नजरेस पडला. या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट किंवा इतर पुरावे मिळाले नाहीत. शिक्षण घेत असलेल्या अद्वैतचे फार मित्र नव्हते. व्यायामाचा लळा असलेला अद्वैत शक्यतो मोबाइलवर पिक्चर वगैरे बघायचा. त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी त्याच्या आई-वड‌िलांकडे प्राथमिक चौकशी केली. मात्र, या घटनेमुळे त्यांनाही धक्का बसला असून, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. गंगापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने उघडले खाते

$
0
0

प्रभाग क्रमांक ३ ‘ब’मधून त्रिवेणी तुंगार यांची बिनविरोध निवड

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी माघारीच्या अंतिम दिवशी नगराध्यक्षपदाच्या पाच उमेदवारांनी आणि २७ प्रभागांतील उमेदवारांनी माघार घेतली. अपक्षांसह अधिकृत पक्षचिन्ह असलेल्या उमेदवारांनीदेखील माघार घेतल्याने नव्या समीकरणांना चालना मिळाली आहे. नगराध्यक्ष आणि ८ प्रभागांतील १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान, भाजपने एक जागा बिनविरोध करीत खाते उघडले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रभाग क्रमांक ३ ‘ब’मधून भाजपच्या त्रिवेणी सोमनाथ तुंगार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या माघारीत अनिल कुलकर्णी, नबीयून शेख, संजय कदम, पुरुषोत्तम कडलग यांचा समावेश आहे. तसेच, सोमवारी कैलास घुले यांनी माघार घेतली होती. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी माघार घेताना आपण काँग्रेससोबत आघाडी असल्याने माघार घेत असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हा बँकेचे माजी चेअरमन परवेज कोकणी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून येथे ठाण मांडून आहेत. माघारीप्रसंगी काँग्रेस तालुकाध्यक्ष संपत सकाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर, अरुण मेढे, तालुका युवक अध्यक्ष कैलास मोरे, भाजपचे निरीक्षक सुनील बच्छाव, शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र आदी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक ३ ब मधून त्रिवेणी सोमनाथ तुंगार या भाजपच्या अधिकृत उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. त्रिवेणी तुंगार यांचे पती रवींद्र सोनवणे हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला. माघारीच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षनेत्यांनी आपण हा प्रभाग मित्रपक्षाला सोडला होता. त्यामुळे आम्ही भाजपसाठी माघार घेतलेली नाही असे स्पष्ट केले.

त्रिवेणी तुंगार यांची प्रभाग ३ ब मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव जागेवर उमेदवारी होती. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादीच्या पल्लवी पुरुषोत्तम कडलग आणि काँग्रेसच्या मोनाली कपिल माळी या अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार

आता नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात सुनील अडसरे (काँग्रेस), पुरुषोत्तम लोहगावकर (भाजप), धनंजय तुंगार (शिवसेना), अॅड. पराग दीक्षित, बाळकृष्ण झोले, केशव काळे, उल्हास तुंगार (सर्व अपक्ष) हे उमेदवार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकात संशोधनवृत्ती हवी

$
0
0

डॉ. रवींद्र जायभावे यांचे प्रतिपादन

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

‘प्राध्यापक दशेत असतांना संशोधन कार्याची आवड असणे गौरवास्पद आहे. आजच्या शिक्षणव्यवस्थेला अनुसरून प्रत्येक प्राध्यापकात संशोधनवृत्ती असणे गरजेचे आहे. प्राध्यापकांच्या संशोधनातून नव्या क्लुप्त्या बाहेर येत असतात. तसेच संशोधनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासोबतच शिक्षणव्यवस्थेतील अनुदान वाढते. याच संशोधन प्रणालीतून विद्यार्थ्यांना अधिकाधिक गोष्टी नव्याने शिकायला मिळतात. यामुळे शिक्षण क्षेत्रातील नव्या अविष्कारांसाठी संशोधन हा एक गाभा झाला आहे’, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च सेलचे समन्वयक डॉ. रवींद्र जायभावे यांनी केले. एचपीटी आरवायके कॉलेजमध्ये आयोजित अविष्कार-२०१७ संशोधन स्पर्धेच्या उद््घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१७-१८च्या अविष्कार संशोधन स्पर्धेची झोनल लेवलची फेरी मंगळवार (२८ नोव्हेंबर) रोजी पार पडली. प्राध्यापक गटाच्या अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान यंदा एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स कॉलेजला मिळाला होता. अविष्कार स्पर्धेच्या उद््घाटन समारंभप्रसंगी व्यासपीठावर पुणे विद्यापीठाच्या रिसर्च सेलचे डॉ.रवींद्र जायभावे, गोखले सोसायटीचे सचिव डॉ.मो.स.गोसावी, प्राचार्य व्ही.एन.सूर्यवंशी होते.

यावेळी बोलताना डॉ. जायभावे म्हणाले, ‘अविष्कार फेस्टची सुरुवात माजी राज्यपाल एस. कृष्णा यांच्या संकल्पनेतून झाली आहे. देशाला तरुण शास्त्रज्ञ मिळावा आणि तरुणांमध्ये संशोधनाची आस निर्माण व्हावी यासाठी अविष्कार सुरू करण्यात आले आहे. दरवर्षी अविष्कारमधून अनेक नवे संशोधन समोर येतात. यातून समोर येणारे शास्त्रज्ञ अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपले संशोधन सादर करत असतात. अविष्कार फेस्टमध्ये असाच उत्साह कायम वाढत रहावा आणि विद्यार्थ्यांना आपली कल्पना मांडण्याचे योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी विद्यापीठ कायम तत्पर असते.’

डॉ. गोसावी यांनी प्राध्यापकांना स्वतः आपली ओळख निर्माण करण्यासाठी संशोधनातून पुढे या, असे मोलाचे मार्गदर्शन केले. अविष्कार फेस्टमध्ये एचपीटी आरवायकेचे योगदान मोठे असून, कायमच अविष्कारमधून एचपीटी आरवायकेच्या प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांना उत्तुंग यश मिळाले आहे, असे सांगत अविष्कारसाठी आलेल्या सर्व प्राध्यापक स्पर्धकांना प्राचार्य सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या. एचपीटी आरवायकेत रंगलेल्या अविष्कार २०१७च्या प्राध्यापक गटाच्या विभागीय फेरीत 'ह्युमॅनिटी, भाषा, फाइन आर्टस, कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ, सायन्स, अँग्रीकल्चर, अॅनिमल हसबंडरी, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिसिन आणि फार्मसी' या विभागातले रिसर्च पेपर सादर करण्यात आले. यावेळी पुणे विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजेसमधील एम. फिल तसेच पीएचडी झालेले सुमारे ११० प्राध्यापकांनी आपले रिसर्च पेपर सादर केले. डॉ. संजय औटी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजयकुमार वावळे तसेच इतर प्राध्यापकांनी स्पर्धेचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षेच्या मुद्द्यावर पोलिस-लष्करात चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय लष्कर आणि शहर पोलिस यांच्यात परस्परसहकार्य वाढावे आणि त्यातून सुरक्षाव्यवस्था मजबूत व्हावी, यासाठी मंगळवारी स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये महत्त्वाची बैठक झाली. बैठकीस पोलिस अधिकारी, तसेच लष्करातील वरिष्ठ अधिकारी हजर होते.

स्थानिक पोलिस आणि लष्करात काही कारणांमुळे मतभेद निर्माण होतात. विशेषतः पोलिसांनी लष्करी अधिकारी अथवा जवानांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवले की हे वाद उफाळून येतात. अशाच एका घटनेनंतर काही वर्षांपूर्वी ४० ते ५० लष्करी अधिकाऱ्यांनी उपनगर पोलिस स्टेशनवर हल्ला चढवला होता. हा वाद त्या वेळी बराच गाजला. यानंतर लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस आयुक्त यांच्यात ठराविक अंतराने बैठकींचे आयोजन करण्यात येते. आजची बैठक मात्र वेगळीच ठरली. शहर पोलिसांनी स्कूल ऑफ आर्टिलरीमध्ये सुरुवातीला क्राइम मीटिंग घेतली. त्याला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त हजर होते. यानंतर याच ठिकाणी लष्करातील वरिष्ठ अधिकारी हजर झाले. लष्कर आणि स्थानिक पोलिसांमध्ये परस्परसहकार्य वाढीस लागावे, या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी लष्कराकडून असलेल्या अपेक्षा सांगितल्या, तर लष्कराच्या अधिकाऱ्यांनीदेखील आपल्या समस्या मांडल्या. लष्करी हद्दीत अतिक्रमणाचा प्रश्न असून, पोलिसांनी यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दहशतवादाचा मुकबला करण्यासाठी पोलिस आणि लष्कराने एकत्र सराव करावा, लष्कराचे काही तंत्र पोलिसांना शिकवावे, अशा अनेक मुद्द्यांवर या वेळी खल करण्यात आला.

नवीन इमारती रडारवर

मागील काही वर्षांत लष्करी हद्द परिसरात नवीन इमारती उभ्या राहिल्या. पूर्णत्वाचा दाखला नसताना बिल्डरने सदनिकांची विक्री केली. येथे सध्या कोण व्यक्ती वास्तव्यास आहे, हे समोर येत नसल्याची गंभीर बाब लष्कराने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनीदेखील हा मुद्दा हाती घेणार असल्याचे स्पष्ट करीत मूळ मालकासह भाडेकरूंची नोंदणी करून घेणार असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महात्मा फुले दूरगामी विचारांचे देवदूत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अर्थकारण विषयात महात्मा फुले यांना वेगळे काढता येणार नाही. आर्थिक ताकद सक्षम झाली पाहिजे, असे सांगण्यात त्यांच्याकडे अर्थतज्ज्ञाची दूरदृष्टी होती. भविष्यकाळाची तरतूद करण्याचा विचार मांडणारे महात्मा फुले दूरगामी विचार करणारे प्रभावी देवदूत होते, असे प्रतिपादन विश्वास सहकारी बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळी समाजसेवा समितीतर्फे आयोजित विशेष पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी महात्मा फुले व आजची आर्थिक परिस्थिती या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. दौलतराव गांगुर्डे अध्यक्षस्थानी होते.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास नगरसेवक राहुल दिवे, माजी नगरसेवक अनंत सूर्यवंशी, चंद्रकांत बागूल, योगेश थोरात, माळी समाजसेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत आदी उपस्थित होते. विश्वास ठाकूर म्हणाले, की श्रम आणि उद्यमशीलता या विषयावर महात्मा फुले बोलत असत. कष्टाने संपत्ती कमवावी, कुणावरही अवलंबून राहू नका, स्वतः काय कमावता यावर विश्वास असावा, त्या काळात त्यांची व्यवसाय विषयावरील मांडणी अद््भुत होती. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना माहीत होत्या. त्यांच्या आर्थिक पिळवणुकीवर ते सातत्याने बोलत. पारंपरिक पद्धतीतून शेतीचे होणारे नुकसान ते समजून देत. उत्पादन करणाऱ्या श्रमाची किंमत माहिती होती. विनाकष्ट पैशाच्या मागे लागू नका, असे त्यांचे विचार आजही उपयुक्त ठरणारे आहेत. समृद्ध असलेला माळी समाज मागे महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव आहे.

मनीष जाधव यांना उद्योगरत्न, चंद्रकांत बागूल यांना समाजरत्न, डॉ. अरुण निकम यांना धन्वंतरी रत्न, राहुल दिवे यांना राजकारण आदी मान्यवरांबरोबरच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जागृती कोलगीकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तमराव बडदे यांनी स्वागत केले. विजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. हरिश्चंद्र विधाते यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शांतता, सौहार्दातूनच प्रगती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शांतता आणि सोहदार्यातून प्रगतीचे मार्ग मोठे होतात. परस्पर सहकार्य असल्यास दिशा मिळते. यंदा शहरात गणेशोत्सव डीजेमुक्त तसेच पर्यावरणपूरक पार पडला. राज्यातील आदर्श गणेशोत्सव म्हणून याची पोलिस महासंचालक तसेच शासनस्तरावर नोंद घेण्यात आली. प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादचा हा परिणाम होता, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.

शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित डीजे व पर्यावरण पूरक तसेच सेल्फी विथ गणेश या पुरस्कारांचे वितरण आणि शांतता कमिटी सदस्यांची बैठक गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह येथे पार पडली. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. सिंगल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार देवयानी फरांदे होत्या.अध्यक्षीय भाषणात आमदार फरांदे यांनी सार्वजनिक गणेश मंडळाचे कौतुक केले. कार्यक्रमास महापालिकेच्या पूर्व विभागाच्या सभापती शाईन मिर्झा, पोलिस उपआयुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सचिन गोरे, विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. सहायक आयुक्त आशोक नखाते यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल

सेल्फी विथ गणेश : १) आर्या योगेश गायधनी, २) शिवांग सागर कुंभार, ३) सोहम सुनील जाधव.

विभाग १ : १) छावा ग्रुप गणेश मंडळ (शिलापूर), २) तारवालानगर सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ, ३) आरटीओ कॉर्नर मित्र मंडळ. उत्तेजनार्थ : नवनिर्माण कलाक्रीडा मंडळ (मखमलाबाद नाका), श्रीमान सत्यवादी मंडळ (पेठरोड), हनुमान मित्र मंडळ (पेठफाटा), पटेल मित्र मंडळ (पेठफाटा), यंगस्टार मित्र मंडळ (पंचवटी), जय बाबाजी गणेश मंडळ (स्वामी समर्थनगर), जिजाऊ मित्र मंडळ, आराध्य गणेश मित्रमंडळ (पेठरोड)

विभाग २ : १) रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ, २) महात्मानगर विकास मंडळ, विनयनगर मित्रमंडळ, ३) राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक मंडळ, उत्तेजनार्थ : कॉलेजरोड मित्र मंडळ, स्कॉलरईन मित्रमंडळ, कृषीनगर जॉगिंग ट्रक, महाराष्ट्र पत्रकार महासंघ

विभाग ३ : १) युनिक ग्रुप (इंदिरागनर) २) माऊली टेंभानाका मित्रमंडळ (अंबड), ३) साई रुद्र बहुउद्देशीय संस्था (सातपूर), उत्तेजनार्थ : शिवचौक मित्र मंडळ (अंबड), एकता सेवा मंडळ (अंबड), पेलिकन बहुउद्देशीय संस्था (अंबड), श्री सिद्धी विनायक कॉलनी मित्रमंडळ, श्री प्रतिष्ठान श्रद्धा विहार मंडळ (इंदिरानगर), द्वारकामाई मित्रमंडळ (इंदिरानगर), हुतात्मा अनंत कान्हेरे मित्र मंडळ (सातपूर), श्री रजत नवशा गणपती मित्र मंडळ (सातपूर), हर हर महादेव मित्र मंडळ (सातपूर)

विभाग ४ : १) दि नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक गणेशोत्सव मंडळ, २) शिवछत्रपती तालीम संघ (भगूर), ३) ईगल स्पोर्टस क्लब (आर्टिलरी सेंटर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे

$
0
0

सभापती माणिकराव बोरस्ते यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी नेहमी मानसिकदृष्ट्या अथवा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्यास त्याला जीवनात नेहमी यश प्राप्ती होते. तसेच त्याला महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे यश प्राप्त होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी अशा उपक्रमांत सहभाग घ्यावा व मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या योजनेत विद्यार्थी हा स्वयंसेवक म्हणून ओळखला जातो. त्याचा सर्वांगीण विकास होण्यास त्याने श्रमसंस्कार शिबिर करावे व समाजात वेगळी ओळख निर्माण करावी, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे स्थानिक समिती सदस्य निवृत्ती जाधव,कैलास चौधरी,प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, खंबाळे ग्रा. प. सदस्य, प्रा. ए. बी. भगत उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. सी. पाटील यांनी केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एस.एस.काळे यांनी या शिबिरात स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान,व गाव परिसर सर्वांगीण विकास,पर्यावरण स्वच्छतेची जण जागृती, कौटुंबिक सर्वेक्षण, महिला सक्षमीकरण असे विविध उपक्रम राबविले तसेच या शिबिराचा उद्देश सफल केला त्याबद्दल त्यांनी स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.

श्रमसंस्कार शिबिरासाठी मविप्र संचालक भाऊसाहेब खातळे, अॅड. जे. एन. शिंदे, योगीता चौधरी, शाम मोगल, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. डॉ. डी. डी. वाळके, प्रा. आर. एम. आंबेकर, प्रा. यु. एन. सांगळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एस. बागूल, प्रा. डॉ. वाय. एच. वाळुंज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या वेळी खंबाळे गावातील ग्रामस्थ राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वंयसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन आदिनाथ गिते, आरती लोटे यांनी केले तर आभार प्रा. सी. डी. चौधरी यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाड्यांचे नियम धाब्यावरच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील घंटागाडी ठेकेदाराला राजकीय वरदहस्त असल्याने मनमानी पद्धतीने गाड्या चालविल्या जात असून, या सर्वच गाड्यांची तपासणी केली पाहिजे अशी मागणी नगरसेवकांकडून वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे मंगळवारी दुपारी सिडकोतील सर्व घंटागाड्या सिडको विभागीय कार्यालयात बोलविण्यात आल्या व त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी दहा गाड्या उशिराने आल्या, सत्तर टक्के गाड्यांवर नव्या नियमाप्रमाणे भोंगे लावले नसल्याचे समोर आले. तीन कोटींहून अधिक रकमेचा दंड झालेला हा ठेकेदार या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने आरोग्य विभागाकडूनच त्याची पाठराखण केली जात असल्याचा आरोप सभापती सुदाम डेमसे यांनी केला. दरम्यान, ठेकेदाराच्या प्रतिनिधीने आठ दिवसांत ही परिस्थिती बदलण्याचे आश्वासन विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

सिडकोतील सहा प्रभागांत एकूण बेचाळीस गाड्या आहेत. त्यापैकी दोन गाड्या लहान, एक गार्डनसाठी, एक डेब्रिससाठी, दोन रात्रपाळीसाठी व एक गाडी खास हॉटेलांसाठी ठेवण्यात आली आहे. उर्वरित घंटागाड्या या प्रभागातील कचरा उचलण्यासाठी आहेत. या सर्वच गाड्या मंगळवारी सिडको कार्यालयात आणण्यात आल्या होत्या. सुरुवातीला केवळ बत्तीस आल्या होत्या. दहा गाड्या खत प्रकल्पावर असल्याचे ठेकेदाराच्या प्रतिनिधीने सांगितले. या गाड्यांची तपासणी विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, प्रभाग सभापती सुदाम डेमसे, नगरसेवक शाम साबळे, नीलेश ठाकरे, संगीता जाधव, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड आदींसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. एकाही घंटागाडीवर प्रभागाचा उल्लेख नव्हता. गाड्या तपासणार म्हणून कागदावर प्रिंट काढून चिकटविण्यात आली होती. सुमारे सत्तर टक्के गाड्यांवर भोंगेच नसल्याने या गाड्या कधी येतात व कधी जातात, हेच नागरिकांना समजत नसल्याचा आरोप करण्यात आला. पुरेशा घंटागाड्या नसल्याने व गाड्यांवर प्रभाग क्रमांक व सुपरवायझर यांचे नंबर लिहिणे बंधनकारक असतानाही त्याकडे ठेकेदाराने लक्ष दिले नसल्याचे समोर आले. महानगरपालिका व ठेकेदार यांच्यात झालेल्या करारातील अनेक अटी व शर्तींचा भंग झाला असल्याचे यावेळी नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी संबंधित ठेकेदाराचा ठेकाच रद्द करण्याची मागणी केली. ठेकेदार व आरोग्य अधिकारी डॉ. बुकाणे यांच्यात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याने ते दोघेही याठिकाणी अनुपस्थित राहिल्याचा आरोपही सभापतींनी केला.

प्रतिनिधीकडून आश्वासन

संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधीने आठ दिवसांत गार्डनसाठी दोन गाड्या देण्याबरोबरच झाडपाल्यांसाठी दोन गाड्या व सगळ्या गाड्यांवर स्पीकर सुरू करण्यात येतील. दोन प्रभागांसाठी एक सुपरवायझर नेमण्यात येऊन प्रत्येक गाडीवर प्रभाग क्रमांक व सुपरवायझरचा क्रमांक टाकण्यात येईल, असे आश्वासन दिले. या सर्व गोष्टींची पूर्तता आठ दिवसांत करण्यात येणार असल्याचे सांगितल्याने या वादावर तात्पुरता पडदा पडला.

जादा गाड्या मिळत नाहीत

सिडको प्रभागात सध्या असलेल्या गाड्यांपेक्षा जादा गाड्या लागल्या तर त्या देण्याची अट करारनाम्यात असतानाही ठेकेदाराकडून पाहिजे तेव्हा गाड्या मिळत नसल्याचे विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी सांगितले. गाड्या वाढविण्याबाबत पत्रव्यवहार केला असून, ठेकेदार या पत्राला उत्तरही देत नाही व गाड्याही वाढवित नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर ठेकेदाराला वारंवार सुचना करूनही तो आमचे ऐकत नसल्याचा आरोप विभागीय स्वच्छता निरीक्षक रमेश गाजरे यांनी केल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्‍त केले. विभागीय अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांनाच ठेकेदार जुमानत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

प्रभाग २९ मध्ये घंटागाडी येत नसल्याने आंदोलन केले होते. त्यावेळी ठेकेदाराने एक गाडी वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज ही वाढीव गाडी दिसली नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार दिशाभूल करीत आहे.

- रत्नामाला राणे, नगरसेविका

नगरसेवकांच्या घरासमोरून जाणाऱ्या गाड्यांनाच भोंगे लावण्यात आले आहेत. अनेक गाड्यांवर भोंगे नसल्याने घंटागाडी केव्हा येते व केव्हा जाते हे महिलांना समजत नाही. त्यामुळे कचरा टाकला जात नाही व पर्यायाने हा कचरा खुल्या जागेत टाकला जात असतो. यामुळे सिडकोत डेंग्यू सारख्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत.

- शाम साबळे, नगरसेवक


महापौरांनी आदेशित केल्यानंतर ठेकेदार किंवा प्रशासनाला जाग येत नाही हे यावरून सिद्ध झाले आहे. डॉ. बुकाणे यांना या कार्यक्रमाची माहिती कालच देण्यात आली होती, मात्र तेच या ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत.

- सुदाम डेमसे, प्रभाग सभापती

पाला-पाचोळा किंवा गार्डनचे गवत हे घंटागाडीत घेतले जात नाही. कोणी टाकले तर घंटागाडी कर्मचारी यासाठी पैसे मागतात.

- संगीता जाधव, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिपिकांनी केल्या न्यायाधीशांच्या सह्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीशांच्या परस्पर सह्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यायालयात विविध खटल्यांमध्ये सातत्याने वॉरंट काढण्यात येते. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात असलेल्या कनिष्ठ लिपिकांनीच परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी दोन कनिष्ठ लिपिकांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी निलंबित केले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या लिपिकांमध्ये जिल्हा न्यायालय व दिंडोरी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे असलेल्या लिपिकांचा समावेश आहे. न्यायालयात वारंवार वॉरंट काढूनही गैरहजर राहणाऱ्यास गैरजमानती वॉरंटही काढले जाते. जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. व्ही. देढिया यांच्या न्यायालयातील कनिष्ठ लिपिक संशयित बी. बी. आंधळे यांनी न्यायाधीशांचे आदेश व वॉरंटवर परस्पर न्यायाधीशांच्या सह्या केल्याचे समोर आले, तसेच दिंडोरी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील कनिष्ठ लिपिक आर. बी. बलसाणे यांनीही सह्या केल्याचे काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी कनिष्ठ लिपिक आंधळे व बलसाणे या दोघांना निलंबित करण्याचे आदेश सोमवारी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पाण्याची उपलब्धता आणि खरीप हंगामानंतर काढणी करून लवकर तयार होणाऱ्या पालेभाज्यांच्या लागवडीवर दिलेला भर यामुळे नाशिक मार्केटमध्ये पालेभाज्यांची आवक प्रचंड वाढली आहे.

राज्यातील इतर भागातून मुंबईला पालेभाज्यांच्या पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांच्या भावात घसरण झाली आहे. काही महिन्यांपासून दरांचा उच्चांक गाठणाऱ्या पालेभाज्या आता स्वस्त झाल्या आहेत. मात्र, शेपूची आवक कमी असल्याने या पालेभाजीला चांगले दर मिळत आहेत.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सायंकाळी होणाऱ्या लिलावासाठी अडीच ते तीन लाख पालेभाज्यांच्या जुड्या विक्रीस येत आहेत. त्यात एक लाखांपेक्षा जास्त असल्याने मेथीला केवळ ४ ते ८ रुपये प्रति जुडी असा दर मिळत आहे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दरांचा उच्चांक गाठणाऱ्या कोथिंबीरीचीही आवक वाढली आहे. तिचेही दर १० ते १५ रुपये प्रति जुडी असे स्थिर आहेत. या मोसमात दर्जेदार कांदापात उपलब्ध होत असून त्याचे दरात फारशी वाढ झालेली नाही १० ते १८ रुपये प्रति जुडी असा दर मिळत आहे. पालेभाज्यात शेपू अपवाद ठरत आहे, हिवाळ्यात पडणाऱ्या दवामुळे शेपू पिवळी पडत असल्याने या हंगामात शेपूची लागवड करण्याचे शेतकरी टाळतात. त्यामुळे सध्या शेपूची आवक कमी झाली आहे. त्यामुळे या पालेभाजीचे दर २५ ते ३२ रुपये प्रति जुडी असे वाढलेले आहेत.

नाशिकहून मुंबईला लहान-मोठी अशी सुमारे ५० वाहनातून पालेभाज्या पाठविल्या जात आहे. गुजरातला ८ ते १० वाहने जातात. मुंबईला पालेभाज्या पाठविण्यात नाशिक बाजाराचा मोठा वाटा असतो. मात्र, सध्या नाशिकला खेड, मंचर, नारायणगाव, मनमाड, चांदवड येथून जाणाऱ्या पालेभाज्यांशी स्पर्धा करण्याची वेळ आली आहे. या भागातूनही मोठ्या प्रमाणात पालेभाज्या मुंबईला रवाना होत असल्यामुळे पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. या भागातील पालेभाज्या अजून साधारणतः पंधरा दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पालेभाज्यांचे दर कमीच राहण्याची शक्यता आहेत.

नाशिक मार्केटमध्ये सध्या पालेभाज्यांची आवक आणि त्याला असणारी मागणी लक्षात घेता शेपूचा अपवाद वगळता दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पालेभाज्यांची लागवड आणि आवक बघता अजून १५ दिवस अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे.
- रंजन शिंदे, आडतदार

बाजार समितीतील पालेभाज्यांचे मंगळवारचे दर
- पालेभाज्या .............दर (प्रति जुडी)
- कोथिंबीर...................१० ते १५
- मेथी.........................४ ते ८
- शेपू...........................२५ ते ३२
- कांदापात...................१० ते १८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीच्या हत्येचे गूढ कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंबेगण शिवारातील (ता. दिंडोरी) पाझर तलावात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. १६ ते १८ वयोगटातील मुलीची निघृण हत्या करून आरोपीने तिचे हातपाय बांधले आणि तिचा मृतदेह गोणीत भरून त्यात दगड टाकून पाझर तलावत फेकला होता. अत्यंत थंड डोक्याने खून करण्यात आला असून, २४ तासानंतरही घटनेचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

घटना सोमवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. मृतदेहाची कोणतीही ओळख पटणार नाही, याची आरोपीने काळजी घेतलेली दिसते. मृतदेह तीन ते चार दिवस पाण्यात राहिल्याने खराब झाला. त्यामुळे डॉक्टरांना जागेवरच शवविच्छेदन करावे लागले. डोक्यात गंभीर वार केल्याने हा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. याबाबत अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सांगितले, की मुलीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे शवविच्छेदन अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. हत्या झालेल्या मुलीचे वय अंदाज १६ ते १८ असून, तिच्या अंगात काळी जिन्स पॅन्ट आहे. त्यावर कंबरेला मविप्र संस्थेचा लोगो असलेला बेल्ट आहे. निळसर डिझाईन व त्यावर फुले असलेला अंगात गुलाबी कलरचा टॉप घातलेला आहे. डाव्या हाताला नेलपॉलिश असून, डाव्या बोटात अंगठी आहे. या वर्णनाची तसेच या वयोगटातील मिसिंग असलेल्या मुलींबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. ग्रामीणसह शहर पोलिसांकडूनही माहिती घेण्यात येते आहे. मात्र, अद्याप हाती काही लागले नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. मुलीची ओळख पटल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाला वेग मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.

फिंगरप्रिंट स्कॅनिंगद्वारे आधारकार्डाचा शोध

हत्या झालेल्या मुलीच्या वयावरून ती शाळेत किंवा अकरावीला असू शकते. या वयातील मुलांचे आधारकार्ड काढण्याचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मृतदेहाच्या हाताचे ठसे स्कॅन करून संबंधित मुलीचा आधारकार्ड क्रमांक अथवा इतर माहिती मिळते काय याची चाचपणी पोलिसांकडून सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कर्पे यांनी सांगितले, की हा प्रयत्न यशस्वी होईलच असे नाही. मृतदेहाची अवस्था बिकटच असून, कोर्टाच्या आदेशाने ही प्रक्रिया बुधवारी पार पडू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images