Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

२१५ हेक्टर जमीन समृद्धीसाठी संपादित

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात थेट खरेदीद्वारे २१५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी २५२ कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील ७५३ शेतकऱ्यांनी या जमिनीची खरेदी केली आहे.

समृद्धीबाधीत शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध कायम असतानाही प्रशासनाने थेट खरेदीद्वारे या जमिनी संपादित केल्या आहेत. या भूसंपादनात सिन्नर तालुक्यातील १४०.८५ हेक्टर जमीन संपादित केली असून ४३३ शेतकऱ्यांना १६० कोटी ३५ लाख रुपये देण्यात आले आहे. तसेच इगतपुरी तालुक्यातील ७५ हेक्टर जमीन संपादित केली असून त्यात ३२० शेतकऱ्यांना ९२ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. राज्यातील ३० तालुके आणि ३५५ गावांतून जाणारा हा महामार्ग देशातील राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार असून त्यात नाशिकच्या या दोन तालुक्यातील जमिनी आहेत. राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री स्वत: लक्ष ठेवून असल्याने अधिकारी भूसंपादनासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाजसुधारकांचा सन्मान

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील सम्राट मंडळ व सत्यशोधक युवा सभेच्या वतीने समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. स्मृतीदिनाच्या निमित्ताने समाजवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची स्नेहसंमेलन, महात्मा हा एकपत्री प्रयोग, अंधार भेदताना पुरस्कार वितरण व मानव मुक्ती गीतांचा जलसा असे विविध कार्यक्रम यानिमित्ताने झाले.

ओबीसींसाठी क्रांतिकारी ठरलेल्या मंडल आयोग आंदोलन तसेच मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर आंदोलनात सक्रीय सहभाग घेतलेल्या मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, सिन्नर, नाशिक येथील समविचारी कार्यकर्त्याचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक रणजीत परदेशी होते. प्रमुख अतिथी म्हणून अलका महाजन, डॉ. सुगम बरंठ आदींसह शहर व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. या संमेलनात सत्यशोधक चळवळ, महात्मा फुलेंचे विचार आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

सायंकाळी प्रा. नवनाथ शिंदे यांचा महात्मा फुले यांचा जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. तसेच रात्री सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून जनप्रबोधन करणारा एल्गार सांस्कृतिक मंच यांचा ‘मानव मुक्ती गीतांचा’ कार्यक्रम झाला. यावेळी उपमहापौर सखाराम घोडके, शंकर बागुल, शेख रियाज, सुधाकर मिस्त्री आदींसह शहरातील मान्यवर उपस्थित होते. सम्राट मंडळाचे सुभाष परदेशी यांनी कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली.

यांचा झाला सन्मान

शहर व तालुक्यात प्रसिद्ध‌िच्या प्रकाशझोतापासून दूर असलेल्या परंतु सामाजिक योगदान देणाऱ्या सहा निःस्वार्थी कार्यकर्त्यांचा ‘अंधार भेदताना सन्मान पुरस्कार’ देवून गौरव करण्यात आला. यात शरीफ खान, कैलास भामरे, जिभाऊ जाधव, शकील साबीर, अशोक पाटील, आनंद प्रसादालय यांचा सन्मान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा तहसीलदारांना नोटिसा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात जिल्हा पिछाडीवर आहे. जिल्ह्यातील तब्बल ४२ लाख मतदारांच्या ७ लाख कुटुंबापैकी फक्त ९ हजार २०० कुटुंबांचे ऑनलाइन पुनरीक्षण केल्याने दहा तहसीलदारांना कारणे द्या नोटीस जिल्हा निवडणूक शाखेने बजावल्या आहेत. या पुनरीक्षण कार्यक्रमात २२ हजार ऑफलाइन पुररीक्षण झाले आहे.

निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी १५ ते ३० नोव्हेबर असा कार्यक्रम दिला होता. यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी देण्याच्या सूचना केल्या. त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या मोहिमेला अवघा एक दिवस या बाकी असताना यातील धक्कादायक आकडे समोर आले आहेत. मतदार पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) या भेटीत स्थलांतरित आणि मृत्यू झालेल्या मतदारांची नावे वगळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मतदारांचे नाव, वय, लिंग, पत्ता, फोटो यामध्येही आवश्यक त्या दुरुस्त्या सूचविल्या आहेत. मतदारांची, कुटुंबाची माहिती व संपर्कासाठी मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी भरण्याचे आदेश देण्यात आल्याने हे काम सोपे नाही. असे असतांना त्याकडे ‘बीएलओ’ने दुर्लक्ष केले आहे.

जिल्ह्यातील १५ तालुक्यात ४ हजार ‘बीएलओं’ची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडून १५ दिवसात फक्त ९ हजार २०० घरांनाच भेट देण्यात आल्यामुळे प्रशासनही चिंतेत पडले आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे आलेल्या ऑनलाइन डेटामध्ये दिंडोरी, चांदवड, इगतपुरी, कळवण आणि नांदगाव तालुका वगळता अन्य १० तालुक्यांमध्ये समाधानकारक काम झालेले नसल्याचेही समोर आले आहे.

कामगिरी समाधानकारक नाही
मालेगाव बाह्य, बागलाण, निफाड, येवला, नाशिक मध्य, नाशिक पूर्व, नाशिक पश्‍चिम, सिन्नर या मतदारसंघात समाधानकार कामगिरी नाही. या सर्व मतदारसंघात कुठे एक तर कुठे दोन असेच आकडे आहे. त्यात नाशिक मध्य मतदारसंघात ५३ तर इतर ठिकाणी १६ च्या आतच आकडे आहे. त्यामुळे तब्बल ७ लाख कुटुंबाकडे कसे पडताळणी केली जाणार? असा प्रश्न पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयनगरला ७१ हजाराची घरफोडी

0
0

म टा प्रतिनिधी, नाशिक

घरातील सर्व व्यक्ती बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी वडाळा पाथर्डी रोडवर घरफोडी केली. विनयनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ७१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे. उदय पंढरीनाथ मेखे (रा. पूर्ती सोसा. सिध्द‌िविनायक मंदिराजवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मेखे कुटुंबीय २१ ते २७ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले होते. त्यादरम्यान ही घटना घडली.



पंचवटीतून कार लंपास

शहरात वाहन चोरीने जोर पकडला असून, दुचाकी पाठोपाठ आता चारचाकी वहानेही पळविली जात आहेत. मखमलाबाद रोडवर पार्क केलेली तवेरा (एमएच ३९ १५३९) चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश भांगरे (रा. पागेवाडी, महादेव कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.


महिलेची पोत खेचली

जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेल्याची घटना पारिजातनगर भागात घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुह्याची नोंद करण्यात आली आहे. मनिषा नीलेश येवला (रा.गुरूचरणी अपा. पारिजातनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास येवला शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. परिसरात फेरफटका मारून त्या आपल्या घराकडे परतत असतांना गुरूचरणी अपार्टमेंट समोरच दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्याच्या गळ्यातील ३२ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली.



महिलेचा विनयभंग

पाठलाग करून महिलेचा विनयभंग करणाऱ्या संशयीताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. माणिकनगर भागात राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचा संशयीत तब्बल महिनाभरापासून पाठलाग करीत होता. याप्रकरणी महिलेने गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. यावरुन गंगापूर पोलिसात गुह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रभाकर विनायक भोळे (रा.परिश्रम निवास) असे संशय‌िताचे नाव आहे. संशयीत भोळे गेल्या महिनाभरापासून महिलेच्या गॅलरीसमोर उभे राहून अश्लिल वर्तन करीत होता. त्यानंतर त्याने इमारतीच्या पार्किंगमध्ये भेटण्याचा प्रयत्न केला. याबरोबर महिला व्यायामासाठी जीम मध्ये अथवा घराबाहेर पडली असता त‌िचा पाठलाग करून विनयभंग केल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.


पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न

चारित्र्याच्या संशयासह मद्यप्राशन करून मारझोडीस कंटाळून घर सोडलेल्या पत्नीचा पतीने गळा घोटण्याचा प्रयत्न केल्याची घटना पाथर्डीफाटा परिसरात घडली. पत्नीने सोबत जाण्यास नकार दिल्याने लष्करातून निवृत्त झालेल्या पतीने हे कृत्य असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालचंद्र तुळशीराम घरटे असे संशयीत पतीचे नाव आहे. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून संगिता घरटे (४२) या पंधरा दिवसांपासून पाथर्डी फाट्यावरील वासननगर भागात राहत होत्या. पती भालचंद्र मंगळवारी सकाळी पत्नी संगिताला घेण्यासाठी वासननगर येथे गेला असता ही घटना घडली. पत्नी संगिताने सोबत जाण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पती भालचंद्रने हातातील टायने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. संगिता यांनी आरडाओरड केल्याने ही घटना उघडकीस आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींची हेळसांड

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक विभागाच्या आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यक्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांच्या उद्‍घाटनाकडे पाच मंत्र्यांनी पाठ फिरविली. हा समारंभ बुधवारी (दि. २९) रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार होता. खेळाडूंनी तब्बल दीड तास उन्हात बसून मंत्र्यांची प्रतीक्षा केली. अखेर आदिवासी विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते उद्‍घाटनाचा सोपस्कार पार पाडण्यात आला.

पंचवटीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विशेष उपस्थितीत आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात येणार होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन तसेच विशेष अतिथी म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आदिवासी विकास व वने राज्यमंत्री राजे अंबरिशराव अत्राम यांची उपस्थिती राहणार असल्याचा उल्लेख होता. मात्र, यापैकी एकही मंत्री या कार्यक्रमाला आले नाहीत. याविषयी उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.

क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून तसेच फुगे सोडून तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धांचे उद्‍घाटन करण्यात आले. खेळाडूंनी स्पर्धेत खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करण्याची शपथ घेतली. सहभागी खेळाडूंनी प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. आदिवासी विकास आयुक्तालयाचे सह आयुक्त दशरथ पानमंद, विभागाच्या क्रिडा व युवक सेवाचे उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, संदीप गोलाईत, अमोल येडगे उपस्थित होते.

आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांनी खेळाडूंना आपली क्षमता दाखविण्याचे तसेच खिलाडूवृत्ती निर्माण करण्याचे आवाहन केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची भोजन, वैद्यकीय, सुरक्षा आदी सर्वप्रकारच्या सुविधांची व्यवस्था ठेवण्याची सूचना आयोजकांना दिल्या.

ध्वनीक्षेपकाचा व्यत्यय

स्वागतगीत तसेच समूहनृत्याच्या सादरीकरणाच्या वेळी ध्वनीक्षेपक बंद पडल्याने कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाला. ध्वनीक्षेपक सुरळीत चालावा यासाठी सूत्रसंचालिका परमेश्वराला साकडे घालीत होती. कार्यक्रम दीड तास लांबल्याने खेळाडूंना उन्हात ताटकळत बसण्याची वेळ आली. उन्हामुळे त्रासलेल्या अनेक खेळाडूंनी प्रमुख अतिथींचे भाषण सुरू होताच मैदानातून काढता पाय घेतला.

खेळाडू शूजपासून वंचित

क्रीडा स्पर्धेत सात ठिकाणच्या आश्रमशाळा प्रकल्पातील दोन हजार ८५८ खेळाडू सहभागी झाले. त्यातील खेळाडूंना आयोजकांकडून टॅकसूट देण्यात आले. मात्र, बहुतांशी खेळाडूंच्या पायास शूज नव्हते. तर काही खेळाडूंना तर कार्यक्रम सुरू होण्याच्या शूज देण्यात आले. त्यातील बहुतांशी शुज पायात बसत नसल्याने खेळाडूंची अडचण निर्माण झाली. पाय आणि शूजचा आकार यांच्यात फरक असल्याने मानवंदना देतांना चालणे सोयीचे व्हावे यासाठी काही खेळाडू स्लिपर घालून तर काही खेळाडू अनवाणीच आले. दरवर्षी होणाऱ्या या विभागीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करताना या खेळाडूंना साहित्य पुरविले गेले पाहिजे, याची दक्षता घेतली जात नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

आयोजकांना वेळ कमी मिळाल्याने खेळाडूंना क्रीडा साहित्याची सुविधा देण्यासाठी अडचण आली असावी. सुविधांपेक्षा शारिरीक क्षमता महत्त्वाची आहे. या पुढे स्पर्धा भरविताना काही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- रामचंद्र कुलकर्णी, आयुक्त, आदिवासी विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडी प्रबोध‌िनीचा संघ ठरला विजेता

0
0



म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

येथील आडवा फाटा परिसरातील मैदानावर नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व जिल्हा तालिम संघ यांच्या मान्यतेने क्रीडा महोत्सवांतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत महिला गटातून क्रीडा प्रबोधिनी नाशिकच्या संघाने (३५) पटकावला. त्यांनी शिवशक्ती आडगाव संघाचा (२७) ८ गुणांनी पराभव केला. पुरुष गटातून नाशिक ग्रामीण पोलिस संघाने ३२ गुण मिळवून एन.टी.पी.एस. संघावर अवघ्या ५ गुणांनी मात करत चषक पटकाविला.

पुरुष गटातील विजेत्या संघाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या हस्ते तर महिला गटातील विजेत्या संघाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख अजय बोरस्ते, दिप्ती वाजे, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे समन्वयक उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, नगरसेवक विजय जाधव, पंकज मोरे, वेणुबाई डावरे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत नाशिकच्या दुर्गम व आदिवासी तालुक्यांसह इतर तालुक्यातुन पुरूषांचे ४८ तर महिलांचे १८ कबड्डी संघातील ७९२ खेळाडू १२० प्रशिक्षक व व्यवस्थापक ५० पंच ५० पदाधिकारी सहभाग झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता

0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव/ म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्र सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा धोरण २०१५ अंतर्गत धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५०० मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या भूसंपादनातील अडचणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने सोडविण्यात आल्या.

या प्रकल्पास केंद्र सरकारची मंजुरी यापूर्वीच मिळाली असून, त्यातील भूसंपादनाच्या अडचणींबाबत गुरुवारी (दि. ३०) नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला राज्याचे ऊर्जा प्रधान सचिव अरविंद सिंग, केंद्राच्या नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्रनाथ स्वाधीन, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, संचालक विकास जयदेव, संचालक विनोद बोंदरे, मुख्य अभियंता प्रमोद नाफडे, सेकीचे महाव्यवस्थापक रमेश कुमार आदी उपस्थित होते.

महानिर्मितीकडून होणार भूसंपादन

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचामधील या ५०० मेगावॅटचा सौरऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पास ‘अल्ट्रा मेगा सोलर पॉवर प्रोजेक्ट’ म्हणून मान्यता मिळणार आहे. हा प्रकल्प महानिर्मिती पूर्ण करणार असून, पूर्ण प्रकल्पासाठी एकूण १०२४ हेक्टर जमीन लागणार आहे. यापैकी ८२५ हेक्टर जमीन महानिर्मितीने विकत घेतली आहे. महानिर्मितीला राज्यात २५०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प निर्मितीचे लक्ष्य देण्यात आले असून, त्यापैकी ५०० मेगावॅटच्या या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होत आहे. महानिर्मितीने ८२५ हेक्टर खासगी जागा विकत घेतली असून, मेथी आणि विकरण या दोन गावातील ही जमीन आहे. भूसंपादन कायदा-२०१३ नुसार या जमिनीचे अॅवॉर्ड २०१५-१६ मध्ये सरकारने घोषित केले आहे. भूसंपादनाचे १४.६३ कोटी महानिर्मितीने धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे जमाही केले आहेत.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची वैशिष्ट्ये...

n सौर ऊर्जेचा ५०० मेगावॅटचा प्रकल्प २ टप्प्यात पूर्ण होणार

n पहिला टप्पा २५० मेगावॅटचा मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल

n दुसरा २५० मेगावॅटचा टप्पा २०२१-२२ पर्यंत पूर्ण होईल

n या प्रकल्पाला १६० कोटी रुपये खर्च लागणार आहे

n या प्रकल्पासाठी वीजवाहिनी टाकण्याचे काम महापारेषण करणार

n या प्रकल्पातून निर्मित वीज बलसाने या २२०/३३ के. व्ही. उपकेंद्राद्वारे शेतकऱ्यांना देणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांसाठी पोलिस सरसावले!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ नागरिक समाजाचा आधारवड असून, त्यांच्यासोबत काम करणे ही सन्मानाची बाब आहे. पोलिस आणि ज्येष्ठ नागरिक खांद्याला खांदा लावून काम करतील तर समाजाचा चेहरा नक्कीच बदलू शकेल, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सेल सुरू करणे आणि ओळखपत्रांचे वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हा कार्यक्रम गुरुवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. कार्यक्रमासाठी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह शहरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. शहरात जवळपास तीन लाखांच्या आसपास ज्येष्ठ नागरिक असून, अनेक एकटेच जीवन व्यतीत करतात. निवृत्तीनंतरचे जीवन एका विशिष्ट हेतूने जगणे सर्वांनाच शक्य होत नाही. यातून अनेक समस्यादेखील उद्भवतात.

या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांशी संपर्क साधला. त्यातील काही संघटनांना हाताशी घेत पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक आदी माहिती संकलित केली. या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ओळखपत्रांचे गुरुवारी (दि. ३०) वितरण करण्यात आले. या वेळी बोलताना पोलिस आयुक्त सिंगल यांनी सांगितले की, पोलिस आणि ज्येष्ठ नागरिकांनी परस्परांना सहकार्य केल्यास समाजाचा चेहरा बदलू शकतो. पुण्यात अनेक ज्येष्ठ नागरिक ट्रॅफिक वॉर्डन म्हणून पोलिसांबरोबर काम करतात. नाशिकमध्येही ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतल्यास हे शक्य आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीएसटीने पालिकेला तारले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जकात, एलबीटीपाठोपाठ आलेल्या जीएसटीने महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडेल असे चित्र होते. परंतु, राज्य सरकारने महापालिकेला जीएसटीचे अनुदान वेळेत व नियम‌ितपणे दिल्याने गेल्या सहा मह‌िन्यांपासून पालिकेचा डोलारा जीएसटीमुळे तारला गेला आहे. राज्य सरकारने गेल्या सहा मह‌िन्यांत पालिकेच्या तिजोरीत ४४० कोटी ४० लाखांचे अनुदान जमा केले आहे. विशेष म्हणजे डिसेंबरचे ७३ कोटी ४० लाखांचे अनुदानही नोव्हेंबरमध्येच जमा झाले आहे. येत्या तीन महिन्यांत अजून २२० कोटींचे अनुदान पालिकेला मिळणार असल्याने पालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळला गेला आहे.

जकात रद्द झाल्यानंतर स्थानिक संस्था कर, अर्थात एलबीटी महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. त्यामुळे पालिकेला केवळ एलबीटी आणि शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावरच अवलंबून रहावे लागत होते. त्यातही एलबीटीची निम्मी वसुली पालिकेला, तर निम्मी वसुली शासन करत असल्याने गोंधळच वाढला होता. मात्र, १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी ही नवीकरप्रणाली लागू झाल्यानंतर एलबीटी रद्द करण्यात आला. यामुळे होणारे महापालिकांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी महापालिकांना एलबीटीतून मिळणाऱ्या उत्पन्नाइतके अनुदान देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला होता. जीएसटी अनुदानाची रक्कम दरमहा पाच तारखेच्या आत महापालिकांच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली होती.

सरकारकडून सुखद धक्का

परंतु, आजपर्यंत सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानांचा विचार करता जीएसटीमुळे पालिकेचा आर्थिक गाडा रुतेल अशी चर्चा होती. अनुदान वेळेत मिळाले नाही तर प्रशासकीय खर्च आणि वेतनाचाही प्रश्न निर्माण होणार होता. त्यासाठी पालिकेने एफडी मोडण्याचाही पर्याय ठेवला होता. परंतु, सरकारने जीएसटीचे अनुदान केवळ वेळेतच दिले नाही तर त्यात सातत्यही राखले. नोव्हेंबर महिना अद्याप संपला नसताना डिसेंबर महिन्यासाठी देय असलेले ७३.४० कोटींचे अनुदानदेखील शासनाने महापालिकेला वितरीत केले आहे.गेल्या सहा महीन्यात पालिकेला जीएसटी अनुदानापोटी ४४० कोटी ४० लाखांचे अनुदान मिळाले आहे. पुढील तीन महिन्यांयात २२० कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे मार्चपर्यंत तरी प्रशासकीय खर्चासह वेतनाचा प्रश्न मिटला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याअभावी वाट बिकट

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने शहरात हॉकर्स झोनची उभारणी केली असली, तरी आजही बहुतांश रस्त्यांवरची अतिक्रमणे जैसे थेच आहेत. सातपूर भागातही अशीच स्थिती असून, गावातील असंख्य रहिवाशांना घराकडे जाण्यासाठी रस्त्याच राहिला नसल्याने अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. आता आठ दिवसांत गावाच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढली नाहीत, तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराच या रहिवाशांनी दिला आहे.

सातपूर गावाचा श्वास मोकळा करा, अशी मागणी येथील रहिवाशांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त, सातपूर पोलिस स्टेशन व विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदन सादर करीत प्रसंगी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या सातपूर गावातील असंख्य रहिवाशांना आजही गैरसोय सहन करावी लागत आहे. स्वतःचे घर व शेताकडे जाण्यासाठी अनेकांना रस्ताच उपलब्ध राहत नसल्याने मोठी कसरत करून वाहने चालविण्याची वेळ येत आहे. माजी नगरसेवक सचिन भोर यांनी सातपूर गावातील मुख्य रस्त्यावर बसणारे भाजीविक्रेते व इतर व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. यात्नंतर तब्बल तीन महिने रस्ता मोकळा झाल्याने रहिवाशांनीही समाधान व्यक्त केले होते. परंतु, महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम थंडावल्यानंतर पुन्हा अतिक्रमण जैसे थेच झाल्याने अनेकांवर घरी जाण्यासाठीदेखील मोठी कसरत करण्याची वेळ येत आहे.

--

तात्काळ व्हावी कारवाई

महापालिकेने सातपूर गावाच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करीत व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन गावातील शिष्टमंडळाने नगरसेविका निगळ यांना सोबत घेत संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. नगरसेविका निगळ यांच्यासह रहिवाशांनी, गावाचा कोंडलेला श्वास मोकळा करा, अन्यथा पुढील आठ दिवसांत आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विभागीय अधिकारी गायकवाड यांना दिला. यावेळी विजय भंदुरे, गोकुळ निगळ, दिलीप भंदुरे, सोपान बंदावणे आदी स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

--

ना फेरीवाला क्षेत्रातही अतिक्रमण

महापालिकेने हॉकर्स झोनची उभारणी केल्यानंतर सातपूर भागात अनेक ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. परंतु, ना फेरीवाला क्षेत्र जाहीर केल्यानंतरही रस्त्यांवरच भाजीविक्रेत्यांसह इतर व्यावसायिक बसत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करत असल्याचा आरोप नगरसेविका सीमा निगळ यांनी केला होता. त्यातच त्र्यंबकेश्वररोडवर मशिदीच्या बाजूलाच ना फेरीवाला क्षेत्राच्या फलकाशेजारीच चक्क फेरीवाले कुणाच्या आशीर्वादाने व्यवसाय करीत आहेत, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

--

सातपूर गावात जाण्यासाठी गेल्या काही वर्षांत रस्ताच राहिला नसल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावरच मधोमध भाजीविक्रेते व इतर व्यावसायिक बसत असल्याने दुचाकी व चारचाकींसाठी रस्ताच नसतो. यामुळे गावाचा कोंडलेला श्वास महापालिकेने तात्काळ मोकळा करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

-सीमा निगळ, नगरसेविका, प्रभाग ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...ही तर विद्यार्थ्यांची फसवणूक

0
0

राउंड टेबल

--


...ही तर विद्यार्थ्यांची फसवणूक

कला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. शास्त्रीय संगीत, नृत्य, वादन, लोककला, चित्रकला या कलांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच ते पंचवीस अतिरिक्त गुण देण्याचा हा निर्णय होता. गेल्या वर्षी ८१ हजार ७३६ विद्यार्थ्यांना कलेतील प्रावीण्याद्वारे, तर विभागातल्या १५ हजार विद्यार्थ्यांना चित्रकलेद्वारे अतिरिक्त गुणांचा झालेला लाभ, चित्रकला परीक्षेत अचानक दुपटीने वाढलेली संख्या यामुळे या निर्णयावर टीका झाली होती. त्यामुळे या निर्णयात बदल करण्यात आला असून, आता किमान तीन व कमाल पंधरा गुण विद्यार्थ्यांना मिळू शकणार असल्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. वर्षभरातच झालेल्या निर्णयबदलाने विद्यार्थी, कलाशिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारी व्यवस्था सातत्याने निर्णयात बदल करून विद्यार्थ्यांची फसवणूक करीत असल्याची भूमिका मुख्याध्यापक, पालक, कलाशिक्षकांनी मांडली. एकदाच सर्व बाजूंनी विचार करून शिक्षण विभागाने निर्णय घेतल्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना दहावीच्या महत्त्वाच्या वर्षाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येऊ शकेल, असे मत मटा राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.

--

शब्दांकन ः अश्विनी कावळे

--


गुणांद्वारे होऊ नये कलेचे मोजमाप

शिक्षण विभागाकडून वर्षभरापासून कला क्षेत्राविषयी विविध निर्णय घेतले जात आहेत. त्यातील वादग्रस्त निर्णयांना होत असलेला विरोध पाहता त्यात बदलही घडवून आणले जात आहेत. या सर्वांमध्ये कलेचे पुरेसे शिक्षक शाळांमध्ये आहेत का, हे तपासण्याची गरज आहे. परंतु, त्याची दखल कोणाकडूनही घेतली जात नसल्याचे वास्तव आहे. आजच्या स्थितीत एकीकडे कला, क्रीडा विषयांना प्रोत्साहन देण्यासाठी वाढीव गुणांचा निर्णय सरकारकडून घेतला जातो, तर दुसरीकडे कलाशिक्षकांच्या तासिका कमी करण्याचा निर्णय होतो. हे कमी की काय म्हणून कला विषयासाठी विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या गुणांच्या निर्णयातही पुन्हा बदल केले जातात. अशा परिस्थितीत कलाशिक्षक, विद्यार्थी सर्वच भरडले जात आहेत. ज्या कलांबाबत हे निर्णय घेतले जात आहेत त्या कलांचे शिक्षकच मुळात शाळांमध्ये नाहीत. शिक्षकांची अपुरी संख्या असल्याने मुळात हे विषय विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिकविले जात आहेत की नाहीत, याची शहानिशा केली जाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून प्राथमिक, माध्यमिक स्तरावर कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. विशेषतः ग्रामीण भागात नृत्य, नाट्य, चित्रकला शिक्षक नाहीत. या विद्यार्थ्यांना या गुणपद्धतीचा लाभ कशा प्रकारे होईल, याचा विचार सुरुवातीच्या व आताच्या दोन्ही निर्णयांत दिसून येत नाही. या भागांमधील परिस्थिती बिकट आहे, त्याचा विचार का केला जात नाही, हा प्रश्न आहे. आधी या बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. कलेविषयी मानसिकता तयार करण्यासाठी शाळांमध्ये ओपन हाउसमध्ये विद्यार्थ्यांच्या इतर विषयांच्या पेपरबरोबरच चित्रकलेचे पेपरही दाखविणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांची जोपासना व्हावी हे जरी खरे असले, तरी त्यांचे मोजमाप गुणांमध्ये केले जाऊ नये.

-किशोर पालखेडकर, मुख्याध्यापक, नवरचना विद्यालय

--

निर्णयबदलाने विद्यार्थ्यांचा हिरमोड

आजपर्यंत आपल्याकडे केवळ अभ्यास एके अभ्यास अशी मानसिकता सर्वांचीच दिसून आली आहे. चांगला अभ्यास करून उच्च शिक्षण घेऊन पुढे नोकरी किंवा व्यवसाय करण्याचे मार्गदर्शनच अनेक पालकांकडून विद्यार्थ्यांना केले जाते. परंतु, कला क्षेत्रातूनही चांगले करिअर घडविले जाऊ शकते, याचा विचार आपल्याकडे अद्यापही केला जात नाही. ज्या विद्यार्थ्यांना खरेच याच क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांना शालेय जीवनातच त्याचे ज्ञान मिळाल्यास त्याचा निश्चितच लाभ होऊ शकतो. सध्याच्या निर्णयानुसार इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील ए ग्रेड राप्त विद्यार्थ्यांना ७ गुण, बी ग्रेडप्राप्त विद्यार्थ्यांना ५ गुण व सी ग्रेडप्राप्त विद्यार्थ्यांना ३ गुण देण्यात यावेत, असा निर्णय आहे. परंतु, ए ग्रेडप्राप्त विद्यार्थ्यांना २५, बी ग्रेडप्राप्त विद्यार्थ्यांना १० व सी ग्रेडप्राप्त विद्यार्थ्यांना ५ याप्रमाणे विद्यार्थ्यांना गुण दिले पाहिजेत. कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांना गुण देणे गरजेचे आहे. आम्हीदेखील पाल्यांकडून इतर विषयांप्रमाणेच कला विषयांची तयारी करवून घेत आहोत. परंतु, अशा निर्णयबदलामुळे विद्यार्थ्यांचाही हिरमोड होतो. क्रीडा विषयाला दिल्या जात असलेल्या गुणांनंतर कित्येक वर्षांनी असा निर्णय कलेबाबत झाला आहे, त्याला योग्य न्याय मिळावा.

-प्रीतम महाजन, पालक

- -

निर्णय घेतानाच राखावी अचूकता

कलेबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असा निर्णय अनेक वर्षांनंतर घेण्यात आला. कला विषयाच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी वाढीव गुण देण्याच्या निर्णयाचे कलाशिक्षकांनी समर्थन केले होते. अनेक विद्यार्थी शास्त्रीय संगीत, चित्रकला, लोककला, नृत्य, वादन याचे शिक्षण घेऊन पुढे त्यातच करिअर करण्यासाठी इच्छुक असतात. अशा विद्यार्थ्यांना हा निर्णय निश्चितच सुखावणारा होता. कारण, त्यांच्या आवडीला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात प्राधान्य दिले जात होते. परंतु, गुणांचा फुगवटा होत असल्याच्या कारणाने यात बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. जे विद्यार्थी खरोखरच प्रामाणिकपणे कला विषयांच्या परीक्षा देत आहेत त्यांना त्याचा लाभ होणे महत्त्वाचे आहे. जर गुणांचा फुगवटा होत आहे असे वाटत असेल, तर गुणदान पद्धती, परीक्षा पद्धती बदलणे आवश्यक आहे. सरकारी व्यवस्थेने कोणताही निर्णय जबाबदारपणे घेणे अपेक्षित असताना त्यांच्याकडूनच अशाप्रकारे निर्णय घेतले जात असतील, तर शिक्षक, विद्यार्थ्यांनी हे निर्णय कुठपर्यंत गांभीर्याने घ्यावेत, असा प्रश्न आमच्या सर्वांपुढेच उपस्थित होत आहे. यावर्षी केवळ शिक्षणाचे साडेपाचशेहून अधिक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातील काही निर्णय शिक्षणवर्तुळातून उमटलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे रद्द करण्यात आले आहेत. कलाशिक्षकांच्या तासिकांबाबतही हेच दिसून आले. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षांबाबत देण्यात येणाऱ्या कलागुणांबाबत गेल्या काही महिन्यांत तब्बल चौथ्यांदा निर्णय देण्यात आला आहे. यापूर्वीचे निर्णय रद्द करून आता गुणांमध्ये कपात केल्याचा सध्याचा निर्णय आहे. या निर्णयांमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांचीच मानसिकता बिघडत आहे. विद्यार्थी इतर विषयांबरोबरच कला विषयाच्या अभ्यासाला प्राधान्य देत होते, आता मात्र पुन्हा त्यातील गुण कमी झाल्याने काही विद्यार्थी हिरमुसले आहेत. सातत्याने बदल होणाऱ्या अशा निर्णयांचा थेट विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याने त्यासंबंधित कोणतेही निर्णय अचूकच घेतले गेले पाहिजेत.

-संदीप पांडे, कलाशिक्षक

---

कलेचे प्रमाणपत्र करिअरसाठी पूरक

कला विषयांतर्गत इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत श्रेणीनिहाय वाढीव गुणांमुळे कला क्षेत्रात आनंदाचे वातावरण होते. कला विषयाला चांगले दिवस येत असल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली. परंतु, काही महिन्यांतच हा निर्णय मागे घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी दहावीच्या अभ्यासाचा वेळ कलेच्या तयारीसाठीही दिला होता. परंतु, ऐन परीक्षेदरम्यान निर्णयात बदल केल्याने विद्यार्थी व पालकांचीही सरकारने फसवणूक केली आहे. एलिमेंटरी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच इंटरमिजिएटच्या वाढीव गुणांचा लाभ घेता येईल, हा निर्णयही विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरत आहे. मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही या निर्णयामुळे भीती निर्माण झाली होती. कारण, कलेत प्रावीण्य मिळविणारे विद्यार्थी वाढीव गुणांमुळे त्यांच्या पुढे जाण्याची चिंता त्यांना सतावत होती. परंतु, हा विचार निर्णय घेण्याअगोदर केला जाणे आवश्यक होते, असे वाटते. लोकांकडून एक मत मांडले जाते, की अशाप्रकारे गुणांचा फुगवटा करून विद्यार्थ्यांमध्ये नसता आत्मविश्वास जागवला जातो व पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना अपयश, निराशेला सामोरे जावे लागते. परंतु, दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कलेविषयक मिळणारे प्रमाणपत्र आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनीअरिंगसारख्या अभ्यासक्रमांमध्ये उपयुक्त ठरते. याचा विचार करणेही आवश्यक आहे.

-दत्तात्रय सांगळे, जिल्हाध्यक्ष, व्हीजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात शनिवारी ईद-ए-मिलाद

0
0

शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. नाशिक शहरात शनिवारी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

मुहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादी नावानेही संबोधित केले जाते. ईद दिनदर्शिकेमध्ये आज (दि. १) दाखविण्यात आली आहे. परंतु, चंद्रदर्शन शनिवारी (दि. २) होणार असल्याने तसेच इस्लामी कालगणनेचा उर्दू महिना रवी उल अव्वल या नुसार चंद्रदर्शन एक दिवस उशीरा घडल्याने पैगंबर जयंती अर्थात ईद ए मिलाद शनिवारी (दि. २) साजरी होणार आहे.

यादिवशी मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी होणार असल्याची माहिती नूर अॅकेडमीचे अध्यक्ष हाजी वसीम पिरजादे यांनी दिली. मुहम्मद पैगंबर यांचा जन्म ५ वाजून २८ मिनीटांनी झाला, त्यामुळे ५ वाजून ३० मिनीटांनी सलाम पठण होणार आहे. तसेच घरोघरी खीर व पुरीचे वाटप केले जाणार आहे. दुपारी २.३० वाजता चौक मंडई येथून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात जुलूस काढण्यात येणार असून, यामध्ये नाशिकमधील मुस्लिमबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. या मिरवणुकीत डी. जे. वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. जो कुणी डी. जे. वाजवेल अशांवर कारवाई करावी, अशी मागणी नूर अॅकेडमीच्यावतीने पोलिसांकडे करण्यात आली आहे. ही मिरवणूक बडी दर्गा येथे पोहचल्यानंतर दर्शन केले जाणार आहे. यानिमित्ताने दिवसभर अन्नदान केले जाणार आहे, अशी माहितीही देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलमाफी द्या..नाहीतर टोल हटवा

0
0

शिंदे गावातील नवीन नाक्याविरुद्ध टोल विरोधी कृती समितीची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर रस्त्यावरील शिंदे गावातील नवीन टोलनाक्याविरुद्ध टोल विरोधी कृती समितीने गुरुवारी (दि. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून विरोध नोंदवला. या वेळी टोल माफी द्या...नाहीतर टोल हटवा, असा घोषणा देण्यात आल्या. या वेळी शिंदे येथील गावकऱ्यांबरोबरच चिंचोली, मोहू, पळसे, जाखोरी, चांदगिरी, मोहगाव, बाभळेश्वर, ब्राम्हणवाडे, वडगाव, मोहदरी या गावांतील नागरिक उपस्थित होते.

या आंदोलनात टोल नाक्याच्या १० किलोमीटर परिसरातील सरसकट वाहनांना बिनशर्त टोल माफी द्यावी, टोल नाक्याबाहेर डिजिटल प्रकल्प खर्चाचा दैनंदिन बोर्ड त्वरित बसवावा, रस्त्याच्या सुरक्षेचा विचार करून सर्व ठिकाणी अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करावी, रुग्णवाहिका अद्ययावत असावी, नागरी वस्तीत टोल असूच नये, या मागण्या आंदालनकर्त्यांकडून करण्यात आल्या.

...तर तीव्र आंदोलन

गुरुवारी (दि. ३०) शिंदे गावातील नवीन टोलनाक्याविरुद्ध टोल विरोधी कृती समितीने हे आंदोलन केल्यानंतर त्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या आंदोलनात शिंदे परिसरातील गावे एकमेकांना कामानिमित्त जोडली आहेत. त्यातील बहुतांश गावातील लोक ही शिंदे येथे पेट्रोल पंप, गॅरेज, शाळा, दवाखाना ,खते-बी बियाणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामासाठी येत असतात. त्यासाठी त्यांना आपली व्यावसायिक वाहने आणावी लागतात. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा पुन्हा या टोलवरून वाहतूक करणे भाग पडते. तसेच त्यांची या रस्त्यावरून गावातील नागरिकांची ये-जा होत असल्याने त्यांनी प्रत्येक वेळा टोल द्यायचा का, असा प्रश्नही या आंदोलनकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला. शिंदे टोल नाक्याचा हा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात यावी. तसेच येत्या पंधरा दिवसांत हा टोलनाक्याचा प्रश्न सुटला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही टोल विरोधी कृती समितीकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजाराचं घेऊन ओझं, जगणं शोधतो आहे...

0
0

नाशिक ः एचआयव्हीबाधित मायबापांच्या पोटी जन्म घेतला इतकाच त्यांचा गुन्हा... अवघ्या दोन ते अडीच दशकांचं आयुष्य हाताशी आलेलं असताना खेळण्याबागडण्याच्या वयातच कोणाचे डोळे निकामी झालेत, तर कोणाला रक्त बदलण्यासाठी खेट्या घालाव्या लागताहेत. भरीस भर म्हणून आई-वडिलांच्या माघारी रक्ताची नातीही या निष्पाप लेकरांशी नाबोलती झाली आहेत. ही करूण कहाणी आहे एचआयव्हीबाध‌ित अनाथ मुलांची...!

बंटी, मोनिका आणि महेश (नावे बदलली आहेत) ही यातलीच काही दुर्दैवी मुले. सध्या ही मुले महिंद्रा अँड महिंद्रा आणि यश फाऊंडेशन यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन केंद्राच्या आधारे उरलेले आयुष्य जगण्याची केव‌िलवाणी धडपड करीत आहेत.

मोनिका ही पंधरा वर्षांची मुलगी जन्मत:च एचआयव्ही बाधित ही अवघी १५ वर्षांची मुलगी. एचआयव्हीबाधित बनून आई-वडिलांचं छत्र एकापाठोपाठ तिच्या लहानपणीच हरपले. त्यावेळी वडिलांच्या नातेवाईकांपैकी कोणीही मोनिकाचा सांभाळ करण्याचं औदार्य दाखविलं नाही. आजी आणि एमआयडीसीमध्ये कष्टकरी वर्गात कार्यरत असणाऱ्या मामा-मामीने मात्र मोनिकाची जबाबदारी खांद्यावर घेत तिला स्वत:च्या मुलांच्या बरोबरीने सांभाळण्यास सुरुवात केली. जेमतेम घर चालेल अशा परिस्थितीत मोनिकाचा सांभाळ होत असतानाच बालवयातच नवी सृष्‍टी बघण्याअगोदर तिची दृष्टी हरपली. नियतीचे चटके इतक्यावरही थांबायला तयार नाहीत. आता मोनिकाला फिट्सचाही त्रास सुरू झाला आहे. दिवसातून कुठल्याही क्षणाला फिट्स येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कुटूंबातील व्यक्ती तिची चोवीस तास सावलीसारखी पाठराखण करतात.

बंटीचीही कहाणी मोनिकासारखीच आहे. बंटीही जन्मत:च एचआयव्हीबाधित आणि बालवयातच दृष्टी गमावलेला. बंटी हा एका नामांकित महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचेही आई-वडिल एचआयव्हीची लागण होऊन दिवंगत झाले. इतर नातेवाईकांनी संबंध तोडले, तर त्याची सख्खी बहीणही अनोळखी बनली. त्यामुळे पूर्णत: एकट्या पडलेल्या या लेकराला आधार दिला त्याच्या रिक्षा चालविणाऱ्या काकांनी. घरामध्ये काका, आजी, चुलत बहीण आणि बंटी अशी चार माणसं राहतात. पण आजीचंही वय भरपूर झालं आहे. बहिणीसाठी लग्नाची स्थळं येतात. त्यामुळे तीदेखील परक्याचं धन आहे. अशा स्थितीत पोट भरण्यासाठी काका भटकंतीला गेल्यानंतर बंटीचं पालकत्व कोण निभावणार, असा सवाल आहे.

असे अनेक अनुत्तरीत प्रश्न घेऊन ही मुलं जगत आहेत. या मुलांसाठी महिंद्रा अँड महिंद्राच्या मदतीने यश फाऊंडेशन ही संस्था शक्य तितकी मदत करते आहे. जिल्ह्यात एकूण १४ हजारांवर एचआयव्ही बाधित मुले आहेत. पैकी सुमारे ३५० एचआयव्हीबाधित मुलांची जबाबदारी या संस्थेने घेतली आहे. त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीपासून तर त्यांच्या इतर सर्व गरजांची पूर्तता किंवा समन्वयासाठी यश फाऊंडेशनचे कार्यकर्ते तळमळीने कार्यरत आहेत. पण एकूण बाधित मुलांच्या तुलनेत प्रत्यक्षात त्यांच्यासाठी धडपडणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांची संख्या अतिशय तोकडी आहे.


एचआयव्ही बाधितांच्या या मुलांच्या व्यथा ऐकूण केवळ हळवे सांत्वन करणारे शब्द खूप कानावर येतात. खरी गरज आहे ती या मुलांचे पालकत्व घेणाऱ्या सामाजिक घटकांची. अल्प आयुष्य घेऊन येणाऱ्या या बालजीवांसाठी उत्पन्नाचा थोडासा हिस्सा सामाजिक दायित्व म्हणून समाजघटकांनी त्यांच्यासाठी अर्पण करायला हवा.

- रवी पाटील, अध्यक्ष, यश फाऊंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अवघे साडेचार हजार भाडेकरू?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात केवळ चार हजार ६४३ भाडेकरू असल्याची माहिती महापालिकेने एटीएसकडे सुपूर्द केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एटीएसच्या सूचनेनुसार महापालिकेने सहा विभागांकडून मागवलेल्या माहितीत पालिकेच्या दप्तरी केवळ साडेचार हजार भाडेकरूंची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांपाठोपाठ पालिकेकडे भाडेकरूंची नोंदणी करण्यात नागरिक तत्पर नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या दप्तरी घरात भाडेकरूची नोंद झाल्यास, घरपट्टीचे दर वाढतात. त्यामुळे नागरिक घरात भाडेकरू असल्याची नोंद करत नसल्याचे चित्र आहे.

शहरात रोजगारासह व्यवसायासाठी दररोज बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठी असून, निवासासाठी ते भाड्याच्या घराचा आश्रय घेतात. परंतु, अनेक घरमालकांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली असली तरी संबंधित भाडेकरूंची माहिती घेण्याची तसदी अनेक घरमालक दाखवत नाहीत. तसेच त्यांची नोंद पोलिस स्टेशन आणि महापालिकेकडे करत नाहीत. दिवाळीच्या काळात पाथर्डी फाटा येथे एका घरातून पोलिसांनी गुन्हे करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले होते. संबंधित गुन्हेगारांनी हे घर भाड्याने घेतले होते. त्या संदर्भातील कोणतीही माहिती पोलिस अथवा महापालिकेकडे नव्हती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील भाडेकरूंच्या माहितीची जमवाजमव पोलिसांपाठोपाठ दहशतवाद विरोधी पथकानेही सुरू केली होती. त्यासंदर्भात महापालिकेकडे विचारणा केली होती.

एटीएसने महापालिकेला पत्र पाठवून शहरातील भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महापालिकेने सहा विभागाकडून भाडेकरूंच्या नोंदीची माहिती मागवली होती. ही माहिती सहा विभागांकडून मुख्यालयाला प्राप्त झाली असून, पालिकेच्या दप्तरी केवळ ४ हजार ६४३ भाडेकरूंची नोंद आढळून आली आहे. त्यासंदर्भातील माहिती पालिकेडून एटीएसला देण्यात आली आहे. महापालिकेकडून घरात भाडेकरू राहत असल्यास अतिरिक्त कराची आकारणी केली जाते. त्यामुळे घरमालकाने भाडेकरू राहात असल्याची नोंद केल्यास त्याच्या घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ केली जाते. वाढत्या घरपट्टी व पाणीपट्टीमुळे शहरातील बहुतांश घरमालक महापालिकेकडे नोंदणीच करीत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेकडेही मोठ्या प्रमाणावर भाडेकरूंची नोंदणी होत नसल्याचे वास्तव आहे.

भाडेकरूची माहिती

विभाग- संख्या

सातपूर ३६६

पंचवटी ५३६

नवीन नाशिक ७३५

नाशिकरोड ८४३

नाशिक पश्चिम ११८०

नाशिक पूर्व ९८३


फेरतपासणी करणार

घरमालकाने घरात भाडेकरू ठेवला असेल तर त्या मालमत्तेवर दुपटीने घरपट्टी आकारली जाते. त्यामुळे मालमत्ताधारक भाडेकरूची नोंद घरपट्टी सदरी करीत नाहीत. मिळकत सर्वेक्षणांतर्गत भाडेकरूंची फेरतपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याअंतर्गत सर्वेक्षणादरम्यान मालमत्ताधारक राहत असलेल्यांचे ओळखपत्र तपासण्यात येत आहे. ओळखपत्रात असलेल्या व्यक्तीची मिळकतसदरी नोंद असली तरच ती घरमालक समजण्यात येईल. अन्यथा भाडेकरू म्हणून नोंद केली जाणार आहे. याद्वारे भाडेकरूंची वास्तव संख्या समोर येईल, असा विश्वास उपायुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी

0
0

राष्ट्रवादी काँग्रेसकडून हल्लाबोल मोर्चा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या तीन वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देऊन त्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी, कामगार, व्यावसायिक, शिक्षक, डॉक्टर अशा सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सरकारविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, असा आरोप गुरुवारी (दि. ३०) धुळे शहरात काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चाद्वारे करण्यात आला. केंद्रातील सरकारच्या नोटबंदी, जीएसटीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यामुळे यासर्व बाबींचा विचार करीत धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

मालेगाव रोडलगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जुना आग्रा रोडमार्गे गुरुवारी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्याठिकाणी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष मनोज मोरे, ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, माजी महापौर मोहन नवले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, जावेद बिल्डर, आसिफ शहा, महेंद्र शिरसाठ, रजनीश निंबाळकर, जगदीश गायकवाड आदी उपस्थित होते.

या वेळी मोर्चेकरांनी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना मागण्याचे निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नेमण्यात आलेले खासगी क्षेत्रातील विशेष कार्याधिकाऱ्यांनी राज्याचे प्रशासन ताब्यात घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या गरजेनुसार आवश्यक असलेले विषय प्राधान्यक्रमानुसार न घेता बुलेट ट्रेन व समृद्धी महामार्गसारख्या अवाढव्य योजनांसाठी राज्याचा महसूल वळविला जात आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आत्महत्या हा विषय शेतकरी आणि शेतमजूर यांच्यापुरता सीमित न राहता इतर अनेक क्षेत्रातही कोंडीत सापडलेले सामान्य नागरिक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतील, अशी गंभीर परिस्थिती या सरकारने निर्माण केली आहे. तसेच जनता आता हवालदिल झाली आहे. त्यामुळेच शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या समाज घटकांतील विविध मागण्या सरकारने मान्य कराव्या, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचोलीतील जवानाची पत्नीसह हत्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ)च्या जवानाने आपल्या पत्नीसह सहकारी जवान आणि त्याची पत्नी अशा तिघांची १६ गोळ्या झाडून हत्या केली. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे ही तिहेरी हत्याकांडाची घटना घडली. मृत झालेला जवान आणि त्याची पत्नी सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी आहेत. हा सर्व प्रकार अनैतिक संबंधामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

चिंचोली येथील जवान राजेश किरण केकाणे आणि त्याची पत्नी शोभा किश्तवाडमध्ये राहत होते. धुलस्ती येथील राष्ट्रीय जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी राजेश तैनात होता. तेलंगणा येथील रहिवासी इंगलप्पा सुरिंदर हा जवान राजेशचा मित्र होता. सीआयएसएफच्या शालिमार चौकातील कॉलनीमध्ये राहत असलेल्या सुरिंदरने गुरुवारी दुपारी अचानकपणे त्याची पत्नी लावण्य हिच्यावर आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो राजेश यांच्या घरी आला आणि त्याने राजेशसह त्याची पत्नी शोभा यांच्यावरही गोळ्या झाडल्या. यामध्ये राजेश, शोभा आणि सुरिंदरची पत्नी या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत स्थानिक पोलिसांनी सुरिंदरला अटक केली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोन्ही कुटुंबीयांच्या चारही मुलांची जबाबदारी सीआयएसएफने घेतली असून, सुरिंदरला तत्काळ निलंबित करण्यात आल्याचे सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले. सुरिंदर हा २०१४ मध्ये सीआयएसएफमध्ये रुजू झाला आहे.

राजेश आणि शोभा यांच्या पार्थिवावर चिंचोलीच्या व्ही. एन. नाईक हायस्कूलच्या पटांगणावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते. राजेश २००९ मध्ये सीआयएसएफमध्ये दाखल झाले होते. राजेश आणि शोभा यांच्या मागे दीड वर्षाची मुलगी आणि आर्यन हा साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. चिंचोलीत राहणारे राजेश यांच्या आई-वडिलांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजेश यांचे बंधू गणेश पठाणकोट येथे भारतीय सैन्यदलात नोकरीला आहेत. सीआयएसएफद्वारे फोनवर माहिती देण्यात आल्यानंतर गणेश किश्तवाड येथे रवाना झाले. केकाणे कुटुंब मूळचे टेंभूरवाडी येथील आहेत. गेल्या १५ वर्षांपासून ते चिंचोली येथे वास्तव्यास आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमभावनामय तरल अन् सजग ‘सावित्री’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आईविना वाढलेल्या बुद्धिमान तरुणीच्या भावविश्वाचा ठाव घेणारी कलाकृती म्हणजे सावित्री हा एकपात्री नाट्यप्रयोग. आनंदी, खेळकर, स्वतंत्र विचारांची, अत्यंत संवेदनशील, कलासक्त प्रेम या संकल्पनेला व्यापक स्वरुपात पाहणाऱ्या साऊचा एका प्रवासात भेटलेल्या तरुण बुद्धिमान सुहृदाशी स्वत:हून संवाद सुरू होतो. हा संवाद पत्ररुपी असतो. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात हे नाटक सादर झाले.

सावित्री ही पु. शि. रेगे यांची पत्ररूप कादंबरी. या कादंबरीचा नाट्यमय आविष्कार म्हणजे सावित्री हा नाट्यप्रयोग. ही केवळ प्रेमकथा नव्हती. साऊ कुठल्याही चौकटीत बसणारी नाही. बुद्धिमान, स्वतंत्र विचारांच्या, आपल्या स्वातंत्र्याचे मोल जाणणाऱ्या, पण त्यातून येऊ शकणारा बंडखोरपणा, बेबंदपणाचा लवलेशही नसणाऱ्या, अत्यंत संवेदनशील, कलासक्त, काळाच्या कितीतरी पुढे असलेल्या, वसुधैव कुटुम्बकम् वृत्तीच्या आणि प्रेम या संकल्पनेला कितीतरी व्यापक रूपात पाहणाऱ्या अशा मुलीच्या जगण्याचा विलक्षण पटच सावित्रीतून मांडण्यात आला. तिच्याच वडिलांच्या शब्दात सांगायचे तर ती आनंदभाविनी आहे. आपल्याला मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचे, आपल्याला जे-जे हवे ते आपणच व्हायचे ही तादात्म्यता तिच्यात आहे, पण असे एकरूप होताना आपले मीपण हरवू न देण्याचे भानही तिच्याकडे आहे. आनंदी, खेळकर, विचारी, तीक्ष्ण विनोदबुद्धी असलेली, विलक्षण, धीट, उत्कट अशी ही तरुण मुलगी एका प्रवासात भेटलेल्या तरुण, बुद्धिमान सुहृदाशी तिचा स्वत:हून संवाद सुरू होतो.
या दोघांचा पत्ररुपी संवाद घडतो साठ-पासष्ठ वर्षांपूर्वी. पत्र हे दूरस्थ संवादाचं प्रमुख माध्यम असतानाच्या काळात हे सर्व घडते. आजच्या क्षणाक्षणाला अवघ्या जगाशी जोडले जाऊ शकणाऱ्या काळातल्यांना संवादाच्या त्या तीव्रतेचा अंदाजही येणार नाही कदाचित; पण मनातले कागदावर उतरवून त्रयस्थामार्फत पलीकडच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे आणि त्याच्याकडून पुन्हा उत्तर येणे ही जितकी वेळ घेणारी प्रक्रिया, तितकीच गुंतवून ठेवणारीही. सावित्री तर प्रत्येक अक्षर न अक्षराला शास्त्र-काट्याची कसोटी लावते. आपले मन उघडे करायला उत्सुक असलेली; पण तरीही त्याला जोखू पाहणारी, त्याच्या सहवासासाठी आतुरलेली पण आपली पायरी जराही न उतरणारी, तरल आणि तितकीच सजग अशी ही सावित्री. तिच्या प्रेमाच्या कल्पनेत तो एकटा नाहीये तर तिच्या सगळ्या अवकाशासह तिला त्याला आपलेसे करून घ्यायचे आणि हा प्रवास फक्त प्रेमातल्या समर्पणाचा नाही तर आत्मशोधाचाही आहे.

रसिकांसाठी अनोखा अनुभव
सुरुवातीला मुग्ध व नंतर परिपक्व होत जाणारा सावित्रीच्या प्रेमाचा प्रवास सांगणारा हा नाट्याविष्कार रसिकांना साहित्याचा अनोखा अनुभव देणारा ठरला. सावित्री ही पु. शि. रेगे यांची १९६२ मध्ये लिहिलेली काव्यमय पत्रात्मक कादंबरी, या कादंबरीची रंगावृत्ती, नेपथ्य आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवींद्र लाखे यांनी केले होते तर सावित्रीची भूमिका प्रिया जामकर यांनी साकारली. नव्वद मिनिटांच्या या नाट्याविष्काराची निर्मिती मिती-चार कल्याण व प्रस्तुती अस्तित्व मुंबई यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्युनिक्युलर ट्रॉलीचा घोळ सुरूच

0
0

दीपक महाजन, कळवण

सप्तशृंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प कधी पूर्ण होणार व त्याचे कधी लोकार्पण होणार, या प्रश्नांचे उत्तर प्रशासनाकडूनच दोन वेगवेगळ्या प्रकारे मिळू लागले आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या लोकार्पणाबाबतची संभ्रमावस्था वाढली आहे. किमान नवीन वर्षात तरी हा प्रकल्प सुरू व्हावा, अशी अपेक्षा भक्तांसह, पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

प्रकल्पाचे लोकार्पण होईल या धर्तीवर प्रशासन व प्रकल्प संचालक यांच्यामार्फत २०१७ मध्ये देण्यात आलेले गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, १५ ऑगस्ट हे तीनही मुहूर्त टळले आहेत.

सप्तशृंग गडावर दिवसेंदिवस भाविक व पर्यटकांची संख्या वाढत आहे. वर्षातून होणारे दोन यात्रोत्सव, नवसपूर्ती निमित्ताने लाखो भाविक गडावर हजेरी लावतात. अबालवृद्ध, अपंग, गरोदर महिलांना गडाच्या दर्शनासाठी ५०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यामुळे भाविकांना माफक दरात सुलभ दर्शन व्हावे, या हेतून ट्रॉली प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

प्रकल्पाची कामे अपूर्ण

सप्तशृंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. सुचविलेली सर्व कामे पूर्ण झाल्यामुळे संबंधित टीमने प्रकल्प सुरू करावा, असा अहवाल शासनाला दिला असल्याचे, प्रकल्प व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तर या प्रकल्पात लिफ्ट, इलेक्ट्रिशियनचे काम अपूर्ण आहे. टॉयलेटची व हॉल सिलिंग तसेच कलरिंगचे काम अपूर्ण आहे. या ट्रॉलीचा वापर करत असतांनाच लहान मुलांची काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रोलिंगचे कामे होणे गरजेचे आहे. याबाबतच्या सूचना व्यवस्थापनाला दिल्या असून डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत ही सर्व कामे होणे अपेक्षित आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

प्रकल्पाबाबत दावे-प्रतिदावे

या प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा ठेकेदार असलेल्या नागपूर येथील सुयोग गुरुबक्षाणीच्या व्यवस्थापनाने केला आहे. तसा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्याचेही ते सांगतात. तर याउलट सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकल्पाची महत्त्वाची मेंटेनन्सची कामे बाकी असल्याचे सांगत आहेत. एकाच प्रकल्पाबाबत दोन विभागाकडून वेगवेगळी कारणे पुढे आल्यामुळे लोकार्पण सोहळा होणार तरी कधी, मुहूर्त सापडणार तरी कधी ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुरक्षा रामभरोसे

या प्रकल्पाच्या सर्व पूर्तता झाल्याशिवाय तसेच खऱ्या अर्थाने लोकार्पण झाल्याशिवाय कुणालाही या ट्रॉली मधून ने-आण करू नये, हा नियम आहे. तरी चाचण्यांचे निमित्त पुढे करत स्थानिक पुढाऱ्यांच्या हट्टापायी आमदार, खासदार, मंत्र्यांना ट्रॉलीची सेवा मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत कुठलीही लेखी परवानगी व सूचना केली जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा सेवानिवृत्तांबाबत पदाधिकाऱ्यांची अनास्था

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत अनेक वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी या सेवेचा मोबदला म्हणून महापौर, आयुक्त किंवा पदाधिकाऱ्यांकडून सत्कार व्हावा अशी सर्वच कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते. परंतु, नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला सत्काराचे असे भाग्य आले नाही. कारणही महापौरांसह, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती तसेच विविध समित्यांचे सभापती गुरूवारी गायब होते. प्रशासनाने शोधाशोध करूनही पदाधिकारी सापडले नाही. अखेर नगरसेवकांच्या हातून या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याची वेळ आली.

महापालिकेच्या सेवेतून क्रीडा तथा जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले, कनिष्ठ लिपिक नीलिमा जोशी, रोड मुकादम विष्णू गांगुर्डे, पंप ऑपरेटर अशोक थेटे, व्हॉलमन भानुदास सुक्ते, स्टाफ नर्स सरला रुपवते, बिगारी अनाजी रोकडे, सफाई कर्मचारी शकुंतला निरभवणे, छगन पाथरे, लक्ष्मीबाई वाघमारे, निळू जगताप हे नोव्हेंबर महिन्यात निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सत्कार स्थायी समितीत प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात आला. महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा, सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या उपस्थितीत या सर्वांचा सत्कार केला जातो. परंतु, शुक्रवारी महापौरांसह महापालिकेतच दिवसभर ठिय्या मांडून असलेले सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, विविध समित्यांचे सभापती या सत्कार कार्यक्रमांकडे फिरकलेच नाही. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी महापौरांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. मात्र, तेथे कोणीही आढळले नाही. अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते सत्कार ठेवण्यात आला. मात्र, ऐनवेळी आलेल्या राजेंद्र महाले, राहुल दिवे, नगरसेविका प्रियंका घाटे यांना सत्कारासाठी उभे करण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबाबत सत्ताधाऱ्यांनी दाखवलेली अनास्था ही गंभीर असून निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांची हेडसांड केली जात असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images