Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकरोड रोशन!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोडमध्ये ईद-ए-मिलाद सण मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात, ईद-ए-मिलादनिमित्त शहरातून शनिवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात शहरातील ३५ मोठ्या चित्ररथांसह मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहरातील चित्ररथ मिरवणुकीत जेलरोड, विहितगाव, चेहेडी, सिन्नर फाटा, सुभाषरोड, देवळालीगाव आदी ठिकाणच्या सार्वजनिक मंडळांचे चित्ररथ सहभागी झाले होते. त्यात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांचे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मुख्य चौकांत मिठाई, गुलाबपुष्प देऊन स्वागत करूत बंधुभावाची शिकवण दिली.

गोसावीवाडी येथून शनिवारी सकाळी मौलानांच्या हस्ते मिरवणूक सुरू झाली. डॉ. आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको चौक, सत्कार पॉइंट, अनुराधा चौक, विहितगाव व देवळालीगाव अशा मार्गाने आलेल्या मिरवणुकीची सांगता गाडेकर मळ्यातील महापालिकेच्या मैदानावर मौलाना अकबर कादरी व इतर धर्मगुरूंच्या प्रवचनाने झाली. या कार्यक्रमास मौलाना मुफ्ती रहेमान रजा मिसवाही, मौलाना हाफिज मुस्ताक, मौलाना जफर खान, मौलाना अब्दुल अजीज, मौलाना हारुन रशीद आदी उपस्थित होते.

--

सामाजिक मंडळांचा सहभाग

मिरवणुकीदरम्यान अनेक ठिकाणी सामाजिक मंडळांतर्फे चित्ररथांचे स्वागत व अन्नदान करण्यात आले. टिपू सुलतान फ्रेंड सर्कल, हिंद सोशल वेल्फेअर, अजमेरी ग्रुप, सरकार फाऊंडेशन, हजरत सादिका शाह हुसैन ग्रुप, अलहुसेनी वेल्फेअर ट्रस्ट, हनफिया नौजवान कमिटी, आझाद हिंद सेना आदी मंडळांचा मिरवणुकीत समावेश होता.

--

ठिकठिकाणी स्वागत

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर मिरवणुकीत सहभागी चित्ररथांचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. शिवसेनेच्या वतीने नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी अनुराधा चौकात चित्ररथांचे स्वागत केले. माजी नगरसेवक अस्लम मणियार यांच्यासह निजाम मास्टर, वसीम शेख, इम्तियाज सय्यद, जेलरोडच्या अंजुमन फैजाने हनफिया नुरीयाचे अध्यक्ष हाजी अब्दुल गनी, हाजी गनी चाँद, हाजी उमर पटेल आदींसह शेकडो मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

--

भाजपतर्फे मिठाईवाटप

नाशिकरोड ः येथील मिरवणुकीत सहभागी झालेला चित्ररथांचे भारतीय जनता पक्ष आणि मित्रमेळा परिवारातर्फे स्वागत करण्यात आले. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन मिठाईवाटप करण्यात आले. आमदार बाळासाहेब सानप, प्रभाग समितीच्या सभापती सुमन सातभाई, मित्रमेळा परिवाराचे राजेंद्र ताजणे, नगरसेवक बाजीराव भागवत, युवा मोर्चाचे नाशिकरोड मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थायी समिती सदस्या सीमा ताजणे, नगरसेविका संगीता गायकवाड, मीरा हांडगे, सुनंदा मोरे, नगरसेवक पंडित आवारे, अंबादास पगारे, सुभाष घिया, नय्युम खान, मंदा फड, रोहिणी नायडू आदी उपस्थित होते.

--

पोलिसांचे चोख नियोजन

या मिरवणुकीदरम्यान पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे बाजीराव महाजन, सहाय्यक निरीक्षक (गुन्हे) सुरज बिजली आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाची तुकडीही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती.

-----------


देवळाली कॅम्पमध्ये मिरवणूक

--

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणजेच ईद-ए-मिलादचा सण देवळाली कॅम्पसह भगूर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात विविध चौकांमध्ये जगभरातील प्रसिद्ध मशिदींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. शहरातून काढण्यात आलेल्या जुलूस-ए-मोहम्मदी मिरवणुकीत मिलाद पार्टीच्या गाण्यांनी रंगत भरली.

देवळाली कॅम्प शहरात जुन्या बसस्थानक परिसरात सुन्नी इस्लामिक फाउंडेशनतर्फे साकारण्यात आलेल्या मुख्य सजावटीत व शहेनशहा-ए-सरकार ग्रुपतर्फे मक्का मदिना, अजमेर शरीफ व बगदाद शरीफ, चिश्तिया फ्रेंड सर्कलतर्फे अबुधाबी येथील जामा मशीद, अर्क वेल्फेअर अॅण्ड एज्युकेशन ट्रस्टतर्फे मस्जिद-ए-नबी, लब्बीक फ्रेंड सर्कल व सुल्ताने हिंद ग्रुपतर्फे मस्जिद-ए-अबुधाबी, फत्ते स्टार ग्रुपतर्फे मलेशियातील मशीद, केजीएन ग्रुपतर्फे मक्का-मदिना, बज्मे गरीब नवाज बेडर जमततर्फे अबुधाबी येथील मशीद, शेख फ्रेंड सर्कलतर्फे फत्तेपूर लखनऊ येथील ऐतिहासिक जामा मशिदीचा देखावा, तर फैजान-ए-मदिना काबा शरीफ मशिदीची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

शहरातील मुख्य जामा मशिदीपासून दुपारी ४ ​वाजेला मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. त्यात मौलाना सादिक अख्तर, नगरसेवक सचिन ठाकरे, सुरेश कदम, संजय गोडसे, निसार खान, फारूक खान, अफजल खान​, रफिक शेख, रईस शेख, जहाँगीर शेख, वाजीद सय्यद, अजीज शेख, राशीद सय्यद, इब्राहिम शेख, शाहिद सय्यद, झिशान खान आदी सहभागी झाले होते.​

--

मिठाई, सरबत बाटप

नगरसेवक भगवान कटारिया यांच्यासह शेख फ्रेंड सर्कल, ब्लू वॉरियर्सतर्फे मिरवणुकीदरम्यान नानकटाई, मिठाई व दूध-सरबताचे वाटप करण्यात आले. शहराच्या विविध भागात दुचाकीवरून रॅली काढण्यात येऊन हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. टांगा लाइन येथे नियाजचे वाटप करण्यात आले.

--

भगूरला देखावे, मिरवणूक

येथील मौलाना आझादरोडवर मक्का-मदिना येथील आकर्षक रोषणाईचा देखावा सादर करण्यात आला होता. चौकाचौकांत मुस्लिम युवा सोशल ग्रुप, मुस्लिम एज्युकेशन वेल्फेअर सोसायटी, बज्मे गौसिया ग्रुप आदींतर्फे देखावे सादर करण्यात आले. लहान मुले-मुली, युवक यांच्या उपस्थितीत निघालेला जुलूस टाकी चौक, तेली गल्ली, राम मंदिररोड, आठवडेबाजार, मारवाडी गल्ली, शिवाजी चौकात दाखल होताच शिवसेना जिल्हाप्रमुख करंजकर, नगरसेवक भाऊसाहेब गायकवाड, फरीद शेख आदींनी इमाम-ए-खतीफ मौलाना मोहम्मद अफाक रझा यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले.

--

पोलिसांतर्फे स्वागत

जुलूसमध्ये सहभागी बांधवांचे सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक सुभाष डौले यांच्यासह पोलिसांतर्फेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. परिसरात मसूर पुलाव व गोड नियाजचे वाटप करण्यात आले. अस्लम मणियार, फिरोझ पटेल, अमजद पटेल, मुन्नाभाई अन्सारी, आरिफ मणियार, यासिर शेख, इम्रान पटेल आदींसह मुस्लिम बांधव या कार्यक्रमांत सहभागी झाले होते.

--

बच्चेकंपनीचा उत्साह

मिरवणुकीसह दिवसभर झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांत बच्चेकंपनीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ईदनिमित्त नवीन कपडे परिधान करण्यासह धार्मिक टॅटू रंगवून धमाल केली. सेल्फी काढण्यासाठीही चिमुकल्यांचा उत्साह दिसून आला. एक दिवस आधी लहान खास चिमुकल्यांसाठी आजोयित करण्यात आलेल्या तकरीर मुकाबल्यातदेखील बच्चेकंपनीने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरवठा निरीक्षकाचे निलंबन

$
0
0

रेशन दुकानदारांकडे मागितले होते पैसे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याकरीता रेशन दुकानदारांकडे पैसे मागणाऱ्या सोशल मीडियावरील व्हिडिओची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. संबंधित पुरवठा निरीक्षकाच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले असून, या प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.

पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य वितरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकाचा आधार क्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदविणे अनिवार्य आहे. शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक मिळवून त्याची डाटा एंट्री करवून घेण्याची जबाबदारी जिल्हयातील रेशन दुकानदारांवर सोपविण्यात आली आहे. नाशिक धान्य वितरण कार्यालयात ‍आधारच्या एंट्रीचे काम सुरू आहे. परंतु, त्यासाठी तेथील एका पुरवठा निरीक्षकाकडून रेशन दुकानदारांकडे प्रति कार्ड पैसे मागितले जात असल्याची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पैसे न दिल्यास डाटा फ्रिज करतो असेही रेशन दुकानदारांना धमकावले जात होते. व्हिडिओ चित्रफितीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाल्याने खळबळ उडाली असून, पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार जिल्ह्यात चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित निरीक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यानुसार त्याच्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारकार्डमुळे विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’

$
0
0

आधार नसल्यास हमीपत्र देणे आवश्यक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे (बारावी) आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, विद्यार्थ्यांना आवेदनपत्रात आधारकार्ड क्रमांक देणे बंधनकारक असणार आहे. खासगीरित्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हा नियम लागू असून, आधारकार्ड क्रमांक नसल्यास विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना हमीपत्र भरून देणे अनिवार्य असल्याचे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले..

दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आवेदनपत्रातच आधारकार्ड क्रमांक भरणे अनिवार्य आहे. आधारकार्ड नसल्यास नोंदणी क्रमांकदेखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी निकालापर्यंत आधारकार्ड काढण्यात येईल, असे हमीपत्र प्राचार्यांना देणे आवश्यक आहे. आधारकार्ड क्रमांक नाही म्हणून आवेदनपत्र भरणे नाकारता येणार नाही याची कॉलेजांनी नोंद घ्यावी, अशा सूचनाही राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

अर्ज प्रक्रिया सुरू

खासगीरित्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने दाखल करणे गरजेचे असून, त्यासाठी तारखा मंडळाने जाहीर केल्या आहेत. ज्युनिअर कॉलेजांकडून ऑनलाइन पद्धतीने नियमित शुल्कासह २ ते ११ डिसेंबर २०१७पर्यंत आणि विलंब शुल्कासह १२ ते १६ डिसेंबरपर्यंत आवेदनपत्रे दाखल करायची आहेत. ज्युनिअर कॉलेजांकडून बँकेमध्ये २ ते १८ डिसेंबरअखेर चलनाद्वारे शुल्क भरायचे आहे. परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यासाठी आपल्या निर्धारित कॉलेजांशी संपर्क साधावा, असे आवाहनही मंडळाकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्था सावरताहेत

$
0
0

ठेवी अडकल्याने होतेय अडचण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटांबदीनंतर राज्यात सहकार चळवळीला मोठा फटका बसला. सर्वसामान्यांचा पैसा असलेल्या पतसंस्थांची अवस्था तर अधिकच बिकट झाली. पण, आता या पतससंस्था सावरत आहेत. मात्र या संस्थांच्या ठेवी जिल्हा बँकेत अडकल्याने त्याचाही फटका त्यांना बसला आहे. चांगले कर्जदार मिळत नसल्याने पतसंस्थांच्या अडचणींत भर पडते आहे.

जिल्ह्यातील ५४५ पैकी ३७३ पतसंस्था गावपातळीच्या आहेत. त्यामुळे या पतसंस्थांच्या ठेवींना सरकारने संरक्षण दिल्यास त्याचा फायदा या संस्थांवर विश्वास वाढवण्यासाठी होणार आहे. पतसंस्थेचे फेडरेशन सरकारकडे ही मागणी गेल्या काही महिन्यांपासून सतत मांडत असले तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका येथून कर्ज घेणे सर्वसामान्यांना सहज शक्य नसते, तर सहकारी बँकाही सर्व ठिकाणी नाहीत. त्यामुळे पतसंस्था याच बहुतांश आधार आहेत. त्यात ठेवींवरील व्याजही राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा जास्त मिळत असल्याने लोकांचा कलही आहे. पण, या ठेवी सुरक्षितता हाच मोठा विषय पतसंस्थेपुढे आहे. जिल्ह्यात या पतसंस्थांच्या ठेवीवर नजर टाकली तरी त्यांचे महत्त्व समोर येते. पतसंस्था अवसायनात येण्याचे तसेच गैरव्यवहार असलेल्या पतसंस्थांही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात कमी आहेत. पतसंस्थांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ठेवी सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे.

कोट्यवधींच्या ठेवी

राज्यभर या पतसंस्थांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ठेवीकडे नजर टाकली तरी आकडे मार्च अखेर समाधानकारक असेच आहेत. २६२ पतसंस्थांकडे एक कोटीपर्यंत ठेवी होत्या. त्याचप्रमाणे १५३ पतसंस्थांकडे १ ते ५ कोटीपर्यंत ठेवी आहेत. ५ ते २५ कोटीपर्यंतच्या ठेवी २६ , ५० ते १०० कोटीपर्यंतच्या ठेवी असणा-या दोन पतसंस्था आहेत. त्याचप्रमाणे ५० ते १०० कोटींच्या ठेवी असणा-या तीन पतसंस्था जिल्ह्यात आहेत.

ग्रामीण भागाची आर्थिक नाडी

जिल्ह्यात एकूण ५४५ पतसंस्था असून, त्यांची मार्चअखेर सभासद संख्या ४ लाख ७१ हजार ३३९ आहे, तर कर्जदारांची संख्याही २ लाख १७ हजार ९७२ होती. विशेष म्हणजे या पतसंस्थांतील ठेवी तब्बल ३ हजार १०८ कोटी होत्या. त्यामुळे गावपातळीवर या पतसंस्थांचे महत्त्व असून, ती आर्थिक नाडी असल्यामुळे त्या टिकवणे सुद्धा पुढील काळात महत्त्वाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामप्रश्नी चिंता दंडाची...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असली, तरी दंडाच्या रकमेबाबत चिंता कायम आहे. या दंडाच्या रकमेची कोणतीही माहिती समोर न आल्यामुळे महापालिका ती कशी आकारते याबाबत बांधकाम व्यावसायिक अंदाज बांधत आहेत.

राज्य सरकाने अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्व बेकायदा बांधकामे अधिकृत होणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेल्या कपाटांचा प्रश्नही मार्गी लागणार असून, त्यातून बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. पण, या दंडाची रक्कम जास्त असल्यास त्याचा फटकाही बसणार आहे.

--

या बांधकामांनाच लाभ

राज्यभरातील शहरी भागांतील सर्व बेकायदा बांधकामांना संरक्षण देऊन ती नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यानंतर महापालिकेने अधिसूचना जारी करून काही नियम व निकषांवर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात ४५०० हून अधिक अनधिकृत बांधकामे आहेत. त्यामुळे ही अनधिकृत बांधकामे दंड भरून अधिकृत करून घेता येणार आहेत. मात्र, ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या बांधकामांनाच नव्या कायद्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सहा महिन्यांची मुदत असून, त्यात हे बांधकाम नियमित न केल्यास पुन्हा संधी मिळणार नाही. महापालिकेला त्यातून १५० कोटींहून अधिक उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक कोंडीत असलेल्या महापालिकेलाही त्यातून दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला टळली रेल्वे दुर्घटना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दिल्ली येथून बंगळुरूकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसच्या इंजिन नजीकच्या डब्यांचे कपलिंग तुटल्याने मनमाड रेल्वे स्थानकात इंजिनपासून काही डबे वेगळे झाले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. मात्र रेल्वे लोहमार्ग पोल‌िस, रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे प्रशासन आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व मोठा अपघात टळला.

इंजिनपासून दूर गेलेले डबे थोड्या वेळात जोडले गेल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मनमाड रेल्वे स्थानकातील शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडलेला हा प्रसंग काही काळासाठी प्रवाशांचा थरकाप उडविणारा ठरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी न्यू दिल्ली-बंगलोर कर्नाटक एक्स्प्रेस दुपारी सव्वा चारच्या सुमारास थांबा घेण्यासाठी स्थानकात प्रवेश करीत होती. मनमाडला थांबा असल्यामुळे गाडीचा वेग कमी होता. मनमाड रेल्वे स्थानकात प्रवेश करीत असताना इंजिनपासून पावचा डब्याजळची कपलिंग तुटली.

प्रवाशांनी टाकल्या उड्या

कपलिंग तुटल्यामुळे इंजिनपासूनच चार डबे पुढे आणि मागील सर्व डबे मागे राहिले. कपलिंग तुटल्यामुळे गाडीला थोडा झटका बसला. मनमाड स्थानकावर उतरण्यासाठी दरवाजात आलेले प्रवाशी मात्र यामुळे प्रचंड घाबरले. काही जणांनी भीतीपोटी गाडीतून खाली उड्या टाकल्या. फलाट काहीसा दूर असल्यामुळे प्रवाशांनी खाली खडीवरच उड्या सोडल्या.

दुसऱ्यांदा तुटली कपलिंग

मनमाड स्थानकात रेल्वे डब्यांचे कपलिंग तुटल्याची दुसरी घटना आहे. सहा महिन्यांपूर्वी नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसचेही डबे वेगळे झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅनॉलवरच सुलभ शौचालये

$
0
0

गंगापूररोडवरील उजव्या कॅनॉलची दुरवस्था

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहरात शेतजमिनी असताना जलसिंचन विभागाने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे याकरीता हजारो एकर शेतजमिनी आरक्षित केल्या. यामधील गंगापूर धरणातून उजव्या कॅनॉलची उभारणी करण्यात आली होती. परंतु, शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या या कॅनॉलवर चक्क महापालिकेने सुलभ शौचालये उभारल्याचे चित्र आहे.

काही राजकारण्यांच्या हट्टापोटी कॅनॉलची दुरवस्था होत आहे, असे सुज्ञ नाशिककरांचे मत आहे. त्यात या कॅनॉलबाबत महापालिका व जलसिंचन विभाग कधी लक्ष देणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.


सांडपाणी थेट पाइपलाइनीत

शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था व्हावी या हेतूने शहरात गंगापूर धरणातून उजव्या कॅनॉलची उभारणी करण्यात आली होती. कालांतराने शहराची वाढत्या लोकसंख्येत कॅनॉलच्या बाजूला असलेली शेतीच गायब झाली. यानंतर कॅनॉल बंद करण्यात आल्याने नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा करणारी थेट पाइपलाइन टाकण्यात आली. परिणामी, दिवसेंदिवस महापालिका व जलसिंचन विभागाने गंगापूर धरणातून निघणाऱ्या उजव्या कॅनॉलकडे दुर्लक्ष केल्याने आजमितीस दिसेनासा झाला असून, केवळ ब्रिटिशकालीन कॅनॉलचे अस्तित्व पहायला मिळत आहे. यामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांच्या हट्टापायी कॅनॉलरोडलाच शौचालयांची उभारणी करण्यात आल्याने थेट पाइपलाइनीत सांडपाणी जात असल्याने त्याचा त्रास रहिवाशांना सहन करण्याची वेळ येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूर-ए-खुदा जमींपर...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकमेकांना शुभेच्छा देत आणि घरोघरी खीर-पुरीचा आस्वाद घेतानाच एकात्मतेचा संदेश देत ईद-ए-मिलादचा सण शहरात हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. जुने नाशिक परिसरातून काढण्यात आलेल्या जुलूस-ए-मिलाद मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या अबालवृद्धांमध्ये यंदा अभूतपूर्व उत्साह पाहावयास म‌िळाला.

मानवता आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या हजरत मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त शहरात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच शहरातील मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. शनिवारी पहाटे या कार्यक्रमांची सांगता झाली. बडी दर्गाह शरीफ आणि जहाँगीर मशीद येथे बांधवांनी दर्शन घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या सणाचे आकर्षण ठरली ती शहरातून काढण्यात आलेली जुलूस-ए-मिलादची मिरवणूक. दुपारी साडेतीनच्या सुमारास चौक मंडई येथील जहाँगीर चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथामध्ये धर्मगुरू स्थानापन्न झाले होते.

बागवानपुरा, मरहूम सलीम अब्बास चौक, भोई गल्ली, कथडा, शिवाजी चौक, नाईकवाडीपुरा, आझाद चौक, पठाणपुरा, चव्हाटा, बुधवार पेठ, आदमशाह चौक, काझीपुरा, मुलतानपुरा, बुरुड गल्ली, कोकणीपुरा, दखनीपुरा, महात्मा फुले मंडई, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौक, पिंजारघाट या मार्गावरून ही मिरवणूक पुढे सरकत बडी दर्गाह शरीफ येथे पोहोचली. या लाल आणि हिरव्या पताका लावण्यात आलेल्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिस आणि सामाज‌िक संघटनांच्या वतीने कमानी उभारून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

--

देखावे अन् अन्नदान

ईद-ए-मिलादनिमित्त ठिकठिकाणी मशिदींच्या प्रतीकात्मक रूपातील धार्मिक देखावे साकारले होते. चौक मंडईतील तरुणांनी २० बाय २० च्या आकारात पवित्र मदिना शरीफची प्रतिकृती उभारली होती. रोषणाईने उजळून निघालेली ही प्रत‌िकृती सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरली. सकाळी बागवानपुरा चौकात सर्वधर्मीयांना अन्नदान करण्यात आले.

--

तरुणाईची उत्स्फूर्तता

दर वर्षीप्रमाणे चिमुकल्यांसह अबालवृद्ध यंंदाच्या मिरवणुकीत उत्साहाने आणि मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र, त्याचबरोबर तरुणाईचा मोठ्या प्रमाणावरील उत्स्फूर्त सहभाग ही यंदाच्या मिरवणुकीचे वेगळेपण अधोरेखित करणारी बाब ठरली. पंचविशीतील तरुणाई आणि टीनएजर्स दुचाकींना ध्वज लावून दिवसभर शहरभर फिरताना दिसून आली. त्यांची वेशभूषा अन् उत्साह चर्चेचा विषय ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलीस धमकी देऊन पळविले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मायलेकीस ठार मारण्याची धमकी देत एका १५ वर्षीय अल्पवयीन युवतीस संशयित आरोपीने पळवून नेले. ही घटना वडाळागावातील मदिनानगर भागात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल नोंदवला आहे.

मदिना लॉन्स पाठीमागे राहणारी १५ वर्षांची युवती २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आपल्या घरी एकटी असतांना हा प्रकार घडला. घरात आलेल्या अन्सार पठाण (रा.खडकाळी) व त्याच्या एका मित्राने युवतीस फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने संशयितास असे करण्यास नकार दिला. यावेळी संशयितांनी मुलीसह तिच्या आईचा खून करण्याची धमकी देत तिला बळजबरी पळवून नेले.

भाजल्याने महिलेचा मृत्यू

स्वयंपाक करीत असतांना स्टोव्हचा भडका होवून भाजलेल्या विवाहीतेचा मृत्यू झाला. आनंदवलीतील काळेनगर भागात हा प्रकार घडला. गंभीर जखमी असलेल्या महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात १३ पासून यात्रोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव येत्या १३ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहन बागलाणचे आमदार दीप‌िका चव्हाण यांनी केले.

यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवमामलेदार यशवंतराव महाराज मंद‌िर सभागृहात आमदार दीप‌िका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी चव्हाण बोलत होत्या. व्यासपीठावर तहसीलदार सुनील सैंदाणे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड, पालिका मुख्याधिकारी हेमलता डगळे, पोलिस निरीक्षक बुवा, नगराध्यक्ष सुनील मोरे, माजी आमदार संजय चव्हाण उपस्थित होते. नगरसेवक राहुल पाटील, नितीन सोनवणे व मनसेचे पंकज सोनवणे यांनी यात्रेतील पाळण्यांच्या वाढत्या दराबाबत नाराजी व्यक्त केली. हे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. तर यात्रेकरू व व्यापाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या फीवरही त्यांनी आक्षेप नोंदवला. नगरसेवक दिनकर सोनवणे कुस्ती स्पर्धेतील मल्लांना दिला जाणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत वाढ करावी, अशी सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईद-ए-मिलाद उत्साहात

$
0
0


टीम मटा

जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी मोठ्या उत्साहात ईद-ए-मिलाद सण साजरा केला. या निमित्ताने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

कमानींनी सजले मालेगाव

मालेगाव ः शहरातील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद सण उत्साहात साजरा केला. या निमित्ताने शहरातून सुन्नी जमेतूल उलेमातर्फे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मिरवणूक मार्गांची पालिकेकडून डागडुजी करण्यात आली होती. चोख पोल‌िस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. सकाळी दहा वाजता उत्तर प्रदेशातील डॉ. सैय्यद मुशिरूद्दीन कादरी बरकती याच्या नेतृत्त्वाखाली लल्ले चौक येथून मिरवणुकीस सुरुवात झाली. आझादनगर, नुरानी मश‌िद, किदवाई रोडमार्गे शहरातील ए. टी. टी. हायस्कूलच्या प्रांगणात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत घोडेस्वार, वाहने सहभागी झाली होती. समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमास रझा अकादमीचे मुंबई येथील प्रमुख मोहम्मद सईद नुरी, अब्दुला नासिमुल कादरी, मुफ्ती वाजीद अली यार अल्वी, मौलाना अब्दुल्ला रझा, मौलाना इरफान रझा मिसबा यांच्यासह अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांताधिकारी अजय मोरे, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने उपस्थित होते.

येवल्यात मिरवणूक

येवला ः येवला शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात हजरत मोहंमद पैगंबर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिमबहुल भागात ठिकठिकाणी हिरवे झेंडे, पताका व आकर्षक कमानी लावण्यात आल्या होत्या. सकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील कचेरी रोडवरील आयना मस्जिद येथून सकाळी ९ वाजता या मिरवणुकीस प्रारंभ झाला.

येवला शहरात सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्राच्या वतीने वलीबाबा दर्गा येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

लासलगावी जुलूस

निफाड ः लासलगाव येथे जुलूस काढण्यात आला. सकाळी ९ वाजता जामा मश‌िद येथून जुलूस निघाला. लासलगाव व परिसारातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांचाही सहभाग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीने १० ते १२ सुशिक्ष‌ति बेरोजगारांना गंडा घातल्याचे पुरावे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. या प्रकरणात विभागातील कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असावा, अशी शक्यता असून, चौकशी करण्याकामी पोलिसांनी विभागास पत्र दिले आहे.

सोमनाथ विठ्ठल डाबल (३७ रा. शांतीनगर, मखमलाबादरोड), राजेश राम रोहिडा (४२ रा. दत्तनगर, पेठरोड), राजेंद्र सहदेव मोरे (४५ रा.लक्ष्मीनगर, नांदगाव) आणि हेमंचंद्र विष्णू आहिरे (६२ रा. क्रांतीनगर,मखमलाबाद) या संशयित आरोपींनी साहेबराव रामभाऊ शेवाळे (रा. सौंदाणे, ता. नांदगाव) या फरार साथिदारासह बनावट कागदपत्रांआधारे बेरोजगारांना आर्थिक गंडा घालण्याचे रॅकेट सुरू केले होते. आदिवासी विकास विभागातील सुरक्षारक्षकास हाताशी धरून या टोळीने संदीप बाळू सानप (रा. कासारी, ता. नांदगाव) या तरुणास तब्बल तीन लाख रुपयांना चूना लावला. फसवणुकीचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने सानपने पोलिसांकडे धाव घेतली. संशयित आरोपीने अधिकाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केली. एवढेच नव्हे तर बनावट स्टॅम्पही बनवून सानपची विभागातच मुलाखत देखील घेतली. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे सानप यांनी तक्रार केल्यानंतर संशयितांची धरपकड करण्यात आली.

मास्टरमाईंडचा हात

संशयित आरोपींनी आणखी १० ते १२ जणांची फसवणूक केली असावी. तसे पुरावे व नावांची यादी पुढे आली असून, आम्ही तक्रारीच्या प्रतिक्षेत आहोत. यातील एक संशयित आरोपी फसवणुकीच्या गुन्ह्यात सराईत असून, तोच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असू शकतो, असे मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसकडून एकच अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी शनिवारी गटनेत्यांनी उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव राजेश धसे यांच्याकडे अर्ज दाखल केले. एकूण ५ जागांसाठी अर्ज दाखल होणे अपेक्षित असताना चारज जागांसाठी अर्ज आले. काँग्रेसच्या गोटातून दोनपैकी एकच अर्ज आल्याने एक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी काँग्रेस व महागठबंधन आघाडीस प्रत्येकी दोन तर शिवसेनेस एक स्वीकृत सदस्य पद मिळणार आहे.

शनिवारी काँग्रेस गटनेत्या ताहेरा शेख यांच्यातर्फे एमआयएमचे नेते अब्दूल मलिक युनुस इसा यांचा अर्ज दाखल करण्यात आला. काँग्रेसकडून दोन पैकी एकाच जागी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यातही ही एक जागा मित्रपक्ष असलेल्या एमआयएमला देण्यात आली आहे. काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यानेच एक जागा रिक्त ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर महागठबंधन आघाडीतर्फे गिरीश बोरसे व मोह. अमीन मोह. फारुख यांचे अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेना गटनेते नीलेश आहेर यांनी भिका भडांगे यांचा अर्ज दाखल केला. यावेळी संजय दुसाने, मनोहर बच्छाव उपस्थित होते. या अर्जांची छाननी होवून आयुक्तांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर महासभेत या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.

भाजपचाही अर्ज?

स्वीकृत नगरसेवक पदासाठी शनिवारी पक्षीय बलाबालानुसार चार अर्ज दाखल झाले. पाच स्वीकृत सदस्यांपैकी भाजपला एक ही पद नाही. मात्र या निवड प्रक्रीयेस भाजप गटनेते सुनील

गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. शनिवारी गुलाब पगारे यांचा अर्ज दाखल केला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तर नगरसचिव धसे यांनी असा कोणताही अर्ज प्रशासनास प्राप्त झाला नसल्याचे सांगितले.

स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी पक्षीय बलाबलनुसारच अर्ज स्वीकारण्यात आले. भाजपाच्या वतीने कुठलाही अर्ज प्राप्त झालेला नाही. पक्षीय बलाबलनुसार कार्यालायास चारच अर्ज दाखल झाले आहेत.

- राजेश धसे, नगरसचिव, मनपा, मालेगाव

महागटबंधन आघाडी तीन घटकांपासून बनली असून, संख्या बळानुसार राष्ट्रवादी वगळता इतर पक्षाचे संख्याबळ भाजपपेक्षा कमी असल्याने कायद्याने भाजपचा सदस्य असणे अपेक्षित आहे. त्यामुळे भाजपच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला आहे.

- सुनील गायकवाड, गटनेता, भाजपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाव जागवत आली, वासुदेवाची स्वारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर


कधीकाळी पहाटे पहाटे दारात येवून अभंग ओव्या गात दान मागणारा वासुदेव गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकनगरीत मतांचे दान मागताना दिसत आहे. शहरातील काही उमेदवारांनी प्रचारासाठी या ऐतिहास‌कि संवाददूताचा योग्यपद्धतीने वापर सुरू केला आहे. त्यामुळे निवडणूक कालावधीत का असेना मागे पडलेल्या या संवाददूताला पाहून भल्या पहाटे त्र्यंबक शहरातील मतदार तृप्त होत आहेत.

त्र्यंबक नगरपालिका निवडणूक प्रचार रंग अधिक गडद झाला आहे. भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवक सूर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यंत मतदारांचे उंबरठे झिजव‌ति आहेत. सकाळ उजाडताच वासुदेव दारात येऊन उभा राहतो आणि देवाची आळवणी करतांनाच तो उमेदवाराची आठवण करून देत आहे. त्याच्या खांद्यावर शिवसेनेचा दुपट्टा आहे. नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार धनंजय तुंगार यांनी चार वासुदेवाच्या पेहराव केलेले प्रचारक आणले आहेत. ते मतदारांचा जागर करीत आहेत. प्रचाराचा बॅनर असलेल्या तीन चाकी सायकली सध्या शहरात दाखल होत आहेत. तर काँग्रेस पक्षोने जादुगार आणला आहे. चौकाचौकात जादू करत हाताचा पंजा काढून दाखवत आहे. नांदेड महापालिका प्रचार यंत्रणेचा यशस्वी फंडा येथे राबविण्याचा प्रयोग होत असल्याची चर्चा आहे. सोशल मीड‌यिावर तर प्रचारपत्रकांचा भडीमार सुरू झाला आहे.

घरदार निघाले प्रचाराला

नारळ फोडून झाले की उमेदवार आणि समर्थक यांची प्रभागातून नमस्कारासाठी फेरी सुरू होते, तेव्हा परप्रांतीतून आलेले पर्यटक मात्र गोंधळात पडतांना दिसत आहेत. उमेदवार घरोघरी गाठीभेटी घेत प्रचार करीत आहेत. त्यांच्या घरातील ज्येष्ठ सदस्य स्वतंत्र व्यूव्हरचना राबवत आहेत. तर महिलादेखील स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबव‌ति आहेत.

आमदारांचा त्र्यंबकमध्ये

वाढला मुक्काम

नगराध्यक्ष आणि प्रभाग लढविणारे भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी शहरात ठाण मांडून आहेत. सकाळ-संध्याकाळ रणनीती आखणाऱ्या बैठका सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंकलने मम्मी-पप्पाला रक्त लावले…

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

‘अंकलने पप्पा आणि मम्मीच्या अंगावर फटाके फोडले, रक्त लावले’ अशा शब्दात निरागस आर्यनने आपल्या आई-वडिलांवर झालेल्या हल्ल्याचे हृदयद्रावक वर्णन करताच जवान राजेश, त्याची पत्नी शोभा यांच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या समुदायाला अश्रू अनावर झाले. त्या प्रसंगाचे वर्णन करतांना साडेतीन वर्षांचा आर्यन पूर्णपणे भांबावलेला होता.

काश्मीरमध्ये हत्या झालेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा जवान राजेश केकाणे आणि त्याची पत्नी शोभा यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.२) सकाळी साडेनऊ वाजता चिंचोली येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच चितेवर आई-वडिलांना चिमुरड्या आर्यनने अग्निडाग दिला, तेव्हा नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांना अश्रू अनावर झाले. राजेश आणि शोभाची मध्यरात्री त्याच्याच सहकाऱ्याने हत्या केली तेव्हा राजेशचा मुलगा आर्यन आणि मुलगी अनुष्का हे दोघेही घरातच होते. त्यावेळी आई-वडिलांवर बेतलेल्या प्रसंगाचे चिमुकल्या आर्यनने अडखळतच वर्णन केले.

इतिहासात प्रथमच पती-पत्नीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आल्याने संपूर्ण चिंचोली गाव शोकसागरात बुडाले. सीआयएसफच्या सशस्त्र तुकडीने याप्रसंगी राजेश व शोभा यांना अखेरची मानवंदना दिली. सीआयएसफचे निरीक्षक धर्मपाल सोमकुवर यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

काश्मीरमधील तुलस्ती (जिल्हा किश्तवाड) येथे राजेश आणि शोभा यांची गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास त्याच्याच सहकाऱ्याने गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री दोन वाजता त्यांचे पार्थिव नाशिकरोड येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या केंद्रावर आणण्यात आले. तेथून शनिवारी सकाळी साडेसात वाजता राजेश आणि शोभाचे पार्थिव चिंचोलीत आणताच कुटुंबियांनी आक्रोश केला. गावातील व्ही. एन. नाईक विद्यालयाच्या मैदानावर चिंचोलीकरांनी आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. या प्रसंगी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार नितीन गवळी, उदय सांगळे, सीआयएसएफ दलाचे निरीक्षक धर्मपाल सोमकुंवर उपस्थित होते.

सोळा गोळ्या झेलल्या

रात्री दीड वाजता दरवाजाची बेल वाजल्यावर राजेशने दरवाजा उघडताच त्याचा मित्र सुरिंदरने हातातील रायफलने अवघ्या तीन फूट अंतरावरुन राजेशवर गोळ्या झाडल्या. आवाज ऐकून पत्नी शोभाही राजेशच्या मदतीला धावली. परंतु राजेशने तिला आपल्या पाठ‌ीशी घातले. तोपर्यंत सुरिंदरने राजेशवर तब्बल सोळा गोळ्या झाडल्या. यात शोभालाही गोळी लागल्याने तिचाही यात अंत झाला.

ऐसा दोस्त कहाँ मिलेगा…

चार सालसे रजेश और मैं एकसाथ थे. राजेश बहुत अच्छा दोस्त था, जम्मू काश्मीर मे काम करने के लिए उसे बहुत दिलचस्पी थी. ऐसा दोस्त हमे और हमारे बल को हमेशा के लिए छोड गया, अशा शब्दांत सब इन्स्पेक्टर बिपीनकुमार यांनी राजेश यांना श्रद्धांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोरीवली होणार कनेक्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक


पुण्यापाठोपाठ मुंबई मार्गावर एसटी महामंडळाच्या चार शिवशाही बसेस सोमवारपासून धावणार आहे. गेल्या आठवड्यात एसटीने या बसचे वेळापत्रक जाहीर केले होते. पण, आरटीओ पासिंग न झाल्याने या बस सुरू झाल्या नाही. आता या बस नाशिकमध्ये आल्या असून, त्यांचे वेळापत्रकही तयार आहे. नाशिक येथून सकाळी साडेपाच वाजेपासून या बस तासाभराच्या अंतराने सुटणार आहे. त्यानंतर दुपारी पुन्हा बोरीवली येथून या बसेस येतील.

गेल्या आठवड्यात जाहीर केलेले वेळापत्रक या बससाठी कायम ठेवण्यात आले आहे. सकाळी साडेपाच, साडेसहा, साडेसात, साडेआठ याप्रमाणेच दुपारी अडीच, साडेतीन व सायंकाळी साडेचार या वेळेतही या बस धावणार आहेत. बोरीवलीहून या बस सकाळी ९.५०, १०.५० ११.५० या वेळेत नाशिकसाठी सुटतील. तसेच दुपारी १२.५०, सायंकाळी ७ आणि रात्री ८ वाजताही बोरीवलीहून नाशिकसाठी बसेस असतील. यातील एक बस ठाण्यासाठी ठेवण्यात आली आहे.

मुंबई मार्गावरील शिवशाही बसेसचे गेल्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर झाले. पण, बसेस न धावल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला होता. शिवशाही बस वातानुकूलित असूनही त्याचे भाडे परवडणारे असल्यामुळे राज्यभर या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक-पुणे या मार्गावर एसटीने याअगोदर १७ बसेस सुरू केल्या असून त्यात आता या चार बसेसची भर पडणार आहे.

सोमवारपासून बोरीपवलीपर्यंत चार शिवशाही बससे धावणार आहे. गेल्या आठवड्यात आरटीओ पासिंगमुळे या बस आल्या नाही. आता या बस नाशिक डेपोत आल्या असून, पहिल्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत. - राजेंद्र जगताप, जिल्हा वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा पोलिसांची सरकारवाड्यात धाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुलकर्णी गार्डन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणाची शनिवारी सटाणा पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, त्यांच्या हाती फार काही लागले नाही. सटाणा शहरातील एटीएम फोडून चोरट्यांनी २३ लाखांची रोकड चोरी केली असून, पोलिस चोरट्यांच्या मागावर आहेत.

किरण रघूनाथ मोरे (वय २२ रा.कृष्णा हाईटस, शिवगंगानगर, दिंडोरीरोड) आणि अमित साहेबराव गवई (वय २४ रा. श्याम अपा. पीएनटी कॉलनी) अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. एका खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या मोरे आणि गवई यांनी झटपट पैसे कमवण्याचा निर्णय घेतला होता. यू ट्युबवर चोरी करण्याच्या प्रकारांची माहिती घेऊन दोघांनी शुक्रवारी पहाटे कुलकर्णी गार्डनजवळील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा उद्योग सुरू असताना सरकारवाडा पोलिसांच्या गस्ती पथकाने दोघांना जेरबंद केले. नोकरी करतानाच बाहेरून शिक्षण घेत असलेल्या संशयितांनी काही दिवसांपूर्वीच चोरीची तयारी केली होती. मात्र, पहिल्याच प्रयत्नात ते पोलिसांच्या हाती सापडले. याबाबत पोलिस उपनिरीक्षक अनिल बागुल म्हणाले, झपटप पैसे मिळवण्यासाठीच दोघांनी उद्योग केल्याचे दिसते. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे जाणवत नाही.गुरुवारी सटाणा येथे एक एटीएम फोडून चोरट्यांनी २३ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. यानंतर शहर पोलिसांनी शुक्रवारी नाशिकमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.या पार्श्वभूमीवर सटाणा पोलिसांच्या तपास पथकाने शनिवारी सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठून दोघा संशयितांची चौकशी केली. मात्र, त्यात फार काही स्पष्ट होऊ शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तरुणा’ला करायचेय देशभ्रमण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

बाइकवर फिरण्याची आवड तर सगळ्यांनाच असते. काहीजण महिनाअखेरीस जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देतात, तर काही अधूनमधून ऐतिहास‌कि स्थळांपर्यंत जावून मन प्रसन्न करून येतात. मात्र, काही जण आपल्या भ्रमंतीसाठी, बाइकसवारीच्या आवडीसाठी वयाची कुठलीही सीमा न बाळगता आनंद घेत असतात.

मनमाड येथील ६६ वर्षीय प्रकाश गोयल हे देखील अशाच अवलियांमधील एक. त्यांनी आपल्या बाइकवर आजपर्यंत १८ हजार किलोमीटर प्रवास केला असून, कोकण गोव्यासह, खजुराहो, ओंकारेश्वर, उज्जैनपर्यंत दुचाकीवर मजल मारली आहे. आता गोयल यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी भारतभ्रमण करण्याचा चंग बांधला आहे.

त्याच्यातील उत्साह आणि भटकंतीची आवड पाहून शहर परिसरात त्यांच्या या धैर्याचे खूपच कौतुक होत ओहे. विशेष म्हणजे येथून पुढचा प्रवास ते ज्युपीटर या मोपेड दुचाकीवर करणार आहेत.

मनमाड येथील सराफ व्यावसायीक असलेल्या प्रकाश गोयल यांना लहानपणापासून भटकंतीचे वेड. तारुण्यात हातात दुचाकी आली आणि त्यांच्या आवडीला वेगाचे पंख मिळाले. वयाच्या १९व्या वर्षी हिरोहोंडावर मुंबई-कोल्हापूर ची वारी करणाऱ्या या दुचाकीवेड्याला आता भारतभ्रमणाचे वेध लागले आहेत. या प्रेमापोटीच काही वर्षांपूर्वी त्यांना अपघातालाही सामोरे जावे लागले. त्यात तब्बल दोन वर्ष त्यांनी बेडवर काढले. त्या अंधकारमय दिवसातही या ‘प्रकाश’ने स्वप्नांचा पिच्छा सोडला नाही. अपघातातून सावरल्यानंतर त्यांचे ही भटकंतीप्रेम अधिकच वाढले. गेली तब्बल पाच दशके गोयल यांची बाइकसफर अव्याहत सुरू आहे.

आजवर त्यांनी बाइकवर १८ हजार कि.मी. प्रवास केल्याचे ते सांगतात. नुकतेच सांची, खजुराहो येथे दुचाकीवर जाऊन आले. देवीची साडे तीन शक्ती पीठे, सोलापूर, अक्कलकोट, कास पठार, उज्जैन, अजमेर, मांडव गड, यासह मध्य प्रदेशातील इतरही प्रेक्षणीय स्थळांना गोयल यांनी बाइकवर भेट दिली आहे.

कुठेही जा, भारत समृद्ध वाटतो. विविध रिती परंपरा लक्ष वेधतात. कुठे आदिवासी भागातील दारिद्रय मन बेचैन करते. तर कुठे निसर्ग साद घालतो. त्यातून बाइक सफारीने जणू आयुष्याला नवसंजीवनी दिली आहे.

- प्रकाश गोयल, बाइकस्वार

सुरक्षित प्रवास

गोयल बाइकवर दरताशी ३५ कि.मी. व दिवसभरात २५० कि.मी. अंतर कापतात. दर ७० कि. मी. नंतर थोडासा आराम व सायंकाळी साडेसहानंतर प्रवास बंद आणि पोहचेल त्या ठिकाणी मुक्काम असे नियम त्यांनी घातले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचीदेखील या प्रवासाला साथ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्वप्रेमींची मांदियाळी

$
0
0

सारंगखेड्यात चेतक फेस्टिवलसह यात्रेला सुरुवात; पर्यटकांचा मुक्काम

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवाला रविवारी (दि. ३) सुरुवात झाली. दुपारी चार वाजेच्या सुमारास पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, यात्रेचे आयोजक जसपालसिंह रावल आदींच्या उपस्थितीत यात्रोत्सवाचे उद््घाटन करण्यात आले. या वेळी देश-विदेशातील पर्यटकांनी यात्रेतील भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. घोडे दाखल झाल्यापासून यात्रेच्या पहिल्या दिवसापर्यंत घोडे खरेदी-विक्रीत २७ लाखांची उलाढाल झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

यात्रेच्या पहिल्याच दिवशी रविवार सुटीचा दिवस असल्याने दर्शनासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून भाविकांच्या मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या. यात्रेत पहिल्याच दिवशी सुमारे एक लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. दरम्यान, शेकडो भाविकांनी गूळ, साखर, पेढे, पैशांच्या नाण्यांची तुला करून नवस फेडण्यात आला. सूर्यकन्या तापी नदीच्या किनारी उंच डोंगरावर मंदिर असलेल्या एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेला रविवारपासून सुरुवात झाली. या यात्रेसाठी गेल्या १५ दिवसांपासून तयारी सुरू होती. दत्त जयंतीच्या मध्यरात्रीपासून सारंगखेडा येथील दत्ताच्या मंदिरात महाआरती व दत्तप्रभूंच्या पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सारंगखेडा नगरीत दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी भक्तांचा जनसागर लोटला होता. ही ऐतिहासिक यात्रा असल्याने दरवर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होत असते. यावर्षीही यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे एका लाखांपेक्षा जास्त भाविकांनी यात्रेला हजेरी लावल्याचे दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अर्जून सोमजी पाटील, सचिव भिकन पाटील व शिरीष पाटील यांनी सांगितले.

सारंगखेडा यात्रेत घोडे, बैल जोडी विक्रीसह विविध साहित्य विक्रीचा बाजार भरतो. घोडे बाजारात ज्याप्रमाणे कोटींची उलाढाल होते. त्यानुसारच संसारोपयोगी वस्तू, शेती अवजारे, विविध शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थांसह गरजेच्या वस्तू विक्रीसाठी येतात. यावर्षी यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी हजेरी लावल्याने पूजेचे साहित्य विक्रीपासून ते सर्वच वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून सारंगखेडा यात्रेत रविवारी लाखो रुपयांची उलाढाल झाली. यात्रा परिसरात मनोरंजनाची साधने व विविध वस्तू विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यावर्षी सारंगखेडा यात्रेला नवा लूक देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग व चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून चेतक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठी विविध कार्यक्रमांची मेजवानीचा आनंद यात्रेकरूंना मिळणार असून, यंदा यात्रेत विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. या विदेशी पर्यटकांसोबत सेल्फी काढण्याची जणू काही स्पर्धाच लागली असून, या पर्यटकांसोबत सेल्फी काढून आनंद यात्रेकरू घेत आहेत.

अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

सारंगखेडा यात्रेनिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी दाखल झाले होते. रविवारी (दि. ३) सकाळी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरात जावून एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. यावेळी चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते एकमुखी दत्तप्रभूंची विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी पर्यटन विकास विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, कार्यकारी अभियंता हेमंत जगताप, उपअभियंता फारूक शेख, दशरथ मोठाड, महेश बागुल, सारंगखेड्याचे पोलिस सहाय्यक निरीक्षक मनोहर पगार आदी उपस्थित होते. त्यानंतर पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेंट सिटी, महिला कट्टा, घोडे बाजार, मंदिर परिसर, चेतक फेस्टिवल कार्यालयाची पाहणी केली. तसेच गेल्या वर्षीपेक्षा अतिशय नियोजनबद्ध व सुंदर अशा फेस्टिवलचे आयोजन केल्याने पर्यटन विभागाचा व चेतक फेस्टिवलचा खऱ्या अर्थाने उद्देश सफल झाल्याचे सांगून या महोत्सवामुळे देशी, विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचेही नमुद केले. पर्यटन विभागाकडून जास्तीत जास्त सहकार्य करून सारंगखेडा यात्रा जागतिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही पर्यटन विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी सांगितले.

घोडे विक्रीतून २७ लाखांची उलाढाल

सारंगखेडा यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असल्याने १५ दिवसांपूर्वीच देशातील कानाकोपऱ्यातून घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यावर्षी यात्रेत सरकारकडून अश्व संग्रहालय उभारण्यात येणार असून, आणखीनच भर पडणार आहे. या सारंगखेड्यातील घोडे बाजारात एकूण २००० घोडे विक्रीसाठी आले असून, विविध प्रजातीचे घोडे असल्याने अश्वशौकिनांचे लक्ष वेधून घेत आहेत. आतापर्यंत ८६ घोड्यांची विक्री होऊन एकूण २६ लाख ८९ हजार ३०० रुपयांची उलाढाल घोडे बाजारात झाली आहे. रविवारी (दि. ३) यात्रेच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात ६४ घोड्यांची विक्री होवून २३ लाख ११ हजार ३०० रुपयांची उलाढाल झाली. यात उत्तरप्रदेशातील नबाबगंज (जि़बरेली) येथील अब्दूल रशीद अब्दूल समद यांच्याकडे असलेली घोडी ही सातारा जिल्ह्यातील कडेगाव येथील दिलीप नामदेव घाडगे यांनी दोन लाख ४० हजार रुपयांनी खरेदी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथके रवाना, पण गूढ उकलेना!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून तपासासाठी जोर लावला आहे. दुर्दैवाने दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारातील पाझर तलावात सापडलेल्या मुलीच्या मृतदेहाची अद्याप ओळखच पटलेली नाही. तिचे मारेकरी मोकाटच असून, मृतदेह सापडून सोमवारी, ४ डिसेंबर रोजी आठ दिवस पूर्ण होतील.

आंबेगण येथील पाझर तलावात २७ नोव्हेंबर रोजी एका १६ ते १८ वयोगटातील मुलीचा मृतदेह आढळून आला होता. आरोपीने अत्यंत थंड डोक्याने मुलीची हत्या केली आहे. चेहऱ्याची ओळख पटू नये याची काळजी आरोपीने घेतली. यानंतर या मृतदेहाचे हातपाय बांधून तो एका गोणीत टाकला. गोणीत दगड भरून तो आंबेगण शिवारातील पाझर तलावत फेकून दिला होता. साधारणतः तीन ते चार दिवसांनी मृतदेहाची गोणी तरंगत वर आली. त्यानंतर खुनाच्या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. मात्र, मागील सात दिवसांत तपासात एकही धागादोरा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. शहरसह ग्रामीण भागात महिला, तरुणी, तसेच अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण, शहर पोलिस, परिक्षेत्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी बेपत्ता मुलींची माहिती घेतली. मात्र, ठोस काही हाती आले नाही. आता पोलिसांनी आपला मोर्चा शेजारील गुजरात राज्याकडे वळवला आहे. या ठिकाणी काही धागेदोरे मिळतात काय, याचा तपास पोलिस घेत आहेत. बेपत्ता मुलींची घेतली जाणारी माहिती आणि सापडलेला मृतदेह यांच्यात अद्याप साधर्म्य दिसून आलेले नाही. इतक्या दिवसांनंतरही मुलीचे पालक समोर आलेले नाहीत. त्यामुळे ऑनर किलिंगसारखा हा प्रकार असावा काय, याची शक्यता पोलिस पडताळून पाहत आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांना ही माहिती कळवण्यात आली असून, त्यातून काही समोर येते काय याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी काही पथके तयार केली असून, तपासासाठी त्यांना गुजरातसह इतर जिल्ह्यांत पाठवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images