Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राज्याची खाद्यसंस्कृती जगाच्या नकाशावर जावी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बाहेरून जे आले आहे, त्यात थोडाफार बदल करून महाराष्ट्राने स्वीकारले. मात्र, आता आपले जे आहे ते आपलेच ठेवण्यासाठी झगडण्याचा काळ आला आहे. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जगाच्या नकाशावर जावी यासाठी यथार्थ प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खाद्यसंस्कृती अभ्यासिका मोहसिना मुकादम यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयात ग्रंथालय सप्ताह सुरू आहे. त्यातील दुसरे पुष्प मुकादम यांनी गुंफले. ‘महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती’ असा विषय होता. मुकादम पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रीयन माणसाचा स्वभाव थोडा भिडस्त असल्यामुळे आपले प्रमोशन त्याने केलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीबाबत कमी लिहिलेले आहे. आपल्या संस्कृतीविषयी मोदक आणि पुरणपोळी सोडली तर खाद्यपदार्थांबाबत लिखाण झालेलेच नाही. त्यामुळे अनेक पदार्थांच्या रेसिपीपासून वंचित रहावे लागते. खाद्यसंस्कृती ही दहा हजार वर्षे जुनी आहे. आतातर आपले काय व बाहेरचे काय याच्या सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत, असेही मुकादम म्हणाल्या. मुकादम यांनी मोदक, वडा, वडापाव या पदार्थांविषयी अधिक माहिती सांगितली.

दुसऱ्या वक्त्या डॉ. सुषमा पौडवाल यांनी प्राचीन काळापासून आजपर्यंत समाजामध्ये आहारात कसा बदल होत गेला याविषयी सांगितले. खाद्यसंस्कृतीची नाळ ही मौखिक परंपरेशी व कुटुंबव्यवस्थेशी जोडली असल्याचेही पौडवाल म्हणाल्या.

यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते, स्वाती पाचपांडे, आशा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन संगीता बाफणा यांनी केले तर स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. वेदश्री थिगळे यांनी करून दिला.

आजचे व्याख्यान

आज, रविवार १० डिसेंबर रोजी वास्तुशास्त्रतज्ज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांचे ‘वास्तुदोष आणि घरगुती उपाय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कै. सावित्रीबाई वावीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या व्याख्यानाचे वेळी आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महालोकअदालतीत विक्रम; सव्वा लाख प्रकरणे निकाली

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शनिवारी घेण्यात आलेल्या महालोकअदालतीमध्ये साडेतीन लाख खटल्यांपैकी एक लाख २७ हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली. शंभर कोटींहून अधिक तडजोड रक्कम त्यामध्ये वसूल करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. या महालोकअदालतीने विक्रम प्रस्थाप‌ित केल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही महालोक अदालत घेण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने खटले निकाली काढण्यात आले असून, एवढी मोठी रक्कम तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आली आहे. तडजोडीने प्रकरणे मिटाव‌ित यासाठी सकाळपासून जिल्हा न्यायालयात गर्दी उसळली. गोंधळाची परिस्थ‌िती निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोल‌िस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी बँकांचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, वीज मंडळ, मोबाइल कंपन्या आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थ‌ित होते. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये मिळून तीन लाखांहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. लोक अदालत यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर बुक्के, वकिलांनी सहकार्य केले.


साडेतीन लाख खटले

या लोकअदालतीमध्ये दाखल पूर्व ८० हजार खटले सुनावणीसाठी यावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात तीन लाख ५५ हजार ६२० खटल्यांपैकी एक लाख २३ हजार ५६३ खटले निकाली काढण्यात आले. त्यातून ५३ कोटी १३ लाख ८८ हजार ४१९ रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर प्रलंबित १२ हजार २३० प्रकरणांपैकी तीन हजार ४४१ खटले निकाली काढण्यात आले असून, ४६ कोटी ८६ लाख ७९ हजार ६०६ रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. या लोकअदालतीमुळे देशपातळीवर नवा विक्रम प्रस्थापित झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईएसआयसी’ला बाधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींत असलेल्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांसाठी सरकारने कामगार विमा रुग्णालयाची (ईएसआयसी) उभारणी केलेली आहे. मात्र, शहरातील सातपूर येथील या रुग्णालयाला समस्यांची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. येथे वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारीही अनेक कामगारांकडून होत अाहेत. याप्रश्नी ठोस कार्यवाही करण्याची मागणी कामगारवर्गाकडून केली जात आहे.

या रुग्णालयाच्या समस्या प्रशासनासमोर वेळोवेळी मांडल्या आहेत. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कामगार विमा रुग्णालयालाच समस्यांची बाधा झाल्याने त्यावर उपाय करणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कामगार विमा रुग्णालयाच्या पडून असलेल्या परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात अाहे. त्यातच कामगार विमा रुग्णालयात येणाऱ्या रस्त्याचीच दुरवस्था झाल्याने रुग्णांचा प्रवासही खडतर झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी येथील समस्यांप्रश्नी कधी पुढाकार घेणार, असा सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे. एकीकडे सातपूर पोलिस स्टेशनला काँक्रिटीकरणाचा रस्ता महापालिका करते. मात्र, दुसरीकडे लाखो कामगारांसाठी असलेल्या कामगार विमा रुग्णालयाची वाट खडतर झाली असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

प्रयत्नांना मिळेना दाद

शेकडो कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी सरकारने कामगार विमा रुग्णालयाची भव्य इमारत सातपूर औद्योगिक वसाहतीत उभारली आहे. परंतु, कामगार विमा रुग्णालयात वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप नेहमीच केला जातो. खासदार हेमंत गोडसे यांनी कामगार रुग्णालयाला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार व निवेदन देत मागणी केली होती. आमदार सीमा हिरे यांनीदेखील कामगारांना योग्य आरोग्य सुविधा देण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे. परंतु, तरीही योग्य ती कार्यवाही होत नसल्याने कामगारांना नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे.


रस्त्याची वाट, झुडपे फोफावली

कामगार विमा रुग्णालयाच्या परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली असून, झाडाझुडपांमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयाच्या प्रशासनाने याबाबत लेखी पत्रव्यवहार करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहितीदेखील सादर केली आहे. मात्र, असे असतानादेखील कामगारांना खडतर रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. कामगार रुग्णालयाच्या अशा दुरवस्थेकडे सरकार कधी लक्ष देणार, असा सवाल कामगारांनी उपस्थित केला आहे.

----------

स्थानिक नगरसेवकांकडून पोलिस स्टेशनच्या हद्दीत महापालिकेच्या खर्चाने नागरी सुविधा पुरविल्या जातात. परंतु, लाखो कामगार येत असलेल्या कामगार विमा रुग्णालयाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथील समस्या सोडविण्याची गरज आहे.

- दीपक जगताप, कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात दोन भाविक जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पाथरे सबस्टेशनजवळ शनिवारी (दि. ९) दीड वाजेच्या सुमारास व्होक्सवॅगन कार उलटल्याने दोन जण जखमी झाले. वावी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

मुंबईहून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेली व्होक्सवॅगन कार (एमएच ०१, ए एक्स ४९९६) सिन्नरकडून शिर्डीच्या दिशेने जात होती. पाथरे शिवारात सबस्टेशनजवळ असलेल्या वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सरळ नालीत उलटली. या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाले. अपघातानंतर पाथरे बु.चे सरपंच मच्छिंन्द्र चिने यांच्यासह मनोज गवळी, सुरेश जोर्वेकर, महेश नरोडे, संदीप ढवण, उपकेंद्रातील कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. कारमधील जखमींना बाहेर काढून श्रीराम मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेद्वारे उपचारार्थ शिर्डी येथे पाठविण्यात आले. वावी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झिरो गार्बेज’ला तिलांजली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ व सुंदर नाशिकचा नारा देणाऱ्या नाशिक महापालिकेने स्वच्छतेतील आपले गुणांकन सुधारण्यासाठी आपल्याच ‘झिरो गार्बेज’ संकल्पनेला तिलांजली दिली आहे. शहरात पुन्हा ओला व सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणाच्या नावाखाली महापालिकेने शहरात सुमारे दोनशे ठिकाणी कचरा पेट्यांची उभारणी केली आहे. त्यासाठी ठेकेदारावर तब्बल २१ लाखांचीही उधळपट्टी करण्यात आली आहे. शहरात पुन्हा कचराकुंड्यांमुळे घाणीचे साम्राज्य तयार होणार असून, स्वच्छ व सुंदर नाशिकला पुन्हा हरताळ फासला जाणार आहे. या वादग्रस्त निर्णयामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

माजी महापौर प्रकाश मते यांनी शहर कचराकुंडीमुक्त करण्यासाठी आदर्श घंटागाडी योजना सुरू केली होती. या योजनेनेमुळे घरोघरी केरकचऱ्याचे संकलन होऊन शहर झिरो गार्बेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. घंटागाडीमुळे शहरातील कचराकुंड्याची संख्या कमी झाली होती. कचऱ्या कुंड्यांभोवती तयार होणारे कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट कमी झाल्याने नाशिकचा ‘झिरो गार्बेज सिटी’ म्हणून देशभर नावलौकिक होता. परंतु, अधिकाऱ्यांच्या ठेकेदारप्रेमामुळे, तसेच लोकप्रतिनिधींचीही ठेकेदारांवर माया वाढल्याने आदर्श घंटागाडी योजनेलाच घरघर लागली होती. त्यामुळे पुन्हा शहरात कचऱ्याचे साम्राज्य उभे राहण्यास सुरुवात झाली. त्यावर उपाय म्हणून पुन्हा घंटागाडी ठेकेदारांना आमंत्रण देण्यात आले. त्यासाठी महापालिकेनेच घंटागाड्या विकत घेऊन त्या ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात आल्यात.

आरोग्य विभाग आणि ठेकेदारांच्या संगनमताने पुन्हा घंटागाड्यांचा ठेका पाच वर्षांसाठी देण्यात आला. त्यासाठी नवीन घंटागाड्या खरेदीची अट ठेकेदारांना घालण्यात आली. यासाठी घंटागाडीचा ठेका तब्बल १७६ कोटींपर्यंत वाढविण्यात आला. ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणाची अट नव्या ठेक्यात अंतर्भूत होती. घंटागाडी योजनेत सुधारणा व्हावी, शहरातील कचऱ्याची समस्या दूर व्हावी, या यामागील उद्देश होता. त्याची सर्व व्यवस्था ही घंटागाडी ठेकेदारानेच करायची होती. परंतु, ठेकेदारांच्या दावणीला बांधलेल्या आरोग्य विभागाने ओला व सुका कचऱ्यासाठी पुन्हा शहरात कचरापेट्या आणि ब्लॅकस्पॉटला आमंत्रण देण्याचे धोरण स्वीकारले. ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमताने पुन्हा ओला व सुका कचऱ्यासाठी दोनशे प्लास्ट‌िकच्या कचरापेट्या खरेदी करण्यात आल्या आहेत. ओला व सुका कचरा स्वतंत्र घेण्याच्या नावाखाली शहरात तब्बल २०० ठिकाणी कचरा पेट्या उभारण्याचा उफराटा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी २१ लाख रुपयांचा खर्चदेखील करण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या भूमिकेवरच आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.

कचरास्पॉट वाढणार

शहरात महापालिकेच्या दप्तरी सध्या साडेचारशे कचऱ्याचे ब्लॅकस्पॉट आहेत. यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच, पुन्हा कचरापेट्या लावण्याचा उद्योग करण्यात आला आहे. या कचरापेट्यांमुळे नागरिकांमध्ये पुन्हा घंटागाडीत कचरा टाकण्याची सवय मोडेल. ते पुन्हा कचरापेट्यांमध्ये कचरा टाकण्यासाठी प्रवृत्त होणार आहेत. त्यामुळे कचरापेट्यांच्या अवतीभवती कचरा जमा होऊन दुर्गंधी वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये चुरशीची लढाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. थेट नगराध्यक्षपदाची ही निवडणूक भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रदेशाध्यक्षांना त्र्यंबकमध्ये उतरवत डागलेल्या तोफांचा नेमका किती परिणाम साध्य होतो ते स्पष्ट होणार आहे. भाजप, सेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या आजी-माजी आमदार, खासदार तसेच प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांनी तळ ठोकून केलेले नियोजन आज दिसून येणार आहे.

त्र्यंबकच्या मतदारांनी १९७४ आणि २००२ या दोन निवडणुकांमध्ये थेट नगराध्यक्ष निवडून दिले होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या हद्दवाढीने दोन हजारांच्या आसपास मतदार नव्याने जोडले गेले आहेत. शहराची लोकसंख्या १२,५०० आहे तर मतदारांची संख्या १०,६१४ इतकी आहे. यामध्ये महिला मतदार ५४२३ आणि पुरूष मतदार ५१९१ इतके आहेत.

नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार, तर ८ प्रभागांतील १७ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी भाजपचा एक उमेदवार बिनविरोध झालेला आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यासाबत चार अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. प्रभागांमध्ये भाजप १७, शिवसेना १०, काँग्रेस १२, राष्ट्रवादी ४ आणि १४ अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरोग्य’ची चमकोगिरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या आरोग्य विभागाने घंटागाडी प्रभागात जातानाचा मार्ग ठरवून दिलेला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हजेरी शेडवर नगरसेवकांचा प्रभाग व नावे यांचा फलक लावण्यात आलेले आहेत. मात्र, त्यावर माजी नगरसेवकांचीच नावे अद्यापही कायम असल्याचे सभापती माधुरी बोलकर यांच्या पाहणी दौऱ्यात आढळून आले. तेथील कामकाजात इतरही अनेक त्रुटी आढळून आल्याने आरोग्य विभाग चमकोगिरी करीत असल्याचा आरोप सभापती बोलकर यांनी केला.

आरोग्य विभागात चालणाऱ्या अनागोंदी कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे याबाबत माहिती घेण्यासाठी केलेल्या या पाहणीदौऱ्यात अनेक त्रुटी आढळून आल्याने त्या दूर करण्यासह तेथील फलक तात्काळ हटविण्याचे आदेश सभापती बोलकर यांनी कर्मचाऱ्यांना दिले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ फलक हटविले. परंतु, आता आरोग्य विभागाकडून तेथे नवीन फलक कधी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या एकंदर प्रकाराबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सभापती बोलकर यांनी सांगितले.

महापालिकेची निवडणूक होऊन दहा महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र, असे असतानादेखील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या हजेरी शेडवर जुन्याच नगरसेवकांचे फलक झळकत असल्याचे सातपूरच्या सभापती बोलकर यांच्या पाहणी दौऱ्यात आढळल्यावर सभापतींनी आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता घंटागाडीचा मार्ग दर्शविण्यासाठी फलक लावण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. परंतु, संबंधित फलकावर जुन्याच नगरसेवकांची नावे असल्याने ती काढण्यात का आली नाहीत, असा सवाल सभापती बोलकर यांनी उपस्थित केला. त्यानंतर जुने फलक आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ हटविले.

--


नेमलेल्या ठिकाणी कामच नाही

नागरिकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींनंतर हा पाहणी दौरा सभापतींनी आयोजिक केला होता. त्यात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी नेमलेल्या ठिकाणी कामच करीत नसल्याचे आढळले. त्याचप्रमाणे कामकाजात इतर त्रुटीदेखील आढळल्याने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सभापती बोलकर यांनी यावेळी सांगितले.

--

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हजेरी शेडवर पाहणी केली असता घंटागाडीसाठी लावण्यात आलेल्या मार्गाच्या फलकांवर जुन्याच नगरसेवकांची नावे दिसली. संबंधित फलक तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे.

-माधुरी बोलकर, सभापती, सातपूर प्रभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचएएलला सुखोईचे गिफ्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाचव्या पिढीतील अत्याधुनिक लढाऊ विमानांची निर्मिती हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या ओझर आणि बंगळुरू येथील प्रकल्पामध्ये केली जाईल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली, तसेच येत्या २०३० पर्यंत ओझर एचएएलला सुखोईचे काम राहणार असल्याचे सांगून डॉ. भामरे यांनी नाशिककरांना सुखद धक्का दिला आहे.

नाशिक ‘एचएएल’तर्फे आयोजित खासगी सहकारी भागीदारी संमेलन २०१७ वेळी डॉ. भामरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ओझर येथील एचएएलच्या कारखान्यात सुखोई या लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात येत आहे. रशियन सरकारच्या सहयोगाने निर्मिती होणाऱ्या सुखोई या विमानाचे भारतीयीकरण करण्यात आले आहे. येत्या २०१९ पर्यंत या विमानांच्या निर्मितीचे काम ओझर एचएएलकडे आहे. मात्र, त्यानंतर काय असा प्रश्न एचएएलच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. याची दखल घेण्यात आली असून, सुखोई विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम ओझर एचएएलमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे २०३० पर्यंत हे काम पुरेल, असे डॉ. भामरे यांनी सांगितले. त्याशिवाय पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांची निर्मिती सध्या प्रस्तावित आहे. त्या संदर्भात संरक्षण मंत्रालय आवश्यक ती कार्यवाही करीत आहे. या विमानांची निर्मिती बंगळुरू आणि ओझर येथील प्रकल्पांमध्ये करावी, असे निर्देश एचएएलचे चेअरमन यांना देण्यात आल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

डीटीएलचा सन्मान

सुखोई विमानासाठी लागणारे विविध पार्टस खासगी कंपन्यांकडून खरेदी केले जातात. मेक इन इंडिया या मोहिमेंतर्गत संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योगांना संधी दिली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुखोईच्या निर्मितीत शेकडो उद्योजकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. डायनामॅटिक टेक्नॉलॉजीज या बंगळुरूच्या कंपनीतर्फे सुखोईसाठी लागणारा शंभरावा भाग शनिवारी प्रदान करण्यात आला. त्याचा स्वीकार डॉ. भामरे आणि एचएएलचे चेअरमन टी. सुवर्ण राजू यांनी केला. याप्रसंगी डीटीएलचे एमडी व सीईओ उदयनाथ मल्होत्रा उपस्थित होते.

पीपीपी तत्त्व वाढविणार

संरक्षण क्षेत्रात खासगी सहकारी भागीदारी (पीपीपी)चा अतिशय प्रभावी वापर केला जाणार आहे. त्यामुळे परदेशातून होणारी आयात कमी करण्यात येईल. नवीन उद्योगांना संधी मिळेल, शिवाय याद्वारे गुंतवणूक येईल. परदेशी उद्योजकांनाही याचा लाभ घेता येईल. यासाठी त्यांना तंत्रज्ञान हस्तांतर करावे लागेल, असे डॉ. भामरे आणि राजी यांनी सांगितले.

ओझर एचएएलचे कौतुक

सुखोई विमानावर ब्राह्मोसचे यशस्वी आरोहण ओझर एचएएलमध्ये करण्यात आले. सुखोईच्या निर्मितीत खासगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली. ही बाब लक्षात घेऊन डॉ. भामरे आणि राजू यांनी ओझर एचएएलचे कौतुक केले. याप्रसंगी ओझर एचएएलचे सीईओ दलजितसिंग, सेमिलॅकचे सीईओ पी. जयपाल, डीजीएक्यूएचे अतिरिक्त संचालक निर्मल थिसाई उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी आत्महत्यांत ५० टक्क्यांहून अधिक तरुण

$
0
0

नाशिक ः जगाचा पोशिंदा म्हणून अहोरात्र राबणाऱ्या बळीराजाच्या मानेवरील अनंत अडचणींचा जू काही केल्या उतरण्यास तयार नाही. त्यामुळेच शेतकरी मरणाला जवळ करीत असून यंदाच्या वर्षी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये निम्म्याहून अधिक शेतकरी तरुण आहेत. यंदा सर्वाधिक १०१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यामध्ये २० ते ४९ वयोगटातील ६७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्यात पहिली शेतकरी आत्महत्येची घटना विदर्भात १९९५ मध्ये घडली होती. तेव्हापासून लागलेले शेतकरी आत्महत्यांचे ग्रहण गेल्या २२ वर्षांत सुटू शकलेले नाही. किंबहुना वर्षानुवर्ष आत्महत्यांची संख्या वाढतेच आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या तुलनेने नाशिकसारख्या सधन जिल्ह्यातदेखील शेतकरी मेटाकुटीला येऊन जीवनयात्रा संपवित आहे. संकटांच्या मालिकेपेक्षा मृत्यू परवडला, ही भावनाच शेतकऱ्यांना जीवनयात्रा संपविण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याचे मत जाणकारांकडून नोंदविले जात आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये तरुणांपासून वृध्दावस्थेला पोहोचलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यात यंदा प्रथमच शेतकरी आत्महत्यांच्या घटनांनी शंभरी गाठली आहे. गतवर्षी अशा ८७ घटनांची नोंद झाली होती. यंदा जानेवारी ते ९ डिसेंबर २०१७ या कालावधीत ही संख्या १०१ पर्यंत गेली आहे. त्यामुळे आत्महत्यांच्या या वाढत्या घटनांनी सरकार आणि प्रशासनापुढे आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे यंदा आत्महत्या करणारा एक शेतकरी अवघ्या १९ वर्ष वयाचा आहे, तर एक ७९ वर्ष वयाचे आजोबा आहेत. निफाडसारख्या सधन तालुक्यात तर शेतकरी महिलेने आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याने जिल्हा प्रशासनाला नोंद घ्यावी लागली. विशेष म्हणजे सुरगाणा या आदिवासी तालुक्यातदेखील पहिल्यांदाच शेतकरी आत्महत्येची नोंद झाली. त्यामुळे दुर्दैवाने यंदाचे वर्ष शेतकरी आत्महत्यांच्या दृष्टीने सर्वव्यापी ठरले.

नकळत्या वयातच जबाबदाऱ्यांचे ओझे

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या ज्या घटना घडल्या त्यापैकी सर्वाधिक आत्महत्या ४० ते ४९ वयोगटातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. अशा २७ घटनांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तर ५० ते ५९ वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या २२ आहे. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीने अजून तारुण्यात देखील प्रवेश केला नसून आतापासूनच संसाराची चिंता वाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. २० ते ३९ या वयोगटातील ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे नकळत्या वयातच त्यांच्या बालकांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे. एकीकडे बेरोजगारी, महागाई यामुळे शेतकरी कुटुंबातील तरुण हवालदिल झाला असताना शेतीतूनही हाती काही लागत नसल्याने तो नैराश्याने ग्रासला जात आहे.

वयोगट शेतकरी आत्महत्या

० ते १९ १

२० ते २९ १७

३० ते ३९ २३

४० ते ४९ २७

५० ते ५९ २२

६० हून अधिक ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दातृत्वातून कायापालट

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पडकी इमारत, फुटकी कौले, भौतिक सुविधांचा आभाव असे चित्र उभे राहते. मात्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे हे उदासीन चित्र आता पालटू लागले आहे. देवघट (ता. मालेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला कधीकाळी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जाऊन टाळे लागले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत विविध या शाळेने कात टाकली आहे. कसमादे परिसरातील शाळांसाठी ही शाळा रोल मॉडेल ठरली आहे.

उपक्रम व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेत शिक्षकांनी शाळेचा नावलौकिक वाढवला. याची दखत घेत मुंबई येथील सामाजिक संस्था एम्पथी फाउंडेशन व जिल्हा परिषद नाशिक यांच्या सौजन्याने शाळेची भव्यदिव्य इमारत उभी राहिली. या कायापालट झालेल्या जिल्हा परिषद देवघट शाळेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. देवघट येथील शाळेची तीन वर्षांपूर्वीची अवस्था इतर जिल्हा परिषद शाळांसारखीच होती. शिक्षकांची कमतरता होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून येथील शिक्षकांनी विविध उपक्रमांनी, स्पर्धा परीक्षेतील यशाने शाळेचा कायापालट करायला सुरुवात केली. आज संपूर्ण जिल्हाभरात देवघटची शाळा एक कुतूहलाचा विषय बनली आहे.

गावाशी कुठलीही ओळख, नातगोत नसताना मुंबई येथील एम्पथी फाउंडेशनने दाखवलेल्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एम्पथी फाउंडेशनने सुसज्ज दहा वर्गखोल्या, मुख्याध्यापक कार्यालय, संगणक कक्ष, मुलामुलींसाठी व दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची निर्मिती केली. ही भव्य शालेय इमारत आज देवघट गावाच्या लौकिकात भर घालत आहे. तसेच आदिवासी, शेतकरी, मजूर यांनी पाचशे ते लाखापर्यंत देणगी देत जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला. पुढील वर्षी ग्रामस्थांचा आठवीचा वर्ग सुरू करण्याचा मानस आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार भौतिक सुविधांसह शिक्षण मिळावे म्हणून राज्यभरातून आजपर्यंत १४८ शाळा एम्पथी फाउंडेशनने निर्माण केल्या आहेत. देवघट शाळेचा नावलौकिक व प्रत्यक्ष शिक्षकांची तळमळ पाहून फाउंडेशनने शाळेचे स्वप्न साकार केले. - शांतिलाल छेडा,

सहाय्यक कार्यकारी विश्वस्त,

एम्पथी फाउंडेशन, मुंबई

देवघट येथ सुसज्ज शालेय इमारतीचे निर्माण झाले आहे. शाळेच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांनी तर इमारत संरक्षणासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. एम्पथी फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे.

- संदीप पाटील, शिक्षक देवघट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकअदालत व्हावी लोकचळवळ!

$
0
0

टॉक टाइम

-----

लोकअदालत व्हावी लोकचळवळ!

--

नाशिक जिल्ह्यात एका दिवसात एक लाख २७ हजार ४ खटले निकाली काढण्याचा विक्रम करण्यात आला. राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून १२६ कोटी रुपयांची वसुली झाली. न्याय व्यवस्थेने व त्या अनुषंगाने सरकारी यंत्रणेने केलेला हा चमत्कारच म्हणावा लागेल. लोकअदालत ही लोकचळवळ म्हणून पुढे आल्यास न्याय व्यवस्थेचा चेहेरामोहराच बदलेल, अशी अपेक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी व्यक्त केली. लोकअदालत या संकल्पनेविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...

----

-प्रलंबित व दावापूर्ण खटले निकाली काढण्याचा पुन्हा विक्रम झाला. ही अशक्य वाटणारी बाब शक्य कशी झाली?

-शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हटले जाते. खटल्यांच्या सुनावणीसाठी जाणारा वेळ, त्या कुटुंबाला होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास पाहता ही म्हण खोटी म्हणता येणार नाही. एकदा का पक्षकारास तारखा सुरू झाल्या, की त्याच्या पुढील दोन ते तीन पिढ्यांना न्यायासाठी झगडत बसावे लागते. न्यायदानास विलंब होणे, ही बाब चुकीची असली, तरी न्याय व्यवस्थेवर पडणारा भार, मनुष्यबळ, इन्फ्रास्ट्रक्चर अशा वेगवेगळ्या घटकांमुळे याकडे दुर्लक्ष होते. या पार्श्वभूमीवर लोकअदालतीचा सक्षम पर्याय पुढे आणण्यात आला. मागील दोन लोकअदालतींत आपण जवळपास दीड लाख प्रलंबित आणि दावापूर्व प्रकरणांत तडजोड घडवून आणली. प्रलंबित प्रकरणांवर कोर्टात सुनावणी सुरू होती, तर दावापूर्व प्रकरणांमध्ये भविष्यात सुनावणी सुरू झाली असती. भविष्यात कधी तरी निकाल लागला असता. तो मान्य झाला नसता, तर हे प्रकरण पुन्हा वरिष्ठ कोर्टासमोर आले असते. लोकअदालतीच्या माध्यमातून आपण प्राथमिक स्तरावर दोन्ही पक्षांत समझोता करण्यात यशस्वी ठरलो. अर्थात, याचे श्रेय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासह बार असोसिएशन, पोलिस दल किंबहुना न्याय व्यवस्थेशी संबंधित प्रत्येक घटकाला देणे उचित ठरेल.

-शनिवारच्या लोकअदालतीत थकबाकी करांची वसुली झाली, हासुद्धा एक विक्रमच म्हणावा लागेल...

-राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून आपण जवळपास १२६ कोटी रुपयांची वसुली केली. जिल्हाभरातील ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच १०० टक्के वसुली झाली. या माध्यमामुळे किमान वसुलीची टक्केवारी ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचली. कराची रक्कम वसूल होत नसल्याने हैराण झालेल्या काही ग्रामपंचायतींनी या यशामुळे फटाके फोडून आनंद साजरा केला. वसूल झालेला पैसा शेवटी समाजाच्या भल्यासाठी वापरला जातो. कायदेशीरदृष्ट्या कर्ज माफ होऊ शकते. मात्र, कर माफ होत नाही. कराची रक्कम फारतर कमी होऊ शकते. मात्र, नागरिक चालढकल करतात. लोकअदालतीच्या माध्यमातून आम्ही हाच मुद्दा जनतेसह प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. आजचे मरण उद्यावर ढकलण्यात काहीही साध्य नाही. त्यापेक्षा तडजोड करून पुढे जाणे आवश्यक ठरते.

-यात इतर यंत्रणांचा सहभाग कसा महत्त्वाचा ठरतो?

-पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, बँका, इन्शुरन्स कंपन्या, औद्योगिक महामंडळ अशा संस्थांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाद होत असतात. कराची थकबाकी वसुली, जमीन अधिग्रहण प्रक्रिया असे विषय मार्गी लागत नाहीत. वर्षानुवर्षे परिस्थिती कायम राहते. चेक बाऊन्स प्रकरणातदेखील प्रारंभी वादानंतर खटला दाखल करण्यात येतो. अशा वेळी लोकअदालत मध्यस्थ म्हणून काम करते. दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवून त्यांना एक पाऊल मागे जाण्यास प्रवृत्त करून सर्वमान्य तोडगा काढण्यात येतो. शनिवारच्या लोकअदालतीत एका केसमध्ये २५ कोटी रुपयांची तडजोड करण्यात यश मिळाले. लोकअदालत ही व्यापक संकल्पना असून, सर्वच सरकारी, निमसरकारी, महामंडळे यात सहभागी होऊ शकतात. तीन महिन्यांपूर्वी आयोजित लोकअदालतीचा अनुभव यावेळी कामी आला. त्यामुळे सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन हे यश मिळविता आले.

-तरीही तीन लाखांपेक्षा अधिक पक्षकारांना नोटिसा बजावणे, त्यांना प्रवृत्त करणे ही सोपी बाब नाही...

-लोकअदालतीचा फायदा घेऊन वाद मिटविणे हीच काळाची गरज आहे. नागरिकांना सर्वच बाबतींत दिलासा देणारी लोकअदालत लोकचळवळ होणे गरजेचे आहे. त्यासाठी न्याय व्यवस्थेने झटणे हे आद्यकर्तव्य असल्याचे माझे मत आहे. आम्ही प्रयत्न केला, त्यात यश मिळाले. त्यामुळे नवी उभारी मिळाली. यावेळेस आम्ही सर्वच विभागांची पाच ते सहा वेळा बैठक घेतली. आमचे काही न्यायाधीश रस्त्यावर उतरले. पथनाट्यांमध्ये सहभागी होऊन त्यांनी लोकअदालतीचे महत्त्व पटवून दिले. काही न्यायाधीशांनी तर वेळ मिळेल त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य असो, की पोलिसपाटील त्यांना बोलावून मार्गदर्शन केले. एका चळवळीची ही सुरुवात असून, त्याचा जनतेला निश्चित फायदा होणार आहे.

-लोकअदालतीसाठी काही टार्गेट असते का?

-नाही, असे कधीही होत नाही. प्रलंबित खटल्यांच्या संख्येनुसार नाशिकचा क्रमांक राज्यात सातवा किंवा आठवा असेल. आमचा प्रयत्न फक्त जास्तीत जास्त खटल्यांमध्ये तडजोड व्हावी, असा आहे. त्यामुळे न्याय व्यवस्थेतील सध्याचा आणि भविष्यात पडणारा ताण कमी होतो, हे लक्षात घ्यावे. लोकअदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासह संपूर्ण यंत्रणा अडीच महिने झटून काम करते. तीन लाखांपेक्षा नोटिसा तयार करणे, स्वाक्षऱ्या करणे आणि त्या वेळेत वितरित करणे यातच सर्व काही येते. त्यासाठी आम्ही दिवस-रात्र काम करतो. त्याचा परिणाम म्हणून प्रकरणे निकाली निघतात आणि थकबाकीची वसुली होते.

-यानिमित्ताने नागरिकांसाठी काही आवाहन करणार का?

-नक्कीच, जलदगतीने न्याय मिळविण्यासाठी, तसेच तंटे मिटविण्यासाठी लोकअदालत हा सक्षम पर्याय आहे. पक्षकारांनी त्याचा फायदा घ्यायलाच हवा. एखाद्या भांडणाचे भिजत घोंगडे ठेवल्यास त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. कोणताही वाद सामोपचाराने मिटविता येतो.

--

(शब्दांकन ः अरविंद जाधव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्न‌तिथीमुळे औरंगाबाद हायवेवर मेगाब्लॉक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रविवारी आलेल्या दाट लग्नतिथीमुळे नाशिक-औरंगाबाद हायवेवर वाहतुकीचा मेगाब्लॉक झाला. आडगाव नाका ते नांदूर नाका या परिसरात दाटीवाटीने असलेल्या लॉन्समध्ये येणाऱ्या वऱ्हाडींची पार्किंग रस्त्यावरच होत असल्यामुळे दरवर्षी लग्नांच्या सिझनमध्ये हा हायवे ब्लॉक होतो. रविवारी मुहूर्त असल्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. पर्याय म्हणून मुंबई-आग्रा महामार्गाने वळालेल्या वाहनांमुळे तो मार्गही वाहतुकीच्या कोंडीत अडकला.

औरंगाबादरोडचा निलगिरीबाग परिसर, शिवनगर, निमसे बंगला, हनुमाननगरकडे जाणारा रस्ता या पट्ट्यात लॉन्सची संख्या जास्त आहे. याच परिसरात रविवारी (दि. १०) सायंकाळी सहा वाजेपासून वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली. ही कोंडी वाढत गेल्यामुळे लग्नाच्या वऱ्हाडी मंडळींसह बसने प्रवास करणारे लांबच्या पल्ल्याचे प्रवाशी अडकून पडले. अनेकांना तर ट्रॅफिक एवढी जॅम कशी झाली, हा प्रश्न पडला. अडकलेल्या वाहनांना मार्ग मिळणे अवघड असल्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.

या भागात येणारी वाहने शक्यतो लग्नाला आलेली होती. त्यांना त्यांच्या लग्नाच्या ठिकाणापर्यंत वेळेत पोहचणे शक्य झाले नाही. लग्न तिथीचा वेळ टळून गेला तरी ते वाहतूक सुरळीत होण्याच्या प्रतीक्षेत रस्त्यातच थांबून वैतागून गेले होते. त्यात महिला आणि लहान मुले असल्यामुळे त्यांचे फारच हाल झाले. लग्नसराईच्या काळात या भागात होणारी वाहतुकीची कोडी ही समस्या नित्याची झालेली आहे. अद्याप त्यावर उपाय शोधण्यात आलेला नाही. अशा प्रकारची समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर होत असलेल्या वाहनांच्या पार्किंगवर प्रतिबंध घालणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे या समस्येचा त्रास इतरांनाही सहन करावा लागत आहे.

काही वर्षांपूर्वी या रस्त्यावर लग्नाच्या वराती काढण्याची प्रथा होती. त्यावेळी ट्रॅफिकला त्याचा अडथळा होत असल्यामुळे अशा प्रकारच्या वरातींना पोलिस प्रशासनाने बंदी घातली. त्यानंतर ही समस्या सुटली होती. येथील वाहतूक सुरळीत होऊ लागली असताना वाहनांची रस्त्यावरच होणारी पार्किंगमुळे हा त्रास होऊ लागला आहे. त्यावर उपाय योजना केली नाही तर प्रत्येक दाट लग्नतिथीच्या काळात याच समस्येला वाहनाचालकांना तोंड देण्याची वेळ येणार आहे.

चारचाकींमुळे वाढली समस्या

पूर्वीच्या दुचाकींची जागा आता चारचाकी वाहनांनी घेतली आहे. एकटा माणूससुद्धा चारचाकी वाहनानेच लग्नकार्यास येत असल्यामुळे चारचाकींची संख्या वाढून या समस्येत भर पडत आहे. त्यात प्रत्येकजण सोयीनुसार वाहनांची पार्किंग करीत असल्यामुळे इतर वाहनांची कोंडी होते. अनेक लॉन्सवर वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध असतानाही वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. जेणेकरून तेथून निघताना आपल्या वाहनाला अडथळा निर्माण होऊ नये. मात्र, त्यांच्याप्रमाणेच इतरही वाहनचालक हाच विचार करीत असल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत जाऊन रस्त्यावरील वाहने अडकून पडतात.

भाजीबाजाराची भर

न‌िलगिरी बाग येथे रविवारी भाजीबाजार भरतो. या भाजीबाजारात येणाऱ्या विक्रेत्यांच्या आणि ग्राहकांच्या वाहनांचीही या गर्दीत आणखी भर पडली. ग्राहकांना भाजीपाला खरेदी करून बाहेर पडणे मुश्किल झाल्याने तेही अडकून पडले. दुचाकीस्वार रस्त्यात जिथे जागा मिळे तेथून आपले वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करीत होते. राँग साइडने वाहने नेण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे वाहतुकीला आणखी अडथळा निर्माण होत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिक्रमेत आढळली समस्याग्रस्त गोदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरी नदीविषयीच्या गप्पाटप्पाच्या कार्यक्रमातून सुचलेल्या गोदावरी परिक्रमेच्या संकल्पनेस रविवारी (दि. १०) मूर्त रूप देण्यात आले. गोदावरीवर प्रेम करणाऱ्या सुमारे पन्नास जणांनी या परिक्रमेत सहभागी होऊन रामकुंडापासून ते तपोवनातील कपिला संगमापर्यंत गोदात्राच्या दोन्ही भागांतून परिक्रमा पूर्ण केली. यावेळी सर्वांना समस्याग्रस्त गोदावरीचे दर्शन झाले.

रविवारी सकाळी दुतोंड्या मारुतीसमोरील अहिल्यादेवी व्यायामशाळेच्या परिसरापासून परिक्रमेस सुरुवात करण्यात आली. शहर परिसरातील गोदाप्रेमींबरोबरच जिल्ह्यातील इतर भागांतून अनेकजण परिक्रमेत सहभागी झाले. गोदाकाठाने ही परिक्रमा करीत असताना त्यांना अनेक ठिकाणी गटारीचे पाणी थेट गोदापात्रात मिसळत असलेले दिसले. सध्या नदीला पाणी सोडण्यात आलेले नसल्यामुळे गोदापात्रातील पाणी स्थिर आहे. त्यावर निर्माल्य, प्लास्टिकचा कचरा साचलेला, पाण्याची दुर्गंधी सुटलेली अशी अवस्था बघायला मिळाली. तपोवनातील रामसृष्टी उद्यानातील अॅम्फी थिएटरच्या जागेत परिक्रमा करणारे एकत्र जमले. त्याठिकाणी शिल्पा डहाके, नीलेश गावडे यांनी गोदावरी परिक्रमेविषयीची माहिती दिली. सध्याची गोदावरीची अवस्था कशी आहे, ती कशी बदलता येईल, या परिक्रमेतून नेमके काय करता येईल, गोदावरीचे केवळ सुशोभिकरण करण्याने ही परिस्थिती सुधारणार नाही, या विषयी चर्चा केली. तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ही परिक्रमा करण्याचे निश्चित करण्यात आले. पुढील परिक्रमा ८ जानेवारी २०१८ रोजी होणार असल्याचे सांगितले.

काठाने चालायला जागा नाही

तपोवनातील कपिला संगमावरून परतीच्या मार्गाने गोदावरीचे वास्तव बघत असताना नदीकाठच्या भागातून चालता येईल अशी जागाच नाही. लांबचा पल्ला घेऊन लक्ष्मीनारायण पुलाखालच्या भागातून पुन्हा गोदाकाठाने यशवंतराव महाराज देवमामलेदार पटांगण, होळकर पुलाखालून रामवाडी पुलापर्यंत, रामवाडी पूल ओलांडून गोदापार्कवरून पुन्हा दुतोंड्या मारुती पुलापर्यंतची ही परिक्रमा पूर्ण करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांची वक्रदृष्टी नळांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात स्टील व तत्सम धातूंचे नळ चोरून नेणाऱ्या चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. सिडकोसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात अशा भुरट्या चोऱ्या सर्रास होत असून, चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

दोन दिवसांपूर्वी गंगापूर रोड येथील एका बंगल्यातून सुमारे सहा हजार रुपये किमतीचे नळ चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल झाला. प्रमोद महाजन गार्डनजवळील कलानगर कॉलनीमध्ये हा प्रकार घडला. स्वप्न‌िल सातपूते (वय ४१, रा. चैतन्यनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सिडकोसारख्या परिसरातही नळ चोरीचे प्रकार घडू लागल्याने रहिवाशांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. पहाटे दरवाजांना बाहेरुन कडी लावून टॉयलेट्स व तत्सम ठिकाणचे धातूचे नळ मोकळे करून चोरटे पोबारा करीत आहेत. विशेष म्हणजे चोरी करताना पकडले जाऊ नये यासाठी चोरट्यांकडून पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. पाळत ठेऊन आणि परिसराची पाहणी करून या चोऱ्या होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. नळ चोरीसारख्या भुरट्या चोऱ्यांची माहिती देण्यासाठी नागरिक पोल‌िस चौकी अथवा पोलीस स्टेशनपर्यंत जात नाहीत. याचाच फायदा चोरट्यांकडून घेतला जात आहे. नळ चोरी करणाऱ्या टोळीमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. टोळीतील काही तरुण टेरेसमार्गे घराच्या व्हरांड्यात उतरतात. बहुतांश घरांचे टॉयलेट्स बाहेर आहेत. घर बंद असल्याचा फायदा घेऊन टॉयलेटमधील नळ चोरून नेतात. यावेळी चोरट्यांचा एखादा साथीदार मोबाइलवर बोलण्याच्या किंवा तत्सम बहाण्याने तेथे पाळत ठेवतो. सावतानगर येथील शिवशंकर चौकात अशाच प्रकारे नळ चोरीस गेले आहेत. अनोळखी व्यक्ती संशयास्पद अवस्थेत वावरताना दिसल्यास त्यांना हटकावे असे आवाहन करण्यात येत आहे.


चोरीच्या भीतीने प्लास्ट‌िकचे नळ

नळ चोरताना पाणी प्रेशरने बाहेर फेकले जाऊ नये यासाठी चोरटे पाण्याच्या टाकीचा कॉक बंद करतात. त्यामुळे पाण्याचा आवाज होत नसल्याने चोरट्यांना चोरी करून पसार होणेही शक्य होते. सावतानगर परिसरातील शिवशंकर चौकात अशी घटना घडल्यामुळे तेथील रहिवाशांनी धातूचे नळ काढून घेत प्लास्ट‌िकचे नळ बसविण्यास प्राधान्य दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहक सुखी; उत्पादक दुःखी!

$
0
0

टोमॅटो, शेवगा तेजीत, पोलभाज्यांचे दर कमीच

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आवक वाढल्यामुळे तसेच गुजरातमधून मागणी कमी झाल्यामुळे भाजीपाला दरात दोन आठवड्यानंतरही सुधारणा झालेली नाही. यामुळे ग्राहकराजा समाधानी असला तर, बळीराजा मात्र नाराज झाला आहे. मात्र, टोमॅटो व शेवगा शेंगांना चांगला दर मिळत असल्याने उत्पादकांच्या पदरात दोन पैसे पडत आहेत. टोमॅटोला किलोला ४० रुपये, तर शेवगा शेंगांनाही किलोला ३० ते ४० रुपये दर मिळत आहे.

ऑक्टोबर महिन्यात व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दीडशे रुपये जुडीचा विक्रम करणाऱ्या कोथिंबीरची आवक वाढल्याने दर दहा ते पंधरा रुपये जुडीपर्यंत खाली आले आहेत. मेथीचीही भरमसाट आवक वाढल्याने जुडीला २ ते ७ रुपये दर मिळत आहे. शेपू ८ ते १५ रुपये जुडी तर पालकला जुडीला दोन ते तीन रुपये दर मिळत आहे. कांदापात मात्र भाव खात आहे. कांदापातची जुडी १५ते २० रुपये दराने विक्री होत आहे. पालेभाज्यांच्या आवक चांगली असल्याने दरात सुधारणा होण्याची या महिन्यात तरी शक्यता कमी आहे, असे विक्रेत्याने सांगितले.

फळभाज्यांचे दर टिकून आहेत. टोमॅटोची आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने ४० रुपये दराने विक्री होत आहे. काकडीही २० रुपये किलो दराने विक्री होत आहे. शेवगालाही चांगला दर मिळत आहे. कोबी, फ्लॉवरच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. भेंडी, वांगे, गवार, कारले, गिलके, दोडके या भाज्यांच्या दरात आवकेनुसार चढ-उतार होत आहे.

गुजरातमधून मागणी घटली

नाशिकमधून मुंबई व गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाठवला जातो. सध्या गुजरातमध्ये स्‍थानिक भाजीपाला येत असल्याने नाशिकमध्ये मागणी कमी झाली आहे. याचा फटका भाजीपाला दराला बसत आहे. मुंबईत भाजीपाला पाठवला जात असला तरी आवक जास्त असल्याने दर कमी आहेत.

फळांची बाजारात रेलचेल

साधारणपणे डिसेंबर म‌हिन्यापासून बाजारात फळांची रेलचेल वाढण्यास सुरुवात होते. यामुळे बाजारात सर्व प्रकारची फळे दाखल होत दरही कमी होतात. उन्हाळी फळ म्हणून ओळखले जाणारे टरबूज, पपई, बोर, संत्री, द्राक्ष ही फळे बाजारात दाखल झाली आहेत. आवक चांगली असल्याने सध्या फळांचे दर सर्वसामान्यांच्या आवकेत आहेत.

पपई व बोरांची बाजारात आवक वाढू लागली आहे. याचबरोबरच संत्रीचीही आवक वाढणार असून, दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पपईची ३० रुपये किलोने विक्री होत आहे. त्याचप्रमाणे टरबूज १५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. सफरचंदाचे दर जैसे थे आहेत. मात्र सीताफळांची आवक कमी झाली आहे. यामुळे दरात थोडी सुधारणा झाली आहे. अॅपल बोरांची आवक सुरू झाली असून, ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आवक वाढून दर आणखी थोडे कमी होतील, असे विक्रेत्याने सांगितले.

डाळिंब तेजीत

डाळिंब मार्केट सध्या तेजीत आहे. आरक्ता व सेंद्रिय आरक्ता या दोन जातीचे डाळिंब मार्केटमध्ये भाव खात आहेत. डाळिंबाला किरकोळ बाजारात किलोला ६० ते ८० रुपये दर मिळत आहे. द्राक्ष बाजारात दाखल झाले असले तरी स्‍थानिक बाजारात अद्याप रेलचेल वाढलेली नाही. याशिवाय साखर उतरली नसल्याने द्राक्ष चवीला थोडी आंबट लागत आहेत. स्‍थानिक बाजारात जानेवारीपासून द्राक्षांची आवक वाढण्यास सुरुवात होईल. यामुळे दरही सर्वसामान्यांच्या आवकेत येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रान्स्पोर्टचे प्रश्न सोडवू

$
0
0

आमदार बाळासाहेब सानप यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे ट्रक टर्मिनल व वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवा करणार असल्याची ग्वाही आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली. नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल साई पॅलेस येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.

पदाधिकारी व सदस्यांची निवड ही २०१७ ते २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. पदग्रहण सोहळ्याप्रसंगी हायवे विभागाचे पोलिसप्रमुख सुभाष पवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, एच. पी. कंपनीचे मॅनेजर संजय कुंभारे, बांधकाम व्यावसायिक जयेश ठक्कर, मित्तल लॉजिस्टिकचे महावीर मित्तल, प्रदीप जोहर, सुनील बुरड, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष जयपाल शर्मा, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, सेक्रेटरी सुभाष जांगडा, राजू लोढा, महेंद्रसिंग राजपूत आदी उपस्थित होते. आमदार बाळासाहेब सानप पुढे म्हणाले, की नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनला कामकाजासाठी शहरात विविध विभागांत नाममात्र दरात गाळे व जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शहरात बसमुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नाशिक बससेवेसाठी कन्नमवार पुलाजवळील २५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल. नाशिक शहर वाहतुकीसाठी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष जयपाल शर्मा म्हणाले, की पूर्वी ज्या गतीने नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे काम सुरू होते, त्याच गतीने पुढेही कामकाज सुरू राहील. प्रास्ताविक राजेंद्र फड यांनी केले. ओझर, शिंदे व विल्होळी टर्मिनलचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावे, अशी मागणी सानप यांच्याकडे करण्यात आली.

सामूहिक शपथ

प्रारंभी अध्यक्ष जयपाल शर्मा व वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड यांच्या जीवन परिचय व कार्याविषयी चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी बेटी बचाव बेटी पढाओसाठी नाशिक ते शिर्डी धावलेले नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सेक्रेटरी सुभाष जांगढा यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राजकुमार शर्मा यांनी सामूहिक शपथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकअदालतीत विक्रमी वसुली

$
0
0

टीम मटा

जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या लोकअदालतीला प्रतिसाद मिळाल्याने विक्रमी वसुली झाली. निफाड, पिंपळगाव बसवंत, सिन्नर व नांदगाव तालुक्यात प्रथमच लोकअदालतीतून थकीत वसुली मोठ्या प्रमाणात झाली. यामुळे लोकअदालत यशस्वी झाली.

निफाडमध्ये प्रतिसाद

निफाड : निफाड न्यायालयाने आयोजित केलेल्या लोकअदालतीत ११९ ग्रामपंचायतींच्या थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीतून ३ कोटी २८ लाख ६७ हजार ८२४ रुपये इतकी विक्रमी वसुली झाल्याची माहिती गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी दिली.

निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत विभागाचे निफाड न्यायालयात एकूण थकबाकीदाराचे ३५,५३९ दावे दाखल होते. पैकी १२,०२२ दावे निकाली निघाले आहेत. निकाली काढण्यात आलेल्या दाव्याची वसूल झालेली रक्कम रुपये २ कोटी ७८ लाख ६३ हजार ३७ रुपये इतकी आहे. तसेच पिंपळगाव न्यायालयाच्या आवारात एकूण दावे ९९३९ दाखल होते. त्यापैकी १५५४ दावे निकाली निघाले आहेत. या अंतर्गत ५० लाख ४ हजार ७८७ रुपये वसूल झाले आहेत. निफाड तालुक्यात एकूण ४५ हजार ४७८ दाव्यांपैकी १३,५७६ दावे निकाली निघाले. त्याअंतर्गत ३ कोटी २८ लाख ६७ हजार ८२४ रुपये इतकी विक्रमी वसुली झाली.

सिन्नरला ३५ हजार प्रकरणांचा निपटारा

सिन्नर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शहर तालुका विधी समिती, सिन्नर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयात ३५ हजार ८७५ इतकी विक्रमी प्रकरणे निकाली निघाली असून विविध विभागांची ९ कोटी २ लाख ३१ हजारा रुपये यावेळी वसुली करण्यात आली. या लोकन्यायालयाचे उद्घाटन सिन्नर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. सी. रामदीन यांनी केले. यावेळी कनिष्ठ न्यायाधीश डी. एस. जाधव, न्यायाधीश व्ही. एस. वाघ, वकील संघाचे अध्यक्ष अरुण गुरुळे आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत प्रकरणे : १०८७२, निकाली प्रकरणे - ५०५९, एकूण वसुली : १ कोटी २७ लाख ४५ हजार

४८२२ प्रकरणांमध्ये नांदगावात तडजोडी

मनमाड : नांदगाव येथे न्यायालयाच्या तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विविध संस्थांची ४८२२ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन तब्बल ७२ लाख ५९ हजार ८९२ रुपये एवढी विक्रमी वसुली झाली.

या वसुलीत सर्वाधिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या ३८८७ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ५२ लाख ४४ हजार ४९ रुपये वसूल करण्यात आले. तसेच भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यांची तीन प्रकरणात तडजोड होऊन एकत्रीत रक्कम १३ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे ७५ प्रकरणात तडजोड होऊन ३ लाख २५ हजार रुपये, तहसील कार्यालयांतर्गत ३४८ प्रकरणात ३ लाख ३९ हजार ४९३ रुपये, नगरपरिषद कार्यालय १३ लाख २० हजार ४५० रुपयांचा समावेश आहे. न्यायालयाच्या प्रलंबित केसेस अंतर्गत मोटार वाहन कायद्यान्वये ८७ प्रकरणात तडजोड होऊन १७ हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले होते. तसेच, प्रलंबित प्रकरणांपैकी चार दिवाणी प्रकरणे व इतर सहा प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकअदालतीचे उदघाटन दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे करण्यात आले. यावेळी पॅनलप्रमुख पी. आर. दांडेकर, पॅनल सदस्य व्ही. पी. आहेर, नायब तहसीलदार योगेश जमदाडे, गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वांगडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या करा अस्वच्छतेची तक्रार

$
0
0

मनमाड पालिकेचे नागरिकांसाठी स्वच्छता अॅप

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शहरात कुठे कचरा गाडी आली नाही किंवा घराजवळ कुठे एखादे मृत जनावर मरून पडलेय तर आता नगरपालिकेत जाण्याची किंवा पालिका कर्मचाऱ्याला शोधून तक्रार देण्यासाठी धडपड करण्याची गरज नाही. मनमाडकर नागरिक थेट पालिकेच्या स्वच्छता अॅपवर किंवा पालिका फेसबुक पेजवर जाऊन तक्रार नोंदवू शकतात. तशी व्यवस्था राज्य सरकारच्या प्रकल्पांतर्गत मनमाड पालिकेने उपलब्ध करून दिली आहे.

अस्वच्छतेमुळे मनमाडमध्ये नेहमीच ओरड केली जाते. यामुळे पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी अॅप उपलब्‍ध करून दिले आहे. तुमच्या मोबाइलवर संबंधित अॅप डाउनलोड करा किंवा पालिकेच्या फेसबुक पेजला भेट देऊन तक्रार मांडा. तुमच्या तक्रारींचे त्वरित निवारण होईल याची ग्वाही पालिका प्रशासनाने दिली आहे. आजवर या अॅपवर ५० नागरिकांनी तक्रारी दिल्या असून, प्राप्त तक्रारींपैकी ३५ तक्रारींची दखल पालिका प्रशासनाने घेतल्याची माहिती या प्रकल्पाच्या समन्वयक मनीषा धांडे यांनी दिली.

चारशे नागरिकांचा प्रतिसाद

स्वच्छता अॅप डाउनलोड करण्यासाठी पालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. आजवर ४०० लोकांनी हे अॅप डाउनलोड करून मनमाडच्या स्वच्छतेबाबतच्या प्रकल्पाला प्रतिसाद दिला आहे. समन्वयक मनीषा धांडे बोराडे यांनी प्रयत्न करून तयार केलेल्या मनमाड पालिकेच्या फेसबुक पेजला चांगली पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यात निवडक पालिकांना राज्य सरकारतर्फे हा स्वच्छता अॅप प्रकल्प व त्यासाठी समन्वयक व्यवस्था करण्यात आली आहे. जास्तीत जास्त किती लोक अॅप डाउनलोड करतात यावरून नामांकने ठरणार आहेत. यामुळे अॅपा डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अॅपसाठी माहिती

हे अॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरमध्ये Swachhata - MoHUA लिहा. डाऊननोड करून इन्‍स्टॉल केल्यानंतर ओपन करा. आपली भाषा निवडा. आपला इंटरनेट कनेक्शन असलेला मोबाइल नंबर नोंदवा व नेक्‍स्ट दाबा. मेसेजने आलेला ओटीपी क्रमांक नोंदवून कन्टीन्यू दाबा. लोकेशनवर जाऊन MANMAD MAHARASHTRA महाराष्ट्र निवडून डन दाबा.

पालिकेचे नागरिकांना आवाहन

मनमाड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रकल्पात सहभाग घेणे आवश्यक असल्याचे नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी स्पष्ट केले आहे. समन्वयक मनीषा बोराडे यांनी या अॅपवरील तक्रारींचे निवारण लवकर करण्याकडे प्रशासनाचा कल असल्याचे सांगितले. मनमाडच्या स्वच्छतेसाठी फेसबुक मोबाइल अॅपद्वारे प्रयत्न ही बाब नागरिकांना दिलासा देणारी बाब ठरणार आहे.

अॅपवर नोंदवा तक्रारी

कचरा गाडी आली नाही, मृत जनावरे, सार्वजनिक शौचालय कार्ड व वीजजोडणी, रस्ते सफाई, कचरा कुंडी तक्रार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनुष्यमात्राचे कल्याण हे शास्त्रांचे अंतिम ध्येय’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपली शास्त्रे आपल्या मातीत बसून आपल्याच माणसांकडून शिकली पाहिजे, कारण ती बाहेर जाऊन इतर नको त्या गोष्टींनी लडबडून येतात. मग, त्यांना आपण शिकतो. तसे न करता सोळा आणे खरे शास्त्र शिकले पाहिजे, असे प्रतिपादन वास्तुशास्त्र तज्ज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेचा ग्रंथालय सप्ताह सुरू आहे. त्यातील तिसरे पुष्प वास्तुशास्त्रतज्ज्ञ डॉ. पाठक यांनी गुंफले. व्याख्यानासाठी ‘वास्तुदोष आणि घरगुती उपाय’ या विषयावर व्याख्यान झाले.

डॉ. पाठक पुढे म्हणाले, की कोणतेही शास्त्र हे १०० टक्के परिपूर्ण नसते. वास्तुशास्त्रदेखील परिपूर्ण नाही. आपल्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी तो एक घटक आहे हे समजून घेतले तर त्यावर माणूस पूर्णपणे विसंबून रहात नाही. परंपरेने जे सांगितले आहे ते खरे मानले पाहिजे. आपल्याकडे जे मानसशास्त्र आहे ते आयात केलेले आहे. त्यामध्ये मनाची व्याख्याच लिहिलेले नाही. त्यामुळे सर्व गोंधळ उडालेला आहे, असेही डॉ. पाठक म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर आदिवासी विकास आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, जोतिषरत्न नरेंद्र धारणे, पल्लवी धारणे, वनवासी कल्याण आश्रमाचे यशवंत जाधव तसेच सावानाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. संगीता बाफणा यांनी सूत्रसंचालन केले. कै. सावित्रीबाई वावीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या व्याख्यानाचे वेळी आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या यशवंत जाधव या सेवाभावी कार्यकर्त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या टाकीत महिलेचा मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहितेचा मृतदेह इमारतीवरील सोसायटीच्या पाण्याच्या टाकीत रविवारी दुपारी आढळून आला. गोविंदनगर परिसरात उघडकीस आलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून, महिलेने आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे, याविषयी चर्चा सुरू आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उषा नाना पाटील (वय ४३ रा. कृषी बँक को. ऑप. सोसा. गोविंदनगर) असे पाण्याच्या टाकीत मृत अवस्थेत मिळून आलेल्या महिलेचे नाव आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी असलेल्या नाना पाटील यांच्या पत्नी उषा पाटील गत गुरुवारी दुपारच्या सुमारापासून बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाहीत. या प्रकरणी शुक्रवारी (दि.८) मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी पाटील राहतात त्या इमारतीवरील सोसायटीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी तपासली असता मृतदेह आढळून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>