Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्वीकृत सदस्य निवडीसाठी मालेगावी आज महासभा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी गुरुवारी (दि. १४) सायंकाळी चार वाजता पालिका सभागृहात विशेष महासभा आयोजित करण्यात आल्याची माहिती नगरसचिव राजेश धसे यांनी दिली.

येथील महापालिकेची निवडणूक मे महिन्यात पार पडली होती. त्यानंतर पालिकेतील पक्षीय बलानुसार पाच स्वीकृत सदस्य नियुक्ती खोळंबली होती. अखेर १३ नोव्हेंबर रोजी पालिका आयुक्तांच्या दालनात उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्या उपस्थित सर्व गटनेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यात १० डिसेंबरपर्यंत पक्षीय बलानुसार अर्ज दाखल करायचे, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मुदतीत चार अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची छाननी ६ डिसेंबर रोजी गटनेते व उमेदवारांच्या उपस्थितीत पार पडली. चारही अर्ज वैध ठरले आहेत. या चार उमेदवारांची आयुक्तांकडे शिफारस करण्यात आली आहे. या सदस्य नियुक्तीसाठी गुरुवारी विशेष महासभा होणार आहे.

चार दाखल अर्ज

अब्दुल मलिक इसा (काँग्रेस), मोह. अमीन मो. फारुख, गिरीश बोरसे (महागठबंधन आघाडी), भिमा भडांगे (शिवसेना).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरम नदी तटावर उत्सवाला उधाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या १३० व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने आयोजित महापूजा व यात्रोत्सवास बुधवारी पहाटेच्या गुलाबी थंडीत मोठ्या उत्साहाने व धुमधडाक्यात प्रारंभ करण्यात आला. मंदिरासह परिसराची सजावट करण्यात आली आहे. तब्बल १५ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

श्री संत शिरोमणी देव यशवंतराव महाराज यात्रोत्सवाला बुधवारी पहाटे बागलाणचे तहसीलदार दीपक धिवरे व स्नेहा धिवरे, नगराध्यक्ष सुनील मोरे व योगिता मोरे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड व अरूणा बागड, देवस्थानचे विश्वस्त धर्मा सोनवणे व कमलाताई सोनवणे यांच्या हस्ते महापूजानंतर सुरुवात झाली. पहाटेच्या आरतीला महिला व पुरूष भाविक भाविकांनी गर्दी केली होती. पुजेनंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनसाठी खुले करण्यात आले. मंदिरात महिला व पुरुष भाविकांना दर्शनासाठी वेगवेगळी बॅरिकेडसची सोय करण्यात आली आहे.

पहाटे काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनीही सपत्नीक पूजा केली. गांधी चौकातील देवमामलेदार यशवंतराव महाराज मित्र मंडळाच्या वतीने महापुजेनंतर भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. खामखेडा येथील अखिल विश्व वारकरी परिषद व ग्रामस्थांच्या वतीने खामखेडा ते सटाणा पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. यात्रेनिमित्त कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. आरम नदी काठावर यात्रोत्सवात ठिकठिकाणाहून करमणुकीचे साधने, पाळणे, व विविध स्टॉल्स, विक्रेते दाखल झाले आहेत.

रथ मिरवणुकीने

भारावले भाविक

उत्सवानिमित्ताने शहरातून निघालेल्या रथमिरवणुकीचा शुभारंभ नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविलेला देवमामलेदार यशवंतराव महाराज रथाची महापूजा पोलिस अधीक्षक संयज दराडे यांच्या हस्ते झाली. यावेळी पोलिस उपअधीक्षक शशीकांत शिंदे, पोल‌सि निरीक्षक हिरालाल पाटील, प्रांतधिकारी प्रवीण महाजन यांनीही पूजा केली. यांनतर रथ मिरवणूकीस प्रारंभ झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर ताशेरे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडिया हे माणसाला फसवणारे साधन म्हणून आता पुढे येत आहे. याद्वारे अनेक लबाडी होत असून त्याचा परिणाम काय होतो, हे दाखविण्याचा प्रयत्न ‘ये मामला गडबड है’ या नाटकातून करण्यात आला.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५ वा नाट्य महोत्सव प. सा. नाट्यगृह येथे सुरू असून नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत ‘ये मामला गडबड है’ हे नाटक बुधवारी सादर झाले. विनय एक नाट्य कलाकार असतो. त्याची पत्नी लता नोकरी करत असते. विनयला मिळणाऱ्या ‘नाइट’वर व लताच्या पगारात ते दोघे सुखी असतात. त्यांच्या शेजारी वकील लांडगे फुकट पेपर वाचायला येतो आणि त्यांना उलटसुलट सल्ले देत असतो. विनयचा मित्र बबन दारूच्या नादात जुगारात सर्व पैसे हरतो आणि विनयच्या घरी आसऱ्यासाठी येतो. त्यातच लताला फेसबुकवर तिची एक मैत्रीण चिंगी भेटते व ती थेट तिच्या घरीच येते. चिंगीच्या सांगण्यानुसार तिची आजी मरताना दहा कोटीची इस्टेट तिच्या नावावर सोडून गेलेली असते. पण एक अट असते की तिचे लग्न झालेले पाहिजे. महिला वकिलासमोर विनयाला ती पती म्हणून सादर करते. परंतु, तितक्यात विनयचे वडील आबा तेथे येतात. आबांसमोर विनय हा चिंगी ही बबनची पत्नी असल्याचे सांगतो. या गोंधळात चिंगी लताचे दागिने घेऊन पळते आणि इन्सपेक्टर चिंगी, महिला वकिल व त्याचा असिस्टंट यांना अटक करतात. त्यांचा डाव उघडकीस आणतात. अशा आशयाचे हे कथानक होते.

कामगार कल्याण केंद्र ओझर मिग (टाऊनशीप) संस्थेच्या वतीने सादर झालेल्या या नाटकाचे लेखन संदेश सावंत यांनी केलेले असून सहनिर्मिती लक्ष्मीकांत खैरनार यांची होती. दिग्दर्शक मिल‌िंद मेधने, सूत्रधार योगेश बागूल, नेपथ्य विजय घोरण, संगीत अमोल काबरा, प्रकाशयोजना जयदीप पवार, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा लिला सोनार यांची होती.

आजचे नाटक : सिंगल
स्थळ : प. सा. नाट्यगृह
वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसमधून पडल्याने तरुणी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव शहर बसमधून पडल्याने एक तरुणी गभीर जखमी झाली. त्र्यंबकरोडवर हा अपघात झाला. जखमी युवतीवर सिव्हिल हॉस्प‌िटमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

काजल काळे (रा. सातपूर) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. सातपूरहून सीबीएसकडे शहर बसने ती बुधवारी (दि. १३) सकाळी प्रवास करीत होती. गर्दीमुळे दरवाजाजवळ उभी असताना त्र्यंबकरोडवरील कुबेर हॉटेललगत ती पडली. भरधाव बसमधून गंभीर जखमी झाल्याने बसचालक महेश नागरे यांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव इनोव्हा कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. औरंगाबाद रोडवर हा अपघात झाला. भाभानगर येथील दुचाकीस्वार तरूण विवाह सोहळा आटोपून रात्री घराकडे परतत होता. त्यावेळी हा अपघात झाला. आडगाव पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.
सचिन हिरवे (२९ रा. भाभानगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास आडगाव नाक्याकडे जात असताना हा अपघात झाला. सचिन गंभीर जखमी झाल्याने त्याला भाऊ संदीप यांनी सिव्हिल हॉस्प‌िटलमध्ये तात्काळ दाखल केले. परंतु, सचिनचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूविक्री विरोधात महिलांचा हल्लाबोल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

तालुक्यातील मोहाडी येथील महिलांनी तीन दिवसांपूर्वी दिंडोरीचे पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांना मोहाडी येथे सुरु असलेल्या अवैध दारूबंदी विरोधात निवेदन दिले होते. तरीही पोलिसांनी कुठलीही कार्यवाही न केल्याने बुधवारी येथील संतप्त महिलांनी मोहाडी येथील पोलिस चौकीवर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हल्लाबोल मोचा काढला.

मोहाडी येथे १२ ते १५ ठिकाणी अवैध दारूविक्री सुरू आहे. त्या विरोधात गावातील १०० महिलांनी ग्रामपालिका सदस्या सविता पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दिंडोरी पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांना दारूबंदीबाबत निवेदन देत व्यथा मांडल्या होत्या. यावेळी शिरसाठ यांनी गावात १०० टक्के दारूबंदी करू, असे आश्वासन दिले. मात्र, तीन दिवसांपासून सर्रासपणे अवैध दारूविक्रीचे दुकाने सुरू होते. येथील अवैध दारूविक्रेत्यांनी निवेदन देणाऱ्या महिलांना शिवीगाळ केली. तसेच आमचे कोणी काही करू शकत नाही, असे मुजोरी भाषेत उत्तर दिले. यानंतर संतप्त महिलांनी पोलीस हवालदार एस. के. जाधव यांना घेराव घालत जाब विचारला. त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने येथील महिलांनी गावातून हल्लाबोल मोर्चा काढत पोलिसचौकीवर सुमारे तीन तास ठिय्या दिला.

यावेळी सुमारे दीडशे महिला व पुरुष सहभागी झाले. पोलिस निरीक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा पवित्रा घेतला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास दिंडोरी पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ घटनास्थळी आले. त्यांनी महिलांची समजूत काढत अवैध दारूविक्री विरोधात कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. दोन दिवसात येथील अवैध धंदे बंद झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई कनेक्ट सोयीचे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसाठी विमानसेवेची घोषणा झाल्यानंतर एअर डेक्कन कंपनीने बुधवारी वेळापत्रक प्रसिद्ध केले. यात मुंबईला जाणाऱ्या विमानाची वेळ पहाटे ६.२० वाजेची तसेच येण्याची वेळ सायंकाळी ५.१० ची ची निश्चित करण्यात आली आहे. यामुळे नाशिककरांचा मुंबई कनेक्ट अधिक सुलभ होणार आहे.

वेळापत्रकात सोमवार वगळता मुंबई व पुणेसाठी मंगळवार ते रविवार अशी रोज विमानसेवा उपलब्ध असणार आहे. पुणे येथे जाण्यासाठी व येण्यासाठी रात्रीच विमानसेवा असणार आहे. सोमवारी हा कामाचा दिवस असतांना या दिवशी नेमकी सेवा का बंद ठेवण्यात आली. यामागील कारण मात्र पुढे आले नाही. या वेळापत्रकाप्रमाणे मुंबईला जाण्यासाठी ५० मिनिटे तर पुणे येथे जाण्यासाठी ४० मिनिटांचा वेळ लागणार आहे.

केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत ही विमानसेवा १ सप्टेंबरपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, आता ८४ दिवसानंतर ती सुरू होणार असली तरी तिचे वेळापत्रका हा कळीचा मुद्दा होता. त्यात मुंबईचे वेळापत्रक कामाच्या सोयीसाठी चांगले आहे. त्यामुळे या सेवेला प्रतिसाद मिळेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. गेल्या वेळी वेळापत्रक सोयीचे नसल्याने हा आनंद फार काळ टिकला नाही. नाशिक येथून सायंकाळी ६.२० ला विमान उडाण घेतल्यानंतर पुणे येथे ते ७ वाजता पोहचणार आहे. त्यानंतर ७.२० ते पुन्हा नाशिककडे ८ वाजता येणार आहे.

जळगावला वेगवेगळ्या वेळा
जळगाव येथे वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्याने व्यापारी पेठ असलेल्या या शहराला त्या फारशा सोयीच्या नसणार आहे. जळगावहून मुंबईला जाण्यासाठी मंगळावार, बुधवार व रविवारी सकाळी ७.४० वाजता विमानसेवा असणार आहे. त्यानंतर गुरुवार, शुक्रवार व शनिवारी हीच सेवा दुपारी ३.१० वाजता राहणार आहे. पण, मुंबईहून जळगावकडे येणारी विमानसेवा मंगळवार ते रविवारपर्यंत सकाळी ७.४० असणार आहे. त्यामुळे जळगावकरांना मुंबईत मुक्काम करावा लागणार आहे.

आंदोलनला यश
नाशिकला अनेकदा घोषणा झाल्या पण उडाण झाले नाही. त्यामुळे या सेवेसाठी सत्तेत असतांनाही शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना थेट दिल्लीत आंदोलन करावे लागले. त्याची दखलही घेण्यात आली. त्यामुळे नाशिक बरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा फायदा झाला. नाशिकबरोबरच आता जळगावमधूनही ही सेवा मुंबईसाठी सुरू होणार आहे.

इतर शहरात हवी विमानसेवा
उद्योजक संघटना, पर्यटन संस्था, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी संघटना यांनी तर विमानसेवा सुरू करण्यासाठी विविध पातळीवर मोहीम उघडली. पण, ही सेवा परवडत नाही असे एकमेव कारण पुढे करत ती सतत नाकारण्यात आली. केंद्राने उडाण योजना जाहीर केल्याने त्यातून नाशिकला त्याचा फायदा झाला. पण, ही सेवा मुंबई, पुणे या शहरापर्यंत न राहता तिची भरारी मोठ्या शहराची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी व्हावी हा आग्रह सर्वांचा आहे. त्यामुळे भविष्यात त्यातून शहराच्या उद्योग व व्यापाराला फायदा होणार आहे.

एक रुपया तिकीट
विमानसेवेचा शुभारंभ करण्यासाठी कंपनीने ‘लकी-ड्रॉ’ची घोषणा केली आहे. त्यामुळे बुकिंग करणाऱ्या काही भाग्यवंतांना अवघ्या एक रुपयात तिकीट मिळणार आहे. तसेच १४०० रुपयांपासून तिकीट दर राहणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. उडान योजनेत तिकिटांचा दर २५०० रुपये घोषित करण्यात आला आहे.

अनेकांना फायदा
नाशिकमधून नातळ सुट्यांसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटनाचे बुकिंग झाले आहे. त्यामुळे या सर्वांना मुंबई आणि तिथून पुढे जाण्यासाठी ही विमानसेवा सोयीची ठरणार आहे. म्हणून पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तिकीट दर
सध्या नाशिककर मुंबई विमानतळावर जाण्यासाठी टॅक्सी, कॅब तसेच कार बुक करतात. त्यास प्रतिसीट ११०० ते १५०० रुपये लागतात. त्याच दरात विमानाच्या तिकिटाचे दर राहणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई आणि पुणे या दोन शहरांसाठी नाशिककरांना २३ डिसेंबरपासून विमानसेवा मिळणार आहे. दिल्लीतील आंदोलनाची सरकारने दखल घेतली. ही सेवा अखंड सुरू रहावी यासाठी पुढील काळातही प्रयत्न केले जाणार आहे. मुंबई, पुणेसह नवी दिल्ली, हैद्राबाद, बेंगळुरूसह विविध मोठ्या शहरासाठी ही सेवा मिळावी ही अपेक्षा आहे.
- हेमंत गोडसे, खासदार

बहुचर्चित विमानसेवेचे बुकिंग सुरू झाल्याचा आनंद आहे. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर त्याचा उद्योगाला निश्चित फायदा होणार आहे. अनेक उद्योजकांना कमी वेळात प्रवास करता येणार आहे. तसेच नाशिकमध्ये गुंतवणूकवाढीस मदत होणार आहे.
- मंगेश पाटणकर, अध्यक्ष निमा

विमानसेवेचे वेळापत्रक (नाशिक, मुंबई, पुणे, जळगाव)
विमान नंबर - उडाणाचे ठिकाण - येण्याचे ठिकाण - उडाणाची वेळ - पोहचण्याची वेळ - उड्डाणाचे वार
डीएन १९१ - नाशिक - मुंबई - ६.२०- ७.१० - मंगळवार ते रविवार
डीएन १८१- मुंबई - जळगाव - ७.४० -९.१०- मंगळवार ते रविवार
डीएन १८२ - जळगाव - मुंबई - ११.१५ - १२.४५ - मंगळ,बुध, रविवार
डीएन १९२ - मुंबई - नाशिक - १७.१० -१८.०० - मंगळवार ते रविवार
डीएन १९३ - नाशिक - पुणे - १८.२० - १९.०० - मंगळवार ते रविवार
डीएन- १९४ - पुणे - नाशिक - १९.२० - २०.०० - मंगळवार ते रविवार
डीएन - १८२ - जळगाव -मुंबई - १५.१० - १६.४० - गुरुवार, शुक्रवार, शनिवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस चौकीवर दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैसे हरविल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने पोलिस चौकीवर दगडफेक करून चौकीचे नुकसान केले. जुन्या नाशकातील दुधबाजार परिसरात मंगळवारी हा प्रकार घडला. या घटनेत चौकीचे दार व खिडकीच्या काचा फुटून पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. चौकीमध्ये पोलिस कर्मचारी उपस्थ‌ित नसल्याने हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता भद्रकाली पोलिसांनी व्यक्त केली आहे.

समाधान साहेबराव कुमावत (३८, रा. पगारे मळा, उपनगर) असे दगडफेक करणाऱ्या संशय‌िताचे नाव आहे. त्याला अटक झाली असून एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमावत हे मंगळवारी (दि. १२) दुपारी खरेदीसाठी दुधबाजारात आले होते. त्यावेळी त्यांचे पाकिट चोरीस गेले. तक्रार देण्यासाठी ते पोलिस चौकीत आले. मात्र पोलिस कर्मचारी जेवणासाठी गेला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या कुमावत यांनी तेथून बाहेर पडत दगड उचलून आणला. कुणाला काही कळण्यापूर्वीच त्याने तो दरवाजावर टाकला. त्यानंतर दगडफेक करीत खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले. या घटनेत चौकीचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबादमधील हुक्का पार्लरवर कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मखमलाबाद शिवारात सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी मंगळवारी (दि. १२) रात्री छापा टाकला. या कारवाईत ताब्यात घेतलेल्यांमध्ये हॉटेलचालक, हुक्का पार्लर ग्राहक तसेच तरुण-तरुणींचा समावेश आहे. जागामालक फरार असून, यावेळी दोन बालकामगारांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मखमलाबाद शिवारातील सुयोजित गार्डनरोडवरील हॉटेल हबीबी येथे अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि. १२) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी हॉटेलचालक जितेंद्र बिहारीलाल उपाध्याय याच्यासह हुक्का पार्लर ग्राहक सौरभ ज्ञानेश्वर गायकवाड, रितेश गोविंद देव, समीर श्रीकांत बाल, दीपांश प्रवीण गर्ग, अपूर्व राजेश तेंडूलकर, प्रसाद रवींद्र राजपूत, अभिजित मिलिंद पाटील, सौरभ जगन्नाथ डांगे, शेख जुनेद अल्ताफ यांच्यासह दोन २१ वर्षांच्या तरुणींना ताब्यात घेण्यात आले. यावेळी कामावर असलेल्या दोघा बालकामगारांची सुटका करण्यात आली. कारवाईत सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, म्हसरूळ ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांच्यासह महिला पोलिस सहभागी झाले.

जागामालकावरही गुन्हा
कारवाईत हुक्का पार्लर साहित्य व मद्याच्या बाटल्या आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जागामालक युवराज माळी (रा. मखमलाबाद) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अशा गुन्ह्यात जागामालकावर कारवाई झाल्याची पहिलीच घटना आहे.

मखमलाबादमधील कारवाईतून जागामालकांना योग्य संदेश गेला आहे. हॉटेल चालकाचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव संबंधित विभागास पाठविण्यात येणार आहे. तसेच बालकामगार उपायुक्तांनाही प्रस्ताव देण्यात येणार आहे.
- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डस्टबिन खरेदीबाबत महापौर, आयुक्तांकडून दखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या २१ लाख रुपयांच्या डस्टबिन खरेदी घोटाळ्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर महापौरांसह आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य खात्याकडून मागविला आहे. डस्टब‌िन खरेदी घोटाळ्याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी महापौर रंजना भानसी यांनी केली आहे. त्यामुळे डस्टबिनची खरेदी आरोग्य विभागाच्या अंगलट येणार आहे.

शहरात केंद्र सरकारच्या पथकामार्फत ४ जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षण केले जाणार असून, पालिकेने आपले गुणांकन सुधारण्यासाठी पैशांची उधळपट्टी सुरू केली आहे. शहरातील बाजारपेठ परिसरात ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी डस्टबिन बसविल्या आहेत. या खरेदीमुळे उलट पालिकेचीच कचराकुंडी मुक्त शहराची घोषणा मोडीत निघाली आहे. या डस्टबिनची खरेदी अव्वाच्या-सव्वा दरात करण्यात आल्याने यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि प्रशासनावर निशाणा साधत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकाराची महापौर तसेच आयुक्तांनीही गंभीर दखल घेतली आहे. महापौर रंजना भानसी यांनी खरेदीबाबत शंका उपस्थित केल्या असून, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आपण आयुक्तांकडे करणार असल्याचे त्या म्हणाल्या. खरेदीचा निर्णय धोरणात्मक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा त्यांनी केला. डस्टबिन खरेदीसंदर्भात झालेल्या आरोपप्रकरणी आरोग्य विभागाकडून अहवाल मागविण्यात येत असून, बाजारपेठेतील दर आणि प्रत्यक्ष निविदेतील दर याची पडताळणी केली जाणार असल्याचे आयुक्त कृष्णा यांनी सांग‌ितले. त्यामुळे आरोग्य विभागाची स्वच्छतेतील परस्पर धुलाई चांगलीच अंगलट येणार आहे. ‌शिवाय, येत्या महासभेत विरोधकांकडून या विषयाचे भांडवल केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारीही सावध झाले असून, त्यांनी आरोग्य विभागावरच सर्व प्रकरण ढकलले आहे. त्यामुळे यातील अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांनीच बनावे पाल्यांचे रोल मॉडेल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

देशाचे भविष्य आजच्या युवापिढीच्या हाती असल्याने तरुणाई शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे. मात्र, कुटुंबातील सुसंवाद कमी होत असल्याने आजची युवापिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. या पिढीला योग्य संस्कार, शिक्षण आणि मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी पालकांनीच रोल मॉडेलची भूमिका पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा शहराचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी येथे व्यक्त केली.

नाशिकरोड आणि उपनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मोहल्ला कमिटी सदस्यांसाठी देवळालीगावातील तक्षशिला विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित बैठकीत ते बोलत होते. धर्म व जातीच्या नावावर सामाजिक संघर्ष टाळला पाहिजे. शांतता व सुसंवादाच्या मार्गाने सामाजिक प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. या शहरातील सर्वधर्मीयांतील सौहार्दाचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गारही आयुक्तांनी यावेळी काढले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस बांधील असून, प्रभावी पोलिसिंगसाठी मोहल्ला कमिटीने केलेल्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. यापुढे सर्वच नागरिकांनी पोलिसांच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तक्षशिला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लेझिम नृत्याचे त्यांनी यावेळी आवर्जुन कौतुक केले. घरातून बाहेर पडणाऱ्या आपल्या आई-वडिलांना हेल्मेट परिधान करण्याचा आग्रह धरा, असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

याप्रसंगी पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, उपनगरचे बाजीराव महाजन यांच्यासह सुभाषरोड, रमाबाई आंबेडकरनगर, देवळालीगाव राजवाडा, बौद्धनगर या ठिकाणच्या मोहल्ला कमिट्यांचे सदस्य उपस्थित होते. सुनील वाघ, शेखर भालेराव, दिलीप आहिरे, रामबाबा पठारे आदींनी मनोगत व्यक्त केले. या सभेस परिसरातील नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रामाणिक रिक्षाचालकांचे कौतुक

शहरातील प्रामाणिक रिक्षाचालकांचा शहर पोलिसांना अभिमान वाटतो. अशा रिक्षाचालकांची नावे पोलिसांच्या वेबसाइटवर नोंदविली जाणार आहेत. त्याचा फायदा दुसऱ्या प्रांतातून, शहरातून नाशिकमध्ये येणारे पर्यटक, नागरिकांना होणार आहे. शहरातील सर्वच रिक्षाचालकांनी या वेबसाइटवर आपल्या नावाला स्थान मिळावे यासाठी आपल्या कामात सुधारणा केली पाहिजे, असे आवाहनही आयुक्तांनी उपस्थित रिक्षाचालकांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात. विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करुन जनतेला, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी केले.

नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग व नाशिक शहर विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मनपास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू मराठा हायस्कूलमध्ये गुरुवारी महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन असून, २४७ प्रकल्पांचे सादरीकरण यात करण्यात आले आहे. न्यूटनच्या तिन्ही नियमांचा वापर करून तयार केलेल्या प्रकल्पाद्वारे अनोख्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर भानसी बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक करत त्यांनी संशोधन करण्याविषयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी प्रत्येक मुलात संशोधक लपला असून, त्याला जागे करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यापक वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कौतुक केले.

या वर्षी आरोग्य आणि सुदृढ आरोग्य, संसाधन व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक आणि दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान, गणितीय प्रतिकृती हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या विषयांवर २४७ प्रकल्पांचे सादरीकरण प्रदर्शनात करण्यात आले आहे. शहरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रकल्प सादर करुन विज्ञानाविषयी गोडी दाखवून दिली आहे. प्रदर्शनाचे प्रास्ताविक मनपाचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी केले. विद्यार्थीदशेत संशोधनाचे बीज त्यांच्यात रोवावे, या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन कविता सोनवणे व स्मिता अहिरराव यांनी केले. तर आभार अनिल माळी यांनी मानले. यावेळी मविप्र संस्थेचे संचालक नाना महाले, सचिन पिंगळे, मनपा स्थायी समिती सभापती शिवाजीराव गांगुर्डे, संभाजी मोरुस्कर, मुख्याध्यापक सी. टी. साळवे, वनिता पाटील आदी उपस्थित होते.

लक्षवेधक प्रकल्प

स्पीड ब्रेकरद्वारे वीजनिर्मिती

रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर असतात. स्पीड ब्रेकरवर वाहने आपली ऊर्जा गमवून वेग कमी करतात. हीच उर्जा परत मिळवून तिचे रुपांतर विद्युत ऊर्जेत करू शकतो, या उद्देशाने स्पीड ब्रेकरद्वारे वीजनिर्मिती हा प्रकल्प लक्षवेधक ठरत आहे.

इलेक्ट्र‌कि पॉवर कार

इलेक्ट्र‌कि मोटर, कंट्रोलर, बॅटरीचा वापर करुन इलेक्ट्र‌कि पॉवर कारचा प्रकल्प प्रदर्शनात सादर करण्यात आला आहे. कार्बनचे कमी उत्सर्जन, तसेच वायू व ध्वनी प्रदूषण कमी होईल, अशा पद्धतीने या वाहनाची रचना करण्यात आली आहे.

गणितीय प्रतिकृती

विद्यार्थ्यांना गणित व भूमिती विषयाची भीती वाटते. त्यातील संकल्पना स्पष्ट न झाल्याने त्यांना हे विषय कठीण वाटतात. गणितीय प्रतिकृती या शैक्षणिक साहित्याद्वारे विद्यार्थ्यांना भूमितीमधील प्रमेये समजून सांगण्यास मदत होते. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म स्पष्ट करता येतो. तसेच समांतर रेषेच्या छेदिकेमुळे होणारे संगत कोन एकरुप असतात हे प्रत्यक्ष अनुभवता येते, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये बायो टॉयलेट्स

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिककरांशी ऋणानुबंध जुळलेल्या पंचवटी एक्स्प्रेसच्या सर्व कोचमध्ये लवकरच बायो टॉयलेट्स बसविण्यात येणार आहेत. सध्या सहा कोचेसमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

मनमाड ते मुंबईदरम्यान गेल्या पाच दशकांपासून अवरित धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमधून जिल्ह्यातील नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण मुंबईला अप-डाऊन करतात. मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणे महत्त्वाचा असा इंटरसिटी दर्जा मिळालेली पंचवटी एक्स्प्रेस नाशिककरांची लाइफलाइन झालेली आहे. या गाडीत वीस कोचेस आहेत. त्यात पासधारकांचे दोन कोचेस आहेत.

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत रेल्वे २०१८ पर्यंत सर्व एक्स्प्रेसमधील कोचेसमध्ये बायोटॉयलेट्स बसविणार आहे. २०१९ मध्ये एकही रेल्वेगाडी बायो टॉयलेटविना धावणार नाही, असे रेल्वेचे नियोजन आहे. याबाबत मध्य रेल्वेचे भुसावळ विभागाचे व्यवस्थापक आर. के. यादव यांनी सांगितले की, भुसावळ विभागातील मार्गांवर धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांमध्ये बायो टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. पंचवटी एक्स्प्रेसमध्ये हे काम प्राधान्याने केले जात आहे. सहा कोचेसमध्ये बायोटॉयलेट्स बसविले असून, उर्वरित कोचेसमध्ये लवकरच हे काम पूर्ण केले जाईल.

भुसावळ विभागात ३२५ कोचेस आहेत. विभागातील विविध रेल्वेस्थानके तसेच मुंबई, पुणे, नागपूर, सूरत आणि मध्यप्रदेशला जाणाऱ्या गाड्यांमध्ये हे कोच वापरले जातात. या कोचेसमध्ये बायो टॉयलेट बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, पंचवटी, राज्यराणीसारख्या महत्त्वाच्या गाड्यांमध्ये प्राधान्याने बायोटॉयलेट्स बसविले जात आहेत. सध्या भुसावळ विभागातील ९० कोचेसमध्ये बायोटॉयलेट्स बसविण्यात आले आहेत. डिसेंबर २०१८ पर्यंत सर्व ३२५ कोचेसमध्ये बायो टॉयलेट्स बसविले जातील.

पर्यावरणपूरक

रेल्वेगाड्यांमधील सध्याच्या शौचालयातील विसर्जन रुळावर पडते. तसेच रेल्वे स्थानकात गाडी थांबल्यावरही मोठी दुर्गंधी पसरते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते. स्वच्छतेवर मोठा खर्च करावा लागतो. रेल्वेची व देशाची प्रतिमा खालावते. बायो टॉयलेट्स हे पर्यावरणपूरक आहेत. त्यातून बाहेर पडणारे विसर्जन निसर्ग किंवा मानवासाठी घातक नाही. त्यावर प्रक्रिया केली नाही तरीही ते घातक ठरत नाही. तसेच प्रक्रिया करून वापर केला तर सिंचनासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

संरक्षण विभागाची रचना

देशातील रेल्वे गाड्यांमध्ये बसविण्यात येणाऱ्या बायो टॉयलेट्सचे डिझाइन हे देशाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) तयार केले आहे. या टॉयलेटमध्ये अनेक चेम्बर्स आहेत. त्यामधील बॅक्टेरिया विसर्जनावर त्वरित प्रक्रिया करतात. मिथेन आणि कार्बन डाय ऑक्साईडवर नियंत्रण आणले जाते. गॅसेस हवेत सोडले जातात. पाणी रुळावर पडण्याआधी क्लोरीनचा मारा करून ते पर्यावरणपूरक केले जाते. बायो टॉयलेट्स हे टाक्या गंजण्यापासून वाचवतात. बायो टॉयलेट्सच्या देखभालीचीही गरज भासत नाही.

हवी प्रवाशांची साथ

रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, बायो टॉयलेटची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केलेली आहे. मात्र, प्रवाशांनी पेपरचे तुकडे, पेपरचे कप, प्लास्टिक त्यामध्ये टाकले तर गंभीर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे प्रवाशांची साक्षरता, विवेक व सहकार्य महत्त्वाचे आहे. अन्यथा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती होईल. बायो टॉयलेटमध्ये प्लास्टिक व अन्य कचरा टाकला तर मेन्टेनन्सवर रेल्वेला मोठा खर्च करावा लागेल. त्यामुळे नाईलाजाने त्याचा बोजा प्रवाशांवरच अप्रत्यक्षपणे पडू शकतो. याबाबत प्रबोधन केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेच्या तिकीट नोंदणीची प्रतीक्षाच

$
0
0

एअर डेक्कनकडून असुविधा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या विमानसेवेतील अडथळ्यांची शर्यत संपता संपत नसल्याचे स्पष्ट होत आहे. गुरुवारपासून विमानसेवेचे बुकिंग सुरू होणार असल्याचे जाहीर झाले. मात्र, एअर डेक्कनसह कुठल्याही वेबसाइटवर तिकीट बुकिंगची सेवा उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नाशिककरांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

एअर डेक्कन कंपनीने २३ डिसेंबरपासून पुणे आणि मुंबई सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, तसेच यासाठीचे ऑनलाइन बुकिंग कंपनीच्या वेबसाइटवर सुरू होईल. १४२० रुपयांपासून तिकिटाचे दर असतील. काही भाग्यवंतांना अवघ्या एक रुपयात तिकीट मिळेल, असेही कंपनीने जाहीर केले. विमानसेवेच्या वेळापत्रकाचीही घोषणा झाल्याने नाशिककरांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. कंपनीच्या वेबसाइटवर दिवसभर नाशिककरांनी भेट दिली; पण तेथे कुठल्याही प्रकारची बुकिंग व्यवस्था सुरू झालेली नव्हती. ट्रॅव्हल बुकिंग करणाऱ्या अन्य वेबसाइटवरही काही जणांनी बुकिंगचा प्रयत्न केला; पण तोही निष्फळ ठरला. काही जणांनी ट्रॅव्हल एजंट्सशी संपर्क साधला, पण त्याचाही फायदा झाला नाही. त्यामुळे दिवसभर या बुकिंगच्या अनुपलब्धतेची चर्चा नाशिककरांमध्ये होती. हे बुकिंग नक्की कधी सुरू होईल, याची कुठलीही माहिती कंपनीने रात्री उशिरापर्यंत जाहीर केली नाही.

संपर्क क्रमांक नाही

एअर डेक्कनने त्यांच्या वेबसाइटवर तिकीट बुकिंग लवकरच, केवळ एवढीच माहिती पुरवली आहे. त्यावर कुठलाही संपर्क क्रमांक नसल्याने या संदर्भात संपर्क कुणाशी करावा, असा प्रश्न नाशिककरांना पडला. मात्र, समाधानकारक उत्तर कुठूनही मिळू शकले नाही.

लगेजचे नक्की काय?

१९ आसनी असलेल्या विमानाद्वारे सेवा मिळणार असली तरी या विमानात प्रवाशांना नक्की किती सामान नेता येईल, याची स्पष्टता झालेली नाही. हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, केवळ हँडबॅग प्रवाशांना नेता येईल. त्यामुळे जे प्रवासी मुंबईहून पुढे प्रवास करणार आहेत, त्यांना सामान नेण्याची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे एअर डेक्कनने याबाबत लवकर खुलासा करावा, अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे.

माहिती इतर साइटवरही नाही

एअर डेक्कनच्या सेवेसाठी केवळ त्यांच्याच वेबसाइटवर नाही, तर इतरही ट्रॅव्हल बुकिंग साइटवर बुकिंगची कुठलीच सुविधा नसल्याचे दिसून आले. शहरात अनेक जण विविध ट्रॅव्हल बुकिंग साइटचा वापर करतात. मात्र, नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव या मार्गांसाठी बुकिंगचा कुठलाही पर्याय या वेबसाइटवर आढळून आला नाही. त्यामुळे नाशिककरांनी चिंता व्यक्त केली आहे.

ट्रॅव्हल एजंटकडे नोंदणी

शहरात ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशनचे शेकडो सदस्य आहेत. ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी अडचणी येत असल्याने अखेर काही नाशिककरांनी या असोसिएशनच्या सदस्यांकडे बुकिंगची नोंदणी केली आहे. शहरातील उद्योजक, डॉक्टर, वकील, व्यावसायिकांनी पुणे आणि मुंबई या सेवांसाठी बुकिंगला पसंती दर्शविल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एअर डेक्कनच्या वेबसाइटवर बुकिंग सुरू झालेले नाही. त्यामुळे दिवसभरात आमच्याकडे चौकशीसाठी भरपूर फोन आले. मात्र, या बुकिंगबाबत आम्हाला काहीही माहिती मिळालेली नाही.

- दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान

एअर डेक्कनच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. ऑनलाइन बुकिंगसंदर्भात आमचे काम सुरू असून, लवकरच सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

विमानसेवेचे तिकीट बुकिंग करण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटला भेट दिली; पण तेथे बुकिंगचा कुठलाही पर्याय नव्हता. लवकरच ते सुरू होईल, एवढे मात्र, झळकत होते. अन्य वेबसाइटवरही बुकिंगची सुविधा उपलब्ध झाली नाही.

- जितेंद्र ठक्कर, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपकेंद्र जागेसाठी कुलगुरूंची चाचपणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समन्वयक, पुरेसे मनुष्यबळ आणि साधनांशिवाय एकाकी लढणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या पदरात नव्या वर्षात चांगली फळे पडणार असल्याचे संकेत कुलगुरूंच्या गुरुवारच्या नाशिक दौऱ्याने दिले आहेत. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी शहरातील तीन जागांना भेट देऊन तेथे अद्ययावत उपकेंद्र उभे करता येण्याच्या दृष्टीने चाचपणी केली.

विद्यापीठातील मोठी कॉलेजे आणि विद्यार्थीसंख्या असणाऱ्या नाशिकमध्ये विद्यापीठ उपकेंद्राची मात्र दैना झाली आहे. येथे पुरेसे मनुष्यबळ नाही की वर्षभरापासून समन्वयकही नाहीत. शिवाय उपकेंद्राला विशेष अधिकारदेखील नाहीत. पण विद्यापीठाच्या नव्या बृहद आराखड्यात नाशिक आणि नगर उपकेंद्रांना सक्षम करण्याचा संकल्प विद्यापीठाने सोडला आहे. त्यादृष्टीने नाशिक सबकॅम्पसचा तिढा हा पूर्णत: आता सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबून झाला आहे. सरकारला उपरती होईल तेव्हा होईल, पण त्याअगोदर नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी अद्ययावत उपकेंद्र उभारून देण्याचा प्रयत्न कुलगुरूंच्या पुढाकाराने होत आहे. याप्रश्नी खासदार हेमंत गोडसे यांनीही विद्यापीठात जाऊन काही दिवसांपूर्वी कुलगुरूंना साकडे घातले होते. यानुसार शहरातील तीन मोक्याच्या जागांवर खासदार गोडसे यांच्यासमवेत भेट देत कुलगुरू डॉ. करमाळकर यांनी उपकेंद्रासाठी नव्या जागेची चाचपणी केली.

तीन जागा विचाराधीन

सद्यस्थितीत शरणपूर रोडवर जुन्या पोलिस आयुक्तालयाजवळ उपकेंद्र कार्यालय सुरू आहे. मात्र तेथील जागा कामकाजासाठी पुरेशी नाही. त्यामुळे शहरामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील गजरा उद्योग बिझनेस सेंटर,

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील संकलेचा व्हेसकॉन आयटी पार्क, नाशिकरोड परिसरातील अंधशाळा, बसस्टँडजवळील के. के. ग्रुप ऑफ कंपनी या जागांना कुलगुरू डॉ. करमाळकर, विद्यापीठाच्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार, मुक्त विद्यापीठाचे डॉ. जयदीप निकम आणि संतोष कटारिया यांनी भेट दिली.

नाशिकमध्ये विद्यापीठाचे सबकॅम्पस प्रस्तावित आहे. तो विषय प्रक्रियेत असला तरीही तत्पूर्वी विद्यापीठ उपकेंद्रही अद्ययावत आणि सक्षम होण्याची गरज आहे. यावर काही दिवसांपूर्वी कुलगुरूंची भेट घेतली होती. त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हे उपकेंद्र सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांनी आज शहरात तीन ठिकाणी जागांना भेट दिली.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदखेडा नगरपंचायतीत अखेर फुलले कमळ

$
0
0

नगराध्यक्षपदी भाजपच्या रजनी वानखेडे विजयी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिंदखेडा नगरपंचायतीची द्वितीय पंचवार्षिक निवडणूक सर्वांगाने चुरशीची ठरली. या निवडणुकीत भाजपने सत्ता परिवर्तन घडवून आणत प्रथमच कमळ फुलविले तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पराभव पत्करावा लागला.

या निवडणुकीत भाजपच्या रजनी वानखेडे या ३२३३ मतांची आघाडी घेत प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या. एकूण १७ पैकी भाजपचे नऊ नगरसेवक विजयी झाले असून, काँग्रेसचे सहा आणि समाजवादी पार्टीचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.

शिंदखेडा नगरपंचायतीची लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या १७ जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १४) मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये शिंदखेडा नगरपंचायतीत भाजपने सत्ता परिवर्तन घडवून आणले असून, भाजपच्या रजनी वानखेडे या लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर निवडून आल्या. या निवडणुकीत १७ जागांपैकी नऊ जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी झाले आहेत. यात किसन जगन सकट, प्रकाश नागो देसले, योगिता विनोद पाटील, अनिल लालचंद वानखेडे, भारती जितेंद्र जाधव, वंदना चेतन गिरासे, निर्मला युवराज माळी, भिला बारकु माळी, नर्मदा अर्जुन भिल यांचा समावेश आहे. मात्र आठ जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. सहा जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमदेवार विजयी झाले असून, या निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्ष व १२ जागांवर नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले होते. परंतु, त्यांना एकाही जागेवर यश आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक दिन बिताएंगे गाँव में...

$
0
0

मनातले बोला

-------

एक दिन बिताएंगे गाँव में...


गौतम संचेती, नाशिक

ग्रामीण भागातील काही व्यक्तींमध्ये बऱ्याचदा न्यूनगंड दिसून येतो. त्यातून अनेक वेळा त्यांच्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून नैराश्य येते. असे नैराश्य दूर करून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र टाइम्स’ व टाइम्स ग्रुपच्या सर्व भाषिक वृत्तपत्रांनी चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू या गावात ‘एक दिन बिताएंगे गाँव में’ हा उपक्रम घेतला. गावातील छोटे-मोठे प्रश्न जाणून घेऊन विविध संस्थांच्या तज्ज्ञांनी त्यावर मार्गदर्शन करून त्यांचे मनोबलही वाढविले.

देशात शहरीकरणाचे प्रमाण वाढले असले, तरी आजही गावांचे प्रश्न शहरांपेक्षा वेगळे आहेत. लहान-लहान गावांतील शेतीवर त्या गावांची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे शेती व शेतमालाचे भाव हा प्रश्न मुख्य असतो. पण, या प्रश्नाबरोबरच अनेक प्रश्न दैनंदिन जीवनात असतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारनेही अनेक योजना सुरू केल्या. पण, तरीसुद्धा ग्रामीण भागात काहीसे नैराश्य दिसत असल्याने ते दूर करण्याच्या उद्देशाने हा प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आला.

‘एक दिन बिताएंगे गाँव में’ हा उपक्रम सकाळी १० वाजेपासून सुरू झाला व सायंकाळी ७ वाजता ‘आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग’ या व्याख्यानाने त्याचा समारोप करण्यात आला. तब्बल नऊ तासांच्या या कार्यक्रमात सामजिक व शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध विषयांवर काैन्सिलिंग, चर्चा व मार्गदर्शन केले. शेती, वैद्यकीय सुविधा, शाळेतील विविध शैक्षणिक समस्यांसारख्या प्रश्नांचा वेध या कार्यक्रमात घेण्यात आला.

--

‘मनोबल बढाओ’चा दिला संदेश

महिलांचे प्रश्न, स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या दहा विषयांना स्पर्श करीत या उपक्रमाने ‘नैराश्य हटाओ, मनोबल बढाओ’चा संदेश गावकऱ्यांना दिला. मनमाड येथील कॉलेज्या तरुणांनी या उपक्रमात ‘एक दिन बिताएंगे गाँव में’ म्हणत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सायंकाळी शेती व शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या विष्णू थोरे यांच्या शेतीच्या कवितांचा कार्यक्रम झाला. या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक संदेश देणारी रॅली काढण्यात आली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘पावसाचा लहरीपणा व त्यातून शेतीचे होणारे नुकसान’ यावर सादर केलेले पथनाट्यही सर्वांचे मनोबल वाढविणारे ठरले.

--

विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे

३५० कुटुंबे असलेल्या या गावाची लोकसंख्या २२०० च्या आसपास आहे. येथे प्राथमिक व माध्यमिक अशा दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून या कार्यक्रमाचे सकाळच्या सत्रात नियोजन करण्यात आले. त्यात नाशिकच्या प्रमुख शाळेत विद्यार्थ्यांचे काैन्सिलिंग करणाऱ्या अजिता गानू यांनी बदलत्या जीवनशैलीबरोबर संस्काराचे धडे देत अभ्यासाचे महत्त्व स्पष्ट केले. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना त्यांनी वेगवेगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी टिप्सही दिल्या.

--

इंग्रजीची घालवली भीती

‘केआरटी’चे मुख्याध्यापक मुकेश मिसर यांनी या कार्यक्रमात इंग्रजीचे धडे दिले. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना येणारी मुख्य अडचण इंग्रजी असल्याचे सांगत त्यांनी सोप्या पद्धतीने कसे इंग्रजी शिकता येईल, याबाबत मार्गदर्शन करून इंग्रजीसंदर्भातील भीती घालविली. अभ्यास कसा करावा, स्वच्छता कशी राखावी, यांसारख्या वेगवेगळ्या विषयांचे संगीता कदम-देसले, रीना संचेती, आशा गुजराथी यांनी महत्त्व सांगितले. ‘दहावीनंतर काय?’ या विषयावरप्रमाणेच कॉलेजमधील जीवन व त्यातील अडचणींवर कशी मात करायची, याचीही माहिती देण्यात आली.

--

थेट शेतावर जाऊन सल्ला

एकीकडे शाळेत विविध उपक्रम सुरू असतानाच शेतीवर जाऊन कृषी अधिकारी विजय पवार यांनी शेतीच्या समस्या व त्यावरील प्रश्न समजून घेऊन मोलाचा सल्ला दिला. त्यानंतर महिलांचे प्रश्न, रासायनिक खतांचा वापर, शेतीचे कायदे यांसह विविध विषयांवरील पुस्तकांची भेट यावेळी ‘मटा टीम’कडून देण्यात आली. या उपक्रमात महिलांच्या विविध प्रश्नांबाबत त्यांच्या घरी जाऊन लायनेस क्लबच्या संगीता कदम-देसले यांनी चर्चा केली. युवकांना भेडसावणारा रोजगाराचा प्रश्न व त्यावर मुद्रा योजनेचे फायदे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय सुविधा, त्यांचा पाठपुरावा, रक्तदानाचे महत्त्व या विषयांना स्पर्श करून आजारावर मात करण्याचे अनेक पर्याय व सुविधा देणारी माहिती नितीन पांडे व प्रदीप गुजराथी यांनी यावेळी दिली.

--

आनंददायी जीवनाचा मार्ग

सायंकाळी मोकळ्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात लेखक संदीप देशपांडे यांनी ‘आनंददायी जीवनाचा मार्ग’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यात त्यांनी नैराश्य कसे येते व त्यावर कशी मात केली जाते, याचे अनेक किस्से सांगितले. विनोदी शैलीतून सादर केलेल्या या व्याख्यानात त्यांनी सहज-सोप्या शब्दांत आनंददायी जीवनाचा मार्ग सांगितला.

--

विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग

नांदगाव, येवला व चांदवड या तीन तालुक्यांतील सीमारेषेवर हे गाव आहे. ‘थम्स अप’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी हे गाव वसलेले आहे. मनमाड शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात एक दिवस थांबायचे व त्यातून अनेक प्रश्न समजून घेण्यासाठी मनमाड व चांदवड येथील विविध संस्थांत काम करणाऱ्यांना आवाहन करण्यात आले. त्यानंतर त्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. त्यात वैद्यकीय अधिकारी, कृषी अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी यांनीसुद्धा सहभाग घेत सर्वांचे मनोबले वाढविले. शालेय विद्यार्थ्यांपासून गावाचे सरपंच रवींद्र चव्हाण, विजय चव्हाण, पोलिसपाटील सागर पवार, यांच्यासह डॉ. धीरज बरडिया यांनी यात सहभाग नोंदवला. शाळेच्या शिक्षकांनीही या उपक्रमात हजेरी लावत मार्गदर्शक सूचनाही केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिगल एड क्लिनिकद्वारे नीतिमत्ता रक्षण

$
0
0

टॉक टाइम

--

लिगल एड क्लिनिकद्वारे नीतिमत्ता रक्षण

--

भावनेच्या भरात कायद्याच्या नावाखाली चुकीची पावले उचलली जाऊन पश्चताप करण्याची वेळ सामान्य जनतेवर येऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य लिगल सर्व्हिस अॅथॉरिटीतर्फे येथील नवजीवन लॉ कॉलेजमध्ये ‘लिगल एड क्लिनिक’ (कायदा मार्गदर्शन केंद्र) आज, शुक्रवार (दि. १५)पासून सुरू होणार आहे. कुठल्याही शुल्काविना या केंद्रातील नामवंत कायदेतज्ज्ञ नागरिकांचे कायद्यासंदर्भातील समुपदेशन करणार आहेत. यासंदर्भात संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त अॅड. सुभाष देशमुख यांच्याशी साधलेला हा खास संवाद ‘मटा’च्या वाचकांसाठी...

--

-‘लिगल एड क्लिनिक’ ही संकल्पना नेमकी काय आहे?

-महाराष्ट्र राज्य लिगल सर्व्हिस अॅथॉरिटीच्या प्रोत्साहनामुळे नवजीवन लॉ कॉलेजने काही उपक्रमांद्वारे ग्रामीण जनतेत कायदेशीर जागृतीसाठी काही वर्षांत मोठे काम उभारले आहे. त्याची दखल घेत अॅथॉरिटीने या संस्थेला ‘लिगल एड क्लिनिक’ हे जिल्ह्यातील एकमेव कायदा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. येथे न्याय-निवाड्यांऐवजी कायदेशीर मार्ग, त्याची व्याप्ती, संभाव्य परिणाम आणि नीतिमूल्ये आदी मुद्दे केंद्रिभूत ठेवून सेवा घेणाऱ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे.

--

-या केंद्रासाठी तज्ज्ञांची उपलब्धता कुठवर असेल?

-शैक्षणिक संस्थेद्वारे हे केंद्र चालविले जाणार असले, तरीही या नियोजनात नागरी सुविधांकरिता तज्ज्ञ उपलब्ध करून देण्याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश या पदावरून निवृत्त झालेले न्यायमूर्ती जयंत शिरसाळे, नामवंत विधिज्ञ नागनाथ गोरवाडकर आणि का. का. घुगे यांच्यासह नामवंत व्हिजिटिंग फॅकल्टी आणि संस्थेचे माजी विद्यार्थी हे नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतील.

--

-कायदेशीर लढा आणि भरमसाट पैसा यांचे अतूट नाते असते?

-या केंद्राच्या माध्यमातून केवळ कायदाविषयक समुपदेशन केले जाणार आहे. एखादा कायदेशीर मार्ग अंतिमत: निवडण्याअगोदर त्या मार्गातील खाचखळगे, संभाव्य परिणाम, लढ्याचा मार्ग, लढ्यामध्ये योग्य वेळी घ्यायचे निर्णय आदी मुद्यांबाबत या केंद्राद्वारे नागरिकांना सल्ला दिला जाईल. त्याकरिता येणारा सर्व खर्च शासन उचलणार असल्याने नागरिकांकडून या सेवांचे कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

--

-वकिली पेशाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन चांगला नाही...

-याच पूर्वग्रहाला छेद देण्याचे काम लिगल एड क्लिनिक करणार आहे. समर्पित भावनेने आणि कायद्याला दैवत मानून काम करणारे काही कायदेतज्ज्ञ कार्यरत आहेत. त्यांच्याच योगदानाने गरजू जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. वैयक्तिक व्यवसाय आणि फायदा यापलीकडे जाऊन हे कार्य होणार असल्याने कायद्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन नक्कीच सकारात्मक होईल.

--

-एखादी बाजू स्पष्टपणे न्याय्य असली, तरीही कायद्याची प्रक्रिया मोठी किचकट असते...

-होय, या प्रक्रियेशिवाय न्यायदान होऊ शकत नाही. कायद्याची प्रक्रिया किचकट असण्याचीच मोठी भीती सामान्य माणसाच्या मनात असते. परिणामी कधी कधी अन्याय होऊनही तो दाद मागायला घाबरतो. अपप्रवृत्ती याचा नेमका फायदा उठवतात. त्यामुळे आता या मुख्य प्रक्रियेदरम्यान ‘केस स्टडी’मधील नैतिक बाजू तज्ज्ञांद्वारे तपासून कायदेविषयक गैरसमजांचा माणसाच्या मनातला गुंता दूर केला जाईल.

--

-लोकअदालत आणि ‘लिगल एड क्लिनिक’ या संस्थांमध्ये नेमका फरक काय?

-थेट न्यायालायात केस लढविण्याअगोदर कायदेशीर आणि नैतिक बाजू विचारात घेत लोकअदालतीमध्ये अनेकांना न्याय मिळतो. नियंत्रणातील बाबींमध्ये समन्वय साधून मानवी नाते पूर्वपदावर आणले जाते. पण, लिगल एड क्लिनिकमध्ये थेटपणे कुठलेही न्यायदान होणार नाही. तेथे कायदा नेमका काय आहे, तक्रार मांडणाऱ्या नागरिकाला कायद्याची मदत कशी व संभाव्य कुठवर होऊ शकते, यातून नेमके फलित हाती काय येऊ शकेल, कायद्याचा आधार घेताना कुठल्या वळणावर नेमके काय करावे, कागदपत्रे कोणती असावीत आदी प्रक्रियेसह तक्रारदाराचे कायदाविषयक समुपदेशन करण्यात येईल. ही लोकअदालतीच्याही अगोदरची पायरी आहे.

--

-‘लिगल एड क्लिनिक’ अस्तित्वात आल्याने समाजात नेमका कोणता बदल घडू शकेल?

-अत्यंत क्लिष्ट आणि दीर्घकाळ चालणारी अशी कायद्याची प्रक्रिया समजली जाते. मात्र, या कायद्याविषयी अद्यापही समाजात मोठे गैरसमज आहेत. परिणामी, कायद्यापासून दोन हात दूर राहणारे लोक समाजात जास्त आहेत. जनतेतील हे गैरसमज मिटविणे आणि समाजातील नैतिकता वाढविण्यासाठी कायद्याचा आधार घ्यायला जनतेस प्रवृत्त करणे ही प्रक्रिया यातून वाढेल. परिणामी, कायद्याचा आदर करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी भर पडू शकेल.

--

(शब्दांकन ः जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२२ गुणांसाठी २१ लाखांचा चुराडा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत तब्बल ११ हजार १२१ रुपये खर्चून खरेदी केलेल्या डस्टबिनबाबत पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी आता अफलातून जावईशोध लावला आहे. शहर कचराकुंडीमुक्त असताना केवळ स्वच्छतेच्या २२ गुणांसाठी १८९ डस्टबिन खरेदी केल्याचा हास्यास्पद खुलासा बुकाने यांनी केला आहे. विशेष म्हणजे या डस्टबिन एकाच दिवसासाठी खरेदी केल्या असून, सर्वेक्षण आटोपल्यानंतर त्या दुसऱ्याच दिवशी शाळा व वसत‌िगृहांना भेट देण्यात येणार असल्याचा अजब दावा त्यांनी केला. यावरून भाजपच्याच सत्तेतील अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेतून आपले खिसे भरून घेत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नाशिक महापालिकेच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक ४ जानेवारीला नाशिकमध्ये येत आहे. या पथकाच्या पाहणीनंतर देशभरातून नाशिकचा स्वच्छतेतील गुणांकन समजणार आहे. या स्पर्धेत पास होण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी अफलातून शक्कल लढवण्यास सुरुवात केली आहे. या सर्व्हेक्षणात महापालिकेने ओला आणि सुका कचरा विलगीकरणासाठी काय उपाययोजना केल्यात, यासाठी २२ गुण आहेत. सदर गुणप्राप्तीसाठी महापालिकेने शहरातील व्यापारीपेठांमध्ये १८९ ठिकाणी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डस्टबिन बसविल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी दोन नग ५५ लिटर्स क्षमतेच्या डस्टबिनची खरेदी तब्बल ११ हजार १२१ रुपयांत करण्यात आली आहे. या खरेदीवर शिवसेनेने आक्षेप घेत, चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांची भेट घेतली.

यावेळी डॉ. बुकाने यांनी आपली खरेदी योग्य ठरविण्यासाठी अजबच तर्कट मांडल्याने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डेंसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही हसू आवरले नाही. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत जानेवारीत परीक्षा होणार असून २२ गुण मिळविण्यासाठी या डस्टबिन बसविल्याचा दावा डॉ. बुकाने यांनी केला. एका दिवसाची परीक्षा झाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी काढून घेऊन शाळा, महिला वसतिगृहे यांना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे केवळ २२ गुणांसाठी शहराला पुन्हा कचराकुंडीयुक्त शहर करून पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’चीही फसवणूक आरोग्य विभागाकडून केली जात आहे.

..म्हणे ६०० डस्टबिनची गरज!

आरोग्य विभागाने स्वच्छ भारत अभियानंतर्गत २२ गुण मिळवण्यासाठी पहिल्या टप्प्यात १८९ डस्टबिन खरेदी केल्या आहे. परंतु शहरात अशा प्रकारच्या एकूण ६०० डस्टबिन खरेदी करण्यात येणार असल्याचेही अजब उत्तर आरोग्याधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे ही कचऱ्यातील हात की सफाई करण्याच्या आरोग्याच्या प्रकाराने स्वच्छतेच्या निधीतही बनवेगिरी केली जात असल्याचे चित्र आहे. आरोग्याधिकाऱ्यांच्या या अजब उत्तराने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनीही डोक्यावर हात मारून घेतला आहे. त्यामुळे एकूण आरोग्याचा कारभाच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिका सिझलिंग ब्राउनी केक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ख्रिसमसनिमित्त सिझलिंग ब्राउनी आणि ख्रिसमस स्पेशल फ्रूट केक कसा तयार करायचा यासंदर्भात वर्कशॉप घेतले जाणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता ऑलिव्ह गार्डन रेस्टॉरंट, प्रमोद महाजन गार्डनच्या मागे, गंगापूर रोड या ठिकाणी हे वर्कशॉप होणार आहे.

ख्रिसमस हा सर्वांचाच आवडता सण. वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या केकचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. मात्र ख्रिसमस स्पेशल केक नेमका बनवायचा कसा हे माहीत नसते. या वर्कशॉपमधून याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे घरच्या घरीच ख्रिसमस स्पेशल केक बनवता येणार आहे. ख्रिसमस स्पेशल फ्रूट केकमध्ये ड्रायफ्रूटपासून ते मसाले कसे वापरावेत, हेदेखील शिकविले जाणार आहे. तसेच मोका हेजलनट सिझलिंग ब्राउनी, बेक न करता सिझलिंग ब्राउनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिझलिंग ब्राउनी विवेक सोहनी डेमो वर्कशॉपच्या माध्यमातून दाखवणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ३०० रुपये नोंदणी फी आहे. लवकरात लवकर नोंदणी करा आणि वर्कशॉपमधून केक बनविणे शिका. अधिक माहितीसाठी (०२५३) ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कल्चर क्लबचे ऑनलाइन सभासदत्व मिळवण्यासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक छताखाली ‘धडे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील तोरणानगर येथील शाळेची दयनीय अवस्था झालेली असून, विद्यार्थ्यांना धाेकादायक छताखाली अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्याबाबत विविध प्रकारच्या युक्त्या प्रशासनाकडून लढविल्या जात असल्या, तरी या शाळांच्या दर्जाबाबत अद्यापही कोणतीही कारवाई होत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

सिडकोत महापालिकेच्या अनेक शाळा असून, मोठी कामगार वस्ती असल्याने विद्यार्थी संख्याही चांगली आहे. मात्र, सिडकोतील प्रभाग २९ मध्ये असलेल्या शाळा क्रमांक १०४, १०७ व उर्दू शाळेच्या इमारतीच प्रचंड दुरवस्था झाली आहे. सिडको प्रशासनाने सुमारे २७ वर्षांपूर्वी उभारलेल्या या शाळेच्या इमारतीतच आजही शाळा भरत असून, या शाळेच्या इमारतीत जागोजागी गळती होत आहे. शाळेत एकच प्रसाधनगृह असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींना गैरसोयीला सामोरे जावे लागत अाहे. या शाळेलगतच लोकवस्ती असल्याने विद्यार्थ्यांसाठी पुरेसे मैदानही नाही. डिजिटल आणि सोशल मीडियाच्या गप्पा करणाऱ्या प्रशासनाने तातडीने या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.


विद्यार्थी संख्येत होतेय घट

या शाळेतील अनेक वर्गांतील छताचे प्लास्टर ठिकठिकाणी कोसळलेले असून, काही ठिकाणी ते उखडलेले असल्याने दुर्घटनेची भीती वाढली आहे. या धोकादायक स्थितीबाबत वारंवार आवाज उठवूनही प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचा आरोप नगरसेविका रत्नमाला राणे यांनी केला आहे. शाळेच्या या दुरवस्थेमुळे विद्यार्थी संख्या दर वर्षी कमी कमी होऊ लागली असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत महासभेतही आवाज उठविण्यात आला होता. या शाळेच्या विकासाबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आयुक्त व अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणीसुद्धा केली होती. त्यावेळी नवीन इमारत उभारणीचा प्रस्ताव सादर करण्याचे अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले होते. मात्र, बांधकाम विभागाने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नसल्याचा आरोप राणे यांनी केला.


...तर छेडणार आंदोलन

या शाळेची इमारत उभारण्याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असून, शाळेत एखादी दुर्घटना घडल्यास प्रशासन त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही नगरसेविका राणे यांनी उपस्थित केला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी ही इमारत पडणे किंवा कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहेत का, असा मुद्दा उपस्थित करून, लवकरात लवकर या इमारतीचे ऑडिट करून प्रस्ताव तयार करावा व शाळा इमारत उभारणीचे काम सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाइल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

--

तोरणानगर येथील शाळेची इमारत अत्यंत जुनी असून, या इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे काहीही लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. महासभा किंवा आयुक्‍तांसमोर केवळ आश्वासनेच दिली जात आहेत. दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.

-रत्नमाला राणे, नगरसेविका, प्रभाग २९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images