Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नगराध्यक्षांवर त्र्यंबकला हल्ला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरच्या नगरपालिकेचा निकाल लागून दोन दिवस उलटत नाही तोच नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर गुरुवारी सकाळी एका तरुणाने हल्ला केला. याप्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रदीप अडसरे याला अटक केली आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास कुशावर्त चौक येथे हल्ला करण्यात आला. प्रदीप विश्वनाथ अडसरे असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. लोहगावकर आपल्या निवासस्थानापासून जवळच असलेल्या कुशावर्त चौक येथे उभे होते. तेव्हा प्रदीप अडसरे या युवकाने हल्ला करून त्यांचा गळा दाबला. तसेच त्यांना मारहाणही केली. दरम्यान प्रदीप अडसरे याच्या मारहाणीतून लोहगावकर यांना सोडवत असतांना त्यांचे बंधू गिरीश लोहगवकर, पत्नी व भावजयी यांनाही मारहाण झाली. हे वृत्त समजताच शहरातील सर्व भाजप कार्यकर्ते यांचा मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. मारहाण करणाऱ्या प्रदीप अडसरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्यांदा हल्ला

एक महिन्यापूर्वी पुरुषोत्तम लोहगावकर यांचे धाकटे बंधू नगरसेवक ललित लोहगवकर यांच्यावरही प्रदीप अडसरे याने हल्ला केला होता. गुरुवारी दिलेल्या फिर्यादीत मागील हल्ल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत शहरात चर्चा असून, हे पूर्वनियोजित षड्यंत्र असल्याचे बोलले जात आहे.

पोल‌सि संरक्षणाची मागणी

नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लोहगावकर व त्र्यंबकेश्वर भाजपचे शहराध्यक्ष श्याम गंगापुत्र यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप विजयी झाला असून, प्रतिस्पर्धी हल्ला करण्याची शक्यता आहे, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

अशी दिली धमकी

आता सुटलात. दुसऱ्यांदा माझ्या तावडीतून तुमच्या कुटुंबातील सदस्य सुटणार नाही अशी धमकी अडसरे याने दिली. तसेच नगराध्यक्षाच्या खुर्चीवर कसा बसतो तेच पाहतो, अशीही धमकी प्रदीप याने दिली.

मी कुशावर्त तीर्थ चौकात उभा असताना प्रदीप अडसरे हा युवक अचानक मागून आला आणि माझा गळा दाबायला लागला. मी माझी सोडवणूक करून घेतली. तर तो मारायला लागला. ‘मी तुला ठार मारेल’, असे म्हणत होता. मी त्याला ओळखत देखील नाही. तुला नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसू देणार नाही, असेही तो म्हणत होता. यामागे षडयंत्र असावे, असे वाटते. मी पोल‌सि संरक्षणाची मागणी केली आहे.

- पुरुषोत्तम लोहगावकर, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपनगराध्यक्ष निवडीकडे लक्ष

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपालिकेत आता उपनगराध्यक्ष निवडीची चर्चा सुरू आहे. सर्वच नगरसेवक नवखे असल्यामुळे अनुभवी अनिता बागुल यांच्या नावाची चर्चा सध्या शहरात आहे. येत्या २१ अथवा २२ डिसेंबर रोली उपनगराध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यत वर्तविली जात आहे.

१७ डिसेंबर रोजी विद्यमान सदस्यांचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्या दिवशी रविवार आहे. सोमवारी अमावस्या आहे. मंगळवारी सहसा पदग्रहण होणार नाही. त्यामुळे २० डिसेंबर रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी कार्यभार स्वीकारतील. त्यानंतर तीन दिवसांचा अजेंडा काढून त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेतली जाईल. या सभेत उपनगराध्यक्ष निवड होईल, अशी चर्चा आहे. २१ अथवा २२ रोजी उपनगराध्यक्ष निवड होण्याची दाट शक्यता आहे. यावेळच्या निवडणुकीत भाजपचे १७ पैकी १४ सदस्य असल्याने उपनगराध्यक्ष निवड एकतर्फी होणार आहे. सभागृहात भाजपच्या अनिता शांताराम बागुल यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व सदस्य नवखे आहेत. अनिता बागुल यांनी २००७ मध्ये निवडणूक जिंकली होती आणि उपनगराध्यक्ष व प्रभारी नगराध्यक्ष पदाचे कामकाज पाहिलेले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रब्बीला तारण्यासाठी सुटले पालखेडचे पाणी

$
0
0


संजय लोणारी, येवला

वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्य, परतीच्या पावसानेही दिलेला दगा आणि खालावलेली पाण्याची पातळी यामुळे संकटात असलेल्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांची आनंदाची वार्ता आहे. पालखेड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीसिंचनासाठीचे पालखेडचे पाहिले आवर्तन सुरु झाले आहे. बुधवारी सकाळी पालखेड धरणाचे गेट उघडले गेले. नेहमीप्रमाणे ५५ तासांनंतर शुक्रवारी (दि.१५) दुपारी १२ वाजेपर्यंत पाणी येवल्यात पोचणार आहे. हे आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांना हायसे वाटले असून लाभक्षेत्रातील ‘रब्बी’ पिकांना मोठा आधार मिळणार आहे.

तालुक्यातील पश्चिम-दक्षिण पट्ट्यातील रब्बीच्या पेरण्यांची परिस्थिती देखील यापेक्षा अधिक काही चांगली नाही. परिणामी गेल्यावर्षीच्या तुलनेत तालुक्यात यंदा रब्बी पेरणीचे चक्र धीम्या गतीने पुढे सरकले. गेल्या वर्षी डिसेंबरच्या मध्यापर्यंत तालुक्यात जवळपास ७० टक्के

पेरण्या झाल्या होत्या. यंदा मात्र तालुक्यात अद्यापपर्यंत अवघ्या ५१ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे पालखेड डावा कालवा कमांड एरियातील शेतकऱ्यांचे लक्ष या आवर्तनाकडे लागले होते.

पहिले आवर्तन २५ दिवसांचे

बुधवारी (दि.१३) सकाळी पालखेड धरणाचे गेट उघडले गेले. तालुक्यात हे पाणी शुक्रवारी बारावाजेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. हे पहिले आवर्तन २५ दिवसांचे असून, त्यातून येवला, निफाड व दिंडोरी या तीन तालुक्यांमधील पालखेड डावा कालव्यावरील रब्बीचे शून्य ते ११० किलोमीटरवरील जवळपास साडेपाच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएमला दिली संधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, उपायुक्त डॉ. दिलीप पठारे, नगरसचिव राजेश धसे आदींच्या उपस्थितीत स्वीकृत सदस्य निवडबाबत विशेष महासभा झाली. अपेक्षेनुसार पाच स्वीकृत सदस्यांपैकी काँग्रेसच्या कोट्यातील एक जागा रिक्त राहिली असून, अन्य चार स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यात काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी एक तर महागठबंधन आघाडीचे दोन स्वीकृत सदस्य निवडण्यात आले.

सभेच्या प्रारंभी नगरसचिव राजेश धसे यांनी स्वीकृत सदस्यसाठी गटनेत्यांनी दाखल केलेल्या नावांचे वाचन केले. महापौर यांनी याबाबत कोणाची हरकत नसल्याची विचारणा केल्यानंतर या चार स्वीकृत सदस्यांची निवड शेख यांनी जाहीर केली. यानंतर सभागृहात नवनियुक्त स्वीकृत सदस्य अब्दुल मलिक इसा (काँग्रेस), भिमा भडांगे (शिवसेना) मोह. अमीन मो. फारुख, गिरीश बोरसे (महागठबंधन आघाडी) अभिनंदन करण्यात आले. दरम्यान पक्षीय बलाबलनुसार सत्ताधारी काँग्रेसला दोन स्वीकृत सदस्य निवड करता येत असली, तरी एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. तर एका जागी मित्र पक्ष असलेल्या एमआयएमचे शहराध्यक्ष माजी महापौर अब्दुल मलिक यांना संधी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हागणदारीमुक्तीत ‘फर्स्ट क्लास’ यश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभागातील ४,८७६ पैकी ३,२०० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. मार्च २०१८ पर्यंत सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे प्रशासनापुढे उद्दिष्ट्य आहे. उर्वरीत १६७६ ग्रामपंचायतींमधून हागणदारी हद्दपार करण्यासाठी प्रशासनाची चिंता वाढली आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेअंतर्गत मार्च २०१८ पर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या उद्दिष्ट्याचा पाठलाग करताना प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाच्या तोंडी फेस आला आहे. विभागातील बहुतांश गावांमधील नागरिकांचा या योजनेच्या अंमलबजावणीकरीता प्रशासनाला सकारात्मक पाठिंबा मिळाला असला तरी अजूनही काही तालुक्यांमधील गावांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करताना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे आता प्रशासनाची चिंता वाढली आहे.

काउंटडाउन सुरू
मुक्त हागणदारीच्या पारंपरिक प्रथेला शंभर टक्के मूठमाती देण्यासाठी मार्च २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सुमारे साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने घर तिथे शौचालय या योजनेचे काउंटडाउन सुरू आहे. अद्यापही विभागातील तब्बल १,६७६ ग्रामपंचायंतींत हागणदारीची प्रथा ठाण मांडून आहे. प्रशासनाकडून या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी आजवर करण्यात आलेले उताऱ्यांचा काहीही उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींचे ६५.६३ टक्के इतके उद्दिष्ट्य साध्य झालेले आहे. असे असले तरी मार्च २०१८ पर्यंत विभागातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्तचे उद्दिष्ट्य साध्य करण्यात यश मिळेल, असा आशावाद प्रशासनाने व्यक्त केला आहे.

१०० टक्के मुक्त तालुके
नाशिक जिल्हा : नाशिक, कळवण, देवळा, निफाड
अहमदनगर जिल्हा : राहता, राहुरी, पारनेर
जळगाव जिल्हा : भुसावळ, बोदवड
नंदुरबार जिल्हा : नवापूर
* धुळे जिल्ह्यातील चारपैकी एकही तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त झालेला नाही.

विभागातील हागणदारीमुक्त ग्रामपंचायती
जिल्हा..........एकूण ग्रामपंचायती..........हागणदारीमुक्त ग्रामपंचायती..........टक्केवारी
नगर....................१,३११..............................१,०६२....................८१.०१
नाशिक.................१,३६८..............................१,०५३....................७६.९७
नंदुरबार...................४९९..............................२६६....................५३.३१
धुळे.......................५४९..............................२७३....................४९.७३
जळगाव.................१,१४९...........................५४६....................४७.५२
एकूण...................४,८७६...........................३,२००..................६५.६३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइकचोराला पंचवटीत अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक करण्यात आली आहे. पंचवटी व मालेगाव परिसरातून चोरी केलेल्या हिरो होंडा शाइन, पल्सर व हिरो होंडा मोसा अशा तीन बाइक जप्त करण्यात आल्या आहेत. गौरव प्रकाश खैरनार असे संशयित चोराचे नाव आहे.

पंचवटी परिसरातील के. के. वाघ कॉलेजमागे मातृदर्शन सोसायटीत गौरव खैरनार राहतो. त्याने पंचवटी व मालेगाव येथून तीन बाइक चोरी केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आडगाव पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले. मित्रांना भेटण्यासाठी बुधवारी (दि. १३) आला असता पोलिसांनी गौरवला अटक केली. संशयित आरोपीने यापूर्वी डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आडगाव येथील बॉइज हॉस्टेलमधील विद्यार्थी डॉक्टरांचे ३९ हजार रुपयांचे तीन मोबाइल चोरले होते. या मोबाइलसह एक लाख दहा हजार रुपये किंमतीच्या तीन बाइक जप्त करण्यात आले. आरोपींकडून अजूनही काही बाइक मिळण्याची शक्यता वर्तवली असून पुढील तपास हवालदार बोराडे करत आहे. पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, सहाय्यक निरीक्षक के. व्ही. पाटील, मिथुन गायकवाड यांनी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनी कार्यालयातून पाऊण लाख लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डीजीपीनगर परिसरातील कंपनीचे कार्यालय फोडून चोरट्यांनी सुमारे ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात ५० हजाराच्या रोकडसह मोबाइल आणि कम्प्युटर इत्यादी मुद्देमालाचा समावेश आहे. मंगळवारी (दि. १२) रात्री हा प्रकार घडला असून, या प्रकरणी अंबड पोलिसांनी घरफोडी गुन्ह्याची नोंद केली आहे.

शैलेंद्र देवराम पाटील (रा. डीजीपीनगर २, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाटील यांचा अंबड गावातील तलाठी कार्यालयाजवळ श्री फर्निचर नावाचा कारखाना आहे. कारखान्याच्या आवारात कार्यालयही आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कारखाना आवारातील कार्यालयाचा पत्रा उचकटून चोरी केली. गल्ल्यांतील ५० हजाराची रोकड, मोबाइल, कम्प्युटरचे विविध साहित्य यासह हिशोब पुस्तिका चोरट्यांनी लंपास करीत पोबारा केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

तोतया पोलिसांनी वृद्धास गंडविले

तोतया पोलिसांनी दोन वृद्धांना लुटण्याच्या घटनेस काही तास उलटत नाही तोच पुन्हा एका ६५ वर्षीय वृद्धेकडील ७० हजार रुपयांचे दागिने हातोहात लांबवले. ही घटना सिडको परिसरात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अरुण शिवराम विधाते (रा. दुर्गानगर, सायखेडकर हॉस्पिटलमागे) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाय मोकळे करण्यासाठी विधाते घराबाहेर पडले होते. फेरफटका मारीत असताना घराजवळच त्यांना दोघा चोरट्यांनी थांबवले. आम्ही पोलिस असून परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याने आम्ही अंगझडती घेत असल्याचे त्यांनी विधाते यांना सांगितले. झडतीचा बहाणा करीत अंगावरील दागिने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला चोरट्यांनी विधाते यांनी दिला. यावेळी सोन्याची चेन आणि दोन अंगठ्या रुमालात बांधण्याच्या बहाण्याने हातोहात चोरट्यांनी लांबविल्या. अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.

तरूणाची आत्महत्या

जगतापमळा परिसरातील देवी चौकात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पवन सुधाकर उगले (रा. आकाश दर्शन सोसा.) असे या तरूणाचे नाव आहे. पवनने बुधवारी (दि. १३) रात्री अज्ञात कारणातून आपल्या घरात गळफास लावून घेतला. ही घटना सकाळी उघडकीस येताच कुटुंबीयांनी त्यास तात्काळ बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास हवालदार काकड करीत आहेत.

टाकीत पडल्याने बालकाचा मृत्यू

खेळत असताना घराशेजारील टाकीत पडल्याने पाच वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आगर टाकळी येथे बुधवारी दुपारी घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अश्विन संतोष कोठूळे (रा. शिवाजीनगर, ड्रीमसिटीजवळ) असे बालकाचे नाव आहे. अश्विन बुधवारी (दि. १३) दुपारी घराजवळ खेळत असतांना घरास लागून असलेल्या पाण्याच्या टाकीत पडला. नाका तोंडात पाणी गेल्याने बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यास पाण्याबाहेर काढून खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून अश्विनला मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल गोठवणार महापालिकेचे बँक खाते

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील सर्व्हे नंबर ५४४ व ५४८ या शासकीय मिळकतीच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतरही महसूल विभागाकडून महापालिकेने त्यास मुदतवाढ न घेता अनधिकृतपणे वापर केला. याप्रकरणी महापालिकेला महसूल विभागाकडून नोटीस बजावली, आता बँक खातेही गोठवण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.

शहरातील सर्व्हे नंबर ५४४ व ५४८ ची जागा महसूल विभागाने महापालिकेला करारावर दिली होती. या कराराची मुदत १९८८-८९ मध्ये संपल्यावर पुढील मुदतवाढ न घेता अनधिकृतपणे महापालिकेकडून वापर करण्यात आला. याबाबत महालेखाधिकार नागपूर यांनी महापालिकेकडून ८९ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश दिले. त्यापैकी ५ लाख रुपये फेब्रुवारी २०१६ रोजी सरकारी खात्यात भरण्यात आले. मात्र, उर्वरित ८४ लाख रुपये अद्याप वसूल झालेले नाहीत. त्यानुसार संबंधित रक्कम भरणा करण्यात कासूल केल्याप्रकरणी या आधी महसूल विभागाकडून महापालिकेस नोटीस बजावून ७ दिवसांच्या आत रक्कम भरणा करण्याचे बजावण्यात आले.

मात्र, महापालिकेने या रक्कम भरणा केला नसल्याने हा विषय लोकलेखा समितीसमोर आला. वसुली करणे आवश्यक आहे. त्या अनुषगाने महसूल विभागाकडून महापालिकेस नोटीस बजावण्यात आली असून महापालिकेचे बँक खाते गोठवण्यासाठी बँक खाते क्रमांक मिळण्याबाबत पत्र देण्यात आले. या आधीच भूसंपादन दाव्याप्रकरणी महापालिकेवर जप्तीची टांगती तालावर कायम असताना आता महसूल विभागाकडून बँक खाती गोठवण्याची तयारी सुरू असल्याने महापालिका अधिकच अडचणीत येणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सव्वा हजार हेक्टरला ओखी वादळाचा तडाखा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवड्यात ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार ३६ हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल कृषी विभागाकडे मूल्यमापनासाठी पाठवला आहे.

ओखीचा जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी, निफाड, सटाणा, चांदवड या पाच तालुक्यांना तडाखा बसला. यात द्राक्ष पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा पिकांना बेमोसमी पावसाचा तडाखा बसला असून त्यातून शेतकरी हलबल झाले आहे.

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने ९ हजार ६८६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या पावसामुळे ३७७ गावांमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात १९ हजार १९७ शेतकरी बाधित झाले. या नुकसानीत सर्वाधिक नुकसान फळ आणि जिरायत पिकांचे झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी राज्य सरकारकडे १५ कोटी ४४ लाख २७ हजार १५४ रुपयांची निधीची मागणी केली आहे. ती मिळण्यापूर्वीच ओखीचा तडाख्यामुळे नुकसानीत पुन्हा वाढ झाली.

ओखी चक्रीवादमुळे जिल्ह्यात एकूण १२५.५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यात द्राक्षपिकांबरोबर कांदा, मका, टोमॅटो आदि पिकांचेही नुकसान झाले. सध्या काढणीला असलेला कांदाही खराब झाला. दिवसभरात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास पंचनामे व्हावेत, असा सरकारचा निकष आहे. मात्र, ओखी वादळामुळे निर्माण झालेली आपत्तीतून बाहेर येण्यासाठी मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. प्रशासनाने दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार विद्यार्थी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक / गंगापूररोड

भरधाव वेगातील टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी गिरणारे मार्गावरील दुगाव चौफुली परिसरात झाली. अपघातानंतर संतप्त जमावाने टेम्पो पेटवून दिल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसासह अग्निशमन दलाने धाव घेऊन परिस्थिती नियत्रंणात आणली.

बाबुलाल रतन बोबडे (२० रा. वडगाव, ता. जि. नाशिक) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो महावीर तंत्रनिकेतन कॉलेजचा विद्यार्थी असून, गुरूवारी सकाळी तो आपल्या दुचाकीने (एमएच १५ बीएम ७९८६) कॉलेजला जात होता. दुगाव चौफुलीपासून काही अंतरावर मखमलाबादकडून गिरणाऱ्याकडे भरधाव जाणाऱ्या टेम्पोने (एमएच १५ एजी १६५१) त्याच्या दुचाकीस धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. अपघातानंतर टेम्पोचालकाने वाहन सोडून फरार झाला. ही घटना परिसरातील समजताच दुगावसह गिरणारे आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती देऊनही पोलिस वेळेत न पोचल्याने संतप्त जमावाने कटलरी सामान भरलेल्या टेम्पोस आग लावली.

भर रस्त्यावर उभा असलेला टेम्पो आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. या प्रकाराची दखल घेत दंगल नियंत्रण पथकासह मुख्यालयातील पोलिस पथक घटनास्थळी हजर झाले. जमावाला पांगवत आगीच्या भक्षस्थानी सापडलेला टेम्पो विझविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र यात अपयश आल्याने अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. सातपूर अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळ पोहचून आग आटोक्यात आणली.

पोलिस कर्मचारी संजय सांगळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याविरुद्ध टेम्पो पेटविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर बोबडे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अज्ञात टेम्पोचालकाविरुद्धही तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंब पद्धतीवर कोरडे ओढणारे ‘सिंगल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीत ग्लोबल सीनिअर व्हाइस प्रेसिडेन्ट असलेली मैत्रेयी विवाह करायला तयार नसते. आयुष्यभर एकट्यानेच रहायचे असा तीतिचा निर्धार असतो. त्यात एकल माता होण्याच्या निर्धाराची भर पडते; मात्र तिची आई तिचा विवाह करण्याचा निर्धार करते. त्यात तिला चुलत मावशीची साथ लाभते. योगायोगाने त्याच वेळी अमेयचे स्थळही येते; मग त्या दोघी मैत्रेयीला बोहल्यावर चढवण्यासाठी कोणते दिव्य करता त्यासाठी आत्महत्या करण्याची धमकी देऊन मैत्रेयीच्या एकल राहण्याला तिची आई कशी पाठिंबा देते याची कथा म्हणजे ‘सिंगल’.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५ वा नाट्य महोत्सव प. सा. नाट्यगृह येथे सुरू आहे. नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत ‘सिंगल’ हे नाटक गुरूवारी सादर झाले. मैत्रेयीच्या मनात विवाह संसार, सासर याबाबत एवढी तिडीक का असते ती ‘सिंगल मॉम’ व्हायचे का ठरवते? आणि तिची आई या निर्णयाला का पाठिंबा देते? या प्रश्नांची उत्तरे या नाटकात मोठ्या रंजकतेने मिळतात. भविष्यातील स्त्री जीवनाचा वेध घेणारे हे नाटक आजच्या पुरुष प्रधान कुटूंब पद्धतीवरही सणसणीत कोरडे ओढणारे आहे. आजची कर्तृत्ववान स्त्री कशी आहे? व भविष्यात कशी असेल याची प्रत्यकारी चुणूक ‘सिंगल’ या नाटकात पहायला मिळते. स्त्रीयांचे पारंपरिक साचेबंध अनुभव आणि त्यात अधुनिक विचारांच्या तरुणीची होणारी घुसमट नाटककार मानसी देशमुख यांनी प्रत्ययकारकने मांडलेली आहे. भारतीय विवाह संस्था, कुटुंब संस्थाही अत्यंत कर्मठ ताठर आहे. हे यातून दाखवण्यात आले.

कामगार कल्याण केंद्र एकलहरे संस्थेच्या या नाटकाचे लेखन मानसी देशमुख यांनी केलेले असून दिग्दर्शक अर्चना नाटकर यांचे होते. शोभा दुसाने, सविता जोशी, सोनाली हवराळे, साक्षी गांगुर्डे, सानिक मेहेत्रे, अमित जाधव यांनी भूमिका केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकजवळ मोठा शस्त्रसाठा जप्त

$
0
0

नाशिक
मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड टोल नाक्याजवळ पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. २५ रायफल्स, १९ बंदुका आणि ४ हजार काडतुसं एवढी शस्त्रास्त्र घेऊन तस्कर मुंबईकडे जात होते. त्याची 'टिप' मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून तिघांना ताब्यात घेतलंय. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

मालेगावच्या एका पेट्रोल पंपावर बोलेरो कारचा चालक पैसे न देता रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पसार झाला. या घटनेची माहिती पंपचालकाने लगेचच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना दिली. त्यानंतर सगळी सूत्रं वेगानं हलली. प्रमुख नाक्यांवरील पोलिसांना सतर्क करण्यात आलं आणि प्रत्येक गाडीची तपासणी सुरू झाली.

चांदवड टोक नाक्याजवळ पोलिसांनी बोलेरो कारला हात दाखवला, तेव्हा चालकानं गाडी त्यांच्या अंगावरच नेली. तिथेच पोलिसांना संशय आला आणि त्यांनी कारची कसून तपासणी केली. तेव्हा, रायफल्स, गावठी कट्टे आणि काडतुसांचा मोठा साठा त्यांनी जप्त केला. त्यानंतर, नाशिक-मालेगाव भागातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. नेमकी ही शस्त्रं कुठून आली, मुंबईत कशासाठी नेली जात होती, या तस्करीमागे कोण आहे, याची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागाची सफाई उघड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत तब्बल ११ हजार १२१ रुपये खर्चून खरेदी केलेल्या डस्टबिनबाबत पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी आता अफलातून जावईशोध लावला आहे. शहर कचराकुंडीमुक्त असताना केवळ स्वच्छतेच्या २२ गुणांसाठी १८९ डस्टबिन खरेदी केल्याचा हास्यास्पद खुलासा बुकाने यांनी केला आहे. विशेष म्हणजे या डस्टबिन एकाच दिवसासाठी खरेदी केल्या असून, सर्वेक्षण आटोपल्यानंतर त्या दुसऱ्याच दिवशी शाळा व वसत‌िगृहांना भेट देण्यात येणार असल्याचा अजब दावा त्यांनी केला. यावरून भाजपच्याच सत्तेतील अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेतून आपले खिसे भरून घेत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नाशिक महापालिकेच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक ४ जानेवारीला नाशिकमध्ये येत आहे. या पथकाच्या पाहणीनंतर देशभरातून नाशिकचा स्वच्छतेतील गुणांकन समजणार आहे. या स्पर्धेत पास होण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी अफलातून शक्कल लढवण्यास सुरुवात केली आहे. या सर्व्हेक्षणात महापालिकेने ओला आणि सुका कचरा विलगीकरणासाठी काय उपाययोजना केल्यात, यासाठी २२ गुण आहेत. सदर गुणप्राप्तीसाठी महापालिकेने शहरातील व्यापारीपेठांमध्ये १८९ ठिकाणी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या डस्टबिन बसविल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी दोन नग ५५ लिटर्स क्षमतेच्या डस्टबिनची खरेदी तब्बल ११ हजार १२१ रुपयांत करण्यात आली आहे. या खरेदीवर शिवसेनेने आक्षेप घेत, चौकशीची मागणी केली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने यांची भेट घेतली.

यावेळी डॉ. बुकाने यांनी आपली खरेदी योग्य ठरविण्यासाठी अजबच तर्कट मांडल्याने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डेंसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही हसू आवरले नाही. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत जानेवारीत परीक्षा होणार असून २२ गुण मिळविण्यासाठी या डस्टबिन बसविल्याचा दावा डॉ. बुकाने यांनी केला. एका दिवसाची परीक्षा झाल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी काढून घेऊन शाळा, महिला वसतिगृहे यांना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे केवळ २२ गुणांसाठी शहराला पुन्हा कचराकुंडीयुक्त शहर करून पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियाना’चीही फसवणूक आरोग्य विभागाकडून केली जात आहे.

..म्हणे ६०० डस्टबिनची गरज!

आरोग्य विभागाने स्वच्छ भारत अभियानंतर्गत २२ गुण मिळवण्यासाठी पहिल्या टप्प्यात १८९ डस्टबिन खरेदी केल्या आहे. परंतु शहरात अशा प्रकारच्या एकूण ६०० डस्टबिन खरेदी करण्यात येणार असल्याचेही अजब उत्तर आरोग्याधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे ही कचऱ्यातील हात की सफाई करण्याच्या आरोग्याच्या प्रकाराने स्वच्छतेच्या निधीतही बनवेगिरी केली जात असल्याचे चित्र आहे. आरोग्याधिकाऱ्यांच्या या अजब उत्तराने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनीही डोक्यावर हात मारून घेतला आहे. त्यामुळे एकूण आरोग्याचा कारभाच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक जाणिवांचे व्रतस्थ व्यासपीठ

$
0
0

सामाजिक जाणिवांचे व्रतस्थ व्यासपीठ

---

सक्रिय नेटिझन्स आणि अन्य समाजघटकांना सकारात्मक सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या सोशल नेटवर्किंग फोरम या व्यासपीठाचा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. १५ डिसेंबर) साजरा झाला. त्यानिमित्त समाजसेवेप्रति व्रतस्थ अशा सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांच्याशी केलेली बातचीत...

---

-सोशल नेटवर्किंग फोरमची प्रेरणास्थाने कोणती?

-छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा व्यक्ती सोशल नेटवर्किंग फोरम (सोनेफो)च्या सदस्यांचे प्रेरणास्थान आहेत. देशासाठी ज्यांनी आपले सर्वस्व वाहिले अशा व्यक्तींना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचे व्रत आम्ही अंगीकारले आहे. त्यामुळे अशा महान व्यक्तींच्या जयंतीला मिरवणुकांमध्ये नाचण्याऐवजी एखादा सामाजिक उपक्रम राबविण्याचा पायंडा फोरमने पाडला आहे.

---

-सामाजिक विषयात काम करताना लोकांकडून कसा अनुभव येतो?

-सामाजिक विषयात दोन प्रकारच्या लोकांशी संबंध येतो. पहिला म्हणजे ज्यांच्यासाठी काम करायचे आहे ते आणि दुसरा ज्यांच्या मदतीने करायचे आहेत ते. यातील पहिला घटक साधारणपणे ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोक असतात. आमच्याकडे येण्यापूर्वी पाणी, आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत गरजांसाठीसुद्धा त्यांना वर्षानुवषे झगडावे लागते. या संघर्षानंतरही पदरी काही पडत नाही, तेव्हा हे असहाय्य लोक मदतीसाठी येतात आणि त्यांच्या समस्या मांडतात. यावेळी कोणत्याही सूज्ञ व्यक्तीच्या पोटात कालवाकालव होते. त्यामुळे अशा लोकांच्या समस्या सोडवून त्यांच्या चेहेऱ्यांवरील आनंद बघण्यासाठीच फोरम हे काम करीत आहे. ज्यांच्या मदतीने हे उपक्रम राबविले जातात, ते सर्व सामाजिक भान असलेले लोक असतात. पण, त्यांना नेमके कसे योगदान द्यायचे, हे सुचत नाही. जेव्हा सोशल मीडियावर आम्ही आमच्या उपक्रमाची माहिती पोस्ट करतो, तेव्हा अशा लोकांना आपल्याला हेच तर करायचे होते, असे वाटते आणि ते मनापासून सहभागी होतात. श्रमदान, एक्स्पर्टरीज किंवा निधी अशा शक्य असेल त्या माध्यमातून उपक्रमात सहभागी होता येत असल्याने विद्यार्थ्यांपासून ८० वर्षांच्या आजोंबापर्यंत आमचे सदस्य आहेत. उपक्रम पूर्ण झाल्यावर त्यासंबंधीची माहिती जेव्हा आम्ही मदतकर्त्यांना सोशल मीडियावरून कळवितो तेव्हा त्यांना होणारा आनंद शब्दातीत असतो.

--

-‘सोनेफो’ची नेमकी उद्दिष्टे काय?

-सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तरुणांना देशाप्रति आपल्या जबाबदारीचे भान करवून देणे आणि ज्यांच्यापर्यंत स्वतंत्र भारताच्या विकासाची फळे पोहोचली नाहीत अशा लोकांना विकासगंगेत सहभागी करून घेणे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना, अनाथालयांना, वृद्धाश्रमांना मदत करणे आणि आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देणे. सोशल साइट्सचा जातीय, धार्मिक आणि वांशिक विद्वेषासाठी होणारा चुकीचा वापर थांबविणे, ही ‘सोनेफो’ची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

--

-‘सोनेफो’चे काम कसे चालते?

-फोरमच्या कामाची सुरुवात आणि काम करण्याचे माध्यमच सोशल मीडिया असल्याने कोणताही नवा उपक्रम सुरू करायचा झाल्यास सर्वप्रथम फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अपडेट केले जाते. फोरमच्या काही उपक्रमांत श्रमदानाची, काहींमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शनाची, तर काहींमध्ये निधीची आवश्यकता असते. उपक्रमाला अनुसरून सोशल मीडियावर सर्व सदस्यांना मदतीचे आवाहन जाते. या वाहनाला सर्व सोशल नेटवर्कर्सकडून नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळतो. कॉलेजचे विद्यार्थी श्रमदान करतात, डॉक्टर्स-इंजिनीअर्स आपल्या ज्ञानाचा उपयोग करतात, तर हे व अन्य लोक निधीच्या माध्यमातून मदत करतात. ज्यांना समाजासाठी काही तरी करण्याची इच्छा असेल, अशी कोणतीही व्यक्ती सोशल नेटवर्किंग फोरमचे सदस्यत्व घेऊ शकते. या सदस्यांच्या मदतीने उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात.

--

-‘सोनेफो’चे सदस्य कोण असतात?

-फोरममध्ये राज्यातील विविध शहरांतीलच नव्हे, तर विदेशांतीलही शेकडो सदस्य कार्यरत आहेत. डॉ. पंकज भदाणे, इंजिनीअर प्रशांत बच्छाव, रामदास शिंदे, डॉ. उत्तम फरतळे, डॉ. जयदीप निकम, प्रा. आशिष चौरसिया, अॅड. गुलाब आहेर, डॉ. माधवी गोरे-मुठाळ, डॉ. विशाल पवार, डॉ. योगेश जोशी, डॉ. समीर पवार, जीवन सोनवणे, राजेश बक्शी (कतार), लक्ष्मीकांत पोवनीकर (इराक) आदी असंख्य सदस्य कोणतीही योजना कार्यन्वित करण्यात मोलाचे योगदान देतात.

--

-वाड्यापाड्यांत काम करताना आलेले काही अनुभव शेअर कराल...

-एकदा एका खेड्यात पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गेलो होतो. पाहणीनंतर गावप्रमुखाने चहासाठी घरी नेले. थोड्या वेळात घरातून विनादुधाच्या कोऱ्या चहाचे कप आले. शहरातील लोकांना असा चहा पाजावा लागत असल्याची सल संबंधिताच्या चेहेऱ्यावर दिसली. त्यातूनच ते म्हणाले, की गावात बऱ्याच गायी-म्हशी आहेत. पण, माणसांनाच प्यायला पाणी नसल्याने जनावरांची जास्तच आबाळ होते. त्यामुळे दूधही कमी येते. जे थोडेफार येते त्यावर पहिला हक्क त्यांच्या पिलांचा मानून आम्ही जनावरांचे दूधच काढत नाही, म्हणून हाच चहा गोड मानून घ्या! एका बाजूला जनावरांना हार्मोन्सची इंजेक्शन्स देणारे किंवा केमिकल्स वापरून नकली दूध बनविणारे शहरी महाभाग कुठे आणि प्रतिकूल परिस्थितीतही जनावरांच्या दुधावर पिलांचा हक्क मानणारे हे श्रीमंत लोक कुठे, यावर विचार करीत द्यायला म्हणून गेलेलो आम्ही सदस्य बरेच काही घेऊन आलो...

--

-‘सोनेफो’चे भविष्यातील नियोजन कसे राहणार आहे?

-फोरमने सोशल नेटवर्कर्सच्या मदतीने आजवर आठ आदिवासी गावे टँकरमुक्त केली आहेत. त्यानंतर बरीच गावे आमच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत. साधारण २० गावांची यादीही आमच्याकडे आहे. त्यांचा पाणीप्रश्न आम्ही सोडवू शकतो. मात्र, त्यासाठी आम्हाला निधीची गरज असून, भविष्यात मोठ्या कंपन्यांच्या सीएसआर स्कीममधून निधी उपलब्ध करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना यश मिळाल्यास येत्या वर्षभरातच ‘सोनेफो’ या वीस गावांना टँकरमुक्त करण्यात नक्कीच यशस्वी होईल.

--

(शब्दांकन : प्रशांत भरवीरकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वत:ची बलस्थाने ओळखून नैराश्यावर करा मात

$
0
0

मटा डिबेट

-----

स्वत:ची बलस्थाने ओळखून नैराश्यावर करा मात

आजचे युवकच उद्याचे आशास्थान आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्राला नवी उभारी मिळणार आहे. अशा स्थितीत त्यांनीच उदासीन राहून चालणार नाही. त्यामुळे जीवनातील आव्हानांकडे सकारात्मक दृष्टीने पाहा आणि नैराश्यावर मात करताना स्वत:तील बलस्थाने ओळखा, असा सूर ‘मेंटल वेलनेस : मना सज्जना’ या उपक्रमांतर्गत आयोजित ‘मटा डिबेट’ चर्चासत्रातून उमटला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि मविप्रच्या केटीएचएम कॉलेजतर्फे हा उपक्रम झाला. कॉलेजियन्सने या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात वृत्तमालिकेच्या माध्यमातून विषयाची मांडणी झाल्यानंतर आता ‘मटा डिबेट’च्या माध्यमातून थेट तरुणांशी संवाद साधला जात आहे. या डिबेटमध्ये कॉलेजियन्सने ‘ताणतणाव आणि युवक’ या विषयावर व्यक्त केलेली संवेदनशील मते...

--

(संकलन : सीसीआर कल्पेश उघडे, योगेंद्र देवरे)

--


जीवनातील उत्स्फूर्तता महत्त्वाची

युवकांचे नैराश्याकडे ओढले जाण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. बहुतांश युवक फक्त आपले वैयक्तिक जीवन न जगता विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांत उत्स्फूर्ततेने सहभागी होत आहेत. परिणामी ते नैराश्यमुक्त जीवन जगत आहेत.

-सौरभ भावसार

--

पुरेशा संवादाचा अभाव

बऱ्याचहा कौटुंबिक संवाद न झाल्यामुळे नैराश्य येत आहे. अनेक युवक हे मोबाइल व सोशल मीडियाच्या आहारी जाऊन नैराश्याला बळी पडताना दिसून येत आहेत. दैनंदिन जीवनात पुरेसा संवादच होत नसल्यामुळे युवकांचे मन मोकळे होत नाही. त्यामुळे मुक्त संवाद गरजेचा आहे.

-मयूर गावित

_ _

सोशल मीडियाबाबत व्हावे प्रबोधन

मोबाइल व सोशल मीडियाचा नको तितका वापर हे युवकांचे नैराश्याचे प्रमुख कारण बनत चाललेले दिसते. विविध व्हर्च्युअल सोशल साइट्सपर्यंतच त्यांचे आयुष्य सीमित राहत चालले आहे. त्यामुळे या प्रभावी माध्यमांच्या योग्य वापराबद्दल युवकांमध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.

-श्रुती पाटील

_ _ _

सोशल नेटवर्किंगचा योग्य वापर

आजचा सजग तरुण हा विविध सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्यक्त होताना दिसून येतो. त्याच्या मनातील सुप्त भावना तो या माध्यमाद्वारे मोकळ्या करताना दिसत आहे. त्याद्वारे मनमोकळे करीत असल्याने अशी तरुणाई निश्चितच पॉझिटिव्ह आहे. ती नैराश्यात ओढला जात नाही.

-तेजस्विनी ठाकूर

_ _

शिक्षण पद्धतीचादेखील प्रभाव

फक्त युवकच नाहीत, तर इतर वयोगटातील अनेक जणही नैराश्यात ओढले जात आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. युवकांना योग्य संधी प्राप्त होत नाही, त्यामुळे ते नैराश्यात ओढले जाताता. संवादातला दुरावा व शिक्षण पद्धतीचादेखील यावर प्रभाव पडताना दिसतो.

-पार्थ बागुल

_ _ _

सकारात्मकतने करावी वाटचाल

अनेक युवक नैराश्याला बळी पडताना दिसत नाहीत. योगा, व्यक्तिमत्त्व विकास व अनेक समाजोपयोगी उपक्रमांतून युवक आपले आयुष्य सार्थकी लावताना दिसून येत आहेत. त्यामुळे नैराश्यमुक्त जीवनाकडे युवक वाटचाल करीत आहेत. हे केवळ सकारात्मकतेनेच होताना दिसते.

-सौरभ वडजे

_ _ _ _

चांगले करण्याची इच्छाशक्ती

आजची युवापिढी प्रेम, विश्वासाच्या आधारे नैराशातून बाहेर पडताना दिसून येते. कुटुंब, जोडीदार आदी प्रियजनांसाठी काही तरी चांगले करण्याची इच्छा युवकांना नैराश्यातून बाहेर काढताना दिसते. या सर्व गोष्टींमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये पॉझिटिव्ह अॅटिट्यूड तयार होत आहे.

-योगेश पातळपुरे

_ _

राजकारण घटकही महत्त्वाचा

तरुणांना नैराश्य येण्यामागे काही प्रमाणात राजकारणही कारणीभूत आहे, असे मला वाटते. अनेक गोष्टींमधून ते पुढे येण्याचा प्रयत्न करीत असतात. पण, अनेक जण आपली राजकारणाची पोळी भाजण्यासाठी विविध प्रकारची तेढ निर्माण करतात आणि त्यांच्यामुळे काही प्रमाणात नैराश्य येते.

-शंतनू बिरारी

_ _ _

कुटुंब संस्थेचा मोठा प्रभाव

आजच्या तरुणांच्या नैराश्याला कुटुंब संस्थाही मोठ्या प्रमाणात जबाबदार दिसते. कारण, बरेच आई-वडील मुलांवर अनेक गोष्टी लादत असतात. परिणामी मुलांना आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करता येत नाही. त्यामुळे तरुणांना कामाचा ताण निर्माण होतो आणि ते नैराश्याला बळी पडतात.

-गोदावरी देवकाते

_ _

स्पर्धेसह नानाविध कारणे

वाढलेली स्पर्धा, कुटुंब व मित्रांमध्ये घटलेला संवाद, इंटरनेट, सोशल मीडिया, कौटुंबिक समस्या, आर्थिक समस्या या सर्वांमुळे आजचा युवक नैराश्याकडे ओढला जात आहे. जोपर्यंत नैराश्य दूर करण्यासाठी सर्व स्तरांवर पावले उचलले जात नाहीत तोपर्यंत हे थांबणार नाही, असे वाटते.

-प्रशांत लाटे

_ _ _

स्वार्थी घटकांचाही हात

अनक जण राजकीय जीवनातून नैराश्याकडे ओढले जातात. बरेच युवक निवडणुकीदरम्यान एखाद्या व्यक्तीसाठी दिवस-रात्र प्रचाराला लागतात. पण, संबंधिताचा हेतू साध्य झाल्यानंतर तो या युवकांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळेदेखील काही युवक नैराश्याला बळी पडतात.

-विशाल खानकरी

_ _

आपले जगणे आपल्या हाती

खरे तर या जगात कोणीही काहीही घेऊन आलेले नसते. त्यामुळे आपण कोणत्या भूमिकेतून जगायचे हे आपल्या हातात असते. आपण सकारात्मक राहायचे, की नकारात्मक राहून नैराश्याला बळी पडायचे, हे ज्याने त्याने ठरवावे. त्यामुळे नैराश्याला सर्वस्वी आपणच जबाबदार असतो.

-शुभम जाधव

_ _ _


वाढते नैराश्य चिंतेची बाब

आजच्या युवापिढीतील वाढते नैराश्य ही चिंतेची बाब आहे. आजचा युवक नैराश्यात अडकताना दिसतो, त्याचे कारण म्हणजे त्याची वैचारिक पातळी. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी बरेच युवक आपली तत्त्वेही वेळेवर सोडतात. त्यामुळे नैराश्य वाढत आहे.

-नयन कल्पना जाधव, कवी,गीतकार,लेखक, वक्ता

_ _ _


डोळस दृष्टिकाेन भावणारा

नैराश्य या विषयावर तरुणांना बोलते करीत आजची तणावग्रस्त परिस्थिती, बेरोजगारी, गरिबी, कौटुंबिक स्थिती, शैक्षणिक अपयश, प्रेम-स्वप्नभंग आदीतून आलेल्या नैराश्यावर मुक्त बोलणारी मुले समाजाकडे किती डोळसपणे पाहतात याचा प्रत्यय ‘मटा डिबेट’मुळे आला.

-प्रा. डॉ. डी. पी. पवार, मराठी विभागप्रमुख

----


एकजुटीने करावा सामना

चला, जगू या नैराश्याशिवाय... युवकांनी विपरित परिस्थितीशी दोन हात करून, संघर्षातून नैराश्य आपल्या जीवनातून काढून टाकण्यासाठी संवादी राहायला हवे. समाजाला गृहित न धरता एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण करीत एकजुटीने नैराश्याचा सामना केला पाहिजे.

-प्रा. डॉ. एस. सी. पाटील, उपप्राचार्य केटीएचएम, कॉलेज

_ _ _


सक्रिय मदत ठरेल उपयुक्त

नैराश्य ही समाजापुढील गंभीर समस्या आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नैराश्यापासून दूर ठेवण्यासाठी प्राध्यापकवर्ग अनेक प्रकारे प्रयत्न करतात. नैराश्यग्रस्त व्यक्तींकडे आपुलकीने पाहणेदेखील महत्त्वाचे ठरते. त्यांना नैराश्यामधून बाहेर पडण्यासाठी आजूबाजूच्यांनी सक्रिय मदत केली पाहिजे.

-प्रा. डॉ. पी. व्ही. कोटमे, उपप्राचार्य, केटीएचएम कॉलेज

-------------

चर्चेतील लक्षवेधी मुद्दे

----

-नैराश्याविरोधात लढण्यासाठी आजूबाजूच्यांनी करावी सक्रिय मदत

-समाजाला गृहित न धरता करावी एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण

-समाजाकडे डोळसपणे पाहणे ठरू शकेल उपयुक्त

-सकारात्मक राहायचे, की नकारात्मक हे प्रत्येकाच्या हाती

-नैराश्य दूर करण्यासाठी व्हावेत सर्व स्तरांवर प्रयत्न

- कुटुंब संस्थेची भूमिका प्रभाव टाकणारी

- काही तरी चांगले करण्याची इच्छा युवकांसाठी उपयुक्त

- दैनंदिन जीवनात राखावी पुरेशी सकारात्मकता

- सोशल मीडियाचा करावा प्रभावी वापर

-पुरेशा संवादाने होईल नैराश्यावर मात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिंडोरी डिफेंडर्सचा निसटता विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोमहर्षक लढतीत दिंडोरी डिफेंडर्सने कन्हैया चॅलेंजर्सवर अवघ्या तीन गुणांनी निसटता विजय मिळवला, तर एबीसी रॉयल फायटर्स व सिन्नर सायलेंट किलर्स यांच्यातील बरोबरीमुळे चुरस टिपेला पोहोचली आहे. नाशिक महापालिका व केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेतर्फे नाशिक कबड्डी प्रीमियर लीग सिझन २ स्पर्धेच्या पाचव्या दिवशी उत्कंठावर्धक सामन्यांचा अनुभव प्रेक्षकांना पाहयला मिळाला.

आजच्या झालेल्या पहिल्या सामन्यात एबीसी रॉयल फायटर्स व सिन्नर सायलेंट किलर्स यांच्यातील सामना ३३-३३ असा बरोबरीत सुटला. सामन्याच्या पहिल्या सत्रात एबीसी रॉयल फायटर्सने २१-१६ अशी पाच गुणांची आघाडी आपल्याकडे ठेवली होती; परंतु दुसऱ्या सत्रात आदिनाथ गवळी, शंकर गदई, सुरजा दुंदले, ओंकार जाधव, मियाज शेख यांच्या सुंदर खेळाच्या जोरावर सिन्नर सायलेंट किलर्सने सामन्यात पुनरागमन केले. त्याचवेळेस एबीसी रॉयल फायटर्सचे राकेश खैरनार, दादा आव्हाड, परेश म्हात्रे यांच्या दमदार खेळामुळे सामना उतरोत्तर रंगत गेला व दोन्ही संघांना योग्य न्याय मिळत सामना बरोबरीत सुटला. एबीसी रॉयल फायटर्सने स्पर्धेतील अपराजित राहण्याचा सिलसिला कायम राखला. या सामन्यात सिन्नर सायलेंट किलर्सचा ओंकार जाधव याला उत्कृष्ट चढाईपटूचा, आदिनाथ गवळी याला उत्कृष्ट बचावपटूचा, तर एबीसी रॉयल फायटर्सच्या राकेश खैरनार याने सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान पटकावला.

दुसऱ्या सामन्यातही कबड्डीचा थरार पाहायला मिळाला. कन्हैया चॅलेंजर्स व दिंडोरी डिफेंडर्स यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. पहिल्या सत्रात दिंडोरी डिफेंडर्सने ३०- २४ अशी सहा गुणांची आघाडी घेत ती शेवटपर्यंत टिकवली व हा सामना ५७-५४ असा ३ गुणांनी जिंकला. सामन्यात दिंडोरी डिफेंडर्सच्या मयूर शिवतरकर, रोहित जाधव, सुरेश बोडके, सागर काळे यांनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. कन्हैया चॅलेंजर्सतर्फे मोमीन शेख, बबलू गिरी, सौरभ पाटील, योगेश लोखंडे यांनी पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, ते त्यात अपयशी ठरले. या सामन्यातील कन्हैया चॅलेंजर्सच्या प्रमोद घुले याला उत्कृष्ट चढाईपटूचा, दिंडोरी डिफेंडर्सच्या सुरेश बोडके याला उत्कृष्ट बचावपटूचा, तर सागर काळे याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दिवसातील शेवटचा सामना सर्वज्ञ रायडर्स व नाशिक लॉयन्स यांच्यात सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोमध्ये आज संताजी पालखी सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ आणि श्री संताजी युवक मंडळाच्या वतीने संताजी महाराज पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (दि. १६) पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहात शनिवारी दुपारी दोन ते पाच यावेळेत हा कार्यक्रम होईल. आकर्षक रथामधून संताजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात भजनी मंडळ, ढोल व लेझीम पथक, वारकऱ्यांच्या वेशभूषेत मुले आणि मुली सहभागी होणार आहेत. पालखी सोहळ्याच्या समाप्तीनंतर सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे. त्यामध्ये पहिली ते पदवीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रावीण्य सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून गजानन शेलार, डॉ. भूषण कर्डिले, व्ही. डी. पाटील, बी.जी. चौधरी, माजी पोलिस अध‌िकारी रमेश चौधरी आदी उपस्थ‌ित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा लाभ उपस्थ‌ितांना मिळणार असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ चौधरी, शिवाजी चौधरी, रवींद्र चौधरी, सतिश काळे, प्रदीप कोते, नितीन पवार आदी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

दुकानात खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची दोघा टवाळखोरांनी छेडछाड काढत तिचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि. १२) एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा येथे घडली.

मळ्यात राहणारी अवघ्या तेरा वर्षांची मुलगी घराजवळच असलेल्या दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. दुकानातून घराकडे माघारी येत असताना या मुलीला रस्त्यात अडवुन गुड्ड्या नरवडे आणि वैभव (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांनी तिच्याकडे मोबाईल नंबर मागितला. ‌तिने नकार दिल्याने या दोघा टवाळखोरांनी तिला पकडत मिठी मारली व लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केल्याने दोघा टवाळखोरांनी पळ काढला. या मुलीने घरी आल्यावर आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुड्ड्या नरवडे आणि वैभव या दोघांविरोधात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार या दोघांविरोधात नाशिकरोड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किराणा दुकानातील दारूअड्डा उद्‍ध्वस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

किराणा दुकानात बेकायदेशिररित्या देशी व विदेशी मद्य विक्री सुरू असलेला अड्डा नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकून नुकताच उद्‍ध्वस्त केला. या प्रकरणी मद्य विक्री करणाऱ्या शिवाजी तुकाराम अरिंगळे (४१, रा. अरिंगळे मळा, एकलहरे रोड, नाशिकरोड) याच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकरोड पोलिसांनी बुधवारी (दि. १३) पहाटे साडेपाचच्या सुमारास एकलहरे रोडवरील अरिंगळे मळ्यातील ऋषिकेश किराणा दुकानावर कारवाई केली. यात देशी व विदेशी कंपन्यांच्या ७ हजार आठशे अकरा रुपयांच्या ११३ मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या आदेशानुसार सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार पारदर्शी व्हावा

$
0
0

अॅडम कमांडंट राहुल मिश्रा यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

कॅन्टोन्मेंट बोर्डाने नागरी सुविधा देताना अधिकाधिक लोकाभिमुख होत पारदर्शक व्यवहार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्कूल ऑफ आर्टिलरीचे अॅडम कमांडंट कर्नल राहुल मिश्रा यांनी केले.

देशात १६ डिसेंबर हा दिवस देशभरात रक्षा संपदा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्यानिमित्ताने शनिवारी (दि. १६) देवळालीच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कर्नल आर. एन. सिंग, नगरसेविका कावेरी कासार, आशा गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दि. १ ते १५ डिसेंबर देवळालीत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चमन गेहलोत, हिरामण राऊत, दिलीप कांबळे यांच्यासह कॅन्टोन्मेंट शाळेत आयोजित स्वच्छता विषयावर आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धांतील विजेत्यांचे पारितोषिक देत गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधिकारी सायमन भंडारे यांनी केले, तर आभार कर अधीक्षक दीपक पारकर यांनी मानले. कार्यक्रमास श्रीनिवास सहस्रभोजने, निशांत औथनकर, अतुल पोतदार, जयमाला पाटोळे आदींसह कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते.

कॅन्टोन्मेन्ट हॉस्पिटलमध्ये पॅपस्मियर तपासणी

रक्षा दिनाचे औचित्य साधत शनिवारी (दि. १६) कॅन्टोन्मेंट रुग्णालयात नामको हॉस्पिटलच्या सिसोदिया फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या गर्भपिशवीच्या कॅन्सरचे निदान करणारी पॅपस्मियर तपासणी करण्यात आली. या वेळी डॉ. जयश्री नटेश यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी, धावपळीच्या जीवनात महिलांमध्ये गर्भपिशवीच्या कॅन्सर वाढण्याची भीती निर्माण झाली असून, त्याच्या निदानासाठी पॅपस्मियर तपासणी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी देवी लखमीयानी, अनिता साळवे, वैष्णवी पवार, प्रिया पवार, शशीकांत वाघ आदींसह रुग्णालयाचे कर्मचारी प्रयत्नशील होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images