Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

शाळांबाहेर ‘नो पार्किंग’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून खासगी शाळांना नोटिसा पाठवून शाळांबाहेर शालेय वाहतुकीची, तसेच खासगी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुख्याध्यापकांची यासंदर्भात बैठक घेऊन समजदेखील देण्यात आल्याची माहिती प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी स्थायी समितीत दिली.

शहरातील शाळांपुढील रस्त्यांवरील पार्किंगचा व वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. बहुसंख्य खासगी शाळांसमोर रस्त्यावरच पार्किंग होत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढल्याने महापालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरात शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या शाळांमुळे रस्त्यांवरच वाहने उभी केली जात असल्याने पार्किंगसह वाहतुकीचा प्रश्न चिघळत चालला आहे. शाळांमुळे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शाळांमध्ये मुलांची वाहतूक करणारी वाहने, तसेच पालकांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे रस्त्यांवर कोंडी होत आहे. मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांची दुचाकी व चारचाकी वाहने शाळांच्या बाहेर उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. वाहतूक ठप्प झाल्याने अपघातानादेखील निमंत्रण मिळत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.

अशोका मार्गावरील अशोका स्कूल, तसेच विस्डम हाय स्कूलसंदर्भातील पार्किंगची लेखी तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती. त्यासंदर्भात स्थायी समितीमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर या दोन्ही शाळांना समज देण्यात आली असल्याची माहिती उपासनी यांनी दिली. शाळांबाहेरील पार्किंगमुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्याने त्या अनुशंगाने अॅक्‍शन प्लॅन तयार करून शाळांना बाहेर वाहने लावण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती नितीन उपासनी यांनी स्थायी समितीच्या बैठकी दिली. यापुढे थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

--

शाळांमध्ये करणार तपासणी

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील खासगी मालकीच्या १८९ शाळांना पार्किंगसंदर्भात आतापर्यंत नोटिसा बजावल्या आहेत. त्यात अशोका व विस्डम शाळेने महापालिकेच्या नोटीसांना खुलासाही सादर केला आहे. गुरू गोविंद सिंह, तसेच केंब्रिज शाळेने पार्किंगसदर्भात बदल करण्याची तयारी दर्शविली आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात अॅक्शन तयार केला असून, प्रत्येक शाळेत जाऊन पुन्हा पार्किंगबाबत तपासणी केली जाणार असल्याची माहिती उपासनी यांनी दिली. शाळांच्या मुख्याध्यपकांना पुन्हा एकदा समज दिली जाणार असून, त्यानंतरही कार्यवाही केली नाही, तर थेट दंडात्मक कारवाईचा मार्ग स्वीकारला जाणार आहे.

--

पोलिसांचीही घेणार मदत

खासगी मालकीच्या १८९ शाळांपैकी निम्म्यापेक्षा जास्त शाळा या मध्यवर्ती भागात आहेत. काही शाळांमध्ये पार्किंग तर सोडा, जायलाही रस्ता नाही. त्यामुळे अशा शाळांची यादी तयार करून त्यांनाही पार्किंगसंदर्भात तोडगा काढण्यासाठी पर्याय दिले जाणार आहेत. शाळांना पार्किंगसंदर्भात शिस्त लावण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार असल्याचा दावा शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

--

मटा भूमिका

शाळांबाहेर शालेय वाहतुकीची व इतर खासगी वाहने उभी करण्यास बंदी घालून महापालिका शिक्षण मंडळाने आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. शहरात पार्किंगची समस्या भीषण बनली असताना त्यावर ठोस उपाय शोधण्याऐवजी शाळांना वेठीस धरण्याचा हा प्रकार अघोरी या उपायात मोडणारा आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी अर्धा तासाच्या वाहतूक कोंडीला तोंड देण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस व संबंधित शाळा प्रशासनाने संयुक्त प्रयत्न केले, तरी हा विषय मार्गी लागू शकतो. त्यासाठी वाहनांवरच बंदीचा तुघलकी निर्णय घेणे योग्य नव्हे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिरेंविरुद्ध अविश्वास

$
0
0

मालेगाव बाजार समितीत शिवसेना-भाजप एकत्र

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. सोमवारी घेण्यात आलेल्या विशेष सभेत हा ठराव मंजूर झाला. अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात यावी, यासाठी समितीच्या १७ संचालकांनी जिल्हा उपनिबंधकाना निवेदन दिले होते. यानुसार सोमवारी प्रांत अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.

जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या पत्रात उपसभापती सुनील देवरे यांच्यासह संचालक डॉ. अद्वय हिरे, प्रमोद (बंडू) बच्छाव आदींसह १७ संचालकांच्या सह्या असून सभापती प्रसाद हिरे यांच्यावर विश्वास राहिलेला नसल्याने व ते बाजार समिती व शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध कामकाज करीत असल्याने त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणत असल्याचे नमूद करण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या पत्रात हिरे यांच्याकडून पदाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

सभापती हिरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी संचालकांनी विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. यानुसार प्रांत अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेत हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात सभापती हिरे यांच्या विरोधात १७ संचालकांनी हात उंचावून मतदान केल्याने सदर ठराव मंजूर केल्याचे मोरे यांनी घोषित केले. या प्रक्रियेदरम्यान सर्व संचालक मंडळ, सचिव अशोक देसले आदी उपस्थित होते.

भांडाफोड करणार!

अविश्वास ठरावानंतर महाराष्ट्र टाइम्सकडे सभापती प्रसाद हिरे यांनी आपली भूमिका मांडली. येत्या दोन दिवसात पत्रकार परिषद घेवून आपण विरोधकांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे अविश्वास ठरवानंतर हिरेंकडून कोणता खुलासा होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सभापतिपदासाठी होणार युती

हिरे यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या निमित्ताने सतत एकमेकांच्या विरोधात उभे राहणारे शिवसेना व भाजप यावेळी एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता यानंतर लवकरच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यामुळे प्रसाद हिरे यांच्यावरील अविश्वास ठरावासाठी एकत्र आलेली शिवसेना-भाजप पुन्हा सभापती पदासाठी एकत्र येणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार गोडसेंकडून ठाकरेंचा दौरा हायजॅक

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या एका कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर येत असलेले युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा दौरा शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी नेत्यांना विश्वासात न घेताच हायजॅक करण्याचा प्रकार सोमवारी घडला. आदित्य ठाकरे जणू आपल्याच कार्यक्रमांसाठी येत असल्याचा भास निर्माण करून गोडसे यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात पोस्टर्सही लावले. परंतु, शिवसेनेच्या नेत्यांनी कानपिचक्या दिल्यानंतर खासदारांच्या कार्यालयाकडून पाठविलेला दौरा रद्द करण्यात आला.

नाशिक शहरातील इयत्ता ८, ९ व १० च्या विद्यार्थ्यांसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून व नवनीत प्रकाशनाच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या टॉप स्कोरर या ई लर्निंग सॉफ्टवेअरचे वितरण दिनांक २० डिसेंबर रोजी

सकाळी ११ वाजता रावसाहेब थोरात हॉल करण्यात येणार आहे. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी पक्षाकडून केली जात असतानाच, खासदार गोडसे यांच्या कार्यालयाकडून मात्र आदित्य यांचा स्वतंत्र दौरा पाठविण्यात आला. दोन दिवसांच्या दौऱ्यात संघटनात्मक कामांसोबतच खासदारांच्या निधीतून झालेल्या

विकासकामांच्या उदघाटनांचा समावेश त्यात करण्यात आला. तसेच विमानसेवा जणू खासदारांच्या प्रयत्नांनेच सुरू झाल्याचे पोस्टर्स लावून त्यावरही आदित्य ठाकरेंचे फोटो झळकविण्यात आले. पक्षातील मंडळींनाही विश्वासात घेण्यात आले नाही.

पक्षातील नेत्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितांची कानउघाडणी केली. तसेच दौरा हायजॅक केल्याबद्दल जाब विचारला. त्यामुळे खासदार कार्यालयाकडून पाठविण्यात आला दौरा रद्द करण्यात आल्याचे पत्रक पुन्हा माध्यमांना पाठविण्यात आले. त्यामुळे पक्षातील प्रमुख नेता दौऱ्यावर येत असताना स्थानिक नेत्यांमध्येच त्यांच्या दौऱ्यावरून बेबनाव दिसून आल्याचे चित्र होते. तर नेत्यांच्या दौऱ्याबाबत खासदार कार्यालयाकडून करण्यात आलेली घाई दिवसभर पक्षात चर्चेचा विषय राहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानाचे आरक्षण अखेर रद्द

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या मिळकत व विधी विभागाने पाथर्डी फाट्यावरील उद्यानाच्या आरक्षण संपादीत करण्यासंदर्भात वेळीच भूमिका न घेतल्याने पालिकेला या आरक्षणावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालिकेच्या मिळकत विभागासह वकिलांच्या वेळकाढू भूमिकेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे संबंध‌ति जागा मालकाने महापालिकेला १२७ ची नोटीस दिल्यानंतरही मिळकत विभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत मालकाला मदत होईल अशीच भूमिका घेतली. तसेच मालकाला संपूर्ण मोबदला न देता विकासकाला फायदा होईल, असे धोरण स्वीकारले. त्यामुळे संबंधित जागामालकाने थेट सुप्रीम कोर्टातून या जागेवरील आरक्षण रद्द आणले.

शहर विकास आराखड्यामध्ये टाकण्यात आलेली आरक्षणे महापालिकेकडून ताब्यात घेतली जातात. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आले आहेत. परंतु मोक्याच्या जागेवरील आरक्षणे व्यपगत करण्यासाठी बिल्डरांकडून थेट जागा विकत घेतल्या जातात. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन त्या जागेवरील आरक्षण व्यपगत करून केले जाते. आरक्षणे ताब्यात येणे गरजेचे असताना मिळकत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आरक्षणे व्यपगत कशी होतील यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. पालिकेकडून आरक्षण ताब्यात घेतले जात नसेल, तर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम १२७ नुसार भुसंपादनाची नोटीस बजावली जाते. महापालिकेला पाथर्डी शिवारातील सर्वे क्रमांक ३०० व ३११ यातील उद्यानाच्या आरक्षणाबाबत संबंधित जागा मालकाकडून नोटीस देखील पाठविण्यात आली. उद्यानासाठी आरक्षित असलेल्या तब्बल वीस हजार चौरस मीटर क्षेत्राच्या संपादनासाठी नोट‌सिा बजावल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भुसंपादनाची कार्यवाही सुरू झाली. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जानेवारी २०१० मध्ये आरक्षित जागेची संयुक्त मोजणीही झाली. त्यानंतर भूसंपादन विभागाने रेडी रेकनरनुसार एकुण रक्कमेपैकी तेरा कोटी ३६ लाख रुपये एवढी निम्मी रक्कम भरावी, असे पत्र दिले. स्थायी समितीकडून त्या प्रस्तावाला मंजुरी देखील मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपतर्फे विजयाचा जल्लोष

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर नाश‌किमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत व पेढे वाटून विजयाचा जल्लोष केला. भाजपच्या वसंतस्मृती मुख्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. देशातील जनतेचा भाजपवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याची प्रतिक्रीया भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

गुजरातमधील निवडणूक ऐतिहासिक निवडणूक होती. तर हिमाचल प्रदेशच्या माध्यमातून एक नवे राज्य भाजपला मिळाले आहे. त्यामुळे नाशिकमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजय साजरा केला. देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, अशा पद्धतीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या विजयामुळे नाशिकमधील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील उत्साह वाढला आहे. यावेळी प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, नाना शिलेदार, भारती बागुल, नगरसेवक प्रशांत जाधव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाई सेल्स टॅक्सची, नाव जीएसटीचे

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र व राज्यात कर पद्धती बदलून जीएसटी लागू केला असला तरी मागील कारवाईचे प्रकरण अजूनही प्रलंबित असल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडत आहे. सोमवारी सेल्स टॅक्स थकबाकी भरली नाही म्हणून एका उद्योगाच्या मालमत्तेच्या लिलावाची जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. ही नोटीस सेल्स टॅक्सशी संबंधित असली तरी वस्तू व सेवाकर कार्यालय विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सेल्स टॅक्सनंतर व्हॅट लागू झाला व त्यानंतर वस्तू व सेवाकर सुरू झाला. पण कार्यालय तेच असल्यामुळे हा गोंधळ उडाला.

सिन्नर येथील औद्योगिक सहकारी वसाहतीमधील मे. लाहोटी टेक्नोप्लास्ट प्रा. लि. यांनी सेल्स टॅक्सचे १ कोटी २६ लाख ६३ हजार ५१३ रुपये थकवले आहेत. त्यामुळे या कंपनीची मालमत्ता जप्त करुन जाहीर लिलावाद्वारे पैसे वसूल केले जाणार आहेत. सहकार तत्वावर असलेल्या या औद्योगिक वसाहतीमध्ये २००० चौरस मिटरचा प्लॉट असून त्यावर २४४.११ चौरस मिटर बांधकाम करण्यात आले आहे.

विक्रीकर व वस्तू सेवा कर या दोन नावांमध्ये जसा गोंधळ आहे, तसाच गोंधळ ही कारवाई करतांना सहकार संस्थेच्या प्लॉटचाही आहे. हा प्लॉट भाडेतत्वावर दिला जातो.

सरकारने डी झोनमध्ये असलेल्या या सहकारी वसाहतीला १५ वर्षे सेल्स टॅक्स ग्राहकांकडून वसूल करून नंतर भरायची सवलत दिली होती. पण, विक्रीतून वसूल केलेला सेल्स टॅक्स अनेकांनी भरला नाही. त्यामुळे विक्रीकर विभाग अशा पद्धतीने कारवाई करत असल्याचे अनेक प्रकरणे आहेत. या कारवाईमुळे सिन्नर एमआयडीतीत कारवाई नेकमी कोणत्या विभागाने केली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. या कारवाईमुळे शहरासह जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक धास्तावले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचपीटी-आरवायकेच्या जीएसपदी सौरभ बेंडाळे

$
0
0


कॉलेज क्लब रिपार्टर, नाशिक

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी, आरवायके कॉलेजमध्ये सोमवारी विद्यार्थी परिषदेची निवडणूक पार पडली. यात विद्यार्थी सभेच्या जनरल सेक्रेटरीपदी सांस्कृतिक विभागाचा प्रतिनिधी सौरभ बेंडाळे हा बिनविरोध विजयी झाला.

एचपीटी आरवायकेत विद्यार्थी परिषदेवर संपदा कांबळे (विद्यार्थिनी प्रतिनिधी, सायन्स), आर्या शिंगणे (विद्यार्थिनी प्रतिनिधी, आर्टस), अजित गायकवाड-(एनएसएस विभाग), रुत्विक जेरे- (एनसीसी विभाग), रेवती बेळगांवकर (स्पोर्ट विभाग) यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या सुधारित विद्यापीठ कायद्याच्या पत्रावर कार्यावाही करण्याची तयादी शहरातील अनेक कॉलेजेसनी सुरू केली आहे. शहरातील अनेक कॉलेजेसमध्ये येत्या दोन आठवड्यात पुन्हा मेरीट बेसिसवरील विद्यापीठ निवडणुका पार पडणार आहेत. यामुळे खुल्या निवडणुकांचे बिगुल यंदा वाजले नसल्याने विद्यार्थी संघटनांनी व नेत्यांनी सरकारच्या आश्वासनांबाबत विचाराधीन राहणे गैर असल्याची भावना यावेळी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिवेशनासाठी हवी शिक्षकांना सुटी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १६ वे त्रैवार्षिक राज्य अधिवेशन चार जानेवारी रोजी सिंधुदुर्ग येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्‍घाटन होणार असून नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक यात सहभागी होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील यांनी दिली. दरम्यान, या अधिवेशनासाठी शिक्षकांना सहा दिवसांची सुट्टीची मागणी केली आहे.

अधिवेशनाच्या निमित्ताने तीन जानेवारीला शिक्षण परिषद होणार असून यात प्रामुख्याने शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षण तज्ज्ञ नामदेव माळी, प्रतिभा भराडे आदी शिक्षण व शिक्षकांचे शैक्षणिक योगदान व उपक्रम यावर संवाद साधणार आहेत. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, विश्वनाथ मिरजकर, नाना जोशी, चंद्रकांत आणावकर आदी सहभागी होणार आहेत. चार जानेवारीला खुले अधिवेशन असून या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी शिक्षकांना सुटी देण्यात यावी, अशी मागणी केल्याचे काळुजी बोरसे यांनी सांगितले. तर अधिवेशन काळात शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी सुट्टी देण्यात येईल, असे संकेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले असल्याचेही ते म्हणाले. अधिवेशनात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक उपक्रमशील शिक्षक व शाळेला गौरविण्यात येणार आहे. बालक, पालक, प्राथमिक शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नांसह सामाजिक भूमिका घेणाऱ्या संघटनेचे चार वर्षांनी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य सरचिटणीस उदय शिंदे, राज्य ऑडिटर दादाजी सावंत, आनंदा कांदळकर, राजेंद्र दिघे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एडिपस रेक्स’ अव्वल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६५ व्या नाट्य महोत्सवात नाशिक विभागातल्या प्राथमिक स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र, सिन्नर या संस्थेने सादर केलेल्या ‘एडिपस रेक्स’ नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. नाशिक विभागातून एकूण १६ नाट्यसंस्थांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

स्पर्धेत द्वितीय क्रमांक ललित कला भवन, सिडको या संस्थेने सादर केलेल्या ‘प्रयास’ नाटकाने मिळविला असून तृतीय क्रमांक कामगार कल्याण भवन सातपूर वसाहत, नाशिक या संस्थेने सादर केलेल्या ‘हे रंग जीवनाचे’ या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ नाटक म्हणून कामगार कल्याण केंद्र बुधवार पेठ संस्थेने सादर केलेल्या ‘रक्तबीज’ व कामगार कल्याण केंद्र ओझर या संस्थेने सादर केलेल्या ‘ये मामला गडबड है’ या नाटकांनी यश मिळवले आहे. प्रथम क्रमांकाला १० हजार, द्वितीय क्रमांकाला ७ हजार, तृतीय क्रमांकाला ५ हजार तर उत्तेजनार्थ बक्षिस ३ हजार रुपये अशा प्रकारे आहेत.

उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पहिले पारितोषिक महेश डोकफोडे यांना ‘एडिपस रेक्स’ या नाटकासाठी प्राप्त झाले. दिग्दर्शनाचे द्वितीय पल्लवी पटवर्धन यांना ‘प्रयास’ या नाटकासाठी तर तृतीय नेताजी भोईर यांना ‘हे रंग जीवनाचे’ या नाटकासाठी देण्यात आला. उत्कृष्ट नेपथ्य प्रथम किरण भोईर, द्वितीय संजय चौधरी तर तृतीय मुक्ता कावळे, उत्कृष्ट संगीत प्रथम तेजस बिल्दिकर, द्वितीय क्रमांक वरुण भोईर तर तृतीय क्रमांक शुभम सपकाळे, रवी परदेशी यांना विभागून देण्यात आला. उत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठी प्रथम क्रमांक विनोद राठोड, द्वितीय ईश्वर जगताप तर तृतीय क्रमांक महेंद्र खेडकर यांना मिळाला. उत्कृष्ट नाट्यलेखनासाठी ‘ये मामला गडबड है’ या नाटकासाठी संदेश सावंत यांना प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले.

यांचाही गौरव

उत्कृष्ट अभिनयासाठी पुरूष प्रथम शरद भालेराव, द्वितीय आशिष चंद्रचूड, तृतीय संदीप पाचंगे तर उत्कृष्ट अभिनयासाठी स्त्री प्रथम केतकी कुलकर्णी, द्वितीय गितांजली घोरपडे तर तृतीय क्षमा देशपांडे यांना गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ पुरूष अभिनयासाठी प्रवीण मोकाशी, विकम्र गवांदे, तुषार मोरे, प्रमोद भालेराव, कुंदन तावडे, विशाल रूपवते, राजेंद्र जव्हेरी, प्रदीप देवरे, अनिकेत कुलकर्णी, चंद्रवदन बच्छाव तर स्त्री अभनियासाठी अस्मिता पगारे, अश्विनी कोल्हे, रसिका मुजूमदार, डॉ. प्राजक्ता लेले, पल्लवी ओढकर यांना गौरविण्यात आले.

राज्य नाट्य स्पर्धेत भ्रमनिरास झाला; मात्र कामगार कल्याणला नाटक पहिले आल्याने ते दु:ख काही प्रमाणात कमी झाले. कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत माझ्या संस्थेने हॅटट्रिक केलेली आहे. या वळणावर पहिले, मी आणि गांधीहत्या पहिले व आता एडिपस रेक्स पहिले अशी ही हॅटट्रिक आहे, हे रेकॉर्ड झाले आहे. रंगदेवतेची प्रामाणिकपणे पूजा केल्याचे हे फळ आहे असे मी मानतो.

- महेश डोकफोडे, दिग्दर्शक, एडिपस रेक्स

द्वितीय क्रमांक मिळाल्याने आनंद वाटला. इतक्या मुलींना घेऊन वास्तववादी नाटक करणे अवघड काम आहे. नवीन मुली होत्या. त्यांना स्टेज अनोळखी होते. नाटकाला अगदी आधीच्या दिवसापर्यंत अडचणी आल्या; मात्र त्यातून क्रमांक मिळाला, तीन पारितोषिके मिळाली याचा आनंद आहे.
- पल्लवी पटवर्धन, दिग्दर्शक, प्रयास

नाट्य मंडळाचा हा विजय आहे. नेपथ्य पहिले, दिग्दर्शन तिसरे, संगीताचे दुसरे, अभिनयाचे तिसरे अशी बक्षिसे मिळाली. खूप आनंद झाला. सर्कशीवर नाटक पहिल्यांदाच रंगमंचावर आले आहे. सत्यघटनेवर नाटक असल्याने कथानक, मांडणी विशेष झाली होती.
- नेताजी भोईर, दिग्दर्शक, हे रंग जीवनाचे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळणा किल्ल्याचे थ्री डी मॅपिंग

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com
Tweet @FanindraMT

नाशिक : महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे अधिक कार्यक्षमतेने जतन व्हावे व संरक्षण व्हावे यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून राज्यातील १५ किल्यांचे थ्री डी मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या किल्ल्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील गाळणा किल्ल्याचा समावेश आहे.

राज्य सरकारने पुण्याजवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याचे उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करुन थ्री डी मॅपिंग केले होते हे मॅपिंग योग्य पद्धतीने झाल्याने राज्यातील १५ किल्ल्यांचेही अशाच पद्धतीने मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या राजगडाचे देखील मॅपिंग करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (एमआरएससी) द्वारे हे काम होणार आहे. या उपग्रह मॅपिंगमध्ये स्थलाकृतिक सर्वेक्षण, रिमोट सेन्सिंग, जीआयएस आणि जीपीएस यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे काम लिडार तंत्रज्ञानाच्या मदतीने होणार आहे. पुरातत्त्व विभागासाठी रिमोट सेन्सिंगचा पहिल्यांदा वापर होणार आहे. यात मास्टर प्लॅन तयार करणे, किल्ल्याच्या आसपास असलेले अतिक्रमणे काढून टाकणे, बागकाम व लँडस्केपिंग आणि संरक्षणासाठी रेखाचित्रे तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राजस्थानसारख्या राज्यांमध्ये किल्ल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी लिडार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, तर महाराष्ट्र प्रथमच तंत्रज्ञानाचे एकत्रिकरण करणार आहे.

महाराष्ट्रात ३५३ किल्ले आहेत ज्यात ४९ राज्य सरकारचे संरक्षित आणि ५१ भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) आहेत. या तंत्रज्ञानामुळे किल्ल्याचा भाग किंवा त्याचे तटबंदी कमकुवत आहेत, त्यांना मजबुतीकरण, संरक्षण नियोजन, अतिक्रमणे काढून टाकणे, पर्यटनास प्रोत्साहन देणे इत्यादी कामे हाती घेणे सोयीचे होणार आहेत

या किल्ल्यांचा समावेश
शिरगाव (कोकण विभाग), खर्डा, गाळणा (नाशिक विभाग), तोरणा, भुदरगड (पुणे विभाग), अँटूर, परांडा, दहूर (औरंगाबाद विभाग), औसा, कंधार, माहूर (नांदेड विभाग) आणि नागर्नधाण, माणिकगड आणि अम्बागड (नागपूर विभाग)

थ्री डी मॅपिंगमुळे किल्ल्याचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. ठराविक ठिकाणचा एखादा दगड निसटला तरी तो या माध्यमातून समजणार आहे. तसेच शैक्षणिक कामासाठी सुद्धा याचा चांगल्या प्रकारे वापर होणार आहे.
- विलास वहाने, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग

मटा भूमिका

जतन व संवर्धनासाठी समस्त गड किल्ल्यांचे थ्री डी मॅपिंग करण्याचा निर्णय घेऊन सरकारने हा विषय अग्रक्रमात घेतला ही समाधानाची बाब आहे. आजपर्यंत गड-किल्ल्यांचे ढासळणे मूकपणे पाहण्याव्यतिरिक्त गडप्रेमीही काही करू शकत नव्हते. पुरातत्वच्या ताब्यात काही किल्ले असले तरी त्याच्या संवर्धनासाठी त्यांच्याकडेही निधीची चणचण असे. आता या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने किमान तेथील स्थिती कळू शकेल. त्याबरहुकूम कामही करता येईल. पण, केवळ मॅपिंग करून थांबले असे सरकारी काम होता कामा नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीरामनगरमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मूळचा जळगावचा आणि शिक्षणासाठी नाशिकमध्ये रहात असलेल्या शुभम सुभाष पाटील (२१) या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गळफास घेतल्याचे दिसून आले असले तरी त्याचे दोन्ही हात पाठिमागील बाजूस बांधलेले होते. त्यामुळे याप्रकरणी संशय वाढला आहे. ही घटना सोमवारी (दि. १८) उघडकीस आली असून घटनास्थळी शुभमने लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे.

शुभम हा के. के. कॉलेजमधील विज्ञान शाखेत मायक्रो बायलॉजीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. मुंबई-आग्रा महामार्गालगत, धात्रक फाटा येथील बळीरामनगर येथे त्याच्यासह पाच विद्यार्थ्यांनी रो-हाउसची खोली भाडेतत्वावर घेतली होती. दीड वर्षापासून ते तेथे राहत होते. दुमजली असलेल्या या रो-हाऊसच्या वरच्या मजल्यावर हे विद्यार्थी झोपत असत. दोन दिवसांपासून शुभम हा खालच्या खोलीत झोपायला जात होता, असे त्याच्या सहकारी मित्रांनी सांगितले. तो रविवारी (दि. १७) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास खाली झोपण्यास गेला. सकाळी त्याचा मित्र अक्षय तुकाराम अंबोरे याला तो स्वयंपाक घरात छताला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. घाबरलेल्या अक्षयने इतर मित्रांना झोपेतून उठवले आणि याबाबत सांगितले. या घटनेने सर्वांचा थरकाप उडाला. घाबरून गेलेल्या या मित्रांनी टाहो फोडला. या घटनेबाबत आडगाव पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. शुभमच्या कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती कळविण्यात आली. या प्रकरणाची आडगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन सदाफुले अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेचा थेट श्रीगणेशा!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एअर डेक्कन कंपनीकडून येत्या २२ डिसेंबरपासून थेट विमानसेवा सुरू होणार असून, त्यासाठी कुठलीही चाचणी घेतली जाणार नसल्याचे कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. तसेच, सेवेच्या या शुभारंभाची कंपनीने जोरदार तयारी केली असून, अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रादेशिक विमानसेवा उडाण या अंतर्गत नाशिक-मुंबई-नाशिक, नाशिक-पुणे-नाशिक, जळगाव-मुंबई-जळगाव आणि कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर या सेवेला एअर डेक्कनच्यावतीने प्रारंभ होत आहे.

याचअंतर्गत येत्या २२ डिसेंबर रोजी ओझर विमानतळावर सकाळी साडेसहा वाजता या सेवेचा शुभारंभ होणार आहे. कंपनीचे १९ आसनी विमान ओझरहून मुंबईला झेपावणार आहे. या सेवेसाठी कुठल्याही प्रकारची चाचणी कंपनीकडून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. जळगाव विमानतळाची पाहणी करुन येत्या २१ डिसेंबरला तेथे चाचणी घेण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. मात्र, ओझर येथील विमानतळ सज्ज असून, येथे चाचणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे कंपनीच्या अधिका-यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले आहे.

सेवेच्या शुभारंभप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहण्याची चिन्हे आहेत.

कंपनीच्या विमानसेवेचा श्रीगणेशाच या सेवेने होणार असल्याने कंपनीने त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे. कंपनीचे चिफ एक्जिक्युटिव्ह ऑफिसर कॅप्टन गोपिनाथ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

नाशिकला नाईट पार्किंग

कंपनीच्या १९ आसनी विमानाचे पार्किंग ओझर येथेच होणार आहे. त्यामुळेच पहाटे साडेसहा वाजता ओझरहून मुंबईसाठी सेवा दिली जाणार आहे. ओझर विमानतळाची धावपट्टी मोठी असून नाईट पार्किंगचीही सुविधा उपलब्ध आहे. त्याचा फायदा कंपनीला होणार आहे.

बुकिंगविषयी समाधान

नाशिकहून पुणे आणि मुंबई या दोन्ही विमानसेवेसाठी बुकिंगला भरघोस प्रतिसाद मिळाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नाशिककरांकडून यापुढील काळातही बुकिंगला असाच प्रतिसाद मिळाले, असा विश्वास कंपनीला निर्माण झाला आहे. तशी कबुली कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरला चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घराबाहेर सांयकाळी फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी तोडून नेले. ही घटना राजसारथी सोसायटी पाठीमागील बजरंग सोसायटी मार्गावर घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोद करण्यात आली.

सीमा रामचंद्र गिधाडे (रा. देवांग कॉम्प्लेक्स, बापू बंगला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सांयकाळी सात वाजेच्या सुमारास गिधाडे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या. बजरंग सोसायटीच्या मार्गावर पायी जात असताना पाठीमागून पल्सर दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक गावीत करीत आहेत.

पाटीलनगरला घरफोडी
सिडकोतील पाटीलनगर भागात घरफोडी करीत चोरट्यांनी सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अजित अनिल खोडके (रा. पेठे हायस्कूल पाठीमागे पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. दोन दिवसांसाठी खोडके कुटुंबीय बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ८५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.

सायकलस्वार जखमी
भरधाव मालट्रकने हुलकावणी दिल्याने सायकलस्वार पडून गंभीर जखमी झाल्याची घटना जेलरोडवरील सैलानीबाबा चौकात घडली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
किरण नारायण गांगुर्डे (६२, रा. शिवदर्शन अपा. मोरेमळा) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. अपघाताची घटना रविवारी (दि. १७) दुपारी एक वाजेच्या सुमारास झाली. भीमनगरकडून मोरेमळा येथे सायकलवरून जाणाऱ्या गांगुर्डे यांना सैलानी बाबा चौकात पाठीमागून भरधाव मालट्रक (जीजे व्ही ८८४५) वरील चालकाने हुलकावणी दिली होती. या प्रकरणी ट्रकचालक अल्तनुर महम्मद मल्लीक (रा. दासलवाडा, जि. खेड, गुजरात) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.

पिस्तुल बाळगणारे दोघे अटकेत
शहरात पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यातील एक संशयित अल्पवयीन असून, या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने केली.
पांडुरंग मुरलीधर लगड आणि त्याचा १६ वर्षीय साथीदार (रा. दोघे भैरव कॉलनी, अशोकनगर) अशी संशयितांची नाव आहे. काकडमळा भागात थांबलेल्या या संशयितांकडे पिस्तुल असल्याची माहिती युनिट दोनचे कर्मचारी लक्ष्मण सानप यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत सुमारे २५ हजार रुपयांचा देशी बनावटीचा पिस्तुल आढळून आली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

होर्डिंगप्रकरणी गुन्हा दाखल
इंदिरानगर : नाशिक महापालिकेकडून सध्या विविध प्रकारची अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत असून वडाळागाव परिसरात विनापरवानगी होर्डिंग लावणाऱ्याविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वडाळागाव परिसरात बंटीभाई शेख याच्या वाढदिवसाचे दोन होर्डिंग उभारण्यात आले होते. मात्र, यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नसल्याचे लक्षात आले. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पूर्व विभागाने हे दोन्ही होर्डिंग काढून जप्त केले. तसेच प्रमोद लिमजे या महापालिका कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-मुंबई महामार्गावर अपघात; दोन ठार

$
0
0

नाशिक

नाशिक-मुंबई महामार्गावर टेम्पोच्या भीषण अपघातात एका पाच वर्षाच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या या टेम्पोला वालदेवी नदीजवळ अपघात झाला. अपघातात ३० ते ४० जण जखमी झाले आहेत. त्यातील जखमींवर नजीकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

वऱ्हाड घेऊन जाणारा हा टेम्पो पाथर्डीवरून अस्वलीला जात होता. भरधाव असलेल्या टेम्पोचे स्टेरिंग फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेमधून जखमी झालेल्या १५ ते २० जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार्तिक दीपक माळी (वय ५) गोपाळ रमेश पवार (२५) यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमसंस्कार शिबिरातून सेवेचा संस्कार

$
0
0

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळेंचे मत

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून समाजमन कळते. श्रम, सेवेचा संस्कार होऊन विविध उपक्रम व तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानातून ऊर्जा व ज्ञानप्राप्ती होते. एकत्र काम केल्याने मैत्री भावना, सहकार्य यातून समाजसेवेचा वसा मिळतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले.

येथील चांडक बिटको कॉलेजच्या एनएसएस शिबिराच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. कोटमगाव येथे झालेल्या कार्यक्रमात पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, सरपंच बाळासाहेब म्हस्के, प्रकाश घुगे, निसाकाचे अध्यक्ष तानाजी गायधनी, नगरसेवक बाजीराव भागवत, दिनकर आढव, पंडित आवारे, अरुण ढिकले, कार्यक्रम अधिकारी शशिकांत खेमनार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांद्वारे परिसरात नालेसफाई

गावाच्या विकासात युवकांचा सहभाग हवा. सामान्य बुद्धिमत्ता असली तरी काहीही करता येते फक्त त्याला जिद्दीची जोड हवी, असे प्राचार्य कुलकर्णी यांनी सांगितले.

नागरिकांनी सर्व गट-तट विसरून एक झाल्यास विकास साधता येतो, असे सरपंच म्हस्के म्हणाले. शिबिरासाठी प्रा. लक्ष्मण शेंडगे, प्रा. प्रतिभा घुगे, प्रा. डॉ. सीमा जाधव, प्रा. पागधने, प्रा. नरेश पाटील, अरुण ताजनपुरे, दिनेश म्हस्के, नाना घुगे, समाधान जाधव, शरद म्हस्के, आप्पा माने, ग्रामसेवक पुरकर, संजय राजगुरू आदींनी सहकार्य केले. सप्ताह काळात विद्यार्थ्यांनी कोटमगाव परिसरात नालेसफाई केली.

अंगणवाडी परिसर, व्यायामशाळा परिसर, समाजमंदिराची स्वच्छता केली. विविध वस्त्यांमध्ये जाऊन स्वच्छता मोहिम राबवली. स्मशानभूमी, दारणाघाट, मांगीरबाबा मंदिर, दारणेश्वर, रेणुकामाता मंदिर परिसरात स्वच्छता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोट क्लब विरोधात याचिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये उभारलेला बोट क्लब प्रकल्प पर्यावरण, सुरक्षा आणि आरोग्य यासाठी हानिकारक असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याने गंगापूर धरणावर असलेल्या बोटी हलविण्यात येत आहेत. हा प्रकल्प येथे होणार नव्हता, तर जनतेच्या खिशातील पैसा का वाया घालवला असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. जनतेच्या या वाया गेलेल्‍या पैशांची भरपाई म्हणून वसुली व्हावी यासाठी पर्यावरणप्रेमी न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करणार आहेत.

माजी पर्यटनमंत्री, आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून बोट क्लबच्या कामाला सुरुवात झाली. हा बोट क्लब म्हणजे नाशिककरांचे एक स्वप्न होते. नाशिकमध्ये आलेल्या पाहुण्यांना काय दाखवायचे असा प्रश्न या बोट क्लबमुळे दूर होण्यास मदत होणार होती. निवडणुकीच्या अगोदर कामे अर्धवट असताना मोठा गाजावाजा करीत या बोट क्लबचे घाईघाईने उद्‍घाटन उरकण्यात आले होते. .

नागरिकांचा विरोध

या कामाला सुरुवातीपासूनच विरोध झाला होता. हे बोटिंग सुरू झाले, तर गंगापूर धरणातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त रहाणार नाही, असा पवित्रा नाशिकमधील काही संघटनांनी घेतल्याने हे काम ठप्प झाले हाते. भुजबळांची सत्ता गेल्यानंतर हा क्लब सुरू होण्यास आणखी विलंब झाला. मध्यंतरीच्या काळात पर्यटनमंत्री जयकुमनार रावल हे नाशिकमध्ये आले असताना त्यांची दृष्टी या बोटींवर पडली व या बोटी त्यांनी सारंगखेडा येथे हलवल्या. त्यामुळे नाशिककरांचे स्वप्न भंग पावले.

गंगापूर धरणाच्या ठिकाणी बोट क्लबचा प्रकल्प व्यवहार्य आहे की नाही याचा अहवाल प्रथम का करण्यात आला नाही. कोट्यवधी रुपयांचा चुराडा येथे झाला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी हा अव्यवहार्य प्रकल्प केला त्याची चौकशी व्हावी आणि त्यांच्याकडून हा निधी वसूल केला जावा यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहोत.

- नितीन शुक्ल, निर्मल गोदा अभियान

असा झाला खर्च

बोट क्लब बांधण्यासाठी १४ कोटी ८० लाख ३६ हजार रुपये, बोटिंगची सुविधा पुरविण्यासाठी ८ कोटी २७ लाख ५० हजार रुपये, एकूण २३ कोटी ७ लाख ८६ हजार रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नारायण’ची अनेक रूपे फेर धरताहेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नारायण आपल्यात नाही हे मानणे कठीण गोष्ट आहे. आमची खूप वर्षांची मैत्री. नारायण गेला त्यादिवशी ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाच्या शो ची तयारी करीत होतो. काकाजींच्या जागी नारायणच दिसू लागला. त्याची अनेक रूपे माझ्याभोवती फेर धरताहेत. अशा भावना ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यनम्रता संस्थेचे संस्थापक सदस्य उपेंद्र दाते यांनी व्यक्त केल्या.

ज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या शोकसभेचे आयोजन मंगळवारी कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी दाते बोलत होते. दाते पुढे म्हणाले की, नारायण सुंदरतेवर प्रेम करणारा होता. त्याच्या अनंत आठवणी आहेत. नाटकामुळेच आम्ही संस्थाही जन्माला घातली. केटरिंग, सेवासदन, रंगभूषा जे ही केले ते मनापासून केले. त्याला सुषमाची खूप साथ होती. नारायणला अधिक समजून घेऊ शकू यासाठी आलोय.

यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक व नाट्यनम्रता संस्थेचे संस्थापक रवींद्र ढवळे म्हणाले, की नारायणचे शेवटचे शब्द होते, ‘रवी मी प्रयोगाला येतोय’ प्रयास नाटकाची रंगभूषा नारायण करायचा. संस्थेसाठी शेवटपर्यंत रंगभूषा केली. लेखक सुनीत पोतनीस, प्रमोद तेंब्रे, नाट्य परिषद अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, हर्षवर्धन कडेपूरकर, श्रीकांत बेणी, वसंत खैरनार, कांता हिंगणे, रंगकर्मी विठ्ठल देशपांडे, सावानाचे माजी कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी अनंत येवलेकर, दत्ता पाटील, श्याम दशपुते, सतीश सामंत, चारूदत्त कुलकर्णी, राजा पाटेकर, पंकज क्षेमकल्याणी, अदिती मोराणकर, वंदना अत्रे, लोकेश शेवडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुग्धविकास विभागाचे दोन अधिकारी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अॅण्टी करप्शन विभागाच्या पथकाने (एसीबी) दोन ठिकाणी सापळे लावून दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इगतपुरीतील एका ई सेवा केंद्र चालवणाऱ्या व्यक्तीस अटक केली. एसीबीचा पहिला सापळा दुग्ध विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर लागला. अवैध जनावरांच्या गोठ्याप्रकरणी कारवाई टाळून नवीन परवाना देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दुग्धविकास कार्यालयातील जिल्हा विस्तार अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई महापालिकेच्या रामायण बंगल्यासमोर करण्यात आली.

सुभाष रामचंद्र वाघ (जिल्हा विस्तार अधिकारी) आणि केशव रामभाऊ मांजरे (पशुधन पर्यवेक्षक) अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार यांचा शहर परिसरात जनावरांचा गोठा आहे. हा गोठा सुरू करताना दुग्धविकास कार्यालयाची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. मात्र, परवान्यासाठी तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता संशयित लाचखोरांनी कारवाई टाळण्याबरोबरच नव्याने परवाना देण्याच्या मोबदल्यात सहा हजार ५१० रुपयांची शासकीय शुल्क व तीन हजार रुपयांची लाच अशी ९ हजार ५१० रुपयांची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला.

इगतपुरीतही एसीबीची कारवाई

दरम्यान, एसीबीच्या पथकाने इगतपुरी येथेही कारवाई केली. इगतपुरी येथील महा ई सेवा केंद्रात जातीचा दाखला काढण्यासाठी अर्ज करणाऱ्या तक्रारदाराकडे अडीच हजार रुपयांची मागणी करून दोन हजार ३०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या राजू काळू गांगड यास एसीबीने जेरबंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रमिकनगरला गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनाचा हॉर्न वाजविण्याच्या किरकोळ कारणातून परप्रांतीय तरुणाने चक्क गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे घडली. गोळीबाराच्या घटनेनंतर संशयित आरोपी फरारी झाला असून, पोलिस त्याच्या मागावर आहेत.

नंदन जयस्वाल (रा. श्रमिकनगर, सातपूर, मूळ राहणार आझमगड, उत्तर प्रदेश) असे संशयित आरोपीचे नाव आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी गावठी कट्टाही जप्त केला. या प्रकरणाची अधिक माहिती अधिक अशी, की मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास श्रमिकनगरमधील सातमाऊली चौकात गोळीबार करणारा संशयित नंदन जयस्वाल गाडीचा हॉर्न वाजवीत होता. आवाजामुळे येथेच राहणाऱ्या वाल्मीकी नावाच्या व्यक्तीने जयस्वाल यास हॉर्न वाजविण्याचे कारण विचारले. वाहनांची कोणतीही गर्दी नसताना हॉर्न वाजवीत जाऊ नकोस, असे वाल्मीकीने म्हटल्याचा राग जयस्वालला आला. तो रागतच घरात गेला आणि घरातील गावठी कट्टा बाहेर आणून हवेत गोळीबार केला. या धक्कादायक प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर संशयित जयस्वालने धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त सचिन गोरे यांच्यासह सातपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.

---

नातेवाई, मित्रांची चौकशी

याबाबत बोलताना सहायक आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले, की गोळीबार करून संशयित आरोपी फरारी झाला. त्याने गोळीबार करून तो कट्टा घरात ठेवला होता. पोलिसांनी सदर शस्त्र जप्त केले. फरारी झालेल्या जयस्वालचा शोध सुरू असून, त्याच्या नातेवाइकांसह मित्रांची कसून चौकशी सुरू आहे. मागील १८ ते २० वर्षांपासून जयस्वाल कुटुंबीय या भागात राहते. संशयित जयस्वाल वेल्डिंगचे काम करतो. जयस्वालच्या अटकेनंतर त्याने हा कट्टा कोठून आणला, त्या आधारे त्याने काही गुन्हे केले आहेत काय, याचा तपास केला जाणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले. संशयित आरोपीविरोधात यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नसल्याचे गोरे यांनी सांगितले.

--

संशयित आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून, तो नेहमीच तिकडे जात होता. तेथून त्याने हा कट्टा आणला असावा, अशी शक्यता असून, त्याच्या अटकेनंतर हे स्पष्ट होऊ शकेल. तूर्तास गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरारी संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

-श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्या' प्रेमीयुगुलाची धाडणेत आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आंतरजातीय विवाह केलेल्या प्रेमीयुगुलाने एकत्रितपणे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील धाडणे येथे मंगळवारी उघडकीस आला. काही महिन्यांपूर्वीच या युगुलाने विवाह केला होता. मात्र, दोन्हींच्या कुटुंबांमध्ये जातीभेदामुळे वाद निर्माण होतील या भीतीने त्यांनी जीवनयात्रा संपविली.

साक्री तालुक्यातील धाडणे येथील सचिन नानाजी बागूल (वय २२) हा तरुण वेकिंज पोल्ट्री या फर्ममध्ये कामाला असताना गेल्यावर्षी त्याची नियुक्ती कळवण तालुक्यातील अभोणे गावाजवळ झाली. याठिकाणी कामादरम्यान तेथे राहणाऱ्या दीपाली चव्हाण (वय १९) हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर दोघांच्या भेटी होत असताना त्यांनी ४ मे २०१७ रोजी सप्तशृंगी गडावर जाऊन विवाह केला. मात्र सचिन हा पाटीदार समाजाचा तर दीपाली ही कोकणी समाजाची असल्याने सचिनच्या घरच्यांनी विरोध केला. पोलिसांनी सचिन व दीपालीच्या नातेवाईकांचे जबाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करीत घटनेची नोंद साक्री पोलिस ठाण्यात केली आहे. आमच्या लग्नाला तुम्ही मान्यता देणार नाहीत. त्यामुळेच आम्ही आत्महत्या करीत आहोत, असे चिठ्ठीत लिहीले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images