Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आमदार टी. राजा सिंह सोमवारी धुळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

प्रखर हिंदूत्ववादी म्हणून ओळख असलेले हैदराबादचे आमदार टी. राजा सिंह हे सोमवारी (दि. २५) धुळ्यात येणार आहेत. हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदू धर्मजागृती सभेला ते प्रमुख वक्ते असून, याठिकाणी जनसमुदायाला ते संबोधित करणार आहेत.

शहरातील मालेगाव रोडलगत गिंदोडिया शाळेजवळ ही सभा सोमवारी (दि. २५) सायंकाळी होणार आहे. या वेळी सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या क्षिप्रा जुवेकर आणि महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे.

हैदराबादमध्ये रामनवमीला शोभायात्रा काढून संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेणारे आमदार राजा सिंह हे त्यांच्या तिखट शैलीसाठी परिचित आहेत. जहाल भाषण करणारे राजा सिंह यांना ऐकण्यासाठी त्यांच्या सभांना सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य हिंदू बांधव सभेला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती समितीकडून देण्यात आली आहे. या सभेबाबत जनजागृती व्हावी यासाठी हिंदू जनजागृती समितीने ग्रामसभा, कोपरासभा, घरोघरी प्रसार, बैठका, होर्डिंग्ज, भित्तिपत्रक, हस्तपत्रके याद्वारे जनजागृती केली आहे.

तसेच शनिवारी (दि. २३) शहरातील प्रमुख मार्गावर मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हागणदारीमुक्ती’चे वाभाडे!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका प्रशासनाकडून शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी करण्यासाठी मोठा गाजावाजा झालेला असला तरी शहर केवळ फोटोग्राफीपुरता हागणदारीमुक्त झाले आहे. नवीन शौचालय अद्याप वापरण्यासाठी पालिकेने खुले केलेले नाही. त्यामुळे नागरिकांची कुचंबना होत असून, शहर हागणदारीमुक्त म्हणजे प्रशासनाचे ढोंग आहे, असा घणाघाती आरोप येथील महासभेत शिवसेनेच्या नगरसेविका ज्योती भोसले यांनी केला.

येथील पालिकेच्या जुन्या सभागृहात महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव राजेश धसे आदींच्या उपस्थितीत बुधवारी महासभा झाली. उपमहापौर सखाराम घोडके यांनी शहरात बांधण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालयांचे अनुदान अद्याप देण्यात आलेले नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनास धारेवर धरले. भीमा भडांगे यांनी मोची कॉर्नर परिसरातील सर्वजनिक शौचालय नागरिकांसाठी कधी खुले करणार? असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेविका ज्योती भोसले यांनी थेट शहर हागणदारीमुक्त अभियान म्हणजे ढोंग असल्याची टीका केली. उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी ‘ते’ सार्वजनिक शौचालय तत्काळ सुरू करण्यात यावेत, असे आदेश दिले. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी जाधव यांनी संबंधित शौचालय स्वच्छता विभागाकडे हस्तांतरित केल्याचे उत्तर दिले. स्वच्छता विभागाचे सोनवणे यांनी ते हस्तांतरित झाले नसल्याचे उत्तर दिल्याने महापौर भडकले.

वॉटरग्रेसचा ठेका रद्द करा

वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आलेला कचरा संकलन ठेका रद्द का करण्यात येवू नये असा प्रश्न डॉ खालिद परवेज यांनी उपस्थित केला. कंपनीकडून कामगारांना किमान वेतन देण्यात येते आहे की नाही याविषयी प्रशासनाने विचारणा करावी अशी सूचना महापौर शेख यांनी केली.

एमआयएमचा सभात्याग

महासभेदरम्यान प्रशाकीय अधिकाऱ्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देता येत नसल्याने नगरसेवकांनी जनतेस काय उत्तर द्यायचे? असा संतप्त सवाल एमआयएमचे गटनेते डॉ. खालिद परवेज यांनी केला. अधिकारी जबाबदारी घेत नसून, सभागृहात अपूर्ण माहितीच्या आधारे बेजबादार उत्तरे देत आहेत. अशा महासभेस काहीही अर्थ नसल्याचे म्हणत त्यांच्या सर्व नगरसेवकांनी सभात्याग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाड रेल्वेस्थानक झाले वायफाय

$
0
0


संदीप देशपांडे, मनमाड

नाशिकरोड ते भुसावळ रेल्वे स्थानकांदरम्यानची महत्त्वाची रेल्वे स्थानके वायफाय करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार असून, त्या अंतर्गत मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात देखील वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनमाड रेल्वेस्थानकातील वायफाय सुरू करण्यात आले असल्याची गुड न्यूज रेल्वे मंडल प्रबंधक आर. के. यादव यांनी पाहणी दौऱ्यात दिली. यामुळे प्रवासी वर्गात विशेषतः तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मनमाड रेल्वे स्थानकाची जंक्शन स्थानक म्हणून देशभरात ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मनमाडमार्गे रेल्वे उपलब्ध असते. याशिवाय अलीकडे धावत्या रेल्वेतील वाढत्या चोऱ्यांमुळेही मनमाडची ओळख विविध राज्यात पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर आता मनमाड रेल्वे स्थानकाचे नाव चांगल्या अर्थी गाजेल अशा सोयी सुविधा मनमाड स्थानकात देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न रेल्वे प्रशासन करीत आहे.

मनमाड स्थानकात वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ही सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती आर. के. यादव यांनी मंगळवारी मनमाड येथे दिली. या सुविधेकरिता ३२ हॉट स्पॉट केंद्रे निर्मित करण्यात आली असून, मनमाड स्थानकातील वायफाय प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पादचारी पुलाचे काम जोरात

नवा पादचारी पूल सहा महिन्यांत पूर्णत्त्वास येणार असल्याचे संकेत आर. के. यादव यांनी दिले. सध्या पुलाचे काम जोरात सुरू असून, लोखंडी गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. सहा महिन्यांत पूल तयार होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

लिफ्ट महिनाभरात

मनमाड स्थानक आधुनिक करताना प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट बसविण्यात येत असून, या लिफ्टचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या महिन्यात लिफ्ट सुविधा सुरू होईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.


मनमाड स्थानकात वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली ही चांगली बाब आहे. प्रवाशांना त्याचा निश्चितच लाभ होईल. मात्र सुविधांबरोबरच रेल्वे वेळेवर धावतील याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे.

- प्रसाद पंचवाघ, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वांगीण अभ्यासातून जातीअंताचा मार्ग

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

आपल्या ग्रंथांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातीव्यवस्थेचा वेध घेऊन विश्लेषण केले. तीव्यवस्थेसारख्या कळीच्या सामाजिक प्रश्नाला हात घालण्याचे श्रेय निःसंशय त्यांचेच आहे. भारतीय समाजशास्त्र आणि भारतीय मानववंशशास्त्र समजून घेण्यासाठी येथील जातीव्यवस्थेचा सर्वांगीण व सखोल अभ्यास गरजेचा आहे. त्याशिवाय आपणास जातीअंताचा मार्ग मिळणार नाही, असे मत लेखक राहुल कोसंबी यांनी व्यक्त केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जातीसिद्धांत आणि समकालीन जातीव्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते.

कोसंबी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीव्यवस्थेविषयीचे आकलन अभ्यास तत्कालीन नेत्यांपेक्षा अधिक होता. असे असले तरी सध्याची जातीव्यवस्था समजून घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीसिद्धांत उपयोगी पडत नाही. कारण समकालीन जातीव्यवस्था आता संवैधानिक बनली आहे. तर प्रत्येक सामाजिक अभ्यासाच्या मांडणीमागे राजकीय हेतू असतो. तसा तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीसिद्धांतांतही दिसून येतो. जात ही व्यवस्था म्हणून काम करते हे सांगणारे डॉ. बाबासाहेब हे पहिलेच होते. तथापि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत जातीव्यवस्थेचा विचार केल्यामुळे त्यात त्रुटीही दिसून येतात. देशातील सध्याच्या जातिव्यवस्थेवर कोसंबी म्हणाले, भारतातील विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची जातीव्यवस्था दिसून येते. व्यवसायावर आधारित अस्पृश्यतेच्या कल्पनेतही प्रदेशाप्रमाणे भिन्नता आहे. ईशान्य भारतात अस्पृश्यता आणि वर्णव्यवस्था नाही कारण तेथे आदिवासी संस्कृती आहे. जातीव्यवस्था अनेक आहेत. त्यामुळे जाती अंतासाठी जातीव्यवस्थेचा सर्वांगीण व सखोल अभ्यास गरजेचा असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. व्याख्यानानंतर कोसंबी यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

आजचे व्याख्यान

२१ डिसेंबर

विषय : विधिमंडळातील अनुभव

वक्ते : साहित्यिक लेखक सुरेशकुमार वैराळकर, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रबोधनपर उपक्रमांची घडविणार सफर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहरात महापालिका आणि विविधि संस्थांनी अनेक प्रबोधनपर उपक्रम, प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अशा काही प्रकल्पांची नोंद देशपातळीवर घेतली जात असतानाही अनेक नाशिककरांनी या प्रकल्पांना भेटी दिल्या नसल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर लाडशाखीय वाणी मित्रमंडळातर्फे दि. २६ ते २९ डिसेंबरदरम्यान पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्कची सफर घडवून आणण्यात येणार आहे.

या अभिनव उपक्रमासाठी साधारणतः पाचशे विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट या संस्थेने घेतले असून, त्यानंतर विविध प्रकल्पांच्या भेटी आयोजित करण्यात येणार आहेत. सर्वांना वाहतुकीचे नियम माहिती होण्याच्या उद्देशाने शहरात हे पार्क साकारण्यात आले. या पार्कमध्ये केवळ ग्रुप गेल्यावरच सफर करता येत असल्याने वारंवार एकटे जाणे शक्‍य होत नाही. त्यामुळे या मंडळातर्फे शहरातील पाचवी ते दहावीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांना या पार्कची सफर घडविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्कमध्ये दिवसभरातून दोन बॅचेच होत असून, प्रत्येक बॅचला किमान पन्नास विद्यार्थी नेण्याचा मंडळाचा मानस आहे. त्यासाठी मंडळाने सोशल मीडियाचा वापर करून नावनोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.

--

निसर्गाचीही देणार माहिती

नवीन वर्षात मंडळातर्फे महापालिकेच्या तारांगण सफरीचे आयोजन करण्यात येणार आहे. तारांगणासाठी लागणारी प्रवेश फीसुद्धा मंडळाकडूनच भरली जाणार असून, त्यानंतर विविध प्रकल्प, डोंगर किंवा निसर्गाची माहिती मंडळांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंडळाचे विश्वस्त चंद्रकांत धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकल्प राबविले जात असून, मंडळाचे अध्यक्ष सचिन बागड, सेक्रेटरी नीलेश कोतकर, प्रमोद शिरुडे, व्हीनस वाणी, चिन्मय धामणे आदींचा सक्रिय सहभाग आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी या पार्कच्या सफरीचा आनंद घ्यावा, असे आवाहन कोतकर यांनी केले आहे.

--

इतरांच्याही पुढाकाराची अपेक्षा

शहरात अनेक चांगले प्रकल्प उभारण्यात आले असून, अद्यापपावेतो कोणत्याही सामाजिक संस्थेने अशा पद्धतीने पुढाकार घेतलेला दिसत नाही. लाडशाखीय वाणी मित्रमंडळाने नाशिकचे सर्वच प्रकल्प नाशिककरांना माहिती व्हावेत, या उद्देशाने या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरातील विविध सामाजिक मंडळांनीसुद्धा अशा पद्धतीने विविध प्रकल्प राबविल्यास त्याचा फायदा नाशिककरांना निश्चितच होईल.

--

शहरातीलच नव्हे, तर इतर ठिकाणच्या प्रकल्पांची माहिती जनतेला होण्याच्या उद्देशाने आम्ही हे काम हाती घेतले आहे. सर्वच नाशिककरांना या प्रकल्पात सहभागी होता येणार आहे. आगामी काळात काही निसर्गरम्य ठिकाणांचीही सफर घडवून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.

-नीलेश कोतकर, सेक्रेटरी, लाडशाखीय वाणी मित्रमंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक कचऱ्याचा वेढा

$
0
0

डाव्या कालव्याचे पाणी शेतात येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त; मनपाचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गंगापूर धरणातून डाव्या कालव्याला सध्या पाण्याचे हिवाळी आवर्तन सोडण्यात आलेले आहे. या आवर्तनाच्या अगोदर कोरड्या असलेल्या या कालव्याचा वापर कचरा कुंडीप्रमाणे केला जात असल्यामुळे पाणी सोडताच या कालव्यातून पाण्याबरोबर कचराही वाहून शेतात पोहचू लागला आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या आता पाण्याद्वारे थेट शेतापर्यंत पोहचू लागली आहे. तरी प्रशासनाने ही समस्या सोडवून शेतकऱ्यांची अडचण सोडवावी, अशी मागणी होत आहे.

काही ठिकाणी असलेल्या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी कालव्याचे काम सुरू असताना हा प्रवाह खालच्या बाजूने खड्डे खोदून त्यावर सिमेंटचे बांधकाम करून करण्यात आले आहे. खाली कालवा आणि नैसर्गिक नाला अशी रचना असल्यामुळे पावसाळ्यात नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहाला काही अडचणी येत नाहीत. अशा ठिकाणी हा पाण्यावर तरंगणारा कचरा मोठ्या प्रमाणात अडकलेला दिसत आहे. या कचऱ्यामुळे कालव्याच्या पाण्यालाही अडथळा निर्माण होऊन कालवा फुटण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे.

नदीचे प्रदूषण बनली गंभीर समस्या

कचरा टाकल्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कालव्यात तळाशी टाकलेला कचरा वाहून शेतात जात आहे आणि कडेला असलेला कचरा तसाच साचून राहिलेला पाणी वाढल्यावर हा कचरादेखील वाहून शेतात जाण्याची शक्यता आहे. कालव्याचे पाणी चाऱ्यांतून थेट शेतात जात असते. त्या पाण्यात हा कचरा वाहून जातो, तो थेट शेतात जाऊ लागला आहे. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात अडकून पाणी जाण्याच्या मार्गात अडथळे येऊन पाणी वेगळ्या दिशेनेही वाहून जाण्याचे प्रकार या कचऱ्यामुळे होऊ लागले आहे.

नदीच्या पाण्यात कचरा टाकल्यामुळे नदीचे प्रदूषण वाढले आहे. त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात कालव्याच्या पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. मात्र, याकडे पाहिजे तसे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. या डाव्या कालव्याच्या लगत रस्ता असल्यामुळे त्या रस्त्याने जाणाऱ्या वाहनांतून सहजपणे कचरा कालव्यात फेकून देण्याचे प्रकार घडत असल्यामुळे ही समस्या गंभीर बनत चालली आहे.

शेतीला पाणी पुरविणाऱ्या कालव्याचा वापर आता कचरा टाकण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे नाल्यात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसतात. कालव्याला पाणी येताच हा कचरा वाहत जाऊन तो शेतात पोहचू लागला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या भेडसावू लागली आहे.

-गणपत जाधव, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या जाचाविरोधात रिक्षा-टॅक्‍सीचालकांचा मोर्चा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनधारकांना पोलिसांकडून टार्गेट केले जात असल्याच्या निषेधार्थ रिक्षा - टॅक्सी कृती समितीतर्फे मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालसमोर निदर्शने करण्यात आली. वाहन तपासणीच्या नावाखाली वाहनधारकांची अडवणूक करून त्यांचा मानसिक, आर्थिक छळ केला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

निदर्शनांनंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, खासगीत पोलिस सांगतात की, आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टार्गेट पूर्ण करण्यास सांगितले आहे. या टार्गेटमुळे अनेकांना नाहक त्रास आणि भुर्दंड सहन करावा लागतो. पोलिसांकडून वाहनधारकांची अडवणूक होत असून, सर्वसामान्य वाहनधारकाला अर्वाच्च्य भाषेत शिव्या देणे, सक्तीने बेकायदेशीर दंडाची वसुली करण्यामुळे पोलिस कर्मचारी शहरातील नागरिकांच्या रोषास बळी पडत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

..ती वाहने सोडा

शहरातील ६८६ रिक्षाधारकांना आरटीओने सायबर क्राइमच्या माध्यमातून खोट्या नोटिसा पाठवून वाहने अडकवून ठेवली आहेत. त्या वाहनांना तात्काळ सोडवण्यात यावे, रिक्षा व टॅक्सीधारकांना पॅसेंजर वाहतूक करणाऱ्या ६/१९२ या कलमाचा नियम लागू होत नसतानाही रिक्षा-टॅक्सी धारकांवर खोट्या केसेस दाखल करून दंडवसुली केली जात आहे. शहरात ‘अधिकृत रिक्षा व टॅक्सी थांबा’, ‘नो पार्किग झोन’ फलक लावावेत अशी मागणी भद्रकाली रिक्षा युनियनचे अध्यक्ष हैदर सैय्यद, शिवाजी भोर, राजू देसले, शशी उन्हवणे यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवा प्रारंभानिमित्त सचिवांचा ‘दर्शन’ दौरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एअर डेक्कनची विमानसेवा लांबली असली, तरी या सेवेच्या प्रारंभ सोहळ्यास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. दुबे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे यानिमित्त ते त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी येथे दर्शनाचाही दौरा करणार आहेत. नाशिककरांच्या सेवेत विमानसेवा त्वरित रुजू व्हावी यासाठीच त्यांचा हा दौरा आहे का, असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

एअर डेक्कन या कंपनीच्या विमानसेवेचा येत्या शनिवारी प्रारंभ होत आहे. त्यासाठी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक आणि पुणे या दोन शहरांसाठीच्या विमानसेवेला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. याप्रसंगी नाशिकमधील खासदार, आमदार, महापौर, जिल्हाधिकारी, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीहून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. दुबे येणार आहेत. शुक्रवारी रात्री ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. शनिवारी सकाळीच ते त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळच्या प्रारंभ सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. तो आटोपल्यानंतर ते शिर्डीकडे साईबाबांच्या मार्गदर्शनासाठी रवाना होणार आहेत.

--

घाईबाबत प्रश्नचिन्ह

एकीकडे नाशिककरांना विमानसेवा हुलकावणी देत असताना सरकारी अधिकारी मात्र प्रारंभाच्या निमित्ताने सरकारी दौऱ्यातच देवदर्शनही करीत असल्याची बाब पुढे येत आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तांत्रिक कारणाने सेवा महिनाअखेरीस मिळणार आहे. मग, कंपनीने तिकीट बुकिंगची आणि घोषणेची घाई का केली, असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत.

--

गेल्या अनेक वर्षांपासून माझे स्वप्न आहे, की पुण्याहून नाशिकला विमानाने यावे. म्हणूनच येत्या ३० डिसेंबर रोजी सायंकाळचे पुणे ते नाशिक हे तिकीट मी बुक केले आहे. मात्र, सेवा मिळणार आहे की नाही, ते एअर डेक्कनने स्पष्ट करावे म्हणजे मला नियोजन करता येईल.

-योगेश गायधनी, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाळा बंदचा उर्दूला फटका

$
0
0

नाशिक : राज्य सरकारने दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १३१४ शाळांना कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतल्याचा परिणाम उर्दू माध्यमांच्या शाळांवर झाला आहे. राज्यभरातील एकूण १७५ शाळांमध्ये जिल्ह्यातील चार शाळांचा समावेश आहे. या चारही शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातील शाळांत स्थलांतरित करण्यात आले आहे.

दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील ३१ शाळांचा यात समावेश असून, यात चार शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत. यापैकी दोन शाळांमध्ये दहा, अन्य दोन शाळांमध्ये त्यापेक्षा कमी विद्यार्थी आहेत. या शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा येणार असल्याने शाळा सुरू ठेवण्याची मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाकडून केली जात आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकाला त्याच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार असून, हा अधिकारच शाळा बंदच्या निर्णयाने हिरावला जात असल्याच्या प्रतिक्रिया उर्दू शिक्षकांकडून उमटत आहेत.

या शाळा बंद

- जि. प. प्राथमिक शाळा उर्दू, निंबायती, मालेगाव (विद्यार्थिसंख्या ः ९, शिक्षकसंख्या ः २)

समायोजन ः जि. प. माध्यमिक शाळा

- जि. प. शाळा कळवण उर्दू, कळवण (विद्यार्थिसंख्या ः १०, शिक्षकसंख्या ः २)

समायोजन ः जि. प. शाळा रामनगर, कळवण

- जि.प. प्राथमिक शाळा उर्दू, दाभाडी, मालेगाव (विद्यार्थिसंख्या ः ४, शिक्षकसंख्या ः २)

समायोजन ः जि.प. कन्याशाळा, दाभाडी, मालेगाव

- जि. प. प्राथमिक उर्दू शाळा, देवळा (विद्यार्थिसंख्या ः १०, शिक्षकसंख्या ः १)

समायोजन ः जि.प. मराठी शाळा, देवळा


० ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिकण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. राज्य सरकारने शाळा बंद करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे.

- साजीद निसार अहमद, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशन आवारात ओला, उबेरला रेड कार्पेट

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

ओला आणि उबेरसारख्या टॅक्सीसाठी रेल्वेच्या आवारात पार्किंगला जागा देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या आवारात ओला आणि उबेरसारख्या खासगी टॅक्सी सेवेला अधिकृत परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत. भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील मुख्य वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी यांनी सरकारी धोरणानुसार ही कार्यवाही होत असल्याची माहिती ‘मटा’ला दिली. नाशिकरोड रेल्वे स्टेशन रिक्षाचालक-मालक युनियनचे अध्यक्ष किशोर खडताळे आणि टॅक्सीचालक संघटनेचे पप्पू शेख यांनी ओलासारख्या टॅक्सीसेवेला तीव्र विरोध दर्शविला आहे. ओला, उबेर टॅक्सीचालक व रिक्षाचालक यांच्यात अनेकदा नाशिकरोड स्थानकात हाणामारीचे प्रसंग उद््भवले होते. त्यामुळे प्रस्तावित पार्किंगमुळे नवा वाद उद््भवण्याची चिन्हे आहेत.

--

अधिकाऱ्यांकडून पाहणी

पार्किंगच्या टेंडरची रक्कम १ लाख ९१ हजार ८२५ रुपये असून, बयाणा रक्कम दहा हजार रुपये आहे. २९ डिसेंबरपर्यंत टेंडर जमा करायचे आहे. तीन महिन्याच्या काळासाठी हा करार असेल. भुसावळ आणि नाशिकरोड रेल्वे स्टेशनमधील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी पार्किंगच्या जागेची पंधरा दिवसांपूर्वी पाहणी केली. मुख्य प्रवेशद्वारासमोर पहिल्या रांगेत ओला व उबेरसारख्या टॅक्सींना जागा देण्याचे नियोजन आहे. सध्या येथे रिक्षा उभ्या राहतात.

---

गोंधळाची स्थिती

नाशिकरोड स्थानकाच्या एक किलोमीटर परिसरात ओला, उबेरसारख्या टॅक्सी उभ्या करण्यास प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी, तसेच पोलिसांनीही परवानगी दिली नसल्याचे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष किशोर खडताळे यांनी सांगितले. त्यामुळे रेल्वे कशी काय परवानगी देऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रेल्वे अधिकाऱ्यांच्याही निर्दशनास रिक्षाचालक संघटनेने हा मुद्दा आणून दिला आहे.

--

आंदोलनाचा इशारा

नाशिकरोडला सुमारे तीनशे रिक्षा व ४५ टॅक्सी आहेत. गेल्या ३५-४० वर्षांपासून ते येथे व्यवसाय करीत आहेत. स्पर्धेमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय होत नाही. ओला व उबेरसारखी टॅक्सीसेवा सुरू झाल्यास आपला संसार उघड्यावर येईल, अशी भीती रिक्षाचालकांना वाटते. उबेर आणि ओलासारख्या कंपन्यांना रेल्वे स्थानक भागात भाडेतत्त्वावर पार्किंगसाठी जागा दिली जाणार आहे, असे सांगून खडताळे म्हणाले, की आम्हीदेखील भाडे भरण्यास तयार आहोत. पण, रेल्वे परवानगी देत नाही. आम्ही विमा व कर भरतो, बॅच व परमिटही आहे. मग हा अन्याय का? यामागे मोठे आर्थिक कारण आहे. या टॅक्सींना पार्किंगसाठी फ्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मुबलक जागा आहे. तेथे आमचा विरोध नाही. रेल्वेने ओला, उबेरला परवानगी दिल्यास रिक्षाचालक रेल्वेखाली आत्महत्या करतील व त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, महंमद शेख, सचिन सोनवणे, रमेश दाभाडे, अनिल शिंदे, गोविंद साळुंके, अरुण गोसावी, मोहिन हिरे, अरुण गोसावी, टॅक्सी संघटनेचे पप्पू शेख, अल्ताफ सय्यद, शेख अलीम विठ्ठल भडांगे, मोहसीन पटेल आदींनी दिला आहे.

--

रेल्वेने प्रवास करणारा उच्चशिक्षितवर्ग मोठा आहे. त्याला ओला, उबेरसारखी टॅक्सीसेवा नाशिकरोड स्थानकात हवी आहे. त्याला अनुसरून रेल्वेने पावले उचलली असतील, तर ते योग्यच आहे. रिक्षाचालकांना फटका बसणार नाही, अशी आशा वाटते.

-प्रा. किरण रकिबे, प्रवासी

--

रेल्वे स्थानकात आमच्या पोटावर पाय देऊन ओला व उबेरसारख्या टॅक्सीसेवेला परवानगी दिली जाणार असेल, तर आमचा त्याला तीव्र विरोध राहील. या टॅक्सीला सिन्नर फाटा रेल्वे प्रवेशद्वारासमोर पार्किंग देण्यास हरकत नाही.

-किशोर खडताळे, अध्यक्ष, रिक्षाचालक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्भक मृत्यूप्रकरणी क्लिनच‌ीट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणात वैद्यकीय विभागाने डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. रुग्णालयाने रंगवलेल्या कागदोपत्री पुराव्याच्या आधारावर वैद्यकीय अधीक्षकांनी आपल्या चौकशी अहवालात नातेवाईकांच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा केला आहे.अर्भकाच्या जन्माअगोदरपासून संबंधित महिलेवर योग्य उपचार झाले असून, डॉक्टर आणि रुग्णालयाचा यात दोष नसल्याचा दावा करत त्यांना क्लिनचीट देण्यात आली आहे. परंतु, अजून संशय बळावू नये तसेच वाद होऊ नये यासाठी सविस्तर चौकशी सुरूच असल्याचा दावाही वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी केला आहे.

महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरणाला वैद्यकीय विभागाच्या चौकशी अहवालाने ट्व‌िस्ट मिळाला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आशा तांदळे या गर्भवती महिलेला प्रसूतीकळा येत असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष केल्यानेच नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणात न्याय मिळावा व डॉक्टरांवर कारवाई व्हावी यासाठी सदर महिलेच्या आईने मृत अर्भक घेऊन महापालिका मुख्यालय गाठले होते आणि अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावरच मृत अर्भक ठेवत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर, आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांसह वैद्यकीय अधीक्षकांकडून या प्रकरणाचा चौकशी अहवाल मागविला होता. त्यानुसार, डॉ. राजेंद्र भंडारी यांनी प्राथमिक चौकशी अहवाल अतिरिक्त आयुक्तांकडे सादर केलेला आहे.

वैद्यकीय अधिक्षकांच्या चौकशी अहवालात सदर महिलेकडे दुर्लक्ष केल्याबाबत करण्यात आलेल्या आरोपात तथ्य आढळून आलेले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. उलट प्रसुतीवेळी एक तास अगोदरपासून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश मेतकर त्याठिकाणी हजर होते. दर दोन तासांनी महिलेची तपासणी होत असल्याचा दावा उपचाराच्या रेकॉर्डवरून करण्यात आला आहे. परंतु, अर्भकाच्या फुफ्फुसात पाणी गेल्याने त्याला श्वास घेण्यात अडचणी आल्यात. त्यामुळे अर्भकाला तातडीने उपचाराची गरज होती. म्हणून नातेवाईकांच्या सल्ल्यानेच त्याला शताब्दी हॉस्प‌िटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आल्याचा दावा डॉ. भंडारी यांनी केला. शताब्दी हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचाराची सुविधा असल्याने ही प्रक्रिया राबविल्याचे सांगत, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पाठराखण करण्यात आली आहे. सदर महिलेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप चुकीचा असून डॉक्टरांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीच्या नोंदी असल्याचा पुरावा त्यांनी पुढे केला आहे. त्यामुळे मृत अर्भकाच्या नातेवाईकांकडून या चौकशी अहवालाची च‌िरफाड केली जाण्याची शक्यता आहे.

म्हणे चौकशी सुरूच

आयुक्तांना सादर केलेला अहवाल हा प्राथमिक असल्याचे डॉ. भंडारी यांनी म्हटले आहे. या चौकशी अहवालात सरळ सरळ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा बचाव करण्यात आला असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, नातेवाईकांचा रोष नको म्हणून अजूनही चौकशी सुरू असल्याचे नाटक करण्यात आले आहे. या प्रकरणात शताब्दी हॉस्पिटलचीही चौकशी करण्यात येत असून, त्यानंतर संपूर्ण चौकशी अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. भंडारी यांनी सांगितल्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

समज हीच कारवाई

इंदिरा गांधी रुग्णालयात महिलेला प्रसुतिकळा सुरू असताना नर्स मोबाइलवर खेळत असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकाने केला होता. आपल्याशी उद्धट वर्तन केल्याने कारवाईची मागणी केली होती. परंतु, या प्रकरणातही वैद्यकीय विभागाने कर्मचाऱ्यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांना समज देण्यात आल्याचे डॉ. भंडारी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरचा श्वास मोकळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या जेसीबीचा पंजा गुरूवारी सातपूरच्या अतिक्रमणांवर चालला आणि शहराने मोकळा श्वास घेतला. शिवाजी मंडईसह रस्त्यातील शेकडो अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

औद्योगिक वसाहतीचे गाव म्हणून सातपूरची सुरुवातीपासूनच ओळख आहे. मात्र, गाव वाढत गेले तसे अतिक्रमणेही वाढली. अनेक वर्षांपासून गावाला अतिक्रमणांचा विळखा पडला होता. गाव अतिक्रमणमुक्त करण्याबाबत नागरिकांकडून महापालिकेकडे वारंवार मागणी करण्यात येत होती. परंतु, याकडे दुर्लक्ष होत असल्याने अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढतच असल्याचा आरोप नगरसेविका सीमा निगळ यांनी ग्रामस्थांना सोबत घेत महापालिकेकडे केला होता. यावेळी सातपूर गावातील रस्त्यांचा श्वास मोकळा करा, अशी मागणी नगरसेविका निगळ यांनी केली होती. महापालिकेने ग्रामस्थ व नगरसेविका निगळ यांची मागणी लक्षात घेत सातपूरच्या रस्त्यांचा श्वास अखेर मोकळा अतिक्रमण काढत मोकळा केला.

दिवसभर चाललेल्या मोहिमेत महापालिका अधिकारी, कर्मचारी व पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. महापालिकेचे अतिक्रमण अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, सोनवणे, वरिष्ठ

पोलिस निरीक्षक राजेश आखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेच्या सहाही विभागांतील अतिक्रमण विभागाची वाहने व शंभरहून अधिक कर्मचारी मोहिमेत सक्रिय होते. पोलिसांकडूनही महिला पोलिसांसह ५० कर्मचाऱ्यांचा ताफा बंदोबस्तासाठी देण्यात आला होता.

अरेरावी करणाऱ्यांना पिटाळले

अनेक महिन्यांपासून महापालिकेकडून रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत सूचना दिल्या जात होत्या. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर गुरूवारी झालेल्या मोहिमेत अरेरावी करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलेच धारेवर धरत पिटाळून लावले. अंगावर येणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवत त्यांची हवा काढली. यावेळी खुद्द वरिष्ठ पोलिस निरीक्षक आखाडे यांनीही अरेरावी करणाऱ्यांचा समाचार घेतला.

कमानीपासून सुरुवात

अतिक्रमण मोहिमेसाठी सकाळी दहा वाजताच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांचा ताफा पोलिस स्टेशनच्या आवारात तैनात होता. साडेदहा वाजता कमानीपासून अतिक्रमण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी रस्त्यात

असलेल्या टपऱ्या व पत्र्यांच्या शेडचे अतिक्रमण काढण्यात आले.

फळ विक्रेत्यांचा गोंधळ

शिवाजी मंडईच्या बाहेर फळे विक्री करणाऱ्या महिलांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. यावेळी पोलिसांनी महिलांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला समजावूनच घेत नसल्याने अखेर पोलिसांच्या मदतीने गोंधळ घालणाऱ्या महिलांना बाजूला करत फळांच्या टोपल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहनांत जमा केल्या. यानंतर महिलांनी एकच महापालिकेच्या प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.

गाळ्यांचा रस्ता मोकळा

शिवाजी मंडईत असलेल्या सर्वच गाळेधारकांनी पाहिजे त्या प्रमाणात ग्राहकांसाठी पायी चालण्यासाठी असलेल्या पादचारी मार्गांवर अतिक्रमणे केली होती. तर भाजीविक्रेत्यांनीदेखील महापालिकेने दिलेल्या शेडच्या बाहेर अतिक्रमणे केली होती. मोहिमेत मंडईतील सर्वच अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे मंडईचा श्वास मोकळा झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.

युवकाचा पाय मोडला

सातपूर गावातील बाळू भंदुरे या युवकाचा त्र्यंबकेश्वररोडवरील मशिदीजवळ अतिक्रमण मोहीम सुरू असताना पाय मोडला. अचानक एक जड वस्तू पायाला लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अखेर शिवाजी महाराजांचे दर्शन!

महापालिकेची स्थापना झाल्यावर सातपूरला शिवाजी मंडईची उभारणी करण्यात आली होती. यानंतर ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा मंडईच्या बाहेर उभारला होता. परंतु, दिवसगणिक वाढत चाललेल्या अतिक्रमणांमुळे राजांचे दर्शन दुर्लभ झाले होते. गुरूवारी अतिक्रमण मोहीम फत्ते झाल्याने राजांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

..तर फौजदारी गुन्हे

दिवसभर चाललेल्या अतिक्रमण मोहिमेत शिवाजी मंडईसह रस्त्यात येणारी शेकडो अतिक्रमणे

महापालिकेने जमिनदोस्त केली. पुन्हा कोणी अतिक्रमण केले तर त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले. महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांवर सतत लक्ष ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बच्चे कंपनीसाठी ख्रिसमस कार्निव्हल

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब म्हणजे नाशिककरांना मनोरंजनाच्या जगात नेणारा सर्वांचा खास सोबती. फक्त चित्रपट, नाटकांपर्यंत मर्यादित न ठेवता अनेकांना अवघ्या कलाजगताची सफर घडवून आणणारा कल्चर क्लब हा सोबती सदस्यांना मिळाला असून, ही सोबत आणखी रंगतदार बनविण्यासाठी ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी रॉकिज् अँड डूडलर्स, बी स्केअर कॉम्लेक्सच्या समोर, श्रद्धा पेट्रोल पंपाजवळ, कॉलेज रोड या ठिकाणी हा उपक्रम होणार आहे.

ख्रिसमस म्हटले की आठवतो सांताक्लॉज, गिफ्ट आणि धमाल मस्ती. मात्र, महाराष्ट्र टाइम्सच्या वाचकांसाठी यंदाचा ख्रिसमस स्पेशल असणार आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० ते रात्री ९ दरम्यान बच्चे कंपनीसाठी ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यात बच्चे कंपनीला चॉकलेट, केक तर मिळणारच आहे, शिवाय जादूचे प्रयोगही पहायला मिळणार आहेत. विविध प्रकारचे गेम्स, टॅटू मेकिंग, ख्रिसमस ट्री, फेस पेन्टिंग आदी या कार्निव्हलमध्ये लहानग्यांना अनुभवायला मिळेल. बच्चे कंपनीसाठी प्रवेश निःशुल्क आहे. यात तीन ते १२ वर्षांपर्यंतची मुले सहभागी होऊ शकतात.

कल्चर क्लबतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नाटक, सांगीतिक कार्यक्रम, हॅप्पी स्ट्रीट्स, श्रावण क्वीन अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद कल्चर क्लब सदस्यांना वर्षभर घेता येतो. तसेच सर्वांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मटा कल्चर क्लब व्यासपीठही उपलब्ध करून देत असते.

नाटकांसारख्या कार्यक्रमांनाही मटा कल्चर क्लबकडून सदस्यांना विशेष सवलत देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल, तर आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि मनोरंजन जगताची सफर करण्यासाठी तयार व्हा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर किंवा (०२५३) ६६३७९८७, ९५५२५६६८४२ या क्रमांकांवर संपर्क करा. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टी पुन्हा ‘जैसे थे’

$
0
0

चव्हाण मळ्य ातील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मोठ्या पोलिस बंदोबस्तात मे २०१६ मध्ये उठविण्यात आलेली बिटको कॉलेज शेजारील चव्हाण मळ्यातील झोपडपट्टी दीड वर्षात पुन्हा जैसे थे वसली आहे. या जागेवर मालकी सांगणाऱ्या पालिका प्रशासनाने या झोपडपट्टीतील शेकडो झोपडपट्ट्यांवर बुलडोझर फिरवल्यानंतर या जागेवर पुन्हा झोपडपट्टी वसल्याने महापालिकेची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दीड वर्षापूर्वी येथील झोपडपट्टी अनधिकृत ठरवून ही झोपडपट्टी हटविण्याचा खटाटोप महापालिका प्रशासनाने कुणाच्या इशाऱ्यावर केला होता, असा सवाल आता विचारला जात आहे.

नाशिकरोडच्या बिटको कॉलेजच्या मागील बाजूस चव्हाण मळ्यातील बहुचर्चित झोपडपट्टी महापालिकेच्या जागेवर अनधिकृत वसलेली असल्याचे जाहीर करून अतिक्रमण निर्मूलन विभागाने प्रचंड पोलिस फौजफाट्यासह दि. २४ मे २०१६ रोजी या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरवला होता. या झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्याप्रसंगी संपूर्ण शहरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. चव्हाण मळ्यातील सुमारे सव्वा एकर जागेवर ही झोपडपट्टी गेल्या काही वर्षांपासून वसलेली होती. यात ११४ झोपडपट्टीधारक वास्तव्याला होते. या झोपडपट्टीच्या जागेवरच पीपल्स रिपब्लिकन पार्टी या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने संपर्क कार्यालयही थाटलेले होते. परंतु, गेल्यावर्षी महापालिका प्रशासनाने अचानक या जागेवर आपली मालकी सांगत ही झोपडपट्टी अनधिकृत आणि अतिक्रमित असल्याचे घोषित करून या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरवला होता. चव्हाण मळ्यातील अनधिकृत झोपडपट्टी हटविण्याच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांतून स्वागतच करण्यात आले होते.

दीडशे झोपड्यांचे मोहोळ

सध्या या संपूर्ण जागेवर पुन्हा एकदा झोपडपट्टी वसली असून, महापालिका प्रशासनाच्या डोळ्यासमोरच पुन्हा एकदा या जागेवर झोपडपट्टीचे अतिक्रमण ‘जैसे थे’ झाले आहे. असे असतानाही पालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग या जागेवरील झोपडपट्टीला अभय देण्याची भूमिका घेत असल्याने पालिकेने दीड वर्षभरापूर्वी केलेली कारवाई केवळ एक दिखावा असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या याठिकाणी सुमारे दीडशे झोपड्यांचे मोहोळ जमा झाले आहे.

चव्हाण मळ्यातील जागा खासगी मालकीची आहे. मात्र त्यापैकी केवळ ३ गुंठे जागा पालिकेच्या मालकीची आहे. तेवढीच जागा मोकळी करण्यासाठी गेल्यावर्षी झोपडपट्टी हटविण्याची कारवाई केली होती. मात्र सध्या महापालिकेची ही जागा रिकामीच पडली आहे.

-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, नाशिकरोड या जागेवर दीड वर्षभरापूर्वी केलेली अतिक्रमण निर्मूलन कारवाई कोणाच्या इशाऱ्यावर पालिका प्रशासनाने केली होती, असा प्रश्न पुढे आला आहे. या कारवाईनंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्त व पालिकेच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून पालिकेच्या या कारवाईचा निषेधही केला होता. याशिवाय झोपडपट्टी आपल्या जागेवर वसली असल्याचा दावा हिराबाई दामू भालेराव या महिलेने करून या जागेवर आपली मालकी सांगणारे प्रशासन दिशाभूल केल्याचाही दावा केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोल्फ’चे आरोग्य सुधारणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुरवस्था झालेल्या गोल्फ क्लबचे (अनंत कान्हेरे मैदान) रुपडे आता लवकरच पालटणार आहे. येथील विविध विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिले असून, याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहितीही त्यांनी दिली.

शहरातील व्यायामप्रेमींचे प्रमुख केंद्र असलेल्या गोल्फ क्लबची दुरवस्था ‘मटा’ने प्रभावीपणे मांडली आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त आपण नागपूरला असून, शहरात येताच प्रामुख्याने गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकचे काम हाती घेतले जाईल. या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन आमदार प्रा. फरांदे यांनी दिले. शहरातील अनेक नागरिकांनी त्याबद्दल ‘मटा’चे आभार मानले आहेत.

शहरात जॉगिंगचे प्रमुख ठिकाण म्हणून गोल्फ क्लब मैदान साऱ्यांनाच परिचित आहे. या ठिकाणी शहराच्या विविध भागातून व्यायामप्रेमी नागरिक येतात. मात्र, सध्या या मैदानाला अनेक समस्यांनी ग्रासले असून, अनेक नागरिक या मैदानाकडे पाठ फिरवू लागले आहेत. या ठिकाणी पुरुषांप्रमाणेच महिलांचादेखील मोठ्या प्रमाणात वावर असतो. परंतु, येथे शौचालयासारखी मूलभूत सुविधादेखील सुस्थितीत नसल्याने त्यांना गैरसोय सहन करावी लागते. या मैदानाला कुठल्या अर्थाने मैदान म्हणायचे, असा प्रश्न सध्यात पडत आहे. अनेक दिवसांत येथे साफसफाई झालेली नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या भागात गवत वाढल्याने मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. येथे अनेकदा गायी-म्हशी चरण्यासाठी येतात. येथे जॉगिंग करणाऱ्यांना त्यांच्यामधून वाट काढावी लागते. मैदानात येणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत येथे बसण्यासाठी पुरेशा जागेचा अभाव दिसून येतो. येथे बसविण्यात आलेले बहुसंख्य बाकदेखील तुटलेले आहेत. ट्रॅकवर पुरेसे विजेचे दिवे नसल्याने सायंकाळनंतर या ठिकाणी पुरेसा प्रकाशच पडत नाही. सायंकाळनंतर या ठिकाणी सर्वांसमक्ष अनेक प्रेमीयुगुले अंधाराचा फायदा घेऊन अश्लील वर्तन करताना दिसतात, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यावर ‘मटा’ने फोकसद्वारे प्रकाश टाकल्याने गोल्फ क्लबचे रुपडे पालटणार असल्याच्या निर्णयाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

--

तज्ज्ञांचे घेणार सहकार्य

गोल्फ क्लबचे रूप पालटण्यासाठी शहरातील नामवंत आर्किटेक्ट्स व डिझायनर्स यांना पाचारण करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची डिझाइन्स मागवून घेतली जाणार असून, त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आमदार प्रा. फरांदे यांनी दिली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गोल्फ क्लबची दुरवस्था ‘गोल्फ क्लबचे बिघडले ‘स्वास्थ्य’’ या शीर्षकांतर्गत बुधवारच्या अंकातील फोकसद्वारे उघड केली होती. या वृत्ताची दखल नागपूर येथे असलेल्या आमदार प्रा. फरांदे यांनी ‘मटा’च्या ऑनलाइन आवृत्तीच्या माध्यमातून घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात दोन गटांत तुफान दगडफेक

$
0
0

गजानन कॉलनीतील घटना; पोलिसांकडून पाहणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील चाळीसगावरोड परिसरातील गजानन कॉलनीत बुधवारी (दि. २०) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात कारणावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. या घटनेची माहिती अवघ्या काही वेळातच संपूर्ण शहरात पसरली आणि सोशल मीडियातून अफवांचा पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत व्हॉटस्अॅप, फेसबुकवर अनेक पोस्ट फिरत होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगावरोड परिसरात बुधवारी (दि. २०) रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास गजानन कॉलनी परिसरालगत असलेल्या एका गटाकडून ३०० ते ४०० जणांचा जमाव चालून आला. तर दुसऱ्या बाजूने नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊन धावपळ सुरू झाली. या वेळी घटनास्थळावरील काही नागरिकांनी आझाद नगर पोलिस ठाणे व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात माहिती देवून पोलिसांची कुमक मागविण्याची सूचना मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूने दगडफेक सुरू होऊन एका गटाकडून काचेच्या बाटल्यांचा मारा सुरू झाला. यानंतर घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी जमाव पांगवून शांततेचे आवाहन केले. या वेळी पोलिसांवरदेखील एका बाजूच्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना समजताच त्यांच्यासह घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपपोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्यासह कर्मचारी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत शंभराहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार रात्रीपासून घटनास्थळ व परिसरात एसआरपीएफ व पोलिस दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत.

आयजी चौबेंची पाहणी

गजानन कॉलनी परिसरात दोन गटात वाद झाल्याची बातमी विशेष पोलिस महानिरीक्षक विजयकुमार चौबे यांना समजताच त्यांनी सकाळी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची सखोल माहिती घेतली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या परिसरात गेल्या काही वर्षांत तीनवेळा दंगली झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करणार असल्याचेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंड‌ित कॉलनीत ‘वन-वे’ची अंमलबजावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंड‌ित कॉलनीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ‘वन वे’चा पर्याय पोलिसांनी दिला आहे. या निर्णयाची काही अंशी अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. काही दिवस नागरिकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्ष‌ित असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी व्यक्त केली. या ठिकाणी सम-विषम पार्किंगचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. २० डिसेंबरपासून नियम लागू करण्यात आले आहेत.

पंड‌ित कॉलनीतील दोन प्रमुख रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होते. दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा असते. त्यात रस्त्यावर एखादे वाहन पार्क झाल्यास झालेली कोंडी लवकर सुटत नाही. सततच्या त्रासाला स्थानिक नागरिकदेखील वैतागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंड‌ित कॉलनीतील दोन्ही प्रमुख रस्ते वन-वे करण्यात आले आहेत. गंगापूररोडवरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या सिद्धीविनायक हॉस्पिटलच्या बाजूने जुनी पंड‌ित कॉलनीमार्गे राजीव गांधीभवन शेजारील टिळकवाडी सिग्नलकडे येणाऱ्या वाहतुकीस हा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. २० डिसेंबरपासून टिळकवाडी सिग्नलकडून गंगापूररोडकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना तनिष्क शोरूमसमोरून राणे डेअरीच्या उजव्या बाजूने नवीन पंड‌ित कॉलनीमार्गे मॅरेथॉन चौकाकडे जावे लागणार आहे. दरम्यान, नवीन पंड‌ित कॉलनीतील या रस्त्यावरदेखील बेशिस्त पार्क होणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होत होती. त्यामुळे हा मार्गदेखील वन वे घोष‌ित करण्यात आला आहे. राणे डेअरी ते मॅरेथॉन चौक असा मार्ग एकेरी करण्यात आला असून, मॅरेथॉन चौकाकडून शरणपूररोडकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना जुनी पंडीत कॉलनीतील मार्गाचा वापर करावा लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दादांचा युवांवरील विश्वास ठरला सार्थ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गीता समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानी असण्याची गरज नाही. प्रेम असले की ग‌ीता समजते. गीता समजण्यासाठी अर्जुन होऊ जावे लागते. विद्यार्थी होऊन गेलात, तर गीता समजेल. युवांनी (युवान) तेच केले आहे. त्यांना गीतेचा खरा अर्थ कळलेला आहे. दादांनी युवांवर ठेवलेला विश्वास सार्थ ठरला आहे, असे प्रतिपादन स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यू धनश्रीदीदी तळवलकर यांनी केले.

पांडुरंगशास्त्री आठवले प्रवर्तित स्वाध्याय परिवाराच्या वतीने गीताजयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या अंतिम फेरीप्रसंगी विराट जनसमुदायाला उद्देशून त्या बोलत होत्या. त्र्यंबकरोड येथील ठक्कर मैदानात गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.

धनश्रीदीदी म्हणाल्या, की सर्व स्तरांतील युवकांना एकत्र भेटण्याचा योग दादांनी आणला. विस्तार तोच असला, तरी व्याप मात्र वाढलेला आहे. कोणताही विचार माणसापर्यंत पोहोचविणे हार्ट टू हार्ट व हर्ट टू हर्ट असते, तेव्हा ते कठीण असते. विचार सांगताना तो छापून टाकणे ही पद्धत सोपी आहे. पण, माणसाचे माणसापर्यंत पोहाेचणे अवघड आहे. स्वाध्यायाने तेच काम केले आहे. स्वाध्याय माणसापर्यंत उठून जातो. युवांकडून कार्य करून घेतो. युवांच्या बाबतीत स्वाध्याय खूप पॉझिटिव्ह आहे आणि युवांनीही तो विश्वास सार्थ ठरवला आहे, असेही दीदी म्हणाल्या.

स्वाध्याय परिवारातर्फे सुमारे ४१ वर्षांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेला विश्वव्यापक स्वरूप देण्यात आले असून, यंदा देशातील १८ राज्ये व इंग्लंड, अमेरिकेसह अनेक देशांत १८ भाषांत झालेल्या या स्पर्धेत तब्बल साडेचार लाख युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी ‘गीता : तेजाचे दर्शन, मानवमूल्य संवर्धन’ असा विषय देण्यात आला होता. नाशिक विभागातून३७ हजार ११० युवक-युवतींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धा युवा केंद्रापासून ते गट, तालुका, जिल्हा या टप्प्यांत घेण्यात आल्या. नाशिक विभागाची अंतिम फेरी गुरुवारी झाली. यावेळी १२ विद्यार्थ्यांची भाषणे झाली. त्यानंतर धनश्रीदीदींनी मार्गदर्शन केले. प्रारंभी गीतेच्या तिसऱ्या व चौथ्या अध्यायाचे पठण करण्यात आले. कार्यक्रमानंतर हजारो युवकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

गीतेच्या तेजाचे दर्शन

स्पर्धेच्या अंतिम फेरीत सौरभ पगार, माधवी गुप्ता, मंगेश जगताप, योगेश परदेशी, अविनाश भगरे, श्रुती खैरनार, भक्ती जोशी, माधुरी पाचपोहे, विशाल तांबे, मंगेश पवार, मुकेश पाटील, विवेक पाटील यांची निवड झाली होती. त्यांनी मराठी व हिंदी भाषेतून गीतेविषयीचे विचार प्रकट केले. प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनिटे वेळ देण्यात आला होता. शेवटी परीक्षकांनी निकाल जाहीर केला. विजेत्यांना दीदींनी च्या हस्ते गौरविले.


विराट गर्दी अन् चोख व्यवस्थापन

कार्यक्रमासाठी दुपारपासूनच स्वाध्यायींचा ओघ सुरू होता. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था भोसला सैनिकी शाळेच्या मैदानावर करण्यात आली होती. स्वाध्याय परिवाराचे स्वयंसेवक ठिकठिकाणी मार्गदर्शन करीत होते. मैदानापासून स्वाध्यायी पायीच, पण शिस्तीत कार्यक्रम स्थळाकडे मार्गक्रमण करीत होते. कार्यक्रमाच्या ठिकाणीही स्वाध्यायींच्या अपूर्व शिस्तीचे दर्शन घडले. हजारोंचा जनसमुदाय असूनही सारे जण विशिष्ट रांगेत मैदानावर स्थानापन्न झाले होते. संपूर्ण कार्यक्रमावर ड्रोनने नजर ठेवण्यात आली. कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची, तसेच महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे, प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका चालविणार स्वतंत्र अपंग शाळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आमदार बच्चू कडू यांच्या राड्यानंतर महापालिकेने अपंग विकास योजनांची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे. अपंगांसाठी वीस कोटींचा स्वतंत्र कृती आराखडा तयार केल्यानंतर आता अपंगासाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

शहरातील अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शाळा चालविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या बंद पडलेल्या प्राथमिक शाळांच्या इमारतींत अपंग विद्यार्थ्यांसाठी ही विशेष शाळा सुरू केली जाणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे.

अपंगांसाठीचा राखीव निधी अखर्चित राहिल्याने महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात महापालिकेत राडा झाला होता. आमदार कडू यांनी थेट आयुक्तांच्या अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर अपंग विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने सुमारे २० कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला. त्याअंतर्गत लाभार्थी निश्चितीकरिता महापालिका क्षेत्रातील अंध-अपंगांचे सर्वेक्षणदेखील करण्यात आले. अंध-अपंगांसाठी स्वतंत्र शाळा, रोजगारनिर्मितीसाठी आयटीआय, हैद्राबादच्या धर्तीवर अद्ययावत उद्यान, आरोग्यविमा, आजारांवर उपचारांसाठी पाच लाखांपर्यंत आर्थिक साहाय्य, सहाही विभागांत ऑडिओ लायब्ररी, अर्थसाहाय्य आदी योजना राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

---

प्राथमिक शाळांचा होणार वापर

अपंगांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याकरिता २.५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु, उपलब्ध कालावधीत अपंगांसाठी स्वतंत्र शाळेचे बांधकाम करणे शक्य नसल्यामुळे महापालिकेच्या बंद पडलेल्या प्राथमिक शाळांच्या इमारतींत अपंगांसाठी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण विभागाकडे पाठविला होता. त्यासाठी शाळांचा शोधही सुरू केला आहे, तसेच यासाठी स्वयंसेवी संस्थेचीही मदत घेतली जाणार असून, महासभेच्या निर्णयानंतर त्यावर पुढे कारवाई केली जाणार आहे. या निर्णयामुळे अपंगांना हक्काची स्वतंत्र शाळा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ घडवताहेत व्हर्च्युअल नर्मदा परिक्रमा!

$
0
0

नाशिक ः धर्माचरण करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असलेले नर्मदा परिक्रमेचे स्वप्न आयुष्य उतरणीला लागल्यावर पूर्ण होते. मात्र, हे स्वप्न तत्काळ घरबसल्या पूर्ण होत असेल तर...! हे शक्य केले आहे नाशिकच्या विवेक वासुदेव दंडवते यांनी. दंडवते सध्या नर्मदा परिक्रमेसाठी गेले असून, ते फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दररोज अनेकांना व्हर्च्युअल परिक्रमा घडवत आहेत.

अध्यात्माकडे वळण्यासाठी आता वयाचे काही बंधन नाही. पूर्वी आयुष्याच्या सायंकाळी होणारी नर्मदा परिक्रमा आता तारुण्यातही होऊ लागली आहे. अनेक तरुण या वारीत सहभागी होऊ लागले आहेत. नर्मदा परिक्रमा हा अत्यंत पवित्र उत्सव असून, अनेक लोक त्याकडे आकर्षित होत आहेत. विविध लोकांना तसेच एका वेगळ्या संस्कृतीला भेटण्याची संधी यातून मिळते. त्यामुळे ही परिक्रमा करण्यासाठी आता अनेकजण उत्सुक असतात. परंतु, रोजच्या कामामुळे, व्यापामुळे तितका वेळ काढू न शकलेल्यांसाठी हा आनंद देण्याचे काम दंडवते आहेत. दंडवते गेल्याच महिन्यात परिक्रमेसाठी निघालेले आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतून निवृत्त झालेल्या दंडवते यांना अध्यात्माची ओढ असून गणेशबाबांचे ते अनुयायी आहेत. याआधीही त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. यावेळच्या परिक्रमेमध्ये ते रोज फेसबुक लाइव्हवर एक व्ह‌िडीओ टाकतात. यात तेथील भागाची माहिती दिलेली असते. तसेच वाटेत येणारी अनेक मंदिरे, प्राचीन स्थळे यांचा परिचय ते अनेकांना करून देतात. त्यांच्या फेसबुक लाइव्हला असंख्य व्ह्यूज मिळत आहेत. कमेंटचाही पाऊस पडत असून, आमचे नर्मदा परिक्रमेचे स्वप्न या रूपाने पूर्ण होत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

..ही परिक्रमेची पूर्वतयारीच!

विवेक दंडवते यांचा रोजचा व्हिडीओ फेसबूकवर कधी पडतो याची अनेकजण वाट पाहात असतात. एकप्रकारे नर्मदा परिक्रमेची पूर्वतयारीच ते अनेकांकडून करून घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही असून, व्हिडीओ काढण्यात त्या दंडवते यांची मदत करतात. यासाठी रोज मुक्कामच्या जागी मोबाइल चार्ज करून घेणे त्यांना अनिवार्य असते. परिक्रमा आनंदात सुरू असून ते अध्यात्मिक समाधान देत आहेत. Vivek Vasudeo Dandwate या फेसबुक अकाऊंटवर हे लाइव्ह पाहता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images