Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बागलाणच्या तहसीलदारांचे निलंबन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण विधानसभा मतदार संघाच्या आमदार दीप‌िका संजय चव्हाण यांचा अवमान केल्याचे प्रकरण बागलाणचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या अंगलट आले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी हक्कभंगाबाबत सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मांडलेल्या मुद्याला सर्वसदस्यांनी पाठिंबा दिल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार सुनील सौंदाणे यांना निलंबित केल्याची घोषणा केली. सध्या तहसीलदार सुनील सौंदाणे हे २६ डिसेंबर पर्यंत रजेवर असून, प्रभारी तहसीलदार म्हणून दीपक धिवरे हे कामकाज पाहत आहेत.

आमदार दीप‌िका चव्हाण यांनी दीड वर्षांपूर्वी तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्यावर विशेष अधिकार हक्कभंगाचा प्रस्ताव दिला होता. मात्र विशेषाधिकार समितीने मुदत वाढ मागितली होती. या विरोधात आमदार चव्हाण व इतर महिला आमदारांनी गुरुवारी सभागृहात ठिय्या मांडला. त्यानंतर तहसीलदारांवर कारवाई का केली नाही, असा मुद्दा सभागृहामध्ये चर्चेला आला. तेव्हा विधीमंडळ पक्षनेते आमदार अजित पवार, जयंत पाटील आक्रमक झाले. प्रशासकीय अधिकारी सदस्यांना अशी वागणूक कशी काय देवू शकतात, असा शब्दात त्यांनी संतप्त सवाल केला. यासर्वांनी बाजू मांडल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार सौंदाणे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा केली.

बदली मॅटकडून रद्द

याप्रकरणानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये सौंदाणे यांची धुळे येथे रोजगार हमी तहसीलदारपदी प्रशासकीय बदली झाली होती. मात्र या बदली विरोधात सौंदाणे मॅट मध्ये गेले असता मॅटने त्यांना सटाणा येथे पूर्ववत बदली करून राज्याचे प्रधान सचिव यांच्यावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँक अध्यक्ष औटघटकेचा

0
0

vinod.patil@timesgroup.com

vinodpatilMT

नाशिक ः नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या अध्यक्षांची निवड ही औटघटकेचीच ठरण्याची चिन्हे असून, कलम ८८ अन्वये बँकेवर पुन्हा बरखास्तीची टांगती तलवार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बँकेवर प्रशासक येण्याची शक्यता असून, नव्या प्रशासकाची फाइलदेखील सहकार आयुक्तांकडे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. रिझर्व्ह बँकेनेच या बँकेच्या बरखास्तीची शिफारस केल्याने भाजप नेत्यांनी दबाव टाकला, तरी सहकार विभाग बरखास्तीवर ठाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी सध्या निवडणूक लागली आहे. ही अध्यक्षपदाची बहुचर्चित निवडणूक शनिवारी (दि. २३) होत असून, अध्यक्षपदासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी अध्यक्ष परवेझ कोकणी आणि संचालक केदा आहेर यांच्यात रस्सीखेच आहे. जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपच्या संचालकांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. अध्यक्षपदासाठी विशेषतः अध्यक्षपदासाठी कोकाटे आणि कोकणी यांच्यात चुरस असून, अध्यक्षपदाचा निर्णय थेट पालकमंत्री गिरीश महाजन घेणार आहेत. बहुमताचा दहाचा आकडा गाठण्यासाठी कोकाटे, कोकणी गटाने प्रयत्न सुरू केले असून, मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीदर्शनाची स्पर्धाही सुरू झाली आहे. येत्या शनिवारी ही निवडणूक होणार असून, भाजपचाच अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित आहे.

जिल्हा बँकेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु, नाशिक जिल्हा बँकेवर कमळ फुलविण्याचा हा आनंद औटघटकेचा ठरण्याची शक्यता आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या काळात बँकेत झालेल्या गैरकारभाराप्रकरणी बँकेवर बखास्तीची कारवाई होणार आहे. नोकरभरती, संगणक खरेदी, तिजोरी खरेदीतील भ्रष्टाचारासह विविध अनियमिततेप्रकरणी सहकार कायदा कलम ८३ व ८८ अन्वये झालेल्या चौकशीत संचालक मंडळ दोषी असल्याचा अहवाल सहकार आयुक्तांनी तयार केला आहे. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी कलम ११० नुसार रिझर्व्ह बँकेकडे शिफारस पाठविण्यात आली आहे. त्यासंदर्भातील कारवाई अंतिम टप्प्यात आहे. रिझर्व्ह बँकेकडूनही बरखास्तीसंदर्भात अनुकूल स्थिती असून, सहकार विभागाने त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. प्रशासकांच्या नावाचीही निश्चिती केली आहे. जिल्हा बँकेत यापूर्वीही प्रशासक राहिलेल्या एका अधिकाऱ्याचे नाव यासाठी निश्चित असून, त्यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सोबतच कोकाटे आणि कोकणी दोघांवरही कलम ८८ अंतर्गत ठपका ठेवण्यात आल्याने त्यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे.

--

फाइल सहकार आयुक्तांकडे

जिल्हा बँक बरखास्तीसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. संबंधित प्रशासकांच्या नावाची निश्चिती होऊन त्यांची संमतीही मिळाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बरखास्तीसंदर्भातील आदेश काढले जाणार आहेत. त्यानंतर सहकार आयुक्तांकडून प्रशासक नियुक्तीची औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे भाजपने आपला अध्यक्ष बसविण्यासाठी सर्व प्रयत्न केले असले, तरी अध्यक्षांची खुर्ची अल्पकाळासाठीच ठरण्याची शक्यता आहे.

--

...म्हणून नागपूरमध्ये तळ

जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच असली, तरी अध्यक्षपदासह बरखास्तीची कारवाई टाळण्यासाठी सध्या दोन्ही गटांचे नेते नागपूरमध्येच तळ ठोकून आहेत. भाजपकडे अध्यक्षपद मिळाल्यानंतर बँक बरखास्त झाल्यास भाजपचीच बदनामी होणार आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्याची चाचपणी सुरू असली, तरी सहकारमंत्र्यांच्या विधान परिषदेतील वक्तव्यामुळे भाजपचीच कोंडी झाली आहे. सहकार विभागाने बरखास्तीची शिफारस केल्याचे लेखी उत्तर सुभाष देखमुख यांनी दिले आहे. त्यामुळे बरखास्तीची कारवाई टाळली, तर कोर्टात हा वाद जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, सहकारमंत्री अडचणी येण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्रीही सध्या पेचात पडले आहेत.

--

कोकणींचा पत्ता कट?

दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपशी घरोबा करून अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याच्या तयारीत असलेल्या परवेझ कोकणी यांना सवर्पक्षीय संचालकांनी विरोध दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोकणींचा पत्ता कट करण्यासाठी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील गैरव्यवहारांच्या चौकशीची कागदपत्रे, अहवाल विरोधकांनी थेट मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविल्याची चर्चा आहे. पारदर्शकतेवर बोट ठेवून भाजपकडून कोकणींचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कोकणी गटाकडून माणिकराव कोकाटेंच्या नावालाही विरोध केला जात आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी तिसरेच नाव पुढे येण्याचीही शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलन प्रचाराचा गुजरातमध्ये बिगुल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुजरातमध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रचाराचा बिगुल वाजला आहे. बडोदा येथे होणाऱ्या संमेलनाच्या यशस्वितेसाठी मराठी वाङ्मय परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी दौरे सुरू केले आहेत. यात मराठी भाषिक भागांना भेटी दिल्या जात आहेत.

गुजरातमधील बडोदा शहरात १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. यात महाराष्ट्रातून मराठी भाषिक आणि रसिकांची गर्दी होण्याची आशा आहे. मात्र, त्यांच्यासह गुजरातमधील मराठी आणि गुजराती भाषकांचाही सहभाग असावा, यासाठी मराठी वाङ्मय परिषदेने पुढाकार घेतला आहे. गुजरातमधील सुरत, नवसारी आणि वापी येथे संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, संपर्कप्रमुख मिलिंद बोडस आणि प्रसिद्धीसमिती प्रमुख संजय बच्छाव यांनी भेटी देत तेथील विविध मराठी मंडळांसह मराठी भाषिक शाळांना संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

सुरतमध्ये मराठा पाटील समाज मंडळ, नवसारीमध्ये श्री गणेश मंडळ, तर वापी येथे अथर्व पब्लिक स्कूलला या प्रतिनिधींनी भेटी दिल्या. संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी मराठी मंडळांच्या प्रतिनिधींना बडोदा येथे होणाऱ्या संमेलनाचे निमंत्रण दिले. संपर्कप्रमुख यांनी संमेलनाचे स्वरूप स्पष्ट केले, तर प्रसिद्धी समितीप्रमुख संजय बच्छाव यांनी संमेलनाची रूपरेषा, त्यात होणारे विविध उपक्रम याविषयी माहिती दिली.

साहित्यप्रेमी उभारणार होर्डिंग

साहित्य संमेलनामधील सर्व कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित झाल्यानंतर सूरतसह नवसारी आणि वापी या तीन शहरांमध्ये साहित्यप्रेमी होर्डिंग उभारणार आहेत. मराठी वाङ्मय परिषदेच्या बैठकींमध्ये सुरतमध्ये सार्वजनिक हायस्कूलचे उत्तम पाटील, वसंतराव पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण वडनेरे, उद्योजक व साहित्यिक ईश्वर पाटील, मदन साठे सहभागी झाले. नवसारीमध्ये गुरुदत्त रारावीकर, तर वापीमध्ये संजय बोरसे, प्राचार्या लीना बोरसे, साहित्यिक अश्विनी राणे, सुनील पाटील यांनी आपले विचार मांडले.

शैक्षणिक सहलींचे आयोजन

मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनाची माहिती व्हावी, यासाठी राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांनी बडोदा येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन करावे, अशी सूचना आयोजकांनी केली आहे. त्यास अनेक शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संमेलनस्थळी येणाऱ्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भोजनाची व्यवस्था केल्याची माहिती कार्याध्यक्ष खोपकर यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहगावकरांनी स्वीकारला पदभार

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

थेट जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. तत्पुर्वी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातील राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अपर्ण करून पालिका सभागृहात ऋणनिर्देश सभा घेतली. या सोहळ्यास नाशिकच्या महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, सभापती शिवाजी गांगुर्डे आदींसह भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, लक्ष्मण सावजी, पदाधिकारी उपस्थित होते.

माजी तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिलीप जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे. यावर स्वरचित कविता सादर केली. बाळासाहेब कदम यांनी जनसंघापासून केलेल्या कार्याचे हे फळ आहे. म्हणून पायाच्या दगडाला विसरू नका असे मार्मिक बोल सुनावले.

लोहगावकर यांनी सर्वांचे आभार मानत जनता जनार्दनाच्या विश्वासाला तडा जाऊ न देता वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करू. संपूर्ण राज्याला आदर्श वाटावा असा त्र्यंबकेश्वर नगरीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा बनवून केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने उत्कृष्ठ धार्मिक स्थळ बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्यो सांगितले. सुरेश गंगापुत्र यांनी प्रास्ताविकात भाजपच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत गायधनी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर नितीन जाधव, रवींद्र सोनवणे, बाळासाहेब दीक्षित, उद्धव निमसे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाड उपनगराध्यक्षपदी भाजपच्या मंगला वाघ

0
0

निफाड : नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या मंगला शंकर वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निफाड नगरपंचायतीवर भाजप-सेना युतीची सत्ता आहे. आवर्तन पद्धतीनुसार विद्यमान उपनगराध्यक्षा चारुशीला कर्डीले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर मंगला वाघ यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी प‌िठासीन अधिकारी तथा निफाडचे तहसीलदार विनोद भामरे, सहाय्यक अधिकारी किशोर चव्हाण यांनी काम पाहिले. सकाळी दहा वाजता निवडणुकीच्या कामकाजास प्रारंभ झाला. सभागृहात मावळत्या उपनगराध्यक्षा चारुशीला कर्डीले, नगरसेवक राजाभाऊ शेलार, जावेद शेख, आनंद बिवलकर आदी १७ पैकी १४ नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष मुकुंद होळकर यांचा खासगी दौरा असल्याने ते गैरहजर होते. या पदासाठी वाघ यांनी दोन अर्ज सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

भाजप नेते अद्वय हिरे यांचे समर्थक खैरनार बंधूंवर झालेल्या हल्ला प्रकरणी गेल्या दोन दिवसांत शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या संपूर्ण प्रकरणात मंत्री दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांच्यासह भाजप नेते अद्वय हिरेंवरही गुन्हा दाखल आहे. भाजप आणि सेनेच्या गोटातून परस्परविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असली, तरी अद्याप एकाच आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींच्या शोधासाठी पोल‌िस पथक रवाना केल्याची माहिती छावणी पोल‌िस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंद्रजीत विश्वकर्मा यांनी दिली.

सोमवारी मध्यरात्री हिरेंचे समर्थक खैरनार बंधू यांच्यावर हल्ल्याप्रकरणी अविष्कार भुसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर बुधवारी या हल्ल्यातील दुसरा आरोपी राहुल गायकवाड याच्या फिर्यादीवरून भाजप नेतेअद्वय हिरेंसह तिघांवर गुन्हे दाखल झाले होते.

सीसीटीव्हीद्वारे तपास

पोलिसांनी खैरनार बंधूंवर हल्ला होण्यापूर्वी त्यांनी ज्या दुकानात खरेदी केली तेथील व वनविभाग कार्यानाजीक असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. तसेच दोन्ही गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी यांचे त्या वेळीचे मोबाइल लोकेशन ट्रेस करून तपास केला जातो आहे.

चर्चेला उधाण

या प्रकरणातील आरोपी अविष्कार भुसे, अद्वय हिरे यांच्यासह अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोल‌िस पथक रवाना केले असल्याची माहिती विश्वकर्मा यांनी ‘मटा’ला दिली. या मारहाणी प्रकरणामुळे शहरातील वातावरण तापले असून, विविध विषयांच्या चर्चेलाही उधाण आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेताजी, नेहरूंचे संबंध प्रेमादराचे

0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांवरही समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता. स्वातंत्र्यानंतर भारताची जडणघडण कशाप्रकारे व्हावी याबाबतही ते समविचारी होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फॅसिस्ट शक्तींची मदत स्वातंत्र्यलढ्याकरिता घेण्यावरून त्यांचे मतभेद झाले असले, तरी त्यांचे परस्पर संबंध प्रेमादराचे होते, असे असे प्रतिपादन स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे अभ्यासक राज कुलकर्णी यांनी केले.

येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताह व्याख्यानमालेत ‘नेताजी आणि पंडितजी : वैचारिक भूमिका आणि परस्पर संबंध’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्याख्यानास प्रमुख पाहुणे चंद्रशेखर पवार उपस्थित होते.

दोन तासांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात अनेक ऐतिहासिक संदर्भ देत, ओघवत्या शैलीत कुलकर्णी यांनी नेताजी आणि पंडितजींच्या कालखंडाचा व्यापक पट श्रोत्यांसमोर उभा केला. कुलकर्णी म्हणाले, नेताजींच्या गूढ मृत्यूमुळे अनेकांनी विविध कारणांनी पं. नेहरूंबद्दल आणि नेताजींबद्दल प्रवाद निर्माण केले. परंतु त्यात ऐतिहासिक तथ्य नाही. नेहरू आणि नेताजींच्या भूमिका दुसऱ्या महायुद्धापर्यंत समान होत्या. किंबहुना नेताजी हे नेहरूंपेक्षा अधिक डाव्या विचारसरणीचे होते. त्याचे स्पष्ट प्रत्यंतर आपल्याला नेताजींनी स्थापन केलेल्या ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाच्या जाहीर उद्द‌िष्टांवरून येते. १९३९ साली नेताजींनी त्रिपुरा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्याशी मतभेद व्यक्त करण्याकरिता अ. भा. काँग्रेस कार्यकारणीच्या सदस्यांनी सामूहिक राजीनामे दिले. मात्र एकटे नेहरूच नेताजींच्या पाठीशी उभे राहिले.

नेताजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या विदेशी पत्नी व मुलीची काळजी नेहरूंनी अखेरपर्यंत वाहिली. मात्र त्याची प्रसिद्धी कधी केली नाही. एवढेच नव्हे तर पं. नेहरूंच्या मुत्सद्दीपणामुळे आणि वकिली कौशल्यामुळे आजाद हिंद सेनेतील अधिकारी शिक्षेतून मुक्त झाले व नेहरूंनी त्यांच्यापैकी अनेकांना उच्चपदांवर नियुक्त केले, हा इतिहास आहे. तरीही नेहरुंवर नेताजींसंदर्भात दोषारोप केले जातात. यामागे नेताजीबद्दलचा आदर नसून पं. नेहरूंबद्दलचा द्वेष आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे असे कुलकर्णी म्हणाले. या व्याख्यानाला शहरातील साहित्य क्षेत्रातील श्रोते उपस्थित हातेे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडचे पाणी पेटणार!

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतीसिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनातील पाणी वाटपातील नेहमीचीच अनियमितता व प्रशासनाचे करारानुसार ठरलेल्या कोट्यातील पाणी न देण्याचे धोरण यामुळे येवला तालुक्यातील पाणीवापर सहकारी संस्थांनी घेतलेली आक्रमक भूमिका बघता हा पवित्रा आता मागे घेण्याची चिन्हे दिसत नाहीत.

पाणीवापर संस्थांनी आपल्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सुरू असलेल्या आवर्तनातील पाणी वाटप करण्यास असमर्थता दर्शविली आहे. ‘आम्हाला पाण्याचा हिशोब कळत नाही, क्युसेस कळत नाही. आता तुम्हीच पाणी वाटप करताना शेतकऱ्यांना तोंड द्या...अशी भूमिका पालखेड येवला उपविभागाच्या सहाय्यक अभियंत्यांसमवेत झालेल्या बैठकित पाणी वाटप सहकारी संस्थांनी घेतली. त्यामुळे पालखेड पाटबंधारे विभागापुढे पेच निर्माण झाला आहे.

पालखेड डाव्या कालव्यावरील वितरीका क्रमांक ३३ ते ३५ च्या लाभक्षेत्रातील शेतकरी व संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी (दि. २०) पालखेड पाटबंधारे येवला उपविभागाचे सहाय्यक अभियंता वैभव भागवत यांनी घेतली. या बैठकीत पाणी कोटा व पाणी वाटप धोरणावर नाराजी व्यक्त करणाऱ्या पाणीवापर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. अधिकारी नेहमीच केवळ मोठमोठी आकडेवारी दाखवून संस्था पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असतात. ही आकडेवारी आमच्या समजण्या पलीकडची असून ती तुमच्याच जवळ ठेवा. आम्हाला कशासाठी दाखवतात, असा सूर यावेळी संतप्त शेतकऱ्यांसह पाणीवापर संस्थांच्या अध्यक्षांनी लावला. यंदा दोन आरक्षण मिळणार असले तरी पहिल्या आरक्षणात मात्र शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळणार नसल्याने पाणी वापर संस्थांनी विद्रोह पुकारला आहे. कोणतीही संस्था पाणी घेणार नसून पाणी वाटप प्रशासनानेच करावे, असे मत संतू पाटील झांबरे, बाबासाहेब थेटे, प्रभाकर रंधे, शेतकरी संघटनेचे अनिस पटेल यांनी व्यक्त केले.
पाणी वापर सहकरी संस्था अस्तित्वात नव्हत्या. त्यावेळी पालखेडच्या कर्मचाऱ्यांमार्फतच शेतकऱ्यांना पाणीवाटप होत असे. आता पाणी वाटप करण्यास पाणीवापर संस्थांनी नकार दिल्यावर व पालखेड विभागानेच पाणी वाटप करायलाच पाहिजे.

- अनिस पटेल, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना, येवला

सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेल, यासाठी आपण सार्वजनिक प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसह पाणी वापर सहकारी संस्था पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावे. सहकार्य मिळाल्यास पाणीवाटप सुरळीत करता येईल.- वैभव भागवत, सहाय्यक अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी इंजिनीअरिंग कॉलेज नाशिकला शक्य

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकमध्ये गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेज सुरू करण्याच्या राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे देवळालीचे आमदार योगेश घोलप यांनी केलेल्या मागणीला शिक्षणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत नाशिकमध्ये स्वतंत्र गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेज सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिकच्या औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असूनही नाशिकमध्ये अद्यापही गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेजची कमतरता आहे. या कमतरतेमुळे नाशिकमधील विद्यार्थ्यांना इतर शहरांतील कॉलेजेसवर अवलंबून राहावे लागते. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी नाशिकच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार घोलप यांनी ही मागणी केली आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार घोलप यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन नाशिकमध्ये एकमेव गव्हर्नन्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज असून, एकही गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेज नसल्याची बाब लक्षात आणून देत नाशिकमध्ये ते सुरू करण्याची मागणी केली. नाशिकमध्ये मोठ्या संख्येने खासगी शिक्षण संस्थांची पॉलिटेक्निक व इंजिनीअरिंग कॉलेजेस आहेत. परंतु, त्यांचा खर्च बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेरचा असतो. परिणामी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहण्याचे प्रमाण मोठे आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी, तसेच नाशिकमध्ये सातपूर, अंबड, सिन्नर, इगतपुरी या मोठ्या औद्योगिक वसाहतींबरोबरच नोट प्रेस, एचएएल कारखाना, औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पुरेशी जागाही उपलब्ध असल्याने येथे स्वतंत्र गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेज गरजेचे असल्याची बाब आमदार घोलप यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या या मागणीचा राज्य सरकारकडून सकारात्मक विचार करून नाशिकमध्ये नव्याने गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेजला परवानगी दिली जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे नाशिकमध्ये येत्या काळात गव्हर्नन्मेंट इंजिनीअरिंग कॉलेज सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारली चित्रकला प्रदर्शनाचे उद्‍घाटन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज स्मारक येथे प्रसिद्ध वारली चित्रकार राजेंद्र महाले यांच्या हस्ते वारली चित्रकार वसुंधरा शिवणेकर यांच्या वारली चित्रकला प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, डॉ. लक्ष्मण शिवणेकर, वारली चित्रकार संजय देवधर आदी उपस्थित होते.
उद्‍घाटनप्रसंगी वारली चित्रकार राजेंद्र महाले यांनी वारली चित्रसृष्टीतील प्रात्यक्षिके चितारून दाखविली. या प्रदर्शनात वसुंधरा शिवणेकर यांनी वारली चित्रशैलीत काढलेल्या ५० चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. चित्रात लग्नाचा देखाव्यातील चौक, समृद्धीचे प्रतिक असलेला मोर, तारपा नृत्य, वर्तुळ-त्रिकोण-सरळरेषा यांच्याद्वारे काढलेले चित्र, कापडावर मातीने सारवून काढलेले वारली चित्रांचा समावेश आहे. वारली चित्रकलेत पोस्टर कलर बरोबर इतर रंगाचाही त्यांनी वापर केला आहे. ‘बेटी बचाव’सारखे सामाजिक संदेश या चित्रांतून देण्यात आले आहेत. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (दि. २४) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेल्टर’मधून नाशिकचे ब्रॅण्डिंग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येथे होतील स्वप्ने फलदायी असं आवतंन घालत ‘शेल्टर २०१७’ या भव्य गृहप्रकल्प प्रदर्शनाचे औपचारिक उद्‍घाटन सायंकाळी करण्यात आले. डोंगरे वसतिगृह मैदानावर झालेल्या पाच दिवशीय प्रदर्शनात पाहुण्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी नाशिकची महती सांगणाऱ्या दोन शॉर्ट फिल्म दाखविण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

उद्‍घाटन सोहळ्यास महापौर रंजना भानसी, महसूल आयुक्त महेश झगडे, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, क्रेडाईचे महाराष्ट्र अध्यक्ष शांतीलाल कटारीया यासह क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यात उज्ज्वल भविष्याची साक्ष देणारं शहर असं मनावर विंबवत या प्रदर्शनाची माहिती देण्यात आली. यावेळी कोतवाल यांनी या प्रदर्शनाचा उद्देश ग्राहक आहे. त्यामुळे या ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकल्प बघता यावे यासाठी ही मोठी संधी आहे. कोणकडूनही घर घ्या पण; ते नाशिकमध्ये घ्या, असे त्यांनी यावेळी सांगितले. कोतवाल यांच्या प्रास्ताविकानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. ३०,००० मीटर्स जागेत २०० हून अधिक बांधकाम व्यावसायिक, २५ हून अधिक गृहकर्ज देणाऱ्या संस्था तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडीत १०० हून अधिक कंपन्याच्या सहभाग असलेल्या या प्रदर्शनात मंगळवारी (दि. २६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार असल्याची माहिती देण्यात आली.

उद्‍घाटन सोहळ्यापूर्वी नागरिकांसाठी सकाळी दहा वाजेपासूनच प्रदर्शन खुले करण्यात आले. त्यानंतर विविध कार्यक्रम दिवसभर झाले. आपले गाव व शहर कसे असावे या स्पर्धेत ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत चित्र रेखाटली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असलेल्या या प्रदर्शनस्थळी खुला रंगमंच, वातानुकुलित डोम, नाशिक गॅलरी, सेमिनार हॉल, कॅफेटेरिया हे आकर्षण आहे. याशिवाय प्रदर्शनादरम्यान विद्यार्थी, युवक व महिला यांच्यासाठी विविध उपक्रम तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम केल्यामुळे या प्रदर्शानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेचे आज उदघाटन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई आणि पुणे या दोन शहरांसाठीच्या विमानसेवेला हिरवा झेंडा दाखविण्याचा समारंभ शनिवारी (दि. २३) सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. मात्र, नाशिककरांना प्रत्यक्ष विमानसेवेचा लाभ ३० डिसेंबरलाच मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, कंपनीने पुण्यासाठी तिकीटाचे दर वाढविले आहेत.

एअर डेक्कन या खासगी कंपनीच्या वतीने १९ आसनी विमानाद्वारे नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक या दोन सेवा केंद्र सरकारच्या उडान या योजनेद्वारे दिल्या जाणार आहेत. या सेवेचा शुभारंभ सोहळा ओझर विमानतळावर शनिवारी सायंकाळी होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तर, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. दुबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एअर डेक्कनचे चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कॅप्टन गोपिनाथ यावेळी हजर राहणार आहेत. तसेच, नाशिकचे महापौर, जिल्हाधिकारी, विभागीय महसूल आयुक्त, विविध संस्था-संघटनांचे अध्यक्ष, जिल्ह्यातील खासदार, आमदार आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

३० डिसेंबरपासून सेवा
एअर डेक्कनने सेवा नक्की कधी सुरू करण्यात येईल, याचा खुलासा केलेला नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वेबसाईटवर २२ ते ३१ डिसेंबरपर्यंत स्लॉट बुक असे दर्शविले जात होते. शुक्रवारी मात्र ३० डिसेंबरचे तिकीट बुकिंग घेतले जात होते. त्यामुळे कंपनीच्या वतीने ३० डिसेंबरपासून सेवा मिळण्याचे स्पष्ट होत आहे.

टर्मिनल सज्जता

विमानसेवेचा शुभारंभ असल्याने ओझर पॅसेंजर टर्मिनलच्या ठिकाणी सज्जता करण्यात आली आहे. याठिकाणी असलेल्या विविध सोयी-सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तीन वर्षांपासून हे टर्मिनल विनावापरा पडून आहे. या टर्मिनलची मालकी एचएएलकडे आहे. आता विमानसेवा सुरू होणार असल्याने या टर्मिनलच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच, काही सुविधांसाठी किरकोळ दुरुस्तीही करण्यात आल्याचे ‘एचएएल’ने सांगितले आहे.

सेवेचा पत्ता नाही, तिकीट दुपटीने वाढले

एअर डेक्कन कंपनीकडून अद्याप सेवा सुरू झाली नसली तरी आगामी दिवसांच्या तिकिटांचे दर मात्र कंपनीने वाढविले आहेत. कंपनीने गेल्या आठवड्यात तिकिटांचे बुकिंग सुरू केले. यावेळी नाशिक ते पुणे या प्रवासासाठी १६७० रुपयांचा तिकीट दर आकारला. त्यात १३५२ रुपये मूळ तिकीट आणि त्यावर ३१८ रुपयांचा कर यांचा समावेश होता. येत्या ३० डिसेंबरच्या सेवेसाठी मात्र हा दर आता तब्बल दुप्पट करण्यात आला आहे. २८५७ रुपये मूळ तिकीट व त्यावर ३९२ रुपयांचा कर असे एकूण ३२४९ रुपये तिकीट असल्याचे कंपनच्या वेबसाइटवर दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृतिशील अध्यात्म कालसापेक्ष असते

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मनुष्याच्या जीवनात कर्म व ज्ञानाचा समन्वय झाला पाहिजे आणि हा समन्वय अध्यात्म करून आणते. म्हणून माणसाच्या जीवनात अध्यात्माची गरज असते. केवळ अध्यात्म गरजेचे नाही तर माणसाच्या जीवनात कृतिशील अध्यात्म गरजेचे आहे. कारण कृतिशील अध्यात्म हे कालसापेक्ष असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. चैतन्यमहाराज देगलुरकर महाराज यांनी केले. प. पू. बस्तीरामजी सारडा यांच्या ५४ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

प. सा. नाट्यगृहात सुरू असलेल्या ‘अध्यात्म कालातीत की कालसापेक्ष’ या विषयावरील व्याख्यानमाला समारोपप्रसंगी देगलुरकर महाराज म्हणाले, की कर्माची व्याख्या व्यक्तीपरत्वे बदलत जाणारी असते. आपण कर्म कशासाठी करतोय याचे उत्तर आपल्याला स्वत:ला देता आले पाहिजे. शहाणा माणूस कर्माचा परिणाम जाणून घेऊन मगच ती कर्मे करतो. जगताबद्दल जाणीव निर्माण करणे हा वेदांताचा प्रयत्न आहे. अध्यात्माची माणसाच्या जीवनात गरज काय? असे प्रश्न निर्माण होतात; परंतु माणसाचे गजणे सुकर व्हावे त्याने आनंदाने जगावे म्हणून अध्यात्म आहे.

अध्यात्माच्या आणखी काही खुणा सांगताना देगलूरकर महाराज म्हणाले की, मी आहे म्हणून संसार सुरू आहे, असे आपल्याला जोपर्यंत वाटत रहाते तोपर्यंत आपण गैरसमजात असतो. परंतु एकदा चातुर्मासात पंढरपूरला जा, चार महिने तेथे मुक्काम करा आणि चार महिन्यांनी घरी जा. तुमच्यावाचून कुणाचे काही अडलेले नसते, हे जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्हाला अध्यात्माची खरी किंमत कळेल, असेही ते म्हणाले.

कुणाचा द्वेष करू नका
गाथा व ज्ञानेश्वरीविषयी देगलूरकर महाराज म्हणाले, की गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचल्याने कुणाला मोक्ष मिळत नाही. परंतु, मोक्षाची जाणीव करून देण्यासाठी गाथा, ज्ञानेश्वरी आहे. संसाराचा त्याग करू नका, कुणाचा द्वेष करू नका, कुणाला त्याज्य मानू नका. जे आहे त्याला अनुकूल बनवा जगा तर अध्यात्म खऱ्या अर्थाने रुजले असे म्हणता येईल असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कम्युनिटी पोलिसिंगवर भर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) राज्यातील पोलिसांना कम्युनिटी पोलिसिंगचे उद्दिष्ट दिले आहे. पुढील दोन वर्षे या कामाचे दर तीन महिन्यांनी अवलोकन केले जाणार आहे असून, पोलिसांची प्रतिमा सुधारण्याबरोबर नागरिकांशी संवाद वाढावा यासाठी प्रयत्न आहे. कम्युनिटी पोलिसिंग संकल्पना राबवण्यासाठी दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरी तसेच ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी, आधुनिक गुन्ह्यांच्या तपासाची आव्हाने आणि पोलिसांची संख्या तसेच मानसिकता याचा सर्वसामान्यांवर परिणाम होतो. पोलिसांचा फौजफाटा कितीही मोठा असला तरी नागरिकांच्या मदतीशिवाय त्यास यश मिळत नाही. पोलिस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद नसल्याचा त्याचा थेट फायदा गुन्हेगारी प्रवृत्ती घेतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यातील सर्व पोलिस आयुक्तलयांसह पोलिस अधीक्षक कार्यालयांना कम्युनिटी पोलिसिंग ही मोहीम हाती घेण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. पुढील दोन वर्षे यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येणार आहे. कम्युनिटी पोलिसिंग या संकल्पनेत नागरिक आणि पोलिस यांच्यातील परस्पर सहकार्यास महत्त्व देण्यात आले आहे. विशेषतः जातीय सलोखा वाढवणे, गुन्हेगारीस प्रतिबंध, नियत्रंण आणि गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिस-नागरिकांचे परस्पर सहकार्य, आपसातील वाद, खटले समुपदेशनाद्वारे मिटवण्यासाठी प्रयत्न करणे, कम्युनिटी पोलिसिंगद्वारे गुप्तचर यंत्रणेचे जाळे उभे करणे, फेरीवाले, चौकीदार, रिक्षाचालक, विविध क्षेत्रातील एजंट, हॉटेलचालक यांना हाताशी धरून डोळे आणि कान असे कार्यक्रम राबवणे, पीडित महिला व मुलींसाठी विशेष कक्ष स्थापन करून वेळीच मदत करणे, तसेच कायद्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे अशी उद्दिष्ट यात समाविष्ट करण्यात आली आहे. सांगली येथील संशयिताचा कोठडीतील मृत्यू, नागपूरमधील हत्यासत्र तसेच राज्यातील इतर शहरांमध्ये पोलिसांची डागळलेली प्रतिमा सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

कम्युनिटी पोलिसिंग सेल
कम्युनिटी पोलिसिंग सेल त्वतित सुरू व्हावी यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून सहायक पोलिस आयुक्त आणि नियंत्रण अधिकारी म्हणून पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलिस अधिक्षक कार्यालयासाठी ही जबाबदारी पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपअधीक्षक (गृह) अथवा अपर पोलिस अधीक्षकांकडे सोपवण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी सदर माहिती पत्राद्वारे कळवली आहे.

शहर पोलिसांच्या वतीने कम्युनिटी पोलिसिंग ही संकल्पना दीड वर्षांपासून राबवली जाते. मॅरेथॉनचे आयोजन असो की विविध कार्यक्रमांना पोलिस अधिकाऱ्यांची हजेरी ती याचमुळे असते. यासाठी एक सेल सुरू करण्यात येणार असून, त्या निमित्ताने नागरिक आणि पोलिसांचे एक नाते वृद्धींगत होऊ शकते.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील रस्त्यांचा सर्व्हे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या नवीन रावसाहेब सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत ग्रामीण भागातील खराब रस्त्यांवर वादळी चर्चा झाली. यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जिल्हा परिषद सदस्यांनी संताप व्यक्त केला. रस्त्यांचा सर्व्हे केला नसताना अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवर नाराजी व्यक्त करून हा सर्व्हे करण्याचा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन त्याला मंजुरी देण्यात आली.

सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही सभा तब्बल सहा तासांहून अधिक वेळ चालली. सभेत जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी रस्त्यांचा विषय उपस्थित केल्यानंतर या विषयावर बहुतांश सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. येवल्याचे संजय बनकर यांनी, दिवसातून सामान्य माणसांचे विविध कामांसाठी येणाऱ्या १५ फोनपैकी १० फोन हे फक्त रस्त्यांच्या कामाचे असतात, असे सांगून रस्त्यांची स्थिती किती भयावह आहे, याचे चित्र मांडले. अशा रस्त्यांचा बांधकाम विभागाने सर्व्हे केला का, असा प्रश्नही उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी सर्व्हे केल्याची खोटी माहिती दिल्यामुळे सर्वांनी संताप व्यक्त केला. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १३ हजार ८०० किलोमीटरचे रस्ते जिल्हा परिषदेअंतर्गत असून, त्यातील ७५ टक्के रस्ते खराब आहेत. यासाठी दोन हजार कोटींची आवश्यकता असून शासनाने नुकतेच त्यासाठी ४२ लाख रुपये दिल्याचे सांगितले. इतका मोठा निधी नसल्यामुळे हे काम करण्यात अडचण असल्याचे सांगितल्यानंतर या रस्त्यांचा सर्व्हे करून शासनाकडे निधी मागणी करण्याचा ठराव करण्यात आला.

सभेच्या पहिल्या सत्रात रस्त्यांबरोबरच जलसंधारणाची कामे, शाळांच्या दप्तरांची दुरवस्था व जिल्हा बँकेत अडकलेल्या पैशांबाबत सदस्यांनी चर्चा करुन ते सोडवण्यासाठी ठराव करून मंजुरी दिली. या सभेत उपाध्यक्ष नयना गावित, सभापती सुनीता चारोस्कर, अपर्णा खोसकर, मनीषा पवार, यतींद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपकुमार मीना यांसह विविध विभागाचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना धरले धारेवर

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर झालेल्या चर्चेत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. पदाधिकारी व सदस्यांमध्येही खडाजंगी झाली. कृषी कर्मचाऱ्यांच्या बदलीवरून सभेत जोरदार चर्चा झाली. कृषी विभागाच्या एका कर्मचाऱ्याच्या बदलीवरुन कामात येणाऱ्या अडचणी यावेळी मांडण्यात आल्या. प्रशासनातर्फे बदली योग्य कारणाने केल्याचे सांगितले. या चर्चेत भाजपचे गटनेते डॉ. आत्मराम कुंभार्डे व उपाध्यक्ष नयना गावित यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सदस्यांच्या अधिकारांचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.

घोटी ग्रामपंचायत झालेल्या घोटाळ्याबाबत कारवाई करण्यात दिरंगाई केली जात असल्याच्या मुद्यावरून जोरदार चर्चा झडली. चौकशी होऊनही कारवाई केली जात नसल्याचे सांगितल्यानंतर त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी १५ दिवसांत संबंधित सरपंच, ग्रामसेवक व विस्तार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा बँकेवर गुन्हा दाखल करा

जिल्हा बँकेत जिल्हा परिषदेचे वर्षभरापासून १२२ कोटी रुपये अडकले असून, ते लवकर मिळावेत यासाठी या सभेत चर्चा करण्यात आली. हे पैसे अडकल्यामुळे जिल्हा परिषदेची कामे रखडली असून, त्यासाठी नूतन अध्यक्षांचे स्वागत करून तेथे ठिय्या मांडण्याची सूचना यावेळी सदस्यांनी केली. त्याचप्रमाणे सहकार विभागाला पत्र द्या, असे यावेळी सांगण्यात आले. पण, यातूनही पैसे जर मिळत नसतील, तर गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील शाळेच्या दाखल्यांची पुस्तके जीर्ण झाली आहेत. हे पुस्तक काही शाळांमध्ये मोडी लिपीत आहे. त्यामुळे ते मराठी करून कॉम्प्युटराइज्ड करा, असा ठराव यावेळी करण्यात आला.

मराठीत बोला

जिल्हा परिषदेच्या सभेत ग्रामीण भागातून आलेले सर्व सदस्य आपल्या समस्या मराठीतच मांडतात. पण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी उदय जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर हिंदीतून दिले. त्यानंतर जाधव हेसुद्धा चर्चेला उत्तर देताना हिंदीतून बोलू लागल्यानंतर एका महिला सदस्यांनी त्यांना मराठीत बोलण्यास सांगितले. त्यानंतर मीना यांनीसुद्धा मराठीतच संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बुद्धविहाराच्या विश्वस्तांमध्ये कलगीतुरा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड येथील देवी चौकातील बुद्धविहाराच्या ट्रस्टींच्या कामकाजावर मनमानी आणि भ्रष्टाचाराचे केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा खुलासा या विहाराच्या ट्रस्टचे अध्यक्ष भास्कर कटारे आणि सरचिटणीस प्रमोद पाटील यांनी केला आहे. काही ट्रस्टींकडूनच ट्रस्टच्या कामकाजाबाबत नागरिकांना खोटी माहिती देऊन गैरसमज पसरविले जात असल्याचा आरोपही विद्यमान ट्रस्टींनी केला आहे.

या ऐतिहासिक विहाराच्या पावित्र्याला विद्यमान ट्रस्टींच्या या खुलाशामुळे धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बुद्धविहारात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते सुरू झालेले दीनबंधू वाचनालयदेखील आहे. या बुद्धविहाराच्या वास्तूसाठी राज्य सरकारनेही काही निधी मंजूर केला असून, काम सुरू आहे. मात्र, या विहाराच्या विद्यमान ट्रस्टींकडून मनमानी कारभारासह भ्रष्टाचार केला गेल्याचा जाहीर आरोप प्रकाश बागुल यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच स्थापन झालेल्या नाशिकरोड बुद्धविहार बचाव कृती समितीने नुकत्याच झालेल्या सभेत केला. विद्यमान ट्रस्टी सामाजिक व धार्मिक कार्यासाठी विहाराच्या वापरास मनाई करीत असल्याचाही आरोप या सभेत झाला. याशिवाय भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांना या विहाराच्या ट्रस्टवर सभासदत्व देण्यासही विद्यमान ट्रस्टी मनाई करीत असल्याचा आरोप भारतीय बौद्ध महासभेचे चारुदास भालेराव यांनी केला होता. याशिवाय या विहारातील वाचनालयातील पुस्तके आणि मुख्य मूर्तीसह काही ऐतिहासिक वस्तूही गायब झाल्याचा आरोप या सभेत झाला होता. सभेत ऐनवेळी दोन गट पडल्याने वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर या विहाराच्या विद्यमान ट्रस्टींकडून या आरोपांचे खंडन करण्यात आले असून, विद्यमान ट्रस्टी विलास गांगुर्डे यांच्याकडूनच ट्रस्टच्या कामकाजाबाबत खोटी माहिती नागरिकांना दिली जात असल्याचा खुलासा ट्रस्टचे अध्यक्ष भास्कर कटारे यांनी केला आहे.

बचाव समितीकडे लक्ष

ट्रस्टवरील आरोपांत तथ्य नसल्याचा खुलासा विद्यमान ट्रस्टींनी केला आहे. भारतीय बौद्ध महासभेला विहारात कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली असल्याचा खुलासाही ट्रस्टींनी केला आहे. ट्रस्टच्या कामकाजाचे प्रत्येक वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असल्याने या ट्रस्टच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झालेला नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता बचाव समितीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक अध्यक्षपदाचा आज फैसला

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक होत असून सद्यःस्थितीत अध्यक्षपदासाठी भाजपच्याच इच्छुकांध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचे पारडे जड दिसत असले तरी, संदीप गुळवेंचे नावही पुढे आले आहे. सोबतच माजी अध्यक्ष परवेझ कोकणी आणि केदा आहेर यांनीही या पदावर दावा केला आहे. बँक सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संचालकाच्या पारड्यात पालकमंत्री व मुख्यमंत्र्याकडून ऐनवेळी वजन टाकले जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात निवडणूक होत आहे.

जिल्हा निबंधक नीलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असली तरी अध्यक्षपदाच्या नावाचा फैसला मात्र अद्याप झालेला नाही. जिल्हा बँकेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार हे निश्चित आहे. बँकेत सध्या १९ संचालक असून, बहुमतासाठी १० संचालकांची गरज आहे. त्यासाठी माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी अध्यक्ष परवेझ कोकणी, केदा आहेर या तिघांची नावे सध्या चर्चेत आहेत. कोकाटे आणि कोकणी यांच्यात शक्त‌िप्रदर्शनही सुरू असून, शुक्रवारपर्यंत कोकाटे गटाकडे दहापेक्षा जास्त संचालकांचा गट आहे. कोकणींकडेही पाच ते सहा संचालकांचा गट आहे. शुक्रवारी रात्री या दोन्ही गटांनी शहरातील दोन वेगवेगळ्या हॉटेल्सवर ठाण मांडून आपली चाचपणी केली.

अध्यक्षपदाचा अंतिम उमेदवार मुख्यमंत्री व पालकमंत्री सहमतीने ठरवणार आहेत. सध्या बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने अध्यक्ष अभ्यासू व बँकेला आर्थिक गर्तेतून बाहेर काढणारा असावा, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. परंतु, स्पर्धेत असलेल्या सर्वांवर बँक बुडवण्याचे ठपके आहेत. त्यामुळे नावावर शिक्कामोर्तब करताना पक्षश्रेष्ठींचीही कसोटी लागली आहे. सद्यःस्थितीत माणिकराव कोकाटे यांचे पारडे अध्यक्षपदासाठी जड असल्याचे बोलले जात आहे. कोकणी यांनीही आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदाचा फैसला सभागृहातच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द वापरल्यास अध्यक्षपद हे बिनविरोध होण्याची शक्यता असून, त्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने अध्यक्षीय निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

नाव बदलण्याची परंपरा

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असून कोकाटे, आहेर, कोकणी, यांची नावे आघाडीवर आहेत. परंतु, जिल्हा बँकेच्या इतिहासात निवडणुकीच्या वेळी पायऱ्या चढताना उमेदवार बदलण्याची परंपरा आहे. त्यामुळे ही परंपरा यावेळीही खंड‌ित होण्याची शक्यता आहे. या त‌िघांच्या नावावर एकमत झाले नाही तर संदीप गुळवेंचे नवीन नाव अध्यक्षपदासाठी ऐनवेळी पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनीही तोंडावर बोट ठेवले आहे. पालकमंत्री शनिवारी नाशिकमध्ये असून, त्यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायलींप्रश्नी दबावतंत्र

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी विकासकामांच्या फायली मंजुरीसाठी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आता लेखाधिकारी व लेखापरीक्षक विभागावर दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. लेखा व वित्त विभागाकडून काही विकासकामांच्या फायलींना ब्रेक लावला जात असल्याने महापालिकेतील संतप्त पदाधिकाऱ्यांनी लेखाधिकारी, तसेच लेखापरीक्षकांवर राग काढला. अतिरिक्त आयुक्तांसमोरच हे दबावनाट्य सुरू होते. आयुक्तांच्या मंजुरीनंतरही तुम्ही फाइल का अडविता, असा सवाल करीत दोघांना धारेवर धरल्याची चर्चा शुक्रवारी महापालिका वर्तुळात होती.

मार्चअखेर जवळ आल्याने आयुक्त अभिषेक कृष्णा यांनीच अनावश्यक फाइल मंजूर न करण्याचे, तसेच प्राधान्यक्रमानेच फाइल मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले होते. त्यानुसार लेखा विभाग काम करीत आहे. परंतु, यामुळे सत्ताधारी मात्र वैतागले असून, त्यांचा संताप शुक्रवारी पाहायला मिळाला.

शुक्रवारी दुपारी स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील आणि उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आपल्या लवाजम्यासह वित्त विभागात मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांचे कार्यालय गाठले. मात्र, भोर हजर नसल्याने या पदाधिकाऱ्यांनी थेट अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डेंचे कार्यालय गाठले. त्या ठिकाणी लेखाधिकारी व मुख्य लेखापरीक्षकांवर आपला संताप काढला. पदाधिकारी सांगूनही तुम्ही फाइल मंजूर का करीत नाहीत, आयुक्तांनी फाइल मंजूर केल्यानंतर त्यावर नकारात्मक शेरा देण्याचे कारणच काय, अशी विचारणा पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर लेखाधिकाऱ्यांनी निधीच शिल्लक नसल्याने खर्चाची वजावट कशातून आणि कशी करायचा, असा प्रतिप्रश्‍न केल्याने पदाधिकाऱ्यांचा पारा अधिकच चढला. त्यावर बोर्डे यांनी हस्तक्षेप करून आयुक्तांकडे याबाबत बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, पदाधिकारी ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने संतापातच त्यांनी कार्यालय सोडले. त्यामुळे फाइल मंजुरीवरून महापालिकेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये नवा वाद सुरू झाला आहे.

या दबावनाट्यामुळे आता आगामी काही दिवस चांगलाच कलगीतुरा रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याप्रश्नी लोकप्रतिनिधी अन् अधिकारी नेहमीप्रमाणे आमने-सामने आल्याने पदाधिकारी विरुद्ध प्रशासन असा सामना रंगतो की काय, अशी चर्चा महापालिकेत सुरू झाली आहे. मात्र, काहीही झाले तरी याप्रश्नी तातडीने योग्य तो निर्णय घेतला जाणेदेखील गरजेचे बनले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून आता याप्रश्नी नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

--

निधीचा अभाव कारणीभूत

सध्याच्या स्थायी समितीचा कार्यकाळ फेब्रुवारीअखेरीस संपत असल्याने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मंजूर कामांच्या फायली मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, निधीअभावी लेखा विभाग, तसेच लेखापरीक्षकांकडून या फायलींवर प्रतिकूल शेरे मारले जात आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांच्या फायली लेखा विभागातच पडून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभमची आत्महत्या मित्रांच्या छळामुळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मित्रांनी केलेल्या छळामुळेच इंजिनीअरिंग शाखेचा विद्यार्थी शुभम सुभाष पाटील (वय २०, रा. पुरी, ता. रावेर, जि. जळगाव) याने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार आडगाव पोलिसांनी त्याच्या चार रूममेटविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. शुभम के. के. वाघ कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता.

अक्षय तुकाराम अंबारे, क्षितिज लक्ष्मण कलाल, नेताजी गोरकनाथ आटोडे आणि कल्पेश रामचंद्र चौधरी (रा. सर्व बळीरामनगर, धात्रक फाटा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. दीड वर्षापासून हे विद्यार्थी शुभमसोबत एकत्र राहत होते. आत्महत्येपूर्वी शुभमने चिठ्ठी लिहून ठेवली होती. सोबतचे मित्र मद्य घेतात, इतर व्यसने करतात. ते आपल्यालाही यासाठी प्रोत्साहित करीत होते. मी त्यांना नकार दिल्यानंतर त्यांनी आपल्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे शुभमने चिठ्ठीत नमूद केले होते. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. शुभमची चिठ्ठी आणि तपासात समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे चार संशयित विद्यार्थ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले चार विद्यार्थी दुसऱ्या फॅकल्टीमध्ये शिक्षण घेतात. त्यामुळे हा टिपिकल रॅगिंगचा प्रकार म्हणता येणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखडलेल्या कामांना चालना

0
0

लोगो- मटा फोकस

भगूर नगरपालिका

--

वर्षभरापूर्वी निवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या जिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये विकासाचा वारू किंचितसा हलला आहे. विकासकामांची चुणूक दिसत असली, तरी त्यांनी अद्यापपावेतो गती पकडलेली नाही. मूलभूत प्रश्नांची सत्ताधारी सोडवणूक करू शकले नसल्याचेही वास्तव समोर येत आहे. काही नगरपालिकांमध्ये शहराऐवजी सत्ताधाऱ्यांचाच कायापालट होत आहे, तर काही ठिकाणी विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करीत ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’चा प्रत्यय आणून दिला आहे. पूर्वीच्या रस्त्यांवर पुन्हा लाखोंची उधळपट्टी करून ‘पहिले पाढे पंचावन्न’ हा जुनाच खेळही खेळला जात आहे. या नगरपालिकांमध्ये नेमकी काय स्थिती आहे याचा आजपासून घेत असलेला आढावा...

--

संकलन ः प्रशांत धिवंदे

--

रखडलेल्या कामांना चालना

--

शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या व स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर नगरपालिकेने गत वर्षभरात कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. सक्षम नेतृत्वामुळे निधी उपलब्ध होत असला, तरी काही भागाकडे नगरसेवकांचे होणारे दुर्लक्ष भगूरकरांच्या नजरेतून सुटलेले नाही.

--

पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी

गतवर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीपूर्वी अडीच वर्षे शिवसेनेचीच सत्ता होती. मात्र, राज्यात आघाडीचे सरकार असल्याने अनेक विकासकामे प्रलंबित होती. त्यादरम्यानदेखील पाण्याचे नियोजन करीत नागरिकांचा मुख्य पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला. राज्यात झालेला बदल व भगूरकरांनी शिवसेनेला एकहाती दिलेली सत्ता यामुळे वर्षभरात नगरपालिकेचे नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ भगूरकरांना देण्यासाठी पाठपुरावा करीत प्रश्न मार्गी लावण्यास प्रारंभ केला आहे.

--

भूमिगत वीजतारा, रस्ते ‘मार्गी’

धोकादायक वीजतारांमुळे अनेक वेळा जीवित व वित्तहानी होत असते, या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी भगूर नगरपालिकेने वीजतारा भूमिगत करण्याबाबतचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, गावाच्या सौंदर्याला बाधक ठरणाऱ्या या वीजतारांच्या कामासाठी सुमारे २३ लाख रुपयांचा पहिल्या टप्प्यातील निधी उपलब्ध करून शहरातील पथदीपांच्या वीजतारा भूमिगत केल्या आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्यांसह अंतर्गत सर्व रस्तेही काँक्रिटीकरणाने मजबूत झाले आहेत. देवळाली कॅम्पकडून येणारा मेनरोड, विजयनगरकडून येणारा समतावाडी रस्ता, पांढुर्लीकडून येणारा आठवडेबाजार रस्ता यांचे काँक्रिटीकरण आधीच पूर्ण झाले असून, भगूर शहराच्या बाजारपेठेला पंचक्रोशीतील गावांशी जोडणारा लहवित रस्ता अनेक वर्षांपासून तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित होता. आता १ कोटी ८४ लाखांचे काम सुरू झाल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे.

--

शहराच्या सौंदर्यीकरणावर भर

शहरातील सर्व पथदीपांच्या वीजतारा भूमिगत करण्यात आल्या असून, रेल्वे गेटजवळील शहर प्रवेशद्वार, समतावाडी, हाडकी परिसर, गायकवाड गल्ली, करंजकर गल्ली या मुख्य चौकांत हायमास्ट बसविण्यात आले आहेत. जुने पथदीप काढून नवीन ७० लाख रुपये खर्चाचे पथदीप उभारत त्यावर एलईडी लावण्याचे काम प्रगतिपथावर आहे. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी मुख्य नाले आणि गटारी बंदिस्त करण्यात येत आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ७ कोटी रुपये खर्चाच्या सावरकर उद्यान व म्युझियमचे काम आता १३ कोटी रुपयांवर पोहोचले असून, सरकारकडून त्यासाठी वेळोवेळी नियमानुसार निधी उपलब्ध होत आहे.

--

ग्रामीण रुग्णालयास चालना

सरकारच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय उभारणी कामाला आरोग्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यासाठी नगरपालिकेने जागा आरक्षित केली असून, लवकरच या आरोग्य केंद्राच्या कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ रेल्वेकडून मोरीचे काम मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी लागणारी संपूर्ण रक्कम रेल्वेकडे वर्ग करण्यात आली असून, आगामी सहा महिन्यांत हे काम पूर्णत्वास जाणार आहे. शहरासाठी नव्याने शहर विकास आराखडा मंजूर करताना खासदार निधीतून वेळोवेळी १ कोटी ३५ लाख रुपयांच्या खर्चाच्या स्मशानभूमीच्या विकासाला चालना मिळाली आहे. दारणा नदीकिनारी नगरपालिकेने १२ कोटी रुपयांचा घाट सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर केला आहे. नगरपालिकेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशस्त अभ्यासिकेचे कामदेखील पूर्ण झाले आहे.

--

सरकारी योजनांसाठी पाठपुरावा

सरकारची रमाई आवास योजना शहरात प्रभावीपणे राबवीत ६० लाभार्थींना, तर इंदिरा विकास योजनेंतर्गत १५ लाभार्थींना वर्षभरावर त्यासाठी नियमानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय ज्या आर्थिक दुर्बल घटकातील रहिवाशांना आपल्या हक्काचे घर उभारण्याकरिता अथवा जुने घर सुधारणेकामी रक्कम हवी असेल त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. या निधीमध्ये केंद्र सरकारकडून १.५ लाख, तर राज्य सरकारकडून १ लाख असा निधी मिळविता येणार आहे.

--

कचऱ्याचे व्यवस्थापन

शहरातील दैनंदिन कचऱ्याची स्थिती गंभीर असल्याने त्यावर मात करण्यासाठी नगरपालिकेने पूर्वीच्या बंद पडलेल्या गांडूळ खत प्रकल्पाच्या जागी सेंद्रिय खतनिर्मिती सुरू केली आहे. यामधून आता खतनिर्मितीस प्रारंभ करण्यात आला आहे. शहरातील घनकचऱ्याच्या समस्यांच्या अभ्यासानंतर सरसकट कचरा नव्हे, तर ओला आणि सुका कचरा एकत्र असणे ही खरी समस्या असल्याचे लक्षात आले. कचऱ्याचे विलगीकरण केल्यास त्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती करून नगरपालिकेस उत्पन्न मिळविण्याचे साधन उपलब्ध झाले आहे. वॉर्डांमध्ये जागेवर ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक, काच व धातू अशा चार प्रकारांमध्ये विलगीकरण करण्याचे ध्येय आरोग्य विभागामार्फत ठेवण्यात आले आहे. घरातूनच कचऱ्याचे विलगीकरण होण्यासाठी नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

--

आरोग्याच्या समस्येसाठी अॅप

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नोंदणी करून सहभागी होत नागरिकांसाठी नगरविकास विभागाच्या निर्देशानुसार स्वच्छता अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. नगरपालिका हद्दीतील आरोग्य विभागाशी संबंधित समस्यांचे या अॅपमार्फत निराकरण करण्यात येत आहे. नगरपालिका परिसरात राहत असणाऱ्या नागरिकांमार्फत त्या-त्या भागातील आरोग्य विभागाशीसंदर्भात कोणतीही तक्रार थेट दाखल केल्यास त्याद्वारे नियोजित वेळेत तेथे आरोग्य कर्मचारी पोहोचून त्या समस्येचे निराकरण करीत असल्यामुळे भगूरमध्ये खऱ्या अर्थाने नांदणार स्वच्छता असून, नागरिकांसाठी हा उपयुक्त पर्याय उपलब्ध झाला आहे.

--

पुरेशा मनुष्यबळाची निकड

काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेअंतर्गत झालेल्या बदल्यांमुळे अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात काही अधिकारी दोन-दोन नगरपालिकांचा कारभार सांभाळत आहेत. नगरपालिकेकडे प्रशासकीय मनुष्यबळ कमी झाले असून, अनेक रखडलेल्या प्रकल्पांचे कामकाज स्थिर गतीने सुरू आहे. मात्र, तरीही तेवढ्याच प्रभावीपणे शहरातील कामे मार्गी लागत आहेत. त्यात आणखी गतिमानता येण्यासाठी सरकारने भगूर नगरपालिकेला मंजूर असलेल्या प्रशासकीय रिक्त पदांवर मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास सोयीचे ठरणार आहे.

--

नगराध्यक्षा म्हणतात...

--

शहर कायापालटास प्राधान्य

नगरपालिकेत यापूर्वीही अडीच वर्षे शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली शहराचा झालेला विकास नागरिक पाहत आहेत. सन २०११ मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी सर्व विरोधकांनी एकत्र येत नऊ-आठ असे सत्तापरिवर्तन केले होते. त्यादरम्यान एकही नागरी विकासाचे काम संपूर्णपणे मार्गी लागले नाही. शिवसेनेने अडीच वर्षांत सत्ता पुन्हा हातात घेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढला. आता पुन्हा त्याच विश्वासाने वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत भगूरकरांनी भरघोस मतांनी शिवसेनेला सत्ता दिली असून, त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता सत्ता असेपर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून रखडलेली सर्वच विकासकामे मार्गी लावून शहराचा कायापालट करण्यास प्राधान्य देणार आहे.

-अनिता करंजकर, नगराध्यक्षा

--

नगरसेवक म्हणतात...

--

विकासकामांसाठी प्रयत्नशील

भगूर शहराच्या विकासासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून परिवर्तन घडविले आहे. गेल्या वीस वर्षांत नागरिकांनी शहराचा झालेला विकास पाहिला आहे. त्यामुळे विरोधक काय म्हणण्यात यापेक्षा विकासकामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो.

-विजय करंजकर, नगरसेवक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख

--

विरोधक म्हणतात...

--

वस्तुस्थिती लपविली जातेय

भगूरकरांनी मोठ्या विश्वासाने शिवसेनेच्या हाती सत्ता दिली. केंद्र व राज्यातील सरकारची साथ असतानाही भगूर शहरातील कामांना वेग मिळत नाही. नगरसेवक व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्या रस्त्यांचे पूर्वी काँक्रिटीकरण झालेले आहे त्याच रस्त्यांवर पुन्हा लाखोंचा निधी खर्च केला जात आहे. आरोग्य केंद्र, रेल्वे बोगदा व सावरकर उद्यान यांची कामे सहा ते आठ महिन्यांत मार्गी लावण्याचा शब्द निवडणूक काळात दिला होता. मात्र, यातील एकही समस्या अद्यापही मार्गी लावण्यात आलेली नाही. शहरातील आरोग्य केंद्रासह वैद्यकीय महाविद्यालयाचे दाखविलेले स्वप्न हे स्वप्नच ठरते की काय, असे वाटते. विकासाच्या नावाखाली नगरपालिकेची खरी स्थिती लपविली जात आहे.

-प्रेरणा बलकवडे, महिला जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी

--

नागरिक म्हणतात...

--

आता मुख्य प्रश्न सोडवावेत

शहरातील रस्त्यांच्या व गटारींच्या सुविधेपाठोपाठ आता प्रत्यक्ष दवाखाना, मार्केट यांसारख्या मुख्य प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील रोजगारवाढीस चालना मिळेल.

-प्रवीण वाघ, स्थानिक रहिवासी

--

एलईडी पथदीप बसवावेत

भगूर परिसरात बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी नियोजन केले जावे. काही भागात अद्यापही एलईडी पथदीप लागलेले नाहीत, ही समस्या मार्गी लावाण्यात यावी.

-सुजाता शिरसाठ, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images