Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वर्षभरात केवळ सव्वा कोटी खर्च

$
0
0

३८३ कोटी जमा; नियोजनशून्य कारभाराचा प्रत्यय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कंपनीच्या तिजोरीत केंद्र व राज्य आणि महापालिकेचा ३८३ कोटींचा निधी जमा आहे. त्यात केंद्राकडून १९० कोटी तर राज्य सरकारकडून ९३ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. तर महापालिकेनेदेखील १०० कोटी रुपयांचा हिस्सा जमा केला तरी, स्मार्ट तिजोरीत तब्बल ३८३ कोटी पैकी सव्वा कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. त्यामुळे कंपनीची अवस्था ही ‘आमदनी रुपया आणि खर्चा पाच पैसे’अशी झाली आहे.

कंपनीच्या स्थापनेला वर्ष लोटले तरी, संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेपलिकडे स्मार्ट सिटीचा गाडा पुढे सरकू शकला नसल्याचे चित्र आहे. नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २८) पार पडली. यानंतर पत्रकारांशी बोलताना कुंटे यांनी विविध कामांची माहिती दिली. बैठकीत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाकरीता जेमतेम १९ कोटी ७१ लाख रुपये खर्चाच्या बजेटला मान्यता देण्यात आली. सव्वा वर्षांत केवळ १ कोटी २४ लाख रुपये खर्च झाल्याची माहितीही त्यांनी दिली.आतापर्यंत महाकवी कालिदास कलामंदिराच्या पुनर्विकासासाठी ८६ लाख ७० हजार खर्च झाला आहे. महात्मा फुले कलादालनाच्या पुनर्विकासासाठी ३ कोटी २३ लाख तरतूद असून, त्यापैकी ३ लाख २० हजार, नेहरू उद्यानाचे पुनर्विकासासाठी एक लाख २० हजारांचा खर्च झाला आहे. महसुली खर्चापैकी जाहिरात खर्चासाठी २३ लाख ५५ हजारांच्या तरतूदीपैकी १३ लाख ५५ हजार, व्यावसायिक फीकरीता ३ लाख १० हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.

गावठाण पुनर्विकास कागदावरच

स्मार्ट सिटी अंतर्गत गावठाण पुनर्विकासाची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली होती. त्यात गावठाण भागात ४ एफएसआय देण्याची तरतूद केली होती. या योजनेत जुन्या नाशिकचा भाग हा स्मार्ट होणार होता. परंतु, या गावठाण पुनर्विकासाला अद्यापही सरकारने मंजुरी दिलेली नसून, हा प्रकल्प कागदावरच आहे. गावठाण भागात ४ एफएसआयची तरतूद नसल्याने सरकारकडून त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे गावठाण प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विशेष मोहिमेचा मिळाला ‘आधार’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आधारकार्ड काढूनही ते रिजेक्ट झालेल्या नागरिकांसाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासून आधारसंबंधित समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी पाच ठिकाणी युनिट लावले होते. या युनिटमध्ये लहान मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येकी एक युनिट स्वतंत्र लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे नवीन आधार कार्डसाठी दोन युनिट होते.

‘आधार’बाबतच्या समस्या थेट प्रशासनातील अधिकाऱ्यांपुढे मांडता याव्यात, यासाठी महाराष्ट्र टाइम्सने गेल्या आठवड्यात ‘मटा संवाद’ उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आधार कार्डशी संबंधित अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थ‌ित केले होते. त्यामध्ये वारंवार रजिस्ट्रेशन करूनही कार्ड मिळत नसल्याचा मुद्दाही पुढे आला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आधार कार्ड रिजेक्ट होत असलेल्या नागरिकांसाठीच ही मोहीम ठेवली होती. त्यात गुरूवारी तब्बल २१९ नागरिकांनी सहभाग घेतला. यातील बहुतांश लोकांनी आपले आधार कार्ड अपडेट करुन घेतले.

नियोजन भवनात मागदर्शन

जिल्हा प्रशासनाने नियोजन भवनामध्ये आधार कार्डसंबंधी नागरिकांचे प्रश्न समजून घेत त्यांना मार्गदर्शन करण्यात येत होते. अनेकदा आधार कार्डसाठी नोंदणी करूनही बऱ्याच नागरिकांचे कार्ड मिळालेले नसल्याच्या तक्रारी येथे मोठ्या प्रमाणात होत्या. आधारशिवाय अशा नागरिकांची अनेक कामे खोळंबल्याच्या तक्रारी अनेकजणांनी मांडल्या. त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांची नोंद करण्यात येत होती. त्यानंतर जे प्रश्न तातडीने सुटणार आहेत, त्याची माहिती दिली जात होती. जे प्रश्न यूआयडीशी संबंधित आहेत, त्याचा एकत्र डेटा तयार करून तो पाठवला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यासाठी तक्रारदाराला मेसेज व फोन करण्याचे आश्वासनही देण्यात आल्यामुळे अनेकांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले.

युनिटनिहाय लाभ घेतलेल्यांची संख्या

१- लहान मुले - ३८

२- विद्यार्थी - ६१

३- ज्येष्ठ नागरिक - २२

४- नवीन आधारकार्ड - ४२

५- नवीन आधारकार्ड - ५६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षांवर भरदिवसा कुऱ्हाड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील प्रभाग क्रमांक २८ मधील शिवगंगा सोसायटी परिसरात गुरुवारी भरदुपारी चार वृक्षांवर विनापरवानगी कुऱ्हाड चालविण्याचा प्रकार घडला. येथे सुरू असलेली वृक्षतोड नागरिकांच्या सतर्कतेने थांबविण्यात आली. मात्र, तोपर्यंत चार वृक्ष तोडण्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. वेळीच हस्तक्षेप केला नसता, तर आणखी वृक्षांवर कुऱ्हाड चालविली गेली असती, असा आरोपही रहिवाशांनी केला.

सिडको परिसरातील उद्यान विभागात अनागोंदी सुरू असून, अनेकदा तक्रारी करूनही साध्या फांद्यासुद्धा तोडण्यात येत नाहीत. मात्र, गुरुवारी शुभम पार्क परिसरातील चर्चसमोर असलेल्या शिवगंगा सोसायटीतील वृक्षांची सर्रास तोड सुरू असल्याचे दुपारी नागरिकांच्या लक्षात आले. त्याला नागरिकांनी विरोधही दर्शविला. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याकडे लक्ष न दिल्याने अखेरीस मनसे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष संदेश जगताप यांनी थेट विभागीय अधिकाऱ्यांकडेच याबाबत तक्रार केली. कारण नसतानाही येथे वृक्ष तोडण्यात आल्याने संबंधित ठेकेदारासह स्थानिक लोकप्रतिनिधींवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केली. विभागीय अधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.

खुल्या जागेत असलेल्या या झाडांची तोड का करण्यात आली, असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे जीवन नागरी आणि पर्यावरण संस्था यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष अक्षय परदेशी यांनी विभागीय अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने झाडे तोडण्याचे आदेश दिले होते का, संबंधित झाडे तोडणारे कर्मचारी कोण होते, ही बाब उघडकीस आणून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


तक्रारींकडे मात्र कानाडोळा

एकीकडे वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना अशा पद्धतीने विनापरवानगी वृक्षतोड कोणाच्या आदेशावरून करण्यात आली किंवा का करण्यात आली, याची माहिती उघड करावी, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे. सिडकोतील अनेक रस्त्यांवर वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली अाहे. मात्र, तक्रारी करूनही त्यांची छाटणी करण्याऐवजी थेट झाडांची कत्तल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

--

याप्रश्नी सखोल चौकशी करून ठेकेदारासह दोषी असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींवरही कारवाई करण्यात यावी.

- संदेश जगताप, विभाग अध्यक्ष, मनविसे

--

अनावश्यक फांद्या तोडण्याबाबत तक्रारी करूनही उपाय होत नाहीत. मात्र, येथे कारण नसताना झालेली वृक्षतोड धक्कादायकच आहे.

- नितीन पाटील, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महारेरा’साठी ‘मटा’चे व्यासपीठ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता निर्माण होण्यासाठी केंद्र सरकारच्या रेरा कायद्याची दखल घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र स्तरावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) स्थापन केले आहे. मात्र, यासंदर्भात अनेक समज-गैरसमज असून याविषयीच्या शंका निकाली काढायच्या कशा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचीच दखल घेत ‘मटा’ने ‘महारेरा-शंका समाधान’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे.

राज्य सरकारने एक मे २०१७ पासून महारेरा कायदा लागू केला आहे. त्यास सहा-सात महिनेच झाले आहेत. त्यामुळे या कायद्याचा अभ्यास, त्याची माहिती, तरतुदी आणि अन्य बाबीही सर्वसामान्यांना फारशा माहीत नाहीत. सर्वसाधारणपणे प्रचलित नियमांची माहिती अनेकांना असते. पण, महारेरा कायद्यान्वये ती बरोबर आहे की नाही, याची खात्री नसते. जुन्या इमारतींचा पुनर्विकास, आपण घेत असलेल्या घर किंवा फ्लॅटशी महारेराचा असलेला संबंध, निश्चित वेळेत न मिळणारा ताबा, पार्किंगसाठी घेतले जाणारे चार्जेस या आणि अन्य प्रश्नांनी सध्या अनेकांना घेरले आहे. यासंदर्भात योग्य ती माहिती कुठे आणि कशी मिळेल, याचीही चिंता काहींना सतावत आहे. हीच दखल घेत ‘मटा’ने एक उपक्रम सुरू केला आहे. ‘महारेरा-शंका समाधान’ या उपक्रमाद्वारे वाचकांना त्यांच्या शंका मांडण्यासाठी एक मंच उपलब्ध होणार आहे. वाचक त्यांचे प्रश्न, शंका लेखी किंवा ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ या अॅपद्वारे पाठवू शकतात. या प्रश्नांना या विषयातील ख्यातनाम तज्ज्ञ असलेले ‘मटा’चे महारेरा पॅनल उत्तर देणार आहे. हे प्रश्न आणि त्यासंबंधीची उत्तरे ही ‘मटा’मध्येच प्रसिद्ध केली जाणार आहेत.

या पत्त्यावर पाठवा

‘महारेरा-शंका समाधान’, महाराष्ट्र टाइम्स, तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड, नाशिक ४२२००५ किंवा ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ या अॅपद्वारेही पाठविता येईल. विषयामध्ये ‘महारेरा-शंका समाधान’ असा उल्लेख आवर्जून करावा. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप विनामूल्य उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूकबधिरही साकारणार पैठणी

$
0
0

नाशिक : पैठणीचे माहेरघर असलेले येवला आता मूकबधिरांनाही रोजगारासाठी माहेरघर ठरणार आहे. येवल्याच्या कापसे फाउंडेशनकडून सामाजिक बांधिलकी जपत मूकबधिरांसाठी रोजगार प्रकल्पाची निर्मिती केली जात असून, या अंतर्गत मूकबधिरांना रोजगार मिळणार आहे. सुमारे दहा एकर जागेवर हा प्रकल्प उभा करण्यात येत असून, येत्या सहा महिन्यांत मूकबधिरांना पैठणी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

बोलता व ऐकता येत नसल्याने मूकबधिर व्यक्तींना नोकरी देण्यास अनेक व्यावसायिक, उद्योजक तयार नसतात. यामुळे आधीच खडतर असलेले त्यांचे आयुष्य आणखी खडतर बनते. रोजगारासाठी गॅरेज, हॉटेलसारख्या ठिकाणी काम करण्याची वेळही त्यांच्यावर येते. अनेकदा त्यांना अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी कापसे फाउंडेशनकडून खास मूकबधिर व्यक्तींसाठी या प्रकल्पाद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वीसपेक्षा अधिक वयाची व्यक्ती रोजगार मिळवू शकणार आहे. या व्यक्तींना नोकरीबरोबरच त्यांची निवास व भोजनव्यवस्थाही कापसे फाउंडेशनकडून करण्यात येणार आहे. वडिलोपार्जित दहा एकर जागेवर या प्रकल्पासाठी कापसे उद्योगसमूहाकडून शंभर फ्लॅट्स बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. येथे त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. शिवाय याच भागात हातमागाची स्वतंत्र इमारत बांधण्यात येत असून, तेथे त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

‘पैठणी’साठी मिळणार प्रशिक्षण

मूकबधिरांना पहिल्या वर्षी पैठणी बनविण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. कापसे पैठणीत कार्यरत असणारे, तसेच कर्मचारी मूकबधिर व्यक्तींना मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण काळात त्यांना मानधन व त्यानंतर रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येकाला स्वतंत्र हातमागदेखील देण्यात येणार आहे.

गरजूंनाच प्राधान्य

गरजू व गरीब घरातील मूक बधिर व्यक्तींपर्यंत ही योजना पोहोचावी, यासाठी विविध मूकबधिर शाळांशी कापसे फाउंडेशनकडून संपर्क साधण्यात आला आहे. केवळ गरजूंनाच या प्रकल्पात प्राधान्य दिले जाणार असून, त्यासाठी ९५५२१३९९९९ या क्रमांकावर माहिती मिळू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रात १५ ठार

$
0
0

टीम मटा

उत्तर महाराष्ट्रासाठी गुरुवार ‘घात’वार ठरला असून, सहा वेगवेगळ्या अपघातांत १५ जण ठार, तर ३१ जण जखमी झाले. सटाणा-मालेगाव महामार्गावरील शेमळी गावात झालेल्या अपघातात सहा, नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद-आमोदे रस्त्यावर पाच, सिन्नर- बारागाव पिंप्रीजवळील कानडी मळ्याजवळ, तसेच भुसावळ येथे प्रत्येकी एक, तर नांदगाव- औरंगाबाद मार्गावरील पोखरी शिवारात दोन जण ठार झाले. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना या अपघातांनी उत्तर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

देवमामलेदार यात्रोत्सवावर शोककळा

सटाणा ः सटाणा- मालेगाव राज्य महामार्गावरील व शहरापासून चार किलोमीटरवरील शेमळी गावानजीक अवजड वाहनाने अॅपे रिक्षाला दिलेल्या धडकेत गुरुवारी सहा जण ठार झाले. अपघातात अॅपे रिक्षाचा चक्काचूर झाला असून रिक्षातील चालकासह सहाही प्रवासी जागीच ठार झाले. हे सहा प्रवासी सटाणा येथे सुरू असलेल्या देवमामलेदार यात्रोत्सवातील व्यावसायिक असून, त्यात मामा-भाच्याचा समावेश आहे. यातील चार व्यावसायिक परराज्यातील असून, दोन व्यावसायिक अंमळनेर व चोपडा येथील आहेत.

मुंबई येथून माल खरेदी करून लक्झरीने हे व्यावसायिक मालेगाव येथे गुरुवारी पहाटे उतरले. तेथून सटाण्याकडे येण्यासाठी त्यांनी संजय पंधाडे (रा. अयोध्यानगर, मालेगाव) यांच्या अॅपे रिक्षाने (एमएच ४१/ व्ही १५५९) भाड्याने केली. या रिक्षासोबत माल घेऊन येत असताना शेमळीजवळील सुकड पुलाजवळील वळणावर रिक्षाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात रिक्षाचा चक्काचूर होऊन रिक्षामधील सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला. यात अशोक शंकर देवरे (वय ५५, रा. पारोळा रोड, अंमळनेर, जि. जळगाव), अलीम शेख तायर (३४, मण्यार गल्ली, चोपडा, जि. जळगाव), राजेशकुमार शंकरदास गुप्ता (२८, करमपुरा, ता. तलझाडी, जि. साहेबगंज झारखंड), कैलास प्रसाद अर्जुन प्रसाद गुप्ता (२९, करमपुरा, ता. तलझाडी, जि. साहेबगंज, झारखंड), मोहम्मद लखन जल्लू (३५, करमपुरा, ता. तलझाडी, जि. साहेबगंज, झारखंड), रहेमतुल्लाभाई गोहरआशमी पानवाला (६८, इनामपूर, ता. कोठान, जि. झोनपूर, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.

पानाची लाली हरपली

देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव सुरू झाल्यावर यात्रेत हमखास दिसणारा लाल कपड्यांमधील बनारस पानवाला बाबा सटाण्यातील सर्वांना परिचित होता. यात्रेत प्रवेश केला, की ‘लेलो भाई लेलो, बनारसवाला पान लेलो, कल्लकत्ता लेलो, पान खाओ मिठा,’ असे ओरडून लक्ष वेधून घेणारा उत्तर प्रदेशातील रहेमतुल्लाभाई गोहरआशमी पानवाला बाबा सटाणा यात्रेतील एक ओळख होती. त्यांची आता केवळ आठवणच उरणार आहे.

बलक यांचा अपघाती मृत्यू

सिन्नर ः सिन्नर-बारागावपिंप्री रस्त्यावरील कानडी मळ्याजवळ गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बैलगाडी व मोटारसायकलदरम्यान झालेल्या अपघातात मोटारसायकलवर असलेले राजेंद्र दादा बलक (वय ४९) यांचा मृत्यू झाला. ते सगर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आहेत. बलक मोटारसायकलने आपल्या शेतावर जात होते. कानडी मळा परिसरात बलक यांच्या दुचाकीची पुढे जाणाऱ्या बैलगाडीला जोरदार धडक बसली. त्यात बलक गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बलक यांनी समता परिषदेचे पदाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे, तसेच शैक्षणिक, सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.

पोखरी शिवारात दोन ठार

मनमाड ः नांदगाव- औरंगाबाद मार्गावर पोखरी शिवारात ट्रकने मोटारसायकलला समोरून धडक दिल्याने गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे. नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर येथील तांड्यावरील अजय कांतीलाल जाधव (वय २२) व मन्साराम देवसिंग जाधव (३४) मोटारसायकलने नांदगाव येथे बाजारासाठी आले होते. बाजार आटोपून चिंचविहीरकडे ते परतत होते. मात्र, पोखरी शिवारात गागरे वस्तीनजीक वळणावर त्यांच्या मोटारसायकलला औरंगाबाद येथून नांदगावकडे येणाऱ्या ट्रकने (एमएच २०/ईजी ९०३३) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलवरील अजय व मन्साराम जाधव जागीच ठार झाले. ट्रकचालक रमेश काळूराम मरमट (रा. सिल्लोड) याला अटक केली आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पाच ठार

धुळे ः नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद-आमोदे रस्त्यावर मिनी ट्रक आणि अॅपे रिक्षाचा अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी म्हसावद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. तलावडी गावातील लोक भोंगऱ्या गावाला धार्मिक कार्यक्रमासाठी बुधवारी रात्री गेले होते. कार्यक्रम आटोपून गावाकडे परतत असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक सोंगा रायमल पावरा (वय ३२), गोरख इंदा पावरा (४०), गुलाब फकिरा पावरा (५५), शिकाऱ्या पाचा पावरा (७०), रोहिदास कमा पावरा (६५, सर्व रा. तलावडी) यांचा समावेश आहे. यात तेरा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अॅपे रिक्षात एकूण १८ प्रवासी होते. हे सर्व भोंगरा येथील इंदेल हा धार्मिक कार्यक्रम आटोपून गावाकडे परतत होते.

भुसावळला तरुण ठार

जळगाव : भुसावळ शहरातील खडका गावात गुरुवारी सकाळी भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला. कल्पेश दिलीप फिरके (वय २०, रा. किन्ही) असे दुचाकीस्वाराचे नाव असून, या प्रकरणी कालीपिली चालकास पोलिसांनी अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारूचा साठा पकडला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला विभागाच्या अधिकारी अन् कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू धंद्याविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेतंर्गत येथील पथकाने थर्टी फस्टच्या तोंडावरच अवैधरित्या देशी, विदेशी बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेत लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

३१ डिसेंबर अर्थातच थर्टी फस्टच्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्या होताना अनेक ठिकाणी चोरीछुप्या मार्गाने राज्य शासनाचा महसूल बुडवत लाखोंचा मद्यसाठा वापरला जात असल्याच्या आजवर नेहमीच झडणाऱ्या चर्चा. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवल्यातील पथकाने यंदा मात्र असे प्रकार घडू नयेत यासाठी करडी नजर ठेवली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येवला विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक सुजित कपाटे व जमादार रतवेकर, मेमनार, गरुड यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत अवैध दारुचा वाहतूक होणारा मोठा साठा पकडला.

लासलगाव-चांदवड रोडवरील भारत पेट्रोल पंपसमोर टाकळी शिवारात पिकऍप व्हॅन (एमएच१५, एफक्यू ०३२०) ताब्यात घेतली. यात विविध प्रकारचे मद्य पोलिस अधिकाऱ्यांनी जप्त केले. याप्रकरणी संशयित आरोपी दीपक पोतदार (वय २५,रा. औरंगाबाद नाका, नाशिक) व विशाल बाळू नेटावटे (वय २५,रा. पंचवटी, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन लाख ५७ हजार ८४० रुपयाची देशी व विदेशी बनावटीचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विवाहितेची आत्महत्या

येवला ः तालुक्यातील उंदिरवाडी येथे एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचा आपल्या राहत्या घरी छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. जया हरिभाऊ झाल्टे असे या विवाहितेचे नाव असून मंगळवारी सायंकाळी (दि. २६) साडेपाच वाजेच्या दरम्यान तिचा मृतदेह घराच्या पत्र्याच्या छताला साडीने गळफास घेतल्याचे अवस्थेत आढळला. तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खान्देशची संस्कृती अन् परंपरांचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खान्देश परिसरातील आदर्श व्यक्तिमत्व, साहित्य संपदा आणि खानपान संस्कृतीसह विविध परंपरांचे दमदार सादरीकरण करणाऱ्या खान्देश महोत्सवाचे उद्घाटन गुरूवारी करण्यात आले. या महोत्सवास खान्देश परिसराशी नाते असणाऱ्या भूमीपुत्रांसह नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आमदार सीमा हिरे यांच्या वतीने या चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन त्र्यंबक रस्त्यावरील ठक्कर डोम मैदानावर करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटनसत्रात व्यासपीठावर उपक्रमाच्या आयोजक आमदार सीमा हिरे यांसह आमदार देवयानी फरांदे, आमदार दीपिका चव्हाण, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, आमदार अनिल कदम, महापौर रंजना भानसी, साहित्यिक रामदास वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात प्रास्ताविक करताना आमदार सीमा हिरे म्हणाल्या, ‘प्रत्येक विभागाची अभिमानास्पद संस्कृती आणि परंपरा आहे. आपल्याकडे खान्देश परिसरातही अनेक पिढ्यांनी योगदान देत खान्देशची संस्कृती जतन केली आहे. मूळ खान्देशनिवासी असणाऱ्या मात्र शिक्षण किंवा रोजगाराच्या संधींसाठी नाशिक परिसरात स्थलांतर केलेल्या नवीन पिढ्यांची नाळ या संस्कृतीशी जोडलेली रहावी. या संस्कृतीमधील उज्ज्वल परंपरांचे दर्शन नव्या पिढीला घडावे. खान्देशाशी नाते सांगणाऱ्या माणसाच्या कलागुणांसह त्याच्या कौशल्यांना ताकदीचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, खान्देश महोत्सवाच्या निमित्ताने खान्देश भूमीशी नाते सांगणाऱ्या नागरिकांचे एकत्रिकरण झाले आहे. ही अतिशय चांगली संकल्पना असून, यामुळे संस्कृती टिकविण्यासह वैचारिक आदान प्रदानालाही चालना मिळेल. या परिसरात मूळ रहिवास असणारे बहुसंख्य नागरिक नाशिकच्या विकासातही योगदान देत आहेत. या महोत्सवासारखे उपक्रम नागरिकांचा उत्साह वाढवितात, असे त्या म्हणाल्या.

आमदार अनिल कदम म्हणाले, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन चांगल्या समाजनिर्मितीसाठी हिरे कुटूंब‌ियांचे योगदान मोठे आहे. या महोत्सवाच्या आयोजनाच्या निमित्ताने ही उज्ज्वल परंपरा त्यांच्या नवीन पिढीनेही सामाजिक जाणिवेने पुढे सुरू ठेवली, ही बाब स्वागतार्ह आहे. यावेळी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, प्रतीभा पवार, छाया देवांग, कावेरी घुगे, अश्विनी न्याहारकर, उत्तम दोंदे, संजय न्याहारकर, अविनाश पाटील, दिलीप पाटील, जगन पाटील, आदी उपस्थित होते.

शोभायात्रेने वेधले लक्ष

महोत्सव स्थळापासून सिडको परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अश्वारूढ युवकांसह नऊवारी परिधान केलेल्या महिला आणि युवती, विविध वाद्य परंपरांचा समन्वय, खान्देशच्या भूमीतील विविध व्यक्त‌िमत्वे आणि प्रतीकांच्या प्रतिमांनी सजलेले रथही या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेलाही बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. यामुळे या यात्रेनेही नाशिककरांचे लक्ष वेधले.

मंत्र्यांची महोत्सवाकडे पाठ

या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार होते. पण या मंत्र्यांनी महोत्सवाकडे पाठ फिरवली. प्रमुख पाहूणे म्हणून निमंत्रित मंत्र्यांमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री मदन येरवार यांनीही महोत्सवात उपस्थिती लावली नाही.

महोत्सवात आज

या महोत्सवात आज (दि. २९) सकाळी ११ वाजता भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता क्रांत‌िसूर्य मळेगांवकर पुणे यांच्या ‘न्यू होम मिन‌िस्टर, चला पैठणी जिंकू या’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्मार्ट’नाशिकला ‘आयटी’चे कोंदण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट नाशिकसाठी पथदर्शी ठरलेल्या स्मार्ट कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरसह माहिती तंत्रज्ञानाधारीत १२० कोटी रुपये खर्चाच्या 'स्मार्ट आयटीसी बॅकबोन फॉर स्मार्ट सिटी' प्रकल्पाला नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुरुवारी (दि. २८) मंजुरी देण्यात आली.

या प्रकल्पांतर्गत स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टिम, स्मार्ट किओस्क, सेन्सर, पब्लिक अॅड्रेस सिस्टिम, सेंसर आणि वायफाय सिटीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शहराची वाटचाल अधिकाधिक तंत्रज्ञानाच्या वापराकडे होणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियेचा कालावधी ९० दिवसांऐवजी ४५ दिवस करण्यात आला आहे. दरम्यान, या बैठकीत सनदी लेखापाल नियुक्तीसह बैठकीत जनसंपर्क अधिकारी, लघुलेखक यांच्यासह ८ तांत्रिक पदांनाही मंजुरी देण्यात आली.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी संचालक मंडळाची पाचवी बैठक पार पडली. बैठकीस महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, तज्ज्ञ संचालक तुषार पगार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल उपस्थित होते. या बैठकीत स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिक शहरात माहिती तंत्रज्ञानाधारित विविध प्रकल्पांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यासंदर्भात १२० कोटी रुपये खर्चाचा 'स्मार्ट आयसीटी बॅकबोन फॉर स्मार्ट सिटी' हा एकत्रित प्रकल्प तयार करण्यात आल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष कुंटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जानेवारीत मेगा प्रोजेक्ट

नववर्षापासून स्मार्ट सिटीतील महत्त्वपूर्ण कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती कुंटे यांनी दिली. येत्या सप्ताहात आयसीटी इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट पथदीप, स्मार्ट पार्किंग, पब्लिक सायकल शेअरिंग, प्रोजेक्ट गोदाअंतर्गत पायाभूत सुविधा व सुशोभीकरण या प्रकल्पांच्याही निविदा काढण्यात येणार आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीतील दृश्य स्वरूपातील कामे प्रत्यक्षात अवतरण्यास सुरुवात होणार आहे. बैठकीत सुरक्षित नाशिकचाही आढावा घेण्यात आला. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी त्यातील काही अडचणी सांगितल्या. स्मार्ट सिटीत ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण केले जाणार आहे. त्यात पोलिसांना स्वतंत्र नेटवर्क हवे असून, त्यासाठी राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळासोबत चर्चा केली जाणार आहे.


विविध पदांवर नियुक्त्या

स्मार्ट सिटी कंपनीच्या सनदी लेखापालपदी उल्हास बोरसे अ‍ॅण्ड कंपनी यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली.तसेच लेखापरीक्षकपदी 'साबद्रा अॅण्ड साबद्रा' कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.सोबतच जनसंपर्क अधिकारी, लघुलेखक यांच्यासह ८ तांत्रिक पदांनाही मंजुरी देण्यात आली.त्यामुळे स्मार्ट सिटीला नवीन जनसंपर्क अधिकारी मिळणार आहे.

या प्रकल्पांनी नाशिक होणार हायटेक...

पंचवटी विभागीय कार्यालयात स्मार्ट कमांड अॅण्ड कंट्रोल सिस्टिम

सिटिझन एक्स्पिरिअन्स सेंटर उभारणार

इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम

स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टिम

स्मार्ट किओस्क, सेन्सर

पब्लिक अॅड्रेस सिस्टिम

वायफाय सिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यामुळे अधिकारी ‘धारे’वर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर परिसरातील पाणीपुरवठा कायमच विस्कळीत होत असून, वारंवार तक्रार करूनही अधिकारी याकडे लक्षच देत नसल्याचा आरोप करीत पाण्याबरोबरच अतिक्रमणाच्या प्रश्नाकडेही अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

पूर्व प्रभाग समितीची तहकूब केलेली बैठक सभापती शाहीन मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नगरसेविका शोभा साबळे, आशा तडवी, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, नगरसेवक अनिल ताजनपुरे, सतीश सोनवणे, शाम बडोदे व अजिंक्य साने आदींसह अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला विविध विकासकामांच्या सुमारे ३३ लाखांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यानंतर नगरसेवक सतीश सोनवणे यांनी वडाळा गावातील अतिक्रमण काढले असले तरी शंभर फुटी रोडलगत असलेल्या पदपथावरही अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. हेच अतिक्रमण रस्त्यावरही येऊ लागल्याने हा रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत आहे. त्यामुळे या अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली. त्याचबरोबर नगरसेवक ताजनपुरे यांनी पाणी मीटर तपासणी करणाऱ्या खासगी संस्थेच्या कामाचा आढावा घेण्याबाबत सूचना केली. नगरसविका सुप्रिया खोडे यांनी वडाळा गावात अतिक्रमण मोहीम राबविण्यापूर्वी पाणी वाया जाणार नाही याची दक्षता का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी वाया जात असून, त्याची दुरुस्ती करण्याची सूचना केली. नगरसेवक अजिंक्य साने यांनी इंदिरानगर भागातील उद्यानांची दुरवस्था झालेली असून, तक्रार केल्यावर उद्यानाची सफाई होते. मात्र, त्याचा कचराच उचलला जात नसल्याचे सांगितले. त्याचबरेाबर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील रस्ता डांबरीकरण करून अपघात होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली. नगरसेवक शाम बडोदे यांनी इंदिरानगर भागात पाणी पुरवठा कायमच विस्कळीत होत असल्याचे सांगितले. यावेळी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी हे सर्व नियंत्रण सिडकोकडे असल्याने तिकडून नियोजन ढासळत असल्याचा खुलासा केला. यावरून नगरसेवक बडोदे व पाणीपुरवठा अधिकारी यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. त्याचबरोबर येत्या २६ तारखेला पाण्याच्या टाकीचे उद्‌घाटन होणार असल्याचे कोणी जाहीर केले, असा प्रश्नही नगरसेवक बडोदे यांनी उपस्थित केला. यावेळी सिडकोच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती वरिष्ठांना सादर करण्याची सूचना करण्यात आली.

समन्वयाचा अभाव

इंदिरानगरच्या काही भागाला सिडकोतून, तर काही भागाला पूर्व विभागातून पाणी पुरवठा हेात असतो. त्यामुळे इंदिरानगरच्या प्रश्नाबाबत कायमच सिडकोला दोषी धरले जात असले, तरी सिडको व पूर्व विभागातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने इंदिरानगरवासियांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे बैठकीत समोर आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायलॉन मांजाची सर्रास विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

न्यायालयाने नॉयलॉन मांजावर बंदी घातलेली असतानाही नाशिक शहरातील काही भागांमध्ये मांजाची खुलेआम विक्री होत असून, प्रशासन मात्र मूग गिळून आहे.

शहरातील भद्रकाली, रविवार पेठ येथे या मांजाच्या विक्रीने जोर पकडला असून, मागील दरवाजाने याची ने आण होताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने या मांजाच्या विक्रीवर बंदी घातलेली असताना छुप्या मार्गाने होणाऱ्या विक्रीबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

बंदी घातलेल्या मांजाच्या विक्रीसाठी अव्वाच्या-सव्वा भाव आकारले जात आहेत. नायलॉनच्या मांजामुळे पशू-पक्षी, पर्यावरणास मोठी हानी होत आहे. अनेक वेळा नायलॉनमुळे अपघात झालेले आहेत. अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे नायलॉनच्या मांजावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. इमारती, झाडांवर अडकलेला मांजादेखील तितकाच घातक आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात नॉयलॉन मांजानिर्मिती, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली होती. त्यापाठोपाठ पोलिस आयुक्‍तालयातर्फे नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली. असे असताना ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे.

जुने नाशिक परिसरासह शहरातील बहुतांश पतंग व मांजा विक्रेत्यांकडे सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री होत आहे. उलट बंदी असल्याने मांजाची अव्वाच्या-सव्वा किमतीत विक्री होत आहे. यावर पोलिसांची भूमिका मात्र बघ्याचीच आहे. भद्रकालीतील काही दुकांनामध्ये होलसेल व्यापारीदेखील मांजाची विक्री करीत असून ग्राहक पाहून मांजा दाखवला जात आहे.

गतवर्षी शंभरावर जखमी

नॉयलॉन मांजाच्या वापरामुळे मागील वर्षी शंभरावर जण जखमी झाले आहेत. परंतु, नायलॉनचा मांजा वापरणारे तसेच तयार करणारेही बोध घेत नाहीत. मांजामुळे जखमी झालेल्या शंभराहून अधिक रुग्णांनी खासगी रुग्णालयांत उपचार घेतल्याची माहिती आहे. यात अनेकांच्या कान, नाक, गळा आणि हाताला इजा

झाल्याचे आढळून आले. नायलॉन मांजावर बंदी आणण्याच्या दृष्टीने अनेक स्वयंसेवी संघटनांकडून पोलिसांना साकडे घालण्यात आले होते.


मांजाचे दर

मोनोकाईट १२ रुपये रिळ

मोनोगोल्ड १०० रुपये रिळ

मोनोफिल १५० रुपये रिळ

आयव्हीके ७० रुपये रिळ


--

मेटल मांजाचा धोका...

नॉयलॉन मांजा घातक ठरत असतानाच मेटलच्या मांज्याने त्यात भर घातली आहे. नायलॉनचा मांजा एकवेळ कात्रीने कापला तरी जातो. मात्र, मेटलचा मांजा कात्रीने कापण्यासही वेळ लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नायलॉन मांजाची विक्री करणारा सापडला तरी त्याला फारशी कठोर शिक्षा होत नाही. पोलिस ताकीद देऊन सोडून देतात. अशा प्रकारच्या मांजाच्या विक्रीबाबत सरकारने कठोर कायदा करावा व विक्रेत्यांना कारावासाची शिक्षा करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता सर्वेक्षणात नाशिक २२वे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात अमृत योजनेतील पाचशे शहरांमध्ये नाशिक महापालिकेने कागदोपत्री पुराव्यांच्या आधारावर २२ व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. कागदोपत्री सादरीकरणात महापालिकेला १८०० पैकी १६४१ गुण मिळाले असून, त्यामुळे महापालिकेने ५०० शहरांमध्ये २२ व्या स्थानावर झेप घेतली असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. त्यामुळे आता पहिल्या दहांमध्ये येण्यासाठी महापालिकेला प्रत्यक्ष सर्वेक्षण पथकासमोर जोर लावावा लागणार आहे. दरम्यान, नाशिक शहराने पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता सर्वेक्षणासंदर्भात गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक महापालिकेसह नगरपालिकांच्या कामगिरीचा आढावा घेतला. या आढाव्यासंदर्भात पत्रकांराना माहिती देताना आयुक्त कृष्णा यांनी पालिकेची कामगिरी सुधारल्याचा दावा केला आहे. यावर्षी देशभरातील ४१४० शहरांसाठी स्वच्छता सर्वेक्षण होत असून, त्यात अमृत योजनेतील शहरे व अन्य शहरे असे दोन गट करण्यात आले आहेत. नाशिकचा समावेश अमृत योजनेत असून, महापालिकेने आतापर्यंत या सर्वेक्षणात विविध प्रकल्प व त्यांच्या अंमलबजावणीसंदर्भातील कागदपत्रे सादर केली आहेत. कागदोपत्री सादरीकरणात १८०० गुण आहेत. त्यापैकी महापालिकेला १६४१ गुण मिळाले असून, नाशिकचा क्रमांक २२ वा आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महापालिकेने वर्षभरात खतप्रकल्प, घंटागाडी, वेस्ट टू एनर्जी, घनकचरा व्यवस्थापन यामध्ये केलेल्या कामगिरीचा त्यात सहभाग आहे. येत्या ४ जानेवारीपासून शहरात प्रत्यक्ष स्वच्छता सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. त्यासाठी केंद्रीय पथकही येणार आहे. त्यामुळे या पथकासमोर पालिकेला आता जोर लावून कामगिरी उंचवावी लागणार आहे.

कोट्यवधींची बक्षीसे

या सर्वेक्षणात स्वच्छ प्रभाग स्पर्धाही होणार आहे. मार्च महिन्यात त्रयस्थ संस्थेमार्फत या स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार असून, यातील पहिल्या तीन वॉर्डना बक्षीसे देण्यात येणार आहेत. ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांतील पहिल्या तीन वॉर्डना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख, २० लाख अशा बक्षीसांची घोषणा करण्यात आली आहे. स्वच्छता सर्वेक्षणात पहिल्या तीनमध्ये येणाऱ्या शहरांना २० कोटी रुपये, पहिल्या ४ ते १० शहरांमध्ये येणाऱ्यांना १५ कोटी आणि १० ते २० शहरांच्या यादीत येणाऱ्यांना १० कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता नव्हे, हा तर मृत्युपथ!

$
0
0


कैलास येवला, सटाणा

सटाणा यात्रोत्सवाची सांगता अंतिम टप्प्यावर असतांना शेमळी येथे झालेल्या अपघाताने यात्रेवर दुःखाचे सावट पसरले आहे. सटाणा-मालेगाव रस्त्याचे चौपदीकरणाबाबत अनेक सामाजिक संघटना, प्रवाशी संघटना तसेच वाहनचालकांनी मागणी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्याचे चौपदीकरण नसल्यामुळे अपघांताची माल‌किा सुरू आहे.

वर्षअखेर व सटाण्यातील देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सवाची सांगता अंतिम टप्प्यांत आली आहे. पंधरवाड्याभर चालणारी यात्रा अखेरच्या चरणात जोर धरू लागली असतानाच किरकोळ व्यावसायिकांकडील माल संपत आला होता. परिमाणी पोटासाठी दोन पैसे मिळतील या आशेवर खान्देशसह परराज्यातून दाखल झालेल्या व्यावसायिकांनी आपल्या पोटापाण्यासाठी माल खरेदीसाठी मुंबई गाठली. तेथे दिवसभर खरेदी करून रात्रीचा प्रवास करून लक्झरीने पहाटे मालेगाव परतले. विशेष म्हणजे मुंबई जाताना हे सहाही व्यापारी सटाणा येथून एकाच वाहनाने गेले. त्याच वाहनातून परत येण्याची तयारीही केली. मात्र त्या वाहनांत सर्वच व्यापारी बांधवाचा माल असल्याने त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती. यामुळे त्यांनी मालवाहू वाहनात माल टाकून लक्झरीने मालेगाव गाठले. इकडे त्यांचा माला सटाण्यात येवून पोहोचला. आणि ते मालेगावहून रिक्षाने परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

मृतदेह केले रवाना

व्यापाऱ्यांचे मृतदेह झारखंड, उत्तर प्रदेशात रवाना करण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांवर खर्च अपेक्षित होता. मृतदेह पोहचविण्यासाठी वातानुकुलित शववाहिका नाशिक येथून पाचारण करण्यात आली. त्यासाठी आवश्यक निधी या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून जमवून शववाहिकेद्वारे शव रवाना केले.

याआधी अनेकांनी

गमावला जीव

सटाणा-मालेगाव रस्ता हा गेल्या अनेक काळापासून मृत्यूचे तांडव निर्माण करणारा ठरला आहे. गत आठवड्यातच पोलिस हवालदार अनिल अहिरे यांना ट्रॅक्टरने समोरून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गत महिन्यात ट्रॅक्टर पलटल्याने अपघात झाला होता. त्यात सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. तीन महिन्यांपूर्वी आराई येथील ज्येष्ठ नागरिक यांना एका वाहनाने ठोस दिल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला होता. देवळा येथील देवळा एज्युकेशन सोसायटीचे विद्यालयातील निवृत्त मुख्याध्यापक डॉ. रामराव वामन आहेर (वय ६२) हे आपले (सातमाने ता. मालेगाव) येथील व्याही विजय गोविंद जाधव (वय ६५) व डॉ. रामराव वामन आहेर यांची नात यांचाही आराई फाट्याजवळ अपघातात तिघेही

जागीच ठार झाले होते. तर दोन वर्षांपूर्वी ५ डिसेंबर २०१५ रोजी सटाणा शहरातील चार युवकांचाही याच मार्गावर अपघात मृत्यू झाला होता.

चौपदरीकरण होणे गरजेचे

मालेगाव-सटाणा रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या रस्त्याचे चौपदरीकरण करावे अशी मागणी आजा जोर धरत आहे. सटाणा-मालेगाव रस्ता आंतरराज्य रस्ता असल्याने उमराणे, मुंगसे, मालेगाव बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात या रस्त्याने वाहतूक होते. मालवाहतुकीसोबतच नेहमीच प्रवासी वाहतुकीची वर्दळ या रस्त्यावर असते. मात्र रस्त्या अरुंद असल्याने अनेकवेळा भीषण अपघात होतात. तसेच रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. दिवसेंदिवस या रस्त्यावरील वाहतूक वाढत असून रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी, वाहतूक सुरक्षित व सुरळीत व्हावी यासाठी चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

यात्रेवर दुःखाचे सावट

गुरुवार सटाणावासियांसाठी व यात्रेकरूसाठी काळा दिवस ठरला. संपूर्ण दिवसभर पहिल्यांदाच यात्रेच्या इतिहासात यात्रोत्सव बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्याचा बाका प्रसंग शहरवासियांवर ओढावला. दिवसभर यात्रोत्सवात दुकाने, पाळणे व सर्वच व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने निःमनुष्य असे शांत वातावरण बघावयास मिळत होते. दुसरीकडे शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक मुन्ना शेख, अनिल पाकळे, काकाजी सोनवणे, नीलेश पाकळे यांनी या सातही मृतदेहांची त्यांच्या गावाकडे पोहच करण्याची जबाबदारी घेतली आहे.

अमळनेरकरांसाठी दुसरा धक्का

काही वर्षांपूर्वी देखील यात्रोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी शॉर्टसर्किट होवून अमळनेर येथील व्यावसायिकाला आपला जीव गमवावा लागला होता. आजच्या अपघातातही अमळनेर येथील एक जण ठार झाला. त्यामुळे त्या घटनेची पुन्हा एकदा यात्रेत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकाने टाळला बसचा अपघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

भररस्त्यात अचानक रिक्षा थांबविल्याने पाठीमागून येणाऱ्या राज्य महामंडळाच्या ‘शिवशाही’वर दुसरी बस येऊन आदळली. यात पुढील आसनांवर आदळून बसमधील १८ प्रवाशी जखमी झाले. बसचालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने संभाव्य अपघात टळला.

नाशिकरोड येथील बिटको चौकातील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सटाणा आगाराची बस (एमएच १४ बीटी ४५१९) गुरुवारी नेहमीप्रमाणे पुण्याच्या दिशेने जात होती. बसपुढे शिवशाही बस (एमएच ६ बीडब्ल्यू ३०३२) धावत होती. पेट्रोलपंपाजवळ रिक्षा अचानक थांबल्याने शिवशाही बसचालकाने गाडी थांबविली. मागून येणारी सटाणा आगाराची बस शिवशाहीवर आदळली. बसचालकाने इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने बसचा वेग झटक्यात कमी झाला आणि बसमधील सुमारे ३० प्रवाशी पुढील आसनांवर आदळले. यात प्रवाशांना स्वतःला सांभाळण्यासाठी वेळच मिळाला नाही. यातील १८ जणांच्या तोंड, खांदा व डोक्याला मार लागला. जखमींमध्ये १३ महिला तर पाच पुरुष प्रवाशांचा समावेश आहे. याशिवाय अपघातात आराध्या मालवणकर (रा. नाशिक) ही पाच वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली.

जखमी प्रवाशांच्या आक्रोशाने खळबळ उडाली. अपघातास कारणीभूत असलेला रिक्षाचालकाने लगेचच पसार झाला. जखमी प्रवाशांना तात्काळ महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व जखमी प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये आणल्याने धावपळ उडाली. डॉ. अशोक गायकवाड, डॉ. अर्चना बोधले यांच्यासह सारंग चव्हाण, मनीषा कोतवाल, नीला घुटे या कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते जगदीश पवार आदींनी या जखमी प्रवाशांना मदत करून तात्काळ प्राथमिक औषधोपचार केले.

रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा
नाशिकरोडमधील रेल्वे स्टेशनजवळील डॉ. आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, बिटको चौक, दत्तमंदिर, जेलरोड या भागात बेशिस्त रिक्षाचालकांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. रहदारीला होणाऱ्या अडथळ्याची पर्वा नसलेले शेकडो रिक्षाचालक प्रवाशी मिळविण्यासाठी बेशिस्तपणे रस्त्यावर घिरट्या मारतात. त्याच्या बेशिस्तपणामुळे इतर वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

जखमी प्रवाशी
संध्या भामरे (३०, रा. देवळा), अश्विनी खैरनार (२६, रा. नाशिक), रामदास घोडके (६२, रा. सातपूर), रोशनी गायकवाड (२१, रा. पाथर्डी फाटा), चित्रा सुकेणकर (५०, रा. कॉलेजरोड), विजया पाटील (६५, रा. शिरपूर, जि. धुळे), संजय घोडेकर (४२, रा. जुना कुंभारवाडा, नाशिक), मंगला बकरे (६४), शंकर बकरे (६८, रा. सोमवार पेठ, नाशिक), मंदा गायकवाड (६०, रा. पवननगर), पूनम भामरे (३३, रा. विजयनगर), लतिफा युसूफ शेख (६५, रा. बागवानपुरा), हुसेन शेख (६५, रा. वडाळा), शहिदा शेख (५४), अब्दुल रेहमान शेख (४२, रा. चौकमंडई), शैला पवार (५०, रा. जुनी तांबट लेन) आणि सुमनबाई खरात (६०, रा. बोरगड) अशी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. याशिवाय अपघातात आराध्या मालवणकर (रा. नाशिक) ही पाच वर्षांची मुलगीही गंभीर जखमी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीच्या युवकांनी सर केला लिंगाणा

$
0
0


म. टा. वृतसेवा, घोटी

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपक्रम राबवितात. इगतपुरी तालुक्यातील साहसी ट्रेकिंगवीर युवकांनी ट्रेकर्ससाठी आव्हान समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वात खडतर लिंगाणा किल्ला सर करून युवकांसमोर आदर्श निर्माण केला.

गेल्या वर्षभरात अनेक किल्ल्यावर जाऊन स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या घोटीतील या साहसी युवकांनी लिंगाणा किल्ल्यावर पोहचल्यावर आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविली.

महाराष्ट्रातील अनेक किल्ले सर केल्यानंतर घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाच्या साहसी ट्रेकिंगवीरांनी या वर्षभरात खडतर व आव्हानात्मक किल्ल्यांवर जाण्याचे आव्हान पेलले. या वर्षाच्या सरतेशेवटीही युवकांनी भगीरथ मराडे यांच्या नेतृत्त्वाखाली रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्याची निवड केली. विशेष म्हणजे निवडक युवकांची अवघड, अनोळखी परिसर, रात्रीचा अंधार, अशा स्थितीत रॅपलिंगच्या सहाय्याने लिंगाणा किल्ला सर केला. ही मोहीम रायगड जिल्ह्यातील ‘बा’ रायगड गृपच्या मारर्गदर्शनाखाली राबविण्यात आली.या चढाईत मराडे यांच्यासह प्रशांत जाधव, बालू आरोटे, बालाजी तुंबारे, प्रशांत येवलेकर, संतोष म्हसने, लकी राका, प्रवीण भटाटे, गजानन चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

महाराष्ट्रातील सर्वात खडतर किल्ला म्हणून लिंगाणाची ओळख आहे. आजपर्यंत राज्यातील अनेक गड, किले सर केले. मात्र लिंगाणा सर करण्याचा आनंद वेगळाच. धाडस, आव्हान व थरार असा त्रिवेणी अनुभव यात आला.

- भगीरथ मराडे, ट्रेकिंगप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलाने केला पित्यावर हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील शिवशक्ती चौक येथील अजिंक्य व्हिला रो-होउस येथे राहणाऱ्या मधुकर तुकाराम बोरगे (७२) यांच्यावर त्यांच्याच मुलगा जॉन याने प्राणघातक हल्ला केला.
मधुकर यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर बोरगे यांचा त्यांच्या मुलाशी सायंकाळी वाद झाला. या वादातून मुलगा जॉनने जवळील असलेल्या लाकडी दांड्याने मधुकर यांच्या डोक्यात वार केला. यात मधुकर गंभीर जखमी झाले. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वास ठाकूर यांना श्री पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहकार बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विश्वास को-ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांना बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशनतर्फे दिला जाणारा पुरस्कार सांगली येथे डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहातील समारंभात प्रदान करण्यात आला.

एम. आय. टी. पुणेचे अधिष्ठाता व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ बापुसाहेब पुजारी, फॅम मुंबईचे माजी उपाध्यक्ष सनतकुमार आरवाडे, श्री फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त ए. आय. मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. त्यात डॉ. प्रशांत नारनवरे (जिल्हाधिकारी, पालघर), डॉ. डी. टी. पवार (प्रादेशिक परिवहन अधिकारी कोल्हापूर), रामदास माने (चेअरमन माने ग्रुप ऑफ कंपनीज), प्रा. तौहीर मुजावर (शैक्षणिक क्षेत्र), डॉ. धनंजय गुंडे (योगसेवा) आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षापासून सप्तशृंग देवीचे दर्शन ऑनलाइन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

अर्ध शक्तीपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील श्री सप्तशृंग देवीचे नववर्षापासून ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे. सोमवारपासून न्यासाच्या फेसबुकवरील अधिकृत पेजवर भाविकांना या ऑनलाइन दर्शनाचा घरबसल्या लाभ घेता येणार आहे.

न्यासाच्या www.saptashrungi.net हे संकेतस्थळ व फेसबुकवरील अधिकृत Shree Saptashrung Niwasini Devi Trust, Saptashrung Gad पेजवर श्री भगवतीची दैनंदिन ऑनलाइन दर्शन सुरू केले जाणार आहे. भाविकांनी या ऑनलाइन (लाइव्ह) दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे. ऑनलाइन दर्शन प्रक्रिया सुरू करण्यासाठी विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी व भारत संचार निगमचे नितीन महाजन यांची न्यासाला विशेष सहकार्य मिळाले. यापूर्वी ऑनलाइन दर्शनाचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र इंटरनेटच्या कमी स्पीडमुळे ही आनॅलाइन दर्शनसेवा बंद करण्यात आली होती.

अडथळा आल्यास साधा संपर्क

श्री भगवतीच्या दैनंदिन स्वरूपात सुरू होत असलेल्या ऑनलाइन दर्शनाबाबत कोणत्याही प्रकारची सूचना अथवा अडथळा जाणवल्यास न्यासाच्या ०२५९२-२५३३४९ /२५३३५१ या कार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

श्री सप्तशृंगी मातेचे ऑनलाइन सोमवारपासून सुरू होणार आहे. यापूर्वी असा प्रयोग झाला होता. भाविकांच्या अपेक्षा व श्रद्धा विचारात घेता न्यासाच्या नूतन विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शन व परवानगीनुसार बीएसएनएलच्या सह्योगातून न्यासाच्या प्राप्त झालेल्या लिजलाइन इंटरनेट सुविधेमुळे भाविकांसाठी पुन्हा एकदा ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध होत आहे.

- सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजारातील साहित्य अवघ्या साडेचार लाखांत विकले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने ऑक्टोबरमध्ये सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याच्या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या लोखंड, कोळसा आणि लाकूड आदि साहित्याचा लिलाव केला असून, त्यात अवघे साडेचार लाख रुपये पालिकेच्या पदरात पडले आहेत. भंगार बाजार हटवण्यासाठी जवळपास एक कोटींपेक्षा अधिक खर्च आला असताना, जप्तीच्या मालातून मात्र अवघे साडेचार लाख रुपये मिळाले आहे. तर संबंधित दुकानदारांकडून अजून पहिल्याच कारवाईचे ८५ लाख रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे भंगार बाजाराची अतिक्रमण निर्मूलन मोहीम ही पालिकेच्या पथ्यावर पडली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पोलिसांच्या मदतीने १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत अंबड लिंक रोडवरील भंगार बाजार विरोधी मोहीम दुसऱ्यांदा राबविली होती. त्यापूर्वी जानेवारी महिन्यात पहिल्यांदा भंगार बाजार हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. या मोहिमेत जागेवर असलेला माल पालिकेने जप्त केला होता. जवळपास ३७४ गाड्या माल जप्त करून तो सातपूर क्लब हाऊसवर ठेवण्यात आला होता.
या जप्त मालाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने दोन वेळा लिलाव प्रक्रिया राबविली. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तिसऱ्या वेळी महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबविली असता, सातपूर येथीलच साई प्लास्टिक प्रॉडक्टस् या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली. त्यानुसार, जप्त करण्यात आलेले १२,३४० किलो लोखंड २२ रुपये प्रतिकिलो, २१ हजार ७८० किलो कोळसा प्रति किलो ४ रुपये तर २६,७८० किलो लाकूड ३.२० रुपये दराने विक्री करण्यात आले. त्यातून महापालिकेला ४ लाख ५५ हजार रुपयांची वसुली झाली आहे. पहिल्या कारवाईचे अद्याप ८५ लाख वसुल होणे दुकानदारांकडून बाकी आहे. तर दुसऱ्या कारवाईचे एक कोटी वसूली करायची आहे.पण जप्तीच्या मालातून फक्त साडेचार लाख मिळाल्याने ही कारवाई पथ्यावर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अ‌नधिकृत होर्डिंग्जना चाप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे चमकोगिरी करण्यासाठी शहरात होर्डिंगबाजी करणाऱ्यांसह अनधिकृत जागेवर होर्डिंगबाजी करणाऱ्यांना चाप लावण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. महापालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग्ज व बॅनरबाजी रोखण्यासाठी महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे अखेर कारवाईला सुरुवात केली आहे. अनधिकृत होर्डिंग बाजी रोखण्यासाठी सहा विभागात सहा प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्याकडे तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच थेट तक्रारींसाठी हेल्पलाइन व टोल फ्री नंबर सुरू केले आहेत. या नंबरवर कॉल केल्यानंतर चोवीस तासांत होर्डिंग्ज हटविले जाणार असल्याचा दावा केला जात आहे.

शहरात रिकाम्या जागेत अनधिकृतपणे होर्डिंग्ज, बॅनर तसेच फलक लावून शहराचे विद्रूपीकरण केले जाते. गल्लीबोळात दादा-भाईंकडून नेत्यांना खूश करण्यासाठी मिळेल त्या जागेवर फलक लावले जात असल्याने शहरात सर्वत्र होर्डिंग्जच दिसत आहेत. स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पालिकेने शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या या अनधिकृत पोस्टर्स व होर्डिंग्जविरोधात आक्रमक कारवाईची मागणी केली जात होती. नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे चमकोगिरी करण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी करत, शहर विद्रूप केले होते. त्यासंदर्भात पालिकेवर टीका झाल्यानंतर पालिकेने कारवाईसाठी अनधिकृत होर्डिंग्जबाबत उच्च न्यायालयाच्याच आदेशाचा आधार घेतला आहे. या आदेशाच्या आधारे अनधिकृत होर्डिंगवर कारवाईसाठी सहा विभागांत सहा प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अनधिकृत होर्डिंगसंदर्भात तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार केल्यानंतर चोवीस तासांत त्याची दखल घेतली जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले.

यांच्याकडे करा तक्रार

विभाग अधिकारी मोबाइल नंबर

नाशिक पूर्व जे. डी. सोनवणे ९४२३१७९१२३

नाशिक पश्चिम नितीन नेर ९४२३१ ३१३२१

पंचवटी बी.वाय शिंगाडे ९५५२१९४५२८

नाशिकरोड एस.डी. वाडेकर ८२७५०१५३९१

सिडको डॉ. एस. बी. कुमावत ९४२३१७९१२१

सातपूर ए. एम. गायकवाड ७०३०९०२०१५


टोल फ्री व हेल्पलाइन नंबर

सहा विभागांत सहा प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्त केली असून, त्यांच्यावर कारवाईची जबाबदारी टाकण्यात आली आहे. यासोबतच महापालिकेत हेल्पलाइन व टोलफ्री नंबर्सची सेवा सुरू करण्यात आली आहे. पालिकेने एसएमएस व थेट संपर्कासाठी ९४२३१७००९७ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच १८००२३३१९८२, १८००२३३४७१ हा टोल फ्री नंबर जाहीर केला आहे. या नंबरवर कॉल केल्यानंतर २४ तासांच्या आत कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images