Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रिक्षांची चाके थांबली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील रेल्वे स्टेशनबाहेर ओला, उबेर आणि जुगनू यांसारखी टॅक्सी सेवा सुरू करण्याची कार्यवाही रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. त्याविरोधात शुक्रवारी येथील रिक्षाचालकांनी एल्गार करून या सेवेला परवानगी देऊ नये, या मागणीसाठी महसूल आयुक्त कार्यालयावर मूक मोर्चा काढला, तसेच दिवसभर बंद पुकारला. पण, स्टेशनबाहेरील रिक्षासेवा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांची गैरसोय टळली.

रेल्वे स्टेशनबाहेर सुरू होणाऱ्या नव्या सेवेला विरोध करीत रिक्षाचालक-मालक संघटना, तसेच टॅक्सी संघटनेने महसूल आयुक्त कार्यालयावर मूक मोर्चा काढून आयुक्तालय प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले. यावेळी रिक्षाचालक-संघटनेचे नेते सुनील वाघ, माजी मंत्री बबनराव घोलप, अस्लम मणियार, संघटनेचे अध्यक्ष किशोर फडताळे, उपाध्यक्ष चंद्रकात गायकवाड, डॉ. गिरीश मोहिते, टॅक्सी संघटनेचे नेते पप्पू शेख, सचिन सोनवणे, रशिद शेख, गोविंद साळवे, प्रकाश जगताप, संजय पवार, राम कुमटेकर, दिनेश कंटक, लक्ष्मण घुगरे, रियाझ शेख, बुऱ्हाण शेख, रमेश दाभाडे, विजय गवळी, अनिल शिंदे, महमंद शेख, हमीद पठाण रामा साळवे, अमजद शेख आदी उपस्थित होते. रेल्वे स्टेशनपासून सकाळी मोर्चास प्रारंभ झाला. नाशिकरोड पोलिस स्टेशनला पोहोचल्यानंतर तेथून तो महसूल आयुक्त कार्यालयावर नेण्यात आला. तेथे महसूल अधिकारी स्वामी यांना निवेदन देण्यात आले. ओला, उबेरसारख्या टॅक्सी सेवेला परवानगी देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनाचा आशय असा ः रिक्षाचालक शासनाचे सर्व कर नियमित भरतात. प्रवाशांना स्वस्त आणि चांगली सेवा देतात. रेल्वे स्टेशन भागात अडीचशे रिक्षा आणि ५० टॅक्सी असून, त्यांच्यावर या चालकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. या कुटुंबांत सुमारे दीड हजार व्यक्ती असून, खासगी टॅक्सीमुळे येथील व्यवसायाच बंद पडण्याची वेळ आल्याने त्यांची उपासमार होण्याची भीती आहे. ओला आणि जुगनू या खासगी कंपन्यांची वाहने कसलीही परवानगी नसताना रस्त्यांवर धावतात. बस आणि रेल्वे स्टेशनपासून तीनशे मीटरपर्यंत या खासगी टॅक्सींना बंदीचा शासनाचा जीआर आहे. मात्र, तरीही रेल्वेने परवानगी देणे चुकीचे आहे. त्यामुळे नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात या सेवेला परवानगी देऊ नये.

--

प्रवाशांना दिलासा

रेल्वे स्टेशनच्या लेनमधील अडीचशे रिक्षा व ५० टॅक्सी शुक्रवारी बंद होत्या. सकाळी त्यांनी अचानक बंद पुकारल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. एसटी महामंडळानेही बसच्या फेऱ्या कमी केलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी रिक्षा संघटनेने बस स्टॅण्डशेजारील रिक्षाचालकांना बंदमधून वगळले. त्यामुळे प्रवाशांना बंदचा फटका बसला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँकेची नोकरभरती बेकायदेशीर

$
0
0

१९ संचालकांना वसुलीच्या नोटिसा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेतील २१ संचालकांपैकी १९ संचालकांना बँकेतील नोकरभरती आणि पद वाचविण्यासाठी बँकेच्या पैशातून वकिलांवर केलेली उधळपट्टी भोवणार आहे. जिल्हा उपनिबंधकांनी केलेल्या चौकशीत नोकरभरती व न्यायालयीन खर्च प्रकरणी संचालकांना दोषी ठरवले असून, त्यांच्याकडे आठ कोटी ३६ लाख ४३ हजार रुपयांची वसुली काढली आहे. त्यात चारशे जणांच्या नोकरभरतीत सात कोटी ९३ लाख, तर न्यायालयीन खर्च प्रकरणात ४२ लाखांची वसुली काढली आहे. या प्रकरणात संचालकांनी केलेला खुलासा चौकशी अधिकाऱ्यांनी अमान्य केला असून, अंतिम खुलाशासाठी २२ जानेवारीची डेडलाइन दिली आहे. त्यामुळे संचालक मंडळाच्या अडचणी वाढल्या आहेत.

जिल्हा उपनिबंधकांच्या नोकरभरती तसेच न्यायालयीन खर्च प्रकरणी संचालकांवर दोषारोप निश्चित केले आहेत. सीसीटीव्ही खरेदी, नोकरभरती, तसेच संचालक अपात्रतेसाठी उच्च न्यायालयात जिल्हा बँकेच्या वतीने दाखल याचिकेवरील खर्चाबाबतचा चौकशी अहवाल चौकशी अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी पूर्ण केला आहे. त्यात सीसीटीव्ही खरेदी प्रकरणात संचालकांना क्लिन चीट मिळाली असली तरी चारशे जणांची नोकरभरती व अपात्रतेच्या न्यायालयीन प्रकरणात मात्र दोषारोप ठेवण्यात आले आहेत. करे यांनी केलेल्या चौकशीत नोकरभरती प्रकरणात जीवा पांडू गावित, हरिश्चंद्र चव्हाण, अपूर्व हिरे वगळता उर्वरित २१ संचालकांना दोषी धरण्यात आले आहे. सदरची भरती नियमबाह्य ठरवत या नोकरभरती प्रकरणी आतापर्यंत झालेला खर्च वसुलीच्या नोटिसा काढल्या आहेत. प्रत्येकी ४१ लाख ७७ हजारांची वसुली काढण्यात आली आहे.

न्यायालयीन प्रकरणात ४२ लाखांची वसुली

आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने काढलेल्या संचालक अपात्रता अध्यादेशामुळे विद्यमान ११ संचालकांवर बरखास्तीची कारवाई ओढावली होती. ही कारवाई टाळण्यासाठी या संचालकांनी बँकेच्या खर्चातून उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत बाजू मांडली होती. त्यापोटी जिल्हा बँकेला तब्बल ४६ लाखांचा खर्च आला आहे. परंतु, हा खर्च चौकशी अधिकाऱ्यांनी बेकायदा ठरवला असून, संचालकांकडून त्यांची वसुली करण्यासाठी नोटिसा काढल्या आहेत. त्यात परवेझ कोकणी, गणपतराव पाटील, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, अद्वय हिरे, शोभा बच्छाव, जीवा पांडू गावित, शिरीष कोतवाल, धनंजय पवार, संदीप गुळवे व नरेंद्र दराडे यांचा समावेश आहे. पैकी दराडे यांनी रक्कम भरली असून, अन्य दहा जणांकडून वसूल केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठ्यपुस्तक वितरण शाळा स्तरावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुरविण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच शाळा स्तरावर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार नाही. महाराष्ट्र शिक्षण परिषदेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी, तसेच महापालिका आयुक्तांना आज तसे पत्रकाद्वारे कळविले आहे.

पत्रकात नमूद केले आहे, की शासन निर्णयानुसार राज्याच्या नियोजन विभागाने विविध कल्याणकारी योजना वस्तुरूपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरूपात थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने घेतला आहे. या निर्णयातील तरतुदी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांनाही लागू करण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने लाभार्थी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत/शेड्युल्ड/ग्रामीण बँकांमध्ये लाभार्थी खाते उघडून त्यात विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक निगडी करण्याबाबत कळविले होते. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी शासन निर्णय क्रमांक डीसीटी २३१६/प्र.क्र.१३३/का.१४१७ या संदर्भ एकच्या तरतुदीनुसार पाठ्यपुस्तक योजनेस सूट देण्यात आली आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पुणे येथील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) तयार करते. प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणारी बालभारती एकमेव संस्था आहे. ती शासनाच्या अखत्यारीत असल्याने नियोजन विभागाच्या ५ डिसेंबर २०१६ च्या शासननिर्णयातून पाठ्यपुस्तक योजना शासनाच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेतून वगळण्याचा प्रस्ताव बालभारतीच्या संचालकांनी दिला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन महिन्यांत भूसंपादन

$
0
0

क्लीन चिट मिळताच मोपलवारांनी घेतला समृद्धी महामार्गाचा आढावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार सेवेत रुजू होताच कामाला लागले आहेत. शुक्रवारी त्यांनी नाशिक येथे भेट देऊन समृद्धी महामार्ग प्रकल्पातील गावनिहाय आढावा घेऊन जमीन संपादनाला गती देण्याचे निर्देश दिले. या महामार्गासाठी लागणारी सर्व जमीन दोन महिन्यांत संपादित करून हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराची ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर मोपलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर ते चार दिवसांपूर्वीच रुजू झाले. त्यानंतर त्यांनी नाशिकला भेट देऊन पत्रकारांशी शासकीय विश्रामगृहात संवाद साधला. ते म्हणाले, की सुरुवातील या प्रकल्पाच्या जमीन संपादनासाठी विरोध झाला. पण, संवादामुळे तो निवळला आहे. दहा जिल्ह्यांतील ३९२ गावांपैकी अमरावतीमधील दोन व नाशिक जिल्ह्यातील चार गावांत विरोध असून, त्यांच्याशी संवाद सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या गावात अधिकाऱ्यांना कोडून ठेवण्यात आले, त्या गावातही थेट खरेदीतून ७० ते ७५ टक्के थेट खरेदी झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आतापर्यंत या महामार्गासाठी ३७ टक्के जमिनीची थेट खरेदी झाली असून, त्यासाठी २८०० कोटी रुपये वाटप केल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा

नाशिक येथे विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व प्रांताधिकारी यांच्यासह या प्रकल्पाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी संपादनात येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या. गावनिहाय आढावा घेताना त्यांनी सर्व प्रश्न समजून घेत मार्गदर्शनही केले. नाशिक जिल्ह्यात सिन्नर, इगतपुरी येथील ३०.२२ टक्के जमिनीची थेट खरेदी झाल्याची माहिती त्यांनी घेतली.

आरोपाचे पुन्हा खंडण

ऑगस्ट महिन्यात मोपलवार यांची कथित ध्वनिफीत वृत्तवाहिन्यांवर प्रसारीत झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या ध्वनिफितीमुळे मोपलवार यांच्यावर समृद्धी महामार्ग प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यालाही त्यांनी यावेळी उत्तर दिले ही ध्वननिफीतच बनावट होती. अस्तित्वात नसलेल्या बोरीवलीच्या प्लॉटवरून हे आरोप केल्याचे उघड झाल्यामुळे क्लीन चिट मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यामागे काही षडयंत्र होते का, याबाबत मात्र त्यांनी अधिक बोलणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला संघ नसतानाही क्रिकेटवर ‘माया’!

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com
Tweet @FanindraMT

शहरातल्या मुलींना शहरातच दोन किलोमीटरवरील मैदानावर जाणेही जेथे गैरसोयीचे वाटते, तेथे एक मुलगी सिन्नरहून नाशिकमध्ये रोज सरावासाठी येते. महिला खेळाडूंचा अभाव हे कारणही तिला क्रिकेटपासून वंचित ठेवू शकले नाही. पुरुष संघात रोजचा सराव करणाऱ्या या मुलीचे धाडस म्हणूनच कौतुकास्पद ठरत आहे. खेळावरची तिची ही ‘माया’ शहरातल्या मुलींनाच नव्हे, तर मुलांनाही लाजविणारी आहे. हा संघर्षपूर्ण प्रवास आहे रणजीपटू सिन्नरच्या माया सोनवणेचा.

रणजीमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळणारी माया सोनवणे ही नाशिक जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे. सरावासाठी रोज सकाळी सात वाजता सिन्नरहून महात्मानगर ग्राऊंडवर येते. येथे सरावासाठी येणाऱ्या मुलींची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे तिला मुलांच्या संघात सराव करावा लागतो. याबाबत मायाला विचारले असता, ती म्हणाली, ‘‘लहानपणापासून सिन्नरमध्ये मी क्रिकेट खेळत आले. या खेळातील तंत्रशुद्ध मार्गदर्शनासाठी ती नाशिकला येते. मात्र येथे मुली क्रिकेट फारशा खेळत नाहीत. त्यामुळे मुलांबरोबर मला सराव करावा लागतो. मुलीने क्रिकेट खेळावे असे पालकांना वाटत असले, तरी प्रथम अभ्यास करावा, नंतरच क्रिकेट खेळावे, अशी त्यांची भूमिका असते. काही पालक क्रिकेटमध्ये करिअर होऊ शकते हे मानण्यास आजही तयार नाहीत. क्रिकेट हा महिलांचा खेळ नसून पुरुषांचाच खेळ आहे ही मानसिकता आजही आहे.’’ अर्थात, गोल्फ क्लबवर दुपारी मुलींच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचप्रमाणे द्वारकावर असलेल्या ग्राऊंडवरदेखील महिलांची संख्या वाढते असल्याचे निरीक्षणही मायाने नोंदवले.

माया काही वर्षांपासून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत असून, आतापर्यंत ती चार वेळा रणजी टीममध्ये खेळली आहे. मुलींमध्ये क्रिकेटची आवड वाढावी यासाठी नाशिक शहरात महिलांचे जास्तीत जास्त सामने आयोजित केले तर महिला खेळाडूंच्या संख्येत नक्कीच वाढ होईल, असे मायाला वाटते. नाशिकचे वातावरण चांगले आहे. येथे महिला प्रशिक्षक आहेत व जिल्हा क्रिकेट संघटनेकडूनही मुलींना प्रोत्साहन दिले जात असल्याचे तिने सांगितले.

सराव फायद्याचाच

पुरुष संघात सराव करण्याच्या अनुभवाबद्दल माया म्हणाली, की मुलींची संख्या कमी आहे हे खेदजनक आहे. मात्र, मुलांमध्ये खेळत असल्याने माझा तोटा नाही तर फायदाच जास्त होतो. मुले चागले प्रकारे बॉल हिट करीत असल्याने त्यांच्याबरोबर खेळताना महिलांच्या खेळापेक्षा जास्त कस लागतो. महिलांमध्ये सामने खेळताना हा सराव कामी येतो. त्यामुळे मुलांच्या संघात खेळावे लागते याचे मला कधीच वाईट वाटत नाही. महिलांच्या क्रिकेटवाढीसाठी अविनाश आघारकर यांनी चांगली मेहनत घेतली होती. त्याचप्रमाणे सध्या मकरंद ओक, अमित पाटील, समीर रकटे, धनपाल शहा यांच्यासारखी मंडळी महिला खेळाडूंच्या पाठीशी असल्याने महिलांचा क्रिकेट बहरतो आहे.

मुलींनी क्रिकेट खेळायला हवे. यात करिअरच्या मोठ्या संधी आहेत. पालकांनी त्यांच्या पाठीशी राहावे. आज अनेक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घ्यायला हवा.

- माया सोनवणे, महिला रणजीपटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्‍वासक पण, संथ विकासगती

$
0
0

मटा फोकस

--

सिन्नर नगरपालिका

--

आश्‍वासक पण, संथ विकासगती

--

वर्षभरापूर्वी सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या हातून सत्ता काढून घेत आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या हाती सोपविली. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत शिवसेनेचे उमेदवार किरण डगळे यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ टाकली. बहुमताने नगरसेवक निवडून एकहाती सत्ताही शिवसेनेलाच मिळाली. वर्षभरात जनतेच्या अपेक्षांचे ओझे घेऊन काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी केलेले कामकाज समाधानकारक असले, तरी जनतेच्या अपेक्षापूर्तीच्या दिशेने होत असलेली वाटचाल संथ असल्याचे कामकाजातून दिसून येते.

--


संकलन ः संदीप भोर


--

संघटित प्रयत्नांचा अभाव

सिन्नरवासीयांनी आमदार वाजे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून नगरपालिकेची सत्ता शिवसेनेच्या हाती दिली. नगरपालिकेचा कारभार हाकताना अडचणींचा सामना करावा लागत असला, तरी नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, गटनेते हेमंत वाजे, पाणीपुरवठा सभापती शैलेश नाईक यांच्यासह काही नगरसेवक शहरात विकासकामे करण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसते. पण, सर्व सत्ताधारी नगरसेवक संघटितपणे कुठले काम करीत असल्याचे मात्र दिसत नाही. सत्तासोपान चढताना शहरातील समस्यांचे आव्हान सत्ताधाऱ्यांसमोर होते. निधीही फारसा उपलब्ध नव्हता. प्रामुख्याने शहरातील पाणीप्रश्न गंभीर होता. माजी आमदार कोकाटेंच्या पाठपुराव्यातून शहरासाठी कडवा धरणातून ७२ कोटींच्या पाणीयोजनेचे काम सुरू होते. सत्तांतरानंतर या कामाची गती मंदावल्याचे दिसते.

--

समान पाणी वितरणाची कसरत

जलवाहिनीसाठी भूसंपादनाकरिता काही अडचणी होत्या. मात्र, आमदार वाजे यांनी प्रयत्नपूर्वक या अडचणी दूर केल्या असून, योजनेचे रखडलेले काम सुरू झाले आहे. येत्या सहा महिन्यांत योजनेचे पाणी शहरवासीयांना मिळू शकेल, असा आशावाद नगराध्यक्ष डगळे व्यक्त करीत आहेत. उपलब्ध अपुरे पाणी आणि त्याचे मोठी लोकसंख्या, विस्तीर्ण क्षेत्रफळाला समान वितरण ही कठीण परीक्षा असली, तरी त्यात उत्तीर्ण होण्यासाठी शैलेश नाईक यांच्यासह पदाधिकारी मेहनत घेत आहेत. काही ठिकाणी तक्रारी असल्या, तरी पाणीप्रश्‍नाची तीव्रता काहीअंशी कमी झाली आहे.

--

जनजागृतीसाठी इच्छाशक्तीची निकड

पथदीप, स्वच्छता यासाठीही नगरपालिका तत्पर आहे. व्यंकटेश दुर्वास यांच्यासारखे मुख्याधिकारी लाभल्याने प्रशासन तत्परतेने काम करताना दिसते. नगरपालिकेला स्वच्छ भारत अभियानात शासनाकडून मिळालेले प्रोत्साहन, हागणदारीमुक्तीसाठी दीड कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान याही जमेच्या बाजू आहेत. परंतु, घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत, नळांना तोट्या बसविण्याबाबत जनजागृती करण्यात नगरसेवक, कर्मचाऱ्यांना रस असल्याचे दिसत नाही. ओला व सुका कचरा वेगळा करून खत प्रकल्प उभारण्यासाठी नगरपालिकेला मोठा निधी मिळणार असल्याची अपेक्षा नगराध्यक्षांनी व्यक्त केली असून, त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. शहरातील विविध शाळांच्या माध्यमातून असे प्रबोधन सहज होऊ शकते. वॉर्डावॉर्डांत नगरसेवक जनजागृती करू शकतात, ही इच्छाशक्ती निर्माण होणे, कृतीत उतरणे अद्याप बाकी आहे.

--

वीज, रस्ते, वाहतूक समस्या

शहराचा वीजपुरवठा पुरेशा दाबाने, अखंडित होण्यासाठी १२ नवीन रोहित्रे बसवून पुरवठा विभागणी करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ही बाब चांगली असली, तरी शहरातील काही मुख्य रस्त्यांची अवस्था आता खूपच खराब झाली आहे. हा प्रकार नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारा आहे. अतिक्रमणांची वाढती संख्या पारदर्शक कारभाराचे वचन देणाऱ्यांना निश्चितच शोभादायक नाही. शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्याचे वचननाम्यात नमूद करण्यात आले, याचाही नगरपालिकेस सोयीस्कर विसर पडला आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीची पुरती वाट लागली असून, वाहनतळही नसल्याने रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे.

--

तरीही अपेक्षापूर्तीचा आशावाद

गावगाडा शिस्तीने चालवायचा म्हणजे कठोर भूमिका घेत कटूता पत्करण्याचे धाडस ठेवावे लागत. त्याचा अभाव सत्ताधाऱ्यांत दिसतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वचननाम्यातील छोटी-मोठी आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी धडपडत असले, तरी सत्ता मिळाल्यानंतर दोन महिन्यांत घरपट्टी कमी करण्याचे आश्‍वासन वर्षपूर्तीनंतरही पूर्णत्वास गेलेले नाही. परिणामी शहरासह उपनगरवासीयांकडून घरपट्टीची बिले भरली जात नसल्याने नगरपालिकेच्या महसूलातही तूट येत आहे. एकूणच सत्ताधाऱ्यांनी वर्षभरात केलेले कामकाज समाधानकारक असले, तरी विकासाच्या दृष्टीने ठोस काम दिसत नाही. तथापि, अद्याप चार वर्षे हातात असल्याने सत्ताधारी शहरवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात निश्‍चित यशस्वी होतील, असा आशावाद व्यक्त होत आहे.

---

सत्ताधारी म्हणतात...

--

वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून २.५ कोटी रुपयांचा निधी आणला, तसेच दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ४.५ कोटींचा निधी, कचरा व्यवस्थापन योजनेंतर्गत ६.५ कोटी, मैला व्यवस्थापनासाठी एक कोटी ८७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ‘डीपीआर’अंतर्गत भुयारी गटारीच्या कामासाठी ४० कोटींचा प्रस्ताव पाठविला, याशिवाय अन्य विकासकामांसाठी सुमारे २५ कोटींचे प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेले आहेत. स्वच्छतेमध्ये प्रगती दिसत असून, महाराष्ट्र विभागात सिन्नरचा दुसरा नंबर आहे. आठ दिवसांत शहरांतर्गत रस्त्यांची कामे सुरू करणार असून, सध्याही रस्त्यांची कामे सुरू आहेत. वचननाम्यातील आश्‍वासनांच्या पूर्तीकडे आश्‍वासक वाटचाल सुरू आहे. सरस्वती नदीपात्र स्वच्छतेसाठी नियोजबद्ध प्रकल्प तयार केला. काम झाले नसल्याचे दिसत असले, तरी प्रस्ताव प्रक्रियेत एक वर्षाचा काळ लोटला. तथापि, आगामी वर्षभरात सिन्नरसह उपनगरांचा कायापालट झालेला दिसेल.

-किरण डगळे, नगराध्यक्ष

--

विरोधक म्हणतात...

--

वर्षभरात एकही ठोस काम नाही

आमच्या काळात मंजूर झालेली कामेच सध्या मार्गी लावली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. नवीन एकही ठोस काम झालेले नाही. एका वर्षात परिसराचा पाणीप्रश्‍न जैसे थे असून, उपनगरांमध्ये पाच-पाच दिवसांनी पाणी येत असल्याचे दिसते. शहरातील बहुतांश रस्त्यांचीदेखील दुर्दशा झालेली आहे. वर्षभराच्या काळानंतरही असे चित्र कायम असून, एकही ठोस काम झालेले दिसत नाही. शहरातील नाट्यगृहाचे कामदेखील मार्गी लागलेले नाही. नगरपालिका इमारतीच्या सभागृहाचे कामही जैसे थे स्थितीमध्ये आहे. आमच्या काळात मंजूर झालेल्या जुन्या निधीवरच आजवर कामे होत आहेत. सत्ताधारी आमदार असल्याने त्यांच्या माध्यमातून निधी आणणे गरजेचे असताना वर्षभरात तसे प्रयत्न झालेले नाहीत. आमची सत्ता असताना निधी देण्यास उत्सुक असलेल्या आमदारांनी त्यांच्या पक्षाची सत्ता आल्यानंतर वर्षभरात किती निधी दिला, हादेखील संशोधनाचा विषय ठरावा.

-नामदेव लोंढे, विरोधी गटनेते

--

अधिकारी म्हणतात...

--

पदाधिकारी-प्रशासन समन्वयातून प्रगती

स्वच्छ भारत अभियानात दीड कोटीचे बक्षीस मिळाले असून, घनकचरा व्यवस्थापनास साडेसहा कोटी मंजूर झालेला आहे. रस्ता अनुदानातून एक कोटीची पाच रस्त्यांची कामे सुरू होत आहेत. शहरात एलईडी पथदीप बसविण्याचे नियोजन, कडवा पाणीपुरवठा योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, ३१ मार्चपर्यंत योजना कार्यान्वीत करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शासनाकडून १० कोटींचे कर्ज घेणार आहोत. सिन्नर बसस्थानक परिसरात असलेल्या नगरपालिकेच्या लोणारे कॉम्प्लेक्सची दुरुस्ती केली असून, त्याचा लिलाव लवकरच होईल. नायगावरोडलगत प्रस्तावित शॉपिंग सेंटरचे काम प्रगतिपथावर असून, पहिला टप्पा लवकरच पूर्ण होईल. भुयारी गटार योजनेसाठी ४० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. पदाधिकारी आणि प्रशासनाच्या समन्वयातून शहर स्वच्छतेच्या दृष्टीने अग्रेसर आहे. मैला व्यवस्थापन प्रकल्पही आगामी वर्षात पूर्ण होईल.

-व्यंकटेश दुर्वास, मुख्याधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात थंडीने एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देवळाली कॅम्प येथे एका भिकाऱ्याचा कमालीच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला. दिवसेंदिवस तापमानाचा पारा घसरत असून, थंडीचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये तापमानात मोठी घसरण झाली आहे. ढगाळ वातावरणात थंडी वाढल्यामुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. शहरात शुक्रवारी ७.६ अंश, तर निफाडचा पारा ६.५ पर्यंत आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला असून, नाशिकचा पारा पुन्हा एकदा आठ अंशांच्या खाली घसरला आहे. चालू वर्षात राज्यात समाधानकारक व जास्त पाऊस झाला आहे. परतीच्या पावसानेही अनेक ठिकाणी मोठे नुकसान केले. त्यामुळे यंदा थंडी अधिक असणार, असे भाकीत वेधशाळेने वर्तवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजार कोटी वसुलीचे उद्दिष्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वसुली यंदा केवळ नऊ टक्के झाली असून, ती अत्यल्प आहे. शेतकरी कर्जमाफीमध्ये समाविष्ट नाहीत अशा सभासदांकडून सुमारे दोन हजार कोटींची वसुली येणे बाकी आहे. त्यामुळे या वसुलीवर आगामी काळात भर देऊन बँक पूर्वपदावर आणणार असल्याचे बँकेचे नूतन अध्यक्ष केदा आहेर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वसुली मोहीम तातडीने सुरू करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नवनिर्वाचित अध्यक्ष केदा आहेर यांनी शुक्रवारी (दि.२९) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत कामकाजास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी अध्यक्ष आहेर यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल यांसह सर्व विभागांचे अधिकारी, सर्व शाखा व्यवस्थापक, विभागीय अधिकारी, बँक निरीक्षक, वसुली अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत प्रामुख्याने वसुलीवर चर्चा झाली. अडचणीत सापडलेल्या बँकेला पूर्वपदावर आणण्यासाठी सभासदांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी सभासदांशी संवाद साधून बँकेबाबत विश्वास निर्माण करावा. तसेच, सभासदांनीही आपली बँक म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच, बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वसुलीवर भर देण्याचे, बँकेच्या खातेदारांशी त्यांच्या गरजेपुरतीच रोख रक्कम शाखास्तरावरून काढण्याबाबत सहकार्य करण्याचे आदेश ही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. वसुलीसाठी जप्ती केलेल्या ट्रॅक्टरचे लिलाव करण्याचे आदेश बजाविले आहेत.

टॅाप २०चे होर्डिंग

आगामी काळात वसुली कडक करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेतील टॉप २० थकबाकीदारांची यादी तयार करून गावनिहाय होर्डिंगव्दारे झळकवली जाणार आहेत. यात कोणतीही गय केली जाणार नाही. त्यासाठी थकबाकीदारांनी तत्काळ थकबाकी भरावी, असे आवाहन अध्यक्ष आहेर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधान परिषदेसाठी आहेरांचे खैरेंशी गुफ्तगू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागेसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष केदा आहेर यांनी भुजबळ फार्म येथे भुजबळांचे निकटवर्ती दिलीप खैरै यांच्याशी शुक्रवारी गुप्तगू केले. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. या भेटीमागे दोन्ही नेत्यांनी कारण गुलदस्त्यात ठेवले असले तरी विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

जूनमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जयवंत जाधव यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी विधान परिषदेसाठी चाचपणी सुरू केली आहे. एकीकडे या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे नाशिकला आलेले ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेची संख्या यावेळेस जास्त असून, आमदारही शिवसेनेचाच होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. नाशिक विधान परिषदेची ही निवडणूक मे मध्ये होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नव्या वर्षातील तीन महिने या जागेसाठी जोरदार राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इच्छुक उमेदवारांनी आपली मोर्चेबांधणी सुरू करून गाठीभेटी घेणेही सुरू केले आहे. कोकण महोत्सवानिमित्त नारायण राणे नाशिकला आल्यानंतर या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांचे मतदान असून, त्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्या पाठोपाठ भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना व भाजपाकडे सर्वाधिक मते असली तरी त्यांना अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे. वरिष्ठ पातळीवर युती झाली तर ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान, आहेर यांनी भेट घेतल्याच्या वृत्तास खैरे यांनी दुजोरा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनियमित घंटागाड्यांप्रश्नी अधिकाऱ्यांना खडेबोल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विभागात घंटागाड्या अनियमित येत असल्याने कचऱ्याची समस्या वाढली आहे. कमी वेळेत कचरा उचलण्याचे व ‘अचिव्ह पॉइंट’चे टार्गेट दिल्याने प्रभागातील संपूर्ण कचरा उचलला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शुक्रवारी प्रभाग सभेत सर्वच नगरसेवकांनी घंटागाडीप्रश्नी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावून धारेवर धरले. आरोग्य विभागाने महापालिका प्रशासनास प्रस्ताव पाठविण्याची मागणीदेखील यावेळी करण्यात आली.

पंचवटी प्रभाग समितीची सभा सभापती प्रियांका माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत ३२ लाख रुपयांच्या विकासकामांना विनाचर्चा मंजुरी देण्यात आली. कोणार्कनगरसह प्रभागात तब्बल पंधरा दिवसांनी घंटागाडी येत असल्याने परिसरात कचरा साचल्याची स्थिती आहे. याबाबत संबंधित विभागाला कळविल्यास उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवक उद्धव निमसे यांनी केला. दिवाळीपासून घंटागाडी अनियमित येत असल्याचे शांताबाई हिरे, कमलेश बोडके, पुंडलिक खोडे, सुरेश खेताडे यांनी सांगितले. प्रभाग समिती सभापतींच्या प्रभागात घंटागाडी येत नसल्याचे सांगत, अाशापुरा, भगवतीनगर आदी परिसरात घंटागाडी येत नसल्याने नागरिकांच्या समस्या वाढत असल्याचे नगरसेविका पूनम मोगरे यांनी सांगितले.

--

डॉक्टरांविरोधात वाढल्या तक्रारी

इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी नागरिकांना योग्य वागणूक देत नाहीत. नवजात बालकांना उपचार व प्रसूतीदरम्यान योग्य उपचार न मिळाल्याचे तक्रारी वाढत असल्याचा आरोप जगदीश पाटील, शांताबाई हिरे व प्रा. सरिता सोनवणे यांनी केला. प्रभागात एलईडी पथदीप कधी बसविणार, असा प्रश्न उपस्थित करीत मोकाट कुत्री पकडण्यासाठी प्रभागात वाहन येत नसल्याचे नगरसेवक कमलेश बोडके यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वखर्चातून बांधला १५ लाखांचा डांबरी रस्ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली शहरातील सर्वात विकसनशील नागरी भाग म्हणून वॉर्ड क्रमांक चारकडे पहिले जाते. याशिवाय कॅन्टोन्मेंट बोर्डाला नागरी भागातून सर्वाधिक करही याच वॉर्डातून मिळतो. असे असतानाही या वॉर्डातील विविध बांधकाम आराखड्यांना मंजुरी देताना तेथे प्राथमिक सुविधा देणेकामी प्रशासन कमी पडते की काय, म्हणून येथील एका बांधकाम व्यावसायिकाने १५ लाख रुपये खर्च करून आपल्या बांधकाम क्षेत्राकडे येणारा रस्ता स्वतःच डांबरीकरण करून घेतला आहे.

येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात १०० एकरहून अधिक परिसरात सध्या गुजराती बांधवांच्या आरोग्यधाम व विविध इमारतींचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे या भागात सातत्याने अवजड वाहनांची ये-जा असते. त्यामुळे येथील रस्ते वाहतुकीसाठी कूचकामी ठरत आहेत. मोठ्या प्रमाणावर बांधकाम होणार असेल तर महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून तातडीने येथे सुविधा दिल्या जातात. या बांधकाम व्यावसायिकांकडून कॅन्टोन्मेंट बोर्ड बांधकाम आराखडे मंजूर करताना डेव्हलपमेंट चार्ज आकारत असते. यामुळे प्रशासनाने किमान रस्ते व पथदीप सुविधा देणे आवश्यक असतानादेखील त्या दिल्या जात नसल्याचा आरोप देवळालीतील बांधकाम व्यावसायिक गुंडाप्पा देवकर यांनी केला. हे बांधकाम झाल्यानंतर येथे नागरिक राहणाऱ्याठी आल्यास कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महसुलात वाढ होणार आहे. याशिवाय अशा काही भागांत सुविधा देण्यासाठी नामांकित बांधकाम व्यावसायिक पुढाकार घेण्यास तयार आहेत. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्ड परवानगी देत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून महालक्ष्मी रोडवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असून, प्रशासकडे वारंवार रस्त्याबाबत पाठपुरावा करूनदेखील काम होत नसल्याने स्वखर्चातून १५ लाख रुपये खर्च करून एक किमी अंतराच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे.

लामरोड ते महालक्ष्मी मंदिर डांबरीकरणाची प्रतीक्षा

सहा नंबर नाका ते महालक्ष्मी मंदिर रस्ता परिसरात भूमिगत पाइप टाकण्याचे काम पूर्ण झाले असूनदेखील रस्ता होत नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. याच परिसरात शुद्ध हवा व हिरवाई असल्याने सकाळी व सांयकाळी नागरिकांसह पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था पाहून सर्वच प्रशासनाच्या नावाने बोटे मोडतात. लष्करी भागाला लागून असलेला एक किलोमीटरपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात आल्याने फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग १३ मध्ये लवकरच पोटनिवडणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेच्या ज्येष्ठ नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १३ मधील महिला राखीव जागेसाठी पोटनिवडणूक घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे येथील पोटनिवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. परंतु, मनसेने ही जागा राखली नाही, तर स्थायी समितीतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे नगरसेवकपदाची एक जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर नियमानुसार पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनासह राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. ही जागा महिला राखीव असल्यामुळे महिला उमेदवारांनाच या ठिकाणी निवडणूक लढविण्याची संधी असणार आहे.

...तर स्थायीचे समीकरण बदलणार

भोसले कुटुंबीयातील महिला सदस्याने मनसेच्या तिकिटावर ही निवडणूक लढविल्यास आणि अन्य सर्वच पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचा निर्धार केला तर मनसेची जागा कायम राहून महापालिकेतील तौलनिक संख्याबळही कायम राहील. परंतु, निवडणूक होऊन ही जागा शिवसेनेने जिंकल्यास मनसेचे तौलनिक संख्याबळ घसरेल. त्यामुळे स्थायी समितीतील सदस्यपदाच्या एकमेव जागेवर मनसेला पाणी सोडावे लागेल. शिवसेनेचे संख्याबळ वाढल्याने उतरत्या क्रमानुसार शिवसेनेचा एक सदस्य वाढेल. भाजपचा उमेदवार निवडून आल्यास मनसेचे संख्याबळ घटूनदेखील स्थायीतील सदस्यपद कायम राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट रोड’ला मुहूर्त!

$
0
0

कंपनीकडून निविदा प्रसिद्ध; मार्चपासून कामकाज

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसित केल्या जाणाऱ्या अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्याचे त्रिस्तरीय सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी या रोडच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली. निविदेत येत्या २२ जानेवारीपर्यंत ठेकेदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्यामुळे मार्चपासून स्मार्ट रोडच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाक्यापर्यंत चार इंटेलिजंट सिग्नल यंत्रणा उभारण्याबरोबरच सीसीटीव्ही, वाय-फाय सुविधा, सायकल ट्रॅक, ज्येष्ठांसाठी बेंचेस अशा सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाक्यापर्यंतचा १.१ किलोमीटरचा रस्ता हा स्मार्ट रोड म्हणून विकसित केला जाणार आहे. नाशिक म्युन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या बैठकीत एक किलोमीटर, शंभर मीटर अंतराच्या या रस्त्याच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी १६ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या स्मार्ट रोडच्या विकासासाठी महापालिकेने केपीएमजी या सल्लागार संस्थेची नियुक्ती केली होती. या संस्थेच्या प्रतिनिधींकडून हा आराखडा स्मार्ट सिटीच्या बैठकीत सादर करण्यात आल्यानंतर त्याला हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. ‘स्मार्ट रोड’च्या प्रारूप आराखड्यात सुचविलेल्या पर्यायांवर विचार करण्यासाठी शहर वाहतूक शाखा, एसटी महामंडळ, पोलिस आदींसमवेत संयुक्त बैठक झाली असून, त्याला मान्यता देण्यात आली आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या दरम्यान अस्तित्वात असलेले सिग्नल, चौक, मार्गस्थ होणाऱ्या वाहनांची संख्या, रिक्षा स्टॅण्ड, रस्त्यालगतच्या झाडांची संख्या आदींचा विचार केल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी कंपनीच्या वतीने शुक्रवारी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक ठेकेदारांकडून प्रस्ताव मागविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसभरात सहा घरफोड्या

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील सटाणा नाका परिसरात शुक्रवारी पहाटे पाच ठिकाणी तर पूर्व भागात एका ठिकाणी धाडसी घरफोडी झाल्याने परिसरात सर्वत्र खळबळ माजली आहे. घरफोडीचे सत्र सुरूच असून पोलिसांना चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अद्याप यश आलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दोन वेगवेगळ्या भागात अवघ्या २४ तासांत सहा घरफोडीचे प्रकार झाले असून, एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.

शहरातील सटाणा नाका येथील बागुल कॉलनी, पाटील नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी चार दुकाने व एका घरात हात साफ केला. या प्रकरणी येथील छावणी पोल‌सि ठाण्यात साक्षी ज्वेलर्सचे मालक सुवर्णकार शामकांत सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.

शिवरोडलगत त्यांचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे शटर उचकावून आतील तीन हजार १०० रुपयांची रोकड, अडीच हजाराचे चांदीचे दागिने व अन्य मुद्देमाल लंपास केला. त्यांच्या शेजारील अशोक कुलकर्णी यांच्या मालकीचे जनरल स्टोअर्स, ललित विजय जगताप यांचे लेडिज टेलरिंग दुकान, क्रांती खैरनार यांचे वैष्णवी जनरल स्टोअर्स या दुकानांचे शटर उचकावून तेथेही चोरी केली. तसेच येथील भरत भावसार हे बाहेरगावी गेले असतांना त्यांच्या घरातूप टीव्हीसह इतर किरकोळ साहित्य चोरुन नेले. याप्रकरणी सोनवणे यांच्यासह घरमालक व अन्य दुकानदारांच्या तक्रारीवरून छावणी पोल‌सिांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच छावणी पोल‌सि ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंद्रजीत विश्वकर्मा यांच्यासह पोल‌सि दाखल झाले होते.

पूर्व भागातही हात साफ

शहरातील पूर्व भागात देखील चोरट्यांनी बंद घरात घुसून ४५ हजाराचा ऐवज लंपास केला. २८ डिसेंबर रोजी चोरट्यांनी एका या घरातून ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मोहंमद सुभान अब्दुल कुर्बान (वय ५३) हे बाहेरगावी गेले होते. गुरुवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास सलमान अहमद सलीम अहमद व त्याच्या दोन साथीदाराने मोहंमद सुभान याचा बंद घराचे कुलूप तोडून घरात घुसून सोन्याची चेन व रोख रक्कमसह ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरी परत आल्यावर

मोहमद सुभान याला चोरी झाल्याचे कळताच त्याने पवारवाडी पोल‌सि ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दोन वेगवेगळ्या भागात अवघ्या २४ तासांत सहा घरफोडीचे प्रकार झाले. एकूण ९० हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.

पोलिसांकडून अद्याप एकासही अटक नाही

येथील अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी नुकतेच गुन्हेगारीमुक्त मालेगाव करण्याच्या दिशेने विशेष अभियान सुरू केले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या घरफोडीचे सत्र वाढत असून, गुन्हेगारीमुक्त मालेगाव मोहिमेवर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील या घरफोडी प्रकरणी अद्याप पोलिसांकडून एकासही अटक झालेली नसल्याने या गुन्हेगारांवर वचक बसणार कसा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘करंजवण-मनमाड योजनेचे सर्वेक्षण करा’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

करंजवण-मनमाड जल योजनेचे सर्वेक्षण १० जानेवारी २०१८ पर्यंत तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा मनमाड बचाव कृती समितीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शुक्रवारी मनमाड बचाव कृती समितीतर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग उपविभागीय कार्यालयाला देण्यात आला.

मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासंदर्भात कृती समितीचे कार्यकर्ते अशोक परदेशी व इतर मिळून सहा जणांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र शासनाने त्या अनुषंगाने करंजवण-मनमाड ग्रॅव्हीटीची जलयोजना प्रस्तावित केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून बचाव कृती समितीतर्फे सदर योजनेच्या सर्वेक्षणाचा पाठपुरावा केला जात आहे. मनमाड पलिकेनेही सकारात्मक भूमिका घेऊन सर्वेक्षण शुल्कापोटी २३ लाखांपैकी १० लाख रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाकडे अदा केले आहे.

दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरी सर्वेक्षणाचे कोणतेही काम सुरू झालेले नाही. बचाव कृती समितीने सतत पाठपुरावा सुरू ठेवला असूनही सर्वेक्षणाची निविदा प्रत्यक्षात कार्यान्वित झालेली नसल्याने शेवटी बचाव कृती समितीने म. जी. प्रा. मंडळाच्या उपविभागीय मनमाड कार्यालयाकडे निवेदन देऊन सर्वेक्षण सुरू करण्याची मागणी केली. अन्यथा १० जानेवारीपासून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बचाव समितीतर्फे ज्येष्ठ कार्यकर्ते शमशाद सय्यद यांनी म. जी. प्रा. चे सहाय्यक अभियंता सुदर्शन बहादूरे आणि सहाय्यक अभियंता सुजीता थोरात यांना निवेदन दिले. निवेदनावर मंगल केदारे, नसरीन अन्सारी, कल्पना पाराशर, अनिता इंगळे, रेखाताई येणारे, बिस्मिल्लाबी मन्सुरी, सुषमाताई तिवारी, सुशांत केदारे, सुरेश वाघ, डी. एम. व्यवहारे, रामदास पगारे, दिलीप बिडवे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठवडे बाजाराला घरघर

$
0
0


दीपक महाजन, कळवण

कळवणकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला आठवडे बाजार गेल्या अनेक वर्षांपासून ओस पडत चालला आहे. कळवण शहर व तालुक्यातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांऐवजी इतर तालुक्यातील, जिल्ह्यातील व्यावसायिकांचाच यात राबता असल्यामुळे शहराच्या आर्थिक सुबत्तेलाही उतरती कळा लागली आहे. सलग दोन ते तीन वेळा आठवडे बाजाराच्या जागा बदलल्यामुळे स्थानिक व्यावसाय‌किांनीही याकडे पाठ फिरवली आहे. तालुक्यातील अभोणा, कनाशी, जयदर, बेज, देसराणे या गावांमध्ये बाजार भरतो. त्यामुळे तेथेही सक्षम बाजारपेठा तयार झाल्या आहेत. त्यामुळे साहज‌किच कळवण शहरातील व्यावसायिकही आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडले आहेत.

दर बुधवारी कळवण शहरात आठवडे बाजार भरतो. पूर्वी सुभाष पेठ, फुलाबाई चौक भागात भरणारा हा आठवडे बाजार मध्यंतरी मेनरोड परिसरात भरत होता. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे काही वर्षांपासून आता बेहडी नदीकाठच्या परिसरात कळवण नगरपंचायतच्या माध्यमातून हा बाजार भरतो. त्यासाठी तत्कालीन ग्रामपालिकाने जागा उपलब्ध करून दिली आहे. पणन महामंडळाच्या माध्यमातून ओटे बांधण्यात आली आहेत. मेनरोडवरील आठवडेबाजार गावात यावा म्हणून प्रयत्न करणाऱ्यांना यश आले. जुन्या गावालाही गतवैभव प्राप्त झाले खरे. मात्र शहराच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या व आठवडे बाजारात विशेषतः भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलावर्गाला नदीकाठी व उतार-चढ रस्त्याने येणे-जाणे अत्यंत अडचणीचे ठरू लागले आहे. कळवणच्या आठवडे बाजारात किराणा, भुसार, फळभाज्या, प्लास्टिक वस्तू, गृहपयोगी वस्तूंचे दुकान थाटण्यात तालुक्या बाहेरील अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आता पुढे आले आहेत.

बाजार शहरातच भरावा

बेहडी नदीकाठी भरणाऱ्या आठवडे बाजार परिसरात पिण्याच्या पाण्याची, निवारा शेडची मुबलक व्यवस्था नाही. शिवाय या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे नगरपंचायतचे युनिट कार्यरत आहे. बाजारामुळे नदीपात्रात प्लॅस्टिक व अन्य प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. बुधवारच्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न अत्यंत गंभीर व धोकेदायक आहे. व्यापारी महासंघाच्या माध्यमातून लवकरच या बाबत पाऊल उचलण्यात येईल, महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळीरामांची ‘उतरणार’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचे प्रकार रोखण्यासाठी यंदा वाहतूक शाखेने जोरदार प्रयत्न केले. शहर वाहतूक शाखेकडे १३ ब्रेथ अॅनालायझर उपलब्ध आहे. याद्वारे वाहनचालकांची तपासणी केली जाणार असून यात दोषी आढळणाऱ्या तळीरामांना थेट कोर्टातच उभे केले जाणार आहे.

दरवर्षी ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’संदर्भात १०० ते १२५ या दरम्यान असलेली ही कारवाई यंदा डिसेंबरच्या मध्यापर्यंत ४६६ इतकी झाली आहे. वर्षाअखेरीस हेच प्रमाण ५०० च्या घरात पोहचू शकते. मागील दोन वर्षांपासून शहर वाहतूक शाखेने हा गुन्हा करणाऱ्या वाहनचालकास लागलीच कोर्टासमोर हजर करण्यास सुरुवात केली आहे.

मद्य प्राशानानंतर वाहने चालवणाऱ्या चालकांमुळे अनेक गंभीर अपघात होतात. यात काही जणांना जीवही गमवावे लागतात. जीवघेण्या अपघातानंतर वाहनचालकांच्या या मद्यपानाकडे मात्र डोळेझाक केली जाते. ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या वाढत्या प्रकारामुळे काही वर्षात पोलिसांनी तळीरामांना धडा शिकवण्यासाठी दंडात्मक कारवाईसोबत थेट कोर्टात पाठवण्याचा धडका लावला आहे. २०११ ते २०१५ या पाच वर्षाच्या काळात ४२० मद्यपी वाहनचालकांना कोर्टात पाठवण्यात आले. २०१६ मध्ये ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या जवळपास १०० केसेसचा समावेश आहे. २०१७ मध्ये पोलिसांनी कारवाईस गती दिली. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हबाबत वाहतूक पोलिस सातत्याने कारवाई करत असतात. इतर दिवसांपेक्षा गटारी अमावस्या किंवा नववर्ष स्वागता दरम्यान मद्यपी वाहनचालकांचे प्रमाण वाढत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मद्य प्राशन करून वाहन चालवणे गुन्हा आहे. तसेच यामुळे चालकाचा तसेच इतरांचा जीव धोक्यात सापडतो. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या केसेस करताना ब्रेथ अनालायझर वापरले जाते. रक्तातील अल्कोहलचे प्रमाण जास्त आढळून आल्यास संबंधीत वाहनचालकाचे वाहन लागलीच जमा करण्यात येते. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून ते प्रकरण कोर्टात सादर केले जाते.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिस व पोलिस स्टेशनचे कर्मचारी वाहनचालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असून संशयित वाहनचालकांची लागलीच तपासणी होत असल्याचा दावा एका पोलिसांनी केला. यासाठी शहर वाहतूक शाखेकडे १३ ब्रेथ अॅनालायझर उपलब्ध आहे. शहर वाहतूक शाखेच्या चार युनिट्स असून, प्रत्येक युनिटकडे दोन ते तीन इतके मशिन्स पुरवले जातील. यंदा ४६६ तळीरामांवर कारवाई करीत वाहतूक शाखेने सात लाख ७१ हजार ७१० रुपयांचा दंड वसूल केला. सध्या नववर्ष स्वागत पार्ट्यांच्या आयोजनाची धूम सुरू असून, पोलिसांनी टवाळखोरांना रोखण्यासाठी आपल्या परीने तयारी सुरू केली आहे. शहरात नुकत्याच हत्येच्या तीन घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची खांदेपालट करण्यात आली असून, या घटनांचे पडसाद नववर्ष स्वागतावर पडू शकते.

शिक्षा अन् दंडही
‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या गुन्ह्यात संशयित दोषी आढळून आला तर त्यास मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १८५ नुसार सहा महिने शिक्षा किंवा तीन हजार रुपयांचा दंड किंवा हे दोन्ही होऊ शकतात. याबरोबर, संशयितांनी दुसऱ्या वेळी अशाच प्रकारे कायद्याचे भंग केल्याचे सिद्ध झाल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन जानेवारीपासून चंदनपुरीत यात्रोत्सव

$
0
0


म. टा. वृत्तसेवा,मालेगाव

प्रतीजेजुरी म्हणून ओळखले जाणारे तालुक्यातील चंदनपुरी येथे येत्या २ जानेवारीपासून यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या यात्रोत्सावास दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर येथील चंदनपुरी ग्रामपंचायत, जय मल्हार ट्रस्ट तयारीला लागले आहेत. ग्रा. प. ट्रस्ट तसेच पंचायत समिती व पोल‌सि प्रशासनाची यासंबंधी गुरुवारी बैठक झाली. यावेळी पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, सरपंच योगिता अहिरे, उपसरपंच रोशना सोनवणे, ट्रस्ट अध्यक्ष सतीश पाटील, किल्ला पोल‌सि ठाण्याचे निरीक्षक सुरेश पारधी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यात्रोत्सावात लहान मोठ्या व्यावसायिकांना दुकाने लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, मंडप, प्रसाद, पुजाविधी आदी सुविधांची उपलब्ध करून देणे अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. पोल‌सि प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याचे पारधी यांनी सांगितले. तर ट्रस्ट अध्यक्ष सतीश पाटील यांनी दोन जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते खंडेरायाची पूजा होऊन यात्रोत्सावास प्रारंभ होईल भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता स्वयंसेवक नियुक्त केले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्याविरोधात रेल्वे कर्मचारी आक्रमक

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

येथील रेल्वेचे सिनिअर सेक्शन इंजीनिअर व्ही. के. सोनवणे पदाचा गैरवापर करीत आहेत. कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. तसेच हिटलरशाही पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ ऑल इंडिया एससीएसटी रेल्वे एम्प्लॉयीज अशोशिएशन ओपन लाईन शाखेच्या वतीने गुरुवारी दुपारी एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी वरिष्ठ सहायक मंडल अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

व्ही. के. सोनवणे यांनी पदाचा गैरवापर करीत रेल्वे कर्मचाऱ्यांशी दुर्व्यवहार सुरू केला आहे. याबाबत अनेक कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. परंतु दखल घेतली गेली नाही. ऑल इंडिया एससीएसटी रेल्वे एम्प्लॉयीज अशोशिएशन ओपन लाईन शाखेच्या वतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी व्ही. के. सोनवणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सहायक मंडल अधिकारी गुणशेखरन यांना मागण्यांचे निवेदन दिले. गुणशेखरन यांनी प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवेल असे आश्वासन त्यांनी दिले. झोनल अतिरिक्त सचिव सतीष केदारे, प्रदीप गायकवाड, सी. आर. भालेराव, एन. बी. नवसारे, सिद्धार्थ जोगदंड आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी सोनवणे यांच्या बदलीची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्हा बँकचे संचालक मंडळ बरखास्त

$
0
0

नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दोन दिवसापूर्वीच भाजपचे केदा आहेर यांची निवड झाली असतानाच, नोकरभरती प्रकरणात सहकार विभागाने जिल्हा बँकेवर बरखास्तीची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. सहकार कलम ११० प्रमाणे विभागीय सह निंबधक मिलींद भालेराव यांनी ही कारवाई केली. शनिवारी बँकेची सूत्रे प्रशासकांनी सांभाळली आहेत. या कारवाईमुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. बेकायदेशीर नोकरभरती आणि बँकेच्या पैशाने स्वतःचे पद वाचविण्यासाठी केलेला खटाटोप संचालक मंडळाच्या अंगलट आला असून आरबीआयच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेचा कारभार नेहमीच वादात राहीला आहे. संचालकांच्या लहरी कारभारामुळे अखेर शनिवारी विभागीय सहनिबंधक मिलीद भालेराव यांनी जिल्हा बँकेवर बरखास्तीची कारवाई केली. बँकेवर प्रशासक म्हणून भालेराव यांनी पदभार स्विकारला आहे. बेकायदेशीर नोकरभरती आणि अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी झालेल्या खर्चापोटी सहकार विभागाने विद्यमान संचालकांवर आठ कोटी ३६ लाखांची वसुली काढत त्यांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यात विद्यमान अध्यक्ष केदा आहेर यांच्यासह माजी अध्यक्ष नरेंद्र दराडेसह १९ संचालकांचा समावेश होता. त्यांना २२ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु त्यापूर्वीच आरबीआयच्या आदेशानुसार कलम ११० अन्वये बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वीच बँकेवर प्रथमच भाजपचे केदा आहेर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे सहकार क्षेत्रात भाजपाचा प्रवेश हा कमनशिबी ठरला आहे. या संचालकांनी रक्कम भरली नाही तर थेट त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images