Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिक बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहकार विभागाने जिल्हा बँकेपाठोपाठ वार्षिक दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवत बरखास्तीची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी कलम ४५ अन्वये बरखास्तीची कारवाई करीत अप्पर निबंधक अनिल चव्हाण यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

बाजार समितीच्या कारभारात मोठ्या प्रमाणार अनियमितता, बेकायदेशीर नोकरभरती, नियमबाह्य कामकाज यामुळे सहकार विभागाने बरखास्तीची कारवाई केल्याने सभापती शिवाजी चुंभळेंसह शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. संचालक मंडळाची गतवर्षभरापासून बाजार समितीमधील अनियमिततेच्या मुद्यावर चौकशी सुरू होती. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे १३ कोटी २६ लाख, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे थकीत कर्ज १२१ कोटी, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे एकूण १३ कोटी ९२ लाख, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ९९ लाख रुपयांचे थकीत कर्जाचा भरणा संचालक मंडळाने अद्याप पूर्णपणे केलेला नाही. निलंबित कर्मचाऱ्यांच्या वकिलाची फी देण्यासाठी ६ लाख ५० हजारांचा नियमबाह्य खर्च, ऑगस्ट २०१५ ते डिसेंबर २०१६ दरम्यान विविध न्यायालयीन कामकाजासाठी नियमबाह्य पध्दतीने वकिलांच्या फीसाठी ५३ लाख ५८ हजार १४० रुपयांचा खर्च करणे, १३ लाख ७७ हजार ६८८ रुपयांचा जाहिरात खर्च, नियमबाह्य पध्दतीने रोजंदारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांच्या पगारावर २२ लाख २४ हजार ७६६ रुपयांचा खर्च केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ४५ (१) अन्वये संचालक मंडळाला जून महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. जूनपासून या संचालक मंडळावर ठेवण्यात आलेल्या दोषारोपाबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावणी सुरू होती. संचालक मंडळाने आपली भूमिका मांडल्यानंतर बाजार समितीमधील कामकाजात अनियमितता आढळून आल्याच्या मुद्यावर शनिवारी जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीचा आदेश काढला.

पंधरा दिवसांचा दिलासा

बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असली तरी संचालक मंडळाला पंधरा दिवसांचा दिलासा मिळाला आहे. संचालक मंडळाने जिल्हा निबंधकांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागीतली होती. या याचिकेवर जुलै महिन्यात सुनावणी होऊन न्यायालयाने बरखास्तीच्या कारवाईपासून पुढे १५ दिवसांच्या मुदतीत पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुदत दिली होती. यानुसार समितीचे संचालक मंडळ हे आता या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.

पिंगळे-चुंभळे वाद

बाजार समिती बरखास्तीला माजी सभापती देवीदास पिंगळे आणि विद्यमान सभापती शिवाजी चुंभळे यांच्यातील वादही कारणीभूत आहे. पिंगळे यांच्या काळात बाजार समितीच्या तीन कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीची थकीत रक्कम घेऊन जाताना लाचलुचपत विभागाने पकडले होते. गुन्हा दाखल होऊन चौकशीत पिंगळे यांच्या घरी पैसे घेऊन जात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पिंगळे यांना पायउतार व्हावे लागले होते. यानंतर शिवाजी चुंबळे यांची सभापतिपदी, तर संजय तुंगार उपसभापतिपदी बिनविरोध वर्णी लागली. मात्र, तरीदेखील बाजार समितीचे कामकाज नेहमीच वादग्रस्त राहिले.

यापूर्वीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभाराचा ठपका विद्यमान संचालकांवर ठेवण्यात आला आहे. बरखास्तीच्या मुद्यावर उच्च न्यायालयाने पंधरा दिवसात संचालक मंडळास आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे.

- शिवाजी चुंभळे, सभापती, नाशिक बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिका म्हणते, आधी तुम्हीच ट्रॅक उभारा!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकरोडवर अनंत कान्हेरे मैदान ते सातपूरपर्यंत दुतर्फा पाच किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक उभारण्याचा प्रस्ताव नाशिक सायकलिस्ट असोसिएशनने महापालिकेला दिला आहे. त्र्यंबकरोड सोबतच महापालिकेच्या रिंगरोडवरही सायकल ट्रॅक उभारण्याची मागणी असोशिएशसने महापालिकेकडे केली आहे. सदर ट्रॅक महापालिकेने उभारावा, अशी सूचना असोसिएशनने केल्यानंतर असोसिएशननेच आधी शंभर मीटरचा ट्रॅक नमुना म्हणून तयार करून देण्याचा सल्ला पालिकेने दिला आहे.

त्र्यंबररोडवर अनंत कान्हेरे मैदानापासून ते सातपूर गावापर्यंत दुतर्फा १२ मीटरचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर अडीच मीटरवर सायकल ट्रॅकसाठी कलर पट्टे मारण्यात यावे आणि त्यावर सायकलीचे चिन्ह लावावे, असा प्रस्ताव नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे दिला. तसेच सदरचा ट्रॅक महापालिकेने तयार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. शहर अभियंता यू. बी. पवार यांनी असोशिएशनच्या सूचनेचे स्वागत केले आहे. परंतु या ट्रॅकची उपयुक्तता सिद्ध होण्यासाठी सर्वप्रथम नमुना म्हणून नाशिक सायकलिस्टने शंभर मीटरचा ट्रॅक निर्माण करून दाखवावा, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेवू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

रिंगरोडचाही प्रस्ताव

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या मध्य व बाह्य रिंगरोडवर ४० कि.मी. लांबीचा सायकल ट्रॅक उभारण्याची मागणी सुद्धा सायकलिस्ट असोसिएशनने केली आहे. पर्यावरण संवर्धन व सायकल प्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी रिंगरोडवर स्वतंत्र सायकल ट्रॅकची आखणी करण्याची सूचना असोसिएशनने महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या प्रस्तावाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता सर्वेक्षणासाठी महापौरांचे सज्जतेचे आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या ४ जानेवारीपासून शहरात स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी प्रशासनाला दिले. पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिक यावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या कामकाजात केलेल्या हलगर्जीपणामुळे नाशिकची क्रमवारी घसरल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौरांनी यावेळी दिला.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात ४ जानेवारीपासून स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. देशातील ४१४० शहरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेअंती स्वच्छ शहरांची यादी जाहीर केली जाणार आहे. गतवर्षी स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकची क्रमवारी १५३व्या क्रमांकावर घसरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करीत यंदा पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेची जबाबदारी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ सर्वेक्षणाची आढावा बैठक स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती सतीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या खातेप्रमुख, विभागीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांच्या या बैठकीत महापौर भानसी यांनी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकचा पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाकिस्तानला धडा शिकवा!

$
0
0

वागणूकप्रकरणी हिंदू जनजागृती समितीची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पाकच्या ताब्यात असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानने अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन मानवतेला काळिमा फासला आहे. त्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ३०) धुळे येथील हिंदुत्ववादी संघटनांनी पाकिस्तानच्या विरोधात संतप्त निदर्शने करीत पाकला कायमचा धडा शिकवावा, अशी मागणी केली.

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या धुळे येथील आंदोलनात हिंदू एकता आंदोलन, सनातन संस्था आणि अन्य राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या संघटनांकडून विविध मागण्यांचे निवेदन स्थानिक प्रशासनाला देण्यात आले. या निवेदनात, भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरी केल्याच्या खोट्या आरोपाखाली पाकिस्तानने फाशीची शिक्षा घोषित केली आहे. जाधव हे माजी नौदल अधिकारी असल्याने त्यांच्यावर अशी कारवाई करणे, हे भारतावर कुरघोडी करण्याच्या षड्यंत्राचा एक भाग आहे, असेही नमूद केले आहे. नुकतीच त्यांच्या आई आणि पत्नी यांनाही पाकिस्तानमध्ये अपमानित करण्यात आले. कुटुंबियांची भेट घडवताना त्यांना समोरासमोर पण वेगवेगळ्या काचेच्या खोल्यांमध्ये ठेवले आणि एकमेकांशी फोनद्वारे संवाद साधण्यास देणे, त्यांच्या आई साडी घालून आणि कुंकू लावून आल्याने त्यांना साडी बदलून अन्य वस्रांमध्ये येण्यास सांगणे, तसेच कुंकू पुसून येण्यास सांगण्यात आले, या सर्व गोष्टींचा समितीद्वारे निषेध करण्यात आला. भेट झाल्यानंतरही जाणीवपूर्वक त्यांना पत्रकारांच्या समोर काही काळ थांबवण्यात आले आणि पाकिस्तानी पत्रकारांनी त्यांना अवमानकारक प्रश्‍न विचारून जाधव यांचा आई आणि पत्नी यांची अवमानना केली असल्याचेही निवेदना म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुकाणू समितीत पडली फूट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना, नेते यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सुकाणू समितीत फूट पडली आहे. या समितीत दोन गट पडले असून एका गटाच्या म्हणण्याप्रमाणे समिती बरखास्त करण्यात आली आहे, तर दुसरा गट समिती अविरत कार्यरत राहणार असल्याचे सांगत आहे. त्यामुळे शेतकरी बुचकळ्यात पडले आहेत.

सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना, नेते यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सुकाणू समितीत फूट पडली आहे. या समिती प्रमुख सदस्यांनी एकत्र येऊन गोदावरी बँकेत बैठक घेत समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तसेच १ मार्च २०१८च्या राज्यव्यापी शेतकरी संपात सहभागी न होण्याचा निर्णयही जाहीर केला.

शेतकरी संपातून पुणतांबे येथील शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीने माघार घेतल्यानंतर हा संप सुरू ठेऊन या आंदोलनाचे केंद्र नाशिक बनले होते. त्यानंतर शेतकऱ्यांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या काही सदस्यांनी औरंगाबाद येथे समितीच्या नावाने १ मार्च २०१८ पासून पुन्हा शेतकरी संपाची हाक दिल्यामुळे इतर सदस्यांनी आक्षेप घेत त्याला विरोध केला आहे. या काळात द्राक्ष, कांदे, ऊस, टमाटे, भाजीपाला असा अनेक प्रकारचा शेतमाल बाजारात विक्रीसाठी येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे या समितीच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे.

या बैठकीत समितीचे काम दिशाहिन झाले असून, जनाधार असलेल्या नेत्यांना विश्वासात न घेता ठराविक लोक निर्णय घेऊन मुळ उद्द‌िष्टांपासून भरकटत असल्याचा आरोपही करण्यात आला. समितीची व्याप्ती वाढवून पुलर्रचना करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्याचप्रमाणे पुढील काळात देशपातळीवर स्थापन झालेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसोबत काम करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. गोदावरी बँकेत झालेल्या या बैठकीत हंसराज वडघुले, अमृता पवार, चंद्रकांत बनकर, कैलास खांडबहाले, नाना बच्छाव, माधुरी भेदाणे, चेतन शेलार, प्रकाश चव्हाण, गागंधर निखाडे, संदीप जगताप, दत्तू ढगे, नितीन रेाठे पाटील, भिमराव कडलग, विलास लोखंडे, योगेश कापते आदी उपस्थित होते.

कार्यरत राहणार!

नाशिक : कर्जमुक्ती व हमी भावाच्या प्रश्नासाठी सुकाणू समिती अविरत कार्यरत राहणार असून, ही समिती बरखास्त होण्याच्या बिलकुल शक्यता नसल्याचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये सुकाणू समितीची राज्यस्तरीय बैठक होत असून, या बैठकीला समितीमधील सर्व प्रमुख संघटनांचे नेते व पदाधिकारी उपस्थ‌ित राहणार आहेत. पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असतील तर ते देखील दूर केले जातील असे देखील या स्पष्ट करण्यात आले आहे. सुकाणू समितीत सामील नाशिक येथील काही कार्यकर्त्यांमधील स्थानिक मतभेदांमुळे सुकाणू समिती बरखास्त झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरपूरमध्ये स्पिरिटचा साठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतातील गवताच्या गंजीखाली दडवून ठेवलेला सुमारे दोन लाख रुपये किमतीचा स्पिरिटचा अवैध साठा राज्य उत्त्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने हस्तगत केला. ही कारवाई नवापाडा (रोहिणी, ता. शिरपूर) येथे करण्यात आली.

रोहिणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या नवापाडा शिवारात एका शेतात गवताच्या (कडबा) गंजीखाली मोठ्या प्रमाणात स्पिरिटचे ड्रम लपविण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून बुधवारी मध्यरात्री धुळे आणि नंदुरबार येथील भरारी पथकाच्या मदतीने उपरोक्त ठिकाणी छापा मारण्यात आला. या ठिकाणी गवतात लपविलेले २२ प्लास्टिक ड्रम सापडले. यात पाच हजार लिटर व सुमारे एक लाख ९८ रुपये किमतीचे बेवारस स्पिरिट विभागीय पथकाच्या हाती लागले. ही कारवाई विभागीय पथकाचे निरीक्षक एम. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश सावखेडकर, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईसाठी पहाटेचे उड्डाण संक्रांतीनंतरच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वर्षअखेरीस विमानसेवेचा प्रारंभ झाला असला तरी नाशिककरांना पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पहाटेची मुंबईसेवा मकरसंक्रांतीनंतर मिळणार आहे. एअर डेक्कन कंपनीने विमानसेवेचे वेळापत्रक बदलले असून ते ३१ डिसेंबरपासून लागू होणार आहे.

एअर डेक्कनने नाशिक, मुंबई, जळगाव आणि पुणे या शहरांसाठी २४ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू केली आहे. नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा सध्या नियमित वेळेत आहे. मात्र, तांत्रिक कारणास्तव नाशिक-मुंबई-नाशिक या सेवेचे नियोजन बदलण्यात आले आहे. त्यामुळेच पहाटे ६.२० ऐवजी सकाळी ११.५५ वाजता नाशिकहून मुंबईकडे विमान जात आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच

येत्या मकरसंक्रांतीपर्यंत पहाटेची विमानसेवा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीने वेळापत्रक बदलले असून, ते ३१ डिसेंबरपासून लागू केले आहे. दरम्यान, पुणे सेवेला मोठा प्रतिसाद असून, सायंकाळी असलेली ही सेवा यापुढेही कायम राहणार आहे.

बुकिंग केलेल्यांना मेसेज

पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे ज्यांनी प्रवासाचे बुकिंग केले आहे त्यांना एअर डेक्कनच्यावतीने मेसेज पाठविले जात आहेत. नव्या वेळापत्रकानुसार प्रवासाचे नियोजन करुन बुकिंग करावे त्यासाठी कुठल्याही प्रकारचे ज्यादा शुल्क किंवा तिकीट रद्दचे शुल्क आकारले जाणार नाही, असे कंपनीने जाहीर केले आहे.

जळगावसेवा मर्यादित

एअर डेक्कनकडे उपलब्ध असलेले विमान आणि तांत्रिक बाबी याचा फटका जळगाव सेवेला बसला आहे. त्यामुळेच संपूर्ण आठवडाभर सेवा जळगावकरांना मिळणार नाही. ३१ डिसेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत मुंबईहून दुपारी १.१५ ला निघालेले विमान दुपारी २.४५ ला जळगावला पोहचेल. तर, दुपारी ३.१० ला हे विमान जळगावहून निघेल आणि मुंबईला दुपारी ४.४०ला पोहचेल. मात्र ही सेवा मंगळवार, बुधवार आणि रविवार असे तीन दिवसच मिळणार आहे. तर, १४ जानेवारी ते २४ मार्च या कालावधीत सकाळी ७.४०ला मुंबईहून विमान निघेल आणि जळगावला ९.१० ला पोहचेल. ही सेवा मात्र मंगळवार ते रविवार अशी मिळेल. तर, मंगळवार, बुधवार आणि रविवार असे तीन दिवस जळगावहून सकाळी ११.१५ला निघेल आणि १२.४५ला मुंबईला पोहचेल.


नवे वेळापत्रक असे

३१ डिसेंबर ते १४ जानेवारीपर्यंत

नाशिक-मुंबई

सकाळी ११.५५ ते १२.४५ – मंगळ, बुध, रवि

नाशिक-मुंबई

दुपारी ३.५० ते ४.४० – गुरूवार ते शनिवार

मुंबई-नाशिक

दुपारी ५.१० ते ४.४० – मंगळवार ते रविवार

नाशिक-पुणे

सायं ६.२० ते ७.०० - मंगळवार ते रविवार

पुणे-नाशिक

सायं ७.२० ते ८.०० – मंगळवार ते रविवार

--

१४ जानेवारी ते २४ मार्च

नाशिक-मुंबई

सकाळी ६.२० ते ७.१० – मंगळवार ते रविवार

मुंबई-नाशिक

सायंकाळी ५.१० ते ६.०० - मंगळवार ते रविवार

नाशिक-पुणे

सायं ६.२० ते ७.०० - मंगळवार ते रविवार

पुणे-नाशिक

सायं ७.२० ते ८.०० - मंगळवार ते रविवार

(वेळ - निघण्याची आणि पोहचण्याची)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर सेफ्टीकडे पोलिसांचे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गतवर्षाला निरोप देऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. हॉटेल्स, पब यासह वेगवेगळ्या ठिकाणी नववर्ष स्वागत पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जास्त गर्दी होणाऱ्या पार्टीस्थळांची पाहणी करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले असून, आग प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत किंवा नाही याकडे लक्ष पुरवले जाते आहे.

मुंबईतील परळ भागातील कमला मिल कम्पाउंड येथील पबला लागलेल्या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आग प्रतिबंधक उपाययोजनांची व्यवस्थित अंमलबजावणी झाली नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून, या घटनेचे सावट नववर्ष स्वागताच्या सेलिब्रेशनवर दिसून येते आहे. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, अशा कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये सर्वच प्रकाराच्या सुरक्षांकडे लक्ष पुरवणे महत्त्वाचे असते. मुंबईतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कार्यक्रम आयोजित होत असलेल्या ठिकाणांना भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्तकालीन दरवाजे, आग प्रतिबंधक उपाययोजना आहेत की नाही हे तपासण्याचे काम सुरू असल्याचे आयुक्त सिंगल म्हणाले. दरम्यान, उत्साहाच्या भरात आपला किंवा इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह हा प्रकार गंभीर असून, तो रोखण्यासाठी पोलिस आपल्यापरीने प्रयत्न करीत आहे. मात्र, नागरिकांनीच हे टाळावे. तरीही कोठे अपघात झाल्यास इतर नागरिकांनी मदतीला यावे. जखमीला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. दोन दिवसांपूर्वी कळवण येथील डॉ. सुहास कोटक यांनी अमृतधाम जंक्शन येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रस्त्यावरच उपचार केले. अॅब्युलन्स येईपर्यंत कोटक यांनी प्रयत्न सुरू ठेवले. कोटक यांच्याप्रमाणे सर्वांनीच अशा वेळी मदत करावी, असे आवाहन सिंगल यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार आयुक्तांची कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक गैरव्यवहारांमुळे सतत चर्चेत असलेल्या आणि जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वादग्रस्त संचालक मंडळ शनिवारी बरखास्त करीत रिझर्व्ह बँकेने संचालकांना मोठा दणका दिला. बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, केदा आहेर यांचे अध्यक्षपद हे औटघटकेचे ठरले असून, या निर्णयामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. अनपेक्षित झालेल्या या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून बँकेवर बरखास्तीची टांगती तलवार होती. रिझर्व्ह बँकेच्या पत्रानुसार सहकार आयुक्तांनी शनिवारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०चे कलम ११० ए (१) (३) अन्वये संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासकाची नियुक्ती केली आहे. प्रशासक म्हणून विभागीय सहनिंबधक मिलिंद भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने सन २०१५ व २०१६ या दोन वर्षांत नोकरभरती, सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करणे, बंदुकधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक, तिजोरी खरेदी करणे व सरकारी अध्यादेशाविरोधातील बेकायदेशीरपणे न्यायालयीन खर्च करण्याचे निर्णय घेतले. संचालक मंडळाच्या या निर्णयाविरोधात लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्यानंतर संचालक मंडळाच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले होते. तसेच, वसुलीअभावी बँकेचा एनपीए वाढल्याचा अहवाल नाबार्डने सन २०१६ मध्येच दिला होता. त्याच अहवालाच्या आधारे राज्य सरकारनेही जुलै २०१७ मध्ये बँकेच्या बरखास्तीबाबत रिझर्व्ह बँकेला पत्र पाठविले होते. बरखास्तीची कारवाई होत नसल्याने बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपने मोठा आटापिटा केला होता. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करीत केदा आहेर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकली होती. त्यांच्या निवडीला आठवडा होत नाही तोच नोकरभरती व न्यायालयातीन लढाई प्रकरणात कलम ८८ अन्वये चौकशीचे प्राधिकृत अधिकारी निळकंठ करे यांनी आरोपपत्र निश्चित करून संचालक मंडळावर दोषारोप दाखल केले होते. ही कारवाई सुरू असतानाच शनिवारी बरखास्तीचे आदेश काढले.

दुसऱ्यांदा बरखास्तीची कारवाई

जिल्हा बँकेवर आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचारप्रकरणी दुसऱ्यांदा बरखास्तीची कारवाई झाली आहे. सन २०१३ मध्ये याच कलम ११० अन्वये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. विशेष म्हणजे सध्याच्या संचालक मंडळातील ११ संचालकांवर यापूर्वीही बरखास्तीची कारवाई झाली आहे. अद्वय हिरे अध्यक्ष असताना भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेमुळे जिल्हा बँकेवर २३ मे २०१३ रोजी आरबीईने कलम ११० नुसार बरखास्तीची कारवाई केली होती.

सोमवारी मुंबईत बैठक

बरखास्तीच्या कारवाईसंदर्भात संचालक मंडळाने पालकमंत्री गिरीश महाजन यांची विश्रामगृहावर भेट घेत कैफीयत मांडली. रिझर्व्ह बँकेची कारवाई असल्याचे सांगत महाजन यांनी अंग काढून घेतले. तरीही संचालकांच्या समाधानासाठी सोमवारी मुंबईत सहकार मंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिले.

शनिवारीच पायउतार

गेल्या शनिवारी (दि. २३) केदा आहेर यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. परंतु, पुढचाच शनिवार त्यांच्यासाठी अनलकी ठरला. बँकेत येण्यापूर्वीच प्रशासकांनी ताबा घेतल्याने आहेरांना रस्त्यांवरून माघारी परतावे लागले.

गैरव्यवहारप्रकरणी चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही पक्षाच्या संचालकांना पाठीशी घालणार नाही.

- गिरीश महाजन, पालकमंत्री

राज्याच्या सहकार आयुक्तांच्या आदेशान्वये प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. बँकेचा आढावा घेऊन बँकेचे भांडवल पर्याप्त प्रमाण टिकविण्याला प्राधान्य दिले जाईल. कर्जवसुलीसाठी प्राधान्य देऊन बँक पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

- मिलिंद भालेराव, प्रशासक, जिल्हा बँक

कर्जमाफीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे भांडवल पर्याप्तताचे प्रमाण कमी झाले. आम्ही नियमानुसार कामकाज केले असून, बरखास्तीसंदर्भात कोणतीही सूचना आम्हाला केलेली नाही. नोकरभरती नियमानुसार केली आहे.

- नरेंद्र दराडे, माजी अध्यक्ष, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अनुवादासाठी भारतात प्रतिकूल वातावरण’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा


उत्तम अनुवाद करण्यासाठी प्रदीर्घ अनुभव, वाचन व झोकून देण्याची वृत्ती अंगीकारावी लागते. वर्तमान काळात चांगले अनुवाद होत नसल्याकारणाने नोबेल पारितोषिकांपासून आपण वंचित असल्याची खंत छिंदवाडा येथील प्रसिद्ध कवी अनुवादक व ज्येष्ठ साहित्य व सिनेमा समीक्षक प्रा. विष्णू खरे यांनी व्यक्त केली.

येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अनुवाद विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उदघाटन मविप्र संस्थेचे उपसभापती राघो अहिरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी पुणे येथील प्रसिद्ध कवी, अनुवादक व समीक्षक डॉ. चद्रकांत पाटील होते.

आपल्या बीजभाषणात बोलतांना प्रा. विष्णू खरे म्हणाले, वर्तमान काळात चांगले अनुवाद होत नाहीत. परिणामी नोबेल पारितोषिक मिळत नाही. चांगले अनुवाद होण्यासाठी युरोपमध्ये स्वतंत्र अनुवाद विभाग आहेत. आपल्या देशात मात्र अनुवाद हा विषय प्रामुख्याने विचारात घेतला जात नाही, त्यांचे स्वतंत्र प्राध्यापक नाहीत, त्यामुळे रितसर प्रयत्न होत असलेले दिसून येत नाही. परिणामी अनुवाद या विषयाची भारतासारख्या देशात निकड असतांना सुद्धा उत्तम अनुवाद होत नसल्याची खंत खरे यांनी व्यक्त केली.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. चंद्रकांत पाटील, म्हणाले की, दोन संस्कृतीमधील अनुबंध समजल्याशिवाय अनुवाद करता येत नाहीत. युरोपातील छोटी छोटी राष्ट्रे त्यांचे साहित्य अनुवादीत करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करतात. परंतु या बाबतीत आपल्या देशात मात्र उदासिनता दिसून येते.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी अनुवाद या विषयाचे महत्त्व विषद करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. या प्रसंगी पुणे येथील नागपूर येथील कवी व प्रा. डॉ. प्रफुल्ल शिलेदार, प्राचार्य डॉ. शिरीष चिंधडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरीला मिळावा हेरिटेजचा दर्जा

$
0
0

पर्यावरणप्रेमींची महसूल आयुक्तांकडे मागणी

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत परिसर आध्यात्मिक व पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. याच गोदावरीच्या काठावर आध्यात्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व असलेला कुंभमेळा भरतो.

या कुंभमेळ्याची नुकतीच युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून नोंद केली आहे. त्यामुळे गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतातील नैसर्गिक साधनसंपत्तीलाही हेरिटेज दर्जा द्यावा, अशी मागणी त्र्यंबकेश्वर संस्थानाच्या विश्वस्त ललिता शिंदे आणि पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी केली आहे.

ब्रह्मगिरी पर्वताच्या रांगेत सरकारकडून खोदकाम करण्यास बंदी करण्यात आली आहे. मात्र असे असूनही त्र्यंबकेश्वर परिसरात या बंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन होत आहे, याकडेही या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामुळे ब्रह्मगिरीचे व पर्यायाने गोदावरीचे आध्यात्मिक व पर्यावरणीय महत्त्व धोक्यात येत आहे. तरी या ठिकाणी विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर खोदकामांना आळा घालण्याचे निर्देश द्यावे. परिसरातील सर्व जलस्रोतांना हेरिटेज म्हणून घोषित करण्याची मागणीचे निवेदन शुक्रवारी (दि. २९) विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांच्याकडे दिले आहे.

गोदावरीशिवाय या पर्वतावर बाणगंगा, अहिल्या आणि वैतरणा या नद्यांचा उगम होतो. गोदावरीचे उगमस्थान असलेला परिसर पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असल्याने या परिसरात खोदकामास बंदी घातली आहे. परंतु, प्रत्यक्षात या परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून, त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. या परिसरातील जंगले वा टेकड्या भुईसपाटच होत आहेत. हा प्रकार असाच सुरू राहिला तर भविष्यात गोदाच्या खोऱ्यात मोठे दुष्परिणाम घडण्याची शक्यता आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीची कोर्टासमोर छेड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याने पायी जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या रोडरोमियोविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयितास अटक केली असून, ही घटना जिल्हा कोर्टासमोर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. राजेंद्र एकनाथ वाघमारे (वय ३४, रा. वाढोली खंबाळा, ता. त्र्यंबकेश्वर) असे संशयिताचे नाव आहे.

परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी पायी घरी जात असताना संशयिताने सीबीएसपासून तिचा पाठलाग सुरू केला. कोर्टासमोर गर्दी असल्याने त्याचा फायदा घेत मुलीजवळ पोहोचला आणि अश्‍लिल बोलायला लागला. यादरम्यान त्याने तिचा विनयभंगदेखील केला. बससाठी उभ्या असलेल्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पीडित विद्यार्थिनीने धाडस दाखवत संशयित आरोपीस जाब विचारला. पीडित विद्यार्थिनीची संशयित आरोपी छेड काढत असल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यास पकडून चांगला चोप दिला. ही माहिती कोर्टात हजर असलेल्या पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीस ताब्यात घेतले. सरकारवाडा पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर युवक सतत पाठलाग करून छेड काढत असल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.

तडीपार शेळकेस अटक

शहरातून काही महिन्यांपूर्वी हद्दपार केलेला किरण दत्तात्रेय शेळके (वय २२, रा. महावीर भवन, पंचवटी) यास पोलिसांनी रामकुंड परिसरातून अटक केली. न्यायालय अथवा सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता शेळके शहरात राहत होता. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुह्याची नोंद केली आहे. सक्रिय गुन्हेगारीत सहभागी असलेल्या शेळकेविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

प्राणघातक हल्ल्यातील जखमी वडिलांचा मृत्यू

सिडको : सिडकोतील शिवशक्ती चौक येथील अजिंक्य व्हिला रो होउस येथे राहणाऱ्या मधुकर तुकाराम बोरगे (वय ७२) यांच्यावर त्यांच्याच मुलगा जॉन याने प्राणघातक हल्ला केला होता. उपचार सुरू असताना गंभीर जखमी मधुकर बोरगे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. यातील संशयित आरोपी जॉन उर्फ जीवन मधुकर बोरगे यांचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला न्यायालयाने एक जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मधुकर बोरगे यांचा शुक्रवारी त्यांच्या मुलाशी वाद झाला होता. या वादातून मुलाने मधुकर यांच्या डोक्यावर दांड्याने वार केला. यात मधुकर हे गंभीर जखमी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाथर्डी फाट्यावर मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेल्या मद्य तस्करांना रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. विभागाच्या वेगवेगळ्या पथकाने तीन ठिकाणी मद्य तस्करांना जेरबंद करीत जवळपास नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात पाथर्डी फाटा येथे झालेल्या कारवाईचा देखील समावेश आहे.

नाशिक विभागाच्या भरारी पथक क्रमांक एकने पंकज एकनाथ येवला (रा. गणेश चौक, सिडको) यास पाथर्डी फाटा परिसरातील गजलक्ष्मी रो हाऊस या ठिकाणी पकडले. सदर रो हाऊसमध्ये संशयित येवलाने दमण येथे निर्मित आणि महाराष्ट्रात बंदी असलेल्या व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ४८० बॉटल्स आढळून आल्या. हा मुद्देमाल ७६ हजार ८०० रुपये किमतीचा असून, तो जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक व्ही. ए. गोसावी, दुय्यम निरीक्षक पी. आर. मंडलिक, सहायक दुय्यम निरीक्षक चव्हाणके आदींनी केली. संशयितांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, कळवण विभागाच्या पथकाने सुधाकर कोंडाजी पुरकर (रा. चिखलआंबे, ता. चांदवड) यास पिंपळगाव बसवंत येथील जोपूळरोडवरील शरदचंद्रची पवार मार्केट यार्डाजवळ पकडले. एका चार चाकी वाहनामधून पुरकर देशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या एक हजार ४४० बॉटल्स ३० बॉक्समधून घेऊन निघाला होता. त्याच्या ताब्यातील एकूण पाच लाख ७४ हजार ८८० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, याच ठिकाणी दुसऱ्या एका कारमधून ३० बॉक्समधून १८० मिली क्षमतेच्या एक हजार ४४० बॉटल्स घेऊन जाणाऱ्या भाऊसाहेब रामराव सरोदे यास अटक करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून दोन लाख ४४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या तीन कारवाईत दोन चार चाकी आणि आठ लाख ९६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या संधी, नवी आव्हाने

$
0
0

सरतं वर्ष ओंजळीत जे काही देऊन जातं त्यातूनच अनेक संधींना धुमारे फुटतात. २०१७ या वर्षानं नाशिकच्या ओंजळीत अनेक हर्षदीप दिले आहेत. आता त्यातूनच २०१८ या वर्षात नव्या संधी निर्माण केल्या आहेत. काय आहेत या संधी, कुठली आहेत आव्हाने या सर्वांचा आढावा घेणारा हा फोकस...

आधार येणार ट्रॅकवर

आधार सेंटर्सच्या तोकड्या किट्समुळे नागरिकांना सध्या अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. शहरात सद्यःस्थ‌ितीत ३१ किटच्या माध्यमातून आधार एन्रोलमेंट आणि आधारमधील दुरुस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र, शहराच्या लोकसंख्येच्या मानाने दिवसेंदिवस आधार सेंटर्सवर होणारी गर्दी विचारात घेता, केवळ शहरासाठी एकूण ६० किट्सची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्याबाबत पाठपुराव्याला प्रतिसादही मिळत असून, नवीन वर्षात ही समस्या मार्गी लागेल, या दृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. याशिवाय अंगणवाडीसेविका, हॉस्प‌िटल्समध्ये टॅबच्या माध्यमातून आधारची कामे करता येणार असल्याने नागरिकांच्या समस्या सुटू शकतील, अशी आशा आहे.

नाशिक, मालेगावात ऑनलाइन सातबारा

जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये संगणकीकृत सातबारा देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, नाशिक आणि मालेगाव तालुक्यात अद्याप हे काम काहीअंशी अपूर्ण आहे. हस्तलिखित व संगणकीकृत सातबारा यांमधील साम्य अथवा तफावतीची तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यात एकूण १२ लाख १७ हजार ४७८ सातबारे असून, त्यापैकी ११ लाख ४९ हजार ६४ (९४.३८ टक्के) सातबारे एडिट मोड्युलमध्ये तपासून व आवश्यक त्या दुरुस्त्या करून अंतिम करण्यात आल्या आहेत. मात्र, ६८ हजार ४१४ सातबारांतील दुरुस्तीचे काम अजूनही बाकी आहे. हे काम फेब्रुवारीपर्यंत मार्गी लागावे, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नववर्षात सर्वच तालुक्यांमधील सातबारा ऑनलाइन मिळू शकतील.

जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हर

सर्व्हर डाऊनसारख्या तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन सातबारासह विविध दाखले देताना तलाठ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. प्रशासनाने या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी तालुका स्तरावर सर्व्हर देण्याचा विचार सुरू केला आहे. जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला असून, नववर्षात जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हरची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन आणि त्यामुळे उद््भवणाऱ्या अडचणींपासून तलाठी आणि नागरिकांचीदेखील सुटका होणार आहे.

समृद्धीचे भूसंपादन आटोपणार

समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, जिल्हा प्रशासनापुढे भूसंपादनाचे आव्हान आहे. गेल्या एक-दोन महिन्यांत या महामार्गाला होणाऱ्या विरोधाची धार कमी करण्यात सरकार आणि प्रशासनाला यश आले आहे. सद्यःस्थ‌ितीत सुमारे साडेतीनशे हेक्टर जमिनीचे संपादन होऊ शकले आहे. अद्याप सातशे ते आठशे हेक्टर जमिनीचे संपादन होणे बाकी आहे. ही संपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून नववर्षात महामार्गाचे काम सुरू करण्याचे सरकारचे आणि प्रशासनाचे नियोजन सुरू आहे.

घाटांच्या लिलावासाठी नियोजन

जिल्ह्यात २४ वाळू घाट असून, त्यापैकी केवळ सहा घाटांचे लिलाव आतापर्यंत होऊ शकले आहेत. घाटांच्या लिलाव प्रक्रियेकडे ठेकेदार पाठ फिरवत आहेत. त्यामुळे सरकारचा महसूल बुडत असल्याने पुन्हा एकदा लिलावप्रक्रिया राबविण्यात येत आहे. उर्वरित घाटांचे लिलाव होऊन सरकारचा महसूल वाढावा, यासाठी गौन खनिज विभागाकडून नियोजन सुरू आहे.

राष्ट्रीय क्रिकेट सामने

येणारे वर्ष खेळाडूंसाठी पर्वणी घेऊन येणार आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय व विविध क्रीडा संघटनांतर्फे राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरचे सामने होणार आहेत. त्यामुळे नाशिककरांना राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचे खेळ पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नाशिक शहरात जानेवारीमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटातील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांतर्फे तयारी सुरू आहे.

सायकल रेकॉर्ड होणार

सायकलविश्वात शहरात प्रथमच जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याचे प्रयत्न आहेत. हा विक्रम चार फेब्रुवारी रोजी सिंगल लाइन राइडमध्ये करण्याचे प्रयत्न आहेत. यापूर्वी बांगलादेशात ११८६ लोकांनी एका रांगेत सायकल चालवून विक्रम केला होता. नाशिक सायकलिस्ट्सने हा विक्रम मोडीत काढण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी सुमारे २५०० सायकलिस्ट्स सहभागी करण्याचे उद्दिष्ट असून, ते एकाच रांगेत सायकल चालवून गिनीज बुकमध्ये नोंद करतील.

राष्ट्रीय कबड्डी सामने

यंदा प्रथमच पुरुष व महिला गटाची ६६ वी राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे होणार आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी होणारी नाशिक कबड्डी प्रीमियर लीग यंदाच्या वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे. या वेळी संपूर्ण भारतातून पुरुष गटाचे व्यावसायिक सामने नाशिककरांना पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण भारतातून २४ संघ सहभागी होणार असून, त्यातील वीस संघ राष्ट्रीय स्तरावरील असतील.

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण होणार व्यापक

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे जिल्ह्यातील क्रीडा संघटना व खेळाडूंची बैठक होणार असून, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांबाबत माहिती देण्यात येणार आहे. मार्चमध्ये क्रीडा संघटनांना एकत्र बोलावून त्यांच्या अडचणी समजून घेण्यात येणार आहेत. त्या सोडवण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचारविनिमय होईल. एप्रिलमध्ये शालेय क्रीडाशिक्षकांची बैठक होणार असून, बैठकीत मुलांमधील क्रीडागुण कसे विकसित करायचे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मेमध्ये शाळांना सुटी असते. या कालावधीत जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विविध खेळांची शिबिरे होणार असून, गेल्या वर्षीपेक्षा प्रशिक्षण केंद्रे वाढवण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय लॉन टेनिसचे सामने

दरवर्षी निवेक क्लबच्या वतीने राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सामने होतात. यंदाही १९ वर्षांखालील महिला गटातील राष्ट्रीय सामने होणार आहेत. त्याचप्रमाणे १२ व १४ वर्षे वयोगटातील राष्ट्रीय मानांकन स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा मेमध्ये होणार आहेत.

टेबल टेनिसच्या मानांकन स्पर्धा

नव्या वर्षात राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा नाशिकला व्हावी, अशी मागणी नाशिक जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून, तिला लवकरच मान्यता मिळणार आहे. ही स्पर्धा १२ गटांत होणार आहे. १०, १२, १५, १८, २१ आणि ओपन महिला आणि पुरुष गटात ही स्पर्धा होईल. त्याचप्रमाणे टेबल टेनिस प्रीमियर लीगदेखील होणार आहे.

शंभर टक्के शाळा ‘अ’ श्रेणीत

महापालिकेच्या सर्व शाळा ‘अ’ श्रेणीत आणण्याचा प्रयत्न शिक्षण समितीकडून करण्यात येत आहे. महापालिकेच्या १२७ पैकी पहिल्या टप्प्यात ३३ शाळांना अ श्रेणी मिळाली होती. त्यानंतर ही संख्या ७७ वर पोहोचली. नव्या वर्षापर्यंत सर्व शाळा अ श्रेणीत येतील, यासाठी शिक्षण समितीकडून विविध कार्यशाळा घेण्यात येत आहेत. त्यानुसार हा टप्पा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पूर्ण होणार असल्याचा विश्वास शिक्षण समितीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

विभागीय मंडळाला मिळणार इमारत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागाची हक्काची इमारत येत्या वर्षात आकारास येणार आहे. आडगाव येथे सात एकर जागेवर ही इमारत साकारण्यात येणार असून, जानेवारीपासून बांधकामास सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाच्या हक्काच्या इमारतीसाठी पाठपुरावा सुरू होता.

बोगस अपंग शिक्षकांवर होणार कारवाई

जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने शिक्षक संघटनांच्या मदतीने बोगस अपंग प्रमाणपत्र धारण केलेल्या शिक्षकांची शोधमोहीम सध्या सुरू केली आहे. यातील पहिल्या टप्प्यात दहा शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. अशा शिक्षकांचा शोध घेणे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अशा शिक्षकांमुळे दिव्यांग शिक्षकांच्या हक्कावर गदा येत आहे. येत्या वर्षभरात बोगस अपंग शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे.

नाशिप्रला १०० वर्ष

नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेला १ मे २०१८ रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. नाशिक येथे १ मे १९१८ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या ‘राष्ट्रीय शिक्षण’ या संकल्पनेतून या संस्थेची स्थापना झाली होती. संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त १ मे २०१७ ते १ मे २०१८ यादरम्यान अनेक उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्यातील अनेक उपक्रमांची पूर्तता झाली आहे, तर विद्यार्थिहिताचे उर्वरित उपक्रम नव्या वर्षात होणार आहेत.

पर्यटन विभाग

पर्यटनाच्या दृष्टीने नव्या वर्षात रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्यामुळे येणारे वर्ष पर्यटनस्थळांच्या वाढीसाठी चांगले राहील. मनोरंजन पार्कच्या निविदा आल्या असून, त्यावर निर्णय होणार आहेत. त्यामुळे हे पार्क नव्या वर्षात सुरू होईल. त्याचप्रमाणे बोट क्लबचा विषय या वर्षात सुटण्याची चिन्हे आहेत. वेगवेगळ्या नव्या प्रकल्पांना २०१८ मध्ये चालना मिळण्याचीही शक्यता आहे. त्यात भावलीचा प्रोजेक्ट व इगतपुरीचा वेलनेसचा विषय मार्गी लागेल. या प्रोजेक्टप्रमाणेच ओझरखेड येथील पर्यटनस्थळही येत्या वर्षात पूर्ण होणार असल्यामुळे सापुताराकडे जाणारे पर्यटक येथे वळण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१७ मध्ये काही रस्ते दुरुस्त केले असले तरी त्याची संख्या खूपच कमी आहे. यावर्षी खड्डे बुजविण्याचे काम जवळपास पूर्ण झाल्यानंतर नव्या वर्षात नवीन रस्त्यांचे काम होणार आहे. या नवीन वर्षात जिल्ह्यातील २८०० किलोमीटरवर दुरुस्तीचे काम दिले जाणार असून, ८०० किलोमीटरवरील रस्त्याचे नव्याने काम केले जाणार आहे. त्यात रुंदीकरण व मजबुतीकरणाचा समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात रस्ते नादुरुस्त झाले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक टेंडरही प्रसिद्ध केले. त्याच्या निविदा आल्या असून, त्यातील काही मंजूर झाल्या असल्या तरी हे काम नव्या वर्षातच सुरू होणार आहे.

नवीन उद्योग येणार

जिल्ह्यात नवीन उद्योग यावे यासाठी २०१७ मध्ये उद्योग संघटनेपासून सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात आले. मात्र, सरत्या वर्षात मोठ्या प्रमाणात उद्योग आले नाहीत. त्यामुळे २०१८ मध्ये मोठ्या प्रमाणात विविध उद्योग येण्याची शक्यता आहे. त्यासाठी विविध ठिकाणी जागा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे तळेगाव- अक्राळे येथील प्लॉटचेही वाटप या नव्या वर्षात होणार आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणीसुद्धा उद्योजकांना मोठ्या प्रमाणात जागा मिळणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष उद्योगांच्या भरभराटीसाठी चांगले असेल.

जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेची २०१७ मध्ये झालेली निवडणूक, त्यानंतर झालेले सत्तांतर यामुळे यंदा फारशी कामे झाली नसली तरी नव्या वर्षात बहुतांश कामांना वेग येणार आहे. नोटाबंदीचा फटका, त्यानंतर जीएसटीमुळे जिल्हा परिषदेच्या कामाचा वेगही कमी झाला. त्यात अनेक निविदाही रखडल्या. आता या निविदा मंजूर होण्याची प्रक्रिया पूर्ण होत असून, नव्या वर्षात अनेक कामांना चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे सरत्या वर्षातील अडचणी येत्या वर्षात बहुतांश कमी असल्यामुळे जिल्हा परिषदेसाठी हे नववर्ष लाभदायी ठरणार आहे.

एसटी महामंडळ

तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. पुणे व मुंबई येथे ही सेवा सुरू करण्यात आली असून, नव्या वर्षात स्लिपर कोच बस सुरू होणार आहे. या बस पुणे, अहमदाबाद, इंदूर, बडोदा येथे सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. राज्यात अशा तब्बल ५०० बस राज्यभरात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या असून, नाशिकमध्ये या बसच्या संख्येतही मोठी वाढ होणार आहे. शिवशाही बसच्या प्रतिटप्प्याचे भाडे इतर बस गाड्यांच्या तुलनेत कमी ठेवण्याचा निर्णय महामंडळाने यापूर्वीच घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठे आकर्षण आहे. त्याप्रमाणे बस पोर्टचे कामही येत्या वर्षभरात पूर्ण होणार असल्यामुळे त्याचाही फायदा नाशिककरांना होणार आहे.

महामार्गालाही मिळणार गती

नाशिक- पुणे या महामार्गाची उर्वरित कामे नव्या वर्षात पूर्ण होऊन येथील वाहतूक सुरळीत होणार आहे. त्याचबरोबरच द्वारका ते नाशिकरोड उड्डाणपुलाच्या कामालाही या वर्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे. नाशिक- धुळे महामार्ग नव्या वर्षात सहापदरी होणार आहे. त्याचप्रमाणे पेठ रोड व इतर महामार्गांचीही कामे नव्या वर्षात होणार असल्याने नाशिककरांना दिलासा मिळणार आहे. या रस्त्यांच्या कामाबरोबरच काही ठिकाणी उड्डाणपूल व नवे पूलही होणार आहे.

नवीन टोइंग व्हॅन

नववर्षाच्या सुरुवातीलाच शहर वाहतूक पोलिसांकडे अत्याधुनिक टोइंग व्हॅन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या या कामाचे टेंडरचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पोलिसांच्या अटी- शर्थी मान्य करणारा, तसेच आधुनिक सेवा पुरवणारा ठेकेदार समोर आल्यास जानेवारीअखेरीस जवळपास १२ नवीन वाहनांचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

तालुका स्टेशनचा पत्ता बदलणार

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले तालुका पोलिस स्टेशन नागरिकांसह पोलिसांसाठी डोकेदुखी ठरते. या शहराची हद्द शहरापासून दूर असून, गंभीर गुन्ह्यांचा तपास असो वा घटनास्थळी पोहोचणे, सर्वच दृष्टिकोनांतून ते तापदायक ठरते. या पार्श्वभूमीवर हे पोलिस स्टेशन शहर पोलिसांत वर्ग करण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव यंदा मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे.

शहर सीसीटीव्हींच्या टप्प्यात

कुंभमेळ्यापासून शहरात सीसीटीव्ही बसवण्यासाठी राज्यस्तरावर हालचाली सुरू आहेत. मध्यतंरी हे काम अंतिम टप्प्यात आले होते. मात्र, नंतर स्मार्ट सिटीअंतर्गत या कामाची कक्षा रुंदावण्यात आली. स्मार्ट सिटीकडे शहराची वाटचाल सुरू असून, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा नव्या वर्षात कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

बॉडीवॉर्न कॅमेरे आणि आधुनिक दंड वसुली

मागील महिन्यात बॉडीवॉर्न कॅमेऱ्यांच्या खरेदीसाठी गृह विभागाने काही लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खरेदीप्रक्रिया पूर्ण होऊन शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या वर्दीवर हे कॅमेरे दिसू शकतील. यामुळे दंड वसुलीची प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊ शकेल. वाहनचालक आणि पोलिसांमध्ये होणाऱ्या वादांचे प्रमाण कमी होऊ शकते.

न्यायालयाची ‘कक्षा’ रुंदावणार

जिल्हा कोर्टाला पोलिस मुख्यालयाची अडीच एकर जागा देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ही कार्यवाही सध्या सुरू असली तरी कोर्ट प्रशासनाने आतापर्यंत प्रत्यक्ष ताबा मिळवलेला नाही. नवीन वर्षात हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल.

पोलिस मुख्यालयाचा मास्टर प्लॅन

पोलिस मुख्यालयाच्या आवारातील विविध बांधकामे, रस्ते, मैदानांसह इतर सुविधा यांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून, वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचे काम पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हे महत्त्वाचे वर्ष असून, किमान येथील बैठ्या पोलिस चाळींचे रूपांतर नवीन इमारतीत होण्याचे काम सुरू होऊ शकते.

उपकेंद्रास मिळणार नवीन जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र सद्यःस्थितीत कॅनडा कॉर्नर परिसरातील तिबेटीयन मार्केटनजीक कार्यरत आहे. या उपकेंद्रात असणारे मर्यादित अधिकार, मनुष्यबळाची वानवा आणि साधनसुविधांचा अभाव यामुळे गेली काही वर्षे हे उपकेंद्र शहर व जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे. अखेर नवनियुक्त कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी नाशिकमधील या समस्येची दखल घेऊन उपकेंद्राच्या समस्या सोडविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे नव्या वर्षात उपकेंद्र नवीन इमारतीत स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. शहरामध्ये मुंबई- आग्रा महामार्गावरील गजरा उद्योग बिझनेस सेंटर, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील संकलेचा व्हेसकॉन आयटी पार्क, नाशिकरोड परिसरातील अंधशाळा, बसस्टँडजवळील के. के. ग्रुप ऑफ कंपनी या जागांची पाहणी कुलगुरूंनी नुकतीच केली आहे.

सबकॅम्पसबाबत आशा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अधिक व्यापक होत जाणारा कारभार नियंत्रणात आणण्यासाठी विकेंद्रीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यानुसार गेल्या काही वर्षांमध्ये नाशिक आणि नगर सबकॅम्पसच्या पदरी जागा पडली. विद्यापीठाच्या सबकॅम्पससाठी दिंडोरी परिसरातील शिवनई येथे जागा आरक्षित आहे. या पडीक जागेवर स्थानिकांकडून अतिक्रमणही झाले होते. यानंतर विद्यापीठाने वॉल कंपाउंड उभारत जागेचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. आता नवीन वर्षात येथे सबकॅम्पस निर्मितीसाठी शक्य तितके प्रयत्न केले जातील , असे आश्वासन कुलगुरू डॉ. करमाळकर यांच्यासह शहरातील लोकप्रतिनिधींनी दिले आहे. यामुळे नव्या वर्षात सबकॅम्पसच्या जमिनीवर नवा प्रकल्प साकारण्याच्या दृष्टीने आशावादी पावले टाकली जातील, अशी नाशिककरांना आशा आहे.

चार नवीन अभ्यासक्रम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्र कार्यालयासाठी २० हजार चौरसफूट जागेची गरज आहे. त्या दृष्टीने पाहणी झाली आहे. लवकरच पाहणी झालेल्या जागांपैकी एक जागा निश्चित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या उपकेंद्राच्या इमारतीत नवीन वर्षामध्ये ‘पैठणी’, ‘फळबागा’, ‘दाक्षे-कांदा’ आणि ‘निर्यात’ या विषयांवर आधारित चार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. हे चारही अभ्यासक्रम नाशिकमधील उत्पादकता आणि कौशल्यगुणांशी निगडित असल्याने नाशिककरांनी याची प्रतीक्षा आहे.

आणखी बहरणार सांस्कृतिक नाशिक

नाशिक हा आधुनिक महाराष्ट्राच्या सुवर्णत्रिकोणातला एक कोन. प्राचीन काळापासून धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून गणल्या जाणाऱ्या या शहराने साधारणपणे तीन दशकांपूर्वी विकासाची कास धरली अन् पाहता पाहता ते मुंबई-पुण्याच्या पंगतीत जाऊन बसले. अर्थात, नाशिक महानगराची वाटचाल विकासाच्या महामार्गावरून समर्थपणे सुरू असल्याचा जो बोलबाला आज सर्वत्र आहे, त्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचा वाटाही मोठा आहे. बदलत्या नाशिकच्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा या क्षेत्रांमधील विविधांगी उपक्रमाची जोडही शहराला दिली. दादासाहेब फाळके स्मारक, बुद्ध स्मारक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव, यशवंतराव चव्हाण तारांगण, कुसुमाग्रज काव्य उद्यान, दादासाहेब गायकवाड सभागृह, मीनाताई ठाकरे इनडोअर स्टेडियम, वसंत कानेटकर उद्यान, महाकवी कालिदास कलामंदिर, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर नाट्यगृह अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची महापालिकेने केलेली उभारणीही नजरेत भरते. त्यातीलच काही ठळक घडामोडींवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

नाट्यगृहांना मिळणार झळाळी

महाकवी कालिदास कलामंदिराचे रिनोव्हेशन होत असून, नव्या कालिदासमध्ये अनेक सुधारणा पाहायला मिळतील. त्यात मुख्यत्वे बुकिंग ऑफिस गेटजवळच्या रूममध्ये हलविण्यात येणार असून, कालिदास नाट्यगृहाच्या अंगणातले बेटही कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे तेथून गाडी आत नेताना त्रास होणार नाही. कालिदासचे टेंडर काढण्यात आल्यानुसार विजेच्या गतीने काम सुरू आहे. सर्व खुर्च्या बदलण्यात येणार असून, दोन खुर्च्यांमधील अंतर एक मीटर करण्याचा महापालिकेचा मानस आहे. तेथील फ्लोअरिंगही व्यवस्थित होणार असून, लाइट, अॅकोस्टिक, फायर फायटिंग ही कामेही प्रस्तावित आहेत. टॉयलेटची संख्या वाढवणार असून, ती आधुनिक होणार आहेत. शहरातील इतर नाट्यगृहेही आधुनिक करणार आहेत. पलुस्करची प्रेक्षकक्षमता कमी आहे. त्याप्रमाणे त्याच्यावर खर्च करून काम होणार आहे. नाशिकरोडचा टाऊन हॉल पडून आहे. तेथे केवळ बक्षीस वितरणाचे कार्यक्रम होतात. त्याऐवजी तेथे कार्यक्रम व्हावेत, अशी अपेक्षा असल्याने त्यातही काही बदल करता येतात का, हे महापालिका तपासून पाहत आहे. कालिदास कलामंदिराचे रिनोव्हेशन करणार, त्या वेळी दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यक्रम व्हावेत, अशी महापालिकेची अपेक्षा आहे. गायकवाड सभागृहात काही बदल करून ते नाटकासाठी वापरता येते का, याची चाचपणी सध्या सुरू आहे.

नाशिककर गाजविणार थिएटर ऑलिम्पिक

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आयोजित आठव्या थिएटर ऑलिम्पिकमध्ये नाशिकच्या प्राजक्त देशमुख लिखित व अश्वमेध थिएटर्स व स्पंदन निर्मित ‘संगीत देवबाभळी’ नाटकाची निवड झाली आहे. थिएटर ऑलिम्पिक प्रथमच भारतात होत असून, त्यासाठी थेट नाशिकच्या नाटकाची निवड होणे रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाची घटना मानली जात आहे. वेगवेगळ्या देशांतील नाट्यसंस्कृती समजून घेणे आणि शिकणे हा थिएटर ऑलिम्पिकचा उद्देश आहे. जगभरातल्या सर्वोत्तम नाट्यकृतींची निवड करून आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक देवाणघेवाण करणे हे थिएटर ऑलिम्पिकचे काम आहे. दिल्ली येथे १७ फेब्रुवारी ते ८ एप्रिलदरम्यान हा नाट्यमहोत्सव होणार आहे. देशभरातून आलेल्या ११०० आणि विदेशातून आलेल्या १०० नाटकांतून ४५० नाटकांची निवड करण्यात आली असून, संगीत देवबाभळी त्यापैकी एक आहे.

नाशिकचा झेंडा व्यावसायिक रंगभूमीवर

हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीमध्ये नेहमीच अव्वल ठरलेली नाशिकची रंगभूमी आता व्यावसायिकतेसाठीही कात टाकत असून, नाशिकचे रंगकर्मी प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे. प्रसाद मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शनने हे नाटक रंगभूमीवर आणले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिक रंगभूमीवर जाणारी ही पहिलीच स्वतंत्र नाट्यकृती आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहाला आज या नाटकाचा प्रयोगही आहे. भद्रकाली प्रॉडक्शनचे ५५ वे नाटक म्हणून ‘संगीत देवबाभळी’ला सन्मान मिळत आहे. या नाटकाला व्यावसायिक रंगभूमीसाठी सादर करताना हवे ते बदल करण्याचे, तसेच हवे ते रंगकर्मी निवडण्याचे स्वातंत्र्य नाटकाचे लेखक देशमुख यांना मिळाल्याने नाटकात जान आली आहे.

नाशिक केंद्रातून पहिली दोन नाटके अंतिमला

गेल्या अनेक वर्षांपासूनची रंगकर्मींची मागणी मान्य करीत राज्य सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी आनंदाचा गोड धक्का दिला असून, राज्य नाट्य स्पर्धेत ज्या केंद्रांवर १५ पेक्षा जास्त प्रवेश आले असतील, त्यातून यंदा दोन नाटके अंतिम फेरीसाठी असतील. यापूर्वी प्रवेश कितीही असले तरी एकच नाटक अंतिम फेरीला जात होते. नाटके कितीही चांगली झाली तरी अंतिम फेरीसाठी मात्र पहिले आलेलेच नाटक पात्र ठरत होते. त्यामुळे केवळ एखाददोन गुणांनी मागे असलेले किंवा एखाद्या गटात कमी बक्षिसे मिळवल्याने मागे पडलेले नाटक मागेच राहत होते. पहिल्या नंबरच्या तोडीचे असूनही त्याला हवा तसा न्याय मिळत नव्हता. मात्र, तावडे यांनी १५ पेक्षा जास्त प्रवेश आलेल्या केंद्राकडून दोन नाटके अंतिम फेरीला जाणार असल्याची घोषणा केल्याने रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नाशिककर कवीचा सन्मान

चांदवडचे प्रसिद्ध कवी विष्णू थोरे यांची उभ्या महाराष्ट्राला वेड लावलेली ‘इश्काच्या इलाजाची दवा मला पाज गं’ ही कविता रसिकांना आगामी मराठी चित्रपटातून ऐकायला मिळणार आहे. अनेक कार्यक्रमांतून आपल्या कविता सादर करणारे कवी थोरे गायक, कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. ‘गाव व्हिलेज झालंय’ हा त्यांचा कवितांचा कार्यक्रम रसिकांनी डोक्यावर घेतला. त्यातून त्यांची ओळख सर्वदूर पोहोचली. कवितेचा अस्सल ग्रामीण बाज त्यांच्या शब्दांतून येतो. ना. धों. महानोर, कवी प्रकाश होळकर यांच्याच पठडीतला कवी म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

स्मार्ट सिटीला चालना

नववर्षाच्या प्रारंभापासून स्मार्ट नाशिकच्या विकासाला गती मिळणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत नववर्षात विविध प्रकल्पांचा प्रारंभ होणार असल्याने शहराचे खऱ्या अर्थाने रूपडे पालटणार आहे. येत्या सप्ताहात आयसीटी इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट पथदीप, स्मार्ट पार्किंग, पब्लिक सायकल शेअरिंग, प्रोजेक्ट गोदाअंतर्गत पायाभूत सुविधा व सुशोभीकरण या प्रकल्पांचाही प्रारंभ होणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतील दृश्य स्वरूपातील कामे प्रत्यक्षात अवतरण्यास सुरुवात होणार आहे.

प्रोजेक्ट गोदाचा प्रारंभ

गोदावरीचे प्रदूषण कमी करण्यासाठी व तिच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नवीन वर्षापासून स्मार्ट सिटीअंतर्गत प्रोजेक्ट गोदाचा प्रारंभ होणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या रेट्रोफिटिंग प्रकल्पात दोन टप्प्यांत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यात जवळपास १८ कामांचा पुनर्विकास केला जाणार आहे. या प्रकल्पाचा मूळ खर्च ५१५ कोटी रुपये असून, पहिल्या टप्प्यात ३३० कोटींची कामे सुरू होणार आहेत. त्याअंतर्गत अहिल्यादेवी होळकर पूल ते नवश्‍या गणपती मंदिर अशी सुमारे सहा किलोमीटरची जलवाहतूक सुरू होणार आहे. त्यासाठी दोन जेटी केंद्रांची निर्मिती होणार आहे. गोदातीरांचे सौंदर्यीकरण करताना शहराचे धार्मिक महत्त्वही जपले जाणार आहे. गोदाघाटाचे पौराणिक सौंदर्य साकारण्यासाठी वृक्षारोपण, अरुणा व वाघाडीचे सौंदर्यीकरण, सायकल ट्रॅक, दगडी भिंत, पेव्हर ब्लॉक, अ‍ॅम्पी थिएटर, प्राचीन कुंड पुनर्जीवित करणे, पुलांची निर्मिती करण्यात येणार आहे.

४१ स्मार्ट पार्किंग

शहरातील वाहतुकीचा, तसेच पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी ४१ ठिकाणी स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम राबविण्याच्या सविस्तर प्रकल्पाची अंमलबजावणी जानेवारीपासून होणार आहे. यामध्ये ३४ ठिकाणी ऑन स्ट्र‌ीट, तर सात ठिकाणी ऑफ स्ट्रीट पार्किंग विकसित करण्यात येणार आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवालास नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आधीच मंजुरी दिली आहे. सध्या निविदाप्रक्रियेत हा प्रकल्प आहे. याअंतर्गत वाहनतळनिर्मिती, वाहनतळांसाठी धोरण, रस्त्यांवर वाहतूक नियमांचे सुयोग्य आरेखन, परिवहन व्यवस्थेचे सक्षमीकरण केले जाणार आहे. भुयारी, तसेच बहुमजली वाहनतळांच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे. विशेषत: पुण्याच्या धर्तीवर ई-पार्किंगची उभारणी केली जाणार आहे. वाहनधारकांना ई-कार्डाची सुविधा दिली जाणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत या ई-पार्किंगची उभारणी निश्चित करण्यात आली आहे. मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे या स्मार्ट पार्किंग नियंत्रित केल्या जाणार आहेत.

सीसीटीव्ही लागणार

स्मार्ट सिटीकडे शहराची वाटचाल सुरू असून, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता अधिक आहे. शहरातील सीसीटीव्हीसंदर्भातील सर्वेक्षण महापालिकेने पूर्ण केले असून, त्या संदर्भातील डीपीआर बनविण्याचे काम पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणानुसार शहरात सीसीटीव्हींसाठी ७७६ जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्यावर ३,११५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलिसांसाठी ३४३ जागांवर ११०६ कॅमेरे, तर महापालिकेच्या ४३३ जागांवर १८४४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलिस आणि महापालिकेचे स्वतंत्र कंट्रोल आणि कमांड सेंटर राहणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव ‘महाआयटी’कडे पाठविण्यात आला असून, या कामांची सुरुवात जानेवारीपासून होईल.

मालमत्तांवर कॅमेऱ्यांची नजर

शहरात पोलिसांबरोबरच महापालिकेनेही आपल्या प्रमुख शासकीय कार्यालयांसह जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ, उद्याने आणि विविध प्रकल्प सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या टप्प्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरात सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्याचा कंट्रोल रूम नव्या पंचवटी विभागीय कार्यालयामध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाआयटीच्या मदतीने पोलिसांसोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण महापालिका कार्यालयांमध्ये असेल. त्यामुळे शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे दोन नियंत्रण कक्ष राहतील.

स्मार्ट रोड

स्मार्ट सिटीअंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका सर्कलपर्यंतचा रस्ता स्मार्ट रोड करण्यात येणार आहे. त्यासाठी १६ कोटींचा खर्च करण्यात येणार असून, जानेवारीपासून या रोडच्या कामाला सुरुवात होणार आहे. परदेशातील रस्त्यांच्या धर्तीवर या रोडवर वायफाय सुविधा, स्वतंत्र सायकल ट्रॅक, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग, आधुनिक सिग्नल व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे इतर शहरांसाठी हा रस्ता रोल मॉडेल ठरणार असून, मार्चपासून तो नागरिकांच्या वापरासाठी खुला होणार आहे.

ऑप्टिकल फायबरचे जाळे

स्मार्ट नाशिकसाठी पथदर्शी ठरलेल्या स्मार्ट कमांड अँड कंट्रोल सेंटरसह माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटी रुपये खर्चाच्या ‘स्मार्ट आयटीसी बॅकबोन फॉर स्मार्ट सिटी’ प्रकल्पाला नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी निविदा कालावधीही कमी केल्याने हा प्रकल्प मार्चपासून सुरू होणार आहे. या प्रकल्पांतर्गत स्मार्ट पार्किंग मॅनेजमेंट सिस्टिम, स्मार्ट किओस्क, सेन्सर, पब्लिक अॅड्रेस सिस्टिम, सेन्सर आणि वायफाय सिटीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शहराची वाटचाल अधिकाधिक तंत्रज्ञानाच्या वापराकडे होणार आहे. शहरात ऑप्टिकल फायबरचे जाळे तयार केले जाणार असून, नागरिकांना माहिती व तंत्रज्ञानाकडे नेण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नवीन वर्षात सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातृत्व अॅपमुळे मातामृत्यू रोखण्यात यश

$
0
0

नाशिकमधील पायलट प्रोजेक्टला यश; राज्यभर राबविणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात आलेल्या मातृत्व अॅपमुळे माता मृत्यू रोखण्यात यश आले आहे. या अॅपमुळे त्र्यंबकेश्वर येथील अंबोलीत गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आले आहे. मातृत्व अॅप त्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरले आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्याची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्याने तो आता राज्यभर राबविण्यात येणार आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात या मातृत्व अॅपचे उद्घाटन करण्यात आले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात दरवर्षी पाच ते सहा गर्भवती माता मृत्यू होत असतं. तेथे गर्भवती मातांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी मातृत्व अॅपची मदत घेण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. या अॅपमध्ये गर्भवती महिलेच्या आरोग्यविषयक बाबी नोंदविण्यात आल्या. तिच्या आरोग्यात सुधारणा होतेय की बिघाड यावर लक्ष ठेवण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबतचा अलर्ट अॅपच्या माध्यमातून मिळू लागल्याने आरोग्याच्या तक्रारींवर वेळीच उपचार करण्यात आले. त्यामुळे अंबोलीत गेल्या दोन वर्षांत माता मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आले आहे.

ऑफलाइनही अॅप कार्यरत

हे अॅप ऑफलाइन पध्दतीने काम करीत असल्याने ते दुर्गम भागातही उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्याची मदत घेण्यात येणार असून, त्यामुळे माता मृत्यूचे प‍्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून हे अॅप विकसित करण्यात आल्याने राज्यभर ते वापरले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नववर्ष स्वागतावर ‘वॉच’

$
0
0

दोन हजार पोलिस रस्त्यावर; सोमवारी पहाटेपर्यंत बंदोबस्त

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्ष स्वागतास गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. जवळपास दोन हजार पोलिस रविवार दुपारपासून सोमवारी पहाटेपर्यंत रस्त्यावर उतरणार आहेत. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, छेडछाड किंवा हाणामारीसारखे प्रकार रोखण्याकडे पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, परिमंडळ एक आणि दोन यांच्या स्तरावर वेगळा बंदोबस्त असणार आहे.

पोलिसांच्या मदतीला गृहरक्षक जवानांसह स्ट्रायकिंग फोर्स आणि अचानक उद्भ्वणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडीदेखील तैनात ठेवण्यात येणार आहे. बंदोबस्तासाठी जवळपास १५० पोलिस अधिकारी आणि एक हजार ५०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. रविवारी दुपारी दोन वाजेपासून सोमवारी पहाटेपर्यंत बंदोबस्त कायम राहणार आहे.

परिमंडळ एक

परिमंडळ एकमध्ये पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका, म्हसरूळ, आडगाव आणि गंगापूर पोलिस स्टेशनचा समावेश होतो. या ठिकाणी १२ पोलिस निरीक्षक, ४९ सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, ४११ कॉन्स्टेबल, ११५ महिला कॉन्स्टेबल, ४० पुरूष तर २० महिला होमगार्डस, चार स्ट्रायकिंग फोर्स पथके, एसआरपीएफचे एक पथक आणि १८ वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय पोलिस आयुक्तालय स्तरावरून अधिकचे १० पोलिस निरीक्षक, ३९ सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, २९० कॉन्स्टेबल, १०५ महिला कॉन्स्टेबल असा बंदोबस्त देण्यात येणार आहे.

परिमंडळ दोन

परिमंडळ दोनमधील अंबड, इंदिरानगर, सातपूर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या पोलिस स्टेशनसाठी नऊ पोलिस निरीक्षक, ३७ सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, ३०५ कॉन्स्टेबल, ४२ महिला कॉन्स्टेबल, १९५ होमगार्डस त्यात ५५ महिला होमगार्डस, एसआरपीएफ तसेच २४ वाहने असे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तालयाकडून चार पोलिस निरीक्षक, ९० कॉन्स्टेबल, १३ महिला कॉन्स्टेबल, तीन वाहने असा अधिकचा बंदोबस्त पुरवण्यात येणार आहे. गर्दीची ठिकाणे विशेषतः मार्केट, मॉल्स, मंदिरे अशा ठिकाणी लक्ष पुरवण्यात येणार आहे. वाहतूक विभागाकडून मद्यपी वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते तसेच शहरातून जाणाऱ्या महामार्गावर देखील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

कोम्बिंगदरम्यान टवाळखोरांवर वॉच

नाशिक : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी आपले लक्ष काही झोपडपट्टी भागांकडे वळवले आहे. या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यासह टवाळखोरांना ताकीद देण्याचे काम सुरू आहे. नववर्ष स्वागतादरम्यान रस्त्यावर उतरून ये-जा करणाऱ्यांना टवाळखोरांचा त्रास होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात येत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

शहरातील पंचवटी, उपनगर, इंदिरानगरसह नाशिकरोड परिसरात काही झोपडपट्टी परिसर असून, या ठिकाणांहून प्रमुख रस्ता गेलेला आहे. रात्रीच्या सुमारास आनंद साजरा करणारी उत्साही मंडळी रस्त्यावर उतरून ये-जा करणाऱ्यांना त्रास देऊ शकतात. या पार्श्वभूमीवर रविवारपासून सोमवार सकाळपर्यंत अशा ठिकाणांकडे विशेष लक्ष पुरवण्यात येणार आहे. गत बुधवारी रात्री इंदिरानगर परिसरातील राजीवनगर झोपडपट्टी येथे दोघा युवकांची हत्या करण्यात आली. सिडकोतदेखील एका रिक्षा चालकाचा निर्घृण खून झाला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नववर्ष स्वागताच्या बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या पथकाने सातपूर परिसरात प्रबुध्दनगर येथे भेट देऊन टवाळखोरांवर कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता दुरुस्तीस मुहूर्त

$
0
0

नाशिकरोडमध्ये महापालिका प्रशासनाकडून कामांचा श्रीगणेशा

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

रस्ते दुरुस्तीसाठी विभागनिहाय मिळालेल्या निधी वापराचा तपशिलाचा पालिका प्रशासनाला थांगपत्ता लागत नसल्याचे वृत्त ‘मटा’तून प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर पालिका प्रशासनाकडून तातडीने नाशिकरोड मधील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचा नारळ फोडण्यात आला आहे.

रस्ते दुरुस्तीचा निधी वापराच्या तपशिलाबाबत भाजपच्या नगरसेविका संगीता गायकवाड यांनीही नाशिकरोड प्रभाग समिती सभेत प्रशासनाला यापूर्वी अनेकदा विचारणा केली होती. परंतु, त्यांच्या या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली होती.

शहरातील रस्त्यांचे पावसाळ्यातील पावसामुळे दरवर्षी नुकसान होत असते. अशा नुकसानग्रस्त रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी मार्च महिन्यात प्रत्येक विभागासाठी सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. संपूर्ण शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी अशाप्रकारे सुमारे २५ ते ३० कोटींचा निधी मंजूर केला जातो. परंतु, प्रत्यक्षात टेंडरमधील नियमांप्रमाणे या निधीचा वापर करून रस्त्यांची प्रत्यक्षात दुरुस्ती केली जात नसल्याचे चित्र आहे. तरी याबाबतही प्रशासनाने गंभीर होणे आवश्यक आहे.

केवळ रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचा फार्स पूर्ण केला जातो. मात्र प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचा निधी या कामासाठी पालिका प्रशासनाने मंजूर केला असला तरी शहरातील बहुतांश नगरसेवक आपल्या प्रभागातील कोणत्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी या निधीचा वापर झाला याबाबत अनभिज्ञच असतात. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० च्या नगरसेविका संगीता गायकवाड यांनी रस्ते दुरुस्तीचा निधी विभागानुसार न देता प्रभागनिहाय द्यावा, अशी मागणी केली होती. रस्ता दुरुस्तीस मुहूर्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विभागातून पुंड विजयी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत नाशिकमधून संजयकुमार पुंड, मुंबई विभागातून शैलेश मोहिते, पुण्यातून सदानंद देशपांडे तर औरंगाबाद विभागातून ज्ञानेश्वर चिंते यांनी बाजी मारली. शनिवारी सायंकाळी उश‌रिा विद्यापीठ मुख्यालयात हा निकाल घोषित करण्यात आला.

विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी राज्यभरात दोन दिवसांपूर्वी निवडणूक पार पडली होती. शनिवारी सकाळी या मतमोजणीस सुरुवात झाली. सायंकाळी उश‌रिा मतमोजणी आवाक्यात आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी निकाल जाहीर केला. राज्याच्या चार महसूल विभागांमधून ही निवडणूक झाली होती.

कुलगुरूंनी केले अभिनंदन

या मतमोजणीतून आशावादी असणाऱ्या उमेदवारांची उपस्थिती विद्यापीठाच्या परिसरात होती. यात यश मिळविणाऱ्या विजयी उमेदवारांचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी अभिनंदन केले.

अधिसभेसाठी प्राध्यापक वगळता शिक्षक गटात वैद्यकीय विद्याशाखेतून अजय तावरे, दंत विद्याशाखेतून कविता पोळ, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेतून संजय गुंबळे, विद्याशाखेतून बाळासाहेब घुले विजयी झाले.

आयुर्वेद व युनानी विभाग

विद्यापरिषदेसाठी पदवी आणि पदव्युत्तर आयुर्वेद व युनानी विद्याशाखेतील प्रि-क्लिनिकल विभागात नितीन चांदूरकर, नितीनकुमार धानोरकर, रवींद्र धिमधिमे, मिलिंद निंबाळकर, यशवंत पाटील यांनी विजय मिळविला.


विद्या परिषदेवर मिनल राणे

विद्यापरिषदेसाठी तत्सम विद्याशाखेतून मिनल राणे विजयी झाल्या. विद्यापीठाच्या अभ्यासमंडळासाठी पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेतील प्रि-क्लिनिकल विभागातून प्रमोद इंगळे, दीपक जोशी, पंकजा नाईक, रामचंद्र पडाळकर, सुषमा पांडे, शिवाजी सुक्रे यांनी विजय मिळविला. विद्यापीठाच्या अभ्यासमंडळ पदवी आणि पदव्युत्तर दंत विद्याशाखेतील क्लिनिकल विभागात अभय दातारकर, चेतन होतकर, माया इंदुरकर, रितेश कळसकर, संगीता मुगलीकर, गिरिष नाझिरकर उमेदवार विजयी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पादनात घट; महसूलात वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभागात मत्स्य व्यवसायातून सरकारला प्राप्त होणाऱ्या महसूलात चालू वर्षी वाढ झाली असली तरी प्रत्यक्षात मत्स्य उत्पादन मात्र घटले आहे.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत नाशिक विभागातील तलाव ठेकेदारी तत्वावर दिल्याने या क्षेत्रातही मच्छिमार सहकारी संस्थांत मोठी स्पर्धा निर्माण झाली असून यामुळे महसूलात वाढ झाल्याचे दिसत आहे. चालू वर्षी सरकारला मत्स्य व्यवसायातून तब्बल एक कोटी २ लाख २९ हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे. तर ६ हजार ९४३ टन मत्स्य उत्पादन झालेले आहे.

नाशिक विभागात मत्स्य व्यवसायातून २०१७-१८ या वर्षात सरकारला मिळणाऱ्या महसूलात काही अंशी वाढ झाली आहे. मात्र, २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांच्या तुलनेत नाशिक विभागातील मत्स्य उत्पादनात घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आर्थिक वर्ष संपण्यास अजून तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या काळात आणखी मत्स्य उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. विभागात मत्स्य उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यांमध्येही यंदा मत्स्य उत्पादनात घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मत्स्यबीज उत्पादन व संचयनातही मोठी घट आलेली आहे. गेल्या वर्षीचे १ कोटी १३ लाखांवरील कोळंबी बीज संचयन यंदा अवघे ७५ लाख इतकेच झालेले आहे. नाशिक वगळता विभागातील धुळे, जळगाव, नगर आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये कोळंबी बीज संचयन करण्यात स्थानिक मत्स्यव्यवसाय व विकास विभागाला अपयश आलेले आहे.

तलाव ठेका वसुलीत वाढ
विभागात २०१५-१६ या वर्षी तलाव ठेक्यातून सरकारला ९५ लाख २६ हजार तर २०१६-१७ या वर्षी ८१ लाख २२ हजार रुपये इतका महसूल प्राप्त झाला होता. बोली पद्धतीने तलावांचा ठेका देण्यास सुरुवात झाल्याने चालू वर्षी सरकारला विभागातुन ऑक्टोबर अखेरपर्यंतच १ कोटी २ लाख २९ हजार रुपये इतका महसूल प्राप्त झालेला आहे. मात्र, मत्स्य उत्पादनात काही अंशी घट झालेली आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात २५०८ टन, धुळे जिल्ह्यात ६६० टन, नंदुरबारमध्ये ३१५ टन, जळगावमध्ये २२५७ टन तर नगरमध्ये १२०३ टन इतके मत्स्य उत्पादन आतापर्यंत झालेले आहे.

प्रक्रिया अद्यापही सुरुच
मत्स्य व्यवसाय व विकास खात्याला नाशिक विभागातील लहान-मोठ्या ३०७ पैकी आतापर्यंत २१२ तलाव मत्स्य उत्पादनासाठी ठेक्याने देण्यात शक्य झालेले आहे. तर अद्यापही विभागातील ९५ तलावांचा ठेका देणे बाकी आहे. विभागातील सर्व तलावांचा ठेका प्रक्रिया वेळेत राबविली गेली असती तर कदाचित मत्स्य व्यवसायातून सरकारला प्राप्त झालेल्या महसूलात आणखी वाढ झाली असती.

विभागातील तलाव ठेका वसुली (लाख रुपयांमध्ये)
जिल्हा...................वसुली
२०१७-१८ २०१६-१७ २०१५-१६
नाशिक.............१७.५१ २२.४० २४.४२
धुळे.....................४ ७.२७ ११.१२
नंदुरबार.............०.८६ १.०४ १.१०
जळगाव............७१.०९ ४१.१७ ४७.६५
नगर..................८.८३ ९.३४ १०.९७
एकूण...............१०२.२९ ८१.२२ ९५.२६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्य विकासावर राज्य सरकारचा भर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

औद्योगिक क्षेत्राच्या तुलनेत महाराष्ट्र नंबर एकचे राज्य असून या पुढील काळात अधिकाधिक कौशल्य कारागीर घडविण्याकडे सरकारचे विशेष लक्ष आहे. दरवर्षी राज्यात सुमारे दोन लाख अभियांत्रिकी किंवा तत्सम कॉलेज तरुण तरुणी प्रशिक्षित होत असतात. त्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

पाथर्डी फाटा येथे बेजॉन देसाई फाउंडेशन व जयम फाउंडेशन यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या युनिक स्किल डेव्हलपमेंटच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, एन. एम. आव्हाड, नगरसेवक भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, अतुल चांडक, धनपतलाल शहा, विक्रांत जाधव, विक्रांत मते उपस्थित होते.

मंत्री देसाई यांनी सांगितले, की नोकरी ही केवळ ओळखी किंवा वशिल्यानेच मिळते असे नाही. आपल्यात असलेल्या कलागुणांमुळे कोणत्याही व्यक्तीला नोकरी मिळते. नोकरी देणारा उद्योजक कायम ही व्यक्‍ती आपल्यासाठी काय करू शकते याचा विचार करीत असतो. येत्या काळात राज्यात अधिकाधिक कौशल्य डेव्हलपमेंटचे सेंटर उभारण्यात येणार आहे. औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य हे सर्वगुण संपन्न राज्य आहे. त्यामुळे अधिक चांगले उद्योग राज्यात आणण्याचे प्रयत्न आहे.
वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी स्किल डेव्हलपमेंटच्या संस्था अधिक वाढल्या पाहिजेत असेही सांगितले. आमदार सीमा हिरे यांनी स्कील डेव्हलपेमंट सेंटरमुळे सिडको व परिसरातील कामगारांच्या मुलांना चांगले ज्ञान मिळण्यास मदत होणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. तर अशा प्रकारचे सेंटर मध्य नाशिक भागातही सुरू करण्याची सूचना आमदार फरांदे यांनी केली.

बेजॉन देसाई फाउंडेशनचे मनोज टिबरीवाला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तळागळातील जनतेसाठी चांगले कार्य करण्याच्या उद्देशाने ही संस्था सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील युवकांना चांगले ज्ञान देणे हा त्यामागील उद्देश असून नाशिकमधील युवक-युवतींना स्किल डेव्हलपमेंट करणे हेच संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या कार्याची चित्रफित सादर करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images