Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाणीटंचाईचा फेरा कायम

$
0
0

नाशिक जिल्हा सुखी; मात्र जळगाव, धुळ्यातील ५६ गावांना ३२ टँकर्स

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी पाणी टंचाईच्या फेऱ्यातून नाशिक विभागाची वर्षभर सुटका होऊ शकलेली नाही. डिसेंबर महिनाअखेरीपर्यंत नाशिक विभागातील तब्बल ५६ टंचाईग्रस्त गावांना ३२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आला आहे. यात जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. तर नाशिक, नगर आणि नंदुरबार जिल्ह्यांना अद्याप तरी पाणीटंचाईची झळ बसलेली नाही.

नाशिक विभागात गतवर्षीच्या पावसाळ्यात धो-धो पाऊस बरसला होता. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची प्रशासकीय आकडेवारी सांगते. परंतु, गत वर्षाच्या सरतेशेवटीदेखील नाशिक विभागात टंचाईग्रस्त गावांची संख्या टिकूनच आहे. नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील ८ आणि जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील ३१, पारोळ्यातील ५, भुसावळमधील १ आणि जामनेरमधील ११ अशा एकूण ५६ गावांची पाणीटंचाईच्या फेऱ्यातून सुटका करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. या गावांना ३२ टँकर्सद्वारे सुरू असलेला पिण्याचा पाणीपुरवठा आजही कायम आहे.

विषम पर्जन्यमानाचा फटका

विभागातील धुळे आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यांना विषम पर्जन्यमानाचा फटका बसला आहे. या दोन जिल्ह्यात सरासरीपेक्षा खुपच कमी पाऊस झाला होता. तर उर्वरित जिल्ह्यांत पावसाने सरासरीही ओलांडली होती. या विषम पर्जन्यमानामुळे धुळे आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांश तालुक्यांतील भूजल पातळीतही मोठी घट आली होती. परिणामी, या दोन्ही जिल्ह्यांतील तब्बल ५६ गावांची पाणी टंचाईच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकली नाही. जळगाव जिल्ह्यात गेल्यावर्षीही अनेक खेड्यांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागली होती.

नाशिक-नगर-नंदुरबारची सुटका

नाशिक जिल्ह्यासह नंदुरबार व नगर या तिन्ही जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत पाणी टंचाईचे आगमन झालेले नसल्याने या तिन्ही जिल्ह्यांची पाणीटंचाईच्या फेऱ्यातून सुटका झालेली आहे. या तिन्ही जिल्ह्यांत गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. याशिवाय या तिन्ही जिल्ह्यांत राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियान या योजनेचाही काही गावांना फायदा झालेला आहे. या योजनेमुळे पाणीटंचाईचे सावट कायमचे दूर झालेले नसले तरी काही कालावधीसाठी तरी पुढे ढकलले गेले आहे. येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांनंतर पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्राहकांना दिलासा; पालेभाज्या, टोमॅटो स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या महिन्याभरापासून भाजीपाल्याची आवक चांगली होत असल्याने दरात घसरण सुरूच आहे. दर्जा चांगला असूनही दर मात्र कमीच आहेत. कमी दरात चांगल्या भाज्या मिळत असल्याने ग्राहक आनंदात असला तरी उत्पादक मात्र नाराज आहेत. आणखी पंधरा दिवस तरी भाजीपाला दरात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. पालेभाज्या व टोमॅटो स्वस्त झाले असून, इतर भाज्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात व डिसेंबर म‌हिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टोमॅटोचे दर चाळीस रुपये किलोपर्यंत वाढले होते. मात्र आवक वाढत गेल्याने व मालाचा दर्जाही थोडा घसरल्याने दर सहा ते सात रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. शिवाय थंडीमुळे थोडी मागणीही कमी असल्याने त्याचा दरावर परिणाम झाला आहे. पालेभाज्यांचीही आवक चांगली असून, कोथिंबीर, मेथी, शेपू पालक यांचे दर पाच ते दहा रुपये जुडीपर्यंत स्थिरावले आहेत. कांदापात मात्र अजूनही भाव खात आहे.

कारले, गिलके, दोडके यांचे दर जैसे थे आहेत. भोपळ्याची मागणी वाढल्याने दरही वाढले आहेत. भोपळा १० ते १५ रुपये प्रतिनगाने विक्री होत आहे. गाजरही २० ते २५ रुपये किलोने विक्री होत आहे. वांगे, कोबी, फ्लॉवर, भेंडी, वाटाणा यांचे आवक चांगली असून दर टिकून आहेत. आणखी पंधरा दिवस आवक टिकून राहणार असल्याने दरात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. मुंबई व गुजराममध्ये माल जात असला तरी तेथील स्‍थानिक मालाच्या आवकेमुळे दरावर परिणार होत आहे.

किलोचे दर (बाजार समितीतील)
मेथी - ३ ते १२, कोथिंबीर - ५ ते १५, कांदापात - १५ ते २०, शेपू - ५ ते १२, पालक - ३ ते ५, मिरची - २५ ते ३०, कोबी - १० ते १५, फ्लॉवर - १० ते १५, कारले - ३० ते ४०, गिलके - ४०, दोडके - ३०, भेंडी -३०, वांगे - १५ ते २०, गवार - ३० ते ४०, वाटाणा - २५ ते ३०, शिमला मिरची - २५ ते ३०, टोमॅटो - ६ ते ७, गाजर - २० ते २५, भोपळा - १० ते १५

द्राक्ष हंगामाला बहर

गेल्या महिन्यापासून सुरू झालेला द्राक्ष हंगाम सध्या बहरत आहे. द्राक्षांची बाजारात आवक वाढू लागली असली तरी थंडीमुळे मात्र मागणीत अजूनही वाढ झालेली नाही. पपई, अॅपल बोर, संत्री यांची आवक मात्र वाढली आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून द्राक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या द्राक्षांच्या पिकाला पोषक वातावरण आहे. नाशिक, पुणे, सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षशेती केली जाते. गणेश, सोनाका, शरद द्राक्षास प्रति किलो ५० ते १०० रुपये इतका दर मिळत आहे. येत्या पंधरा दिवसांत द्राक्षांची आवक आणखी वाढेल. अवकाळी पावसाने द्राक्षावर पडलेल्या डावण्या रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सध्या स्‍थानिक बाजारात अजूनही द्राक्षांची फारशी आवक नाही. शेतकरी निर्यातीवरच भर देत आहेत. गेल्या महिन्यांत पंधराशे टन द्राक्षांची निर्यात झाली होती.

पपई, अॅपल बोर यांची आवक वाढली असून, ३० ते ४० रुपये दर मिळत आहे. सफरचंदचे दर ९० ते १२० रुपये किलोवर स्थिरावले आहेत. संत्रीही ४० ते ६० रुपये किलोने मिळत आहे. येत्या पंधरा दिवसात संत्र्यांची आवकेत आणखी वाढ होईल. चिक्कू ४० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. कडाका, उमराण जातीची बोरही ४० रुपये किलो मिळत असून, त्यांच्या आवकेत आता वाढ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वारिप’कडून हेगडेंच्या वक्तव्याचा निषेध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी राज्य घटनेसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. येवला तहसील कार्यालयासमोर शनिवारी (दि. ३०) धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने या वेळी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना निवेदन देण्यात आले.

कर्नाटकमधील कोप्पल जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी आम्ही भारतीय राज्य घटना बदलण्यासाठी आलेलो आहोत. यासह घटना बदलण्यासंदर्भात बेजाबदार वक्तव्य केल्याचा आरोप येवल्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आला. हे वक्तव्य करून त्यांनी राज्यघटनेचा तसेच धर्मनिरपेक्ष विचारांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यांनी तत्काळ खासदारकीचा व मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जनतेची माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. हेगडे यांनी राजीनामा न दिल्यास येथील विंचूर चौफुली वरील राज्य महामार्गावर 'रास्ता रोको' करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, शशिकांत जगताप, अजर शेख, हमजा मन्सुरी, अजीज शेख, आकाश घोडेराव, सागर गरुड आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनईचा निकाल १५ ला अपेक्षित

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील बहुचर्चित तिहेरी हत्याकांड खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी सुमारे अर्धा तास युक्तिवादाला उत्तर दिले. या खटल्यात आतापर्यंत ५३ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या खटल्याची १५ जानेवारी रोजी पुन्हा सुनावणी होणार असून, त्याच दिवशी निकाल लागण्याची शक्यता आहे.

सोनईजवळील विठ्ठलवाडी येथे जानेवारी २०१३ मध्ये संदीप राज धनवार (वय २४), राहुल कंडारे (२६), सचिन घारू (२३) या तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. प्रेमप्रकरणातून हे प्रकरण घडले होते. स्वच्छतागृहाची टाकी साफ करायच्या निमित्ताने त्यांना बोलावण्यात आले होते. धनवार व कंडारे यांचा मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आला, तर घारू यांच्या शरीराचे अवयव कूपनलिकेत फेकण्यात आले होते.

या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना अटक केली. सुरुवातीला नेवासा सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता; परंतु साक्षीदारांवर दबाव येण्याच्या शक्यतेमुळे तो नाशिक कोर्टात सुरू करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांच्याकडे या खटल्याची सुनावण‌ी सुरू आहे. विशेष सरकारी वकील निकम यांनी सोमवारी आरोपींच्या युक्तिवादाला उत्तर दिले. खटल्याची सुनावणी १५ जानेवारी रोजी ठेवण्यात आली असून, या दिवशी निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पोलिस कोठडीत वाढ

नाशिक : रिक्षाचालक साहेबराव जाधव खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कामटवाड्याजवळील महालक्ष्मीनगरमध्ये ही घटना घडली होती. लाकडी दंडुके व चॉपरने वार करून जाधव यांचा खून करण्यात आला होता. संशयित गणेश राजेंद्र शिंगटे (रा. महाकाली चौक, सिडको), संतोष अरुण जाधव (रा. हॉटेल मेजवानीजवळ, खुटवडनगर), भावेश राजेंद्र खैरनार (रा. लोकमान्यनगर, सिडको), विनोद सुरेश घरत (रा. सातपूर कॉलनी), महेश उर्फ नाना आनंदा पगार (रा. अंबिकानगर, कामटवाडा), प्रवीण उर्फ भय्या राजेंद्र शिंगटे (रा. महाकाली चौक, सिडको), दर्शन उत्तम दोंदे (रा. कामटवाडा), किरण महेंद्र निरभवणे (रा. कामटवाडा) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोल‌िस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

जॉनी बोरगेची कारागृहात रवानगी

नाशिक ः सिडकोतील शिवशक्ती चौकातील मधुकर बोरगे खून प्रकरणात पोलिसांनी संशयित जॉनी बोरगे (वय ३५) याला अटक केली आहे. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, नाशिकरोड कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. जॉनीने ७२ वर्षीय पित्याच्या डोक्‍यात घाव घालून खून केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची रवानगी नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतमाला, ड्रायपोर्टमुळे मिळणार बूस्ट

$
0
0

नाशिक ः मोदी सरकारने घोषित केलेला महत्त्वाकांक्षी भारतमाला प्रकल्प आणि देशात विविध ठिकाणी होऊ घातलेले ड्रायपोर्ट याचा एकत्रित परिणाम दिल्ली-मुंबई इंडस्ट्र‌िअल कॉरिडॉरला मोठे बळ देणारा ठरणार आहे. कॉरिडॉरअंतर्गत विकसित होणाऱ्या औद्योगिक शहरांना सर्वोत्तम पायाभूत सोयी-सुविधा देतानाच देशभरातील दळणवळण व्यवस्था यातून सक्षम होणार आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने दिल्ली-मुंबई इंडस्ट्र‌िअल कॉरिडॉर (डीएमआयसी) या प्रकल्पाची घोषणा केली होती. नंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा केली. देशभरात रस्त्यांचे जाळे सक्षम करण्यासाठी ‘भारतमाला’ हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी जवळपास ७ लाख हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. देशातील ११ राज्यांमध्ये ‘भारतमाला’अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग सशक्त केले जाणार आहेत. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणात पैसा पायाभूत सुविधा क्षेत्रात येऊन रोजगारही निर्माण होणार आहे. याच प्रकल्पाचा फायदा डीएमआयसीअंतर्गत विकसित होणाऱ्या सहाही राज्यांतील औद्योगिक शहरांना होणार आहे. देशभरात एकूण ४४ आर्थिक कॉरिडॉर ‘भारतमाला’अंतर्गत विकसित केले जाणार आहेत. महामार्गांच्या जाळ्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उत्पादनांची वाहतूक जलदगतीने होईल. यात वेळ, पैसा आणि इंधन यांचा अपव्यय टळणार आहे. रस्ते, महामार्गांच्या सक्षम जाळ्यामुळे कॉरिडॉरमध्ये गुंतवणूक येण्यास फायदा होईल, असा विश्वास दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर विकास प्राधिकरणाचे (डीएमआयसीडीसी) एमडी आणि सीईओ आल्केश कुमार शर्मा यांनी व्यक्त केला.

केंद्र‌िय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात विविध ठिकाणी ड्रायपोर्ट उभारण्याची घोषणा केली आहे. हे ड्रायपोर्टही कॉरिडॉरला बळ देणार आहेत. ड्रायपोर्टद्वारे औद्योगिक उत्पादनांचा तात्पुरता साठा करणे आणि उत्पादनांच्या निर्यातीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हरियाणा येथील नांगल चौधरी येथे ४.८८ चौरस किमी क्षेत्रावर, गुजरातच्या साणंद येथे २०० हेक्टरवर आणि उत्तरप्रदेशात दादरी येथे २९४ हेक्टरवर मल्ट‌ि-मोडल लॉजिस्टिक हब उभारले जात आहे. कॉरिडॉरअंतर्गत औरंगाबादनजीक शेंद्रा-बिडकीन येथे औद्योगिक शहर विकसित केले जात आहे. या शहराला जालना येथील प्रस्तावित ड्रायपोर्ट उपयुक्त ठरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नाशिकमध्ये प्रस्तावित औद्योगिक शहराला निफाड येथील ड्रायपोर्ट बळ देणार आहे. जालना आणि निफाड येथील ड्रायपोर्ट हे मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला जोडले जाणार आहेत. वर्धा येथील ड्रायपोर्ट हे महामार्गांसह मध्यप्रदेशातील डीएमआयसीच्या शहरांना फायदेशीर ठरेल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.

‘समृद्धी’चाही फायदा

महाराष्ट्रात मुंबईत ते नागपूर या दरम्यान समृद्धी महामार्ग होऊ घातला आहे. या महामार्गाचाही डीएमआयसीला फायदा होईल. याच महामार्गालगत जालना, नाशिक व वर्धा येथील ड्रायपोर्ट राहणार आहेत. शेंद्रा-बिडकीन येथील औद्योगिक शहर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तर, नाशिकमध्ये औद्योगिक शहर प्रस्तावित आहे. त्यामुळे समृद्धीचा मोठा फायदा राज्याच्या व देशाच्या औद्योगिक विकासाला होणार आहे. समृद्धी महामार्ग कॉरिडॉरच्या विकासात मोलाची भूमिका बजावेल, असा दावाही शर्मा यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटो डीसीआर महिन्यात सुरळीत

$
0
0

राऊंड टेबल

---

ऑटो डीसीआर महिन्यात सुरळीत


नगररचना विभागातील मानवी हस्तक्षेप थांबून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, तसेच बांधकाम परवानग्या सुरळीत, तसेच कामकाज गतिमान करण्यासाठी लागू केलेली ऑटो डीसीआर प्रणालीच सदोष आहे. परिणामी नगररचना विभागात अजूनही ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन पद्धतीनेही काम सुरू असल्याने प्रणालीचा हेतू सफल झालेला नाही. त्यामुळे विविध संघटनांनी या प्रणालीवरच आक्षेप घेत त्यात आमुलाग्र बदल करण्याची मागणी केली आहे. नगररचनासह सॉफ्टटेक कंपनीने त्रुटी मान्य करीत महिनाभरात प्रणालीत अावश्यक ते बदल करण्याची तयारी ‘मटा’च्या राऊंड टेबल कॉन्फरन्समधील चर्चेत दर्शविली. ऑटो डीसीआरचा गोंधळ महिनाभरात दूर होईल, अशी अपेक्षा क्रेडाई, आर्किटेक्ट असोसिएशन व ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

--


शब्दांकन ः विनोद पाटील

---

चार्टर्ड आर्किटेक्टची संकल्पना राबवावी

ऑटो डीसीआर प्रणाली लागू करणे हा चांगला निर्णय असून, त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन त्याचा फायदा बांधकाम क्षेत्रासह ग्राहकांना होणार आहे. परंतु, या प्रणालीत अजूनही अनेक त्रुटी असून, त्या दूर करणे गरजेचे आहे. सध्या प्रणालीत त्रुटी असल्याने वेळ लागत आहे. प्रणाली ९० टक्के चांगली असेल अन् त्यात १० टक्के दोष असेल, तर संपूर्ण शंभर टक्के काम त्यामुळे रखडते. सध्या या विभागात काम करणाऱ्यांनाच प्रणाली हाताळता येत नाही. अनेकांनी प्रशिक्षणही घेतले नसल्याने त्यांना काम करता येत नाही. त्यामुळे वेळ लागतो. ‘रेरा’मध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन होऊन फाइल पंधरा दिवसांत निकाली निघते. त्या धर्तीवर ऑटो डीसीआर प्रणाली कार्यान्वीत का होत नाही, हा खरा प्रश्न आहे. ‘रेरा’च्या धर्तीवर ऑटो डीसीआर प्रणाली कार्यान्वीत झाली, तर बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांचे अनेक प्रश्न सुटतील. जो चुकीचे काम करीत असेल त्याला जबर दंड आकारावा. सिस्टिममध्येच त्याचा समावेश करावा. जबर दंड लावला, तर चुकीचे प्लॅन मंजुरीसाठी विभागाकडे येणारच नाहीत. ‘मालप्रॅक्टिस’ थांबून परवानग्यांचे काम जलदगतीने झाले पाहिजे. ऑटो डीसीआर यंत्रणेतील त्रुटी या एक मिशन म्हणून दूर करण्याची गरज आहे. नियमात बसणारा शंभर टक्के प्लॅन मंजुरीसाठी आला, तर प्राधान्य देऊन तो लगेच मंजूर केला पाहिजे. परंतु, सध्या नियमात बसणाऱ्या आणि नियमात न बसणाऱ्या प्लॅनच्या बाबतीत एकच धोरण असल्याने ऑटो डीसीआर प्रणाली प्रभावी होऊ शकलेली नाही. चार्टर्ड अकौंटंटच्या धर्तीवर नगररचना विभागानेही चार्टर्ड आर्किटेक्ट ही संकल्पना राबविली पाहिजे. अनधिकृत कामे ऑटो डीसीआरसारख्या यंत्रणेतून नियमित होऊ शकत नाहीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणाच उभारावी लागते. आपल्या बायलॉजमध्ये मोठी गुतांगुत आहे. त्यामुळे यंत्रणेतील त्रुटी दूर करून योग्य सिस्टीम लावून दिल्यास बांधकाम परवानग्यांचा मार्ग सुलभ होऊन ग्राहकांना परवडणारी घरेही वेळेत मिळू शकतील.

-सुनील कोतवाल, अध्यक्ष, क्रेडाई

--

मानवी हस्तक्षेप थांबवावा

शहर विकास नियंत्रण नियमावली सध्या हस्तांतरण प्रक्रियेत जात अाहे. त्यातच दररोज नवनवीन अध्यादेश येत आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह आर्किटेक्टमध्येच संभ्रमाचे वातावरण आहे. ऑटो डीसीआर प्रणालीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. या प्रणालीची कोणतीही चाचणी न घेताच ती अंमलात आणली गेली आहे. त्यामुळे त्यात असणाऱ्या त्रुटी तात्काळ दूर करण्याची गरज आहे. या माध्यमातून प्लॅन सबमिट केल्यानंतरही मानवी हस्तक्षेप थांबत नसल्याचे चित्र आहे. अजूनही फाइल घेऊन नगररचनामध्ये फिरावे लागते. त्यामुळे या प्रणालीचा फायदा होताना दिसत नाही. अन्य महापालिकांप्रमाणेच सॉफ्टटेक कंपनीने व्यावसायिकांना सॉफ्टवेअर पुरविले पाहिजे. या सॉफ्टवेअरची किंमत ५० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु, सॉफ्टवेअरसाठी महापालिकेने या आधीच पैसे मोजले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना कमी किमतीत हे सॉफ्टवेअर दिले पाहिजे. सध्या स्क्रूटीनीही आर्किटेक्ट लोकांनाच करून द्यावी लागते. हे काम कंपनीचे आहे. त्यामुळे कंपनीने तात्काळ स्क्रूटीनी सेंटर सुरू केले पाहिजे. त्यासाठीचा आवश्यक डेस्क कंपनीने नगररचना विभागात स्थापन करायला हवा. डिजिटल स्वाक्षरी अजूनही मिळत नाही. कंपनीचे कार्यालय पुण्याला असून, नाशिकमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे मनुष्यबळ वाढवून देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. नगररचना विभाग अजूनही टेक्नोसॅव्ही नाही. अनेक अभियंत्यांना स्वतःत बदल करून घेण्याची इच्छा नाही. त्यांना अजूनही प्रस्ताव ऑफलाइनच हवे असतात. त्यासाठी विभागाकडूनच प्रयत्न केले जातात. आर्किटेक्ट लोकांना अाणखी अधिकार देण्याची गरज आहे. सध्या २०० स्क्वेअर फूट बांधकामाची परवानगी ही पाचशेपर्यंत वाढवून मिळायला हवी. त्यासाठी अधिकाराचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे.

-प्रदीप काळे, अध्यक्ष, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स

--

दोषयुक्त प्रणालीमुळे हेतूच असफल

ऑटो डीसीआर प्रणाली सर्वांनाच हवी आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार आता ही यंत्रणा सक्तीची झाली आहे. त्यामुळे सर्वांनी त्याचे स्वागत केले पाहिजे. आमचा कोणाचाही याला विरोध नाही. परंतु, मुख्य प्रश्न हा आहे, की ही यंत्रणा कार्यान्वीत होऊनही फाइलला तात्काळ मंजुरी मिळत नसल्याचे चित्र आहे. ऑटो डीसीआर लागू झाल्यानंतर फाइलची पद्धत बंद व्हायला हवी. परंतु, आजही ऑनलाइन आणि ऑफलाइन काम नगररचना विभागात सुरूच आहे. त्यामुळे ही यंत्रणा लागू करण्याचा हेतू अजून सफल झालेला नाही. बायलॉजमध्ये गुंतागुंत असल्याने प्लॅनमध्ये थोडा जरी बदल झाला, तरी वेळ लागतो. ही यंत्रणा ‘एरर फ्री’ असली पाहिजे. सध्या ऑटो डीसीआरसाठी विंडोजचाच वापर केला जातो. प्रत्यक्षात विंडोजपेक्षाही आधुनिक सिस्टीम सध्या वापरात आहेत. आयओएस, अँड्रॉइड यांसारख्या सिस्टीमवरही या सॉफ्टवेअरचा वापर करता आला पाहिजे. ऑटो डीसीआर यंत्रणा लागू करताना घाई झाल्याने त्यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. त्या तातडीने दूर करण्याची आवश्यकता आहे. या यंत्रणेमुळे व्यावसायिकांना अजूनही त्रास सुरूच आहे. आधी सॉफ्टवेअरच्या चाचण्या व्हायला हव्या होत्या. त्यातील दोष दूर झाल्यानंतरच ते लागू करण्याची गरज आहे. सॉफ्टटेक कंपनीने नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनाही सॉफ्टवेअर हाताळण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. ज्यांना हे काम हाताळता येत नाही त्यांना या विभागातून दुसरीकडे बदली दिली पाहिजे. विभागाने महापालिकेतील तज्ज्ञ व काम करण्याची इच्छा असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना या विभागात आणून काम जास्तीत जास्त गतीने कसे होईल याची काळजी घेतली पाहिजे. परंतु, विभागातील बऱ्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांची आजही ऑफलाइननेच काम करण्याची इच्छा असल्याने त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. दोन्ही पद्धतीने सुरू असलेले कामकाज तातडीने थांबवून ऑटो डीसीआरद्वारेच काम सुरू ठेवण्याची गरज आहे. अन्यथा हाच पायंडा पडून ग्राहक, बिल्डर, आर्किटेक्ट यांची या जाचातून मुक्तता होणे अवघड आहे.

-विजय सानप, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनीअरिंग

--

नंबरिंग पद्धत अंमलात आणावी

ऑटो डीसीआर सॉफ्टवेअर विकसित करताना महापालिकेने अन्य महापालिकांमधील सॉफ्टवेअरचा अभ्यास करायला हवा होता. एमआयडीसी, पासपोर्ट, रेरा या ठिकाणचे सॉफ्टवेअर कितीतरी पटीने सहज, सुलभ व गतिमान आहे. ऑटो डीसीआरमध्ये अनेक त्रुटी असल्याने मानवी हस्तक्षेप होऊन कामे प्रलंबित राहण्याचे प्रकार वाढत आहेत. शहर विकास नियंत्रण नियमावली आणि महापालिकेच्या नियमांत असलेल्या तफावती दूर करून त्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्याची गरज आहे. सरकारने बायलॉज बदलले, तर लगेच हा अध्यादेश कंपनीकडे पाठविला गेला पाहिजे. त्यामुळे ई-फायलींचा निपटारा तातडीने होऊ शकतो. परंतु, तसे होताना नाही. महापालिकेच्या डेस्कवर, तसेच अधिकाऱ्यांकडेसुद्धा अद्याप हे सॉफ्टवेअर उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वप्रथम विभागाला याबाबत पूर्ण साक्षर करण्याची गरज आहे. पासपोर्टच्या धर्तीवर ई-फाइलला नंबरिंग पद्धत असली पाहिजे. त्यामुळे एखाद्याने प्लॅन सबमिट केल्यानंतर त्याला त्याचे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी निश्चित वेळ दिला पाहिजे. संबंधित त्याच वेळेला येऊन आपले काम करू शकतो. परंतु, आता तसे होत नाही. विभागात कोणीही फाइल घेऊन येते अन् काम करून जाते. त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवला गेला पाहिजे. बऱ्याचदा ज्यांच्या फायली नियमात असतात त्या प्रणालीतच पडून असतात. ऑनलाइनपेक्षा ऑफलाइनद्वारे काम करणारा लवकर फाइल क्लीअर करून निघून जातो. बांधकामासाठी नगररचनासह अनेक विभागांच्या परवानग्या लागतात. परंतु, त्या परवानग्या या ऑटो डीसीआर प्रणालीत अजून समाविष्ट नाहीत. त्यामुळे एकाच प्रणालीत सर्व परवानग्यांचा समावेश करून परिपूर्ण असे सॉफ्टवेअर असले पाहिजे. सॉफ्टटेक कंपनीने व्यावसायिकांना सॉफ्टवेअरसाठी लावलेले दर हे अवाजवी आहेत. टेक महिंद्रासारखी कंपनी हेच सॉफ्टवेअर दोन हजार रुपयांना देते, तर नाशिकमध्ये त्याची किंमत ५० हजार रुपये लावण्यात आली आहे. विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांसाठी कंपनीने क्रॅश कोर्स घेतले पाहिजेत. विभागातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करायची जबाबदारी संबंधित कंपनीचीच आहे. त्यामुळे महापालिका, आर्किटेक्ट, बिल्डर, ग्राहक यांच्या सोयीचे सुटसुटीत आणि गतिमान सॉफ्टवेअर बनवून ते नाशिककरांच्या सेवेत आणले पाहिजे.

-सचिन गुळवे, अध्यक्ष, आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स असोसिएशन

---

अधिकाऱ्यांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव

ऑटो डीसीआर प्रणाली २००९ मध्येच राबविण्याचे ठरले होते. परंतु, अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती नसल्याने तेव्हा त्याची अंमलबजावणी झाली नाही. हा विभाग सर्वसामान्यांशी निगडित असल्याने मंजुरीला कमीत कमी वेळ लागला पाहिजे. बांधकाम परवानग्यांसाठी सिंगल विंडो सिस्टीम २००९ मध्येच सुरू केली होती. पंधरा दिवसांत प्लॅन मंजूर होत होते. परंतु, नंतर ती पद्धतशीरपणे बंद करण्यात येऊन अनियमिततेसाठी ऑफलाइन कामाला प्राधान्य दिले गेले. त्यामुळे नगररचना विभागाला शिस्त लावण्यात सगळेच कमी पडले. प्रशासनानेही सोयीस्करपणे चांगल्या प्रणालीच्या अंमलबजाणीकडे दुर्लक्ष केले. आता तर ६० ऐवजी ३० दिवसांतच प्लॅन मंजुरीचे बंधन लावून दिले आहे. एखाद्याचा प्लॅन थांबवला म्हणजे त्यात काहीतरी गडबड आहे, असा समज होतो. त्यामुळे भ्रष्टाचाराला कुठेतरी खतपाणी घातले जाते. नगररचना विभागाचे दर वर्षी ऑडिट झाले पाहिजे. असे ऑडिट झाले, तर भयंकर प्रकार समोर येतील. व्यक्तीपेक्षा सिस्टीम चालली पाहिजे. प्री डीसीआर आणि ऑटो डीसीआर अशा दोन प्रणाली असायला हव्यात. परंतु, गतिमान काम करण्याची प्रशासनाचीच इच्छाशक्ती नाही. अशाच पद्धतीने काम चालले, तर २०२० मध्ये सर्वांना घरे कशी दिली जातील? बांधकाम परवानग्या लांबल्या, तर त्याचा परिणाम घरे महागण्यावर होतो. बिल्डर वाढीव खर्च हा ग्राहकावरच टाकतो. त्यामुळे नगररचना विभागाचे सध्याचे चित्र निराशाजनक आहे. यंत्रणेत प्राधान्यक्रम असले पाहिजेत. प्लॅन मेरिटनुसारच मंजूर झाले पाहिजेत. परंतु, तसे होताना दिसत नाही. अनियमित काम करणाऱ्याचे काम प्रथम होते. प्लॅन नियमात असेल, तर त्यात त्रुटी शोधून संबंधिताला त्रस्त केले जाते. त्यामुळे बांधकाम परवानग्या सुरळीत होण्यासाठी बिल्डर, आयुक्त, नगररचना विभाग, आर्किटेक्ट आणि ग्राहकांनी एकत्र आले पाहिजे.

-मोहन रानडे, ग्राहक प्रतिनिधी

--

त्रुटी होतील महिनाभरात दूर

ऑटो डीसीआर प्रणाला लागू करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे जूनपासून सॉफ्टटेक कंपनीच्या मदतीने नगररचना विभागात ही प्रणाली लागू करून बांधकाम परवानग्या दिल्या जात आहेत. या प्रणालीत आतापर्यंत २५३ आर्किटेक्ट्स आणि ८९ इंजिनीअर्सची नोंदणी झालेली आहे. जूनपासून आतापर्यंत ५६२ प्लॅन आले असून, ११६ मंजूर झाले आहेत. ३१४ प्लॅन पाइपलाइनमध्ये आहेत. ऑटो डीसीआर प्रणालीत दोष असले, तरी त्यात बदल करण्याचे काम सुरू आहे. सातत्याने बायलॉजमध्ये बदल होत असल्याचाही परिणाम मंजुरी देताना होत आहे. बायलॉज बदलले, तर नव्याने फाइलचा प्रवास होतो. त्यामुळे बायलॉज आणि ऑटो डीसीआरमध्ये सांगड घालण्याची गरज आहे. सध्या बरेच बदल होत आहेत, तसेच विभागाकडे मनुष्यबळाची अडचण आहे. हळूहळू ही प्रणाली आता स्वीकारली जात आहे. बायलॉजमधील अनेक बदल अजून शासनाकडे प्रलंबित आहेत. ते बदल झालेत, तर कामाला अधिक गती येणार आहे. विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. प्लॅन ऑनलाइन दाखल झाला, तरी साइट व्हिजिटला जावेच लागते. त्यामुळेही बराच वेळ जातो. त्यामुळे रिस्कबेस प्लॅन येऊन त्यांना मंजुरीची प्रक्रिया राबविली पाहिजे. आपल्याकडे विभागानुसार बायलॉज आहेत. सिडकोचे प्लॅन वेगळे आहेत. त्यामुळे ऑटो डीसीआरमध्ये त्या पद्धतीने वेळेनुसार बदल करावे लागत आहेत. सध्या सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्याने प्रस्ताव आपण ऑफलाइन घेत आहोत. परंतु, असे असले, तरी आधीपेक्षा आता परिस्थिती सुधारली आहे. विविध संघटनांनाकडून त्यांना अपेक्षित असलेल्या लेखी सूचना घेऊन त्यात बदल केले जात आहेत. येत्या बुधवारी (दि. ३) कंपनीचे डिझायनर येत असून, त्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यात अनेक प्रश्न निकाली निघणार असून, महिनाभरात परिपूर्ण ऑटो डीसीआर नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध होईल.

-आकाश बागूल, सहाय्यक संचालक, नगररचना विभाग

---

सॉफ्टवेअर अद्ययावत अन् परिपूर्ण

सॉफ्टटेक कंपनीकडून विकसित करण्यात आलेले ऑटो डीसीआरचे सॉफ्टवेअर अद्ययावत व परिपूर्ण, तसेच पेटंट सॉफ्टवेअर आहे. दुबई, सिंगापूर येथेदेखील त्याचा वापर केला जात आहे. बायलॉजमध्ये होणाऱ्या बदलांमुळे सॉफ्टवेअरमध्ये बदल करताना अडचणी येत आहेत. सध्या ९९ टक्के सॉफ्टवेअर तयार असून, विंडोजसह अन्य सिस्टीम्सवरही ते आणण्याबाबत इतर कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. टाइमलाइनची प्रक्रिया सुरू झाली आहे. हेल्प डेस्कमध्ये टाइमलाइन सुरू झाले असून, त्याचा सर्वांना लाभ होणार आहे. कंपनीच्या वतीने आता नाशिकमध्ये मनुष्यबळ वाढविले जात असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. बुधवारी कंपनीचे प्रतिनिधी नाशिकमध्ये येत असून, संघटनांकडून आलेल्या सूचनांवर तोडगा काढला जाणार आहे.

-ऋषिराज पुजारी, कन्सल्टंट, सॉफ्टटेक कंपनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खगोलप्रेमींनी अनुभवला ‘सुपरमून’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नववर्षाचा पहिलाच दिवस खगोलप्रेमींसाठी ‘सुपरमून’मुळे पर्वणी ठरला. नेहमीपेक्षा चंद्र चौदा टक्क्यांनी मोठा व तीस टक्के अधिक प्रकाशमय असल्याने त्याचे निरीक्षण करणे खगोलप्रेमींसाठी आनंददायी ठरले. मध्यरात्रीनंतर सूपरमूनची खरी मजा अनुभवण्यास मिळणार असल्याने खगोलप्रेमींनी त्यादृष्टीने नियोजन केले.

प्रत्येक महिन्यात चंद्र काही काळ पृथ्वीजवळ, तर काही काळ दूर असतो. चंद्र पृथ्वीजवळ येणाऱ्या काळात पौर्णिमा असल्यास चंद्राचा आकार मोठा दिसतो. त्याला सुपरमून म्हटले जाते. पौष पौर्णिमेला सोमवारी सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी प्रारंभ झाला, तर मंगळवारी सकाळी ७.५३ मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे. या दरम्यान चंद्र नेहमीपेक्षा आकाराने मोठा दिसून आला. इतरवेळी चंद्र आणि पृथ्वी यांमधील ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर असलेले अंतर ३ लक्ष ५६ हजारपर्यंत आले. त्यामुळे चंद्र नेहमीपेक्षा ७.३ टक्क्यांनी मोठा दिसत असल्याचे खगोल अभ्यासकांकडून सांगण्यात आले. २०१८ या वर्षातील सर्वांत प्रकाशमय व मोठ्या सुपरमूनचा अनुभव यानिमित्ताने खगोलप्रेमींना मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये सर्व खेळांचे चांगले टॅलेंट

$
0
0

नामदेव शिरगावकर यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये वेगवेगळ्या खेळाचे चांगले टॅलेंट आहे. नाशिकचे खेळाडू राज्य, राष्ट्रीयच नव्हे तर थेट आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत, असे मत मार्गदर्शन करताना नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केले. नाशिकसारख्या ठिकाणी सरकारने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाचे प्रशिक्षण केंद्र उभारावे, त्यासाठी मीदेखील संपूर्णपणे प्रयत्न करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले.

भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या नवीन कार्यकारिणीत महाराष्ट्राचे क्रीडा संघटक नामदेव शिरगावकर यांची भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या सहसचिव या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे. यानिमित्त नाशिकच्या विविध क्रीडा संघटना, संस्था, संघटक, क्रीडाप्रेमींसह खेळाडूंच्या वतीने यशवंत व्यायामशाळा, महात्मा गांधी रोड येथे नामदेव शिरगावकर यांच्या भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

या सत्कारावेळी मंचावर नामदेव शिरगावकर यांच्यासोबत भारतीय मॉडर्न पेन्टॅथलॉन असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पूर्णपात्रे, सचिव बिपिन सूर्यवंशी, जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, ज्येष्ठ क्रीडा संघटक आबासाहेब देशमुख, क्रीडा संघटक आनंद खरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी नाशिक जिल्हा क्रीडा महासंघाच्या वतीने नामदेव शिरगावकर यांचा शाल, श्रीफळ आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी यशवंत व्यायामशाळा, नाशिक जिमखाना, नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल संघटना, तलवारबाजी संघटना, जलतरण संघटना, ज्युडो संघटना. अॅथलेटिक संघटना, कबड्डी संघटना, टेनिस व्हॉलीबॉल संघटना, टेनिक्वाइट संघटना, योगा संघटना, जिम्नॅस्टिक संघटना, मल्लखांब संघटना, रोलबॉल संघटना, टेनिस क्रिकेट संघटना, आर्चरी संघटना, जम्परोप संघटना अशा विविध संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंग्यूची धाव हजाराकडे!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्चूनही शहरात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. डेंग्यूच्या रुग्णसंख्येचा आलेख सन २०१६ पेक्षा २०१७ मध्ये वाढला असून, शहर डेंग्यूच्या डेंजर झोनमध्ये कायम आहे. सन २०१७ मधील डेंग्यूबाधितांची संख्या यंदा तब्बल ९४१ वर पोहोचली असून, हिवाळ्यातही डेंग्यू नियंत्रणात आणणे पालिकेला शक्य झालेले नाही. सन २०१६ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ९३० होती. त्यात यंदा वाढ झाली आहे. तर ही आकडेवारी केवळ महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे प्राप्त अहवालांतील असून, खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या डेंग्यूबाधितांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे.

शहरात गेल्या तीन वर्षांपासून डेंग्यूने थैमान घातले असून, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. महापालिकेकडे असलेला कर्मचाऱ्याचा अभाव व पेस्टकंट्रोलबाबत वाढत्या तक्रारी, यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविणे अवघड होऊन बसले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही डेंग्यू नियंत्रणात येत नसल्याने आता आरोग्य व वैद्यकीय विभागही हतबल झाला आहे.

सन २०१७ मध्ये या डेंग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात येतील अशी अपेक्षा होती; मात्र महापालिकेची डास निर्मूलन मोहीम कागदावरच राहिल्याने हा आजार अधिक फोफावल्याचे स्पष्ट झाले. जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत उपाययोजना करूनही डेंग्यूच्या रुग्णांचा आलेख वाढताच राहिला आहे. सर्वप्रथम जानेवारीत या आजाराचे चार रुग्ण आढळले होते; परंतु आजाराच्या साथीकडे डोळेझाक करण्याचे धोरण महापालिकेच्या आरोग्य विभागाने अंगीकारल्याने रुग्णसंख्या वाढत गेली.

मधल्या आरोग्य यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ९७ वर गेली. सप्टेंबर महिन्यात ती आणखी वाढून १०५ वर पोहोचली, तर ऑक्टोबर महिन्यात २४८ जणांना या आजाराची लागण झाली. ऑक्टोबरमध्ये मान्सून माघारी फिरल्यानंतर डेंग्यूचा प्रादूर्भाव आपोआप कमी होईल अशी अपेक्षा होती; परंतु नोव्हेंबरमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लागण झालेल्या संशयित रुग्णांची संख्या ७८०च्या घरात पोहोचली. नोव्हेंबरमध्ये तब्बल २७६ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पाठोपाठ डिसेंबर महिनाअखेर तब्बल १६९ डेंग्यूबाधित आढळून आले. नाशिकमध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण हे सिडको आणि सातपूर या दोन विभागात सापडले आहेत. सन २०१६ मध्ये जानेवारी ते डिसेंबरदरम्यान डेंग्यूचे २३५९ संशय‌ित तर ९३० बाध‌ित रुग्ण आढळले होते. सन २०१७ मध्ये जानेवारी ते डिसेंबरपर्यंत डेंग्यूचे २१६८ संशयित तर ९४१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे डेंग्यूचा प्रकोप कायम असल्याचे चित्र आहे.


महिना- डेंग्यू रुग्ण

जानेवारी- ४,

फेब्रुवारी- ५,

मार्च- ४,

एप्रिल- २,

मे- ६,

जून- १९,

जुलै- १४,

ऑगस्ट- ९७,

सप्टेंबर- १०५,

ऑक्टोबर- २४८,

नोव्हेंबर - २७६,

डिसेंबर १६९.

आता मलेरियाचा अलर्ट

स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा प्रादूर्भाव कायम असतानाचा आता नाशिककरांसमोर मलेरियाचे संकट उभे ठाकले आहे. थंडीचे वातावरण क्युलेक्स डासांच्या उत्पत्तीस पोषक आहे. क्युलेक्स डासाच्या मादीमुळे मलेरिया आजाराचा प्रादूर्भाव होतो. त्यांची संख्या आता वाढायला लागली आहे. त्यामुळे सर्दी, पडसे आणि तापाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मलेरिया आता हायअलर्टवर असल्याने महापालिकेने डास निर्मूलनाच्या कार्यक्रमावर भर देण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना सापडले अवघे दोनशे तळीराम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरत्या वर्षाला निरोप देताना मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. विशेष म्हणजे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात मिळून अवघ्या २०० जणांवर कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

‍३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी तरुणांच्या उत्साहाला उधाण येते. अशा उत्साहाच्या भरातच अनुचित प्रकार घडण्याची शक्यता बळावते. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना मोठ्या प्रमाणावर मद्य रिचविले जाते. मद्य पिऊन वाहने चालविल्याने अपघातही होतात. हे प्रकार टाळता यावेत यासाठी शहरात १३ आणि ग्रामीण भागात ४० पोलिस स्टेशनच्या हद्दीत ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महामार्ग, वर्दळीच्या ठिकाणांवर बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात आली. मद्य प‌िऊन वाहने चालविणाऱ्यांवर प्रामुख्याने कारवाई करण्यात आली. वाहनधारकांच्या तपासणीसाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर उपकरणाची मदत घेण्यात आली. हॉटेल्स, ढाबे, रिसॉर्ट परिसरांत फिक्स पॉइंट लावून तपासणीला प्राधान्य देण्यात आले. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

ग्रामीण भागात मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या ६९ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. तर बेदरकारपणे वाहने चालविल्याप्रकरणी १८५ गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधितांकडून ३८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मद्याची अवैध वाहतूक व विक्रीप्रकरणी १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू असल्याचे पहावयास मिळाले. विशेषत: मोटरसायकलस्वारांना थांबवून त्यांची ब्र‌ेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली. प्रमाणापेक्षा अधिक मद्य सेवन केलेल्या १०९ मद्यपी वाहनचालकांवर शहरात कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपुरी ठरली यंत्रणा

शहर आणि जिल्ह्यात कारवाईसाठी पोलिस मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले असताना केवळ २०० तळीरामांवर कारवाई होऊ शकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ३१ डिसेंबरला शहरातील, महामार्गांवरील बारमध्ये मोठ्या संख्येने तळीरामांची गर्दी होती. मोठ्या प्रमाणावर मद्यदेखील रिचविले गेले. त्यामुळे कारवाईसाठी पोलिस यंत्रणा कमी पडली की काय, असा सवाल उपस्थ‌ित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकळीत वाहने सुसाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

टाकळी परिसरातील रस्त्यांवर सिग्नल व गतिरोधकांअभावी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांत वाढ झाली आहे. त्यामुळे येथील नवीन लिंकरोड चौकात तातडीने सिग्नल व गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे. नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.

कुंभमेळ्यात टाकळी लिंकरोड तयार करण्यात आला. त्यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील जुन्या फेम चौकातून टाकळीमार्गे थेट नाशिक-औरंगाबाद, तसेच मुंबई-आग्रामार्गाला जाता येते. हा लिंकरोड झाल्यापासून येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गतिरोधक व सिग्नल सुरू करण्याची मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टाकळीच्या या नवीन चौकातून एक रस्ता जेलरोडकडे, दुसरा औरंगाबादरोडकडे, तिसरा आगर टाकळीकडे आणि चौथा फेम टॉकीजच्या दिशेने जातो. लिंकरोड होण्याआधी येथे दोनच रस्ते होते. या चौकातील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. औरंगाबाद मार्गाकडे जाताना नवा पूल करण्यात आला आहे. जेलरोडकडे जाणारा रस्ताही डागडुजी करून डांबरी करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहने प्रचंड वेगाने धावत असतात. या चौकात असलेले झाड दुभाजकाचे काम करायचे. मात्र, ते तोडण्यात आले. त्यामुळे वाहने सुसाट धावतात. उपनगरमार्गे जेलरोडला जाताना वाहनांची गर्दी व प्रदूषण असते. ते टाळण्यासाठी कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक टाकळी मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे रहदारी वाढली आहे. मात्र, भरधाव वाहनांमुळे अपघातदेखील वाढले आहेत.

---

तातडीने उपाययोजनांची मागणी

येथे सिग्नल किंवा गतिरोधक टाकण्याची तसदीही महापालिकेने घेतलेली नाही. रात्री येथे अंधार असतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, मोठ्या अपघाताची भीती वाढली आहे. दिवसाही येथून वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. गतिरोधक नसल्याने येथे वरचे वर अपघात होत असून, दोन महिन्यांपूर्वी दुचाकीवरून जाणारी राष्ट्रीय खेळाडू हर्षदा माळोदे हिला तिच्या आईसह पोलिसाच्या खासगी वाहनाने याच चौकात धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतरही अपघातांचे प्रकार सुरूच असल्याने येथे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

---

दोन बळींनंतर पांढरे पट्टे!

जेलरोडला जाणाऱ्या मार्गावर दोन दुचाकींच्या धडकेत पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला होत्या. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा दोन दुचाकींची धडक होऊन ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील धोकादायक रस्त्यांच्या स्थितीबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने जेलरोडला जाणाऱ्या मार्गावर केवळ पांढरे पट्टे मारले. परंतु, टाकळी चौकात मात्र काहीच उपाययोजना केलेली नाही. मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षभरात १६ सीईटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यावसायिक अभ्यासक्रमातील विविध विद्या शाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर वर्गांमधील प्रवेशप्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

आवडीच्या विद्याशाखेत प्रवेश मिळावा, यासाठी आता प्रत्येक विद्या शाखेकरिता प्रवेश परीक्षा सक्तीची आहे. प्रवेश परीक्षांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारनेही काही वर्षांपूर्वी स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलची स्थापना केली होती. या सेलच्या माध्यमातून वर्षभरातील प्रवेश परीक्षांचे नियोजन आणि नियंत्रण केले जाते. आता नवीन वर्षात होणाऱ्या संभाव्य प्रवेश परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक या सेलच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकात अभ्यासक्रमासह प्रवेश परीक्षेची तारीख आणि माध्यम जाहीर करण्यात आले आहे. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर राज्य सरकारतर्फे नियंत्रित होणाऱ्या एकूण १६ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा नवीन वर्षात नियोजित आहेत. यामध्ये अपवाद वगळता सर्वच परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यामध्ये एकूण १६ परीक्षा होतील. यातही बीई किंवा बी. टेक. आणि बॅचलर ऑफ फाइन आर्टस या दोनच परीक्षा पूर्णत: ऑफलाइन असतील. बी.पी.एड. आणि एम.पी.एड. या अभ्यासक्रमांसाठी ऑफलाइनसोबतच ऑनलाइनचाही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.

असे आहे वेळापत्रक

ऑनलाइन प्रवेश परीक्षा

‘एमबीए’ आणि ‘एमएमएस’ ः १० आणि ११ मार्च, एलएल.बी. (पाच वर्षे मुदतीचा) ः २२ एप्रिल, ‘एमसीए’ ः २४ मार्च रोजी, हॉटेल मास्टर ऑफ मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ः २० मे, मास्टर ऑफ एज्युकेशन ः २५ मे,

बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन ः १ जूनला ऑनलाइन, तर २, ३ जूनला ऑफलाइन परीक्षा, बी. एड. ः ९, १० जून, एम.पी.एड. ः ११ जूनला ऑनलाइन, तर १२ जूनला ऑफलाइन परीक्षा, एलएल.बी. (तीन वर्षीय अभ्यासक्रम) ः १७ जून, इंटीग्रेटेड (चार आणि तीन वर्षांचा अभ्यासक्रम) ः २१ जून, मास्टर ऑफ फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडिओ स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स ः २२ जुलै.

ऑफलाइन सीईटी

बी. टेक., बी.ई., बी. फार्मसी, डी. फार्मसी ः १० मे, बॅचलर ऑफ फाईन आर्टस ः १३ मे, मास्टर ऑफ आर्किटेक्चर ः २० मे, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ः २७ मे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तणावमुक्तीसाठी ध्यानधारणा आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कामाच्या ठिकाणी निर्माण झालेली स्पर्धा तणावाला जन्म देते. याचा प्रतिकूल परिणाम माणसाच्या कुटुंबावरही होतो. या तणावाचे व्यवस्थापन करायचे झाल्यास ध्यानधारणेचा अभ्यास अधिक परिणामकारक ठरू शकतो, असे प्रतिपादन औद्योगिक कीर्तनकार डॉ. संदीप भानोसे यांनी केले.

यज्ञोपवित या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस आयुक्तालयात पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा झाली. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. भानोसे म्हणाले, की पोलिस विभागाला बहुतांश वेळा ताणतणावाला सामोरे जावे लागते. त्यांच्या कामाचा तणाव अनेकदा कौटुंबिक स्तरावरही दिसून येतो. योगाभ्यास, छंद जोपासना यांसारख्या उपायांमधून तणावाचे व्यवस्थापन सहज शक्य आहे. सुहास गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. गरुडझेप प्रतिष्ठानचे राजेश शेळके यांनी ‘गैरसमज कसे होतात? विसंवादातून तणाव कसा निर्माण होतो व त्यावरील उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले. यज्ञोपवित परिवाराचे प्रसाद अग्निहोत्री यांनी, ‘पोलिस वर्गाचा सामाजिक कार्यातील सहभाग आणि आनंदनिर्मिती’ या विषयावर मत व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटो-‌डीसीआर महिनाभरात सुरळीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बांधकाम परवानग्यांसाठी सध्या पालिकेच्या नगररचना विभागात ऑनलाइन आणि ऑफलाइनचा सुरू असलेला वापर जानेवारीअखेर पूर्णतः बंद होणार आहे. तसेच पासपोर्ट आणि ‘रेरा’च्या धर्तीवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून, ई-फाइलला नंबर दिला जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन प्लॅन जमा करणाऱ्या आर्किटेक्टना आता सबमिशनसाठी नंबर आणि निश्चित वेळ मिळणार आहे. बांधकाम व्यावसायिकांसह आर्किटेक्टच्या संघटनांनी केलेल्या मागणीला नगररचना आणि सॉफ्टटेक कंपनीने होकार दर्शवला असून, त्यासंदर्भात बुधवारी (‌दि. ३) नगररचना विभागातील अधिकारी आणि सॉफ्टटेक कंपनीच्या संचालकांची बैठक होणार आहे.

‘मटा’तर्फे ऑटो डीसीआर प्रणालीच्या वापरातील त्रुटींसंदर्भात क्रेडाई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स असोसिएशन, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीअरिंग या संघटनांच्या प्रतिनिधींसह नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची राऊंड टेबल आयोजित करण्यात आली होती. त्यात सहभागी प्रतिनिधींनी सध्याच्या ऑटो डीसीआर प्रणालीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचे सांगत, प्रणाली लागू होऊनही ऑनलाइन व ऑफलाइन काम सुरू असल्याबद्दल तक्रारींचा सूर लावला होता. तसेच, बांधकाम परवानग्या पासपोर्ट आणि रेराने स्वीकारलेल्या ऑनलाइन प्रणालीप्रमाणेच व्हाव्यात, अशी मागणी केली. पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विशिष्ट तारीख आणि वेळ निश्चित करून दिली जाते. निश्चित केलेल्या दिवशीच सबमिशन केले नाही तर त्यानंतर येणाऱ्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सगळ्यांचाच वेळ आणि परिश्रम वाचतात. रेरामध्ये नोंदणी केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत परवानगीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामुळे हीच पद्धत ऑटो डीसीआरमध्ये स्वीकारण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली.

बिल्डरांसह नगररचनाची तयारी

क्रेडाईसह विविध संघटनांनी केलेल्या या सूचना स्वीकारण्याची तयारी नगररचना विभागाने दर्शवली आहे. त्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार असून, जानेवारी अखेर ऑटो-डीसीआर प्रणाली निर्दोष बदल बांधकाम परवानग्यांचा निपटारा केला जाणार आहे. तसेच विभागात हार्डकॉपीचा वापरही पूर्णपणे बंद केला जाईल, अशी माहिती सहाय्यक नगररचना संचालक आकाश बागूल यांनी दिली. प्रत्येक अर्जाला नंबर देवून एका समितीसमोर कागदपत्रांच्या छाननीसाठी विशीष्ट तारीख आणि वेळ दिला जाणार आहे.त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या पद्धतीचा अवलंब केला जाणार असल्याचेही बागूल यांनी सांग‌ितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैदान चकाचक करून नववर्षाचे अनोखे स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकरोड येथील शाळा क्रमांक १२५ च्या मैदानाची आनंद जॉगर्स पार्कच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे साफसफाई करून मैदान चकाचक केले अन् अनोख्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत केले.

सोमवारी भल्या सकाळी हाती झाडू-खराटा घेत पदाधिकाऱ्यांनी मैदानाची साफसफाई सुरू केली. तेथे फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनीदेखील हाती झाडू घेत मैदानाची स्वच्छता केली. यावेळी दोन ट्रॅक्टर कचरा जमा करण्यात आला.

आनंद जॉगर्स पार्कच्या पदाधिकाऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राबविलेला हा अनोखा उपक्रम परिसरातील नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरला.

नगरसेवक रमेश धोंगडे, नगरसेविका ज्योती खोले, श्याम खोले, माजी पोलिस अधिकारी रावसाहेब पोटे, नंदन बुब, नाना नगरकर, रमेश कुलकर्णी आदींसह मैदानावर येणाऱ्या असंख्य नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे निरीक्षक संजय दराडे यांनीदेखील कर्मचाऱ्यांसह या उपक्रमात सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौर शोधणार ‘ब्लॅक स्पॉट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राचे स्वच्छता सर्व्हेक्षणात शहराचा पहिल्या दहामध्ये क्रमांक आणण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. उद्यापासून महापौर स्वतःच कचऱ्याच्या ‘ब्लॅक स्पॉट’ची शोधमोहीम राबविणार आहेत. सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान प्रभागांमध्ये जाऊन स्वच्छतेची पाहणी करणार आहेत. शहरात कचऱ्याचे ढ‌ीग आढळल्यास संबंधित विभागातील स्वच्छता निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा भानसी यांनी दिला आहे.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ४ जानेवारीपासून केंद्राचे पथक सर्वेक्षणासाठी येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने स्वच्छतेतील आपला क्रमांक सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत लोकप्रतिनिधींनीही आपला सहभाग वाढवला असून, महापौरच आता मैदानात उतरल्या आहेत. त्या दररोज सकाळी शहरातील ब्लॅकस्पॉट तपासणार असून, ते स्वच्छ करण्यावर भर राहणार आहे.

दुभाजकही स्वच्छ करणार

शहरातील मुख्य रस्ते तसेच उपनगरांमधील रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या दुभाजकांमधील वाढलेले गवत, तसेच दुभाजकांबाहेर साचलेली माती स्वच्छ केली जाणार आहे. विशेष म्हणजे पालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहेदेखील स्वच्छ ठेवण्याच्या सूचना त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सकाळी सात ते नऊ या वेळेत घंटागाडी येत नसल्याची तक्रार नागरिकांकडून प्राप्त होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर घंटागाड्यांचीसुद्धा तपासणी त्या करणार आहेत. कचऱ्याचे ढीग आढळल्यास थेट स्वच्छता निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन दर्शनास भाविकांची पसंती

$
0
0

पहिल्याच दिवशी तीन हजार जणांना लाभ

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सन २०१७ ला निरोप देऊन २०१८ चे स्वागत करीत नव्या वर्षानिमित्त नव्या संकल्पना राबवण्यात शक्ती मिळण्यासाठी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या शक्तिपीठाचा उल्लेख असलेल्या कळवण तालुक्यातील श्री सप्तशृंग देवीच्या हजारो भाविकांनी सोमवारी (दि. १) भगवतीचे ऑनलाइन दर्शन घेतले.

वर्षअखेरीस असल्याने सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्यात आले होते. नववर्षाच्या निमित्ताने आता ऑनलाइन दर्शनाचा लाभ होणार आहे. रविवारी, सुमारे ३ हजारांवर भक्तांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत भगवतीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

सोमवार (दि १) पासून ऑनलाइन दर्शनाची पर्वणी भाविकांना देण्यात आल्याने भाविकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी होती. तिचा अनेक ऑनलाइन भाविकांनी लाभ घेत देवीचे दर्शन घेतले. २०१८ पासून न्यासाच्या www.saptashrungi.net हे संकेतस्थळ व फेसबुकवरील अधिकृत Shree Saptashrung Niwasini Devi Trust, Saptashrung Gad या पेजवर श्री भगवतीची दैनंदिन ऑनलाइन दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात आले आहे. त्याला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, पहिल्याच दिवशी 3 हजारांवर भाविकांनी ऑनलाइन (लाइव्ह) दर्शनाचा लाभ घेतला, अशी माहिती देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आली. आता सर्वच हायटेक होत असताना देवीदर्शन ऑनलाइन झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला असून, त्यांना आता आपल्या घरबसले सप्तशृंग गडावरील भगवतीचे दर्शन घेता येणे शक्य होणार आहे.


वर्षारंभी उसळली गर्दी

श्री भगवतीच्या दैनंदिन स्वरूपात सुरू झालेल्या ऑनलाइन दर्शनाबाबत कोणत्याही प्रकारची सूचना अथवा अडथळा जाणवल्यास न्यासाच्या ०२५९२ २५३३४९/२५३३५१ या कार्यालयीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केले आहे. दरम्यान भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवतीच्या दर्शनासाठी वर्षाखेर व वर्षारंभी हजारो भाविकांनी गडावर गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरतीच्या ‘गोल्फ’भोवती ५१ फेऱ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ धावपटू रंजय त्रिवेदी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांची शिष्या आरती निषाद हिने गोल्फ कल्ब मैदानाला ५१ फेऱ्या मारण्याचा विक्रम केला.

आजच्या युवकांनी व्यसनाधीनता सोडून व्यायामाची कास धरावी, यासाठी अनेक वर्षे रंजय त्रिवेदी गोल्फ क्लबवर वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करीत आले आहेत. यंदाच्या बांद्रा ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर ते ४८ तासांत पूर्ण करणार होते; मात्र नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांची शिष्या आरती निषाद हिने त्यांचा वारसा चालवण्यासाठी गोल्फ क्लबच्या मैदानाला ५१ फेऱ्या मारण्याचा निश्चय केला. या उपक्रमासाठी तिने महिनाभरापासून सराव केला होता. या उपक्रमाला तिने ३१ डिसेंबर रोजी सकाळी सातला सुरुवात केली. दुपारी चार वाजता तिचा हा विक्रम पूर्ण झाला. नियमित ग्राऊंडवर येणाऱ्या जॉगर्सने तिचे अभिनंदन केले. पुढेही असेच विक्रम करण्याचा मानस तिने व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलच्या कर्मचाऱ्यांनी नाकारले निलंबनपत्र!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सेवा बजावत असताना विनापरवानगी चार वेळा बाहेर गेल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी ही कारवाई केली. मात्र, या कर्मचाऱ्यांनी निलंबनाचे पत्र घेण्यास नकार देत कारागृह उपमहानिरीक्षकांकडे धाव घेतली आहे.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात सेवा बजावत असताना रात्री चार वेळा नियम तोडून कारागृहातून ये-जा केल्याचा आरोप शिपाई अनिल पवार आणि हवालदार बाळू पालवे यांच्यावर आहे. कारागृह अधीक्षक साळी यांनी त्यांना निलंबनाचे लेखी आदेश नुकतेच दिले; मात्र हे पत्र घेण्यास या कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. हे आरोप मान्य नसल्याचे सांगत त्यांनी औरंगाबादचे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांच्याकडे आपली बाजू मांडली आहे. यावर वरिष्ठ लवकरच निर्णय घेणार आहेत.

बेशिस्तीची ही घटना घडली असतानाच कारागृहाच्या आवारात ३२ नंबर क्वार्टरमध्ये रोज रात्री गैरप्रकार चालतात, असे निनावी पत्र वरिष्ठांना पाठविण्यात आले आहे. उपमहानिरीक्षकांच्या कार्यालयातील अधिकारी या घटनेची चौकशी करीत आहेत. कारागृह कर्मचाऱ्यांचे ३२ नंबर क्वार्टर हे निवासस्थान आहे. या पत्रानंतर आमच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आजही चौकशी

पवार आणि पालवे यांच्या निलंबनाच्या वृत्ताला औरंगाबाद येथील कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी दुजोरा दिला आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली असून, मंगळवारीही ती ऐकून घेतली जाणार आहे. त्यानंतरच निलंबनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती धामणे यांनी ‘मटा’ला दिली.

कारागृहातील बेशिस्त कर्मचाऱ्यांना चाप लावल्यामुळेच बाहेरील भ्रष्ट प्रवृत्तींच्या मदतीने मला घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निनावी पत्र पाठवणे, शिस्तपालन न करणे ही त्याचीच उदाहरणे आहेत. पारदर्शी व शिस्त कारभाराला कायम प्राधान्य राहील.

- राजकुमार साळी, अधीक्षक, नाशिकरोड कारागृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट शिक्षकांवर कारवाईचा बडगा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवून बदली, बढती आणि प्राप्तिकरसारख्या सवलती पदरात पाडून घेण्यासाठी बागलाण तालुक्यात बहुतांश प्राथमिक शिक्षकांनी अपंग प्रमाणपत्र पदरात पाडून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना यांनी पडताळणीचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात बनावट अपंग प्रमाणपत्र घेऊन शासकीय सवलती लाटल्या जात आहेत. या गंभीर प्रकारामुळे खऱ्या अपंगांवर अन्याय होत असल्याचे अपंग संघटनांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांना निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे मिना यांनी गंभीर दखल घेत बनावट अपंग शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे येथील पंचायत समितीच्या कार्यालयात प्रमाणपत्र पडताळणी ठेवण्यात आली होती. शासकीय लाभ घेत असलेल्या तब्बल १९१ शिक्षकांनी कागदपत्रांसह कार्यालयात दिवसभर गर्दी केली हाती.

या पडताळणीसाठी आलेल्या शिक्षकांमध्ये अस्थिव्यंग, कर्णबधिर, अल्पदृष्टी आदींचा समावेश होता. त्यांच्यात सर्वाधिक शिक्षक कर्णबधिर व अल्पदृष्टीचे आढळून आले. पडताळणी करताना अनेक शिक्षकांची पडताळणी समितीच्या सदस्यांशी शाब्दिक चकमक उडाल्याने काही काळ तणावदेखील निर्माण झाला होता.

बोगस अपंग शिक्षकांचे धाबे दणाणले

तालुक्यातील अपंग प्रमाणपत्रधारक शिक्षकांच्या पडताळणीत ९४० पैकी तब्बल १९१ शिक्षकांना अपंगत्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पडताळणी समितीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसला तरी सरकारच्या नियमानुसार अधिवास असलेल्या जिल्ह्याबाहेरील सर्वाधिक प्रमाणपत्र आढळून आले आहेत. त्यामुळे आता खऱ्या अपंग शिक्षकांची संख्या पन्नासच्या आतच असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. शिक्षण विभागानेदेखील दुजोरा दिल्याने बोगस अपंग शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images