Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिल्ह्यात साडेबाराशे हेक्टर पिकांना फटका

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील पिकांना ओखी चक्रीवादळाचा ४ ते ६ डिसेंबरदरम्यान फटका बसला. याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. १२३१.२२ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष पिकांचे, तर दिंडोरी तालुक्यात २० हेक्टरवर कारल्याचे नुकसान झाले आहे. नाशिक, दिंडोरी, निफाड, सटाणा आणि चांदवड या पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.

ओखी चक्रीवादळाचा फटका १४२ गावांमधील १,१८४ शेतकऱ्यांना बसला आहे. सर्वाधिक नुकसान द्राक्षबागांचे झाले आहे. नाशिकमध्ये वादळाचा थेट फटका बसला नसला तरी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात १२५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या बदललेल्या वातावरणामुळे द्राक्ष पिकांचे नुकसान झाले. ऑक्टोबरमध्येही अवकाळीमुळे ९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोग पडला. दिवसभरात ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास पंचनामे व्हावेत, असा सरकारी निकष आहे. मात्र, ओखी वादळामुळे आलेले संकट नैसर्गिक आपत्ती असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत होती. सरकारनेही पंचनाम्यांचे आदेश दिले. जिल्हा प्रशासनाला नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, यात १२३१.२२ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे, तर दिंडोरी तालुक्यात २० हेक्टरवरील कारल्याचे नुकसान झाले आहे.

तालुका नुकसान (हेक्टरमध्ये)

सटाणा ८९१.८०, चांदवड १३१.६२, मालेगाव १२२.८८, दिंडोरी ६०, देवळा ४०.४५, कळवण २६.११, निफाड १०.८०, नाशिक ६.१६.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लिहिते व्हा’ पुस्तक नवोदितांसाठी लेखन शिबिर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनाची समस्या वाढतच चालली आहे, दिवसेंदिवस संवाद कमी होत चाललाय, मनाचे गॅसचेंबर झाले आहे. त्याचा एखाद्या दिवशी स्फोट होऊन माणूस होरपळणार आहे. अशातच संतोष हुदलीकरांचे ‘लिहिते व्हा’ पुस्तक अभिव्यक्त होण्याचा संदेश घेऊन आले आहे. हे पुस्तक नवलेखकांचे लेखनशिबिरच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व गीतकार प्रवीण दवणे यांनी केले.

गझलकार संतोष हुदलीकर यांच्या ‘लिहिते व्हा’ या पुस्तकाच्या प्रकाशसोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्ह्यातील बारा तरूण साहित्यिकांच्या हस्ते परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा सोहळा रंगला. दवणे पुढे म्हणाले की, गेलेल्या माणसाला देण्यासाठी चार खांदे सापडतात मात्र जिवंतपणी दु:ख वाटून घेण्यासाठी एक खांदा सापडत नाही अशातच लिहिते होण्याचा संदेश देणे ही प्रेरक बाब आहे.

यावेळी व्यासपीठावर कवी ऐश्वर्य पाटेकर, संदीप जगताप, विष्णू थोरे, प्रशांत केंदळे, संतोष वाटपाडे, सुधीर कुलकर्णी, गौरी पटवर्धन, स्वप्नील बापट, अनिता जोशी, सत्यजीत पाटील, सोहा हुदलीकर यांची उपस्थिती होती. ऐश्वर्य पाटेकर म्हणाले की, पुस्तकांच्या बळावर पृथ्वी तरलेली आहे. महान माणसांचे विचार पुस्तकातूनच वाचायला मिळतात. सध्या माणूस संस्कार विसरत चालला आहे कारण त्याच्या हातात पुस्तके नाहीत. पुस्तकातून काढता पाय घेऊ नये म्हणजे संस्कार शोधायला दुसरीकडे जावे लागत नाही असेही ते म्हणाले. यावेळी संतोष हुदलीकर यांनी पुस्तकाविषयी भूमिका विशद केली. सूत्रसंचालन आनंद क्षेमकल्याणी यांनी केले.

बारा महिन्यात होणार बारा पुस्तकांचे प्रकाशन

नाशिकचे प्रख्यात गझलकार संतोष हुदलीकर यांना पुस्तक प्रकाशनाविषयी एक अभिनव कल्पना सुचली असून ते त्यावर प्रत्यक्ष अमलबजावणीही करीत आहेत. नव्या वर्षात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एक अशी बारा पुस्तके ते प्रकाशित करणार आहेत. द्वादश प्रकाशन या नावाने हा सोहळा होणार असून परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा सोहळा रंगणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळेचे क्रीडांगण वादाच्या भोवऱ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

आदिवासी आश्रमशाळांचे कामकाज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सदैव चर्चेत असते. एकीकडे कनाशी येथील आदिवासी आश्रमशाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळते तर दुसरीकडे याच विभागाच्या शासकीय आश्रमशाळांच्या क्रीडांगणाचे कामकाज आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत लाखो रुपयांचा निधी क्रीडांगण तयार करण्यासाठी देण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाचे कामे झाल्यामुळे क्रीडांगण आहेत की नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. इस्टिमेटनुसार कामे करण्यात आली नसल्यामुळे लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. या क्रीडांगणाची वरिष्ठ

पातळीवरून चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे.

बोगस कामे करून ठेकेदारांनी लाखो रुपयांची माया हडप केली आहे. क्रीडांगण तयार करण्यासाठी केवळ एक ते दोन दिवसांत एका शाळेचे क्रीडांगणे तयार करून लाखो रुपये खर्च केला आहे. आश्रमशाळेच्या यंत्रणेकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने निकृष्ट क्रीडांगणे तयार झाल्याचेही बोलले जात आहे. याबाबत विधानसभेत याप्रश्नी आवाज उठवण्यात येईल, असे आमदार जे. पी. गावित यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलाच्या तयारीला लागा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील नवीन बसस्थानक परिसरात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात महापालिकेत महत्त्वाची बैठक झाली. आमदार आसिफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा आयुक्त संगिता धायगुडे यांनी ही बैठक घेतली. वाढती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याच्या सूचना शेख व धायगुडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शहरातील नवीन बसस्थानक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससह खासगी वाहतूक, मालवाहतूक याच मार्गावरुन जातात. त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली निघावा यासाठी २१ कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाच्या कामास शासनाने मान्यता दिली आहे. या उड्डाणपुलाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त धायगुडे यांनी दिले.

उड्डाणपुलाच्या कामात अडथळे येऊ नये यासाठी या मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार असून सर्व्हिस रोडच्या कामाआधी उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या पुलाबाबतच्या महत्त्वाच्या कामांना तडीस नेले जाणार आहे.

या कामांमध्ये अडथळा येऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जुना आग्रा रोडवरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. नवीन बस स्थानकात येणाऱ्या बसेस जुन्या बस स्थानकात थांबणार आहेत. याबाबतच्या सूचना राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सर्व्हिस रोड, उड्डाणुपूल व व‌िजेच्या कामासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्याच्या सूचना आमदार आसिफ शेख यांनी दिल्या.

वीजतारा होणार भूमिगत

या मार्गावरील वीजतारा भूमिगत करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबतही चर्चा झाली. याबाबतचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती वीजवितरणच्या अधिकाऱ्यांनी

दिली. या बैठकिस राज्य परिवहन महामंहळ, वीज वितरण कंपनी, नगररचना विभागाचे अधिकारी, पालिकेतील

अधिकारी तसेच शहरातील ट्रक चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य पुलाची लांबी

३०२.५० मी

सलग्न रोड

२१२ मी .

एकूण उड्डाणपूल लांबी

५१४.५० मी

पुलाची रुंदी

१२ मी

एकूण मंजूर प्रस्तावित रक्कम

२१.७२ कोटी रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याबाबत शेतकऱ्यांना टिप्स

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड


राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) या संस्थेला ४० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कांदा, लसूण आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकतेच मार्गदर्शन शिब‌िर झाले. शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनात कशी वाढ करता येईल याबाबत मार्गदर्शन करणे, हा या शिबिराचा हेतू असल्याचे एनएचआरडीएफ संचालक डॉ. पी. के. गुप्ता यांनी सांगितले.

चितेगाव येथील एनएचआरडीएफमध्ये २९ आणि ३० डिसेंबररोजी हे शिब‌िर पार पडले. शिब‌िराच्या अध्यक्षस्थानी द्राक्ष निर्यायदार संघाचे अध्यक्ष जगण खापरे होते. व्यासपीठावर नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, एनएचआरडीएफचे संचालक संजय होळकर, यू. बी. पांडे, डॉ. एस. आर. भोंडे उपस्थित होते.

डॉ. गुप्ता म्हणाले, या शिबिराचा शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा आणि कांदा, लसूण व बटाटा या पिकांचे उत्पादन दुपटीने कसे वाढेल असा प्रयत्न करावा. राजस्थानात पाण्याची कमतरता असल्याने कांद्याची गुणवत्ता मिळत नाही. त्यामुळे तेथेही लाल कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना शिब‌िरातून मार्गदर्शन केले जाणार आहे. एखाद्या पिकाला भाव मिळाल्यावर सर्वच शेतकरी तेच पीक घेतात. असे न करता वेगवेगळी पिके घ्यावीत, असा सल्लाही त्यांनी शेवटी दिला.

नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील म्हणाले, २२ महिन्यांपासून कांदा उत्पादक तोटा सहन करुन आपला माल विकत आहेत. परतीच्या पावसामुळे काही ठिकाणचा कांदा खराब झाला. त्यामुळे बराच कांदा खराब झाला. मागणीपेक्षा पुरवठा काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे कांद्याला जास्त भाव मिळत आहे.

यू. बी. पांडे यांनीही मार्गदर्शन केले. शिबिरासाठी महाराष्ट्रासह ाजस्थानातून आलेल्या २०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. जगण खापरे यांनी रासायनिक खतामुळे जमीन खराब होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षात पर्यावरण बचावसाठी झटणार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड


तरुण मंडळी नववर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्या करतात. या ओल्या-सुक्या पार्ट्यांमुळे अनेकदा नववर्षाच्या सुरुवातीलाच अनेक गैरप्रकार समोर येतात. मात्र काही ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रबोधनात्मक, धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. अशा एक आदर्श उपक्रम निफाड येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रात आज घेण्यात आला. यातून पर्यावरण बचावचा संदेश देण्यात आला.

गेल्या चार वर्षांपासून निफाड येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र हा उपक्रम राबवित आहे. सेवा मार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्या प्रेरणेने आगळ्यावेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

येथील केंद्रात ३१ डिसेंबरच्या रात्री श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चारित्रासमृत या ग्रंथाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. आदिशक्तीचा जयजयकार, मंत्र जप, गुरुदेव समाधी स्थानावर चादर चढव‌िणे असे अनेक धार्मिक कार्यक्रम रविवारी रात्री ९ ते १२ या वेळात घेण्यात आले. सर्व सेवेकऱ्यांनी रात्री १२ वाजता देवीचा जयजयकार करीत नवीन वर्षाचे स्वागत केले.

सेवेकऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा

नवीन वर्षात श्री स्वामी समर्थ महाराजांची जास्तीत जास्त सेवा करतानाच पर्यावरण संवर्धनासाठी ‘झाडे लावा झाडे जगवा’ असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडण्यात आला. निफाड सेवा केंद्राचे प्रमुख वि. दा. व्यवहारे यांनी सेवेकऱ्यांकडून सेवा संकल्पासाठी सामुदायिक प्रतिज्ञा घेतली. सुभाष खाटेकर, सुलोचना मेधणे, अॅड. जगदीश बागडे, यशवंत शिंदे, सूर्यभान टर्ले, भूषण सोनवणे, संदीप भुजबळ, मंगेश डरंगे, कडलग बाबा आदींसह १०० सेवेकरी सहभागी झाले होते.

नवीन वर्षाचे स्वागत कोण कसे करतो, यापेक्षा आपण कसे करतो आणि करावे हे महत्त्वाचे आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण जरी झाले, तरी आपल्या परंपरेने अध्यात्मिक सेवा करून नववर्ष साजरे करावे, असा आमचा हेतू होता. तसेच गुढीपाडवाही आम्ही आपल्या परंपरेने साजरा करतो.

- वि. दा. व्यवहारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा, हॉटेल्स, रुग्णालय पास

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ अंतर्गत येत्या ४ जानेवारीपासून शहरात सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे. त्याअंतर्गत येणाऱ्या विविध बाबींची पूर्तता करण्यासाठी पालिकेकडून तयारी सुरू आहे. शहरातील शाळा, दवाखाने, हॉटेल्स, मार्केट यांना देखील स्वच्छतेचे रॅकिंग देण्यात आले आहेत. यासाठी सर्वेक्षणात २० गुण असणार आहेत. या स्वच्छ रॅकिंगनुसार शहरातील स्टार हॉटेल, एल.व्ही. एच. शाळा, श्रेष्ठता नेत्र चिकित्सालय व महात्मा फुले भाजी मार्केट यांना पहिल्या क्रमांकाचे रॅकिंग मिळाले आहे.

महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील शाळा, दवाखाने, हॉटेल्स, मार्केट यांना स्वच्छतेबाबत गुणांक देण्यात आलेत. यासाठी १७ ते २४ डिसेंबर दरम्यान प्रत्येक प्रभागात प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांच्या समितीने पाहणी केली.

असे मिळाले गुण

स्वच्छ शाळा

एल. व्ही. एच. विद्यालय- १५० पैकी १४९ गुण, भारत विद्यालय, मालेगाव कॅम्प - १४४ गुण, आर. बी. एच कन्या विद्यालय, मालेगाव कॅम्प - १४३ गुण

स्वच्छ दवाखाना

श्रेष्ठता नेत्र चिकित्सालय सोयगाव - १६० पैकी १४५ गुण, अलहेरा रुग्णालय, नयापुरा - १४१ गुण, रचना रुग्णालय, सिंधी कॉलनी - १४१ गुण

हिराई रुग्णालय, सटाणा नाका - १४१ गुण

स्वच्छ हॉटेल

स्टार हॉटेल - १५० पैकी ९५ गुण, हॉटेल राधिका, मोतीबाग नाका - ९० गुण, हॉटेल रामराज, श्रीराम नगर - ८० गुण

स्वच्छ मार्केट

महात्मा फुले भाजी मार्केट - १०० पैकी ५८ गुण, सिंधी मार्केट, रामसेतू - ५६ गुण, सोमवार बाजार, रावळगाव नाका - ४९ गुण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदनपुरीत ‘येळकोट येळकोट’चा गजर

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

प्रत‌िजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील श्री क्षेत्र चंदनपुरी येथे मंगळवारपासून श्री खंडेराय महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. सोमवारी गावातील तरुण व मल्हारभक्तांनी जेजुरी येथील मंदिरातून प्रज्वलित केलेली मशाल ज्योत पदयात्रा चंदनपुरीत दाखल झाली. उद्यापासून पुढील १५ दिवस चंदनपुरीत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर होणार आहे.

ज्योत आणली त्यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. राजेंद्र पाटील, सरपंच योगिता अहिरे, राजाराम जाधव, शरद पाटील, विजू गवळी व भाविक उपस्थित होते. यानंतर संपूर्ण गावात या मशाल ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. या मशालीने मंदिर परिसरातील दिवटी पेटव‌िण्यात आली. मंगळवारी सकाळी मनाच्या काठ्या, देवाचे मुखवटे यांची गावातून सवाद्य मिरवणूक निघेल. यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे सपत्नीक महापूजा करतील. खंडेराय महाराजांच्या यात्रोत्सवासाठी संपूर्ण चंदनपुरी नगरी सज्ज झाली असून, भाविकांसाठी ग्रामपंचायत व जय मल्हार ट्रस्टच्या वतीने विविध सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

सीसीटीव्ही यंत्रणा

किल्ला पोल‌िस ठाण्याच्या वतीने चोख पोल‌िस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात्रेत ५०० व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. मंदिरपरिसरात रंग रंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवस श्री क्षेत्र चंदनपुरीत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर होणार आहे.

नवसपूर्तीसाठी गर्दी होणार

चंदनपुरीत दरवर्षी हजारो भाविक नवसपूर्तीसाठी येतात. यंदाही नवसपूर्तीसाठी मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता आहे. यंदा वर्षाची सुरुवात आणि योत्रात्सव यांचा मेळ साधला गेला आहे. अनेक भाविकांनी सोमवारी येथे दर्शन घेवून नवीन वर्षाची सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘दलित वस्ती’ प्रस्ताव सादर करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांकडून दलित वस्ती सुधार योजनेचा निधी पळविल्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर आता भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे सुद्धा या मुद्द्यावर आक्रमक झाल्या आहेत.

शहरातील दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचा आ. फरांदे यांनी आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा घेतला. तसेच राज्य सरकारने नाशिकसाठी स्वतंत्र १२ कोटीचा निधी मंजूर केला असून त्यासाठी नगरसेवकांकडून प्रस्ताव मागवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा ‘डीपीआर’ही शासनाला लवकर सादर करण्याची सूचना फरांदे यांनी केली.

राज्य सरकारने शहरात दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत स्वंतत्र १२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे या निधीच्या खर्चासह नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या व प्रश्नांबाबत आ. फरांदे यांनी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या दालनात बैठक घेतली. स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, शहर अभियंता उत्तम पवार यांच्यासह नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. राज्य सरकाकडून मंजूर झालेल्या १२ कोटी रुपयांच्या निधीसाठी मतदारसंघातील दलित वस्ती व दलितेतर वस्ती यातील विकासकामांबाबत आढावा घेत लवकर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आमदार देवयानी फरांदे यांनी दिल्या. तसेच विविध कामांबाबत महापालिकेने तातडीने काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. सोबतच मध्य विभागातील उघड्या नाल्यांबाबत नगरसेवकांनी तक्रार केली. उघडे नाले बंद करण्यासंबंधी डीपीआर तयार केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर प्रधानमंत्री आवास योजनेचा डीपीआर लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

गोल्फ क्लबची समस्येतून सुटका
बैठकीत आ. फरांदे यांनी गोल्फ क्लब सह शहरातील जॉगिंग ट्रॅकच्या दुरवस्थेचाही प्रश्न उपस्थित केला. विशेषत: गोल्फ क्लबच्या समस्यांबाबत नागरिकाच्या तक्रारींची जाणीव फरांदे यांनी करून दिली. जॉगिंग ट्रॅकचे नियोजन महापालिकेचे विविध विभाग करत असल्याने त्यांच्यातील विसंवादाने अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर तोडगा काढून जॉगिंग ट्रॅकसाठी ५० लाखांचा निधी राखीव आहे. जॉगिंग ट्रॅकच्या समस्या सोडविल्या जातील, असे त्यांनी आश्वासन आयुक्त कृष्णा यांनी दिली आहे.

यापूर्वीचे प्रस्ताव तपासणार
महापालिकेकडून दलित वस्ती सुधारणेसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचा गैरवापर झाल्याची तक्रार शिवसेनेने केली आहे. हा निधी गरज नसलेल्या ठिकाणी वापरल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केला होता. त्याबाबत आयुक्तांनी माझ्याकडे याबाबत तक्रार आली नसल्याचे सांगितले. तसेच दलित वस्ती व्यतिरिक्त निधी वापरल्याचे लक्षात आल्यास अथवा त्याबाबत कुठे चुकीचे प्रस्ताव झाले असल्यास त्याची तपासणी करून ते रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कान्होजी आंग्रे इन्स्टिट्यूटची राष्ट्रीय स्तरावर घोडदौड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सीएचएमई इन्स्टिट्यूटने नेहरू मेमोरियल म्युझिअम आणि लायब्ररी यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावर नवी दिल्ली येथे चर्चासत्र झाले. या निमित्ताने गतवर्षी स्थापन झालेल्या इन्स्टिट्यूटची घोडदौड आता राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे.

अठराव्या शतकात ब्रिटिश अन् पोर्तुगीजांसह डच, फ्रेंच यांसारख्या बलशाली परकीय आक्रमकांचा बिमोड करणारे मराठा आरमारप्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावे सीएचएमई सोसायटीच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या नाशिकच्या या इन्स्टिट्यूटने राष्ट्रीय स्तरावर घोडदौड सुरू आहे.

‘हिंदी महासागराबाबत भारतीय दृष्टिकोन’ या विषयावर कान्होजी आंग्रे इन्स्टिट्यूटच्या पुढाकाराने नोव्हेंबरमध्ये झालेल्या या चर्चासत्रात सागरी सुरक्षा या विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सहभाग घेत विचारमंथन केले. गेल्या वर्षी १ जानेवारी २०१७ रोजी ‘मटा’ ने ‘सागरी सुरक्षेसाठी दमदार पाऊल’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यावेळी नुकत्याच स्थापन झालेल्या कान्होजी आंग्रे इन्स्टिट्यूट या विषयासंदर्भातील तपशील या वृत्तात प्रकाशित करण्यात आला होता. पुढील वर्षभराच्या कालावधीत ‘सागरी सुरक्षा’ या विषयाच्या धोरणात्मक अभ्यासाच्या अनुषंगाने इन्स्टिट्यूटचे कार्य आता राष्ट्रीय स्तरावर सुरू झाले आहे.

सागरी सुरक्षेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन आता सागरी सुरक्षेसाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ देशाला पुरविण्याचे उद्दिष्ट्य या इन्स्टिट्यूटने ठेवले आहे. नाशिकमधील सेंट्रल हिंदू मिलिटरी सोसायटी आणि मुंबई विद्यापीठ हे या विषयात कार्यरत आहेत. या इन्स्टिट्यूटचे अभ्यास केंद्र नाशिकला होणे अद्याप प्रस्तावित आहे. या ‘रिसर्च इन्स्टिट्यूट’चा प्रमुख भर सागरी सुरक्षेशी निगडित विविध आयामांसोबतच संबंधित विषयांच्या संशोधनावर आहे. यात प्रामुख्याने सागरी सुरक्षाविषयक धोरणे, सागरी इतिहास आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यावर हा भर आहे. याशिवाय संरक्षण दलाला धोरणांनुसार अपेक्षित ती आवश्यक मदत करण्याचीही भूमिका या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सांभाळली जाणार आहे.

सागरी शिक्षणासाठी आशावाद
भारताला तब्बल ७ हजार ५१७ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या विशाल किनाऱ्यावर १२ मोठी, तर १८७ लहान बंदरे आहेत. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ‘सागरी सुरक्षा’ विषयाचे महत्त्व विशेष वाढले आहे. येथील भोसला मिलिटरी स्कूलमधून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणारे बहुतांश विद्यार्थी संरक्षण दलात निवडले जातात. या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेबाबत संस्थेच्या ज्या विद्यार्थ्यांना ‌विशेष रस असेल, त्यांच्या भविष्यासाठी ही इन्स्टिट्यूट आशेचे केंद्रच ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच मंचावर शंभर कवींचा मेळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काव्यगायन व काव्यवाचनाचा आनंद एकाच मंचावर तब्बल शंभर कवींकडून मिळाला तर...! नववर्षामध्ये ही संधी कुसुमाग्रज साहित्य मंचाने उपलब्ध करून दिली आहे. कुसुमाग्रज साहित्यिक मंचतर्फे तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि. १३) सकाळी नऊ वाजेपासून श्री समर्थ मंगल कार्यालय, कॅनडा कॉर्नर येथे महास्पर्धा होणार आहे.

नगरसेवक सलीम शेख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून विजयकुमार मिठे यांची उपस्थिती राहील. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी किशोर पाठक, खलील मोमीन, फुला बागूल, संजय बोरुडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सकाळी साडेनऊला पैठण येथील सदानंद मगर यांचे भजन गायन होणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीनपर्यंत कविता सादरीकरण महास्पर्धा रंगणार आहे. यात राज्यभरातील सुमारे १०० कवी सहभागी होणार आहेत. आरती शिरवाडकर, मानसी देशमुख या सूत्रसंचालन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात दुपारी साडेतीनला संजय गोराडे यांचे कथा अभिवाचन तर सायंकाळी चारला निकालाची घोषणा व पुरस्कार वितरण केले जाणार आहे.

याचा होणार गौरव
कार्यक्रमात चांदवड येथील कवी व ग्रंथचळवळीतील कार्यकर्ते रवींद्र देवरे यांना ‘ग्रंथधन’ या विशेष पुरस्काराने गौरवले जाणार आहे. त्यांनी आपल्या खासगी ग्रंथसंग्रहातून लोकांसाठी वाचनालय सुरू केले आहे. कवी संतोष वाटपाडे, सुरेखा बोऱ्हाडे, सत्यजित पाटील, वृषाली सानप, सुभाष पाचारणे, बाळासाहेब लबडे यांना ‘ग्रंथप्रेरणा’ पुरस्काराने, तर कवयित्री ऊर्मिला बांदिवडेकर यांना ‘अक्षरसाधना’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. महास्पर्धेला प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय चौधरी, डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे, रवींद्र मालुंजकर, विवेक उगलमुगले, प्रशांत केंदळे, ज्ञानेश्वर पाटील, शरद पुराणिक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकत्या जिन्यांना ‘गती’

$
0
0

मटा इम्पॅक्ट

------

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्यांचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी दोन लिफ्ट गेल्या वर्षीच सुरू झालेल्या आहेत. येथील सरकते जिने हे मॉलमधील जिन्यांप्रमाणे असतील. रेल्वे स्थानकात सरकते जिने बसवावेत यासाठी ‘मटा’ने वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

प्लॅटफॉर्म क्रमांक एकबरोबरच प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरही सरकते जिने उभारले जाणार आहेत. हे काम दोन महिन्यांत पूर्ण होईल. भुसावळच्या रेल्वे अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईची कंपनी हे काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिकरोड रेल्वे स्थानकातून दररोज सरासरी पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. हे लक्षात घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोनवर लिफ्ट बसविण्याची मागणी होती, ती गेल्या वर्षी पूर्ण झाली. लिफ्टचे काम नाशिकच्या सरदार इंजिनीअर्स अँड असोसिएशनने केलेले आहे. लिफ्ट सुरू झाल्याने ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना दिलासा मिळाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकबरोबरच प्लॅटफॉर्म दोन आणि तीनच्या पॅसेजमध्ये सरकते जिने (एस्केलेटर्स) बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयाशेजारी पायाचे काम सुरू झाले. सरकते जिने झाल्यानंतर गर्दीचे योग्यरीत्या व्यवस्थापन होणार आहे. चारही प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना सुलभतेने जाता येईल.

--

नाशिक स्थानकातून श्रीगणेशा

रेल्वेच्या भुसावळ विभागात मनमाड, भुसावळ, खंडवा, अकोला, वनडेरा येथेही सरकते जिने बसविले जातील. नाशिकपासून त्याचा श्रीगणेशा झाला आहे. या सहाही ठिकाणांचे ड्रॉइंग करण्याचे काम भुसावळला करण्यात येत आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर नाशिकरोडचे बांधकाम अभियंते पुढील कार्यवाही करणार आहेत. सरकत्या जिन्यांना मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा लागणार आहे. रेल्वेच्या नाशिकरोड वीज अभियांत्रिकी विभागाने विजेसंबंधीचा अहवाल भुसावळला दिला आहे. नोव्हेंबरमध्ये या जिन्यांचे काम सुरू होणे अपेक्षित होते, ते जानेवारीत सुरू झाले आहे.

--

पुलावर जाण्यासाठी वापर

नाशिकरोड स्थानकातील जिन्यांच्या पायऱ्या उंच असल्याने जिने चढणे दिव्यच ठरत आहे. मुंबईप्रमाणे रॅम्पसारखे जिने नाहीत. लिफ्ट बसविण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिक, अपंग, रुग्ण, गर्भवती यांना जुन्या जिन्यांचा त्रास होत होता. आताही या जिन्यांमुळे पायदुखी वाढते. सध्या दोन लिफ्ट सुरू झाल्या असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, लिफ्टला मर्यादा आहे. सरकते जिने बसविल्याने ज्येष्ठांबरोबरच नेहमीच्या प्रवाशांचाही त्रास कमी होईल. सरकते जिने वर जाण्यासाठी व खाली येण्यासाठी असतात. नाशिकरोडचे सरकते जिने फक्त पादचारी पुलावर जाण्यासाठी असतील. उतरण्यासाठी रॅम्प व पारंपरिक जिन्यांचा वापर करावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

--

पादचारी पूल जोडले

मुंबईत काही महिन्यांपूर्वी रेल्वे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासन जागे झाले आणि मुंबईबरोबरच नाशिकच्या सरकत्या जिन्यांचा प्रस्ताव मार्गी लागला. महिनाभरापूर्वी दोन पादचारी पूल जोडण्यात आले. नाशिकरोडला कुंभमेळ्यात चौथा प्लॅटफॉर्म बांधल्यानंतर अलीकडे दोन लिफ्ट बसविण्यात आल्या. स्थानकात पैसे टाकून, तसेच कार्ड स्वाइप करून तिकीट घेण्याची दोन स्वतंत्र मशिन्स लावण्यात आली आहेत. मिनरल वॉटरचे मशिनही आहे. स्थानकाभोवती संरक्षक भिंत बांधण्याचा, चारचाकींचे नवीन पार्किंग, आधुनिक स्कॅनर, पुरेसे कॅमेरे व मेटल डिटेक्टर लावण्याचे प्रस्ताव आहेत. ते मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरच्या घरी साकारा कुंड्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फ्लॅट संस्कृतीमध्ये बगीचा फुलवायचा असेल, तर कुंड्यांशिवाय पर्याय नसतो. बगीचा फुलविण्यासाठी कुंड्यांची मोठी मदत होते. बाजारात अनेक प्रकारच्या कुंड्या उपलब्ध असतात, परंतु या कुंड्या आपल्याला घरच्या घरी तयार करता आल्या तर..! ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कल्चर क्लबतर्फे आता अशी संधी उपलब्ध झाली आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे कुंड्या कशा बनवायच्या याविषयी डेमो वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. ७) सकाळी १० वाजता अजय मित्रमंडळ हॉल, इंदिरानगर या ठिकाणी हे वर्कशॉप होणार आहे.

या वर्कशॉपमध्ये निसर्गसंवर्धक संदीप चव्हाण हे वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या कशा बनवायच्या याचे मार्गदर्शन करणार आहेत. कागद आणि सिमेंटपासून कुंडी कशी बनवायची, फक्त सिमेंटपासून, सिमेंट आणि गोणपाटापासून कुंडी कशी बनवायची हे या वर्कशॉमध्ये ते सांगणार आहेत. या डेमो वर्कशॉपसाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३- ६६३७९८७, तसेच ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

--


कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत निषेध मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भीमा कोरेगाव घटनेचा देवळालीतील रिपब्लिकन पा‌र्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी निषेध करीत देवळातील दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.

रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी जुन्या बस स्थानक परिसरात असलेल्या फलकावरुन समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र नेते विश्वनाथ काळे, सिद्धार्थ पगारे, आर. डी. जाधव, सुभाष बोराडे, संजय भालेराव, सुरेश निकम, अशोक साळवे, पंडित साळवे, गौतम भालेराव, पद्माकर दोंदे, राजू जाधव, विजय निकम, प्रणिल शेजवळ या रिपाइं पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी देवळालीच्या जुन्या बस स्थानकापासून भीमा कोरेगाव भ्याड हल्ल्याचा निषेध करत जातीयवाद करणाऱ्या समाजकंटकांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. शहरातील व्यापारी व व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. शहरातील विविध रस्त्यांवरून घोषणाबाजी करत निषेधकर्त्यांनी देवळाली कॅम्प पोलिस स्थानकाबाहेर जमत पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली.

शहरातून निषेध नोंदविण्यासाठी निघालेल्या मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात दगडफेक झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे जलद प्रतिसाद पथकांचे १२ जवान हजर झाले. यावेळी पोलिस स्थानकाबाहेर पोलिस उपायुक्त कोकाटे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना समाजात कुठलीही दुही पसरणार नाही, याकडे लक्ष देण्याची विनंती केली. त्यानंतर हा निषेध मोर्चा पुन्हा जुन्या बस स्थानकावर समाप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवासस्थाने दुरवस्थेचे दशावतार

$
0
0

मटा मालिका

सरकारी इमारतींना ‘घरघर’

देवळाली कॅम्प

--------------

निवासस्थाने दुरवस्थेचे दशावतार

--

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प


देवळाली कॅम्प येथे लष्कराची विविध प्रशिक्षण केंद्रे स्थापन करीत असताना तत्कालीन ब्रिटिश सरकारने लष्करी व परिसरातील रहिवाशांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने १८६९ मध्ये देवळाली कॅन्टोन्मेंन्ट बोर्डाची स्थापना केली. कॅन्टोन्मेंटच्या कामकाजाचा विस्तार वाढत असताना नागरिकांना कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधांसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी विविध ठिकाणी दीडशेहून अधिक खोल्या बांधण्यात आल्या. त्यापैकी काही ठिकाणी दुरुस्ती तर काही ठिकाणची स्थिती अगदी १९३५ सालापासून आजतागायत जैसे थे आहे. बहुतांश निवासस्थानांच्या दुरवस्थेचे दशावतार कायम आहेत. याबाबत घेतलेला आढावा...

---

खोल्यांची संख्या अन् स्थिती

--

सहा चाळ : ७२ खोल्या, २९ बंद

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल : २२ खोल्या, ८ बंद

गवळीवाडा ः १८ खोल्या, १ बंद

गुरुद्वारारोड ः १९ खोल्या, २ बंद

स्टेशनवाडी : ९ खोल्या, ३ बंद

मिठाई स्ट्रीट : ९ खोल्या

फायर स्टॉप : ७ खोल्या

--

सहा चाळींत सुविधांचा अभाव

कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे आनंदरोडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जागेत सहा चाळींमध्ये ७२ खोल्यांची उभारणी करण्यात आली. तेथे आरोग्य विभागातील कर्मचारी प्राधान्याने आहेत. प्रत्येकी १८० चौरस फूट असलेल्या या खोल्यांपैकी केवळ ४३ खोल्यांमध्ये कर्मचारी राहत असून, उर्वरित खोल्या कर्मचारी निवृत्त झाल्याने रिकाम्या आहेत. या खोल्यांवरील कौलारू छप्पर २००३ मध्ये निगार हुसेन या महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हटवून त्यावर सिमेंटचे पत्रे टाकले. वीज, पाणी या सुविधा नियमित आहेत. कर्मचारी चाळींच्या बाजूला नवीन पद्धतीने शौचालये, तर काही कर्मचाऱ्यांना थेट घरालगत शौचालये बांधून देण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी येथील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते, तर काही ठिकणी काँक्रिटीकरण केले गेले. मात्र, आता जागोजागी खड्डे व बऱ्याच ठिकाणी काँक्रिटीकरण उखडले आहे. येथील बहुतांश खोल्यांवरील पत्रे फुटले असून, पावसाळ्यात रहिवाशांना गैरसोय सहन करावी लागते. प्रशासनाकडून छपरावर वेळोवेळी डांबराचे शीट टाकून ते रोखण्याचा निरर्थक प्रयत्न करण्यात येतो. मात्र, त्याने फरक पडत नसल्याची स्थिती आहे. येथे जरी स्वच्छता कर्मचारी राहत असले, तरी त्यांच्या घरातील कचरा टाकण्यासाठी येथे असलेल्या कचराकुंडीचीही दुरवस्था झाली आहे. दररोज घंटागाडी येत असली, तरी अनेक कर्मचारी कामावर जात असल्याने प्रत्येकाला घंटागाडीत कचरा टाकणे शक्य होत नाही. त्यासाठी प्रशासनाने येथील कचराकुंडीदेखील दुरुस्त करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. देवळालीतील विविध वॉर्डांमध्ये प्रशासनाने ग्रीन जिम उभारल्या आहेत. येथील कर्मचारी व त्यांच्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी या चाळींजवळ एखादी ग्रीन जिम बसविल्यास सोयीचे होईल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

---

८० वर्षांत एकदा दुरुस्ती!

मिठाई स्ट्रीट चाळ येथे कॅन्टोन्मेंट बोर्डाने येथील कर्मचाऱ्यांकरिता १७५ चौरस फुटांच्या ९ खोल्या १९३८ मध्ये साडेतीन हजार रुपये खर्चून बांधल्या. या ठिकाणी कार्यालयातील शिपाई व काही कामगार राहतात. या चाळींमध्ये गेल्या ८० वर्षांपासून केवळ पत्रे टाकण्याचे काम सोडल्यास एकदाही प्रशासनाने येथे दुरुस्ती केलेली नाही. येथील भिंतींचे प्लास्टर जागोजागी पडलेले आहे. पत्रेही गळतात. घरांमध्ये सतत घुशींचा वावर असतो. नाल्यांची दुरवस्था न सांगितलेली बरी अशी अवस्था आहे. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना शौचालय बांधून ते वापरा असे म्हणणाऱ्या प्रशासनाच्या येथील खोल्यांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्याप बोर्डाने ठरविल्याप्रमाणे शौचालय बांधून देण्यात आलेले नाही. संबंधित कंत्राटदार या कामास विलंब करीत असल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. सुमारे ८० वर्षांपासून कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांचे परिवार येथे राहतात. आजतागायत ते सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत आहेत. बोर्डाच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत या ठिकाणच्या प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्याकामी एका कंत्राटदारास वर्कऑर्डरही दिली आहे, तरीही या कामास विलंब होत आहे.

--

नर्सेस क्वार्टर हटविले

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता १९२२ ते ३५ दरम्यान सर्व सुविधा असलेल्या एकूण २२ खोल्या बांधून देण्यात आल्या. त्यापैकी सध्या आठ बंद अवस्थेत आहेत, तर एक नर्सेस क्वार्टर संपूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासन नियमित आरोग्यसेवेसह विविध सुविधा पुरविते. मात्र, अनेक वर्षांपासून तशाच असलेल्या या खोल्यांमध्ये गत दोन महिन्यांपासून दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.

--

इतर चाळींची स्थिती आलबेल

शहरातून गुरुद्वारारोडकडे जातानाच्या मार्गावर पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर अशा एकूण १९ खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. येथील कर्मचारी चाळीसाठी दोन वर्षांपूर्वी प्रत्येक घरात स्वतंत्र शौचालय उभारून देण्यात आले आहे. स्वतंत्र गटार व्यवस्था या चाळीकरिता करण्यात आली आहे. येथील गवळीवाडा भागात आठवडेबाजाराच्या उत्तरेस असलेल्या ३८० चौरस फुटांच्या एकूण १८ खोल्या आहेत. त्यापैकी केवळ एक खोली रिक्त असून, तिची दुरवस्था झाल्याने ती पडण्याच्या मार्गावर आहे. चाळीच्या एका बाजूने बाजाराचा रस्ता असल्याने तो थोडा डांबरी, तर सिमेंटचा आहे. मात्र, दोन्ही बाजूने काँक्रिटीकरण केल्यास सोयीचे होणार आहे. पूर्वी लष्कराच्या जनावरांसाठी व धान्याचे गुदाम असलेल्या ठिकाणी १९३५ मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाने थोड्याफार प्रमाणात दुरुस्ती करीत एकूण ८ खोल्यांची एक चाळ उभी केलेली आहे. जुन्या स्टेशनवाडी परिसरात स्टेंचिंग ग्राउंडवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ९ खोल्या उभारल्या, त्यापैकी ३ बंद अवस्थेत असून, त्यांची दुरवस्था झालेली आहे.

-----

आगामी काळात गुरुद्वारारोडवर असणाऱ्या मोकळ्या जागेत सर्व कर्मचाऱ्यांची एकत्रित निवासव्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना सर्व सोयी-सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.

-सतीश भातखळे, आरोग्य अधीक्षक, कॅन्टोन्मेंट बोर्ड

--

कॅम्पमधील चाळी गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात गळत आहेत. दरवेळी फक्त डांबर टाकण्यात येऊन तात्पुरत्या स्वरूपाचे काम केले जाते. याबाबत कायमची उपाययोजना करावी.

-रामचंद्र थामेत, स्थानिक रहिवासी

--

प्रशासनाला अनेकदा सांगूनदेखील येथे असलेल्या चाळींमध्ये अंतर्गत रस्त्यांवर पथदीप उभारण्यात येत नाहीत. आता शहरात एलईडी बसविण्यात येत असून, कर्मचाऱ्यांच्या चाळींमध्येदेखील पथदीप उभारावेत.

-विक्रम रईसवाल, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मैत्रिणीच्या आजाराला चिमुकल्याची मोलाची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक जाणिवेचा विकास हे शिक्षणाचे मुलभूत काम. पण ते प्रत्येक विद्यार्थ्याकडून होतेच असे नाही. गरजू व्यक्तीला पैसे दिले म्हणून त्या वेदनेतून मुक्त होता येत नाही. यासाठी स्वतः काहीतरी करणे गरजेचे असते. याच उदात्त भावनेने आपल्या मैत्रिणीच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी नाशिक शहरातील सात मैत्रिणी पुढे सरसावल्या आहेत. शिवानी दुतोंडे ही तिसरीतील चिमुकली ब्लड कॅन्सरने आजारी असून, तिला अर्थिक मदत मिळावी म्हणून या मैत्रिणींनी हस्तकलेच्या वस्तूंची विक्री सुरू केली आहे.

शहरातील आनंदनिकेतन शाळेत शिकत असलेल्या शिवानी दुतोंडे या मुलीला रक्ताचा कॅन्सर झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलीच्या औषधोपचारासाठी शाळेनेही मदत करण्याचे ठरवले. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून पालकांना मदतीचे आवाहन केले. मदतीचा ओघ सुरू असतानाच आपणही यात खारीचा वाटा उचलावा अशी इच्छा सातवीतील भार्गवी गांगल हिच्या मनात आली. आपल्या मनातले विचार त‌िने सिद्धी बोढाई, माही टक्के, श्रावणी पाटील, ज्ञानदा कुलकर्णी, समिधा गर्दे, भैरवी साळुंखे या मैत्र‌िणींना बोलून दाखवले. त्यानुसार शाळेच्या दुकानजत्रेत आपण ज्याप्रमाणे वस्तूंचा स्टॉल लावतो, त्याप्रमाणे नियोजन करून पैसे जमा करण्याचे सर्वानुमते ठरले. स्टॉल कशाचा लावायचा, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर सर्वानुमते आपण ज्या हस्तकलेच्या वस्तू तयार करतो, त्याच वस्तूंचा स्टॉल लावला तर आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतील, असा सर्वांच्या मनात विचार आला. सातही चिमुकल्यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. सर्वांच्या पालकांनीही या योजनेला साथ दिली. यातील त‌िघींनी गंगापूररोडवर असलेल्या भाजीबाजारात स्टॉल लावला, तर उरलेल्या चौघींनी सिडकोतील शिवाजी चौकात स्टॉल लावला. यातील एकीने ‘कॅन्सरग्रस्त मैत्रिणीला मदत करा’ असा बोर्ड हातात धरायचा व दुसऱ्यांनी वस्तू विकायच्या. त्याच्या या उपक्रमाला अनेक लोकांनी हातभार लावला त्याच्याकडच्या वस्तू हातोहात विकल्या गेल्या. काही लोकांनी तर त्यांना देणगी दाखल पैसेदेखील दिले. काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर मदत केली.

असा ठेवला चोख हिशेब

नाव न सांगण्याच्या अटीवर ज्यांनी पैसे दिले त्यांच्या पैशाचा हिशेब लागावा म्हणून निनावी काका, निनावी काकू, चायनीजवाले काका, दुधवाले काका, सॅन्ट्रोवाले काका, अमूक-तमूक ताई अशा पद्धतीने हिशेब लिहून ठेवला आहे. त्यांनी कागदापासून बनवलेले झुमके, कानातले, ग्रीटिंग अशा वस्तूंची विक्री केली आहे. आपल्या वरच्या वर्गातील विद्यार्थीनी आपल्या मैत्रिणीला मदत करत असल्याचे पाहून चौथीतल्या मुक्ता कुलकर्णी आणि मैत्रेयी महात्मे या मुलींनीदेखील नुकत्याच झालेल्या कोकण महोत्सवात अशाच प्रकारच्या वस्तूंचा स्टॉल लावला. त्यांनीदेखील २ हजार ४०० रुपयाची मदत जमा केली आहे. सातवीतल्या मुलींनी ३ हजार २५० व चौथीतल्या मुलींनी २ हजार ४०० अशी ५ हजार ६०० रुपयांची मदत शाळेतल्या ताईंकडे जमा केली आहे.

आमच्या शाळेतील विद्यार्थिनीला मदत करण्यासाठी या मुली पुढे आल्या आहेत. त्यांना कोणीही तुम्ही हे करा, असे सांगितले नाही. स्वयंस्फूर्तीने त्या हा उपक्रम राबवित आहेत.

विनोदीनी काळगी, शिक्षिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात अनोखा उपक्रम राबविला. विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या स्मारकांच्या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली. नाशिकमध्येही शहराच्या मध्यवर्ती परिसरासह विविध उपनगरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

संघटनेच्या वतीने राज्यभरात १८५ स्मारक स्वच्छ करण्यात आले. यात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांची स्मारके स्वच्छ करण्यात आली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम राबविण्यात आला. नवीन वर्षात जातीय सलोखा वाढावा, आपसातील सौहार्द आणि प्रेम, सद्भ्भावना वाढीला लागावी, अशी अपेक्षा यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, मार्गदर्शक नीलेश शेलार, कोअर टीम अध्यक्ष तुषार गवळी, कोअर टीम सदस्य सागर पवार, संदीप निगळ, सागर डोंगरे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख डॉ. जयेंद्र थाविल, ओबीसी जिल्हा अध्यक्ष कुणाल बागडे, युवती सेना महानगर प्रमुख पूजा खरे, आयटी प्रमुख प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ समर्थकांची जोरदार निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धितून होणारी कारवाई थांबवावी अशी मागणी करीत शेकडो भुजबळ समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त करण्यात आला. मोठ्या संख्यने रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांमुळे वाहतूक व्यवस्थेचा मात्र फज्जा उडाला.

‘सामान्यांसाठी जगणं ज्यांचं, सामान्यांचाच ध्यास, त्या साहेबांसाठी लढणं आमचं, त्यांच्यासाठीच श्वास’ यांसारख्या आशयाचे हाती पोस्टर्स, डोक्यावर ‘मी भुजबळ’ असा संदेश असणारी टोपी, भुजबळ नावाचे पिवळे झेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टीचे झेंडे घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दाखल झाले. तेथे जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘छगन भुजबळ संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’, ‘समीर भुजबळ संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या. भुजबळ समर्थक समन्वय समितीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. त्यामध्ये म्हटल्यानुसार, भुजबळ हे देशातील बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांकांचे आशास्थान आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपाखाली चौकशी यंत्रणांनी त्यांना २२ महिन्यांपासून डांबून ठेवले आहे. बंदी करून जामीन न देणारा कायदा घटनाबाह्य असल्याचा न्यायनिवाडा सुप्रीम कोर्टाने नुकताच दिला आहे. तरीही त्यांना केवळ आकसापोटी कारागृहात डांबून ठेवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. भुजबळांच्या काही हितशत्रूंनी वैयक्तिक आकस, मत्सर व राजकीय वैमनस्यातून खोटी-नाटी कपट कारस्थाने केली आहेत. बनावट व खोटे साक्षीदार उभे करून तपास यंत्रणांना चुकीची माहिती पुरविल्याचा गंभीर आरोपही आंदोलकांनी केला. गेले काही दिवस त्यांच्याविरुद्ध पद्धतशीर राजकीय कट सुरू असून त्यांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न होत असल्याचा दावाही करण्यात आला.

वस्तुस्थितीची मोडतोड करून अवास्तव आकडे मांडून तपासाचे आदेश घेण्यात आले असून, तक्रारदारांनी लिहिलेल्या पूर्वनियोजित पटकथेनुसार तपास यंत्रणा काम करताना दिसत असल्याची शंकाही निवेदनात उपस्थित करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन प्रकल्पासाठी राज्य सरकारचा एक रुपयाही खर्च झालेला नाही किंवा संबंधित बिल्डरला अद्याप एफएसआयसुद्धा दिलेला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार झाला कुठे, कसा, असा सवाल उपस्थ‌ित करीत भुजबळांवरील आरोप म्हणजे कल्पनाविलास असल्याची टीकाही करण्यात आली आहे. यावेळी भुजबळ समर्थक आमदार जयवंत जाधव, माजी खासदार देवीदास पिंगळे, नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, समता परिषदेचे दिलीप खैरे, विष्णूपंत म्हैसधुणे, महापालिका गटनेते गजानन शेलार, माजी आमदार प्रा. दिलीप सोनवणे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समता परिषद शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलकांनी वेधले लक्ष

‘खूप झालं, खूप सोसलं, तयारी आता सत्याग्रहाची, साहेबांवरील अन्यायाविरुद्ध, वेळ आली लढण्याची’, ‘भावना सूडबुद्धीची, लाचार राजकारणाची, आवाज उठवू आज सारे, साथ देऊ या योद्ध्याची’, ‘सूडबुद्धीने वागणाऱ्या सरकारला, चला धरू या धारेवर, न्याय आता मिळालाच पाहिजे, नाहीतर आणू सरकार ताळ्यावर’, ‘अन्यायाविरुद्ध आवाज हा, सरकारविरुद्ध एल्गार हा, साहेबांच्या न्याय हक्कासाठी, समतेचा मार्ग हा’, ‘चला करुया तयारी, आपण आता आंदोलनाची, समतेचा मार्ग आपला, मागणी आमची न्यायाची’, अशा आशयाच्या पोस्टर्सने नागरिकांचे लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवेत विरला शब्दपसारा...

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हवेत विरल्या गोष्टी साऱ्या

हवेत विरला शब्द बिचारा..

हवेत विरली वचने अन्

हवेत विरला शब्दपसारा...

सावानाच्या कवितालय विभागाला सध्या वरील कवितेच्या ओळी चपखल लागू पडताहेत. कवितालयात वर्षभर प्रकाशित केलेल्या कवितांचा काव्यसंग्रह काढू, अशी सावाना पदाधिकाऱ्यांची वचने हवेत विरली अाहेत. वर्ष संपून गेले, मात्र अद्याप काव्यसंग्रहासाठी काहीच हालचाली नजरेस पडत नसल्याने कवींची घोर निराशा झाली आहे.

गेल्या १७७ वर्षांमध्ये अनेक कवींच्या कारकीर्दीने गाजलेले सार्वजनिक वाचनालय त्यांच्याच कवितांना पारखे झालेले होते. नामांकित काय व नवोदित काय, कोणत्याच कवींच्या कविता आजपर्यंत सार्वजनिक वाचनालयाच्या अंगणात कधीच खेळल्या नाहीत. परंतु, ७ मे २०१७ रोजी शहरातील कवींसाठी वाचनालयाने ‘कवितालय’ नावाने नवे दालन खुले करून दिले. वाचनालयाच्या देव-घेव विभागात लावलेल्या या कवितालय शोकेसमध्ये शहरातील कवींच्या कविता दर आठवड्याला प्रसिद्ध केल्या जातात. सावानाच्या कार्यकारिणी सभेत या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. बालकवींच्या स्मृतिदिनी ज्येष्ठ कवी शरद पुराणिक यांच्या हस्ते या शोकेसचे उद््घाटन करण्यात आले होते. या शोकेसमध्ये दर आठवड्याला निवडक चार ते पाच कविता प्रसिद्ध केल्या जातात. सावानाचे उपाध्यक्ष कवी किशोर पाठक यांच्याकडे ‘कवितालय’ची जबाबदारी आहे.

कवितालयामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या कवितांचा वर्षाअखेरीस कवितासंग्रह काढणार असून, त्याचे संपादन कवी किशोर पाठक करणार, असे मेमध्ये झालेल्या कार्यकारिणी सभेत सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप त्यासाठी काहीही हालचाल नसून, त्यामुळे कवींची घोर निराशा झाली आहे. कवितालयाचे पुस्तक लवकरच यावे यासाठी काही कवी एकत्रितरीत्या सावानाशी बोलणार आहेत.


कुसुमाग्रजांच्या कवितांचा समावेश

उपक्रमाच्या प्रारंभी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ‘जाग’, ‘क्रांतीचा जयजयकार’, कवी चंद्रशेखर गोरे यांची ‘गोदागौरव’, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘सागरास’, बाबूराव बागूल यांची ‘वेदांआधी तू होतास’, बालकवींची ‘औदुंबर’ या कविता शोकेसमध्ये लावण्यात आल्या. त्यानंतर काही दिवस मान्यवर कवींच्या कवितांनी कवितालय संपन्न झाले. शहरातील कवींच्या कवितादेखील यात प्रसिद्ध करण्यात आल्या. परंतु, त्याचे पुस्तक कधी येणार याची प्रतीक्षा आता कवीजन करीत आहेत.

---

वैविध्यपूर्ण कविता न आल्याने अद्याप आम्ही थांबलेलो आहोत. दिवाळी अंक काढला आहे, त्यामुळे मोठा खर्च झाला आहे. मार्चनंतर पुस्तकाचे बघता येईल, तसे अजून एक वर्ष पूर्ण झालेले नाही. बऱ्याच कविता अजून यायच्या आहेत.

-कवी किशोर पाठक, समन्वयक, कवितालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन टायपिंग परीक्षा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पारंपरिक टाइपरायटींग पद्धतीऐवजी ऑनलाइनकडे वळणाऱ्या प्रवाहाची कास धरून राज्य परिषदेने आयोजित केलेल्या ऑनलाइन कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेला मंगळवारी प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात ८ जानेवारीपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात १३ ते १८ जानेवारी या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.

परिषदेच्या वतीने ३० शब्द प्रतिमिनिट आणि ४० शब्द प्रतिमिनिट या प्रकारात मराठीसह हिंदी आणि इंग्रजी या भाषांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना ही चाचणी कॉम्प्युटरवर ऑनलाइन पद्धतीने द्यायची असल्याने त्यांना परीक्षा होताच काही वेळाने निकाल त्वरित मिळतो. नाशिक विभागातून आठवडाभरात सुमारे २० हजार परीक्षार्थी या कसोटीला सामोरे जाणार आहेत. पैकी मंगळवारी नाशिक विभागात सुमारे एक हजार परीक्षार्थींनी विविध केंद्रांवर ही परीक्षा दिली. २ ते ८ जानेवारी आणि १३ ते १८ जानेवारी या कालावधीत ही परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेसाठी नाशिक विभागातून सुमारे २० हजारांवर विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

जिल्हाभरात ७ हजारांवर परीक्षार्थी

या ऑनलाइन कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून सुमारे ७ हजारावर परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. यात ३० शब्द प्रतिमिनिट या क्षमतेंतर्गत चाचणीसाठी जिल्ह्यातून ६ हजार तर ४० शब्द प्रतिमिनिट या क्षमतेंतर्गत चाचणीसाठी जिल्ह्यातून १०१० परीक्षार्थिंनी नोंदणी केली आहे. विविध परीक्षा केंद्रावर दिवसभरातील विविध सत्रांमध्ये परीक्षार्थिंच्या तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ही परीक्षा पार पडणार आहे. विभागात एकूण २० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहे. ३० शब्द प्रतिमिन‌टि या क्षमतेंतर्गत नाशिक विभागात १७ हजार ९५८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये विभागात नाशिक जिल्ह्यातून ६ हजार, नगरमधून ५ हजार, धुळे जिल्ह्यातून १८१७, जळगाव जिल्ह्यातून ३००५, नंदूरबार जिल्ह्यातून ११३६ याप्रमाणे संख्या आहे. तर ४० शब्द प्रतिमिनीट या क्षमतेंतर्गत नाशिक विभागातून नगर जिल्ह्यात ११५२ परीक्षार्थी, नाशिक जिल्ह्यात १०१० परीक्षार्थी, धुळे जिल्ह्यात २०४, जळगाव जिल्ह्यात ४४९, नंदूरबार जिल्ह्यात ८३ या प्रमाणे २८९८ इतकी परीक्षार्थींची संख्या आहे. दोन्हीही परीक्षा मिळून १९ हजार ८५६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images