Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कुटुंब संस्थेला लागलीय घरघर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

आजची पिढी उच्च शिक्षणाच्या पदव्या मोठ्या गुणांनी पास होताना दिसत असली, तरी कुटुंब संस्था चालविण्यात नापास होऊ लागल्याचे चित्र आहे. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटांसाठी दाखल दाव्यांच्या दिवसागणिक वाढणाऱ्या संख्येवरून ही बाब अधोरेखित झाली आहे.

कौटुंबिक वादांच्या दाव्यांसाठी नाशिक जिल्ह्यासाठीच्या एकमेव अशा शहरातील विशेष कौटुंबिक न्यायालयात गेल्या तीन वर्षांत घटस्फोटांसाठी तब्बल ५ हजार १७३ दावे दाखल झाल्याची नोंद आहे. कुटुंब संस्था खिळखिळी झाली असल्याचे या आकडेवारीतून सिद्ध होत आहे.

नाशिक महापालिका हद्दीचेच ज्युरिडिक्शन असलेले विशेष कौटुंबिक न्यायालय नाशिकरोड येथील महसूल आयुक्तालय आवारात कार्यरत आहे. या कौटुंबिक न्यायालयात केवळ नाशिक महापालिका हद्दीतीलच कौटुंबिक वादांविषयीचे दावे दाखल होतात. जिल्ह्यातील अशा प्रकारच्या दाव्यांसाठीचे एकमेव स्वतंत्र न्यायालय आहे. या न्यायालयात गेल्या तीन वर्षांत घटस्फोट आणि त्या अनुषंगाने खावटी, खावटी वसुली, मुलांचा ताबा, नांदण्याविषयीचे दावे, संमती अशा स्वरुपाच्या इतर वादांविषयीचे तब्बल ५१७३ दावे दाखल झाल्याची नोंद आहे. या दाव्यांपैकी या न्यायालयाने तब्बल ४३५९ दावे गेल्या तीन वर्षांत निकाली काढले आहेत. या न्यायालयात अद्यापही २ हजार ९४१ दावे प्रलंबित आहेत. केवळ नाशिक महापालिका हद्द कार्यक्षेत्र असूनही घटस्फोटांसाठीचे दावे दाखल होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे या न्यायालयात दाखल दाव्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

न्यायालय जपते बांधिलकी

या न्यायालयात घटस्फोटासाठी मोठ्या प्रमाणात दावे दाखल होतात. या पार्श्वभूमीवर लग्नव्यवस्था टिकावी, त्यावरील विश्वास कायम राहावा या उद्देशाने या न्यायालयाकडून तक्रारदार व त्यांच्या नातेवाइकांसाठी ध्यानधारणा, सामोपचाराने दावा मिटविणाऱ्या कुटुंबांचा सत्कार, अनाथ मुलांचा सत्कार आयोजित करून अनाथ मुलांच्या जीवनातील समस्यांची वादी व प्रतिवादींना कल्पना देणे, समुपदेशन केंद्र चालविणे अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. या उपाययोजनांचा उपयोग काही दावे सामंजस्याने मिटविण्यासाठी झाला आहे.

--

घटस्फोट दाव्यांतील प्रमुख कारणे

--

-आधुनिक पिढीकडून फिल्मी लाइफशी होणारी तुलना

-कॉलेज लाइफमध्ये सारासार विचार न करता चोरून होणारे विवाह

-मुलींच्या संसारात त्यांच्या आईची वाढलेली ढवळाढवळ

-मोबाइलचा अतिरेकी वापर आदी


--

तीन वर्षांतील दाखल व निकाली दावे संख्या-

वर्ष - दाखल दावे संख्या - निकाली दावे संख्या

२०१५ – १४८९ - १२३७

२०१६ – १८५५ - १६०४

२०१७ – १८२९ - १५१८

एकूण - ५१७३ -४३५९

--

मोबाइल फोनचा अतिरेकी वापर आणि मुला-मुलींच्या संसारात त्यांच्या नातेवाइकांची मर्यादेपेक्षा वाढलेली ढवळाढवळ कुटुंबसंस्था मोडकळीस आणण्यास कारणीभूत ठरत आहे. सुदृढ कुटुंबसंस्था राष्ट्रहिताचा पाया असल्याने तो टिकविणे समाजातील सर्वच घटकांचे कर्तव्य ठरते. भावीपिढीचे संगोपन मानसिक व भावनिकदृष्ट्या सबल झाले नाही, तर राष्ट्राचेच नुकसान होते. शाळा-कॉलेजांत लग्नव्यवस्थेचे महत्त्व याविषयी समुपदेशन होणे आवश्यक आहे.

-सौ. क. वि. ठाकूर, न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नाशिक रन’ १३ जानेवारी रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शनिवारी, १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महात्मानगर क्रीडांगणापासून या रनचे आयोजन केले आहे. या १६ व्या ‘नाशिक रन’मध्ये सतरा हजारहून अधिक नाशिककर धावतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

रनसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी व उपाध्यक्ष एच. बी. थोन्टेश यांनी माहिती दिली. नाशिक रनचे सकाळी आठ वाजता उद्‍घाटन होणार आहे. त्यानंतर सायकल रॅली व नाशिक रन ज्योतीचे प्रज्वलन केली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर जागतिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या नाशिकच्या तीन क्रीडापटूंना देण्यात येणाऱ्या प्रयोजकत्वचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. यानंतर नाशिक रन २०१८ च्या आरंभाची घोषणा केली जाणार असून नारंग डान्स इन्स्टिट्यूटच्या वतीने नृत्य सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर मुख्य रनला सुरुवात होईल. सुरुवातीला दिव्यांग मुलांसाठी रन, ९ वाजता मुलांसाठी व सव्वानऊ वाजता ‘प्रौढांसाठी रन’ची सुरुवात होईल. यंदाचे नाशिक रन बॉश कंपनीतर्फे आयोजित करण्यात आले होते पुढील वर्षी ते इप्कॉस कंपनीकडे देण्यात येईल त्याचा हस्तांतरण सोहळा यावेळी होणार आहे.

असा असेल मार्ग
महात्मानगर क्रीडांगणापासून रिलायन्स फ्रेश, पारिजात नगर, वर्ल्ड ऑफ टायटन, मधू इंडस्ट्रीज, परत समर्थ नगर, पारिजात नगर, सिक्स सिग्मा हॉस्पिटल व महात्मा नगर त्याच प्रमाणे प्रौढांसाठी महात्मानगर, रिलायन्स फ्रेश, पारिजात नगर, वर्ल्ड ऑफ टायटन, रॉकेट सर्कल, जेहान सर्कल, स्वामी समर्थ सर्कल, आयसीआयसीआय एटीएम, परत रॉकेट सर्कल, समर्थनगर, पारिजातनगर, सिक्स सिग्मा हॉस्पिटल, महात्मानगर, बंजारा हॉटेल व परत महात्मानगर क्रीडांगण असा ‘रन’चा मार्ग असणार आहे.

१५० हून अधिक स्वयंसेवक
‘रन’साठी १५० हून अधिक स्वयंसेवक परिश्रम घेत असून ‘नाशिक रन’साठी ठक्कर डोम परिसरात पार्किंग सुविधा करण्यात आली आहे. नागरिकांनी आपली वाहने ठाकर डोम परिसरात पार्क करावित, असे आवाहन नाशिक रन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ तीन उमेदवारांची सोमवारी मुलाखत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यात पोलिस पाटील भरती प्रक्रियेत दीड वर्षांपूर्वी अपात्र ठरलेल्या तीन उमेदवारांची सोमवारी (दि. ८) फेरमुलाखत घेण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात दीड वर्षांपूर्वी पोल‌िस पाटील व कोतवालांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. निफाड व सिन्नर वगळता इतर तालुक्यांमध्ये ही प्रक्रिया सुरळीत पार पडली. परंतु, सिन्नरमधील नळवाडी येथील मीना दराडे, प्रतिभा शहाणे तसेच आशा शहाणे या तीन उमेदवारांनी सिन्नर व निफाड तालुका भरती प्रक्रियेत अनियमितता असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. हायकोर्ट तसेच मॅटमध्ये धाव घेतली. तिन्ही उमेदवारांचे म्हणणे योग्य असल्याचे मान्य करत मॅटने फेरमुलाखत घेण्याचे निर्देश दिले. तोंडी परीक्षा व कागदपत्रांच्या तपासणीचे अधिकार प्रांतधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. निफाडचे प्रांतधिकारी महेश पाटील या त‌िन्ही उमेदवारांची सोमवारी मुलाखत घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील खुल्या जागांवर असलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम महापालिकेने पुन्हा सुरू केली असून, शुक्रवारी दोन ठिकाणी पत्र्याच्या शेडसह संरक्षक भिंतींची अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

सिडकोत महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचे स्वागत होत असले, तरी सिडकोतील खरी अतिक्रमण केव्हा काढली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिडको परिसरात सर्वाधिक अतिक्रमणे असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. मात्र, सिडको व महापालिका एकमेकांवर ही अतिक्रमणाची जबाबदारी ढकलत असल्याने सिडकोतील अतिक्रमणांचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता महापालिकेने बेकायदेशीर अतिक्रमणे किंवा वाहनतळांच्या जागेवर केलेली अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू केली आहे.

ही मोहीम आयुक्‍त व उपायुक्‍तांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, एम. डी. पगारे, शिवाजी काळे, सुनील शिंदे आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी राबविली. बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या, तसेच पार्किंगच्या व सार्वजनिक जागांवर अतिक्रमणे करणाऱ्यांना त्यांची बेकायदेशीर व अतिक्रमित असलेली बांधकामे काढून घेण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी जाहीर सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या नागरिकांनी, व्यावसायिकांनी, विक्रेत्यांनी त्यांची अतिक्रमणे काढून घेतलेली नाहीत, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

--

येथे झाली कारवाई

शुक्रवारी झालेल्या कारवाईत महापालिकेच्या वतीने सह्याद्रीनगर येथील कंपाउंडची भिंत, पत्र्याचे शेड व गणेश चौक येथील महेश भवनसमोरील पत्र्याचे शेड व कापूस पिंजण्याचे यंत्र महापालिकेने जप्त केले. इमारतीच्या आवारात रस्त्याला अडथळा येईल असे अतिक्रमण झाले असून, हे अतिक्रमण आता काढण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वयाची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याची पंचायतराज व्यवस्था देशाला मार्गदर्शक आहे. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीत समन्वयाअभावी त्या नागरिकांना सुविधा देण्यात यशस्वी होत नाहीत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सामाजिक सलोखा ही काळाची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी या बाबींवर जाणीवपूर्वक लक्ष दिले, तरच घटनादुरुस्तीचा खरा उद्देश सफल होईल, असा सूर ‘स्थानिक स्वराज्य संस्था व शासन परस्परसंबंध’ या विषयावरील चर्चासत्रात शुक्रवारी उमटला.

महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार अध्यक्षस्थानी होते. सत्राला अहमदनगर महापालिकेचे सदस्य अॅड. अभय आगरकर, यशदाचे प्राध्यापक अजय सावरीकर, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक वीरेंद्र जाधवराव आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की ग्रामीण आणि शहरी भारतात शहरातील झोपडपट्ट्यांचा विस्तार होत आहे. विकासासाठी सरकार भरपूर निधी देते; परंतु विकासाची मानसिकता असणे महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर कामांच्या गुणवत्तेचे सामाजिक मूल्यमापन होणेदेखील गरजेचे आहे, असे मत त्यांन‌ी व्यक्त केले.

जाधवराव म्हणाले, की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत पंचवार्षिक सामाजिक- आर्थिक नियोजन होणे गरजेचे आहे. सुधारणांमुळे वित्तीय स्रोत वाढले असताना वित्तीय शिस्त आणि उत्तरदायित्वाचाही विचार होणे महत्वाचे आहे. उत्पादक स्वरूपाचा खर्च करण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वास्तविक अंदाजपत्रक न केल्याने विकासकामांवर परिणाम होतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत प्रतिकूल मत तयार होते. हे टाळण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाला सामोरे जात पारदर्शक व्यवहार करण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कामगिरीचे योग्य मूल्यमापन केल्यास ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सावरीकर यांनी ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीमधील तरतुदींची माहिती दिली. ग्रामसभा, पंचायतराज नियुक्त करणे, महिलांचे आरक्षण, वित्त आयोग आणि जिल्हा नियोजन समिती या बाबी घटनादुरुस्तीमुळे अस्तित्वात आल्या, असे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य, निधी, आणि मनुष्यबळ याबाबतही विचार होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

लोकशाही सुदृढ करण्यासाठी घटनादुरुस्ती महत्त्वाची ठरल्याचे अॅड. आगरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, की आर्थिक स्थितीचा विचार न करता केवळ तुष्टीकरणासाठी कामे केल्यास सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थेत योग्य समन्वय साधला जात नाही. रस्ते आणि सांडपाणी व्यवस्थापन या पल‌ीकडे जनतेच्या मूलभूत गरजा व विकासाचा विचार करून कामे करावीत, अशी सूचना त्यांनी केली. समाजातील चांगली माणसे सदस्य म्हणून या व्यवस्थेत यावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंडी बनवा वर्कशॉप उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हल्ली जागेच्या अडचणीमुळे तसेच फ्लॅट संस्कृतीमुळे बगीचा फुलवण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होत नाही. परंतु, बाल्कनीमध्ये, हॉलमध्ये कुंड्यांमध्ये लावलेली रोपंही घराला छानसा लूक देतात. त्याबरोबरच आकर्षक कुंड्याही घराची शोभा वाढवतात. अशाच कुंड्या स्वतः बनविण्याविषयी मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे कुंड्या बनवा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (७ जानेवारी) सकाळी १० वाजता अजय मित्रमंडळ हॉल, इंदिरानगर या ठिकाणी हे वर्कशॉप होणार आहे.

बगीचा फुलवायचा असेल तर अंगण हवे पण फ्लॅट संस्कृतीमध्ये अंगण मिळणे दुरच. फ्लॅट संस्कृतीमध्ये बगिचा फुलवायला मदत झाली ती कुंड्यामुळेच. आज अनेक प्रकाराच्या, आकाराच्या कुंड्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, आपल्या बागेसाठी आपणच कुंड्या तयार केल्या तर त्यातील आनंद नक्कीच वेगळा असेल. या हेतूने या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

संदीप चव्हाण हे या वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या कशा बनवायच्या याचे मार्गदर्शन करणार आहेत. कागद आणि सिमेंटपासून कुंडी कशी बनवायची, फक्त सिमेंटपासून, सिमेंट आणि गोणपाटापासून कुंडी कशी बनवायची याविषयी येथे माहिती मिळणार आहे. या डेमो वर्कशॉपसाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० तर इतरांसाठी ३०० रुपये नोंदणी फी आहे. नोंदणीसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्बल घटकांच्या शिक्षणाचा विचार व्हावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महिला आणि दुर्बल घटकांच्या आरोग्य आणि शिक्षणाचा विचार प्राधान्याने व्हावा, राखीव निधीचा उपयोगही परिणामकारक व्हावा, अशी अपेक्षा आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली. विभागीय परिषदेत आयोजित ‘स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सर्वसमावेशक प्रयत्न’ या सत्रात त्या बोलत होत्या. सत्राला पाणी फाउंडेशनचे सल्लागार नामदेव ननावरे, संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्राध्यापक जितेंद्र वासन‌िक, अशोक भांगरे आदी उपस्थित होते.

फरांदे म्हणाल्या, की गावाचा विकास महिला आणि दुर्बल घटकांच्या विकासावर अवलंबून आहे. गावाचा विकास झाला तरच देशाचा एकूण समतोल विकास होईल. घटना दुरुस्तीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण देण्यात आले. आरक्षणाच्या माध्यमातून महिलांचे नेतृत्व चांगल्या प्रकारे विकस‌ित झाले. स्थानिक स्वराज्य संस्थेतून अनुभव घेत विधीमंडळ आणि संसदेत प्रभावी कामगिरी करण्याची संधी त्यांना मिळाली. कुटुंबातून जिथे महिलांना प्रोत्साहन दिले जाते, त्या ठिकाणी चांगले नेतृत्व निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. महिला आणि दुर्बल घटकातील लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाच्या आधारे विकासप्रक्रिया गतिमान करावी आणि अशा लोकप्रतिनिधींनीदेखील निवडून आल्यावर समाजाच्या सेवेची संधी म्हणून ठसा उमटवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वासनिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत स्त्री-पुरुष समानतेविषयी विचार व्हावा आणि महिलांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले. आरक्षणामुळे सार्वजनिक जीवनातील महिलांचा सहभाग वाढला, असे मत त्यांनी व्यक्त केले. भांगरे यांनी स्थानिक स्वरांज्य संस्थेच्या माध्यमातून दुर्बल घटकांच्या विकासाच्या योजनांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. घटनादुरुस्तीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला गती मिळाली. महिला आणि दुर्बल घटकांना जबाबदारी आणि अधिकार देण्यात आले. ग्रामीण विकासासाठी सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीतर्फे मोफत सॅनेटरी नॅपकीन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर शाखेतर्फे रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात नववी व दहावीतील मुलींना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या वेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गौरी पिंप्राळेकर यांनी मासिक पाळी व शारीरिक बदल यावर मार्गदर्शन केले. गर्भ पिशवी कॅन्सर, तसेच स्तनाचा कॅन्सर यावर विस्तृत माहिती देण्यात आली. अशा वेळी विद्यार्थिनींनी आई व स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले. मुख्याध्यापिका सरिता जोशी, कुसुम पवार, लता शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सहकार्य केले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्षा सुषमा पगारे, नगरसेविका समिना मेमन, शोभा साबळे, पूर्व विधानसभा अध्यक्ष सुरेखा निमसे, संघटक रंजना गांगुर्डे, संगिीता गांगुर्डे, रजनी चौरसिया, कामिनी वाघ, पंचशीला वाघ उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनोरंजन पार्कचा फैसला वेटिंगवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणालगत जलसंपदा विभागाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या मनोरंजन पार्कच्या निविदा उघडल्यानंतरही त्यावर १८ दिवसांनंतर निर्णय झालेला नाही. या निविदा निकषात बसतात किंवा नाहीत हे तपासून, नंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी इतका मोठा कालावधी लागण्यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कोणत्याही निविदा उघडल्यानंतर त्याबाबतचा निर्णय तातडीने घेतला जातो. मात्र, जलसंपदा विभागाची पहिली निविदा वादात सापडल्यामुळे अधिकारीसुद्धा या निविदेवर निर्णय घेताना वेळकाढूपणा करीत असल्याची चर्चा आहे.

शहरासाठी मनोरंजन पार्क जिव्हाळ्याचा विषय आहे. नववर्षात यावर निर्णय होऊन तो सुरू होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती; पण जलसंपदा विभागाने त्यासाठी वेळ लावल्यामुळे आता सोमवारी ८ जानेवारी रोजी या निविदा उघडणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. तांत्रिक कारणामुळे दिरंगाई होत असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

काय आहे मनोरंजन पार्कमध्ये?

तब्बल सात एकरवर तयार करण्यात आलेल्या या मनोरंजन पार्कचे काम पूर्ण झाले आहे. पार्कमध्ये उद्यान, हॉटेल, भव्य लॉन्स व राहण्यासाठी प्रशस्त कॉटेज बनविण्यात आले आहेत. हे मनोरंजन पार्क जलसिंचन विभागाने तयार केले आहे. या पार्कचा मेंटेनन्स व्हावा व त्याचा आनंद सगळ्यांना मिळावा, यासाठी हे कंत्राटी पद्धतीने ठेकेदाराला देण्यात येणार आहे. त्यासाठी या निविदा मागवण्यात आल्या आहेत.

अगोदर झाला होता वाद

यापूर्वी काढलेल्या निविदेवरून विजय वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राजकीय पाठिंबा असलेल्या कंपनीला हा ठेका मिळावा म्हणून निविदाप्रक्रियाच रद्द केल्याचा आरोपही त्यांनी मागील निविदेवर केला आहे. त्यात पहिली २६ जुलै रोजी काढलेली ई निविदा वादात सापडली. लक्ष्मी एंटरप्रायजेसचे पार्टनर विजय वानखेडे यांनी ही निविदा भरली होती. सर्वाधिक सात कोटींची निविदा भरूनही ही निविदाप्रक्रियाच रद्द करण्यात आल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर दुसरी निविदा काढण्यात आली. मनोरंजन पार्कच्या निविदांमध्ये तीन वर्षांचा अनुभव महत्त्वाचा निकष होता. गेल्या वेळी निविदांमध्ये फक्त एकाकडेच हा अनुभव असल्याचे जलसंपदाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर दुसरी निविदा काढण्यात आली. त्यात तीन जणांनी निविदा भरल्या असून, त्यापैकी एकाला काम दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा स्पंदन महोत्सवात मखमलाबाद कॉलेजचे यश

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘मविप्र’च्या युवास्पंदन सांस्कृतिक महोत्सवात मखमलाबाद येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाने यश मिळविले. महाविद्यालयाच्या ‘बारा किलोमीटर’ या एकांकिकेस प्रथम तर ‘इनक्रेडिबल इंडिया’ या लघुनाटिकेने द्वितीय पारितोषिक पटकाविले.

अभिनेते अभिनेते अरुण नलावडे, मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते आणि अध्यक्ष तुषार शेवाळे, संचालक भाऊसाहेब खताळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, संजय फडोळ, प्राचार्य डॉ. ए. पी. पाटील, प्रा. आर. के. मुंगसे, अमोल थोरात यांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांना गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात गौरविण्यात आले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘मविप्र’तर्फे २०१४ पासून ‘युवास्पंदन’ महोत्सव घेतला जातो. एकूण १४ कला प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत मखमलाबाद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘बारा किलोमीटर’ ही एकांक‌िका अव्वल ठरली. तसेच ‘इनक्रेडिबल इंडिया’ या लघुनाटिकेस द्वितीय पारितोषिक मिळाले. एकांकिकेमध्ये शुभम शिरसाठ (कदुआ), आरती घुगे (कोयना), सोनाली तिडके (सुरभा), तोफिक अत्तार (कदुवा २), कुणाल शिंदे (वॉर्डबॉय), ईश्वर ठाकर आदी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय केला. लघुनाटिकेत प्रियंका आहेर, दुर्गा पुरोहित, संयुक्त कुलथे, गौरी तिडके, श्रद्धा पिंगळे, आरती घुगे यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.

मखमलाबाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. पी. पाटील, प्रा. सोमनाथ कांगणे, प्रा. वैशाली क्षीरसागर, प्रा. छाया लभडे, प्रा. डॉ. युवराज जाधव, प्रा. डॉ. दत्तात्रय वेलजाळी, प्रा. डॉ. गोरक्षनाथ पिंगळे, डॉ. विजयकुमार सोनवणे, प्रा. संदीप ढोली, प्रा. विक्रांत राजोळे, प्रा. संदीप क्षीरसागर, प्रा. हर्षाली कोठावदे, प्रा. सोनाली कतवारे, प्रा. नलिनी बागूल, प्रा. अश्विनी जाधव, प्रा. अश्विनी काळे, प्रा. कल्पना चोपडे, प्रा. संगीता चव्हाणके, प्रशिक्षक उर्वराज गायकवाड, प्रसाद पवार आदींनी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक @ ८.८

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात गारठा वाढत असून, शुक्रवारी ८.८ अंश सेल्स‌ियस किमान तापमानाची नोंद झाली. गुरुवारच्‍या तुलनेत एक अंशाने तापमान कमी झाले. गुरुवारी ९.३ अंश सेल्स‌ियस तापमानाची नोंद झाली होती.

शहरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. तापमानामध्ये सातत्याने चढउतार होत असले तरी साधारत: आठ ते नऊ अंश सेल्स‌ियसच्या दरम्यान तापमानाची नोंद होत आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ९.४ अंश सेल्स‌ियस किमान तापमानाची नोंद झाली होती. नाशिकमधील नववर्षातील सर्वात नीचांकी तापमान २ जानेवारी रोजी नोंदविले गेले. या दिवशी ८.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर हेच तापमान ३ जानेवारी रोजी वाढून १०.६ अंश सेल्स‌ियसवर पोहोचले. दोनच दिवसांत हे तापमान दोन अंश सेल्स‌ियसने खाली उतरले. गेल्या पाच दिवसांत कमाल तापमान देखील २८.४ ते २९.१ अंश सेल्स‌ियस दरम्यान नोंदविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थगितीसाठी संचालक न्यायालयात जाणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेच्या संचालकांनी आरबीआयच्या बरखास्तीच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे. दुष्काळात वसुली करू नये या सरकारी आदेशाच्या बळावर संचालक हायकोर्टात दाद मागण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजळव करीत असून, पुढील आठवड्यात यासंदर्भात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासनाकडूनही छुपी मदत संचालकांना केली जात असल्याने सहकार विभागही हतबल ठरला आहे.

जिल्हा बँकेचे संचालक मंडळ हे सन २०१७च्या मार्चमधील आर्थिक ताळेबंदाच्या आधारावर आरबीआयने बरखास्त केले होते. त्यामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. गेल्या वर्षात जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असल्याने आणि कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांनी कर्जफेड केली नाही. त्यामुळे जिल्हा बँकेचा आर्थिक ताळेबंद बिघडला होता. परंतु, राज्य सरकारनेच शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करू नये, असा आदेश काढल्याने बँकेला वसुली करता आली नव्हती, असा दावा आता जिल्हा बँकेच्या संचालकांनी केला आहे. थेट आरबीआयची कारवाई असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे या संचालकांना थेट हायकोर्टात जाण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे संचालक आता पुढील आठवड्यात या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात असून, सरकारकडूनही अप्रत्यक्ष मदत केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिंतीअभावी धाकधूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

चेहेडी गावाजवळ दारणा नदीपात्रात नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या चेहेडीच्या बाजूच्या संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण असल्याने या पुलालगतच्या रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. दारणा नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी चेहेडी गावाच्या बाजूकडील संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. सिन्नर ते पळसेदरम्यानचे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे. चेहेडी गावाजवळील दारणा नदीच्या पात्रातील ब्रिटिशकालीन आर्च प्रकारातील पुलाला लागून नव्याने भव्य पुलाची उभारणी करण्यात आली आहे. दारणा नदीपात्रात उभारण्यात आलेला पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मात्र, या पुलालगत चेहेडी गावाच्या बाजूस अद्यापही संरक्षक भिंत उभारण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत उभारल्याशिवाय हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाऊ नये, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

--

रहिवाशांचा जीव धोक्यात

या पुलासाठी टाकण्यात आलेल्या भरावाची माती चेहेडी गावातील काही रहिवाशांच्या घरांच्या दारापर्यंत आलेली आहे. या ठिकाणी अजून संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण आहे. नवीन पूल अजून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. मात्र, असे असले, तरी बॅरिकेडस बाजूला सारून दुचाकीसारखी वाहने थेट या नव्या पुलावरून ये-जा करू लागली आहेत. या ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने पुलावरून जाणारी वाहने थेट खाली घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्वरुपाचा अपघात झाल्यास पुलालगतच्या घरांत वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

--

दारणा नदीवर नव्याने उभारलेल्या पुलाच्या संरक्षक भिंती अगोदर उभारणे आवश्यक होते. मात्र, संरक्षक भिंत अद्यापही उभारण्यात आलेली नसल्याने मोठ्या प्रमाणात मातीचा भराव आमच्या घरांच्या दारात येऊन पडलेला आहे. या पुलावरून परवानगी नसतानाही रहदारी सुरू झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

-शमा शेख, स्थानिक रहिवासी

--

चेहेडी गावाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या संरक्षक भिंतीचे काम अद्याप अपूर्ण आहे. या ठिकाणच्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत उभारल्याशिवाय पुलावरील सार्वजनिक वाहतूक सुरू केली जाणार नाही.

-सी. आर. सोनवणे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक निधीत प्रशासनाचा जुमला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापौरांनी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील विकासकामांसाठी ७५ लाख रुपयांचा निधी दिला जातो. प्रत्यक्षात या निधीपैकी ५० ते ५५ लाखांपर्यंत खर्च होत असल्याचा दावा शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी केला आहे. प्रशासनाकडून दरसूचीनुसार प्राकलन तयार केले जाते; मात्र ठेकेदार त्यात ३० ते ४० टक्के कमी दराने काम मिळवतो. त्यामुळे प्रशासनाकडून प्राकलन दरानुसार नगरसेवकांचा निधी वर्ग करीत असल्याचा आरोप तिदमे यांनी केला आहे. त्यामुळे नगरसेवक निधीच्या जुमलेबाजीवर आक्षेप घेत, शिल्लक निधी पुन्हा नगरसेवकाच्या निधीत वर्ग करण्याची मागणी तिदमे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

२०१७- २०१८ या आर्थिक वर्षात नगरसेवकांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या मागणीप्रमाणे प्रभागात विविध विकासकामांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. तांत्रिक बाबींमुळे हा ७५ लाख रुपयांचा संपूर्ण निधी नगरसेवकांना मिळतच नसल्याचा दावा तिदमे यांनी केला आहे. प्रभागात विकासकामे करण्यासाठी कामाप्रमाणे नगरसेवक निधी वापरण्यासाठी नगरसेवकांकडून प्राकलन रकमेनुसार पत्र घेण्यात येते. प्राकलन तयार करताना डीएसआर रेटचा (जिल्हा दरसूची) संदर्भ घेण्यात येतो. मुळातच डीएसआर हा स्थानिक प्रचलित दरांपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळेच बहुतांश ठेकेदार २५ ते ४० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा भरताना दिसतात. म्हणजेच नगरसेवकांनी प्राकलन रकमेनुसार दिलेला निधी संपूर्ण खर्च होत नाही. हे काम ठेकेदाराने कमी दरात घेतले म्हणून उर्वरित रक्कम पुन्हा नगरसेवक निधीत समाविष्ट होत नाही.

नगरसेवकांचा निधी प्राकलन दरानुसारच त्याच्या मिळालेल्या निधीतून कपात होतो. डीएसआर रेट जास्त असल्याने प्राकलन जास्त रकमेचे तयार होऊन त्याचा फटका नगरसेवकांना बसत आहे. त्यामुळे ठेकेदाराला वर्कऑर्डर झाल्यानंतर दिलेल्या निधीपत्रातील उर्वरित शिल्लक निधी पुन्हा संबंधित नगरसेवक निधीत जमा करावा, अशी मागणी नगरसेवक तिदमे यांनी केली आहे.

सुमारे २५ कोटी पुन्हा तिजोरीत

सरासरी विचार केला तर प्रत्येक नगरसेवकाने विकासकामांसाठी ७५ लाख रुपयांचे पत्रही दिले तरी प्रत्यक्षात ५० ते ६० लाख रुपयेच प्रभागात खर्च होत आहेत. महापालिकेतील १२२ सदस्यांचा नगरसेवक निधी लक्षात घेतल्यास ९१ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, डीएसआर रेट अधिक असल्याने प्राकलन जादा दराने बनते आणि नगरसेवक निधीचे पत्रही त्याचनुसार घेतले जाते. मात्र, ठेकेदार काम घेताना २५ ते ४० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा भरतात. सरासरी ३० टक्के म्हटले तरी तरतूद केलेल्या एकूण रकमेतून २५ ते ३० कोटी रुपये खर्चच होत नाहीत. म्हणजेच अंदाजपत्रकातील तरतुदीचा पूर्ण लाभ नगरसेवक निधीतून मिळत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतिम घटकाच्या विकासाचे ध्येय बाळगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. घटना दुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त झालेले अधिकार लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना शेवटच्या घटकाच्या विकासासाठी वापरावे लागतील. तसे झाले तरच महासत्तेच्या दिशेने देशाची सक्षम वाटचाल सुरू होईल, असा विश्वास ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी नाशिक येथे व्यक्त केला.

७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या विषयावर विभागीय परिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त महेश झगडे, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, नाशिक आणि नगरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अनुक‍मे शीतल सांगळे, शालिनी विखे पाटील, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन आदी उपस्थ‌ित होते.

भुसे म्हणाले, की समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचावी हेच ग्रामपंचायत, पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्तव्य आहे. पंचायतराजकडे २९ विषय हस्तांतरित करण्यात येणार होते. त्यापैकी १४ विषय हस्तांतरित झाले असून, १५ विषय अद्याप हस्तांतरित होऊ शकलेले नाहीत. घटना दुरुस्तीत हस्तांतरणाची सूचना करण्यात आली असली तरी अद्याप तिची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. ती लवकरच होईल, असा आशावाद भुसे यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागात अनेकांना आजही शुद्ध पाणी मिळत नाही. बोअर किंवा विहिरीचे पाणी त्यांना वापरावे लागते. अनेकांच्या अंगावर पुरेसे कपडे नसतात. काही ठिकाणी अन्नाची नासाडी होते, तर काहींना उकिरड्यावर अन्नाचे कण वेचावे लागतात. हे चित्र बदलण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचे ते म्हणाले.

गावाचे दरडोई उत्पन्न वाढविणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असते. दरवर्षी हे उत्पन्न वाढते राहायला हवे; परंतु घटना दुरुस्तीनंतर प्रत्यक्षात असे घडले का याचा अंतर्मुख होऊन विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा झगडे यांनी व्यक्त केली. जेंडर बजेटची संकल्पना राबविली जाते का, शेतकरी आत्महत्या रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची असली तरी त्या ही जबाबदारी घेतात का, असा सवाल त्यांनी उपस्थ‌ित केला. सर्वांना सुखी आणि आनंदी करणे घटना दुरुस्तीचा उद्देश आहे. तो सफल होत नसेल तर कोणत्या उपाययोजना करता येतील याचा विचार व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या ycmou.ac.in या संकेतस्थळावर आणि www.facebook.com/ycmouniversity या फेसबुक पेजवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थ‌ित नसलेल्यांनाही कार्यशाळेचा लाभ घेता आला.

लोकप्रत‌िनिधींची अनास्था

घटना दुरुस्तीमधील तरतुदींच्या अंमलबजावणीची जबाबदारी लोकप‍्रतिनिधींची आहे. म्हणूनच परिषदेसाठी आजी-माजी महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, महापौर रंजना भानसी उद््घाटनाचे सत्र संपण्याच्या वेळी पोहोचल्या. काही लोकप्रतिनिधींनी औपचारिकता म्हणून हजेरी लावून निघून जाणे पसंत केले. एकूणच या उपक्रमाबाबत लोकप्रतिनिधींच्या अनास्थेचे दर्शन घडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांसाठी ५० कोटींचा जीएसटी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या रस्ते विकास योजना जीएसटीच्या भाराखाली दबली असून, २२५ कोटींच्या रस्ते विकास योजनेसाठी पालिकेला तब्बल २७ कोटींचा जीएसटी भरावा लागणार आहे. त्यामुळे २५७ कोटींची रस्ते विकास योजना पालिकेला २२५ कोटींवर आणावी लागणार आहे. सोबतच आता स्मार्ट सिटीत पुन्हा दोनशे कोटींचे रस्ते होणार असल्याने तेथेही २४ कोटींचा जीएसटी कंपनीला भरावा लागला आहे. त्यामुळे निव्वळ रस्ते विकास योजनेतून केंद्राच्या तिजोरीत ५० कोटींचा निधी जमा होणार आहे.

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी विकासकामांऐवजी रस्त्यांवर डांबर ओतण्याची योजनाच हाती घेतली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकमध्ये तब्बल ४६० कोटींची रस्ते-रिंगरोडची कामे करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील रस्ते चकाचक झाले असतानाच, मनसेच्या सत्ताकाळात पुन्हा शहरातील रस्त्यांवर १९२ कोटींचे डांबर ओतण्यात आले होते. या योजनेअंतर्गत घेतलेली कामे अद्याप पूर्ण झालेली नसताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये चमकदार कामगिरीसाठी पुन्हा रस्त्यांवर २५७ कोटींचे डांबर ओतले जाणार आहे. गुरुवारी या योजनेअंतर्गत २२५ कोटींच्या निविदा देखील जाहीर करण्यात आल्या. निविदा प्रक्रियेअंती प्रत्यक्षात मार्च महिन्यात या रस्ते विकासाच्या कामांना सुरुवात होईल.

महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या विकासकामांसाठी पूर्वी जिल्हा नियंत्रण दरसूचीनुसार प्राकलने तयार केली जात असत. आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यासाठी एकच दरसूची लागू करण्यात आली आहे. मात्र या दरसूचीत जीएसटीचा समावेश नाही. आता विकासकामांसाठी १२ टक्के जीएसटी लागू आहे. विकासकामांची देयके अदा करताना निविदा रकमेवर १२ टक्के जीएसटी वसूल करून ते शासनाकडे भरण्याचे परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे. त्यानुसार महापालिकेच्या प्रत्येक विकासकामासाठी १२ टक्के जीएसटी भरला जात आहे. २२५ कोटींच्या रस्ते विकास योजनेसाठी तब्बल २७ कोटींचा जीएसटी भरावा लागणार आहे. अर्थात विकासकामे झाल्यानंतर देयक सादर करण्यापूर्वी संबंधित मक्तेदाराकडून तो भरला जाईल. कामाचे देयक सादर करताना जीएसटी भरल्याची पावती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरच जीएसटीसह देयक अदा केले जाणार आहे. अंतिमत: जीएसटीचा भार महापालिकेवरच राहणार आहे.

स्मार्टमध्ये २५ कोटींचा भार

स्मार्ट सिटीअंतर्गत पुन्हा गावठाण भागात २०४ कोटींची रस्ते विकासकामे केली जाणार आहे. त्यासाठीच्या निविदा पुढील महिन्यात काढण्यात येणार आहेत. त्या कामासाठीसुद्धा १२ टक्के जीएसटी कंपनीला द्यावा लागणार आहे. त्यामुळे जवळपास २५ कोटी जीएसटी भरावा लागणार आहे. त्यातही पालिकेचा हिस्सा असल्याने जवळपास ५० कोटींपेक्षा अधिक जीएसटीचा भार रस्ते विकासकामांसाठी पालिकेवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार नवीन आदर्श फुटपाथ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवर महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शहीद चौक ते जेहान सर्कल आदर्श फुटपाथ आता शहरात अन्य चार ठिकाणी करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाच्या वतीने याबाबत रस्त्यांची चाचपणी करण्यात येत असून लवकरच शहरात प्रमुख चार रस्त्यांवर आदर्श फुटपाथ पालिकेच्या खर्चातून केले जाणार आहे. दरम्यान या फुटपाथवर होणाऱ्या अतिक्रमणांचाही दखल घेतली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता उत्तम पवार यांनी दिली आहे.

महापालिकेच्या वतीने गंगापूर रोडवर शहीद चौक ते जेहान सर्कल दरम्यान दुतर्फा दिड किलोमीटरचा आदर्श फुटपाथ तयार करण्यात आला आहे.या आदर्श फुटपाथमुळे रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.या आदर्श फुटपाथच्या धर्तीवर बांधकाम विभागाच्या वतीने आता शहरात चार ठिकाणी फुटपाथ उभारण्यात येणार आहे.बांधकाम विभागाच्या वतीने हा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने चार आदर्श फुटपाथ होणार आहे.दरम्यान गंगापूर रोडवरील आदर्श फुटपाथ वर वाहन धारकांकडून अतिक्रमण केले जाते.त्यामुळे नागरिकांना हा फुटपाथ वापरता येत नाही.बांधकाम विभागाने येथील अतिक्रमण हटवण्याचीही तयारी दर्शवली असून वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरीच्या संशायावरून मित्राचा खून

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी


मोबाइल चोरल्याच्या संशयावरून दिंडोरी तालुक्यातील तुंगलदरा येथील तीन मित्रांनी आपल्याच मित्राचा धारदार शस्त्राने खून केला. दिंडोरी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

तुंगलदरा येथील सचिन राजाराम बगर (वय २२) याला गुरुवारी रात्री आठ वाजता त्याचा मित्र पोपट जगन बेडकुळे घरातून बाहेर घेऊन गेला. त्याच्यासोबत दीपक बाळू बेडंकुळे, योगेश भास्कर बेडंकुळे हेही होते. पोपटचा मोबाइल सचिनने चोरल्याचा संशय होता. यावरुन सचिनला तिघे गवळवाडी शिवारातील शेतात घेऊन गेले. तेथे त्यांच्यात वाद झाला. तिघांनी सचिनच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. तिघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पोत्यात बांधून मोटारसायकलवर टाकले. त्यानंतर रात्रीच मोहाडी-साकोरे रस्त्यावरील कुर्णोली शिवारात रस्त्याच्या कडेला त्याचे मृतदेह फेकून दिला. दरम्यान रात्री पोपट बेडकुळे याने हा घरी प्रकार सांगितल्यावर पहाटे पोलिसांना खबर मिळाली पोलिसांनी तातडीने सर्व आरोपींना ताब्यात घेतले. तसेच मृतदेह शोधून काढला. पोल‌िस उपअधीक्षक देवीदास पाटील, पोल‌िस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या. दिंडोरी पोलिसांनी त‌ीनही आरोपींविरुद्ध भादवी ३०२, २०१, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला. मृत सचिन हा यापूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात संशयित आरोपी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ सर्वेक्षणाआधी अस्वच्छतेचे दर्शन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत नाशिक पहिल्या दहा क्रमांकात येण्यासाठी महापौरांसह पालिकेतील पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. परंतु, या पाहणी दौऱ्यात शहरातील अस्वच्छतेचेच दर्शन होत असून, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिग, पाणीगळती, पालिकेच्या इमारती व उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून येत आहे. त्यामुळे वरचा क्रमांक तर दूरच, परंतु आहे तो क्रमांकही गमावण्याची भीती आता पदाधिकाऱ्यांना सतावत असून, मुख्यमंत्र्यांची स्वप्नपूर्ती कशी करायची, अशा पेचात पदाधिकारी पडले आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत केंद्राचे पथक नाशिकमध्ये १५ जानेवारीपासून येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देशातील पाचशे शहरात नाशिकचा क्रमांक १५१ वा आला होता. ‘स्वच्छ व सुंदर नाशिक’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिकसाठी हा धक्काच होता. महापालिकेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक आणण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी आयुक्तांसह महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, स्थायी समिती सदस्यांसह विविध प्रभाग समित्यांचे सभापती प्रयत्न करीत आहेत; परंतु आरोग्य विभागाच्या दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र या पाहणीr दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पदाधिकारी विविध विभागांना अचानक भेटी देत असून, त्यात पालिकेच्या आरोग्य विभागाचेच वाभाडे निघत असल्याचे चित्र आहे.

शुक्रवारी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य व वैद्यकीय समिती सभापती सतीश कुलकर्णी, शहर अभियंता यू. बी. पवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी शहरातील अनेक ठिकाणी पाहणी केली.

येथे केली पाहणी

जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मेळा बसस्थानक, सेंट्रल बसस्थानक, महात्मा गांधी रोड, शिवाजीरोड, शरणपूर रोड, फुले मार्केट, फाळके रोड येथे पाहणी केली. या पाहणीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग, उद्यानांमध्येच घाणीचे साम्राज्य, पाणीगळतीने पसरलेली दुर्गंधी, पालिकेच्या कार्यालयांमध्ये अस्वच्छता आढळून येत आहे. त्या परिसरातील आरोग्यविषयक समस्या, रस्ते, वीज, गटार, बांधकाम आदींच्या समस्या जाणून घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचे तत्काळ निराकरण करण्यास सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी नाक्यावर दोघांना लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोघांना दुचाकीवरील चोरट्यांनी बेदम मारहाण करून लुटले. ही घटना दिंडोरीनाका भागात भरदिवसा घडली. या घटनेत दोघांच्या खिशातील मोबाइल आणि रोकड असा अडीच हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये लुटमारीचा गुन्हा दाखल झाला आहे.

किरण विनायक आहेर (रा. उज्ज्वलनगर, बोरगड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरूवारी (दि. ४) सायंकाळी आहेर कामावरून घरी परतण्यासाठी निघाले होते. दिंडोरीनाका बस स्टॉपवर विकास विश्वनाथ धनवे यांच्या समवेत ते गप्पा मारत उभे असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोघे जण आले. त्यांनी काही कारण नसताना थेट शिवीगाळ सुरू करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आहेर आणि धनवे या दोघांच्या खिशातील मोबाइल आणि रोकड असा सुमारे अडीच हजार रुपयांचा ऐवज घेवून पोबारा केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक वाय. डी. उबाळे करीत आहेत.

श्रमिकनगरला दुचाकीस्वारास लुटले

काम आटोपून घराकडे परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा रस्ता अडवून बेदम मारहाण करून दोघा महिलांसह इतर तिघांनी मिळून एकास लुटल्याची घटना सातपूर परिसरातील श्रमीकनगर भागात घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बंडू सरदार मन्सुरी (रा. सातमाऊली चौक, श्रमिकनगर) यांच्या तक्रारीनुसार, गुरुवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मन्सुरी दुचाकीने घराकडे परतत होते. सात माऊली चौकातून जात असतांना संशयित अतुल खरे, आकाश इंगळे, राजू गांगुर्डे, माया गांगुर्डे, कौशल गांगुर्डे तसेच त्यांच्या दोन ते तीन साथीदारांनी त्यांना अडवले. या टोळक्याने थेट शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांच्या खिशातील १,२०० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. घटनेचा अधिक तपास एस. एस. वऱ्हाडे करीत आहेत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

भरधाव वेगातील रिक्षा पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सदर रिक्षाचालकाविरोधात देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अस्लम बाबुभाई शेख (अंबडवाडी, शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प) असे अपघातात ठार झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर, मेहम्मूद बाबुभाई शेख (अंबडवाडी, शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. १ जानेवारी रोजी रात्री १२ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास धोडींरोड, देवळाली हायस्कूल येथे अपघाताची घटना घडली होती. मेहम्मूद आणि अस्लम असे दोघे रिक्षातून (एमएच १५, झेड ९७१८) प्रवास करीत असताना भरधाव वेगातील रिक्षा पलटी झाली. यात अस्लमच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पीएसआय आर. एस. नरोटे करीत आहे.

टोळक्याचा धुडगूस

किरकोळ कारणातून टोळक्याने घरात घुसून राडा घातला. ही घटना दिंडोरी रोडवरील विजयनगर भागात घडली असून, संशयित आरोपींनी सोसायटीत पार्क केलेल्या दोन कारच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
विनायक राजेंद्र गोसावी (२३, रा. महालक्ष्मी दर्शन सोसा. रिलायन्स पेट्रोलपंपासमोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी सोनू शशिकांत गोसावी यांच्याशी विनायकचा किरकोळ वाद झाला होता. या वादातूनच बुधवारी (दि. ३) मध्यरात्री सोनू गोसावी याने अनिल नावाचा तरुण आणि आणखी काही साथीदारांसमवेत विनायकचे घर गाठले. यावेळी संशयितांनी शिवीगाळ करीत विनायकला बेदम मारहाण केली. तसेच मारहाणीनंतर परतत असतांना सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन कारची तोडफोड केली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक जोपळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images