Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एसटीतील कामांची श्वेतपत्रिका काढावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन न देऊ शकणारे एसटी महामंडळ दुसऱ्या बाजूला आर्थिकदृष्ट्या डबघाईत असतानादेखील अवास्तव खर्च करते. या कामाचे ऑडिट करण्यासाठी महामंडळाने गेल्या तीन वर्षांत घेतलेले निर्णय आणि त्यापोटी केलेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केली आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह इतर मागण्यांसाठी १७ ते २० ऑक्टोबर या कालावधीत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, आर्थिक उत्पन्नाचे कारण पुढे करीत अल्प पगारवाढीचा प्रस्ताव महामंडळाने ठेवला होता, असे संघटनेचे म्हणणे आहे.

महामंडळाने बस आणि बसस्थानक सफाईसाठी १२९३ स्वच्छक कर्मचारी आणि ५१४ सफाई कामगार कार्यरत असताना खासगी कंत्राटदारास ४४७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. नव्याने शिवशाही बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आलेल्या निविदाप्रक्रियेनुसार १५०० खासगी बस कुणाच्या मालकीच्या आहेत, त्यावर किती रुपयांचा भार सोसावा लागणार आहे, असे प्रश्न छाजेड यांनी उपस्थित केले आहेत. गणवेश खरेदी, ईटीआयएम तिकीट मशिनच्या ट्रायमॅक्स कंपनीस मुदतवाढ देणे, करार संपल्यानंतर मशिन आणि यंत्रसामग्री महामंडळास वर्ग करणे आवश्यक असताना पुन्हा ट्रायमॅक्स कंपनीस ठेका देणे, ट्रायमॅक्स कंपनीच्या नव्या करारानुसार आलेल्या मशिनमध्ये जीपीएस यंत्रणा असतानाही ट्रायमॅक्स कंपनीलाच व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीमचे काम देणे, चेसीज खरेदी निविदेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या नमूद सूत्राप्रमाणे धंदा वाटप न करणे, केपीएमजी या बाह्य सल्लागार संस्थेस अनावश्यक नेमणे, बाह्य निविदा प्रकरण, बसस्थानक नूतनीकरण, स्मार्ट कार्ड योजना, वाय फाय, टायर खरेदी, भरतीप्रक्रिया, बाहेरून बस बांधून घेणे, तुर्भे येथील बस आगाराकरिता सिडकोकडून घेण्यात आलेल्या जागेवर ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग कॉलेज आणि स्वयंचलन इंजिनीअरिंग कॉलेज बांधण्याचा निर्णय, पुणे स्वारगेट येथे सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचा निर्णय, अवास्तव जाहिरातींसाठी खर्च, मराठी भाषादिन, वर्धापनदिन, गणवेशवाटप आदी कामांसाठी करण्यात आलेला खर्च यासह गेल्या तीन वर्षांपासून घेतलेल्या निर्णयांची, कामांची व खर्चाची श्वेतपत्रिका एसटी महामंडळाने काढावी, अशा मागण्या छाजेड यांनी केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वेच्या टाकाऊ वस्तूंमधून ग्रीन जिम

$
0
0

नांदगाव स्टेशनला लोको फोरमनच्या कल्पनेतून उभारणी

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वेचे रनिंग रूम म्हणजे रेल्वे चालवून दमलेल्या रेल्वे चालकांचे व सोबतच्या गार्डसचे विश्रांती स्थानच. मात्र नांदगावमध्ये केवळ रेल्वे चालकांना आराम करण्यासाठीची जागा एवढेच त्याचे स्वरूप न ठेवता चालकांची तब्येत ठणठणीत व एकदम सुदृढ राहण्यासाठी अत्याधुनिक जिम तयार करण्यात आली आहे. रेल्वेच्या निकामी झालेल्या टाकाऊ भंगार वस्तूंमधून ही ग्रीन जिम निर्माण केल्याने दहा ते बारा हजारांचा खर्च आला आहे.

नांदगाव रेल्वे स्थानकावर करण्यात आलेला हा प्रयोग जरा हटके असून, त्याला शनिवारी (दि. ६) नांदगावला पाहणीसाठी आलेल्या रेल्वे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांच्याकडून २५ हजारांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. येथील लोको फोरमन ए. जी. गोरे यांच्या कल्पकतेतून जिमला मूर्तरूप मिळाले. रेल्वे चालकांसाठी जिमयुक्त रनिंग रूम कौतुकाचा विषय ठरला असून, सर्वांसाठी आदर्शवत ठरण्याची शक्यता आहे.

नांदगाव येथील रेल्वेच्या चालक, गार्ड वर्गासाठी असलेल्या विश्रांती गृहात आता अत्याधुनिक जिम साकारण्यात आली आहे. नांदगावच्या लोको फोरमन्सकडून चालक व गार्ड यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने विचार करून या रनिंग रूमला वेगळे रूप बहाल केले आहे. ज्यामुळे रेल्वे चालक आणि गार्ड यांना विश्रांती करणे सोपे होणार आहे. या विश्रांतीगृहासाठी रेल्वे प्रशासनाकडून दरमहा मिळणाऱ्या ठराविक खर्चाच्या रकमेतही बचत करीत ही ग्रीन जिम साकार करण्यात आली आहे.

महाप्रबंधकांकडून २५ हजारांचे बक्षीस

विशेष म्हणजे या जिमला लागणारे रेल्वेचे लाखो रुपये कल्पकतेने वाचवून त्यांनी रेल्वेच्या टाकाऊ व भंगारात जाणाऱ्या वस्तू मोठ्या कौशल्याने जिमसाठी वापरल्या आहेत. या टाकाऊ वस्तूंपासून जिममधील व्यायामाची साधने तयार करून घेतली आहेत. यात प्रामुख्याने चालकांसाठी व गार्डसाठी स्काय वॉकर, लेग प्रेस, एअर वॉकर, चेस्ट प्रेस, सर्फ बोर्ड, सीट अप बोर्ड, सीटिंग अँड स्टँडिंग ट्विस्टर अशा विविध साधनांची उपलब्धता करण्यात आली आहे. नांदगाव रेल्वे स्थानकाच्या दौऱ्यावर आलेले रेल्वे महाप्रबंधक शर्मादेखील ही जिम पाहून प्रभावित झाले. त्यांनी या कल्पकतेला दाद दिली तसेच भरभरून कौतुक करीत त्यांना रोख बक्षीसही दिले. रेल्वे चालकांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्य व सुदृढतेसाठी योगा, इतर प्रकारचे व्यायाम चालक वर्गासाठी नांदगाव रनिंग रूम एक वरदान ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमित औषधांनी इपिलेप्सी नियंत्रणात

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इपिलेप्सी (फिट्स) आजार नियमित औषधोपचाराने पूर्ण बरा होऊ शकतो. यासाठी नवनवीन थेरपींचा वापर शक्य असून, कुटुंबाने या पेशंटकडे लक्ष पुरवावे, असा सल्ला अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. गजानन होले यांनी दिला.

राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि इपिलेप्सी फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे जिल्हा रुग्णालयात रविवारी झालेल्या शिबिर प्रसंगी ते बोलत होते. शि‌बिराचा शुभारंभ आरोग्य उपसंचालक डॉ. लोचना घोडके यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास इपिलेप्सी फांउडेशनचे डॉ. निर्मल सूर्या तसेच इंडियन अॅकॅडमी ऑफ न्युरोलॉजीचे सेक्रेटरी डॉ. गगनदीपसिंग (पंजाब) हे उपस्थित विशेषज्ञ म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ. मनोज गुल्हाने, डॉ. आनंद दिवाण, डॉ. राहुल बाविस्कर आदी सात न्युरोफिजीशियन्सनी मदत केली. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच सदर शिबिराची माहिती देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाने ग्रामीण भागासह शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्याद्वारे माहिती दिली. शिबिरामध्ये जिल्हा तसेच परिसरातील २०० वेगवेगळ्या वयोगटातील पेशंट्सची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. पेशंट्सचा मोफत इ‍इजी व सीटी स्कॅन करण्यात आला. शिबिरात आलेल्या पेशंट्सना फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी या सुविधांची माहिती देऊन त्या प्रत्यक्षात पुरवण्यात आल्या. ग्रामीण भागातून आलेल्या पेशंट्सला तीन महिन्यांचे मोफत औषध पुरवण्यात आले. दूरवरून येणाऱ्या पेशंट्स तसेच नातेवाइकांसाठी विशेष मोफत वाहनांची तसेच दिवसभरात जेवणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली.

इपिलेप्सी आजाराबाबत तसेच शिबिराबाबत संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती तसेच शिबिराची माहिती देण्याचे काम आशा कार्यकर्त्या तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. उपस्थित सर्व विशेषज्ञांनी इपिलेप्सी हा आजार नियमित व योग्य वेळेत उपचार केल्यास पूर्ण बरा होऊ शकतो, असे मत व्यक्त केले. या आजाराचे जवळपास ५०० पेशंट्सवर दर महिन्याला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार केले जातात. या आजाराची सर्व औषधे जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध असून, त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू घाट लिलावावर प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाळू घाटांच्या परिसरात पर्यावरण संवर्धनाचे निकष पाळले जात नसल्याची हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. पुढील आदेश येईपर्यंत घाटांचे लिलाव करू नका असे आदेश हायकोर्टाने दिल्याने राज्यभरातील घाटांचे लिलाव ठप्प होणार आहेत. नाशिकमध्ये सोमवारी (दि. ८) लिलाव होणार होता. परंतु, हायकोर्टाच्या आदेशाने तो पुढे ढकलावा लागणार आहे.

राज्यात वाळू घाटांच्या लिलावातून राज्य सरकारला मोठा महसूल मिळतो. या घाटांच्या ठिकाणी उत्खनन केले जात असले तरी पर्यावरण संवर्धनाचे निकष पाळण्याचे बंधन प्रशासनासह ठेकेदारांवरही आहे. परंतु, हे निकष पाळले जात नसल्याबद्दलची याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. हायकोर्टाने घाटांच्या लिलावावेळी पर्यावरण संवर्धन तसेच पर्यावरणीय आघात करणाऱ्या बाबींचा आराखडा तयार करण्यास सांगितले. या आराखड्यांना पर्यावरण विभागाची मंजुरी घेतानाच ते जिल्हास्तरीय पर्यावरण समितीपुढे सादर करण्याचे निर्देश दिले. याबरोबरच पुढील निर्णय येईपर्यंत राज्यातील एकाही घाटाचा लिलाव करू नये, अशा सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक वाळू घाटांच्या लिलावावर बंधने आली आहेत.

ठेकेदारांनी फिरवली पाठ
नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाळू घाटांच्या लिलावासाठी इ-ऑक्शन प्रक्रिया राबविली जात होती. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ३० घाटांचे लिलाव सोमवारी करण्यात येणार होते. या लिलावात सहभागी झालेल्या निविदा शनिवारी (दि. ६) उघडण्यात आल्या. त्यामध्ये चार घाटांसाठी बोली लावल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये केवळ कळवण व देवळा तालुक्यातील घाटांचा समावेश होता. म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातही वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

प्रशासनाची द्विधा मनस्थिती
निविदा उघडण्याची वेळ उद्यावर आली असताना कोर्टाचे आदेश आल्याने घाटांचे लिलाव करायचे की नाही अशी जिल्हा प्रशासनातील गौन खनिज विभागाच्या यंत्रणेची द्विधा मनस्थ‌िती झाली आहे. वाळू चोरी करणाऱ्या माफियांवर दरोड्याची कलम लावण्याचे धोरण राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात अवलंबले आहे.

आराखड्यात हे अपेक्षित
कोर्टाच्या आदेशानुसार, प्रत्येक घाटाचे सर्वेक्षण करावयाचे आहे. त्यामध्ये नदी कोणत्या दिशेने वाहते, नदीतून किती गाळ वाहून नेण्याची क्षमता आहे, नदीपात्रात किती ब्रास वाळू उत्खनन शक्य आहे अशा विविध गोष्टींची माहिती घेऊन आराखडा तयार करावा लागणार आहे. अशा एका घाटासाठी सुमारे २५ हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. हा खर्च जिल्हा प्रशासनाच्या माथी पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचे आरोग्य सुदृढ, तर कुटुंबास स्वास्थ्य!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस रेझिंग सप्ताहनिमित्त रविवारी, सायंकाळी शहर पोलिसांनी महिला बाईक रॅलीचे आयोजन केले. यात पोलिस दलातील तसेच इतर महिलांनी सहभाग घेतला. रॅली दरम्यान वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
बाईक रॅली त्र्यंबकरोडवरील स्वांतत्र्यवीर सावरकर जलतरण तलावापासून सुरू झाली. त्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात महिला व बाल कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, डॉ. श्वेता भिडे, सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त उपस्थित होते. कार्यक्रमास संबोधित करताना डॉ. भिडे यांनी सांगितले, की महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाही, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. वाहतुकीसारख्या प्रश्नात आपणच पुढाकार घेऊन पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे डॉ. भिडे यांनी सांगितले. महिलांचे आरोग्य हा महत्त्वाचा विषय ठरतो. घरातील महिलेच आरोग्य सदृढ असल्यास त्या कुटुंबास स्वास्थ लाभते. त्यामुळेच कुटुंबाची प्रगती शक्य होते. महिलांनी व्यायामाकडे लक्ष पुरवणे आवश्यक असून, शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत अधिकाधिक महिलांनी सहभागी होऊन सदृढ आरोग्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहचावा, असे डॉ. भिडे यांनी स्पष्ट केले.

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष नको
पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी संबोधित करताना सांगितले, की वाहतूक हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्याकडे दुर्लक्ष होते. याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले. दरम्यान महिलांच्या बाईक रॅलीला जलतरण तलावापासून सुरुवात झाली. पुढे त्र्यंबक नाका, सीबीएस, अशोकस्तंभ तेथून गंगापूररोड, राजीवगांधी भवन आणि पुन्हा जलतरण तलाव अशी ही रॅली पार पडली. सहभागी झालेल्या महिलांनी वाहतूक नियम पाळण्याबाबत घोषणा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाच्या कार्यात पुढाकार घेणे आवश्यक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

समाजाच्या कार्यात बऱ्याचदा काही ठराविक लोकच कायम पुढे दिसतात. मात्र, समाजाचा होत चाललेला वटवृक्ष पाहता प्रत्येक समाजबांधवाने आता समाजकार्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश सुरते यांनी केले.

श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगीत ते बोलत होते. या अधिवेशनातून मिळालेला संदेश आत्मसात करून समाजाच्या उत्कर्षासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. समाजाने सर्वच क्षेत्रात आघाडी घेण्याची गरज आहे, असेही अॅड. सुरते यांनी सांगितले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्रात सकाळपासून विविध ठरावांवर चर्चा करून त्यांना समाजबांधवांनी संमती दिली. यात प्रामुख्याने समाजाच्या वतीने करावयाची कामे त्यात वधूवर मेळावे, आरोग्य तपासणी, मोतीबिंदू शिबिर, समाजाच्या संस्थेचे कार्य करण्यासाठी आर्थिक नियोजन या सारख्या अनेक गोष्टींवर यावेळी चर्चा करण्यात आली. सिडकोतील लक्ष्मी धवल मंगल कार्यालयापासून अधिवेशनानिमित्त भव्य पालखी काढण्यात आली. या पालखीत समाज बांधव व विविध वेशभूषा केलेले अबालवृद्ध सहभागी झाले.

अधिवेशनात संघटनेची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष म्हणून सुनील निकुंभ यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष विजय बिरारी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर निकुंभ यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. समाजातील प्रत्येकाच्या सहकार्याने ही जबाबदारी पार पाडणे शक्‍य होणार आहे. तळागळापर्यंत समाजाचे कार्य नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे निकुंभ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात वाढतोय लसीकरणाचा टक्का

$
0
0

तिसऱ्या टप्प्यात ७७ टक्के लसीकरण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

विशेष इंद्रधनुष्य मोहिमेमुळे मालेगाव शहरात लसीकरणाचा टक्का वाढू लागला आहे. पहिल्या टप्‍प्यात झालेल्या ४४.७० लसीकरणाचा टक्का तिसरा टप्प्यात ७७.३९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे मालेगावात लसीकरणाबाबत असलेला नकार आता होकारमध्ये बदलत असल्याचे आशादायी चित्र आहे. चौथ्या टप्‍प्यात लसीकरण ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचा मानस महापालिका प्रशासनाने व्‍यक्त केला आहे.

जानेवारी २०१८मध्ये राबविण्यात येणाऱ्या विशेष इंद्रधनुष्य मोहिमेत लसीकरण देणाऱ्यांचे मतपरिवर्तन करण्यात येणार आहे. चौथ्या टप्‍प्यात लसीकरण ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयुक्त संगीता धायगुडे यांनी सांगितले. येथील महापालिकेच्या आयुक्त धायगुडे यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी आरोग्यधिकारी डॉ. किशोर डांगे, डॉ. प्रकाश पाडवी, डॉ. एम. ए. एच. अजहर आदी उपस्थित होते.

शहरातील लसीकरणाचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता केंद्राच्या विशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान शहरात सध्या राबविले जात आहे. एकूण चार टप्पात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे तीन टप्पे पार पडले असून, लसीकरणाचे प्रमाण ७७ टक्क्यांपर्यंत गेले आहे. शहरातील मुस्लिमबहूल पूर्वभागात लसीकरणास नकार देणाऱ्याचे मत होकारात बदल्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अभियानास यश आले आहे.

लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये तसेच, राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राज्यात ७ ऑक्टोबरपासून विशेष मिशन इंद्रधनुष्य योजनेंतर्गत लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मालेगाव महापालिका क्षेत्रातदेखील ऑक्टोबरपासून मोहीम राबवली जात आहे. मोहिमेंतर्गत ३६५ सत्रात लसीकरण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात ४४.७० टक्के म्हणजेच ६ हजार २६१ बालकांना लसीकरण करण्यात यश आले. नोव्हेंबर महिन्यात राबविलेल्या दुसऱ्या टप्प्यात ६३.०४ म्हणजेच एकूण ११ हजार ९२२ बालकांपैकी ७ हजार ५१६ बालकांना, तर डिसेंबर महिन्यात १० हजार ५६१ बालकांपैकी ८ हजार १७३ बालकांना लसीकरण करण्यात आले. विशेष मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरण करण्यात यश आल्याने या अभियानामुळे जेमतेम ३५ ते ४० टक्के लसीकरणाचे प्रमाण आता ७७.३९ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.

या अभियानाचा अद्याप एक टप्पा बाकी असून, जानेवारी २०१८ मध्ये राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत १०हजार ३३० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. विशेष मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत शहरातील ९ नागरी आरोग्यकेंद्राद्वारे हे लसीकरण होत असून, यात शहराच्या पूर्वभागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

गरोदर मातांना लसीकरण

विशेष मिशन इंद्रधनुष्य अभियानांतर्गत ० ते २ वयोगटातील बालकांसह गरोधर मातांनादेखील लसीकरण केले जाते. त्याअंतर्गत पहिल्या टप्यात २ हजार ८१ या उद्दिष्ट्यापैकी १ हजार २५९, दुसऱ्या टप्प्यात १ हजार ४५७ पैकी १ हजार २२५, तर तिसऱ्या टप्प्यात १ हजार ४०२ पैकी १ हजार १४१ गरोधर मातांना हे लसीकरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांवर यंदा पाणीकपातीचे संकट ओढवण्याचे संकेत आहेत. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणातून पिण्यासाठी आरक्षित असलेल्या ४३०० दशलक्ष घनफूटपैकी तब्बल १२९१ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर केवळ ८५ दिवसांतच झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाण्याची उधळपट्टी अशीच सुरू राहिल्यास जून-जुलै महिन्यात नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट गहिरे होण्याची भीती आहे. हे संकट टाळण्यासाठी नाशिककरांनी आतापासूनच पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे.

शहराला सध्या दररोज १५.२० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जात आहे. १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१७ या दरम्यानच्या ८५ दिवसांतच उपलब्ध पाणी आरक्षणापैकी गंगापूर धरणातून १२१०.४५ दशलक्ष घनफूट, तर दारणा धरणातून ८१.२२ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा करण्यात आला आहे. रोज सरासरी १५.२० दशलक्ष घनफूटप्रमाणे हा पाणीपुरवठा केला गेला. सद्यःस्थितीत गंगापूर धरणसमूहात २६८९.५५ दशलक्ष घनफूट, तर दारणा धरणात ३१८.७८ दशलक्ष घनफूट यानुसार ३००८.३३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. अशा परिस्थितीत शहरात रोज १५.२० दशलक्ष घनफूट या दरानेच पाणीपुरवठा सुरू राहिल्यास जूनच्या अखेरीसच पाणी आरक्षण संपुष्टात येईल, तसेच दारणा धरणातील उपलब्ध पाणीआरक्षण उचलण्याची महापालिकेची क्षमताच नसल्यामुळे पाणीसंकट वाढण्याचा धोका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नोंदणीकृतपेक्षा अधिक रिक्षांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहरातील नोंदणीकृत रिक्षांपेक्षा अधिक रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी गत वर्षात कारवाई केली. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत २२ हजार ४८३ रिक्षा चालकांकडून ४९ हजार ४६ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला.
बेशिस्त रिक्षा व्यावसायिकांचा मुद्दा शहरात ऐरणीवर आहे. शहरात परवानाधारक रिक्षांपेक्षा अधिक रिक्षा धावतात. यावर्षीच्या वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून ही बाब अधोरेखित होते. शहरात १५ हजारांच्या आसपास अधिकृत रिक्षा असताना वाहतूक पोलिसांकडून २२ हजारांपेक्षा अधिक रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडीसह अपघात होण्यास हातभार लावण्याचा ठपका रिक्षा व्यावसायिकांवर येतो. अनेक रिक्षाचालक प्रामाणिकपणे काम करतात. मात्र, समोर येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण पाहता वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त रिक्षाचालकांचा सातत्याने शोध घेऊन दंडात्मक कारवाई केली जाते. २०१७ मध्ये वाहतूक पोलिसांनी २२ हजार ४८३ रिक्षाचालकांकडून ४९ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे तीन हजार ९११ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. या वर्षात सर्वाधिक कमी कारवाई एप्रिल महिन्यात झाली. यात एक हजार ६३ रिक्षाचालकांकडून दोन लाख ५१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याबाबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाईचा जोर वाढला की लागलीच मोर्चे सुरू होतात. त्यामुळे आता रिक्षासंघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाच सोबत घेऊन कारवाई केली जाते आहे. भविष्यात बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात आणखी कडक भूमिका घेतली जाणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले. युनिफॉर्म न घालणे या नियमाकडे दुर्लक्ष केल्याने पाच हजार ७५ रिक्षा चालकांनी १० लाख १५ हजार रुपये दंड म्हणून पोलिसांना दिले. वास्तविक हा नियम पाळल्याचा फायदा रिक्षाचालकांनाच होऊ शकतो. वारंवार आदेशित करूनही दुर्लक्ष होत असल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलल्याचे एका वाहतूक पोलिसाने स्पष्ट केले.

फ्रंटसिटवरही कारवाई
याप्रमाणे फ्रंटसिट प्रवासी वाहतूक करणाऱ्या पाच हजार २६० रिक्षाचालकांकडून एक लाख ५२ हजार रुपये वसूल करण्यात आले. लायसन्स जवळ न बाळगणे, पोलिसांचा आदेश न जुमानणे, वाहनांचे कागदपत्रे जवळ नसणे, वाहतूक नियमांचे पालन करणे, स्टॉप सोडून रिक्षा उभी करणे, बॅच न लावणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षांमुळे होते वाहतूक कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नाशिक शहराचा मुख्य भाग असलेल्या शालिमार परिसराला रिक्षाचालकांनी वेढले असून, याठिकाणी बसस्टॉप नव्हे, तर रिक्षा स्टॉप असल्याचे दृष्य पहायला मिळते आहे.
या परिसरात सीट भरण्यासाठी चालक गोल चकरा मारत असल्याने वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. शालिमार परिसरात रिक्षाचालकांची मनमानी सुरूच आहे. रस्त्यात गाड्या लावणे, प्रवाशांशी हुज्जत घालणे, अवास्तव भाडे आकारणी करणे यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रिक्षाचालकांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
शहरात रिक्षा प्रवासासाठी सर्वात जलद आणि सुरक्ष‌ित असलेली सेवा आता बेशिस्त सेवा म्हणून ओळखली जात आहे. प्रवाशांना रिक्षा चालकांची गरज आहे. मात्र रिक्षाचालकांना प्रवाशांची गरज राहिली आहे असे वाटत नाही. ‘ग्राहक देवो भवो’ असे मानणारे रिक्षाचालक आता हमरीतुमरी आणि प्रवाशांचा अपमान करण्यासाठी स्वागतापेक्षाही अधिक तत्पर असतात. प्रवाशांना लुबाडता कसे येईल आणि कमी वेळेत जास्त पैसे कसे बनविता येतील, याकडेच त्यांचे अधिक लक्ष असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना गैरसोय व त्रास सहन करावा लागत आहे. अर्थात सर्वच रिक्षाचालक असे आहेत, असेही नाही. मात्र, यामुळे ‘वाट पाहू पण बसने जाऊ’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. अदब‌ीने अन् चांगली सेवा देऊन प्रवाशांचे स्वागत केले तर रिक्षाचालक सध्या दिवसाला जेवढे कमावितात, याहीपेक्षा अधिक कमावतील अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकांनी शिस्त‌ीचे दर्शन घडविले, तर शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षाही प्रवाशांकडून व्यक्त होताना दिसते.

प्रीपेड रिक्षाची गरज
शालिमार ते नाशिकरोड या मार्गावर २४ तास प्रवाशांचा राबता असतो. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांकडून रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे अकारणी करतात. अनेकदा हमरीतुमरीवर प्रसंग येतो. याकरता येथे प्रीपेड रिक्षा सुरू करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत आहे. परिवहन विभागाने पुढाकार घ्यावा व नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबवावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.

लायसन्स, परमिट नसलेले अनेक रिक्षाचालक या भागात व्यवसाय करतात. ते कोणत्याही संघटनेशी संलग्न नाहीत. अशांवर पोलिस वेळोवेळी कारवाई करीत असतात. ही कारवाई सातत्याने सुरू राहिली पाहिजे. पोलिस प्रशासनाला आमचा पाठिंबा असेल.
-भगवान पाठक, श्रमिक सेना रिक्षा चालक मालक संघटना

आमचे चार कर्मचारी या भागात सातत्याने कारवाई करीत असतात. गरजेनुसार त्यात वाढ होत असते. चार कर्मचारी चारही दिशांना उभे असतात. या भागात रिक्षाचालकांवार सातत्याने कारवाई सुरू असते. कुणाची तक्रार असल्यास त्यांनी आमच्या संपर्क साधावा.
- अजय देवळी, सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग

आपला अनुभव कळवा
रिक्षाचालकांच्या मनमानीचा अनुभव अनेकांकडे आहे. तो अनुभव मटा सिटिझन रिपोर्टर या अॅपद्वारे आपण पाठवू शकता. विषयामध्ये (Subject) ‘रिक्षांची मनमानी’ असा उल्लेख आवर्जून करावा. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. तसेच आपले लेखी अनुभव अल्फा स्क्वेअर, तिसरा मजला, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक या मटा कार्यालयाच्या पत्त्यावरही पाठवू शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंत डावखरे यांच्या अस्थींचे विसर्जन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विधान परिषदचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या अस्थींचे सोमवारी (दि.८) रामकुंडात विसर्जन करण्यात आले. त्यांचे चिरंजीव प्रबोध डावखरे यांच्या हस्ते अस्थी विसर्जन करण्यात आले. यावेळी डावखरे यांचे चिरंजीव आमदार निरंजन डावखरे, सून सोनिया डावखरे, नीलिमा डावखरे, भाचे नंदू धनवटे, पुतणे सचिन डावखरे, पुतणी पिंकी हिंगणे, आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापार्कचे पुन्हा होणार नूतनीकरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात मनसेच्या नवनिर्माणाचे प्रतीक असलेला गोदापार्क पुन्हा चकाकणार असून, त्याचे नूतनीकरण होणार आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने गोदापार्कच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, पुन्हा पुरात वाहून जाऊ नये म्हणून आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत. आर्किटेक्टच्या आराखड्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती शहर अभियंता यू. बी. पवार यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रिलायन्स फाउंडेशनच्या मदतीने गोदावरी काठावर गोदापार्कची निर्मिती केली होती. सीएसआर अंतर्गत रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने त्यावर ५० कोटींचा खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. गेल्या वर्षी आलेल्या महापुरात गोदापार्कचे मोठे नुकसान झाले. गोदापार्कचा अनेक भाग वाहून गेला. काही भागाचे नुकसान झाले. पूररेषेतच काम झाल्याने गोदापार्कचे नुकसान झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर महापालिका निवडणुकीत मनसेचा पराभव होऊन भाजपची सत्ता आली. भाजपकडूनही या गोदापार्ककडे दुर्लक्ष झाले. परंतु, आता रिलायन्स फाउंडेशनने गोदापार्कच्या देखभालीचाही करार केला असल्याने पुन्हा पार्कचे नूतनीकरण सुरू केले आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने येथील साफसफाईचे काम हाती घेतले असून, त्याच्या आराखड्यात काहीसा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील पथदीप, सिमेंटीकरण काहीसे नदीच्या बाहेर केले जाणार आहे. त्यामुळे गोदापार्कला पुन्हा झळाळी मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचतगटातही घुसखोरी

$
0
0

महापौरांसह पदाधिकाऱ्यांची समिती ठरविणार बचतगट

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अंगणवाड्यांमध्ये सकस आहार पुरविण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या बचतगटांच्या निवड समितीतही पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या ४१८ अंगणवाड्यांमधील सुमारे १२ हजार बालकांना पोषण आहार पुरविण्यासाठी बचतगटांना आता सत्ताधाऱ्यांची विशेष मर्जी राखावी लागणार आहे. विशेष म्हणजे मर्जीतल्या बचतगटांनाच काम देण्यात आल्याचा सत्ताधाऱ्यांवर आरोप होऊ नये, यासाठी विरोधी पक्षनेत्यांनाही या समितीच्या अशासकीय सदस्यपदी स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे बचतगटांचे कामही आता सत्ताधाऱ्यांच्या मर्जीवर चालणार आहे.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून शहरात ४१८ अंगणवाड्या चालविल्या जातात. त्यातून जवळपास या अंगणवाड्यांमध्ये १२ हजार बालके शिक्षण घेत आहेत. शासनाच्या सकस पूरक पोषण आहार योजनेच्या धर्तीवर महापालिकेच्या माध्यमातून अंगणवाड्यांमधील बालकांना पूरक पोषण आहार पुरविला जातो. शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार प्रत्येक बालकाच्या सकस आहारावर सहा रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एका अंगणवाडीस प्रतिदिन १६८ रुपये खर्च याप्रमाणे वार्षिक खर्च ३८ हजार ६८८ रुपये, तर ४१८ अंगणवाड्यांकरिता वार्षिक खर्च १.६१ कोटी रुपये अपेक्षित आहे. यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनातर्फे नोव्हेंबर महिन्याच्या महासभेवर मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. या अंगणवाड्यांमध्ये सकस आहार पुरविणाऱ्या ३२ बचतगटांच्या निवडीवरून नगरसेवकांनी प्रशासनावर ताशेरे ओढले होते.

शहरातील बचतगटांच्या निवडीसाठी अतिरिक्त आयुक्त दोन यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती कार्यरत होती. उपायुक्त महिला व बालकल्याण विभाग हे या समितीचे उपाध्यक्ष असून, महिला बालकल्याण सभापती अशासकीय सदस्य होते. त्यात आपल्या मर्जीतील बचतगटांना काम देता येत नसल्याने सत्ताधाऱ्यांनी थेट महासभेत ठराव करीत समितीत बदल केला आहे. अतिरिक्त आयुक्तांना समितीवरून हटवून तेथे महापौरांची वर्णी लावण्यात आली आहे. यासंदर्भातील ठराव प्रशासनाला नुकताच प्राप्त झाला आहे.

अशी आहे नवीन समिती

नव्या समितीत महापौर अध्यक्ष, उपमहापौर उपाध्यक्ष, तर स्थायी समिती सभापती, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, बालकल्याण समिती सभापती हे अशासकीय सदस्य व आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, मुख्य लेखाधिकारी हे सदस्य आहेत. उपायुक्त (महिला व बालकल्याण विभाग) हे या समितीचे अशासकीय सदस्य आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीवर आता बचतगटांची निवड ठरणार आहे. यामुळे सत्ताधा-यांशी जवळीक असणा-या बचतगटांचे फावणार आहे.

बचतगटांची रखडली बिले

अंगणवाड्यांमध्ये सकस आहार पुरवठा करणाऱ्या ३२ महिला बचतगटांची जुलै २०१७ पासूनची सुमारे ७५ लाखांची बिले रखडली आहेत. महापालिकेकडे बिले प्रलंबित राहिल्याने सकस आहार पुरवठ्याची योजना अडचणीत आली असून, बचतगटांची आर्थिक स्थिती खालावली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून, महासभेच्या ठरावानुसार ३२ पैकी २२ बचतगटांचे करारनामे नव्याने करण्यात आले आहेत. त्यांची देयके येत्या आठवडाभरात अदा केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको रुग्णालयाला समस्यांची बाधा

$
0
0

नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड

नाशिकरोडसह आजूबाजूच्या तालुक्यांतून वैद्यकीय उपचारांसाठी हजारो रुग्णांची नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयाला प्रथम पसंती असते. मात्र, सध्या या रुग्णालयालाच विविध समस्यांची बाधा झालेली आहे. महापालिका प्रशासनासह स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या रुग्णालयाच्या सुविधा दुर्लक्षित होत असल्याचा परिणाम रुग्णसेवेवर होताना दिसून येत आहे. महापालिकेतील वरिष्ठ पातळीवरील राजकारण, डॉक्टरांना झालेली ‘तू भारी की मी भारीची बाधा’ या अंतर्गत समस्यांसह इमातीलाही विविध समस्यांनी घेरले असल्याचे सध्याचे चित्र आहे. बिटकोसह महापालिकेच्या समांतर हॉस्पिटल्सलाही समस्यांची बाधा झाली आहे.

शहरातील महापालिका रुग्णालयांपैकी बिटको रुग्णालय सर्वांत मोठे आहे. या रुग्णालयात नाशिकरोडसह शेजारील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांतूनही रुग्ण येतात. परंतु, सध्या या रुग्णालयातील समस्यांनी रुग्णांसह रुग्णांचे नातेवाईकही त्रस्त झालेले आहेत. स्वच्छता वेळेवर व दर्जेदार होत नसल्याने दुर्गंधीमुळे रुग्ण हैराण झालेले आहेत. डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला आहे. केसपेपर्ससाठी लागणाऱ्या रांगा रुग्णालयाबाहेर जात आहेत. पार्किंगसाठी जागा अपुरी पडत आहे. गटारी आणि फुटलेल्या पाइपांमुळे पाण्याची गळती सुरू आहे. डॉक्टरांची संख्या काहीशी वाढली आहे. परंतु, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.

ओपीडीला वेळेआधीच टाळे

बिटको रुग्णालयात दररोजच रुग्णांची मोठी गर्दी असते. डॉक्टरांच्या ओपीडीची वेळ सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत असते. परंतु, डॉक्टर्स नऊनंतरच रुग्णालयात येतात. त्यानंतर तासाभरात वॉर्डांमधील राउंड पूर्ण करतात. नंतर ओपीडीचे कामकाज सुरू होते. बारा ते साडेबारा वाजता ओपीडीला टाळे लागते. त्यामुळे रुग्णांची निराशा होते. थम्ब इंप्रेशनची सुविधा या रुग्णालयात नाही. थम्ब इम्प्रेशन मशिनसाठीची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.


डासांमुळे रुग्ण हैराण

बिटको रुग्णालयाच्या इमारतीभोवती उघडी गटार आणि मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो. याशिवाय रुग्णालयाच्या आतील बाजूस काही ठिकाणी ढापे फुटलेले आहेत. पाण्याच्या नळांजवळही स्वच्छता नसते. रुग्णलयाच्या खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत. परिणामी येथे येणाऱ्या रुग्णांना डासांचा सामना करावा लागतो. स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून, आहेत ते कर्मचारीही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात.

डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांची कमतरता

बिटको रुग्णालयात डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. दोन हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरांपैकी सध्या एकच डॉक्टर उपलब्ध आहेत. त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. सदानंद नाईक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रिया राजहंस या डॉक्टरांनी कधीच राजीमाना दिला आहे. मात्र, अजूनही ही पदे भरण्यात आलेली नाहीत. ड्रेसर सुधाकर धुळे निवृत्त झाल्याने या रुग्णालयात ड्रेसरही उपलब्ध नाही. वॉर्ड बॉय, आया आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचीही निम्मी पदे रिक्त आहेत. परिणामी सध्याच्या आया, स्वच्छता कर्मचारी व वॉर्ड बॉय यांना साप्ताहिक सुटीही मिळत नाही.

डॉक्टरांतील दहशत कायम

बिटको रुग्णालय आणि डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या नातेवाइकांकडून मारहाण हे जणू काही समीकरणच बनले आहे. डॉक्टरांच्या कामात ढवळाढवळ करण्यात आजी-माजी नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते आघाडीवर असतात. रुग्णालयांतर्गत प्रशासनाचा जाच आणि बाहेरील व्यक्तींकडून होणारी शिवीगाळ, मारहाण या प्रकारांमुळे या रुग्णालयातील डॉक्टरांना दहशतीची बाधा झालेली आहे. यापूर्वीच्या मारहाणीच्या घटनांमुळे वैतागलेल्या इनटर्न डॉक्टरांची सेवाही गेल्या दीड वर्षापासून बंद झालेली आहे.

सोलर धूळ खात पडून

बिटको रुग्णालयात रूफ टॉप सोलर प्रोजेक्ट काही वर्षांपूर्वीच बसविण्यात आला आहे. परंतु, तो आजतागायत सुरू झालेला नाही. सध्या येथील सोलर पॅनल बेवारस स्थितीत धूळ खात पडून आहेत. बहुतांश सोलर पॅनलची मोडतोड झालेली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या अनास्थेमुळे लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. आजवर एकाही पेशंटला गरम पाण्याची सुविधा देण्यासाठी या सोलर संचाचा वापर झालेला नाही.

सदोष ड्रेनेज सिस्टिम

बिटको रुग्णालयातील सर्व प्लंबिंग आणि ड्रेनेज सिस्टिम सदोष असल्याने पावसाळ्यात या रुग्णालयात पाणी शिरते. आजही ठिकठिकाणी भिंतींवरील पाइप फुटल्याने सतत पाणीगळती सुरू असल्याचे दिसते. काही ठिकाणी गटारी उघड्या आहेत. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी ढापेदेखील फुटलेले आहेत.

सिन्नर फाटा रुग्णालय ओस

बिटकोवरील रुग्णसेवेचा ताण कमी करण्यासाठी सिन्नर फाटा येथे महापालिकेने २००२ मध्ये सुसज्ज रुग्णालय उभारलेले आहे. परंतु, येथील समस्यांमुळे गेल्या १५ वर्षांपासून हे रुग्णालय एकांतवासात पडून आहे. या रुग्णालयात केवळ तासभर ओपीडी चालते. इतर वेळेला या रुग्णालयाकडे डॉक्टर्स आणि कर्मचारी फिरकत नाहीत. येथील ऑपरेशन थिएटरचे टाळे गेल्या पंधरा वर्षांपासून काढण्यात आलेले नाही. या रुग्णालयाची संरक्षक भिंत सिंहस्थातील विकासकामांदरम्यान काढण्यात आल्याने सध्या येथे मद्यपींचा अड्डा जमतो. परिणामी या रुग्णालयाकडे सहसा रुग्ण फिरकत नाहीत.

--

बिटको रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी संख्या याबाबत महापालिकेच्या मुख्यालयातून माहिती मिळेल. इतर सुविधांबाबतही आपल्याकडे माहिती नसून, संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांच याबाबत सांगू शकतील.

-डॉ. जयंत फुलकर, वैद्यकीय अधिकारी, बिटको रुग्णालय

--

बिटको रुग्णालयात रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे जाणवते. दर्जेदार रुग्णसेवा मिळण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचारी संख्या वाढविली पाहिजे. स्वच्छतेवरही भर दिला पाहिजे.
-रविकांत जगधाने, नागरिक

--

बिटको रुग्णालयात रुग्णांची गर्दी जास्त असल्याने ओपीडी जास्त वेळ सुरू राहणे आवश्यक आहे. या रुग्णालयातील स्वच्छतेकडेही अजून लक्ष दिले पाहिजे. ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांनाही केस पेपर्ससाठी जास्त वेळ रांगेत उभे राहण्याची वेळ येते, हे चुकीचे आहे. पार्किंगसाठीही जागा पुरेशी नाही.

-विकास भडांगे, नागरिक

--

बिटको रुग्णालयातील सोलर पॅनल्स सुस्थितीत आहेत. मात्र, त्यांच्या बहुतांश नळांची चोरी झालेली आहे. त्यामुळे सध्या त्यांचा वापर बंद करण्यात आलेला आहे.

-संजय कुलकर्णी, उपअभियंता, विद्युत विभाग, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉशप्रकरणी राजकीय लागेबांधे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
बॉश कंपनीतून ११ कोटी रुपयांचे साहित्य चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार ताहीरअली मोहम्मद इब्रित चौधरी उर्फ छोटू याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या घटनेच्या चौकशीला बळ मिळणार आहे. या प्रकरणात पालिकेतील काही भाई नगरसेवकांचे आर्थिक हितसंबध उघड होऊन ही चौकशी त्यांना छत्रछाया पुरवणाऱ्या राजकीय नेत्यांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी आता राजकीय दबाव येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातून औद्योगिक छत्रछायेखाली चालणारी भाईगिरी पुन्हा समोर आली असून, तपासात आता पोलिसांची कसोटी लागणार आहे.
सातपूरच्या बॉश कंपनीतून तब्बल १० कोटी ६६ लाख रुपयांचा २३ टन माल लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कंपनीच्या एका ठेकेदाराची टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. बॉश कंपनीचे नोझल, नीडल्स, वॉल्व्ह सेट, वॉल्व्ह पिस, पिस्टन व इतर सुट्या भागांची चोरी करून तसेच त्याचे डुप्लिकेशन करून विकण्याचे काम सुरू होते.
सिडकोत गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू असलेल्या या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीत शहरातील काही राजकीय नेत्यांचे व पालिकेतील नगरसेवकांचे आर्थिक हितसंबध गुंतल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर या प्रकरणात गुन्हाच दाखल होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांनीच प्रयत्न केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या नगरसेवकांनी पोलिस स्टेशनमध्ये धावही घेतली होती; परंतु पोलिसांनी दबाव झुगारत कारवाई केल्याने राजकीय नेत्यांचे पुन्हा धाबे दणाणले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची शहरातील काही नेते व नगरसेवकांसोबत उठबस होती. तसेच काहींनी त्यांना छत्रछाया पुरवत त्यांच्यासोबत आर्थिक हितसंबध जपले होते. पोलिसांच्या तपासात ही बाब उघड होण्याची शक्यता असल्याने राजकीय वजन वापरून हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच कंपनीवरही दबाव टाकून प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नगरसेवक दिलीप दातीर यांनीही या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. एका राजकीय नेत्यानेच हे आरोप केल्यामुळे यात तथ्य असलेच पाहिजे, असा अंदाज सर्वांनी व्यक्‍त केला आहे. तसेच हा प्रकार उघडकीस येऊच नये म्हणून अनेकांनी जीव तोडून प्रयत्न केल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास चोरीच्या या गुन्ह्यात राजकीय पदाधिकाऱ्यांचे थेट लागेबांधे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात आता राजकीय दबावाचे तंत्र सुरू झाले असून पोलिसांची तपासात कसोटी लागणार आहे.

‘भंगार’ ते ‘भाईं’चे कनेक्शन
अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीमधील भंगाराच्या चोरीवर शहरातील अनेक भाई पोसले जात असून, त्यांच्या बॉसगिरीने नागरिक त्रस्त झाले आहेत. अंबड, सातपूरचा चोरीचा माल भंगार बाजाराच्या माध्यमातून देशभऱ विकला जात होत; परंतु भंगार बाजार हटल्याने हा माल आता नागरी वस्त्यांमध्ये आणून त्याची विक्री केली जात आहे. नागरी वस्त्यांमध्ये चोरी लपवायची असेल तर, त्यासाठी राजकीय पाठबळ आवश्यक असते. त्यामुळे अनेक राजकीय नेते व पदाधिकारी या प्रकरणात पार्टनर होऊन अशा चोरट्यांना सर्रास संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे या चौकशीत भाईंचे कनेक्शन उघडकीस येणार असल्याने आता प्रकरणाचीच मिटवामिटवी सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘धुळे ते मंत्रालय’ शिवशाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी विविध बदल घडवून शिवशाही ही वातानुकूलित व आरामदायी बससेवा धुळ्यातून थेट मंत्रालयापर्यंत सोमवार (दि. ८) पासून सुरू केली आहे. धुळे परिवहन विभागाकडून याचे संचलन होणार असून, ५५५ रुपये एका बाजूचे भाडे राहणार आहे. यासाठी प्रवाशांना आगाऊ बुकिंगची सेवा पुरविली जाईल, अशी माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली आहे.

धुळे परिवहन विभागाकडून गेल्या कित्येक अशी बससेवा असावी, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. ती पूर्ण होऊन आता ही शिवशाही बस धुळ्याहून नाशिक-ठाणे-मुंबई मंत्रालय या मार्गावर धावणार आहे. पहिल्याच दिवशी या बस सेवेला प्रवाशांचादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. ही बस पुन्हा त्याचदिवशी रात्री नऊ वाजेला मुंबई सेंट्रलहून मंत्रालय आणि तेथून रात्री दहा वाजेला धुळ्याकडे शिवशाही बस रवाना होणार आहे. यामुळे आता प्रवाशांना एका दिवसात धुळे ते मुंबईचा प्रवास करणे शक्य झाले आहे. धुळे ते मुंबई मंत्रालयापर्यंत प्रवासभाडे ५५५ रुपये आकारण्यात आले असून, यासाठी आगाऊ बुकिंगचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. धुळे विभागातून गेल्या काही दिवसांपासून धुळे-पुणे, नंदुरबार-पुणे, दोंडाईचा-पुणे, शिरपूर-पुणे या मार्गांवर शिवशाही बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यालाही प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र जिल्ह्यातून मुंबई मंत्रालयात विविध कामांसाठी दररोज लोकप्रतिनिधींसह शासकीय, निमशासकीय, सामाजिक, शैक्षणिक कामानिमित्त नागरिक ये-जा करीत असतात. यासाठी अनेकवेळा प्रवाशांना अवाजवी पैसेदेखील प्रवाशांना मोजावे लागतात. येत्या काही दिवसांत धुळे विभागाला ४० शिवशाही बस देण्यात येणार असून, धुळ्याहून सुरत, अहमदाबाद, औरंगाबाद, बडोदा, वापी यासह अन्य मार्गावर प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. यापुढे प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक त्याठिकाणी चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी धुळे विभाग प्रयत्नशील राहील, असेही नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी सांगितले.

असा असेल मार्ग

धुळ्याहून पहाटे ३.४० वाजता शिवशाही बस देवपूर बसस्थानकात येईल. पुढे मार्गस्थ होऊन चार वाजता धुळे मुख्य बसस्थानकात येऊन प्रवाशांना घेत मुंबईकडे रवाना होईल. धुळे-नाशिक-ठाणे-मुंबई मंत्रालय असा मार्ग असून, परतीचा मार्ग मुंबई सेंट्रलहून रात्री नऊ वाजता मंत्रालय जाऊन तेथून रात्री १० वाजता धुळ्याकडे निघेल. सोमवारी पहाटे शिवसेनेचे सतीश महाले, युवा सेनेचे पंकज गोरे, आगारप्रमुख भगवान जगनोर, सुनील बैसाणे आदींनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉशप्रकरणी संशयित जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बॉश कंपनीतून तब्बल ११ कोटी रुपयांचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी मुख्य सूत्रधार ताहीरअली मोहम्मद इब्रित चौधरी उर्फ छोटू (वय ३७) यास इंदूर येथून अटक केली. कोर्टाने त्यास बुधवारपर्यंत (दि.१०) पोलिस कोठडी सुनावली. मागील पाच वर्षांत हळुहळू करीत हा सर्व माल एकत्र केल्याचे चौधरीने पोलिसांना सांगितले.
बॉश कंपनीतून तब्बल ११ कोटी रुपयांचे सुटे भाग चोरी केल्याप्रकरणी चौधरीसह शिश अहमद अस्लम हुसेन खान आणि अहमद रजा शुभराजी खान आणि एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन्ही संशयित खान पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर गुन्हा उघडकीस आल्यापासून चौधरी फरार झाला होता. अंबड पोलिसांनी त्यास इंदूर येथे शिताफीने अटक करून सोमवारी कोर्टासमोर हजर केले. पखालरोड येथील रझा कॉलनीत राहणारा चौधरी ठेकेदार असून, तो बॉश कंपनीतील स्क्रॅप मटेरियल उचलण्याचे काम करत होता. २००९ पासून तो कंपनीसोबत असून, आजमितीस त्याचा कंपनीबरोबर करार आहे. चौधरीकडे कंपनीतील स्क्रॅप मटेरियल उचलून सिन्नर येथे पोहचवण्याची जबाबदारी होती. यासाठी त्याच्या तीन ते चार ट्रक कार्यरत होत्या. मात्र, स्क्रॅप मटेरियलसह चौधरीने कंपनीचा इतर कच्चा तसेच पक्का माल न कळत उचलण्यास सुरुवात केली. कंपनीच्या मालात तुटवडा दिसून येत असल्याचे अहवाल दरवर्षी तयार झाले. मात्र, त्याचा सुगावा लागत नव्हता. देशभरात काही ठिकाणी बनावट माल विक्री होत असल्याच्या तक्रारीदेखील कंपनीला प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये तीनपेक्षा अधिक तक्रारी दाखल आहेत. नव्याने पोलिसांकडे एक तक्रार आली होती. यादृष्टीने पोलिस तपास करीत असताना १ जानेवारी रोजी सिडकोतील पंडितनगर येथील चौथ्या स्कीममधील रहेतमुल्ला चौधरी याच्या तीनमजली इमारतीसमोर संशयास्पद ट्रक उभे असताना पोलिसांनी चौकशी केली. यात बॉश कंपनीकडून उत्पादित होणारे नोझल, नीडल्स, वॉल्व्हसेट, वॉल्व्ह पीस, पीस्टन व इतर सुटे असा १० कोटी ६६ लाख रुपयांचा २३ टन माल पोलिसांच्या हाती लागला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त पार्किंगला ब्रेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
वाहतूक पोलिसांनी सोमवारी केंब्रिज शाळेसमोर रस्त्यात गाडी लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. ही मोहीम अशाच पद्धतीने सुरू ठेवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. वडाळा-पाथर्डीवरील केंब्रिज शाळेसमोर दररोज वाहनांची वर्दळ असल्याने या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात होत असतात. या शाळेसाठी येणारे अनेक पालक रस्त्यावरच बेशिस्तपणे गाड्या लावत असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त होण्याची मागणी होत होती.
वडाळा-पाथर्डीरोडवर असलेल्या केंब्रिज शाळेसमोर दररोज शाळा भरताना व सुटताना मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या असलेल्या खासगी गाड्या, रिक्षा किंवा शाळेच्या गाड्यासुद्धा रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद होत असतो. विद्यार्थ्यांना घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी येणारी वाहने या शाळेच्या आवारात उभी करण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना यापूर्वीही पोलिसांनी शाळा प्रशासनाला केली होती. मात्र, त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना पालक दुचाकींवर सोडण्यासाठी येत असतात, तेही सर्रासपणे रस्त्यावर गाडी उभी करीत असल्याने या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी होत असते. शाळेच्या आवारात वाहनतळाची व्यवस्था होणे अपेक्षित असतानाही केवळ रस्त्यावरच वाहनतळ झाल्याने परिसरातील नागरिकांना याचा खूपच त्रास होत आहे. त्यामुळे ही शाळा सुटते व भरते तेव्हा अनेक लहान-मोठे अपघातसुद्धा होत असतात. अनेक विद्यार्थी रस्ता ओलांडून जात असल्याने त्यांनाही रस्ता ओलांडणे अवघड होत असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर पोलिसांनी कारवाई केली.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी यापूर्वीही इंदिरानगर पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र, त्यात सातत्य न राहिल्याने ही परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. सोमवारी सकाळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश भाले, शंकर दातीर यांच्यासह वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी अनेकांनी वादावादी केली. परंतु, रस्त्यावर वाहने लावल्यास कारवाई होणारच, असे पोलिसांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी सुमारे तीस वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. आजपासून ही मोहीम व्यापक स्वरुपात करण्यात येणार असल्याचे संकेतही पोलिसांनी दिले असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आता शाळांजवळील वाहतूक कोंडी फोडण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे सोमवारी शाळेजवळची वाहने हटविण्यात आल्याने परिसरातील नागरिकानी समाधान व्यक्‍त केले.

वादावादीने रंगली चर्चा
रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई सुरू झाल्याने अनेकांनी यावेळी पोलिसांशी वाद घातला. यावेळी एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पतीनेही पोलिसांशी वाद घातल्याचे दिसून आले. या संदर्भात सहाय्यक निरीक्षक भाले यांनी नोंद केली असून, पोलिसांचेच नातेवाईक त्रास देऊ लागले, तर सामान्यांनाच का नियम दाखविले जातात, अशी चर्चा परिसरात सुरू होती.

वाहतूक नियोजनाची अपेक्षा
केंब्रिज शाळेपासून हाकेच्या अंतरावर इंदिरानगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी दररोज नाकेबंदीसाठी उभे असतात. त्यांनीही या शाळेच्या जवळील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले, तर त्याचा फायदा निश्चितच नागरिकांना होणार आहे. चौकात नाकेबंदीबरोबरच शाळा सुटताना व भरताना त्या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन इंदिरानगर पोलिसांनी केले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली आहे.

--
नागरिकांनी अनेक दिवसांपासून येथे होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत तक्रार केली होती. त्यामुळे आज येथे येऊन कारवाई केली आहे. भविष्यात वरिष्ठांशी चर्चा करून अशी वाहनेसुद्धा जप्त करण्यात येणार आहेत.
-सुरेश भाले, सहाय्यक निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसतोडीला लागेना मुहूर्त

$
0
0


सुनील कुमावत, निफाड

ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या निफाड तालुक्यातील निफाड व रानवड हे दोन्ही कारखाने बंद असल्याने तालुक्यातील हजारो एकर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. उसावर ज्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन अवलंबून आहे त्यांच्यासमोर या उसाचे करायचं काय? असा प्रश्न पडला आहे.

निफाड तालुक्यातील विशेषतः गोदाकाठ भागात उसाचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे या भागातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप उसाची तोड मिळाली नाही ते शेतकरी हवालदिल झाले आहेत. उसाचे रान मोकळे करून बऱ्याच शेतकऱ्यांना कांदे लागवड करायची आहे. मात्र तोड मिळत नसल्याने इतकडे ऊस वाळणे आणि त‌िकडे दुसरे पीकही घेता न येणे, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

मुकादम, मजुरांना पायघड्या

तालुक्यातील दोनही कारखाने बं असल्यामुळे संगमनेर, कोळपेवाडी, संजीवनी, कादवा, प्रवरा, कोपरगाव, लोणी अशा साखर कारखान्यांनी निफाड परिसरात आपली कार्यालये थाटले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली भावना खूप संताप आणणारी आहेत. काही कारखान्याचे उसतोडी करणाऱ्या टोळ्यांचे मुकादम ऊसतोडणी मजूर टोळी देण्यासाठी ८ ते १० हजार रुपये शेतकऱ्यांकडून घेतात. ही एक प्रकारची लाचच आहे. त्यांच्यावर संबंध‌ित कारखान्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मुकादमांना त्यांचा हिस्सा दिल्यानंतर मजुरांनाही ओल्या-सुख्या पार्ट्या द्याव्या लागतात. अन्यथा तुमच्या शेतात जायला रस्ता नाही, अडचणीचे आहे अशी विविध कारणे सांगून ऊसतोड मजूरही कामे लांबवणीवर टाकतात.

एक एकरला ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना १० ते १४ हजार रुपये खर्च येतो. हा आर्थिक भुर्दंड सहन केल्याशिवाय ऊसतोडणी होत नाही. कारखान्याच्या कर्मचाऱ्यापेक्षा मुकादमाला त्यामुळे ‘अच्छे दिन’ आले आहेत.

कारखाने बंद पडल्याने ही अवस्था

तालुक्यातील गोदाकाठ भागात सर्वाधिक ऊस लागवड क्षेत्र असल्याने तालुक्यात ‘निसाका’नंतर ‘रासाका’ उभा करण्यात आला. हे दोन्ही कारखाने तीन वर्षांपासून बंद आहेत. यावर्षी रानवड सुरू होण्याची आशा होती. मात्र फसवणूक झाल्याने ती फोल ठरली. एकेकाळी तालुक्यात या दोन्ही कारखान्यांना पुरवठा होईल एवढा ऊस पिकवला जात होता. आज देखील परिस्थिती जैसे थे आहे. क्षेत्रही तितकेच आहे. मात्र दोन्ही कारखाने बंद पडले आहेत.

ऊस तोडणी आली मुकादमच्या हातात

स्थानिक दोन्ही कारखाने बंद असल्यामुळे पर जिल्ह्यातील कारखान्यांनी तालुक्यातील उसाला मागणी केली आहे. त्यांच्याकडून योग्य भाव मिळत असला तरीही ऊसतोडणी मुकादमाच्या हाती गेल्याने मजुरांची टोळी सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. टोळीचा मुकादम जेथे सांगेल तेथे टोळी तोडणी करण्यासाठी जाते. ऊस तोडणीसाठी कारखान्याचा प्रशासकीय अधिकारी म्हणून स्लिप मास्तरची नियुक्ती केलेली असते. एकेकाळी स्लिप मास्तरचा शब्द अंतिम असायचा. मुकादम अथवा मजूर यांनी कोणतीही सबब न सांगता स्लिप मास्तर ज्या शेताची स्लिप बनवून मुकादमकडे देत असे त्याच शेतात टोळी जात असे. आत्ता मात्र मुकादम स्लिप मास्तर यांना न जुमानता जो शेतकरी आर्थिक देवाणघेवाण करतो त्याच्याच शेतात मजूर पाठवतो.

राजकारण्यांची चुप्पी

नाशिक व नगर जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात ऊस पिकविणारा तालुका म्हणून निफाड तालुक्याची परंपरा कायम होती. मात्र आता तालुक्यातील नेत्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव, गलिच्छ राजकारणामुळे तालुक्यातील दोन साखर कारखाने बंद पडले. आज ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी होत नसल्याने बांधावर बसून रडत आहे. मुकादम, मजूर यांच्याकडून त्यांची पिळवणूक होत आहे.


मजूर आणि मुकदामांच्या जाचाला ऊस उत्पादक कंटाळले आहेत. त्यांच्या अवास्तव मागण्या आणि ऊसतोडणी करताना होणाऱ्या मनमानीला आळा घालण्यासाठी तालुक्यातील राजकारन्यांनी कारखान्याच्या प्रशासकीय अधिकारी, चेरमन, संचालक मंडळ यांच्याशी चर्चा करावी.-विनायक शिंदे, ऊस उत्पादक



निफाड तालुक्यात १२०० ते १३०० हेक्टर क्षेत्रावरील ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्यातील कारखाने बंद असल्याने दुसऱ्या कारखान्यांना ऊस द्यावा लागत आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करून तालुक्यातील दोन्ही कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे.-अशोक कापसे, ऊस उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा विवेक धांडे राज्यात दुसरा

$
0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 'क' वर्ग या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत नामपूर (ता. सटाणा) येथील विवेक पंडित धांडे याने राज्यात दुसरा, तर मागासवर्गीयांत प्रथम क्रमांक मिळविला आहे. विवेक नामपूर येथील उन्नती माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक पंडित धांडे यांचा मुलगा आहे.

विवेकने नाशिक येथील मेट कॉलेजमधून मेकॅनिकल डिप्लोमा व शताब्दी इंजिनीअरिंग कॉलेजमधून डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. एमपीएससी परीक्षा हेच ध्येय ठरवून विवेकने पुणे गाठले आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. गेल्या दोन वर्षांत अनेक परीक्षा दिल्या; मात्र एकाही पूर्व परीक्षेत यश आले नाही. या अपयशाने खचून न जाता ठरवलेले ध्येय गाठायचेच या उमेदीने अभ्यास सुरू ठेवला आणि या वर्षी एमपीएससीच्या एकूण नऊ पूर्व परीक्षांत यश मिळवले. त्यातील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदासाठी सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ८) लागला.

लहान भावाचा आदर्श

बहुतांश जणांच्या यशामागे मोठ्या भावाचा आदर्श असतो. मात्र, विवेकच्या बाबतीत ही गोष्ट अगदी उलट आहे. लहान भाऊ अक्षय याने गेल्या वर्षी आयसीडब्लूएमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. लहान भावाकडून मिळालेली ही प्रेरणा विवेकच्या या यशात महत्त्वाची ठरली.

मी या यशाने भारावून गेलो आहे. क्लासेसपेक्षा सेल्फ स्टडीवर अधिक भर दिला. एवढ्यावरच न थांबता अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. माझ्या यशात लहान भाऊ अक्षय आणि आई-वडिलांचे मोठे योगदान आहे.

- विवेक धांडे, दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क)

विवेक लहानपणापासूनच हुशार आणि जिद्दी होता. त्याने मिळवलेल्या या यशाने आम्ही खूप आनंदी आहोत. आमचे नाव आमच्या दोन्ही मुलांनी रोशन केले आहे, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.

- पंडित व उषा धांडे, आईवडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images