Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘केंब्रिज’जवळ बेशिस्त वाहनचालकांना दणका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी रोडवरील केंब्रिज शाळा व गुरूगोविंद सिंग महाविद्यालयाच्या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोहिमच सुरू केली आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी पोलिसांनी येथे बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली असली, तरी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी वाहनचालकांनी याबाबत नाराजी व्यक्‍त केली आहे. आमची वाहने पार्किंगला जागा द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
इंदिरानगरमधील केंब्रिज शाळेसमोर कायमच वाहतुकीची कोंडी होत असते. याठिकाणी येणारे पालक किंवा विद्यार्थ्यांच्या खासगी वाहतुकीच्या गाड्या या सरळ रस्त्यावरच उभ्या करण्यात येत असल्याने रस्त्याला वाहनतळाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यावर कारवाई करण्यासाठी सोमवारी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्‍त अजय देवरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश भाले व कर्मचाऱ्यांनी याठिकाणी मोहीम सुरू केली. पहिल्या दिवशी नागरिकांचे रस्त्यावर वाहने उभी न करण्याबाबत प्रबोधन करून कारवाईही करण्यात आली. मात्र, सोमवारीही त्याठिकाणी पुन्हा रस्त्यावर वाहने उभी असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
यावेळी विद्यार्थ्यांची खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी जागेची मागणी केली. याबाबत शाळा प्रशासनाशी चर्चा करा, परंतु रस्त्यावर वाहन उभे केले तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा पवित्रा पोलिसांनी घेतल्याने अखेरीस या वाहनचालकांनी शाळा प्रशासनाबरोबर बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षणसंस्थांना नोटीस
या प्रकारानंतर पोलिसांनी केंब्रिज व गुरूगोविंद सिंग महाविद्यालयातील मुख्याध्यापक व प्राचार्य यांना कलम १४९ अन्वये नोटीस दिली आहे. शाळा व कॉलेज यांनी पालकांच्या वाहनांकरीता स्वमालकीच्या जागेत वाहनतळ करावे व रस्त्यावर वाहने उभी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल व अपघातास आपणास वैयक्‍तिक जबाबदार धरण्यात येईल अशी नोटीस देण्यात आली आहे. यामुळे आता या दोन्ही शैक्षणिक संस्था याबाबत काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही शैक्षणिक संस्थांमुळे रस्त्यावरच वाहनतळ होत असून पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यांसाठी अतिक्रमण निर्मूलन

$
0
0

धुळ्यात पांझरा नदीकाठी कार्यवाही

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पांझरा नदीकाठी दुतर्फा प्रत्येकी साडेपाच किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. हे काम प्रगतीपथावर असल्याने या रस्त्यांसाठी सोमवार (दि. ८) पासून उत्तरेकडील गणपतीपुळे ते ब्रिजकम बंधाऱ्यापर्यंतचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. याठिकाणी काही निवासी तर काही गुरांच्या गोठ्याचे अतिक्रमण होते. विशेष म्हणजे, हे अतिक्रमण निर्मूलन करताना कुठल्याही प्रकारचा विरोध स्थानिकांनी केला नाही कारण शहरातील विकासात यामुळे भरच पडणार आहे, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.

वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टिने दीर्घकालीन उपाययोजना म्हणून आमदार अनिल गोटे यांनी पांझरा नदीकाठी दोन्ही बाजूने रस्ते उभारण्याची संकल्पना मांडून त्यासाठी निधीही उपलब्ध करून घेतला. शिवाय हे काम महापालिका हद्दीत असले, तरी ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून व्हावे, अशी अटच त्यांनी या कामाच्या मंजुरीच्या वेळी ठेवली. यामुळे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून, या भागात असलेल्या २८ अतिक्रमणांचा प्रश्‍न होता. हे अतिक्रमण काढण्यासंबंधी संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. शिवाय या रस्त्यावरील अतिक्रमणाची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद भदाणे यांनी केली होती. त्यानुसार हे अतिक्रमण काढण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ जेसीबींसह डंपर व ट्रॅक्टर तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा रस्त्यावर उतरविला असून, हे अतिक्रमण काढून याठिकाणी नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. जनतेनही या अतिक्रमण निर्मूलनाला विरोध केला नाही, त्यामुळे प्रशासनानेही समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेचे बेगडी सोपस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणाची तयारी महापालिकेने सध्या फारच मनावर घेतलेली दिसते. लोकप्रतिनिधी कधी नव्हे, ते सकाळी कडाक्याच्या थंडीत घराबाहेर पडून स्वच्छता करून घेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत फिरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहेत. मात्र, बऱ्याचशा भागात लोकप्रतिनिधी निघून जाताच स्वच्छतेचे काम अर्धवट सोडून दिले जात आहे. त्यामुळे स्वच्छ नाशिक सुंदर नाशिकचे स्वप्न कितपत पूर्ण होईल, याविषयी प्रश्न उपस्थित होत आहे.
केवळ सर्वेक्षणापुरता स्वच्छतेचा बेगडी देखावा करण्यात येऊ नये, असे नागरिक म्हणू लागले आहेत. स्वच्छतेच्या सर्वेक्षणात गतवर्षी नाशिक महापालिका पिछाडीवर पडल्यामुळे यंदा परिस्थिती सुधारून महापालिका स्वच्छतेच्या बाबतील आघाडीवर यावी यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार कंबर घेतलेला दिसत आहे. नाशिक परिसरात इतकी अस्वच्छता आहे, की ती स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कडाक्याच्या थंडीतही घाम फुटू लागला आहे.

रस्तोरस्ती स्वच्छतेवर भर
सर्वेक्षण हे रस्त्यारस्त्यांनी होणार असल्याचे गृहित धरून रस्त्यांच्या स्वच्छतेवर भर दिलेला दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावरील दुभाजकांच्या जवळ वाढलेले गवत काढणे, दुभाजकाजवळील माती गोळा करून ती भरून नेणे, दुभाजक स्प्रे पंपांच्या साह्याने स्वच्छ धुणे, रस्त्यावरील धूळ झाडून ती गोळा करून वाहनातून वाहून नेणे, दगडगोटे, कचरा गोळा करणे अशी कामे सर्वच विभागांत दिसत आहेत. मात्र, ही कामे करताना कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जोमाने कामे करताना दिसतात. पण, लोकप्रतिनिधींची पाठ फिरताच हाती घेतलेले काम तसेच टाकून देण्यात येत असल्याचे दिसते.

शेकोट्या पेटल्याचे दृश्य!
प्रभागानुसार एक-एक दिवस स्वच्छतेवर लक्ष ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून केले जात आहे. नगरसेवक आपापल्या प्रभागातील स्वच्छतेवर लक्ष देऊ लागेल आहेत. सकाळपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेची पाहणी करीत कर्मचाऱ्यांना सूचना देण्याचे आणि त्यांच्या कामाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळ-दुपार-सायंकाळ याच मोहिमेचा धडाका लागलेला आहे. नियमित स्वच्छतेकडे केलेले दुर्लक्षामुळे शहरात अस्वच्छता असल्यामुळे ती साफ करण्यात कर्मचाऱ्यांचे चांगले हाल होत आहेत. रस्त्याच्या कडेला पडणारा कचरा ही या स्वच्छता मोहिमेतील सर्वांत मोठी समस्या दिसत आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा उचलण्यात येतो ना येतो तोच पुन्हा कचरा टाकला जात आहे. हा कचरा उचलण्याऐवजी तेथेच पेटवून देण्याचा पराक्रमही काही कर्मचारी करीत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला बऱ्याच ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दृश्य दिसते.

हागणदारीचे वास्तव उघड
सिन्नर फाटा ः हागणदारीमुक्त शहर म्हणून नाशिक घोषित झालेले असले, तरी प्रभाग १९ मध्ये प्रभाग समिती सभापतींच्या पाहणी दौऱ्यात सिन्नर फाटा परिसरात मुक्त हागणदारीच्या वास्तवाचे दस्तुरखुद्द महापालिका पदाधिकाऱ्यांनाच दर्शन होण्याची नामुष्की ओढावल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. मंगळवारी सकाळी नाशिकरोड प्रभाग समिती सभापती सुमन सातभाई यांनी प्रभाग १९ मध्ये पाहणी केली. या दौऱ्याप्रसंगी प्रभाग १९ चे नगरसेवक पंडित आवारे, जयश्री खर्जुल यांच्यासह विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, कार्यकारी अभियंता सतीश हिरे, उपअभियंता राजेश पालवे, स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, विद्युत विभागाचे विजय गायकवाड आदींसह पाणी, उद्यान, ड्रेनेज विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सिन्नर फाटा परिसरातील केळकरवाडी, गोदरेजवाडी, स्टेशनवाडी, चेहेडी या भागातील बहुतांश कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ते सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. मात्र, लोकसंख्येच्या प्रमाणात या सार्वजनिक शौचालयांची संख्या अगदीच नगण्य असल्याने या भागात उघड्यावर शौचविधीचे प्रमाण मोठे असल्याचे यावेळी आढळून आले. या दौऱ्याप्रसंगी नागरिकांनी सुचविलेली स्वच्छता, विद्युतविषयक कामे तात्काळ करण्याचे आदेश प्रभाग समिती सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रभाग स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छता विभागाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
----
भूखंडांची सफाई कशी?
सातपूर ः सातपूर भागात ४ जानेवारीपासून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी केंद्राची टीम येणार आहे. त्यासाठी सातपूर विभागात जोमाने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, या मोहिमेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोकळ्या भूखंडांचीदेखील सफाई केली जात आहे. वास्तविक मोकळ्या भूखंडांवर पडलेला कचरा उचलण्याची जबाबदारी संबंधित जागामालकाची असते. मालकाने घाण, कचरा उचलला नाही, तर त्यावर आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. परंतु, स्वच्छ सर्वेक्षणात आरोग्य कर्मचाऱ्यांकरवीच खासगी मोकळ्या भूखंडांवरील घाण, कचरा उचलला जात असल्याचे दिसून येत आहे. याप्रश्नी महापालिका आयुक्तांनीच लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. रोजच विविध भागात होणाऱ्या या मोहिमेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. पहाटे सहा वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत स्वच्छतेचे काम केले जात असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच वाढलेल्या भागात अतिरिक्त कर्मचारी नसल्याने एकाच कर्मचाऱ्याकडून स्वच्छता करण्याची वेळ येत असल्याने वाढीव आरोग्य कर्मचारी देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इमारतींच्या नियमितीकरणाचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या ६ ते ६.५ मीटर रुंदीच्या रस्त्यावरील इमारतींच्या नियमितीकरणाचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. नगर विकास विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेने ६ व ७.५ मीटर रुंदीच्या रस्त्यांवरील खासगी जागा ताब्यात घेऊन ते रस्ते ९ मीटरचे करण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला आहे. प्लॉटधारकांना एफएसआय त्याच जागेवर लोड करून नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार परवानगी देण्याचे धोरण अमलात आणले जाणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून त्यावर अंमलबजावणी होणार आहे; परंतु या प्रस्तावाला प्लॉटधारकांचा विरोध होण्याची शक्यता आहे.
शहरातील कपाट प्रकारात बांधकाम व्यावसायिकांनी एफएसआयचे उल्लंघन केल्यानंतर नवीन विकास नियंत्रण नियमावलीत ६ आणि ७.५ मीटर रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर अनुज्ञेय करण्यात आलेला नाही. त्यामुळे कपाटांचा प्रश्न अधिकच गुंतागुतीचा बनला होता. या निर्णयामुळे छोटे प्लॉटधारक अडचणीत सापडले होते. टीडीआर प्रकरणावरून शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी तसेच लहान प्लॉटधारकांनी आंदोलने करत, नियमावलीला विरोध केला होता. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकांचीही कोंडी झाल्याने सत्ताधारी भाजपचे आमदारही अडचणीत आले होते. क्रेडाईसह विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ६ आणि ७.५ मीटर रुंदीच्या रस्त्यांबाबतचा तिढा सोडविण्यासाठी साकडे घातले होते. त्यामुळे या प्रकरणातून मार्ग काढण्याचा प्रस्ताव शासन पातळीवर प्रलंबित आहे. हा प्रस्ताव प्रलंबित असतानाच, नगररचना विभागाने आता नियमावलीनुसार ६ आणि ७.५ मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि.१०) होणाऱ्या महासभेवर ठेवला आहे.
नगररचना विभागाच्या प्रस्तावानुसार, दाट लोकवस्तीच्या क्षेत्राबाहेर मंजुरी प्राप्त अभिन्यास क्षेत्रातील ६ आणि ७.५ मीटर रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. तात्पुरत्या मंजूर अभिन्यासातील ६ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी १.५ मीटर रुंदीकरण दर्शवून ९ मीटरपर्यंत रस्ता वाढविण्यात येणार आहे. सध्याच्या ७.५ मीटर रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी ०.७५ मीटर रुंदीकरण दर्शवून ९ मीटरपर्यंत रस्ते रुंद करण्यात येणार आहेत. रस्त्याच्या नियमित संरेषेमुळे किंवा ९ मीटरपर्यंत रुंदीकरण करताना बाधित होणारे खासगी मालकीच्या भूखंडाचे क्षेत्र महापालिका सदर जागा मालकाबरोबर कराराद्वारे संपादन करणार करेल, तसेच सदर क्षेत्र संपादनाच्या मोबदल्यास संबंधित जागामालकास केवळ एफएसआयच्या स्वरुपातच मोबदला मिळणार आहे. जागा मालकास संबंधित एफएसआय जागेवर वापरता येणार असला तरी, त्या जागेच्या बदल्यात टीडीआर किंवा रोखीने मोबदला मात्र मिळणार नाही. त्यामुळे प्लॉटधारकांचा या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे.

भाजपची कोंडी
६ व ७.५ मीटर रस्त्यावरील टीडीआरचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असतानाच, महापालिकेच्या नगररचना विभागाने रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवल्याने शासनाकडून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. प्रस्तावातील त्रुटींमुळे प्लॉटधारकांचा या प्रस्तावाला विरोध होण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील बंगलेधारकांकडून प्रस्तावाला फारसे सहकार्य होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात लहान प्लॉटधारक एकवटण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून या प्रस्तावाला तीव्र विरोध होण्याची शक्यता असून, भाजपची या प्रकरणात कोंडी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी जुमानेतना!

$
0
0

आयुक्तांचे विनंतीपत्र धुडकावले; घरपट्टीचे उर्वरित कर्मचारीही पळवले

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकीत ७५ कोटींच्या वसुलीसाठी अॅक्शन प्लॅन तयार केला असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने कर संकलन व मूल्य निर्धारण विभागाचे कर्मचारीच बीएलओसाठी पळवले आहेत. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांत वसुलीचे उद्दिष्ट कसे गाठायचे असा सवाल करीत आयुक्तांनी कर्मचारी परत देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने आयुक्तांना पुन्हा डिवचत घरपट्टी विभागातील उर्वरित १९ कर्मचारीही पळवले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेतील शीतयुद्धाची चर्चा असून, दोघांच्या भानगडीत पालिकेच्या वसुलीचा गाडा रुतला आहे.

महापालिकेने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १०५ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्टे ठरवले असून, नऊ महिन्यांत ६२ कोटी ६३ लाख रुपये वसुली झाली आहे. अजूनही ४३ कोटी वसुली होणे बाकी आहे. पाणीपट्टीचे उद्दिष्टे ४२ कोटी असून, त्यापैकी २७ कोटी रुपये वसूल झाले आहेत. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचीही शिल्लक दहा कोटींची वसुली करायची आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत जवळपास ७५ कोटींची वसुली करण्याचे आव्हान विविध कर संकलन विभागासमोर आहे. त्यासाठी महापालिकेने दोन हजार रुपयांच्या वर थकबाकी असलेल्या ८८ हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे.

पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या ६७ हजार ग्राहकांना नोटिसा काढून थकबाकी वसुलीचे काम सुरू करण्याचा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. परंतु, या प्लॅनला जिल्हाधिकारी कार्यालयाने दृष्ट लावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेच्या घरपट्टी विभागातील १२२ कर्मचाऱ्यांपैकी १०३ कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून नियुक्ती केली आहे. यासाठी महापालिकेची परवानगी न घेताच परस्पर त्यांच्यावर निवडणूक मोहिमेची जबाबदारी टाकली आहे. घरपट्टी विभागाकडे अगोदरच कर्मचाऱ्याचा तुटवडा असताना उर्वरित कर्मचारीही पळविल्याने आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहून घरपट्टी विभागाचे कर्मचारी परत देण्याची मागणी केली होती. इतर विभागाचे कर्मचारी घ्या, पण घरपट्टीचे घेऊ नका अशी विनंती पत्राद्वारे केली होती. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने कर्मचारी परत करणे तर सोडाच या विभागात उरलेल्या १९ कर्मऱ्यांची पुन्हा बीएलओ म्हणून ऑर्डर काढून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

आयुक्तांपुढे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान

कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पुढील दोन ते तीन महिने त्यांच्याकडे निवडणुकीचे काम सुरू असणार आहे. त्यामुळे या काळात वसुली ठप्प होणार आहे. तीन महिन्यांत ७५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्टे गाठायचे कसे असा प्रश्न विभागातील अधिकाऱ्यांना पडला आहे.

अडचणीत आणण्याचा प्रयत्न

राज्य सरकारने अगोदरच घरपट्टी व पाणीपट्टीची शंभर टक्के वसुलीचे फर्मान काढले असून, वसुलीत अपयश आल्यास थेट आयुक्तांच्या सर्विस बुकमध्ये त्याची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे वसुलीची थेट जबाबदारी असल्याने आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. परंतु, दोघा अधिकाऱ्यांमध्ये अगोदरच कशावरून तरी वाद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात मुद्दाम आयुक्तांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन उपोषणकर्त्यांचे घटले वजन

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा मर्चटस् को. ऑप. बँकेने सन २००४ मध्ये बॉण्डमध्ये गुंतवणुकप्रकरणी माजी संचालकांनी सोमवारपासून उपोषणास सुरू केले आहे. मंगळवारी सायंकाळी बागलाणचे प्रातांधिकारी प्रवीण महाजन यांनी उपोषणार्थीची भेट घेत उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र उपोषणार्थी आपल्या निर्णयावर ठाम असल्याने दुसऱ्या दिवशी कडाक्याच्या थंडीतही उपोषण सुरूच आहेच.

सटाणा मर्चटस् को. ऑप बँकेतील दोषी संचालकांवर कारवाई होणे अपेक्षित असतांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी निर्णयास स्थगिती देवून अर्जदारांवर अन्याय केल्याची बँकेच्या आजी-माजी संचालकांनी थेट आरोप करित उपोषण सुरू केले आहे.

मंगळवारी उपोषणाच्या दुसरा दिवस असतांना उपोषणस्थळी विविध मान्यवरांनी भेटी दिल्यात. सायांकाळी उशिरा बागलाणचे प्रातांधिकारी महाजन यांनी उपोषणस्थळी चर्चा केली. त्यांच्या भावना समजून घेत शासनाच्या वतीने त्यांना उपोषण मागे घेण्याची देखील विनंती केली. मात्र उपोषणकर्ते आपल्या मुद्यावर ठाम होते. या उपोषणात विद्ममान संचालक डॉ. व्ही. के. येवलकर, माजी संचालक यशवंत येवला, झिप्रु अमृतकर, शामकांत बागड, श्रीकांत येवला, विजय भांगडीया, मंगला मेणे यांच्यासह निवृत्त अधिकारी डी. व्ही. कापुरे, व राजेंद्र अमृतकर यांचा समावेश आहे.

वैद्यकीय तपासणी

उपोषणकर्त्यांमधील बँकेचे माजी संचालक झिप्रु अमृतकर व शामकांत बागड यांना मुधमेहाचा त्रास असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचे वजन घटल्याचे समोर आले. त्यामुळ दोघांवर उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान मालकी जमिनी पुन्हा ऐरणीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

देवस्थानने दिवाबत्तीसाठी दिलेल्या जमिनींवर कसणाऱ्या शेतकऱ्यांचा मालकी हक्क प्रस्थापित होऊ शकतो का, या प्रश्नी कायदेशीर चौकशी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. देवस्थानांच्या ताब्यातील जमिनींचा मुद्दा प्रशासनाकडून ऐरणीवर घेतला गेल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिक तालुक्यातील ज्या गावांतील जमिनींच्या रेकॉर्डवर नाशिकमधील देवस्थानांची नावे आहेत त्या ज‌मिनींवरील संबधित देवस्थानांची नावे कमी करण्याच्या मागणीसंदर्भात विभागीय आयुक्त झगडे यांच्याकडे महत्त्वाची बैठक झाली. यात विभागीय आयुक्तांनी संबंधित शेतकरी आणि देवस्थानांचे विश्वस्त यांची बाजू ऐकून घेत कायदेशीर चौकशी करण्याचे आदेश दिले.

तालुक्यातील बेलदगव्हाण, विहितगाव, तिरडशेत, टाकळी, मनोली आणि शिंगवे बहुला या गावांमधील सुमारे २११ हेक्टर व ९७ आर जमिनी नाशिकच्या व्यंकटेश देवस्थानच्या ताब्यात आहेत. तशी नोंद या जमिनींच्या इनामवर्ग तीन आणि भोगवटादार दोनमध्ये आहे. बेलदगव्हाण या गावाच्या शिवारातील जमिनींवर बालाजी देवस्थानचे नाव आहे. १९७३ सालच्या तत्कालीन शासकीय परिपत्रकाचा आधार घेत या जमिनींवर या देवस्थानांनी आपले नाव लावलेले असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांना या मागणीचे लेखी निवेदन दिले. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत सबंधित शेतकरी व देवस्थानांचे विश्वस्त यांची महत्त्वाची बैठक विभागीय आयुक्तालयात झाली. बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, सहाय्यक आयुक्त उन्मेष महाजन, प्रांत नीलेश सागर, तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्यासह शेतकरी निवृत्ती अरिंगळे, संजय हांडोरे, संजय कोठुळे, सुनील धुर्जड, शिवाजी हांडोरे, विलास धुर्जड, बाबुराव मोजाड, दिनकर पाळदे, आबा बोराडे, सचिन ठाकरे, एकनाथ शिंदे, विक्रम कोठुळे आदींसह संबंधित देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.

यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष
जमिनींवर व्यकंटेश आणि बालाजी या दोन देवस्थानांची नावे आहेत. शेतकऱ्यांना या जमिनींची विक्री करणे, अकृषक करणे कर्ज काढणे, जमिनी विकसित करणे अशा कामांसाठी संबंधित देवस्थांनांची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. गावांमधील शेतकऱ्यांकडून त्यांच्या जमिनींवरील संबंधित देवस्थानांची नावे वगळण्याची मागणी शासनदरबारी काही वर्षांपूर्वी केलेली आहे.

तालुक्यातील काही गावांतील जमिनींच्या रेकॉर्डवर इतर अधिकारात नाशिकमधील काही देवस्थानांची नावे लागलेली आहेत. परंतु, या जमिनी प्रत्यक्षात स्थानिक शेतकऱ्यांच्या कब्जात आहेत. या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. या जमिनींच्या रेकॉर्डवरील संबंधित देवस्थानांची नावे दूर होणे आवश्यक आहे.
- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावडे दाम्पत्यासह १२ जणांविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मारहाण आणि मालमत्तचे नुकसान केल्याप्रकरणी विभागीय महसूल आयुक्तालयाचे उपायुक्त रघुनाथ गावडे, त्यांच्या पत्नी रुपाली आणि इतर १० ते १२ जणांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे महसूल खात्यात खळबळ उडाली असून, विनयभंगाच्या एका प्रकारानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक झाली नसून, सध्या चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

लिलाबाई देवराम कांदळकर (६२, रा. गोशिबा गार्डन, फ्लॅट क्रमांक १, स्वप्निल पार्कशेजारी, टिळकवाडी) असे फिर्याद देणाऱ्या वृद्ध महिलेचे नाव आहे. फिर्यादी कांदळकर आणि त्यांची सून रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी असताना संशयित आरोपी किरण चेवले, सीमा (पूर्ण नाव नाही) तसेच नऊ ते दहा अनोळखी महिला आणि पुरूषांनी कांदळकर यांच्या घरात प्रवेश केला. उपायुक्त रघुनाथ गावडे तसेच त्यांच्या पत्नी रुपाली यांच्या सांगण्यावरून सर्व संशयित आरोपींनी घरात प्रवेश केल्याचे कांदळकर यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संशयित आरोपींनी कांदळकर सासू-सुनेला घराबाहेर काढून घरातील कपाटात ठेवलेले २० हजार रुपये, एक जोड सोन्याचे कर्णफुले वेलासह, मुलाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, चार ते पाच हजार रुपये आत असलेले एक पाकीट, तीन घड्याळ, एक मोबाइल आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर असा मुद्देमाल काढून नेला. यावेळी संशयित आरोपींनी दोघींना दमदाटी करीत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी कलम ४५२, ३२३, ३२७, १०९, १४१, १४३, ४२७ तसेच ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक रोहकले करीत आहे. या गुन्ह्यात अद्याप संशयितांना अटक झाली नसून, चौकशी सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

विनयभंग फिर्यादीनंतर हल्ला
फिर्यादी लिलाबाई कांदळकर यांचा मुलगा विजय कांदळकर (३७) याच्याविरोधात शनिवारी (दि. ६) सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगासह पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. कांदळकर राहतो या ठिकाणापासून एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला धमकी देण्याची फिर्याद संबंधित मुलीने दिली होती. या प्रकारातून कांदळकर कुटुंबीयांवर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असून, पोलिसांच्या तपासात या बाबी स्पष्ट होतील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात ३१ हजार नवमतदारांची नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाने राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेनंतर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी बुधवारी (दि. १०) प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यात या मोहिमेंतर्गत नव्याने ३० हजार ६६० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४२ लाख ९७ हजार ५२२ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात १ ते १५ नोव्हेंबर या काळात नवमतदार नोंदणी मोहीम राबव‌िली जाणार होती. परंतु, प्रतिसादाअभावी त्यास दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. या मोहिमेत ‘बीएलओं’नी जिल्हाभरात चांगला प्रतिसाद दिला. तब्बल चार लाख ९० हजार ५७५ गृहभेटी करण्यात आल्या. नवमतदारांचे नाव नोंदव‌िणे, मृत व्यक्तींची नावे कमी करणे, पत्ता बदलणे, नाव किंवा पत्ता यांमध्ये काही दुरुस्त्या असतील तर त्या करणे अशा स्वरुपाच्या नोंदी करण्यात आल्या. बीड जिल्ह्याने पाच लाख ४९ हजार २३७ गृहभेटी करून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नाशिक दुसऱ्या स्थानावर आहे. चार लाख ९० हजार २६३ गृहभेटी पूर्ण करून सोलापूरने तिसरे स्थान पटकावले आहे. या मोहिमेमध्ये प्राप्त अर्ज डिसेंबर अखेरपर्यंत आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार डिसेंबरअखेर सर्व अर्ज अपलोड करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४२ लाख ९७ हजार ५२२ पर्यंत पोहोचली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक जागृती साक्षरता क्लबद्वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मतदान प्रक्रियेबाबत‌ जनजागृती व्हावी आणि सर्वच निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने जिल्ह्यात १,२९७ निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले आहेत. या क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध स्तरातील सुमारे ७,८०० व्यक्ती मतदान जनजागृतीच्या कार्यात सक्रिय झाल्या आहेत.

नववी ते बारावीचे विद्यार्थी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात. त्यांच्या शाळा आणि कनिष्ट महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता क्लब कार्यान्वित केला आहे. त्यामध्ये शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी नोडल अधिकारी असून पाच विद्यार्थी सदस्य आहेत. कॉलेजमध्ये प्राध्यापक किंवा प्राध्यापकेतर कर्मचाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली असून पाच विद्यार्थी सदस्य आहेत. जेथे शाळा किंवा महाविद्यालये नाहीत, अशा झोपडपट्टी, वाड्या आणि वस्त्यांवर निरक्षर किंवा अल्पशिक्षित मतदारांसाठी चुनावी पाठशाला हा उपक्रम सुरू केला आहे. तेथे बीएलओ (बुथ लेवल ऑफिसर) हाच नोडल अधिकारी असून त्या-त्या परिसरातील पाच व्यक्तींना सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे. तर विविध कार्यालये, धार्मिक संस्था, सामाजिक संस्था व तत्सम सर्वच ठिकाणी मतदार जनजागृती फोरमची स्थापना करण्यात आली असून तेथील प्रमुखांना नोडल अधिकारी नेमले आहे.

जनजागृतीचे साहित्य निवडणूक विभागाकडून
मतदारांची जनजागृती करणे, निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या सुधारणांची माहिती विविध घटकांपर्यंत पोचण्याची जबाबदारी बीएलओ अधिकारी आणि सदस्यांची असणार आहे. या सर्वांची माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली आहे. त्यांचे जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेण्यात येणार असून जनजागृतीचे साहित्य निवडणूक विभागाच्या वतीने पुरविण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार शांताराम पवार यांनी दिली.

चार प्रकारात क्लब
जिल्ह्यात ४,२२८ मतदान केंद्र असून त्यापैकी ३० टक्के म्हणजे १,२९७ क्लबची स्थापन करण्यात आली आहे. यात शहरातील चार मतदार संघातील ३३० केंद्र आहेत. जिल्ह्यात चार प्रकारांत या क्लबची विभागणी केली आहे. भविष्यातील मतदार, नव मतदार, चुनावी पाठशाला आणि मतदार जनजागृती फोरम अशा चार प्रकारांत हा क्लब कार्यान्वित आहे. सुरुवातीला मतदान केंद्रांच्या एकूण संख्येपैकी ३० टक्के केंद्रांवर हा क्लब स्थापन करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्गांवर वाहनांचा भार

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) मागील नऊ महिन्यात तब्बल ८१ हजार नवीन वाहनांची भर पडली आहे. शहरासह या विभागात येणाऱ्या उर्वरित तालुक्यांमध्ये डिसेंबर अखेर वाहनांची घनता १६ लाखांपर्यंत पोहचली असून, वाहने रस्त्यावर उतरण्याचा वेग गत वर्षीपेक्षा वाढला आहे.

नाशिक ‘आरटीओ’त नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, येवला, निफाड, सुरगाणा, चांदवड, पेठ, दिंडोरी या तालुक्यांचा तर मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागातंर्गत मालेगाव, कळवण, सटाणा, देवळा आणि नांदगाव या तालुक्यांचा समावेश होतो. नाशिक ‘आरटीओ’त एप्रिल ते डिसेंबर या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये ८१ हजार २६४ नवीन वाहनांची नोंदणी झाली. मार्च २०१७ मध्ये या तालुक्यांमध्ये वाहनांची एकूण घनता १४ लाख ६३ हजार ५८२ इतकी होती. डिसेंबर २०१७ पर्यंत भर पडलेल्या नवीन वाहनांच्या संख्येमुळे आता हा आकडा १५ लाख ४४ हजार ८४६ इतका झाला आहे. गत वर्षीच्या तुलनेत वाहन खरेदीचा वेग वाढलेला दिसतो.

मालेगाव उपप्रादेशिक कार्यालयात याच दरम्यान २० हजार १५९ वाहनांची नोंदणी झाली. यात सर्वाधिक प्रमाण दुचाकींचे (१६ हजार ३७७) असून, त्याखालोखाल ट्रॅक्टरची (१ हजार २१६) विक्री झाली आहे. २०१६ मध्ये याच वर्षी सदर विभागात १४ हजार ८३९ दुचाकींची तर ९९१ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. नाशिक विभागातही नवीन वाहने खरेदीचा जोर वाढला असून, २०१६ मध्ये नोंदणी झालेल्या ७९ हजार १८० वाहनांच्या तुलनेत २०१७ मध्ये ८१ हजार २६४ नवीन वाहनांची नोंदणी झालेली दिसते.

दुचाकी खरेदीकडे ओढा

दुचाकी खरेदीकडे ग्राहकांचा ओढा अधिक आहे. मागील नऊ महिन्यांच्या काळात तब्बल ६२ हजार १९ दुचाकी रस्त्यावर आल्या. यात शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांचा सर्वात जास्त भरणा असल्याचे सूत्रांनी सांगितले. आर्थिक, पार्किंग तसेच घरातील सर्व सदस्यांच्या उपयोगाच्या दृष्टीकोनातून दुचाकींचा वापर केला जातो. ग्रामीण भागातही दळणवळणासाठी दुचाकी हा चांगला पर्याय असल्याने त्यास मागणी वाढते आहे.

अशी झाली वाहन नोंदणी

वाहन…मार्चपर्यंतची वाहने....नोंदणीकृत वाहने....डिसेंबरअखेर वाहन घनता
- दुचाकी...१०,८८,६०९....६२,०१९....११,५०,६२८
- कार...१,५५,०४१....११,७९७....१,६६,८३८
- जीप...२६,३८०....१४....२६,३९४
- टॅक्सी...२,०९५....१९....२,११४
- टुरिस्ट कॅब...३,६७१...१०७....३,७७८
- अॅटोरिक्षा...२१,८०३...६१३...२२,४१६
- स्टेज कॅरीएजेस...९५०...२९...९७९
- मीनी बस...१,५३८...३६...१,५७४
- स्कूल बस...९४५...२२२...१,१६७
- खासगी सेवा वाहने...२०३...१...२०४
- अॅब्युलन्स...६४१....२०....६६१
- ट्रक....१२,८८१....२३०१...१,५१८२
- टँकर....८३९....०....८३९
- डिलेव्हरी व्हॅन(तीन चाकी)...३,०६१२...५६३....३१,१७५
- डिलेव्हरी व्हॅन (चारचाकी).....१,३५९०....३१२...१३,९०२
- टॅक्टर...६८,९९६...१,३८९....७०,३८५
- ट्रेलर...२८,७३८....१,७०५...३०,४४३
- इतर...६,०५०....११७...६,१६७
- एकूण....१४,६३,५८२....८१,२६४....१५,४४,८४६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. पाटील यांना अटकपूर्व जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सचिन पाटील यांना मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मंगल पवार यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलिसांनी डॉ. पाटील यांच्यासह इतरांविरोधात कलम ३०६ प्रमाणे गुन्हा नोंदवला होता.

मृत्यू झालेली व्यक्ती सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे काम करीत होती. काही दिवसांपूर्वी त्याने तेथील काम सोडले. त्या व्यक्तीविरोधात हॉस्पिटलमधील प्रवीण सावंत यांची दुचाकी चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर डॉ. पाटील व इतरांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून मंगल पवार यांच्या मुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल झाला. संशयितांच्या वतीने अॅड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद करीत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे दाखवणारे कोणतेही पुरावे नाही आणि संशयितांना पोलिस कोठडीत डांबून ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. हा युक्तिवाद मान्य करीत न्या. साधना जाधव यांनी डॉ. पाटील यांना अटकपूर्व जमीन मंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आसारी जपतेय पैठणी अन् पतंगाशी नातं

$
0
0

संजय लोणारी, येवला:

आज स्पर्धेच्या युगात, धकाधकीच्या जीवनात माणसा माणसातील माणुसपणाचा धागा काहीसा अस्तव्यस्त होत चालला असताना, दुसऱ्या बाजूला निर्जीव असुनही एकप्रकारे सजीवतेचं लक्षण तिनं जपलं आहे अगदी वर्षानुवर्षांपासून...काठापदरासह इंच अन् इंच जागी फुललेल्या व खऱ्या अर्थाने सजलेल्या भरजरी, जरतारी जगप्रसिद्ध पैठणीशी जसं तिचं नातं जुळलं आहे, तसंच हवेत उंचच उंच भरारी घेणाऱ्या पतंगाशीदेखील. पैठणी अन् पतंगाशी जिव्हाळ्याचं नातं आजही घट्ट ठेवणारी ती दुसरी तिसरी कुणीही नसून, ती आहे बांबूच्या लाकडापासून आकारास आलेली येवल्याची ‘आसारी’. येवला ब्रँडेड ही ‘आसारी’ आजही पैठणीचा रेशमी ‘धागा’ आणि पतंगाचा ‘मांजा’ यांच्यातील जुळलेले बंध जपत आहे.

तीन अक्षरी शब्द असलेल्या ‘आसारी’ने वर्षानुवर्षांपासून येवलेकरांशी कधीही न तुटणारे अतूट असे नाते निर्माण केले आहे. नव्हे तर आसारी या तीन अक्षरी शब्दाने स्त्री मनाला भुरळ घालणाऱ्या व जगप्रसिद्ध पैठणी निर्मितीसाठी हातमागावर अपार कष्ट घेणाऱ्या येवल्यातील विणकर बांधव आणि परंपरा जोपासणाऱ्या पतंगवेड्या येवलेकरांशी आजही घट्ट असे बंध जुळवले आहे. पैठणीचं रुपडं खुलविणारा रेशीम धागा पैठणी विणकाम होणाऱ्या हातमागावर चढण्यापूर्वी जसा आसारीवर उकलला जातो, त्याचप्रमाणे पतंगवेड्या येवलेकरांच्या हातातील पतंग हवेत नेणारा मांजा हा याच आसारीवर गुंडाळला जातो. पैठणी...येवलेकर....पतंग यातील महत्त्वाचा घटक बनलेली ही ‘आसारी’ मकरसंक्रांतीला येवल्यातील प्रसिद्ध पतंगोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आकर्षणाचा विषय ठरली आहे. कष्टकरी बुरूड समाजाच्या मोठ्या कष्टातून आकार घेणारी, साकारणारी ही आसारीने यंदा शहरातील बुरुड गल्ली फुलली आहे.

>>बुरुड गल्ली फुलली

पतंग उडविण्यासाठी येवला व्यतिरिक्त इतर सर्वच ठिकाणी हा रीळ वापरला जातो. हा रीळ वापरताना पतंग उडविणाऱ्याला आपल्या हाती ‘मांजा’ अर्थातच पतंगाचा दोरा धरावा लागतो, तर त्याच्या सोबतच्या सहकाऱ्याच्या हाती असतो रीळ. या सर्वच बाबतीत पतंग उडविताना मोठे कष्ट पडतात. मात्र, येवल्यात तयार झालेली ही आसारी पतंगप्रेमींचे काम अगदी सोपे करते. या आसारीच्या सहायाने पतंगप्रेमी एकट्यानेच आसारी हाती धरत पतंग वर वर भिरकावतो. कधी ढील देत, तर कधी भरभर आखडताना पतंग काटाकाटीचा खेळ रंगतो. येवल्यातच बनलेली, नव्हे तर अस्सल येवला ब्रँड असलेली ही ‘आसारी’ येवला शहरातील बुरुड समाजातील कारागीर बांबुपासून तयार करतात. ही आसारी तयार करण्यासाठी खास कोकणातील ‘चवली’ व ‘बाटमानी’ जातीचा बांबू वापरला जातो. शहरातील बुरुड गल्लीतील खैरे, सोनवणे परिवारातील जवळपास आठ ते दहा कुटुंब ही आसारी बनविण्याचे काम अनेक पिढ्यांपासून करत आहेत.

>>पाच दिवसांवर आला सण

शेकडो वर्षांपूर्वी येवला शहरात पैठणी साडी निर्मितीस प्रारंभ होताना पैठणी विणकामासाठी लागणारा रेशीम उकलण्यासाठी ही आसारी वापरली जात. तेव्हापासून हे बुरुड समाजबांधव आसारी निर्मितीचे काम करतात. पैठणीतील दुवा बनलेली हीच आसारी पुढे अनेक वर्षांपासून पतंगाची साथीदार बनली आहे. अवघ्या पाच दिवसांवर मकरसंक्रांत आली आहे. या संक्रांतीनिमित्त रंगणाऱ्या पतंगोत्सवासाठी ही ‘आसारी’ खरेदी करण्याकरिता यंदाही पतंगप्रेमींची पावले बुरुड गल्लीच्या दिशेने पडत आहेत.

>>रेशीमबंध असे जुळती

मकरसंक्रांतीच्या पतांगोत्सवात पतंगवेड्या प्रत्येक येवलेकरांच्या हाती दिसणाऱ्या ह्या आसारीचे पैठणीशी जुळलेले रेशीमबंध शेकडो वर्षांपासूनचे आहे. हातमागावर पैठणी साकारण्यापूर्वी तिच्या निर्मितीसाठे वापरले जाणारे रेशीम हे या आसारीवरूनच उकलले जाते. रेशमाचे विविध रंगात रंगारी बांधवामार्फत रंगकाम झाल्यावर पुढे रेशमाची ही गुंडी अन् तिच्यातील धागा हा या आसारीवरच व्यवस्थित गुंडाळला

जातो. हाच धागा पुढे छोटया रिळावर चढतो. पुढे तो हातमागावरील इकडून तिकडे फिरणाऱ्या धोट्यासरशी गुंफला

जावून स्त्रीमनाला भुरळ घालणारी भरजरी, जरतारी पैठणी तयार होते. रेशीम उकलण्यासाठी आज शहरातील काही पैठणी विणकरांनी मश‌निचा वापर सुरू केला असला तरी, रेशीम उकलण्यासाठी आसारीचा वापर अनेक ठिकाणी होताना दिसतो.

>>३० ते ५० रुपयांची वाढ

येवल्यात अनेक पाती आसारी बनविल्या जात असल्या तरी विशेषतः सहा व आठ पाती आसरींना यंदा अधिक मागणी दिसत आहे. बांबूच्या किंमतीत झालेली वाढ, ‘जीएसटी’ यातून साहजिकच येवला ब्रँड आसारीची किंमत देखील यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत वाढली आहे. आसारीसाठी वापरला जाणारा ‘चवली’ बांबू गतवर्षी ७० ते ८० रुपयाला होता. यावर्षी तो ९० ते १०० रुपये झाला आहे. तर बाटमानी बांबूच्या किमतीतही यंदा २० रुपयांनी वाढ झाली आहे.

>>असा घेते आकार

बुरुड गल्लीत आसारी मिळते. एरवी वर्षभर बांबूपासून पाट्या, टोपले, सुपले तयार करणारे बुरुड बांधव संक्रात तोंडावर आली की दोन महिने अगोदरपासून आसारी तयार करण्यात गुंततात. विशेषतः खास कोकणातील सिंधुदुर्ग, कुडाळ आदी ठिकाणाहून मागविण्यात आलेल्या चवली, बाटमानी व फरसमानी या बांबूपासून ही आसारी आकारास येते. लहान व मोठ्या आकारातील सहा, आठ व बारा पाती बाजारात विक्रीस येते. या आसरीवर खास तयार केलेला मांजा गुंडाळून येथील पतंगप्रेमी मकरसंक्रांतीच्या तीनही दिवस पतंग उत्सवाची धूम करतात.

>>चिमुकल्यांसाठी बनवली ‘आसारी’

अगदी छोट्या आकारातील आसारी बनविणे म्हणजे अवघड काम. मात्र, येवल्यातील बाबुराव खैरे यांनी यंदा चिमुकल्यांना हातात धरता येईल अशी छोटी आसरीदेखील बनवली आहे. विशेष म्हणजे अगदी लहानशी असूनही खैरे यांनी ही आसारी सहा व आठ पातीमध्ये बनविण्याची किमया केली आहे. या इवल्याशा आसारीची किंमत ४०० ते ५०० रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विंदांच्या कवितांची ‘स्वच्छंद’ पर्वणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘माझ्या मना दगड बन’, ‘तेच ते’, ‘चेडवा ये गो माझ्या घरी’, ‘नाचा भावय’ ‘मुक्ती मधले मोल हरवले’, ‘माळ्यावरचा ट्रंक’ या विंदांच्या महत्त्वाच्या कवितांच्या संगीतबद्ध वाचनाची पर्वणी मंगळवारी नाशिककरांना लाभली. निमित्त होते गो. वि. तथा विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या समग्र साहित्य निर्मितीचे दर्शन घडविणाऱ्या ‘स्वच्छंद’ कार्यक्रमाचे. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात झाला. विंदा करंदीकरांच्या कविता, बालकविता, काही चार ओळी तसेच काही लघुनिबंधाचे वाचन करण्यात आले. प्राचीन ओव्यांचे रूपांतर अर्वाचिन साहित्यात करण्यात विंदा यांचे योगदान आहे. ‘साठीची गझल’ देखील रसिकांची दाद घेऊन गेली. भारतीय मराठी साहित्याचे विरुपीकरण करणारी ‘विरुपिका, ‘कर कर करा-मर मर मरा’ या कविता वाचून दाखविण्यात आल्या. ‘राजा लिअर’मधील जाते प्रसंग, शेक्सपीअरच्या मूळ संहितेमध्ये पंचखंडी आहे. विंदांनी त्याचे चतुष्खंडी मुक्तछंदात भाषांतर केले आहे. या भागाचे यावेळी वाचन करण्यात आले. लघुनिबंधामधला ‘आम्रयोग’ याचेही अभिवाचन करण्यात आले. अमृतानुभवातल्या ओव्या, आततायी अभंग, गणेश स्तवन मानवांनो आत या रे या कविता संगीतबद्धरित्या सादर करण्यात आल्या. विंदांनी अष्टदर्शने मधून सात युरोपिय तत्त्वज्ञ आणि भारतीय तत्त्वज्ञ चार्वाक यांचे घडवलेले दर्शन वाचनातून यथार्थपणे घडविण्यात आले.

‘स्फूर्तीदाता जगत्कर्ता विघ्नहर्ता गजानना’ या ओळीने विंदांना कवी असल्याचा आत्मविश्वास जागवून दिला. त्यानंतर वसंतविकास हे टोपणनाव घेऊन त्यांनी लिखाण केले. ‘माझ्या कवितेतील वाटचाल’ या लेखातील काही उतारे यावेळी वाचून दाखविण्यात आले.

विजया राजाध्यक्ष यांनी घेतलेल्या विंदांच्या दीर्घ मुलाखतीतील काही वाक्ये यावेळी वाचून दाखविण्यात आली. विंदांच्या ‘चेडवा ये गो माझ्या घरी’ या मालवणी कवितेने कार्यक्रमात रंगत आणली. प्रारंभी मान्यवर कलाकारांचे स्वागत प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी केले. लोकेश शेवडे यांनी सूत्रसंचालन केले. तर वामन पंडित यांनी स्वच्छंद कार्यक्रमाचे निवेदन केले. कार्यक्रमाचे सादरीकरण वामन पंडित, माधव गावकर, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर, जाई फराकटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४७४ इमारतींना नोटिसा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुंबईतील आगीच्या घटनेनंतर राज्यातील मुख्य शहरांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजनांकडे शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यातील गुंतागुंतीच्या शहरांमध्ये मालेगाव शहराचाही वरचा क्रमांक लागतो. मात्र मालेगावातील बहुसंख्य शासकीय इमारती, सिनेमागृह, रुग्णालय, पोलिस ठाण्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून फायर ऑडिटच न केल्याची धक्काधायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे गेल्या ९ दिवसांत शहरातील ४७४ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शहरातील विविध शासकीय कार्यालये, रुग्णालये, शैक्षणिक इमारती, सिनेमागृह, मंगल कार्यालय यात महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियमानुसार अग्न‌प्रितिबंधक उपाययोजना करणे व फायर ऑडिट प्रमाणपत्र वर्षांतून दोन वेळा अग्निशामक अधिकारी यांचाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र याबाबत मालेगावातील अग्निशामक विभागाकडून २००९ पासून याबाबत वारंवार सूचित करण्यात येऊनही कोणत्याही शासकीय कार्यालयाने अग्नीप्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित करण्याची कारवाई केलेली नाही. त्यामुळे भविष्यात या कार्यालय, इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील महानगरपालिका, नवीन तहसील कार्यालय, सामान्य रुग्णालय, प्रभाग कार्यालय, पोल‌सि ठाणी या शासकीय इमारतींमध्ये तसेच खासगी व्यावसायिक इमारती, सिनेमागृहांना येथील अग्न‌‌शिामक दलाकडून अग्न‌प्रितिबंधक उपाययोजना करण्याबाबत २००९ पासून नोट‌सिा बजावण्यात आल्या आहेत. यंदा देखील गेल्या ९ दिवसांत शहरातील ४७४ खासगी व्यावसायिक व आस्थापनांना नोट‌सिा बजावल्या आहेत. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. संबंधित इमारत मालक व आस्थापनांनी अग्न‌प्रितिबंधक उपाय योजनांची पूर्तता करून जानेवारी अखेर प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन मुख्य अग्निशामक अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.

सूचनांना केराची टोपली

नॅशनल बिल्ड‌िंग कोड २००६ नुसार शासकीय किंवा खासगी इमारतीत अग्न‌प्रितिबंधक उपाययोजना करायला हव्यात. मात्र अग्निशामक दलाच्या नोट‌सिीला साऱ्यांनीच केराची टोपली दाखवली आहे. शहरातील इमारतींचे फायर ऑड‌टि करण्यात आल्यानंतर ९ सिनेमागृह, ४९ बियरबार व वाइनशॉप देखील धोकादायक ठरवली आहेत. नियमानुसार संबंधितांनी या इमारतीत अग्न‌प्रितिबंधक उपाय योजना न केल्याने त्यांचे वीज तसेच पाणीपुरवठा जोडणी तोडण्यात यावी अशा सूचना प्रभाग अधिकारी व वीज अभियंता यांना वारंवार देवून देखील कारवाई झालेली नाही.

शासकीय कार्यालयांमध्ये उदासीनता

शहरातील नवीन तहसील कार्यालयात, विशेष लेख परीक्षक कार्यालय, विक्रीकर कार्यालय, सामान्य रुग्णालय, महापालिका नवीन इमारत या महत्त्वाच्या शासकीय इमारतींमध्ये देखील या उपाययोजनाबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आजवर महापालिकेस अग्न‌शिामक दलाकडून १२ स्मरणपत्रे देवूनही याची दखल घेतलेली नाही. शहरातील कोणत्याही नव्या बांधकामास परवानगी किंवा पूर्णत्व दाखला देण्यापूर्वी नगररचना विभागाने अग्न‌शिामक दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे आयुक्तांचे आदेश आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रखडलेल्या कामांबाबत निफाडकरांना आश्वासन

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड येथील विनता नगर व बालाजी नगर मध्ये मंजूर असलेली कामे ठेकेदाराने रखडवल्यामुळे या प्रभागाचे नगरसेवक जावेद शेख मंगळवारी निफाड नगरपंचायत कार्यालयासमोर प्रभागातील नागरिकासंमवेत उपोषणाला बसले होते. सायंकाळी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर चव्हाण यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.

प्रभाग चारमधील विकास कामांची मुदत संपून सहा महिने उलटले. मात्र ठेकेदार काम सुरू करत नसल्याने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक जावेद शेख यांनी कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्याकडे केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने शेख यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात प्रभागातील नागरिकांनीही सहभाग घेतला. नगराध्यक्ष मुकुंद होळकर यांनी कार्यकारी अधिकारी चव्हाण यांना संबंध‌ति विषयावर तत्काळ नियोजन करायला सांगितले. सायंकाळी चव्हाण यांनी उपोषणस्थळी शेख यांनी भेट घेतली. त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर शेख यांनी उपोषण मागे घेतले.

आठ दिवसांत कामे

प्रभागातील रखडलेली कामे आठ दिवसांच्या आत सुरू करण्यात येतील. कामे सुरू न झाल्यास नवीन टेंडर टाकण्यात येईल. हे काम अंदाजपत्रकानुसार केले जाईल. ठेकेदार जोपर्यंत काम पूर्ण करीत नाही तोपर्यंत त्याला बिल दिले जाणार नाही, असे लेखी आश्वासनात म्हंटले आहे. या प्रसंगी नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, किरण कापसे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, उपतालुकप्रमुख इरफान सय्यद, शहरप्रमुख संजय कुंदे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सूक्ष्म सिंचन’ ठरले मृगजळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विभागातील ८० टक्के शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या ५४,३१८ पैकी फक्त १०,३३७ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. प्रशासकीय उद्दिष्ट्य कमी असल्याने शेतीसाठी लाभदायी ठरू शकणारी ही योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरली आहे.

लहरी पावसावर अवलंबून असलेल्या शेती व्यवसायात सूक्ष्म सिंचनाचे महत्त्व वाढले आहे. केंद्र आणि राज्याच्या निधीतून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी केली जाते. नाशिक विभागातील पर्जन्याच्या असमान वितरणामुळे पाणी‍टंचाई निर्माण होणाऱ्या गावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तेथील कृषी सिंचनावर परिणाम होतो. उपलब्ध पाण्यात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची टंचाई निर्माण होते. परिणामी शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु, सूक्ष्म सिंचन योजनेचा वापर केल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नेमका उपयोग होत असल्याचे लक्षात आल्याने सूक्ष्म सिंचनाच्या वापराला विभागातील शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. सरकारच्या सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचनासाठी तब्बल ५४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन मागणी नोंदविली आहे.

जळगाव-नाशिकमध्ये प्राधान्य
विभागात सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यास प्राधान्य देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जळगाव जिल्ह्यात आघाडीवर आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जळगाव जिल्ह्यातील ऑनलाइन अर्ज केलेल्या २६,६४० पैकी ४,५५८ शेतकऱ्यांना तर नाशिक जिल्ह्यातील १५,२७६ पैकी ३,८६९ इतक्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी सरकारी अनुदान प्राप्त झाले. या तुलनेत धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून पुरेसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. वर्षभरात सूक्ष्म सिंचन योजनेसाठी कृषी विभागाकडून सुमारे ४५ कोटी ९९ लाख रुपये इतके अनुदान वितरित केले गेले. यापैकी सुमारे ४० लाख रुपये निधी २०१६-१७ वर्षातील प्रलंबितमधून वर्ग करण्यात आला होता.

शेतकऱ्यांचा हिरमोड
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी विभागातील ५४ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र, पूर्वसंमती दिलेल्या अर्जांची संख्या अगदी तुटपुंजी आहे. ऑनलाइन अर्जांना पूर्वसंमती न मिळाल्याने हजारो शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. या योजनेच्या किचकट अटी आणि जिल्ह्यांना मिळणारे अत्यल्प उद्दिष्ट्य यामुळे अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळू शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊले चालती त्र्यंबकची वाट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी (दि. १२) होणाऱ्या श्री निवृ‌त्तिनाथ महाराज यात्रेसाठी शहरातून बुधवारी दिंड्या रवाना झाल्या. शहराच्या विविध भागातून दिंड्या मार्गस्थ होत असल्याने सर्वत्र हरिनामाचा गजर दुमदुमला. त्र्यंबकरोड, गंगापूररोड या भागातून मोठ्या प्रमाणात दिंड्या त्र्यंबकच्या दिशेने रवाना झाल्या. या दिंड्या गुरुवारी त्र्यंबकमध्ये दाखल होणार आहेत.

महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या दिंड्यांचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. सिन्नर, श्रीरामपूर, अहमदनगर भागातून आलेल्या दिंड्यांनी सिडको, सातपूर भागात मुक्काम केला. स्थानिकांनी वारकऱ्यांच्या फराळासह पिण्याचे पाणी व मुक्कामाची व्यवस्था केली.

राज्यातील संतांच्या यात्रा या त्यांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी होतात. मात्र, संत निवृ‌त्तिनाथांची यात्रा समाधी सोहळ्याऐवजी पौष वद्य एकादशीला होते. संत निवृ‌त्तिनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीला समाधी घेतली. परंतु, या दिवशी सर्व वारकरी पंढरपूरला यात्रेसाठी जात असल्याने त्यांना माघारी येणे शक्य होत नाही. त्यामुळे ही यात्रा पौष वद्य एकादशीला घेण्यात यावी, असा निर्णय त्यावेळच्या संत परिषदेत झाला. तेव्हापासून या यात्रेची परंपरा रुजली आहे. यात्रेनिमित्त आठवडाभर नामवंत प्रवचनकार या सोहळ्यासाठी हजेरी लावतात. तसेच महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात येथील भाविक येतात. यंदाही दिंड्यांची संख्या सहाशेवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात्रेसाठी एसटीच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. या कालावधीत नियमित बसेसचे वेळापत्रक बदलणार नसल्याची माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली.

शहरात वाहतूक नियोजन
दोन दिवसांपसून शहरातील वातावरण ज्ञानोबा माऊलीच्या गजराने दुमदुमून गेले आहे. सिन्नरला एका वारकरी महिलेचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने शहरातून जाणाऱ्या दिंड्यासाठी वाहतुकीचे नियोजन केले आहे. ज्या ठिकाणाहून दिंड्या जात आहेत अशा मार्गावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैष्णव भक्तांचा गोदाकाठी पूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करीत त्र्यंबक मार्गाने निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेसाठी निघालेल्या दिंड्यांच्या टाळ-मृदुंगाच्या गजराने पंचवटी परिसर दुमदुमला. हाती ध्वज, पताका, गळ्यात वीणा घेऊन भक्तीभावाने पायी चालत शिस्तबद्ध निघालेल्या दिंड्यातील वारकऱ्यांनी पंचवटी परिसरातील रामकुंडावर स्नानासाठी गर्दी केली. रामकुंडावर स्नान करून कपालेश्वर महादेव मंदिर, काळाराम मंदिर, सीतागुंफा येथे दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी केली.

पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील सष्टतिला एकादशीला त्र्यंबक येथील निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव भरतो. या यात्रेसाठी सालाबादाप्रमाणे यंदाही पायी दिंड्या दाखल होत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विविध भागातून येणाऱ्या दिंड्या नाशिक शहरातून त्र्यंबककडे जात आहेत. कडाक्याच्या थंडीतही पायी मार्गक्रमण करणाऱ्या या वारकऱ्यांच्या उत्साह कमी झालेला दिसत नाही. पंचवटी परिसरातील विविध भागात या दिंड्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे. या यात्रोत्सवासाठी शुक्रवारी (दि. १२) जाणारे वारकरी दोन दिवस अगोदरच दाखल होत आहे.

पालख्यांमुळे रस्ते ध्वज, पताकांनी फुलून गेले आहे. भजन, कीर्तन करीत येणाऱ्या या दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या भाविकांचे मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या चहापान, नाष्टा, जेवण आणि निवास यांची व्यवस्था दिंड्या पालख्या निघण्याअगोदरच केलेली असते. नियोजित ठिकाणी या दिंड्या पोहचत आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम होत असल्याने सध्या भक्तीमय वातावरण तयार झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवक-युवतींसाठी आजपासून आरोग्य जागर

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिलांच्या आरोग्यासंदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आता जनजागृतीचा मोठा जागर होणार असून, त्याच्या पहिल्या टप्प्यांत कॉलेजेसमध्ये विविध कार्यक्रम आयोजित होणार आहेत. गंगापूररोडवरील जेआयटी कॉलेजमधील सेमिनारमधून त्यास गुरुवारी (११ जानेवारी) प्रारंभ होत आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’ने महिलांच्या आरोग्य सुरक्षिततेच्यादृष्टीने ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ ही मोहिम हाती घेतली आहे. याचअंतर्गत त्यांच्या आरोग्याशी निगडीत बाबींवर प्रकाश टाकला जात आहे. विविध सरकारी कार्यालये, बसस्टँ, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी महिला स्वच्छतागृहांची असलेली दुरवस्था याची सद्यस्थिती मांडण्यात आली. त्याला मोठा प्रतिसाद लाभला. मासिक पाळी संदर्भात अनेक भ्रामक समजुती, अंधश्रद्धा आणि प्रथा-परंपरा आहेत. यासंदर्भात मटाने वृत्तमालिकांद्वारे प्रकाश टाकला आहे. तसेच, सध्या बाजार उपलब्ध असलेले सॅनिटरी नॅपकीन, त्याचा वापर, त्याचे परिणाम, पर्यावरणपूरक पर्यायांची उपलब्धता याचा आढावाही विविध बातम्यांमधून घेतला जात आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत आता जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात कॉलेज युवतींचे प्रबोधन, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या शंकांचे निरसनासाठी विशेष सेमिनारचे आयोजन शहर परिसरातील कॉलेजेसमध्ये केले जाणार आहे. त्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांची एक टीम तयार करण्यात आली असून त्यामाध्यमातून जनजागरण होणार आहे.

जेआयटीत सेमिनार

‘मटा’ आणि जेआयटी इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.११) सकाळी ११ वाजता 'महिलांचे आरोग्य' या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोड वरील जेआयटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सेमिनार हॉल मध्ये हा सेमिनार होणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली देसले-सावंत या मार्गदर्शन करणार आहेत, असे प्राचार्य डॉ. एम. व्ही. भटकर यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images