Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सहा-साडेसात मीटर रस्त्यांच्या प्रस्तावाला मान्यता

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कपाटकोंडीमुळे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून अडकलेल्या, तसेच नवीन विकास नियंत्रण नियमावलीमुळे बाधित झालेल्या ६ व ७.५ मीटर रुंदीच्या रस्त्यावरील इमारतींच्या नियमितीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार विभागाने ६ व ७.५ मीटर रुंदीच्या रस्त्यांवरील खासगी जागा ताब्यात घेऊन ते रस्ते ९ मीटरचे करण्यासदंर्भातील प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील कपाटकोंडी तसेच एफएसआयचा प्रश्न काही अंशी सुटणार असला तरी, या रस्त्यावरील नागरिकांसमोर तांत्रिक अडचणींचा डोंगर कायम राहणार आहे.
नागरिकांच्या समंतीशिवाय रस्तारुंदीकरण करता येणार नसल्याने तसेच आर्थिक मोबदला देण्याची तरतूद नसल्याने अशोक स्तंभ ते रविवार कारंजा रस्त्यासारखीच अवस्था या प्रस्तावाची होणार असल्याचा विरोधकांनी आरोप केला. मार्जिन स्पेस आणि पार्किंगचा प्रश्न कसा मिटणार असा सवाल करीत, गावठाणातील रस्त्यांचे काय, असा प्रश्न करून विरोधकांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी एफएसआयचे उल्लंघन करीत, इमारतींमध्ये कपाटांची निर्मिती केली. तत्कालीन अधिकाऱ्यांनी नियमांवर बोट ठेवल्याने कपाट प्रश्नामुळे सर्व बांधकाम व्यवसाय अडचणीत आला. त्यातच नवीन विकास नियंत्रण नियमावलीमुळे ६ व ७.५ मीटर रस्त्यावर टीडीआर अनुज्ञेय करण्यास बंदी घातली. ९ मीटरवरील रस्त्यावरील कपाटकोंडी फुटली असली तरी, त्याखालील रस्त्यांवरील इमारती नियमितीकरणाचा मार्ग बंद झाला होता. तसेच छोटे प्लॉटधारक अडचणीत आले होते. त्यांना दिलासा देण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नगररचना विभागाने आता नियमावलीनुसार ६ आणि ७.५ मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव बुधवारच्या महासभेवर ठेवला होता. त्या प्रस्तावाचे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले आहे. संभाजी मोरुस्कर यांनी या प्रस्तावामुळे शहरातील कपाटाचा प्रश्न मिटणार असल्याचा दावा केला. विकासकांनी चूक केली, परंतु त्याचा फटका ग्राहकांना नको असे सांगत, हा प्रस्ताव उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. एखादा प्लॉटधारक पुनिर्वकास करेल तेव्हा साइट मार्जिन सोडून बांधकाम करण्यास तयार असेल, तर त्याचाही या प्रस्तावात समावेश करण्याची सूचना केली. उपसूचनांसह प्रस्ताव मंजुरीची मागणी त्यांनी केली. गजानन शेलार यांनी दत्तक नाशिकला वेगवेगळे नियम लावले जात असल्याचे सांगत, गावठाणातील बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. डीसीपीआरमध्ये नाशिक आणि पुण्याला वेगवेगळा न्याय का असे सांगत, गावठाण क्लस्टर डेव्हलपमेंटचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला. रस्ता रुंदीकरणात साइड मार्जिनचे काय, असा प्रश्न उपस्थित केला. गुरुमीत बग्गा यांनी या प्रस्तावामुळे लहान प्लॉटधारकांचे नुकसान होऊन मोठे बिल्डर पोसले जाणार असल्याचा आरोप केला. रस्ता रुंदीकरणाच्या माध्यमातून अशोक स्तंभ ते रविवार कारंजा हा रस्ता २००१ मध्ये रुंदीकरणासाठी खुला केला होता. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगत, या प्रस्तावाचेही तसेच होईल असा दावा केला. आर्थिक मोबदला देण्याची तरतूद नसल्याने प्रतिसाद मिळणार नाही असे सांगितले. साइड मार्जिन सोडल्यास पार्किंग कुठे करायची, असा सवाल करत हा रोगापेक्षा इलाज भंयकर असल्याचे त्यांनी सांगितले. शाहू खैरे यांनीही गावठाण पुनर्विकासाचा मुद्दा पुढे करीत, त्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी या प्रस्तावाचे समर्थन करत, सुरुवात चांगली असल्याचे सांगत, नवीन विकास नियंत्रण नियमावलीवर बोट ठेवले. नाशिक आणि अन्य शहरांना वेगवेगळे नियम लावले जात असल्याचे स्पष्ट करून गावठाणांचाही समावेश करा अन् पार्किंगचा दिलासा देण्याचा यात समावेश करण्याची मागणी केली. सभागृहनेत्यांनी कायदेशीर बाबी तपासून प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. त्यावर महापौरांनी उपसूचनांसह ठराव मंजूर करीत, त्याला स्थायी समितीकडे पाठविण्याचे आदेश दिले. त्यामुळे कपाटकोंडीसह रस्ते रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.


असा आहे प्रस्ताव
नगररचना विभागाच्या प्रस्तावानुसार, दाट लोकवस्तीच्या क्षेत्राबाहेर मंजुरीप्राप्त अभिन्यास क्षेत्रातील ६ आणि ७.५ मीटर रुंद रस्त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. तात्पुरत्या मंजूर अभिन्यासातील ६ मीटर रुंदीचे रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी १.५ मीटर रुंदीकरण दर्शवून ९ मीटरपर्यंत रस्ता रुंद करण्यात येणार आहे. सद्यस्थितीतील ७.५ मीटर रुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी ०.७५ मीटर रुंदीकरण दर्शवून ९ मीटरपर्यंत रस्ते रुंद करण्यात येणार आहेत. रस्त्याच्या नियमित संरेषेमुळे किंवा ९ मीटरपर्यंत रुंदीकरण करताना बाधित होणारे खासगी मालकीच्या भूखंडाचे क्षेत्र महापालिका सदर जागामालकाबरोबर कराराद्वारे संपादन करणार. तसेच सदर क्षेत्र संपादनाच्या मोबदल्यास संबंधित जागा मालकास केवळ एफएसआयच्या स्वरुपातच मोबदला मिळणार आहे. जागा मालकास संबंधित एफएसआय जागेवर वापरता येणार असला तरी, त्या जागेच्या बदल्यात टीडीआर किंवा रोखीने मोबदला मात्र मिळणार नाही. प्लॉटचा विकास करताना जागा पालिकेला देणे बंधनकारक आहे. एकत्रित प्रस्ताव आल्यानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जाईल. विकसीत प्लॉट मालकांकडून प्रस्ताव आल्यास त्यांनाही एफएसआय दिला जाईल. एफएसआय लाभधारकांना सात-बारा व मालमत्तापत्रकावर नोंद करणे बंधनकारक असणार आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वादाच्या भोवऱ्यात भाजी मार्केटची वाट

0
0

गणेशवाडी परिसरातील भाजीबाजार बनले अस्वच्छतेचे आगार; प्रशासनाकडून ​ दुर्लक्ष

रामनाथ माळोदे, पंचवटी

गंगाघाटावरील भाजीबाजार गणेशवाडी परिसरातील मोकळ्या जागेत सुरू करावा या हेतूने तेथे महापालिकेने भाजीमार्केट बांधले. मात्र, हे भाजीमार्केट सोयीचे नसल्याचे कारण देत भाजीविक्रेत्यांनी तेथे भाजीविक्री करण्यास विरोध दर्शविला आहे.

पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे मार्केट महापालिका आणि भाजीविक्रेते यांच्या वादामुळे गेल्या दहा वर्षांपासून धूळ खात पडून आहे. आता तर त्याची अत्यंत दुर्दशा होऊन वाट लागली आहे. भिकारी, बेघर झालेल्यांनी या जागेत ठिय्या मांडून येथे प्रचंड घाण केली आहे. अस्वच्छतेमुळे तर परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. जनतेच्या करातून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्च वाया गेला आहे.

गंगाघाटावरील भाजीबाजाराची जागा मोकळी करण्याच्या हेतूने महापालिकेने गणेशवाडी रस्त्यालगतची अनाधिकृत असलेली गोदावरी झोपडपट्टीचे अतिक्रमण काढले. येथील दोन एकर जागेवर सुसज्ज अशा भाजीमार्केटची उभारणी केली. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, असुरक्षितता, ग्राहकांची उपलब्धता, गैरसोयीची जागा अशा अनेक कारणांमुळे भाजीविक्रेते येथे जाण्यास तयार नाहीत. बांधकाम पूर्ण होऊन तब्बल दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील हे मार्केट सुरू होऊ शकले नाही. अनेक बेघरांचे येथे वास्तव झाले असून, त्यांनी या वास्तूची जागा हागणदारीसाठी केल्याचे दिसत आहे. घाणीने आणि दुर्गंधीने येथे घर केले आहे.

बेघरांची हक्काची जागा
गणेशवाडीच्या या मार्केटमध्ये बेघर असलेल्या अनेकांनी आपली जणू हक्काची जागा आहे, अशा अविर्भावात येथे ठिय्या मांडला आहे. त्यांचे कपडे, भांडीकुंडी येथे ठेवल्या आहेत. चुलीही येथेच मांडल्या आहेत. आजूबाजूच्या झाडांची लाकडेही सरपणासाठी येथे आणून ठेवले आहेत. येथील जाळ्यांवर आणि लोखंडी कुंपणावर अंथरूण आणि पांघरुणाचे कपडे वाळत टाकले जात आहे. कपडे धुणे, भांडी घासणे, तेथे घाण टाकणे अशा प्रकारांमुळे हा भाग गलिच्छ झाला आहे. भाजीमार्केटच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत. या पायऱ्यावरून जाण्याच्या मार्गावर लोखंडी दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. हे दरवाजे मोकळे असल्यामुळे या जिन्यांनी कुणीही वरच्या बाजूला जाऊ शकत आहेत. या जिन्याने चढून जाताना येथील भागात प्रचंड हागणदारी असल्याचे दिसते. येथील जागेचा वापर शौचास आणि मुतारीसाठी केला जात असल्यामुळे येथे प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. हागणदारीमुक्त नाशिकचा दावा करणाऱ्यांनी या भागात येऊन पाहणी केल्यास येथील घाण आणि दुर्गंधी बघता येईल.

काचेच्या छताची तोडफोड
मार्केट बांधताना येथील ओट्यांवर प्रकाश असावा यासाठी येथे काचेचे छत तयार करण्यात आलेले आहेत. या छताच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रकाश पडण्याऐवजी पावसाचे पाणीच खालच्या भागात पडू लागले आहे. वरच्या बाजूला असलेल्या गच्चीवर सर्वत्र दारुच्या बाटल्या फोडल्या असल्यामुळे ही गच्ची काचांच्या तुकड्यांनी भरून गेली आहे. वरच्या बाजूच्या छताचे दरवाजे गायब झाले आहेत. लोखंडी रेलिंगचे पाईप कापून नेण्याचे काम भुरटे चोरटे करीत असल्याचे येथील गायब झालेल्या पाईपांमुळे कळते.

क्रमांक दिलेले ओटे वापराविना पडून
महापालिकेने येथे भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे तयार केले आहेत. या ओट्यांना नंबरही देण्यात आलेले आहेत. गंगाघाटावर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांचे लकी ड्रॉ काढून त्यांच्या नावे ही ओटे करून देण्यात आले आहेत. मात्र विक्रेत्यांनी येथे भाजीपाला विक्रीसाठी येणार नसल्याचे स्पष्ट सांगत येथे बसण्यास विरोध कायम ठेवल्यामुळे हा ओटे वाटण्याचा प्रकार केवळ फार्सच ठरला. पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा व्हावा यासाठी गटारी काढण्यात आलेल्या आहेत. या गटारीवर बसविण्यात आलेले ढापे निखळून पडले आहेत. या गटारीमध्ये कचरा, कागद, प्लास्टिक यांचा खच साचला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी निघून जाणे शक्य होत नाही.

आठवडे बाजारही भरेना
नाशिकचा दर बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजाराला आता म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण आणि रोकडोबा मैदान कमी पडू लागले आहे. धान्य बाजार थेट अमरधाम रस्त्याला तर भाजीबाजार थेट गणेशवाडीच्या रस्त्याच्या दुर्तफा भरू लागला आहे. हा भाजीबाजार रस्त्यावर न भरविता या भाजीमार्केटमध्ये भरावा अशी मागणी झाली होती. येथे हा बाजार भरविण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, येथील अस्वच्छतेमुळे विक्रेते आणि ग्राहक या भागात फिरकायला तयार नाहीत. एकवेळ रस्ता परवडला पण या मार्केटमध्ये नको असे विक्रेते म्हणून लागले. त्यांनी गणेशवाडीच्या रस्त्यावर बाजार मांडला, पण या मार्केटमध्ये येण्याचे टाळले जात आहे. गंगाघाटावरील भाजीबाजाराच्या जागेसंदर्भात महापालिका आणि भाजीविक्रेते यांच्यातील वाद न्याय प्रविष्ठ असल्यामुळे या विषयी विक्रेते आणि महापालिका प्रशासन यांनी या विषयावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही अशी भूमिका घेतलेली आहे.

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना या भाजीमार्केट मार्केटची पाहणी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. या वास्तूचा वापर सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. येथील स्वच्छतेच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे.
-प्रियंका माने, सभापती, पंचवटी प्रभाग समिती

भाजीविक्रेत्यांच्या आणि ग्राहकांच्या सोयीसाठी सुसज्ज मार्केट बांधण्यात आले. मात्र, त्याला भाजीविक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे हे मार्केट सुरू होऊ शकले नाही. हे मार्केट उपयोगात आणल्यास त्याची नियमित स्वच्छता होऊ शकेल.
-उल्हास धनवटे, माजी नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडीच्या वादग्रस्त ठेक्याला पुन्हा मंजुरी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेतील वादग्रस्त २२० कोटींच्या एलईडी खरेदी विषयाची कायदेशीर अडचण दूर होण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी ऊर्जा संवर्धनाच्या नावाखाली नव्याने शहरात ९९ हजार एलईडी दिव्यांच्या लखलखाटाला मंजुरी दिली आहे. ऊर्जा संवर्धनाच्या गोंडस नावाखाली शहरातील तब्बल ९९ हजार पथदीपांवर शासनाच्या ईईएसएल कंपनीमार्फत अथवा जाहीर ई-निविदांद्वारे वीज बचतीच्या निधीतून एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. परंतु, यापूर्वीचा करारनामा रद्द करण्यापूर्वीच सत्ताधाऱ्यांच्या घाईगडबडीमुळे हा प्रस्तावही वादात अडकण्याची शक्यता आहे. यापूर्वीचा करारनामा अस्तित्वात असतानाच, तसेच मोठ्या प्रमाणावर कायदेशीर अडचणींचा डोंगर असतानाही, महापौरांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध डावलत प्रस्तावाला मंजुरी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत जादा विषयात ऊर्जा संवर्धनाच्या वीजबचत निधीतून शहरात तब्बल ९९,५८२ पथदीपांवर एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु, यापूर्वीचा वादग्रस्त २२० कोटींच्या एलईडी दिवे बसविण्याच्या प्रस्तावाने मात्र सत्ताधाऱ्यांसमोर कायदेशीर अडचणींचा डोंगर उभा केला आहे. एमआयसी कंपनीचा दावा महापालिकेने जिंकला असला तरी, करारातील अटी-शर्तींमुळे महापालिकेला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याचा खुलासा गुरूमित बग्गा यांनी सभागृहात केल्यानंतर सभागृहच अवाक झाले. ८० कोटींच्या बँक गॅरंटीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना व करारनामा रद्द झाला नसताना ही घाई कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुधाकर बडगुजर यांनीही यापूर्वी अस्तित्वात असलेल्या २४ हजार एलईडी दिव्यांचे एनर्जी ऑडिट कुठे आहे, असा सवाल करीत, त्यांचेही पैसे ठेकेदार कंपनीला देणार काय, असा प्रश्न उपस्थित केला. हा प्रस्ताव चुकीचा असून आम्ही जेलमध्ये जाणार नाही, असे सांगत विरोध केला. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी विधी विभागाच्या सल्ल्यावरच आक्षेप घेत, ऊर्जा बचतीच्या नावाखाली सभागृहाला अडचणीत आणणार का, असा सवाल केला. सोबतच कंपनीला प्रोजेक्ट खर्च चार टक्के का द्यायचा, असा सवाल करीत या प्रस्तावाला विरोध केला. कायदेशीर अभ्यास करण्यासाठी हा विषय तहकूब करून पुढच्या महासभेत घेण्याची मागणी गजानन शेलार यांनी केली. या विषयाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. शाहू खैरे यांनीही या प्रस्तावाला विरोध केला. परंतु, गटनेते संभाजी मोरुस्कर आणि सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मात्र प्रस्तावाची भलामण केली. गटनेते मोरुस्कर यांनी ईईएसएल कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने वादग्रस्त एलईडीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे.
असा आहे इलईडीचा प्रस्ताव!
नाशिक शहरातील ८६,९८० पथदीपांपैकी जेमतेम ३५०० पथदीपच एरिया बेस डेव्हलपमेंट क्षेत्रात स्मार्ट लायटिंगमध्ये अंतर्भूत होतात. त्यामुळे मनपाचा इतर भाग एलईडी दिव्यांपासून वंचित राहणार असल्याने हा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सद्यस्थितीत नाशिक मनपा क्षेत्रात एकूण ७५,४५५ सोडिअम व टी- ५ फिटिंग्ज लावण्यात आलेल्या आहेत. तसेच ११५२५ एलईडी फिटिंग्ज आहेत. त्याचप्रमाणे नगरसेवकांच्या मागणीनुसार आणखी ७.२९ कोटी रुपये रकमेच्या एकूण १२,६०२ एलईडी फिटिंग्ज बसविण्याच्या कामास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या सर्व निविदा रद्द करून एकत्रित ९९,५८२ दिवे बसविले जाणार आहेत. राज्याच्या ऊर्जा संवर्धन धोरणांतर्गत शासनाने नियुक्त केलेल्या ईईएसएल कंपनीमार्फत अथवा जाहीर ई-निविदा मागवून स्मार्ट सिटी प्रकल्प सल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार ईस्को मॉडेलनुसार एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव आहे. एलईडी दिव्यांमुळे वीज बचत होणार आहे. त्याचबरोबरच देखभालीचा खर्च देखील कमी होईल. या प्रकल्पांतर्गत तब्बल ४५.२ टक्के वीज बचत अपेक्षित आहे. यानुसार बचत झालेल्या वीज बिलापोटीच्या रकमेचा काही भाग मक्तेदारास दिला जाईल व काही भाग मनपास फायद्यास्वरूपात राहील.

नियम डावलून पूर्वीचा करारनामा
गुरुमित बग्गा यांनी यापूर्वीच्या २२० कोटींच्या एलईडी प्रस्तावाची अक्षरक्षा चीरफाड केली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी महापालिकेचे हित न बघता ठेकेदाराला पूरक असा करारनामा करून दिल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याची पोलखोल बग्गा यांनी केली. एमआयसी कंपनीने ठेका रद्द केल्यास महापालिकेला १० टक्के परतावा देण्याची तर, महापालिकेने ठेका रद्द केल्यास ९० टक्के भरपाई देण्याची तरतूद करारनाम्यात करण्यात आल्याचा भंडाफोड त्यांनी केला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ठेकेदाराचाच फायदा होणार आहे. महापालिकेने ठेका रद्द केल्यास तब्बल १८० कोटी रुपये द्यावे लागणार असल्याने अधिकाऱ्यांनी थेट ठेकेदारावरच मेहरबानी करत, सर्व नियम डावलून करारनामा केल्याचे समोर आले. ठेकेदाराने दिलेली नोटीस महापालिकेने स्वीकारली नसल्याने पूर्वीचे टेंडर रद्द कसे झाले, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली. परंतु ठेका द्यायचाच या उद्देशाने महासभेत आलेल्या प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी मात्र पद्धतशीरपणे या गोंधळाकडे डोळेझाक करण्याचे धोरण अवलंबले आहे.

एमआयसी, ईईएसएल कनेक्शन
विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी वादग्रस्त २२० कोटीच्या एलईडी दिवे बसवणाऱ्या एमआयसी कंपनी व सध्या इच्छुक असलेल्या ईईएसएल कंपनीचे आर्थिक कनेक्शन उजेडात आणले. महापालिकेने एमआयसी कंपनीला यापूर्वी दिलेली ८० कोटी रुपयांची बँक गॅरंटी संबधित कंपनीने ईईएसएल कंपनीला हस्तांतरीत केल्याचा आरोप त्यांनी केला. तेव्हा आयुक्तांनी सारवासारव करत, हा दोन कंपन्यांचा अंतर्गत विषय असल्याचा दावा केला. परंतु यानिमित्ताने या दोन कंपन्यांमधील आर्थिक कनेक्शन चव्हाट्यावर आले आहे. पूर्वीच्या ठेक्याची भरपाई म्हणूनच ईईएसएल कंपनीला ठेका देण्याची घाई सत्ताधाऱ्यांकडून केली जात असल्याचा आरोप करत, त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला.

पाटील-बडगुजर भिडले
एलईडीच्या जुन्या प्रस्तावावरून सभागृहात माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर आणि सभागृह नेते दिनकर पाटील आपसातच भिडले. एलईडीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना, पाटील यांनी शेरेबाजी केल्यानंतर बडगुजर यांनी त्यांना शेरेबाजीनेच उत्तर दिले. त्यावरून दोघांमध्ये तू-तू,मै-मै होऊन वाद हमरीतुमरीवर गेला. सत्ता असली म्हणून काहीही करणार का, अशा शब्दांत बडगुजर यांनी हल्लाबोल करत, आम्हीही सभागृहनेता असल्याची जाणीव करून दिली. त्यामुळे पाटील यांनीही संतप्त होत, बडगुजर यांच्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जेष्ठ सदस्यांनी मध्यस्थी करीत, वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. बोरस्ते, शेलार, खैरे यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी मध्यस्थी करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु या वादाने सभागृहात तणावाचे वातावरण तयार झाले होते. बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांनी जुन्या व ज्येष्ठ सदस्यांनी मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला. बोलताना तारतम्य बाळगण्याचे आवाहन करीत, वाद मिटवण्याचा सल्ला दिला

आऊटसोर्सिंग भरतीचा प्रस्ताव तहकूब

नाशिक : मनपातील सफाई कर्मचाऱ्यांची ७०० पदे आऊटसोर्सिंगने भरण्याबाबतच्या प्रस्तावाला शिवसेनेसोबतच इतर सर्वच पक्षांनी विरोध केला. या कर्मचाऱ्यांचे मानधन नेमके किती असावे, या मुद्द्यावर एकमत होत नसल्याने हा विरोध तीव्र झाला.
सर्वपक्षीयांचा विरोध विचारात घेत आऊटसोर्सिंग भरतीचा प्रस्ताव तहकूब झाल्याने हा विषय पुन्हा पुढील महासभेत उपस्थित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोनवेळा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या शहराच्या गरजेच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ही पदे आऊटसोर्सिंगने भरण्याचा प्रस्ताव होता. पालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर सद्यस्थितीत मंजूर असणाऱ्या १९९३ सफाई कामगारांच्या पदांपैकी पाचशे कर्मचारी पालिकेत बिगारी म्हणून कार्यरत आहेत. परिणामी सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत असल्याने सत्ताधारी ही उणीव भरून काढण्याच्या मानसिकतेत होते. परिणामी हा प्रस्ताव दाखल झाला होता. शिवसेनेने या प्रस्तावाला सुरुवातीपासून विरोध करत आऊटसोर्सिंगऐवजी मानधन अथवा रोजंदारीवर कर्मचारी भरतीसाठी विरोधक आग्रही होते. तहकूब झालेल्या या प्रस्तावासाठी सुमारे २० ते २१ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.

महापौर चषकला हिरवा झेंडा
कबड्डी , खो-खो आणि कुस्ती या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या महापौर चषक स्पर्धेला महासभेने अखेर हिरवा झेंडा दाखविला. तब्बल सहा वर्षांपासून या चषकाची परंपरा खंडित झाली होती. या निमित्ताने ही परंपरा आता पुनरुज्जीवीत होणार आहे. या स्पर्धांसाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी सन् २०१२ साली ही स्पर्धा झाली होती. यानंतर सहा वर्षांच्या काळात लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या स्पर्धेकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी होती. शहराचे पहिले महापौर स्व. शांताराम बापू वावरे यांच्या कार्यकाळापासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती.

भूमिगत तारांना मंजुरी
महापालिकेत महावितरणच्या मदतीने वीज तारा भूमिगत करण्याच्या नागपूर पॅटर्नलाही महासभेने मंजुरी दिली आहे. महावितरण कंपनीने महापालिका हद्दीत ८७ कोटी रुपये खर्चून वीजतारा भूमिगत करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, त्यासाठी काही अटी व शर्ती पालिकेसमोर ठेवल्या होत्या. त्यासाठीचा करारनामा महावितरण सोबत केला जाणार आहे. त्या कराराला महासभेने मंजुरी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामसृष्टी उद्यानास ‘अच्छे दिन’ नाहीच!

0
0

वर्ष उलटूनही मोकाट कुत्री आणि वाहनांचा त्रास कायम

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तपोवनाच्या निसर्गरम्य ठिकाणी वृक्षांचे अस्तित्त्व असलेल्या जागेत महापालिकेने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजना (जेएनयुआरएम) अंतर्गत रामसृष्टी उद्यान विकसित करण्यात आले आहे.

रामसृष्टी उद्यानाच्या बाजूला असलेल्या सुलभ शौचालयाच्या सरंक्षक भिंतीचे काम सुरू आहे. त्या कामामुळे उघड्या असलेल्या प्रवेशद्वारातून थेट दुचाकी वाहने उद्यानात नेण्यात येत आहेत. तसेच लक्ष्मीनारायण पूलाच्या बाजूनेही दुचाकी थेट उद्यानात आणल्या जात आहेत. मोकाट कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालेला आहे.

तपोवन परिसरात २०१२ मध्ये गोदावरीच्या काठावर ३ कोटी रुपये खर्चून विकसित केलेले हे उद्यान सुरुवातीच्या काळात महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे होते. त्या काळात या उद्यानाची दुरवस्था झाली होती. हे उद्यान नंतर उद्यान विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे, त्यानंतर या उद्यानाच्या देखभालीकडे लक्ष दिले जात असल्यामुळे आणि भविष्यात काही नवीन योजना, उपक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे रामसृष्टी उद्यान कात टाकण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

गेल्यावर्षी या उद्यानातील गवत चारण्यासाठी जनावरे सोडली जात असे ती आता बंद झालेली आहेत. पावसाळ्यात वाढलेले गवत कापून येथील जागा स्वच्छ करण्यात आलेली आहे. मात्र, येथे खास सुरक्षेची व्यवस्था नसल्यामुळे उद्यानात मोकाट कुत्री वाढलेली आहे. उद्यानात येणाऱ्यांवर ती धावून जाण्याचे प्रकार वाढल्याने या कुत्र्यांची धास्ती घेतली जात आहे.

फोटोसेशनमध्ये रमले विद्यार्थी
उद्यानात थेट वाहने घेऊन जाण्याचे प्रकार वाढले आहेत. दुचाकी वाहने उद्यानात येऊ नये यासाठी लक्ष्मीनारायण पूलाच्या बाजूने खोदण्यात आले आहे. तरीही या बाजूने वाहने थेट उद्यानात आणली जातात. प्रवेशद्वार उघडे राहत असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाहनेही या उद्यानात आणली जात आहेत. त्या वाहनांवर बसून फोटोसेशन करण्यात हे विद्यार्थी रमलेले दिसतात.

सुरक्षारक्षकांची गरज
जेएनयुआरएम योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेले हे उद्यान बांधकाम विभागाकडे होते. २०१६ मध्ये ते उद्यान विभागाकडे देण्यात आले आहे. उद्यान विभागाकडे हे उद्यान आल्यानंतर त्याचे कामे ठेकदाराला न देता महापालिकेचे उद्यान विभागाचे कर्मचारीच करीत आहे. स्वच्छता आणि देखभालीकडे लक्ष देण्यात येत असले तरी येथे खास सुरक्षारक्षकांची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोंडीरोड डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वार्ड क्रमांक ७ मधील धोंडी रोड मार्गाचे ३० लाख रुपये खर्चाचे रस्ता डांबरीकरणाचे काम बुधवारी (दि. १०) बोर्डाचे उपाध्यक्ष दिनकरराव आढाव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून वॉर्डातील नागरिकांमधून हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी होत होती. त्यासाठी विविध राजकीय पक्षांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनास निवेदनदेखील दिली होती. मात्र त्याबाबत कोणतीही हालचाल होत नव्हती. शिंगवे बहुला गावाकडे जाणारा धोंडीरोड हा एकमेव मार्ग असल्याने त्याचे काम प्राधान्याने करणे गरजेचे होते, असे मत या वेळी बोलताना नगरसेवक बाबुराव मोजाड यांनी व्यक्त केले. खंडोबा टेकडी ते लष्करी हद्दीपर्यंतचा रस्ता होत आहे. यासोबतच या भागातील इतरही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले. शुभारंभप्रसंगी भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष संतोष मेढे, विठ्ठल मेढे, गेनू मोजाड, सोमनाथ निसाळ, संपत निसाळ आदींसह नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात बँकेतून १० लाखांची लूट

0
0

पाच भामट्यांकडून पैशांचे बंडल लंपास

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पंजाब नॅशनल बँकेत बुधवारी (दि. १०) भरदिवसा ग्राहक बनून आलेल्या चार ते पाच भामट्यांनी बँकेच्या कॅशियरसोबत हुज्जत घालण्याचे नाटक करीत सुमारे १० लाखांच्या रकमेचे बंडल चोरून लंपास केल्याची घटना घडली. या चोरीच्या घटनेने बँक परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सहाव्या गल्लीत असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य शाखेत दुपारी १ वाजेच्या सुमारास ही नाट्यमय लूट झाली. बँकेत चार ते पाच अनोळखी तरुण आले. त्यातील दोन जण बँकेतील कॅश काऊंटरजवळ गेले आणि कॅशियर वाघ यांना आपल्याला बँकेत खाते उघडायचे आहे असे म्हणून फॉर्म मागू लागले. त्याचवेळी एक जण आपणास एटीएममधून १ लाख रुपये काढायचे आहेत, असे म्हणत जवळच उभ्या सोनवणे नामक शिपायास बाहेर बोलावू लागला. त्या अनोळखीने शिपाई सोनवणे यांना संमोहित केल्याचे सांगण्यात येत आहे. याच सर्व गोंधळात लुटारूंपैकी एकजण थेट बँकेच्या काऊंटरमध्ये शिरत कॅशियरजवळील ड्रॉवरमधून पैशाचे बंडल काढून पळ काढला.

हे पैशाचे बंडल सुमारे १० लाखाचे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पैशाचे बंडल उचलून एक पळताच इतर चार जणही क्षणात पळाले. काही मिनिटात हा सर्व थरार झाला असून, कॅशियर यांनी आरडाओरड करीत लक्ष वेधले. बँकेतील ग्राहक, कर्मचाऱ्यांनी चोरांना शोधण्याचा प्रयत्नही केला मात्र ते पसार झाले. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्ससाठी ट्रेनिंग, ग्रुमिंग अन् मेकअपही!

0
0

नाशिक : हौसेला मोल नसते हे श्वान आणि तत्सम प्राणी पाळण्याच्या बाबतीत तंतोतंत खरे ठरू लागले आहे. त्यांना शाम्पूने स्नान घालण्यापासून, नखे काढणे, कान साफ करणे आणि मेकअपचाही व्यवसाय सध्या तेजीत आहे. इतकेच नव्हे तर पाळीव प्राण्यांची फिजिओथेरपीदेखील शहरामध्ये येऊ घातली असून, या व्यवसायांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीलाही चालना मिळते आहे.
शहरात श्वान आणि तत्सम प्राणी पाळण्याचे प्रमाण गेल्या दोन-तीन वर्षांत दुपटीने वाढले आहे. जे केवळ वातानुकूलित वातावरणातच राहू शकतात, अशा बर्फाळ प्रदेशातील देखण्या श्वानांचाही नाशिककरांना लळा लागला आहे. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक महागडे हे श्वान आहेत. सायबेरियन हस्की, नेपोलियन मॅस्टीफ, तिबेटियन मॅस्टीफ यांसारख्या काही जातीच्या श्वानांना वातानुकूलित जागेत ठेवले जाते. काही त्यापासून उपेक्षित राहतात. श्वान, मांजर किंवा तत्सम प्राणी केवळ लळाच लावत नाहीत, तर मानवाच्या मनावरील ताणही हलका करतात असे मनोविकार तज्ज्ञांचे निष्कर्ष आहेत. त्यामुळेच ते पाळण्याचे प्रमाण वाढले असून, पेट शॉप व अन्य सेवा सुविधाही वाढू लागल्या आहेत. श्वानांना शाम्पूने स्नान घालणे, त्यांची नखे काढून देणे, मेकअप करण्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. दोन वर्षांत अशा व्यावसायिकांची संख्या दुपटीने वाढली आहे.
शहरात सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. त्याचप्रमाणे खासगी डॉक्टर्सची संख्याही वाढते आहे. आठवड्यात एक किंवा दोनवेळा शाम्पूने श्वानांना अंघोळ घातली जाते. त्यासाठी दरमहा तीन हजार रुपये आकारले जातात. श्वानांना प्रशिक्षण देणाऱ्या तीन तरुणी आणि दोन तरुणही नाशिकमध्ये सक्रिय आहेत. आठवड्यातून दोन वेळा असे किमान सहा महिने प्रशिक्षण दिले जाते. एका दिवसासाठी किमान ५०० रुपये आकारले जातात. पाळीव प्राण्यांना फिजिओथेरपी देण्याकडेही आता नाशिकची वाटचाल सुरू झाली आहे. घरातील कुत्र्याच्या स्वच्छतेपासून त्याला शिस्त लावण्यापर्यंत आणि त्याच्या मेकअपपासून आहारापर्यंत सर्वच बाबतीत प्राणीमित्र दक्ष झाले असून, त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढत आहेत.

शहरात १५ हून अधिक केनल
कुटुंबासह बाहेरगावी निघताना श्वानप्रेमींना त्यांच्या पाळीव श्वानांचीही व्यवस्था लावावी लागते. त्यासाठी शहरात केनलची (डॉग होस्टेल) संख्या दुपटीने वाढली आहे. त्यासाठी प्रतिदिन किमान ५०० रुपये घेतले जातात. त्याला वेळेवर खाद्य देणे आणि सकाळ-सायंकाळ फेरफटका मारून आणण्याची जबाबदारी त्यांच्याकडून पार पाडली जाते. पूर्वी शहरात सात कॅनल होते. गेल्या दोन वर्षांत त्यांची संख्या १५ झाली आहे. तरीही सुटीच्या हंगामात तेथे हाऊस फुल्लचा बोर्ड लागतो.

नाशिकमधील महागडे श्वान
सेंट बर्नाड - ३००
सायबेरीयन हस्की - ९०
नेपोलियन मस्टीफ - १२
तिबेटियन मस्टीफ - २

हल्ली एकटेपणा वाढला असून तो कमी करण्यास पाळीव प्राण्यांची खूप मदत होते. ते लळा लावतात. खूप विश्वासू असतात. मानवाला प्रेम देतात. त्यांच्यासमवेत वेळही मजेत जातो आणि त्यामुळे मनावरील ताणही कमी होतो. म्हणूनच हल्ली कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी पाळणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
- डॉ. उमेश नागापूरकर, मानसोपचारतज्ज्ञ
(समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजभान बाळगून करा समाजसेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येक नागरिक हा सिटिझन रिपोर्टर असणे गरजेचे आहे. आपली बाजू सशक्तपणे मांडण्यासाठी प्रत्येक सिटिझन रिपोर्टरने बातमी करण्याचे कौशल्य जाणून घेतले पाहिजे. हे कौशल्य अवगत करून देण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने सिटिझन रिपोर्टर्ससाठी मंगळवारी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
दीड वर्षापूर्वी ‘मटा’ने ही संकल्पना सुरू केल्यानंतर त्यास नाशिककरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत त्याचाच पुढचा अध्याय म्हणून या सिटिझन रिपोर्टर्सना माध्यमे, त्यांची कार्यपद्धती, बातमीची प्रक्रिया आदींबाबत माध्यमतज्ज्ञ अनंत येवलेकर व नितीन शुक्ल यांनी मार्गदर्शन केले. बातमी कशी सादर करायची व बातमीमूल्य कसे ओळखायचे, याचे ओघवत्या शैलीत विवेचन केले. कॉलेजरोडवर असलेल्या बिल्डर असोसिएशनच्या कार्यालयात ही कार्यशाळा पार पडली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पत्रकारितेला नवा आयाम देण्याची किमया ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ या अॅपने साध्य केली आहे. या अॅपद्वारे मटाचे वाचक सार्वजनिक समस्या, तसेच अडी-अडचणी सहजपणे पाठवतात. त्या प्रसिद्ध होताच त्याची तत्काळ दखल घेतली जाते. त्यामुळेच हे अॅप अतिशय लोकप्रिय झाले आहे. दररोज शेकडो समस्या, अडी-अडचणी या अॅपद्वारे पाठविल्या जातात. निवडक सिटिझन रिपोर्टर्सला दर आठवड्याला सन्मानपत्र देऊन त्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल त्यांना गौरविण्यात येते. याच अनुषंगाने सिटिझन रिपोर्टर्सला योग्य ते मार्गदर्शन लाभावे, यासाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी केले. चीफ रिपोर्टर भावेश ब्राह्मणकर यांनी सूत्रसंचलन केले. मार्गदर्शन झाल्यानंतर सिटिझन रिपोर्टर्सनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली.

अत्यंत प्रभावी अॅप
मटाचे सिटिझन रिपोर्टर हे अॅप अत्यंत प्रभावी असून, यात छापून आलेल्या बातम्यांची प्रशासन गंभीरपणे दखल घेत असते. त्याचप्रमाणे विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे व नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ मटाने उपलब्ध करून दिले असल्याची भावना यावेळी उपस्थित सिटिझन रिपोर्टर्सनी व्यक्त केली.

कायम नियोजन व्हावे
मटाने केवळ अॅप तयार करुन आपले काम संपवले नाही; तर समस्येच्या मुळाशी जाऊन ती सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अनेकदा बातमी तयार करताना अडचणी येतात. बातमी माहीत असूनही ती प्रभावीपणे मांडता येत नाही. ही अडचण ओळखून मटाने आयोजित केलेली ही कार्यशाळा निश्चित कौतुकास्पद आहे, असेही सिटिझन रिपोर्टर्सनी सांगितले.

मोठ्या संख्येने उपस्थिती
मटाचे सिटीझन रिपोर्टर अॅप हे दहा हजारांवर लोकांनी प्ले स्टोअरमधून डाऊनलोड केले आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात सिटिझन रिपोर्टर्स उपस्थित होते.

बातमी देताना जबाबदारीचे भान बाळगा
महाराष्ट्र टाइम्सने सिटिझन रिपोर्टर हे एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असून, त्याचा उपयोग सर्वांनी करावा. बातमी देताना आपण या लोकशाहीचे घटक आहोत. ती बळकट करणे आपले काम आहे, असे समजून जबाबदारीने बातमी द्यावी, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, माध्यमतज्ज्ञ प्रा. अनंत येवलेकर यांनी केले. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने सिटिझन रिपोर्टरसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, तंत्रज्ञानाने आज रिपोर्टर्ससाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक नागरिकाला क्षणार्धात बातमी पाठवणे सोयीचे झाले आहे. सिटिझन रिपोर्टर्सने बातमी देताना वैयक्तिक हेतू बाजूला ठेवून बातमी द्यायला हवी. त्याचप्रमाणे पत्रकारितेचे संकेत पाळायला हवेत. आपण दिलेली बातमी तंतोतंत खरी आहे, याची खात्री करूनच ती द्यावी. आपण बातमी दिल्यानंतर ती विश्वासार्ह आहे याची खात्री वाचकाला झाली पाहिजे, तरच ते आपल्या पत्रकारितेचे यश आहे. आपल्या जबाबदारीकडे सूक्ष्मतेने पहायला हवे. बातमी देणे ही जबाबदारी मोठी आहे. ती देत असताना आपल्याला जगात काय चालले आहे, याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास असणे आवश्यक आहे. आपली भाषा सुधारण्यासाठी प्रत्येकाने वर्तमानपत्रांचे वाचन करणे गरजेचे आहे. बातमी देताना पत्रकाराचा स्वार्थ असता कामा नये. बातमी जास्त पाल्हाळीक असता कामा नये. बातमीचे तंत्र समजावून घेणे गरजेचे आहे. बातमीत थिल्लरपणा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कोणती बातमी द्यायची, कोणती द्यायची नाही, याचे भान असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

सोशल मीडीया हे प्रभावी अस्त्र
सोशल मीडिया हे अत्याधुनिक माध्यम आहे. त्याच्या वापराला कुठलेही बंधन नसले, तरी आपण ते कसे वापरायचे हे निश्चित करायला हवे. सोशल मीडियामध्ये अनेक पोस्ट व्हायरल होतात. पण, त्या खऱ्याच असतात का, याची शहानिशा आपण करतो का? असे प्रश्न उपस्थित करतानाच हे माध्यम प्रभावी शस्त्र असून, ते अधिक जबाबदारीपूर्वक वापरा, असा सल्ला आयटी उद्योजक आणि सोशल मीडिया अभ्यासक नितीन शुक्ल यांनी दिला.
पुढे ते म्हणाले की, मटा सिटिझन रिपोर्टर हे अॅप सोशल मीडियाचाच एक भाग आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारखी माध्यमे प्रभावशाली झाली आहेत. प्रत्येक माध्यमाचे वापरकर्ते प्रचंड आहेत. सोशल मीडियाला काळ, वेळेचे बंधन नाही. हे सशक्त माध्यम आहे. पण, हे माध्यम वापरताना आवश्यक ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. पोस्ट टाकताना ती पुन्हा एकदा वाचायला हवी. आपण बातमी केव्हा टाकतो, तेसुद्धा महत्त्वाचे आहे. आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरच येण्याची किंवा उतरण्याची गरज नाही. आपण ऑनलाइनही ते करू शकतो. नाशिकला विमानसेवा सुरू व्हावी यासाठी ट्विटरवर हॅशटॅगद्वारे मोहीम राबविली गेली. त्याची दखल घेतली गेली. आपण ज्या काही समस्या मांडतो त्याची कागदपत्रे मिळवणे योग्य असते. त्यामुळे त्यास वजन प्राप्त होते. गंगापूर धरणावरील बोट क्लबसंदर्भात पर्यावरण कार्यकर्त्यांनी विविध परवानग्यांची कागदपत्रे मिळवली. त्या आधारेच तेथे बोटींग करणे अशक्य असल्याचे सिद्ध झाले, असेही त्यांनी सांगितले.


अधिकार व कर्तव्ये समजून घ्या
सिटिझन रिपोर्टरने आपले अधिकार आणि कर्तव्ये समजून घ्यायला हवीत. समाजातल्या काही समस्यांना वाचा फोडताना त्या निष्पक्ष आणि कोणताही गैरहेतू न ठेवता काम करायला हवे. आपण समाजातले एक सजग नागरिक म्हणून समस्या मांडण्याचे काम करत आहोत, हे कर्तव्य लक्षात घ्यावे. तसेच सिटिझन रिपोर्टर्सनी समस्या मांडताना योग्यता व खात्रीपूर्वक त्या मांडायला हव्यात.

चौफेर अभ्यास हवा
सिटिझन रिपोर्टर म्हणून भूमिका मांडताना प्रत्येकाने चौफेर अभ्यास करायला हवा. प्रत्येक क्षेत्राची पूर्ण माहिती घेऊनच त्यावर भाष्य करायला हवे. कोणत्याही क्षेत्राची माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट हे सोपे माध्यम आहे. अधिकृत माहिती मिळवण्यासाठी सरकारी वेबसाइटचा फायदा सिटिझन रिपोर्टरने करून घ्यायला हवा.

लिहिताना भाषा महत्त्वाची
सिटिझन रिपोर्टर अॅपच्या माध्यमातून समस्या पाठवत असताना त्यातील माहिती ही शुद्ध भाषेत असायला हवी. मुख्यत्वे बोलीभाषा, प्रचलित शब्द आणि सहजसोप्या मराठीचा वापर करायला हवा. आपले म्हणणे योग्यरित्या समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहज-सोपी मराठी वापरणे योग्य आहे.

ऑनलाइन आंदोलने
सध्या सोशल मीडिया हा आंदोलनाचा भाग झाला आहे. नव्याने सोशल मीडियावर हॅशटॅग मोहिमा राबविल्या जातात. या माध्यमातून समस्यांना वाचा फोडणे शक्य होत आहे. हा सिटिझन जर्नालिझमचा एक भाग झाला आहे. मात्र, यात कोणतीही माहिती पोस्ट करताना त्याची खात्रीशीर पडताळणी करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. हे सिटिझन रिपोर्टसनी लक्षात घ्यावे.


आम्हाला बातमीच्या बाबतीत पडलेले प्रश्न या कार्यशाळेतून सुटले. सिटिझन रिपोर्टरचे स्थान नेमके काय असते, याबाबत विस्तृत मार्गदर्शन कार्यशाळेतून मिळाले. असेच कार्यक्रम नियमित राबवावेत.
- अंजली धामणे

कार्यशाळा खूप छान झाली. येवलेकर आणि शुक्ल यांचे मार्गदर्शन उत्तम झाले. प्रिंट मीडियातील बातमीबरोबरच सोशल मीडिया कशा पद्धतीने हाताळला पाहिजे, याची माहिती मिळाली. मुळात सिटिझन रिपोर्टर हे ‘मटा’ने आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले फार मोठे व्यासपीठ आहे.
- संजय निकम

बातमीसंदर्भात उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेच्या माध्यमातून सिटिझन रिपोर्टर या नात्याने काम करण्यासाठी नवीन दृष्टी मिळाली. सिटिझन रिपोर्टरच्या मर्यादा समजल्या. त्यासोबतच पत्रकारीतेतील चांगले अनुभव ऐकायला मिळाले.
- अनिल जगताप

पत्रकारितेतील बारकावे या कार्यशाळेतून समजले. शब्द कसे वापरावेत, बातमी कशी द्यावी, याची संपूर्ण माहिती मिळाली. बातमीचे टायमिंग काय असले पाहिजे, याचादेखील धडा यातून मिळाला.
- शशीकांत खडताळे

मटा सिटिझन रिपोर्टरसाठी चांगले मार्गदर्शन मिळाले. सिटिझन रिपोर्टर नाशिकला एक चांगले शहर बनवू शकतो, हे कळाले. प्रेरक शब्दांचा वापर आणि माहिती नसलेल्या गोष्टींचे बारकावे समजले. यासाठी ‘मटा’चे धन्यवाद.
- राजेंद्र राजधर

हा कार्यक्रम आम्हा सर्वांना उत्तम मार्गदर्शन देणारा ठरला आहे. याद्वारे सिटिझन रिपोर्टरकडून होणाऱ्या चुका कळाल्या. त्रास न होणारी भाषा वापरणे व इम्पॅक्टफुल बातमी कशी द्यावी, हे समजले. सोशल मीडियाचा पण कसा वापर करावा, हे लक्षात आले. यासाठी मटाचे विशेष धन्यवाद.
- जय जोशी

कार्यक्रम अत्यंत छान व महत्त्वाचा होता. यातून आम्हाला एक चांगल्या रिपोर्टरने कसे काम करावे, याचे सखोल ज्ञान मिळाले व यापुढे काय काळजी घ्यावी आणि कशा प्रकारच्या बातम्यांवर भर द्यावा, याची ही माहिती मिळाली, यासाठी मटाचे आभार.
- चंद्रकांत महाले

मटा सिटिझन रिपोर्टर मार्गदर्शनासाठीचा हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त होता. यातून आम्हाला एका चांगल्या रिपोर्टरच्या जबाबदारीचे भान आले. आणखी चांगली बातमी देत नाशिकला स्वच्छता यादीत अव्वल स्थान मिळण्यासाठी कार्यरत राहण्याची स्फूर्ती मिळाली.
- विनायक येवले

मटा सिटिझन रिपोर्टर्ससाठीच्या या कार्यक्रमाद्वारे आम्हाला अतिशय उत्तम माहिती मिळाली. बातम्यांचे स्वरूप काय, कसे लिहावे, शब्दांचा वापर आणि सामाजिक भान ठेवत बातमी कशी लिहावी, याची महत्त्वाची माहिती मिळाली.
-चंद्रशेखर साठे

महाराष्ट्र टाइम्सने सिटिझन रिपोर्टरसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचा आम्हाला फार फायदा झाला. प्राध्यापक अनंत येवलेकर यांनी अतिशय सोप्या भाषेत पत्रकारिता आम्हाला समजावली. निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. हा उपक्रम वेळोवेळी राबवला जावा अशी आमची इच्छा आहे.
- भारत भुरे

शहरात अनेक समस्या आहेत. त्या निर्भीडपणे मांडण्याचे बळ आम्हाला सिटिझन रिपोर्टर होऊन मिळाले. असे काम आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने कसे करावे याचे मार्गदर्शन मिळाले. एक रिपोर्टर म्हणून कसं काम करावं याचं मार्गदर्शन मिळाले. लोकोपयोगी कार्य करण्याची प्रेरणा दोन्ही मान्यवरांच्या बोलण्यातून मिळाली.
- सुनीता ससाणे

महाराष्ट्र टाइम्सची टीम वेळोवेळी उत्तम कार्यक्रम आयोजित करत असते. त्यातून समाज जागृती हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. दीड वर्षांपूर्वी सिटिझन रिपोर्टर त्यांनी नुसते नेमले नाहीत, तर एक उत्तम रिपोर्टर घडवण्याचेदेखील ते करत आहेत. आज झालेला कार्यक्रम हे त्याचंच उदाहरण आहे.
- सागर शेवाळे

कार्यक्रम अतिशय छान झाला. ही कार्यशाळा असूनही कंटाळवाणी झाली नाही. अनंत येवलेकर यांनी आलेल्या अनुभवातील उदाहरण देऊन कार्यक्रम खुमासदार केला. पत्रकारिता हे जबाबदारीचे काम आहे, हे समजावले. आपले व्याप सांभाळून रिपोर्टिंग कसे करावे, ते या कार्यशाळेतून समजले. असे कार्यक्रम नेहमी होत रहावेत, आणि आम्हाला मार्गदर्शन मिळावे अशी आमची इच्छा आहे.
- विदुला अष्टेकर

मी एक गृहिणी आहे. एक वर्षापासून सिटिझन रिपोर्टर म्हणून काम करत आहे. या कामामुळे मला आपण समाजासाठी काही तरी चांगले करीत असल्याची प्रेरणा मिळते. या कार्यशाळेतून बातमी कशी असावी, ते मला समजले. पत्रकारितेबद्दल शास्त्रशुद्ध माहिती मिळाली. मी सिटिझन रिपोर्टर असल्याचा आज अभिमान वाटतो.
- संगीता सोनवणे

वृत्तपत्र वाचकाला आपला एक भाग बनवून महाराष्ट्र टाइम्सने फार मोठा मान दिला आहे. तरुण मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला ही संधी उपलब्ध करुन दिली. एवढेच नाही, तर पत्रकार म्हणून काम कसे करायचे हेदेखील सांगितले. मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन आम्हाला प्रेरणा देणारे होते. यापुढेदेखील आम्ही एक जबाबदार पत्रकार म्हणून काम करू.
- समीर भडांगे

पहिल्यांदा अॅप डाउनलोड केले तेव्हा वाटले होते, आपल्याला बातमी जमेल का? पण आता एकदम सहज जमते. आम्हाला नुसते रेपोर्टिंग कसे करायचे हेच नाही तर भाषा, बातमीचे स्वरुप आणि बातमी करतानाची दक्षता याबद्दलही या कार्यक्रमातून कळाले. आता आम्ही अजून जोमाने आमचे काम करू. या कार्यशाळेमुळे आम्ही सगळे रिपोर्टर एकमेकांना भेटू शकलो आणि येणाऱ्या अडचणींना उत्तरही मिळाले.
- सौरभ अमृतकर
(संकलन : सौरभ बेंडाळे, लखन सावंत, योगेंद्र देवरे, पीयू शिरवाडकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनाची चर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

बॉश (मायको) कंपनीत कोट्यावधींच्या चोरी प्रकरणी अफवांचे पेव पसरले आहे. कंपनीतील कॉमन रेल इंजेक्टर (सीआरआय) या प्रकल्पातीतून तब्बल ११ कोटी रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याने तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची चर्चा सुरू होती. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून दुजोरा मिळू शकला नाही.

कामगार युनियनने कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापनाकडे संबंधित चोरी प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच रोजच युनियनची कंपनी व्यवस्थापनासोबत चोरी प्रकरणी बैठकाही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. चोरीसाठी मुख्य संशयित चौधरीला कंपनीतून मदत करणारे नेमके कोण, याचा तपास मात्र लागला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, ज्या सीआरआय प्रकल्पातील स्क्रॉपमधून चांगला माल चोरीला गेला होता. त्याच प्रकल्पातील तीन अधिकारी निलंबित केल्याची चर्चा दिवसभर कामगारांमध्ये रंगली होती. यात मात्र नेमके कोणाला निलंबित केले याची माहिती मिळू शकली नाही. तर पुढील काही दिवसात चोरी प्रकरणाची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. यासाठी लवकरच जर्मनीचे अधिकारी कंपनीत येणार असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौधरी बंधुंच्या कोठडीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर एमआयडीसीतील बॉश कंपनीतील स्पेअरपार्ट चोरी प्रकरणात अंबड पोलिसांनी आणखी एका संशयिताला बुधवारी (दि. १०) अटक केली. त्यामुळे गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांची संख्या चार झाली आहे. त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यापैकी संशयित चौधरी बंधू या दोघांच्या पोलिस कोठडीत १५ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील प्रमुख संशयित ताहेर अली मोहम्मद इदरीस चौधरी उर्फ छोटू व त्याचा भाऊ परवेजअली इदरीस चौधरी यांची पोलिस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. परवेझला (२४, रा. संजीवनगर, केवलपार्क, अंबड लिंक रोड) यास अजमेरानगर येथून अटक करण्यात आली. तपासात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता बळावली आहे.

छोटू चौधरी याच्याकडे बॉश कंपनीतील भंगार मालाचा ठेका आहे. कंपनीतील चांगले व डिफेक्टिव्ह स्पेअरपार्ट चोरून डिफेक्टिव्ह पार्टच्या दुरुस्तीसाठी सिडकोतील पंडितनगरमध्ये कारखानाच सुरू केला होता. कंपनीचे हे स्पेअरपार्ट विविध राज्यांमध्ये विक्री करून कंपनीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. अंबडच्या एका पोल‌िस उपनिरीक्षकासह दोन पोल‌िस कर्मचारी व राजकीय पुढाऱ्यांनी या प्रकरणात हात ओले केल्याच्या चर्चेने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. हे प्रकरण उघड होऊ नये, यासाठी राजकीय हस्तक्षेप आणि आर्थिक देवाण-घेवाणीद्वारे प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चाही रंगली आहे.

कोणालाही पाठिशी घालणार नाही
या प्रकरणातील सर्व संशयितांची चौकशी केली जाणार आहे. राजकारणी, पोल‌िस कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कंपनीतून माल चोरताना चौधरी याला कंपनीत कोणाची साथ होती, बनावट माल कुठे विक्री केला जात होता अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरावाडीत तरुणांचे मोबाइल लुटले

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

हिरावाडी परिसरातील एनआयटी महाविद्यालयाच्या मागील बाजूस फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांचे मोबाइल व रोख रक्कम वाघाडी येथील चौघा संशयितांनी लुटून नेल्याची घटना शनिवारी (दि. ६) घडली. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

या प्रकरणी वैभव पांडुरंग घोडे (रा. चेहडी पंपिंग, नाशिकरोड) याच्यासह त्याचे मित्र अमोल घुगे, आकाश भोये, शुभम आंबेकर हे शनिवारी (दि. ६) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एनआयटी महाविद्यालयाच्या मागील बाजूस गेले होते. तेथे संशयित मोहन सुभाष निसाळ (२०, रा. वाघाडी पंचवटी) व त्याचे तीन साथीदार यांनी त्यांना अडविले आणि त्यांच्या खिशातील मोबाइल व रोख रक्कम असा ३७ हजार ६०० रुपयांचा ऐवज संशयीतांनी बळजबरीने लूटून नेला. त्यात अमोल घुगे याच्या खिशातील पंधरा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल व पाच हजार रुपयांचा मोबाइल, आकाश भोये याच्या खिशातील पाच हजार रुपयांचा मोबाइल, शुभम आंबेकर याच्या खिशातील आठ हजार रुपयांचा मोबाइल व चार हजार ६०० रुपये रोकड यांच्या समावेश आहे.

पंचवटी परिसरात पेठनाका येथे व्यापाऱ्याकडून दोन लाख रुपयांची लूट, त्यानंतर दिंडोरी नाका दोन व्यक्तींकडून मोबाइल व रोख रकमेची लूट असे प्रकार घडल्यानंतर हिरावाडीतही लुटीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक धुरळा उडणार

0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे तालुक्यात ऐन कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर होणाऱ्या बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने या निवडणुकीत खऱ्या अर्थाने आता उमेदवारांचा कस लागणार आहे.

राज्य सरकारने निवडणूक नियमात बदल केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात प्रथमच नव्या अधिनियमानुसार पहिली सार्वत्रिक निवडणूक सटाणा व नामपूर बाजार समितीची होत आहे. या निवडणुकीविषयी संपूर्ण जिल्ह्यात उत्साह शिगेला पोहचला आहे. पूर्वी ग्रामपंचायत, सोसायटी गटांतून होणाऱ्या निवडणुकीत बोटावर मोजण्याइतके मतदार असल्याने एका ठराव‌कि गटाची व पक्षांची सत्ता बाजार समितींवर असायची. या बाबीला शह देण्यासाठी शासनाने कसेल त्याची जमीन या धर्तीवर सातबारा असेल तो शेतकरी मतदार, हा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून निवडणूक अधिनियमात बदल केले. त्यामुळे या दोन्ही बाजार समितींच्या निवडणुकीत प्रथमच दहा गुंठेधारक शेतकरीही मतदानास पात्र ठरणार आहे. परिणामी वर्षानुवर्षे बाजार समितीत ठाण मांडून बसलेल्या संचालकांना यामुळे धक्का बसणार आहे.

याद्या तयार करणे सुरू

शासनाने बाजार समिती परिसरातील शेतकऱ्यांना सभासद करण्याचा निर्णय घेतल्याने ते शेतकरीही मतदानात सहभागी होतील. सध्या सटाणा व नामपूर बाजार समितीसह जिल्हा निवडणूक विभाग मतदार याद्या करण्याचे काम करीत आहे. बागलाण तहसीलदार यांच्या दालनात देखील या संदर्भातील कामांनी वेग घेतला आहे. येत्या १२ जानेवारीपर्यंत प्रारूप मतदार यादी निश्चित होईल. सटाणा तालुक्यात सध्या १ लाख ७० हजार शेतकरी खातेदार आहेत. त

्यातील दहा गुंठे शेतजमीन ज्यांच्या नावावर आहे ते यावेळी मतदान करू

शकणार आहेत.

सध्या प्रशासकीय मंडळ

आघाडी सरकारच्या कार्यकाळात सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होऊन नामपूर बाजार समिती अस्त‌त्त्विात आली. सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ७५ गावांचा समावेश आहे. तर नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ९६ गावांचा समावेश आहे. विभाजनानंतर ३० एप्रिल २०१५ पासून १८ जुलै २०१६ पर्यंत सटाणा व दिंडोरी येथील सहाय्यक निबंधक कामकाज बघत होते.

भारतीय जनता पक्षांची सत्ता आल्यानंतर १९ जुलै २०१६ रोजी भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची प्रशासकीय मंडळात वर्णी लावण्यात आली. ते प्रशासकीय मंडळ आजही कार्यरत आहे. नव्या अधिनियमानुसार बाजार समितीची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राध‌किरणाच्या माध्यमातून होत आहे. यात गावनिहाय खातेदारांची संख्या विचारात घेऊन गावांचे एकुण १५ गणांमध्ये विभाजन होणार आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्राचे गणांमध्ये विभाजन करतांना प्रत्येक गणात साणारण समान खातेदार संख्या विभागण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोण होणार सभापती?

0
0

मालेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापत‌पिदासाठी येत्या १८ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. सध्यस्थितीत शिवसेना-भाजपमधील ताणलेले संबंध व माजी सभापती प्रसाद हिरे यांची भूमिका यामुळे सभापत‌पिदी कोणाची वर्णी लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे हे कामकाज पाहणार आहेत. १८ जानेवारी रोजी दुपारी बारापासून निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. यात नामनिर्देशनपत्र दाखल करणे, त्याची छाननी, अर्ज माघारी आणि गरज असल्यास मतदान प्रक्रिया राबविली जाईल. सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकी हालचाली गतिमान झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीत कुडकुडत होते नवजात अर्भक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील कर्हे-देवळाणे रस्त्यावर बुधवारी पहाटे पुरूष जातीचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर कडाक्याच्या थंडीत त्याला शेतात टाकून त्याच्या आईने पोबारा केल्याने संताप व्यक्त होत आहे. त्या नवजात शिशूच्या आईचा शोध घेण्याचे आव्हान जायखेडा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

तालुक्यातील कर्हे-देवळाणे रस्त्यावर इच्छामणी गणपती मंदिराजवळ युवराज श्रावण काकुळते राहतात. ते नेहमीप्रमाणे पहाटे चार वाजता उठून गोठ्याची स्वच्छता करण्यासाठी गेले असता त्यांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता त्यांना पुरूष जातीचे जिवंत अर्भक दिसले. प्रचंड थंडीत कोणत्याही कापडाविना अर्भक कुडकुडत होते. साधारण तीन ते चार तासांपूर्वीच त्याचा जन्म झाला असावा. काकुळते यांनी ताबडतोब आपल्या पत्नीला बोलावून अर्भकाला पांघरून घातले. तसेच पोलिसपाटील अशोक अहिरे यांना माहिती दिली.

थोड्याच वेळात या अर्भकाला सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्या अर्भकाची प्रकृती स्थिर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांनी घेतली ‘मांजा हटवा, पक्षी वाचवा’ची शपथ

0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

मकरसंक्रांतीचा सण जवळ आला की पतंगप्रेमींना पतंगोत्सवाचे वेध लागतात. मात्र निरनिराळ्या आकराचे पतंग उडविण्यासाठी पक्ष्यांसाठी घातक असलेला मांजा वापरजा जातो. त्यामुळे यंदाच्या मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर करू नये, असे आवाहन शहरातील वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.

‘मांजा हटवा, पक्षी वाचवा’ असा संदेश प्राथमिक शाळेतील मुलांनी दिला आहे. पतंग उडवण्यासाठी मांजाचा उपयोग केला जातो. मांजावर नियमाने बंदी असली तरीही पतंगाने आभाळात उंच भरारी घेण्यासाठी मांजाचा सर्रास वापर केला जातो. अशा पतंगप्रेमींना या चिमुरड्यानी केलेले आवाहन विचार करायला लावणारे आहे.

या आनंदाच्या उत्सवात नायलॉन व काचेच्या तसेच धातूमिश्रित मांजामुळे पक्ष्यांच्या पंखांना दुखापत होते. अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात. तसेच या मांजामुळे दुचाकीस्वारांनाही अपघाताला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी मांजामुक्तीची शपथ घेतली. याप्रसंगी शिक्षक गोरख सानप यांनी मांजामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. मांजामुळे घडलेल्या अपघातांची तसेच जखमी झालेल्या पक्ष्यांची वृत्तपत्रातील कात्रणे दाखवली. शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव यांनी विद्यार्थ्यांना मांजामुक्तीची शपथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खांदेपालटाचा इशारा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

महापालिकेच्या कारभारात एकच आमदाराची सुरू असलेली चलती, पदाधिकाऱ्यांची गटबाजी अन् सैराट कारभारामुळे शहरात भाजपची बदनामी होत असल्याचे इनपूट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. खासदार आणि आमदारांच्या एका गटाने पालकमंत्री गिरीश महाजन आणि शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या एकूणच कंट्रोलची कहानी मुख्यमंत्र्यांकडे विशद केल्यानंतर त्यांनी दोन्ही गटांना गटबाजी थांबवून काम करण्याचा सल्ला दिला आहे. परिस्थिती सुधारली नाही तर खांदेपालटाची तयारी करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केल्यानंतर नाशिककरांना भाजपला पूर्ण बहुमत दिले. परंतु महापालिकेत नियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सैराट कारभारामुळे मुख्यमंत्र्यांवर आता तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. शहरात तीन आमदार असतांना सुद्धा निर्णय प्रक्रियेत फक्त पालकमंत्री गिरीश महाजन आणि शहराध्यक्ष सानप यांच्याच आदेशाने कारभार सुरू आहे. त्यामुळे पक्षाचे अन्य आमदार आणि खासदारांमध्ये मोठी नाराजी आहे. महाजन यांनी पालकत्वाचे अधिकार सानप यांच्याकडे हस्तांतरीत केल्याने महापालिकेत निर्णय घेतांना अन्य आमदारांना तसेच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. पालिकेतील कारभारावर विश‌ष्टि गटाचाच दबदबा असल्याने भाजपच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रारी केल्या आहेत. तर महापालिकेतील महापौरांसह, पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली गटबाजी, अधिकाऱ्यांची स्वेच्छा निवृत्तीमुळे पालिकेचा कारभार भरकटला आहे. त्यातच पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे पालिकेची बदनामी होत असल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचल्या आहेत. आमदारांसह काही पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे.

यापार्श्वभूमीवर खासदारांच्या नेतृत्वाखालील एका गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रात्री उश‌रिापर्यंत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेत खडे बोल सुनावले. मुख्यमंत्र्यांनी टाळी एका हाताने वाजत नसल्याचे सांगत, तक्रारकर्त्यांनाही फटकारले. तर विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या भरकटलेल्या कारभारावरही बोट ठेवत यापुढे तक्रारी खपवून घेणार नसल्याचा दम भरला. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत.

त्यामुळे कारभारात सुधारणा करा, अन्यथा कठोर निर्णय घेवून अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी कानउघाडणी केली. पदाधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याचा सल्ला देत, वाद टाळण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच विकासकामांना प्राधान्य देण्याचा सल्ला देत, परिस्थिती सुधारली नाही तर खांदेपालटाची तयारी करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा आहे.


आमदार सानपांना दिला सबुरीचा सल्ला

महापालिकेच्या कारभारात सध्या आमदार बाळासाहेब सानप यांचा शब्द प्रमाण मानला जातो. सानपांकडून आलेला शब्द हा पालकमंत्र्यांकडून तर पालकमंत्र्यांचा शब्द मुख्यमंत्र्याकडून आल्याचे प्रमाण मानले जाते. परंतु अशी स्थिती भासवली जात असल्याचा दावा दोन आमदारांनी केला असून, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या नावाने नको ते विषय मार्गी लावले जात असल्याच्या तक्रारी आमदारांनी केल्या आहेत. महाजन, सानप यांना आवरा असा सूर तक्रारींमध्ये आल्याने मुख्यमंत्र्यांनी सानपांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला असून, निर्णयात सर्वांना विश्वासात घेण्याचा सल्ला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनोधैर्य’ची जबाबदारी विधी सेवा प्राधिकरणाकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच अॅसिड हल्ल्यातील पीडित महिला अथवा मुलींना मनोधैर्य योजनेतंर्गत आर्थिक मदत वाढवण्यात आली आहे. ही योजना राबवण्याचे काम आता राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत केले जाणार आहे.

पीडितांच्या पुर्नसनासाठी २०१३ मध्ये मनोधैर्य योजना सुरू केली. तसेच ही योजना राबवण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपवण्यात आले. या योजनेतंर्गत तीन लाख रुपयांपर्यंतची मदत करण्यात येत होते. मात्र, ३० डिसेंबर रोजी सरकारने मनोधैर्य योजनेत महत्त्वाचा बदल केला. आता या योजनेला सुधारित मनोधैर्य योजना म्हटले जाते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने राज्य सरकारने हा बदल केला आहे. यापूर्वी पीडितांना गुन्हा दाखल झाल्यानंतर किमान दोन लाख तर विशेष प्रकरणात ३ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जात होती. ही प्रकरणे मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा गुन्हेगारी क्षती सहाय्य व पुनर्वसन मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळामार्फत प्रत्येक प्रकरणाची शाहनिशा करून मदत दिली जात होती. यात बराच कालपव्यप होत होता. तसेच रक्कमही पुरेशी नसल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मंत्रालय समितीच्या सूचनानंतर नवी योजना विकसित केली आहे.

असे आहेत सुधारित बदल
सुधारित मनोधैर्य योजनेनुसार, बलात्काराच्या गुन्ह्यातील विविध कलम, बालकांवरील लैंगिक आत्याचार, अॅसिड हल्ला, अनैतिक व्यापर प्रतिबंधक अधिनियमानुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १८ वर्षाखालीला मुलींना याचा लाभ मिळणार आहे. पीडितेने अर्ज केल्यापासून ७ दिवसाच्या आत तिला ३० हजार रुपये रक्कम मिळेल. तर उर्वरित रक्कम १२० दिवसात टप्याटप्याने दिली जाईल. सदर योजनेसाठी मागणीचा अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करावा लागेल. अर्थसाहय्य मंजुरीपासून पूर्ण रक्कम देण्याचे अधिकार विधी सेवा प्राधिकरणास दिले आहेत. दरम्यान, जबानी फिरवणे, खोटी तक्रार अथवा गुन्हा सिद्ध न झाल्यास अर्थसाह्य वसूल करण्याचेही अधिकार प्राधिकरणास आहेत.

सुधारित मनोधैर्य योजना विधी प्राधिकरणामार्फत राबविली जाणार आहे. याबाबतचा आदेश प्राप्त झाला असून, अर्थसहाय्य तीन लाखांवरून १० लाख रुपये करण्यात आले. यामुळे जलद तसेच पारदर्शक काम होण्यास मदत मिळेल.
- एस. एम. बुक्के, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बापट खोटे बोलत नाही

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या ‘वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे,’ या टिपणीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवली. नाशिक येथे त्यांनी सरकारवर जोरदार टोलेबाजी केली. ‘बापट अस्सल पुणेकर आहेत. जुने नेते आहेत. ते कधीही खोटे बोलत नाहीत. त्यांच्या जे पोटात होते, ते ओठावर आले आहे. सरकारबद्दल त्यांनी केलेली टिप्पणी खरी आहे,' असे सांगत राऊत यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी खासदार संजय राऊत आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या कारभारावर त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. वर्षभरानंतर हे सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे मागायच ते आताच मागून घ्या, असे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या बापट यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करताना केले. या वक्तव्याचा आधार घेत राऊत यांनी बापट यांना जोरदार टोला लगावला. बापट अस्सल पुणेकर आहेत. ते जुने नेते आहेत. कधीही खोटे बोलत नाहीत. त्यांच्या पोटात होते, ते ओठांवर आले आहे, असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी कोरेगाव भीमा प्रकरण आणि मुंबईतील आगीच्या घटनांवरही भाष्य केले. पुण्यातील एल्गार सभेला उमर खालिदला का बोलावलं? त्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करणं चुकीचे आहे. महाराष्ट्र जातीपातीत विभागला जात आहे. हे धोकादायक आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांसाठी विशेष सत्र बोलवा

देशभरातील शेतकऱ्यांचे प्रश्न वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र आयोजनाची ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांची मागणी रास्त असल्याचे राऊत यांनी सांग‌तिले. जर तीन तलाकच्या विषयावर विशेष सत्र बोलावले जाऊ शकते तर मग शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विशेष सत्राचे आयोजन का केले जाऊ नये? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका’

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार खोटे बोलून लोकांना फसवून सत्तेत आले आहे. गुजरातमध्ये मोदींचा मतदार संघात भाजपचा पराभव झाला आहे. भाजपचे मंत्र गिरीश बापट याच्या तोंडूनच एका वर्षात सरकार बदलणार, असे सत्य बाहेर पडले आहे. तेव्हा राज्यात कधीही निवडणुका लागतील अशी परिस्थिती आहे. तसेच निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असा ठाम विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत त्यांनी व्यक्त केला.

आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीसंदर्भात तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राऊत बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना संपर्क प्रमुख सुहास सामंत, रवींद्र पाटील, श्रीकांत पाटील, जिल्हाप्रमुख सुहास कांदे, नरेंद्र दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. महानगरप्रमुख रामा मिस्तरी यांनी प्रास्ताविकातून शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा मांडला. राऊत म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजप केवळ जाहिरातबाजी व मार्केटिंग करून सत्तेत आले आहे. गेल्यावेळी त्यांनी लोकांना फसवले.येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना फसव‌ल्यिासशिवाय राहणार नाही. राऊत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रेरणा’त साकारणार गणेशाची १२५ रुपे

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरच्या महिला विभागाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी १९ ते २१ जानेवारीपर्यंत सिटी सेंटर मॉल जवळीत लक्षिका मंगल कार्यालयात प्रेरणा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नाशिकचे प्रसिद्ध रांगोळीकार नीलेश देशपांडे हे ६५० मिनिटांत गणेशाची १२५ विविध रुपे रांगोळीतून साकारुन विश्वविक्रम करणार आहेत.

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी राज्यातील विविध शहरात प्रेरणा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनाचे हे पाचवे वर्षे असून, त्यात ५० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. त्यात महिला उद्योजकांचे बचतगट सदस्यांना आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्याची संधी देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सर्वांनी सहभाग घेऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, महिला उपसमितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे, शुभांगी तिरोडकर, योगिनी देशपांडे, दिपा चांगराणी, रोहिणी नायडू, डॉ. गायत्री फडे यांनी केले.
एकाच छताखाली

विविध प्रकराचे वस्त्रे, खाद्यपदार्थ, अलंकार, गृह सजावट, सौंदर्य प्रसाधने असणार आहेत. या प्रदर्शनातच चित्रकला, मोदक बनवणे, माझा बाप्पा, अथर्वशीर्ष पठण, यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रांगोळी, फॅशन डिझाईन, मेंदी, मेकअप, सुलेखन व वारली पेटिंगवरही कार्यशाळा होणार आहे. त्याचप्रमाणे पतंग महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. मोफत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणीसह महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

असा असेल विश्वविक्रम

नाशिकचे रांगोळीकार नीलेश देशपांडे हे ६५० मिनिटांत गणेशाची १२५ विविध रुपे रांगोळीतून साकारुन विश्वविक्रम करणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर गणेश गीत व गणपती अथर्वशीर्षाचे पठण होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आगळा वेगळा ठरणार आहे. प्रत्येक रांगोळी ही दीड बाय दीड फुटाची असणार आहे. १९ तारखेला पहाटे पाचपासून या रांगोळीला सुरुवात होणार असून, ११ तासात १२५ रुपे रांगोळीत साकारले जाणार आहे.

रौप्यमहोत्सवानिमित्त रेकॉर्ड

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवानिमित्त गणेश जयंतीचे औचित्य साधून हा विश्वविक्रम केला जाणार आहे. त्याची नोंद जिनीयस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याअगोदर १११ रुपे साकारण्याचे रेकॉर्ड असून त्यासाठी वेळ मात्र जास्त लागला होता. यावेळेस देशपांडे कमी वेळात ही कलाकृती सादर करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images