Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

चांदीच्या रथात निघाली नाथांची स्वारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

निवृत्त‌िनाथ महाराज यात्रेतील ज‌िवाशीवाची भेट घडविणारा रथोत्सव सोहळ्यास दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रारंभ झाला. वारकरी पारंपरिक पद्धतीने श्री संत निवृत्त‌िनाथांची पालखी भगवान त्र्यंबकराजाच्या भेटीला रथातून घेऊन जातात. ज‌िवाशिवाची ही भेट वारकरी पताका नाचवत टाळ, मृदुंग आणि विणेकरी आणि तुळसधारी महिला यांच्या समवेत अवर्णनीय असे दृष्य अवतरले होते.

निवृत्त‌िनाथ महाराज यात्रेत तीन वर्षांपासून चांदीचा रथ हे खास आकर्षण ठरले आहे. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान संत निवृत्त‌िनाथ महाराजांची पालखी असलेला चांदीचा रथ भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात आला तेव्हा ही भेट याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक उपस्थित होते. रथास लोणारवाडी सिन्नर येथील भाविक शेतकऱ्याची बैलजोडी होती. यात्रा पटांगणाच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या रथासमवेत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. संजयमहाराज धोंडगे, सचिव पवनकुमार भुतडा, त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलीक थेटे, ललिता शिंदे, रामभाऊ मुळाणे, मोहन महाराज बोलपूरकर, बाळासाहेब महाराज देहूकर, बालसाहेब डावरे, आळंदीचे राजाभाऊ चोपदार आदी मानकरी मंडळी अग्रभागी होते. भगवान त्र्यंबकेश्वर मंदिरात अभंग सेवा सादर करण्यात आली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
पौषवारी निमित्ताने पहाटे पाच वाजता संत निवृत्त‌िनाथ समाधीची शासकीय महापूजा पालकमंत्री गिरीश महाजन आणि त्‍यांच्‍या पत्‍नी यांच्या हस्ते झाली. समवेत नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर हे सपत्नीक पूजेस बसले होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, आमदार जे. पी. गावित, भाजप शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र, समाधी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय महाराज धोंडगे, सचिव पवनकुमार भुतडा, उपनगराध्यक्ष स्वप्‍निल शेलार, गटनेता समीर पाटणकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

लवकरच प्रशासकीय अधिकारी
वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत श्रेष्ठ श्री निवृत्त‌िनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर जिर्णोद्धार कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी घोषणा जलसंपदा, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यात्रोत्सवात महापूजेच्या दरम्यान केली. येथील निसर्ग आणि पौराणिक ठेवा यांचा उपयोग पर्यटनवाढीसाठी होईल, असा विश्वासही त्यांनी या प्रसंगी केला. संत निवृत्त‌िनाथ महाराज समाधी मंदिर नव्याने काळ्या पाषाणात बांधण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गत महिन्यात झाले आहे. या कामास आता गती येणार, असा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला आहे.

संस्थानला द्या पाठबळ
महापूजेनंतर ऋणनिर्देश सभा झाली. सभेत संस्थानचे अध्यक्ष संजय महाराज धोंडगे यांनी प्रास्ताविकात संस्थानातर्फे झालेल्या कामाची माहिती दिली. भव्य समाधी मंदिर उभारण्यासाठी सरकारकडून तीर्थक्षेत्राप्रमाणे निधी आणण्यासाठी संस्थानच्या पाठीशी उभे राहून वारकऱ्यांच्या आद्यपीठाचा विकास करावा, अशी मागणी केली. यावेळी समाधी संस्थान व नगरपालिकेतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शांताराम बागूल, संतोष भुजंग, हर्षल शिखरे, सुयोग वाडेकर, भावेश शिखरे, प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार महेंद्र पवार, पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

पालघरच्या दाम्पत्यास मान
यंदा शासकीय पूजेनंतर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सारशी येथील आरती व अनिल ठाकरे या दाम्पत्यास प्रथम दर्शनाचा मान मिळाला. त्यांच्यानंतर भिवंडी तालुक्यातील सागाव येथील रुपाली व रघुनाथ पाटील यांनी दर्शन घेतले. या सगळ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठवणीतल्या सुपरहिरोंनी गाजवला दिवस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक:

सध्याच्या टीव्ही, संगणक व मोबाइलच्या युगात मुलांना हॅरी पॉटर, स्पायडर मॅन माहीत आहे मात्र त्यांना गोट्या, फास्टर फेणे माहितच नाही. या पुस्तकांच्या वाचनातून मुलांच्या मनासमोर प्रतिमा उभी राहायची पण हल्लीच्या पिढीला हे सुपरहिरो माहीत नाही. हे सुपरहिरो माहीत व्हावे त्यासाठी नाटकांमधून ते दाखविण्याचा दिग्दर्शकांचा उद्देश सफल झाला.

दीपक मंडळाच्या सांस्कृतिक विभागातर्फे सादर झालेल्या गोट्या नाटकात हा सुपरहिरो दाखविण्यात आला. तसेच विद्या प्रबोधिनी प्रशालेच्या नाटकात ज्ञानेश्वर महाराज दाखविण्यात आले. सिद्राम सुडोकू हेदेखील असेच कॅरेक्टर नाटकातून रंगविण्यात आले.

गोट्या नाटकाचे लेखन प्राजक्ता पंचाक्षरी यांनी केले होते. दिग्दर्शन किरण कुलकर्णी, संगीत कैवल्य, प्रकाशयोजना कुंतक गायधनी, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा जय शुक्ल यांची होती. नाटकात अथर्व कुलकर्णी, प्रथमेश पाडवी, संहिता देशपांडे, प्रतिक शुक्ल, मंत्रणा देव यांनी भूमिका केल्या.

‘ताटी उघडा’ नाटकाचे लेखन सुजीत जोशी यांचे होते. दिग्दर्शन नुपूर सावजी यांचे होते. नाटकात मधुरा कट्टी, हर्ष कुलकर्णी, सुशांत दळवी, सुमती कुलकर्णी, ईशा गायकवाड, श्रुतिका पाटील यांनी भूमिका केल्या. ‘सिद्राम सुडोकू’ हे नाटक बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव यांनी सादर केले. लेखन धनंजय सरदेशपांडे यांचे होते. दिग्दर्शन भक्ती शिंदे यांचे होते. नाटकात प्रणव बोरूडे, मुग्धा घेवरीकर, पराश नाईक, कौत्सुभ बोडखे, रेणुका गुजर यांनी भूमिका केल्या. अश्वमेध थिएटर्सचे ‘चौदाशे भागीले चौदा’ हे नाटक तांत्रिक कारणात्सव रद्द करण्यात आले.

आजची नाटक
नाट्य स्पर्धेत सकाळी १० वाजता कलाभ्रमंती संस्थेतर्फे गणेश सरकटे लिखित ‘ट्रॅजेडी’, सकाळी ११.१५ वाजता अग्नेय गुरूकुल लोकसेवा युवक प्रतिष्ठानतर्फे गौरी जोशी लिखित ‘मी एक बोन्साय’, दुपारी १२.३० वाजता आत्मा मलिक इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलतर्फे योगेश सोमण लिखित ‘झेप’ आणि दुपारी १.४५ वाजता अहमदनगर हौशी नाट्य संघातर्फे मधुरा झावरे लिखित ‘मुलाकात’ ही नाटके होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटो डीसीआर ऑफलाइनकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नगररचना विभागातील अनियमितता रोखण्यासाठी तसेच गतिमान कारभारासाठी मोठा गाजावाजा करून सुरू केलेली ऑटो डीसीआर यंत्रणा सहा महिन्यानंतरही सुरळीत होऊ शकलेली नाही. सॉफ्टटेक कंपनीने तयार केलेल्या प्रणालीत अनेक त्रुटी असल्याने अजूनही ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्रस्ताव सादर करावे लागत आहे. नगररचना विभागासाबेत कंपनीच्या अधिकाऱ्यांची क्रेडाईसह आर्किटेक्ट संघटनांच्या प्रतिनिधींसोबत शुक्रवारी बैठक झाली. यात कंपनीला त्रुटी सुधारण्यासाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला. परिस्थिती सुधारली नाही तर कंपनीला नोटीस काढली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा बांधकाम परवानग्या ऑफलाइनकडे जाणार असल्याचे चित्र आहे.

नगररचना विभागातील कारभार गतीमान करून बांधकाम परवाग्यांचा निपटारा दोन महिन्यात करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बांधकाम परवानग्या देण्याचे धोरण बदलून ऑटो-डीसीआर प्रणाली १ जूनपासून अंमलात आणली आहे. त्यासाठी सॉफ्टटेक इंजिनिअरिंग प्रा. लि. या संस्थेची नियुक्ती करण्यात आली. ऑटो डीसीआर प्रणाली लागू होण्यापूर्वी संबंधित संस्थेमार्फत नगररचना विभागातील सर्व अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आतापर्यंत ६२४ प्रकरणे दाखल झाली. यापैकी फक्त १३८ प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. जोपर्यंत पीडीएफ फाईल हाती येत नाही तोपर्यंत बांधकाम परवानगीचा दाखला मिळाला असे ग्राह्य धरता येत नाही. १३८ प्रकरणे मंजूर झाली असली तरी सर्टीफिकेटच्या १५ फाईल फक्त वास्तुविशारदांना मिळाल्या. प्रकरण दाखल केल्यानंतर एसएमएस प्राप्त होण्यापासून ते संथगतीने सुरू असलेल्या कामांबाबत वास्तुविशारदा व बांधकाम व्यावसायिकांनी तक्रारींचा भडीमार केला. परंतु, संबधित कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याने बांधकाम परवानग्यांसाठी अजूनही ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज सादर करावे लागत आहे. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचा कल ऑफलाइनकडे असून कंपनीच्या मदतीने परवानग्यांमध्ये अंनत अडचणी उभ्या केल्या जात आहे.

ऑटो डीसीआर प्रणालीच्या वापरासंदर्भातील त्रुटींसंदर्भात क्रेडाई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनीअर्स असोसिएशन, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीअरच्या प्रतिनिधींनी आयुक्तांकडे तक्रार केली. यानंतर आयुक्तांनी समन्वय समिती स्थापन केली. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण केले होते. त्यानुसार शुक्रवारी कंपनीचे अधिकारी भिमसेन मिश्रा यांच्या उपस्थितीत नगररचना विभागाचे अधिकारी, बांधकाम व्यवसायाशी निगडीत संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. ऑटो-डीसीआर प्रणाली सात महिने लागू होऊन सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्याने ऑफलाइन काम करावे लागत असल्याच्या तक्रारी क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी केल्या. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे यावेळी सॉफ्टवेअरच्या त्रुटी संदर्भात यादी सुपूर्द करण्यात येऊन त्रुटी आठ दिवसात सोडविण्याचा अल्टीमेटम देण्यात आला. त्रुटी दूर झाल्या नाहीत तर पुन्हा ऑफलाइन काम सुरू करण्याची मागणी संघटनांनी केली. यावर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे ऑटो डीसीआर प्रणालीची वाटचाल पुन्हा ऑफलाईनकडे जाण्याची शक्यता असून कंपनीवर केलेला खर्चही वाया जाण्याची भीती आहे. क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, उदय घुगे, एसीसीईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय सानप, एसीसीईचे अध्यक्ष पुनीत रॉय, आर्किटेक्‍ट ऍण्ड इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गुळवे, आर्किटेक्‍ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप काळे, विवेक जायखेडकर, रसिक बोथरा यांच्यासह नगररचना विभागाचे सहसंचालक आकाश बागूल, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण, संगणक विभाग प्रमुख प्रशांत मगर उपस्थित होते.

अधिकाऱ्यांची उदासिनता
महापालिकेने जवळपास दीड कोटी रुपये खर्चून ऑटो डीसीआर प्रणाली कार्यान्वित केली आहे. परंतु, नगररचना विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचीच मानसिकता ऑफलाइनची आहे. त्यामुळे ऑटो डीसीआर कंपनीच्या त्रुटीकडे बोट दाखवून ही प्रणालीच बंद करण्याचा घाट काही अधिकाऱ्यांनी घातला आहे. सर्व परवानग्या ऑनलाइन झाल्यास आर्थिक व्यवहार बंद होणार आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा फटका या सॉफ्टवेअरला बसत असल्याचे चित्र आहे. आयुक्तांनी ऑटो डीसीआर बंद होणार नसल्याचा दावा केला असला तरी अधिकाऱ्यांची वाटचाल बंद करण्याकडे असल्याचे चित्र आहे.

ऑटो डीसीआर संदर्भातील बांधकाम व्यावसायिकांच्या त्रुटींसदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. त्यांना त्रुटींची यादी सुपूर्द करण्यात आली असून आठ दिवसात परिपूर्णता करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यानंतर नोटीस बजावली जाणार आहे.
- आकाश बागूल, सहाय्यक संचालक, नगररचना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संख्याशास्त्रात करिअरसंधी

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

संख्याशास्त्र विषयात करिअर करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोलकाता येथील भारतीय संख्याशास्त्र संस्था या नामांकित संस्थेच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. संख्याशास्त्र विषयाशी निगडित विविध पदव्यांसाठीची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होत असून, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठीच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती संस्थेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय संख्याशास्त्र संस्था, कोलकाता या संस्थेमध्ये तेरा विषयांच्या पदव्यांसाठीची प्रवेशप्रक्रिया दि. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरू होत आहे. देशातील ही सर्वांत मोठी शिक्षण संस्था असून, येथील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजच्या जॉब्सची संधी कायम उपलब्ध होत असते. देशभरातील खासगी व सरकारी संस्था या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करीत असतात. त्यामुळे या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेकडे लक्ष लावून असतात. यंदा ७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०१८ पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना या संस्थेत पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे आहे त्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल करायचे आहेत. ९ फेब्रुवारी ते ११ मार्च २०१८ पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करून खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी १००० रुपये, तर इतर प्रवर्गांतील विद्यार्थ्यांनी ५०० रुपये प्रवेश परीक्षा शुल्क जमा करायचे आहे. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा १३ मे २०१८ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व अपडेट प्रवेश अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत कळविण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र दिले जाईल त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. या संस्थेच्या एकूण प्रवेशांमधील ५० टक्के जागा या भारताच्या उत्तर-पूर्व भागातील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहेत. संबंधित प्रवेशप्रक्रियेची संपूर्ण माहिती www.isical.ac.in/admission या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे.
...

या कोर्सेससाठी संधी

- बीएस्सी संख्याशास्त्र- ३ वर्षे
- बीएस्सी मॅथ्स- ३ वर्षे
- एमएस्सी मॅथ्स- २ वर्षे
- एमएस्सी संख्यात्मक अर्थशास्त्र- २ वर्षे
- एमएस्सी गुणवत्ता व्यवस्थापन विज्ञान- २ वर्षे
- एमएस्सी ग्रंथालय आणि माहिती विज्ञान- २ वर्षे
-एमएस्सी संगणकशास्त्र- २ वर्षे
-एमएससी गुप्तलेखनशास्त्र आणि सुरक्षा- २ वर्षे
-एमएससी गुणवत्ता, विश्वासनीयता आणि संशोधन- २ वर्षे
-पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन- १ वर्ष
-पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॅटिस्टिकल मेथड्स अँड अॅनालिसिस- १ वर्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुपूरब उत्सवाला प्रारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
नाशिक शहरातील गुरुगोविंद सिंग फाउंडेशन या संस्थेच्या स्थापनेनिमित्त तीन दिवशीय गुरूपूरब उत्सव साजरा करण्यात येतो. शुक्रवारी या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. या उत्सवासाठी अमृतसर येथून ग्यानी जयवंतसिंग व कीर्तनकार ग्यानी गुरुदेवसिंग हे दोघेही मार्गदर्शन करणार आहेत. काल या कार्यक्रमास प्रारंभ झाला.
सन १९७८ साली नाशिकच्या पंजाबी शीख समुदायाच्या सदस्यांनी गुरुगोविंदसिंग फाउंडेशनची स्थापना केली आहे. सध्या या फाउंडेशनचे सुमारे १२ एकर जागेत वडाळा पाथर्डी रोड येथे पब्लिक स्कूल ते इंजिनीअरिंग कॉलेजपर्यंतचे महाविद्यालय उभारण्यात आले आहे. या फाउंडेशनच्या स्थापनेनिमित्त दरवर्षी तीन दिवसांचा हा गुरुपूरब उत्सव आयोजित करण्यात येतो. शुक्रवारी सकाळी या उत्सवाला सुरुवात करण्यात आली.

विद्याथ्र्यांना पारितोषिके
यावेळी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या गुरुबानी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. गुरुबानी या स्पर्धेसाठी पाच ते पंधरा वर्षा वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील गुणवंत तसेच सहभागी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी भलविरसिंग छाब्रा सेक्रेटरी, हरजित आनंद, बी. एच. सिब्बल, एच. एफ. घटोडे, आर. एस. सलुजा, गोपाल लाल, परमिंदूर सिंग उपस्थित होते.

हे कार्यक्रम होणार
या उत्सवानिमित्त तीन दिवस लंगरचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणचे सर्वधर्मीय उपस्थित राहतात. यंदा ग्यानी जयवंतसिंग यांचे प्रवचन व ग्यानी गुरुदेवसिंग यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. आज (दि. १३) सकाळी कीर्तचा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी पाच वाजेपासून कथेचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी (दि. १४) सकाळी सात वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौण खनिजांच्या वाहतुकीवर आता हायटेक वॉच

$
0
0

नाशिक ः अवैध गौण खनिज वाहतुकीद्वारे स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्या ठेकेदारांच्या मुसक्या गौण खनिज विभागाने आता आणखी आवळल्या आहेत. हा विभाग हायटेक होत असून, उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर वॉच ठेवणारी गौण खनिज उत्खनन नियंत्रणप्रणाली जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने होणाऱ्या अवैध गौण वाहतुकीचा ‘उद्योग’ बंद करण्यास मदत होणार आहे.

अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक हा सातत्याने कळीचा मुद्दा ठरला आहे. प्रशासनाकडून कारवायांचा बडगा उगारला जात असला तरी असे गैरप्रकार सुरूच आहेत. अनेकदा महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर माफियांकडून हल्लेही झाले आहेत. एकीकडे ई ऑक्शन प्रणालीला प्रतिसादाअभावी सरकारचा महसूल बुडत असताना अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचे ‘उद्योग’ मात्र सुरूच आहेत. ते थोपविण्यासाठी आता गौण खनिज उत्खनन नियंत्रणप्रणालीचा पर्याय पुढे आला आहे. अगदी मोबाइलवरूनही ही प्रणाली कार्यान्वित राहणार असून, बारकोड स्कॅनिंगद्वारे कामकाज करणार आहे. त्यामुळे गौण खनिज ठेकेदार आणि वाहतूकदारांकडून मारल्या जाणाऱ्या भूलथापांना चाप बसण्यास मदत होते आहे.

सद्यःस्थ‌ितीत गौण खनिज वाहतूकदाराकडे खनिकर्म विभागाने पावती पुस्तक दिले आहे. वाहतूक केले जाणारे गौण खनिज, त्यासाठी वापरात येणारे वाहन, चालकाचे नाव, मोबाइल क्रमांक व तत्सम आवश्यक माहिती त्यावर हाताने नमूद केली जाते. हीच माहिती आता संबंधित ठेकेदाराला त्याचवेळी www.mahamining.com या प्रणालीवर अपलोड करणे अनिवार्य आहे. शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही प्रणाली विकस‌ित केली असून, त्यावर माहिती अपलोड करताच संबंधितांना युनिक आयडेंटिटी नंबर दिला जातो. तो नंबर वाहतूकदाराला पावतीवर नोंदवावा लागतो. बारकोडद्वारे हा क्रमांक लिंक होतो. तपासणीसाठी महसूल विभागाने संबंधित वाहन अडविले की, बारकोड स्कॅनद्वारे क्षणार्धात संबंधित वाहतुकीबाबतचे तपशील समजतात. चालकाने पावती दाखविली नाही तरी वाहनाच्या क्रमांकावरूनही वाहतुकीबाबतचा इत्थंभूत तपशील प्राप्त होतो. मर्यादेपेक्षा अधिक गौण खनिजाची वाहतूक होत असल्याचे आढळल्यास कारवाईचा बडगा उगारला जातो.

संबंधित वाहनास नमूद मार्गावर ताशी किमान २० किलोमीटरने प्रवासाची मर्यादा निश्च‌ित करण्यात आली आहे. त्यामुळे निर्धारित ठिकाणी त्या वेळेत वाहन पोहोचले नाही तर ते चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकते. वाहनाने मार्ग बदलला तरीही त्याचे कारण लगेचच अपडेट करावे लागले. वाहन नादुरुस्त झाले किंवा तत्सम अडचणी उद््भवल्या तर त्याची माहितीही त्या प्रणालीवर लगेचच अपडेट करणे अनिवार्य आहे. त्यामुळे चोरट्या मार्गांनी होणाऱ्या वाहतुकीला चाप बसेल, असा विश्वास यंत्रणा व्यक्त करीत आहे.

गौण खनिज उत्खनन न‌ियंत्रणप्रणालीमुळे अवैध गौण खनिज वाहतुकीला चाप लावणे अधिक सोपे होणार आहे. प्रत्यक्ष प्रणाली वापरास सुरुवात झाली असल्याने चोरट्या वाहतुकीला चाप बसतोय.

- प्रशांत कोरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वेस्ट टू वेल्थ’मध्ये ई-कचऱ्याबाबत चिंता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
धोकादायक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट हा एक ज्वलंत प्रश्न असून, त्यासाठी सर्व स्तरावर जागरुकता आवश्यक आहे. तंत्रज्ञानात होणाऱ्या रोजच्या बदलांमुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंद्वारे निर्माण होणारे धोकादायक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट तसेच पुनर्वापरासाठी असंघटित असलेल्या कर्मचारी वर्गाला ई-कचरा गोळा करण्याबाबत प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचा सूर काढत वेस्ट टू वेल्थ कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी काढत ‘वेस्ट’ वर चिंता व्यक्त केली.
निमातर्फे शुक्रवारी ‘वेस्ट टू वेल्थ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. व्यासपीठावर ‘निमा’चे अध्यक्ष मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष उदय खरोटे, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, नाशिकचे उप-प्रादेशिक अधिकारी अनंत कुडे, असिफ हुसैन, जाहीर कपासी, बी. के. सोनी, स्वीश कन्सल्टन्सीचे स्वामी, सुधीर आवळगांवकर उपस्थित होते.
धोकादायक टाकाऊ पदार्थांची हाताळणी, विल्हेवाट संदर्भातील नियमावलीतील अलीकडील बदल तसेच कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर तरतुदी, त्यामागचा हेतू इ. बाबी महाराष्ट्र एन्वायरो पॉवर आसिफ हुसैन यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादर केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे यासंबंधातील ऑनलाइन ट्रॅकिंग प्रणालीद्वारे चालणाऱ्या कार्यासंबंधीदेखील माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजमंदिराचा वनवास संपेना

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी
नाशिक महापालिकेच्या हद्दीच्या पूर्वेकडील सीमेवर असलेले मानूरगाव हे दुर्लक्षित आहे. महापालिकेच्या विकासाची गंगा अजूनही या गावापर्यंत नीटशी पोहचली नाही. गावठाणाचा भाग तर एखाद्या आदिवासी पाड्यासारखा भासतो. या गावात तेरा वर्षांपूर्वी छोट्याशा जागेत समाजमंदिर आमदार निधीतून उभे राहिले. मात्र, त्याचा ताबा कुणाकडेच नसल्यामुळे वापराविना धूळ खात पडून असलेल्या या समाजमंदिराचा वनवास कधी संपेल याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे.

मानूरगावच्या शिवसैनिकांनी गावासाठी एखादे समाजमंदिर बांधून द्यावे अशी मागणी त्यावेळचे आमदार बबनराव घोलप यांच्याकडे केली. मानूरगाव हे त्यावेळी देवळाली विधानसभा मतदार संघात होते. ही मागणी मान्य करीत मानूरगावच्या वेशीजवळच्या महापालिकेच्या पाऊण गुंठा जागेत या समाजमंदिराची उभारणी करण्यात आली. २००४ मध्ये या समाजमंदिराचे काम पूर्णत्वास आले. त्यासाठी ३ लाख ७५ हजार रुपये खर्च आला. वास्तू कमी जागेत उभारली गेली असली तरी त्यात सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वास्तूवर पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी बसविण्यात आली. पूर्वेला प्रवेशद्वार आणि खिडकी, उत्तरेला खिडक्या, पश्चिमेला स्वच्छतागृह बांधण्यात आले. या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही ती काही दिवस दुर्लक्षितच राहिली. वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या समाजमंदिराचे उद्घाटन करण्याची नेतेमंडळींनी घाई केली. उद्घाटनानंतर या समाजमंदिराला कुलूप लागले, ते अजूनही खोलण्याचा प्रयत्न झाला नाही. ही वास्तू महापालिकेकडे वर्ग करण्यात आली.

गावठाणात पडकी घरे
महापालिकेच्या स्थापना झाली तेव्हापासून पूर्वेच्या महापालिकेच्या हद्दीतील मानूरगावाचा समावेश करण्यात आला. पूर्वी गावठाणात राहणारे नागरिक शेती व्यवसायामुळे मळे परिसरात राहण्यास गेले त्यामुळे गावठाण परिसरात जुन्या पडक्या घरांची संख्या वाढत गेली. मूळ गावच्या काही नागरिकांनी येथील घरे आणि जागा विकल्या. त्यामुळे गावठाणचा आणि गावातील मूळ नागरिकांचा संबंध कमी होत गेला. मात्र, गावातील हनुमान मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमास गावातील नागरिक एकत्र येतात. एकत्र आलेल्या या नागरिकांनी मंदिराच्या देखभालीसाठी विश्वसंत तुकोबाराय सेवाभावी ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टची अधिकृत नोंदणीही करण्यात आली. गावातील धार्मिक कार्यक्रमांची जबाबदारी या ट्रस्टकडेच आहे.

ट्रस्टने मागितली वास्तू
तुकोबाराय ट्रस्टने ही समाजमंदिराची वास्तू ट्रस्टच्या ताब्यात द्यावी अशी मागणी केलेली आहे. या वास्तूचा वापर सार्वजनिक कामासाठीच केला जाईल, असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. महापालिकेचे जे काही भाडे शुल्क असेल, तेही भरण्यास विश्वस्त मंडळाने तयारी दर्शविली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे समाजमंदिर ताब्यात देण्यात येईल, असे सांगितले. मात्र, अद्याप ते ताब्यात मिळालेले नाही.

वास्तूची दुर्दशा
या समाजमंदिराच्या पूर्वेला असलेल्या मुख्य प्रवेशव्दाराच्या पायऱ्या खिळखिळ्या झाल्या आहेत. पायऱ्यालगतच्या भिंतीचे पोपडे निघाले आहेत. पूर्वेच्या तसेच उत्तरेच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. दरवाजा आणि खिडक्यांच्या लोखंडी गजांना गंज चढला आहे. येथील जागेवर जाळण्यासाठी आणलेल्या सरपणाची साठवण करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. टॉयलेट आणि बाथरुमचीही दूरवस्था झाली आहे. यांची दुरुस्ती केल्याशिवाय या समाजमंदिराचा वापर करता येणे शक्य होणार नाही.

हे समाजमंदिर विश्वस्त मंडळाकडे देण्याचा ठराव करण्यात आलेला आहे. वापराविना पडून राहिलेल्या या समाजमंदिराची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करून हे समाजमंदिर मानूरच्या विश्वस्त मंडळाच्या ताब्यात देण्यात येईल. हे समाजमंदिर वापरात राहिल्यास त्याची देखभाल व्यवस्थित होईल. सार्वजनिक कामासाठी त्याचा वापर होईल.
- उद्धव निमसे, नगरसेवक

मानूरच्या विश्वसंत तुकोबाराय सेवाभावी ट्रस्टची हे समाजमंदिर ताब्यात मिळावे अशी जुनी मागणी आहे. हे समाजमंदिर ट्रस्टच्या ताब्यात मिळाल्यास त्याची देखभाल नियमितपणे होईल. त्याच्या आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवता येईल.
- श्याम अनवट, सदस्य, विश्वसंत तुकोबाराय सेवाभावी ट्रस्ट

मानूरच्या शिवसैनिकांच्या मागणीनुसार त्यावेळचे आमदार बबनराव घोलप यांच्या आमदार निधीतून हे समाजमंदिराचे बांधकाम करण्यात आले. नंतर हे समाजमंदिर महापालिकेकडे वर्ग करण्यात आले. तेव्हापासून वापराविना पडून असल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. महापालिकेने अधिकृतपणे ट्रस्टच्या ताब्यात दिल्यास त्याची देखभाल राहिल.
- संजय माळोदे, ग्रामस्थ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अस्वच्छतेचा फेरा सुटेना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

भारत स्वच्छता अभियानांतर्गत शहरात होणार असलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर महापौरांसह महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना शहरातील विविध भागात अस्वच्छतेचे दर्शन झाले आहे. खुद्द महापौरांसह सर्वच प्रभाग सभापतींनी स्वच्छता राखण्याचे आदेश दिलेले असतानाही नाशिकरोड परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले दिसून येत आहेत.

शहरात स्वच्छताविषयक सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान नागरिकांना काही प्रश्नही विचारले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी महापौरांसह सर्वच प्रभाग सभापतींनी शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन स्वच्छतेची पाहणी केली आहे .या भेटींदरम्यान शहरातील विविध भागांत अस्वच्छतेचेच दर्शन घेण्याची नामुष्की या पदाधिकाऱ्यांवरच ओढावली होती. ब्लॅक स्पॉट तात्काळ हटविण्याचे आदेश खुद्द महापौरांनीच महापालिकेच्या स्वच्छता विभागाला दिलेले होते. मात्र, असे असूनही शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचून असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कचरा टाकण्यासाठी शहरातील ब्लॅक स्पॉटवर ठेवण्यात आलेल्या डस्टबिनचीही एका दिवसात दुरवस्था झाली आहे. कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने डस्टबिनची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या डस्टबिनची मोडतोडही झाली आहे.

स्वच्छतेचा केवळ फार्स
महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेचा केवळ फार्स पूर्ण केला जात असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. बहुतांश स्वच्छता कर्मचारी सकाळी हजेरी शेडवर केवळ हजेरीपुरतेच हजर राहत असल्याचेही दिसून येते. मुख्य चौकांतील रस्त्यांची थातुरमातुर स्वच्छता करण्यापलीकडे स्वच्छता कर्मचारी काही एक करीत नसल्याने नाशिकरोडमधील विविध भागात स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तासाभरातच स्वच्छता कर्मचारी गायब होत असल्याने स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहराला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे.
--
प्रमुख ब्लॅक स्पॉट
नाशिकरोडमधील सिन्नर फाटा, स्टेशनवाडी, जियाउद्दिन डेपो, चेहेडी, चेहेडी पंपिंग स्टेशन, देवळालीगाव राजवाडा, गुलाबवाडी, गोसावीवाडी, बिटको रुग्णालय परिसर, विशाल मॉल, चेहेडी शिव, कॅनॉलरोड, पवारवाडी, वॉस्को चौक, केळकरवाडी आदी भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून राहत आहेत. या भागातील व्यावसायिकांसह नागरिकही चौकातच कचरा टाकत असल्याने ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. उघड्यावर व सार्वजनिक जागेवर कचरा टाकणारे व्यावसायिक व नागरिक यांच्यावर महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने अस्वच्छतेचा प्रश्न जैसे थे आहे.

--

महापालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी केवळ हजेरीपुरतेच कामावर येतात. अधिकारी उपस्थित असतील, तरच हातात झाडू घेतात. त्यांना शहर स्वच्छतेबाबत जराशीही आत्मीयता नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. डुकरांचा सर्रास वावर आणि हागणदारीकडे आजही महापालिकेचा स्वच्छता विभाग डोळेझाक करीत आहे.
-सचिन चव्हाण, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा वर्षांनंतर महापौर चषकाचा बिगुल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिका व जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेतर्फे फेब्रुवारी महिन्यात महापौर चषक स्पर्धा होणार आहे. तब्बल सहा वर्षांच्या खंडांनंतर महापौर चषक स्पर्धा होणार असून, यात जिम्नॅस्टिक, फुटबॉल, कुस्ती, लॉन टेनिस, क्रिकेट या खेळांचा समावेश आहे. या संदर्भात आज महापालिका मुख्यालयात क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये क्रीडानगरी उभारली जाणार आहे.

१९९२ पासून नाशिक महापौर चषक क्रीडा स्पर्धा सुरू करण्यात आली होती; परंतु २०१२ चा अपवाद वगळता दहा वर्षांपासून महापौर चषक स्पर्धा बंद आहे. उद्धव निमसे स्थायी समितीचे सभापती असताना २०१२ मध्ये महापौर चषक स्पर्धा झाली होती. त्यानंतर सहा वर्षांचा खंड पडला. मात्र, यंदा स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या प्रयत्नातून या स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने दीड कोटीच्या खर्चाची तरतूद केली आहे. या महापौर चषक स्पर्धेसंदर्भात शुक्रवारी बैठक झाली. त्यात ही माहिती देण्यात आली. बैठकीत जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांच्या नेतृत्वाखाली नियोजन केले जाणार आहे. कुस्ती स्पर्धेचे नियोजन संजय चव्हाण, फुटबॉल स्पर्धेचे नियोजन भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अर्जुन टिळे यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रिकेट स्पर्धेचे नियोजन नगरसेवक प्रशांत दिवे यांच्या नेतृत्वाखाली होईल. उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

स्पर्धेची वैशिष्ट्ये

- स्पर्धेत नऊशे खेळाडूंचा सहभाग

- पुरुष व महिला अशा सहा गटांत स्पर्धा

- सकाळ, सायंकाळ अशा दोन सत्रांत सामने

- प्रथमच राष्ट्रीय दर्जाचा डिजिटल बोर्ड

- शिखरेवाडी मैदानावर फुटबॉल व क्रिकेट स्पर्धा

- १२७ नगरसेवकांवर नियोजनाची जबाबदारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉश प्रकरणी आरोपींची संख्या वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बॉश कंपनीतून तब्बल ११ कोटी रुपयांचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह त्यास गुन्ह्यात मदत करणाऱ्यांना जेरबंद केले आहे. लवकरच आणखी दोन ते तीन संशयितांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, कंपनीच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांचा आज, पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला.
या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार ताहीरअली मोहम्मद इब्रीत चौधरी उर्फ छोटू (वय ३७), शिश अहमद अस्लम हुसेन खान आणि अहमद रजा शुभराजी खान आदी संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या हे संशयित पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. याच गुन्ह्यात सिडकोतील काही राजकीय पदाधिकाऱ्यांचेदेखील पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत. लवकरच दोन ते तीन संशयितांना अटक होऊ शकते, असे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले. चोरीच्या गुन्ह्यात किंवा चोरी करून आलेल्या मालाच्या वितरणात राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे किंवा नाही याबाबत बोलण्यास पोलिसांनी नकार दिला. दरम्यान, सदर गुन्हा उघडकीस आल्यानंतर अंबड पोलिसांनी बॉश कंपनीच्या चार अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवून घेतला होता. शुक्रवारीदेखील पोलिसांनी कंपनीच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांचे जबाब घेतले.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी
याबाबत अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या मटेरियलचे विश्लेषण होणे आवश्यक आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. सर्वच अंगाने चौकशी सुरू असल्याचे कड यांनी स्पष्ट केले. हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर बॉश कंपनीचे बेंगळुरू येथील मुख्य सुरक्षा अधिकारी नाशिकमध्ये आले होते. पोलिस तपासात त्यांनी समोर आलेल्या कच्च्या दुव्यांवर काम केले जाईल, असे स्पष्ट केले. दुसरीकडे जर्मनीचे एक पथकदेखील नाशिकमध्ये येणार असून, चोरीचा हा गुन्हा कंपनी व्यवस्थापनाने गंभीरपणे घेतला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.


घरमालकावर गुन्हा दाखल
म. टा. वृत्तसेवा, सिडको
सिडकोत बॉश कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट तयार करण्यात येत असलेल्या घरमालकावर पोलिसांनी भाडेकरूची माहिती न दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंडितनगर भागातील घर ताहीरअली मोहम्मद इदरिस चौधरी उर्फ छोटू चौधरी याने भाड्याने घेतले होते. याच घरात त्याने बॉश कंपनीच्या बनावट स्पेअरपार्ट बनविण्याचा कारखाना सुरु केला होता. त्याठिकाणी कंपनीत काही माल चोरून आणल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून मुख्य संशयित आरोपी छोटू चौधरीसह त्याच्या भावालाही अटक केली आहे. या दोघांना १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून, यादरम्यान पोलिसांनी यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या राजकीय नेत्यांचीही चौकशी केली. त्याचबरोबर छोटू चौधरी याने भाडेतत्त्वावर घेतलेले घर हे अब्दुल मोबिन हाजी अहमद खान यांचे नातेवाईक रेहमतुल्ला मोहम्मद रईस चौधरी यांच्या नावावर असल्याचे तपास उघड झाले आहे. अब्दुल यांच्या मध्यस्थीनेच हा व्यवहार झाला असावा, म्हणून पोलिसांनी घरमालक व मध्यस्थी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

भाडेकरूंच्या नोंदी नाहीच
इंदिरानगर व सिडको भागात अनेक घरे हे भाडेतत्त्वावर दिली जातात. मात्र त्यांची पोलिस स्टेशनला माहिती दिली जात नसल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. घरमालक व भाडेकरू यांची नोंद होत नसल्याने त्यात अनधिकृत व्यवसाय चालत असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही असेच प्रकार समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी आता घरमालक व भाडेकरू यांच्या नोंदीबाबत कठोर कारवाई केली पाहिजे, असे मत नागरिकांमधून व्यक्‍त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचपीटीत आज आरोग्य जनजागृती

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर
महिलांच्या आरोग्यासंदर्भात ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जनजागृतीचा मोठा जागर होत आहे. या मोहिमेअंतर्गत नाशिक शहरातील विविध कॉलेजेसमध्ये कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याच अंतर्गत आज शनिवार (१३ जानेवारी) रोजी कॉलेजरोडवरील एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स कॉलेजमध्ये सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स’ने महिलांच्या आरोग्य सुरक्षिततेच्यादृष्टीने ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ ही मोहिम हाती घेतली आहे. या अंतर्गत मासिक पाळी संदर्भात अनेक भ्रामक समजुती, अंधश्रद्धा आणि प्रथा-परंपरा आहेत. या संदर्भात मटाने वृत्तमालिकांद्वारे प्रकाश टाकला. तसेच, सध्या बाजारात उपलब्ध असलेले सॅनिटरी नॅपकीन, त्याचा वापर, त्याचे परिणाम, पर्यावरणपूरक पर्यायांची उपलब्धता याचा आढावाही विविध बातम्यांमधून घेतला जात आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत महिला आरोग्य जनजागृतीचा हा कार्यक्रम मटाने हाती घेतला आहे. या अंतर्गत कॉलेज युवतींचे प्रबोधन, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या शंकांचे निरसनासाठी विशेष सेमिनारचे आयोजन एचपीटी आर्टस अँण्ड आरवायके सायन्स कॉलेजेसमध्ये करण्यात आले आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ डय. रोहिणी पाटील या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. शनिवार (१३ जानेवारी) रोजी सकाळी १० वाजता सेमिनार हॉलमध्ये हा सेमिनार होणार आहे. कॉलेजमधील विद्यार्थिनी मंच, विद्यार्थी विकास समिती आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. या सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन माहिती प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विद्यार्थी मंचाच्या प्रमुख प्रा. रूपन सिंग, प्रा. श्रद्धा गोसावी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलपंपांवर पाणीमिश्रित इंधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहनधारकांना पाणीमिश्रित इंधन मिळत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपांच्या तपासणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हा पुरवठा अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी सर्व पेट्रोल कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांशी याबाबत पत्रव्यवहार केला असून तपासणी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

शहरातील काही पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पाणीमिश्रित इंधन भरले जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे पेट्रोल पंपावरील मशिनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप बसवून इंधन चोरीच्या प्रकारानंतर आणखी एक उद्योग चर्चेत‌ आला आहे. नाशिकमध्ये काही पंपावर पाच लिटरमागे २०० मिलीलीटर पेट्रोलची चोरी केली जात असल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे. त्यानंतर आता भेसळीचा प्रकारही पुढे येऊ लागला आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच पेट्रोलपंपावरील नमुने तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांनी पेट्रोल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी याबाबत पत्रव्यवहार केला असून तातडीने अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

भेसळीचा दावा चुकीचा
देशात पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे. इथोनॉल मिश्रित पेट्रोलला पाण्याचा स्पर्श झाला की इथेनॉल आणि पेट्रोल वेगळे होते. इथेनॉलचे पाणी होते. पेट्रोल टाकीत पाणी झाले की बाइक सुरू करण्यास त्रास होतो. इथेनॉल आजुबाजुचे पाणी किंवा आर्द्रता शोषून घेते. त्यामुळे त्याचे रुपांतर पाणीसदृश पदार्थांमध्ये होते. त्यामुळे पेट्रोलपंपचालक इंधनात पाण्याची भेसळ करीत असल्याच्या तक्रारी चुकीच्या असल्याचा व्यावसायिकांचा दावा आहे. पेट्रोलपंपाची तपासणी केली तरी हरकत नसल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. पेट्रोलमध्ये पाणी मिसळू शकते का, हा खरा प्रश्‍न आहे. तसे झालेच तर त्याचा त्रास संबंधित पंपावर पेट्रोल भरणाऱ्या सर्वच वाहनधारकांना व्हायला हवा. त्यामुळे अशा प्रकारांमागील शास्त्रीय कारणे तपासली जायला हवीत अशी अपेक्षाही त्यांच्याकडून व्यक्त होते आहे.

पेट्रोलमध्ये पाणीमिश्रित इंधन विक्री केली जात असल्याच्या तक्रारींची दखल घेतली आहे. सर्व कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल.
- श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेची आत्महत्या; सासरच्या मंडळींवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड/ कळवण

शिरवाडे वणी (ता. निफाड) येथील विवाहिता कांचन विलास निफाडे (२८) हिने आपली दीड वर्षाची मुलगी ईश्वरी हिच्यासह सप्तश्रृंगी वणीच्या गडावरील शीतकडा येथून स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करीत मुख्य सूत्रधार असलेल्या दिरास अटक केली आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून कांचन हिने आत्महत्या केल्याची फिर्याद तिचे वडील चंद्रकांत गणपत मोरे यांनी पिंपळगाव पोलिस स्टेशनमध्ये दिली. कांचनला लग्नानंतर सा‌त वर्षे उलटल्यानंतरही सासरचे लोक त्रास देत होते. त्रासाला कंटाळूनच ती यापूर्वी माहेरी निघून आली होती. पण लग्नाच्या अजून तीन बहिणी असल्याने आई वडिलांच्या समाधानासाठी ती पुन्हा सासरी आली होती. मात्र, सासरचा त्रास असह्य झाल्याने अखेर तिने आपल्या सहा वर्षांच्या मुलास घरीच ठेवले आणि अडीच वर्षाच्या मुलीसह वणीच्या गडावर पोचली. तेथे शीतकड्यावरून मुलीसह उडी मारत तिने आत्महत्या केल्याची फिर्याद तिचे वडील चंद्रकांत गणपत मोरे यांनी पिंपळगाव पोलिस स्टेशनला दिली.

कांचनचा मृतदेह पिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात ठेवला असता जोपर्यंत सासरच्या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय मोरे कुटुंबीयांना घेतला. त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मांडला. यात कांचनचा दीर दत्तात्रय दामोदर निफाडे याच्यावर मुख्य आरोप करण्यात आले आहेत.

मुख्य सूत्रधाराला अटक

कांचनचा ‌दीर फरार झाल्याचे समजल्यावर नातेवाईकांनी पिंपळगाव पोलिस स्टेशनच्या आवारात ठिय्या मांडला. पोलिसांनी दत्तात्रय दामोदर निफाडे (दीर) याच्यासह दामोधर महादू निफाडे (सासरे), सिताबाई दामोदर निफाडे (सासू), विलास दामोधर निफाडे (पती), सागर अशोक शिंदे (भाचा), लता दत्तात्रय निफाडे (जाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजता मुख्य संशयित आरोपी दत्तात्रय निफाडे याला अटक केल्यानंतर कांचनसह लहानग्या ईश्वरीवर शिरवाडे वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ड्रोन कॅमेऱ्यामुळे घटना उघड

शीतकडा हा वणी गडावरील अतिशय दुर्मिळ आणि अवघड पॉईंट आहे. या ठिकाणाचे विदेशी पर्यटकांच्या ड्रोन कॅमेऱ्याने चित्रिकरण केले जात असताना कांचनचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. शीतकड्याच्या खालील दरीतून कांचन व ईश्वरीचा मृतदेह तिच्या नातेवाईकांनी बाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायलॉन मांजाने कापले दुचाकीस्वाराचे नाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अंबड लिंकरोडवरून त्रिमूर्ती चौकाकडे दुचाकीवरून जात असताना कामटवाडे परिसरात राधेश्याम पांडे (वय ५०, रा. अंबड लिंकरोड) या व्यक्‍तीचे नाक आणि गाल मांजामुळे कापले गेल्याची घटना शनिवारी घडली. पांडे यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्याने दुर्घटना टळली असली, तरी त्यांना सात टक्‍के पडले आहेत. या प्रकारावरून आजही नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

मकर संक्रांतीनिमित्त बाजारात पतंग व मांजाची विक्री सुरू आहे. पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करण्यावर बंदी आणलेली असतानाही या मांजाची विक्री होत असल्याचे दिसत आहे. शनिवारी सकाळी राधेश्याम पांडे हे दुचाकीवरून त्रिमूर्ती चौकाकडे जात होते. याचवेळी त्यांच्या तोंडासमोर मांजा आला आणि त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. यावेळी परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना डॉ. दिनेश भामरे यांच्याकडे नेले. पांडे यांच्या नाकाला मोठी इजा झालेली असल्याने त्यातून रक्‍तस्त्राव सुरूच होता. डॉ. भामरे यांनी प्रथमोचार करून त्यांना रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी मोरे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले. या ठिकाणी डॉ. किशोर बोरसे यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना सात टाके टाकले आहेत. पांडे यांच्या नाकावर हा प्रकार निभावला असला, तरी हा मांजा थोडा खाली असता, तर त्यांच्या गळ्यालाच इजा होऊन मोठी दुर्घटना घडू शकली असती, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
या प्रकारावरून सिडको परिसरात नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे लक्षात येत आहे. पोलिसांनी सिडको परिसरातील काही दुकानांवरून नायलॉन मांजा जप्त केला असला, तरी आजही अनेकांकडे नायलॉन मांजा असल्याचे दिसून येत आहे. सणाचा आनंद लुटतांना दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्‍त केले आहे.

स्थानिक नागरिकांनी पांडे यांना माझ्याकडे आणले. त्यावेळी रक्‍तस्त्राव होत होता. त्यांच्यावर प्रथमोपचार केले आहेत. पतंग उडविताना घातक मांजा वापरणे चुकीचे आहे. यासाठी पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. या मांजामुळे जिवाला धोका उत्पन्न होणार नाही याची काळजी नागरिकांनीच घेतली पाहिजे.
-डॉ. दिनेश भामरे

पांडे यांच्या नाकावर छोटी शस्त्रक्रिया करून त्यांना सात टाके टाकण्यात आले आहेत. मांजाचा दोरा नाकावर आल्याने केवळ नाकालाच इजा झाली असली, तरी मोठी दुर्घटना टळली आहे. नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीचे मांजा वापरणे चुकीचे आहे.
-डॉ. किशोर बोरसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पक्ष बांधणीसाठी सेनेची मिसळ पार्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पक्षांतर्गत गटबाजी आणि मोदी लाटेमुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदारसंघात पराभव पत्करलेल्या शिवसेनेने मिसळ पार्ट्यांमधून पक्षाची बांधणी सुरू केली आहे. पक्षापासून काही कारणास्तव दुरावलेले पदाधिकारी, आजी-माजी शाखाप्रमुख, माजी नगरसेवकांना चुचकारण्याचे काम पक्षाच्या नेत्यांनी मिसळ पार्ट्यांमधून सुरू केले आहे.

शहरात सध्या मनोमिलनासाठी मिसळ पार्ट्यांचे पेव फुटले आहे. शनिवारी सातपूरमध्ये मिसळ पार्टीनिमित्त एकत्र आलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी दिलजमाई करीत पक्ष बांधणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मिसळ पार्टीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख अजय चौधरींच्या उपस्थितीत एकतेच्या आणाभाका घेण्यात आल्या. शनिवारी सातपूरच्या एका लॉन्सवर पश्चिम म्हणजेच सिडको-सातपूर मतदारसंघातील शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. पश्चिममधून इच्छुक असलेल्या विलास शिंदेंनी या मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला झाडून शिवसेनेच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसह नेत्यांना आमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत व नाशिकचे संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी उपस्थित राहणार असल्याने दत्ता गायकवाड वगळता सर्वच पदाधिकारी, नगरसेवक आणि शाखाप्रमुख, माजी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजीमंत्री बबन घोलप, आमदार योगेश घोलप यांच्यासह निष्ठावंत शिवसैनिकांची उपस्थिती होती. या मिसळ पार्टीच्या निमित्ताने शिवसेनेने विधानसभा व लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे. काही कारणास्तव पक्षापासून दुरावलेले किंवा गटबाजीमुळे दूर गेलेल्यांचा सत्कारही यावेळी पक्ष नेत्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी महापालिका निवडणुकीतील पराभव विसरत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागण्याचे आवाहन केले. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यात मिसळा व त्यांनी कामे करा असा सल्ला देऊन ‘मिसळ पार्टी’ ही मनोमिलनासाठी उपयुक्त असल्याचे सांगत सर्व मतदारसंघात त्यांचे आयोजन करण्याचा सल्ला दिला.

मिसळसारखाच शिवसेनेचा झणझणीत स्वभाव

सिडको : महाराष्ट्रात काही जणांनी श्रीखंड पुरीचा आस्वाद घेतला असला तरी शिवसैनिक हा मिसळसारखाच झणझणीत असून, मिसळ हे आमचे खाद्यच आहे. कोणी काहीही बोलले तरी आजही शिवसेनेचा वडापावच जोरात असल्याचे सांगून ही पार्टी म्हणजे काही राजकीय पार्टी नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. अशा पार्ट्यांमध्ये काही प्रचाराचा शुभारंभ होत नसून, कोणामध्येही गटतट नसल्याचे यावरून दिसत असल्याचे त्‍यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायर ऑडिट सक्तीचे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
मुंबईतल्या कमला मिल कंपाउंडमधील दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाला अग्निप्रतिबंधक यंत्रणेबाबत उशीरा होईना आता जाग आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात अग्निप्रतिबंधक कायद्यानुसार शासकीय कार्यालयांसह पंधरा मीटरपेक्षा अधिक उंच असलेल्या इमारतींसाठी अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महापालिकेकडून शनिवारी जाहीर नोटिशीद्वारे नागरिकांना व शासकीय कार्यालये, शाळांच्या प्रतिनिधींना फायर ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले असून, प्रमाणपत्र न घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिनियम २००८ मध्येच पारित करण्यात आला असला, तरी अग्निशमन विभागाने त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले आहे.
राज्यात ६ डिसेंबर २००८ पासून महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार शासकीय कार्यालये, बहुमजली शैक्षणिक इमारती, रुग्णालये, हॉटेल्स, लॉजेस, रेस्टॉरंट, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, मॉल्स, ऑफिसेस अशा व्यावसायिक इमारती, नाट्यगृहे, सिनेमागृहे, मंगल कार्यालये, औद्योगिक इमारती, गुदामे, सर्व प्रकारच्या संमिश्र वापराच्या इमारती, तसेच पंधरा मीटरपेक्षा अधिक उंच रहिवासी वापराच्या इमारतींना अग्निप्रतिबंधक यंत्रणा लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. यंत्रणा बंधनकारक करताना त्या सुस्थितीत आहे की नाहीत याची खातरजमा करण्यासाठी वर्षातून दोनदा करण्याचे सक्तीचे केले आहे. दर दोन वर्षांनी जानेवारी व जुलै महिन्यात फायर ऑडिटचे प्रमाणपत्र मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेणे बंधनकारक केले आहे.
या फायर ऑडिटसाठी ठराविक शुल्क आकारण्यात आले आहे. महापालिकेने शनिवारी यासंदर्भात जाहीर नोटिशीद्वारे नागरिकांना व शासकीय कार्यालये, शाळांच्या प्रतिनिधींना फायर ऑडिट करण्याचे बंधन घातले असून, त्यासाठी १५ फेब्रुवारीची डेडलाइन दिली आहे. विशेष म्हणजे २००९ पासूनच्या थकबाकीसह नागरिकांना ही रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे आता यासंदर्भातील नियमावलीचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक ठरणार आहे.
---
तर तीन वर्षे कारावास
फायर ऑडिट लागू केलेल्या शहरातील सर्व भोगवटादार व मालकांना नोटिशीद्वारे सूचना दिली असून, त्यात ऑडिट न केल्यास इमारतीचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. इमारत सील करण्याचाही पर्याय आहे. त्यानंतरही अग्निशमन विभागाकडून प्रमाणपत्र प्राप्त करून न घेतल्यास दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. २० ते ५० हजार रुपये दंडाची तरतूददेखील केलेली आहे. त्यानंतरही कारवाई केली नाही, तर या कायद्यान्वये सहा ते तीन वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूर उड्डाणपुलालगत सर्व्हिस रोड खड्ड्यांत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूरच्या रेल्वेगेट लगत सुरु असलेल्या उडडाणपुलाच्या कमावले पर्यायी म्हणून दिलेल्या रस्त्यावर डांबरीकरण ना करण्यात आल्याने देवळालीसह ग्रामीण भागातील नागरिकांची कंबरडे खड्ड्यांमुळे मोडत आहे. याठिकाणी त्वरित डांबरीकरण करून द्यावे, अशी मागणी येथील भाजप शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांनी केली आहे.

भगूरसह ग्रामीण भागातील जनतेची रेल्वे क्रॉसिंगमुळे होणारी अडचण लक्षात घेत उभारण्यात येणाऱ्या उडडाणपुलाच्या कामाचा प्रारंभ होऊन वर्ष उलटले असताना सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी असलेला डांबरीकरण न केल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे येथून ये-जा करणारे नागरिक हैराण झाले आहेत. संबंधित ठेकेदाराने नियमाप्रमाणे सर्व्हिस रोड उपलब्ध करून देणे गरजेचे असताना अद्यापही डांबरीकरण का करण्यात आले नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सिन्नर महामार्गाकडे जाण्यासाठी या रस्त्याचा अधिक प्रमाणात वापर वाढला आहे. याच पुलापासून काही मीटर अंतरावर भगूर बस स्थानक असल्याने अनेक शालेय विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिक या रस्त्याचा वापर करत असतात. अनेक नागरिक व संघटना याकामी सांगूनदेखील काम होत नसल्याने त्वरित सर्व्हिस रोडचे काम करण्यात ना आल्यास लोकहितासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गच्चीवर शोधणार नायलॉन मांजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
धोकादायक नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या पतंगबाजांवर संक्रांत येण्याची चिन्हे आहेत. शहर पोलिसांनी त्यादृष्टीने तयारी केली असून, आज, रविवारी संक्रांतीच्या दिवशी थेट इमारतींवर पतंग उडवणाऱ्या पतंगबाजापर्यंत पोलिस पोहोचणार आहेत. बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करण्यात आल्यास अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
नायलॉन मांजामुळे दर वर्षी अपघात घडतात. कान कापणे, मान कापणे प्रसंगी जीव जाणे असे प्रकार नायलॉन मांजामुळे घडतात. दुसरीकडे झाडांवर अडकलेल्या या मांजामुळे पशुपक्षीही जायबंदी होऊन मृत्युमुखी पडतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरी भागात पोलिसांनी सदर मांजाच्या विक्रीवर, तसेच वापरावर बंदी घातली आहे. मात्र, काही विक्रेते याकडे दुर्लक्ष करून पतंगबाजाना मांजा पुरवितात. क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने काही दिवसांपूर्वी राजेंद्र तांबोळी या संशयितास सराफ बाजारातील तांबोळी वाड्यात अटक केली. संशयिताकडून तब्बल एक लाख रुपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला होता. याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले, की नायलॉन मांजाची विक्री, तसेच वापरावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी सतत अशा विक्रेत्यांचा शोध घेऊन कारवाईदेखील केली. मांजा विक्री करणाऱ्यांबरोबर तो विकत घेणारादेखील दोषी असून, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. यासाठी संक्रांतीच्या दिवशी पोलिसांकडून शहरात सातत्याने गस्त घालण्यात येईल. दुसरीकडे संशयास्पद ठिकाणी पोलिस थेट इमारतींच्या गच्चीवर पोहोचून पतंग उडविणाऱ्या व्यक्तीकडे कोणता मांजा आहे, याची खात्री करतील. त्यात दोषी आढळून येणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने पंतग उडवून उत्सव साजरा करावा, तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणींनो, आरोग्याकडे लक्ष द्या

$
0
0

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांचा विद्यार्थिनींना सल्ला
--
- सौरभ बेंडाळे/यश कुलकर्णी, कॉलेज क्लब रिपोर्टर
--
सध्या तरुणींमध्ये झिरो फिगर करण्याची क्रेझ आहे. या नादात आहाराकडे तरुणी दुर्लक्ष करतात. यामुळे तरुणींच्या शरीरास पोषक अन्नघटक मिळत नाहीत. सर्व अन्नघटक शरीरास मिळायला हवेत. हे सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये जगणाऱ्या तरुणींमध्ये घडत नाही. तरुणींने झिरो फिगरची क्रेझ सोडून मेन्टेन हेल्थकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, असा सल्ला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रोहिणी पाटील यांनी दिला.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘वाट स्वच्छ आरोग्याची’ या मोहिमेअंतर्गत कॉलेज रोडवरील एचपीटी आर्टस अॅण्ड आरवायके सायन्स कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये शनिवारी (‌दि. १३) ‘महिला आरोग्य जनजागृती’ या विषयावर सेमिनार झाला. याप्रसंगी विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात असणाऱ्या अनेक भ्रामक समजुती, अंधश्रद्धा आणि प्रथा-परंपरा यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच, सध्या बाजारात उपलब्ध असलेले सॅनिटरी नॅप‌किन, त्याचा वापर, परिणाम, पर्यावरणपूरक पर्यायांची उपलब्धता याचा आढावाही या चर्चासत्रातून घेण्यात आला.

या वेळी व्यासपीठावर प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. रुपन सिंग, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजकुमार वावळे, विद्यार्थिनी मंचच्या प्रा. श्रद्धा गोसावी उपस्थित होते. प्राचार्यांनी वाट स्वच्छ आरोग्याची या मोहिमेचे कौतुक करत महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणल्याबद्दल आभार व्यक्त केले. विद्यार्थिनींसमवेत संवाद साधतांना डॉ. पाटील म्हणाल्या, महिलांचे आरोग्य या विषयावर चर्चा होणे खूप महत्त्वाचे आहे. तरुणींनी मासिक पाळीच्या दिवसांत तरुणींना गुप्तांगाच्या समस्या संभवतात. यामुळे तरुणींनी गुप्तांगाची स्वच्छता कायम राखायला हवी. तसेच मासिक पाळीच्या दिवसात सॅनिटरी नॅपकिन साधारण आठ ते दहा तासच वापरायला हवे. सध्या बाजारात इकोफ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध असून, त्याचा वापर तरुणींनी करायला हवा. अनेकदा सकस आहार नसल्यामुळे तरुणींना दोन ते तीन महिन्यांच्या टप्प्याने पाळी येते. ही बाब गंभीर आहे. असं जर कोणाच्या बाबतीत होत असेल तर लागलीच स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करून घ्या.
..
पौष्टिक आहारासाठी लोखंडी कढई!
पौष्टिक आहार शरीरास मिळणे अत्यंत गरजेचे असते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या नॉन-स्टिक कढईमुळे लोहाचे प्रमाण शरीरातून कमी होत आहे. आरोग्यासाठी शरीरात लोह असणे गरजेचे असते. यासाठी जेवण बनवताना शक्यतो लोखंडी कढईचा वापर करावा, असा सल्ला डॉ. पाटील यांनी विद्यार्थिनींना दिला.
..
सुसज्ज स्वच्छतागृह आवश्यक
कॉलेजसमध्ये सुसज्ज स्वछतागृहांची सोया असणे महत्वाचे आहे. मासिक पाळीच्या दिवसात विद्यार्थिनींना हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी, हँडवॉश तसेच टिशू पेपर उपलब्ध व्हायला हवेत. यासाठी नाशिकमधील सर्व कॉलेजेसनी पुढाकार घेत सुसज्ज महिला स्वच्छतागृह विद्यार्थिनींना द्यायला हवी.
..
या कार्यक्रमामुळे मासिक पाळी संबंधीचे अनेक शंकाचे निरसन झाले. या चर्चासत्रातून आधी जे गैरसमज होते ते पूर्णपणे दूर झाले. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने हाती घेतलेली ही मोहीम अतिशय स्तुत्य आहे.
-रेणुका कुलकर्णी, विद्यार्थिनी
--
महिलांच्या मासिक पाळी, आरोग्याबद्दल सहसा जास्त बोलले जात नाही. तरुणी देखील या संबंधीच्या समस्या आपल्या पालकांशीदेखील शेअर करत नसल्याने समस्या वाढतात. आज या चर्चासत्रामुळे या विषयाला वाचा फुटली. आम्हाला यावर मोकळेपणाने बोलता आले.
-श्रुती ठक्कर, विद्यार्थिनी
--
मासिक पाळीविषयी अनेक शंका होत्या. पण या चर्चासत्राच्या माध्यमातून त्यांचे शंकांचे निरसन करता आले. तसेच मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी, आहार, याबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
-अनुष्का राजावत, विद्यार्थिनी
--
मासिक पाळी संबधातील असलेल्या अनेक चुकीच्या समजुती कळाल्या. या कार्यक्रमामुळे खरोखरच आम्हा तरुणींमध्ये जागृती झाली. आमच्या शंका व समस्या निडरपणे मांडण्याची संधी मिळाली.
-अंशुला पंडित, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images