Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

संचालक हायकोर्टात!

$
0
0

पुढील आठवड्यात होणार याचिका दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहकार विभागाकडून झालेल्या बरखास्तीच्या कारवाईला हायकोर्टाने नाशिक बाजार समितीला दिलासा दिल्याने जिल्हा बँक संचालकांच्याही आशा उंचावल्या आहेत. रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या बरखास्तीच्या कारवाई विरोधात जिल्हा बँक संचालक पुढील आठवड्यात न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. हायकोर्टात याचिका फेटाळली जाऊ नये, याकरिता तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊन सबळ कागदपत्र जुळवून याचिका दाखल केली जाणार आहे.

सन २०१६ मधील आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. नोकरभरती, विविध खरेदी आणि अनियमिततेप्रकरणी सहकार विभागाकडून चौकशी सुरू असतानाच आरबीआयने बरखास्तीची कारवाई केली. त्यामुळे ही कारवाई टाळण्यासाठी संचालक मंडळाने मुंबईत पालकमंत्री, सहकारमंत्री व मुख्यमंत्री यांची भेट घेत साकडे घातले. मात्र नाबार्ड व आरबीआयने कारवाई केलेली असल्याने यात हस्तक्षेप करता येत नसल्याचे शासनाने हतबलता व्यक्त केली होती. बॅँकेचे संचालक मंडळ पूर्वपदावर आणणे आता राजकीयदृष्ट्या शक्य नसल्याचे संचालकांना कळून चुकले आहे. त्यामुळे संचालकांपुढे आता न्यायालयीन लढाईचा पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यासाठी शेतकरी कर्जमाफीचे कारण पुढे केले जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नाशिक बाजार समितीला बरखास्तीबाबत हायकोर्टाने दिलासा दिला आहे. त्यामुळे याचा आधार घेत बरखास्त संचालकांनी या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाईचा पवित्रा स्वीकारला आहे. सहकारमंत्र्यांनी याचिका दाखल करण्यापूर्वी दमाने घेण्यासा सल्ला देत योग्य ती कागदपत्रे जमा करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे काही संचालक मुंबईत आठवडाभरापासून तळ ठोकून असून, कागदपत्रांची जुळवाजुळव केली असल्याचे समजते. त्यासाठी काही मंत्र्यांचे सहकार्य घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे जेष्ठ वकिलांशी चर्चा करून याचिका दाखल करण्याची तयारी केली असल्याचे कळते.

सोमवारी संचालकांची बैठक

न्यायालयात याचिका फेटाळली जाऊ नये याची काळजी घेऊन कागदपत्रे तयार केली जात आहेत. ही तयारी झाली असल्याने पुढील आठवड्यात न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असून, सोमवारी संचालकाची एकत्रीत बैठक होऊन त्यात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे बरखास्तीचा वाद हायकोर्टात पोहोचण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुटुंबीयांशी गळाभेटीमुळे बंदिवानांना उभारी

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड
येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांना शनिवारी त्यांचे कुटुंबीय उराउरी भेटले. बायको हमसून हमसून रडली, तर पित्याला पहिल्यांदाच पाहून चिलीपिली गळ्यालाच लटकली. हा अनोखा गळाभेट उपक्रम राबविताना काही जेल कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळल्याचे दिसून आले. नंतर सर्वांनी एकत्रितपणे एक दिवस आधीच तिळगूळ वाटून संक्रांतीचा आनंद लुटला.

या अभिनव उपक्रमात इगतपुरीच्या भाऊ पिंगळे या कैद्याचा दहावीतील मुलगा आकाश पाच वर्षांनी पित्याला भेटत असल्याने दिवसभर आसवेच ढाळत होता. सहावीतील सागर मोडक्या तोडक्या इंग्रजीत बापाला पोएम एकवत होता. पारोळ्याच्या गौतम खैरनारला तर कुटुंबीय भेटणार या कल्पनने हर्षवायूच झाला. त्याला जेवणच गेले नाही. कळवणचा राजेंद्र गायकवाड पत्नी ज्योतीसमवेत तीन वर्षांची लक्ष्मी, पाच वर्षांचा शशी, सहा वर्षांची राणी या अपत्यांच्या बाललीला कौतुकाने पाहत होता.
एखाद्या चुकीने कारागृहात गेल्यानंतर कैदी आतून-बाहेरून बदलून जातो. शिक्षा संपल्यावर त्याला समाजच नव्हे, तर कुटुंबीयही स्वीकारत नाही. ही दरी दूर करून कैद्यांचा जगण्याचा हुरूप वाढविण्यासाठी कारागृह अतिरिक्त महासंचालक भूषण कुमार यांनी दोन वर्षांपूर्वी कैदी गळाभेट उपक्रम सुरू केला. देशातील हा पहिलाच उपक्रम. शिक्षा झालेल्या कैद्यांना महिन्यातून दोनदा जेलच्या कक्षात दूरवरून नातेवाइकांशी वीस मिनिटे संवाद साधण्याची परवानगी आहे. पंधरा दिवसाला रक्ताच्या नातेवाइकांशी फोनवर पाच मिनिटे बोलण्याचीही सुविधा आहे. परंतु, तासभर मुक्तपणे कुटुंबीयांना भेटता यावे, सुख-दुःख वाटता यावीत म्हणून गळाभेट उपक्रम सुरू झाला आहे.
--
तीनशे कैद्यांना लाभ
नाशिकरोड कारागृहात ३,३३८ कैदी आहेत. त्यामध्ये शिक्षा झालेले २२२२ कैदी आहेत. त्यात खून प्रकरणातील ४६७, तर जन्मठेप झालेले १९४७ कैदी आहेत. बावीसशेपैकी तीनशे कैद्यांची आज गळाभेट झाल्याची माहिती कारागृह अधीक्षक राजकुमार साळी व अशोक कारकर यांनी दिली. हे प्रमाण पंधरा टक्के असले, तरी पुढील वेळी जोमाने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. वर्षातून दोन वेळा गळाभेट होते. शिक्षा झालेल्या कैद्यांच्या कुटुंबीयांशी चार महिने आधीपासून पत्रव्यवहार केला जातो. फोनवरही संपर्क साधला जातो. रक्ताचे नाते असलेल्या कुटुंबीयांनाच गळाभेटीसाठी परवानगी असते. कैद्याची मुले लहान असतील, तर त्यांना आईसह कैद्यांची गळाभेट घेता येते. मुलगा सोळा वयापुढील असेल, तर कारागृह कर्मचाऱ्यासमवेत गळाभेटीसाठी आत सोडले जाते. या कारागृहात बॉम्बस्फोट प्रकरणातील २३ कैदी आहेत. त्यांना गळाभेटीची परवानगी नाही. येथे १४ विदेश कैदी आहेत. त्यांना भेटण्यास कोणीच आले नाही.
--
सुधारणा हाच उद्देश
गळाभेटीसाठी नाशिकरोड जेलमधील मोकळा परिसर कैदी मोहन पावराने सहकाऱ्यांच्या मदतीने शेणाने सारवून लख्ख केला होता. त्यावर जेलमध्येच तयार केलेल्या मोठ्या सतरंज्या टाकण्यात आल्या. स्टेज सजविण्यात आले होते. आज येथे कैद्यांच्या कुटुंबीयांची जत्राच भरली होती. फळे व चहा-बिस्किटे देऊन प्रशासनातर्फे कुटुंबीयांचे स्वागत करण्यात आले. कैद्यांना मुक्त संवाद साधता यावा म्हणून जेलचे सुरक्षा कर्मचारी दूरवरच उभे राहिले. कारागृहाचे अधीक्षक राजकुमार साळी ‘मटा’शी बोलताना म्हणाले, की सुधारणा व पुनर्वसन हे कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. कैद्यांचे नैराश्य दूर व्हावे, त्यांचा जगण्याचा हुरूप वाढावा, तेदेखील समाजाचे घटक आहेत याची जाणीव व्हावी म्हणून गळाभेट उपक्रम राबविला जातो. कैद्यांची निराशा दूर करण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी टाटा सेवाभावी कंपनीचे दोन पुरुष व दोन महिला कर्मचारी येथे सेवा देत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केक मेकिंग’ची पर्वणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
कोणाचाही वाढदिवस असो, की कुठलेही सेलिब्रेशन, हल्ली असे सोहळे केकविना साजरे होत नसल्याचे दिसते. पण, तो केक आपण स्वतः बनविलेला असेल, तर त्याची मजा आणखी वाढते. त्यासाठी बाजारात मिळणारे अॅडव्हान्स केक आणि बेसिक केक कसे बनवावेत याची पर्वणी नाशिकरोड परिसरातील महिलांनी साधली. निमित्त होते ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लबतर्फे आयोजित विशेष कार्यशाळेचे.
नाशिकरोड येथील ऋतुरंग भवनात आयोजित केक मेकिंग वर्कशॉपला मटा कल्चर क्लब सदस्यांसह परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केक वर्ल्डच्या संचालिका उज्ज्वला देशमुख यांनी या वर्कशॉपच्या माध्यमातून उपस्थित महिलांना रसमलाई केक, मँगो ट्रफल केक विथ फुटबॉल डेकोरेशन आदी प्रकारच्या केकची प्रात्यक्षिके करून दाखवीत ते घरी कशा प्रकारे बनवता येतील याची माहिती सोप्या शब्दांत महिलांना करून दिली. दरवेळी मुलांना बाजारातून केक आणून देणे शक्य नसते. त्यासाठी बाजारात मिळणारे अॅडव्हान्स केक घराच्या घरी बनविण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कृती अन् केक बनविताना उद्भवणाऱ्या समस्या याविषयीची माहिती महिलांना देण्यात आली.

चॉकलेट बॉलचे प्रात्यक्षिक
घरात लहान मुलांना सहज करून देता येतील असा चॉकलेट बग बॉल कसा तयार करता येतो व त्याला सजविण्यासाठी लागणारे काय काय साहित्य लागते, याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी महिला केक मेकिंग शिकण्यात हरखून गेल्या होत्या. काहींनी ही प्रात्यक्षिके मोबाइमध्ये रेकॉर्डदेखील केली. अनेकींनी शंकांचे निरसन करून घेतले.

बाजारात मिळणारे डेकोरेटिव्ह केक महाग होत आहेत. त्याच प्रकारचे केक घरी कसे बनविता येतील ही माहिती या अॅडव्हान्स केक मेकिंग वर्कशॉपच्या माध्यमातून मिळाली.
-देविका गोसावी, गृहिणी


‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’च्या माध्यमातून गृहिणींना अधिकाधिक सक्षम कसे बनविता येईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. असे उपक्रम नेहमी राबविणे गरजेचे आहे. -संध्या फडोळ, गृहिणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्कृष्ट बांधकामांचा होणार गौरव

$
0
0

बिल्डर्स दिनानिमित्त आठ कॅटेगिरीच्या इमारतीची निवड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियातर्फे दि. १७ फेब्रुवारी रोजी बिल्डर्स दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने राज्यस्तरीय बैठक होणार असून, त्यानंतर प्रोजेक्ट एक्सलन्स पुरस्कार देण्यात येणार आहेत. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट बांधकाम केलेल्या इमारतींना पारितोषिक दिले जाते. या पारितोषिक वितरणात आठ कॅटेगिरी असून, त्यात हॉटेल्स, रिसॉर्टस व औद्योगिक बांधकामे यांचा यावेळी समावेश करण्यात आला आहे.

यावर्षी ‘भविष्यातील भारत’ ही संकल्पना पुढे करण्यात आली असून, त्यात विविध वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. उत्कृष्ट इमारतरीला दिला जाणाऱ्या पुरस्कारात इमारतीची गुणवत्ता, त्यातील सोयी, दर्जा याचा विचार नेहमीच करण्यात येतो. पण, यावेळेस पर्यावरणपूरक बांधकाम ही संकल्पना केंद्रस्थानी असणार आहे. आठ कॅटेगिरीमध्ये शासकीय इमारती, हॉटेल्स व रिसॉर्टस, औद्योगिक बांधकामे, समूह गृहप्रकल्प (८ हजार स्वेअर मिटरपर्यंत), व्यावसायिक प्रकल्प, संस्थात्मक प्रकल्प, हाऊसिंग प्रोजेक्ट (एकल योजना), समूह गृह प्रकल्प (८ हजार स्वेअर मिटरपुढील) यांचा समावेश असणार आहे. त्यातून एकाची निवड करून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

१९ जानेवारी अंतिम मुदत

या पुरस्कारासाठी १९ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयात ९८६०७४४७०८ संपर्क करा, असे आवाहन असोशिएशनने केले आहे. बांधकाम व्यावासायिकांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. या सर्व कार्यक्रमाचे संयोजन बिल्डर्स असोशिएशनचे अध्यक्ष गोपाल अटल, सेक्रेटरी अरविंद पटेल, विलास बिरारी, दीपक धारराव, मनोज खोडेकर, राहुल सूर्यवंशी, राजेंद्र मुथा हे करणार आहेत. बिल्डर्स असोशिएशनची राज्यस्तरीय बैठक नाशिकमध्ये आयोजित केली असून, त्यात विविध प्रश्नांबाबत चर्चा होणार असून, त्यानंतर पुरस्कार सोहळा होणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे अध्यक्ष राजेंद्र आठवले, विजयराव रेड्डी हे उपस्थित राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये १७ भाविक जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा आटोपून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना अपघात होऊन १७ प्रवासी जखमी झाले. यातील तिन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथील यात्रा आटोपून परतीच्या मार्गावर असलेल्या वाहनांची मोठी रांग लागली होती. अंजनेरी शिवारातील ब्रह्मा व्हॅली शिक्षण संस्थेसमोर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास वाहनांचा वेग कमी झाल्यामुळे चालकाने बसचा (एमएच १२/ईएफ ६११५) वेग कमी केला. मात्र, बसमागे असलेली पिकअप व्हॅन (एमएच ३८/बी १०६०) ब्रेक न लागल्याने बसवर आदळली. यामुळे मागे असलेला ट्रॅक्टर (एमएच १५ ईजी ७६४८) पिकअप व्हॅनवर आदळला. त्यामुळे व्हॅनमधील १७ प्रवासी जखमी झाले. त्यांना त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धेचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. शहरापासून दीड किलोमीटरवरील स्वामी समर्थ गेटच्या पुढे अंधारात ६०-६५ वयोगटातील महिला रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. मात्र, या वृद्ध महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत प्रस्तावित असलेल्या सफारी गार्डनच्या भूखंडांचा मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ साठी जमीन अधिग्रहणाच्या व्यवहारातही बनावट सातबारा उतारे तयार करून सरकारची कोट्यवधी रुपयांत फसवणूक केल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

भूमाफियांशी संगनमत करून धुळ्यातील तत्कालीन तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांनी सर्व नियम, कायदे पायदळी तुडवून सुमारे १३५ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आमदार गोटे यांनी केला आहे. या भूमाफियांच्या बेकायदेशीर व्यवहारांची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असल्याचेही आमदार गोटे यांनी सांगितले. धुळे शहरालगत चक्करबर्डी मागील सर्वे नं ५०१ व ५१० या जमिनीवर सफारी गार्डन उभारण्याचे नियोजन आमदार गोटे यांनी केले आहे. सदर जमीन मिळवण्यासाठी त्यांचे अनेक वर्षांपासून शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याच जमिनीचा आढावा घेत असताना तत्कालीन महसूल अधिकार्‍यांनी भूमाफियांसमवेत संगनमत करून प्रचंड भ्रष्टाचार केला असल्याचे उघडकीस आल्याची माहिती आमदार गोटेंनी दिली.

हे प्रकरण अतिशय गंभीर व पूर्णतः गुन्हेगारी स्वरुपाचे असल्याने भूमाफिया व त्यांना मदत करणार्‍या महसूल कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई केली पाहिजे, अशी सुस्पष्ट शिफारस महसूल आयुक्त महेश झगडे यांनी या अहवालातून केल्याचीही माहिती आमदार गोटे यांनी बोलताना दिली. या जमीन भ्रष्टाचारप्रकरणी स्वतंत्र चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचीही माहिती दिली.

असे आहे प्रकरण...

सरकारच्या मालकीच्या सर्व्हे नं. ५०१ व ५१० मधील जमीन महसूल अधिकार्‍यांनी दगडखाणीकडे वर्ग २०७ हेक्टर जमिनीचे क्षेत्र आपली वडिलोपार्जित संपत्ती असल्याप्रमाणे सर्व कायदे, आदेश पायदळी तुडवून शासकीय निर्णयाचे गैरअर्थ लावून २०१२, २०१३, २०१४ यात जमिनीचे वाटप तत्कालीन तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी यांनी केले. या संबंधी आपण दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे पुराव्यासह तक्रारी केल्या असून, त्याची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. यावर महसूल आयुक्त महेश झगडेंना स्वतः सदर प्रकरणाची १५ दिवसांत चौकशी करून सरकारचे १३५ कोटींचे नुकसानीचा अहवाल सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस वसाहतीला अवकळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर परिसरात औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर पोलिस स्टेशनची उभारणी करण्यात आलेली आहे. येथे प्रशस्त जागेवर पोलिस स्टेशन उभे राहिल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानेदेखील बांधण्यात आली. परंतु, सद्यःस्थितीत येथील पोलिस वसाहतीला अवकळा आली असून, अस्वच्छतेचे ग्रहण लागल्याची स्थिती आहे.
या वसाहतीची इमारत जीर्ण झालेली असून, रहिवासी इमारतीच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जीर्ण झालेल्या इमारतीची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथे स्वच्छता मोहीम राबवावी, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

औद्योगिक वसाहत स्थापन होताना सातपूर पोलिस स्टेशनची उभारणी करण्यात आली. एकूण २९ सदनिका शासनाने पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या. त्र्यंबकेश्वररोडलगत असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये राहण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांचीही पसंती होती. परंतु, कालांतराने पोलिस स्टेशनच्या रहिवासी भागाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत गेल्याने या परिसराला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. महापालिकेने रस्ते बनविले असले, तरी इमारतीच्या परिसरात नेहमीच कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. येथे नव्याने रुजू झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश दराडे यांनी पोलिस स्टेशनसमोरील परिसर स्वच्छता मोहीम राबवून चकाचक केला आहे. मात्र, निवासस्थानांच्या परिसराची अवकळा कायम असल्याचे चित्र आहे.
--
जनावरांचा मुक्त संचार
पोलिसांना पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घरकुलाची व्यवस्था असावी याकरिता इमारतीची उभारणी करण्यात आली होती. परंतु, पोलिस राहत असलेल्या इमारतींच्या बाजूला मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने सर्वांनाच त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा महापालिकेकडे मोकाट जनावरांबाबत तक्रारी करूनदेखील कारवाई केली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
--
उघड्या नाल्यामुळे दुर्गंधी
पोलिस वसाहतीला लागून एमआयडीसीतून वाहणारा नैसर्गिक नाला आहे. या उघड्या नाल्यातून बाराही महिने सांडपाणी वाहत असल्याने दुर्गंधीसह डासांचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. एमआयडीसीतील कारखान्यांना सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने अनेक काराखान्यांकडून या नाल्यात सांडपाणी सोडले जाते. परंतु, त्याचा त्रास पोलिस वसाहतीतील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
--
एमआयडीसी चौकी धूळ खात
सातपूर एमआयडीसीत हजारो काराखान्यांचे जाळे पसरल्यावर स्वतंत्र पोलिस चौकीदेखील उभारण्यात आली होती. परंतु, अनेक वर्षांपासून महिंद्रा कंपनीने अनुदान देत उभारलेली ही चौकी केवळ नावालाच असल्याचे चित्र आहे. धूळ खात पडून असलेल्या या पोलिस चौकीच्याच बाजूला भंगाराची दुकाने थाटली आहेत. याच भंगार दुकानदारांचे साहित्य पोलिस चौकीत ठेवले जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
--
इमारतीसाठी आमदारांचा प्रस्ताव
जुन्या झालेल्या सातपूर पोलिस स्टेशनच्या इमारतीसाठी आमदार सीमा हिरे यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यात पोलिस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीलादेखील नव्याने निधी उपलब्ध करीत घरकुले उभारावीत, अशी मागणी आमदार हिरे यांनी केली आहे. आमदार हिरे यांच्या पुढाकारानेच सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या इमारतीला रंग दिला होता.
--
सातपूरला पोलिस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुंदर वसाहत शासनाने तयार केली होती. परंतु, सद्यःस्थितीत इमारतीच्या बाजूला अस्वच्छता पसरल्याने त्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
-विजय गांगुर्डे, स्थानिक रहिवासी
--
जुन्या झालेल्या पोलिस स्टेशन व रहिवासी इमारतीबाबत शासनाकडे नवीन इमारतीची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेदेखील पाठपुरावा सुरू असून, जीर्ण झालेल्या इमारतीच्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्तावही शासनाकडे दिला आहे.
-सीमा हिरे, आमदार
--
येथील समस्यांबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला सांगितले जाते. महापालिकेने येथे सर्व सुविधा दिल्या आहेत. केवळ पाणीपुरवठा एमआयडीसीकडून होते. कमी दाबाने पाणी येत असल्याच्या समस्या पोलिस वसाहतीतील महिलांनी मांडल्या आहेत.
-सीमा निगळ, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाहिरातीच्या बहाण्याने लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुला-मुलींना जाहिरातीत, तसेच टीव्ही सिरियलमध्ये काम देण्याच्या बहाण्याने शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्यासह त्यांच्या मुलीविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी महिलेला अटक करण्यात आली असून, या फसवणुकीचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत.

या प्रकरणी तेजल कुणाल चांदवडकर (वय ३३, राधिका प्राइड, रामेश्वरनगर, गंगापूररोड) यांनी तक्रार दिली आहे. विदुषी सेठ, तिची आई अंजू ओबेरॉय सेठ आणि तिचे वडील रोहन सेठ अशी संशयित आरोपींची नावे आहेत. गृहिणी असलेल्या चांदवडकर यांना १३ नोव्हेंबर रोजी फेसबुकवरील नाशिक लेडिज ग्रुप या पेजवर विदुषी सेठ हिची जाहिरात दिसली होती. २ ते १५ वर्षे वयोगट असलेल्या मुला-मुलींना जाहिरातीत, तसेच टीव्ही सिरीयलमध्ये काम करण्याची आवड असल्यास त्यांनी फेसबुक मेसेंजरवर संपर्क करण्याचे आवाहन संशयित विदुषीने केले होते. नाशिकलाच फोटोशूट होणार असल्याने, तसेच १० वर्षांचा मुलगा यासाठी इच्छुक असल्याने चांदवडकर यांनी विदुषीशी संपर्क साधला. यातून चांदवडकर यांना ०९०६९६७४१८४ हा क्रमांक मिळाला. त्यावर चांदवडकर यांचे विदुषीशी बोलणे झाले. आमची रेडक्लिफ नावाची प्रोडक्शन हाऊस कंपनी असून, आम्ही मुलांना जाहिरात, तसेच इतर कामांसाठी प्रमोट करतो. तुम्ही मुलाचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवा, असे सांगत नावनोंदणीसाठी तिने दोन हजार रुपये मागितले. पेटीएमद्वारे चांदडवकर यांनी ५०० रुपये दिले, तसेच १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता बालाजी धबधबा, गंगापूररोड येथे मुलाचे फोटोसेशनदेखील पार पडले. दरम्यान, संशयित आरोपींनी चांदवडकर यांच्या मुलाचे फोटो आर्चिस कॅलेंडर, तसेच बालाजी टेलिफिल्म प्रॉडक्शन कंपनीची सिरियल ममता दोनमध्ये निवड झाल्याचे सांगितले. काही कालावधीनंतर फॅशन बिग बाजारसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसीडर म्हणून मुलाची निवड झाल्याचेही संशयित विदुषीने सांगितले. यासाठी ती वेगवेगळे कारण काढून चांदवडकर यांच्याकडून पैसे उकळत होती. काही दिवसांपूर्वी सिरियलची शूटिंग २८ डिसेंबर ते २ जानेवारी यादरम्यान बेंगळूरू येथे होणार असून, त्यासाठीही पैशांची मागणी करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र अशी कोणतीही शूटिंग पार पडलीच नाही. या कालावधीत संशयितांनी चांदवडकरांकडून १८ हजार २३३ रुपये उकळले. फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाल्याने चांदवडकर यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
--
महिलेला अटक
रेडक्लिफ कंपनीची संचालक असलेली अंजू ओबेरॉय सेठ ही गुन्हा दाखल झाला त्यावेळी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये थांबलेली होती. तक्रारदाराची तक्रार आल्याने पोलिसांनी सदर हॉटेलमध्ये चौकशी केली. मात्र, महिला त्यावेळी हॉटेलमध्ये नव्हती. शुक्रवारी (दि. १२) ती परतताच पोलिसांनी तिला अटक केली. उर्वरित दोन्ही संशयितांचा शोध सुरू असून, हे कुटुंब दिल्ली येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
--
संशयित आरोपींनी ८० ते ९० जणांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. त्यापैकी पाच ते सहा तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. अशा पद्धतीने पैसे देण्यापूर्वी नागरिकांनी कंपनीबाबत चौकशी करायला हवी. मुला-मुलींचे फोटो काढल्यानंतर त्यांचा गैरवापर देखील होऊ शकतो.
- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माहेश्वरी भवनसाठी ४ फेब्रुवारीला निवडणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्री माहेश्वरी विद्यार्थी भवनाचा त्रैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, ही निवडणूक ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होणार असून त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष असे पाच पदाधिकारी व इतर १६ कार्यकारणी मंडळाचे सदस्य निवडले जाणार आहेत.

शिक्षणासाठी बाहेरगावहून आलेल्या माहेश्वरी समाजाच्या विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये होस्टेल असावे यासाठी ६० वर्षांपूर्वी या संस्थेची निर्मिती करण्यात आली. शरणपूर रोडवरील जुनी पंडित कॉलनी येथे या संस्थेची इमारत आहे. जुन्या घटनेप्रमाणे या संस्थेचे कामकाज आतापर्यंत चालत होते. पण, नुकतेच संस्थेने घटनेतील काही नियमांत बदल केल्यामुळे या त्रैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे संस्थेचे पदाधिकारी सांगत आहेत.

संस्थेमध्ये एकूण ७६० सभासद असून त्यात आधारस्तंभ, आश्रयदाते, आजीवन, सर्वसाधारण अशी वर्गवारी आहे. त्यामुळे या गटातून सदस्यांची निवड केली जाणार आहे. आज या संस्थेत ९५ विद्यार्थी व ७२ विद्यार्थ्यांनी असून, त्यांच्यासाठी संस्थेने सोलर सिस्टिमपासून विविध सुविधा दिल्या आहेत.

निवडणूक कार्यक्रम

या निवडणुकीसाठी १६ जानेवारीपासून मतदार यादीवर हरकती मागवल्या जाणार आहेत. त्यानंतर १७ तारखेला हरकतींची छाननी करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १८ ते २५ जानेवारीपर्यंत नामनिर्देशन देण्याची तारीख आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाची छाननी २७ जानेवारीला करून वैध यादी त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत ही ३० जानेवारी आहे. त्यानंतर त्याच दिवशी वैध उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ४ फेब्रुवारीला आवश्यक वाटल्यास मतदान घेतले जाणार आहे. मतदान झाले तर त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

माहेश्वर विद्यार्थी भवनाची निवडणूक नव्या घटनेप्रमाणे घेतली जाणार आहे. ही त्रैवार्षिक निवडणूक असून, ती बिनविरोध होईल. त्यासाठी कोणताही वाद नाही.

- विनोद जाजू, अध्यक्ष, माहेश्वर विद्यार्थी भवन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरबसल्या मोबाइल करा आधारकार्डशी लिंक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे आता सोपे झाले असून, घरबसल्या हे काम काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. १ डिसेंबपासून ही सुविधा वेगवेगळ्या मोबाइल ऑपरेटरने टप्याटप्याने सुरू केली आहे. बीएसएलने त्यात आघाडी घेतली असून, १४५४६ या नंबरवर डायल करून आपला मोबाइल आधार लिंक करण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.

आधार लिंकसाठी १४५४६ हा नंबर डायल केल्यानंतर पहिल्यांदा भाषेची निवड, त्यानंतर भारतीय आहात की एनआरआय आहात याची निवड करावी लागणार आहे. त्यानंतर आधार लिंकला संमती देऊन १२ डिजिटचा आधार नंबर टाइप करावा लागणार आहे. त्यानंतर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) नंबर टाकून आपला मोबाइल सक्सेसफुली आधार लिंक करता येणार आहे. सरकारच्या जवळपास सर्व योजनांच्या लाभांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आल्यामुळे अनेकांना ही डोकेदुखी झाली आहे. मोबाइल आधारशी लिंक करण्याबाबत तर गेल्या काही दिवसांपासून मेसेज मोबाइलवरुन येत आहेत. त्यासाठी ऑपरेटकडे जाऊन अंगठा दाबून हे लिंक करण्यासाठी अनेकांना त्रासही सहन करावा लागला. त्यामुळे ही सोपी पध्दत सर्वांना दिलासा देणारी ठरली आहे. अद्याप याबाबत फारशी माहिती नसल्यामुळे अनेकांच्या अडचणी कायम आहेत. सरकारने बँक, आयकर रिटर्न यासाठीही आधारकार्ड अत्यावश्यक केले आहे. त्यामुळे मोबाइल क्रमांक आधारकार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अनेक फायदे मिळणार असल्याचे बोलले जाते. यामुळे आयकर रिटर्न ऑनलाइन व्हेरिफाय होणार आहे. तर ई-आधार डाऊनलोड करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाकाऊपासून बनवले टिकाऊ पतंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कापड, प्लास्टिक, पतंगांच्या जुन्या काड्यांपासून बनवलेला नवा पतंग असे विविध प्रकारचे पतंग बनविण्याची कार्यशाळा शनिवारी कुसुमाग्रज स्मारकात झाली. बालग्रंथालय, तरुणाई, ग्रंथ तुमच्या दारी व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे या उपक्रमांतर्गत ही पतंग निर्मितीची कार्यशाळा झाली.

निकामी झालेल्या छत्र्यांपासून पतंग बनविण्याची पध्दत यावेळी हेमंत नाखरे यांनी सांगितली. कागदाचे पतंग फाटतात, त्यामुळे मुले नाराज होतात म्हणून प्लास्टिकपासून पतंग बनविण्याची वेगळीच पध्दत यावेळी नाखरे यांनी सांगितली. तसेच, रिकामे पेन व त्याचे टोपण हे वापरून पतंग बनविण्याची कला यावेळी त्यांनी सांगताच मुलांना प्रचंड आनंद झाला. मोठ्या आकाराच्या दहापेक्षा जास्त पतंग यावेळी नाखरे यांनी बनविल्या. या कार्यशाळेत ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमात अंध व आर्थिक दुर्बल भागातील मुलांनाही सहभागी करून घेण्यात आले. साहित्यासाठी विशेष सहकार्य गुणवंत मणियार यांनी केले. कार्यशाळेत माधवी पाठक यांनी साहाय्य केले. यावेळी नाखरे यांनी मुलांना वाऱ्याची दिशा कशी ओळखायची ते सांगितले. ट या कार्यशाळेचे आयोजन विनायक रानडे यांनी केले होते.

दृष्टिबाधितांनीही बनवले पतंग

नॅब संस्थेतील १० दृष्टिबाधित विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते. त्यांना पतंग कशी बनवायला सांगायची हा मोठा प्रश्न पतंगवाल्या काकांसमोर उभा राहिला होता. परंतु, वेळेत वेळ काढून इतरांना शिकवत असताना त्यांनाही हा मांजा आहे, हा कागद आहे, या काड्या आहेत, या डिंकाने चिकटवायच्या वगैरे पध्दत नाखरे यांनी समजून सांगताच दृष्टिबाधित दहाही विद्यार्थ्यांनी एकदाच समजून घेत उत्कृष्ट पतंग बनवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप नगरसेवक आयुक्तांच्या पाठीशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव होत असल्यास आम्ही तो हाणून पाडू. महापालिकेतील माफियागिरी कदापि खपवून घेतली जाणार नाही. भाजप नगरसेवक आयुक्त धायगुडे यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू. तसेच तसा ठराव पारित झाल्यास आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून ठराव हणून पाडू. गरज पडल्यास जनजागृती करून जनतेसह रस्त्यावर उतरू, असे भाजप महानगराध्यक्ष सुनील गायकवाड यांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप नगरसेवक मदन गायकवाड, राजेंद्र शेलार, विवेक वारुळे, दीपक शिंदे, भरत बागुल, संजय काळे, विजय देवरे, नीलेश साबणे उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, आयुक्त धायगुडे यांनी शहर हागणदारी मुक्त केले. शहरात विविध विकास कामे राबविली. शहर हितासाठी योग्य निर्णय घेतले. येथील महापालिकेत कागदी घोडे नाचवून कामे दाखवली जातात. त्याची बिले मंजूर केली जातात. या प्रकरणावर आळा बसावा म्हणून आयुक्त धायगुडे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहेत. भाजप नगरसेवकांसह शहरातील जनता देखील आयुक्तांच्या बाजूने उभी राहील, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.

अशी पडगी ठिणगी

मागील आठवड्यात शहरातील विकासकामांवर चर्चा करण्यासंदर्भात महापौर रशीद शेख यांच्या कार्यालयात पक्षांचे गटनेते, नगरसेवक व मनपा अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यान आयुक्त धायगुडे व महापौर शेख यांच्यात शाब्दिक वाद झाले. यानंतर दुसऱ्या दिवशी आयुक्त धायगुडे यांनी पत्रकार परिषद घेऊन शहर हितासाठी व मनपाची आर्थिक स्थिती बघता आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे जाहीर केले होते.

याबाबत सत्ताधारी व महापौर यांना सदर बाब खटकल्याने त्यांनी आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली असल्याची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप गटनेते नगरसेवक सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता आयुक्त आणि सत्ताधारी यांच्यातील शीतयुद्धात विरोधक भाजप व महा गठबंधन आघाडीने देखील उडी घेतली असून राजकारण सुरू झाले आहे.

आयुक्तांविरोधात अविश्वासाची तयारी

येथील महापालिका आयुक्त संगीता धायगुडे व महापौर रशीद शेख यांचा वाद विकोपाला गेला असून, सत्ताधारी काँग्रेस पक्ष आयुक्त धायगुडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे. यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार असून, भाजप व महागटबंधन आघाडीने यास समर्थन न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आधाडीचे गटनेते बुलंद इकबाल यांनी पक्षादेश देखील जारी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचे बंड

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील द्याने येथील मोसम नदी पात्रातून शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर चालकांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच प्तसेच दोन्ही ट्रॅक्टरची मोडतोड करून द्याने ग्रामस्थांनी वाळू वाहतुकीविरोधात बंड पुकारले. दरम्यान, या प्रकरणाची प्रशिक्षणार्थी तहसीलदार सुधाकर राठोड यांना मध्यरात्रीच माहिती देण्यात आली. मात्र ते रात्री घटनास्थाळी पोहोचले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

ते शनिवारी सकाळी द्यान्यात पोहोचले असता ग्रामस्थांना त्यांच्यासह मंडालाधिकारी खरे या दोघांना ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. जिल्हाधिकारी आल्याशिवाय अधिकाऱ्यांनी सुटका करणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली. शेवटी तहसीलदार प्रशांत पाटील दुपारी पोहोचल्यावर या अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली.

तालुक्यात दिवसेंदिवस नदीपात्रातील वाळू लिलाव व अवैध वाळू वाहतुकीस प्रचंड विरोध असताना ब्रह्मणगाव, नामपूर परिसरातील गिरणा, मोसम नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू आहे. वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या पाठीशी तालुक्यातील राजकीय मंडळी असल्याने महसूल व पोलिस प्रशासनही मख्खपणे त्यांच्याकडे पाहत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री सुमारास द्याने येथील मोसम नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाला. त्यांनी एकत्र येत वाळू वाहतूक करणाऱ्या इसमांना बेदम चोप दिला. तसेच त्यांचे वाळूचे ट्रॅक्टर ग्रामपंचायत कार्यालयजवळ आणून त्यांची मोडतोड केली.

बागलाणचे तहसीलदार व नायब तहसीलदार यांना पाचारण करून परिस्थितीची जाणीव करून दिली. पोलिस व महसूल प्रशासनावरही ग्रामस्थांनी तोंड सुख घेतले. आगामी काळात असा प्रकार घडल्यास कठोर कारवाई करण्याची भूमिका करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. या आंदोलनात मव‌िप्रचे माजी संचालक भरत कापडणीस, उपसरपंच गोपाल कापडणीस, दावल कापडणीस, पोपटराव कापडणीस, प्रमोद कापडणीस आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायलॉन मांजात अडकले घुबड

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

मकर संक्रांतीच्या पतंगोत्सवात गेल्या काही वर्षांपासून बंदी असतानाही येथील पतंगप्रेमींकडून ‘नायलॉन’ मांजाचा सर्रास वापर केला जात आहे’ हा मांजा मानवांसह पशु-पक्ष्यांनाही इजा करीत आहे. येवल्यातील पतंगोत्सवात शनिवारी या नायलॉन मांजाच्या तावडीत एक घुबड सापडले. ते घुबड गंभीर जखमी झाले आहे. शहरातील काही तरुणांनी समयसूचकता दाखवत या घुबडाची नायलॉन मांजातून सुटका करून जीवदान दिले.

तीन दिवस चालणाऱ्या येवला शहरातील पतंग उत्सवास शनिवारी सुरुवात झाली. आकाशात दिवसभर रंगीबेरंगी पतंग घिरट्या घालताना पतंग काटाकाटीची स्पर्धाही रंगली होती. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील गणेश कांबळे यांना पिंपळाच्या झाडाच्या फांदीवर कसली तरी फडफड ऐकू आली. त्यांनी झाडावर नजर टाकली असता एक पक्षी मांजात अडकलेला दिसला. कांबळे यांनी निरंजन परदेशी, गौरव कांबळे, बाबू अत्तार, किशोर मोतीवाले आदींना बोलावून घेतले. सर्वांच्या मदतीने पक्षी खाली काढून त्याची नायलॉन मांजापासून सुटका केली. हा पक्षी पांढऱ्या रंगाचे घुबड असल्याचे लक्षात आले. त्याच्या पंखात व पायात नायलॉन मांजा लागल्याने ते जखमी झाले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला अंगणगाव येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिवादन महारॅलीने मनमाडमध्ये उत्साह

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मनमाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून मनमाड शहरातून भव्य अभिवादन महारॅली काढण्यात आली. नामांत्तर लढ्यात बलिदान दिलेल्यांना अभिवादन करण्यात आले. पांढरे वस्त्र, हातात निळेध्वज, डोक्यावर निळीटोपी घालून रॅलीत हजारो आंबेडकर अनुयायी सहभागी झाले. कुठल्याही घोषणाबाजी न करता अगदी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने रॅली शहरातील विविध भागातून जात एकात्मता चौकात समोरोप करण्यात आला.

औरंगाबाद येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी महाराष्ट्रात आंबेडकर अनुयायांनी मोठा लढा उभारला होता. यावेळी अनेक आंदोलने झाली. अनेकांना अटक झाली. तर या विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे यासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यानंतर या विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यात आले. तेव्हापासून या विद्यापीठाचा नामविस्तार दिन १४ जानेवारी रोजी राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदा या नामविस्तार दिनाचे २४ वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या मनमाड शहरात आंबेडकरी अनुयायांनी या लढ्यात ज्यांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य महारॅलीचे आयोजन केले होते. शहरातील पाकिजा कॉर्नर, महात्मा गांधी पुतळा, सुभाष रोड, छत्रपती शिवाजी चौक, फुले पुतळा, कर्मवीर गायकवाड चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे एकात्मता चौकात आली. रॅलीत राजेंद्र पगारे, राजेंद्र आहिरे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, दिलीप नरवडे, कैलास आहिरे, पी. आर. निळे, अमोल खरे, नीलेश वाघ, अमीन शेख, प्रवीण पगारे आदींसह सर्व पक्षातील आंबेडकरी समाजबांधव सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरात हॉकर्स झोनचा फज्जा

$
0
0

नाशिक : अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेने हॉकर्स झोनच्या बाबतीत मात्र आस्तेकदम धोरण स्वीकारले आहे. शहरात हॉकर्स झोन आणि नो हॉकर्स झोनची निश्चिती होऊन सात महिने लोटले, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. १६५ हॉकर्स झोनपैकी ४० हॉकर्स झोन तयार झाले असून, अंमलबजावणीअभावी त्याचा फज्जा उडाला आहे.

केंद्र सरकारच्या नगरविकास व दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने नागरी क्षेत्रातील रस्त्यांवरील किरकोळ विक्रेत्यांबाबत राष्ट्रीय फेरीवाला धोरण जाहीर केले आहे; परंतु या धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याचे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आले. ९ सप्टेंबर २०१३ रोजी देशभर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. त्यानुसार राज्य सरकारनेही राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले; परंतु महापालिका क्षेत्रात चार वर्षांपासून यावर संथ कार्यवाही सुरू आहे. शहरात नेमके कोठे आणि किती फेरीवाले आहेत हे निश्च‌ित व्हावे, यासाठी महापालिकेने गेल्या वर्षी शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. तब्बल ९,६२० फेरीवाल्यांची बायोमेट्रिक नोंदणी करण्यात आली. या फेरीवाल्यांनी मुख्य बाजारपेठांचा आणि रस्त्यांचा बहुतांश भाग व्यापल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी जागा निश्चित करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश देण्यात आले.

फेरीवाला धोरण अंमलबजावणीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने वर्षभर अथक परिश्रम करीत शहरात मोठ्या कष्टाने १६५ हॉकर्स झोनची निर्मिती केली. त्याबाबतच्या ठरावाला १६ जून २०१६ रोजी महासभेची मंजुरीही मिळाली; परंतु या हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीत अनंत अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे हॉकर्स झोन कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.

निवासी क्षेत्रात व गर्दी नसलेल्या ठिकाणी हॉकर्स झोन तयार केल्याने फेरीवाल्यांचा स्थलांतराला तीव्र विरोध आहे. त्यामुळे गेल्या सात महिन्यांत १६५ पैकी अवघे ४० हॉकर्स झोन तयार होऊ शकले आहेत. त्यापैकी निम्मे अद्याप कागदावरच आहेत. १२५ हॉकर्स झोन अजूनही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहेत.

नाशिकरोड, पश्मिममध्ये अनास्था

हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीत पंचवटी विभाग आघाडीवर असला तरी येथील ४१ पैकी तयार १६ हॉकर्स झोनबाबत हॉकर्सधारकांनाच शंका आहेत. सर्वाधिक वर्दळीच्या नाशिक पश्चिम, पूर्व आणि नाशिकरोडमध्ये मात्र संथ गतीने कार्यवाही सुरू आहे. नाशिकरोडमध्ये ४३ पैकी ३, तर पूर्वमध्ये १३ पैकी ४ हॉकर्स झोन तयार झाले आहेत. नाशिकरोड, पूर्व आणि नाशिक पश्चिममध्ये हॉकर्सची संख्या सर्वाधिक आहे; परंतु या तीन विभागांतच अंमलबजावणीची बोंब असल्याने हॉकर्स धोरणाचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विभागनिहायय हॉकर्स झोन (तयार हॉकर्स झोन) ः नाशिक पूर्व- १३ (४), नाशिक पश्चिम- २८ (३), पंचवटी- ४१ (१६), नाशिकरोड- ४३ (३), सिडको- १५ (९), सातपूर- २५ (५).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात मुलीवर सामूहिक बलात्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

आई आणि भाऊ बाजारात गेल्याची संधी साधत दोन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना सटाणा येथील आराई पांधी परिसरात घडली. या वेळी नराधमांनी मुलीच्या लहान बहिणींचे हातपाय बांधून ठेवले होते. सटाणा पोलिसांनी दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्यांची नावे श्याम सुरेश पवार व विलास बापू सताळे अशी आहेत.

पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली असून, त्यात नमूद केले आहे, की ते आराई पांधी येथे एका शेतात मजुरी करतात. तीन मुलींना घरी सोडून शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास आई आपल्या मुलांसह सटाण्याच्या आठवडे बाजारात संक्रातीच्या सण बाजारासाठी आली होती. आई आणि मुले बाजारात गेल्याची संधी साधत परिसरातच राहणाऱ्या विलास सताळे व श्याम पवार या दोन तरुणांनी घरात प्रवेश करत दोन्ही लहान बहिणींचे हातपाय बांधले. विलास सताळेने दोन्ही बहिणींचे तोंड दाबून धरत आवाज न करण्याची धमकी दिली. याच वेळी श्याम पवारने पंधरा वर्षीय मोठ्या बहिणीला दुसऱ्या खोलीत नेत तिच्यावर बलात्कार केला. दोन्ही नराधम घटनास्थळावरून पसार झाल्यानंतर पीडित मुलीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. त्यातील एकाने पीडित मुलीच्या भावाला फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत दोन्ही नराधमांना अटक केली असून, त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महारेरा’साठी आता ‘मटा’चे व्यासपीठ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता निर्माण होण्यासाठी केंद्र सरकारच्या रेरा कायद्याची दखल घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (महारेरा) स्थापन केले आहे. मात्र, यासंदर्भात अनेक समज-गैरसमज असून, याविषयीच्या शंका निकाली काढायच्या कशा, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचीच दखल घेत ‘मटा’ने ‘महारेरा-शंका समाधान’ हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे.
राज्य सरकारने एक मे २०१७पासून महारेरा कायदा लागू केला आहे. सद्यःस्थितीत त्यास सहा-सात महिनेच झाले आहेत. त्यामुळे या कायद्याचा अभ्यास, त्याची माहिती, तरतुदी आणि अन्य बाबीही सर्वसामान्यांना फारशा माहिती नाहीत. सर्वसाधारणपणे प्रचलित नियमांची माहिती अनेकांना असते. पण, महारेरा कायद्यान्वये ती बरोबर आहे की नाही याची खात्री नसते. जुन्या इमारतींचा पुनर्विकास, आपण घेत असलेल्या घर किंवा फ्लॅटशी महारेराचा असलेला संबंध, निश्चित वेळेत न मिळणारा ताबा, पार्किंगसाठी घेतले जाणारे चार्जेस या आणि अन्य प्रश्नांनी सध्या अनेकांना घेरले आहे. यासंदर्भात योग्य ती माहिती कुठे आणि कशी मिळेल, याचीही चिंता काहींना सतावत आहे. हीच दखल घेत ‘मटा’ने एक उपक्रम सुरू केला आहे. ‘महारेरा- शंका समाधान’ या उपक्रमाद्वारे वाचकांना त्यांच्या शंका मांडण्याचे एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. वाचक त्यांचे प्रश्न, शंका लेखी किंवा मटा सिटिझन रिपोर्टर या अॅपद्वारे पाठवू शकतात. या प्रश्नांना ‘मटा’चे पॅनल उत्तरे देणार आहे. उत्तरे ‘मटा’मध्येच प्रसिद्ध केली जाणार आहेत.

या पत्त्यावर पाठवा प्रश्न

‘महारेरा- शंका समाधान’, महाराष्ट्र टाइम्स, तिसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड किंवा मटा सिटिझन रिपोर्टर या अॅपद्वारे प्रश्न पाठविता येईल. विषयामध्ये ‘महारेरा- शंका समाधान’ असा उल्लेख आवर्जून करावा. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप विनामूल्य उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबाज करंडक स्पर्धा आजपासून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
बाबाज थिएटर्स नाशिक आणि एम्स परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाबाज करंडक स्पर्धेचे उद्घाटन आज, दि. १५ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी उद्घाटक म्हणून नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे समन्वयक श्याम लोंढे, प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ही नाट्यस्पर्धा ज्येष्ठ रंगकर्मी, रंगभूषाकार नारायण देशपांडे यांना समर्पित आहे.
स्पर्धेसाठी ३० एकांकिका आल्या असून, त्यापैकी निवडक १७ नाट्यसंस्थांच्या एकांकिका सादर होणार आहेत. गुरूवार, १८ रोजी सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता पडसाद थिएटर्सची ‘नो चान्स’ एकांकिका होणार आहे. त्यानंतर ‘रंगपंढरी’, ‘पुणेची फडस’ ही एकांकिका होईल.
१६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता एकांकिकांना सुरुवात होणार आहे. यात प्रारंभी कृपा शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संस्थेची ‘बायकोच्या नवऱ्याच्या बायकोचा खून’ ही एकांकिका होणार आहे. त्यानंतर ‘परिवर्तन’, ‘विवर’, ‘रेनमेकर’, ‘रणमर्द’ या एकांकिका होतील. १७ रोजी दुपारी ३ वाजता ‘पाऊस आवडणारी मुलगी’, ‘दहा किलोमीटर’, ‘अभंग’, ‘सरप्राइज’, ‘ओरिगामी’ या एकांकिका होतील. १८ रोजी सकाळी ११ वाजता ‘वाळुवरील मुंगी’, ‘ब्लॅकआउट’, ‘भडभुंजी’, ‘नि:शस्त्र योद्धा’, ‘शहाण्या माणसाचा चष्मा’ या एकांकिका सादर होतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल.

अशी आहेत पारितोषिके
या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या एकांकिकेस १५ हजार, द्वितीय १० हजार, तृतीय ५ हजार अशी बक्षिसे आहेत. दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय व पार्श्वसंगीतासाठी प्रथम १५००, द्वितीय १००० व तृतीय ५०० रुपयांचे बक्षिस आहे. वाचिक अभिनयासाठी ५०० रुपये व सर्वोत्कृष्ट लेखनासाठी १००० रुपयांचे बक्षीस आहे. या एकांकिका स्पर्धांना अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बाबाज थिएटर्सचे प्रशांत जुन्नरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संक्रांतींच्या गोडव्याला पतंगबाजीची जोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
रविवार आणि संक्रांत असा माहौल जुळून आल्याने चिमकुल्यांसह तरुणांनी पतंगबाजीची धूम केली. घरातील मोठ्यांनीही या उत्सवात उत्साहाने भाग घेत सणाचा आनंद लुटला. बहुतांश ठिकाणी इमारतीच्या छतांवर तरुणांनी डीजे लावून पतंगोत्सवाची धमाल केली. अनेकांनी एकत्र ग्रुपने पतंग उडविण्याचा आनंद लुटला. ‘गई बोला रे’, ‘ए लपेट’च्या आरोळ्या ठोकत एकमेकांचा उत्साह द्विगुणित केला जात होता. सकाळी सुरू झालेला कल्ला संध्याकाळपर्यंत सुरू होता.
निरभ्र आकाशात हवेची हलकीशी झुळूक, हवेत पतंग उडविण्यासाठी उडालेली लगबग, ‘हीप हीप हुर्रे’, ‘कमॉन चिअर अप’ अशा शब्दांत एकमेकांना प्रोत्साहित केले जात होते. संगीताच्या तालावर नाचणारे चिमुकले, पतंगांची होणारी काटाकाटी, त्यातून होणारा जल्लोष, हवेत भिरभिरणाऱ्या विविध रंगांच्या पतंगांनी आकाश व्यापून गेले होते. जल्लोष आणि आशा-आकांक्षांचे प्रतीक असलेल्या पतंगोत्सवाचा आनंद तरुणांनी तसेच बच्चे कंपनीसह त्यांच्या पालकांनीही लुटला.
दिवसभर चाललेली ही पंतगबाजी चैतन्य आणि उत्साहाचे प्रतीक बनली. बच्चे कंपनींसह कॉलेज तरुणांनी तर या पतंगोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाच, पण मोठ्यांनीही पतंग उडवून बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. इतर खेळांच्या तुलनेत हा पतंगोत्सव उत्साही आणि आनंद देणारा ठरला. पतंग उडवण्याचेही तंत्र असते आणि स्पर्धकाला चीत करणे हे कसब असते. हे अनेकांना शिकता आले.

पतंगांचा बाजार फुलला
रविवारी संक्रांत असल्याने शहरातील पतंगांची दुकाने शनिवारी सकाळपासूनच फुलली होती. शहरातील रविवार कारंजा परिसरात असलेल्या दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे भद्रकाली परिसरात मोठ्या प्रमाणात मांजा खरेदी झाली. वंचित मुलांना पतंगीचा आनंद लुटता यावा यासाठी शहरातील काही संस्थांनी पतंगवाटप केले. कापलेले पतंग पकडण्यासाठी लहान मुले रस्त्याने पळत होती.

खोडे थोडक्यात बचावले

अशोकनगरच्या जाधव संकुलमध्ये राहणारे ज्ञानेश्वर खोडे कामानिमित्ताने सातपूरला गेले होते. घरी परतताना जाधव संकुलच्या मुख्य रस्त्यावर
दुचाकीवरून जात असताना त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला. खोडे यांनी तत्काळ त्यांचा डाव्या हाताच्या एका बोटाने मांजा पकडला. यात त्यांच्या गळ्याला जखम झाली असून बोटही कापले गेले आहे. प्रसंगावधान राखल्याने गळा चिरला गेला नाही, असे ते म्हणाले.

नायलॉन मांजावर बंदी असतानाही पतंग उडविताना त्याचा सर्रास वापर होत असल्याचे पहायला मिळाले. कामानिमित्ताने सातपूरहून घरी परतताना
कटलेल्या पतंगाचा मांजा माझ्या गळ्याला लागला. वेळीच सावधान होत मी तो हाताने पकडला म्हणून पुढील अनर्थ टळला. यावर कायमस्वरुपी बंदी आणावी.
- ज्ञानेश्वर खोडे, जखमी नागरिक


वाण खरेदीसाठी महिलांची गर्दी
‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’, म्हणत संक्रांतीला सर्वांनी आपला स्नेह दृढ केला. या सणानिमित्त महिलावर्गात हळदी-कुंकवाचा उत्साह मोठा असल्याने त्यांनी वाण लुटण्यासाठी तयारी सुरू केली आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवसापासूनच त्यासाठी बाजारात गर्दी दिसून येत असून रविवारच्या सुटीचा सदुपयोगही अनेकींनी या खरेदीसाठी केला.
मकरसंक्रांत म्हणजे महिलावर्गासाठी आनंददायी सण असतो. एकमेकींना वाण देऊन मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न यातून केला जातो. एकमेकींना भेटण्याची, गप्पा मारण्याची संधी म्हणून हल्ली गार्डनमध्ये किंवा एकत्रितरित्या हळदीकुंकू करण्यास प्राधान्य देऊ लागल्या आहेत. यंदा रथसप्तमीही लवकर असल्याने दहा दिवसातच सुवासिनींना हळदी कुंकूचा कार्यक्रम करता येणार आहे. त्यासाठी आकर्षक व उपयोगी असे वाण लुटण्यास प्राधान्य मिळत असून त्यासाठी विविध वस्तूंचा शोध महिलावर्ग घेत आहेत. स्टीलच्या डब्या, आकर्षक कँडल्स, वस्तूंचे स्टँड, छोटे बटवे, रुमाल, शोपीस, संसारोपयोगी वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य मिळत आहे. पंधरा रुपयांपासून आपल्या आवडी निवडीनुसार तसेच बजेटनुसार वस्तू खरेदी केल्या जात असल्याचे चित्र बाजारात आहे. खरेदीच्या या लगबगीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

काळी साडी अन् हलव्याचे दागिने
नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिली जातात. बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे या वस्तूंची खरेदी संक्रातीला प्रामुख्याने केली जाते. हलव्याचे तयार दागिनेही बाजारात उपलब्ध असून त्यात हार, नेकलेस, कानातले, बिंदी, बांगड्या, कंबरपट्टा, बाजूबंद, मंगळसूत्र, कानाचे वेल, मुकूट असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय आपल्या मागणीनुसार दागिने तयार करुन दिले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images