Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेशन दुकानदारांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधार कार्डाची मागणी केली म्हणून वाशिम जिल्ह्यात रेशन दुकानदाराला एका लाभार्थी ग्राहकाने मारहाण केली. जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी सोमवारी दुकाने बंद ठेवून या घटनेचा नाशिकमध्येही निषेध नोंदविला. रेशन दुकानदारास मारहाण करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

स्वस्त धान्य वितरणप्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभागाने बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. प्रत्येक रेशन कार्डधारकाला पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिनच्या मदतीनेच धान्य वितरण केले जाते; परंतु त्याकरिता रेशन कार्डाशी आधार लिंक करणे अनिवार्य आहे. ही जबाबदारी पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांच्या माथी मारली आहे. आधार लिंकिंगबाबत पुरवठा विभागाचा दबाव आणि सर्वसामान्यांचा उफाळून येत असलेला रोष अशा कात्रीत रेशन दुकानदार सापडत आहेत. वाशिम येथेही असाच प्रकार घडला. एका लाभार्थ्याकडे आधार कार्डाची मागणी केली म्हणून गणेश तिवारी या रेशन दुकानदारास आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यातील २,६०९ रेशन दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना रेशन दुकानदारांच्या संघटनेने निवेदन दिले. अध्यक्ष निवृत्ती कापसे यांच्यासह महेश सदावर्ते, दिलीप तुपे, सलीम पटेल, रतन काळे, राजू लोढा आदी उपस्थ‌ित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जवाहर मार्केटचे हाल बेहाल

$
0
0

मटा मालिका
सरकारी इमारतींना ‘घरघर’
नाशिकरोड

---



जवाहर मार्केटचे हाल बेहाल



नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड
भूतपूर्व नाशिकरोड-देवळाली नगरपालिकेचे मुख्य प्रशासकीय कार्यालय आणि सध्याच्या नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाची धुरा अनेक वर्षे वाहणाऱ्या देवी चौकातील जवाहर मार्केट या इमारतीचे सध्या हाल बेहाल झाले आहेत. साफसफाईअभावी या इमारतीच्या दालनांना सध्या उकिरड्याचे स्वरूप आले असून, सुरक्षेअभावी या इमारतीत मद्यपींचा सर्रास वावर वाढला आहे. तब्बल ५२ वर्षे परिसराचे वैभव असलेली ही इमारत सध्या जर्जर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
जवाहर मार्केट या महापालिकेच्या पूर्वीच्या विभागीय कार्यालयाची सध्या दुरवस्था झाली आहे. या इमारतीची उभारणी तत्कालीन नाशिकरोड-देवळाली नगरपालिकेने केली होती. अगदी अलीकडच्या काळापर्यंत परिसराच्या विकासाचे केंद्र ठरणाऱ्या या इमारतीची पूर्वीप्रमाणे साफसफाई होत नाही. गॅलरीचा वापर कचरा साचविण्यासाठी होत आहे. बहुतांश दालनांना सध्या टाळे लावलेले आहे. येथील महापालिका विभागीय कार्यालयाचे कामकाज दुर्गा गार्डनजवळील नवीन इमारतीतून सुरू झाल्यापासून या इमारतीला बकाल स्वरूप आल्याचे दिसते. सध्या या इमारतीतीत सर्व फर्निचर धूळ खात पडून आहे. येथे सुरक्षारक्षकही नेमणुकीस नाही. केवळ शासकीय ग्रंथालय आणि सिटी सर्व्हे या दोन कार्यालयांचा अपवाद वगळता ही इमारत सध्या बेवारस पडून आहे. आगप्रतिबंधक सिलिंडर, झाडांच्या कुंड्या, खुर्च्या असे साहित्य गॅलरीत सध्या बेवारस पडून आहे. खिडक्या उघड्याच असल्याने बाहेरील धूळ आत आल्याने आतमध्ये धुळीचे थर साचलेले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जवाहर मार्केट या इमारतीचे पूर्वीचे वैभव लयाला गेले आहे.
--
गॅलरी, दालनांसमोर अडगळ
या इमारतीच्या गॅलरीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कचर साचलेला आहे. काही अडगळीचे साहित्यही सर्वांत वरच्या मजल्यावरील दालनांपुढील गॅलरीत गेल्या वर्षभरापासून पडून आहे. धुळीचे थर जमा झालेले आहेत. पूर्वीप्रमाणे या इमारतीच्या दैनंदिन स्वच्छतेचा महापालिकेच्या स्वच्छता विभागाला आता जणू काही विसरच पडलेला असल्याचे येथील अस्वच्छतेमुळे उघड झाले आहे.
--
फर्निचरला लागलीय वाळवी
या इमारतीत पूर्वी महापालिकेचे विभागीय कार्यालय होते. येथील विभागीय कार्यालय काही वर्षांपूर्वी दुर्गा गार्डनजवळील नूतन वास्तूत स्थलांतरित झाले. मात्र, तेव्हापासून या कार्यालयातील फर्निचर येथेच पडून आहे. लाखो रुपये किमतीच्या येथील फर्निचरची सध्या दुरवस्था झाली आहे. काही फर्निचरला वाळवीही लागल्याचे दिसून येते. इलेक्ट्रिकल साहित्याचीही मोडतोड झालेली आहे. काही साहित्य उघड्यावर बेवारस स्थितीत गॅलरीतच पडून आहे.
--
व्यावसायिकांचा पालिकेला चुना
या इमारतीच्या तळमजल्यावरील व्यावसायिक गाळ्यांना गेल्या वर्षभरापासून सील लावण्यात आलेले आहे. या गाळ्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांनी महापालिकेचा लाखो रुपयांचा कर थकविल्याने त्यांच्यावर महापालिकेने ही कारवाई केली आहे. तेव्हापासून येथील गाळे बंद आहेत. अगदी वाजवी दराने भाडेतत्त्वावर देऊनही या गाळ्यांचा कर थकविणाऱ्या व्यावसायिकांनी महापालिकेला लाखो रुपयांचा आर्थिक चुना लावला आहे.
--
ग्रंथालय शोभेचे बाहुले
या इमारतीत शासकीय ग्रंथालय सुरू आहे. मात्र, या ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांच्या असहकार्याच्या वृत्तीमुळे व येथील समस्यांमुळे सध्या हे ग्रंथालय केवळ शोभेचे बाहुले बनले आहे. या ग्रंथालयातील हजारो पुस्तके वाचकांच्या प्रतीक्षेत आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येथे काही विद्यार्थी येतात. परंतु, त्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने जिन्यातील पायऱ्यांवर बसूनच वाचन करावे लागत असल्याची स्थिती आहे. काही ग्रंथालय कर्मचारी सोशल मीडियवरच व्यग्र दिसतात. शांतता राखण्यासाठीही त्यांच्याकडून प्रयत्न होत नाहीत.
--
स्वच्छतागृहे मद्यपींचा अड्डा
या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृहे आहेत. ही सर्व स्वच्छतागृहे साफसफाईअभावी अस्वच्छ झालेली आहेत. काही स्वच्छतागृहांत अडगळीचे साहित्य ठेवलेले आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहांचा वापर करता येत नाही. काही स्वच्छतागृहांत मद्यपींचा दररोज अड्डा जमत असतो. या ठिकाणी मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. या मद्यपींमुळे या इमारतीतील ग्रंथालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
--
महापालिकेचे पूर्वीचे विभागीय कार्यालय असलेल्या जवाहर मार्केट या इमारतीत सध्या शासनाचे वाचनालय आणि सिटी सर्व्हे विभागाचे कार्यालय आहे. बाकी सर्व दालनांचा वापर होत नाही. या इमारतीतील काही गाळे सील करण्यात आलेले आहेत. या इमारतीचा पूर्वीसारखा वापर होत नसला, तरी आरोग्य व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून येथील स्वच्छता राखली जाते.
-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, नाशिकरोड
--
जवाहर मार्केट इमारतीच्या देखभालीकडे महापालिकेने गेल्या दोन-तीन वर्षांपासून साफ दुर्लक्ष केलेले आहे. सध्या या इमारतीची अस्वच्छतेने दुरवस्था झालेली आहे. लाखो रुपये किमतीचे फर्निचर व अन्य साहित्य वापराविना धूळ खात पडून आहे. काही साहित्य गायबही झाले असण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक नगरसेवकांचेही या इमारतीच्या समस्यांकडे दुर्लक्ष झालेले आहे.
-योगेश आहिरे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डाएटिंग’च्या मिळणार टिप्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजकाल वाढत्या वजनामुळे केवळ महिला आणि पुरुष दोघेही त्रस्त असतात. शारीरिक आकारमानच बिघडवून टाकणारे वजन सौंदर्यासाठीही घातक ठरते. मग सुरू होते शरीररचना योग्य आकारात आणण्यासाठीची धावपळ आणि डाएटिंगचे नियोजन. मात्र, डाएटिंग म्हणजे नेमके काय करायचे, हेच अनेकांना व्यवस्थित समजत नाही. याविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे डाएटिंगवर आधारित वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.
एम. एस. गोसावी फार्मसी कॉलेज, कॉलेजरोड येथे शनिवारी (दि. २०) दुपारी ३ वाजता हे वर्कशॉप होणार आहे. ऋतूनुसार कुठला आहार घ्यावा, हा आहार घेताना आपली प्रकृती कोणत्या प्रकारची आहे, डाएटिंग करायाचे असल्यास कोणती काळजी घ्यावी, प्रकृतीनुसार आहार कसा असावा, ऋतूनुसार आहार कसा ठरवावा, हे ओळखून आपल्या आहारात कसा बदल करावा, याविषयी वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डाएटिंग तज्ज्ञ संदीप चिंचोलीकर मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी ५० रुपये, तर इतरांसाठी ३०० रुपये नोंदणी फी आहे. ज्यांना कल्चर क्लब सदस्यत्व घ्यायचे आहे, त्यांना या वर्कशॉपच्या ठिकाणी सदस्यत्व मिळू शकणार आहे. नोंदणीसाठी (०२५३) ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे संपर्क साधावा. www.mtcultureclub.com <http://www.mtcultureclub.com/> या वेबसाइटवर ऑनलाइन सदस्यत्वही मिळवता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा घरे फोडणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर पोलिसांच्या मध्यवर्ती क्राइम ब्रँचच्या पथकाने संशयावरून पकडलेल्या संशयित आरोपीने तब्बल १५ घरफोड्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या अन्य तिघा साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सहा लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

अंबड, चुंचाळे तसेच इंदिरानगर भागात सातत्याने होणाऱ्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर क्राइम ब्रँचच्या मध्यवर्ती पथकाने संशयावरून चुंचाळे येथील गोटीराम लक्ष्मण भोये याच्या हालचालींवर काही दिवस नजर ठेवली. त्यात काही संशयास्पद आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर त्याने गुरूदेव काळू खताले (१९), सागर आत्माराम जमदाडे (२१) आणि एका अल्पवयीन साथीदाराची नावे पोलिसांना दिली. मध्यवर्ती पथकाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लागलीच सर्वांना ताब्यात घेतले. या संशयितांनी अंबड पोलिस स्टेशन हद्दीत १४ तर इंदिरानगर पोलिस स्टेशन हद्दीत एक अशा १५ घरफोड्या केल्याची कबुली दिली. ही कारवाई मध्यवर्ती पथकाचे निरीक्षक कुमार चौधरी, सहाय्यक निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड आदींनी केली. या पत्रकार परिषदेसाठी सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

या वस्तूंची केली होती लूट
पोलिसांनी त्यांच्याकडून पाच लाख चार हजार १५० रुपयांचे १६८ ग्रॅमचे सोन्याचे, ८०० ग्रॅमचे सुमारे ३२ हजार रुपयांचे चांदीचे दागिने तसेच सुमारे एक लाख रुपयांचे चार लॅपटॉप, १० हजार रुपयांचे दोन कॅमेरे आणि रोख चार हजार रुपये असा सहा लाख ५० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद जवानास निरोप

$
0
0

खलाणेत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून शनिवारी (दि. १३) झालेल्या गोळीबारात शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावाचे १०८ इंजिनीअर रेंजीमेंटमध्ये कार्यरत जवान योगेश मुरलीधर भदाणे शहीद झाले. शहीद योगेश यांचे पार्थिव जम्मू-काश्मीरहून रविवारी (दि. १४) दिल्लीला आणण्यात आले. मात्र खराब हवामानामुळे सैन्य दलाच्या विशेष विमानाने दिल्लीहून सोमवारी (दि. १५) दुपारी दोन वाजता हे पार्थिव नाशिक येथील ओझर विमानतळावर दाखल झाले. तेथून हेलिकॉप्टरने खलाणे गावात सायंकाळी पाच वाजता दाखल होऊन शहीद योगेश भदाणे यांना लष्करी इतमामात अश्रूपूर्ण निरोप देण्यात आला.

खलाणे गावाच्या शिवारात एका शेतात योगेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी फुलांनी सजावट करण्यात आली होती तसेच रांगोळ्या, बॅनर लावून आपल्या गावचा सुपूत्राने देशसेवा करीत असताना बलिदान दिल्याने प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यात अश्रू होते.

शहीद योगेश भदाणे यांच्यावर खलाणे गावाच्या शिवारातील शंभर एकर जागेची साफसफाई करून त्याठिकाणी चौथरा बांधण्यात आला. योगेश यांच्यावर शासकीय इतमामात सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून नागरिकांनी अंत्यसंस्काराला उपस्थिती लावत ‘वीर जवान अमर रहे’सह देशभक्तीच्या घोषणांनी खलाणे गाव दुमदुमले होते. जवळपास ५० ते ६० हजार नागरिकांचा जनसमुदाय यावेळी सहभागी झाला होता. तरुणांनी हातांची साखळी करीत अत्यंत शिस्तीत अंत्यसंस्काराच्या जागेपर्यंत पार्थिव पोहोचविले. आपल्या गावाचा सुपुत्र देशासाठी शहीद झाल्याने खलाणेत गेल्या दोन दिवसांपासून चूल पेटली नसल्याची स्थिती होती. या वेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, अतुल सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलिस प्रमुख एम. रामकुमार उपस्थित होते.

अर्ध्यातून मोडला डाव

भारतीय सैन्यातील जवान योगेशसोबत प्रियाचा १७ फेब्रुवारी २०१७ ला विवाह झाला. मोठ्या संघर्षातून आपल्या जीवनाची घडी बसल्याने योगेशला विवाहाचा क्षण आकाश ठेंगणे करणारा होता. जीवनाच्या सारीपाटावर दोघांनी आयुष्यभरासाठी साथ देण्याची शपथ घेतली. कर्तव्य प्रथम मानणारे योगेश लग्नानंतर काही दिवसांच्या आत आपल्या सैन्यात रुजू झाले. दोन महिन्यांपूर्वीच योगेश यांनी प्रियाला जम्मू-काश्मीर येथे सोबत नेले होते. दोघांचा संसार आकार घेत असतानाच एका बातमीने सारं काही नष्ट झाले. शस्त्र संधीचे उल्लंघन करत पाकने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील सुंदरबनी भागात योगेश मुरलीधर भदाणे शहीद झाले. योगेश यांच्यासोबत आयुष्याच्या सारीपाटावर मांडलेला डाव बातमीनंतर अर्ध्यावर थांबला होता. आपल्या आयुष्यभराची साथ निभावण्याची शपथ घेतलेल्या वीरपतीच्या अंतिम प्रवासात प्रिया सोबत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉश प्रकरणी सिन्नरच्या उद्योजकाला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको
सिडकोतील पंडिनगर भागात बॉश कंपनीचे बनावट स्पेअर्स पार्ट बनविण्याचा छोटा कारखाना उघडकीस आल्यानंतर यात अनेकांचे हात गोवले गेल्याचे आता पुढे येऊ लागले आहे. याप्रकरणी सिन्नर येथील राजाराणी या कंपनीचे मालक अरविंद उर्फ भैय्या अग्रवाल यास पोलिसांनी अटक केली असून, आधी अटक केलेल्या दोन संशयितांसह अग्रवाल यास कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्वांची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बॉश कंपनीच्या बनावट स्पेअर्स पार्ट तयार करण्याचे काम पंडितनगर येथे सुरू होते. अंबड पोलिसांनी याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी ताहेरअली मोहम्मद इद्रिस चौधरी उर्फ छोटू चौधरी याच्यासह त्याच्या लहान भावाला अटक केली आहे. कंपनीतून माल कशा पद्धतीने चोरी होत होता, याचेही प्रात्यक्षिक पोलिसांनी त्यांच्याकडून करवून घेतले. या गुन्ह्यात सिन्नर येथील राजाराणी कंपनीचा मालक अरविंद उर्फ भैय्या अग्रवाल याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानुसार रविवारी रात्री पोलिसांनी अग्रवाल यास अटक केली. बॉश कंपनीतील रिजेक्‍टेड माल अग्रवाल यांच्या कंपनीत पुन्हा वितळविण्यासाठी जात असल्याचे समोर आले असले, तरी बराचसा माल हा परस्पर चौधरी याच्या ताब्यात येत असल्याने अग्रवाल यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बॉश कंपनीप्रकरणी पोलीसांनी यापूर्वीच नगरसेवक मुकेश शहाणे, नगरसेविका पती बाळा दराडे व सचिन राणे यांची पोलिसांनी चौकशी केली असून, आता कंपनीतील काही कॉन्ट्रक्‍टरर्सची चौकशी सुरू केली आहे. मुख्य संशयित छोटू चौधरी हा सन २००९ पासून भंगार खरेदीचा कॉन्ट्रॅक्टर होता. ८ ते १० जणांकडे अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्‍ट असून, त्यांचीही याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.

तिघांची रवानगी जेलमध्ये
बॉश कंपनीच्या बनावट स्पेअर्स पार्ट बनावट प्रकरणी मुख्य सूत्रधार ताहेरअली मोहम्मद इद्रिस चौधरी उर्फ छोटू चौधरी याच्यासह त्याचा लहान भाऊ भाऊ परवेझ अली इद्रिस चौधरी याला अटक केली होती. या दोघांची पोलिस सोमवारी संपली. याच गुन्ह्यात पोलिसांनी सिन्नर येथील राजाराणी कंपनीचा मालक अरविंद उर्फ भैय्या अग्रवाल यास अटक केली होती. या सर्व जणांना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्या सर्वांची सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

बॉश कंपनीतील या बनावट स्पेअर्स पार्टच्या प्रकाराचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी सलग तीन दिवस पंचनामा करून हा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला अटक करण्यात येईल.
- मधुकर कड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रियांचे मॉलला प्राधान्य!

$
0
0

वाट स्वच्छ आरोग्याची

--


पियू शिरवाडकर, नाशिक

शहरातील मेनरोड, रविवार कारंजा, दहीपूल यांसारख्या पारंपरिक बाजारपेठेऐवजी महिलांकडून मॉलमध्ये खरेदी केली जात असल्याची बाब निदर्शनास येत आहे. या बाजारपेठेत सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने महिलांना गैरसोय सहन करावी लागते. परिणामी, महिलांनी आता मॉल्स आणि मोठ्या शोरुम्सचा पर्याय स्वीकारल्याचे स्पष्ट होत आहे.

शहरात पूर्वीपासून मुख्य बाजारपेठ ही मेनरोड, रविवार कारंजा, दहीपूल, अशोक स्तंभ या भागात केंद्रित आहे. आजही एखादी वस्तू घ्यायची असेल, तर ती तेथे नक्की मिळेल, अशी खात्री ग्राहकांना असते. मात्र, या बाजारपेठेला आता सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अनुपलब्धतेचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा महिलांबरोबर लहान मुलीदेखील खरेदीवेळी असतात. महिलांसह लहान मुलींनाही स्वच्छतागृह नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्या महिलांना मधुमेह आहे त्यांना तर अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे बाजारपेठेपासून शहरातील बस स्टँड किंवा अन्य ठिकाणे गाठावी लागतात. गर्भवती स्त्रियांचीही स्वच्छतागृहाअभावी गैरसोय होते. हे लक्षात घेऊन महिलांनी आता मॉल, सुपर मार्केट आणि शोरुम्सच्या ठिकाणी खरेदीला पसंती दिली आहे. या ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध असल्याने महिलांना तेथे वावरणे अधिक सोयीचे वाटत आहे. शहरात स्वच्छता अभियानांतर्गत अनेक कामे हाती घेण्यात आली असली, तरी विविध भागात महिला स्वच्छतागृहांची वानवा आहे.
--
मेनरोड परिसरात फिरताना स्वच्छतागृहाचा अभाव जाणवतो. स्वछतागृहासाठी सीबीएस परिसरात यावे लागते. मधुमेही आणि गर्भवती स्त्रियांची, तर फारच कोंडी होते. स्वच्छतागृह ही मूलभूत गरज असूनही त्याकडे दुर्लक्ष कसे केले जाते.
-डॉ. पर्णिका चेवले
--
अनेक वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. बाजारपेठेत स्वच्छतागृह नसल्याने फार अडचण होते. एकदा धावपळीत चुकीच्या जागी गाडी पार्क झाली. त्यामुळे अडीचशे रुपये दंड पडला. त्यामुळे मी मॉलमध्ये खरेदीस जाणे पसंत करते.
-आशा दीक्षित
--
खरेदीस बराच वेळ लागणार असेल आणि बरोबर मुलगी असेल, तर मुख्य बाजारपेठेत मी जात नाही. त्याऐवजी मी सुपर मार्केटला जाते. मुलगीही मला तसे सांगते.
-प्रमिला शिंदे
--
महिला ग्राहकांचा प्रश्न आम्ही समजू शकतो. महिलांसाठी स्वच्छतागृह नसणे ही वस्तुस्थिती आहे. महापालिका काही करीत नसल्याने त्याचा परिणाम आता आमच्या व्यवसायावर होत आहे.
-जुगल शहा, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचे बजेट जानेवारीतच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी बजेट कार्यक्रमात यंदा फेरबदल केले असून, पुढील आर्थिक वर्षाचे बजेट जानेवारीतच मंजूर करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे लेखा विभागाकडून सुधारित बजेटसोबतच आगामी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे बजेटही जानेवारीतच सादर केले जाणार आहे. जानेवारीनंतर फेब्रुवारीत ते मंजूर करून मार्चअखेर मंजुरी घेण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहेत. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाचे बजेट फसल्यात जमा असून सत्ताधाऱ्यांनी बजेटमध्ये केलेल्या कोटीच्या कोटी उड्डाणांना ब्रेक लागला आहे. सुधारित बजेट जेमतेम १४१० कोटींपर्यंतच पोहचणार आहे.
महापालिकेत बजेटच्या कार्यक्रमानुसार दरवर्षी फेब्रुवारीत बजेट सादर करण्याची आतापर्यंत परंपरा आहे. दरवर्षी आयुक्तांनी बजेट सादर केल्यानंतर नवीन निवडून येणारा सभापती त्याला मंजुरी देतो. परंतु, यंदापासून ही पद्धत मोडीत निघणार आहे. स्थायी समिती सभापतींनी पुढच्या वर्षाचे बजेट जानेवारीतच सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून सध्या बजेटसंदर्भात तयारी सुरू आहे. एकाचवेळी सुधारीत बजेट आणि सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे बजेट स्थायीवर सादर करण्याचे काम सुरू आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत प्रशासनाच्या वतीने सुधारित बजेटसह पुढील आर्थिक वर्षाचेही बजेट सादर केले जाणार आहे. त्यामुळे चालू वर्षापासून बजेटचा नवीन पायंडा पडणार असून, फेब्रुवारीमध्येच स्थायीमध्ये बजेट पारित होऊन ते महासभेला सादर केले जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाला बजेटची अंमलबजावणी करणे सोपे होणार आहे.

फुगा फुटला
महासभा आणि स्थायी समितीने केवळ आकड्यांनी फुगविलेल्या अंदाजपत्रकाचा फुगा फुटला आहे. सध्याच्या आर्थिक स्थितीत प्रशासन १४१० कोटीचा पल्ला जेमतेम गाठणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी २१७६ कोटींपर्यंत फुगवलेल्या बजेटचा बोजवारा उडाला आहे. स्थायी समितीने आयुक्तांच्या बजेटमध्ये ३८९ कोटींची वाढ केली होती. त्यामुळे बजेट १७९९ कोटींपर्यंत पोहचले होते. त्यानंतर महासभेने ३७८ कोटींची वाढ सुचवली होती. त्यामुळे बजेट २१७६ कोटींपर्यंत पोहचले होते. परंतु, आर्थिक स्थिती योग्य नसल्याने प्रशासनाच्याच बजेटची पूर्ती होणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी फुगवटलेल्या बजेटपर्यंत पोहचणे शक्य होणार नाही. सुधारित बजेट हेच आयुक्तांचे बजेट असल्याने सत्ताधाऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृद्धांना लुटणारा तोतया पोलिस अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वृद्धांना रस्त्यात अडवून पोलिस असल्याची बतावणी करून हातोहात चुना लावणाऱ्या ठाणे येथील तोतया पोलिसास क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याने शहरात तीन गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
अलीमिर्झा दरवेश जाफरी (वय ३८, रा. शांतीनगर, पिरानीपाडा, भिवंडी, ठाणे) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शहरात काही महिन्यांपूर्वी सातत्याने वृद्धांना लुबाडण्याचे प्रकार घडले. मुंबईनाका पोलिस स्टेशन हद्दीत एका ज्येष्ठ नागरिकास तोतया पोलिसाने ओळखपत्र दाखवून थांबवले होते. पुढे रेड झाली असून, तुमची झडती घ्यायची असल्याचे सांगत आरोपीने ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरी केली होती. अंबडलाही १५ किलो गांजा पकडला असून, तुमची झडती घ्यायची असल्याचे सांगत वृद्धाकडील सोन्याच्या दोन अंगठ्या काढून घेतल्या होत्या. यानंतर मेळा बस स्टॅण्ड येथे एका वृद्धेला सोन्याचे बिस्किट स्वस्तात देण्याचे आमिष दाखवत संशयिताने महिलेकडील मंगळसूत्र काढून घेतले होते. या सर्व गुन्ह्यांचा तपास सुरू असताना क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे, हवालदार बाळासाहेब दोंदे यांना संशयित आरोपी जाफरीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ठाणे येथून जाफरीला अटक केली. त्याच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यातील ९० हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. ही कारवाई युनिट एकचे पोलिस निरीक्षक आंनदा वाघ, सहायक पोलिस निरीक्षक सचिन खैरनार, महेश कुलकर्णी, दीपक गिरमे, एएसआय चंद्रकांत पळशीकर, जाकीर शेख, संजय पाठक, पोपट कारवाळ, हवालदार बाळासाहेब दोंदे, अनिल दिघोळे, संजय मुळक, वसंत पांडव, रवींद्र बागूल, पोलिस नाईक आसिफ तांबोळी, मोहन देशमुख, संतोष कोरडे आदींनी केली.

सावधान राहा..
‘पुढे छापा पडला आहे. खून झाला आहे.’ असे सांगून खोटे ओळखपत्र दाखवून वृद्धांना लुटले जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये किंवा प्रतिसाद देऊ नये. अशा तोतया पोलिसांची माहिती मिळाल्यानंतर लागलीच नजिकच्या पोलिस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीतील रिक्षा असून अडचण, नसून खोळंबा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
देवळाली शहरातून विविध ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीचे नियोजन करताना कॅन्टोन्मेंट बोर्डाने ठराविक रिक्षा थांबे उपलब्ध करून दिले आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे व वाहतूक पोलिसांच्या निष्काळजी धोरणामुळे या रिक्षांची स्थिती ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
बिटको-नाशिकरोडकडे जाणाऱ्या रिक्षांसाठी जुन्या बसस्थानक परिसरात थांबा दिलेला आहे. नेमका याच ठिकाणी सर्वाधिक शिस्तीचा फज्जा उडालेला पाहायला मिळतो. काही रिक्षाचालक आपल्याला प्रवासी मिळावेत म्हणून थांबा सोडून मुख्य रस्त्यापर्यंत रिक्षा घेऊन जातात. या सर्वांवर वाहतूक पोलिसांची नजर असायला हवी. मात्र, देवळालीत गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिस दृष्टीस पडत नाहीत. यामुळे रिक्षा वाहतुकीला बेशिस्तीचे ग्रहण लागलेले पाहायला मिळते.
बिटकोकडे जाणाऱ्या रिक्षांसाठी असलेल्या जुन्या बस स्थानक परिसरात कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने बेरिकेडिंग केल्याने आधी उत्तर-दक्षिण अशा थांबणाऱ्या रिक्षा आता पूर्व-पश्चिम थांबत असल्याने अनेकदा शहरात प्रवेश करणाऱ्या हौसन रोडवर रिक्षा वळवतांना रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीचा गोंधळ होतो.

अनधिकृत थांबे
देवळालीतून भगूरला जाण्यासाठी गवळीवाडा कॉर्नर, शिगवे येथे जाण्यासाठी राम भरोसे पॉइंट, शहरात जाण्यासाठी राजकमल पॉइंट, चारणवाडीकडे जाण्यासाठी लेव्हिट मार्केट, याशिवाय संसरी नाका, भाटिया स्टॉप येथे थांबे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बिटकोकडून भगूरकडे जाण्यासाठी असणाऱ्या रिक्षा ‘नो पार्किंग झोन’ असलेल्या झेंडा चौक येथे अनधिकृतपणे थांबत प्रवाशांची चढ-उतर करीत असतात. झेंडा चौकाच्या बाजूनेदेखील अशाच पद्धतीने अनधिकृतपणे प्रवासी घेण्यासाठी रिक्षा थांबत असतात. या सर्वांवर नियंत्रण मिळविण्यासाठी असलेल्या शहर वाहतूक पोलिस चौकीत नियमितपणे वाहतूक पोलिस असणे गरजेचे आहे. मात्र, येथे कधीच वाहतूक पोलिस नजरेस पडत नसल्याने रिक्षाचालक बेशिस्तपणे वागत असतात.

रविवारी कोंडी ठरलेली
रविवारी येथील आठवडे बाजार भरत असल्याने बाजारातून येणारे प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षा आपल्या नियोजित थांब्यावर न थांबता बाजारात प्रवेशाचा रस्ता असलेल्या मुलींच्या शाळेजवळ थांबतात. त्यामुळे पायी चालणाऱ्यांपासून ते रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनधारकास अडचण होते. शिवाय शाळेच्या मैदानावर रविवारी बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग उपलब्ध करून दिल्याने वाहने पार्क करताना व बाहेर काढताना या रिक्षाचालकांमुळे अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होते.

देवळालीत रिक्षा चालकांना शिस्त लावण्यासाठी शहरात नियमित वाहतूक पोलिस असणे गरजेचे आहे. मात्र, पोलिस दिसत नसल्याने रिक्षाचालक बेशिस्तपणे वागतात.
- किरण भालेराव, रिक्षाचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नो हॉकर्स झोन’तरी अतिक्रमण कायम

$
0
0

विनोद पाटील/ प्रवीण बिडवे, नाशिक
नाशिक : वर्दळीच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा आणि वाहतूक व्यवस्थेमध्येही सुसूत्रता यावी यासाठी महापालिकेने शहरात ८३ ठिकाणी ‘नो हॉकर्स झोन’, तर ६१ ठिकाणी प्रतिबंधित फेरीवाला क्षेत्र जाहीर केले; परंतु अशा बहुतांश स्थळांवर हॉकर्सचा मुक्काम कायम आहे. महापालिकेलाही या धोरणाचे विस्मरण झाले आहे. व्यवसायाची घडी विस्कटू नये यासाठी हॉकर्स जागा सोडण्यास तयार नाहीत. यामुळे नागरिकांसाठी प्रवास करणे ही अडथळ्यांची शर्यत आहे.
केंद्र सरकारच्या नगरविकास व दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने राष्ट्रीय फेरीवाला धोरण जाहीर केले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी नाशिक महापालिकाही सरसावली आहे. त्यानुसार शहरात ‘मुक्त फेरीवाला क्षेत्रे’, ‘प्रतिबंधित फेरीवाला क्षेत्रे’ आणि ‘ना फेरीवाला क्षेत्रे’ जाहीर करण्यात आली. शहरातील गर्दीची ठिकाणे, चौक, रस्ते, महापालिका क्षेत्रातून शहराबाहेर जाणारे राज्यमार्ग, महामार्ग अशा ८३ ठिकाणांना पोलिस, राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या सूचनेनुसार ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. सिव्हिल व सुपर स्पेशालिटीसारखी सरकारी हॉस्प‌िटल, वर्दळीच्या ठिकाणच्या काही शाळा, अरुंद रस्ते, गोदावरी नदीपात्राचा परिसर, बस स्थानके, रेल्वे स्थानक, सरकारी कार्यालयांचा परिसर, सैन्यदलाच्या वाहनांची वर्दळ असणारे रस्ते, एमआयडीसीतील रहदारीचे रस्ते यांचा ‘ना फेरीवाला क्षेत्रे’ (नो हॉकर्स झोन) म्हणून समावेश आहे; परंतु बहुतांश ठिकाणी त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. त्यामुळे अशा वर्दळीच्या रस्त्यांवरही फेरीवाल्यांची मक्तेदारी कायम आहे. सातपूरसारख्या काही भागांत हॉकर्सवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईदेखील केली; परंतु अधिकाऱ्यांची पाठ फिरताच परिस्थिती ‘जैसे-थे’ होते.
शालिमार, रविवार कारंजासारख्या अनेक परिसरांत ‘ना फेरीवाला’ क्षेत्राला तीव्र विरोध आहे. मेनरोडवर ‘ना फेरीवाला क्षेत्रा’ऐवजी ‘नो व्हेईकल झोन’ची आग्रही मागणीही करण्यात येत आहे. यांसारख्या विविध कारणांमुळे ‘नो हॉकर्स झोन’च्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘प्रतिबंधित फेरीवाला’ क्षेत्राचाही विसर
महापालिकेने शहरात ६१ ठिकाणे ‘प्रतिबंध‌ित फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित केली आहेत. सर्वाधिक १९ ठिकाणे नाशिक पश्च‌िममध्ये, तर १५ ठिकाणे नवीन नाशिकमध्ये आहेत. त्या ठिकाणांनुसार विशिष्ट वेळेत हॉकर्सना व्यवसाय करण्यास तेथे मज्जाव आहे; परंतु अनेक ठिकाणी हॉकर्स ही मर्यादाही पाळत नाहीत. याकडेही महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

गैरसोयीच्या जागा
महापालिकेने बायोमेट्रिकद्वारे हॉकर्सची नोंदणी सुरू केली; परंतु संबंधित व्यावसायिकाच्या कुटुंबातील अनेकजण त्यावर नोंदणी करतात. त्यामुळे कुटुंबप्रमुखासह अन्य सदस्यांनाही ‘हॉकर्स झोन’मध्ये जागा हवी आहे. ती देताना महापालिका प्रशासनालाही मर्यादा येत आहेत. सातपूरला जाधव संकुलाजवळील समृद्धनगरमधील काही व्यावसायिकांना श्रमिकनगर मंडईत, तर काहींना थेट सोमेश्वर धबधब्याजवळ जागा देण्यात आली आहे. सर्वच ठिकाणी अशी परिस्थ‌िती असून, एवढे दूर नव्याने सुरुवात करण्यास व्यावसायिक राजी नाहीत. त्यामुळेही ‘नो हॉकर्स झोन’चा फज्जा उडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोपनीयतेबाबत बेपर्वाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आधारमधील माहिती हा गोपनीय दस्ताऐवज असल्याचे सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात असले, तरी तो सुरक्षित ठेवण्याबाबत कमालीची बेपर्वाई सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांच्या घोळक्यातच आधार नोंदणी व अपडेशनची कामे सुरू असल्याने आधारच्या गोपनीयतेलाच एकप्रकारे आव्हान दिले जात आहे.
आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयाची मुख्य ओळख बनू पहात आहे. त्यामुळे आधार नोंदणी आणि आधार दुरुस्ती ही प्रत्येक नागरिकासाठी अनिवार्य बाब बनली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आधारमधील माहिती हा सरकारच्या लेखी गोपनीय डेटा आहे. त्यामुळे या माहितीच्या सुरक्षेला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या माहितीचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे आदेशही यंत्रणांना देण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने खासगी आधार सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारी कार्यालयांच्या आवारात आधारची नोंदणी आणि दुरुस्तीची कामे केली जाऊ लागली आहेत. परंतु, या सर्व प्रकारामुळे आधारची यंत्रणा ढेपाळली आहे. नागरिकांच्या तुलनेत आधार सेंटर्स खूपच कमी असून, त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो आहे.
आर्थिक सेवांची जोडणी, सिमकार्ड लिंकिंग, सामाजिक सुरक्षा योजनेकरीता आधार लिंकीग करणे अनिवार्य असून बँक खाते, क्रेडिट कार्ड, विमा पॉलिसी, इक्विटी, म्युच्युअल फंड गुंतवणूक, स्मॉल सेव्हिंग स्किम्स, पीपीएफ, किसान विकास पत्र यांच्यासोबत लिंक करण्यासाठी भारतीयत्वाची ओळख म्हणून आधार मान्यता पावत आहे. ही कामे मार्गी लावण्यासाठी नागरिकांची आधार सेंटर्सवर गर्दी होते आहे. परंतु, सेंटर्सच्या तोकड्या संख्येमुळे त्यांना प्रतीक्षेत राहावे लागते आहे.
--
हवे स्वतंत्र दालन
जिल्हाधिकारी कार्यालयात टपाल शाखेजवळ आधारचे चार किट कार्यान्वित करण्यात आले आहेत. इमारतीच्या व्हरंड्यातच टेबल मांडून आधार नोंदणी आणि दुरूस्तीची कामे सुरू आहेत. किटधारकांनी स्वतंत्र दालनाची मागणी केली होती. परंतु त्यांना अद्याप दालन उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे उघड्यावरच आधारची कामे सुरू आहेत. एखाद्या व्यक्तीचे आधार नोंदणी किंवा आधार दुरुस्तीचे काम सुरू असताना प्रतिक्षेत असलेले अन्य नागरिक घोळक्याने ही माहिती पाहात थांबतात. त्यामुळे आधारच्या माहितीची गोपनीयताच धोक्यात येऊ लागली आहे. आधारचे काम सुरू असताना एकावेळी एकच व्यक्ती तेथे थांबेल, अशी व्यवस्था असायला हवी, अशी मागणी होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या ‘पतंग’चीच भरारी!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवल्यातील पतंगोत्सवाची मजाच न्यारी. राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींना देखील येथील पतंगोत्सवाने भुरळ न घातली तर नवलच! या पतंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची पतंग येवलेकरांनी एकदा, दोनदा, नव्हे तर चक्क तीन वेळेस कापली. मात्र, महाजन यांनी त्यावर शाब्दिक टोलेबाजी करीत या पतंगोत्सवात राजकीय रंग भरले. राजकारणाच्या पतंगामध्ये भाजपच्या पुढे कुठलाही पतंग (पक्ष) उडू शकत नाही. सगळ्यांची पतंग आम्ही कापणार आहोत, असे सांगत ढिल दे... अन् वकाट म्हणत पतंगबाजीचा आनंद लुटला.

पालकमंत्री महाजन यांची पतंग कटल्यावर म्हणाले, की हा खेळाचाच भाग असून, या पतंगाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. राजकारणाच्या पतंगामध्ये आम्ही निश्चितच वरचढ आहोत. भारतीय जनता पक्षाच्या पुढे कुठलाही पतंग उडू शकत नाही. देशभरात भाजपच्या पतंगाचीच भरारी असून, आम्ही सगळ्यांची पतंग कापलेली आहे. त्यामुळे आता देशात सर्वात उंच पतंग भाजपचाच असणार, येत्या निवडणुकांमध्ये पुन्हा दिसेल.

महाजन यांचे येवल्यातील निकटवर्ती समजले जाणारे युवा कार्यकर्ते समीर समदडिया यांच्या आग्रहाखातर येवल्यात पोहचलेल्या महाजन यांनी सोमवारी दुपारी समदडिया, तसेच नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर यांच्या घरी जाऊन घराच्या गच्चीवर पतंग उडविण्याचा आनंद घेतला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, मनीष काबरा आदी उपस्थित होते. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही सोमवारी आपला मोर्चा येवल्याकडे वळवत पतंगबाजीचा आनंद घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनई हत्याकांडात सहा दोषी

$
0
0

१८ जानेवारीला सुनावणार शिक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनर किलिंगची सर्वात मोठी घटना ठरलेल्या सोनई (ता. नेवासा, जि. नगर) तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहा जणांना कोर्टाने सोमवारी दोषी ठरवले. सबळ पुरावे नसल्याने एका संशयिताची जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी निर्दोष मुक्तता केली. दोषी ठरवलेल्या आरोपींना १८ जानेवारी रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शहर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

सन २०१३ मध्ये झालेल्या सोनई हत्याकांडाच्या खटल्याची मागील चार वर्षांपासून सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण होऊन कोर्टाने सोमवारी संशयितांना दोषी असल्याचे जाहीर केले. पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले, गणेश ऊर्फ प्रवीण दरंदले, संदीप कुऱ्हे, अशोक नवगिरे अशी दोषी ठरलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींचा नातेवाईक अशोक फलके याच्या विरोधात सबळ पुरावा नसल्याने कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली.

सोमवारी सकाळी साडेदहा वाजताच सर्व संशयितांना कोर्टात हजर केले. न्यायमूर्ती वैष्णव यांनी सर्व संशयितांना त्यांच्यावरील दोषांबाबत सविस्तर माहिती दिली. आरोपी अशोक फलके याच्याविरोधात पुरावे नसल्याचे सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. यामुळे कोर्टाने फलकेची निर्दोष मुक्तता करीत जामीन मंजूर केला. दि. २ जानेवारी रोजी अॅड. निकम यांनी अंतिम साक्षीदार तपासला होता. खटल्यात एकूण ५३ साक्षीदार तपासण्यात आले.

कट रचून अतिशय निघृर्णपणे तिघा युवकांची हत्या करण्यात आली. मुलीच्या प्रेमप्रकरणास विरोध असल्याने प्रियकरासह त्याच्या दोन मित्रांची हत्या करण्यात आली. घटनेचा प्रत्यक्ष साथीदार नसला तरी मयत आणि आरोपींमध्ये मोबाइलद्वारे झालेले संभाषण, त्यानंतर दोन दिवस मोबाइलचे एकाच ठिकाणी मिळालेले लोकेशन हे पुरावे महत्त्वाचे ठरले. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

- अॅड. उज्ज्वल निकम, सरकारी वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळे भाडेवाढीचा तिढा सुटणार?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने रेडीरेकनर दरानुसार गाळ्यांची भाडेवाढ केली आहे. ही वाढ गाळेधारकांना मान्य नसल्याने हा वाद आता थेट मुंबईत पोहोचला आहे. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी, १६ जानेवारी रोजी मुंबईत आमदार, गाळेधारक संघर्ष समिती आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. बैठकीत गाळेधारकांच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे भाडेवाढीबाबत तिढा सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

महापालिकेने आपल्या मालकीच्या व्यापारी संकुलांमधील १९७३ गाळ्यांची भाडेवाढ ही रेडीरेकनरच्या दरानुसार करण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये हा ठराव करण्यात येऊन या दरामुळे गाळ्यांची भाडेवाढ अवाच्या सव्वा झाली असून, गाळेधारकांना नवे दर परवडणारे नाहीत. त्यामुळे भाडेवाढ कमी करण्याची मागणी गाळेधारकांनी केली आहे. यासाठी स्थायी समिती व महासभेत दर कमी करण्याचे ठरावही झाले; परंतु आयुक्तांनी हे ठराव विखंडनासाठी सरकारकडे पाठविल्याने गाळे भाडेवाढीचा वाद कायम राहिला आहे. त्यामुळे सर्व गाळेधारकांनी संघर्ष समिती स्थापन करीत शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांना साकडे घातले. आमदार सीमा हिरेंनी याबाबत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे तक्रार केली असून, गाळेधारकांना न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आमदार हिरे यांच्या पत्रावरून राज्यमंत्री पाटील यांनी मंगळवारी मंत्रालयात संघर्ष समितीची व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीसाठी तिन्ही आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

समिती कागदावरच

भाडेवाढीसंदर्भात गाळेधारकांचा रोष लक्षात घेतल्यानंतर महापौरांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गटनेत्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. ही समिती सहा महिन्यांत अभ्यास करून गाळे भाडेवाढीबाबत निर्णय घेणार होती; परंतु महापौरांच्या अध्यक्षतेखालील या समितीची अद्याप एकही बैठक झालेली नाही. समितीला वैधानिक दर्जा नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे समितीची बैठक होऊ शकली नसल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलींच्या आयुष्यात लग्नानंतर हस्तक्षेप नको

$
0
0

संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नववधूच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात डोकावणे गरजेचे नाही. तसेच प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या अथवा मुलींच्या आयुष्यात लग्नानंतर हस्तक्षेप करू नये. यामुळे घटस्फोटाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे मत संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केले. त्या संक्रात भोगी महोत्सवात बोलत होत्या.

शहरातील गिदोंडीया मैदानावर महाराष्ट्र वाणी प्रबोधिनी महिला मंडळ व महाराष्ट्र वाणी युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने संक्रांत भोगी महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी आमदार अनिल गोटे, महापौर कल्पना महाले, कांचन थोरात, गोपाळ केले, सुंनदा केले, सुनील नेरकर, अश्विनी चितोडकर, ज्योती कोतकर, रत्ना नेरकर, राजेंद्र पाचपुते, शोभाबाई येवले उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपासून मकरसंक्रांतीनिमित्त भोगी उत्सव साजरा होत आहे. यंदा या कार्यक्रमाला राज्यातील विविध जिल्ह्यासह गुजरात व मध्य प्रदेशातील वाणी समाजातील सुमारे १५ हजारांहून अधिक महिलांनी हजेरी लावली होती. प्रत्येक घरात शिवबा जन्मला पाहिजे, तर यासाठी प्रत्येक आईने जिजाऊ होणे गरजेचे आहे. आई-वडिलांचे आदर्श, संस्कार चांगले असतील, तरच चांगले संस्कार मुलांवर घडतील. महिलांनी मुलांना संस्कारांची शिदोरी देणे गरजेचे आहे. सध्या नव्या पिढीतील मुलांना संस्काराची कमतरता आहे, असे प्रतिपादन आमदार अनिल गोटे यांनी केले.

समाजाची प्रगती होण्यास मदत होईल. प्रत्येक सासूने आई आणि सुनेने मुलगी व्हावे, यामुळे कुटुंबात स्वर्ग सुख मिळेल. पारंपरिक रुढी परंपरांना बाजूला ठेवून नाविन्यपूर्ण जीवन जगावे, असेही तांबे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व महिलांनी सप्तरंगी साड्या परिधान केलेल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योगांच्या प्रश्नासाठी केंद्रीय राज्यमंत्र्यांशी भेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे प्रश्न सुटावे, यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंग यांची दिल्ली येथे भेट घेतली. या वेळी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीत शिष्टमंडळाने राज्यातील उद्योगांचे प्रश्न मांडले.

महाराष्ट्रातील उद्योगांना सक्षम करणे, तसेच उद्योगांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंग यांनी शिष्टमंडळाला दिले. सूक्ष्म, लघु व मध्यम केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे उद्योगांच्या विकासासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चरला सहकार्य असेल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करणे, त्यांचा विकास कसा करता येईल व उद्योगांच्या विकासाशी संबंधित प्रश्नांबाबत मंत्रालयाकडून सहकार्य मिळावे व सुधारित धोरणांत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा विशेषकरून विचार करण्यात यावा, अशी मागणी मंडलेचा यांनी केली. उद्योगांचा विकास व विकासाबाबत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. उद्योगांशी संबंधित महाराष्ट्र चेंबरतर्फे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या कॉन्फरन्समध्ये येण्याचे आमंत्रणही या वेळी देण्यात आले. शिष्टमंडळात मंडलेचा यांच्यासह उपाध्यक्ष ललित गांधी, अनिल वाघाडकर, समीर दूधगावकर, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, महाराष्ट्र चेंबरच्या उपसचिव वनिता घुगे यांचा समावेश होता. अतिरिक्त सचिव व विकास आयुक्त राममोहन मिश्रा, संयुक्त सचिव (एआरआय) बी. एच. अनिलकुमार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला समितीचा शिमल्यात ‘अभ्यास’

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांना आता शिल्लक निधी संपवण्याचे वेध लागले आहेत. निधी संपव‌ण्यिासाठी थेट शिमल्यात जाऊन चिंतन केले जाणार आहे. पुण्याच्या दौऱ्यानंतर समितीचे सदस्य आता शिमलासह दिल्ली, अमृतसर या तीन ठिकाणी महिलांच्या विविध योजनांचा अभ्यास करणार आहेत. त्यासाठी सभापतींसह १२ जणांचे पथक बुधवारी (दि.१७) दिल्लीकडे रवाना होणार आहे. या दौऱ्यावर पाच लाखांचा खर्च केला जाणार असला तरी, या दौऱ्याचे नेमके फलित काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीत नऊ सदस्य असून, सभापतिपदी भाजपच्या सरोज आहेर, उपसभापती भाग्यश्री ढोमसे आहेत. समितीवर पूर्णपणे महिलांचे वर्चस्व असून, समितीला यंदा महिला व बालकल्याणसाठी राखीव पाच टक्के निधी मिळाला आहे. मे पासून अस्तित्त्वात आलेल्या समितीच्या सभापतींसह सदस्यांनी शहरातील महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असले तरी, त्यांची अंमलबजावणी प्रलंबित आहे. परंतु समितीला आता अभ्यासदौऱ्याचे वेध लागले आहेत. समितीचे सदस्य १७ तारखेपासून सहा दिवसांच्या दिल्ली, अमृतसर, शिमला आणि आग्रा या शहरांच्या दौऱ्यावर जाणार आहे. या शहरामंध्ये नाशिक शहरातील महिला व बालकांच्या कल्याणावर चिंतन होणार आहे. या नऊ महिलांच्या सोबतच या विभागाचे तीन कर्मचारीही जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खेडे विकास’ला अटींचा अडथळा!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका क्षेत्रातील खेड्यांच्या विकासाची दिलेल्या दहा कोटींच्या निधीला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. महापौरांच्या हट्टासाठी आयुक्तांनी खेडे विकास निधीचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या आराखड्यात रस्ते, ड्रेनेज, पाण्याच्याच योजनांचा समावेश असेल, तर निधी दिला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहे. आराखड्यात काही तरी नवीन असेल तरच निधी मिळेल अशी अट आयुक्तांनी घातली आहे .त्यामुळे आराखड्याच्या अंमलबजावणीवर पुन्हा शंका उपस्थित होत आहेत.

महापालिका क्षेत्रात २० खेड्यांचा समावेश झाला असूनख्, महापालिका स्थापनेच्या गेल्या ३५ वर्षांत या खेड्यांचा विकास होऊ शकलेला नाही. महापालिका क्षेत्रात समाविष्ट असूनही विकासाअभावी या खेड्यांचा ग्रामीण बाज कायम आहे. या खेड्यांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून नगरसेवकांकडून केली जात होती. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच बजेटमध्ये महापौर रंजना भानसी यांनी खेडे विकास निधीसाठी दहा कोटींची तरतूद केली. परंतु महापौरांच्या घोषणेला सात महिन्यांचा कालावधी उलटूनही हा निधी नगरसेवकांना उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे गेल्या महिन्यात महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेवून निधी देण्याची मागणी केली होती. त्यावर आयुक्तांनी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. परंतु या आराखड्यात पुन्हा रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याचीच कामे समावेश होण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी आराखड्यात रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठ्याचा समावेश असेल तर निधी देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. नाविन्यपूर्ण कामे असतील तरच, निधी देऊ असे सांगितल्याने या निधीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटो-डीसीआरवर प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक


महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ऑटो-डीसीआर संगणकप्रणालीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. त्यात तातडीने सुधारणा करण्याची मागणी पश्‍चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. सोबतच नगररचना विभागातील आर्थिक व्यवहार थांबवण्याची मागणी करीत प्रसंगी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. नगररचना विभागातील गैरव्यवहार थांबव‌ण्यिासह ऑटो-डीसीआर प्रणालीत सुधारणा झाली नाही तर विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा डॉ. पाटील यांनी दिला आहे.

बांधकामातील परवानग्या सुलभ होण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या ऑटो-डीसीआर संगणक प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. यांसदर्भात बांधकाम व्यावसायिकांनीही तक्रारी केल्या असून, ऑनलाइन व ऑफलाइन असे काम सुरू आहे. त्यामुळे यात सुधारणा करण्याची मागणी डॉ. हेमलता पाटील यांनी केली आहे. नवीन नियमांमध्ये टेरेस स्लॅबपर्यंत इमारतीची उंची मोजली जाते. परंतु ऑटो-डीसीआरमध्ये भिंतीच्यावरपर्यंत उंची मोजली जाते. स्टील्ट पार्किंगमध्ये चुकीचे मोजमाप घेणे, पार्किंग एरियाचे मोजमाप होत नाही, व्हेन्टीलेशनचा भाग चुकीच्या पद्धतीने मोजले जातात, उंची देखील चुकीच्या पद्धतीने मोजली जाते. प्रस्तावांची क्रमवारी पाळली जात नाही, असा आरोप पाटील यांनी केला आहे. सोबतच एक प्रस्ताव सहा महिने टेबलांवरून फिरत असल्याचा आरोप करीत त्यांनी नगररचना विभागागातील आर्थिक व्यवहारांवर बोट ठेवले आहे. याबातच्या तक्रारींचे निवेदन डॉ. पाटील यांनी आयुक्तांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images