Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

परीट-धोबी समाजाचे प्रश्न सोडवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संत गाडगेबाबांनी स्वच्छतेबाबत समर्पित आयुष्य घालविले. बाबांचे कार्य आदर्शवत असून, परीट समाजाचे आरक्षण व इतर राज्य व दिल्ली पातळीवरचे प्रलंबित प्रश्न आगामी काळात मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले.

महाराष्ट्र परीट (धोबी) समाजाचे अकरावे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात झाले. एकनाथ बोरसे अध्यक्षस्थानी होते. माजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्याम रजक, मध्य प्रदेशचे खासदार अमित खत्री, आमदार देवयानी फरांदे, आमदार सिमा हिरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील परीट (धोबी) समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. याशिवाय संघटन, समाजविकास याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी या अधिवेशनात विविध ठराव संमत करण्यात आले. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन श्याम रजक यांच्या हस्ते झाले. उद्योजक राजेंद्र यशवंतराव खैरनार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. किसन जोर्वेकर म्हणाले, की नाशिकच्या पवित्र भूमीत हे अधिवेशन होत असून, राज्यातील परीट-धोबी समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरेल. माजी ऊर्जामंत्री श्याम रजक म्हणाले, की या समाजाला दिशा देण्याचे काम अधिवेशन करणार आहे. महाराष्ट्रातील परीट-धोबी समाजाला इतर राज्यांप्रमाणे आरक्षण मिळवून देण्यासाठी देशस्तरावर मी प्रयत्नशील राहीन. आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, की समाजाचे अधिवेशन होणे हे त्या समाजाच्या विकासासाठी गरजेचे आहे. परीट समाजाने व्यवसाय करताना नवीन तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. परीट धोबी समाजाच्या प्रश्नांचा राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार हिरे यांनीही शुभेच्छा देत समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. यावेळी तुकाराम दळवी, खासदार अमित खत्री आदींची भाषणे झाली. एकनाथ बोरसे यांना स्व. अशोक राऊत स्मरणार्थ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हल्लाबोल मोर्चा’साठी येवल्यात बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप करीत राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर आसूड ओढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येत्या १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान राज्यात आयोजित केलेल्या 'हल्लाबोल मोर्चा'चे १६ फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्यात आगमन होत आहे. जिल्ह्यात येताना या मोर्चाचे पहिले ठिकाण असणार आहे ते येवला. या मोर्चात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे, माजीमंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने येवल्यात होणाऱ्या जाहीर सभेच्या नियोजनाच्या दृष्टीने शनिवारी (दि.३) येवल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

येवल्यात येणारा 'हल्लाबोल मोर्चा' आणि त्यातील होणारी सभा लक्षात घेता शनिवारी येवला शहरातील आमदार छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात नियोजन बैठक घेण्यात आली. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य अॅड. माणिकभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अरुण थोरात, राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, भागीनाथ पगारे, संजय बनकर, मोहन शेलार, भागुनाथ उशीर, भागवत सोनवणे, कारभारी लभडे, शामाताई श्रीश्रीमाळ, हरीभाऊ जगताप यांनी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. १६ फेब्रुवारीला येवला शहरातील शनिपटांगण येथे सायंकाळी सहा वाजता या हल्लाबोल मोर्चा अंतर्गत जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती यावेळी अॅड. माणिकराव शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनर लूट बेतली जिवावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील जऊळके शिवारातील सय्यद पिंप्री ते दहावा मैल या रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास फिल्मी स्टाइल लुटीचा प्रयत्न झाला. थेट चालत्या कंटेनरवर चढून लुटीचा प्रयत्न करणारा संशयित पडल्याने चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले, तर दुसऱ्याला अटक केली.

श्याम आत्माराम सहाणे (वय १८, रा. ओढा, तालुका नाशिक) असे कंटनेरखाली मृत्यू झालेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी श्रीकांत बाळासाहेब हांडे (वय २२, मूळ रा. सांगली, हल्ली कळंबोली, तालुका पनवेल) या कंटेनरचालकाने फिर्याद दिली आहे. कंटेनरचालक हांडे शनिवारी एक्स्पोर्ट द्राक्ष भरण्यासाठी दिंडोरी तालुक्यात आला होता. एमएच ४६/एएफ ७४७८ या कंटेनरमध्ये द्राक्ष भरून हांडे जऊळके शिवारातील सय्यद पिंप्री ते दहावा मैल या रस्त्यावरून जात असताना एमएच १५/ईके ६२९४ या दुचाकीवर सहाणे हा राजेंद्र उर्फ राजू भागूजी निंबेकर (वय २५, रा, तळेगाव, ता. त्र्यंबकेश्वर) आणि त्याच्या साथीदारासमवेत आला. या तिघांनी ट्रकलुटीच्या इराद्याने कंटेनरला दुचाकी आडवी घालण्याचा प्रयत्न करून कंटेनर थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालक हांडेला लुटीची कल्पना आल्याने त्याने कंटेनर उभा केला नाही. यामुळे संतापलेल्या तिघांपैकी एकाने मोठा दगड फेकून कंटेनरची काच फोडली. मात्र, तरीही कंटेनर थांबला नाही. अखेर संशयितांपैकी अल्पवयीन मुलगा दुचाकी चालवत होता. त्याच्यामागे निंबेकर, तर सर्वांत मागे सहाणे बसलेला होता. त्याने चालत्या कंटनेरला पकडून केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याने चालकाला शिवीगाळही केली. मात्र, या प्रयत्नात त्याचा तोल गेला अन् तो कंटेनरच्या चाकाखाली सापडला. कंटेनर अंगावरून गेल्याने सहाणेचा जागीच मृत्यू झाला, तर कंटेनरचालक महामार्गाच्या दिशेने पुढे गेला. महामार्गावर दिंडोरी पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन पाहिल्यानंतर चालक हांडेने कंटेनर थांबवून सर्व प्रकार सांगितला. यानंतर हांडेला घेऊन पोलिस घटनास्थळी पोहोचले. तिथे संशयितही उभे होते. हांडेच्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील अल्पवयीन संशयिताची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून, निंबेकर पोलिस कोठडीत आहे. निंबेकरविरोधात यापूर्वी आडगावसह इतर काही पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आधारतीर्थ’चा महिला व बालकल्याणला ठेंगा!

$
0
0

शासकीय मान्यतेशिवाय आधारतीर्थ अनाथालयाचा कारभार


arvind.jadhav@timesgroup.com
Tweet : @ArvindJadhavMT

नाशिक : आधारतीर्थ या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या अनाथालयाला महिला व बालकल्याण विभागासह दुसऱ्या कोणत्याही विभागाची मान्यताच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या चौकशीत यावर शिक्कामोर्तब झाले. याबाबत अवगत असूनही महिला व बाल कल्याण विभाग चुप्पी साधून आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आसारा देण्याचे काम आधारतीर्थकडून होते, असा दावा संस्थाचालकांकडून केला जातो. या ठिकाणी जवळपास दीडशेपेक्षा अधिक मुले-मुली राहतात. नियमानुसार ० ते १८ वयोगटातील कोणत्याही मुलाचे संस्थांना संगोपन करायचे असल्यास त्यास महिला व बाल कल्याण विभाग किंवा समाजकल्याण तसेच सक्षम विभागाची मंजुरी आवश्यक असते. मात्र, तशी कोणतीही मान्यता आधारतीर्थकडे नाही. काही तक्रारींच्या अनुषंगाने जवळपास १५ दिवसांपूर्वी महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी तसेच समिती सदस्यांनी अचानक तेथे पाहणी केली. त्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्या.

महिला व बाल कल्याण विभागाच्या मान्यतेची आवश्यकता नसून, या संस्थेला समाज कल्याण विभागाची लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे संस्थाचालक त्र्यंबकराज गायकवाड यांनी सांगितले आहे. वास्तविक समाज कल्याण विभाग फक्त अनुसूचित जाती तसेच जमाती यासंबंधित काम करतो. तर, आश्रम शाळेसाठी आदिवासी हा निकष आहे. उर्वरीत सर्व समाजातील मुलांसाठी महिला व बालकल्याण विभागाचीच मान्यता असते. मुलांची काळजी व संरक्षणासंदर्भात असलेल्या कायद्यातच हे स्पष्ट करण्यात आले आहे.

अहवालाकडे लक्ष

याबाबत सूत्रांनी सांगितले, की यापूर्वी महिला व बाल कल्याण विभागाकडून गायकवाड यांच्यासह आधारतीर्थची अनेकदा चौकशी झाली. मात्र, पुढे काहीच होत नाही. अगदी विभागीय स्तरावरून झालेल्या चौकशीलाही 'आधारतीर्थ'कडून दाद देण्यात आली नाही. १५ दिवसांपूर्वी झालेल्या चौकशीचा अहवाल पुणे येथील आयुक्तालय कार्यालयात पाठवण्यात आला असून, तिथे काय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आधारतीर्थ ही संस्था मागील १० ते १२ वर्षांपासून सुरू असून, संस्थेला मदतीचा आर्थिक ओघ मोठ्या प्रमाणावर होत असतो. मात्र, कोठे नोंदणीच नसल्याने मुलांचे पुनर्वसन कोठे आणि कसे होते हे स्पष्ट होत नाही.

अनाथालयातील बालकांना पालक!

संस्थेकडे मुळातच मान्यता नसून, ती घेण्यासाठी प्रयत्न झाल्याचे पुरावेही यावेळी समोर आले नाहीत. नियमानुसार एकाच ठिकाणी मुले तसेच मुलींना ठेवता येत नाही. तसेच नोंद असलेली जवळपास ३० ते ३५ मुले संस्थेत आढळून आली नाही. याबाबत चौकशी केली असता ही मुले गावी गेली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कोणतेही दप्तरही समोर आणण्यात आले नाही. विशेष म्हणजे अनाथालय म्हणून दाखविलेल्या या ठिकाणी राहणाऱ्या मुलांना पालकही आहेत.

मुख्यमंत्री, सहकार मंत्र्यांची भेट!

मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांनी आधारतीर्थला भेट दिली होती. मुख्यमंत्र्याच्या भेटीतच गायकवाड यांनी मान्यतेचा मुद्दा उपस्थित केला होता. कायद्याचा कोणताही आधार असल्याचे पुरावे संस्थेकडून आजवर समोर आलेले नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री तसेच सहकारी मंत्री भेट देत असतील तर अधिकारी कारवाई करण्याची धमक दाखवतील काय, असा सवाल यानिमित्ताने चर्चिला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचित्र अपघातात तीन जण मृत्युमुखी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील साक्री आणि सटाणा तालुक्याच्या सीमेवर तीन दुचाकींच्या विचित्र अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जायखेडा व पिंपळेनर पोलिस ठाण्याच्या हद्दीवरून पोलिसांनी वाद निर्माण केल्याने या अपघातग्रस्त रुग्णांना प्राथमिक मदत मिळण्यास विलंब झाल्याने एकास प्राण गमवावा लागला. दरम्यान, उशिरापर्यंत या अपघातग्रस्त व्यक्तींची नावे कळू शकली नाहीत.

जायखेडा पेालिसांशी संपर्क साधला असता, पिंपळनेर व जायखेडा पोलिस ठाण्याच्या अगदीच सीमेरेषेवर हा अपघात घडला. यात दोघे जागीच मृत्युमुखी पडले. तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे. अपघातातील तीनही दुचाकी या साक्री तालुक्यातील उंभर्टी व पिंपळनेर येथील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस थांब्याच्या जागेचा कंपनीलाच पडला ‘विसर’

$
0
0

ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापनाची चूक

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनाला पळसे येथील बस थांब्यासाठी निवारा शेड उभे करण्याच्या जागेचाच विसर पडल्याचे समोर आले आहे. या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाने नियोजित ठिकाण सोडून भलतीकडेच बस थांबा निवारा शेड उभे करण्याचा केलेला प्रयत्न स्थानिक शेतकऱ्यांनी उधळून लावला आहे.

सिन्नर ते नाशिकरोडपैकी सिन्नर ते पळसेदरम्यान नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या महामार्गालगतच्या गावांच्या बस थांब्यावर नवीन निवारा शेड उभे करण्याचे काम चेतक एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे. पळसे येथे किमी. १९७/५०० येथे नियोजित बस थांबा असताना कंपनीने पळसे येथील सुधाकर गायधनी यांच्या गट नंबर ११४ आणि १४१८ मधील शेताच्या कडेलाच बस थांबा निश्चित करून नवीन निवारा शेड उभारण्याच्या कामाला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे या दोन्ही बस थांब्यांपैकी एक थांबा पळसे गावापासून चक्क एक किलोमीटर दूर आहे.

ठेकेदार कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाला नियोजित बस थांब्याच्या जागेचा विसर पडल्याचे स्थानिक शेतकरी सुधाकर गायधनी यांनी तत्काळ लक्षात आणून दिले. त्यानंतर ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही आपली 'चूक' लक्षात आली. तेव्हा या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब काढता पाय घेतला.

मूळ जागामालकांना मोबदला

पळसे येथे पूर्वीपासूनचा बस थांबा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीलगत होता त्या जमीनमालकांना नव्याने बस थांबा उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेचा सरकारकडून लाखो रुपयांचा मोबदलाही मिळालेला आहे. मात्र, असे असतानाही ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मात्र भलतीकडेच बस थांब्याचे निवारा शेड उभे करण्याचा प्रयत्न केल्याने स्थानिक शेतकऱ्यांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नियोजित बस थांबा शेड माझ्या शेताच्या कडेला नसतानाही कंपनीने माझ्या शेताच्या कडेला बस थांबा निवारा शेड उभारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कामास विरोध करताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पळ काढला.
-सुधाकर गायधनी, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे हागणदारीमुक्त जाहीर

$
0
0

केंद्रीय समितीचे पत्र महापालिकेला प्राप्त

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महापालिकेला केंद्रीय समितीने हागणदारीमुक्त शहराचा दर्जा दिल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले. हे धुळेकर नागरिकांचा सहभाग आणि योगदानामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन महापौर कल्पना महाले यांनी केले. तसेच स्वच्छ भारत अभियानासाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

केंद्र सरकारच्या क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली (क्युसीआय) मार्फत शहराला हागणदारीमुक्त दर्जा टिकविल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबद्दल शनिवारी (दि. ३) महापौर कल्पना महाले यांच्या हस्ते आयुक्त सुधाकर देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. गेल्यावर्षी दि. २१ जुलैला केंद्रीय समितीने पाहणी करून हागणदारीमुक्त शहराचा दर्जा जाहीर करीत प्रमाणपत्र दिले होते. त्या प्रमाणपत्राची मुदत सहा महिने अर्थात दि.२१ जानेवारीपर्यंत असल्याने दुसऱ्या टप्प्यामध्ये क्युसीआयकडून दि. २२ जानेवारी रोजी शहरात पुनर्तपासणी करण्यात आली. यामध्ये पुन्हा एकदा शहर हागणदारीमुक्त असल्याचे प्रमाणित करण्यात आले असून, त्याबाबतचे प्रमाणपत्र महापालिकेस प्राप्त झालेले आहे.

हा दर्जा असाच टिकविण्यासाठी धुळेकरांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. महापौर दालनात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात उपायुक्त रवींद्र जाधव, सहायक आयुक्त अभिषेक कदम, अनूप डुरे, मुख्य लेखापरीक्षक राजू सोळुंखे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


शहरातील नागरिकांच्या सहकार्याशिवाय विकासात्मक कामाला गती नागरिकांनी हागणदारीमुक्तीसाठी दाखविलेले सहकार्य मोलाचे आहे. तसेच शहर हागणदारीमुक्त व स्वच्छतेसाठी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा हातभार लागला आहे.
-सुधाकर देखमुख, आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतसंस्था नामांतर: ठेवीदारांच्या पैशांवर संक्रांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्या महिला नागरी सहकारी पतसंस्थेने स्थलांतर व नामांतरानंतर ठेवीदारांना तुटपुंजा परतावा देत असून, त्या विरोधात न्याय मागण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता पैसे देणेही बंद करण्यात आल्याची तक्रार ज्येष्ठ गुंतवणूकदारांनी केली आहे. ठेवीदारांचे गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी ज्येष्ठ गुंतवणूकदारांनी केली आहे.

या प्रकरणी वसंत गोविंद टिकेकर या निवृत्त शिक्षकाने आपली व्यथा मांडली आहे. केंद्रीय विद्यालयातून प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले टिकेकर यांच्या पत्नी मंगला यांनी विद्या महिला नागरी सहकारी पतसंस्थेत जवळपास दोन लाख १४ हजार रुपयांची रक्कम ठेव म्हणून ठेवली होती. मात्र, मुदत संपल्यानंतर टिकेकर यांना पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर त्यांनी संचालकांकडे पाठपुरावा करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे टिकेकर यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला. मात्र, त्यावरही कार्यवाही झाली नाही. याच दरम्यान विद्या महिला पतसंस्थेचे नाव 'नंदिनी' असे करण्यात आले. उपनगर परिरसरातील कार्यालय पंचवटीतील हिरावाडी येथे सुरू झाले. या ठिकाणी टिकेकर यांनी पैशांबाबत विचारणा केली असता त्यांना पाच हजार रुपये महिनाभरानंतर परतावा देण्यास सुरुवात झाली. आपण एकरकमी गुंतवलेली रक्कम तुटपुंजा स्वरूपात मिळत असल्याने टिकेकर यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. आता बँकेने ते पाच हजार रुपये देणेही बंद केले. टिकेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या महिला पतसंस्थेत अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या ठेवी आहेत. संचालकांनी नामांतर करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला असून, ठेवीदारांचा विश्वासघात केला आहे. दोषी व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी टिकेकर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१० रु.चे नाणे गिळले, साडेचार वर्षीय शालिनीचा मृत्यू

$
0
0

नाशिक: दहा रुपयाचं नाणं गिळल्यानं साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदगिरी गावात घडली आहे. शालिनी हांडगे असं मयत मुलीचं नावं असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसेजवळील चांदगिरी गावात राहणाऱ्या शालिनीने काल (रविवार) दुपारी खेळता खळता दहा रुपयाचं नाणं गिळलं होतं. त्यानंतर शालिनी झोपी गेली. मात्र, अचानक त्रास होऊ लागल्याने तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिने नाणं गिळल्याचं समोर आलं.

शालिनीवर रुग्णालयात उपचारही सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. पण उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनं हांडगे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालरंगभूमीचा आधारवड गेला

$
0
0

नाशिकमधील नाट्यवर्तुळातील मान्यवरांची सुधाताईंना आदरांजली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालरंगभूमीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने बालरंगभूमीचा आधारवड हरपला, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील नाट्यवर्तुळात उमटली.

करमरकर यांचा बालनाट्याशी घनिष्ठ संबंध होता. त्यांनी साहित्य संघाच्या सहकार्याने 'बालरंगभूमी-लिट्ल थिएटर' सुरू केले. बालनाट्य हे लहान मुलांच्या करमणुकीसाठी असून ते वास्तव असावे म्हणून सुधाताईंनी रत्नाकर मतकरी आणि इतरही काही नाटककारांकडून नाटके लिहून घेतली. ती शाळांच्या हॉलमध्येच नव्हे, तर व्यावसायिक नाट्यगृहांतही सादर केली. यांतून मुलांची भरपूर करमणूक तर झालीच पण मुलांचे नाटक कसे असावे, याचा धडा सुधाताईंनी संबंधितांना घालून दिला. अधिकचे नाट्यशिक्षण घेण्यासाठी सुधाताई अमेरिकेत गेल्या. त्यांनी 'बालरंगभूमी' संकल्पनेचा अभ्यास केला आणि तिथूनच त्यांनी भारतात परत गेल्यावर काय करायचे ते ठरवून टाकले.

शतकाहून अधिक वर्षाची परंपरा सांगणाऱ्या मराठी रंगभूमीला मुलांचे वावडेच होते. नानासाहेब शिरगोपीकर मुलांना घेऊन 'गोकुळचा चोर' नाटक करत असत. दामूअण्णा जोशीही मुलांना घेऊन नाटके करीत असत. अशा नाटकांचा उद्देश मुलांना सर्व भूमिका करायला मिळाव्यात एवढाच असे. झी वाहिनीने ३ मार्च २०१२ रोजी त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला. तसेच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने देण्यात येणारा, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार (२१ फेब्रुवारी २०१२) रोजी बहाल करण्यात आला होता.

बालनाट्यांची संकल्पना बदलली

मुलांचे वेगळे भावविश्व असते, त्यांची वेगळी कल्पनासृष्टी असते, त्यांची मानसिकताही वेगळेच रंग प्रकट करणारी असते. या वेगळेपणाची भूक भागेल असे प्रौढ नाटकापेक्षा सर्वस्वी वेगळे असलेले नाटक मराठी रंगभूमीवर नव्हते. त्यामुळेच शाळेतल्या समारंभातही मुले दाढी, मिशा लावून किंवा कोट पॅन्ट घालून मोठ्यांचीच नाटके करीत असत. त्यांतील संवादांचा अर्थ मुलांना कळो ना कळो. संवाद हातवारे करून धडाधड म्हणायचे आणि आपापल्या भूमिका वठवायच्या, हेच त्यावेळचे बालनाट्य होते. या रुढ बालनाट्यामध्ये सुधाताईंनी अमूलाग्र बदल केले.

बालरंगभूमी पोरकी झाली

सुधाताईंनी महाराष्ट्रात बालरंगभूमीला वेगळा आयाम दिला. त्या लहान मुलांसाठी बालनाट्य शिबिरं भरवित असतं. मी शाळेत शिक्षिका असताना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मला मिळाला. कायम हसतमुख असायच्या. काही दिवसांपूर्वी सुलभा देशपांडे यांचे निधन झाले. आता सुधाताई गेल्या. त्यामुळे बालरंगभूमी पोरकी झाली आहे.

- सुषमा अभ्यंकर, बालनाट्य दिग्दर्शिका

...

त्यांच्या प्रयत्नांमुळेच बालनाट्य स्पर्धा

नाशिकच्या नाट्यसंमेलनाच्या वेळी त्यांना भेटण्याचा योग आला होता. यावेळी महाराष्ट्र सरकारतर्फे बालनाट्य स्पर्धा आयोजित कराव्या यासाठी त्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे व मी आमच्या जिजाई थिएटरतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. नाना पाटेकर यांच्या देखील कानावर याबाबत काहीतरी करावे, असे सांगितले होते. त्यांच्या प्रयत्नानंतर बाल राज्यनाट्य स्पर्धा सुरू झाली. त्याचे बालनाट्याच्या क्षेत्रात काम अगाध आहे. त्यांची बरोबरी कुणीही करू शकत नाही.

- सिद्धार्थ आहिरे, जिजाई थिएटर

मुलांमध्ये नाट्याची गोडी

लहान मुलांना घेऊन त्यांच्यासाठी त्यांच्याकडून नाटक करवून घेणे हे सुधाताईंनीच प्रथम केले. गिरगाव, केळेवाडीत मुंबई मराठी साहित्य संघात मुलांना घेऊन त्यांनी बालनाट्य चळवळ उभी केली, ती सातत्याने चालू ठेवली. लिटील थिएटर या आपल्या संस्थेतर्फे त्यांनी अनेक बालनाट्ये सादर केली. मुलांमध्ये नाटक करण्याची तसेच नाटक पहाण्याची गोडी निर्माण केली. बालनाट्य म्हणजे सुधा करमरकर असं समीकरणच तयार झालं होतं. त्यांचं जाणं माझ्या मनाला चटका लावणारं आहे.

- रवींद्र ढवळे, नाट्य दिग्दर्शक

अभ्यासू व्यक्तिमत्व

शाळेत असताना त्यांनी मला भेटायला बोलावले होते. आम्ही एकवर्षी 'इंद्राचं आसन, नारदाची शेंडी' हे नाटक करत होतो. त्यात मी नारदाची भूमिका करायचो. प्रयोगानिमित्त त्या नाशिकला आल्या असताना त्यांनी मला बोलवून घेतले होते. या नाटकाविषयी चांगली चर्चा झाली. अत्यंत विनम्र, अभ्यासू व्यक्तिमत्व होतो. त्यांच्या वागण्या बोलण्यात कधीही अहंभाव आला नाही. हा आपल्या पेक्षा लहान आहे म्हणून त्यांनी कुणाला हिणवले नाही.

- मुकुंद कुलकर्णी, नाट्य दिग्दर्शक

दिग्दर्शिकेसह कलावंतही

पूर्वी लहान लहान मुलांसाठी वेगळी नाटके नव्हती. ही बाब सुधाताईंनी हेरली आणि बालरंगभूमीचा अभ्यास केला आणि बालनाट्य चळवळीला त्यांनी वेगळे वळण दिले. सुधाताईंनी मुंबईत आपल्या वडिलांच्या साहित्य संघ या नाट्यसंस्थेच्या साह्याने 'मधुमंजिरी' हे मराठी रंगभूमीवरील खरेखुरे पहिले बालनाट्य सादर केले. रत्नाकर मतकरी यांनी ते लिहिले होते. सुधाताईं या नाटकाच्या केवळ दिग्दर्शिकाच नव्हत्या तर त्या नाटकात त्यांनी चेटकिणीची अफलातून भूमिकाही केली होती.

- जयंत जातेगावकर, नाट्य व्यवस्थापक

दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी

खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात बाल नाट्य चळवळ रुजविणारे व्यक्तीमत्व म्हणजे सुधाताई! स्वतंत्र बाल रंगभूमी निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी बाल रंगभूमीसाठी कार्य केलं आहे. त्यामुळे त्यांचं योगदान हे चिरकाळ टिकणारं आहे. अलिकडच्या काळात त्या सक्रिय नव्हत्या. परंतु, त्यांनी केलेले काम आजही सर्वांना दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी असेच आहे.

- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष,

अभामना परिषद, नाशिक शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी लाभासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ ज्या अर्जदार शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही, त्यांनी त्यांच्या बँक शाखेशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर लाभाचा फायदा देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्जखात्यांच्या माहितीशी जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा म्हणून शासनाने तालुकास्तरीय समिती गठित केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत उपलब्ध करून दिलेल्या आहेत व बँकांनी त्यांच्या शाखेत त्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.

अशी असेल प्रक्रिया

- कर्जमाफी योजनेचा लाभ प्रलंबित असलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची अचूक माहिती आपल्या बँकेच्या शाखेत त्वरित सादर करावी.

- शेतकऱ्यांसंबंधी माहितीची शहानिशा करून त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती बँकेमार्फत करण्यात येईल.

- तालुकास्तरीय समितीमार्फत तपासणीअंती ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येऊन योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांसाठी पीयूसी बंधनकारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनांकडून उत्सर्जित होणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक यांच्या वतीने प्रत्येक वाहनांना प्रदूषण नियंत्रण (पी.यू.सी) प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

वाहनाची पहिल्यांदा नोंदणी करताना प्राप्त वाहन पी.यू.सी प्रमाणपत्राची वैधता ही एक वर्षाची असते. त्यानंतर प्रत्येक वाहनास शासनमान्य पी. यू. सी सेंटरमार्फत तपासणी करून प्रमाणपत्र मिळविणे व वाहन चालवताना सोबत बाळगणे आवश्यक आहे. वाहन चालविताना प्रमाणपत्र नसेल, तर संबंधित अधिकारी यांच्याकडून मोटार वाहन कायद्यातील कलम १९०(२) च्या तरतुदीनुसार वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळालीगाव येथे असलेल्या वालदेवी नदी किनाऱ्यावरील गवळीवाडा भागात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करीत ७९ घरे जमीनदोस्त केली. मुक्तिधाम परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आल्याने परिसरातून समाधान व्यक्त करण्यात आले.

प्रभाग क्र. २२ मधील देवळालीगावातील गवळीवाडा भागातीलन अनेकांना घरकुल योजनेअंतर्गत सदनिका देण्यात आल्या आहेत. परंतु, हे नागरिक सदनिकेत न राहता येथेच राहातात. ही जागा मनपाची असून ७९ रहिवाशांनी येथे अतिक्रमण केले होते. ही घरे रिकामे करण्यासाठी मनपातर्फे वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे या नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने ही मोहीम राबविण्यात आली.

सोमवारी आयुक्त अभिषेक कृष्णा व अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (अतिरिक्त) आर. एम. बहिरम यांच्या सूचनेप्रमाणे मनपाच्या सहा विभागांची वाहने, जेसीबी, अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी असा मोठा लवाजमा घटनास्थळी दाखल झाला. हे पथक गवळीवाडा परिसरात येताच काहींनी त्यांना विरोध केला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करीत मनपास मोहीम राबविण्यास मदत केली. सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा यावेळी हजर होता. अनेक वर्षांपासून या ठिकाणी अतिक्रमण होते. घरकुल योजनेअंतर्गत सदनिका देऊनही नागरिक तेथे वास्तव्यास जात नसल्याने मनपाने आक्रमक पवित्रा घेतला.

टपरीधारकही हटविले

मुक्तिधामच्या सोमाणी उद्यानानजीक असलेल्या फुटपाथवर काही टपरीधारकांनी अतिक्रमण केले होते. मनपातर्फे येथील अतिक्रमण वेळोवेळी काढण्यात येते. परंतु, अतिक्रमण विभागाची पाठ फिरताच पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' होते. सोमवारी पालिकेने या ठिकाणी ६ ते ७ टपऱ्या, हातगाडे जप्त करीत पक्के शेड हटविले. या मोहिमेमुळे मुक्तिधाम परिसराने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतल्याने येथे येणाऱ्या भाविकांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच पार्किंगच्या व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांना अशी बांधकामे काढून घेण्याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. अतिक्रमण न काढणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढावीत, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळी पिवळीला टेम्पोची धडक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

मुंबई-नाशिक महामार्गावरील जिंदाल कंपनीलगत सोमवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कसारा येथून नाशिकडे जाणाऱ्या काळी पिवळी आणि टेम्पो यांच्यात अपघात झाला. यात रस्त्यावर उभी असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तसेच जळगाव व सिन्नर तालुक्यातील सात जण गंभीर जखमी झाले.

जिंदाल कंपनी लगत काळी पिवळी गाडी (एम एच १५ इ १५८९) कसारा येथून नाशिकडे जात असताना रस्ता ओलंडणाऱ्या टेम्पो (एम एच १५ डीके ७८४५) यांच्यात अपघात झाला. वाहनातील सात प्रवाशी गंभीर जखमी झाले. दरम्यान रस्त्याच्या कडेला बसलेली महिला ठार झाली. जिजाबाई लहानु लोहकरे (६५, रा. लहवीत) असे या महिलेचे नाव आहे. नातलगांना भेटण्यासाठी त्या आल्या होत्या. घरी परत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. स्वप्निल देशपांडे (३८), शालिनी देशपांडे (५५), स्वाती बापट (३९), आदित्य बापट (१५), योगिता सुभाष जगताप (३२), सुभाष जगताप (३५) या जखमींची नावे आहेत. त्यांना जगतगुरू नरेंद्रचार्य संस्थांचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड यांनी तात्काळ उपचारासाठी नाशिकच्या सिव्हिल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्य गाठण्यासाठी प्रशासनाकडून आकड्यांचा खेळ

$
0
0

विभागातील ५४ पैकी फक्त १६ तालुके हागणदारीमुक्त

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत नाशिक विभागातील ५४ तालुक्यांपैकी फक्त १६ तालुके शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. हागणदारीमुक्तीत विभागातील नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांनी आघाडी घेतली असून, धुळे जिल्ह्याला मात्र शंभर टक्के तालुका हागणदारीमुक्तीचे अद्याप खाते उघडण्यात यश मिळालेले नाही. परिणामी मार्च २०१८ पर्यंत विभागातील सर्वच तालुके हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनापुढील अडचणी वाढल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे प्रशासकीय यंत्रणेनेही आता कागदी घोडे नाचविण्यास सुरुवात केली आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेंतर्गत मार्च २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण राज्य हागणदारीमुक्तीसाठी मार्च २०१८ पर्यंतची मुदत सर्व महसूल विभागातील प्रशासकीय यंत्रणेला दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या अंतिम मुदतीच्या वर्षभर अगोदरच हागणदारीमुक्तीचा मुकुट पटकावण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही असले तरी वास्तव मात्र हास्यास्पद आहे. नाशिक विभागातील ५४ तालुक्यांपैकी आतापर्यंत अवघे १६ तालुके शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. उर्वरीत ३८ तालुक्यांत अद्यापही लोटापरेड सुरूच आहे. हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आता प्रशासनाच्या हाती अवघे दोनच महिने आहेत. उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.

हागणदारीमुक्तीचे कागदोपत्रीच उच्चाटन

हागणदारीमुक्तीचे ध्येय गाठण्यास दिलेली अंतिम मुदत जवळ येऊन ठेपल्याने आता कागदी घोडे नाचविण्यास वेग आला आहे. हागणदारीमुक्तीची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी सध्या केवळ आकडे जुळवाजुळवीत मग्न झाल्याचे चित्र आहे. विभागात शंभर टक्के हागणदारीमुक्तीचा मुकुट १६ तालुक्यांना मिळाला असला तरी या तालुक्यांतील बहुतांश गावांत मुक्त हागणदारीचे दर्शन होताना दिसते.

हागणदारीमुक्त तालुके (नाशिक विभाग)

नाशिक : कळवण, चांदवड, देवळा, नाशिक, निफाड, पेठ

नगर : पारनेर, राहता, राहुरी

जळगाव : भडगाव, एरंडोल, भुसावळ, बोदवड, धरणगाव, मुक्ताईनगर

नंदुरबार : नवापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंत्राटी कामगारांचा आत्मदहनाचा इशारा

$
0
0

आरोग्य विद्यापीठात कामबंद आंदोलन सुरूच

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कामगार संघटनेकडून गेल्या साठ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू असून, कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांविषयक निवेदन वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले असले तरी आश्वासनपूर्ती न केल्याने कंत्राटी कामगारांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास मुंबई येथे मंत्रालयात सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आत्मदहन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासन व महाराष्ट्र सरकारची राहील, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

गेल्या पाच ते दहा वर्षांपासून ६५०० ते ७००० या अत्यल्प वेतनावर उच्चस्तरीय दर्जाचे काम कामगारांकडून करून घेतले जात आहे. विद्यापीठ प्रशासन व संघटना यांच्यातील अनेक बैठकींमध्ये कुलगुरू, कुलसचिव यांच्याकडे विस्तृतपणे याविषयी माहितीही देण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासन अनिष्ठ प्रथांचा वापर करीत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी ५ डिसेंबर २०१७पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनादेखील याविषयी चार वेळा निवेदन देण्यात आले असले तरी साठ दिवसांनंतरही आश्वासनपूर्ती केली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. विद्यापीठ प्रशासनाबरोबरच राज्य सरकारही अन्याय करीत असल्याची भावना कामगारांमध्ये दृढ झाली असून, वर्षानुवर्षे विद्यापीठाची सेवा केल्यानंतरही उपासमारीची वेळ आली असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर न सोडवल्यास मुंबई मंत्रालय येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा कंत्राटी कामगारांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर-शिर्डी रस्ता होणार चौपदरी

$
0
0

बांधकाम विभागाने काढले ८८० कोटींचे टेंडर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. सिन्नर-शिर्डी या ५१ कि. मी. चौपदरी महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी ८८० कोटींची टेंडर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढली आहे. हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलद्वारे हा रस्ता तयार करण्यात येणार असून, त्यासाठी टप्याटप्याने ठेकेदाराला पैसे दिले जाणार आहेत. या महामार्गावर ५.५ कि. मी.चा पालखीमार्ग व मुसळगाव येथे बायबास केला जाणार आहे. या महामार्गामुळे नाशिक व शिर्डीचे अंतरही कमी वेळेत पूर्ण करता येणार आहे.

नाशिकरोड ते शिर्डी हे अंतर ८४ कि. मी. असून, नाशिकरोड ते सिन्नर या चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यात या ५१ कि. मी. चौपदरीकरणाची भर पडणार आहे. दोन धार्मिक स्थळांना जोडणारा हा रस्ता असल्याने चौपदरीकरणामुळे कमी वेळेत हे अंतर पार करता येणार आहे. शिर्डीला येणारे भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वला दर्शनासाठी येतात. त्यामुळे त्यांना या रस्त्याचा उपयोग होणार आहे.

राज्यात १९०० कि. मी.चे महामार्ग

सिन्नर-शिर्डी प्रमाणेच राज्यात १९०० कि. मी. अंतराच्या रस्त्यांसाठी टेंडर नोटीस काढण्यात आली आहे. त्यात राज्यातील प्रमुख मार्ग आहेत. देशात हेच काम १० हजार ४६० कि. मी. केले जाणार आहे.

हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल

बीओटी-टोल मॉडेलनंतरचे हायब्रिड अॅन्युइटी हे नवे मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये ठेकेदाराचा खर्च हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टप्याटप्याने देणार आहे. त्याचप्रमाणे टोल मात्र प्राधिकरण गोळा करणार आहे.

संयुक्त मोजणी सुरूच

या महामार्गाचे टेंडर काढण्यात आले असले तरी या महामार्गाची संयुक्त मोजणी अद्याप सुरू आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे त्याला उशीर होत आहे. या महामार्गावर अहमदनगर जिल्ह्यातील २४ तर व सिन्नर तालुक्यातील १९ गावे आहेत.

सिन्नर-शिर्डी या महामार्गावरील संयुक्त मोजणीचे काम सुरू आहे. ५१ कि. मी.च्या महामार्गावर पालखी मार्ग व मुसळगाव येथे बायबास होणार आहे. त्याचे टेंडर प्रसिध्द झाले असून, हे कामाने वेगाने सुरू व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- प्रशांत खोडस्कर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्यातमूल्याची मात्रा लागू

$
0
0

टीम मटा

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर लिलावाच्या पहिल्याच दिवशी कांद्याचा दर क्विंटलमागे १००० रुपयांनी वाढला. जिल्हाभरातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी कांद्याचे दर क्विंटलमागे सरासरी २३९९ ते २५३७ रुपयांपर्यंत गेले. लाससलगाव बाजार समितीत क्विंटलमागे सरासरी २४५१ रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला.

आठवडाभरापासून कांद्याच्या दरात घसरण होत होती. क्विंटलमागे दर २००० रुपयांवरून १४०० रुपयांपर्यंत घसरले होते. मात्र, केंद्राने निर्यातमूल्य शून्य केल्याने कांद्याने कमालीची उसळी घेतली आहे. जिल्ह्यात आता फक्त लाल कांदा शिल्लक असून तोही आता संपत आला आहे. कांद्याची आवक कमी आणि निर्यात खुली यामुळे कांद्याने एकाच दिवसात १००० रुपयांनी उसळी घेतली. महिनाभरात उन्हाळ कांदाही मार्केटमध्ये यायला सुरुवात होईल आणि निर्यातमूल्य शून्य केल्यामुळे कांद्याचे सरासरी दर १००० रुपयांच्या खाली येणार नाहीत, असे भाकीत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लासलगावात सर्वाधिक भाव

निफाड : पिंपळगाव बाजार समितीत झालेल्या लिलावात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ४०० रुपयांनी कांदा वधारला होता. सोमवारी २१५१ रुपये सरासरी भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत १४५१ रुपये भाव होता. क्विंटलमागे थेट २४५१ असा एक हजार रुपयांच्या उसळीने सोमवारी भाव वधारला. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक सरासरी भाव हा लासलगाव मार्केटमध्ये मिळाला. जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव, उमराणा, सायखेडा, वणी, विंचूर, निफाड या बाजार समित्यांच्या आवारात सोमवारी एकूण ५४ हजार २९४ क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी ९०० ते १५००, तर जास्तीत जास्त २३९९ ते २५३७ रुपये असा क्विंटलमागे भाव होता.

उसळलेले दर

पिंपळगाव बसवंत : १५०० ते २५३७ रुपये

लासलगाव : १६००-२३०० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन थंडीत ‘तापली’ वाळू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गौण खनिजांच्या व्यवहारासंदर्भात सरकारने कारवाईचा फास आवळल्याने नाशिक जिल्ह्यातील हा व्यवसाय जवळपास ठप्प पडला आहे. त्याचा फटका केवळ बांधकाम उद्योगालाच बसत नसून, या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी अतिरेकाचा निषेध म्हणून या व्यावसायिकांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात असून वाहने जप्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हे वाहतूकदार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून आपल्या व्यथा मांडणार आहेत. वाळू वाहतुकीला मारक ठरणारी धोरणे परिपत्रकांच्या मदतीने सरकार वाळू वाहतूकदारांवर लादत आहेत. यामुळे गौण खनिज वाहतुकीला उतरती कळा लागली असून, उत्तर महाराष्ट्रातील वाळू व्यावसायिकांवर उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहे. याबाबतची कैफियत मांडणारे निवेदन उत्तर महाराष्ट्रातील वाळू वाहतूकदारांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविले आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसू असा इशारा देण्यात आला आहे. वाळू वाहतूकदारांना सरसकट माफिया संबोधून होत असलेल्या एकतर्फी कारवाईबाबत प्रचंड असंतोष आहे. या व्यवसायातील अडचणी, समस्या व धोके समजून घेण्याची विनंतीही या मंडळींनी केल्याने ऐन थंडीत वाळू तापली आहे.

गेल्या ३ आणि १२ जानेवारीला गौण खनिज वाहतुकीबाबत काही धोरणे सरकारने परिपत्रकांच्या माध्यमातून जाहीर केली आहेत. नाशिक जिल्ह्यात वाळू उपलब्ध नसल्याने येथील वाहतूकदार धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथून वाळू आणतात. त्याची रॉयल्टीही भरतात. प्रमाणापेक्षा थोडीही वाळू अधिक आढळली तरी पूर्ण वाळूसाठा अवैध ठरवून दंडात्मक कारवाई केली जाते. एवढ्यावरच न थांबता लेखी हमीपत्रही घेतले जाते. गाडीच्या इन्शुरन्सच्या व्हॅल्युएशनइतका दंड आकारण्यास आमची हरकत नाही, अशी हमी या हमीपत्रातून घेतली जाते. अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा समज झाला तर हमीपत्रात नमूद केल्याप्रमाणे दंड आकारण्यात येतो आहे. ही कारवाई अत्यंत जाचकरित्या राबिवली जात असून त्यामुळे वाहतूकदार देशोधडीला लागत असल्याकडे महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाळूचे लिलाव जेव्हा अधिकृतरित्या झालेले असतात, त्याचवेळी कारवाईची मोहीम राबविली जात असल्याचा आरोप या व्यावसायिकांकडून करण्यात आला आहे. बँकेची गॅरंटी नसल्यास सॉलव्हन्सी देण्याची सक्ती प्रशासनाकडून केली जात आहे. सरकार आम्हाला आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचा आरोपही त्यामध्ये करण्यात आला आहे.

'जाचक अटी रद्द करा'

वाळू वाहतूक करणारी वाहने अनेक जिल्ह्यांमधून प्रवास करीत असतात. प्रत्येक जिल्ह्यात त्यावर कारवाई न करता ज्या कार्यक्षेत्रात वाळू भरली जाते तेथेच महसूल अधिकाऱ्यांनी शहानिशा करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. गौण खनिजांवर आधारित हजारो जणांवर सरकारच्या जाचक अटींमुळे उपासमारीची तसेच आत्महत्येची वेळ आली आहे. या जाचक अटी रद्द होण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली असून, संपाचा आणि उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच, वाळूचे भाव नियंत्रित राहावेत यासाठी सरकार आणि प्रशासन कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याकडे पाटील यांचे लक्ष पत्रात वेधण्यात आले आहे.

महसूलकडून कोर्टाचा अवमान

वाळूचा सरकारी भाव ४०० रुपये आहे. परंतु, महसूल प्रशासन प्रतिब्रास पाच हजार रुपये भाव गृहीत धरून त्यावर पाचपट दंड आकारते. वाळूचा दंड तीन हजार रुपये प्रतिब्रास याप्रमाणे आकारण्यात यावा, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे महसूल विभाग वाळू वाहतूकदारांवर अन्याय करीत असतानाच उच्च न्यायालयाचा अवमानही करीत असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाणे गिळल्याने चिमुरडी मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

खाऊ घेण्यासाठी दिलेले एक रुपयाचे नाणे चार वर्षीय बालिकेने गिळल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चांदगिरी येथे सोमवारी घडली. शालिनी दत्तात्रेय हांडगे असे या बालिकेचे नाव आहे. शालिनीने खाऊसाठी आईकडे हट्ट धरला होता. त्यामुळे आईने तिला एक रुपयाचे नाणे दिले. चिमुरड्या शालिनीने हे नाणे गिळले.

चांदगिरी येथील चार वर्षीय शालिनी हांडगे या बालिकेने खेळताना हातातील दहा रुपयांचे नाणे गिळले होते. ही बाब लक्षात येताच तिला शिंदे येथील डॉ. काकड यांच्याकडे उपचारासाठी तिला दाखल केले. मात्र, त्यांनी बिटको रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्याने तिला तिच्या वडिलांनी तत्काळ पालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. येथे शालिनीचा एक्स-रे काढल्यावर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. मात्र, संबंधित डॉक्टर्स नसल्याने आडगाव मेडिकल कॉलेजला नेण्याचा सल्ला दिला. बिटकोच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, शालिनीला तिच्या वडिलांनी मेडिकल कॉलेजला दाखल केले. तेथे डॉक्टरांनी पुन्हा एक्स-रे काढण्यास सांगितले. त्यानुसार पुन्हा एक्स-रे काढला व ऑपरेशनचा सल्ला दिला. मात्र, रात्री नऊपर्यंत ऑपरेशन केले नाही. त्यानंतर शालिनीला त्रास झाल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल केले. काही वेळाने ऑपरेशन उद्या करावे लागेल, अशी माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली. दरम्यान, ट्रेनी डॉक्टर वरिष्ठ डॉक्टरांशी फोनवर वारंवार संपर्क करीत असल्याचे शालिनीच्या पालकांच्या लक्षात आले. शालिनीवर पुढील उपचार का होत नाहीत, याची ते वारंवार विचारणा करीत होते. मात्र, डॉक्टरांनी चालढकल करणे सुरूच ठेवल्याने अखेरीस रात्री शालिनीने रडत रडतच मान टाकली.

शालिनीला लवकर उपचार मिळावेत म्हणून आम्ही तिला तत्काळ डॉक्टरांकडे नेले; परंतु आम्हाला सर्वांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. मेडिकल कॉलेजमध्ये औषधेही आणून दिली. उपचारांसाठी शिकाऊ डॉक्टरांनी ताटकळत ठेवले. उपचारांत चालढकल झाली नसती तर आमची चिमुकली आम्हाला सोडून गेली नसती. - दत्तात्रेय हांडगे, शालिनीचे वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live