Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नागरिकांनी पकडला चेन स्नॅचर्स

$
0
0

चोप देऊन केले पोलिसांच्या हवाली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवाह सोहळा आटोपून मुलाची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पोबारा करणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ही घटना औरंगाबाद मार्गावर घडली. संशयिताच्या अटकेमुळे या परिसरात झालेले काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

संतोष तुकाराम निकम (वय ३३, रा. लखमापूर, ता. दिंडोरी, हल्ली शिवअमृत सोसा. बोरगड) असे या संशयित चेन स्नॅचर्सचे नाव आहे. निर्मला संजय गामणे (रा. गामणेमळा, मखमलाबाद) या महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारताना संशयित संतोष नागरिकांच्या हाती सापडला. नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यासाठी गामणे सोमवारी औरंगाबाद रोडवरील गुरूदत्त लॉन्स येथे गेल्या होत्या. सायंकाळी विवाह आटोपताच साडेसात वाजेच्या सुमारास त्या रस्ता ओलांडून नजीकच्या सिद्धिविनायक लॉन्ससमोर पोहचल्या. येथे त्यांचा मुलगा दुचाकीवर येणार होता. गामणे आपल्या मुलाची वाट पाहत उभ्या असताना त्यांच्या शेजारी तोंडाला मास्क बांधून संतोष तयारीतच थांबला होता. संतोषने गामणे यांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतोषने पोतीवर हात टाकताच गामणे यांनी जोरात आरडाओरड केली. सोमवारी लग्नाची तिथी दाट असल्याने या मार्गावर वर्दळ होती. तसेच गोरस मुहूर्तावरील विवाह सोहळे आटोपून वऱ्हाडी मंडळी लॉन्स बाहेर पडत असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यातील काही नागरिकांनी पाठलाग करीत संशयितास पकडून बेदम चोप दिला. ही घटना आडगाव पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पुजारी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. नागरिकांनी मुद्देमालासह बेदम मारलेल्या संशयितास पोलिसांच्या स्वाधीन केले. गामणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिस स्टेशनमध्ये संशयित संतोष निकमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार बोऱ्हाडे करीत आहेत.

इतर गुन्ह्यांशी संबंध तपासणार

संशयिताच्या अटकेमुळे या परिसरात झालेले काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आडगाव, पंचवटी तसेच उपनगर या पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांत सतत चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या असून, त्यांच्याशी संशयिताचा थेट संबंध आहे काय याचा तपास पोलिस करीत आहेत.

फटाके वाजविण्यावरून मारहाण

मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घरासमोर फटाके उडविल्याने दोघांनी एकास बेदम मारहाण केली. ही घटना सिडकोतील उत्तमनगर भागात घडली असून, या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत उर्फ भूषण साळुंके आणि त्याच्या काकाचा मुलगा (रा. डीजीपीनगर) अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. राजरत्ननगर येथील शिवचौकात राहणाऱ्या गुलाब प्रकाश महाले या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी रात्री घराजवळील मित्र निखिल अहिरराव याच्या हळदीच्या कार्यक्रमात महाले फटाके उडवित असताना वादास सुरुवात झाली. कार्यक्रमानिमित्त आलेल्या दोघा संशयितांनी गुलाब महाले यास बाजूला घेऊन जाऊन फटाके का उडवितो, असा जाब विचारत शिवीगाळ सुरू करून बेदम मारहाण केली. संशयितांपैकी एकाने गुलाबच्या डोक्यात लोखंडी फायटरने मारल्याने तो जखमी झाला असून, अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.

जुगारींना अटक

पंचशीलनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे जुगार खेळणाऱ्या चौघा जुगारींना पोलिसांनी अटक केली. संशयिताच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास वरील ठिकाणी उघड्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला. यावेळी शंकर रामा शेट्टी तसेच त्याचे तीन साथीदार पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर जुगार खेळतांना सापडले. घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक शेख करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठ सदस्य निवृत्त होणारच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येत्या महिनाभरात स्थायी समितीवर २५७ कोटींच्या रस्त्यांसह कोट्यवधीचे येणारे प्रस्ताव डोळ्यासमोर ठेवून स्थायी समितीच्या सदस्यांनी कार्यकाल वाढवण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. त्यासाठी पूर्ण एक वर्षाचा कार्यकाळाचा आधार घेण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, नवीन २०११ च्या नियमावलीत अशी कोणतीही तरतूद नसल्याने २८ फेब्रुवारीच्या आत ८ सदस्य निवृत्त होणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कार्यकाळ वाढवण्यासाठी आटापिटा सुरू असलेल्या सदस्यांच्या मनसुब्यावर वरवंटा फिरणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीत दरवर्षी फेब्रुवारीत आठ सदस्य नियमावनुसार निवृत्त होतात. त्यासाठी चिठ्ठी पद्धतीचा आधार घेवून ही निवृत्ती घेतली जाते. परंतु सध्याच्या स्थायी समिती सदस्यांना स्थायीचा मोह सुटत नसल्याने त्यांनी कार्यकाळ कमी मिळत असल्याचा दावा करत, तो महीनाभर वाढवून घेण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. स्थायी समिती एप्रिलमध्ये अस्तित्वात आल्याचे सांगत, मुदत मार्च अखेरपर्यंत मिळावी अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यासाठी सन २००४ मध्ये झालेल्या तत्कालीन न्यायालयीन निवाड्याचे हवाला देत, सदस्यांकडून कायद्याचा किस पाडण्याचे काम सुरू आहे. परंतु आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी अशी शक्यता फेटाळून लावली असून, सन २०११ मध्ये महापालिकेच्या कायद्यात बदल व सुधारणा झालेली आहे. त्यानुसार नियमाप्रमाणे, २८ फेब्रुवारीच्या आत स्थायी समितीवरील आठ सदस्य निवृत्त केले जातील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. प्रशासकीय पातळीवरून त्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडे धाव घेतलेल्या सदस्यांच्या मनुसुब्यांवर पाणी फेरले जाणार आहे. दरम्यान प्रशासनाने यांच्या निवृत्तीची प्रक्रिया सुरू केली असतांना विभागीय आयुक्तांनीही याबाबत स्पष्टता केली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सदस्यांच्या उरल्या सुरल्या आशाही मावळल्या असून स्थायीचा मोह आवरता घ्यावा लागणार हे निश्चित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा तेजीतच;२३६१ रुपये भाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर ९०० ते हजार रुपयांनी वधारलेले कांद्याचे बाजारभाव मंगळवारीही टिकून होते. लासलगाव बाजार समितीत १२ हजार क्विंटल आवक झाली असून, सरासरी २३६१ रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. कांद्याच्या बाजारभावात लक्षणीय सुधारणा झाली आहे. परंतु शेतकऱ्यांकडे आता अवघा २० ते २२ टक्के कांदा शिल्लक आहे. त्यामुळे आठवडाभरपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कांदा लिलावात दिला, त्यांना ७०० ते ८०० रुपयांचा क्विंटलमागे फटका बसला आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव व पिंपळगाव या प्रमुख बाजारसमित्यांमध्ये चांदवड, देवळा, येवला आदी भागतीलही कांदा उत्पादकांनी मंगळवारी राहिलेला कांदा ट्रॅक्टर पिकअप आदी वाहनांनी आणला होता. लाल कांदा संपल्यानंतर रांगडा अर्थात उन्हाळ कांदा मार्केटमध्ये दाखल होणार आहे. त्याला अजून तीन आठवडे ते महिना अवकाश आहे. लाल कांद्याची अत्यल्प उपलब्धता आणि उन्हाळ कांद्याला यायला अवकाश यामुळे येत्या काळात कांद्याचे भाव स्थिर राहतील असे व्यापारी वर्गाने सांगितले. पिंपळगाव बाजार समितीत मंगळवारी १६ हजार ८७० क्विंटल आवक झाली. सरासरी २२०० रुपये भाव होता. सायखेड्यात ७४०० क्विंटल आवक असून, सरासरी भाव दोन हजार रुपये होता. तर लासलगाव बाजार समितीत बारा हजार क्विंटल आवक झाली असून, सरासरी भाव २३६१ प्रति क्विंटल होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळींनंतर सिग्नलची उपरती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अवजड ट्रकखाली सोमवारी दुचाकीस्वाराचा गेलेला बळी, तसेच गेल्या काही वर्षांत डझनभर बळी घेणाऱ्या जेलरोडवर अखेर पहिला सिग्नल सुरू होणार आहे. सर्वांत वर्दळीच्या इंगळेनगर जेलटाकी चौकात सिग्नलचे काम सुरू झाले असून, पंधरा दिवसांत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी माहिती देण्यात आली. येथे सिग्नल सुरू करण्याबाबत 'मटा'ने पाठपुरावा केला होता. 'मटा'च्या दणक्यानंतर पोलिसांनी मंगळवारपासून या रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांवरदेखील कारवाई सुरू केली आहे.

प्रभाग क्रमांक १७, १८ आणि २० च्या सीमेवरील इंगळेनगर चौकातून नाशिकरोड, दसक, बिटको आणि पवारवाडी येथे जाता येते. या चौकात वर्षभरात चार बळी गेले आहेत. दोन वर्षांपूर्वी या चौकात महिला, तसेच जेल कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर नागरिकांनी रास्तो रोको व दगडफेक केली होती. या चौकात मटण, मासळी, फळ बाजार व महापालिकेच्या तीन शाळा आहेत. येथून शंभर मीटरवर सोमवारी अवजड ट्रकखाली प्रवीण कुमट (वय ४२) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनावर टीका झाली होती. जेलरोडवर डझनभर बळी गेले आहेत.

केबल टाकण्यास सुरुवात

महापालिका निवडणूक झाल्यानंतर आमदार बाळासाहेब सानप यांची भेट घेऊन नगरसेविका मीरा हांडगे यांनी येथे सिग्नल सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार सानप यांनी महापालिका आयुक्तांसह इंगळेनगर चौकाची पाहणी केली होती. पेट्रोलिंगवेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनीही येथे भेट दिली होती. येथे वाहतूक बेटाची मागणी होती. परंतु, ते शक्य नसल्याने सिग्नल सुरू केला जाणार आहे. त्यासाठी चार ठिकाणी रस्ता खोदून केबल टाकण्यात येत आहे. जेलरोडच्या दसक चौकात वाहतूक बेट करण्याचा प्रयत्न आहे. तसा प्रस्ताव महासभेत मंजूर झाला आहे. आता स्थायी समितीवर तो येणार असल्याची माहिती मीरा हांडगे, शरद मोरे यांनी दिली.

तक्रारींनंतरही होत होते दुर्लक्ष

इंगळेनगर चौकाजवळ सोमवारी अवजड ट्रकखाली दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. गेल्याच महिन्यात जेलरोडवर ट्रकच्या धडकेने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. जेलरोड हा मृत्यूचा सापळा झाला असूनही महापालिका, पोलिस प्रशासनच्या उदासीनतेमुळे येथे वारंवार बळी जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या चौकातून दररोज शाळा, कॉलेज, खासगी क्लासचे विद्यार्थी, नोकरदारांची वाहतूक सुरू असते. येथे गतिरोधक व पिवळा सिग्नल लावण्यात आला आहे. परंतु, पिवळा सिग्नल बंद असतो, तर गतिरोधक अवजड वाहनांमुळे लहान झाले आहेत. आता सिग्नल सुरू असल्याने अपघातांना आळा बसू शकतो.

शाळांपुढे गतिरोधकांची गरज

या रस्त्यावरील सेंट फिलोमिना, कोठारी कन्या, पुरुषोत्तम शाळा, तसेच इंगळेगनर चौकातील महापालिकेच्या तीन शाळांपुढे गतिरोधकांची गरज आहे. शिवाजी चौक आणि मॉडेल कॉलनी चौकात सर्वांत जास्त अपघात होऊनही गतिरोधक किंवा सिग्नल नाही. जेलरोडवर शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, सेंट फिलोमिना स्कूल येथे तातडीने गतिरोधक टाकावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. भीमनगर चौक, इंगळेनगर चौक, शिवाजीनगर चौक, मॉडेल कॉलनी चौक, सैलानीबाबा चौक आणि नांदूर नाका हा भाग धोकादायक झाला आहे. सैलानीबाबा चौकापासून नांदूर नाक्यापर्यंत गरज नसतानाही गतिरोधक टाकलेले आहेत. जेलरोडवर पुरुषोत्तम शाळा, करन्सी नोट प्रेस, भीमनगर, जेलटाकी येथील गतिरोधक लहान झाले आहेत. सैलानीबाबा चौक ते नांदूर नाका येथील गतिरोधकही असेच आहेत. जेलरोडवर महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधकांसाठी विविध पक्ष व संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.



अवजड वाहने रोखली

जेलरोडला बेशिस्त वाहतूक आणि अवजड वाहनांचा प्रश्न गंभीर झाला आहे. अवजड वाहनांना येथे बंदी असल्याचा बोर्ड बिटको चौकात लावलेला आहे. बिटको चौकात वाहतूक पोलिसांची चौकी असून, दिवसभर पोलिस असतात, तरीही अवजड वाहनांवर कारवाई होत नाही. अशाच अवजड वाहनाखाली सापडून सोमवारी एकाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले. मंगळवारी त्यांनी अशी वाहने रोखून दंडात्मक कारवाई केली. जेलरोडने नाशिक-औरंगाबाद, नाशिक-पुणे, मुंबई-आग्रा या तीन महामार्गांवर जाता येते. त्यामुळे जेलरोडवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. अवजड वाहनांना या तीन महामार्गांवर जाण्यासाठी द्वारका हाच मार्ग आहे. परंतु, तेथील वाहतूक कोंडी व जादा इंधनामुळे अवजड वाहनाचालक जेलरोडला प्राधान्य देतात.

(लोगो- मटा इम्पॅक्ट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव-चिंचखेड बसला अपघात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पिंपळगाव बसवंत एसटी डेपोच्या बसला बुधवारी सकाळी साडेआठ वाजता चिंचखेड परिसरात अपघात झाला. बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने हा अपघात झाला. बसमधील १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. पिपंळगाव बसवंत ते चिंचखेड परिसरातील रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे हा अपघात झाला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर पिंपळगाव पोलिसांनी हद्दीचा मुद्दा पुढे करून मदत करण्यास टाळाटाळ केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.



पिंपळगाव बसस्थानकातून ही बस (एमएच २०, बीएल ०२३६) जऊळके (ता. दिंडोरी) साठी बुधवारी सकाळी निघाली. शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर अचानक स्टेरिंगचा रॉड तुटला. त्यातच बसचे उजव्या बाजूचे पुढचे चाक निखळले. बस वेगात असल्यामुळे बाजूच्या झाडावर आदळली. बसचालक संजय गांगुर्डे, वाहक रत्नाकर शिंगाडे आणि बसमधील ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना चिंचखेड व पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

मोठा अनर्थ टळला

बस ज्या झाडावर आदळली तेथून जवळ ११ के. व्ही. चे रोहीत्र होते. त्यामुळे बस झाडावर आदळण्याऐवजी जर रोहीत्रावर घसरली असती तर मोठा अनर्थ झाला असता. शिवाय ही बस चिंचखेडला पोहोचल्यानंतर परतीच्या प्रवासात बसमध्ये विद्यार्थी बसतात. ते पिंपळगाव बसवंत येथील कॉलेज आणि शाळेत शिक्षणासाठी या बसने ये-जा करतात. त्यामुळे हा अपघात जर परतीच्या प्रवासात झाला असता तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जखमी झाले असते.

रस्ता डागडुजीची मागणी

पिंपळगाव-चिंचखेड रोडवर हा चौथा अपघात आहे. या रस्त्याची मोठी दूरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. केवळ खराब रस्त्यांमुळे हा अपघात घटना घडला असून या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. पिंपळगाव बसवंत येथील परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड यांनी जखमींची विचारपूरस केली असून, त्यांनी उपचारासाठी आर्थिक मदतही केली.

कोट.-- बुधवारी सकाळी ही बस पिंपळगावहून जऊळकेकडे जात होती. गाडी वेगातही होती आणि रस्ताही खराब होता. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते, त्यापैकी जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी मदत केली. तसेच त्यांना महामंडळाकडून पी फॉर्म दिला. त्यामुळे भविष्यातही उपचार घेता येतील.--प्रशांत गुंड, आगार व्यवस्थापक

पोलिसांची असंवेदनशीलता

बसचा अपघात झाल्यावर स्थानिक नागरिकांनी बसचा दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिकेची वाट न पाहता स्वतःच्या वाहनांनी रुग्णालयात आणले. काही नागरिकांनी पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनला फोनवर ही घटना कळविल्यानंतर त्यांनी अपघात दिंडोरी तालुका पोलिसांच्या हद्दीत झाल्याचे कारण पुढे करून मतद करण्यास टाळाटाळ केली. वास्तविक हा अपघात पिंपळगाव पासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावर झाला होता. पोलिसांच्या या असंवेदनशीलतेवर नागरिक व जखमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नो पार्किंग’मध्येच वाहने

$
0
0

रामकुंड परिसरात बेशिस्तीचे दर्शन

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भाविकांच्या गर्दीने कायम गजबजलेल्या रामकुंड परिसरात वाहने पार्क करू नये, असे फलक लावण्यात आलेले असताना नेमक्या त्याच फलकांच्या खाली वाहने पार्क केले जात आहेत. या बेशिस्तीचे दर्शन परराज्यातील तसेच विदेशातील भाविकांना आणि पर्यटकांना घडत आहे.

वाहनांसाठी गोदाघाटावर जागा असतानाही थेट रामकुंड परिसरात वाहने आणून तेथे पार्क करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे येथे कायम कोंडी होत आहे. रामकुंडावरील चौथऱ्यासमोर, स्वच्छ विभागाच्या कार्यालयाजवळ, पांडे मिठाईजवळ नो पार्किंगचे फलक लावण्यात आले असून त्याच्या २०० मीटर आसपास वाहने पार्क करू नये, असे स्पष्ट लिहिले असताना त्याच फलकाच्या खाली वाहने पार्क केली जातात. या वाहनांमुळे रामकुंडावर सकाळी अस्थीविसर्जन, दशक्रिया विधी, श्राद्धविधीसाठी येणाऱ्या भाविकांना अडचण निर्माण होते. वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्यामुळे येथे वाहनांची कोंडी तर होते, शिवाय भाविकांना येथून पायी मार्ग काढणे मुश्किल होते.

फलकाखालीच वाहनांची रांग

रामकुंडावरील चौथऱ्यासमोरच्या भागातून रामकुंडाकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या भागातून भाविकांना आणि पर्यंटकांना ये-जा करण्यासाठी जागा आहे. याच जागेवर वाहने पार्क केल्यामुळे येथून जाण्यास अडचणी येतात. रामकुंडावर येण्यासाठी मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी वाचनालय, पुरिया मार्ग, गंगाघाट मार्ग हे मार्ग आहेत. या मार्गाने वाहनांची ये-जा सुरू असते. वाचनालयाकडून येणाऱ्या मार्गावर स्वच्छता निरीक्षकांच्या कार्यालयासमोरच फलकाखालीच वाहनांची रांग लागलेली असते. तर पांडे मिठाईच्यासमोर जुना फलक असून, त्याच्यावर गंज चढला आहे. मात्र, येथील पार्किंग काही हटली नाही तर तेथे आता रिक्षांच्या थांबा झाला आहे.

शिस्त लावल्यास कोंडी सुटणार

वस्त्रांतरगृहाच्या समोरच्या भागात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे, असे असतानाही येथे दुचाकी आणि रिक्षा यांची सर्रास ये-जा सुरू असते. गोदाकाठावर रामकुंड पार्किंग, भाजीबाजाराची जागा, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण या भागात पार्किंगसाठी सध्या मुबलक जागा आहे. बाहेरगावाहून येणारी वाहने पार्किंगच्या जागेवर थांबविली जातात. मात्र, शहरातील वाहने विशेषतः दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा यांचाच रामकुंड परिसराच्या भागात जास्त वावर असतो. या वाहनांना शिस्त लावल्यास येथील कोंडी सुटण्यास मदत होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - ग्रेप हार्वेस्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाईन व पर्यटनाचे ब्रँडिंग करण्यासाठी जिल्ह्यातील विविध १४ ठिकाणी २८ दिवस इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाईन फेस्टीव्हल २०१८ चे कार्यक्रम रंगणार आहे. ८ फेब्रुवारी, गुरुवारी मोहाडी येथील सह्याद्री फॉर्म येथे सायंकाळी ४ वाजता पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री गिरीष महाजन यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा होणार आहे.

नाशिक व्हॅली वाईन क्लस्टरने या फेस्टिव्हलचे आयोजन केले असून, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे याला पाठबळ दिले असल्याचे अखिल भारतीय द्राक्ष वाईन उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर, सरचिटणीस राजेश बोरसे व राजेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ९ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस नाशिक परिसरातील कृषी प्रक्रिया उद्योग व्हिनेयार्डस आणि वेगवेगळ्या वाईनरीजमध्ये हा फेस्टिव्हल होणार आहे. उच्च दर्जाची वाईननिर्मिती जिल्ह्यात केली जात असल्याची माहिती फेस्टिव्हलनिमित्त करून दिली जाणार आहे.

नाशिक व्हॅली पर्यटन केंद्र

वाईन फेस्टिव्हलद्वारे 'नाशिक व्हॅली' वाईन पर्यटनाचे केंद्र म्हणून सर्वत्र प्रचार आणि प्रसार करण्याचा पर्यटन महामंडळाचा प्रयत्न आहे. देशभरातील मोठ्या महोत्सवांपैकी नाशिकचा वाईन महोत्सव एक ठरावा, यासाठी याचे आयोजन भव्य स्वरुपात करण्यात आले आहे. द्राक्ष उत्पादक, कृषी उद्योजक आणि वाईन प्रेमींनी या उत्सवात आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्रातील ७७ वाईनरीजपैकी ३९ वाईनरजी नाशिक जिल्ह्यात आहेत. त्यामुळे वाईन पर्यटनामध्ये २५ टक्के वाढ झाली असून, गेल्या आठवड्यात जपान, फ्रान्स, जर्मन, कोरीया या देशातील पर्यटकांनी भेटी दिल्या आहे.

अनेक कार्यक्रमांची रेलचेल

फेस्टिव्हलमध्ये नाशिक वाईन सिटीच्या ब्रँडिंग सोबतच अनेक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे. ग्रेप स्टोम्पिंग, वाईन टेस्टिंग, फूट कोर्ट, शेतकरी बाजार, वाईन सोबत खाण्याचे पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक, हॉट एअर बलून टूर, पतंग उडवणे, सायकलिंग असे खेळाचे प्रकार या महोत्सवात असणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

शेतकऱ्यांसाठी तसेच शेती आणि शेतीपूरक उद्योग करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी शिबराचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील फळ आणि कृषी माल उत्पादकांच्या ब्रँडिंगसाठी हा फेस्टिव्हल उत्तम संधी असल्याचे संयोजकांनी सांगितले.

कैदींच्या वस्तूंचे स्टॉल

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉलही या फेस्टिव्हलमध्ये असणार आहे. या वस्तू जास्तीत जास्त विकल्या जाव्या यासाठी या फेस्टिव्हलमध्ये स्टॉल असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेनंतरही अस्वच्छ पाणी

$
0
0

भाविकांना त्रास; रामकुंडात दुर्गंधी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरीच्या स्वच्छतेवर सातत्याने चर्चा होत आहे. त्यात पवित्र रामकुंडातील पाणी स्वच्छ कसे राहिल यासाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

रामकुंडातील गाळ काढण्याचे काम मंगळवारी (दि. ६) केले असले तरी या साफसफाईनंतरही येथील पाणी दुर्गंधीयुक्त आणि खराब असल्याचे बुधवारी (दि. ७) दिसत होते. विशेष म्हणजे, स्वच्छतेसाठी हा तलाव रिकामा करण्यात आला होता. गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्ताने रामकुंडावर आलेल्या भाविकांना स्नानासाठी स्वच्छ पाण्याचा अभावच जाणवला.

मनपा सल्ल्याच्या प्रतीक्षेत

रामकुंडातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी कुंडात पाण्याचा प्रवाह अखंडित वाहता ठेवण्यात यावा, अशी मागणी जोर धरत असताना त्या दृष्टीने प्रयत्न केले जात नाही. गंगापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर जसे पाणी वाहते राहते त्यावेळी रामकुंडातील पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रवाहित ठेवण्यावर भर दिला पाहिजे. हे करण्यापेक्षा महापालिका येथील पाणी स्वच्छ कसे ठेवता येईल यासाठी तज्ज्ञांकडून सल्ला मिळण्याच्या प्रतीक्षेत बसली आहे.

गाळ काढूनही उपयोग नाही

रामकुंडात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांसाठी स्वतंत्रपणे कुंड तयार करण्यात आलेले असल्याने या कुंडात दिवे सोडले जात आहेत. तरीही रामकुंडात तरंगणारे निर्माल्य कमी झालेले नाही. पाण्याचा प्रवाह थांबलेला असल्यामुळे या स्थिर पाण्यावर निर्माल्य तरंगताना नजरेस पडत आहे. रामकुंडातील गाळ काढण्याचे काम झाल्यानंतर रामकुंड स्वच्छ धुणे गरजेचे असते. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला पाण्याचा प्रवाह नसल्यामुळे स्वच्छ करण्यात आलेल्या रामकुंडात जसे पाणी उपलब्ध होते, ते सोडण्यात आले. हे पाणी शुद्ध नसल्यामुळे केवळ गाळ काढून काही उपयोग झालेला दिसला नाही. पाणी अस्वच्छ असल्याचे दिसत होते. रामकुंडाची साफसफाई करीत असताना तेथे असलेल्या अस्थिमिश्रीत गाळ बुधवारी (दि. ७) रोजी दुपारपर्यंत काठावर पडून होता. या परिसरात उभारण्यात आलेल्या मंडपांमुळे हा गाळ वाहून नेता येणे शक्य नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्राह्मणगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे दोन दिवसात पिसाळलेल्या व जखमी कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. या कुत्र्यांनी तब्बल १५ जणांना त्यांनी चावा घेतल्याने ब्राम्हणगावात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे.

ब्राम्हणगाव येथील बसस्थानक, कासार चौक, बाजार चौक, होळी चौक, एकलव्य नगर, गणेश नगर, सिद्धार्थ नगरात मोकाटांसह पिसाळलेल्या व जखमी कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. पिसाळलेली कुत्री जो दिसेल त्याच्यावर हल्ला करित आहेत. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्रीराम अहिरे नुतन इंग्लिश स्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून शाळेतील पटसंख्येवरही परिणाम झाला आहे. सोमवारी ५ तर मंगळवारी ८ जणांना चावा घेतला. जानकाबाई सरोदे (७०), भावेश पगार (३५), जानकाबाई सरोदे (७०), दुर्गाप्रसाद परदेशी जानकाबाई सरोदे (४४), कृष्णा जाधव (१५), भिकुबाई नवरे (६०), दीपक पारखे, (१०), वंदना शेवाळे (३२), जगदीश येथी (५०), पियुष सांळुखे (५५), सुनीता खैरनार (३०), स्वप्निल चव्हाण (५) यांच्यासह परिसरातील लखमापूर, धांद्री या भागातील रहिवाशांना देखील या पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. दरम्यान रुग्णांवर ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. प्रकाश भोये यांनी उपचार केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संपूर्ण ई-पासपोर्ट नाशिकलाच बनणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

ई-पासपोर्टमध्ये सर्वात महत्त्वाची असलेली चीप (इन-ले) तयार करण्याचे काम नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्येच होणार असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, संदीप बिश्वास यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

पासपोर्ट निर्मितीचे काम भारतात फक्त नाशिकरोडच्या प्रेसमध्येच होते. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार जुना पारंपरिक पासपोर्ट जाऊन आता ई-पासपोर्ट येणार आहे. अनेक प्रगत देशांमध्ये ई-पासपोर्टचा वापर सुरू झाला आहे. भारतात सुमारे २५ ते ३० कोटी पासपोर्टधारक आहेत. त्यांना ई-पासपोर्ट घ्यावा लागणार आहे. त्यामुळे नाशिकरोड प्रेसला मोठे काम मिळणार आहे. ऑक्टोबरपर्यंत 'इन-ले'चे काम सुरू होणार आहे.

ई पासपोर्ट हा इलेक्ट्रानिक चीपवर चालतो. या चीपला 'इन-ले' असे म्हणतात. 'इन-ले' सोडून बाकी सर्व ई-पासपोर्टचे काम नाशिकरोडला प्रेसमध्येच केले जाते. मात्र, 'इन-ले' बाहेरील कंपनीकडून तयार करून मग तो येथील प्रेसला देऊन ई-पासपोर्टमध्ये बसविण्यात येणार होता. मजदूर संघाचे नेते प्रेस महामंडळाचे नवनियुक्त चिफ मॅनेजिंग डायरेक्टर एस. सेल्वाकुमार यांना दिल्लीत भेटले. त्यांनी 'इन-ले' बाहेरच्या कंपनीस देण्यास तीव्र विरोध केला. सेल्वाकुमार यांनी निर्णय रद्द केला. हैदराबादच्या प्रेसला हे काम देण्याचा विचार महामंडळाने सुरू केला. जगदीश गोडसे यांनी सांगितले की, ई-पासपोर्ट नाशिकरोड आयएसपी बनवणार असल्याने 'इन-ले' देखील येथेच बनविला तर सुरक्षितता राहील आणि खर्चातही मोठी बचत होईल. संपूर्ण ई-पासपोर्ट नाशिकला तयार झाला तर उत्पादनातही अडथळा येणार नाही. सेल्वाकुमार यांनी तसे आदेश पारित केले आहेत.

यावेळी कामगार नेते सुनील आहिरे, माधवराव लहांगे, नंदू पाळदे, उत्तम रकिबे, शिवाजी कदम, रमेश खुळे, इरफान शेख, दिनकर खर्जुल, उल्हास भालेराव, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, अशोक पेखळे, ज्ञानेश्वर गायकवाड, भगवान मोरे, अरुण गिते उपस्थित होते.

ई पासपोर्ट मशिन

नाशिकरोड प्रेसमध्ये पासपोर्ट छपाईची एक जुनी व एक नवी मशिन आहे. ई-पासपोर्टचे काम मोठे असल्याने नवीन मशिन मिळावी अशी मागणी करण्यात आली असता सेल्वाकुमार यांनी जलदरित्या ही मशिन उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. संपूर्ण ई-पासपोर्टची छपाई ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार आहे. सर्व बँकांचे चेक नाशिकरोडच्या प्रेसमध्येच तयार केले जातात. मायकर चेक करण्यासाठी नवीन मशीन मिळावी अशी मागणी होती तीदेखील मंजूर झाली आहे. विविध राज्यांसाठी एक्साइज सिल या प्रेसमध्ये होते. त्यासाठीही नवीन मशिनची मागणी मंजूर झाली आहे. नोटांच्या प्रेसमध्ये आधुनिक मशिन लाइन मंजूर झाली. ही ती लवकर मिळावी तसेच या मशिनवर २०१९ मध्ये उत्पादन सुरू करण्यासाठी टेंडर प्रोसेस जलद गतीने व्हावी, ही मागणीही सेल्वाकुमार यांनी मान्य केली आहे. जुन्या मशिन्सचे ओव्हरहॉलिंग केले जाणार आहे.

नवीन इन्सेंटिव्ह

नाशिकरोड प्रेस कामगारांचे सुधारित इन्सेंटिव्ह अॅग्रीमेन्ट लवकर व्हावे, यासाठी दिल्लीत मार्चच्या अखेरीस व्यवस्थापनाबरोबर बैठक आहे. ती झाल्यानंतर नवीन इन्सेंटिव्ह लागू होणार आहे. नवीन दराने ओव्हरटाइमबाबतही महामंडळाच्या मनुष्यबळ विभागाशी सकारात्मक चर्चा झाली असून, सेल्वाकुमार यांची मान्यता आल्यानंतर नवा ओव्हरटाइम तसेच अॅरिअर्सही मिळतील, असे जगदीश गोडसे यांनी सांगितले. कामगारांच्या मुलांना कामावर घेण्याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती लवकर स्थापन करावी, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णा यांची तडकाफडकी बदली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांची १९ महिन्यांत राज्यसरकारने तडकाफडकी बदली केली असून, त्यांच्या जागी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णा यांनी गेल्या दीड वर्षात शहर विकासाच्या दृष्टीने अडचणीची ठरलेली घंटागाडी योजना, भंगार बाजार हटवणे, खतप्रकल्पाचे खासगीकरण, मालमत्तेचे सर्व्हेक्षण, उद्यानांची देखभाल दुरुस्ती, ऑटो डीसीआर यंत्रणा, वेस्ट टू एनर्जी, कपाट असे शहर विकासाला चालना देणारे प्रकल्प मार्गी लावले आहेत. शहर विकासाला चालना दिल्यानंतरही त्यांची बदली केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कृष्णा हे भाजपच्या अंतर्गत राजकारणाचे बळी ठरल्याची चर्चा आहे. कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून मुंढे यांची ओळख असून शुक्रवारी ते आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

महापालिका आयुक्त म्हणून अभिषेक कृष्णा यांची ७ जुलै २०१६ रोजी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. नियुक्तीनंतर कृष्णा यांनी महापालिकेत समन्वय आणि सोल्युशन बेस कामावर भर देत, महापालिकेच्या विकासकामांना चालना दिली होती. गेल्या १९ महिन्यांच्या काळात शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेले अनेक प्रश्न मार्गी लावले होते. विशेषत: शहराच्या विकासाला अडसर ठरलेला कपाट प्रश्नही त्यांनी बऱ्यापैकी सोडवला होता. घंटागाडी योजना, भंगार बाजार हटवणे, खतप्रकल्पाचे खासगीकरण, मालमत्तेचे सर्व्हेक्षण, उद्यानांची देखभाल दुरुस्ती, मालमत्ता सर्वेक्षण, वृक्षगणना, गंगापूर व पिंपळगाव एसटीपी प्रकल्प, अमृत उद्यान, गोदा प्रोजेक्ट, ऑटो डीसीआर यंत्रणा, वेस्ट टू एनर्जी असे शहर विकासाला चालना देणारे प्रकल्प मार्गी लावून विकासाची गाडी रुळावर आणली होती. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांनाही त्यांनी चालना दिली होती. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशीही त्यांचा समन्वय चांगला होता. परंतु, भाजपमधील अतंर्गत राजकारणाचा फटका त्यांना बसला. त्यांची शहरातील कारकीर्द अल्पकाळ ठरली आहे. कृष्णा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कृष्णा यांच्या जागेवर धडाकेबाज व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मुंढे यांच्या बदलीने अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनाही धसका घेतला आहे.

मुंढे शुक्रवारी पदभार घेणार

महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झालेले तुकाराम मुंढे हे शुक्रवारी आपला पदभार घेणार आहेत. बुधवारी मुंढे बैठकीसाठी मुंबईत असल्याने रात्री उशिरा पुण्यात पोहचले. त्यामुळे पुण्याच्या पीएमपीएलचा पदभार मुंढे हे गुरुवारी सोडणार असून, शुक्रवारी महापालिकेच्या आयुक्तपदाचा चार्ज घेणार आहेत. शहर विकासासाठी आपण काम करणार असल्याचे मुंढे यांनी 'मटा'ला सांगितले.

पालिकेत सन्नाटा

अभिषेक कृष्णा यांची बदली झाल्याची वार्ता महापालिकेत धडकताच, पालिकेत एकच सन्नाटा निर्माण झाला होता. कृष्णा यांच्या बदलीपेक्षा महापालिकेत मुंढे येत असल्याने पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी धसका घेतला आहे. कृष्णांचा प्रशासनावर दरारा असला तरी, मुंढे यांच्या कार्यपद्धती व शिस्तप्रियता व भ्रष्टाचाराला चाप लावण्याच्या कार्यपद्धतीमुळे अधिकारी व कर्मचारी हे चांगलेच धास्तावलेले होते. कृष्णांच्या बदलीवर आश्चर्य व्यक्त करत असतानाच, मुंढेच्या कारवाईच्या धास्तीने अनेकांचे त्राण गळाले होते.

आमदार सानपांची धाव

आयुक्त कृष्णा यांची बदली झाल्याचे वृत्त धडकताच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी महापालिकेत धाव घेत, आयुक्तांशी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी सानप यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करीत, बदली थांबवा अशी आर्त हाक दिली. परंतु, हा निर्णय थेट मुख्यमंत्र्याचाच असल्याने बदली थांबणार नसल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सानप यांनी आयुक्तांच्या कार्यालयातील मागच्या दरवाजाने बाहेर जाणे पंसत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासर्डी पूरप्रवण क्षेत्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नासर्डी नदीच्या पूररेषेखाली असलेल्या उंटवाडी पुलामुळे नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण होत असल्याचे पुण्याच्या केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्थेच्या अहवालात समोर आल्यानंतर आता या पुलावर गंडांतर आले आहे. त्यामुळे महापालिकेने कोणत्याही नियोजनाशिवाय बांधलेला व पूरक्षेत्रात येणारा हा पूल वाचवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यासाठी मेरीकडून मार्गदर्शन मागविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नाशिक शहर व आजूबाजूच्या परिसरात सप्टेंबर, २००८ मध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने गोदावरी व नासर्डी नदीला महापूर आला होता. या महापुरात नदीकाठावरील बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता. त्यामुळे हजारो मालमत्तांचे नुकसान झाले होते. त्यानंतर जलसंपदा विभागानकडून पूररेषा निश्चित करण्यात आली होता. केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या पुणे कार्यालयाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातून दोन्ही नदीकाठावर निळी व लाल रेषा निश्चित करण्यात आली. संशोधन केंद्राच्या सर्वेक्षण अहवालानुसार नासर्डी नदीवरील उंटवाडी पूल पूररेषेच्या एक मीटर खाली असल्याचा आढळून आले होते. त्यामुळे सदर पूल हटवून त्याठिकाणी उंच पुलाची निर्मिती करण्याची सूचना देखील महापालिकेला करण्यात आली होती. तसे केल्यास पुरात नदीच्या प्रवाहास होणारा अडथळा दूर होऊन पूरप्रभाव क्षेत्र कमी होईल, अशी शिफारस या अहवालात आहे. या सूचनांची अंमलबजावणी करावयाची झाल्यास उंटवाडी पूल तोडावा लागणार आहे. त्यामुळे नक्की काय भूमिका घ्यावी, यासंदर्भात महापालिकेने मेरीकडून मार्गदर्शन मागविण्याची तयारी केली आहे. मेरीनेही पूल पाडण्याची शिफारस केल्यास महापालिकेला मात्र या पुलावर बुलडोझर चालवावा लागणार आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगाळ वातावरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सकाळी ढगाळ वातावरण तर रात्री थंडी असे संमिश्र वातावरण सध्या शहरात अनुभवायला मिळत आहे. त्याचा फटका नाशिकमधील द्राक्ष पिकासह अन्य पिकांना बसण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे सुचविण्यात आले आहे. उत्तरेकडून आलेल्या थंड हवेच्या लाटेमुळे हवेतील बाष्प एकत्र झाले आणि त्यांचे ढग तयार झाले आहेत. त्यामुळे नाशिकसह राज्यात ढगाळ वातावरण आहे.

गेल्या आठवड्यात शहरात चांगली थंडी होती; मात्र काही दिवसात थंडीचा जोर ओसरुन बुधवारपासून वातावरणात अमुलाग्र बदल झाला. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन होणे दुरपास्थ झाले. शहरात किमान तापमान १५.८ इतके तर कमाल तापमान २९.७ इतके नोंदवले गेले. पुणे वेधशाळेने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक पाऊस पडण्याची तर विर्दभात हवामान कोरडे रहाण्याची शक्यता वर्तविली आहे. आज आणि उद्या संपूर्ण राज्यात कोरडे हवामान राहील. तर ११ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.

आरोग्याची काळजी घ्या

ढगाळ वातावरणात पचनशक्ती कमी होत असल्याने अनेकांना ताप व जुलाब त्रास सुरु झाला आहे. त्याच प्रमाणे पोटदुखीही मोठ्या बळावली असून, दोन दिवसात डॉक्टरांकडे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांनी हलक्या अन्नाचे सेवन करावे जास्त जड पदार्थ खाऊ नये, तसेच समतोल आहार घ्यावा. दरम्याच्या रुग्णांनी जास्त त्रास होत असल्यास तत्काळ डॉक्टरचा सल्ला घ्यावा. त्याचप्रमाणे गरम पाण्यात वावडींग टाकून प्यावे, असे आवाहन वैद्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत साहित्य संमेलनाध्यक्षपदी लहवितकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

वारकरी साहित्य परिषद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानद्वारा आयोजित गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी भोर येथे होणाऱ्या ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येथील जगद्गुरू द्वाराचार्य ह. भ. प. डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांची निवड करण्यात आली आहे.

१५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान आयोजित या संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले असतील. या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. दिंडी सोहळ्याचा शुभारंभ पशूसंवर्धन, दुग्ध, मत्स्यविकास कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते होणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून डॉ. रामकृष्ण लहवितकर हे संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. यावेळी महाराष्ट्रातील संत परंपरा, संत साहित्याची सामाजिक फलश्रुती आदी विषयांवर परिसंवाद होणार आहे. खुली भजन स्पर्धादेखील पार पडणार आहे. शुक्रवार दि. १६ रोजी 'संत साहित्यात स्त्री संतांची भूमिका', 'झाडीपट्टी रंगभूमीची संतांवरील नाट्यसंपदा व सामाजिक समता', 'विदर्भातील संतांची सामाजिक जागृती' आदी विषयांवर परिसंवाद होणार आहे. शनिवार दि. १७ रोजी बापूसाहेब महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन सांगता होणार आहे. समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कारांचे वितरण

यावेळी उपस्थितांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना 'वारकरी विठ्ठल' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, त्यांच्या संस्थेचे सरचिटणीस जनार्दन बोथे हा पुरस्कार स्वीकारणार आहे. यासोबत संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी बापूसाहेब देशमुख यांना जीवनगौरव, विशेष कार्य पुरस्कार ह. भ. प. बाबा महाराज राशनकर, ह. भ. प. माधव महाराज शिवणीकर यांना देण्यात येणार आहे. सामाजिक व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देण्यात येणारा पहिला संत चोखामेळा पुरस्कार सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना ५१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या संमेलनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बार्टी, पुणे व जिल्हा नियोजन मंडळ, गोंदिया यांचा विशेष सहभाग असणार आहे.





--

PRASHANT

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोक अदालतीत ६६ हजार खटले

$
0
0

दाखलपूर्व तब्बल ६० हजार खटल्यांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत शनिवार (दि.१०) राष्ट्रीय लोक अदालतीअंतर्गत लोक अदालत होणार आहे. यात दाखलपूर्व ६० हजार तर न्यायालयात दाखल सहा हजार ५०० अशी एकूण ६६ हजाराहून अधिक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहे. यातील अधिकाधिक प्रकरणांचा निपटारा लोकअदालतीत होईल, असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे आणि विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांनी व्यक्त केला.

मागील वर्षभरापासून लोक अदालत चळवळ व्यापक होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी झालेल्या लोकअदालतीत विक्रमी खटल्यांमध्ये तडजोडी होऊन कोर्टावरील अतिरिक्त ताण कमी करण्यात यश मिळाले. आता शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लोकअदालतीतही कोर्टात दाखल सहा हजार ५०० प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यात तीन हजार २०० प्रकरणे फौजदारी स्वरूपाची आहेत. तसेच धनादेश बँकेत न वटता परत आल्याची एक हजार ३४३, विविध बँकाचे २८१ दावे, मोटार अपघाताची २०० प्रकरणे, कौटुंबिक वादाची ४२५ प्रकरणे, दिवाणी स्वरूपाची ८२० आणि अन्य प्रकरणांचाही यात समावेश आहे. त्यामध्ये ७९६ फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटता परत आल्याबद्दल ३३४ प्रकरणे, विविध बँकाचे १५ दावे, मोटार अपघाताची २०० प्रकरणे, कौटुंबिक वादाची ९० आणि दिवाणी स्वरूपाची १९० अशा एक हजार ६०० दाव्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील विविध न्यायालयातील दाखलपूर्व अशी ६० हजार प्रकरणे लोकअदालतीत निवाड्यासाठी ठेवली जाणार आहेत. त्यात नाशिकमधील २२ हजार प्रकरणांचा समावेश आहे.

विनाविलंब न्यायासाठी आयोजन

विनाविलंब न्याय मिळवण्याच्या दृष्टीकोनातून तसेच दोन्ही बाजूंच्या परस्पर समन्वयामुळे लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. भविष्यातील आर्थिक व मानसिक कटकटींपासून सुटका होत असल्याने अधिकाधिक पक्षकारांनी लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन न्यायाधीश शिंदे तसेच सचिव बुक्के यांनी केले आहे.

दाखल खटल्यांचे स्वरुप
न्यायदाखल प्रकरणे : ६,५००
फौजदारी खटले : ३,२००
धनादेश बँकेत न वटणे : १,३४३
विविध बँकाचे दावे : २८१
मोटार अपघात प्रकरणे : २००
कौटुंबिक वाद : ४२५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गण गण गणात बोतेचा गजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीसंत गजानन महाराजांचा १४० वा प्रकटदिन शहरात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला. यावेळी विविध ठिकाणी महाप्रसाद व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक शहरातील श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीने श्री यशवंतराव महाराज पटांगण येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी लोणार गल्ली येथे श्रींच्या रजत मुखवट्यांचे पूजन करण्यात येऊन शहराच्या विविध भागातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता गंगाघाटावर करण्यात आली. या पालखी सोहळ्यात पुरुष, महिला, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चित्ररथदेखील काढण्यात आला. गंगाघाटावर पालखी येताच श्रींच्या मुखवट्याला महाभिषेक घालण्यात येऊन महाआरती करण्यात आली. दुपारी १ ते रात्री १० पर्यत ९०० किलो बाजरीच्या भाकरी, पिठले, रवा, ठेचा अशा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारनंतर संस्कृती महिला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर नाशिक शहरातील विविध मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला यात ना. द. जोशी, कविता बोंडे, वसुधा परांजपे, त्र्यंबकराव गायकवाड, सुभाष खर्डेकर यांना गौरविण्यात आले. गजानन महाराज विजय ग्रंथातील भाषा सौंदर्य शास्त्र या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. याचा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला. मिलिंद धटिंगण यांनी गायलेल्या गजानन बावन्नीच्या सीडीचे प्रकाश करण्यात आले. संध्याकाळी ह. भ. प. दामोदर गावले महाराज यांचे कीर्तन सादर झाले. नरेंद्र पुजारी यांनी अभंगवाणी सादर केली. रात्री ९ वाजता महाआरती होऊन अन्नकोट प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा सोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी भक्तांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅपी स्ट्रीट’ची धमाल आता गोविंदनगरला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनोरंजनाची सफर कॉलेजरोडवर नाशिककरांना घडविल्यानंतर आता 'महाराष्ट्र टाइम्स'चा 'हॅपी स्ट्रीट' उपक्रम गोविंदनगरसोबत धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. या रविवारी (दि. ११) गोविंदनगर येथे सकाळी ७ वाजता हॅपी स्ट्रीट सिझन ४मधील दुसरे पर्व माता जिजाऊ मार्ग या ठिकाणी नाशिककरांची सकाळ हॅपी करणार आहे. झुम्बा, स्केटींग, गाणी, खेळ आदींची गंमत एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी यामुळे गोविंदनगर येथील रहिवाशांना मिळणार आहे.

रोजची धावपळीतील सकाळ 'हॅपी स्ट्रीट'मुळे निवांत तर होतेच शिवाय संपूर्ण आठवडाभर काम करण्यासाठी नवा उत्साहही देते. एरवी वाहनांनी गजबजलेला रस्ता हॅपी स्ट्रीटच्या निमित्तानेच आनंददायी होतो. झुम्बाच्या माध्यमातून ताल धरणारी तरुणाई, आबालवृद्धांकडून राबविले जात असलेले उपक्रम वातावरणात उत्साहाचे रंग भरतात. याच रंगांनी कॉलेजरोडवर हॅपी स्ट्रीटची धमाकेदार सुरुवात झाली. स्केटींग, डान्स, गाणी, वाद्यवादन, जिम्नॅस्टीक्स, सापशिडी, कॅलिग्राफी, रांगोळी, पेंटिंग्ज अशा कितीतरी गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी हॅपी स्ट्रीटच्या माध्यमातून अनुभवता आली. याची पुरेपूर मजा लुटण्यासाठी नाशिककरांनी कॉलेजरोड हॅपी स्ट्रीटवर तुफान गर्दी केली होती. आता ही संधी गोविंदनगर भागातील रहिवाशांना मिळणार असून सकाळी ७ वाजेपासून ९.३० वाजेपर्यंतच्या अडीच तासात रस्ता केवळ तुमचाच असणार आहे. तुम्हालाही कोणती कला सादर करायची असेल तर ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधा.

अभिनेता अंशुमन विचारे येणार

यावर्षी हॅपी स्ट्रीट आणखी मजेदार बनविण्यासाठी अभिनेता अंशुमन विचारे यांची सोबत असणार आहे. कॉलेजरोडवर आपल्या विनोदांनी नाशिककरांना हसवल्यानंतर गोविंदनगरमध्येही अंशुमन धम्माल उडवून देणार आहे. हॅपी स्ट्रीटचा संपूर्ण अडीच तास अंशुमन तुमच्या सोबत असणार असून त्यांच्याबरोबर विविध उपक्रमात सहभागही घेता येणार आहे.

सोसायट्यांसाठी स्पर्धा

हॅपी स्ट्रीट ज्या रस्त्यावर होत आहे त्या परिसरातील सोसायट्यांसाठी अनोखी स्पर्धा यावेळी घेण्यात येणार आहे. सोसायटीची स्वच्छता करतानाचे फोटो 'मटा सिटीझन रिपोर्टर' या अॅपवर पाठवायचे आहेत. हॅपी स्ट्रीट दरम्यान या सोसायच्यांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना विविध बक्षीसेही दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण रोखणार फ्रॅन्चायजीद्वारे वीज हानी

$
0
0

महावितरणने मागविले प्रस्ताव; मालेगावसह ग्रामीणचा समावेश

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महावितरणच्या नाशिक परिमंडळात विजेची सर्वाधिक वितरण व वाणिज्यिक हानी मालेगाव शहर व परिसरात होते. यावर सातत्याने प्रयत्न करूनही वीज हानी रोखण्यात महावितरणला यश मिळालेले नाही. परिणामी महावितरणने परिसरात वीजपुरवठा व वसुलीसाठी प्रस्ताव मागविले आहेत.

मालेगाव शहरातील तीन उपविभाग व ग्रामीण उपविभागातील काही भाग याठिकाणी फ्रॅन्चायजी नियुक्तीबाबत महावितरणच्या मुख्य कार्यालयाने २० फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत. मालेगाव विभागात वीजवितरण व वाणिज्यिक हानी सर्वाधिक आहे. तेथे फ्रॅन्चायजी नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०१६ या काळात मालेगाव विभागात वितरण हानी ३९.४९ टक्के व वाणिज्यिक हानी ५०.५९ टक्के होती. तर त्यानंतर एप्रिल २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या काळात मालेगाव विभागात वितरण हानी ४१.२६ टक्के व वाणिज्यिक हानी ४९.७२ टक्क्यांवर आली.

मालेगाव विभागात घरगुती, वाणिज्यिक व व्यावसायिक या लघुदाब ग्राहकांची संख्या २ लाख ३ हजार २११ तर औद्योगिक उच्चदाब ग्राहकांची संख्या ७५ आहे. डिसेंबर २०१८ मध्ये या ग्राहकांनी वापरलेल्या ५५.६७ दशलक्ष युनिट वीजपोटी २५ कोटी २० लाख रुपयांची बिले देण्यात आली. पूर्वीच्या थकबाकीसह २६ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा ग्राहकांनी केला. तर ३०७ कोटी ६४ लाख रुपयांची वीजबिले अजूनही थकीत आहेत. डिसेंबर २०१७ अखेर ५२ हजार ४९९ घरगुती, वाणिज्यिक व व्यावसायिक ग्राहकांकडे १८ कोटी २५ लाख रुपयांची चालू वीजबिले थकीत होती.

भिवंडी पॅटर्न राबविणार

फ्रॅन्चायजी म्हणजे खासगीकरण नव्हे; तर फ्रॅन्चायजी ही महावितरणचे प्रतिनिधी म्हणूनच काम करते. वितरण व वाणिज्य हानी कमी झाल्यास भारनियमनाचा कालावधी कमी होणार, परिणामी ग्राहकांना लाभ होईल. यापूर्वी फ्रॅन्चायजी दिलेल्या ठिकाणी वितरण व वाणिज्य हानी घटून ग्राहकांना लाभ झाल्याचे भिवंडी येथील उदाहरण आहे. महावितरण प्रमाणेच फ्रॅन्चायजीमध्ये ग्राहकांचे हक्क अबाधित राहतील. मालेगावशी साधर्म्य असलेल्या भिवंडी येथे असा प्रयोग यशस्वी ठरून वीज ग्राहकांना लाभ झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजमाध्यमांमुळे भाषेच्या कक्षा रुंदावल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

संवाद ही माणसाची भावनिक गरज असून आज माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्यामुळे जग एक खेडे झाले. त्यामुळे समाज माध्यमाच्या मदतीने भाषेचा विस्तार जगभर होताना दिसत असून, त्यातून संवादाच्या कक्षा रुंदावल्या आहेत, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले.

तालुक्यातील रावळगाव कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज व पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत रावळगाव कॉलेजमध्ये दोन दिवशीय मराठी, हिंदी व इंग्रजी या विषयांचे 'भारतीय साहित्यावर जागतिकीकरणाचा परिणाम' या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन मंगळवारी झाले. उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. धोंडगे बोलत होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण येवले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाघ, प्राचार्य डॉ. बापूराव तर चर्चासत्राच्या स्वागताध्यक्षपदी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. गौतम निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी 'भारतीय साहित्यावर जागतिकीकरणाचा परिणाम' या विषयावरील शोधनिबंध पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकामध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी या विषयातील पन्नास पेक्षा जास्त शोध निबंधाचे प्रकाशन करण्यात आले आहे. चर्चासत्राचे प्रस्ताविक समन्वयक शरद अंबेकर यांनी केले. एन. एल. सोनवणे, अंबादास पाचंगे, भारत आहेर, विष्णू बोरसे, जयवंत अहिरे, पी. एस. बच्छाव, आर. पी. काचवे, व्ही. एन. पवार यांच्यासह प्राध्यापक व संशोधक विद्यार्थांची उपस्थिती होती.

तिन्ही भाषांवर निबंध वाचन

चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात 'जागतिकीकरण आणि मराठी भाषा' या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. किरण गंगापूरकर होते. या सत्रात प्रा. डॉ. भारती कापडणीस व प्रा. ए. जी. यांनी शोधनिबंधाचे वाचन केले. तर तिसरे सत्र 'भूमंडलीकरण और हिंदी साहित्य' या विषयावरील झाले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अनिता नेरे तर निबंध वाचक प्रा. व्ही. डी. सूर्यवंशी हे होते. चौथ्या सत्रात 'इंग्रजी साहित्यावरील जागतिकीकरणाचा परिणाम' या विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. वैभव सबनीस होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी गळतीने रस्त्यांची दुरवस्था

$
0
0

एमआयडीसीत पाण्याची नासाडी; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनीला गळती लागली आहे. यामुळे रोजच शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याने एमआयडीसीतील पाण्याची नासाडी होत आहे. त्याचा फटका येथील रस्त्यांना बसत असून, रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे

एमआयडीसीतील पिण्याच्या पाइपलाइनीतून पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने येथील विविध ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या समस्येबाबत एमआयडीसीचे अधिकारी कधी लक्ष देणार असा सवाल उद्योजक व कामगारांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, एमआयडीसीने नव्याने निर्माण केलेला आयटी पार्कच्या रस्त्यांवरूनच पाणी वाहत असल्याने एमआयडीसी दुरूस्तीचे काम कधी हाती घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

उद्योजकांनी अनेकदा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची समस्या एमआयडीसीकडे मांडली होती. यानंतर आनंदवली गावातील पंपिग स्टेशन बंद करत एमआयडीसीने गंगापूर धरणातून थेट पाइपलाइन टाकत कारखान्यांसाठी मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला होता. मुबलक पाणीपुरवठा कारखान्यांना मिळत असतानाही ही पाणी गळतीची मोठी समस्या या भागात भेडसावत आहे.

पाणीगळती रोखणार कोण?

पाण्याच्या पाइपलाइनीला लागलेल्या पाणी गळतीबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असतानादेखील पाणीगळती रोखणार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाणी गळतीने अंबड एमआयडीसीतील आयटी पार्कचे रस्तेही नादुरूस्त झाले आहेत. रोजच हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक झाले आहे.


पिण्याचे पाणी अनमोल असताना अंबड एमआयडीसीत हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. त्यामुळे एमआयडीसीतील अधिकारी पाणीगळती कधी रोखणार, असा प्रश्न पडतो. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष देण्याची गरज आहे.

-राकेश पवार, कामगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images