Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कांदा दरात ६०० रुपयांची घसरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा निफाड

केंद्र सरकारने कांदा निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर लासलगावसह जिल्ह्यात कांदा बाजार आवारावर आलेली तेजी पुन्हा आवक वाढ झाल्याने ओसरली आहे. लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलावात बुधवारी सकाळी सत्रात लिलाव सुरू होताच वेगाने घसरण झाली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सहाशे रुपयांनी घसरण झाली. कांदा भाव पुन्हा गडगडल्यामुळे लिलावासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

मंगळवारच्या तुलनेत बुधवारी किमान भावात दीडशे तर कमाल भावात ६०० रुपये व सरासरी भावात ४५० रुपयांची प्रतिक्विंटल मागे घसरण झाली. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ८०० वाहनातील कांद्याचा लिलाव झाला. बुधवारी कांदा किमान १००० तर कमाल २१२० व सरासरी १८०० या भावाने विक्री झाला. मंगळवारी लासलगाव येथे दिवसभरात १८ हजार ९९० क्विंटल आवक झाली. तर बाजारभाव प्रती क्विंटल किमान ८०१ कमाल २१२० सरासरी १७५१ रुपये होते.

पिंपळगाव बाजार समितीतही कांद्याची ६०० रुपयांची घसरण झाली. एकूण आवक १७ हजार १५० क्विंटल होती. किमान भाव १३००, कमाल २३०० तर सरासरी १८०० रुपये प्रति क्विंटल असा भाव होता. केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य शून्य करताच कांद्याच्या दरात वाढ झाली होती. त्याचे परिणाम नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये पहायला मिळाले. केंद्र सरकारने निर्यातमूल्य शून्य करताच कोसळणाऱ्या कांद्याच्या भावाला ब्रेक लागला होता.

आवक वाढली

जिल्ह्यातल्या पिंपळगाव, लासलगाव, उमराणा, चांदवड, दिंडोरी या सर्वच बाजारसमित्यांमध्ये मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जवळपास ६०० रुपयांची घसरण झाली. भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी शिल्लक असलेला कांदा लिलावसाठी आणायला सुरुवात केल्याने आवक वाढली होती. बुधवारी १६०० ते १८०० रुपये सरासरी भाव होता.

यामुळे उतरले कांद्याचे भाव

कांदा निर्यातमूल्य शून्य केले असले तरी निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना बाहेरच्या देशातून सौदे मिळण्यासाठी किमान १५ दिवस लागणार आहेत. कांदा मागणी असलेल्या देशात या अगोदरच्या दिलेल्या ऑर्डर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय कांद्याला मागणी मिळणार नाही. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना जोपर्यंत कांद्याची मागणी मिळत नाही तोपर्यंत कांद्याचे बाजारभाव असेच राहतील, असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरांच्या ठरावाला प्रशासनाची केराची टोपली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
एलईडी फिटींग्जबाबत महासभेत महापौरांनी नगरसेवक निधीतील सर्व प्रस्ताव मंजूर करण्याचा ठराव केला असतानाही प्रशासनाकडून महासभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती डॉ.हेमलता पाटील यांनी केला आहे.नगरसेवकांचे सर्व प्रस्ताव फेटाळत आयुक्तांनी ईईएसएल कंपनीकडूनच एलईडी दिवे बसवण्याचा निर्णय घेत नगरसेवकांच्या प्रस्तावाना ब्रेक लावला आहे. त्यामुळे प्रशासन महापौरांचेही निर्णय जुमानत नसल्याचे सांगत, याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

शहरात एलईडी बसविण्यावरून सध्या वाद सुरू असतांनाच, प्रशासनाने नगरसेवक निधीच्या एलईडी दिव्यांनाही ब्रेक लावला आहे. त्यावरून वातावरण तापले आहे.

१० जानेवारी २०१८ रोजी झालेल्या महासभेत स्मार्ट लाईटिंगचा आयुक्तांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. नगरसेवकांनी आपल्या निधीतून एलईडी दिवे बसवण्याचे जे प्रस्ताव दिले असतील ते सर्व प्रस्ताव ग्राह्य धरून महापौरांनी आयुक्तांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या कामकाजाचे रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे. स्वत: आयुक्तही या बैठकीला उपस्थित होते. परंतु, महिनाभरातच प्रशासनाने घूमजाव करत सदस्यांनी एलईडीसंबंधीचे दिलेले प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या नगरसेवकांनी आपल्या निधीतून एलईडी फिटींग्ज बसविण्यासाठी १२ कोटी ८७ लाख ८ हजार रुपये खर्चाची ११५ कामे दिलेली आहेत. परंतु, प्रशासनाने महापौरांच्या ठरावालाच वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. महापालिकेचे कामकाज नियमानुसार चालत नसेल तर न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टात लवकरच हास्य योग क्लब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक जिल्हा न्यायालयात लवकरच हास्य योग क्लबची स्थापना करण्याची घोषणा नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी केली.

आनंद हास्य योग क्लब व नाशिक बार असोसिएशनतर्फे नाशिकच्या कोर्टात हास्य योग प्रात्यक्षिके व मार्गदर्शनाचा कार्यक्रम नुकताच झाला. त्यावेळी अॅड. ठाकरे बोलत होते. जिल्हा सरकारी वकील अॅड. अजय मिसर, आनंद हास्य योग क्लबचे अध्यक्ष अॅड. वसंतराव पेखळे, रवींद्र जाधव, डी. जी. पाटील, सतीश अहिरराव, श्याम बोरकर, अॅड. बबन मुठाळ, बार असोसिएशनचे पदाधिकारी शामला दीक्षित, शरद गायधनी, हर्षल केंगे, महेश लोहिते, शरद मोगल, कमलेश पाळेकर आदी उपस्थित होते.

अॅड. ठाकरे म्हणाले, की वकील हे दिवसभर कोर्टाच्या कामात व्यस्त असतात. त्यांना मानसिक व शारीरिक थकवा येतो. सायंकाळी किमान अर्धा तास हास्य योग केला तर त्यांना ताजेतवाने वाटू शकेल. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी त्याचा फायदा होईल. दरम्यान यावेळी जिल्हा सरकारी वकील अॅड. मिसर यांचेही भाषण झाले. अॅड. संजय गिते यांनी सूत्रसंचलन केले.

हास्य योगाचे प्रात्यक्षिक

आनंद हास्य योग क्लबचे अध्यक्ष अॅड. वसंतराव पेखळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हास्याचे विविध प्रकार सादर केले. नमस्ते लाफ्टर, लायन लाफ्टर, टेन्शन रिलिज लाफ्टर यासारखे विविध हास्य प्रकार सादर करतानाच यापासून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी कसा फायदा होतो, याची माहिती दिली. वकील वर्गाने हास्य प्रकारात सहभाग घेऊन हास्याचा आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपशकुनी खुर्ची नको रे बाबा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बरखास्तीला हायकोर्टाने स्थगिती दिल्यानंतर बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी शुक्रवारी दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा पदभार घेऊन नव्याने कामकाजाला सुरुवात केली. गुरुवारच्या मुहुर्तावर अध्यक्षांसह संचालक मंडळाने सूत्रे हाती घेत, कामकाजाला सुरqवात केली. आपणास दुसऱ्यांदा संधी मिळाल्याचे सांगत, कर्जवसुलीचे आव्हान पेलणार असल्याचे त्यांनी सूत्रे घेताना स्पष्ट केले. परंतु दुसऱ्यांदा सूत्रे घेताना आहेर यांनी खबरदारी म्हणून अल्पकाळ ठरलेली अपशकुनी खुर्ची बदलून टाकत, साध्या खुर्चीतून दुसऱ्या इंनिगला सुरुवात केली आहे.

रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशांनुसार राज्याच्या सहकार आयुक्तांनी गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी आर्थिक अनियमितता प्रकरणी नाशिक जिल्हा बॅँकेवर बरखास्तीची कारवाई केली होती. जिल्हा बँकेत प्रथमच भाजपचा अध्यक्ष होत असताना झालेल्या या कारवाईने संचालक मंडळही आवाक् झाले होते. आरबीआयची कारवाई असल्याने सरकारने यात हस्तक्षेप न करता, संचालक मंडळाला हायकोर्टात धाव घेण्याची अनुकूल स्थिती निर्माण करून दिली होती. त्यामुळे संचालकांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. यात सहकार खात्याच्या बॅँक बरखास्तीच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. संचालकांना बॅँकेचे नियमित कामकाज पाहण्याची मुभा दिली होती. आदेशाची प्रत आल्यानंतर अध्यक्ष आहेर यांच्यासह संचालकांनी दुसऱ्यांदा सूत्रे स्वीकारण्यासाठी गुरुवारचा मुहूर्त निवडला. गुरूवारी अध्यक्ष केदा आहेर यांनी बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांच्याकडे हायकोर्टाच्या आदेशाची प्रत सादर करून अध्यक्षपदाची सूत्रे दुसऱ्यांदा स्वीकारली. यावेळी आमदार सीमा हिरे, माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, डॉ. शोभा बच्छाव, किशोर दराडे, परवेज कोकणी, दिलीप बनकर, धनंजय पवार, शिरीष कोतवाल हे संचालक उपस्थित होते. यावेळी बाहेर फटाक्यांची आतषबाजीही आहेरसमर्थकांकडून करण्यात आली. पदभार घेताच आहेर यांनी बँकेचे खातेप्रमुख व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कर्तवसुलीला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या.

जुन्या खुर्चीचा त्याग

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे प्रथमच थेट केदा आहेर यांच्या रुपाने भाजपकडे पहिल्यांदाच आली होती. परंतु, आठवडाभरातच बँकेवर बरखास्तीची कारवाई झाल्याने त्यांचे अध्यक्षपद अल्पकाळ ठरले होते. परंतु राज्य सरकारच्या दिलदारपणामुळे आणि हायकोर्टाच्या आदेशामुळे त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची खुर्ची मिळाली. त्यामुळे आधीच्या खुर्चीचा अपशकुन समजून आहेर यांनी दुसऱ्यांदा सूत्रे घेताना जुन्या खुर्चीचा त्याग केला. पदभार घेताना त्यांनी अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळातील खुर्ची हटवून साध्या खुर्चीवर बसून कामकाजाला सुरुवात केली. पहिली खुर्ची अपशकुनी ठरू नये साठी त्यांनी खबरदारी घेतल्याची चर्चा बँक वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली.

अध्यक्ष म्हणून काम करण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. त्यामुळे बँकेला उर्जितावस्था आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून, कर्जवसुलीला प्राधान्य देणार आहे. सर्वसामान्य सभासदांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचा प्रयत्न केला जाईल. थकबाकीदारांवर कारवाईला सुरुवात करणार आहोत.

- केदा आहेर, अध्यक्ष, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवबाभळी’ची गाथा महाराष्ट्राने तारली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी नाटकाला औदासिन्याची कळा लागलेली असताना आणि मल्टिप्लेक्सच्या जमान्यात नाटकापेक्षा चित्रपटांकडे प्रेक्षकांचा अधिक कल असताना नाशिकच्या मातीत रूजलेले, वाढलेले 'संगीत देवबाभळी' नाटक रंगभूमीवर आल्याने मराठी रंगभूमीवर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'संगीत देवबाभळी' बघितलेल्या रसिकांच्या भरभरून प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत.

मूलत: नाशिकच्या अश्वमेध थिएटर्सचे आणि आता भद्रकाली प्रॉडक्शनची निर्मिती असलेले 'संगीत देवबाभळी' या प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित आणि आनंद ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या नाटकाने अल्पावधीतच नाट्यरसिकांना मोहिनी घातली आहे. अनेक साहित्यिक, समीक्षक आणि चित्रनाट्यसृष्टीतले दिग्गज तारे-तारकाही या नाटकाबद्दल फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

'ज्ञानपीठ'प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनीही नाटकाचे कौतुक केले. अनेक वर्ष आपल्या मूळ परंपरेपासून नाटक तुटल्यासारखे वाटत होते. परंतु, या नाटकाने ते पुन्हा केंद्रस्थानी आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नाट्यलेखक शफाअत खान यांनी मराठी नाटक म्हणजे काय असे कुणी अमराठी माणसाने विचारले तर हे नाटक दाखवावे असे 'श्रीमंत मराठी नाटक' या शब्दात या नाटकाला गौरवले. गेली अनेक वर्ष नाटकांवर उत्तमतेच्या कसोटीवर मुल्यमापन करणारे ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी तर चक्क एक छोटेखानी पत्र लिहिले आहे. ज्यात 'हे नाटक नसून साक्षात्कार आहे' असे म्हटले आहे. आता वयोमानाने आणि नुकत्याच झालेल्या ऑपरेशनने थकलेल्या नाडकर्णींनी पत्रात असेही लिहिले आहे की 'या नाटकाने माझे आयुष्य आणि जगण्याची उमेद वाढवली आहे'. ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांनीही 'सर्व बाजूंनी परिपूर्ण असं नाटक, स्त्री जन्माची कित्येक युगांची कहाणी' पाहिल्याचे समाधान व्यक्त केले. ज्येष्ठ नाटककार राजीव नाईक यांनी हे नाटक एक अलौकिक त्रिवेणी संगम आणि रंगभूमीवर घडलेली दुर्मिळ अविष्कार म्हणून देवबाभळीचा गौरव केला आहे. लोकप्रिय संगीतकार सलिल कुलकर्णी यांनी तर नाटकाच्या चमूसोबत फेसबुक लाइव्ह जाऊन हे नाटक एक अलौकिक अनुभव असल्याचे नमूद करत सगळ्यांना हे नाटक बघण्याचे आमंत्रणच दिले आहे.

सिनेनाट्य जगतातील अनेक मान्यवरही व्यक्त होताना दिसत आहेत. सुवर्णकमळ विजेत्या 'कासव' सिनेमाच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी 'सर्व बाजूंनी सुंदर असे वरच्या दर्जाचे नाटक आहे' असे नमूद केले आहे. आघाडीची अभिनेत्री अमृता सुभाष यांनी तर 'मी सगळ्यांना हात लावून पाहिला की सगळे खरे आहेत की नाही. कारण हे नाटक म्हणजे रंगमंचावरचा चमत्कार वाटतो' असे भरभरुन कौतुक केले आहे. 'भारतीय रंगभूमीवर एक अलौकिक घटना घडलेली आहे असे मी नमूद करतो' या शब्दात लेखक संदेश कुलकर्णींनी या नाटकाची पाठ थोपटली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी 'काहीतरी अद्वितीय दुर्मिळ बघितल्याचं समाधान मिळाल्याचे नमूद करत असे जीवनानुभव देणारे अंतर्मनाला ढवळून आपले अस्तित्व उजळून टाकणारा हा अनुभव होता' असे मत व्यक्त केले. अभिनेते सयाजी शिंदे यांनी 'सर्वार्थाने समृद्ध करणारे अभ्यासपूर्ण नाटक, परंपरेला शोभणारे आणि पुढे नेणारे" अशा शब्दात नाटकाबद्दल कौतुक व्यक्त केले. 'अनाथांची माई' सिंधूताई तर 'हे नाटक तुम्हाला आतून बाहेरुन स्वच्छ करुन टाकेल' अशी ग्वाहीच दिली आहे.

आजचे आघाडीचे अनेक अभिनेते सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले, चिन्मय मांडलेकर आदी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना 'हे नाटक नसून चमत्कार आहे. अनेक वेळा पहावेसे वाटणारे असा परिपूर्ण नाट्यानुभव असल्याचे सांगितले आहे.

स्थानिक वर्तुळात आनंदाचे वातावरण

नुकत्याच दाखल झालेल्या या नाटकाने अल्पावधीतच नाट्यरसिकांबरोबरच अनेक मान्यवर आणि तारेतारकांना भुरळ घातल्याचे दिसत आहे. अत्यंत वेगळं आशयघन कथानक, दर्जेदार दिग्दर्शन, कर्णमधूर संगीत, डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रकाशयोजना, प्रत्यक्षतेची प्रचिती देणारे नेपथ्य आणि कसदार गाणं आणि अभिनय करणारे कलावंत आणि या सगळ्यांना एकत्रित बांधणारे, उत्तम निर्मितीमूल्य असलेली भद्रकाली ही नाट्यसंस्था असे सगळे जुळून आलेल्या या 'संगीत देवबाभळी' नाटकामुळे मराठी रंगभूमीवर चैतन्याचे वातावरण झाले आहे. स्थानिक नाट्यवर्तुळात देखील आपल्या मातीतल्या कसदार नाटकाच्या या वारेमाप कौतुकाची चर्चा आणि समाधान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, बनवू या पेपर बॅग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम ठाऊक असूनही अनेकांकडून प्लास्टिक बॅगचाच वापर होतो. पण, त्याला पर्याय म्हणून आता पेपर बॅगकडे पहिले जात आहे. ही पेपर बॅग स्टायलिश, डिझायनर असली, तर गोष्टच वेगळी. त्यासाठीच 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'तर्फे येत्या मंगळवारी (दि. १३ फेब्रुवारी) डिझायनर पेपर बॅग मेकिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.

आज सगळीकडे प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आपण पाहतोय. दैनंदिन आयुष्यातसुद्धा प्लास्टिकला पर्याय आहे की नाही, असा प्रश्न अनेक वेळा पडतो. प्लास्टिक कचरा, त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, या हेतूने सरकारनेसुद्धा प्लास्टिकवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर समाजमंदिर, कृषिनगर हौसिंग सोसायटी, कृषिनगर, कॉलेजरोड या ठिकाणी दुपारी ३ वाजता हे वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.

या वर्कशॉपमध्ये डिझायनर पेपर बॅग, डिझायनर पेपर कसे तयार करायचे, याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. नंदिनी रामचंदानी या डिझायनर पेपर बॅग कशी तयार करायची याचे मार्गदर्शन करणार आहेत. कल्चर क्लब मेंबरसाठी १०० रुपये, तर जे मेंबर नाहीत त्यांच्यासाठी वर्कशॉपची ३०० रुपये फी आकारण्यात येणार आहे. पेपर बॅग तयार करण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे ते साहित्य तुम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी मिळेल. मात्र, त्यासाठी १०० रुपये वेगळे चार्जेस द्यावे लागणार आहेत. ज्यांना या वर्कशॉपमध्ये सहभागी व्हायचे असेल अशांनी ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा सक्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे संपर्क साधावा. त्याचप्रमाणे क्लचर क्लबच्या ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्हॅलेंटाइन डे’ फीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेब्रुवारी महिना सुरू होताच तरुणाईला वेध लागतात ते १४ तारखेच्या व्हॅलेंटाइन डेचे. आपल्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट्स, गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस तरुणाईसाठी मोठ्या आकर्षणाचा असल्याने त्यादृष्टीने बाजारपेठाही सज्ज होत असतात. यंदाही तरुणाईला आकर्षित करतील असे गिफ्ट्स, ग्रीटिंग कार्ड्स, की-चेन्स, चॉकलेट्स, चॉकलेट बुके आदींनी बाजारपेठ सजली असून, हटके गिफ्ट्स घेण्याला तरुणाईकडून पसंती दिली जात आहे.

व्हॅलेंटाइन वीकचा प्रारंभ रोझ डेपासून झाला असून, व्हॅलेंटाइन डेपर्यंत हा वीक सेलिब्रेट केला जाणार आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हक्काचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे असे मानले जाते. अनेक जण प्रेम व्यक्त करण्यासाठी या स्पेशल डेची वाट बघत असतात. या दिवसाच्या आठवडाभरापूर्वीपासूनच व्हॅलेंटाइन वीकच्या माध्यमातून प्रेमाचा रंग तरुणाईवर चढत असतो. यंदादेखील हा उत्साह दिसून येत असून, कॉलेजियन्समध्ये याचा उत्साह अधिक आहे. रोझ डेने या वीकला सुरुवात झाल्यानंतर शहरातील तरुणांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबपुष्प देत या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गुरुवारी प्रपोज डे सेलिब्रेट करताना अनेक दिवसांपासून मनात ठेवलेल्या भावनांना शब्दांद्वारे वाट मोकळी करून देण्यात आली.

वीक डेज् असे...

शुक्रवार (दि. ९) चॉकलेट डे, शनिवार (दि. १०) टेडी डे, रविवार (दि. ११) प्रॉमिस डे, सोमवार (दि. १२) हग डे, मंगळवार (दि. १३) किस डे आणि बुधवारी (दि. १४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डे याप्रमाणे हा वीक सेलिब्रेट केला जाणार आहे.

चॉकलेट बुकेंची चलती

व्हॅलेंटाइन वीकअंतर्गत आज, शुक्रवारी (दि. ९) चॉकलेट डे सेलिब्रेट केला जाणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच आकर्षक पॅकिंगमधील चॉकलेटत्ची तरुणांकडून खरेदी केली जात होती. यात विशेषत: चॉकलेट बुके या प्रकाराला चांगली मागणी असल्याचे दिसून आले. हार्ट, टेडी शेपमधील चॉकलेट्सचा बुके विकत घेण्याला पसंती दिली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे मनपाच्या आवारात हाणामारी

$
0
0

वॉर्डातील समस्या मांडणाऱ्यास मारहाण

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महापालिकेत आपल्या वॉर्डातील नळ गळतीची तक्रार करणाऱ्या एका तरुणाला गुरुवारी (दि. ८) काँग्रेसचे नगरसेवक इस्माइल पठाण यांच्या मुलांनी आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केली. पोलिसांकडून वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणून नगरसेवक पुत्रांना ताब्यात घेतल आहे.

धुळे महापालिकेच्या आवारात गुरुवारी (दि. ८) ही हाणामारी झाल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. शहरातील देवपूरातील प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसचे नगरसेवक इस्माइल पठाण यांच्या भागातील रहिवासी तौसिफ खाटीक या तरुणाने आपल्या घराजवळील एका नादुरुस्त नळाच्या आणि पाणी गळतीचा व्हिडीओ सोशल मीडियावरून इतर नागरिकांपर्यत पसरविला. तसेच गुरुवारी (दि. ८) तो व्हिडीओ नगरसेवक इस्माइल पठाण यांच्या मोबाइलवर टाकण्यात आला. याबाबत तक्रारदार तौसिफ खाटीक यांनी पाणी गळतीवरून संताप व्यक्त करून पठाणांसोबत वाद घातला. त्याचवेळी पठाण यांच्या मुलांना हा प्रकार समजताच त्यांनी तौसिफ खाटीक यांना मारहाण करण्यात सुरुवात केली. यावेळी तत्काळ इतरांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला मात्र त्याचवेळी शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी दाखल होऊन त्यांनी तक्रारदार तौसिफ खाटीक व नगरसेवक इस्माइल पठाण यांच्या तीनही मुलांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी वाद घालणाऱ्यांना तंबी देऊन सोडून दिले.

कोट००
माझ्या प्रभागातील नागरिकांच्या सुविधांबाबत मी सदैव तत्पर असतो, मात्र नागरिकांनी तक्रारी थेट मला सांगायला हव्या. परंतु, त्यांनी सोशल मीडियावर समस्या मांडणे योग्य नाही, ती प्रत्यक्ष सांगितली तर मी लगेच समस्या मार्गी लावेल.
-इस्माइल पठाण, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिसरातील पाण्यावरच भागवा तहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येवला आणि बागलाण तालुक्याच्या काही भागात पाणी टंचाईची समस्या आतापासूनच जाणवत असून, स्थानिकांनी टँकरची मागणी केली आहे. त्यांची कैफियत समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याऐवजी प्रथम परिसरातील दोन किलोमीटर अंतरावरील पाणी असलेल्या विहिरींचा शोध घ्या असा अजब सल्ला जिल्हा प्रशासनाकडून दिला जाऊ लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

येवला तालुक्यातील पूर्वभाग आणि बागलाण तालुक्यातील दुर्गम भागामध्ये नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. गतवर्षी चांगला पाऊस होऊनही खडकाळ व मुरूमयुक्त जमिनीमुळे काही भागात पावसाचे पाणी जमिनीत मुरू शकलेले नाही. त्यामुळे अशा भागात पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे. विशेषत: येवला तालुक्यातील कोळम, कुसूमाडी, भारम, खैरगव्हाण, अहेरवाडी यांसारख्या काही गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. बागलाण तालुक्यातील गोराणे, खिरमाने, चौगाव पंचक्रोशीमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या ग्रामपंचायतींनी पाण्याच्या टॅँकरसाठी ठराव करून पंचायत समितीला सादर केला. त्या अनुषंगाने तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून पाणी टंचाईची खात्री केली. त्याबाबतचे प्रस्ताव गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले. टँकरची मागणी नोंदविण्यात आली. परंतु जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्यामुळे टँकर सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक नाही. टॅँकर मागणीच्या प्रस्तावांत त्रुटी काढून तो परत पाठविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. टॅँकर देण्यापूर्वी टंचाईग्रस्त गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील पाणी असलेल्या विहिरी शोधण्याचा सल्ला प्रशासनाने दिला असून त्यामुळे ग्रामस्थांसह तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांनाही अशा विहिरींची शोध घ्यावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्शवत शिवजन्मोत्सव सोहळ्याचा निर्धार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शिवजन्मोत्सव आदर्शवत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून शिवजन्मोत्सवात मद्य पिणार नाही आणि कुणाला पाजणार नाही, अशी शपथच पंचवटी शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आली. पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांना ही शपथ घ्यायला लावली.

बर्डेकर म्हणाले, की यावर्षीचा शिवजन्मोत्सव ज्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे, त्यातून चांगला संदेश पोहोचणार आहे. ज्या पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे, त्यातून खरा इतिहास वाचला जाऊ लागला आहे, याची जाणीव होत आहे.

सचिन पवार म्हणाले, की शिवजन्मोत्सव साजरा करताना कोणत्याही यंत्रणेवर ताण पडणार नाही, कुणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. देवांग जानी म्हणाले, की यंदाचा शिवजन्मोत्सव साजरा करताना ज्या गोष्टी करण्यात येणार आहेत, त्या केवळ तोंडी न सांगता त्या प्रसिद्ध केल्या आहेत, ही खरोखर गौरवास्पद बाब आहे.

कोणताही उत्सव साजरा करताना त्यात मद्य पिणाऱ्यांची संख्या जास्त असते. आदर्शवत शिवजन्मोत्सव साजरा करताना त्यात दारूला कुठेही थारा दिला जाणार नाही, याची दक्षता पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घ्यावी. त्यासाठी कुणीही मद्य पिणार नाही आणि कुणालाही पाजणार नाही, अशी शपथ यावेळी घेण्यात आली. सचिन डोंगरे, नंदूभाऊ पवार, पद्माकर पाटील, माधवी पाटील, किरण पानकर, डॉ. गिरीश मोहिते आदींनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हाभरात प्रबोधन

शिवजन्मोत्सवात या वर्षापासून वेगळा पायंडा पाडण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाभरात प्रबोधन करण्यात आले असून, शिवजन्मोत्सवासाठी कुणीही कुणाकडेही वर्गणी मागणार नाही. वर्गणीसाठी पावती पुस्तक छापण्यात येणार नाही, तसेच मिरवणुकीत डीजेही लावण्यात येणार नाही. रस्त्यावर स्टेज किंवा मंडप उभारण्यात येणार नूसन, सर्वांना सोबत घेऊन हा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती तुषार जगताप यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंचा दणका, अधिकाऱ्याला घरी पाठवले

$
0
0

नाशिक:

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. आज झालेल्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत साध्या ड्रेसवर आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला मुंढे यांनी बैठकीतून बाहेर काढले आणि त्यांना युनिफॉर्म घालून यायला सांगितले. मुंढे यांनी पहिल्याच दिवशी दिलेल्या या दणक्यामुळे पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

तुकाराम मुंढे यांनी आज नाशिक महापालिकेच्या सर्व प्रमुख अधिकारी आणि खाते प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीला अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजनही उपस्थित होते. मात्र महाजन हे अग्निशमन दलाचा ड्रेस परिधान न करता फॉर्मल ड्रेसवर आले होते. महाजन यांचं साध्या ड्रेसवर येणं मुंढे यांना खटकलं. त्यांनी महाजन यांना ड्रेस घालूनच बैठकीला यायला सांगितलं. त्यामुळे महाजन घरी गेले आणि अग्निशमन दलाचा ड्रेस परिधान करून आले.

मुंढे यानी सकाळीच महापालिकेत प्रवेश केला. बरोबर दहा वाजता तुकाराम मुंढे त्यांच्या दालनात हजर झाले होते. यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. आपल्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांनी संपूर्ण पालिका इमारतीची पाहणी केली. पालिकेतील विविध खात्यांच्या कार्यालयांची पाहणी करत असताना त्यांना नळातून पाणी टपकत असल्याचा आवाज आला आणि त्यांनी मगे वळत नळ तातडीने बंद करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. आज झालेल्या बैठकीत मुंढे यांनी शहरातील समस्या आणि प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.
62847761

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा बाजारभावाचा आलेख उंचावला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

लाल रांगडा कांदा बाजारभावात बुधवारी अचानक झालेल्या सातशे रुपयांच्या मोठ्या घसरणीनंतर शुक्रवारी कांद्याने उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.९) लाल कांद्याच्या किमान, कमाल दरात दोनशे, तर सरासरी दरात पावणेदोनशे रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले.

गेल्या आठवड्यापासून लाल रांगडा कांदा बाजारभावात पडझड होत होती. बुधवारी येवला बाजार समितीत अचानक तब्बल सातशे रुपयांची मोठी घसरण झाली होती. अचानक पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली होती. काही संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोरील राज्य महामार्गावर अचानक 'रास्ता रोको'चा पवित्रा घेतला होता. बुधवारी येवला बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान ६२५ ते कमाल १८७५ (सरासरी १६७५) असा दर मिळाला होता. त्यानंतर गुरुवारी देखील कांदा बाजारभावाने जवळपास बुधवारचेच पाढे गिरवल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील निराशा होती. गुरुवारी येवल्यात कांद्याला किमान ८०० ते कमाल १७९५ (सरासरी १६७५) असा दर मिळाला होता. शुक्रवारी मात्र कांदा बाजारभावाने उचल खाल्ल्याने शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी होण्यास मदत झाली. येवला मुख्य बाजार आवारात शुक्रवारी साडेचारशे ट्रॅक्टरमधून सुमारे १९ हजार क्विंटल कांदा आवक झाली. कांद्याला किमान १ हजार ते कमाल २ हजार (सरासरी १८५०) असा दर मिळाला. बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शुक्रवारी कांद्याला किमान १ हजार ते कमाल २ हजार ९० (सरासरी १८००) असा दर मिळाला. याठिकाणी जवळपास चारशे पिकअप रिक्षामधून ५ हजार क्विंटल कांदा आवक झाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी येवल्यात कांद्याला मिळालेला दर हा बुधवार व गुरुवारच्या तुलनेत सरासरी दोनशे रुपयांनी अधिक होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिकाराने चे स्नॅचरचा डाव उधळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नवीन आडगाव नाका परिसरातून रिक्षाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला पत्ता विचारण्याचा बहाणा करीत त्याला नादात ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचली. मात्र, त्या ज्येष्ठ नागरिकाने प्रतिकार करीत चैनस्नॅचरला काठीने मारल्याने त्याच्या हातून चैन खाली पडली. ते बघून त्या चैनस्नॅचरने पळ काढला. शुक्रवारी (दि. ९) सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. ज्येष्ठ नागरिकाने दाखविल्या धैर्य आणि प्रतिकाराचे परिसरात कौतुक होत आहे.

नवीन आडगाव नाका परिसरातील स्वामी नारायण नगर येथे राहणारे विश्वनाथ शंकरराव घुगे (वय ८१) हे शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घरून निघाले. त्यांना काळाराम मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. ते घरासमोर रिक्षाच्या प्रतीक्षेत उभे असताना त्यांना त्या परिसरात दुचाकीवर दोन तरुण चकरा मारीत असल्याचे दिसले. दोन-तीन चकरा मारल्यानंतर ते दोघे घुगे यांच्याजवळ आले, त्यांनी आम्ही फायनान्स कंपनीकडून आलो असून, शिंदे कुठे राहतात अशी विचारणा केली. त्यावर घुगे यांनी शिंदे याठिकाणी राहत असल्याची खूण सांगितली. त्यानंतर त्या तरुणांनी मागचा बंगला कुणाचा असे विचारले. यासाठी घुगे यांनी मागे वळून बघताच त्या संधीचा फायदा घेत दुचाकीवरच्या एकाने घुगे यांच्या गळ्यातील सात तोळे वजनाची सोन्याची चैन ओढली. घुगे यांच्या लक्षात येताच त्यांच्या हातात असलेल्या काठीने त्याला मारण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या हाताने दुचाकीचा हॅण्ड धरला, त्या झटापटीत संशयितांनी चोरलेली चैन खाली पडली. त्या संशयितांनी लगेच तेथून पळ काढला. या घटनेची माहिती आडगाव पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, आडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पूजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ण गणवेशात या!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढें यांच्या शिस्तबद्ध व काटेकोर स्वभावाचा पहिलाच झटका अग्निशमन दल विभागाचे प्रमुख अनिल महाजन यांना बसला आहे. खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीत उशिरा पोहोचलेल्या आणि अग्निशमन विभागाच्या गणवेशावर शोल्डर रँक कॅप नसलेल्या महाजन यांना मुंढे यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. बैठकीला पूर्ण गणवेशात येण्याचे फर्मान काढले. महाजन यांनी धावतपळत बाहेर येऊन आपल्या गाडीतून शोल्डर रँक कॅप व टोपी घालत पुन्हा बैठक गाठली. त्यामुळे महाजन यांना पहिल्याच दिवशी शिकवलेला शिस्तीचा धडा इतरांसाठी आता इशारा ठरला आहे.

आपल्या नेहमीच्या शैलीत वावरणाऱ्या अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढे वेळेत येणार नाहीत, अशी खात्री होती. परंतु, मुंढे यांनी दहाच्या ठोक्याला मुख्यालयात गाठत व पदभाराचे सोपस्कार गाठत खातेप्रमुखांच्या बैठकीचे फर्मान सोडले. त्यामुळे सवय नसलेल्या अधिकाऱ्यांनी धावत पळत आयुक्त कार्यालय गाठत बैठकीला पोहचण्याचा प्रयत्न केला. मुंढे पदभार घेत असतानाच काही अधिकाऱ्यांची प्रवेशाची तयारी सुरू होती. मुंढेंनी बैठक सुरू केली तरी काही अधिकारी येतच होते. पहिलाच दिवस असल्याने मुंढे यांनीही आस्तेकदम घेतले. परिचय सुरू असताना मुंढे यांनी महाजन यांना पहिला दणका दिला. महाजन अगोदरच उशीरा आल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. महाजन यांनी अग्निशमन विभागाचा गणवेश परिधान केला असला तरी त्यांच्या खांद्यावर शोल्डर रँक कॅप व डोक्यावर विभागाची टोपी नव्हती. त्यामुळे मुंढेंनी त्यांना झापत पूर्ण गणवेशाबाबत विचारणा केली. त्यांना बैठकीतून बाहेर जाण्याचे सांगत, पूर्ण गणवेश परिधान करून येण्याची सूचना केली. धास्तावलेल्या महाजन यांनीही धावतपळत आपले वाहन गाठत, त्यातून शोल्डरँक कॅप आणि टोपी काढत पूर्ण गणवेश परिधान केला. त्यानंतर पुन्हा बैठकीकडे धाव घेत आतमध्ये प्रवेश मिळवला. त्यामुळे महाजन यांना शिकवलेला शिस्तीचा धडा हा पहिल्याच दिवशी इतरांसाठी इशाराच ठरला आहे.

पदाधिकारी परतले

आयुक्त महापालिकेत दाखल झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी धावपळ सुरू केली होती. परंतु आयुक्त मुंढे यांनी प्रथम कामाला प्राधान्य देत, भेटीगाठी टाळल्या. मुंढे यांच्या स्वागतासाठी उपमहापौर प्रथमेश गिते आयुक्त कार्यालयात आले होते. परंतु तोपर्यंत आयुक्तांनी खातेप्रमुखांची बैठक सुरू केली. त्यामुळे गितेंना ताटकळत बसावे लागले. ही बैठक तब्बल अडीच तास चालल्याने उपमहापौरांना माघारी फिरावे लागले. स्वागतासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांना परतीचा रस्ता धरावा लागला. बैठकीनंतर आयुक्तांनी पदाधिकारी तसेच नगरसेवकांची भेट घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशांच्या वादातून चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैशांची मागणी करणाऱ्या संशयित आरोपीने तरुणावर चाकू हल्ला केला. ही घटना सिडकोतील कामटवाडा भागात घडली असून, या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिंबाजी रामभाऊ गोरनर (वय ३०, रा. श्रीकृष्णनगर, डीजीपीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी (दि. ८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गोरनर कामटवाडा येथील मीनाताई ठाकरे शाळेजवळून जात होते. यावेळी तिथे आलेल्या संशयित शाहरूख शेख तसेच त्याच्या एका साथीदाराने गोरनर यांना थांबवून पैशांची मागणी केली. गोरनर यांनी पैसे देण्यास नकार देताच संतप्त झालेल्या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर शाहरूखने आपल्या खिशातील छोटा धारदार चाकू काढून गोरनर यांच्या पोटावर वार केला. यात गोरनर जखमी झाले असून, अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

पर्समधून मंगळसूत्र चोरी

कारमध्ये ठेवलेल्या पर्समधील मंगळसुत्रावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील बिग बाझारजवळ घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण सत्यनारायणसिंग कुमार (रा. आईएसपी इस्टेट नाशिकरोड) यांनी तक्रार दिली आहे. प्रवीणकुमार आपल्या कुटुंबासह गुरुवारी (दि. ८) बिग बाझार येथे गेले होते. कुमार यांच्या पत्नी दिव्यासिंग यांच्या गळ्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र प्रवासात तुटल्याने त्यांनी ते काढून आपल्या पर्समध्ये ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या कारचा दरवाजा उघडून पर्समधील तुटलेले मंगळसूत्र चोरून नेले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

घरगुती गॅसचा वाहनासाठी वापर

घरगुती सिलिंडरमधून गॅस काढून वाहनासाठी वापर करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. संजय किसन पुरकर (रा. शिवनेरी बंगला, श्रमनगर) आणि संदीप दत्तात्रेय जोशी (रा.माधव अपार्ट. लोखंडे मळा) अशी कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. शिवनेरी बंगल्याच्या आवारात एका कारमध्ये (एमएच. १५ बीएन ९१२४) बेकायदा घरगुती सिलेंडरमधील गॅस पाईपद्वारे भरताना मिळून आले. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

संशयास्पद हालचालींवरून महिलेस अटक

महामार्ग बस स्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करीत असलेल्या एका ५२ वर्षाच्या महिलेस पोलिसांनी अटक केली. तिच्या ताब्यातून सुमारे १४ हजार रूपये किंमतीचे विविध कपडे पोलिसांनी हस्ततगत केले. यात साड्या ब्लाऊज पिस आणि परकर यांचा समावेश असून, हे नवीन कपडे चोरीचे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुगंधाबाई सूर्यभान मोकळ (५२, रा. मनमाड, ता. नांदगाव) असे संशयित महिलेचे नाव आहे. गुरुवारी (दि. ८) सकाळी ही महिला महामार्ग बस स्थानकात असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ संशयास्पद हालचाल करताना मिळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन झडती घेतली असता २१ साड्या, ६६ ब्लाऊजपीस, ७ परकर असा १४ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर महिलेने एखाद्या दुकानात चोरी केल्याचा पोलिसांना संशय असून, तिची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर कारवाई

पंचवटी कारंजावरील एका हॉटेलच्या तळमजल्यावर जुगार खेळणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक शंकर देशमुख (५६ रा. जाधव संकुल), मंगल रामा बोरसे (४८ रा. फुलेनगर, पेठ रोड), दिलीप हिरामण वानखेडे (३५ रा. येवलेकर चाळ, पंचवटी कारंजा) व वसंत रघुनाथ ससाणे (५२ रा.वाल्मीकनगर, पंचवटी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. पंचवटी कारंजा येथील साहेबा हॉटेल इमारतीच्या तळमजल्यावर गुरूवारी ही कारवाई करण्यात आली. घटनेचा अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.

मोर्चा आयोजकांवर गुन्हा

आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांसाठी विना परवानगी मोर्चा काढून जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सीआयटीयू संघटनेच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीधर देशपांडे, डॉ. डी. एल. कराड, संतोष काकडे, तानाजी जायभावे, सीताराम ठोंबरे आदीं प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विद्यान विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी गुरुवारी (दि. ८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सीआयटीयू या कामगार संघटनेच्यावतीने शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी आयोजकांनी मोर्चाची कुठलीही परवानगी घेतली नव्हती, तसेच पोलिस आयुक्तांनी जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेश जारी केलेली असतांना हा मोर्चा काढण्यात आल्याने या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राठोड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावांमध्ये आता जलसेवक

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक: 'जल है तो कल है' असे म्हटले जात असले तरी आपल्याकडे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उधळपट्टी होते. पाण्याचा अवाजवी वापर टाळता यावा आणि प्रत्येक थेंबाचा परिणामकारक उपयोग केला जावा, या जनजागृतीसाठी खेड्यापाड्यांत जलसेवक आणि जलकर्मींची नेमणूक केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात झाली असून, पाणी बचतीचा मूलमंत्र लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

'पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचविण्याचे करा प्रामाणिक प्रयत्न' यांसारख्या घोषवाक्यांद्वारे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचविण्याचे काम आजवर सातत्याने होत आले आहे. तरीही पाण्याची उधळपट्टी, जलप्रदूषणाचे प्रकार सातत्याने नजरेस पडतात. सर्वांना त्यांच्या गरजेनुसार पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचा अत्यंत काटकसरीने आणि नियोजनपूर्वक होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून जलसाक्षरतेवर भर दिला. त्यास जनतेचा चांगला प्रतिसादही मिळाला. याच अनुषंगाने पाणी बचतीवर यशदामध्ये जलसाक्षरता केंद्र तयार करण्यात आले असून, विभाग स्तरावर जलयोध्दांची निवडप्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यात तालुकास्तरावर जलनायक जलदूत निवड समिती गठीत करण्यात आली असून, जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी विभागाचे कृषी अधीक्षक, विभागीय जल साक्षरता केंद्रांचे प्रतिनिधी समितीचे सदस्य असून जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सदस्य सचिव आहेत. जलसाक्षरतेच्या कामाला गती देण्यासाठी नुकतेच या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यामध्ये तालुका आणि ग्रामीण स्तरावरही स्थानिकांच्या मदतीने जलसेवक आणि जलकर्मींचे पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडील सर्व्हेक्षणानुसार शोषित, अतिशोषित झोनमध्ये येणारी गावे, टँकरग्रस्त तसेच जलयुक्त शिवार योजनेत निवडण्यात आलेल्या गावांना जलसाक्षरतेच्या मोहिमेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. जलसाक्षरता आणि जलसंवर्धनाच्या कामात सक्रीय सहभाग देऊ शकतील, अशा सजग नागरिकांची यादी बनविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.

जलनायक, जलकर्मींचीही नियुक्ती

तालुका स्तरावर जलनायक, गाव स्तरावर जलसेवक आणि जलकर्मींच्या नियुक्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सरकारी सेवेत कार्यरत तसेच निवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांची जलकर्मी म्हणून निवड केली जाणार आहे. सरकारी यंत्रणेशी समन्वय साधणे, जलसेवक आणि तालुका स्तरावरील जलनायकांशी सुसंवाद ठेवणे आणि या मोहिमेचे रेकॉर्ड ठेवण्याचे काम जलकर्मी करणार आहेत. ग्रामसभेच्या सदस्याची जलसेवक म्हणून निवड केली जाणार असून, सिंचन व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढविणे, ग्रामस्थांना जलसाक्षरतेबाबत जागृत करणे, विद्यार्थ्यांमध्ये जलजागृतीबाबत प्रबोधनाचे काम जलसेवक करणार आहेत. ठरवून दिलेल्या निकषांनुसार तालुका आणि गावपातळीवर जलनायक, जलसेवक आणि जलकर्मी नेमण्याबाबतची कार्यवाही करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले असून, त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदाचा अर्थसंकल्प अर्थकारणाचे पुढचे पाऊल

$
0
0

एनएसडीएलचे चंद्रशेखर टिळक यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रगतीच्या दिशेने जाणारा पण काहीसा मध्येच थांबलेला, असा हा अर्थसंकल्प आहे. म्हणजेच गेली ४ वर्षे आपल्या देशात सुरू असलेल्या मोदी अर्थकारणाचे पुढचे पाऊल आहे, असे प्रतिपादन एनएसडीएलचे व्हाइस प्रेसिडेन्ट चंद्रशेखर टिळक यांनी केले. विस्डम एक्स्ट्रातर्फे नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्पेक्ट्रम इन्फ्रास्टकचे संचालक मेहुल देसाई हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर हे उपस्थित होते. या वेळी दीडशेहून अधिक उद्योजक उपस्थित होते.

वादळी चढउतार झालेले नाहीत

सर्व महत्त्वाच्या आर्थिक घोषणा अर्थसंकल्पाच्या बाहेर होण्याची परंपरा, याही अर्थसंकल्पाने कायम ठेवली आहे. ज्याप्रमाणे डिमोनोटायझेशन व जीएसटीचे निर्णय, आर्थिक वर्ष बदलण्याच्या घोषणेसहित इतर काही महत्त्वपूर्ण निर्णय पुन्हा पंतप्रधान मोदी जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता टिळक यांनी व्यक्त केली. हा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून, आपल्या शेअर बाजाराच्या शंका फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शेअर बाजाराच्या घसरणीचेसुद्धा संपूर्ण खापर या अर्थसंकल्पावर फोडणे योग्य होणार नाही. मुळातच देशाच्या अर्थव्यवस्थेत कोणतेही वादळी चढउतार झालेले नाहीत हे येथे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

अंमलबजावणी योग्य व्हावी

कल्चर इकॉनॉमीकडून क्लस्टर इकॉनॉमीकडे अतिशय रास्त वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही म्हणायला हरकत नाही. मात्र या तरतुदीचे नियोजन करताना कृषीविषयक धोरणाची तयारी जरी केंद्र सरकारने केली तरी त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावयाची असते, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. 'ऑपरेशन ग्रीन'प्रमाणे 'मेस्मे'ला देण्यात आलेली २५० कोटी रुपयांची सवलत हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी 'आयुष्यमान भव' योजना होय, असे सांगत टिळक यांनी शेवटी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत दीपाली चांडक यांनी केले तर सूत्रसंचालन मयूर भणगे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरी-मनमाडसाठी तिसरा लोहमार्ग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड इगतपुरी दरम्यान तिसरा लोहमार्ग तयार करण्यात येणार असून, त्यासाठी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात तब्बल १८६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा तिसरा लोहमार्ग आस्तित्त्वात आल्यास मनमाड-नाशिक हे अंतर सुपरफास्ट गाड्या अवघ्या ४५ मिनिटांत पार करतील. तसेच रेल्वे मालवाहतूक देखील जलद होणार आहे. भुसावळ रेल्वेचे प्रबंधक राम यादव यांनी ही माहिती दिली आहे. तिसरा लोहमार्ग निर्माण झाल्यास रेल्वे प्रवाशांना इगतपुरी-मनमाड दरम्यानच्या प्रवासाला कमी वेळ लागणार आहे.

मनमाड-इगतपुरी दरम्यान तिसरा लोहमार्गाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद होते का? याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष होते. मात्र आता प्रवाशांची प्रतिक्षा संपली असून, यंदा प्रवासी वर्गाला दिलासा देणारा निर्णय केंद्रीय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मनमाड-इगतपुरी तिसऱ्या लोहमार्गाला ग्रीन सिग्नल देत हा लोहमार्ग आकाराला यावा यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात घसघशीत कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मनमाड-इगतपुरी दरम्यान हा लोहमार्ग आस्तित्वात येवून माल वाहतुकीसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे.

प्रबंधक राम यादव यांनी सदर विभागातील ५४ समपार फाटकांच्या कार्यप्रणालीत सुधारणा व्हावी यासाठी ११.९२ कोटी पुलांच्या दुरुस्ती व नवनिर्माणासाठी

५७.१० कोटी लोहमार्गाखालील स्लीपर्स व रूळ बदलणे या कामांसाठी ९१.५ कोटी आदी तरतुद करण्यात आल्याची माहिती दिली. मनमाड-इगतपुरी या १२४ कि.मी. अंतराच्या मार्गावर तिसरा लोहमार्ग तयार करण्याचे काम अल्पावधीतच सुरू होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला असून ही न्युज प्रवासी वर्गाला समाधान देणारी आहे.

मनमाड स्थानकात सरकते जिने

मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात नवा रेल्वे फूट ओव्हर ब्रीजचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, या नव्या ओव्हरब्रिजला प्रथमच सरकते जिने बसविण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या सरकत्या जिन्यांसाठी देखील मोठी आर्थिक तरतूद केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली असून, मनमाड रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलून स्थानक आधुनिक होत असल्याची ही नांदी असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभेतून संचालकाला हाकलले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गैरव्यवहार, बेहिशोबी कारभार आदी कारणांनी बरखास्त झालेल्या आणि वारंवार मुदतवाढ मिळत असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील गोंधळ अजूनही कमी झालेला नाही. बाजार समितीच्या संचालकांची शुक्रवारी (दि. ९) सभा घेण्यात आली. या सभेत शंकर धनवटे यांनी मागील इतिवृत्ताची मागणी केली असता त्यांना समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी सभेच्या बाहेर काढले. त्यांना शिवीगाळ करून दमबाजी केली. या प्रकरणाची पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभा बोलावण्यात आली होती. या सभेत संचालक शंकर धनवटे यांनी सचिव अरुण काळे यांना बाजार समितीच्या संचालकांनी काढून टाकले होते. त्यांना परत कसे रुजू करून घेतले, त्यांना साधा अजेंडा लिहिता येत नाही. आज शुक्रवार असताना अजेंड्यावर शनिवार लिहिलेला आहे. पहिली सभा तहकूब केली असताना ती सभा रेग्युलर झाली असे दाखविण्यात आले आहे. त्या सभेचे इतिवृत्त द्यावे अशी मागणी केली. मात्र, यावर सभापती चुंभळे यांनी शिवीगाळ करीत दमबाजी करीत धनवटे यांना सभागृहाच्या बाहेर काढले. या प्रकरणी धनवटे यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये चुंभळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यात म्हटले आहे की, बदनामी करतो. घरापर्यंत जाऊ देणार नाही.

त्यांची नियुक्ती उपनिबंधकांकडून

या प्रकरणाविषयी सभापती चुंभळे यांनी सभा संपल्यानंतर विचारले असता त्यांनी इतिवृत्त या अगोदरच दिलेले असल्याचे सांगितले. सचिव अरुण काळे यांना संचालकांनी जरी पदावरून काढण्यास सांगितले असले तरी त्यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधकांकडून झालेली आहे. बाजार समितीला त्यांनी सचिव पदावर बसण्यास जिल्हा उपनिबंधकांनी आदेश काढलेले असल्यामुळे समितीच्या संचालकांना त्यांना काढण्याचे काहीच अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. बाजार समितीच्या बरखास्तीला १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यानंतर ही समिती बरखास्त करायची की नाही यावर निर्णय होणार आहे. याविषयी सभापती चुंभळे यांना विचारले असता, जिल्हा उपनिबंधक काय निर्णय घेतील ते काही सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये रोखला बालविवाह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर शहरामध्ये एका धर्मशाळेत सुरू असलेला बालविवाह चाइल्ड लाइनच्या मध्यस्थीने रोखण्यात आला. बालविवाह कायद्याबाबत, तसेच त्यामुळे होणाऱ्या कारवाईबाबत मुलीच्या पालकांना, तसेच उपस्थित वऱ्हाडींना समजावण्यात आल्यानंतर हा विवाह आता पुढील वर्षी निश्चित करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वरमधील एका आदिवासी कुटुंबातील १७ वर्षांच्या मुलीचा विवाह दिंडोरी तालुक्यातील मुलाशी ठरले होते. विशेष म्हणजे हा आंतरजातीय विवाह होता! मात्र, हा बालविवाह असल्याची माहिती चाइल्ड लाइनपर्यंत पोहोचली. यात मुलीचे वय १७ असल्याचे समोर आले. घटत्या संख्येमुळे योग्य उपवर नसल्याने अनेक विवाहेच्छू तरुण मिळेल ते स्थळ स्वीकारत आहेत. त्याचाच हा एक भाग असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली.

त्र्यंबकेश्वरमधील एका धर्मशाळेत शुक्रवारी हा विवाह होणार होता. मात्र, चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी विवाह होण्यापूर्वीच मुलीच्या पालकांची भेट घेतली. त्यांना बालविवाह, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, कायदा आणि कायद्याचे उल्लंघन झाल्यास होणारी कारवाई याची माहिती दिली. चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी केलेल्या समुपदेशनानंतर मुलीच्या पालकांना त्यांची चूक उमगली. मुलगी १८ वर्षांची झाल्याशिवाय आता लग्न होणार नाही, असा ठाम निश्चिय पालकांनी बोलून दाखवत दोन पावले माघार घेतली.

त्र्यंबकेश्वर येथील घटनेबाबत स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले असून, त्यांनी सर्वांचे म्हणणे रेकॉर्ड करून घेतले आहे. मुलांचे हक्क, समस्या तसेच बालविवाहाबाबत काही तक्रारी असल्यास नागरिकांनी चाइल्ड लाइनच्या १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

- मच्छिंद्र विंचूरकर, चाइल्ड लाइन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images