Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सावधान, पुन्हा पाऊस येतोय!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर व मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात सातत्याने चढ-उतार अनुभवास येत आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणही पाहावयास मिळत आहे. त्यामुळेच भारतीय हवामान विभागाने तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. नाशिकमध्ये ७ फेब्रुवारी रोजी किमान तापमान १५ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. हेच तापमान पुढील दोन दिवसांत म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले. कमाल तापमानही २८.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्यामुळे नाशिककरांना कधी उकाडा, तर कधी गारठ्याचा सामना करावा लागत आहे.

गारपिटीची शक्यता नाही!

राज्यातील सर्वांत कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमान नाशिकमध्ये शनिवारी नोंदविले गेले. वातावरणात सातत्याने होणाऱ्या चढ-उतारांमुळे १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्या तरी गारपीट होणार नाही, असा अंदाज हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे. पावसामुळे होणारे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांचे नुकसान टाळण्यासाठी अनावश्यक औषध फवारणी टाळावी. द्राक्षघड, डाळिंब झाकण्यासाठी पेपरचा वापर करावा, असे आवाहनही जोहरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळू बंद; बांधकामे ठप्प

$
0
0

महसूल, पोलिस व आरटीओ विभागांचा त्रास; व्यावसायिक त्रस्त

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी नवनवीन घरकुलांची बांधकामे हाती घेतली आहेत. परंतु, त्यासाठी लागणारी वाळूच बंद असल्याने बांधकामे ठप्प झाली आहेत, असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यात दुसऱ्या जिल्ह्यातून वाळू खरेदी केल्यावर महसूल, पोलिस व आरटीओ विभागांचा मोठा त्रास वाहतूकदारांना सहन करावा लागत असल्याने नाशिक जिल्ह्यातील वाळू लिलाव सूरू करावेत, अशी मागणी ठेकदारांसह वाहतूकदारांनी केली आहे.

विशेष म्हणजे, दुसऱ्या जिल्ह्यात वाळू लिलाव घेणाऱ्यांकडून रितसर सरकारची पावती वाहतूकदार घेत असताना केवळ त्रास देण्यासाठी शासकीय विभाग आडकाठी आणत असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे. औद्योगिक वसाहत असलेल्या नाशिक शहरात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. यासाठी नवीन घरकुलांचे योजना शहराच्या चारही भागात सुरू केल्या आहेत. गंगापूररोड भागात टूमदार घर घेण्यासाठी अनेकांची पसंती असते. यामुळे सहाजिकच ग्राहकांना पाहिजे तसे घरकुल उपलब्ध करून देण्याचे काम बांधकाम व्यावसायिकांकडून केले जाते. परंतु, बांधकामासाठी लागणारी वाळूच बंद असल्याने बांधकाम व्यावसायिकांची कामेच ठप्प झालेली पहायला मिळतात.

नाहक त्रासाला कंटाळून निर्णय

महसूल विभागाकडे वाळू ठेकेदार व वाहतूकदारांकडून जिल्ह्यातील ठिय्ये सुरू करण्याची मागणी केली जाते. आर्थिक देवाणघेवाणीतून महसूल विभागाचे वाळूचे ठिय्ये सुरू करत नसल्याचा आरोप केला जातो. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून वाळू बांधकाम व्यावसायिकांना खरेदी करावी लागते. यातदेखील वाळूची घेऊन येणाऱ्या वाहतूकदारांना महसूल, पोलिस व आरटीओ विभागांचा त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत नियमानुसार वाळूची वाहतूक केली जात असतानादेखील नाहक त्रास दिला जात असल्याने अखेर वाळू वाहतूक बंद करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे.

मजुरांवर बेरोजगारीची गदा

शहरातील मोठी बांधकामे वाळू येत नसल्याने बंद पडली आहेत. ती बंद असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांवर बेरोजगारीची गदा आली आहे. याकडे सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष द्यावे, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांनी केली. केवळ आर्थिक आकसापोटी नाशिक जिल्ह्यातील वाळूचे लिलाव केले जात नसल्याचा आरोपही वाहतूकदारांनी केला आहे. यात सरकारचादेखील कोट्यवधींचा महसूल वाया जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

लाखोंची वाहने दारात उभी

बांधकामासाठी अति महत्वाची लागणारी वस्तू म्हणून वाळूची गरज असते. परंतू वाळूच बंद असल्याने वाहतूकदारांची लाखोंची वाहने दारात उभी करून ठेवण्याची वेळ आली आहे. त्यातच वाहनांवर काम करणा-या मजूरांना देखील घरबसून वेतन द्यावा लागत असल्याने वाहनमालक हैराण झाले आहेत. दहा लाखांपासून ते ५० लाखांपर्यत वाळू वाहतूकीसाठी खरेदी केलेल्या वाहनांचे बँकेचे हफ्ते भरण्यासाठी पैसाच उपलब्ध होत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात वाहतूकदार अडकले आहेत. याबाबत शासनाच्या वरिष्ठ विभागाने योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरात लहान, मोठे ५ हजारांहून अधिक बांधकामाला साहित्य पुरविणारी वाहने आहेत. यावर हजारो कुटुंब अवलंबून असतात. परंतु, अनेक जाचक अटींमुळे वाळूच बंद असल्याने अनेकांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

-लक्ष्मण रोकडे, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यात रंगला वाइन फेस्टिवल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंडिया ग्रेप हार्वेस्ट वाइन फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी मोहाडी येथील सह्याद्री फॉर्म येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. शनिवारी विंचूर वाइन पार्क येथे ग्रेप स्टेम्पिंग, वाइन टेस्टिंग यासह साहसी क्रीडाप्रकार, हेलिकॉप्टर राइड, आदिवासी नृत्याने फेस्टिवलमध्ये रंगत आणली.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाइन व पर्यटनाचे ब्रँडिंग करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील १४ ठिकाणी हा फेस्टिवल ११ मार्चपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस होणार आहे. नाशिक व्हॅली वाइन क्लस्टरने आयोजित केलेल्या या फेस्टिवलच्या उद्घाटन सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यानंतर विंचूरच्या कार्यक्रमातही पर्यटकांनी भेटी देत या फेस्टिवलचा आनंद लुटला. नाशिक जिल्ह्यातील कृषी प्रक्रिया उद्योग विनियार्ड्स आणि वेगवेगळ्या वायनरीजमध्ये हा फेस्टिवल होणार आहे. या फेस्टिवलमध्ये नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉलही आकर्षणाचे केंद्र आहे.

असा असेल फेस्टिवल

विंचूर येथील दोन दिवसांच्या कार्यक्रमानंतर १६ फेब्रुवारी यॉर्क वाइन यार्ड नाशिक, १७ फेब्रुवारी व्हॅलनवाईन यार्ड, १८ फेब्रुवारी रीनासन्स वायनरी, २३ रोजी विंटेज वायनरी, २४ रोजी रोजी ग्रोवर झाम्पा, २५ रोजी सोमा वायनरी, २ मार्चला व्यंकटेशनगर, ३ मार्च रोजी चंदन इंडिया, ४ मार्चला निफा वाइनरी, ९ रोजी ग्रेप कंट्री, १० रोजी सुला वायनरी येथे तर ११ मार्च रोजी ग्रेप कार्निव्हल येथे समारोप होणार आहे.

वाइनला पर्यटनाचा दर्जा

द्राक्ष पंढरीतल्या वाइनला पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशितोष राठोड यांनी केले. मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्ममध्ये आयोजित 'इंडिया ग्रेप हार्वेस्ट'च्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. वाइनची दर्जात्मक गुणवत्ता आणि समुद्रापार तिने रोवलेली पसंती, यामुळे नाशिकला वाइन कॅपिटल दर्जा मिळाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

उद्घाटनाला मान्यवरांची उपस्थिती

ग्रेप हार्वस्टच्या शुभारंभ सोहळ्यात आमदार देवयानी फरांदे, अनिल कदम, माजी आमदार माणिकराव कोकाटे, भारतीय वाइन असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर, भारतीय द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, प्रसाद हिरे, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, सह्याद्री फार्मचे एमडी विलास शिंदे, वाइन उद्योजक राजेश जाधव, जेलर पल्लवी कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समितीला नकारघंटा

$
0
0

मुंढेंच्या आगमनामुळे अर्थकारण, राजकारण बदलले; पक्षांसमोर नवी डोकेदुखी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर महापालिकेतील राजकारणालाही कलाटणी मिळणार आहे. त्याचा पहिला फटका स्थायी समितीवर जाऊ इच्छिणाऱ्या सदस्यांसह अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या नगरसेवकांना बसला आहे. मुंढेंच्या कामकाजाचा अनेकांनी धसका घेतला असून, आतापर्यंत स्थायीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी तूर्ततरी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. एवढे वर्ष जाऊ द्या, असा पवित्रा सर्वपक्षीय इच्छुकांनी घेतल्याने पक्षाच्या नेत्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

महापालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीतून दरवर्षी फेब्रुवारीत आठ सदस्य निवृत्त होतात. तशी लघीनघाई सध्या पालिकेत सुरू असून, आठ सदस्यांची निवृत्ती करण्यासाठी चिठ्ठी सोडत काढली जाणार आहे. सर्वच पक्षांनी स्थायीचे सदस्यपद एक वर्षासाठी ठेवल्याने यावर्षी आठ नव्हे, तर १६ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या वर्षाचे अध्यक्षपद आणि स्थायीचे सदस्यपद मिळविण्यासाठी सध्या सर्वच पक्षातील नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. फेब्रुवारीनंतर २५७ कोटींचे रस्ते विकास योजना, स्मार्ट लायटनिंग प्रकल्प, सिटी बससेवा असे कोटींचे उड्डाण असलेले विषय स्थायीवर येणार आहेत. त्यामुळे अर्थकारण जोरात राहणार असल्याने स्थायीवर जाण्यासाठी नगरसेवकांचे आपल्या पक्षाकडे लॉबिंग सुरू आहे. तर, विद्यमान सदस्यांकडून एक महिन्याची मुदत वाढवून घेण्यासाठीचेही प्रयत्न सुरू आहेत. परंतु, आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती होताच महापालिकेतील अर्थकारणासह राजकारणाची दिशा बदलली आहे. मुंढे यांनी पहिल्याच दिवशी गरजेच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे सांगत इच्छुकांच्या मनसुब्यांना ब्रेक लावला आहे. कोणत्याही कामाची आवश्यकता तपासूनच ती फाइल पुढे ठेवण्याचा आदेशच मुंढे यांनी पहिल्या दिवशी दिला आहे. त्यामुळे स्थायीकडे येणाऱ्या प्रस्तावांचा ओढा कमी होणार आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांच्याप्रमाणेच मुंढेंची शिस्तबद्ध कार्यपद्धती व पारदर्शक कारभारामुळे स्थायीतील अर्थकारणाला बऱ्यापैकी चाप लागणार आहे. त्यामुळे स्थायी समितीसाठी इच्छुक असणाऱ्या नगरसेवकांनी आपल्या तलवारी तूर्तास तरी म्यान केल्या आहेत. वर्षभर महापालिकेच्या कामकाजाचा अभ्यास केल्यानंतरच पुढच्या वर्षी स्थायीसाठी लॉबिंग करू, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली असून, कोणाला स्थायीवर पाठवायचे असे संकट उभे राहिले आहे.

अध्यक्षपदही नको

स्थायी समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्षपद भाजपकडे पाच वर्षे राहणार आहे. त्यामुळे विद्यमान स्थायी समितीमधील दोन सदस्यांनी अध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली होती. यासाठी नेत्यांनाही साकडे घालत स्थायीचा बारकाईने वर्षभर अभ्यास केला. आता या अभ्यासाचाही उपयोग होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे वर्षभर तरी थांबण्याचा निर्णय या सदस्यांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणजाई तीर्थक्षेत्रावर वाढणार पर्यटन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचुर ते नैताळे दरम्यान डोंगरावर असलेले लोणजाई मातेचे भव्य मंदिर आपले लक्ष वेधून घेते. ३०० वर्षांपूर्वीच्या असलेल्या या मंदिर परिसराचा समावेश आता शासनाच्या 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रात करण्यात आला आहे. या मंदिरासह परिसराला शासकीय निधीतून विविध कामे करून सजविण्यात येणार आहे. यामुळे या लोणजाई गडावर धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

लोणजाई देवी मंदिरास ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत 'ब' वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे मंदिर परिसर विकासकामी कोट्यावधींचा निधी मिळण्यासह विकासकामांना चालणा मिळणार आहे. निफाड तालुक्यातील लोणजाई डोंगर विंचूर नजीक नाशिक-औरंगाबाद महामार्गापासून पाच ते सहा किमी अंतरावर सुभाषनगर गावाजवळ आहे. नवरात्रोत्सवात येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी असते. समुद्र सपाटीपासून अतिशय़ उंचावर असलेला लोणजाई डोंगर हिरवाईने नटलेला असल्याने येथे पर्यटनासाठी तालुक्यातील नागरिकांची कायम वर्दळ असते. श्रीमंत बाजीराव पेशवांचे सरदार विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी अतिशय सुंदर असे मंदिर ३०० वर्षांपूर्वी बांधले आहे. तीर्थक्षेत्र डोंगरावर असल्याने कायम हिरवेगार व थंड वातावरणामुळे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. येथील माजी सरपंच मधुकर दरेकर यांच्यासह स्थानिकांनी लोकसहभागातून, वै. नाना महाराज भक्त परिवार, छोट्याशा मंदिरास भव्य स्वरुप देऊन मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. सद्य स्थितीत १८ फूट उंचीचा १०८९ चौ. फुटाचा मंदिराचा गाभारा व प्रशस्त सभामंडप पूर्ण झाला आहे. तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकरी वर्गाने येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना केली आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात हे ठिकाण अधिकच बहरले आहे.

धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीकोणातून महत्त्व असलेल्या लोणजाई डोंगरावर शासनाच्या निधीअभावी अद्ययावत सुविधांची वाणवा जाणवत होती. लोणजाई गडास 'ब' वर्ग दर्जा मिळावा यासाठी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरु ठेवला. भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, कैलास सोनवणे, पं. स. सदस्य संजय शेवाळे यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना या तीर्थक्षेत्रास भेट देण्यास विनंती केल्याने त्यांनी लोणजाईला भेट देऊन तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत विविध प्रकारची कामे प्रस्तावित करण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार कामाचे प्लॅन व अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत कामांची अंदाजपत्रके सादर करण्याबाबत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला. वनविभाग, स्थानिक ग्रामपालिका ठराव, पोलिस स्टेशनकडून शिफारस प्रमाणपत्रे सादर करण्यात आली. श्री क्षेत्र लोणजाई माता येथील विकास कामांची अंदाजपत्रके पर्यटन विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली. शासनाकडून जिल्ह्यात तीन तीर्थक्षेत्रास ब वर्ग दर्जा प्राप्त झाला असून, कायम पाठपुरावा असल्य़ाने त्यात लोणजाई मंदिराचा समावेश झाला आहे. यामुळे 'लोणजाई'च्या विकासकामांना चालना मिळणार आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही नोव्हेंबर महिन्यात लोणजाई गडास 'ब' वर्ग दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत तुरुंगातून अर्ज केला होता.

ही कामे होणार प्राधान्याने

या पर्यटन स्थळासाठी दोन टप्यात सुमारे पाच कोटींचा निधी मिळणार आहे. पहिल्या टप्यात प्रवेशद्वार, मनोरे, लेझर शोसहीत प्रेक्षकगृह, पार ओटे, अंतर्गत रस्ते, वाहनांकरिता पार्किंग सुविधा, गार्डन, बगीच्यातील खेळणी, कारंजे, संरक्षण भिंत आदी कामे नियोजीत असून, दुसऱ्या टप्यात भक्तनिवास, संतनिवास, व्यापारी गाळे, प्रसाधनगहे, कुंड विस्तारीकरण व सुधारणा आदी प्रस्तावीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्णायक लढा उभारणार

$
0
0

गुरव समाजाच्या मेळाव्यात निर्णय

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अखिल गुरव समाज संघटनेतर्फे समाज मेळावा तसेच संत काशीबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नुकताच जेलरोड येथील ज्ञानेश्वर मंदिरात पार पडला. या वेळी समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुरव समाजाच्या मागण्यांसाठी निर्णायक लढा उभारण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

या मेळाव्यात भास्कर भागवत, कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, रमेश पवार, मनीषा पांडे, भास्कर नवगिरे, काशीनाथ भदे, रेखा सोनवणे, सुभाष शिंदे, आप्पा बावीसकर, संजय गुरव, निशीगंधा बामणोदकर, स्मिता गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. जेलरोडच्या छत्रपती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी दत्ता मसूरकर, वसंत बंदावणे, कल्पना पांडे, वंदना बंदावणे यांनी मार्गदर्शन केले.

भेदभाव विसरून एकत्र यावे

समाजातील पोट जातींनी भेदभाव विसरून अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे. शासनदरबारी शिष्टमंडळ नेऊन मागण्या मान्य करून घ्याव्या, असे आवाहन मसूरकर यांनी व्यक्त केले. समाजाचे शैक्षणिक, इनामवर्ग जमिनी, रोजगार, राखीव जागा आदी प्रश्न सोडविण्यासाठी निर्णायक लढा उभारावा. समाजाचे मोठे अधिवेशन होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. विठ्ठल गुरव यांनी स्वागत तर भाऊसाहेब पवार यांनी प्रास्तविक केले. भास्कर गुरव यांनी आभार मानले. नीलेश शिंदे, सुनील कहाळे, आप्पा शिंदे, सुरेश नवगिरे, तुकाराम शिंदे, विकास आचार्य, धनाजी पवार, हर्षल पांडे, वैभव शिंदे आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकअदालतीचा तोडगा यशस्वी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

न्यायालयीन कामकाजात वेळ, पैसा व श्रम खर्च होत असल्याची जाणीव होत असल्याने दिवसेंदिवस लोकअदालतीस प्रतिसाद वाढत आहे, ही चांगली बाब आहे. शनिवारी येथील न्यायालयात आयोजित लोकअदालतीस नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून, एकूण ९ हजार २८४ प्रकरणे निकाली निघाली. त्यातून एकूण ३ कोटी ३६ लाख ३३ हजार ७८६ रुपये इतकी वसुली झाली असल्याची माहिती येथील जिल्हा मुख्य न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी दिली.

शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीत दाखलपूर्व ४४ हजार ७७० प्रकरणे तर कोर्टात प्रलंबित ६१५ असे एकूण ४५ हजार ३८५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ९ पॅनल नियुक्त करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश महाजन यांच्यासह एस. एम. अली, एस. एम. बेलकर, एस. बी. लांडगे, एम. बी. कांबळे, ए. बी. मरलेचा, ए. आर. यादव, व्ही. एच. देशमुख व जे. जे. इनामदार या न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे कामकाज झाले. या लोकअदालतीसाठी संपूर्ण शहर व तालुक्यातून पक्षकार, थकबाकीदार यांची गर्दी होती. त्यामुळे न्यायालय आवारात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

महापालिकेची ६४१ प्रकरणे निकाली

एकूण ५ हजार ९७२ प्रकरणे

६४१ प्रकरणे निकाली

त्यातून १ कोटी ५ लाख २३ हजार ५११ रुपये वसुली

ग्रामपंचायतीतील प्रकरणे ३७८१२

त्यापैकी ८ हार ५१२ प्रकरणे निकाली

त्यातून ९९ लाख २८ हजार रुपये वसुली

कोर्टात दाखल ६१५ प्रकरणे

१२७ प्रकरणांत तडजोड

मोटारवाहन अपघात ३९ प्रकरणे

फौजदारी ४७ प्रकरणे

दिवाणी ११ प्रकरणे

वैवाहिक १० प्रकरणे

भूसंपादन ३

महावितरण ३

यातून १ कोटी २९ लाख ६७ हजार रुपये वसूल

दाखलपूर्व प्रकरणे - एकूण ४४ हजार ७७०

- निकाली ९ हजार १५७

- रक्कम २ कोटी ६ लाख ६६ हजार ४३८

कोर्टात दाखल प्रकरणे (प्रलंबित) एकूण ६१५

- निकाली - १२७

- रक्कम - १ कोटी २९ लाख ६७ हजार ३४७


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोमहर्षक सादरीकरणाने 'जिम्नॅस्टिक'ला सुरुवात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये प्रथमच घेण्यात आलेल्या नाशिक महापौर जिम्नास्टिक चषक राज्य अजिक्यपद स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी शिवाजी स्टेडियम येथे पार पडला. नाशिक महापालिका व नाशिक जिल्हा जिम्नास्टिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

पोलिस बँण्ड पथकाच्या 'सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा'च्या धूनने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर कथ्थकनृत्त, योगासह विविध कार्यक्रम झाल्यानंतर स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. जिमनास्टिक समितीचे आयोजक शाहु खैरे यांनी स्पर्धेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. राज्यभरातून विविध जिल्ह्यातून आलेल्या स्पर्धकांनी रोमहर्षक खेळ करीत प्रेक्षकांची दाद मिळवली.

सकाळी शोभायात्रा

स्पर्धेनिमित्त सकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रेचे सकाळी छत्रपती शिवाजी स्टेडिअम, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, शालीमार या ठिकाणाहून नेण्यात आली. या शोभायात्रेत राज्यभरातून आलेले जिम्नॅस्टिकचे संघ, नाशिकमधील जिम्नास्टिकचे खेळाडूंसहित विविध महापालिका शाळांसह अन्य शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

रोप, मल्लखांब व योगासने पथक

या शोभायात्रेत रोप, मल्लखांब, कराटे, योगासने यांची पथके असे सुमारे ८०० ते १००० विद्यार्थी सहभागी झाले होते. ढोलपथकांचा गजर, लेझीम, मल्लखांब, कराटे व योगासने यांची प्रात्यक्षिके ही या शोभायात्रेची वैशिष्ट्ये ठरली. शोभायात्रेला महापौर रंजना भानसी, जिल्हा जिमनास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष शाहू खैरे, उपाध्यक्ष भालचंद्र भट, सचिव राकेश केदारे, सहसचिव कुमार शिरवाडकर, खजिनदार श्रीराज काळे, किरण कवीश्वर तसेच सदस्य शेखर सोनवणे, संदीप शिंदे, प्रबोधन डोणगावकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्या सभेबाबत सचिवांकडून खुलासा

$
0
0

नाशिक कृऊबा सचिव अरुण काळेंचा खुलासा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरोधात पोलिस स्टेशनमधील तक्रारीचा वाद पेटलेला असताना सचिव अरुण काळे यांनी वादग्रस्त बैठकीतील घटनेचा खुलासा दिला आहे. त्यात त्यांनी आपल्या नेमणुकीबाबतची सविस्तर माहिती देऊन आपल्यावर खोटे आरोप करण्यात असल्याचे नमूद केले आहे.

सचिव काळे यांनी सभेबाबत खुलासा करताना झालेल्या घडामोडी स्पष्ट केल्या आहेत. त्यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे, की सभा सुरू होण्यापूर्वी मागील सभेचे इतिवृत्त का दिले नाही यावर चर्चा सुरू असताना शंकरराव धनवटे यांनी सभापतींना अरुण काळे यांना सचिव पदावर रूजू का करून घेतले, तुम्ही काळेंकडून पैसे घेतल्याचा आरोप केला. सभापती व धनवटे यांच्यात शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर सभापती बोलत असताना, धनवटे स्वत:हून बाहेर पडले. त्यांना इतर संचालकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रोसेडिंग बुकवरही सही केली नाही. त्यानंतर सर्वसाधारण सभेचे कामकाज दोन तास चालले. या सभेच्या एक दिवस अगोदरही उपसभापतींनी आढावा बैठक घेतली. त्यावेळेस धनवटे उपस्थित नव्हते. मी वेळोवेळी त्यांना प्रोसेडिंगच्या नकला दिलेल्या आहेत, असे म्हटले आहे.

सचिव पदाबाबातही वारंवार मुद्दा उपस्थित केला जातो. याबाबतही सचिव काळे यांनी आपली बाजू मांडली आहे. आपण महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांनी तयार केलेल्या सचिव पॅनलमधील उमेदवार आहोत. त्याला पणन महामंडळाची मान्यता आहे. माझ्यावर चुकीचे आरोप करून काम करून दिले जात नाही. तसेच नेमणुकीबाबत विभागीय निबंधकांचा निकाल, जिल्हा उपनिबंधकांचे आदेश याचे दाखले देत आपली नेमणूक कायदेशीर असल्याचे सांगितले. संस्थेच्या उत्पन्नात झालेल्या वाढीचे आकडेही त्यांनी या खुलाशात दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अघोरी उपचारांवर हवी ठोस भूमिका

$
0
0

मुक्ता दाभोलकर यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपचार पध्दतींमधील आधुनिकीकरणामुळे वैद्यकीय शास्त्र अत्यंत प्रगत टप्प्यावर पोहोचले आहे. तरीही अघोरी पध्दतीने उपचार करणाऱ्या भोंदूबाबांनी राज्यात बस्तान बसविले आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या भोंदूबाबांविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्यभर ठोस भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षा अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी शनिवारी नाशिकमध्ये व्यक्त केली.

आयएमए नाशिकच्या वतीने आयोजित रिफ्रेशकॉन या कार्यक्रमांतर्गत दाभोलकर यांची मुलाखत घेण्यात आली. शालिमार येथील आयएमए सभागृहात झालेल्या या मुलाखतीतून दाभोलकर यांनी श्रध्दा, अंधश्रध्दा, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर आपली मते व्यक्त केली. भूलतज्ज्ञ डॉ. शशांक कुलकर्णी यांनी ही मुलाखत अधिक खुलवली. दाभोलकर म्हणाल्या, की विद्यार्थीदशेपासूनच मी अंधश्रध्दा निर्मूलन समितीची कार्यकर्ता आहे. सन २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून करण्यात आला. माणूस मारून विचार संपत नसतो हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या निर्धाराने मी काम सुरू केले. श्रध्दा, अंधश्रध्दा, विश्वास यातील फरक स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, की आपण संस्कारांचे ओझे बाळगतो. परंतु, चिकित्सक नजरेने त्याकडे पहात नाही. अंधश्रध्दा हा श्रध्देच्या दुनियेतील काळाबाजार असून, तुमचा विवेक कृतिशील झाला असे दिसते, ती श्रध्दा असते असे मत त्यांनी व्यक्त केले. आयुष्यातील सर्व गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या चष्म्यातून पहायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. आपण मंगळावर उपग्रह पाठवितो परंतु, मंगळ असलेल्या मुलीचे लग्न जमवू शकत नाही. अंगठ्या घालून समस्या सुटत असतील तर एक लाख बेरोजगारांना अंगठ्या घालून रोजगार मिळेल का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळेच आम्ही अंनिसला डोकं चालवा चळवळ म्हणतो असेही त्यांनी सांगितले. माझ्या आयुष्याची दोरी कुणीतरी हलवित असते ही भीती मनातून काढून टाकावी आणि मन निर्भय करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अध्यात्मिक बुवाबाजी ही विज्ञानाची भाषा वापरून चालवली जाणारी दुकानदारी असल्याची टीका दाभोलकर यांनी केली. डॉक्टरांचे कौशल्य आणि बुध्दीबद्दल समाजात प्रत्येकालाच आदर असतो. त्यामुळे डॉक्टरांनी प्रॅक्टिसबरोबरच संघटनेच्या माध्यमातून अघोरी उपचार पध्दतींबद्दल ठोस भूमिका घ्यायला हवी अशी अपेक्षा दाभोळकर यांनी व्यक्त केली. अंनिस हिंदूंच्याच अंधश्रध्दांना विरोध करते हा आरोप त्यांनी खोडून काढला. जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांत हे सप्रमाण सिध्द होते. समाजाने धर्म आणि जातींमधील अंधश्रध्दांपेक्षा केवळ अंधश्रध्दांबद्दल बोलायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी खासदार हेमंत गोडसे, डॉ. रवींद्र टोणगावकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रिफ्रेशकॉनचे उद्घाटन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - जिम्नास्टिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये प्रथमच घेण्यात आलेल्या नाशिक महापौर जिम्नास्टिक चषक राज्य अजिक्यपद स्पर्धेत नाशिकला ५ गोल्ड तर मुंबईला ४ गोल्ड मेडल मिळाले.

राज्यभरातून आलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत रविवारी रोमहर्षक खेळ केला. नाशिक महापालिका व नाशिक जिल्हा जिम्नास्टिक असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा सोमवारी (दि. १२) सायंकाळी पाच वाजता समारोप होणार आहे. स्पर्धेत खेळाडूंनी गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ पदक मिळवत आपला आनंद व्यक्त केला. शिवाजी स्टेडियम येथे सुरु असलेल्या स्पर्धेत हा खेळ बघण्यासाठी मोठी गर्दी होती.

स्पर्धेचा निकाल :

- १४ वर्षांखालील मुले : १) चैतन्य देशमुख (मुंबई शहर), २) इशान अजय खर्रा (नाशिक), ३) युवराज लावंड (मुंबई शहर )

- एरोबिक्स (वय ८-११) : मुली : १) नेत्रा घारे (सांगली), २) प्रेक्षा साने (रत्नागिरी), ३) लीओ प्रीत (मुंबई उपनगर)

- एरोबिक्स (वय ८-११) : मुले : १) करण जगेरिया (मुंबई उपनगर), २) श्रेयस पाटील (ठाणे), ३) आयुष बैरागी (नाशिक)

- एरोबिक्स : मिश्र दुहेरी : १) हार्दिक परमार / वंदना संगीत (मुंबई उपनगर), २) श्रेयस पाटील / संतवन कुलकर्णी (ठाणे), ३) देवन आचले / वैष्ण्वी राहे (नाशिक)

- एरोबिक्स (वय १२-१४) : मुली : १) प्रीती नायर (मुंबई उपनगर), २) वसुंधरा (पुणे), ३) वृंदा घाडगे (रत्नागिरी)

- एरोबिक्स (वय १२-१४) : मुले : १) आदित्य सूर्यवंशी (नाशिक), २) प्राण यादव (मुंबई उपनगर), ३) आयुष ब्राह्मणकर (नाशिक)

- एरोबिक्स : मिश्र दुहेरी : १) उषा माध्य / प्राण यादव (मुंबई उपनगर), २) ऋजुता थत्ते / चैतन्य काजळे (नाशिक), ३) संजली मोहोळकर / अमित कांबळे (नाशिक)

- तिहेरी स्पर्धा : १० इशिता मेहता / रेवा जैन/ तीमोन मोरे (नाशिक), २) तन्वी सुर्वे / वेदश्री राजपूत / श्रावणी भिसे (ठाणे), ३) कोमल यादव /इशा जाधव/ प्राण यादव (मुंबई उपनगर)

- महिला एकेरी : १) आर्या कुलकर्णी (नाशिक), २) जाई मानकामे (ठाणे), ३) आर्या पालेकर (रायगड)

- ज्युनियर : पुरुष एकेरी : १) अभिषेक मोरे (नाशिक), २) रोशन खलग (मुंबई उपनगर), ३) सोहम जाधव (नाशिक)

- ज्युनियर : मिश्र दुहेरी : १) ओमकार मटाले / अनिशा देशपांडे (नाशिक), २) कलग / आकांक्षा (मुंबई उपनगर), ३) यशराज पिंगळे / तनिष्का साधकर (नाशिक)

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंपदा विश्रामगृहाचे ‘पीपीपी’नुसार नूतनीकरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जलसंपदा विभागाने भंडारधरा, मुळा व करंजवण धरणावरील विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे. या विश्रामगृहामुळे पर्यटकांना धरणाच्या ठिकाणी राहण्याची सुविधा मिळणार आहे.

अनेक वर्षांपासून पडझड झाल्याने या विश्रामगृहाचा वापर केला जात नव्हता. भंडारदरा व मुळा हे दोन्ही धरणे अहमदनगर तर करंजवण हे धरण नाशिक जिल्ह्यात आहे. मुळा प्रकल्पात १९६० मध्ये चुमेरी विश्रामगृह बांधण्यात आले होते. येथे ६ कक्ष व दोन सभागृह व भोजनकक्ष आहे. याचे बांधकामाचे क्षेत्र २४८ चौरस मीटर असून त्याच्यासमोरील उद्यानाचे क्षेत्र ३ हजार ४८९ चौरस मीटर आहे. भंडारदरा येथेही कृष्णावंती विश्रामगृह आहे. येथे २ व्हीआयपी कक्ष, सहा साधे कक्ष व एक डायनिंग हॉल आहे. येथेही मोठे उद्यान आहे. करंजवण धरणावरही विश्रामगृहे व वसाहती बऱ्याच काळापासून वापराविना पडून आहे. त्यामुळे त्याचा उपयोग पर्यटकांना व्हावा, यासाठी हे विश्रामगृह आता बांधण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांनाही संधी

मोठ्या धरणांवर येणाऱ्या पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना धरणाच्या ठिकाणी रहायला आवडते. पण, त्याना पुरेशा सुविधा उपलब्ध होत नाही. त्या उपलब्ध करून देण्यासाठी विश्रामगृहे वापरात आणावी यासाठी जलसंपदा विभागाने काम हाती घेतले आहे. पूर्वी या विश्रामगृहाचा वापर फक्त अधिकारी व सरकारी कामांसाठी केला जात असे मात्र, आता ती सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचे धोरण जलसंपदाने स्वीकारले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडच्या खेळाडूंनी गाजविली राष्ट्रीय स्पर्धा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया खेलो या राष्ट्रीय स्पर्धेवर मनमाड व नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनी यशाची मोहोर उमटवली आहे. प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील खुशाली गांगुर्डे, पूजा परदेशी व धनश्री पवार यांनी वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची लयलूट केली. या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

खेलो इंडिया या पहिल्या स्कूल गेम्समध्ये मनमाडच्या मुलींनी यशाचा झेंडा राजधानी नवी दिल्लीत फडकावला आहे. त्यांनी एक रौप्य व दोन कास्य पदकाची लयलूट केली. छत्रे न्यू इंग्लिश स्कूल व जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत आपली छाप पाडली. वेटलिफ्टिंग स्पर्धेत खुशाली निवृत्ती गांगुर्डे हिने ४४ किलो वजनी गटात ५७ किलो स्नॅच व ७० किलो क्लीन जर्क असे एकूण १२७ किलो वजन उचलून महाराष्ट्र संघास पाहिले पदक मिळवून दिले. धनश्री नितीन पवार हिने ५३ किलो वजनी गटात ६६ किलो स्नॅच व ८१ किलो क्लीन जर्क असे १४७ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकाविले. तर पूजा राजेश परदेशी हिने ५८ किलो वजनी गटात ६५ किलो स्नॅच व ८२ किलो क्लीन जर्क असे १४७ किलो वजन उचलून कांस्यपदक पदक मिळविले.

देशपातळीवर छाप

पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत मनमाडच्या मुलींनी पदकांची हॅट्रिक साधली आहे. याबद्दल यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. जयभवानी व्यायामशाळा व छत्रे विद्यालय पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे कौतुक करून गौरव केला. मनमाडसारख्या छोट्या शहरात गुणवंत खेळाडू घडत असून ते राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या कर्तृत्वाची छाप पाडत आहेत. या विद्यार्थिनींना प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थमंत्री मुनगंटीवार आज नाशिकमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवारी (दि. १२) नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्या मुख्य उपस्थितीत जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ चा सर्वसाधारण प्रारुप आराखडा अंतिम केला जाणार आहे.

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ही विभागाची बैठक होणार असून पाचही जिल्ह्यांमधील वार्षिक योजनेला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या ३२१ कोटींच्या प्रारूप वार्षिक आराखड्यालाही मंजुरी मिळणार असून मागणी केल्याप्रमाणे अतिरिक्त ६० कोटींचा निधी जिल्ह्याला मिळणार की नाही हे देखील स्पष्ट होणार आहे.

मुनगंटीवार यांचे सकाळी साडेदहा वाजता नाशिक विमानतळावर आगमन होईल. तेथून ते वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी दीड वाजता त्यांचे नाशिक येथील सरकारी विश्रामगृहावर आगमन होईल. दुपारी दोन वाजता त्यांच्या मुख्य उपस्थितीत नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात २०१८-१९ च्या विभागीय जिल्हानिहाय वार्षिक योजना (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात होईल. यावेळी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री या नात्याने या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या बैठकीसाठी पाऊण तास राखून ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्याची बैठक होईल. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता धुळे, साडेतीनला जळगाव, सव्वाचार वाजता नंदुरबार आणि सर्वात शेवटी सायंकाळी पाच वाजता नाशिक जिल्ह्याची बैठक होईल. बैठकीला नाशिकसह अहमदनगर, नंदुरबार, धुळे, व जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुनगंटीवार सायंकाळी सात वाजता सरकारी विमानाने मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत.

नाशिकला हवेत जादा ६० कोटी

बैठकीत नाशिक जिल्ह्याच्या ३२१ कोटींच्या प्रारूप वार्षिक आराखड्यालाही मंजुरी दिली जाणार आहे. तसेच अतिरिक्त ६० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २०१७-१८ या आर्थिक वर्षातील वार्षिक आराखड्यातून १८० कोटी वितरीत झाले असून, त्यात ७६ टक्के निधी खर्च झाला आहे. ३२१ कोटींच्या या आराखड्यात सरकारने ३३ टक्के कपात केली होती. परंतु, नंतर हा निधी परत दिला. त्यामुळे २४४ कोटींच्या आराखड्यात आता ७६ कोटी रुपये अधिक खर्च केले जाणार असून याचा आढावाही बैठकीत घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवधर्मप्रेमींद्वारे स्वच्छता अभियान

$
0
0

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी राबविणार उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सद्गुरूदेव श्री सतपालजी महाराजप्रणीत मानव उत्थान सेवा समितीच्या श्री हंस कल्याण धाम आश्रमाच्या वतीने रविवारी नाशिक-पुणे रोडवरील शिवाजीनगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात मानवधर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी शहरातील वेगवेगळ्या परिसरात असे अभियान राबवून समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्याचा निर्णय समितीने घेतल्याची माहिती संस्थेच्या नाशिक शाखेच्या प्रबंधक साध्वी हिराजी यांनी दिली.

श्री हंस कल्याण धाम आश्रमात प्रत्येक रविवारी दुपारी दोन वाजता प्रवचन असते. रविवारी दुपारी साडेचारला या प्रवचनाचा समारोप झाला. साध्वी हिराजी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मानवधर्मप्रेमींनी लगेचच स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली. आश्रमापासून नाशिक-पुणे महामार्गापर्यंतचा परिसर अभियानात स्वच्छ करण्यात आला. पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन कार्यालयासमोर देखील ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये विशिष्ठ गणवेशात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवावर्गाने सर्वांचेच लक्ष वेधले. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी शहरातील वेगवेगळ्या परिसरात असे अभियान राबविण्याचे निर्णय समितीने घेतला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी साध्वी पंकजाजी, साध्वी मुक्तिकाजी, साध्वी सावित्रीजी, महात्मा कुलदीपानंदजी आदींसह मानवधर्मप्रेमींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अर्थमंत्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवारी (दि. १२) नाशिकमध्ये येत आहेत. त्यांच्या मुख्य उपस्थितीत जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ चा सर्वसाधारण प्रारुप आराखडा अंतिम केला जाणार आहे.

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ही विभागाची बैठक होणार असून पाचही जिल्ह्यांमधील वार्षिक योजनेला अंतिम मान्यता दिली जाणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या ३२१ कोटींच्या प्रारूप वार्षिक आराखड्यालाही मंजुरी मिळणार असून मागणी केल्याप्रमाणे अतिरिक्त ६० कोटींचा निधी जिल्ह्याला मिळणार की नाही हे देखील स्पष्ट होणार आहे.

मुनगंटीवार यांचे सकाळी साडेदहा वाजता नाशिक विमानतळावर आगमन होईल. तेथून ते वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी दीड वाजता त्यांचे नाशिक येथील सरकारी विश्रामगृहावर आगमन होईल. दुपारी दोन वाजता त्यांच्या मुख्य उपस्थितीत नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात २०१८-१९ च्या विभागीय जिल्हानिहाय वार्षिक योजना (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात होईल. यावेळी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे त्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री या नात्याने या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या बैठकीसाठी पाऊण तास राखून ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्याची बैठक होईल. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता धुळे, साडेतीनला जळगाव, सव्वाचार वाजता नंदुरबार आणि सर्वात शेवटी सायंकाळी पाच वाजता नाशिक जिल्ह्याची बैठक होईल. बैठकीला नाशिकसह अहमदनगर, नंदुरबार, धुळे, व जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुनगंटीवार सायंकाळी सात वाजता सरकारी विमानाने मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत.

नाशिकला हवेत जादा ६० कोटी

बैठकीत नाशिक जिल्ह्याच्या ३२१ कोटींच्या प्रारूप वार्षिक आराखड्यालाही मंजुरी दिली जाणार आहे. तसेच अतिरिक्त ६० कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २०१७-१८ या आर्थिक वर्षातील वार्षिक आराखड्यातून १८० कोटी वितरीत झाले असून, त्यात ७६ टक्के निधी खर्च झाला आहे. ३२१ कोटींच्या या आराखड्यात सरकारने ३३ टक्के कपात केली होती. परंतु, नंतर हा निधी परत दिला. त्यामुळे २४४ कोटींच्या आराखड्यात आता ७६ कोटी रुपये अधिक खर्च केले जाणार असून याचा आढावाही बैठकीत घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळणरस्त्याने बसचा ‘घात’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नव्याने रुंदीकरण करण्यात आलेल्या नाशिक-पुणे महामार्गावरील फुलेनगर येथे असलेला वळणरस्ता वाहनांसाठी घातक ठरत असल्याचे या ठिकाणी रविवारी विनावाहक शिवशाही बसला झालेल्या अपघातानंतर पुन्हा स्पष्ट झाले आहे. या अपघातात शिवशाही बसशी धडक झालेल्या कंटेनरच्या चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर थेट दुभाजकावर चढविल्यानेच शिवशाही बसमधील प्रवासी बचावले. त्यामुळे या वळणरस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारात पुणे येथे जाणारी शिवशाही बस (एमएच ०६, बीडब्ल्यू ०५३५) नाशिकरोड बसस्थानकातून निघाली होती. चेहेडी गावाजवळील दारणा नदीच्या पुलाजवळील फुलेनगर येथे या बसला सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरच्या मागील बाजूची धडक बसली. या धडकेत शिवशाही बसच्या दोन खिडक्यांच्या काचांचा चुराडा झाला. या काचा आतील प्रवाशांच्या अंगावर पडल्याने बसमधील प्रवाशांत घबराट निर्माण झाली. या बसशेजारून जात असलेल्या कंटेनरला (एमएच १५, एफव्ही ९६५१) वळणरस्ता असल्याने पुरेशी जागा न मिळाल्याने या कंटेनरच्या मागील भागाची धडक शिवशाही बसला बसली. यावेळी कंटेनरचे मागील चाक थेट दुभाजकावर चढले. मात्र, कंटेनरचालकाने वेळीच नियंत्रण मिळविल्याने कंटेनर पलटी होत होता वाचला. या अपघातात बसमधील प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणूनच त्यांचा जीव वाचला. या अपघातानंतर बसमधील प्रवाशांनी कंटेनरचालक लिंबाजी खिल्लारे याला मारहाण केली. या अपघातप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात कंटेनरचालक लिंबाजी खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून शिवशाही बसचालक बी. आर. आव्हाड यांच्याविरोधात मोटार अपघात कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघाताची माहिती मिळताच नाशिक आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पी. पी. हिरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक के. पी. सांगळे, नियंत्रण अभियंता चालन एस. बी. सोनवणे आदी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आणि नाशिकरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरज बिजली, जगदीश शेलकर आदींनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली.

दुभाजकही ठरताहेत धोकादायक

नाशिक-पुणे महामार्गाचे चेहेडी गावाजवळील दारणा नदीपर्यंत रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दारण नदीवरील पुलाचेही काम पूर्ण झालेले आहे. मात्र, नवीन पूल वाहतुकीसाठी अद्याप खुला केलेला नसल्याने या ठिकाणी वळणरस्त्याचा वापर होतो. हा वळणरस्ता वाहतुकीसाठी पुरेसा नाही. याशिवाय नव्याने बांधण्यात आलेल्या महामार्गावरील दुभाजकही या ठिकाणी धोकादायक ठरत आहेत. नव्या पुलाच्या एका बाजूवरून नाशिकरोडकडून सिन्नरच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू केल्यास वळणरस्त्यावरील रहदारीची वर्दळ कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, हा पूल अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसल्याने येथील वळणरस्ता अपघातास कारणीभूत ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार शेखविरोधात आंदोलन करणार

$
0
0

आचार्य जितेंद्र महाराज यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगावचे आमदार अासिफ शेख यांनी शिर्के व माझ्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खोटे गुन्हे दाखल केले असून, आम्ही त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली नाही. तसेच याबाबत त्यांच्याद्वारे होत असलेल्या देशविरोधी कृत्यांना लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे स्पष्टीकरण मुंबई येथील हिंदू आश्रमचे आचार्य जितेंद्र महाराज यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.

आमदार शेख यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ११) दुपारी पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडण करीत मच्छिंद्र शिर्के व आचार्य जितेंद्र महाराज यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लगेचच आचार्य यांच्याकडून एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यात त्यांनी आमदार शेख यांनी रोहिंग्या मुस्लिमांना मालेगावात आश्रय देण्यासाठी मोर्चा काढला होता. याचा आम्ही तीव्र विरोध करीत असून, देशातील मुस्लिम तरुणांनी आमदार शेख यांच्यासारख्या कट्टरपंथी मुस्लिम नेत्यांच्या प्रभावात येऊन आपले भविष्य धोक्यात टाकू नये, असेही पत्रकात म्हटले आहे. तसेच हा मुद्दा आता देशभरात घेऊन जाणार असून, आमदार शेख यांच्याविरोधात देशभर आंदोलन करून एफआयआर दाखल करणार असल्याचे पत्रकान्वये कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महादेव घाट शिवमंदिरात उत्सव

$
0
0

महाअभिषेक, महाप्रसाद व भजन कार्यक्रमांचे आयोजन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील प्राचीन व ऐतिहासिक गणेश कुंडाजवळ महादेव घाट शिवमंदिरात दरवर्षाप्रमाणे यंदादेखील मंगळवारी (दि. १३) महाशिवरात्रीच्या दिवशी धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मंदिर परिसरात साफसफाई करण्यात येऊन विद्युत रोषणाई, पताके लावण्यात येत असून, शिवरात्री उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.

शिवरात्री निमित्ताने मंदिर भाविकांसाठी सकाळी ५ वाजेपासून खुले असणार आहे. तसेच दिवसभरात सकाळी ६ वाजता, ८ वाजता व सायंकाळी ७ तसेच रात्री १२ वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात येईल. तसेच महाअभिषेकही करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दिवसभर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. महादेव घाट सेवा समितीच्या वतीने यादिवशी दुपारी ४ वाजता नारायणी महिला भजनी मंडळ व भावसार भजनी महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री १० वाजता राजस्थान भजनी मंडळ भजन कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे उत्सवप्रमुख विवेक वारुळे, उपप्रमुख कैलास सोनवणे, पंकज मुंदडा, रमेश मंडाळे, महादू मंडाळे, प्रवीण बच्छाव, राजेश वाजपेयी आदींसह समिती सदस्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमपीएससी’संदर्भात १५ तारखेकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये मागासवर्गीय उमेदवारास गुणवत्तेच्या आधारावर खुल्या गटातील जागेवर अर्ज करण्याचा अधिकार डावलण्यात येत असल्याचा आक्षेप नुकताच घेण्यात आला होता. त्याबाबत एक याचिका कोर्टात दाखल असून, या याचिकेवर आता गुरुवारी (दि. १५ फेब्रुवारी) अंतिम सुनावणी होणार आहे. दरम्यानच्या कालावधीत 'एमपीएससी'च्या प्रवेशप्रक्रियांना देण्यात आलेली स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष आता १५ तारखेकडे लागले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये काही मागासवर्गीय उमेदवारांनी गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातील जागांसाठी अर्ज केले होते. या मुलाखतींमध्ये या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले होते. याविरोधात उमेदवारांनी कोर्टात दाद मागितली होती. संबंधित ऑनलाइन अर्जांमध्ये 'एमपीएससी'ने मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या वर्गातील जागांसाठी अर्ज करता येणार नसल्याचे म्हटले होते. पण, आयोगाच्या या निर्णयामुळे शासन आणि कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत अॅड. अजय मुंडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. यासंदर्भात आता गुरुवारी नेमका कोणता निर्णय होतो, याकडे एमपीएससी उमेदवारांच्या नजरा लागल्या आहेत. या सुनावणीनंतर यासंदर्भातील प्रवेशप्रक्रियांना देण्यात आलेल्या स्थगितीसंदर्भातदेखील निर्णय होण्याची शक्यता आहे.

क्लासेसदेखील कचाट्यात

दरम्यान, खासगी शिकवणी चालकांबाबत नवीन कायद्याच्या मसुद्यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. या कायद्याचा कच्चा मसुदा मांडल्यानंतर त्यात स्पर्धा परीक्षा क्लासेसचालकांचा समावेश नव्हता, असा आक्षेप इतर क्लासेसचालकांनी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसचाही समावेश या कायद्यात करण्यास संबंधित समितीने अनुकूलता दाखविली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षा क्लासेसवरही आता या नव्या कायद्याचे नियंत्रण राहणार आहे. परिणामी शहरांमधून मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या क्लासेसवरही सरकारचे नियंत्रण येणार आहे. त्यामुळे नियमावली डावलून आता स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसचालकांना मनमानी करता येणार नाही. त्यामुळे हे क्लासेसही नियमांच्या कचाट्यात सापडणार असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images