Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महिलांना मिळणार विशेष रजा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला कामगारांना रात्रपाळीत मासिक पाळी आल्यास विशेष रजा देण्याची तरतूद महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम २०१७ मध्ये करण्यात आली आहे. या अधिनियमाचा मसुदा राज्य सरकारने प्रसिद्ध केला असून, त्यावर अभिप्राय मागविण्यात आले आहेत. या अधिनियमाद्वारे प्रथमच महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा मिळू शकणार आहे.

कामगार विभागाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम २०१७ चा मसुदा अभिप्रायाकरिता प्रसिद्ध केला आहे. हा मसुदा http://mahakamgar.maharashtra.gov.in आणि www.dgps.maharashtra.gov.in या दोन्ही वेबसाइट्सवर उपलब्ध आहे. या अधिनियमामध्ये प्रामुख्याने आस्थापनांची नोंदणी करणे, नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करणे, नोंदणी प्रमाणपत्रातील बदल करणे इत्यादींबाबत नमुने देण्यात आलेले आहेत. दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांना फक्त सूचनापत्र द्यावयाचे असून, सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब कॉम्प्युटरद्वारे त्याची पोचपावती दिली जाणार आहे. त्यामुळे सूचनापत्र देण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यात आली आहे. याबरोबरच महिला कामगारांना रात्री साडेनऊनंतर कामावर ठेवायाचे असल्यास त्याबाबतच्या अटी, शर्ती नमूद करण्यात आलेल्या आहेत. यात प्रामुख्याने महिला कामगारांच्या निवासाच्या दारापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत सुरक्षित वाहतूक व्यवस्था, सदर कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी आदी अटी अधिनियमामध्ये देण्यात आल्या आहेत.

आरोग्य समिती बंधनकारक

शंभरपेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थानांमध्ये आरोग्य सुरक्षा व कल्याण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीमध्ये मालक प्रतिनिधींव्यतिरिक्त किमान दहा कामगार प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. समितीचे प्रमुख कार्य आस्थापनेवरील सुरक्षेबाबत उपाययोजना आणि सांस्कृतिक व क्रीडासंदर्भात कार्यक्रम घेणे हे आहे. अपराधाच्या प्रशमनाबाबतची कार्यप्रणाली अधिनियमात देण्यात आलेली आहे. रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांचा तपशील प्रसिद्ध करणे आवश्यक आहे, असे अधिनियमात नमूद आहे.

येथे नोंदवावा अभिप्राय

अधिनियमातील तरतुदीसंदर्भात नागरिकांनी त्यांचा अभिप्राय कामगार विभागाचे प्रधान सचिव यांना psec.labour@maharashtra.gov.in या ई-मेलवर किंवा प्रधान सचिव यांच्या कार्यालयाला लेखी स्वरूपात पाठवावेत, तसेच कामगार आयुक्तांचे कार्यालय, कामगार भवन, इ ब्लॉक, सी-२०, बांद्रा-कुला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०००५१ येथे किंवा mahalabourcommr@gmail.com या ई-मेलवर १५ दिवसांच्या आत पाठवावेत, असे आवाहन विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा परिषदेची शुक्रवारी स्थायी समितीची बैठक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी दुपारी २.३० वाजता रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शीतल सांगळे उपस्थित राहतील. सभेत विविध समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यापासून प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे.

गेल्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या फाइल पेंडिंग विषयावरून ही सभा वादळी ठरली होती. त्यानंतर आता ही सभा होणार असून, त्यात प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतला जाणार आहे. बैठकीत खातेप्रमुखांच्या कामाबद्दलही माहिती घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे कृषी विभाग, पशुसंवर्धन समिती, समाजकल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, अर्थ समिती, बांधकाम समिती, शिक्षण समिती, आरोग्य समितीमधील प्रलंबित विषय, अखर्चिक निधी याबाबत माहिती घेतली जाणार आहे.

नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थायी समितीची ही पहिली बैठक आहे. त्यामुळे बैठकीत सकारात्मक चर्चा व विकासकामांना चालना देण्यावर भर दिला जाणार असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमोदेत बसविले सॅनिटरी नॅपकिन मशिन

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

ग्रामीण भागातील स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व कळावे तसेच अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध व्हावे यासाठी नांदगाव तालुक्यातील आमोदे ग्रामपंचायतीने गावात सॅनिटरी नॅपकिन मशिन बसविले आहे. राज्यात ग्रामीण भागात असे मशिन ग्रामपंचायतीतर्फे बसविण्याची योजना आमोदे सरपंच व सदस्यांनी मूर्त रुपात आणली आहे, अशी योजना राबविणारी आमोदे ग्रामपंचायत तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

राज्य शासनाने ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींना अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची योजना साकारली आहे. त्या योजनेची अंमलबजावणी आमोदे ग्रामपंचायतीने केली आहे. सॅनिटरी नॅपकिन मशिन गावात बसविण्यात आले असून, सरपंच वैशाली पगार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या मशिनसाठी वित्त आयोगामार्फत विशेष तरतूद करण्यात आली आहे. आमोदे गावात स्त्रियांमध्ये आरोग्यविषयक जागृती होत असल्याचे चित्र दिसत आहे. या मशिनमुळे आता आमोदे येथे अल्पवयीन मुली व स्त्रियांना अवघ्या ५ रुपयात १ नॅपकिन मिळू शकणार आहे.

आश्वासक पाऊल

'५ रुपयांचे नाणे टाका आणि नॅपकिन घ्या' या योजनेला ग्रामीण भागात जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. शहरात स्त्री विषयक जागृती प्रबोधन घडत असताना ग्रामीण भागात देखील असे उपक्रम राबविले जात आहेत. मासिक पाळी काळात स्त्रियांनी घ्यायची काळजी, याचे धडे दिले जात आहेत हे एक ग्रामीण भागातील आश्वासक पाऊल समजले जात आहे.

आमच्या गावात स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकिन मशिनची सुविधा व्हावी, अशी आमची आधीपासून मागणी होती. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू होते. पाठपुरावा केल्याने प्रयत्न यशस्वी ठरले. आमोदे गावात या योजनेचे स्वागत होत आहे.-वैशाली पगार, सरपंच, आमोदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सरकारचा मी संकटमोचक!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरकारवर काही संकट आले, की त्याची जबाबदारी माझ्यावर टाकली जाते. त्यामुळे मी संकटमोचक झालो असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत आपलेच कौतुक करून घेतले. मराठा आरक्षणाच्या जबाबदारीपासून आपल्यावर टाकलेल्या संकटसमयीच्या कामांचा पाढाही त्यांनी वाचला.

संकटमोचनाच्या जबाबदारीमुळे मला बाहेर पडणे अवघड झाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडलो, असे सांगत त्यांनी आपल्या कामांचा पाढा वाचला. मंत्री पाटील यांच्या अगोदर एकनाथ खडसे यांच्यावरही अशीच जबाबदारी होती; पण खडसे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर पाटील यांचे महत्त्व वाढले. मुख्यमंत्र्यांनंतर त्यांचाच शब्द महत्त्वाचा मानला जातो. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरही त्यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे सरकारवर काही संकट आले तर त्यांच्यावर जबाबदारी दिली जात असली तरी त्याबद्दल ते कधीही फारसे बोलले नाहीत; पण नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी आपले मन मोकळे करीत आपले कौतुकही करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी कुटुंब उघड्यावर!

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुर्बल घटकातील कुटुंबांना हक्काचे छत मिळावे, यासाठी शासनाने राज्यात घरकुल योजना सुरू केली. आजवर या योजनेंतर्गत असंख्य कुटुंबांना आसरा मिळाला. मात्र, येवला तालुक्यात घरकुलाबाबत अजब प्रकार उघडकीस आला आहे. मोलमजुरी करून कसाबसा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी समाजातील एका कुटूंबाला शासकीय योजनेत मिळालेल्या घरकुलात परस्पर भाडेकरू घालण्याचा ग्रामसेवकाचा प्रताप येवला तालुक्यात उघड झाला आहे. याबाबत संबंधित कुटुंबाने येवला पंचायत समितीकडे धाव घेत आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा गटविकास अधिकाऱ्यांसमोर वाचला आहे.

याबाबत माहिती अशी की, येवला तालुक्यातील कानडी गावामध्ये ज्ञानदेव पोपट खुरसणे व मथुरा ज्ञानदेव खुरसणे हे भिल्ल आदिवासी कुटुंब निवासाला आहे. मोलमजुरी हा त्यांचा व्यवसाय आहे. कुटुंबास सुमारे १५ वर्षांपूर्वी कानजी गावात शासकीय योजनेतून घरकुल मिळाले होते. या घरकुलात हे कुटुंब निवासालाही राहीले व नंतरच्या कालावधीत उपजिवेकेच्या शोधार्थ त्यांनी गाव तात्पुरते सोडले. काही दिवसांनी गावी परतल्यानंतर आपल्या घरात दुसरेच कुटुंब निवासाला असल्याचे बघून त्यांना धक्काच बसला. याबाबत ग्रामसेवकाकडे विचारणा केली असता, 'तेथे आता भाडेकरू राहतो. मी काय घरकुल परत देत नाही, तुझे घरकुल कुठे ते माहिती नाही', अशी उत्तरे देऊन ग्रामसेवकांनी या कुटुंबियांची बोळवण केली. परिणामी या खुरसणे कुटुंबावर आता पुन्हा कानडी गावातील माळरानावर एका पाहुण्याच्या आश्रयाला झोपडीत दिवस काढावे लागत आहेत. शासनाने दिलेले हक्काचे घर देखील हिरावल्याने खुरसणे कुटुंबियांवर 'कुणी घर देता का घर', अशी आर्त हाक मारण्याची वेळ आली आहे. विशेष बाब म्हणजे तीन चार वर्षांपासून त्यांची घरपट्टी थकल्याने त्यांना डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या लोकअदालतीत घरपट्टीचे दाखलपूर्व प्रकरण मिटवावे लागले होते. त्याबाबतची नोटीस व पैसे भरल्याची पावतीही त्यांच्याकडे आहे. याप्रकरणी आठ दिवसांत पोलिसांचे सहकार्य घेऊन संबंधित घरकुलात घुसखोरी करणाऱ्यांना घराबाहेर काढून खुरसणे यांचे घरकुल पुन्हा त्यांच्या ताब्यात देणार असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी सांगीतले.

'आम्ही मजुरीच्या शोधार्थ व मुलामुलींच्या लग्नकार्यासाठी तात्पुरते गाव सोडले होते. घराला कुलूप लावून परगावी गेलो होतो. काही काळाने गावी परतल्यानंतर आमच्या घरात दुसरे लोक राहत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने आम्ही पंचायत समितीकडे तक्रार केली आहे. हे घरकुल आम्हाला शासकीय योजनेतून मिळाले आहे.-मथुरा खुरसणे, तक्रारदार महिला, कानडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांचे बाह्यमूल्यमापन लांबणीवर

0
0

दहावी, बारावीच्या परीक्षेमुळे विद्या प्राधिकरणचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाल्याने या शाळांचे बाह्यमूल्यमापन सद्यस्थितीत स्थगित करण्याचा निर्णय विद्या प्राधिकरणने घेतला आहे. त्यामुळे स्वयंमूल्यमापनात 'अ' श्रेणी मिळविणाऱ्या राज्यातील सुमारे ३४ हजारांवर शाळांचे बाह्यमूल्यमापन पुढे ढकलले गेले आहे.

दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा आणि 'अ' श्रेणी प्राप्त शाळांचे मूल्यमापन हे एकाच कालावधीत येत असल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी काही दिवसांपासून होत होती. ही समस्या लक्षात घेत आता विद्या प्राधिकरणने या शाळांचे बाह्यमूल्यमापन सद्यस्थितीत लांबणीवर टाकले आहे. पुढे ढकलण्यात आलेली तारीख प्राधिकरणच्या वतीने नंतर कळवली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या शाळा सिध्दी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात शाळांनी स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित होते. यानुसार देशभरात १४ राज्यांनी हा टप्पा पूर्ण केला आहे. ज्या शाळांना स्वयंमूल्यमापनात 'अ' श्रेणी मिळाली आहे, त्यांचे शाळा बाह्यमूल्यमापन १० ते १७ फेब्रुवारी या कालावधीदरम्यान होणार होते. मात्र, याच कालावधीत बोर्डाच्या दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडत असल्याने हे मूल्यमापन पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी जोर धरत होती.

चांगल्या दर्जासाठी शाळांना मानांकन

शाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने मूल्यमापनानंतर शाळांना 'शाळासिध्दी' या योजनेंतर्गत मानांकन देण्यात येणार आहे. या मानांकनानुसार शाळांच्या दर्जाची वर्गवारी करण्यात येईल. या दर्जानुसार पाल्याला शाळेत प्रवेश घेण्यासंदर्भात पालकांना निर्णय घेणे सोपे होणार आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून शाळांच्या स्वयंमूल्यमापनास महत्त्व आहे.

'त्या' शाळांचा फुगा फुटणार

शाळा सिध्दी उपक्रमात सहभागी होऊन पहिल्या टप्प्यात देशभरातून १४ राज्यातील शाळांनी स्वयंमूल्यमापन केले आहे. या मूल्यमापनावर आधारीत श्रेणींचे वितरणही संबंधित शाळांना करण्यात आले आहे. यानंतरच्या टप्प्यात मात्र या शाळांच्या बाह्यमूल्यमापनाव्दारे या शाळांना मिळालेल्या श्रेणीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. शाळांनी स्वयंमूल्यमापनात दर्शवलेली खोटी माहिती बाह्यमूल्यमापनाच्या प्रक्रियेने उघड होणार असल्याने या टप्प्याला विशेष महत्त्व आहे. काही शाळांनी स्वयंमूल्यमापनात खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीही विद्या प्राधिकरणाकडे करण्यात आल्या आहेत.

त्रयस्थ संस्थेचा हस्तक्षेप नाही

केंद्राच्या शाळा सिध्दी मूल्यांकन प्रक्रियेंतर्गत स्वयंमूल्यमापनात महाराष्ट्रात सुमारे ३४ हजार ४९१ शाळांनी 'अ' श्रेणी मिळवली आहे. आता या शाळांचे बाह्यमूल्यमापन राष्ट्रीय स्तरावरील निकषांनुसारच होणार असून, यासाठी त्रयस्थ संस्था नेमण्यात आलेली नाही. या शाळांचे बाह्यमूल्यमापन गतवर्षीही मध्यतरांवरच स्थगित करण्यात आले होते. आता पुन्हा या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असली तरीही लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे. शाळा सिध्दींतर्गत शाळांच्या बाह्यमूल्यमापनासाठी राज्यात ४१ निर्धारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची टीमदेखील सहभागी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संदीप उत्सवात उद्यापासून डेजची धमाल

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

संदीप फाउंडेशनचे आकर्षण ठरणारा 'संदीप उत्सव' यावर्षी १५ ते २२ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. संदीप फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये हा उपक्रम होणार आहे. विविध डेज आणि नवनवीन स्पर्धांमुळे हा सोहळा आकर्षक ठरणार आहे.

संदीप फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान विविध डेज सेलिब्रेट केले जाणार आहेत. यात ग्रुप डे, ट्रॅडिशनल डे, मिस मॅच डे- रेट्रो डे, डे विल डे, ब्लॅक अँड व्हाइट डे, सारी डे, टाय डे असे डेज साजरे होतील. शिवाय नृत्य, गायन, नाट्य, अभिनय तसेच फॅशन शो, पेंटिंग, फोटोग्राफी या कलांचे सादरीकरण होईल. यावेळी क्रिकेट, बास्केटबॉल, फुटबॉल, टेबल टेनिस, चेस या क्रीडा स्पर्धांही होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. 'संदीप उत्सव'चे आकर्षण असलेले 'मिस्टर आणि मिस संदीप फाउंडेशन' ही स्पर्धा यावर्षी अनोख्या पध्दतीने पार पडणार आहे. पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, लेथ वॉर, ब्रिक बॉन्ड, रोबो रेस, कॅड वॉर अशा टेक्निकल स्पर्धांही पार पडणार आहेत. दि. २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान 'कल्चरल नाइट' होणार आहे. यामध्ये संगीत, नृत्य, अभिनय, नाट्य अशा संस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल.

सपटमध्ये उद्यापासून डेजची धमाल

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एच. सपट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्येही उद्यापासून (१५ फेब्रुवारी) डेजला सुरुवात होत आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत हे डेज साजरे होणार आहेत. यात ग्रुप डे, ट्रॅडिशनल डे, ब्लॅक अँड व्हाइट थीम, प्रोफेशनल डे हे डेज साजरे होणार आहेत. त्यासाठी कॅम्पसची तयारी सुरू आहे. गुरुवारी (दि. १५) कॅम्पसमध्ये ग्रुप डे, १६ रोजी ट्रॅडिशनल डे, १७ रोजी ब्लॅक अँड व्हाइट थीम डे, १८ रोजी प्रोफेशनल डे साजरे होणार आहेत.

महाशिवरात्रीच्या शुभेच्छांचा सोशल मीडियावर वर्षाव

महाशिवरात्रीचे औचित्य साधून नेटीझन्सने सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या. निरनिराळे मेसेजेस आणि श्लोकांच्या माध्यमातून सोशल मीडियावर या शुभेच्छा देण्यात आल्या. याशिवाय महाशिवरात्रीचे महत्त्वही अनेकांनी शेअर केले. बारा ज्योतीर्लिंगांचे महत्त्वदेखील नावीन्यपूर्ण फोटो व व्हीडिओच्या माध्यमातून शेअर होत होते. दिवसभर या शुभेच्छांचा पाऊस पडत होता.

उद्योजकता विकासाचे विद्यार्थ्यांना धडे

संदीप फाउंडेशन संचलित संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटरच्या एम. बी. ए विभागाच्या वतीने १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान उद्योजकता विकास कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन द कॅटॅलिस्ट कंपनीचे सीईओ प्रदीप घारे, माजी आयपीएस अधिकारी आणि कनेक्ट इंडियाचे संचालक हर्षद बेळे, प्राचार्य डॉ. संजय गंधे, विभागप्रमुख डॉ. राकेश पाटील यांच्या हस्ते झाले.

हर्षद बेळे व प्रदीप घारे यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेबाबत महत्त्वाच्या टिप्स दिल्या. प्रदीप घारे म्हणाले, की उद्योग क्षेत्रातमध्ये आपल्या उत्पादनाचे नेटवर्किंग, मार्केटिंग करणे गरजेचे असते. कोणत्याही व्यवसायात नियोजन महत्त्वाचे असते. उद्योजक बनणे सोपे काम नाही. आज आपण अंबानी, टाटा, बिर्ला या यशस्वी उद्योजकांना पाहतो. परंतु, त्यांनीही यशस्वी उद्योजक बनण्यासाठी अपार कष्ट घेतले. उद्योजक बनण्यासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.

यावेळी हर्षद बेळे म्हणाले, की स्वतःच्या कल्पनेला वास्तविकतेत उतरवणे म्हणजेच उद्योग होय. कोणत्याही उद्योगामध्ये ग्राहकाच्या गरजेवर लक्ष केंद्रित करावे. ग्राहकाची गरज ओळखून पुढील योजना आखणे महत्त्वाचे असते. उद्योजकता हे एक जोखमीचे क्षेत्र आहे, जो या क्षेत्रात जोखीम पत्करतो तोच आयुष्यात एक यशस्वी उद्योजक बनतो.

प्राचार्य डॉ. संजय गंधे व विभागप्रमुख डॉ. राकेश पाटील यांच्या हस्ते हर्षद बेळे व प्रदीप घारे यांचा सत्कार करण्यात आला. या तीन दिवसीय उद्योजकता विकास कार्यक्रमात विविध कंपन्यांचे सीईओ, उद्योजक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. आज (दि.१४) कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. सामारोप सत्रात संस्थेचे चेअरमन डॉ. संदीप झा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

विद्यार्थ्यांनी साधला संस्थाचालकांशी संवाद

केटीएचएम कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थाचालकांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना जाणवणाऱ्या समस्या आणि कॅम्पसमधील अपेक्षिक विकासविषयक मुद्दे मांडले. संस्थेच्या वतीने मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना आश्वस्त केले.

विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार रोकडे, नयन जाधव या विद्यार्थ्यांनी हा संवाद साधला. नॅक पुनर्मूल्यांकन व सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार कॉलेजला मिळाल्याच्या निमित्ताने हा संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी मुलींचे वसतिगृह, स्वच्छतागृहे, ज्युनिअर कॉलेजसाठी ग्रंथालय, तक्रार केंद्र, शिक्षण प्रणाली या बाबींशी संबंधित मागण्या मांडल्या. योग्य मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरात्र लागली कारणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यावर संपूर्ण प्रशासनात 'स्वच्छता' मोहीम सुरू झाली आहे. नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयातील सर्वच विभागप्रमुखांनीदेखील आयुक्तांच्या भेटीचा धसका घेतला असल्याचे चित्र या कार्यालयात मंगळवारी महाशिवरात्रीच्या सुटीच्या दिवशीही सुरू असलेल्या कामकाजातून अधोरेखित झाले. या कार्यालयातील अनेक कर्मचारी कार्यालय अन् दप्तर आवराआवरीत मग्न झाल्याचे दिसून आले.

आयुक्त मुंढे यांचा अचानक दौरा होऊ शकतो ही शक्यता गृहित धरून येथील कार्यालयात चांगलीच धवपळ सुरू असल्याचे चित्र आहे. एरवी कामकाजाचा दिवस असूनही दांडी मारणारे अनेक कर्मचारी गेल्या शनिवार-रविवारप्रमाणेच मंगळवारी चक्क सुटीच्या दिवशीही कार्यालयात हजर झाल्याने नागरिकांतूनही सखेद आश्चर्य व्यक्त केले गेले.

येथील महापालिका विभागीय कार्यालयातील कपाटे, टेबलावरील फायलींची आवराआवर करण्याचे आदेश विभागप्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हे कर्मचारी मंगळवारी सुटी असूनही आपल्या कार्यालयात स्वच्छतेच्या कामात व्यस्त दिसून आले. अडगळीचे कागद व साहित्य कार्यालयातून बाहेर काढण्यासह अस्ताव्यस्त पडलेल्या फायली सुस्थितीत लावल्याने कार्यालयातील बकालपणा दूर झाला.

अतिक्रमण विभागही सक्रिय

मंगळवारच्या सार्वजनिक सुटीला अतिक्रमण निर्मूलन विभागही सक्रिय झाल्याचे दिसून आले. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्यासह या विभागाचे कर्मचारी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या कामासाठी हजर होते. इतके दिवस शहरातील अतिक्रमणांच्या भस्मासुरावर मेहेरबानी करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशीही कर्तव्य बजावताना बघून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

स्वच्छतेसाठी 'नवीन' कर्मचारी!

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील स्वच्छतेच्या कामासाठी 'नवीन' कर्मचारी अचानक दाखल झाले आहेत. आजवर कधीही न दिसणारे चेहेरे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर झाडू मारताना दिसू लागले आहेत. शिवाय या कर्मचाऱ्यांच्या गळ्यात महापालिकेचे ओळखपत्रही आता झळकले आहे. विशेष म्हणजे स्वच्छता विभागाच्या ताफ्यात पांढऱ्या रंगाचा गणवेश परिधान केलेले काही कर्मचारीही नव्याने दाखल झाले आहेत. हे पांढरे गणवेशधारी कर्मचारी स्वच्छता विभागातील मुकादम असल्याचे समजते. आजवर शहरात स्वच्छता विभागाचे पांढरे गणवेशधारी मुकादम कुठे गायब झाले होते, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तुजविण शंभो मज कोण तारी ...

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंगळवारी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पार पडलेला महाशिवरात्रोत्सव भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे चांगलाच खुलला. महाशिवरात्रीचे औचित्य साधून अनेक भाविकांसह सामाजिक व सांस्कृतिक मंडळे आणि विविध देवस्थाने यांच्या वतीने धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'तुजविण शंभो मज कोण तारी...' या प्रार्थनेच्या गजरात शहर व जिल्हा शिवमय झाला होता.

नाशिक शहराला प्राचीन संदर्भ आणि येथील शिवमंदिरांना प्राचीन इतिहास असल्याने शहरात मोठ्या उत्साहात हा उत्सव पार पडला. शहरात प्रामुख्याने पंचवटीत बहुतांश ठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय शहरातील विविध उपनगरांमध्येही आयोजित उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नाशिकमध्ये श्री कपालेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी भाविकांनी मंगळवारी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. सकाळच्या सत्रात शिवपिंडीस महाभिषेक, महापूजा, महाआरती आदी धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याशिवाय गोदापात्रातील मंदिरांमध्येही भाविकांच्या वतीने सेवा करण्यात आली.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेही देशभरातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे नाशिकमध्येही पर्यटकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. गंगापूररोडवरील सोमेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीनेही मंगळवारी पहाटपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सोमेश्वर येथील महादेव मंदिरात पहाटपासून महाभिषेक, महापूजा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर सकाळच्या सत्रात १०५ तबलावादकांनी तबलावादन करून वातावरणात रंग भरले. मान्यवरांच्या हस्ते दुपारी शिवपूजन झाल्यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. याशिवाय गाडगीळ गल्लीमध्ये सामुदायिक लिंगपूजा, संगीत रुद्रपूजा करण्यात येऊन रात्री येथील श्री त्र्यंबकेश्वर महादेवास अभिषेक करण्यात आला. सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, इंदिरानगरसह विविध उपनगरांमध्येही पूजा, अभिषेक, पालखी मिरवणूक, महाप्रसाद वाटप या धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती अर्जाचा मनस्ताप

0
0

ऑनलाइन नंतर आता ऑफलाइन अर्ज भरण्याची सूचना

कॉलेज क्लब रिपोर्टर

समाजकल्याण विभागाकडून जुलै ते नोव्हेंबर दरम्यान विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरून घेण्यात आले. परंतु, मागील दोन तीन दिवसांपासून समाजकल्याण विभागाने कॉलेजेसला विद्यार्थ्यांकडून पुन्हा ऑफलाइन अर्ज भरून घेण्यास सांगितले आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करीत कायमस्वरूपी मार्ग शोधण्याची मागणी केली आहे.

पूर्वीच्या www.mahaeschool.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना विविध समस्या उद्भवत होत्या. यावर उपाय म्हणून आणि विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकाच ठिकाणी अर्ज करता यावेत, शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, अधिकाधिक विद्यार्थ्यांना शासनाच्या शैक्षणिक योजनांचा लाभ घ्याता यावा या हेतूने सरकारने मागील वर्षी www.mahadbt.gov.in हे नवीन संकेतस्थळ विकसित केले. परंतु, या संकेतस्थळाचा विद्यार्थ्यांना लाभ होण्याऐवजी मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विद्यार्थ्यांनी सर्व्हर डाऊन, आधारकार्ड लिंक करणे, विविध कागदपत्रे दिलेल्या मर्यादेत अपलोड करणे यांसारख्या विविध तांत्रिक समस्या, अडचणींचा सामाना करीत ऑनलाइन अर्ज वेळेत जमा केले. कॉलेजमध्ये अर्ज व विविध कागदपत्रांच्या झेरॉक्स जमा केल्या. परंतु, विद्यार्थ्यांना कॉलेजेसने आता पुन्हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून दोन ते तीन दिवसांत अर्जासह कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. www.mahadbt.gov.in या विकसित केलेल्या नवीन संकेतस्थळावर डेटाबेससंदर्भात व इतर अनेक तांत्रिक समस्या उद्भवत असल्याने समाजकल्याण विभागाने सर्व कॉलेजेसला पुन्हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यास सांगितले असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

कायमस्वरूपी मार्ग हवा

विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींचा सामना करीत अर्ज भरले असतानाही आता समाजकल्याण विभागाने पुन्हा ऑफलाइन अर्ज भरून कागदपत्रे जमा करण्यास सांगितल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सरकारने याची दखल घेत कायमस्वरूपी मार्ग काढण्याची गरज असल्याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

आधार लिंकिंग स्टेटमेंटमुळे अडचण

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना बॅँक खात्याशी आधार लिंक केले होते. परंतु, कॉलेजने आता पुन्हा एकदा बँक खात्याला आधार लिंक करून बँकेकडून आधार लिंक करण्यात आल्याबाबताचे ऑफिशियल स्टेटमेंट आणण्यास सांगितले आहे. स्टेटमेंट नसल्यास फॉर्म जमा करून घेतला जाणार नाही, अशी सक्त सूचना विद्यार्थ्यांना दिली आहे. अनेक विद्यार्थी हे नाशिक बाहेरील आहेत. त्यांचे बँक खाते गावाकडील बँकेत असल्याने त्यांना आधार लिंकिंग स्टेटमेंटसाठी पुन्हा बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.

ऑक्टोंबर महिन्यात शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरून सर्व कागदपत्रांसह जमा केले. अर्ज भरताना अनेक वेळा सर्व्हर डाऊन व इतर देखील समस्यांना तोंड द्यावे लागले. परंतु, कॉलेजने आता पुन्हा ऑफलाइन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज भरून जमा करण्यास सांगितले आहे.

- प्रतीक सोनार, विद्यार्थी (इंजिनीअरिंग)

सप्टेंबर महिन्यात महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले. परंतु, पुन्हा शिक्षकांनी नव्याने अर्ज भरण्यास सांगितले आहे. एकदा आधार लिंक केले असतानाही पुन्हा आधार लिंक करून स्टेटमेंट आणण्यास सांगितले जात आहे. सरकारने या समस्यांची दखल घेणे गरजेचे आहे.

- लोकेश खैरनार, विद्यार्थी (इंजिनीअरिंग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात पाच खडी क्रेशर सील

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गौण खनिज रॉयल्टीची थकबाकी देण्यात दिरंगाई करणाऱ्या १८ खडी क्रेशरवर सायने शिवारात तहसील विभागाने छापा टाकला. या कारवाईत १३ व्यवसायीकांनी २३ लाख रुपये थकीत रक्कम भरल्याने त्यांच्यावरील कारवाई स्थगित करण्यात आली. मात्र इतर ५ खडी क्रेशर सील करण्यात आले. तहसीलदार ज्योती देवरे यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने ही कारवाई केली.

आपल्या फौजफाट्यासह महसूल विभागाचा पथकाने अनेक खडी क्रेशर व वाहनांना सील केले. या कारवाईमुळे गौण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे. शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. यामुळे महसुलातही देखील वाढ झाली आहे.

सोमवारी सकाळपासून प्रांताधिकारी अजय मोरे यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार ज्योती देवरे व महसूल विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करीत सायने परिसरात खडी क्रेशर व अवैध उत्खनन करणाऱ्या साधनांना सील ठोकले. महसूल कर न भरल्याने प्रांताधिकारी अजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरे यांच्यासह पथकाने क्रेशच्या कार्यस्थळांवर छापे टाकले. यातील १३ व्यवसायीकांनी तत्काळ काही प्रमाणात तर अनेकांनी सर्व थकित रक्कम भरण्याची तयारी दाखवली. या व्यावसायीकांकडून रोख रक्कम साडेआठ लाख तर १४ लाख ५० हजाराचे धनादेश प्राप्त झाले आहेत. तर पाच खडी क्रेशर मात्र सील केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अत्याचाराला उत्तर देण्यासाठी जिजाऊंनी शिवरायांना घडवले

0
0

'गोएसो'च्या शतकपूर्ती सोहळ्याला प्रारंभ

कॉलेज क्लब रिपोर्टर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राकडे बघण्यापूर्वी आपल्याला त्यांच्या काळापासून पूर्वीचा आठशे वर्षांचा इतिहास तपासून पाहायला लागेल. सुलतानानांचे आक्रमण सर्वाधिक कौर्याचे होते. या कौर्याचा खात्मा करण्यासाठी जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा घडवला, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकपूर्ती महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याची सुरुवात आर. एच. सपट इंजिनीअरिंग कॉलेजच्या शामियान्यात झाली. व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, डॉ. सुनंदा गोसावी, संस्थेच्या विश्वस्त व मानव संसाधन व्यवस्थापन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे, संस्थेच्या विभागीय सचिव डॉ. सुहासिनी संत (मुंबई), डॉ. राम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाची सुरुवात एसएमआरके महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व सोसायटी गीताने केली. यावेळी कीर्तनकार आफळे म्हणाले, की भारतावर परकियांची अनेक आक्रमणे झाली, पण सुलतानांचे आक्रमण अत्यंत भयानक होते. सुलतानांच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी त्यावेळचे राजे सक्षम नव्हते. शत्रूला शत्रूच्या पद्धतीने उत्तर देण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये नव्हती. त्याचप्रमाणे शत्रूंसमोर आपली कौटुंबिक भांडणे करण्यामध्येच राजे रजवाड्यांनी धन्यता मांडली. सुलतानांनी मात्र त्यांच्या आपसातील भांडणे कधीही शत्रूंसमोर केली नाही. म्हणून त्यांना येथे राज्य स्थापन करता आले. त्यांनी चालवलेल्या भयानक अत्याचाराला उत्तर देण्यासाठी जिजाऊंनी शिवरायांसारखा राजा घडवला, असे त्यांनी नमूद केले. या सोहळ्यात १२ ते १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कीर्तनमाला होणार आहे.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी संस्थेच्या शताब्दी वर्षांचा धावता आढावा घेतला. एसएमआरके कॉलेजच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. मुंबईच्या विभागीय सचिव डॉ. संत यांनी आभार मानले. मुग्धा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते योजनेला रेड सिग्नल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गरजेनुसारच प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक भाजप नेत्यांची महत्त्वाकांक्षी २५७ कोटींची रस्ते विकास योजना अडचणीत आली आहे. आयुक्त मुंढे यांनी बांधकाम विभागालाच रडारवर घेतले असून, शहराची गरज नसतानाही केवळ पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे मागच्या दाराने आलेल्या रस्तेविकास योजनेची छाननी होणार आहे.

आयुक्तांनी रस्तेविकास योजनेबाबतची माहितीच सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या योजनेची निविदाप्रक्रिया सुरू असली, तरी ही प्रक्रियाच आता धोक्यात आली असून, ठेकेदारही सावध पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. एकंदरीतच मुंढेंच्या पवित्र्यामुळे रस्तेविकास योजना डब्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सिंहस्थापाठोपाठ मनसेच्या सत्ताकाळात शहरातील रस्त्यांवर तब्बल साडेसातशे कोटींचा खर्च करण्यात आला आहे. राज्यातील अन्य शहरांच्या मानाने नाशिकचे रस्ते चकचकीत असतानाही सत्ताधाऱ्यांनी पुन्हा रस्त्यांवर डांबराची उधळपट्टी सुरू ठेवली आहे. सत्ताधारी भाजपकडून नोव्हेंबरच्या महासभेत जादा विषयाच्या माध्यमातून २५७ कोटी रुपयांची रस्तेविकास योजना मंजूर करून घेतली होती. बजेटमध्ये कोणताही तरतूद नसताना सत्ताधाऱ्यांच्या मर्जीसाठी बांधकाम विभागाने घाईगडबडीत सादर केलेल्या या योजनेवर लेखापाल, लेखापरीक्षकांनीही आक्षेप नोंदवले होते. परंतु, इरेला पेटलेल्या सत्ताधाऱ्यांनी तत्लाकीन आयुक्तांवर दबाव आणून ही योजना मंजूर करून घेतली होती. महापालिकेची आर्थिक स्थिती समाधानकारक नसताना, तसेच या रस्त्यांच्या कामांची आवश्यकता नसतानाही सत्ताधाऱ्यांनी हा प्रकल्प रेटून नेला होता. त्याला तत्कालीन आयुक्तांचीही साथ मिळाल्याने ही योजना वादात सापडली होती.

भाजपच्याच काही नगरसेवकांनी या योजनेवर आक्षेप घेतला असतानाही केवळ डांबरातल्या मलईसाठी घाईघाईत या योजनेचे प्रस्तावही मंजूर करून घेण्यात आले होते. सत्ताधारी भाजपकडून प्रशासनावर राजकीय दबाव टाकत सदर कामांची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्याला गती देण्यात आली असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या योजनेची लघीनघाई सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बेधुंद कारभाराला लगाम घालण्यासाठी आयुक्तपदी धडाकेबाज तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी नियुक्ती केली. त्यामुळे महापालिकेतली सर्व समीकरणे बदलली आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून गरजेनुसारच कामे हाती घेण्याचे फर्मान आयुक्त मुंढे यांनी काढले आहे. तिजोरीसाठी घातक असलेल्या या योजनेसंदर्भातील माहितीही त्यांनी मागवून घेतली आहे. बांधकाम विभागाच्या एकूणच कार्यशैलीवर बैठकांमध्ये नाराजी व्यक्त केल्याने ही योजनाच धोक्यात आली आहे. परिणामी निविदा प्रक्रिया सुरू असली, तरी त्याला प्रतिसाद मिळण्याचीही शक्यता कमीच आहे. आयुक्तांचे थेट लक्ष राहणार असल्याने काम नकोच, अशी भूमिका काही ठेकेदारांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपची महत्त्वाकांक्षी रस्तेविकास योजनाच संकटात सापडली आहे.

३८ कोटींचीही तपासणी

रस्तेविकास योजनेसोबतच शहरातील रस्त्यांवर डांबर ओतण्यासाठी मंजूर केलेल्या ३८ कोटींच्या प्रस्तावावरही आयुक्त मुंढेंची नजर राहणार आहे. विशिष्ट ठेकेदारांच्या साखळीसाठीच ही कामे मंजूर झालेली असून, या प्रस्तावावर भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे मलमपट्टीचीसाठी ३८ कोटींची उधळपट्टीही चर्चेत आली होती. परंतु, कामानुसारच पैसे अदा केले जातील, असा दावा बांधकाम विभागाने केला होता. मात्र, खड्डे बुजविण्यासाठी ३८ कोटींची गरज आहे का, याचीही निकड आता तपासली जाणार आहे. त्यामुळे हा प्रस्तावही वादात सापडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिशन गोदा स्वच्छता!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका मुख्यालयाच्या स्वच्छतेनंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गोदावरीच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले असून, मंगळवारी महाशिवरात्रीच्या सुटीच्या दिवशीही महापालिकेतील अधिकाऱ्यांना गोदावरी नदीकाठावर उतरवत पाणवेली, अस्वच्छता आणि नदीतल्या अतिक्रमणांवरून त्यांची कानउघाडणी केली. नदीतल्या सांडपाण्याला प्रतिबंध करण्यासह पाणवेली तातडीने काढण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. नदीतली सर्व अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश देत गोदावरी स्वच्छतेसाठी तीन आठवड्यांचा अल्टिमेटमही त्यांनी दिला.

महाशिवरात्रीची सुटी असल्याने आरामाच्या मूडमध्ये असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयुक्त मुंढे यांनी गोदावरीच्या काठावर उतरवले. महापालिकेची साफसफाई झाल्यानंतर आयुक्तांनी गोदावरी नदी स्वच्छतेचे दुसरे टार्गेट निवडून अतिरिक्त आयुक्त ते कर्मचारी यांना सकाळीच गोदाकाठ फिरवला. गोदावरीच्या स्वच्छतेची खूणगाठ बांधत त्यांनी सकाळी रामवाडी पूल, गोदा पार्क, गांधी तलाव, अहल्यादेवी होळकर पूल, रामकुंड, दुतोंड्या मारुती परिसर, रामसेतू, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, काझी गढी, संत गाडगेबाबा वसाहत, टाळकुटेश्वर पूल या परिसराची पाहणी करीत विविध समस्या जाणून घेतल्या. रामकुंड व गांधी तलाव परिसरात अनेक ठिकाणी कचरा आढळल्याने मुंढे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांची कानउघाडणी केली. नदीकाठात असलेल्या पाणवेलींवरूनही मुंढे यांनी बुकानेंना फैलावर घेत पाणवेढी का काढल्या नाहीत, असा जाब विचारला. त्यावर टेंडरचे कारण पुढे करणाऱ्या बुकानेंना नदी स्वच्छतेसाठी तीन आठवड्यांचा अल्टिमेटम दिला. दरम्यान, आयुक्तांनी प्रोजेक्ट गोदाचीही माहिती घेतली असून, हा प्रोजेक्ट समजून घेण्यासाठी प्रोजेक्ट गोदाचे थ्रीडीमध्ये सादरीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.

सांडपाण्यावर नोंदवला आक्षेप

नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जात असल्याबद्धलही मुंढे यांनी आक्षेप घेतला. रामवाडी पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत, तसेच गंगापूल मलनि:स्सारण केंद्राचीही पाहणी करून त्यांनी या केंद्रातील कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश यावेळी दिले. नदीकाठावरील चेंबर्सवर उगवलेल्या झाडांवरूनही त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. होळकर पुलाचीही पाहणी करून ढापे बंद करण्याचे आदेश दिले. येथील जॉगिंग ट्रॅकवरील रस्ते बंद करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. मुंढेंच्या दौऱ्याने अधिकाऱ्यांचीही धावपळ उडाली होती. या पाहणी दौऱ्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, किशोर बोर्डे, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने, कार्यकारी अभियंता संजय घुगे, एस. एम. चव्हाणके, उदय धर्माधिकारी, पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी, विभागीय अधिकारी नितीन नेर, बी. वाय. शिंगाडे, निर्मला गायकवाड यांच्यासह स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते.

प्रोजेक्ट गोदा थ्रीडीमध्ये

गोदावरी नदीच्या सुशोभीकरणासाठी स्मार्ट सिटी अभियानांतर्गत 'प्रोजेक्ट गोदा' राबविला जाणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी मंगळवारी या प्रोजेक्ट गोदाचीही फिल्डवर जाऊन पाहणी केली. या अंतर्गत असलेल्या प्रकल्पांची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. सदर प्रकल्पाबाबतची थ्रीडी इमेज सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या असून, या प्रकल्पाला लवकर गती देण्याचे आदेश दिले. त्यामुळे आयुक्तांपुढे प्रोजेक्ट गोदाचे पुन्हा थ्रीडी इमेजमध्ये सादरीकरण होणार आहे.

हा प्लॉट कोणाचा?

नदीकाठावर असलेल्या अस्वच्छतेवरून आयुक्त मुंढेंनी स्वच्छता निरीक्षकांसह आरोग्य अधिकाऱ्यांची खरडपट्टीच काढली. नदीकाठावर कचरा, तसेच डेब्रिस साचले असून, त्याकडे आरोग्य विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. नदीकाठावरील एका प्लॉटवर यावेळी मोठ्या प्रमाणावर डेब्रिस असल्याचे दिसून आले. त्यामुळे आयुक्तांनी या प्लॉटची मालकी कोणाची, अशी विचारणा केली. परंतु, अधिकाऱ्यांना याबाबत काहीच उत्तरे देता आली नसल्याने आयुक्त अधिकच संतप्त झाले. नदी परिसराचा संपूर्ण नकाशा असतानाही माहिती नसल्याबद्दल त्यांनी कानउघाडणी केली. स्मार्ट सिटी कंपनीतल्या एका महिला अधिकाऱ्यांनी हा प्लॉट खासगी विकसकाचा असल्याचे सांगितल्यानंतर त्यावरील डेब्रिस उचलण्याचे, तसेच विकसकाला नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजयोगाच्या माध्यमातून शांतीमय जीवन जगावे

0
0

ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाशिवरात्री हे पर्व निराकार शिवभगवंताच्या अवतरणाचे प्रतीक आहे. शिवभगवंत सकल मनुष्य आत्म्यांना मुक्ती आणि जीवनमुक्ती देण्यासाठी राजयोगा मेडिटेशन शिकवत आहे. आपल्यातील काम, क्रोध आदी विकारांना त्यागून आपणही राजयोगाच्या माध्यमातून सुख, शांतीमय जीवन जगावे, असे आवाहन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांनी केले.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय संस्थेतर्फे ८२व्या त्रिमूर्ती महाशिवरात्री महोत्सवाचे म्हसरूळ येथील प्रभू प्रासाद सभागृहात आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वासंती दीदी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक दत्ता पाटील उपस्थित होते. ब्रह्माकुमारी संस्था कुठल्याही धर्म, पंथ, जाती, वंश न मानता आध्यात्मिक व मूल्यजागृतीचे कार्य करते. याबद्दल दत्ता पाटील यांनी कौतुक केले. ब्रह्मा व्हॅली इंजिनीरिंग कॉलेजचे प्रा. सी. के. पाटील यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी शक्तीदीदी, पूनम दीदी, पुष्पादीदी, विनू दीदी, वीणा दीदी, आरती दीदी, अनिता दीदी, मनीषा दीदी, मीरा दीदी आदी उपस्थित होते.


'ब्रह्माकुमारी संस्था बंदींसाठी आशेचा किरण'

नाशिकरोड कारागृहातील बंदी हे डिप्रेशनमध्ये असतात. त्यांच्याकडून कळत नकळत गुन्हा घडलेला असतो. कालांतराने त्यांना त्यांची चूकही लक्षात येते. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. समाज, नातेवाईकसुद्धा त्यांच्याकडे तोंड फिरवतात. यामुळे काहीजण डिप्रेशनमध्ये जातात, तर काही आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. मात्र, ब्रह्माकुमारी संस्था कारागृहातील बंदीना मूल्य व आध्यात्मिक शिक्षण देऊन एक आशेचा किरण दाखवते. चांगले नागरिक घडविण्याचे कार्य संस्थेकडून होत आहे, असे प्रतिपादन येथील मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य अधीक्षक राजकुमार साळी यांनी केले.

येथील ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे महाशिवरात्री हा शिवजन्मोत्सव येथील सेवाकेंद्रात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी साळी बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संस्थेच्या मुख्य सेवाकेंद्र प्रमुख राजयोगिनी वासंती दीदी, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशोक कारकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिनेस्टाइल पद्धतीने पकडले संशयितास

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत जवळील एका ढाब्यावर देशी आणि विदेशी दारू पुरविण्यण्यासाठी आलेल्या एका कार चालकाला पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करीत मुद्देमालासह पकडले. पोलिस आणि संशयितामध्ये तब्बल १५ ते २० किलोमीटरपर्यंत हा थरार सुरू होता. पोलिसांनी संशयिताकडून ५० हजार रुपयांची दारू सापडली.

पिंपळगाव येथे दिंडोरी येथून उंबरखेडमार्गे कारने (एमएच ०४, बीक्यू ३१२५) देशी विदेशी दारू घेऊन पिंपळगाव येथील समीर पठाण येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिंपळगाव पोलिस स्टेशनचे पोलिस रवी बारहाते, रवींद्र चिने, पप्पू देवरे, एस. के. पाटील यांनी दोन मोटारसायकल घेऊन त्याचा पाठलाग केला. पोलिस आपला पाठलाग करीत असल्याचे समीरच्या लक्षात येताच त्याने कारचा वेग वाढविला. याच वेळी समोरून नितीन थेटे हे आपल्या कारने देवदर्शनासाठी चालले होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या कारला समीरच्या कारची धडक बसली नाही. वाहन कसेबसे नियंत्रित करून समीर पठानने एका ठिकाणी थांबवून पोलिसांच्या तापडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. तो शेतातून पळत असताना पिंपळगाव पोलिसांनी सापळा रचला आणि अखेरीस त्याला पकडले. पोलिसांनी १५ ते २० किलोमीटरपर्यंत त्याचा पाठलाग केला. पोलिसांनी त्याच्या गाडीतून दारूचे बॉक्स जप्त केले आहे. पोलिसांनी ५० हजारांचा मद्यसाठा व गाडी असा दीड लाखांचा मुद्देमाल जमा केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरच टिकेल मानवी संस्कृती

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

आजकाल मनुष्य पोटार्थी बनत चालल्याने शिक्षणाकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. माणसाने पोटार्थी असावे, पण माणूस बनण्यासाठी लागणारी मानवी मूल्ये माणसाने जोपासणे गरजेचे आहे. ही मानवी मूल्ये जपली गेली, तरच मानवी संस्कृती टिकेल, याकडे लक्ष वेधत साहित्यातून ही मानवी मूल्ये आपल्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य कवी, लेखक, साहित्यिक करतात, असे प्रतिपादन कवी खलील मोमीन यांनी येवला येथे केले.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित येथील कला व वाणिज्य कॉलेजच्या स्नेहसंमेलनांतर्गत वार्षिक पारितोषिक समारंभ शनिवारी झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी खलील मोमीन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेज विकास समितीचे सदस्य तथा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अॅड. माणिकराव शिंदे होते. शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून, माणूस घडविणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट्ये आहे. बऱ्याचदा शिक्षणात अपयश येते आणि त्यातून हे शिक्षण अपूर्ण सोडून देण्याची वृत्ती दिसते. मात्र, अपयश ही यशाची पहिली पायरी असून हे अपयश पचविता येणे जीवनात यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वाचे असते, असे यावेळी कवी खालील मोमीन म्हणाले. यावेळी मोमीन यांनी आपल्या खास शैलीत अनेक कविता सादर केल्या. आकाशकंदील, वड आणि परवड या सामाजिक जाणीवेच्या कविता सादर करतानाच त्यांनी समाजातील विषमता आणि हुंड्यासारख्या कुप्रथांवर विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले. कवी हा व्यक्त होणारा रसिक असतो, तर रसिक हा व्यक्त न होणारा कवी असतो. या दोघांनीही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. ज्ञान आणि श्रम या दोन्हींचा संगम माणसाला जीवनात यशस्वी करतो, असे प्रतिपादन अॅड. शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले. स्नेहसंमेलनातील शेला–पागोटे ही विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना देणारी आणि आनंद देणारी स्पर्धा असते असे सांगत कॉलेजच्या प्रगतीबद्दल त्यांनी संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
स्नेहसंमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी संस्थेच्या प्रगतीचा लेखाजोखा सादर केला. वरिष्ठ महाविदयालयाच्या शैक्षणिक अहवालाचे वाचन स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. आर. एन. वाकळे यांनी केले. विद्यापीठ प्रतिनिधीपदी सीमा खोकले, तर नॅक समन्वयकपदी प्रा. कमलाकर गायकवाड यांचे सत्कार करण्यात आले. मराठी विषयात प्रथम आलेल्या कु. स्वाती शिवाजी गोरे या विद्यार्थीनीस स्वर्गीय विठ्ठलराव गमे पारितोषिक, तर बी. कॉम. परीक्षेत प्रथम येणाऱ्या प्रेरणा गवळी या विद्यार्थिनीस रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोदावरी स्वच्छते’ला हरताळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. स्थानिक प्रशासनासह गोदावरी स्वच्छता मोहीम राबविणाऱ्यांचे देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे. अहिल्या-गोदावरी संगमावरील नदीपात्राची झालेली दुरवस्था पाहून येथे आलेल्या हजारो भाविकांचेही मन व्यथीत होत आहे.

काही महिन्यांपूर्वीच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन स्वत: या नदीपात्रात उतरले होते. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह गोदापात्राची सफाई केली होती. मात्र त्यानंतर गोदावरी स्वच्छतेकडे कोणीही लक्ष दिले नाही. नगरपालिका प्रशासन आणि सामाजिक संघटनाही याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. यावर्षी परतीचा पाऊस दमदार झाल्यामुळे नदीपात्रात बरेच दिवस पाणी वाहत होते. या पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ, मातीचे थर, साचलेला कचरा तसाच पडून आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, गोदापात्राची वाताहत झाली आहे. सन २००३ च्या कुंभमेळ्यात गोदावरी कृती आराखडा राबवितांना संपूर्ण नदीपात्राचे काँक्रीटीकरण करण्यात आले. त्यामुळे येथे स्वच्छता करणे सोपे जाते. मात्र तरी देखील नियमीत स्वच्छता होत नसल्याने गोदापात्राची सध्या अक्षरश: 'गटारगंगा' झाली आहे.

मैला सांडपाणी प्रकिया केंदात

निर्मलवारीत लक्षावधी वारकऱ्यांनी टॉयलेट बॉक्सचा वापर केला. मात्र त्यात संकलित झालेला लाखो लिटर मैला सांडपाणी प्रकिया प्रकल्पात विसर्जीत करण्यात आल्याची आता चार्च शहरात सुरू आहे. या केंद्राच्या बाजूस असलेल्या गोदावरी पात्रात निर्मलवारीनंतर पुढील दोन दिवस दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. याबाबत नगरसेवक विष्णू दोबाडे यांनी पालिका प्रशासनाला पत्र देऊन मलजल विल्हेवाट लावण्याच्या संपूर्ण प्रकियेची माहिती मागविली त्यास अद्याप उत्तर मिळालेले नाही.

शुद्धिकरणावर प्रश्नचिन्ह

आगोदरच कार्यक्षमतेवरून वादात असलेला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लक्षावधी लिटर मैला शुद्ध करण्यास सक्षम नाही. त्यातच निर्मलावरीचा संकलीत मैला या केंदातून सरळ नदीपात्रात आणि तेथून पुढे तो गौतमी बेझे धरणात पोहोचला असेल तर या धरणाचे पाणी पुन्हा त्र्यंबक पालिकेच्या नळावाटे येवून नागरिकांच्या आरोग्य समस्येत वाढ करणारे ठरणार आहे. निर्मलवारीत किमान तीन लाख भाविकांनी या शौचालयांचा वापर केला असेल तर त्यातून सरासरी 15 लाख लिटर मलजल तयार झाले. ते १ लाख क्षमतेच्या सांडपाणी प्रकिया केंद्रात टाकले असेल तर अवघ्या एका दिवसात त्याचे शुद्धिकरण होणे कदापि शक्य नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिहेरी तलाक विरोधातआज मूकमोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

लोकसभेत मंजूर झालेला व राज्यसभेत प्रस्तावित असलेल्या तिहेरी तलाक कायद्याविरोधात गुरुवारी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने येथे मुस्लिम महिलांचा मूकमोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाच्या आयोजनासाठी बोर्ड तसेच विविध मुस्लिम संघटना व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

गेल्याच आठवड्यात या मोर्चाच्या आयोजनासाठी येथील सुलेमानी मशिद येथे सेक्रेटरी हजरत मौलाना मोह. उमरैन महेफुज रहमानी यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर मुस्लिमम पर्सनल लॉ बोर्डाचे मौलाना मुफ्ती हसनैन नुमानी यांनी पत्रकार परिषद घेवून या मोर्चाच्या आयोजनाविषयी माहिती दिली होती. या मोर्चासाठी शहरातील सर्व मुस्लिम संघटना, शहर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल आदी पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवली असून या मोर्चाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

१५ फेब्रुवारी गुरुवारी दुपारी २ वाजता शहरातील एटीटी हायस्कूल येथून मोर्चास सुरुवात होईल. मोर्चात केवळ महिलांचा समावेश असेल. तसेच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा मूकमोर्चा अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येईल. येथे अपर जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात येवून मोर्चा पुन्हा एटीटी हायस्कूल मैदानात येणार आहे. येथे दुआँ पठण करून मोर्चाचा समारोप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी राज्यात असून दरवर्षी त्यात वाढ होत आहे. मात्र या परीक्षेची तयारी करताना विविध समस्यांना या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असून, या समस्यांविषयी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शहर व तालुक्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बुधवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

येथील मोसमपूल गांधी पुतळा येथून कॅम्प रोडमार्गे विद्यार्थ्यांचा मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत पोहचला. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात विविध फलक घेतले होते. अपंग विद्यार्थी देखील यात सहभागी झाले होते. तहसील कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार एम. एस. करंडे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. यात राज्यसेवेच्या, पोलिस भारतीच्या जागा वाढवाव्यात, शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, राज्य शासनाची रिक्त पदे भरवीत, एमपीएससीने तामिळनाडू पॅटर्न राबवावा, एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचे केंद्र नाशिक असावे, फी माफक असावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images