Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आखातातही होणार जय शिवरायचा गजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठी माणूस देशात असो की परदेशात, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू शकत नाही. स्वराज्य स्थापन करून गरीब जनतेची सेवा करणारा जगप्रसिद्ध राजा अशी ख्याती असणाऱ्या छत्रपतींची जयंती आता आखात अर्थात, 'यूएई'मध्ये ९ मार्च रोजी साजरी करण्यात येणार आहे.

आखातात स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला आपल्या देदीप्यमान इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्यक्रम पार पाडणाऱ्या इन्स्पायर इव्हेंट्स यूएईतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्राची लोककला पोवाडा, भारुड, एकांकिका, गवळण, लेझीम, बाल्या नृत्य, कोळीगीते इत्यादींचे सादरीकरण होणार आहे. त्याचप्रमाणे वाचन आणि खाद्यसंस्कृती यांसारखे कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय कीर्तनभूषण, शिवकथाकार व समाज प्रबोधक हभप योगेश्वर उपासनी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतील शिवचरित्र व्याख्यान या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे. 'यूएई'मधील शिवभक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रशेखर जाधव, संतोष मोरे, सुहास हांडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये आजपासून वाइन फेस्टिवल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाइनच्या ब्रँडिंगसाठी वाइन क्लस्टरच्या वतीने इंडिया ग्रेप हार्वेस्ट फेस्टिवल साजरा करण्यात येत आहे. त्यात सोमा विनियार्ड येथे शनिवारी 'मराठी तडका' हा कार्यक्रम होणार असून, त्यामध्ये लावणी नृत्य सादर करण्यात येणार आहे. हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये उत्तर महाराष्ट्रातील अडीचशे डॉक्टर्स 'आरोग्य आणि वाइन' या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती इंडिया ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी दिली.

इंडिया ग्रेप हार्वेस्टच्या माध्यमातून वाइनबाबत जनजागृतीसाठी ९ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान या वाइन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शनिवारी हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये २५० डॉक्टरांची बैठक होत असून, त्यामध्ये ग्रेप स्टॅम्पिंग, ग्रेप टू ग्लास, वाइनचा आरोग्यासाठी होणारा उपयोग याबाबत माहिती दिली जाणार आहे. कुंदेवाडी (ता. निफाड) येथील व्हिंटेज वायनरीला मुंबईसह परदेशी पर्यटक भेट देणार आहेत. या ठिकाणी आलेले वाइन पर्यटक कादवा नदीच्या कडेला असलेल्या २७ एकरांवरील कोर्सवर गोल्फ खेळण्याचा आनंद लुटतील. सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांच्या इतर गायकांनी सादर केलेल्या गाण्यांची मैफलदेखील रंगणार आहे. गंगापूर गावाजवळील सोमा वायनरी येथे शनिवारी सायंकाळी 'मराठी तडका : लावणी विथ वाइन' हा कार्यक्रम होईल. रविवारी सुला वायनरीच्या अलीकडे असलेल्या कोंबल स्ट्रीट येथे 'वॉक इन द क्लाउड' हा वायनरीवरील चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार हिरेंच्या वाहनाला कसाऱ्याजवळ धडक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या इनोव्हा कारला शुक्रवारी सकाळी कसाऱ्याजवळ चुकीच्या दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनामुळे अपघात झाला. यात आमदार हिरे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, अपघातानंतर स्कार्पिओमधील तरुणांनी पळ काढल्याने पाठलाग करताना आमदारांच्या अंगरक्षकाची या तरुणांसोबत बाचाबाची झाल्याने वाद निर्माण झाला.

अंगरक्षकाने रिव्हॉल्व्हर काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यामुळे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. मात्र, स्थानिक भाजप व शिवसेना नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटल्याचा दावा आमदार हिरे यांनी केला आहे.

आमदार हिरे शुक्रवारी सकाळी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे जात होत्या. कसारा घाटात माशाळा फाट्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओने त्यांच्या इनोव्हा कारला धडक दिली. त्यामुळे इनोव्हाचे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झाली नाही. धडक दिल्यानंतर स्कॉर्पिओमधील तरुणांनी तेथून पसार होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमदार हिरे यांनी या पाठलाग करीत कार अडवली. त्या वेळी कारमधील तरुणांनी स्थानिकांच्या मदतीने उलट आमच्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आमदार हिरे यांच्यावर केला. या वेळी आमदार हिरेंचे अंगरक्षक आणि या स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. अंगरक्षकाने रिव्हॉल्हर काढल्याचा आरोप स्थानिकांनी केला. त्यामुळे हा वाद चिघळून प्रकरण कसारा पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले. इनोव्हा कारचे नुकसान आणि आमदारांवर हल्ल्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू होताच, संबंधित तरुणांनी माफी मागितली. स्थानिक भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनीही मध्यस्थी करीत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याने आमदारांनी आपली तक्रार मागे घेत वादावर पडदा टाकला.

आमच्या वाहनाला धडक देऊन कारमधील तरुणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पाठलाग केल्यानंतर त्यांनीच आमच्याशी हुज्जत घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने अंगरक्षकाने प्रतिकार केला. त्यामुळे किरकोळ वाद झाले. मात्र, स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला.

- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभासदांसाठी ‘सावाना’चे मोबाइल अॅप

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com
Tweet : bharvirkarPMT

नाशिक : चोपडीवर बोरूच्या टाकाने वाचकांची माहिती नोंदविणारे सार्वजनिक वाचनालय काळाच्या गतीनुसार वेगवान होऊ पाहत असून, लवकरच सभासदांसाठी एक मोबाइल अॅप आणण्यात येणार आहे. या अॅपचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच ते सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नित्यनूतन राहण्यासाठी काळाच्या बरोबर राहणे गरजेचे असते. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात सावानामध्ये संगणकीकरणाचे वारे वाहू लागले होते. दुर्दैवाने ते बरेच रखडले. त्यामुळे संस्थेने ते काम नव्याने उभे करण्यासाठी कंबर कसली आहे. आता संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे संगणकीकरण झाल्यावर पुस्तक विभागात आधुनिकता येईलच, परंतु कारभार सुविहित होण्यासाठी त्याची फारच मदत होणार आहे. सावानाची वेबसाइटसुद्धा नव्याने तयार होत असून, सावानाचे एक स्वतंत्र अॅपसुद्धा नव्याने विकसित होत आहे. ते झाल्यानंतर वाचक सभासदांना घरबसल्या त्यांना हवे ते पुस्तक वाचनालयात आहे किंवा नाही ते समजेल, तसेच वर्गणीची सूचना, पुस्तक मुदत संपल्याची सूचना या व अशा इतर सेवा वाचकांना त्या मोबाइल अॅपवरच देणे शक्य होणार आहे. या मोबाइल अॅपचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच सभासदांच्या सेवेत हे अॅप देण्यात येणार आहे.

‘लायब्ररी ऑन व्हील’ मेपर्यंत

पुस्तके वाचण्यासाठी सभासदांनी, वाचकांनी वाचनालयापर्यंत जावे ही जुनी परंपरा आहे; मात्र काही ज्येष्ठांना, तसेच नोकरी करणाऱ्यांना ते शक्य होत नाही. वाचनाची इच्छा मात्र अतीव असते. अशांसाठी ‘लायब्ररी ऑन व्हील’ हा उपक्रम येत्या मेपर्यंत सुरू करणार असल्याचे सावानाचे प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी सांगितले. ‘लायब्ररी ऑन व्हील’ हा उपक्रम सुरू झाल्यास वाचकांना त्याचा फायदा होणार असून, मनासारखे पुस्तक या उपक्रमातून त्यांना मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर

$
0
0

सुनीता पाटील, दुर्गा गुडीलू, सुशीलकुमार शिंदे, रवींद्र कांगणे, डॉ. सुनीता बोर्डेंचा समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. विद्यापीठाच्या या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी शुक्रवारी नाशिक येथे केली. पुरस्कारमूर्तींमध्ये नाशिकच्या सुनीता पाटील यांना श्रमसेवा, मुंबईच्या दुर्गा गुडीलू यांना रुक्मिणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशाखा काव्य पुरस्कारांत ठाण्याच्या सुशीलकुमार शिंदे, सिन्नर (नाशिक) येथील कवी रवींद्र कांगणे आणि सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांचा समावेश आहे.

आपल्या श्रम आणि सेवेने उपेक्षित वर्गातल्या महिलांची उन्नती करणाऱ्या महिलेला किंवा महिलांच्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा 'श्रमसेवा पुरस्कार' नाशिक येथील स्मशानभूमीत काम करणाऱ्या सुनीता पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

रुक्मिणी पुरस्कार हा पुरस्कार वैदू या अतिशय मागासलेल्या समाजासाठी काम करणाऱ्या दुर्गा मल्लू गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी समाजातील ११२ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले आहे. समाजातील महिलांचे ५८ बचतगट स्थापन करून, त्यांना प्रौढ शिक्षणवर्गात बसवले. आज अशा प्रकारच्या ८४ महिला मुंबईतील हॉटेल्सना रोज ३००० चपात्या बनवून देण्याचे काम करतात. टिफिन सर्व्हिसबरोबरच अनेक शाळांना नाश्ता बनवून देण्याचे काम करीत आहेत. रोख २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार (दि. २७) रोजी सायंकाळी पाच वाजता गंगापूर रोडवरील, शगून हॉल, मते नर्सरीमध्ये होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी किशोर पाठक उपस्थित राहणार असून, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई वायुनंदन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल शिक्षण सेवा केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. विजया पाटील, जनसंपर्क विभागाचे प्रमुख संतोष साबळे आदींनी केले आहे.

विशाखा काव्य पुरस्कार

कवी कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' या काव्यसंग्रहाच्या नावाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे 'विशाखा काव्य पुरस्कार' खालील काव्यसंग्रहांना जाहीर झाले आहेत. प्रथम २१ हजार रुपयांचा पुरस्कार वर्तकनगर (ठाणे) येथील नवोदित कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या 'शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' काव्यसंग्रहास, १५ हजार रुपयांचा द्वितीय पुरस्कार 'येठण' या सिन्नर (नाशिक) येथील कवी रवींद्र कांगणे यांच्या काव्यसंग्रहास, तर १० हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार सांगली येथील कवयित्री डॉ. सुनीता बोर्डे-खडसे यांच्या 'अस्तित्वाचा अजिंठा कोरताना' या काव्यसंग्रहास दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅपी स्ट्रीट’ची उद्या नाशिकरोडला धमाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहतुकीची कोंडी, प्रदूषणासह धकाधकीच्या जीवनातील टेन्शनपासूनही सुटका करून घेण्याची संधी येत्या रविवारी नाशिककरांना ‘हॅपी स्ट्रीट’ या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. बिटको पॉइंट ते कोठारी कन्याशाळा, जेलरोड येथे रविवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी ७ ते ९.३० या वेळेत नाशिकरोड येथील रहिवाशांची सकाळ हॅपी होणार आहे.

नेहमीच वाहतुकीने गजबजलेले रस्ते आपल्यासाठी खुले होणे, हा विचारच आपल्याला सुखावून जातो. त्यातच या रस्त्यांवर विविध खेळ, उपक्रम, डान्स, गाणी होणार असतील तर त्याची मजाच न्यारी असते. हीच मजा हॅपी स्ट्रीटमधून अनुभवण्यास मिळत असल्याने हा उपक्रम नेहमीच लोकप्रिय ठरला आहे. त्यामुळेच नाशिकमध्ये कॉलेजरोड व गोविंदनगरमधील हॅपी स्ट्रीटला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता वेळ आहे नाशिकरोड, जेलरोडवासीयांना हॅपी करण्याची. येत्या रविवारी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, झुम्बा, स्केटिंग, मेहंदी, पारंपरिक खेळ, योगासने, सायकल राइड, स्केच, टॅटू, वारली पेंटिंग, पेपर आर्ट, रांगोळी, बासरीवादन अशा अनेक कलाप्रकारांचे सादरीकरण या वेळी विविध ग्रुप्सतर्फे होणार आहे. पहिल्या दोन हॅपी स्ट्रीटला धमाल केलेला प्रसिद्ध विनोदी अभिनेता अंशुमन विचारे नाशिकरोडलाही येणार असून, त्याला भेटण्याचीही संधी या वेळी मिळणार आहे.

हॅपी स्ट्रीटमध्ये एलिट फिटनेस क्लब, प्रज्ञा फिटनेस अँड क्लब, एमएच १५ रॉक्स, द गिटार वर्ल्ड, डेकेथलॉन स्पोर्टस गुडस मॉल, आर. डी. भडांगे स्केटिंग ग्रुप, मानव उत्थान मंच, धीरज फोटोग्राफी, रचना आर्ट, १८१ टॅटू, शंकर कंदेरा सिंगिंग, किट्टू कॉलीग आर्ट, नाशिक सायकलिस्ट असोसिएशन, एनडीज क्रिएटिव्ह ग्रुप, स्पार्टन हेल्थ सेंटर, प्राइस मेहंदी आर्ट, खगोल मंडळ, जादुगार विजयराज, पूजाज आर्ट अँड क्राफ्ट, ओम रंगोत्सव क्लासेस, अक्षरयज्ञ अॅकॅडमी, शिल्पकार वरुण भोईर, रंगलहरी आर्ट, नम्रता क्रिएशन, अंजलीज विसपुते आर्ट, दीपाज आर्ट सहभागी होणार असून, ते आपापली कला सादर करणार आहेत.

जिंका सरप्राइझ गिफ्ट

महाराष्ट्र टाइम्स हॅपी स्ट्रीटमध्ये तुम्हाला सरप्राइझ गिफ्ट लकी ड्रॉद्वारे जिंकण्याची संधीदेखील मिळणार आहे. त्यासाठी ‘स्वच्छ सोसायटी- स्वच्छ नाशिक’ या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. आपली सोसायटी, अपार्टमेंट स्वच्छ करतानाचा फोटो आणि स्वच्छ झाल्यानंतरचा फोटो तुम्हाला सिटिझन रिपोर्टरच्या अॅपवर पाठवायचा आहे. फोटो पाठवताना सोसायटीचे नाव, पूर्ण पत्ता आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. ‘हॅपी स्ट्रीट-स्वच्छ सोसायटी’ या मथळ्याखाली फोटो, सोसायटीचे नाव, पदाधिकाऱ्याचे नाव पाठवायचे आहे. विजेत्या सोसायट्या, तसेच हॅपी स्ट्रीटमध्ये भाग्यवंतांना प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे याच्या हस्ते सरप्राइझ गिफ्टही मिळू शकते.

इच्छुकांना संधी

हॅपी स्ट्रीटमध्ये कला सादर करण्याची इच्छा असलेल्यांनी आजच ०२५३- ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकता वाढीसाठी नवीन तीन योजना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील युवकांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी जाहीर केलेल्या छत्रपती राजाराम महाराज अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे नवीन तीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेच्या नियम व अटींनुसार पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे राज्यातील राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी बँक व नागरी बँक ज्या सिबिल प्रणाली सदस्य आहेत, अशा बँकांनी आपल्या नियम आणि अटींना अनुसरून करावीत, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका सुचिता भिकाणे यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत बँकेचे हप्ते वेळेवर अदा केल्यास लाभार्थ्यांना, गटांना व्याज परतावा त्यांच्या आधार लिंक खात्यावर महामंडळातर्फे दिला जाणार आहे. या योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना आहेत.

www.mahaswayam.in या संकेतस्थळावरून लाभार्थ्यांचे मंजुरी पत्र पाहून गरजू व्यक्तींना बँकेने आपल्या नियमानुसार कर्ज देऊन सहकार्य करावे, महामंडळाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सहाय्यक संचालक (रोजगार व कौशल्य विकास) कार्यरत आहेत. तसेच महामंडळाने जिल्हा समन्वयकही नियुक्त केलेले असल्याची माहिती महामंडळातर्फे देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांचे धाबे दणाणले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हा बँकेला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी गुरुवारपासून तालुकानिहाय दौरे सुरू केले आहेत. सत्कार नको पण वसुलीसाठी प्रयत्न करा, असे स्पष्ट आदेशच आहेर यांनी दिल्याने शुक्रवारी जिल्हा बँकेच्या पथकाने तालुक्यातील बड्या थकबाकीदारांकडे भेटी देत अंतिम नोटीस बजावली आहे. तसेच थकबाकी भरण्याचे आवाहन केले. तालुक्यात जिल्हा बँकेचे तिन्ही विभाग मिळून एकूण २५ शाखा असून, २०० कोटीहून अधिक थकबाकी वसूल होणे बाकी आहे.

तालुक्यातील मालेगाव, निमगाव, दाभाडी अशा तिन्ही विभागात वसुली पथकाने दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात जिल्हा बँक पथकाने धनदांडगे असलेल्या बड्या थकबाकीदारांना अंतिम नोटिसा बजावल्या आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पथकाने थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत. ही थकबाकी न भरल्यास संबंधित थकबाकीधारकांच्या मालमत्ता जप्ती व लिलावाचे देखील संकेत पथकाने दिले आहेत. थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेचे पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.

कर्जमाफी योजनेस प्राधान्य

जिल्हा बँकेकडून सुरू असलेल्या वसुली मोहिमेत प्राधान्याने शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत १.५० लाखांवरील थकबाकीदार असलेल्या सभासदांना उर्वरित रक्कम भरून कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहून नये यासाठी गावनिहाय याद्या करण्याचे निर्देश अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले आहेत.

अशी आहे थकबाकी

मालेगाव विभाग

६५ कोटी १३ लाख

निमगाव विभाग

१०९ कोटी ३५ लाख

दाभाडी विभाग

८५ कोटी ५० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठी दिनानिमित्त मोफत ग्रंथघर उपक्रम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सोशल मीडिया किंवा कॉम्प्युटरमुळे तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. वाचाल तर वाचाल या उक्तीनुसार वाचन करणे ही अत्यंत महत्त्वाची गरज असल्याने आता माय मराठी मोफत ग्रंथघर उपक्रमाचा प्रारंभ मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी दिली.

कविवर्य कुसमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने मराठीचे वाचक वाढावेत आणि विविध विषयांची माहिती देणारी पुस्तके, ग्रंथ वाचकांना विनामूल्य उपलब्ध व्हावी, या हेतूने माय मराठी मोफत ग्रंथघर हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील जुने सिडकोतील बाळासाहेब ठाकरे उद्यानालगतच्या नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात हे ग्रंथघर सुरू करण्यात येणार आहे. याठिकाणी विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील नागरिकांना शेकडो पुस्तके आणि ग्रंथसंपदा वाचनासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. २६) सायंकाळी या ग्रंथघराचा शुभारंभ होणार आहे. मराठीची गोडी वाढावी, वाचक संख्या वाढावी आणि विविध विषयांचे ज्ञानभांडार सर्वांना विनामूल्य उपलब्ध व्हावे या हेतूने हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक तिदमे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण कारवाईविरोधात एकजूट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने शहरात हॉकर्स झोनची बलपूर्वक अंमलबजावणी सुरू झाली असून, रस्त्यावरील टपरीधारक, फेरीवाले, हॉकर्सविरोधात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर रोजगार बचाव मोर्चा काढण्यात आला. फेरीवाल्यांना विश्वासात घेऊनच फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी तसेच अतिक्रमण निर्मूलन मोहिम तातडीने थांबवावी अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली.

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी जोमाने सुरू करण्यात आली असून, प्रमुख रस्त्यांवरील टपरीधारक, फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढले जात आहे. त्यामुळे हॉकर्सधारकांच्या संघटना संतप्त झाल्या आहेत. शुक्रवारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जुने नाशिक परिसरातील भद्रकाली मार्केट येथून सकाळी अकराच्या सुमारास हा रोजगार बचाव मोर्चा काढण्यात आला. अतिक्रमण कारवाईच्या निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा महापालिका मुख्यालयावर धडकला. यावेळी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत, कारवाईचा निषेध करण्यात आला. शहर फेरीवाला समितीची मंजुरी नसताना १५ मार्च २०१६च्या महासभेत मान्यता देण्यात आलेल्या हॉकर्स झोनच्या ठरावाची अंमलबजावणी स्थगित करावी, महापालिकेने यापूर्वी केलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणात बोगस नावे घुसवली असून फेरीवाल्यांचे फेरसर्वेक्षण केले जावे. हॉकर्स, नो हॉकर्स झोनविषयी संघटनेने सुचविलेल्या पर्यायांची तातडीने अंमलबजावणी केली जावी. हॉकर्स नोंदणी व दैनंदिन करवसुलीसाठी शुल्काबाबत शहर फेरीवाला समितीची बैठक घेऊन चर्चा करावी. तोपर्यंत महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. हॉकर्स, टपरीधारक आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचा जप्त केलेला माल त्वरित परत करावा अशीही मागणी करण्यात आली. या मोर्चात संघटनेचे सुनील संधानशिव, जावेद शेख, पुष्पा वानखेडे, नवनाथ लव्हाटे, चंद्रकला पारवे, जया पाटील आदींसह शेकडो टपरीधारक, हॉकर्स सहभागी झाले होते.

निवेदनावरून वाद

हॉकर्स व टपराधारक संघटनेच्या वतीने मोर्चानंतर आयुक्तांना निवेदन देण्याची मागणी केली. परंतु आयुक्तांनी हॉकर्सना भेटण्यास नकार देत, चार वाजेची वेळ दिली. अतिरिक्त आयुक्तांनीही भेट नाकारल्याने हॉकर्स संतप्त झाले. त्यांनी कार्यालयालयाबाहेरच ठिय्या मांडला. जोपर्यंत आयुक्त भेट देत नाहीत, तोपर्यंत जाणार नाही असा आग्रह धरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठ उलगडणार वैद्यकशास्त्रातील चरित्रनायकांचा इतिहास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील १८ व १९व्या शतकात आधुनिक वैद्यकशास्त्र, आयुर्वेद आणि होमिओपॅथी विद्याशाखेत काम केलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्वांचा परिचय आता लवकरच सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण- शिल्पकार चरित्रकोष यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, येत्या तीन ते चार महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वास येण्याची शक्यता विद्यापीठाने वर्तवली आहे. या चरित्रकोषामुळे वैद्यकशास्त्रातील माहिती मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे.

आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी याबरोबरच आयुष, युनानी चिकित्सा, सिद्ध चिकित्सा, निसर्गोपचार, योग, दंतचिकित्सा, नर्सिंग आदी विषयांबद्दल वैद्यकशास्त्राबरोबरच सर्वसामान्य चिकित्सक व्यक्तींनाही उत्सुकता असते. या शास्त्राचा इतिहास, विकास, त्याच्याशी जोडलेल्या व्यक्ती या विषयी माहिती जाणून घेण्यासाठीदेखील शोधाशोध केली जाते. हीच माहिती जर आपल्या मातृभाषेत मिळाली, तर ते समाधान मोठे असते. त्यामुळेच हा चरित्रकोष तयार करण्यात येत आहे. यामध्ये आयुर्वेद, ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी या तीन मुख्य विभागांमध्ये या तिन्ही क्षेत्रांमधील व्यक्तींचे चरित्रे त्या त्या चिकित्सांचा आढावा घेण्यात आला आहे. तज्ज्ञांनी लिहिलेल्या तिन्ही विभागांच्या प्रस्तावना आणि परिशिष्ट्ये म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या त्या त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था, कॉलेज, नियतकालिके यांची सविस्तर माहिती अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारी आहे. याशिवाय 'इतर चिकित्सा' या चौथ्या विभागामध्ये आयुष, युनानी चिकित्सा, सिध्द चिकित्सा, निसर्गोपचार, योग, दंतचिकित्सा, नर्सिंग हे विषय मांडण्यात येणार आहेत.

या प्रकल्पात समावेश असलेल्या चरित्रनायकांविषयीची माहिती विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आली आहे.

नावे सुचविण्याचे आवाहन

या चरित्रात महाराष्ट्र राज्यात वैद्यक शास्त्रामध्ये काम केलेल्या व्यक्तींची नावे प्रकल्पाव्दारे समोर येणार आहेत. त्यासाठी नावे सुचविण्याचे जाहीर आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. तसेच, या प्रकल्पात आधुनिक वैद्यकशास्त्र, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या तिन्ही विभागात काम केलेल्या चरित्रनायकांची माहितीचे संकलन अंतिम टप्प्यात आले असून, याबाबत माहिती असल्यास विद्यापीठाच्या pr@muhs.ac.in या ई मेलवर येत्या ३ मार्चपर्यंत पाठविण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारपिटीची शक्यता धूसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, वातावरणातील बदलांमुळे शनिवारी २४ फेब्रुवारीला पाऊस आणि गारपीट होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने धास्तावलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रब्बीची पिके हातातोंडाशी आली असताना नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात २३ फेब्रुवारीपासून पुढील ४८ तासांत हवामान विभागाने गारपिटीची शक्यता वर्तवली होती. शेतांमध्ये कापून ठेवलेली पिके सुरक्षित स्थळी हलविण्यासह नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षकांनी केले होते. नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी, तर काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. नगदी पिकांना याचा सर्वाधिक धोका होता. द्राक्ष, कांदा यांची काढणी सध्या सुरू असून, रब्बी हंगामही नुकताच सुरू झाला आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका या दोन पिकांना बसण्याची शक्यता अधिक होती. याशिवाय हरभरा, गहू ही पिकेही कापणीला आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

परंतु, शुक्रवारी सकाळी वर्तविण्यात आलेल्या हवामानाच्या अंदाजात वातावरणातील बदलांमुळे पाऊस तसेच, गारपिटीची शक्यता धूसर झाल्याचे कळविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतची माहिती दिली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हवामान काहीसे ढगाळ राहणार असल्याचेही पुणे वेधशाळेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीविरोधात सर्वपक्षीय मोट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या जबर करवाढीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार असून, या निर्णयाविरोधात आता सर्वपक्षीय आंदोलनाची मोट बांधली जाणार आहे. शिवसेनेच्या पुढाकाराने शहरातील सर्वपक्षीय नेते आणि मराठवाड्याच्या पाणीआंदोलनाच्या धर्तीवर भाजपविरोधात रान उठवणार असून करवाढीच्या कायदेशीर बाबी तपासण्यासह जनजागृती आंदोलन सुरू केले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, माकपासह लहान पक्षांशीही चर्चा केली जाणार आहे. महापौरांनी करवाढीसंदर्भात सर्व पक्षांना एकत्र बोलावून चर्चा करावी, अन्यथा नाशिककरांना बरोबर घेऊन मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा बोरस्ते यांनी दिला. काँग्रेसने शुक्रवारी धरणे आंदोलन केले, तर राष्ट्रवादीनेही विभागीय कार्यालयांवर हल्लाबोल मोर्चे सुरू केले आहेत. त्यानंतर शिवसेनेनेही यात उडी घेतली असून शिवसेना दोन वर्षांपूर्वी मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून करण्यात आलेल्या सर्वपक्षीय जनआंदोलनाच्या धर्तीवर एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहे. बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची माहिती दिली. जनआंदोलनासह कायदेशीर बाबींचीही पडताळणी केली जाणार आहे. जनतेत जाऊन या करवाढीविरोधात जनजागृती केली जाणार आहे. सध्या किती कर वाढणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे महापौरांनी तातडीने यााबाबत पुढाकार घेऊन करवाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कायदेशीर लढाई

स्थायी समितीने महासभेवर केवळ १८ टक्के करवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु प्रशासनाने परस्पर त्यात बदल करत, भरमसाठ करवाढ केली आहे. त्यामुळे अशा प्रकारे स्थायीच्या ठरावात बदल करता येत नसतानाही, प्रशासनाने परस्पर फेरबदल केले आहेत. त्यामुळे याबाबतची कायदेशीर पडताळणी केली जात आहे. यावर प्रशासनालाही कायदेशीर बाबींचा अभ्यास करावा लागणार आहे.

भाजपचा आवाज दबला

शिवसेनेने अन्य पक्षांसोबतच भाजपलाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचाही भेट घेणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. भाजपच्या नगरसेवकांनाही करवाढीविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महासभेत निवडक नगरसेवकांनी या प्रस्तावाचे समर्थन केले असून मोठ्या संख्येने भाजपचे नगरसेवक या करवाढीच्या विरोधात असल्याचा दावाही बोरस्ते यांनी केला आहे. भाजपच्या नगरसेवकांवर प्रशासनाचे दडपण असून भाजपचा आवाज गायब झाल्याची टीकाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण निर्मूलनाचा धडाका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील अत्यंत गजबजलेला व अतिक्रमणाचा विळखा असलेल्या त्रिमूर्ती चौकाचा श्वास मोकळा करण्यासाठी महानगरपालिकेने दोन दिवसांपासून मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी सुमारे तीस अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी महानगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण काढले असून, यात झालेल्या नुकसानीची भरपाई मागणार असल्याचा दावा काही दुकानदारांनी केला. मोहिमेत भेदभाव झाला असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मात्र, त्रिमूर्ती चौकातील अतिक्रमणांबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे या चौकातील वाहतुकीचा प्रश्न मिटणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

त्रिमूर्ती चौकात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक, याच ठिकाणी असलेल्या दोन शाळा, बस थांबे, भाजी मार्केट यामुळे या रस्त्यावर कायमच रहदारी असते. शाळा सुटण्याच्या वेळी सायंकाळी येथे बाजार भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होऊन अनेक वेळा अपघातही झाले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने यावर उपाय म्हणून पहिल्या टप्प्यात रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोन करून त्यांना पाटीलनगर मैदानाजवळ जागा दिली. त्यानंतर महानगरपालिकेने रस्त्याच्या लगत असलेल्या दुकानदारांच्या अतिक्रमणांवर हातोडा चालवला. पहिल्या दिवशी सुमारे पन्नास दुकानांसमोरील अतिक्रमणे काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीस दुकानांसमोरील पत्र्यांचे शेड, ओटे यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. पालिकेने अवधी द्यावा अशी मागणी झाल्याने काही ठिकाणी दुकानदार व कर्मचारी यांच्यात तुरळक वाद झाले. एका दुकानासमोर असलेला फलक परवानगी घेऊन लावण्यात आला असतानाही प्रशासनाने तो काढून टाकल्याने संबंधित दुकानदाराने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

आज दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक व दत्त मंदिर परिसरातील रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढताना यात हातगाड्या, पानटपऱ्या, कुल्फीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्याचे सोडून प्रशासनाने सर्वसामान्य जनतेवर अन्याय केल्याची भावना काही दुकानदारांनी व्यक्त केली. त्यामुळे आता पालिकेने सर्वच अतिक्रमणे काढली पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

मोहिमेने समाधान

सिडकोतील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रस्त्यांवरून रिक्षाही जाणे मुश्किल झाले आहे. यापूर्वी अनेकदा अतिक्रमण काढण्याच्या घोषणा झाल्या, परंतु प्रत्यक्षात कारवाईसाठी नवनियुक्त आयुक्तांनाच पुढाकार घ्यावा लागल्याची चर्चा सुरू होती. सिडकोतील अतिक्रमण महानगरपालिकेने काढावे की सिडकोने यावरून यापूर्वी अनेकदा वाद झाले आहेत. मात्र, आता पालिकेने ही मोहीम हाती घेतल्याने सिडकोतील अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार असल्याचे चित्र आहे. यामुळे सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असंघटित बांधकाम मजुरांचे होणार कल्याण

$
0
0

कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी नोंदणी सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

असंघटित क्षेत्रातील बांधकाम मजुरांसाठी राज्य सरकारने कल्याणकारी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. अशा २८ योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी बांधकाम मजुरांनी आवर्जून नोंदणी करवून घ्यावी, असे आवाहन महापौर रंजना भानसी आणि निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी शुक्रवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बांधकाम मजूर नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण कल्याणाच्या दिशेने कामगार विभागाने कल्याणकारी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. यावेळी कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे, सहायक आयुक्त किशोर दहीफळकर, रविराज इळवे आदी उपस्थित होते. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून २२ मार्चपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

इमारत, पदपथ, रस्ते, रेल्वे, सिंचन, विमान प्राधिकरण, टेलिफोन, विद्युत पारेषण, पूर नियंत्रण, बोगदे, पूल, तेल व वायूची जोडणी टाकणे, टेलिव्हीजन टॉवर्स, इत्यादींचे बांधकाम, फेरबदल, दुरुस्ती, बांधकाम पाडणे यांसारख्या सर्व प्रकारच्या कामांमध्ये सहभागी होणाऱ्या मजुरांची नोंदणी या मोहिमेंतर्गत करून घेण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात काही मजुरांना प्रातिनिधीक स्वरूपात नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी खेडकर यांनी मनरेगाच्या कामावर असणाऱ्या कामगारांची नोंदणी तत्काळ केली जाईल, अशी ग्वाही दिली. तत्पूर्वी मंडळाच्या वतीने सर्व जिल्ह्यांमध्ये कामगार नोंदणी मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातही व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे त्याचे प्रक्षेपण दाखविण्यात आले.

नोंदणीसाठी शासन कामगारांच्या दारी

जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात ५० हजारांहून अधिक कामगार आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यापैकी अवघ्या १६ हजार कामगारांची प्रत्यक्षात नोंदणी झाली आहे. सर्व कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी 'शासन कामगारांच्या दारी' हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांनी दिली. इमारत व इतर बांधकामांवर ठेकेदारामार्फत येणारे कामगार अनोंदीत आहेत. या कामगारांना नोंदणीचा लाभ मिळावा, यासाठी सरकारी व निमसरकारी कार्यालयांना नोंदणीचे अधिकार देण्यात आले आहेत. नोंदणीसाठी एखाद्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे कामगार बेरोजगार होतात. कामगाराने ९० दिवस काम केल्याचा पुरावा बांधकाम व्यवसायिकाकडून सादर करणे बंधनकारक आहे. सलग ९० दिवस काम मिळत नसल्याने राज्यात लाखो बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेपासून वंचित आहेत. बहुतांश कामगारांना आपल्यासाठी असे कल्याणकारी मंडळ अस्तित्वात आहे, याची माहितीच नाही. त्यामुळे बांधकाम साईटसवर जाऊन नोंदणीचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात मालेगाव वगळता १० हजार २७७ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी सिडको, सातपूर, अंबड, नाशिकरोड, पंचवटी, आणि जुने नाशिक या सहा विभागीय कार्यालयांमध्ये विशेष कक्ष स्थापण्यात येणार आहे. क्रेडाई या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांचेही मजूर नोंदणीसाठी सहकार्य घेतले जाईल.

- रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपने महासभेत भरमसाठ करवाढीला मंजुरी दिल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. या करवाढीविरोधात राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसच्या वतीने महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. भाजपने केलेली करवाढ ही अन्याय्य असून, ती रद्द करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली. ही करवाढ मागे न घेतल्यास काँग्रेसकडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहराध्यक्ष शरद आहेर यांनी दिला.

मंगळवारच्या महासभेत सत्ताधारी भाजपने निवासी मालमत्ता करात ३३, अनिवासी मालमत्ता करात ६४ तर औद्योगिक मालमत्ता करात ८२ टक्के अशी भरमसाठ करवाढ केली आहे. या करवाढीच्या दिवशीच विरोधी पक्षांनी या करवाढीला विरोध करीत, आंदोलनांचा इशारा दिला होता. परंतु, तरीही सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केल्याने विरोधकांनी रस्त्यावर उतरून करवाढीचा निषेध सुरू केला आहे. माकपच्या आंदोलनानंतर शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, पश्चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेलमता पाटील, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, महिला काँग्रेस अध्यक्ष वत्सला खैरे, नगरसेवक राहुल दिवे, विमल पाटील, आशा तडवी, बबलू खैरे, वसंत ठाकूर, लक्ष्मण जायभावे, सुरेश मारू यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करीत, करवाढीचा तीव्र निषेध केला. या करवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी व उद्योजकांना मोठा फटका बसणार आहे. शहरात उद्योग येत नसताना, उद्योगांवर करवाढ लादल्याने ते बाहेर जाण्याची भीती आहे. त्यामुळे ही करवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ही करवाढ तातडीने मागे घेतली नाही तर लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन उभारू, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही निवेदन देऊन करवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तायक्वांदो स्पर्धेत ब्रह्मा व्हॅलीचे यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशनतर्फे नूतन विद्यामंदिर भगूर, देवळाली कॅम्प येथे आयोजित खुल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ब्रह्मा व्हॅलीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामिगरी करीत प्रथम क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत ब्रह्मा व्हॅलीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांने शानदार कामिगरी करीत पदाकांची लयलूट केली. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक प्रेम गुरुंग यांचे मार्गदर्शन लाभले. पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, संचालक गुंजन सिंग, प्राचार्य चंद्रकांत शिरसाठ यांनी अभिनंदन केले. सुवर्णपदक विजते विद्यार्थी पुढीलप्रमाणे

सुवर्णपदक : प्रीतम गुरुंग, मानसी देशमुख, पुनीत पाटील, सार्थक अवसरकर, दीपक अवसरकर, अन्मोल कदम, संतोष भोया, प्रीतम वसावे, विश्वजीत घोदा, जॉण्टीराज चौधरी, छत्रपालन भोया, दर्शन मलकरी, अनिता चौधरी, ईश्वरी काचोळी.

रौप्यपदक : तुषार गांगुर्डे, साहील वसावे, सागर मधे, दिग्विजय बागूल, नागेश हिरकुडे, लीना गवळी, माया फुपाणे, रोहिणी पवार, मानसी राऊत, प्रीती पारधी, प्रज्ञा गिते, उज्ज्वल सोनार.

कांस्यपदक : कांतिलाल वसावे, उत्कर्ष कडू, तेजस चौधरी, सागर महाजन, चेतन एकवदे, पूजा दळवी, अरुणा गोविंद, प्रतीक्षा भुसारे, पूजा कुथडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायग्नोस्टिक किट पेशंटच्या मुळावर

$
0
0


arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : आजारपण ओळखण्यात डॉक्टरांना सहाय्य करणाऱ्या वेगवेगळ्या डायग्नोस्टिक किटच्या वारेमाप वापरातून पेशंटचे खिसे हालके करण्याची चढाओढ सर्वत्र सुरू आहे. डॉक्टरांचे वाढलेले तपासणी शुल्क आणि डायग्नोस्टिक किटचा वापर असा दुहेरी 'इलाज' पेशंटवर होत आहे. तंत्रज्ञानाची उपलब्धता वाढते तशी त्याची किंमत कमी व्हायला हवी. आरोग्य क्षेत्रात नेमके उलटे वारे वाहत असून, त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

कुटुंबाच्या प्राथमिक गरजांमध्ये आरोग्याचे स्थान सर्वात वरचे आहे. महागडी आरोग्य सुविधा सर्वसाधारण कुटुंबाच्या आवाक्याबाहेर चालली आहे. बुद्धिमत्ता आणि अनुभव या आधारावर एकाच विभागाचे डॉक्टर वेगवेगळे शुल्क आकारतात. किमान ५०० ते दीड हजारांपर्यंत शुल्क आकरले जाते. दुसरीकडे पेशंटकडून अतिरिक्त पैसे काढण्यासाठी डायग्नोस्टिक किटचा वापर खुबीने वापर होत आहे. यामध्ये एमआरआय, सिटीस्कॅन, एक्स-रे तसेच रक्त-लघवी तपासणीचा समावेश होतो. नव्याने आलेल्या महागड्या मशिनरींचे, हॉस्पिटलमध्ये देण्यात येणाऱ्या इतर सुविधांचे पैसे वसूल करण्यासाठी आवश्यकता असो की नसो, पेशंटला अशा चाचण्यांना समोरे जावेच लागते. एमआरआय, सिटी स्कॅन तसेच एक्स रे मशिन्सचा वापर केव्हा आणि कसा करायचा, हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी त्या डॉक्टरचा असतो. याचाच फायदा घेऊन आलेल्या पेशंटला या चाचण्या करण्यास भाग पाडले जाते. कंबर दुखणे एखाद्या औषधाने सहज थांबू शकते, याची जाणीव असलेले डॉक्टर सुरुवातीलाच एक्स रे काढण्याचे फर्मान सोडतात. मुंग्या येणे या प्रकारात हाडांची झालेली झिज किंवा दबलेली नस हे महत्वाचे कारण माहिती असताना डॉक्टर सिटी स्कॅन किंवा एमआरआयचा आग्रह धरतात. रक्त तपासणीबाबत तर खूपच ओरड आहे. थायरॉईडसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी आजमितीस पाच हजार रुपयांपर्यंतच्या तपासण्या केल्या जातात. या तपासण्याअंती तसेच डॉक्टरांच्या उपचारानंतर १०० टक्के फरक पडतोच असे नाही.

तंत्रज्ञान जुने, पैसे मात्र वाढलेले

कोणतेही तंत्रज्ञान बाजारात आले की दिवसेंदिवस त्याची किंमत कमी होत असते. आरोग्य क्षेत्रात मात्र हे वारे उलटेच वाहते. सुरुवातीस आलेल्या मशिनरींनुसार किमती वाढवल्या जातात. त्यानंतर हजारो पेशंटच्या तपासणीनंतरदेखील तपासणी फी कमी होत नाही. किंबहुना त्यात वर्षागणिक वाढ केली जाते. महागड्या मशिनरी असलेल्या ठिकाणी आवश्यकता असो किंवा नसो, थेट तपासणी ठरलेलीच असते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ प्रकरणी एकच गुन्हा दाखल

$
0
0

अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडून चौकशी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर महाराष्ट्र बंद दरम्यान पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी. एल. थूल सदस्य (विधी) यांनी शुक्रवारी चौकशी करून माहिती घेतली.

मुंबई येथून नाशिकला आल्यानंतर सकाळी ११ वाजता त्यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस व नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांबाबत चर्चा करून माहिती घेतली. 'महाराष्ट्र बंद'दरम्यान पोलिसांनी मागासवर्गीयांवर अन्याय करून मारहाण केली, काही ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केले, अशा अनेक तक्रारी शासनाकडे आल्या. त्यानंतर याबाबत चौकशी करून अहवाल तयार करण्याचे निर्देश सरकारने दिले. त्यानंतर आयोगातर्फे पुणे, कल्याण, ठाणे, कोरेगाव भिमा, अहमदनगर, नागपूर, औरंगाबादसह विविध ठिकाणी भेट दिल्या. त्यात महाराष्ट्र बंद दरम्यान पोलिसांकडून दाखल झालेले गुन्हे, अटक करण्यात आलेले आरोपी, त्यामध्ये महिला, मुले, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आदींचा समावेश आहे का, याबाबत सविस्तर माहिती घेतली जात आहे. नाशिक जिल्ह्यात एकच गुन्हा दाखल असून त्यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात काचा फोडणे व दगडफेक करणे अशा स्वरुपाचा गुन्हा आहे.

'महाराष्ट्र बंद'दरम्यान दाखल झालेले गुन्हे हे गुन्हेगारी स्वरुपाचे नाहीत. हा बंद सामाजिक व राजकीय आंदोलन होता. त्यात भावनेचा उद्रेक झाला. त्यामुळे या बंदमध्ये दाखल गुन्ह्यांबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहे. त्याचा सविस्तर अहवाल तयार केला जात आहे. या चौकशीच्या वेळी अनुसूचित जाती-जमाती आयोगतील अधिकाऱ्यासह पोलिस अधीक्षक नरसिंग शेखाणे व आयोगाचे सहसंचालक रमेश शिंदे हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टोनमध्ये फसवणूक, सराफाला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तीन कॅरेटचा एमराल्ड या किमती खड्याच्या (स्टोन)व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरुन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने भंडारी ज्वेलर्स गॅलक्सी प्रा. लि. ला स्टोन बदलून देण्याचे निर्देश दिले आहे. ते बदलता येत नसले तर ४० हजार रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पाच हजार व खर्चपोटी तीन हजार रुपये अदा करण्याचे आदेशात म्हटले आहे.

शिर्डी येथील कुणाल सर्जेराव शेळके यांनी केलेल्या तक्रारीवरुन न्यायमंचाने हा निकाल दिला आहे. शेळके यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले की, तीन कॅरेट वजनाचा एमेराल्ड स्टोन ४० हजार रुपये किंमतीस खरेदी केला. स्टोन व सोन्याची अंगठी यापोटी ५४ हजार १३१ रुपये भंडारी ज्वेलर्सला दिले. अंगठी वापरण्यास सुरुवात केल्यानंतर दोन तीन दिवसात स्टोनच्या मध्यभागी आतील बाजूस तडा केल्याचे लक्षात आले. त्यासाठी ज्वेलर्समध्ये संपर्क साधला असता बदलून देण्याचे सांगण्यात आले. पण, नंतर स्टोन बदलून दिला नाही व रक्कमही दिली नाही. स्टोन तकलादू व कच्चा खडा देवून फसवणूक केल्यामुळे मला स्टोन द्यावे किंवा रक्कम परत मिळावी असे त्यांनी तक्रारीत सांगितले.

या तक्रारीवर भंडारी ज्वेलर्स गॅलक्सीकडून आपली बाजू मांडण्यासाठी कोणीही हजर झाले नाही. त्यामुळे न्यायमंचाने हा एकतर्फी निकाल दिला. या निकालात न्यायमंचाने म्हटले की, भंडारी ज्वेलर्सने निकृष्ठ, तकलादू व कच्चा एमेराल्ड स्टोन विक्री केला आहे. सदर बाब अनिष्ठ व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी व ग्राहकाच्या सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत स्टोन बदलून द्यावा. स्टोन बदलून देणे शक्य नसल्यास तक्रारदाराला ४० हजार रुपये व्याजासह द्यावे. त्याचप्रमाणे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पाच हजार व खर्चपोटी तीन हजार रुपये अदा करावे असा निकाल दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images