Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

करा भरा, अन्यथा जप्ती!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगर परिषदेने नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. सात दिवसांच्या आत हा कर भरला नाही तर स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती कारवाई होणार आहे. त्याच सोबत थकबाकीदारांची नावे जाहीर प्रसिद्ध करणे, नळकनेक्शन तोडणे आदी पर्याय वापरण्यात येणार आहेत.

नगर परिषद प्रशासनाने पालिकेच्या कर वसुलीच्या बाबत नागरिकांनी नेहमीच सहकार्य ठेवले आहे. किंबहुना गत काही वर्षांपासून पूर्वीची आणि नव्याने हद्दीत समावेश झालेल्या मालमत्तांच्याबाबत अवास्ताव दराने कर आकारणी करण्यात आली आहे. सन २००७ पासून दरसाल मार्च ते जून असे सरासरी चार महिने एक दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येतो. दररोजचा पुरवठा देखील समाधान कारक नसतो. शहरात डासांचा प्रादुर्भाव बाराही महिने कायम राहीला आहे. पथदिपाबाबत ऐन दिवाळीत अंधार होता. सफाई ठेकेदाराचे बील वेळेत आदा न केल्याने सणासुदीत घंटागाडी आली नाही. अशा एक ना अनेक समस्या असतांनाही नागरिक कर भरत होते. परंतु पालिकेने आता थेट जप्तीच्या कारवाईचा इशारा दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वॉटर मशिन अखेर सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील आरओ पाणी देणारे वॉटर वेडिंग मशिन अखेर सुरू झाले आहेत. तीन महिन्यांची वीजबिले मशिन्सच्या ठेकेदाराने भरली नव्हती. त्यामुळे रेल्वेने त्याचा पुरवठा खंडित केला होता. ठेकेदाराने आज वीजबिल भरल्याने ही मशिन्स सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नाशिकरोड स्थानकात प्लॅटफार्म एक, दोन व चारवर वॉटर वेडिंगचे प्रत्येकी एक मशिन आहे. अत्यंत कमी दरात स्वच्छ पाणी देणाऱ्या या मशिन ठेकेदार चालवतो. मुख्य वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी यांनी ‘मटा’ ला सांगितले की, मशिन्सची प्रत्येकी चार ते पाच हजाराची वीजबिले होती. ठेकेदाराने ती तीन ते चार महिन्यांपासून भरलेली नव्हती. प्रशासनाने बुधवारी (दि. २८) सायंकाळी वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. अखेर ठेकेदाराची कानउघडणी केल्यावर त्याने वीजबिले भरली आणि मशिन्स पुन्हा सुरू झाल्या आहेत.

अद्ययावत मशिन येणार

नाशिकरोडसह मनमाड, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, देवळाली या स्थानकांमध्ये ही मशिन आहेत. प्रवाशांना शुद्ध पाणी अत्यंत कमी दरात उपलब्ध मिळते. फन्टुस कंपनीने ही मशिन बसविली आहेत. नाशिकरोडच्या प्लॅटफार्म एक आणि दोनवर प्रत्येकी दोन मशिन बसविण्यात आल्या आहेत. सर्वात मोठ्या प्लॅटफार्म क्रमांक चारवर एकच मशिन आहे. कारण तेथे प्रवासी गाड्या थांबत नाहीत. या मशिनची वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे. सध्याच्या मशिनच्या जागी अत्याधुनिक मशिन येणार आहेत. या मशिनमधील पाणी घेण्यासाठी कर्मचाऱ्ंयाची गरज भासणार नाही. मशिनमध्ये नाणे टाकून प्रवाशी पाणी घेऊ शकतील. तसेच चोवीस तास ही सेवा उपलब्ध आहे.

हाताळण्यास सोपे

वेडिंग मशिनच्या विक्रेत्याकडे मागणी केल्यास पाणी उपलब्ध होते. प्रवाशी पैसे टाकूनही पाणी घेऊ शकतो. एक आणि पाच रुपयांचे नाणे टाकल्यास पाणी मिळते. पाणी शुद्ध कसे होते ते दाखविणाऱ्या आकृत्या मशिनवर आहेत. पाण्यावरच आरोग्य अवलंबून आहे. मात्र अनेक प्रवासी वेडिंग मशिनचे पाणी घेण्याचे टाळतात. त्यामुळे येथे पाणी सेवा देणारा कर्मचारी अडकून पडतो. हे लक्षात घेऊन रेल्वेने आताची सर्व आधुनिक मशिन हटवून अत्याधुनिक मशिन बसविण्यास सुरुवात केली आहे. प्लॅटफार्म एकवरील मशिन हटवून ते दोनवर हलविण्यात आले आहे. आता त्याजागी अत्याधुनिक मशिन येणार आहे.

नाशिकरोड वाणिज्य निरीक्षकांच्या हद्दीतील ई-क्लास दर्जाच्या सात स्थानकांना वॉटर प्युरिफायरच्या सहाय्याने शुद्ध पाणी देण्यात येत आहे. त्यामध्ये घोटी, अस्वली, लहवित, ओढा, कसबे-सुकेणे, निफाड आणि उगाव यांचा समावेश आहे. येस बँकेच्या मदतीने हे प्युरिफायर बसविण्यात आले आहेत. प्रवाशांची उन्हाळ्यातील वाढती संख्या लक्षात घेऊन प्युरिफायरला पाचशे लिटरची सिंटेक्सची टाकी जोडण्यात आली आहे. रेल्वेस्थानकावर नेहमीच्या टाक्यांची स्वच्छता करणे अवघड असते. त्यामुळे पाणी पिऊन आजारी पडणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. वॉटर प्युरिफायरमुळे आजाराला प्रतिबंध होत आहे. नाशिकरोड आणि देवळाली कॅम्पसारख्या महत्त्वाच्या स्थानकांमध्ये मोठा जलकुंभ आणि वॉटर स्टॅन्ड आहे. ज्यांना वॉटर वेडिंग मशिन्सचे पाणी नको असेल त्यांना जलकुभांचे पाणी मोफत मिळते.

नागरिकांना परवडणारे दर (रुपयांमध्ये)

पाणी................................................स्वतःची बाटली.........बाटलीसह पाणी
तीनशे मिलीलिटर ..........................१ ........................२
पाचशे मिलीलिटर..........................३ .........................५
एक लिटर ...................................५ .........................८
दोन लिटर ..................................८ ........................१२
पाच लिटर ...................................२०........................२५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंतवणूकदारांना चुना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ढोकेश्वर मल्टिस्टेट पतसंस्था आणि हरी ओम ग्रुपचे प्रकरण ताजे असतानाच लासलगाव शहरात पुन्हा एकदा आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये सीट्रस् कंपनीचे चेरमन ओमप्रकाश गोयंका, सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीविरोधात ८० लाखांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

दरवर्षी अनेक घोटाळे उघड होत असतानाही लासलगाव व परिसरातील सुशिक्षित एजंट्सला कमिशनचे आमिष देऊन गुंतवणुकीवर घसघशीत परतावा मिळेल असे स्वप्न दाखविले जात आहे. 'सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार' या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंकासह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात ८० लाख रुपयांची फसवणूक व अपहार प्रकरणी लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. गुंतवणूकदारांना तिप्पट-चौपट पैसे देण्याचे आमिष दाखवून ट्विंकल कंपनीने लासलगाव व परिसरातील नागरिकांना चुना लावला आहे. ही रक्कम अंदाजे १०० कोटी रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या कंपनीची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात असून यानंतर अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

कार्यालय बंद

लासलगाव येथील कविता पगार यांनी पती अनिल पगारे यांच्या निधनानंतर मिळालेले विम्याचे १५ लाख रुपये या कंपनीत गुंतविले. तसेच परिवारातील इतरही सदस्य नातेवाइक यांचीही रक्कम विविध नावाने गुंतवणूक केली. परंतु ही रक्कम मुदत पूर्ण होवूनही परत मिळाली नाही. पगार यांनी लासलगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनूसार त्यांनी लासलगाव येथील रुपेश पांडे, पंकज सुर्वे, संतोष जगताप, संतोष खाडे, अनिल गवळी, विजय भोर, तसेच देवळा येथील दीपक पगार व डॉ. भूषण आहेर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर एजंट्समार्फत ही रक्कम गुंतविली. लासलगाव येथील कोटमगाव रोडवर सीट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीची शाखा आहे. या शाखेत वारंवार चकरा मारुनही त्यांना रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सध्या हे कार्यालयही बंद आहे.



एजंट्सचा झगमगाट

तीन चार वर्षांपूर्वी ट्विंक॔ल या नावाने लासलगाव सह नाशिक जिल्ह्यात ील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले. लासलगाव परिसरातील एजंट्सनी प्रचंड कमिशन घेऊन महागड्या गाड्या खरेदी केल्या. त्यांचा झगमगाट पाहून अनेक गुतवणूकदार भुलले. अशा सर्व एजंट्सला पोलिसांनी अटक करून त्यांची वाहने व संपत्ती जप्त करावी अशी मागणी त्रस्त गुंतवणूक दारांनी केली आहे.

आर्थिक फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची वाढती संख्या पाहता या गुन्ह्याची व्याप्ती वाढून करोडो रुपयांचा फसवणुकीचा घोटाळा उघडकीस येईल. गुंतवणूकदारांनी कोठेही गुंतवणूक करताना आधी संपूर्ण माहिती घ्यायला हवी.-जनार्दन सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक, लासलगाव

पती अनिल यांच्या निधनानंतर विम्याचे १५ लाख रुपये मिळाले अशी माहिती एजंट्सला मिळाली.त्यांनी अनेक आमिष दाखवत माझी सर्व रक्कम या स्कीममध्ये गुंतवणूक करून घेतली. दीड वर्षांपासून त्यावरील व्याज ही नाही आणि रक्कम देण्यासही टाळाटाळ करीत आहेत. आता कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न समोर उभा आहे.- कविता पगार, तक्रारदार



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जात प्रमाणपत्र वाटपासाठी मार्गदर्शक सूचना जारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात जातीचे प्रमाणपत्र देताना मागास प्रवर्गातील नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले आहे. यामुळे राज्यात आता विविध प्रांत कार्यालये, सेतू केंद्र याठिकाणी जात प्रमाणपत्र मिळण्यात येत असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यापूर्वी राज्य सरकारने कुटुंबातील रक्तनाते संबंधात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी नियमात दुरुस्ती करण्याबाबतची अधिसूचना काढली होती. तीन वर्षांपासून विविध जाती प्रवर्गाच्या तसेच मराठा समाजातील तसेच कुणबी जातीच्या प्रमाणपत्रे वाटपासंबंधी सेतू केंद्रे, उपविभागीय कार्यालये यांच्यामार्फत सरकारकडे विविध तक्रारी व मागण्या येत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी केले.

राज्यातील जातींच्या प्रवर्गांचा समावेश अनुसूचित जातीसाठी १० ऑगस्ट १९५०, विमुक्त व भटक्या जमातीसाठी २१ नोव्हेंबर १९६१ व इतर मागास प्रवर्गासाठी १३ ऑक्टोबर १९६७ या तारखा आहेत. यापूर्वीचे पुरावे जात प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी आवश्यक असले तरी मागासवर्गीय व्यक्तींना अडचणी येतात. त्याच ओळखून शासनाने हा निर्णय घेतला आहे.

जातींसंदर्भात समाजात ज्या रुढ नावाने, आडनावाने, जातीने संबोधित अशा नोंदी जुन्या अभिलेख्यात अभिलिखित झाल्याचे आढळल्यास, जातीबाबत काही अपभ्रंशित उल्लेख होत असल्यास, तशा जुन्या नोंदी असल्यास उदा. ले. पा - लेवा पाटीदार, कु, कुण - कुणबी - इ. अशा जुन्या नोंदी अर्जदाराच्या इतर पुराव्यांशी सुसंगतता तपासून जाती प्रमाणपत्राबाबत योग्य निर्णय सक्षम प्राधिकाऱ्याने घ्यावा, असे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

प्रकरणानुसार निर्णय घ्यावा

एखाद्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय हा कोणत्या संदर्भात दिलेला आहे, त्याचा अभ्यास करून व इतर न्यायालयीन निर्णय आणि इतर कागदपत्रे व परिस्थितीजन्य पुरावे यांचा सांगोपांग विचार करून या प्रकरणी सक्षम प्राधिकारी यांनी प्रकरणानुसार उचित निर्णय घ्यावा, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण निर्मूलनाचा धडाका सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महानगरपालिकेने सुरू केलेल्या सिडकोतील अतिक्रमण हटाव मोहिमेत गुरुवारी दुर्गानगर येथील कॉर्नरसह परिसरातील सुमारे ५० हून अधिक दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी काही दुकानदारांनी कागदपत्रे दाखवून या मोहिमेस विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु;Ḥ अधिकाऱ्यांनी त्यास न जुमानता संपूर्ण अतिक्रमण काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सिडकोत मागील आठवड्यापासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला त्रिमूर्ती चौक ते दुर्गानगर या परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर पवननगर ते उत्तमनगर या रस्त्यावरील सुमारे दोनशेहून अधिक दुकाने व घरांच्या समोरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यानुसार आज सकाळी दुर्गानगर येथून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. दुर्गानगर येथे सिडको प्रशासनाने उभारलेल्या इमारतीच्या सामाईक जागेत पत्र्याचे शेड उभारून काही व्यवसाय सुरू असल्याने ही दुकाने पाडण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी येथील व्यवसायिकांनी ही जागा सिडकोने आम्हाला दिली असल्याचे सांगून काही कागदपत्रे दाखविली. यावेळी विभागीय अधिकाऱ्यांनी सिडकोचे प्रशासक झोपे यांच्याशी संपर्क साधून या इमारतीची माहिती ताबडतोब देण्याची सूचना केली. त्यानंतर पंधरा मिनिटांनी सिडको प्रशासकांनी हे अतिक्रमण असल्याचे सांगितल्यावर महानगरपालिकेने कोणालाही न जुमता ही मोहीम पूर्णच केली. यावेळी माजी नगरसेवक पुंजाराम गामणे व विभागीय अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याठिकाणी असलेले हॉटेल, पानटपरी, गॅरेजचेही अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर कामटवाडे रोडवरील दुकाने व हॉटेल्सच्या पुढे असलेली सर्व शेडही जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी काही व्यवसायिकांनी अतिक्रमण काढण्यास मुदत मागितली परंतु; अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न देता ही मोहीम सुरूच ठेवली. या मोहिमेत दोन जेसीबी, पन्नास कर्मचाऱ्यांसह पेालिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दुर्गानगरच्या 'त्या' अतिक्रमणावरही जेसीबी

दुर्गानगर येथे असलेल्या अतिक्रमणामुळे बसला वळण घेणेसुद्धा अवघड होत होते. सिडकोने उभारलेल्या इमारतीच्या सामाईक जागेत हे अतिक्रमण करण्यात आले होते. आजपर्यंत अनेक मोहिमा राबविण्यात आल्या, मात्र या अतिक्रमणाला हात लावण्यात आला नाही. मुंढे आल्यानंतर हे अतिक्रमणही जमीनदोस्त करण्यात आले. हे येथील अतिक्रमण काढताना एका वकिलानेसुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करून काही कागदपत्रे सादर केली. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे सांगून ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी विभागीय अधिकाऱ्यांनी सिडको प्रशासकांना या जागेची फाईल मागितल्यावर प्रशासकांनी वेळ लागेल असे सांगितले होते, मात्र विभागीय अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेऊन तातडीने ही फाइल पाठवा, अशी सूचना केल्यावर प्रशासक स्वतः ही फाइल घेऊन घटनास्थळी आले. त्यांनीही ही सामाईक जागा असल्याचे सांगताच या अतिक्रमणावर जेसीबी चालविण्याची सूचना करण्यात आली. कामटवाडे रोडवरील एका हॉटेलचे अतिक्रमण काढतानाही काही प्रमाणात विरोध झाला होता. मात्र, त्यासही अधिकाऱ्यांनी न जुमानता अतिक्रमण हे अतिक्रमणच असते, असे सांगून ते काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगवैखरी स्पर्धेत ‘बीवायके’चा झेंडा

$
0
0

'ताटी उघडा'ला तृतीय पारितोषिक

बागेश्री पारनेरकर, कॉलेज क्लब रिपोर्टर

राज्य मराठी विकास संस्थेने आयोजित 'रंगवैखरी' या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत नाशिकच्या बी. वाय. के. कॉलेजला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. चषक आणि १ लाख रुपये असे बक्षिसाचे स्वरूप होते.

रंगवैखरी या कलाविष्कार नाट्यस्पर्धेची महाअंतिम फेरी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात पार पडली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, रत्नागिरी या केंद्रांवर प्राथमिक व विभागीय फेरीतून निवडलेले ६ उत्कृष्ट नाट्यविष्कार महाअंतिम फेरीसाठी निवडले होते. या स्पर्धेचे हे पहिले वर्ष होते. या वर्षी 'महाराष्ट्री ते मराठी' या विषयावरील विविध कलांच्या म्हणजे नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य यांच्या एकात्म नाट्यविष्कारातून मराठी भाषेचे स्वरूप उलगडले. स्पर्धेसाठी प्रतिमा कुलकर्णी, प्रदीप मुळे, संदेश कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम केले.

बी. वाय. के. कॉलेजच्या 'ताटी उघडा' या कलाविष्कारामध्ये कॉन्व्हेंट शाळेतील मुलांमध्ये मराठी कशी रुजली पाहिजे, मराठीचा समृद्ध इतिहास मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे, याविषयी भाष्य केले आहे. सुजित जोशी यांच्या मूळ कथेचे प्रिया जैन हिने नाट्यरुपांतर केले होते. कृतार्थ कन्सारा यांनी दिग्दर्शन केले होते. कॉलेजच्या २४ विद्यार्थ्यांचा या नाट्यविष्कारात सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकांक्षापुढती गगन ठेंगणे- सिंधू काकडे

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: उमेदीच्या काळात युवा मुलाचे आकस्मात निधन झाले. मुलाचा विरह पित्याला सहन होणारा नव्हता. पण, आपल्या वाट्याला आलेल्या दु:खापेक्षा इतरांचे दु:ख मोठे असल्याची जाणीव मनात ठेवणाऱ्या सिंधू काकडे यांनी स्वत:ला शिक्षणात झोकून दिले. नववीपर्यंत शिक्षण झालेल्या काकडे यांनी पतीच्या इच्छेसाठी शिक्षण पूर्ण तर केलेच, पण महाराष्ट्रात प्रथमच नॅबसारख्या संस्थेवर पीएचडी करून मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला.

तो काळ १९६० मधील. शिक्षणाचा आणि आयुष्य जगण्याचा तसा कोणताही संबंध नसलेल्या विश्वात विदर्भातील सध्याच्या वाशीम जिल्ह्यात एका छोट्याशा गावात सिंधू इंगोले यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. पाचवी, सातवी आणि नंतर नववीपर्यंत अनेकदा सिंधू इंगोले यांची शाळा सुटावी म्हणून प्रयत्न झाले. शेवटी इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सिंधू यांचा इंजिनीअर असलेल्या प्रल्हाद काकडे यांच्याशी विवाह ठरला. शिक्षणाचा एक टप्पा पार करून काकडे यांनी कौटुंबिक जबाबदारी स्वीकारली. सिंधू यांच्या शिक्षणाबाबत काहीतरी चूक झाली याची जाणीव असलेल्या प्रल्हाद काकडे यांची काही वर्षातच नाशिकला बदली झाली. आपण इंजिनीअर तर आपली पत्नी शालेय शिक्षण पूर्ण न झाल्याची खंत कुठेतरी काकडे यांच्या मनात होती. त्यामुळे नाशिकला येताच सिंधू काकडे यांचे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षण सुरू झाले. अपत्य संगोपन आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडत काकडे यांनी बी. ए., एम. ए पूर्ण करून एम. फिलची तयारी सुरू केली. याच दरम्यान त्यांच्या २३ वर्षांच्या मुलाचा आकस्मात मृत्यू झाला. ही घटना काकडे कुटुंबास हादरवून सोडणारी होती. तरुण मुलाच्या अचानक मृत्यूचा परिणाम प्रल्हाद काकडे यांच्यावर झाला. दोन-तीन वर्षांत त्यांचाही कॅन्सरने मृत्यू झाला. दोन मुली आणि सिंधू काकडे यांची आयुष्याची लढाई यानंतर अधिक तीव्र झाली. शोक करीत बसले तर मुलींचे भविष्य धोक्यात येईल, याची जाणीव मनात ठेवत सिंधू काकडे यांनी पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा तसेच नियतीने आपल्यापेक्षा जास्त दु:ख दिलेल्यांना मदतीचा हात देण्याचे ठरविले. आज त्या एसएमआरके कॉलेजमध्ये समाजशास्त्र या विषयाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून, सावित्री फाउंडेशन या संस्थेमार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असतात. समाजात मोकळ्या मनाने फिरले की आपल्यापेक्षा इतरांचे दु:ख मोठे वाटायला लागते. दु:खाचा वर्षाव फक्त आपल्यावर होत नाही ही, जाणीव झाली की जीवन जगणे सोपे वाटायला लागते, ही डॉ. प्रा. काकडे यांची विचारधारणा नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारी आहे.

--

पतीच्या इच्छेसाठी

पतीची इच्छा होती की, काकडे यांनी पी. एचडी करावी. पतीच्या निधनांनंतर काकडे यांनी 'नॅब' या संस्थेवर पीएचडी करण्यास सुरुवात केली. पतीची इच्छा पूर्ण करताना नॅबवर पीएचडी करणाऱ्या महाराष्ट्रातील त्या एकमेव ठरल्या. सध्या त्या अंध व्यक्तींना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठी सुरू असलेल्या बी. एड. संस्थेच्या चेअरपर्सन आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजासाठी होळी कडू!

$
0
0

पंचवटी

होळी आणि धुलीवंदन सणांना मुंबई आणि इतर बाजारपेठा बंद असल्याने नाशिक बाजारात आवक कमी असूनही गुरुवारी (दि. १) रोजी भाजीपाल्याचे दर घसरले. दुपारच्या लिलावास आलेल्या फळभाज्यांचे घाऊक दर १ ते २ रुपये किलो इतके खाली आले. भाज्यांचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. २८) रोजी दुधी भोपळा बाजारातच फेकून दिला होता.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई आणि गुजरातला भाजीपाला मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येतो. होळीच्या सणामुळे या भागातील भाजीबाजार बंद असल्याने येथे शेतमाल पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांनी खरेदी करणे बंद केलेली आहे. त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला असून तीन दिवसांपासून दरात घसरण होत गेली. त्यात ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाला पिकण्याचे वेग वाढलेला असल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक वाढत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

होळीच्या सणामुळे मजूर आपापल्या गावी परतले आहेत. अशा परिस्थितीत शेतातील भाजीपाला काढण्याची शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. भाजीपाल्याचा उत्पादन खर्च भरून निघणे तर सोडाच पण शेतापासून बाजारापर्यंत भाजीपाला वाहतुकीचा खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

भाज्यांना रुपयाचा भाव


फळभाज्यांच्या दुपारच्या लिलावात १ रुपया प्रति किलो असा दर फळभाज्यांना मिळाला. टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी, दुधी, भोपळा यांचे दर बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. त्यापेक्षा भाज्या शेतातच सडू दिल्या असत्या तर बरे झाले असते असे शेतकरी म्हणत होते.

भाजीपाल्याचे गुरुवारचे दर (रुपयांमध्ये)

भाजीपाला .............आवक (क्विंटलमध्ये)............दर प्रति किलो

टोमॅटो ...............७५५.....................................१ ते ४

दुधीभोपळा...........६४५.....................................२ ते ४

कोबी...................३८५......................................१ ते ३

फ्लॉवर................२९४.....................................२ ते ४

वांगी..................२३०......................................३ ते ६

ढोबळी.................१७६......................................१२ ते २२

भेंडी....................३८.......................................२८ ते ३३

कारले...................१६......................................२३ ते ४०

दोडका.................१५.......................................२० ते ३०

पिकॅडोर...............१०........................................१२ ते १८

गिलके................१० ......................................८ ते १२

..

पालेभाज्या ......................आवक (जुडी)...........दर (प्रति जुडी)

कोथिंबीर........................४८,०००...................६ ते १५

मेथी ............................१४,६०० ..................२ ते ६

शेपू...............................१३,७००...................४ ते ९

कांदापात......................१२,८००......................४ ते १०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादीची लोकसभा तयारी सुरु

$
0
0

नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासून लोकसभेची तयारी सुरू केली असून, त्यासाठी जिल्ह्यातील तीन मतदार संघाच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी व माजी मंत्री व विद्यमान आमदार जयंतराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी या स्वतंत्र बैठका नाशिकमध्ये होणार आहेत.

बैठकीला शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून सुरुवात होणार आहे. पहिली बैठक चांदवड येथे होणार असून, त्यात दिंडोरी व धुळे मतदार संघाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दिंडोरी लोकसभा मतदार संघातील येवला, नांदगाव, दिंडोरी, पेठ, निफाड, कळवण, सुरगाणा, चांदवड, देवळा या तालुक्यांसाठी ही बैठक असणार आहे. तर धुळे लोकसभा मतदार संघातील बागलाण व मालेगाव तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक असणार आहे. चांदवड येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात ही बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता नाशिक लोकसभा मतदार संघातील नाशिक शहर व तालुका, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक नाशिक येथील राष्ट्रवादी भवनात होणार आहे.

माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्यासह पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंतराव टकले हे देखील या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. या बैठकांना सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’मुळे ९६ टक्के जलपूर्ती

$
0
0

नाशिक

जलयुक्त शिवार योजनेमुळे २०१६-१७ या वर्षी निवडलेल्या विभागातील ९०० पैकी तब्बल ९६ टक्के म्हणजेच ८६१ इतकी टंचाईग्रस्त गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान आणि नरेगा या योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रगतीच्या संदर्भात विभागीय आयुक्तालयात मावळते विभागीय आयुक्त महेश झगडे बोलत होते. यावेळी त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. जलपूर्ती झालेल्या गावांमधील लोकांचे आयुष्यमानच बदलले. या वर्षीच्या आराखड्यातील नियोजित कामे सरकारने दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

जलयुक्त शिवार अभियानामुळे टंचाईग्रस्त गावांमधील नागरिकांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या वर्षी नाशिक विभागातील ९०० गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता. या गावांत प्रस्तावित २५ हजार ८०५ इतक्या कामांपैकी ९० टक्के अर्थात २३ हजार ५३५ इतकी कामे पूर्ण झाली. ८६१ गावांची टंचाईतून मुक्तता झाली. पूर्ण झालेल्यापैकी २१,१३६ कामांचे जिओ टॅगिंगचे कामही पूर्ण झाले आहे. या कामांमुळे नाशिक विभागात १ लाख ४१ हजार ८३३ टीसीएम क्षमतेची पाणीसाठा निर्मिती झाली असून त्याद्वारे २ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रास संरक्षित सिंचनासाठी एक पाणी देता येणे शक्य होणार आहे. या कामांवर ४९८ कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. पेयजल संबंधी बळकटीकरणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांची फेरतपासणी प्रांताधिकाऱ्यांमार्फेत केली जाणार आहे. कमी पावसाच्या क्षेत्रात मजगीच्या कामांना प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी झगडे यांनी सांगितले.

जलयुक्तचा लेखाजोखा (२०१७-१८)

गावांची निवड : ८४७

प्रस्तावित कामे : २१,३६७

आराखडा निश्चिती :४८९ कोटी रुपये

कार्यारंभ आदेश : ३,५९५ कामे

प्रत्यक्ष सुरुवात : ९७९ कामे

क्षेत्रीय स्तरावर नियोजन

मजगीमुळे रब्बी व उन्हाळी हंगाम असुरक्षित होणार असेल तरीही अशी कामे आता होणार नाहीत. या पुढील वर्षाचा आराखडा व उद्दिष्ट आता शासनाकडून दिले जाणार नाही. क्षेत्रीय स्तरावरच नियोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमविवाहास विरोध, नर्सने केली आत्महत्या

$
0
0

नाशिक: नाशिकमधील अपोलो हॉस्पिटलच्या नर्सिंग हॉस्टेलमध्ये एका २४ वर्षीय नर्सने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (गुरूवारी) रात्री घडली. अश्विनी केके असे या नर्सचे नाव असून ती मूळची केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिल्याने अश्वनीने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटवरून स्पष्ट होत आहे.

अश्विनी नोकरीनिमित्त गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये राहात होती. गुरुवारी अश्विनीची नाईट शिफ्ट होती. नऊ वाजून गेल्यानंतरही ती न आल्यामुळे मैत्रिणींनी तिच्या रुममध्ये धडक दिली. मात्र मृतावस्थेत पडलेल्या अश्विनीला पाहून त्यांना धक्काच बसला. अश्विनीने मांजाच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

अश्विनीच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटनुसार, अश्विनीचे एका मुलावर प्रेम होते. मात्र त्या मुलाबरोबर लग्न करू नये असे अश्विनीच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते. घरच्यांचा लग्नाला नकार असल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे तिने नोटमध्ये नमूद केले आहे. मात्र, आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये असेही अश्विनीने लिहिले आहे.

दरम्यान, नाशिमधील आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे मागण्यांसाठी आज आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य विज्ञान विद्यापाठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन २७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात बैठक घेणार होते. मात्र, चार दिवस उलटूनही अद्याप ही बैठक न झाल्याने या कर्मचाऱ्यांसह सीटू संलग्न कर्मचारी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी दुपारी आंदोलन करून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा संघटनेने घेतला आहे.

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. गेल्या पाच ते दहा वर्षांपासून त्यांना सात हजार रुपये पगारावर समाधान मानावे लागत आहे. अल्प पगारात त्यांच्याकडून उच्चस्तरीय दर्जाचे काम करवून घेतले जाते. या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. दोन वर्षांपासून कर्मचारी मागण्यांबाबत पाठपुरावा करीत आहेत. मात्र, दखल घेतली जात नसल्याने तीन महिन्यांपासून ते बेमुदत संपावर आहेत. पालकमंत्री महाजन यांची त्यांनी भेट घेतली. मंत्रालयात २७ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ प्रशासन आणि संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, चार दिवस उलटूनही ही बैठक झालेली नाही. या निषेधार्थ शनिवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. डी. एल. कराड, अॅड. वसुधा कराड, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे आदींनी दिली.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आम्ही पाठपुरावा करीत आहोत. मात्र, सरकार त्याची दखल घेत नाही. त्यामुळेच कर्मचाऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक रविवारी झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री हेच राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची दखल घ्यायला हवी. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर आंदोलन सुरूच राहील. वेळप्रसंगी आंदोलन तीव्रही केले जाईल.

- डॉ. डी. एल. कराड, सीटू नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा पालिकेचा अर्थसंकल्प १०७ कोटींचा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

कोणतीही कर वाढ न करता शहरवासीयांना दिलासा देत पाणीपुरवठा योजना, स्वच्छता, रस्ते अशा विविध मूलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या १०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला पालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच ३१ लाख ६८ हजार शिलकी अंदाजपत्रकालाही मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली. येथील पालिका सभागृहात नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. या पूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत १०७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्याला आज झालेल्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.

यावेळी उपाध्यक्षा सुवर्णा नंदाळे, गटनेते महेश देवरे, काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, नगरसेवक राहुल पाटील, सुनीता मोरकर, दीपक पाकळे, मुन्ना शेख, डॉ. विद्या सोनवणे, मनोहर देवरे उपस्थित होते.

अशी आहे तरतूद

पाणीपुरवठा योजनांसाठी ३८ लाख ५० हजार

शहर पाणीपुरवठा योजनेसाठी १५ कोटी

केटीवेअर बंधाऱ्यांसाठी ३३ लाख

विंधन विहिरीसाठी ११ लाख

मलनिस्सारण केंद्र भूसंपादनासाठी ५ कोटी

गटारी दुरूस्तीसाठी १५ लाख

घनकचरा संकलनासाठी २० लाख ५० हजार

जंतुनाशके फ वारणीसाठी १६ लाख ५० हजार

भुखंड विकसित करण्यासाठी २ कोटी

विशेष योजनंतर्गत १ केाटी १० लाख

सुशोभीकरणासाठी ५५ लाख

रस्ते काँक्रीटीकरण, डांबरीकरणासाठी १ कोटी ९९ लाख

शौचालय उभारणे, जलवाहिन्या टाकण्यासाठी २ कोटी

इदगाह परिसर, कब्रस्थान व अल्पसंख्याक परिसर विकासासाठी ४० लाख

शहरातील विविध विकासकामांसाठी २ कोटी २० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निसाकाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड साखर कारखाना कार्यान्वित करण्याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. निसाकाबाबत सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

मंत्री देशमुख यांनी निफाडचे आमदार अनिल कदम यांची नाशिक येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी आमदार कदम यांनी निसाकाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत देशमुख यांना माहिती देत निसाकावर अवलंबून असलेल्या कामगारांची अवस्था, तसेच निफाड तालुक्यातील सहकारी संस्थांच्या अडचणी मांडल्या. रानवड साखर कारखाना कार्यान्वित झाला, तसाच निसाकाबाबत निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी केली. या वेळी आमदार राहुल आहेर, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका वैशाली कदम, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष होळकर, सोमनाथ निमसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थाटात निघाले बाशिंगे वीर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

होळीनंतर धूळवडीला गोदाकाठी नाशिक शहरातील मानाच्या वीरांची वेगवेगळ्या देवदेवतांच्या पेहरावात सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यंदाही ढोल ताशांच्या गजरात वीरांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जुन्या नाशिकमधील दाजीबा वीरांची मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

शहरात धूळवडीच्या दिवशी शहरात मानाच्या वीरांची फाल्गुन वद्य प्रतिपदेला सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यंदाही परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात आल्याने गोदाकाठी यात्रेचे स्वरुप आले होते. या यात्रेत जुन्या नाशिकमधील मानाच्या दाजीबा वीराची मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. बाशिंगे वीर म्हणून त्यांची ख्याती आहे. दुपारी दोन वाजेपासूनच मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मार्गावर जागोजागी भाविकांकडून पूजा केली जात होती. हातात मोठी तलवार व डोक्यावर बाशिंगे लावलेला मुखवटा अशा पेहरावात जुन्या नाशकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. दुपारी दोन वाजता निघालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

रामकुंडावर वीरांची यात्रा

धुलीवंदनाच्या दिवशी आपल्या देव्हाऱ्यात असलेल्या पूर्वजांच्या टाकांना वाजतगाजत मिरवून आणण्याची परंपरा आहे. शहरातील अनेक कुटुंबांनी संध्याकाळी घरातील टाकांची मिरवणूक काढली. यात विविध पेहराव करण्यात आले होते. ही मिरवणूक रामकुंडावर पोहचल्यानंतर तेथे टाकांना अभिषेक घालण्यात आला. यावेळी चौकाचौकातील होळ्यांभोवती फेर धरुन वीर नाचवले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुडाचे घर ते आंतरराष्ट्रीय ट्रॅक!

$
0
0


fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : विपरीत परिस्थिती मनुष्याला नियतीपुढे गुडघे टेकायला भाग पाडते. मात्र, समाजात अशाही काही व्यक्ती असतात की त्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतात. ताई बामणे यातीलच! आपल्या जिद्दीच्या जोरावर आकाशाला गवसणी घालण्याचा ताईचा प्रयत्न म्हणूनच उजवा ठरतो.

कविता दिदीसारखे मला धावपटू व्हायचे आहे, अशी मनीषा बाळगून ताईने प्रवास सुरू केला. ती आज एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहचली आहे. ताईचा हा खडतर प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

ताई बामणे हिच्यातील धावपटू बनण्याचे कसब हिरकुड सरांनी ओळखले. ही मोठी धावपटू होणार अशी आशा बाळगून ताईच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. कांदिवलीच्या स्पर्धेला जाताना ताईकडे पैसे नव्हते. वयाच्या नवव्या वर्षी अनवाणी धावणाऱ्या ताईने महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धेत २०१३ साली ब्राँझ मिळवले. इतरांचे बूट आपल्या पायाला लागतील म्हणून तिने धावण्याचा वेग कमी केला. सगळ्या स्टेडियमने उभे राहून ताईचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

ताईचे गाव दलपतपूर. हरसूलपासून १० किलोमीटर अंतरावर. वाट नागमोडी चढ-उताराची. गावात सिमेंटचे रस्ते आता झालेत. शेणाने सारवलेले घर. एकदा हिरकुड सरांनी शाळेत दुसरीच्या वर्गाची शर्यत लावली. ताईने सगळ्यांना निम्मे अंतर ठेवत शर्यत पूर्ण केली. हेच ती तिसरी, चौथी आणि पाचवीच्या मुलामुलींच्या शर्यतीच्या बाबतीत सहज करायची. एका शिक्षकाची नजर किती काम करते हे पाहायचं झालं तर हिरकुड हे उल्लेखनीय आहेत.

गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर हरसूलच्या दिशेने असलेला रस्ता आणि शेतातील एक पट्टा ताईच्या सरावासाठी त्यांनी वापरायचा ठरवला. ७ वर्षांची मुलगी एक स्वप्न मनाशी धरते, मला कविता दीदिसारखं व्हायचं. हा अंधार जरी येथल्या रोजच्या जीवनाचा भाग असला तरी हे वय कष्ट करण्यासाठी तयार होणे अप्रूप आहे. ताईचे हे धाडस असून, त्याला वनवासी आयुष्याची निर्मळता लाभली आहे. सायंकाळचा सराव येथेच पार पडायचा. ताई आज भोसला शाळेत आहे, पण या सरावात कुठेही खंड नाही. ताई अबोल, शांत स्वभावाची आणि तितकीच नम्र. भोसलाच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेची आठवीची विद्यार्थिनी. तिचे जिंकणे हेही अगदी सहज आणि सोपे असते. स्पर्धा जिंकल्यानंतरसुद्धा ती सहज, साधी वावरत असते. शाळेत अभ्यासात तितकेच काळजीपूर्वक लक्ष देणारी. ताईचे आजचे भोसलातील साईचे प्रशिक्षक विजेंद्रसिंह तेही सतत तिच्या पाठीशी असतात.

आंतरराष्ट्रीय ओळख

ताई गेल्या वर्षापासून १७ वर्षांखालील गटातून ४०० मीटर आणि ८०० मीटर या दोन स्पर्धांवर भर देत आहे. एनवायसीएसच्या माध्यमातून प्रसिद्ध गेल इंडिया या कंपनीने ताईस २०२० ऑलिम्पिक तयारीसाठी दत्तक घेतले आहे. वर्षभरापूर्वी थायलंडमधील एशियन स्कूल स्पर्धेसाठी तर नैरोबीत होणाऱ्या वर्ल्ड स्कूल स्पर्धेसाठी देखील तिची निवड झाली होती. यावर्षी खेलो इंडिया या स्पर्धेनंतर लगेच महिनाभराच्या जमेका येथे होणाऱ्या उसेन बोल्ट क्लब येथे प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली आहे. गेल्या चार वर्षांत बामणे हिने थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत धडक घेतलेली आहे. जमैका अॅथलेटिक्समध्ये ८०० मीटरमध्ये ताईने सुवर्णपदक जिंकले आहे. कविता राऊतच्या यशाने हरसूलसारख्या वनवासी भागात आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकण्याचा एक आत्मविश्वास आणि इतिहास निर्माण केला आहे. तीच प्रेरणा ताईने तिच्या कृतीतून जागवली आहे. कविता, ताई आज घराघरात पोहोचली आहे. आपापल्या गाव, तालुका, नाशिक या ओळखीबरोबर त्यांची ओळख राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडून कारवाईची धूळवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धुलिवंदन तसेच रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मद्यपी वाहनचालक, प्रेशर हॉर्नचा वापर करून बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांवर कारवाईसाठी शहर वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी विशेष मोहीम राबवली. यात तब्बल ८०० बेशिस्त वाहनचालकांना दंडाचा दणका देण्यात आला.

शहरात धुलिवंदन तसेच रंगपंचमी उत्साहात साजरी केली जाते. धुलिवंदनात सातपूरसह देवळाली कॅम्प अग्रेसर असते. इतर भागांत थोड्याफार प्रमाणात धूळवड साजरी केली जाते. मागील वर्षी धूळवडीसह रंगपंचमीच्या दिवशी बेदरकारपणे वाहने चालविण्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी तयारी केली होती. शुक्रवारी शहरात २६ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. वाहतूक पोलिस तसेच स्थानिक पोलिस स्टेशनच्या पथकाने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. विशेषत: ओव्हर स्पीड, ट्रिपल सीट, हेल्मेट तसेच सीट बेल्टचा वापर न करणे, राँग साइड यासंदर्भात कारवाई करण्यात आली. याबाबत वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे म्हणाले की, सण उत्सवाच्या दरम्यान रस्त्यावर बेशिस्तपणा वाढतो. याचा परिणाम गंभीर ते किरकोळ अपघातांच्या वाढत्या संख्येतून जाणवतो. त्यामुळे धुलिवंदन तसेच रंगपंचमीच्या दिवशी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान संध्याकाळपर्यंत ८०० पेक्षा अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. रंगपंचमीच्या दिवशीदेखील याच पद्धतीने कारवाई होणार असून, वाहतूक नियमांचे पालन सर्वांनीच करावे, असे आवाहन देवरे यांनी केले आहे.

पंडित कॉलनीत दुसऱ्या दिवशी कारवाई

'वन वे' केल्यानंतरही नियमांना हरताळ फासणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी १ मार्च रोजी येथे १०६ वाहनचालकांवर कारवाई करीत दंड वसूल केला होता. यात पाच शासकीय वाहनांचादेखील समावेश होता. याशिवाय १० सरकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवरदेखील कारवाई करण्यात आली. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या ठिकाणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उचलला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाब विचारणे म्हणजे विरोध नव्हे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील शेतकरी अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे. सरकारने शेतकऱ्यांना अडचणीतून काढण्यासाठी ऐतिहासिक कर्जमाफी केली असली तरी शेतकरी समाधानी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा आहेत. मी सत्तेत असो अथवा नसो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार. त्यासाठी सरकारला जाब विचारणार. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणे म्हणजे विरोध नव्हे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केले.

येथील भायगाव रोडवरील राजीव गांधी तंत्रशिक्षण स्कूल येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रांतिक सदस्य प्रसाद हिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मामको बँकचे हरिलाल अस्मर हे होते. भाजपनेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्रसाद हिरे, इंदिराताई हिरे, आमदार सुधीर तांबे, डॉ. तुषार शेवाळे, दीपक पवार, राजेंद्र भोसले, हेमलता पाटील, अमृता पवार, प्रतिभा सूर्यवंशी, शांताराम लाठर, माणिकराव बोरस्ते, देवराज गरुड आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्यात प्रसाद हिरे यांच्या जीवनावर आधारित श्रीकांत वाघ यांनी संपादित केलेले 'सर्वसामन्यांचे बापू' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

खडसे यांनी प्रसाद हिरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत हिरे घराण्याविषयी असलेल्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी उत्तर महाराष्ट्राचा विकासाचा अनुशेष गेल्या ७० वर्षांत देखील भरून निघालेला नाही, अशी खंत बोलून दाखवली. खडसे म्हणाले की, शासनाने हजारो कोटीची ऐतिहासिक कर्जमाफी दिली. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. असे असले तरी शेतकरी समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. त्यासाठी पाण्याची उपलब्धता व रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत. शेतीकरिता पाणीच्या पाण्यासाठी संघर्ष करण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. हा संघर्ष करण्यासाठी मी पुढे राहणार आहे. अधिवेशन काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणार असल्याची ग्वाही खडसे यांनी दिली. पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी नार-पारच्या माध्यमातून गिरणा-मोसम खोऱ्यात वळविण्याची गरज आहे. तरच या भागातील पाणी प्रश्न कायमचा सुटेल असेदेखील त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतमालास योग्य भाव, पिक विम्याचे संरक्षण, सिंचनासाठी पाणी आणि शाश्वत शेतीचा पर्याय स्वीकारणे आवश्यक असल्याचे खडसे यांनी नमूद केले. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी केवळ सरकारने नव्हे तर सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. दादा भुसे म्हणाले, शेतकरी अडचणीत सापडला आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र हा प्रश्न केवळ मागील तीन वर्षात निर्माण झाला नसून, गेल्या काही वर्षातील शासकीय धोरणांमुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली आहे. सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी दिली असली तरी शिवसैनिक म्हणून सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही लावून धरली आहे. उत्तम कांबळे यांनी शेतकऱ्यांची व्यथा या विषयावरील व्याख्यानात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विज्ञान व तंत्रज्ञाचा शेतीतील वापर आदींविषयी आपले विचार व्यक्त केले.

नाथाभाऊ तुम्हीही दावेदार आहात...

खडसे यांनी गेल्या ७० वर्षांत उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही अशी खंत बोलून दाखविली. भाऊसाहेब हिरे, प्रतिभा पाटील, मधुकर चौधरी, बाळासाहेब थोरात, रोहिदास पाटील अशा अनेकांची पात्रता असतांना देखील उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळवू शकले नाही, असे ते म्हणताच व्यासपीठावरून व श्रोत्यांमधून 'नाथाभाऊ आपण देखील मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये आहेत' असे उत्स्फूर्तपणे बोलून दाखवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव विभागातील वीज थकबाकी कोटीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव विभागातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करणे डोकेदुखी ठरते आहे. मालेगाव विभागात १ लाख ८० हजार ४३८ वीजग्राहक असून, यातील एक लाख ग्राहकांकडे २१५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही बाकी वसूल करण्यासाठी आता वीज वितरण कंपनीकडून पावले उचली जात आहेत.

वीज ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी शहरातील द्याने, गोल्डननगर भागात गेलेल्या महावितरणच्या पथकातील कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना मंगळवारी घडली. यानंतर महावितरणच्या थकबाकीचा विषय ऐरणीवर आला आहे. मालेगाव विभागातील थकबाकीदरांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार कृषिपंपधारक आहेत. ४० हजार कृषिपंप धारकांकडे १७५ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. त्याखालोखाल ५० हजार घरगुती वीजग्राहकांकडे १३ कोटी ७२ लाख रुपये इतकी थकबाकी वसूल होणे बाकी आहे. तसेच ४४ हजार व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहक थकबाकीदार असून त्याच्याकडे देखील १६ कोटींची थकबाकी आहे.

महावितरणने थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आता पावले उचलायला सुरुवात केली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत प्रथमतः ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सुमारे १२ हजार ग्राहकांकडे थकबाकी भरण्यासाठी तगादा लावला जाईल. त्यानंतर ५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल केली जाणार असल्याचे वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. थकबाकीची वसुली व्हावी यासाठी महावितरण कर्मचारी जादा वेळ देखील काम करीत आहेत.

मालेगाव विभागातील ग्राहक आणि थकबाकी -

- घरगुती - ग्राहक ५०३२८, थकबाकी १३.७२ कोटी

- व्यावसायिक - ग्राहक ४३३३६, थकबाकी २.५० कोटी

- औद्योगिक - ग्राहक ९८२, थकबाकी १.७८ कोटी

- पाणी पुरवठा - ग्राहक ११६, थकबाकी २.२५

- शेतीपंप - ग्राहक ४००४३, थकबाकी १७५.२४ कोटी

- पथदीप - ग्राहक ४३९, थकबाकी ५.४६ कोटी

- इतर - ग्राहक ५४९१, थकबाकी १४.४१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक रॅलीचा अनुभवा थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षभर महिला ज्या खास बाइक रॅलीची वाट पाहत असतात ती वुमेन्स बाइक रॅली मोठ्या थाटात रंगणार आहे. महिला दिनानिमित्त आपल्या हक्काच्या रस्त्यावर महिलांना बाइक चालवण्याची संधी मिळणार आहे. बुलेटपासून अगदी मोपेड बाइकपर्यंत कोणतीही बाइक घेऊन सहभागी होता येईल. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने आयोजित वुमेन्स बाइक रॅली यंदा ११ मार्च रोजी होणार आहे. अनेक महिलांनी यासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. तुम्हीदेखील सामील व्हा... गृहिणींपासून नोकरदार महिलांपर्यंत अन् सर्व कॉलेजच्या तरुणींनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा.

आजच्या अपडेटेड युगात पुरुषांना प्रत्येक कामात टक्कर देत आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख महिला निर्माण करीत आहेत. महिलांच्या या शौर्याला आणि कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने वुमेन्स बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाची ही 'ऑल वुमेन्स बाइक रॅली' नाशिकसह ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये एकाचवेळी होणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत या वुमेन्स बाइक रॅलीला महिलांचा कमालीचा प्रतिसाद मिळत आहे. नाशिकमध्ये ही रॅली ११ मार्च रोजी होणार आहे.

बाइक रॅलीमध्ये मोपेड बाइकपासून अगदी बुलेटपर्यंत कोणत्याही बाइकवरून महिलांना सहभागी होता येणार आहे. यापूर्वीच्या बाइक रॅलीत जावा, येझडी, हायबुझा, एफझेड या विदेशी बाइक्ससमवेत महिला सहभागी झाल्या होत्या. ही वुमेन्स बाइक रॅली म्हणजे नाशिककर महिलांचा जल्लोष अन् नारी शक्तीची एकता दर्शविणारी रॅली असते. यामुळेच यंदादेखील या रॅलीसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. कॉलेजियन्स तरुणींचे अनेक ग्रुप्स यात सहभागी होत आहेत. त्यामुळे तुम्हीदेखील तुमच्या मैत्रिणींसोबत ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे त्वरित नावनोंदणी करीत ऑल वुमेन्स बाइक रॅलीत सहभागी व्हावे.

ऑनलाइन नोंदणीसाठी

रॅलीत सहभागी होण्यासाठी www.allwomenpowerrally.com या वेबसाइटला भेट द्यावी. तेथे रजिस्ट्रेशन या सेक्शनला भेट दिल्यानंतर नाव नोंदवता येईल. मोबाइल एसएमएसद्वारे नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी PowerrallyNSK हा मेसेज टाइप करून तो ५८८८८ या क्रमांकावर पाठवायचा आहे.

फॅशनचा दाखवा जलवा

ऑल वुमेन्स बाइक रॅली केवळ बाइक चालवण्यापुरतीच मर्यादित नाही, तर या निमित्ताने तरुणी-महिलांना फॅशनचा जलवा दाखवण्याची खास संधी मिळणार आहे. यासाठी अनेक फॅशनेबल न्यू ट्रेंड असलेले कॉस्च्युम तुम्ही परिधान करू शकतात. अगदी पारंपरिक नववारी साडी अन् फेटा यांपासून वेस्टर्न आउटफिट परिधान करीत फॅशनचा खास जलवा दाखवू शकतात. नारी शक्तीची एकजूट दर्शवत विविध मेसेजेस या माध्यमातून देऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images