Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिल्ह्यात ११ पतसंस्थांमध्ये अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात ११ पतसंस्थांमध्ये अपहार झाला असून, संचालक व मोठ्या कर्जदारांसह ४७० जणांवर सहकार विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यातील एकूण पतसंस्थांपैकी २७ पतसंस्था अडचणीत सापडल्या असून, त्यांच्याकडे तब्बल १४७७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती पुढे आली आहे.

पतसंस्थांमध्ये संचालक मंडळाकडून झालेले गैरव्यवहार आणि बड्या थकबाकीदारांनी कर्ज बुडविल्यामुळे जिल्ह्यातील २७ पतसंस्था डबघाईस आल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या एकूण २१९९ कोटी ४५ लाख रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. सहकार विभागाने आतापर्यंत कलम ८८ अन्वये १९ पतसंस्थांची चौकशी केली आहे. दहा संस्थांची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून, अन्य दोन पतसंस्थांची चौकशी बाकी आहे. फेब्रुवारी २०१८ पर्यंत बुडीत निघालेल्या पतसंस्थांकडून सहकार विभागाने ७२१ कोटी ८३ लाख रुपयांची वसुली केली. जिल्ह्यात ११ पतसंस्थांमध्ये तब्बल १,८०१ कोटींचा अपहार झाला असून, अशा प्रकरणांमध्ये पतसंस्थांच्या संचालकांसह थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात गुंतलेल्या एकूण आरोपींची संख्या ४७० पर्यंत पोहोचली असून, त्यापैकी २०५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

चार मोठ्या बँका अवसायनात

जिल्ह्यातील चार मोठ्या बँका अवसायनात निघाल्या आहेत. या बँकांवर पाच वर्षांपासून अवसायक नेमण्यात आले आहेत. यापैकी श्रीराम बँकेकडे सर्वाधिक ३० कोटींची रक्कम वसुली बाकी आहे. बालाजी बँकेकडून चार कोटी, तर सिन्नर नागरी बँकेतून ५० लाखांची वसुली बाकी आहे. डबघाईस आलेल्या काही पतसंस्थांना सरकारने बिनव्याजी दोन कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. सरकारकडून प्राप्त मदत आणि पतसंस्थांकडील निधी यांमधून ठेवीदारांना दोन कोटी ६३ लाख १७ हजार रुपये परत करण्यात आले आहेत. पतसंस्थांकडून करण्यात आलेल्या वसुलीपैकी दोन कोटी ४२ लाख ७४ हजार रुपये सरकारला परत करण्यात आले आहेत; परंतु अद्याप २० लाख ३३ हजार रुपये वसुली बाकी असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवतीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डी फाटा परिसरातील दामोधरनगर भागात राहणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सौरिना शोमीन धोष (रा. सुकून सी. दामोधरनगर) असे या युवतीचे नाव आहे. अज्ञात कारणातून सौरीनाने शनिवारी (दि. ३) मध्यरात्री आपल्या रूममध्ये गळफास लावून घेतला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सौरीना नोकरी करून कॉलेजचे शिक्षण पूर्ण करीत होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूक वेदनांवर मायेची फुंकर

$
0
0


pravin.bidve@timesgroup.com

tweet : BidvepravinMT

नाशिक : जेथे माणसे एकमेकांचा तिटकारा करतात तेथे भूतदया दाखविण्याच्या फंदात कोणी का पडावे? स्वार्थाने बरबटलेल्या अन् आत्मप्रौढी मिरविण्यातच मग्न असलेल्या दुनियेत त्या मुक्या जीवांचा सहारा बनल्या. जायबंदी, आजारी आणि खंगलेल्या मुक्या जीवांना त्यांनी प्रेमाची अन् ममतेची ऊब दिली. शेकडो मुक्या जीवांच्या वेदनांवर प्रेमाची फुंकर घालणाऱ्या अन् हृदयामध्ये त्यांच्याप्रती आपुलकीची भावना जपण्याचे काम 'शरण फॉर अॅनिमल'च्या शरण्या शेट्टी करीत आहेत.

शरण्या यांचा जन्म मंगरुळला झाला. पण वयाच्या दुसऱ्या वर्षापासून त्या नाशिकमध्येच वास्तव्यास आहेत. शालेय शिक्षण निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी बीवायके महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यामुळे 'मी नाशिककर आहे' असे त्या अभिमानाने सांगतात. शरण्या यांच्या वडिलांना मुक्या जीवांचा प्रचंड लळा. त्यामुळे अशा मुक्या जीवांसमवेत खेळत अन् त्यांच्या सानिध्यातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. शरण्या यांनाही या मुक्या दोस्तांप्रति स्नेह निर्माण होणे स्वाभाविकच होते. विशेष म्हणजे विवाहानंतरही सासरी शेतीप्रधान कुटुंबामध्ये अशा जिवाच्या जीवलगांची त्यांना साथ मिळाली. सासरीदेखील श्वान पाळले असल्यामुळे त्यांची मुक्या जीवांप्रतीची आवड आपसूकच जोपासली गेली.

१९९८ मध्ये घडलेली एक घटना शरण्या यांच्या मनामध्ये खोलवर रुतली. या घटनेने त्यांच्या संवेदनशील मनाला साद घातली. फेब्रुवारी महिन्यातील ही घटना आहे. शिंगाडा तलाव परिसरातील अग्निशमन केंद्रासमोर रस्त्यावरील दुभाजकाला एक श्वान दोरीने बांधून ठेवण्यात आला होता. आजुबाजूने भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे हा श्वान सैरभैर झाला. त्याला अशा पद्धतीने बांधले होते की कोणत्याही क्षणी त्याचा अपघाती मृत्यू झाला असता. त्याची ही अवस्था पाहूनही लोक पुढे निघून जात होते. परंतु, शरण्या यांनी हा प्रकार पाहिला. त्या थांबल्या. या श्वानाला वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. वाहनांच्या गोंगाटामुळे हा श्वान आक्रमक झाला होता. तो जवळही येऊ देत नव्हता. प्रयत्नांची पराकाष्टा करून शरण्या यांनी त्याला वाचविले. हा श्वान संबंधित मालकाला नकोसा झाल्याचा एव्हाना त्यांच्या लक्षात आले. मालक या मुक्या जीवाशी बेईमान झाला असला तरी शरण्या यांनी मात्र त्याला जीव लावला. या घटनेनंतर शरण्या यांनी अशा नकोशा झालेल्या जीवांसाठी ठोस काही करण्याचा निर्धार केला. अशा मुक्या जीवांचा सांभाळ करण्याची इच्छा त्यांनी एका मित्राजवळ बोलून दाखविली. त्यानेही शरण्या यांना याकामी प्रोत्साहन देत जागा उपलब्ध करून दिली. आजारी, अपघातात जायबंदी झालेली, किंवा अगदीच बेवारस सोडलेल्या श्वानांना हक्काचा निवारा देतानाच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी शरण्या यांनी उचलली. त्यासाठी 'शरण फॉर अॅनिमल' ही स्वयंसेवी संस्था त्यांनी सुरू केली. त्यांच्या या कार्याला पती, मुले आणि अन्य कुटुंबियांनीदेखील पाठबळ दिले. गेली अनेक वर्ष त्यांनी हजारो मुक्या जिवांची सेवासुश्रुषा केली अन् संगोपनही केले. कुटुंबातील सदस्य या नात्याने शरण्या यांनी या मुक्या जीवांचा सांभाळ करण्याचे व्रत जोपासले आहे. सुरुवातीला त्यांना लोकांकडून तुसडेपणाची वागणूक मिळाली. परंतु, त्या डगमगल्या नाहीत. त्यांच्या या कामाची व्याप्ती आता वाढू लागली आहे. महापालिका केवळ श्वानांच्या निर्बीजीकरणाचे काम करते. जखमी अवस्थेत आढळणाऱ्या श्वानांबाबत महापालिकेलाही अनेक तक्रारी प्राप्त होत असत. अशा तक्रारीची दखल घेऊन शरण फॉर अनिमल या संस्थेने उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने या संस्थेला विल्होळी येथील कचरा डेपोसमोर जागा दिली असून शरण्या यांनी तेथे या मुक्या जीवांचा संसार थाटला आहे. डॉक्टरांच्या मदतीने येथे जखमी, आजारी, जायबंदी आणि खंगलेल्या मुक्या जीवांवर उपचार केले जातात. त्यांचे संगोपन केले जात. या जीवांवर येथेच एक्सरे, सोनोग्राफी व तत्सम उपचार व्हावेत याकरीता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कुठेही श्वान व तत्सम जीव संकटात असले तरी शरण फॉर अॅनिमलची टीम तेथे जाऊन या जीवाला विल्होळी येथे घेऊन येते.

प्राण्यांसाठी शेल्टर उभारणार

अपघातग्रस्त मुक्या जीवांसाठी शरणने हायड्रोथेरपी पूल विकसित केला आहे. पाळीव अथवा बेवारस मृत श्वांनाना संस्थेच्या आवारातच दफन करण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. इतकेच नव्हे तर या जिवलगांच्या स्मृती वृक्षारोपनाच्या माध्यमातूनही जपल्या जातात. जायबंदी मुक्या जिवांना जपणे हे लोकांना किळसवाणे काम वाटते. परंतु शरण्या यांना सहकार्य करणाऱ्या हातांची संख्या वाढू लागली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, इको फ्रेंडली वातावरणात प्राण्यांना येथे राहता यावे यासाठी नैसर्गिक वातावरणातील शेल्टर उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ममदापूर येथे शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नाशिक

येवला तालुक्यातील ममदापूर येथे साईनाथ भागिनाथ शिंदे (वय २९) या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्री घडलेली ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे यंदा जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १४ झाली आहे.

साईनाथ शिंदे यांनी रविवारी मध्यरात्री राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. शिंदे यांच्या नावावर ममदापूर येथे गट नंबर ८०७ मध्ये २.६३ हेक्टर शेतजमीन आहे. त्यांच्या नावे काही कर्ज होते का, याची माहिती महसूल विभागाकडून घेतली जात आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत १३ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबत मृत्यूला कवटाळले आहे. मार्च महिन्यातील ही पहिली आत्महत्येची घटना असून, गेल्या वर्षी जिल्ह्यात १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिखाव्यापुरताच 'सहकार' ऑनलाइन

$
0
0


ashok.suryavanshi@timesgroup.com

tweet- @ashoksuryaMT

नाशिक : डिजिटलच्या जमान्यात प्रत्येकजण ऑनलाइन सुविधांचा लाभ घेत असताना सहकार खाते मात्र यापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. नाही म्हणायला काही सुविधा नावापुरत्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्या दिखाव्यापुरत्याच उरल्या आहेत. गृहनिर्माण सोसायट्या, सहकारी बँका, कारखाने, सहकारी उद्योग संस्था, पतसंस्था अशा ग्राहकाशी थेट जोडल्या गेलेल्या संस्थांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सहकार विभागाने एकही ग्राहकाभिमुख सुविधा सुरू केलेली नाही. ज्या सुविधा सुरू करण्यात आल्या, त्या पुढे अपडेटच करण्यात न आल्याने त्यांचा काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य संकेतस्थळावर सहकार खात्याच्या वेबसाइटची लिंक आहे. या वेबसाइटवर राज्यातील नोंदणीकृत सहकारी संस्थांची यादी, अधिकाऱ्यांची नावे, भरावयाचे रिटर्न्स आदी माहिती आहे. राज्यातील सर्व प्रमाणित लेखापरीक्षकांचीही यादी देण्यात आली आहे. सहकार आयुक्तांच्या वेबसाइटचीही लिंक यातच दिलेली आहे. या वेबसाइटवर ऑनलाइन सोसायटी प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टिम, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, जीडीसी अँड ए व सीएचएम परीक्षेचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, यातही अनेक त्रुटी आहेत. शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाइन अर्ज सादर करताना किती अडचणी आल्या हे सर्वज्ञात आहे. सध्या जीडीसी अँड ए परीक्षेचे अर्ज स्वीकारणे सुरू आहे. मात्र, हे लॉगिन करतानाही उमेदवारांना असंख्य अडचणी येत आहेत. उमेदवारांनी नोंदणी करूनही यूजर नेम आणि पासवर्ड चुकीचा असल्याचे मेसेज झळकत असल्याने या परीक्षेचे फॉर्म भरणाऱ्यांना मनस्ताप होत आहे.

...ही माहिती उपलब्धच नाही

राज्य सरकारने डीम्ड कन्व्हेयन्ससाठी अनेक वर्षांपासून मोहीम हाती घेतली आहे. मात्र, सहकार विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे अद्याप ऑनलाइन डीम्ड कन्व्हेयन्स सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही. सोसायटी नोंदणीची सुविधाही ऑनलाइन असल्याचे भासविण्यात येत असले तरी कागदपत्रांची जंत्री इतकी मोठी आहे की, ते ऑनलाइन भरणे 'एजंट' आणि वकिलांनाच शक्य होते. एखाद्याने तसा प्रयत्न केला तरी सहकार कार्यालयातून त्याला एखाद्या एजंटकडे धाडण्यात येते. यात मोठे अर्थकारण दडलेले आहे. डीम्ड कन्व्हेयन्सच्या बाबतीतही हीच बोंब आहे. ऑनलाइन तपासणी प्रणाली, सोसायटी प्रमाणिकरण मोड्यूल, सोसायटी प्रमाणिकरण रिटर्न मोड्यूल आदी सर्व गोष्टी वेबसाइटवर दिसत असल्या तरी त्याची माहिती उपलब्ध नाही. विभागाच्या अखत्यारीतील सर्व सहकारी संस्थांची माहिती आणि संपूर्ण पत्तेही या विभागाकडे उपलब्ध नाहीत, हे विशेष.

सहकार विभागाकडून ऑडिटरची जी अॅलॉटमेंट केली जाते, ती रिझर्व्ह बँकेच्या धर्तीवर आणि रँकिंगनुसार करावी. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक झाल्यास ऑडिटरचे स्वातंत्र्य अबाधित राहील.

- महेश कोकाटे, सी. ए.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी दोन अधिकारी रडारवर

$
0
0

अवैध धंदे कारवाईकडे पोलिस दलाचे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात अवैध धंद्याचे प्रस्थ कायम असून, कारवाईनंतरही यात फरक पडत नसल्याचा मुद्दा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गंभीरतेने घेतला आहे. पोलिस आयुक्तांच्या रडारवर आणखी दोन पोलिस अधिकारी असून, ते काय कारवाई करतात, याकडे पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.

अवैध धंद्यावर छापे पडतात आणि दोन दिवसात ते पुन्हा सुरू होतात, याबाबत संबंध शहरात ओरड सुरू आहे. अवैध धंद्याचे पीक जोमात वाढले की पाठोपाठ गुन्हेगारीही वाढते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी दोन दिवसांपूर्वी सर्वच वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बैठक घेतली. विशेष म्हणजे या बैठकीला वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षकही हजर होते. या बैठकीनंतर उपनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांची बदली करण्यात आली. या बैठकीला फक्त पोलिस निरीक्षकच उपस्थित होते. काय चुकते, कोणाचा दबाव असतो याबाबत पोलिस आयुक्तांनी थेट निरीक्षकांकडून माहिती घेतली. या बैठकीत बोलण्याची इच्छा असलेल्या अधिकाऱ्यांना काही कारणास्तव व्यक्त होता आले नसेल म्हणून पोलिस आयुक्तांनी सर्वच निरीक्षकांशी वैयक्तीकरित्या बंद दरवाज्याआड चर्चा केली.

ते अधिकारी कोण?

पोलिस स्टेशन हद्दीत होणाऱ्या गुन्हेगारी घटना, अवैध धंद्यांचे प्रमाण तसेच कारवाईनंतर पुन्हा सुरू होणारे धंदे याबाबतची माहिती पोलिस आयुक्तांनी जाणून घेतली. पोलिस निरीक्षकांकडून संकलित झालेल्या माहितीनुसार दोन अधिकारी आयुक्तांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे पोलिस दलाचे लक्ष लागले आहे. ते अधिकारी कोण, याबाबत मात्र पोलिस आयुक्तांनी चुप्पी साधली आहे.

सर्वसामान्य व्यक्ती तक्रार करतात, यातच सर्व आले. काहीतरी चुकते म्हणून सर्वांची मते जाणून घेतली. शेवटी सर्वसामान्यांची सुरक्षा महत्त्वाची असून, यात कोणी हयगय करीत असेल तर कारवाई करावीच लागणार. पोलिस दलाचा सन्मान कमी करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणाचा लाभ प्रत्येकाला

$
0
0

स्व:जागृती मेळाव्यात डॉ. जितेंद्र ठाकूर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

अनुसूचित ठाकूर जमातीस कायदेशीर व सनदशीर मार्गाने घटनेने दिलेले अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही. आरक्षणाचे लाभ शेवटच्या ठाकूरंपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात मंडळ कार्यरत राहील, असे प्रतिपादन राज्याध्यक्ष डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी केले.

महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या वतीने विश्वास लॉन्स येथे आयोजित अनुसूचित ठाकूर जमात कर्मचारी स्व:जागृती प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभीस छत्रपती शिवाजी महाराज, आदिवासी जननायक बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. जितेंद्र ठाकूर, अॅड. महेश देशमुख, अॅड. रामचंद्र मेंहदाळकर, आयुक्त विलास ठाकूर, बंडू पवार, रणजित शिंदे, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.

या वेळी ‘जीवनसाथी’ या वधू-वर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र ठाकूर जमात मंडळ संघटनात्मक, प्रशासकीय, न्यायालयीन पातळीवर तपासणी समितींच्या बेकायदेशीर कार्यपद्धतीच्या विरोधात सतत संघर्ष करीत असल्याचे रणजित शिंदे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. विश्वास ठाकूर यांनी सामाजिक हक्क अधिकारासाठी एकसंघ व्हा व कायदेशीर संघर्ष करण्याचे आवाहन केले. तर बंडू पवार यांनी आदिवासी विकास विभाग व तपासणी समित्यांकडून होणारी नियमबाह्य पिळवणूकीबाबत अभ्यासपूर्ण प्रश्न मांडले.

शंकांचे समाधानकारक निवारण

अॅड. महेश देशमुख यांनी अनुसूचित ठाकुरांची घटनात्मक बाजू भक्कम असून, कायदेशीर मार्गाने न्याय मिळण्यास सर्वोतोपरी तत्पर राहू, असे सांगत प्रश्नांची उत्तरे दिली. तर मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. रामचंद्र मेहंदाळकर यांनी पडताळण्या समित्यांचे ठाकुरांना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे सर्व प्रयत्न कायद्याच्या कसोटीवर मोडून काढू, असे सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णय व नियमानुसार प्रकरण पडताळणीस देणाऱ्या समाजबांधवांच्या सेवेला धोका नसला तरी ठाकूर आपण सावध राहिले पाहिजे, असेही यावेळी सांगण्यात आले. ठाकूर कर्मचारी बांधवांचे सुमारे २५० प्रश्न लेखी स्वरूपात प्राप्त झाले होते. त्या सर्वांची समाधानकारक उत्तरे मान्यवर विधितज्ज्ञांनी दिली. मेळाव्यास धुळे जिल्हाध्यक्ष के. टी. ठाकूर, मालेगाव अध्यक्ष बापू वाघ, चंद्रकांत महाले, सतीष ठाकूर, मदन महाले, संजय नेमाडे उपस्थित होते. या वेळी गुणवंत कर्मचारी कैलास सूर्यवंशी, आदर्श शिक्षक नीलेश ठाकूर, कैलास वाघोदकर, संजय सूर्यवंशी, अलका चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास ठाकूर, संतोष ठाकूर, हेमंत साळुंखे, पंकज पवार, राजेंद्र ठाकूर, योगेश भामरे, कन्हैयालाल ठाकूर, प्रकाश चव्हाण, दीपक सूर्यवंशी, विजय अहिरे, ललित भामरे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेस्टेशनचे रूप पालटणार

$
0
0

स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट; रँकिंग सुधारण्यासाठी उपाययोजना

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानकात स्वच्छता कर्मचारी संख्या दुप्पट करण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यापर्यंत ३४ स्वच्छता कर्मचारी होते. आता ही संख्या ६५ करण्यात आली आहे. यात महिलांचे प्रमाण लक्षणीय असून, विशेष म्हणजे स्वच्छतेसाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने तीन वर्षांसाठी हा स्वच्छतेचा ठेका घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वेस्थानक स्वच्छता रँकिंग सुधारून लवकरच स्टेशनचे रूपडे पालटणार आहे.

स्थानक प्रमुख एम. बी. सक्सेना आणि वाणिज्य विभागप्रमुख आर. एस. गोसावी यांनीही याला दुजोरा दिला आहे. नाशिकरोड स्थानकाचा स्वच्छतेबाबत देशात सलग दोनवेळा पहिल्या दहामध्ये क्रमांक होता. गेल्या वर्षीपासून हा क्रमांक १६९ वर गेला. तो पुन्हा पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी प्रशासनाने मरगळ झटकली आहे. त्यासाठी अगोदरच्या ३४ स्वच्छता कर्मचारींपैकी कंत्राटी २६ आणि रेल्वेचे ८ कर्मचारी होते. रेल्वेच्या आठ कर्मचाऱ्यांना अन्य विभागात सामावून घेण्यात आले आहे. आता सर्व कंत्राटी स्वच्छता कर्मचारी असून, त्यांची संख्या ६५ झाली आहे. कंत्राट जाण्याची भीती असल्याने हे कर्मचारी मनापासून सेवा देतात. त्यांना केसरी रंगाची जाकेट देण्यात आली आहेत.

स्वच्छता परिसर वाढविला

स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ३ यांचीच जबाबदारी होती. तसेच विश्रामकक्ष, पार्सल विभाग, कार्यालये, स्थानका बाहेरचा परिसर, दोन पादचारी पूल, तीन रेल्वे ट्रॅकवरील कचरा गोळा करण्याचे कामही त्यांच्याकडे होते. आता कर्मचारी संख्या वाढवल्याने जबाबदारीही वाढली आहे. प्लॅट क्रमांक चार, सिन्नर फाटा परिसर, नवीन मोठा पादचारी पूल, मालधक्का, देवी चौक नाला परिसर, रेल्वे सुरक्षा दलामागील वाहनतळ, पार्सल ऑफिसमागील जागा, रेल्वे केबीन यांची नव्याने भर पडली आहे. अशाप्रकारे स्वच्छता परिसर वाढविण्यात आला आहे. या स्थानकातून दररोज १६ हजार प्रवासी प्रवास करतात. स्थानकाला दररोज १४ लाखांपर्यंत महसूल मिळतो. त्यांच्या तुलनेत स्वच्छता कर्मचारी संख्या वाढविणे आवश्यकच होते, असे मुकादम गोपाळ पथरोड यांनी सांगितले.

स्वच्छतेच्या कामाची आखणी...

तीन शिफ्टमध्ये हे ६५ कर्मचारी काम करतात

पहिल्या शिफ्टमध्ये......................१ सुपरवायर व ३१ कर्मचारी

दुसऱ्या शिफ्टला.........................१ सुपरवायझर व २५ कर्मचारी

रात्रपाळी....................................९ कर्मचारी

सफाई मशिन............................८

फरशी स्वच्छता, स्लीपर, स्कब्रर...........प्रत्येकी २

व्हॅक्यूम क्लिनर..................................१

पहिली शिफ्ट................................सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत

दुसरी शिफ्ट................................दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत

तिसरी शिफ्ट................................रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत

पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी मेहनत

काही महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते रेल्वेस्थानक स्वच्छतेचा थर्ड पार्टी ऑडीट रिपोर्ट प्रकाशित झाला. या अहवालात 'ए' वन गटात आंध्रचे विशाखापट्टणम देशातील सर्वात स्वच्छ स्थानक ठरले. तर 'अ' गटात पंजाबच्या बिआसला प्रथम आणि खम्मामला दुसरा क्रमांक मिळाला. गेल्यावेळी खम्माम २८५ व्या स्थानी होते. ओव्हरऑलमध्ये पहिल्या दहात महाराष्ट्रातील फक्त अहमदनगर स्थानकाचा (चौथा) समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून पहिल्या दहांमध्ये असणारे नाशिकरोड स्थानक ६६७ गुणांसह १६९ व्या स्थानी फेकले गेले. खम्मामप्रमाणे नाशिकरोड पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी मेहनत करूरीत असून, त्यासाठी कामाला लागले आहे.

स्वच्छता वादाचा मुद्दा

नाशिकरोड स्थानकातील स्वच्छतेची जबाबदारी रेल्वेची आहे. मात्र, रेल्वे व बसस्थानक परिसरातील जबाबदारी महापालिकेची आहे, असे रेल्वेचे म्हणणे आहे. स्वातंत्र्य दिन, स्वच्छता अभियान व अन्य महत्त्वाच्या प्रसंगीच रेल्वेस्थानकाबाहेरची समाजसेवी संघटनांच्या मदतीने स्वच्छता केली जाते. भिकारी, भटके, छोटे, मोठे व्यावसायिक, खासगी वाहनांचे चालक आदी पुन्हा घाण करतात. अस्वच्छता करण्यास मनाई आहे, कारवाई केली जाईल, असे लिहूनही घाण केली जाते. या कारणांमुळेच नाशिकरोड रेल्वे स्थानकाची स्वच्छतेबाबत घसरण झाली. स्थानकाबाहेरील हा प्रश्न रेल्वे आणि महापालिका यांनी सोडवावा व अन्य घटकांनीही त्यांना मदत करावी, अशी अपेक्षा आहे.

स्वच्छता कर्मचारी संख्या वाढविल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे रूप पालटणार आहे. पूर्वीच्या स्वच्छतेचा परिसर मर्यादित होता. आता मालधक्क्यापर्यंत व्याप्ती वाढविण्यात आली आहे. सर्व कर्मचारी गरीब व मेहनती असून, ते नक्कीच यशस्वी होतील.

-गोपाळ पथरोड, मुकादम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कौटुंबिक हिंसाचारात घट

$
0
0

गुन्हे नोंदणी ४३ टक्क्यांनी कमी; कुटुंब कल्याण समितीचे प्रयत्न

arvind.jadhav@timesgroup.com
Tweet : @ArvindJadhavMT

नाशिक : कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार थेट पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांना ब्रेक लागला असून, २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये दाखल गुन्ह्यांची संख्या तब्बल ४३ टक्क्यांनी घटली आहे. कुटुंब कल्याण समितीच्या प्रयत्नांमुळे गत सप्टेंबरपासून १०० संसार पुन्हा रूळावर आले आहेत. दुसरीकडे यामुळे पोलिसांचा ताणही कमी झालेला दिसतो.

कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण वर्षागणीक वाढत होते. शहरात वर्षभरात २०० ते अडीचशे गुन्हे फक्त शहरातच दाखल होत होते. पोलिसांच्या एका विशेष सेलमार्फत समुपदेशनाचा पर्याय वापरला जात होता. मात्र, यात पारदर्शकता नव्हती. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने कुटुंब कल्याण समिती स्थापन करण्याचे आदेश २७ जुलै २०१७ रोजी सर्वच जिल्हा कोर्टांना दिले. नाशिकमध्ये जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ३१ ऑगस्ट २०१७ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ही समिती गठीत केली. सदर समितीचे कामकाज जिल्हा कोर्टातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीमध्येच चालते. कुटुंब कल्याण समितीचे सदस्य म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. एन. पाठक, हेमा पटवर्धन, ललिता कमोद यांची नियुक्ती करण्यात आली.

कुटुंब कल्याण समिती अस्तित्वात येण्यापूर्वी विवाहितेच्या पती व सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाबाबत कलम ४९८ अ नुसार पोलिसांकडे किंवा न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात तक्रार करण्यात येत होती. मात्र, आता दोन्ही बाजुंच्या पक्षकारांना कुटुंब कल्याण समितीसमोर हजर रहावे लागते. समिती सदस्य दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून आपला अहवाल सादर करतात. या तज्ज्ञ समितीसमोर प्रकरण आल्यानंतर समुपदेशन व समझोता याकडे लक्ष दिले जाते. अगदीच हाताबाहेरचे प्रकरण असेल तरच ही समिती गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देते. याचा परिणाम २०१७ च्या शेवटच्या टप्प्यात लागलीच जाणवला. शहरात २०१६ मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार २२७ गुन्हे दाखल झाले. २०१७ मध्ये हे प्रमाण ४३ टक्क्यांनी कमी झाले. २०१८ मध्ये आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले आहेत.

कुटुंब कल्याण समिती स्थापन झाल्यापासून दावापूर्व ६२ तर प्रलंबीत दाव्यांमधील ३४ प्रकरणात समझोता घडवून आणण्यात यश मिळाले. जवळपास १०० कुटुंबातील वाद या केंद्राद्वारे मिटवण्यात आला. मागील पाच महिन्यांच्या कालावधीतील ही आकडेवारी असून, २०१८मध्ये हे चित्र अधिक स्पष्ट होईल.

- एस. एम. बुक्के, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

पूर्वीच्या तुलनेत आता अनावश्यक गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होते आहे. यामुळे पोलिसांवरील ताणही हलका झाला. कुटुंब कल्याण समितीमार्फत मनोमिलन होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातात. समितीच्या आदेशानुसारच पोलिस या कायद्यानुसार गुन्हा दाखल करू शकतात.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किसान सभेचा नाशिकहून लाँग मार्च

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

किसान सभेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पायी प्रवास करीत मंगळवारी लाँग मार्च काढण्यात येणार आहे. लाँग मार्चची सुरुवात शालिमार चौकातून होणार असून, तो विधानसभेवर धडकणार आहे. मोर्चात राज्यभरातील एक लाख शेतकरी सहभागी होणार असून, ते विधानभवनाला घेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा घेराव राहणार आहे.

लाँग मार्चमध्ये नाशिक, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतून ६० हजार, तर उर्वरित राज्यांतून ४० हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. सर्व शेतकरी आपल्या शिध्याची व्यवस्था स्वत:च करणार आहेत. शेती संकटामुळे शेतकरी वर्ग हलबल झाला आहे. सरकार मात्र शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी फसव्या घोषणा करीत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर १७५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे किसान सभेचा हा आरपार लढा असल्याचे किसान मोर्चच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोर्चात वनहक्क जमीन कायद्याची अंमलबजावणी करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शिधापत्रिका बदलून द्या, विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती करा, विविध योजनांचा तत्काळ लाभ द्या, वीजबिल माफ करा, विकासकामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा यासह विविध प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च व बेमुदत घेराव करण्यात येणार आहे. किसान सभेचे आमदार जिवा पांडू गावित, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, प्रदेशाध्यक्ष किसन गुजर, डॉ. अजित नवले, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इरफान शेख, सुभाष चौधरी मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

मोर्चाचे नियोजन असे

७ मार्च

दुपारचे भोजन खंबाळे (ता. इगतपुरी) जवळ

रात्री मुक्काम घाटणदेवी (ता. इगतपुरी)

८ मार्च

दुपारचे भोजन साईधाम, साई ढाब्याजवळ, कसारा (ता. शहापूर)

रात्री मुक्काम कळंबगाव (ता. शहापूर)

९ मार्च

दुपारचे जेवण आसनगाव (ता. शहापूर)

रात्री मुक्काम भातसा नदीवर

१० मार्च

दुपारचे भोजन भिनार (ता. भिवंडी)

रात्री मुक्काम मुंबई ढाबा (ता. ठाणे)

११ मार्च

दुपारचे भोजन विक्रोळी/घाटकोपर

रात्री मुक्काम सायन/दादरजवळ

१२ मार्च

सायन/दादरहून विधानभवनाकडे कूच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतीवर अंध तरुणी

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

गुणवत्तेवर जग पादाक्रांत करण्याची हिंमत बाळगणाऱ्या जिगरबाज दिव्यांगांना राजकारणातील हेव्यादाव्यांमुळे प्रतिनिधित्व मिळत नाही. मात्र, नांदगाव तालुक्यातील शास्त्रीनगर गावाने डोळस निर्णय घेत एका अंध तरुणीची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड केली. निवड झालेली ही तरुणी पूजा कचरू गुंजाळ असून, नांदगाव तालुक्यातील ती पहिली अंध ग्रामपंचायत सदस्य ठरली आहे. आज सर्व समाजात अंध, अपंग किंवा न्यूनत्व असलेल्यांची उपेक्षा होत असताना ग्रामपंचायतीच्या रिक्त जागेवर अंध पूजाला बिनविरोध निवडून गावाने डोळस दृष्टिकोन सर्वांसमोर ठेवला आहे. "दोन्ही डोळे नसले म्हणून काय झाले? मी ऐकू शकते, अनुभवू शकते. याद्वारेच मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून सक्षमपणे काम करू शकते," अशी विश्वास पूजाने व्यक्त केला आहे.

नांदगावच्या शास्त्रीनगर ग्रामपंचायतीची तीन महिन्यांपूर्वी निवडणूक झाली तेव्हापासून वॉर्ड २ ची इतर मागासवर्गीय महिला राखीव ही जागा रिक्त होती. या जागेसाठी गावात जातीच्या दाखल्यांसह पात्रताधारक महिलाच न मिळाल्याने पद तीन महिने रिक्त राहिले. मात्र, २७ फेब्रुवारी रोजी या जागेसाठी पोटनिवडणूक झाली व गावातील मंडळींनी पात्रताधारक पूजा मुंजाळ हिला या पदासाठी अर्ज भरण्याची गळ घातली. नाशिक येथे बिटको महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या पूजाला हा आपला मोठा सन्मान तर वाटलाच, पण आपण अंध असूनही सामाजिक कार्य करू शकतो हा तिचा ठाम विश्वास सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला. या जागेवर पूजाची बिनविरोध निवड झाली असून, ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झालेली पूजा नांदगाव तालुक्यातील पहिली अंध व्यक्ती ठरली आहे. पूजा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी असून, तिचे काका साहेबराव मुंजाळ माजी सरपंच, तर काकू छाया साहेबराव मुंजाळ या थेट सरपंच निवडणुकीत विजयी होऊन सध्या विद्यमान सरपंच आहेत. पूजा अंध असूनही परिस्थितीशी झुंजणारी, लढणारी आणि अतिशय हुशार व कार्यक्षम असल्याने तिची निवड झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. "अंध असले तरी कमजोर वा दुर्बल नाही, अकार्यक्षम मुळीच ठरणार नाही. प्रत्येक ग्रामसभेला मासिक सभेला उपस्थित राहीन. सभेतील मुद्दे काळजीपूर्वक ऐकेन व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन," असे पूजा ठामपणे सांगते.

पूजा हुशार व परिस्थितीशी दोन हात करणारी आहे. लहानपणी गोवर झाल्याने तिचे दोन्ही डोळे गेले; पण ती डगमगली नाही. ती जिद्दीने शिक्षण घेत आहे. नाशिकमध्ये ती ब्रेल लिपी शिकली. आता बारावीनंतर पुढची दोन वर्षे ती बिटको कॉलेजमध्ये रेकॉर्डिंग ऐकत अभ्यास करतेय, असे तिचे काका साहेबराव मुंजाळ यांनी सांगितले..

''दृष्टी नसली तरी दृष्टिकोन आहे. शिक्षण सांभाळून मी ग्रामपंचायत सदस्यपदाला न्याय देईन. अंध, अपंग असलेल्यांनी रडत न बसता परिस्थितीशी दोन हात करावे. जिद्द ठेवावी. मला गावाने मोठी संधी दिली. त्याला मी योग्य न्याय देईन.'' - पूजा मुंजाळ, ग्राम पंचायत सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरीराचे दोन तुकडे झाले तरी तो होता जिवंत...

$
0
0

धुळे :

नंदुरबार रेल्वेस्थानकावर मालगाडीखाली येऊन एका इसमाने आत्महत्या केली. त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. पण त्यानंतरही काही सेकंद तो जिवंत होता. पोलिसांनी त्याच्याजवळ धाव घेतली, त्याचे पालथे शरीर उचलले. त्याने स्वत:चे नाव, पत्ता सांगितला आणि नंतर प्राण सोडला.

सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास नंदुरबार रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १ आणि २ च्या मध्ये ही घटना घडली. संजय मराठे (३९) असे या इसमाचे नाव असून तो रिक्षाचालक होता. मालगाडीचा वेग कमी होता. मालगाडी येताच संजयने स्वत:ला गाडीसमोर झोकून दिले. कमरेपासून त्याचे धड वेगळे झाले. मालगाडी जाताच रेल्वे स्थानकावर असलेले एस. एस. आय. गोविंद काळे व पोलिस कॉन्स्टेबल पुरूषोत्तम खिरटकर या पोलिसांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांच्या एका मदतनीसाने त्याला उचलले. त्यानंतर त्याने स्वत:चे नाव संजय नामदेव मराठे आहे, असे सांगितले आणि प्राण सोडला. ओळख पटल्याने त्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले.
शवविच्छेदन करून तात्काळ नातेवाईकांच्या ताब्यात शव देण्यात आले.

त्याने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. लहान माळीवाडयात तो राहात होता. त्याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर रिक्षाचालकांत हळहळ व्यक्त होत असून लहान माळीवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लाँग मार्च सुरू

$
0
0

हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

नाशिक:

शेतकऱ्याचा ऐतिहासिक लाँग मार्च नाशिक येथून मंगळवारी दुपारी सुरू झाला. किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या लाँग मार्चमध्ये राज्यभरातून आलेले हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. नाशिक येथील सीबीएस चौकातून निघालेला हा लाँग मार्च सहा दिवस पायी चालून १२ मार्च रोजी मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईत पोहोचल्यावर मागण्यांसाठी शेतकरी विधान भवनाला बेमुदत महाघेराव घालणार असल्याची घोषणा किसान सभेने केली आहे.

कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती दया, शेतीमालाला दीडपट भावाची हमी दया, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी दया, बोंड आळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई दया, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा, साखरेच्या भावात हस्तक्षेप करून ऊसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा, विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0

नाशिक: त्र्यंबकेश्वर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर हे प्रकरण जात पंचायतीच्या माध्यमातून दाबण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

राजेवाडी भोकरपाडा येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये म्हणून या मुलीला धमकावण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी जात पंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. तसेच पीडित मुलीच्या वडिलांना जातीतून बहिष्कृत करण्याची धमकीही देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामटवाडेत अतिक्रमण जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महापालिकेत आयुक्त मुंढे यांचे पर्व सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अतिक्रमण निर्मूलन विभागाला चांगलाच कामाला लागल्याचे दिसून येत आहे. सिडको विभागात सलग अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविल्यानंतर बुधवारी (दि. ७) सिडकोतील कामटवाडे शिवारात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या वेळी घरांसमोरील ओट्यांचे अतिक्रमण काढण्यात आले.

नाशिक महापालिकेने सध्या अतिक्रमणावर चांगलेच लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या सर्वच विभागांमध्ये अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई होत असल्याचे दिसत आहे. बुधवारी, सिडको परिसरातील कामटवाडे येथे अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली. येथील विठ्ठल पार्क रो-हाऊस परिसरातील रस्त्यालगत असलेले घर व दुकांनाचे ओटे काढण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या रो-हाऊस मिळकतधारकांनी ओटे वाढविल्याने या परिसरातील रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे येथून वाहतुकीचा मार्गच बंद होत असल्याचे दिसत होते. विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. ७) अतिक्रमण निर्मूलन विभागाने या रस्त्यावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या रो-हाऊसचे अतिक्रमण काढले. त्याचबरोबर या पुढे अशाप्रकारे अतिक्रमण न करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या असून, ज्या नागरिकांनी अतिक्रमण केले आहे ते स्वयंस्फूर्तीने काढून घेण्याचे आवाहनही पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंगयुद्धाच्या महापर्वणीत येवलेकर चिंब

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

सामुदायिक रंगपंचमीचे सामने खेळताना

रंगवर्षावात न्हावुन निघाले येवलेकर सारे

सप्तरंगांच्या वर्षावात उमटले इंद्रधनुचे नजारे

रंगभरलेल्या पिंपासह ट्रॅक्टर्स सरसावती पुढे

एकमेकांवर मारा करिता रंगांचा

हर्षोल्हात रंगे रंगयुद्ध न्यारे...! असं मनोहारी दृष्य ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या येवला शहरात मंगळवारी (दि. ६) दिसून आले. निमित्त होते रंगपंचमी निमित्त परंपरेनुसार चालत आलेल्या सामुदायिक रंगांच्या सामन्यांचे. ऐतिहासिक मैदानात ट्रॅक्टर्स अन् ट्रॅक्टर्सच्या ट्रॉलीमधील रंगाने भरलेल्या पिंपांमधून बादलीने एकमेकांवर रंगवर्षाव करण्यात आला. सामुदायिक रंगवर्षावात हवेत उमटलेला 'इंद्रधनु'चा मनोहारी नजारा यंदाही लक्षवेधी ठरला.

या 'रंग'लेल्या युद्धाचा हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष सहभागी झालेल्या शहरवासीयांनी आनंद लुटला.

रंगयुद्धाचा पहिला मोठा सामना खेळला गेला तो शहरातील ऐतिहासिक अशा टिळक मैदानात. 'उपमहाराष्ट्र केसरी' पैलवान राजेंद्र लोणारी यांच्या हस्ते मैदानातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, तर माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या सामन्याचा श्रीगणेशा करण्यात आला. सायंकाळच्या पाचच्या सुमारास येथील रंगांच्या सामन्यास सुरुवात होताना पुढे याठिकाणी पाऊनतास रंगयुद्ध रंगले. सामुदायिक सामन्यातील ही रंगांची महापर्वणी साधताना मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने तरुणाईच नव्हे तर ज्येष्ठांनी देखील रंगात ठेका धरला होता. दुसरा सामना शहरातील डीजे रोडवर खेळला गेला. याठिकाणी देखील अनेक मंडळे सहभागी झाली होती. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, किशोर सोनवणे, नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, दयानंद जावळे आदींसह हजारोंच्या संख्येने येवलेकर या सामुदायिक रंगांच्या सामन्यात सहभागी झाले होते.


जलदुर्ग किल्ल्यावर रंगपंचमी

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील कळसुबाई मित्र मंडळाचे कार्यकर्ते व ट्रेकिंगवीर यांनी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेल्या जलदुर्ग खांदेरी, उंदेरी या किल्ल्यावर रंगपंचमी साजरी केली. इतिहासाचा शोध व बोध घेत या कार्यकर्त्यांनी या किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुबंईचे पोर्तुगीज व जंजिराचा सिद्धी यांच्यावर वचक ठेवण्याकरिता व समुद्राच्या किनारपट्टीवर स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी खांदेरी, उंदेरी या जलदुर्ग किल्ल्यांची निर्मिती केली होती. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात आहे. रंगपंचमीचे निमित्त साधून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या किल्ल्यांवर साफसफाई करून निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिकरित्या रंगपंचमी साजरी केली. मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, रामदास चौधरी, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, दीपक बेलेकर, गोकूळ चव्हाण, शुभम बेलेकर, संतोष म्हसने, बालाजी तुंबारे, संदीप खैरनार, भगवान तोकडे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्यांच्या' आयुष्यात उमेदीचे रंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकमेकांवर विविध रंगांची, फुलांची उधळण करीत एचआयव्हीबाधित बच्चेमंडळींनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली. महिंद्रा आणि महिंद्रा आणि यश फाउंडेशन यांच्यातर्फे सातपूर एमआयडीसीतील महिंद्रा हरियाली येथे रंगपंचमीचे आयोजन झाले. या चिमुकल्यांच्या जीवनात आरोग्य, प्रेम, नवीन उम्मेद, आनंद आणि सकारात्मक दृष्टीकोनाचा रंग भरण्याचा प्रयत्न करण्यात आला.

एचआयव्हीग्रस्त बच्चेमंडळींना इतरांप्रमाणेच सकारात्मक दृष्टीकोनातून जीवन जगता यावे या उद्देशाने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा या उपक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महिंद्रा आणि महिंद्राचे मधुकर टर्ले, प्रदीप भट, कमलाकर घोंगडे, आशितोष अग्निहोत्री आणि यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांना रंगाचा टिळा लावून तसेच एकमेकांवर विविध रंगी फुलांची उधळण करून रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील २५० एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या नागरिकांनी व बालकांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या बालकांनी रंगपंचमीचे औचित्य साधून कृष्ण भगवानांचा वेश परिधान करून उपस्थित मान्यवरांना रंगाचा टिळा लावला. उपस्थित मान्यवरांनी बालगोपाळांवर कोरड्या रंगांची व फुलांची उधळण करून रंगपंचमी साजरी केली. यावेळी टर्ले, कमलाकर घोंगडे यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात आज महामूकमोर्चा

$
0
0

धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे बालिका अत्याचारप्रकरणी नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सर्व समावेशक महामूक मोर्चा आज (दि. ८) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. याबाबतची माहिती माजी महापौर भगवान करणकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मूकमोर्चाला शहरातील ३८ समाजांनी, ५० सामाजिक संघटना तसेच भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी यांसह अन्य राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे, असेही करणकाळ यांनी माहिती देताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कानिफनाथांच्याचरणी लाखो नाथभ​​क्त लीन

$
0
0

संजीवन समाधी यात्रेस मढी येथे प्रारंभ

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

डफाच्या तालावर नृत्य करत कानिफनाथांचा ध्वज उंचावत जयघोष करीत कलश भेटीचा सोहळा उत्साहत पार पडला. रेवड्यांचा प्रसाद वाटप व जागोजागी महाप्रसादाचा नाथभक्तांनी लाभ घेतला.

होळी सणापासून कानिफनाथांच्या यात्रौत्सवास प्रारंभ होऊन गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव चालतो. रंगपंचमी अर्थात फाल्गुन वद्य पंचमी हा नाथांचा संजीवन समाधी स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. राज्यभरातून नाथभक्त व आखाडे मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होत असतात. सिन्नर तालुक्यातील निमगाव-देवपूर येथील ९० वर्षांची परंपरा असणाऱ्या शंकरबाबा कांडेकर यांच्या आखाड्याचे उत्तराधिकारी पुंजाजी बाबा कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नाथभक्तांनी सहभाग घेत पूजाविधी केली.

नाशिक, निफाड, सिन्नर, राहता आणि उत्तर महराष्ट्रातील नाथभक्तांनी चतुर्थीला मढीतील टेकडीच्या पायथ्याशी कांडेकर बाबा आखाड्याच्या जागेची स्वच्छता करून तंबूची उभारणी सुशोभीकरण व विद्युत रोषणाई केली. या वेळी नाथांच्या गादी स्थापन करून देवीदेवतांचे आवाहन करून पुजाविधी व आरती करण्यात येते. पंचमीला पहाटे स्नानादी कार्यक्रम आटोपून निशाण काठीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी हजारो भाविकांनी महाप्रसाद वाटपाचा लाभ घेतला. सायंकाळी आरती व पूजाविधी तसेच दीक्षादान समारंभ पार पडला. या वेळी आखाड्याचे प्रमुख पुंजाजीबाबा कांडेकर, दौलतबाबा बोराडे, भिमाजी माळोदे, तुकाराम हांडोरे, कमळाबाई सातभाई, मनीषा जाधव, वंदना शिंदे, राजू अस्वले, भाऊसाहेब शिंदे आदींसह मोठ्या संख्येने नाथभक्त सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वऱ्हाडींवर काळाचा घाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

गोंदेफाटा येथील लग्नसोहळा आटोपून निफाडकडे जाणारा वऱ्हाडाच्या पिकअपला सिन्नर-बारागावपिंप्री रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात तीन वऱ्हाडी ठार झाले. तर २१ जण जखमी झाले आहेत.

निवृत्ती उगले यांच्या शेताजवळ हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. मंगळवारी (दि.६) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संजय सखाराम माळी (वय ४०), बापू दगू कराटे (वय २१) व दग२ भास्कर कराटे (वय ५०, सर्व रा. उगावरोड, मेगट वस्ती, निफाड) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये दगू कराटे व बापू कराटे या बापलेकाचा समावेश आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेगटवस्ती, उगावरोड, निफाड येथील वऱ्हाडी गोंदेफाटा (ता. सिन्नर) येथील माऊली लॉन्समध्ये विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर ते पिकअपने (एमएच १४, बीएम ८१५८) निफाड कडे जात असताना सिन्नर-बारागाव पिंप्री रस्त्यावर बारागावपिंप्री शिवारात निवृत्ती तुकाराम उगले यांच्या शेतजमीनीजवळ चालकाचा पिकअपवरील ताबा सुटल्याने पिकअप पलटली. या अपघातात २४ जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनी लागलीच मदत कार्य सुरू केले. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवत असताना संजय सखाराम माळी (वय ४०), बापू दगु कराटे (वय २१) यांचा मृत्यू झाला. दगू कराटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमींवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालय, पिंपळगाव व निफाड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून किरकोळ जखमींना उपचार करून सोडून देण्यात आल्याचे समजते.

याबाबत सुनील रतन पवार (वय २१, रा. उगावरोड, निफाड) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी पिकअप चालक पोपट रावसाहेब खेडकर याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक हरीभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जी. पी. लावणे अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images