Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महिलांसाठी आज मतदार नोंदणी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला वर्गात मतदानाबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रशासनाने महिला दिनाचे औचित्य साधून गुरूवारी (दि. ८) विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्य अधिकारी निवडणूक अधिकारी गिरीश मोहोड यांनी दिले आहेत. जानेवारीत प्रसिद्ध झालेल्या मतदारयादीत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण बरेच कमी आहे. त्यामुळे महिला मतदारांची नोंदणी वाढणे आवश्यक असून त्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ यांनी तहसीलदार, नायब तहसीलदारांना दिल्या आहेत. महिला दिनानिमित्त मतदान जागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महिला वसतिगृह, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, परिचारिका, महिला बचत गटाच्या सदस्या, शिक्षिका यांना या मोहिमांमध्ये सामावून घेऊन मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारी व असरकारी संस्था, महामंडळ आदींच्या मदतीने महिला मतदारांची नोंदणी वाढविणे, तालुक्यातील प्रतिष्ठित महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे, यासाठी विविध कार्यक्रम घेणे, नवविवाहित महिलांची पूर्वीची मतदार नोंदणी रद्द करून नवीन मतदार म्हणून नोंदणी करणे, मागील वर्षभरात प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी नोंदणी केलेल्या महिलांची यादी प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्राप्त करून घेणे व या महिलांचे मतदारयादीत नाव नसल्यास त्यांची नावे मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सैन्य दलातील महिला, युवती, सैन्य दलातील मतदार तसेच लोकशाही प्रक्रियेपासून वंचित राहिलेले आदिवासी, तृतीयपंथी, स्थलांतरित कामगार यांचीही नोंदणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिमेंट, खडीतून आयुष्याला सोनेरी मुलामा

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com
tweet- SanchetigMT

महिला आणि संघर्ष या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू... त्यातही जर कपाळाचे कुंकूच पुसले गेले तर मग शब्दांतही मांडता येणार नाही अशा दिव्यातून स्त्रीला जावे लागते... पतीच्या निधनानंतर आपसूकच येणारे संकट आणि सोबतच पडणाऱ्या जबाबदाऱ्या मोठ्या असतात... मालेगावच्या नीलिमा जयप्रकाश पाटील यांनी मात्र अशा परिस्थितीशी दोन हात करीत या संकटावर यशस्वी मात केली. पतीच्या निधनानंतर खचून न जाता त्यांचा गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय पुढे नेत त्यांनी जम बसवला. पुरुषी वर्चस्व असलेल्या या क्षेत्राबद्दल त्रोटक माहिती असताना केवळ चिकाटी व जिद्दीच्या जोरावर त्यांनी पूल, रस्त्यासारखी कामे करून अनेकांना रोजगारही दिला. त्यांची संघर्षगाथा प्रेरणादायी अशीच आहे.

सटाण्याच्या नीलिमा पाटील यांचा विवाह १९९६ साली मालेगाव येथील जयप्रकाश पाटील यांच्याशी झाला. पाटील यांनी लग्नानंतर व्यवसायात चांगला जम बसवला. संसाररुपी वेलीवर दोन गोंडस मुलेही जन्माला आली. संसाराचा गाडा व्यवस्थित चालू असताना २०११ साली पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला. साहजिकच नीलिमा पाटील यांच्यावर स्वत:सह कुटुंब तसेच पतीच्या व्यवसायाची जबाबदारी येवून पडली. मुलांचे शिक्षण हा प्रश्नही त्यांच्यापुढे होता. पण त्या अजिबात खचल्या नाहीत. दु:खातून सावरत पतीच्या व्यवसायाची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पेलली. सासू व भावाने पाठिंबा दिल्याने त्यांचे मनोबल वाढले. सुरुवातीच्या काळात या व्यवसायात त्यांना महिला असल्याने ठेकेदारांनी टोमणे मारले. ‘बाई काय काम करणार’ असे उपरोधिक शब्दही त्यांच्या कानावर पडू लागले. पण, त्या मागे हटल्या नाहीत.

सुरुवातीला गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्ट्रेशन करतानाही अधिकाऱ्यांनी नकारात्मक मत व्यक्त केले. त्यातून त्या निराशही झाल्या. पण, बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील व रमेश शिरसाठ यांच्या सहकार्यातून त्यांचे रजिस्ट्रेशन झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. बांधकाम क्षेत्रात महिलांचा टक्का बोटावर मोजण्याइतकाच आहे. त्यात गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरची संख्या तर अत्यल्पच. एकूणच नीलिमा पाटील यांची व्यवसायगाथा निश्चितच सर्वांना बळ देणारी आहे. वाळू, खडी, सिमेंट, डांबराचा दर्जा तपासण्यापासून त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी समजून घेतानाच त्यांनी रोड रोलर, ट्रॅक्टर, पाण्याचे व डांबरचे टँकरचे गणितही समजून घेतले. त्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उभे राहून त्यातले बारकावे टिपले. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल दोन कोटींच्या पुढे आहे. रस्ता, पुलांसह विविध कामे त्यांनी केली आहेत. आता त्या मालेगाव महानगरपालिकेची कामेही करीत आहेत. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नीलीमा पाटील यांनी व्यवसायात जम बसवतानाच मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले. त्यांचा मोठा मुलगा सिव्हिल इंजिनीअरींगचा डिप्लोमा करीत आहे, तर धाकटा कॉमर्स शाखेत अकरावीला शिक्षण घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'तो' ठराव निलंबित

$
0
0

सरकारकडून सत्ताधाऱ्यांना झटका; एसपीव्हीवर दोन सदस्यांचीच नियुक्ती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शासकीय नियमांची मोडतोड करून महापालिकेत अनियमितपणे ठराव करणाऱ्या सत्ताधारी भाजपला राज्य सरकारने आणखी एक दणका दिला आहे. स्मार्ट सिटीतल्या एसपीव्हीच्या संचालक मंडळावर खासदार, आमदार व गटनेत्यांना घेण्याचा महासभेचा ठराव राज्य सरकारने निलंबित केला आहे.

सदरील ठराव शासन निर्णयाच्या विसंगत असून, एसपीव्ही पक्षाच्या उतरत्या क्रमांकानुसार दोनच सदस्यांची नियुक्ती करता येणार असल्याचा खुलासा सरकारने केला आहे. त्यामुळे एसीपीव्हीवर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुचवलेला प्रतिनिधी सत्ताधाऱ्यांना निवडावा लागणार आहे.

शिक्षण मंडळ गठित करण्याऐवजी शिक्षण समिती तयार करण्याचा सरकारचा ठराव असतांनाही, सत्ताधारी भाजपने शिक्षण मंडळ तयार करण्याचा ठराव करून तो सरकारकडे पाठविला होता. सरकारने हा ठराव विखंडित करत, प्रशासनाचीही कानउघाडणी केली होती. तरीही सत्ताधारी भाजपकडून बेकायदेशीर ठराव करण्याचा सिलसिला सुरूच राहिला.

स्मार्ट सिटीची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) स्थापन करण्यात आले आहे. या एसपीव्हीवर १५ संचालक असून, त्यात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेता आणि विरोधी पक्षनेत्यासोबतच उतरत्या क्रमांकाच्या पक्षाचे दोन प्रतिनिधी असावेत, असा नियम आहे. त्यामुळे या एसपीव्हीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य जाणे अपेक्षित होते. परंतु, भाजपने याला छेद देत, २० जुलै २०१७ रोजीच्या महासभेवर नवीन ठराव केला. त्यामुळे या एसपीव्हीत खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, शिवसेना गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादी गटनेते गजानन शेलार, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, मनसे गटनेते सलिम शेख यांचा संचालक मंडळावर घेण्याची शिफारस केली होती.

भाजपसाठी मोठा झटका

परंतु, या ठरावावर काँग्रेसच्या गटनेते शाहू खैरे यांनी सरकारकडे दाद मागितली होती. त्याची दखल घेत, नगरविकास विभागाने हा ठराव निलंबित करून, बेकायदेशीर ठरवला आहे. महासभेचा ठराव हा स्मार्ट सिटी संदर्भात १८ जून २०१६ च्या ठरावाशी विसंगत असल्याचे नगरविकास विभागाने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे एसपीव्हीवर खासदार व आमदारांची वर्णी लावण्याचे प्रयत्न असफल ठरले आहेत. आता त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नामनिर्देशित होणाऱ्या सदस्यांचीच वर्णी लागणार आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

बग्गांचा मार्ग मोकळा

एसपीव्हीवर काँग्रेसकडून शाहू खैरे आणि राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे सहयोगी नगरसेवक गुरूमित बग्गा यांच्या नावाची शिफारस महासभेला करण्यात आली होती. परंतु, गुरूमित बग्गा सारखा अभ्यासू नगरसेवक आल्यास आपली अडचण होईल म्हणून सत्ताधाऱ्यांनी शिवसेना गटनेते विलास शिंदेच्या सुचनेनुसार खासदार व आमदारांचा ठराव करून बग्गांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, खैरे व बग्गा यांनी सरकारकडे यासंदर्भात तक्रार केली. त्याची दखल घेत, सरकारनेच हा ठराव निलंबित केल्याने आता एसपीव्हीवर जाण्याचा खैरे व बग्गा यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयाकडून सासूला १५ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अमृतधाम परिसरात राहणाऱ्या सासूला तिच्या जावयासह नातेवाइकांनी वेगवेगळी कारणे सांगून तब्बल १५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी निफाड तालुक्यातील नैताळे येथील चौघांविरोधात आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

चेतना विजय जाधव (वय २०, रा. धर्मशक्ती रेसिडन्सी, उद्याननंगर, अमृतधाम, पंचवटी) यांनी त्यांच्या पतीसह इतर तीन जणांनी आपल्या आईची फसवणूक केल्याची फिर्याद दिली. चेतना यांचा विवाह नैताळे येथील सागर साहेबराव बारे यांच्याशी झाला. जावई सागर बारे, सासरा साहेबराव लखू बारे, प्रवीण साहेबराव बारे, सासू हौशाबाई साहेबराव बारे यांनी दुग्ध व्यवसायासाठी पैसे लागत असल्याचे सांगून चेतना यांच्या आईकडून १५ लाख ५० हजार रुपये घेतले. जावयावर विश्वास ठेवून त्यांनी पैसे दिले. तसेच सासूच्या नावावरील फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतला. फ्लॅटवर कर्ज घेतले. मात्र, ते न फेडल्याने फायनान्स कंपनीने हा फ्लॅट सील केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात य़ेताच चेतना यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये संशयितांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक योगिता जाधव तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा लाँग मार्च

$
0
0

सीबीएसवर सहा तास ठिय्या; विधानभवनाला मंगळवारी घेराव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेल्या एक लाख शेतकऱ्यांच्या लाँग मार्चने मंगळवारी सीबीएसवर तब्बल ६ तास ठिय्या मांडल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ११ वाजेपासून विविध वाहनांतून मोर्चेकरी गोल्फ क्लबच्या मैदानाजवळ उतरले. त्यानंतर त्यांनी कूच करत सीबीएस चौकाचा ताबा घेतला. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी लागली.

वेगवेगळ्या गावातून आलेल्या आंदोलकांच्या हातात लाल झेंडा व डोक्यात लाल टोप्या घातल्या होत्या. विविध घोषणा व मागण्याचे हातात पकडलेले फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले. मोर्चकऱ्यांची गर्दी जमल्यानंतर सीबीएस चौकात प्रमुख नेत्यांनी भाषणे केली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हा मोर्चा मुंबईच्या दिशेने महामार्गावरून निघाला. शिस्तबद्ध निघालेल्या मोर्चामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मोर्चाने रात्रीचा मुक्काम वालदेवी नदीच्या काठावरील रायगडनगरजवळ केला. त्यानंतर बुधवारी हा मोर्चा इगतपुरीकडे रवाना झाला.

सहा दिवस पायी चालून मंगळवारी (दि. १२) हा मोर्चा मुंबईत पोहोचणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनाला बेमुदत महाघेराव घातला जाणार आहे. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी अध्यक्ष आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला आहे. यात नाशिकमधील कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, भाकप नेते राजू देसले यांच्यासह विविध संघटनेचे नेतही सामील झाले.

घोषणांनी दणाणला कसारा घाट

घोटी : आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुबंईकडे निघालेल्या माकप, किसान सभा यांचा लाँगमार्चने बुधवारी दुपारी घोटीच्या पुढे प्रस्थान केले. रणरणत्या उन्हात आपल्या मागण्यांबाबत घोषणा देत शेतकऱ्यांनी कसारा घाट दणाणून सोडला. दरम्यान, इगतपुरी तालुका मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाला समर्थन दिले आहे.

मोर्चात सहभागी हजारो कार्यकर्त्यांनी घोटीजवळील खंबाळे शिवारात दुपारचे भोजन केले. यानंतर संघटीतपणे ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मोर्चामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. माकप नेते देविदास आडोळे, कांतिलाल गरुड, दत्ता राक्षे, चंद्रकात लाखे, अप्पा भोळे आदींनी घोटी टोलनाका येथे मोर्चाचे स्वागत केले. शेतकरी प्रतिनिधी अरुण जुंदरे, रोहिदास उगले, किरण जाधव, अशोक धांडे, राजाराम धांडे, रोहित उगले, राजाराम जाधव, राजेंद्र काळे यांनी आपापल्या तालुक्यातील विविध समस्यांचे निवेदन अजित नवले यांना दिले.


शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा
शेतीमालाला दीडपट भावाची हमी द्या
दुधाला किमान ४० रुपये भाव मिळावा
कसणाऱ्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा
वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा
कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा
पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्या
बोंडआळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई द्या
विकासकामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे कारस्थान बंद करा
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होताना ऊसाला जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही

$
0
0

अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऑक्सिजनअभावी नाशिक जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यास बापट यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी रुग्णालयांना पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन या अत्यावश्यक सेवेसाठी दरवर्षी तपासणी केली जाते. नाशिक शहराला रायगड जिल्ह्यातून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा होतो. स्थानिकस्तरावर ऑक्सिजनची निर्मितीसाठी रुग्णालयांबरोबर बैठक घेऊ, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सामान्य नागरिकांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेतील साधने आणि उपकरणांच्या तपासणी कामी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्यास त्यांचे निलंबन केले जाणार असल्याचे सांगितले. या विषयावर झालेल्या चर्चेत आमदार दीपिका चव्हाण, जयदत्त क्षीरसागर यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात विवाहितेवर सामूहिक बलात्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

खंडणीसाठी पैसे न दिल्याने तरुणास मारहाण करून त्याच्यासोबत असलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना खड्डाजीन येथील नवीन बसस्थानकाजवळील बोरीचा मळा येथे घडली आहे. याप्रकरणी ४ आरोपींविरुद्ध मालेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

माजीद कुरेशी इकबाल कुरेशी (वय २२) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सोहेल, सलमान, असिफ या उर्वरित संशियतांचा शोध घेतला जात आहे. शहरातील गोल्डननगर भागातील १९ वर्षीय विवाहिता तिच्या बहिणीच्या पतीसोबत दुचाकीवर बसून मंगळवारी (दि. ६) दुपारी उपचारासाठी रुग्णालयात जात होती. याचवेळी खड्डाजीन भागात चार तरुणांनी दुचाकी अडवून दुचाकीस्वार तरुणाकडे २० हजार रुपयांची खंडणी मागितली. त्याने नकार दिल्याने चौघांनीही तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच विवाहितेला रमझानपुरा भागातील बोरचा मळा येथे जबरदस्तीने नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर संशयितांनी तरुणाची दुचाकी व मोबाइल फोन हिसकावून पळ काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपोवनात ड्रेनेजसमस्या

$
0
0

भाविक, पर्यटकांना दुर्गंधीची डोकेदुखी

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तपोवनातील कपिला संगमाजवळून जाणारी ड्रेनेज पाइपलाइन फुटली असून, त्यातील घाण पाणी पाझरू लागले आहे. हे पाणी कपिला संगमावर तुंबले आहे. त्याची दुर्गंधी येथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना डोकेदुखी ठरत आहे. पुराच्या पाण्यामुळे येथील भरावा वाहून गेल्यामुळे ही ड्रेनेज लाइन आणि मोठ-मोठे चेंबर उघडे पडले आहेत.

कपिलासंगमावरील खडक पोखरून त्यातूनही ही ड्रेनेज लाइन टाकण्यात आलेली आहे. त्यावर २० ते २५ फूट उंचीचे चेंबर बांधण्यात आलेले आहेत. खडक पोखरून टाकण्यात आलेल्या या पाइपांवर दगड गोटे-माती टाकून ही ड्रेनेज लाइन बुजविण्यात आली होती. मात्र पुराच्या पाण्यात येथील माती आणि दगड वाहून गेले आहेत. हे दगड पुढे गोदावरीच्या किनाऱ्याला साचून राहिले आहेत. त्यामुळे पुराच्या पाण्याचा प्रवाहाचा तुंब थेट रामटेकडीपर्यंत पोहचून या परिसरात असलेल्या वस्तीत पाणी शिरण्याचे प्रकार घडत आहेत.

लिंकेज बंद करावे

या भागात देशातून भाविक आणि पर्यटक येत असतात. हा परिसर गेल्या काही दिवसांपासून सेल्फी पॉईंट म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. मात्र याठिकाणी जर अशाप्रकारे ड्रेनेजच्या पाण्याने दुर्गंधी पसरली असेल तर येथे येणाऱ्यांचा ओघ कमी होईल. यासोबतच येथील राहणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही उघडी पडलेली ड्रेनेज लाइन बुजवावी आणि तातडीने हे लिंकेज बंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पावित्र्य नष्ट होण्याच्या मार्गावर

गोदावरीच्या किनाऱ्याने नेण्यात आलेली ही ड्रेनेज लाइनला खडकाळ भागात पूर्णपणे उघडी पडली आहे. पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे सुमारे २० फुटापर्यंतचे दगड वाहून गेले आहेत. हा खोदलेला भागात मोठी खळी तयार झाली आहे. त्यात ड्रेनेज लाइन स्पष्टपणे दिसत आहे. त्यातील काही पाइप फुटून त्यातून घाण पाणी पाझरण्यास सुरुवात झाली आहे. त्याची दुर्गंधी असह्य होऊ लागली आहे. कालांतराने हे फुटण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्यामुळे येथील पावित्र्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डिझायनिंग क्षेत्रात ‘तिने’ भरले रंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

बालपणी असलेला चित्रकलेचा छंद, त्याला भविष्यात मिळालेली शिक्षणाची जोड आणि मनात काही वेगळे करून दाखवण्याची जिद्द! याच्या जोरावर शहरातील अर्पिता जितेंद्र लाड यांनी डिझायनिंगच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. बालपणीच्या छंदाला मेहनत आणि प्रशिक्षणाची जोड देत त्यांनी एक यशस्वी उद्योजिका म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

बारामती येथील माहेर असलेल्या अर्पिता लाड यांना चित्रकलेची आवड असल्याने ठरवून कमर्शियल आर्ट सारखे क्षेत्र करियर म्हणून निवडले. माहेरच्यांनी देखील त्यांना प्रोत्साहन दिल्याने पुणे येथील अभिनव कला महाविद्यालयातून याच क्षेत्रात पदवी संपादन केली. पुण्यात एका जाहिरात एजन्सीची सुरुवात केली. दरम्यान शहरातील व्यावसायिक असलेले जितेंद्र लाड यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या मालेगावकर झाल्या. सासरी आल्यावर देखील त्यांच्या कुटुंबाने त्यांना करियर करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

मालेगाव हे यंत्रमागधारकांचे शहर असल्याने येथील कापड उद्योगात डिझाईनिंगला नक्कीच वाव आहे, ही बाब लक्षात घेवून त्यांनी साडीवर डिझाईन करण्याचे ठरवले आणि सुरू झाला एका उद्योजिकेचा प्रवास! यासाठी त्यांनी विविध साड्यांवर पेंटिंग करायला सुरुवात केली. सिल्क मार्क ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (SMOI) द्वारा टेक्सटाईल मिनिस्टरी यांच्याकडे त्यांनी नोंदणी केली. यासह त्यांनी ग्रीक, आफ्रिकन, इजिप्तिशयन चित्रशैलींचा अभ्यास सुरू केला. या सर्व चित्रशैलीचा समावेश त्यांनी साडी पेंटिंग करताना केला. त्यातून आपल्या व्यवसायाचे वेगळेपण सिद्ध केले.

आज अर्पिता लाड पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, सोलापूर, नगर, जळगाव, गोवा, सातारा, बारामती यांसारख्या मोठ्या शहरात 'अर्पिता लाड एक्सप्रेसिंग आर्ट' या नावाने आर्ट गॅलरीमध्ये वैयक्तिक व ग्रुप शोजमध्ये प्रदर्शन भरवित आहेत. भारतीय सिल्क व त्यावरील चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी सिल्क मार्क ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने डिसेंबर २०१० मध्ये बंगळुरू येथे आयोजित केलेल्या फॅशन शोसाठी त्यांची निवड केली होती. आपल्या कलेच्या बळावर डिझाईन क्षेत्रात त्यांनी भरारी घेतली असून या क्षेत्रात मालेगावचा स्वतःचा 'अर्पिता लाड एक्सप्रेसिंग आर्ट' हा ब्रेंड निर्माण केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता रुंदीकरणास मुहूर्त कधी?

$
0
0

बेंडकुळे मळा ते गुप्ता गार्डन रस्ता दुभाजकाविनाच

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक महापालिकेत सर्वाधिक पसंतीचा रोड म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका व स्थानिक नगरसेवक रस्ता रुंदीकरणासाठी झटत होते. यानंतर रस्ता रुंदीकरण करण्यात आले. मात्र त्यात काही ठिकाणी हे काम न झाल्याने तो रस्ता आजही रुंदीकरणाविनाच आहे. त्यामुळे या रुंदीकरणाला मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न या परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

गंगापूररोड परिसरातील बेंडकुळे मळा ते गुप्ता गार्डनपर्यंतचा रस्त्याचे आजही रुंदीकरण झालेले आहे. त्याबरोबर हा रस्ता दुभाजक विनाच आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने नुकतीच या रस्त्यादरम्यानच पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी आरक्षित जागेत खोदकाम करत टाकली. यामुळे पाण्याच्या पाइपलाइनीसाठी जागा आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणाला कधी, असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. रोजच शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या गंगापूररोडच्या उर्वरित रुंदीकरणाकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

महापालिकेने गंगापूररोड भागासाठी नव्याने मोठी पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. रुंदीकरणासाठी अनेक खासगी मालकांनी आजही गंगापूररोडच्या रुंदीकरणाला जागा दिलेली नाही. परंतु, नुकतेच पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी मात्र खासगी मालकांनी जागा दिल्याचे पहायला मिळाले. यामुळे पाण्याच्या लाइनीला जागा, रस्त्याच्या रुंदीकरणाला काहीच नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी उर्वरित गंगापूररोडचे रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

वेगाने वाढलेल्या गंगापूररोड भागात घरकुले घेण्यासाठी अनेकांची पसंती असते. गंगापूररोड भागात २० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंत फ्लॅट बांधकाम व्यावसायिकांनी उपलब्ध केलेली आहेत. अनेक मोठी शैक्षणिक संकुलेदेखील या भागात उभी राहिल्याने या भागास नवीन ओळख मिळाली आहे. मात्र अशा परिस्थितीत गंगापूररोडवरील रस्त्याचे रुंदीकरण व्हावे याकरीता स्थानिक नगरसेवक तसेच महापालिकेला मोठा संघर्ष करावा लागत आहे. अथक प्रयत्नानंतर रस्त्यात अडथळे ठरणारी वृक्ष महापालिकेने न्यायालयाकडे मागणी करत हटविली होती. परंतु, आजही काही ठिकाणी जागा खासगी मालकांनी दिल्या नसल्याने रस्ता रुंदीकरणापासून वंचित राहिला आहे.

कमानीचेही अतिक्रमणच?

गंगापूररोडवर नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिराच्या कमानीचेही रस्त्यात अतिक्रमण का, असा सवाल वाहनचालक उपस्थित करतात. रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर तत्काळ रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे, असे मत गंगापूररोडवासियांनी केले आहे. बेंडकुळे मळा ते गुप्ता गार्डनपर्यंत रस्ता रुंदीकरण झाला नसल्याने सायंकाळी वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. तसेच नेहमीच किरकोळ अपघात होत असल्याने हाणामारीचे प्रकारदेखील होत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅड. गुळवेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील नेतृत्व करणारे जिल्हा बँक संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. संदीप गुळवे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. चार महिन्यापूर्वी त्यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

पक्षप्रवेशाच्या वृत्ताला गुळवे यांनी दुजोरा दिला आहे. मुबईत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हा संपर्क नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी गुळवे व समर्थक नेत्यांनी भेट घेतली. या भेटीप्रसंगी आमदार जयंत जाधव, आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्याशीही चर्चा झाली. नाशिक येथे शनिवार (दि. १०) होणाऱ्या कार्यक्रमात गुळवे व त्यांच्या समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'महिला-बालकल्याण'चा असहकार

$
0
0

मुंढेंच्या उपस्थितीची मागणी; निर्णय अंमलबजावणीसाठी आग्रही

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त समितीच्या बैठकांना हजर राहत नाहीत, तोपर्यंत सभा न घेण्याचा निर्णय महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीने जाहीर केला आहे.

महिला व बालकल्याण समितीने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याचा तसेच प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप महिला व बालकल्याण विभाग समितीच्या संतप्त झालेल्या सदस्यांनी केला. तसेच प्रशासनालाच असहकार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेत महिला सदस्य विरुद्ध प्रशासन असा वाद निर्माण झाला आहे. ठरावाची अंमलबजावणी करा; अन्यथा समिती बरखास्त करा, अशी मागणी थेट मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याची माहिती सभापती सरोज अहिरे यांनी दिली आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभेत महिला सदस्यांच्या ठरावावरून वादळी चर्चा झाली. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या कार्यकाळ पूर्ण होत आला असतानाही प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली. समितीने केलेले ठराव प्रशासनाने बासनात गुंडाळले आहेत. तपोवनात महिलांसाठी होस्टेल बांधण्याचा ठराव, सहा विभागीय कार्यात सॅनिटरी नॅपकिनचे व्हेडिंग मशीन बसवण्याचा,चार कोटींचे प्रशिक्षण शिबिर घेण्याच्या ठरावाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने समिती सदस्यांनी सभा थेट तहकूब केली. यापुढे आयुक्त मुंढेंनाच समितीला हजर राहण्याची विनंती केली जाणार आहे. परंतु त्यानंतरही आयुक्तांकडून प्रतिसाद न मिळाल्यास यापुढे सभाच न घेण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सभेला समिना मेमन, नयना गांगुर्डे, सत्यभामा गाडेकर, शीतल माळोदे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी महिलांचा टाहो

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील उत्तरपूर्व भागातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. या भागातील गावोगावच्या विहिरींनी कातळ गाठल्याने हंडाभर पाण्यासाठी तहानलेल्या जनतेचा पाण्यासाठी आक्रोश सुरू झाला आहे. याच उत्तर पट्ट्यातील गोरखनगर (आंबेवाडी) येथील महिलांनी रिकाम्या हंड्यानिशी गावानजीकच्या जलकुंभाकडे आपला मोर्चा वळवून तासभर ठिय्या दिला.

तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील सोमठाणे, विसापूर, कुसूर आदी गावांना पाणीपुरवठा केला जाणारा जलकुंभ याच गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळस टेकडीवर आहे. मात्र गोरखनगरचा योजनेत समावेश नसल्याने योजनेतील पाण्याचा एक थेंबही मिळत नाही. गोरखनगरवासियांना ग्रामपंचायतीच्या गावातील एका सार्वजनिक विहिरीतून आपली तहान भागवावी लागते. या योजनेतीतून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करत गावच्या महिलांनी बुधवारी आंदोलनात्मक पवित्रा घेतला.

रिकाम्या हंडयानिशी कोळस टेकडीवरील जलकुंभाकडे चाल करत याठिकाणी तब्बल एक तास ठिय्या दिला. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख वाल्मिक गोरे, डॉ. सुधीर जाधव, अशोक बोराडे, निवृत्ती घुमरे, संजय वैद्य आदी उपस्थित होते. ग्रामसेवक मनीष भाबड यांनी येत्या आठ दिवसात १४ व्या वित्त आयोगातून गावानजीक असलेला ३८ गावे योजनेचा जलकुंभ ते गाव अशी एक किलोमीटरची जलवाहिनी टाकून गावाला पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइकर्णींसाठी रविवारी ‘रायडिंग’ची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

काही वर्षांपासून महिला वर्गासाठी पर्वणी ठरणारी 'मटा' बाइक रॅली यंदा महिला दिनानिमित्त रविवारी (दि. ११ मार्च) होणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून यंदा या रॅलीस सुरुवात होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्यास महिलांचा वाढता प्रतिसाद आहे. सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांना थेट किंवा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.

विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी दरवर्षी महिला दिनाचे औचित्य साधत हा उपक्रम आयोजित केला जातो. नाशिकसह ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमध्येही हा उपक्रम राबविला जात आहे. यंदाच्या रॅलीसाठी 'ऑल वुमन्स पॉवर रॅली' असे घोषवाक्य आहे. दरवर्षी या रॅलीस महिला वर्गाचा प्रतिसाद वाढताच आहे. यंदाच्या बाइक रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रुपसह नावनोंदणीला विशेष प्रतिसाद मिळत आहे. मोपेडसह मोटारसायकल आणि बुलेट या वाहनांवर महिला या रॅलीत सहभागी होणार आहेत. कॉलेज विद्यार्थिनींसह विविध सोसायटींमधील ग्रुप, महिला मंडळे, महिलांची भिशी मंडळे, नोकरदार, गृहिणी, अधिकारी, उच्चशिक्षित आदी वर्गांतील महिला नावनोंदणीस प्रतिसाद देत आहेत.

विविध थिमसह ड्रेसअप

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही विविध महिलांच्या ग्रुपने विविध थिम्ससह ड्रेसअप करण्यावर भर दिला आहे. गतवर्षी विविध सामाजिक संदेशांसह महिलांचे ग्रुप विविध संकल्पनांवर आधारीत ड्रेसअपसह रॅलीत सहभागी झाले होते. यामध्ये नऊवारी, फेटा, वेस्टर्न आऊटफिट आदी संकल्पनांनुसार ड्रेसअप केले होते.

ऑनलाइन नोंदवा नाव

या रॅलीत सहभाग नोंदविण्यासाठी www.allwomenpowerrally.com या वेबसाइटला भेट द्या. तेथे रजिस्ट्रेशन सेक्शनवर क्लिक करून नावनोंदणी करा. एसएमएसद्वारेही आपण नावनोंदणी करू शकता. यासाठी powerrallyNSK हा मेसेज टाइप करून तो ५८८८८ या क्रमांकावर पाठवा. अधिक माहितीसाठी (०२५३) ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधा.

एंट्री होणार टशनमध्ये

दरवर्षीप्रमाणे यंदाही बाइक रॅलीमध्ये तुमची एंट्री टशनमध्येच असायला हवी. जेणेकरून आमच्या फोटोग्राफर्सचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल आणि ते तुम्हाला कॅमेराबद्ध करतील. तुमच्या पेहरावासाठी कुठलेही बंधन नाही. तुम्ही पारंपरिक वेशात किंवा मॉडर्न किंवा एखाद्या रफ-टफ लूकमध्ये या. पण तुमचा पेहराव इतरांपेक्षा हटके असायला हवा. यंदा सहभागी महिला व ग्रुपसाठी यावर्षीही खास स्पर्धा होणार आहेत. यात बेस्ट ड्रेस, बेस्ट हेल्मेट, बेस्ट बाइक सजावट, बेस्ट सामाजिक संदेश आणि ग्रुपसाठी बेस्ट ड्रेसकोड स्पर्धा होणार आहेत. विजेत्या महिला व ग्रुपसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिवासह साथीदाराला लाच घेताना अटक

$
0
0

लाच प्रकरणातील चौकशी अधिकारीच ठरला लाचखोर

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता यांच्या तक्रारीवरून मंत्रालयातील सहाय्यक सचिव तथा प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी प्रभाकर बाबूराव पवार व साथीदार प्रशांत गवळी याला २५ हजारांची लाच घेताना धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पाच वर्षांपूर्वी एका लाच प्रकरणात कारवाई झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्ग एकच्या अधिकाऱ्याचा खातेनिहाय चौकशी अहवाल तक्रारदारांच्या बाजूने सरकारकडे पाठविण्यासाठी पवारने ४० हजारांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीअंती २५ हजारांची लाच स्वीकारताना ही कारवाई झाली, अशी माहिती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात गुरुवारी (दि. ८) सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या वेळी उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांनी ही माहिती दिली. यानुसार पाच वर्षांपूर्वी धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत विनोद वाघ यांना लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून, या प्रकरणात वाघ यांची प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, विभागीय आयुक्त नाशिक कार्यालय यांच्यामार्फत चौकशी सुरू होती. याठिकाणी मंत्रालयातील सहसचिव दर्जाचे अधिकारी प्रभाकर बाबूराव पवार यांची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती आहे. तेही चौकशी करीत होते. खातेनिहाय चौकशीचा अहवाल तक्रारदार वाघ यांच्या बाजूने पाठविण्यासाठी पवार यांनी अभियंता वाघ यांच्याकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये पवार यांचा साथीदार प्रशांत माळीला देण्याचे ठरले. त्याआधीच बुधवारी (दि. ७) अभियंता वाघ यांनी पवार यांची धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली. पवार हे सहसचिव दर्जाचे अधिकारी असल्याने धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आवश्यक त्या परवानगीच्या सर्व पुर्तता करुन सापळा रचला. अखेर पवार यांच्या सांगण्यावरुन साथीदार प्रशांत माळीने २५ हजारांची लाच स्वीकारताच त्याला पकडले.

त्याचवेळी दुसरे एक पथक पवार यांच्या मागावर होते. त्या पथकाला आदेश मिळताच त्यांनी पवारला नाशिक येथून नंदुरबारला ठाणेपाडा येथे घरी जाताना पकडले. या दोघांना धुळे एसीबी कायालर्यात आणण्यात आले. याप्रकरणी पवारसह माळीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला असून, पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, निरीक्षक पवन देसले, हवालदार नरेंद्र कुळकर्णी, जयंत साळवे, संदीप सरग, संतोष हिरे, सुधीर सोनवणे, प्रकाश सोनार, कुष्ण्कांत वाडीले, सतीश जावरे, शरद काटके, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संदीप कदम यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेशवेकालीन श्रीरामरथाला बसविले नवीन चाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

चैत्र शुद्ध एकादशीला रामरथाची मिरवणूक काढण्यात येते. सुमारे २५० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही सुरू आहे. या मिरवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या पेशव्यांच्या काळातील रामरथाचे एक चाक जीर्ण झाले होते. ते बदलून त्याच्या जागेवर आता दुसरे चाक बसविण्यात आले आहे. हे चाक सांगली येथील कारागिराकडून बनविण्यात आले आहे. ५०० किलो वजन असलेले हे चाक बनविण्यासाठी ७० हजार रुपये खर्च आला आहे.

नाशिकमधील श्रीराम जन्मोत्सवात रथोत्सव हा ग्रामोत्सव म्हणून ओळखला जातो. काळाराम मंदिरापासून श्रीराम आणि गरुड रथ काढण्यात येतो. नाड्यांच्या साह्याने हे रथ ओढण्याचा मान ठरलेला आहे. पेशव्यांच्या काळात श्रीमंत गोपीकाबाई पेशवे यांनी नवस पुर्ततेसाठी हा रामरथ तयार करून घेतला आणि तो श्रीरामचरणी अर्पण केला. त्याची व्यवस्था त्याकाळी त्यांचे मामा श्रीमंत सरदार रास्ते यांच्याकडे सोपविली होती. त्यांच्या रास्ते आखाडा तालिम संघाला हा रथ ओढण्याचा आणि देखभाल करण्याचा मान दिला, तो आजतागायत सुरू आहे.

रामरथ बनविण्यासाठी सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला आहे. त्याची रचना आणि कलाकुसर अत्यंत सुंदर करण्यात आली आहे. शेकडो वर्षांपासून असलेली या चाकांपैकी रथाच्या डाव्या बाजूचे जीर्ण झालेले चाक बदलण्यात आले. या वर्षी उजव्या बाजूचे चाक बदलण्यात आले. सांगली येथील रफीकभाई मिस्तरी यांनी बाभळीच्या झाडाच्या लाकडाचा उपयोग करून हे चाक बनविले आहे. त्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. डाव्या बाजूच्या चाकाची धाव उतरली होती, ती देखील नव्याने चढून घेण्यात आली आहे. चाकाला आलेला फुगीरपणा काढून दोन्ही चाके सारख्या आकाराची दिसतील अशा प्रकारे करण्यात आली आहे. तयार झालेले चाक नाशिकला आणल्यानंतर मिस्तरी यांनी बसविले. अविनाश दीक्षित यांच्या मंत्रघोषात रथोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे चाक बसविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाईन फेस्टिव्हलमध्ये यशोगाथांचे सादरीकरण

$
0
0

नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद

म.टा.खास प्रतिनिधी,नाशिक

नाशिकच्या वाईन फेस्टिव्हलमध्ये दि. ९ ते ११ मार्चदरम्यान त्र्यंबकरोडवरील ग्रेप काऊंन्टी रिसोर्ट येथे फार्मर्स मार्केट भरणार आहे. हा शेतकऱ्यांचा बाजारातच शेती संबंधित विषयावर फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनावर तसेच त्यांच्या यशोगाथ्यावर निर्मित निवडक चित्रफित सायंकाळी ४ ते ६.३० दरम्यान दाखवण्यात येणार आहेत. या चित्रफितींचा विषय शेतकऱ्यांच्या दूरदृष्टी व मेहनतीने आलेल्या फळाबाबत असून, वाईन मेकिंग, शेळ्या व मेंढ्यापालन, कुक्कुटपालन,ऑरगॅनिक तंत्रज्ञान यावर आधारित या चित्रफिती असणार आहेत.

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा याकरिता ग्रेप काऊंन्टी रिसोर्टतर्फे अशा प्रकारच्या फार्मर्स मार्केटचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे ग्राहकांना ताजा माल योग्य किमतीत मिळू शकतो. यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त ऑरगॅनिक उत्पादक, आदिवासी गावातील उत्पादने, महिला बचत गटाची उत्पादने, दूध उत्पादकांचे दुग्धजन्य पदार्थ व नाशिकचे वाईन उत्पादक यात सहभागी होणार आहे. नाशिकच्या जवळील सुरगाणा, पेठ, हरसूल, वाडोळी, अंबोली या गावातील शेतकरी व आदिवासी यात सहभागी होणार आहेत. शेतीमालासोबतच फळे, नैसर्गिक उत्पादने, आदिवासी हस्तकला येथे उपलब्ध राहतील. दरम्यान, लोकसंगीताचे अनेक कार्यक्रमाचाही आनंद नाशिककरांना घेता येईल. सदर कार्यक्रमाला प्रवेश पूर्णत: मोफत असून, नाशिककरांनी यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकलांगांना अर्थार्जनाची 'विद्या'!

$
0
0


Ashwini.patil@timesgroup.com

tweet- @ashwinipatilMT

नाशिक : मानसिक विकलांग मुलगी म्हणजे पालकांवर ओझं अशी आपल्या समाजाची मानसिकता. या मानसिकतेचं ओझं गेली कित्येक वर्ष पालकांनी वाहिलं आहे. मात्र, मानसिक विकलांग मुलीही स्वत:ला सांभाळू शकतात, अर्थार्जन करू शकतात हे 'घरकुल परिवार' संस्थेच्या कामातून सिद्ध झालं. विद्या फडके यांच्या पुढाकारातून मानसिक विकलांग मुलींसाठी सुरू झालेली संस्था आज पालक आणि महिलांच्या जगण्याचा आधार बनली आहे. संस्थेने या महिलांना सक्षम करण्याचं काम केलं आहे.

मूळच्या पुण्याच्या असलेल्या विद्या फडके लग्नानंतर नाशिकमध्ये आल्या. मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तींशी त्यांचा खरंतर कधी संपर्क आला नाही. मात्र, एका कार्यक्रमासाठी रजनी लिमये यांच्या प्रबोधिनी ट्रस्टमध्ये जाण्याचा योग आला. संस्थेचे काम, मानसिक विकलांग मुलांचे कलाकौशल्य पाहून त्यांना कुतुहल वाटले आणि तेव्हापासून प्रबोधिनी ट्रस्टमध्ये कार्यकर्ती म्हणून काम सुरू केले. गेली चाळीस वर्षे हे काम अखंड सुरू आहे.

१९७८ ते २०११ पर्यंत विद्याताईंनी प्रबोधिनी ट्रस्टच्या मुलांसाठी काम केले. रजनी लिमये यांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. या शाळेत येणाऱ्या मुलांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्याचे काम विद्याताईंनी केले. या मुलांना अर्थार्जनाचा मार्ग मिळावा यासाठीही प्रयत्न केले. अगदी फाइल्स बनविण्यापासून ते मुलांना नोकरी मिळवून देण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास विविध अनुभवांनी घडला आहे. प्रबोधिनी ट्रस्टमध्ये मुले यायची, शिक्षण घ्यायची, कलाकौशल्य विकसित करून घराला थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न करायची. पण या सगळ्यात मुलींचे आयुष्य स्थिरस्थावर व्हायला अधिक वेळ जात होता. किंबहुना पालकांना मुलींच्या भविष्याची चिंता अधिक सतावत होती. आपण नसलो तर या मुलींचं काय होणार, ही चिंता कायम पालकांच्या चेहऱ्यावर दिसून येत असे आणि या जाणीवेतूनच २००६ पासून 'घरकुल परिवार'ची सुरुवात झाली. मानसिक विकलांग मुलींसाठी संस्था सुरू करण्याचा निर्णय विद्याताईंनी घेतला आणि त्याला कुटुंबातूनही पाठिंबा मिळाला. या मुलींच्या पालकांसाठी हा मोठा दिलासा होता. कारण त्यांच्या पश्चात मुलींना दुसरे घर मिळणार होते. या घरात त्यांच्या मुली सुरक्षित राहणार होत्या.

आज घरकुल परिवारच्या होस्टेलमध्ये ४८ महिला गुण्यागोविंदाने राहतात. १६ ते ६२ वयोगटांतील या महिला नाशिक, पुणे, चंद्रपूर, लातूर अशा महाराष्ट्राच्या विविध भागांतून येथे आलेल्या आहेत. विद्याताई आणि त्यांचा स्टाफ या सगळ्यांची काळजी घेण्याचे काम करतो. विशेष म्हणजे या स्टाफमध्येही शिक्षिका, डॉक्टर, स्वयंपाकी ते होस्टेलची देखरेख करणाऱ्या सगळ्या महिलाच आहेत. मानसिक विकलांग असलेल्या व्यक्तींचा सांभाळ करणे ही संयमाची कसोटीच असते. पण, विद्याताई आणि त्यांचा स्टाफ ही कसोटी पूर्ण करतात. वयात येणाऱ्या मुलींच्या वागण्यात होणारा बदल, त्यांची चीडचीड या सगळ्यात त्यांना समजून घेण्याचे काम विद्याताई करतात. घरकुल परिवाराने या महिलांना फक्त आश्रय दिला असे नाही तर त्यांना सक्षम होण्याची संधी दिली आहे. कारण घरकुल परिवारातील या मुली पापड, वाळवणाचं साहित्य तयार करण्यापासून पेन तयार करणं, राख्या, आकाशकंदील, गुढी, बुकेदेखील तयार करण्याचं काम करतात. त्यांनी तयार केलेल्या या वस्तू शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचतात. वारली पेंटिंगमध्येही या मुली पारंगत झाल्या आहेत. त्यांच्यातील हे कलाकौशल्य विकसित झाल्याने त्यांच्या अर्थार्जनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आपली मुलगी कष्ट करून स्वत:साठी जगते आहे हे पाहून पालकांनाही समाधान मिळत असल्याची भावना विद्याताई व्यक्त करतात.

संस्थेतील मुलींना कामात व्यग्र ठेवणे, सण, वाढदिवस साजरे करणे, बाहेर फिरायला नेणे, त्यांना म्युझिक थेरपी, योगा थेरपी देणे हे सगळे उपक्रम दर महिन्याला होतात. येथील सर्व महिला, मुली संस्थेत आलेल्या व्यक्तीशी आपुलकीने बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद आपल्यालाही त्यांच्याच सामावून घेतो.

त्यांना समाजात सामावून घ्या

आपले अपत्य मानसिक विकलांग आहे, हे सत्य स्वीकारताना पालकांना मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र, आपले अपत्य इतर मुलांसारखे बोलू शकत नाही, समाजात वावरू शकत नाही अशी भावना पालकांनी ठेवू नये, असे विद्याताई सांगतात. एक व्यक्ती म्हणून या मुलींकडे बघा, त्यांना विकसित होण्याची संधी द्या. ही संधीच त्यांना सक्षम बनवेल असेही त्या सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारीशक्तीचा गौरव

$
0
0

टीम मटा

जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले. महिलांसाठी आरोग्य शिबिर, उल्लेखनीय कार्य महिलांचा गौरव, प्रबोधनात्मक कार्यक्रम असे विवध उपक्रमांनी महिला दिन साजरा करण्यात आला.

रविवारी रन फॉर युनिटी

मालेगाव : नाशिक ग्रामीण पोलिस व येथील शांतता समितीच्या वतीने रविवारी 'रन फॉर युनिटी' या मालेगाव मॅरेथॉन २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गुरुवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील ऐश्वर्या मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता महिला सुरक्षितता व आरोग्य विषयावर जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी

मार्गदर्शन केले. शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आदी क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या महिलांचा संजय दराडे यांच्या हस्ते विशेष गौरव केला. यावेळी शहराच्या एकात्मतेवर आधारित लघूपट दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, डॉ. शशिकांत वाव्हळ उपस्थित होते. यावेळी मालेगाव मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.

कायद्याविषयी मार्गदर्शन

मालेगाव : येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीच्यातर्फे विधीतज्ञ कल्पना जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. वाय. टी. पवार, उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम, पी. ए. अहिरे, रघुनाथ शेलार उपस्थित होते. यावेळी जाधव यांनी हुंडाबंदी, गर्भपात, गर्भलिंग चाचणी, तलाक अशा महिलांविषयीच्या विविध कायद्याविषयी समग्र माहिती आपल्या व्याख्यानातून दिली. महापालिकेतर्फे महिला स्वच्छता कर्मचारी, बचत गट महिला तसेच शहरातील गरीब महिलांसाठी येथील वाडिया रुग्णालयात सकाळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शाह विद्यालयात मुलींना सुरक्षितता, आरोग्याची काळजी, करियर या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. उज्ज्वल शाळेत पथनाट्य सादर करण्यात आले.

पिंपळगावमध्ये स्त्री शक्तीचा सन्मान

निफाड : आयुष्य खूप सुंदर आहे. महिलांसारखे सुंदर शरीर कुणाकडेही नाही. त्यामुळे शरीराच्या काळजीसह महिलांनी स्वतःवर प्रेम करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता गौरी सावंत यांनी केले. पिंपळगाव बसवंत येथे मुंबई-आग्रा महामार्गावरील शगून मंगल कार्यालयात महिला आधार संस्था व नॅशनल अॅग्रो फार्मर्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने 'सन्मान स्त्री शक्तीचा' या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., चंदूलाल शहा, निफाडचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठी, सरपंच अलका बनकर आदी उपस्थित होते.

गौरी सावंत यांनी विद्यार्थ्यांना लैंगीक शिक्षणासह तृतीय पंथी म्हणजे काय हे देखील माहिती होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

गौरी सावंत, पत्रकार दीप्ती राऊत, ऑलिम्पिकपटू अश्विनी देवरे, कुस्तीपटू वैष्णवी पावले, गंगुबाई शेवरे, कल्पना शंकपाळ, वंदना लाड, अनुराधा साळुंके, तेजस्विनी म्हस्के, इंदूबाई डावखर, नंदा परदेशी, अलका गांगुर्डे, मधुबाला संसारे, हाजी शेख दिलशादबी शमशोद्दीन, चंद्रकला कावळे, माधुरी फसाळे, सीमा जाधव, सुमन शेला आदींचा सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ महिलांचा सत्कार

कळवण : देवळा येथे लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने समाजातील ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा माधुरी मेतकर, आशापुरी पतसंस्थेच्या अध्यक्षा कोमल कोठावदे, नंदा शेवाळकर, रजनी दशपुते, नेहा मेतकर, सुवर्णा नेरकर, मीना मेतकर, चेतना मेतकर, सुनंदा मेतकर, कल्पना येवला, सुमन कोठावदे, सुवर्णा कोठावदे, रोहिणी शेवाळकर, स्नेहा शेवाळकर, सुनंदा येवला उपस्थित होते.

मनमाडला महिलांचा गौरव

मनमाड : येथील केंद्रीय रेल्वे इंजीनिअरिंग कारखान्यात सेंट्रल रेलवे मजदूर संघ, ऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्प्लो असोशियशन, ऑल इंडिया ओबीसी असोशिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने महिलांचा गौरव करण्यात आला. मनमाड रेल्वे चिकित्सा विभागाच्या डॉ. श्रावणी, नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, जि. प. सदस्य अश्विनी आहेर, माजी आमदार जगनाथ धात्रक, पोलिस उपनिरीक्षक छाया पाटील, प्रबंधक बी. के. साहू उपस्थित होते. महिला कामगारांना संघटनांच्या वतीने महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रीडा प्रबोधिनी की केशकर्तनालय?

$
0
0

विनोद पाटील, नाशिक

आदिवासी विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या एकलव्य आदिवासी क्रीडा प्रबोधिनीवर कोट्यवधी रुपये उधळले जात असताना, प्रत्यक्षात आदिवासी मुलांना कोणत्याही सोयीसुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. जागतिक क्रीडा स्पर्धेत भारताची मान उंचावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंच्या हाती आदिवासी विभागाने पदकापूर्वीच कैची आणि कंगवा सोपवल्याने नवोदित खेळाडूंचे भविष्य टांगणीला लागले आहे. प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूंचे केस कापण्यासाठीची सुविधाच मिळत नसल्याने येथील खेळाडूंवर स्वत:चे केस कापण्याची वेळ आली आहे. क्रीडा प्रबोधिनीतील मुले चक्क एकमेकांचे केस कापून आपल्या शरीराची स्वच्छता करीत असल्याचे दुर्दैवी अन् धक्कादायक चित्र या प्रबोधिनीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे विभागाकडूनच सुरू असलेली 'एकलव्यां'ची परवड भयावह असून, कोट्यवधी रुपये जातात कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

राज्याच्या आदिवासी विकास विभागातर्फे नाशिकमध्ये शिक्षण विभागाच्या जागेवर व क्रीडांगणावरच आदिवासी क्रीडा प्रबोधिनी २०१५ पासून सुरू करण्यात आली आहे. इगतपुरी येथे ही प्रबोधिनी मंजूर असली तरी तिचा वाद सुरू असल्याने तूर्तास नाशिकमध्ये भाडेतत्त्वावरील जागेवर ही प्रबोधिनी सुरू आहे. येथे राज्यभरातील आश्रमशाळांमधील खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण आणि शिक्षण सोबत दिले जात आहे; परंतु या प्रबोधिनीत आलेल्या खेळाडूंना सुविधाच मिळत नसल्याचे चित्र आहे. खेळाडूंना आवश्यक क्रीडा साहित्य, ट्रॅकसूट, बुटांचीही वानवा आहे.

भारताचे नाव उंचावण्यासाठी येथे खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या खेळाडूंवर मात्र विभागाने पश्चात्तापाची वेळ आणली आहे. क्रीडा साहित्य तर दूरच, या खेळाडूंवर एकदुसऱ्याचे केस कापण्याची वेळ आदिवासी विभागाने आणली आहे. आदिवासी विभागातर्फे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या गरजा भागविण्यासाठी प्रतिखेळाडू देण्यात आलेले १० हजारांचे अनुदानही दिले नसल्याने खेळांडूच्या हाती पदकापूर्वीच कंगवा आणि कैची आली आहे. विभागाकडून खेळाडूंच्या दैनंदिन गरजाही पूर्ण केल्या जात नसल्याने आमची विभागाने फसवणूक केल्याची भावना खेळाडू व्यक्त करीत आहेत. त्यामुळे क्रीडा प्रबोधिनी की केशकर्तनालय, अशा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

खेलो इंडिया की 'भोगो इंडिया'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात भारताची कामगिरी उंचावी, यासाठी 'खेलो इंडिया'चा नारा दिला आहे; परंतु आदिवासी विभागाकडूनच या 'खेलो इंडिया'च्या घोषणेला हरताळ फासले जात आहे. विशेष म्हणजे आदिवासी विभागांकडून ठेकेदारांना सुविधा देण्यासाठी कोट्यवधीची उधळण केली जाते; परंतु हा पैसा खेळाडूंपर्यंत पोहोचतच नसल्याने त्यांच्यावर पश्चात्तापाची वेळ आली असून, 'खेलो इंडिया' नव्हे, 'भोगो इंडिया' अशी अवस्था आमच्यावर विभागाने आणल्याची टीका हे खेळाडू करीत आहेत.

आवश्यक सुविधा मिळत नसल्याने आमच्यावर आता पश्चात्तापाची वेळ आली आहे. आमच्या डोक्यावरचे केससुद्धा आम्हालाच एकमेकांकडून कापून घ्यावे लागत आहे, अशी विदारक परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे.

- एक विद्यार्थी

सुविधा मिळत नसल्याबद्दल खेळाडूंनी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून, शुक्रवारी आदिवासी क्रीडा समितीची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यात सुविधांसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे.

- रामचंद्र कुलकर्णी, आयुक्त आदिवासी विभाग, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images