Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

२७६ लाभार्थींना घरकुलाचे अनुदान

$
0
0

महापालिका १७ कोटी ४१ लाखांचा प्रस्ताव सरकारला पाठवणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील २७६ लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात घरकुल बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. या २७६ लाभार्थ्यांसाठी १७ कोटी ४१ लाख रुपयांचा सुधारित प्रकल्प अहवाल महापालिकेच्या वतीने राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या घरकुलांची प्रतिक्षा संपणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे देण्यासाठी शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली असून त्याच्यावर सध्या काम जोमाने सुरू आहे. चार घटकांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी देशभरात केली जात आहे. पहिल्या घटकांतर्गत झोपडपट्ट्यांचा आहे तेथे पुर्नविकास केला जाणार आहे. दुसऱ्या घटकात कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट यांना गृहकर्ज व्याज अनुदान साहाय्य दिले जाणार आहे. तिसऱ्या घटकात खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. तर चौथ्या घटकात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुलांच्या उभारणीसाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. चार पैकी चौथ्या घटकांतर्गत घरकुलांच्या उभारणीसाठी अनुदानासाठी पहिल्या टप्प्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २७६ लाभार्थींची निवड केली आहे. म्हाडाच्या निर्देशांनुसार जीएसटी आणि सुधारित ई-डीएसआर प्रमाणे प्राकलन तयार करून १७ कोटी ४१ लाखांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो सरकारच्या मान्यतेसाठी महापालिकेकडून पाठवला जाणार आहे. त्यामुळे या २७६ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वन कार्यालयाबाहेर मद्यपींचा भरतो अड्डा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

त्र्यंबक रोडवरील वन जमिनींची देखभालीसाठी व ग्रामीण भागात येणाऱ्या बिबट्यांवर तात्काळ कारवाई करता यावी, यासाठी सातपूर गावालगत वन विभागाकडून कार्यालय उभारण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या कार्यालयाबाहेर मद्यपींचा अड्डा भरत असल्याचे चित्र आहे. याबाबत वनविभागाने सातपूर पोलिस स्टेशनला तक्रार देत मद्यपींवर कारवाईची मागणी केली आहे.

सातपूर गावालगत वन विभागाची २० गुंठे आरक्षित जागा आाहे. तेथे वन विभागाने आपले नवीन कार्यालय नुकतेच थाटले. परंतु, कार्यालय बंद झाल्यानंतर तेथे मद्यपींचा वावर वाढतो. पेग रिचविण्यासाठी त्यांना जणू हक्काचे ठिकाण उपलब्ध झालेले आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या समोर देशी, विदेशी मद्याचे मोठे दुकान आहे. शेजारीच पाण्याच्या बाटल्या, प्लास्टकचे ग्लास आणि चणे फुटाणे विक्रेतेही असतात. त्यामुळे मद्य विकत घेतल्यानंतर वन विभागाच्या पायऱ्यांवरच मद्यपींची मैफल रंगते.

सातपूर भागात महापालिकेचे अनेक मोकळ्या भूखंडांवर अंधार पडल्यावर मद्यपींची गर्दी जमते. आता तर वन विभागाचे कार्यालय मद्यपींना निवडल्याचे दिसत आहे. मद्यपींकडून तेथे मद्याच्या रिकाम्या बाटल्या, ग्लास, कचरा तसाच टाकून दिला जातो. याप्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनकडे वन क्षेत्रपाल अधिकारी गणेश वाघ यांनी लेखी तक्रार केली आहे.

सातपूर गावाच्या मुख्य रस्त्यावर वन विभागाच्या जागेवर १ मार्चला रोजी नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले. मात्र, येथे मद्यपींकडून रोजच घाण केली जाते. या प्रकरणी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

- गणेश वाघ, वन क्षेत्रपाल अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा तालुक्यांत राबविणार ‘जलसमृद्धी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील युवा मित्र संस्था व टाटा ट्रस्ट यांच्या सहयोगाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला व देवळा तालुक्यांमध्ये जलसमृद्धी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या सहा तालुक्यांतील ५२ धरणांमधून सुमारे ६५ लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट आहे. पाच वर्षांकरिता राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी टाटा ट्रस्टकडून ३० कोटी तर राज्य शासनाकडून डिझेल खर्चापोटी १२ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील पोटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, टाटा ट्रस्टने जलसमृद्धी कार्यक्रमासाठी सहा पोकलेन मशिन तातडीने दिले आहेत. शनिवार १० मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता लोणारवाडी येथे युवा मित्रच्या कॅम्पसमध्ये पोकलेन मशिन हस्तांतरण कार्यक्रम तर भोजापूर, उंबरदरी आणि कोनांबे धरणांतील गाळ उपसा कामाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जलसंवर्धन व रोजगार हमी योजनेचे सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., टाटा ट्रस्टचे मुंबई येथील अधिकारी अरुण पांदी, आनंद बंग, आय. एल. ऍड एफ एस, इन्फ्रा असेट मॅनेजमेंट लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जिग्नेश शहा, कुमार चैतन्य, मुकुल गुप्ते, लघु सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे, प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार नितीन गवळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रकल्पात सामाविष्ट असलेल्या सिन्नर, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला, देवळा या सहा तालुक्यांतील ५२ लघुपाटबंधारे व मध्यम धरणामधून 65 लाख घनफूट गाळ उपसा करणे व जलाशयांचा जलसाठा वाढविणे, त्याबरोबरच या सहा तालुक्यांतील 319 गावामध्ये शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची शाश्वती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

धरणांतून उपसा होणाऱ्या गाळापासून सुमारे ५६६७ एकर जमिनीची सुपीकता वाढणार आहे. पाण्याचे योग्य नियमन व्हावे व जलाशयांच्या देखभाल-दुरुस्ती साठी ५२ पाणीवापर संस्थांची स्थापना करण्यात येणार आहे. दरम्यान, गाळ जलसमृध्दी कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या प्रत्येक धरणावर गाळ उपसा समिती स्थापन करण्यात आल्या आहेत, धरणापासून शेतीपर्यंत गाळ वाहून नेण्याचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागेल, अशी माहिती पोटे यांनी दिली.

असा आहे जलसमृद्धी कार्यक्रम

युवा मित्र व टाटा ट्रस्ट यांनी सिन्नर तालुक्यात गेल्या दोन वर्षांत जलसमृद्धी कार्यक्रम यशस्वी केला. त्याचे दृश्य परिणाम आल्यानंतर दोन्ही संस्थाच्या वतीने जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये लघू पाटबंधारे व मध्यम धरणांतील गाळ उपसा करण्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर कामासाठी टाटा ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने युवा मित्र संस्थेला ६ पोकलेन मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठीवरती हात ठेऊन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!

$
0
0

मणक्याला इजा होऊनही ओमकारने दिली बारावीची परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपत्ती कितीही मोठी असली तरी जिद्दीपुढे त्या थिट्या पडतात, याचा प्रत्यय विविध घटनांमुळे येतो. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याचा अपघात झाला असतानाही त्यातून खचून न जाता त्याने खंबीरपणे परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सर्व पेपर झोपून देत ओमकारने 'पाठीवरती हात ठेऊन, तुम्ही फक्त लढ म्हणा!' या कवितेच्या ओळी सार्थ ठरवल्या. कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ओमकारने अनेकांसमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे.

ओमकार रमेश सांभ हा विद्यार्थी २६ जानेवारीला शिर्डीला दर्शनासाठी गेला होता. परतीच्या प्रवासात वावीजवळ अपघात झाल्याने ओमकारचा पाठीचा मणका सरकला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बारावीची परीक्षा तोंडावर आल्याने ओमकार आणि त्याच्या पालकांची अवस्था गंभीर झाली. डॉक्टरांनी सलग तीन महिने त्याला बेड रेस्ट सांगितली.

परंतु, ओमकारची इच्छाक्ती अन् केव्हीएन नाईक शिक्षण संस्थेच्या केंद्र संचालक आणि शिक्षकांनी बोर्डाला विनंती केली आणि ओमकारला गादीवर झोपूनच पेपर देता येता येतील अशी परवानगी मिळवली. वर्ष वाया जाईल या भीतीने पाठीच्या दुखण्याची पर्वा न करता ओमकारने बारावीचे सर्व पेपर गादीवर झोपूनच दिले. पेपरसाठी त्याचे पालक चार चाकी वाहनातून घेऊन येत. गेटपासून केंद्र संचालक, शिक्षक, विद्यार्थी त्याला गादीसह उचलून वर्गात आणत. दहावीला साठ टक्के गुण मिळवलेल्या ओमकारला बारावीची परीक्षाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, अशी आशा आहे.

ओमकार सांभ या विद्यार्थ्याच्या इच्छाशक्तीमुळे आम्ही बोर्डाला पत्र दिले. अशा अवस्थेत या विद्यार्थ्याला पेपर देण्यासाठी बोर्डानेही आम्हासा प्रोत्साहन दिले. त्यामुळे आम्ही व आमच्या शिक्षकांनी या विद्यार्थाला परीक्षा केंद्रावर रोज ने-आण करण्यासाठी मदत केली.

- कैलास गिते, केंद्र संचालक

अपघातानंतर ओमकारला डॉक्टरांनी तीन महिने बेड रेस्ट सांगितला. त्यावेळी बारावीची परीक्षेला नुकतीच सुरुवात होणार होती. अशा अवस्थेत पेपर कसे देणार अशी भीती मनात आली. मात्र, ओमकारने वर्ष वाया जायला नको म्हणून अशा अवस्थेतही पेपर देण्याची तयारी दर्शवली. जिद्द पाहून आम्हीही त्याला प्रोत्साहन दिले.

- ज्योती सांभ, ओमकारची आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४७ कोटींचा अर्थसंकल्प!

$
0
0

जिल्हा परिषदेच्या विशेष बैठकीत मंजुरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी विशेष बैठकीत २०१८-१९ च्या ४६ कोटी ८५ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. यामध्ये पंचायत समितीच्या ३ कोटी ९२ लाख २५ हजार रुपयांच्या कामांचा समावेश आहे. या अर्थसंकल्पात अनेक नाविण्यपूर्ण योजनांचा समावेश असून, त्यात जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटासाठी २१ लाखांची तरतूद प्रस्तावित केली आहे. त्याचप्रमाणे नव्या प्रशासकीय इमारतींसाठी या अर्थसंकल्पात १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेली ही बैठक तब्बल सात चालली. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपाध्यक्षा नयना गावित, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, आरोग्य व शिक्षण सभापती यतींद्र पाटील यांच्यासह प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधिकिरण सोनकांबळे आदी उपस्थित होते. या बैठकीत सदस्यांनी अर्थसंकल्पाच्या तरतुदीत सूचना केल्यानंतर त्यात काही बदलही करण्यात आले. त्याचे सर्व अधिकारी अध्यक्षांना देण्यात आले. अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, या बैठकीत २०१६-१७ च्या ५२ कोटी ९४ लाखांच्या सुधारित अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.

अशी आहे तरतूद

- प्रशासन व मानधन : १ कोटी ५५ लाख ७२ हजार

- सामान्य प्रशासन : १ कोटी ६६ लाख ४७ हजार

- शिक्षण : १ कोटी ४९ लाख ३५ हजार

- बांधकाम : १६ कोटी ९९ लाख ३ हजार

- लघु पाटबंधारे : ४ कोटी ६० लाख ५० हजार

- आरोग्य : ३९ लाख ५५ हजार

- पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती : ७ कोटी २ लाख १२ हजार

- कृषी : १ कोटी २१ लाख

- पशुसंवर्धन : ७० लाख ५० हजार

- वने : ३ लाख

- पेन्शन : ३० लाख

- समाजकल्याण व अपंग कल्याण योजना : ३ कोटी ६० लाख ३३ हजार

- महिला व बालकल्याण : १ कोटी २३ लाख ५० हजार

- संकिर्ण : २ कोटी ११ लाख ८२ हजार

नाविण्यपूर्ण योजना

या अर्थसंकल्पात नाविण्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला असून, त्यात प्रशासकीय इमारतीसाठी १ कोटी, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अपंगांना त्यांच्या इच्छेनुसार वस्तू घेण्यासाठी १ कोटी १३ लाख रुपये तरतूद केली आहे. यासारख्या ११ योजनांचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता मोठ्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील रस्ते व चौकातील अतिक्रमणावर कारवाईची मोहीम सुरू केल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता मोठी बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची तयारी केल्याचे समजते. शहरातील मोठी बेकायदेशीर ७०० बांधकांमावरील प्रलंबित कारवाईला चालना देण्याचे आदेश मुंढे यांनी नगररचना विभागाला दिले असून अशा बांधकामाची यादीच अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारच्या विविध जाचक नियमांमुळे शहरातील बांधकाम व्यवसायावर मंदीचे संकट आहे. कपाट प्रश्न, राष्ट्रीय हरित लवाद, सहा व साडेसात मीटरचा वाद, अग्निप्रतिबंधक योजनांच्या आदेशाने तीन ते चार वर्षांपासून बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. अनेक बिल्डरांनी इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त बांधकामे करून नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यातच ऑटो डीसीआर यंत्रणेमुळे बिल्डर आणि आर्किटेक्टना घाम फुटला आहे. यातून हा व्यवसाय कसाबसा सावरत असताना आता मुंढे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे रडारवर घेतली आहे.

लहान अतिक्रमणे हटवल्यानंतर मुंढेंनी आता बेकायदेशीरपणे शहरात उभ्या राहिलेल्या बड्या बांधकामांकडे आपला मोर्चा वळवला आहे. नगररचना विभागात अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी प्रलंबित असून त्या तक्रारींची संख्या सातशेच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. मुंढे यांनी नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या असून त्यात अनधिकत बांधकामांच्या तक्रारींचाही समावेश आहे. आतापर्यंत नगररचनेत पडून असलेल्या ७०० अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींची छाननी करून अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे अहवाल सादर करून ती अनधिकृत बांधकामे, शेड, वाढविलेल्या गॅलरी, बंद केलेल्या बाल्कनी तोडण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी एकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय सैन्यदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नाशिकसह जळगाव आणि इतर ठिकाणी शेकडो युवकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या लष्करातील माजी सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख यास कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. याच प्रकरणात पाचोरा पोलिसांनी पुणे येथून आणखी एका संशयितास अटक केली असून, बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या कामात त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नझीम व्होरा असे संशयित आरोपीचे नाव असून, तो पुण्याच्या गणेशनगर भागात राहतो. फसवणुकीप्रकरणी मुख्य सूत्रधार हुसनोद्दीन विरोधात जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यासह आणखी तीन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. प्राथिमक अंदाजानुसार हा घोटाळा १० ते १२ कोटी रुपयांच्या पुढे असून, यात साडेतीनशे ते चारशे बेरोजगार तरुणांना गंडा घालण्यात आला आहे. पोलिसांनी मागील महिन्याच्या अखेरीस हुसनोद्दीनसह त्याच्या पत्नीस व मुलास अटक केली होती. मात्र, पहिल्या पोलिस कोठडीनंतर मायलेकास कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तर, हुसनोद्दीनच्या कोठडीत ८ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. हुसनोद्दीन बेरोजगार तरुणांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून पैसे उकळत होता. यासाठी तो बनावट नियुक्तीपत्रही देत होता. या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांनी तपास करून बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या प्रकरणात नझीम व्होरा यास अटक केली. मात्र, आपण फक्त कागदपत्रे देण्याचे काम केले. कागदपत्रे तयार करणारे दुसरेच असल्याचे व्होराने पोलिसांना सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे एक पथक पुणे येथे अधिक तपासासाठी गेले आहे.

गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग

या प्रकरणी नाशिकमध्ये इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, तपासासाठी हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. नाशिकमधील ५८ पेक्षा अधिक तरुणांची तब्बल अडीच कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. सध्या पाचोरा पोलिस गुन्ह्याचा तपास करीत असून, कोर्टाच्या आदेशाने नाशिक पोलिस मुख्य सूत्रधाराचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकारी अभियंता वाघमारे सक्तीच्या रजेवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघमारे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी दिले. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना बगल देत उध्दटपणे उत्तर दिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा परिषदेची सभा सुरू झाल्यानंतर सदस्य यशवंत शिरसाठ यांनी वाघमारे यांच्या एकूण कार्यपध्दतीबाबत तक्रार केली. एका प्रकरणात माहिती विचारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून घ्या, असे लेखी उत्तर दिले. त्यावर शिरसाठ यांनी प्रश्न विचारल्यानंतर वाघमारे यांनी मला बघावे लागेल, असे सांगून उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे सदस्य संतप्त झाले. त्यावेळी सर्व सदस्यांनी वाघमारे यांच्या पाच वर्षांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करून ठराव केला. त्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर तासाभरानंतर संजय बनकर यांनी वाघमारे यांच्या प्रश्नावरही अशीच उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर सदस्य आणखी संतप्त झाले. त्यावेळेस त्यांनी वाघमारे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले जात नाही तोपर्यंत कामकाज होणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन वाघमारे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सतरा वर्षांनी झाली ‘सोशल’भेट

$
0
0

दीपक महाजन, कळवण

फेसबुक, व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मीडियामुळे अनेक सामाजिक धोके असले तरी त्यांचा योग्य वापर केल्यास काही चांगलेही घडून येते याची प्रचिती सप्तश्रृंग गडावरील काही तरुणांनी घेतली. तब्बल १७ वर्षांपासून घरदार सोडून आलेल्या तरुणास फेसबुकमुळे आपली आई आणि भावाची सोशल गाठभेट झाली. गडावरील काही जागरुक नागरिकांनी याबाबत पुढाकार घेतल्यामुळे तरुणाने काही वेळासाठी आई, भावाशीही फोनवरुन बोलणेही करून दिले. इतक्या वर्षांनंतर परिवारातील सदस्यांशी बोलणे झाल्यामुळे त्या तरुणाला अश्रू अनावर झाले होते.

बिहार राज्यातील सितामढी जिल्ह्यातील सोनवर्षा गावातील उमेश रामप्रकाश महतो (वय ४०) याची ही कहाणी. उमेशला भारत भ्रमण करायची हौस. 'माझे मन या गावात रमत नाही. मला त्यागी वृत्ती जोपासायची आहे. संसाराचा त्याग करायचा आहे', असे म्हणत त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. आईचा जीव होईना म्हणून तिने त्याला समजवून सांगितले. नंतर रागाच्या भरात म्हटले, 'जर तू घर सोडून गेलास तर आमच्यासाठी मेला असे आम्ही समजू.' आईच्या व भावाच्या या बोलण्याचा कुठलाही परिणाम उमेशवर झाला नाही. जेमतेम ५ वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेशने २००१ मध्ये गाव सोडले. अत्यंत आध्यत्मिक मनोवृत्तीच्या उमेशने थेट मुंबई गाठली. जोगेश्वरी माता मंदिरात तो पोहोचला. तेथेच सेवा करू लागला. त्यानंतर वैष्णोदेवीलाही जावून त्याने त्याने आपले भारत भ्रमंतीचे स्वप्नही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. गेज्या ५ वर्षांपूर्वी त्याने मुंबई सोडून सप्तश्रृंग गड गाठला. येथे त्याने मिळेत ते काम केले. उमेश हळूहळू गडावर स्थिरावला. त्याची काम करण्याची उमेद, प्रामाणिकपणा पाहून तो सर्वांचा लाडका झाला. उमेशला ईश्वर कदम, योगेश कदम, संदीप बेनके, मयूर जोशी, नीलेश कदम, रवी कदम यांनी दोन वर्षांपूर्वी त्याला आर्थिक मदतही केली. त्या मदतीतून त्याने गडावर धागा विक्रीचे काम सुरू केले. त्यातून हळूहळू त्याने आपली चांगली प्रगतीही केली.

गडावरील स्वामी जनार्दन महाराजांच्या मठात तो वास्तव्यास असून, तिथेच पूजापाठ, देवीची सेवा करीत असतो. महिन्यातून एक ते दोन वेळा भाविकांना पनीरचे वाटप करीत असतो. यातून त्याच्या दानशूरतेचे दर्शन घडते.

अश्रू थांबेना...

उमेश महतो याच्याशी गप्पा मारत असतांना गडावरील सामाजिक कार्यकर्ते ईश्वर कदम यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा विषय काढला. सहज म्हणून त्याचा मोठा भाऊ अमरनाथ महतो यांचे यांचे नाव फेसबुकवर सर्च केले. त्याच्या फोटोवरून उमेशने भावाला ओळखले. कदम यांनी लागलीच त्याचा संपर्कक्रमांक मिळवून उमेश आणि अमरनाथचे बोलणे करून दिले. उमेशने या निमित्ताने आपल्या वयोवृद्ध आईशीही संवाद साधला. मोबाइलवरील संवाद सुरू असताना उमेश घळाघळा रडत होता. तुम्हा तिघांची लवकरच भेट घडवून आणू असा विश्वास गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेबके-पाटील यांनी उमेशला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बॉश’च्या कामगारांना वेतनदिलासा

$
0
0

वेतनामध्ये दुप्पट वाढ होणार; संघटनेच्या पाठपुराव्यास यश

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील बॉश (मायको) कंपनी नोकरी मिळावी म्हणून अनेकांची धडपड असते. यात गेल्या सहा ते सात वर्षांपासून ऑन जॉब ट्रेनिंग (ओजेटी) तत्त्वावर ४७३ कामगार काम करीत होते. परंतु, संबंधित कामगारांनी न्यायालयात धाव घेत टेंपररी कामगार म्हणून रूजू करावे, अशी मागणी केली होती. त्यावर नुकताच निर्णय होऊन कामगार संघटनेच्या पाठपुराव्यास यश आले आहे.

यामध्ये बॉश कंपनीतील ४७३ कामगारांना ऑन जॉब ट्रेनिंगमधून थेट टेंपररी कामगाराचा दर्जा देण्यात आल्याचे युनियनच्या वतीने सांगण्यात आले. विशेष म्हणजे, सर्वच कामगारांना दुपटीने वेतनवाढ मिळणार असल्याचे उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच चार वर्षांहून अधिक काम केलेल्या कामगारांना फरकदेखील दिला जाणार असल्याने लाखो रुपये कामगारांना मिळणार आहेत. यामुळे कामगारांना न्याय मिळाला असल्याचे युनियनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. कंपनी व्यवस्थापनानेदेखील योग्य सहकार्य केल्याने कामगारांनी त्याचे आभार मानले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण

मदर इंडस्ट्री असलेल्या बॉश कंपनीत कामयस्वरुपी कामगारांना सर्वाधिक वेतन मिळते. कामगार युनियनने कंपनीत सहा ते सात वर्षांपूर्वी ऑन जॉब ट्रेनिंग म्हणून लागलेल्या ४७३ कामगारांनी टेंपररी करण्यात यावे, अशी मागणी कंपनी व्यवस्थापनाकडे केली होती. यात न्यायालय तसेच कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावाही केला होता. याबाबतच्या पाठपुराव्यामुळे ४७३ कामगार टेंपररी होणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. पुढील काही वर्षांत टेंपररी असलेले कामगार कायमस्वरुपी होणार आहेत. यासाठी कंपनीत झालेल्या कराराप्रसंगी कंपनी व्यवस्थापनाचे मुकूंद भट, एच. डी. थाँन्टेश, अतुल खानापूरकर, अविनाश चिंतावार, प्रवीण पाटील, विवेक कासार, संदीप दोंड, सागर देशमाने, किशोर वाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

वेतनवाढ कराराची बोलणी सुरू

बॉश कंपनीच्या व्यवस्थापनाने मृत झालेल्या कामगारांचे वारस कामगार घ्यावेत, अशी मागणी युनियनने केली होती. यातदेखील युनियनच्या मागणीला यश आले असून, कंपनी व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या २७ वारसांना ऑन जॉब ट्रेनिंग म्हणून घेणार असल्याचे युनियनच्या वतीने सांगण्यात आले. बॉश कामगार युनियनने वर्षांपासून थकीत असलेल्या वेतनवाढीच्या कराराची मागणी केली होती. दरम्यान, याबाबत कंपनी व्यवस्थापनासोबत वेतनवाढीच्या कराराबाबत योग्य बोलणी सुरू असल्याचे युनियन अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले. लवकरच तडजोडीची भूमिका घेत कंपनी व्यवस्थापनाने वेतनवाढीचा करार करावा, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

कामगारांना हे फायदे मिळणार

....४७३ कामगारांचे वेतन दुपटीने वाढणार
....प्रत्येकी ३० ते ३२ हजार वेतन मिळणार
....मृत कामगारांचे २७ वारस ‘ओजेटी’वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याची हत्या; अवयवांची तस्करी

$
0
0

एका संशयितास अटक; इगतपुरीतील घटना

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यात शुक्रवारी एक बिबट्या मृतावस्थेत आढळूल आला होता. या मृत बिबट्याचे अवयव काढल्याचे लक्षात आल्यानंतर एका संशियतास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. बिबट्याची हत्या करून अवयवांची तस्करी करणारी टोळी सज्ज असल्याची माहिती तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे यांना समजली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

शेणीतमधील एका शेतात पाच ते सहा महिने वय असलेली एक बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळून आली. याची माहिती समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे, वनपरिमंडळ अधिकारी जी. आर. जाधव, वनरक्षक एफ. जे. सैय्यद, एस. के. बोडके, बी. व्ही. दिवे, आर. टी. पाठक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मृत बिबट्याचे काही अवयव नसल्याचे निदर्शनास आले. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे यांनी वेगाने तपासचक्र फिरवून गुप्त माहितीच्या आधारे दोन तासाच्या आतच संशयित आरोपी कारभारी बाबुराव पवार (रा. कोल्ही, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) यास मुद्देमालासह अटक केली. आरोपीवर भारतीय वन अधिनियम १९७२ मधील ३६, ५०, ५१ कलम लावण्यात आले. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्यास चार दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली. या घटनेत आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास नाशिक वनसंरक्षक रोहयो वन्यजीव संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे करीत आहेत.

करंजीत बिबट्याची मादी मृतावस्थेत

निफाड : करंजी येथे उसाच्या शेतात दीड वर्ष वयाची बिबट्याची मादी मृतावस्थेत आढळून आली. रानडुकरांच्या हल्ल्यात हा बिबट्या मृत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. करंजी येथील मच्छिंद्र नारायण अडसरे हे शेतात वस्ती करून राहतात. अडसरे यांना उसाच्या शेताबाहेर शनिवारी सकाळी बिबट्या मृत असल्याचे आढळून आला. त्यांनी ही घटना वन विभागाला कळवली. त्यानंतर येवला वन विभागाचे वनसंरक्षक राजेंद्र कापसे, वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल एम. एम. राठोड, आव्हाड, वनरक्षक विजय टेकणर आदींचे पथक घटनास्थळी पोहोचले. बिबट्या मृतावस्थेत आढळला त्याच्या आजूबाजूला रानडुकरांच्या पावलाखुणा आढळून आल्या. रानडुकरांच्या झटापटीत बिबट्याचा मृत्यू झाला असवा, असा अंदाज वर्तविण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी या मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले.

शिवरेत सापडले बिबट्याचे बछडे

निफाड तालुक्यातील शिवरे येथील सुनील बाळासाहेब सानप यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड चालू असताना शनिवारी दुपारी बिबट्याचे दोन बछडे ऊसतोड कामगारांना आढळून आले. त्यांनी ही घटना येवला वन विभागाला कळविल्यानंतर तातडीने वनपथक सानप यांच्या शेतात पोहोचले. दोन्ही बछड्यांना ताब्यात घेतले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात मोटरसायकलस्वार जखमी

सिन्नर : मेंढी शिवारात बिबट्याने हल्ला केल्याने दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सांगवी येथील रमेश एकनाथ घुमरे आणि ब्राह्मणवाडे (ता. निफाड) येथील अरुण टिके हे दोघे शुक्रवारी रात्री सिन्नर येथून सांगवीकडे जात होते. मेंढीजवळील ओहोळात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटरसायकलस्वारांवर झेप घेतली. त्यात रमेश यांच्या पायाला बिबट्याचा पंजा लागून जखम झाली. मोटरसायकलचा तोल जाऊन पडल्याने तोंडाला लागले. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत मोटारसायकलवरून पळ काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, बिबट्यासोबत दोन बछडेदेखील असल्याची सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टी करवाढीतून तूर्त सुटका

$
0
0

चालू वर्षी अंमलबजावणी नाही; २०१९ पासून होणार लागू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घरपट्टीत सरसकट १८ टक्के करवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या बोझ्याखाली दबललेल्या नाशिककरांना पाणीपट्टीच्या प्रस्तावित करवाढीतून मात्र तूर्तास दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाणीपट्टी करवाढीचा प्रस्ताव मागे घेऊन तो नव्याने तयार करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. महापालिका अधिनियमाप्रमाणे करवाढीचा प्रस्ताव हा फेब्रुवारी महिन्यातच स्थायीवर सादर करणे बंधन असल्याने तूर्तास यंदा पाणीपट्टी करवाढीची शक्यता मावळली आहे. प्रशासनाने करवाढीचा प्रस्ताव ठेवला तरी, त्याची अंमलबजावणी ही १ एप्रिल २०१९ पासूनच होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीच्या महासभेत प्रशासनाच्या वतीने घरपट्टीत ३३ टक्के आणि पाणीपट्टी करात पाच टक्के करवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, प्रशासनाने पाणीपट्टी करवाढीचा प्रस्ताव मागे घेत केवळ घरपट्टी वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. घरपट्टीच्या भरमसाठ करवाढीचा धसका घेत सत्ताधाऱ्यांनी सरसकट १८ टक्के करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. स्थायीवरून हा प्रस्ताव आल्याने कायद्यानुसार तो मंजूरही झाला आहे. परंतु, पाणीपट्टी करवाढीचा प्रस्ताव मात्र मागे घेऊन तो नव्याने तयार करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. पाणीपुरवठा विभागाकडूनच या प्रस्तावावर सध्या काम केले जात असून, महावितरणच्या धर्तीवर पाणीपट्टी कराची आकारणी केली जाणार आहे. महापालिकेच्या नियमाप्रमाणे कोणताही करवाढीचा प्रस्ताव हा २० फेब्रुवारीपर्यंत स्थायी समितीवर संमत होणे आवश्यक आहे. २० फेब्रुवारीपर्यंत हा प्रस्ताव स्थायीने संमत केला नाही, तर त्या वर्षात करवाढ लागू करता येत नाही असा नियम आहे. प्रशासनाकडून सध्या या प्रस्तावावर काम सुरू आहे. त्यामुळे फेब्रुवारीचा मुहूर्त उलटला असून, आता मार्च सुरू झाला आहे. अजूनही स्थायी समितीवर हा प्रस्ताव आलेला नाही. हा प्रस्ताव स्थायी समितीवर येण्यास अजून महिनाभराचा अवधी लागणार आहे. त्यामुळे स्थायी समिती आणि महासभा असा प्रवास पाणीपट्टी करवाढीच्या प्रस्तावाला करावा लागणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आता जवळपास मावळली आहे. प्रशासनानेही पुढील वर्षापासूनच पाणीपट्टीची करवाढ करण्याचे नियोजन सुरू केले असून, हा प्रस्तावही घरपट्टी करवाढीप्रमाणेच अवास्तव राहणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी नागरिकांना चालू वर्षात पाणीपट्टी करवाढीतून सुटका मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तक नाशिकवर अन्यायच अधिक

$
0
0

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ओढला आसूड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दत्तक नाशिक घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे सर्वच नेत्यांनी जोरदार टीका केली. दळभद्री सरकार जोपर्यंत उघडून टाकत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही अन् तुम्हीही बसायचे नाही असे, आवाहन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत धनंजय मुंडे यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिक घोषणेचीही खिल्ली उडवली. नाशिकला एक वर्षात काही दिले तर नाही पण, भुजबळांनी आणलेल्या बोटी व इगतपुरीतील आदिवासींसाठीचे क्रीडासंकुलही पळवल्याचे सांगितले.

हल्लाबोल यात्रेच्या समारोप सभेत मुंडे बोलत होते. भाजप सरकार आकड्यांचा खेळ करतात, त्यामुळे एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले, की तुम्ही अगोदर मटका वैगरे खेळत होता का? त्यांच्या या जादूच्या खेळामुळे अनेक फसवे आकडे मिळतात. भाजपचे लोक हुशार आहेत. आपल्याला त्यांनी वेडं लावलंय. कर्जमाफीला खुंटी लावली. महागाई, बेरोजगारीचा प्रश्न यांनी सोडवला नाही तरी 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवतात कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

भुजबळांभोवतीच सभा

राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेली ही सभा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या भोवतीच फिरत राहिली. प्रमुख वक्त्यांनी छगन भुजबळ यांच्या कामाचा गौरव करीत त्यांची अनुपस्थिती जाणवत असल्याची खंतही व्यक्त केली. या सभेत छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्याबद्दल शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रांचाही प्रमुख चार वक्त्यांनी उल्लेख केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रांतील काही उताराही वाचून दाखवला. या सभेच्या सुरुवातीलाच आमदार जयवंत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांच्या पाठीशी असल्याचा उल्लेख करून शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनीही पनर्रुच्चार केला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह खासदार सुप्रिया सुळे यांनी भुजबळांच्या कामांचा उल्लेख केला.

संदीप गुळवेंसह शिवसैनिकांचा प्रवेश

जिल्हा बँकेचे संचालक संदीप गुळवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला.

आकांक्षा पवारच्या भाषणाने हेलावली मने

आई-वडिलांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलगी असलेल्या आकांक्षा दिनेश पवार (जि. जळगाव) हिने भाषण केले. यावेळी सर्वांची मने हेलावली. यावेळी तिने आता रडायचे नाही तर लढायचे असे सांगत शेतकऱ्याच्या आत्महत्यांवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ कांद्याला मिळेना दाम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

लाल कांद्यापेक्षा उन्हाळ कांदा हा अधिक दिवस टिकणारा असूनही त्याला मिळणाऱ्या दरामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उन्हाळ कांद्याला सध्या कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशेच्या स्पष्ट छटा दिसत आहेत. यंदाच्या हंगामात लाल रांगडा कांद्याने सुरुवातीपासून बरेच दिवस शेतकऱ्यांच्या हाती दमदार 'दाम' टेकवले होते. बऱ्याच वर्षांनंतर लाल कांद्याने यंदा शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणताना, उन्हाळ कांदा लाल कांद्यापेक्षा नक्कीच अधिकचे दाम देईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, यंदाच्या हंगामात गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारात येण्यास सुरुवात झालेल्या उन्हाळ कांद्यास मिळणारा कमी बाजारभाव बघता शेतकऱ्यांच्या भ्रमनिराश झाला आहे.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल व उन्हाळ कांद्याची आवक टिकून असली तरी, गेल्या सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात कांदा बाजारभावात घसरण झाल्याचे चित्र समोर आले. बाजार समितीच्या येवला मुख्य बाजार आवारात या सप्ताहात एकूण ५८ हजार ३५७ कांदा आवक होताना येथे लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल ९४४ (सरासरी ८५०) पर्यंत होते. याठिकाणी उन्हाळ कांद्यास किमान ३०० ते ९४८ (सरासरी ८५०) पर्यंत होते. समितीच्या अंदरसूल उपबाजारात चालू सप्ताहात कांद्याची एकूण १९ हजार ६६५ क्विंटल झाली. याठिकाणी लाल कांद्यास किमान ३०० ते कमाल ९७५ (सरासरी ९७५), तर उन्हाळ कांद्यास किमान ३०० ते ८८५ (सरासरी ८००) असा बाजारभाव होता. सध्या कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल आदी राज्यांसह परदेशातील दुबई, मलेशिया, कोलंबो, सिंगापूर आदी ठिकाणी सर्वसाधारण मागणी असल्याने कांदा बाजारभाव उचल खात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदार पालिकेच्या रडारवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेची करवसुली वाढावी या दृष्टीने आयुक्त संगीता धायगुडे यांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. करवसुलीत दिरंगाई केल्याप्रकरणी येथील तीन लिपिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत महापालिकेकडून दरवर्षी केवळ ३० ते ४० टक्के वसुली होत होती. यंदा फेब्रुवारीअखेर केवळ ३५ टक्के वसुली झाली आहे. त्यामुळे उर्वरित महिनाभरात हा आकडा वाढावा यासाठी पालिका प्रशासनाने करवसुलीवर जोर लावला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २१ कोटी ६ लाख ७७ हजार रुपयांपर्यंत मालमत्ता कराची वसुली झाली आहे.

महापालिकेच्या मालमत्ताकर वसुलीच्या आढावा बैठकीत आयुक्त संगीता धायगुडे यांनी वसुलीकरिता २४ विभागप्रमुखांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. तसेच उपायुक्त राजू खैरनार यांच्याकडे कर उपायुक्त पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिकेची पाणीपट्टी वसुली एकूण ७ कोटी ९१ लाख ५ हजार रुपये इतकी झाली असून, घरपट्टी वसुली १३ कोटी ७ लाख ९ हजार १४७ रुपये इतकी झाली आहे. याउलट पाणीपट्टी करापोटी सुमारे २७ कोटी, तर घरपट्टी करापोटी सुमारे ३३ कोटी अशी एकूण ६१ कोटी रुपये थकीत कर वसुली होणे बाकी आहे.

मालमत्ताकराचे थकबाकीचे आकडे पाहता पालिकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वसुली होणे गरजेचे आहे. यासाठीच आयुक्त धायगुडे यांनी मिशन करवसुली हाती घेतली आहे. महापालिकेच्या उत्पन्नावर नागरी सुविधा व खर्चाचा डोलारा अवलंबून असल्याने नागरिकांनी देखील कर भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. गेल्यावर्षी मालमत्ता कराची वसुली केवळ ३९ टक्के झाली होती. यंदा हा आकडा वाढवा यासाठी प्रशासन कामास लागले आहे.

तीन लिपिक निलंबित

येथील महापालिकेच्या महसूल थकबाकी वसुलीत दिरंगाई केल्याप्रकरणी तीन लिपिकांवर निलंबन कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त राजू खैरनार यांनी दिली. प्रभाग एक मधील वासुदेव भावसार व प्रदीप बच्छाव तर प्रभाग तीनमधील उबेदूर अत्ताउर रेहमान या तिघांवर निलंबन कारवाई करण्यात आली आहे. या तिन्ही लिपिकाकडून केवळ १५ ते १७ टक्के इतकाच महसूल वसूल झाला असून, महसूल वसुलीत दिरंगाई केली म्हणून निलंबन कारवाई करण्यात आली आहे. वसुली न करणाऱ्या लिपिकांची यापुढे गय केली जाणार नाही. ३१ मार्च अखेर दिलेले वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे आदेश आयुक्त धायगुडे यांनी दिले आहेत.

पाणीपट्टी :-

मागील थकबाकी -- १६ कोटी २१ लाख १५ हजार

चालू मागणी -- ११ कोटी ४१ लाख ७४ हजार

एकूण -- २७ कोटी ६२ लाख ९० हजार

वसुली ( ८ मार्च १८ अखेर ) - ७ कोटी ९१ लाख ५ हजार

घरपट्टी :-

मागील थकबाकी -- १९ कोटी ६१ लाख ६३ हजार

चालू मागणी -- १३ कोटी ६५ लाख ४३ हजार

एकूण -- ३३ कोटी २७ लाख ६० हजार

वसुली ( ८ मार्च १८ अखेर) - १३ कोटी ७ लाख ९ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोर्टाबाहेरील तडजोडी महिलांसाठी घातक

$
0
0

अॅड. आभा सिंग यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये कोर्टाबाहेर होणाऱ्या तडजोडी घातक असून, अशा प्रकारांना लगाम घालणे आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या अॅड. आभा सिंग यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स या संघटनेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित स्त्री सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित या कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या.

हा कार्यक्रम शनिवारी सकाळी ११ ते २ या वेळेत गंगापूररोडवरील कुर्तकोटी सभागृहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती पुखराज बोरा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर, कविता ठाकूर, अॅड. प्रीती शहा उपस्थित होत्या. जगाच्या पाठीवर सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे भारतात दाखल होतात, असे अॅड. आभा सिंग यांनी नमूद केले. देशभरात वर्षाकाठी सात हजारांवर हुंडाबळी होतात. तर या प्रकरणी २० हजारांवर केसेस दाखल होतात. प्रत्यक्षात चार संशयितांना अटक होऊन शिक्षा होते. उर्वरित प्रकरणांमध्ये कोर्टाबाहेर तडजोडी होतात. अगदी बलात्कार, विनयभंग अशा घटनाही परस्पर सहमतीने कोर्टाबाहेरच मिटवल्या जातात. यामुळे चुकीचा संदेश समाजात पसरला जातो. अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालण्याची गरज असल्याचे मत अॅड. सिंग यांनी व्यक्त केले. दुसरीकडे पोलिसांमधील भ्रष्टाचार अशा घटनांना खतपाणी घालत असल्याची खंत सिंग यांनी व्यक्त केली. महिलांविरुध्दे गुन्हे आणि अत्याचार रोखण्यासाठी कायद्याची ठोस अंमलबजावणी होणे आवश्यक असून, यासाठी पोलिस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमन लॉयर्स ही संस्था स्त्रिया व मुलांच्या समस्या, महिला वकिलांचे सक्षमीकरण, विधी साक्षरता आणि कायद्यातील सुधारणा यासंदर्भात काम करते. या संस्थेच्या अध्यक्षा प्रीती शहा यांनी संस्थेचे काम आणि कार्यपध्दती समजून सांगितली. कार्यक्रमादरम्यान अपूर्वा जाखडी यांच्यासह महाराष्ट्रातील ज्येष्ठ महिला विधीज्ञांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाशिक फेडरेशनच्या अध्यक्षा अॅड. नीलिमा वर्तक, उपाध्यक्षा अजंली पाटील, अॅड. वैशाली गुप्ते, कार्यकारणी सदस्य अॅड. अपर्णा पाटील, पश्चिम विभागाच्या रोटरीच्या अध्यक्ष सीमा पाचडे, अॅड. मीनल श्रृंगारपुरे आदींचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निसाका’साठी वन टाइम सेटलमेंटचा पर्याय

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्याला वरदान ठरणाऱ्या निफाड साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जिल्हा बँकेने 'निसाका'वरील थकीत कर्जांपैकी व्याज माफ करून फक्त मुद्दल 'वन टाइम सेटलमेंट' या योजनेत स्वीकारावी, अशा सूचना सहकारमंत्री देशमुख यांनी बँकेचे चेअरमन केदा आहेर व कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांना केल्याची माहिती आहे.

निसाकावर जिल्हा बँकेचे व्याजासह १४२ कोटींच्या आसपास कर्ज आहे. कर्जाची मूळ रक्कम १०९ कोटी असून, जिल्हा बँकेने एकरकमी परतफेड योजनेत फक्त मुद्दल घ्यावी, अशी सूचना सुभाष देशमुख यांनी केली. त्यामुळे निफाड कारखाना सुरू होण्यासाठी निधीची असलेली तरतूद आटोक्यात राहील अशा, अर्थाने हा प्रस्ताव मांडला आहे.

केंद्राच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी निसाका कार्यस्थळावर ट्रायपोर्टला मंजुरी दिली असून, यासाठी ५०० कोटींची आर्थिक तरतूद केल्याचेही दोन महिन्यांपूर्वी दिल्ली येथे बैठकीत जाहीर केले होते. त्यानुसार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दोन वेळा निसाका कार्यस्थळ व परिसराची पाहणी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार आता सरकारकडून सकारात्मक पावले उचलायला सुरुवात झाल्याचे या बैठकावरून लक्षात येते.

मात्र यामध्ये जिल्हा बँकेच्या कर्जावरील तोडगा महत्त्वाचा आहे. सध्या निसाकावर जिल्हा बँकेने जप्ती केली आहे. त्यामुळे सहकार मंत्री देशमुख यांच्या सोबतच्या बैठकीत जिल्हा बँकेचे चेअरमन केदा आहेर यांनाही निमंत्रित केले होते. या बैठकीत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष बन्सल, नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,जिल्हा बँक चेरमन केदा आहेर, कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल, निफाडचे प्रांत महेश पाटील, भाजपचे नेते सुरेशबाबा पाटील, डॉ. प्रशांत पाटील, ट्रायपोर्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील बैठकीत निसाकावरील असलेली कर्जाची मूळ रक्कम स्वीकारण्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी अनुकुलता दर्शविली आहे. त्यामुळे निफाड कारखाना सुरू होईल आणि ट्रायपोर्टच्या कामालाही वेग येईल. सोमवारी याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक आहे. त्यात ट्रायपोर्ट प्रोजेक्टला आणि निसाका सुरू होण्यासाठीही गती मिळेल.-सुरेशबाबा पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोक्याचा गळफास लागल्याने मुलीचा मृत्यू

$
0
0

मटा वृत्तसेवा, नाशिक

चुंचाळे शिवारातील जाधव टाऊनशिप येथे दहा वर्षीय मुलगी घरात झोका खेळत असताना झोक्याचा गळफास लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की चुंचाळे शिवारातील जाधव टाऊनशिप येथे तितिक्षा किरण राऊळ (१०) ही मुलगी घरात बेडरूममध्ये झोका खेळत होती. झोका खेळत असताना तिचा तोल गेला आणि तिला त्या झोक्याचा गळफास लागला. हा प्रकार तिच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी प्रतीक्षाला मृत घोषित केले.

सध्या शाळांना सुट्या लागल्या आहेत किंवा लागत आहेत त्यामुळे मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मुळे काय आणि कोणता खेळ खेळता याकडे पालकांनी लक्ष द्यावे म्हणजे असे प्रसंग घडणार नाहीत.
- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीत शेकडो झाडे स्वाहा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

नाशिकच्या अंबड एमआयडीसीजवळ असलेल्या चुंचाळे गृहनिर्माण प्रकल्पाशेजारील वनविभागाच्या डोंगरावर अज्ञात टोळक्याने लावलेल्या आगीत हजारो झाडे जळून खाक झाली. ही आग जाणूनबुजून लावल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींसह ग्रीन रिव्हॉल्यूशन संघटनेच्या सदस्यांनी केला आहे.

मौजे चुंचाळे शिवारात वनीकरण विभागाच्या राखीव वनक्षेत्र क्रं. २२७ मध्ये असलेल्या संरक्षित डोंगरावर विविध सामाजिक संस्था व वनीकरण विभागामार्फत गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ग्रीन रिव्हॉल्यूशन या संस्थेसह नाशिक जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनी वनीकरण विभागाच्या सहकार्याने विविध झाडे लावली होती. कडुनिंब, करंज, वड, पिंपळ, रुद्राक्ष, बेल, सीताफळ, रामफळ, आंबा अशा बहुपयोगी वृक्षांचा यात समावेश होता. गत तीन-चार वर्षांमध्ये त्या वृक्षांची जोपासनाही उत्तम प्रकारे करण्यात येत आहे. नाशिक परिसरात वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाची जोपासना व्हावी यासाठी विविध संस्थांच्या वतीने पदरमोड करून येथे सातत्याने वृक्षांची लागवड केली जात आहे. तीन वर्षांपूर्वी श्रमदानातून खड्डे खोदून ६५०० वृक्षांची लागवड केली. यामध्ये वनविभागाने ४० हजार रुपये किमतीची, तर नागरिकांकडून जमा झालेल्या रकमेतून ६० हजार रुपये खर्च करून वृक्षलागवड करण्यात आली होती. याशिवाय गतवर्षी उन्हाळ्यामध्ये महिन्याकाठी १० हजार रुपयांचा खर्च करीत ही झाडी जगवण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी अज्ञात टोळक्याने या क्षेत्रात प्रवेश करीत येथे आग लावून दिली. या परिसरात नाशिकमधील विविध शाळांची मुले येऊन वृक्षारोपण करीत असतात. त्यामुळे पुढील पिढीला पर्यावरण जोपासण्याचा संदेशही दिला जातो. वारंवार घडणाऱ्या अशा स्वरुपाच्या घटनांना आळा घालण्यासाठी वन अधिनियम, १९२७ चे कलम २६/१ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली असून, यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने प्रयत्नशील राहिले पाहिजे अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमी व्यक्त करत आहे.

लाखोंच्या पाइपलाइनीचे नुकसान

या वनकक्षात असलेल्या झाडांचे संगोपन व्हावे या उद्देशाने ग्रीन रिव्हॉल्यूशन संघटनेने पुढाकार घेत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ईपीसी कंपनीकडून १ लाख ७५ हजार रुपये मिळवून येथील झाडांना नियमित पाणी देण्याची व्यवस्था ठिबक सिंचनाद्वारे केली होती. यासाठी लाखो रुपये किमतीची प्लास्टिकची पाइपलाइन व मोटर बसवून घेतली आहे. मात्र, आग लागल्याने ही संपूर्ण पाइपलाइन जळून गेली असून, त्यासाठी केलेला लाखो रुपयांचा खर्चही वाया गेला आहे.

गेल्या तीन-चार वर्षांमध्ये ग्रीन रेव्हॉल्यूशन ही स्वयंप्रेरित संघटना येथे वृक्षसंगोपन करीत आहे. त्यासाठी आम्ही रात्री ७ हजार रुपये पगारावर सुरक्षारक्षकाची नेमणूक केली आहे. मात्र तरीही अशा स्वरुपाच्या आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत.

- डॉ. संदीप अहिरे

नाशिकमध्ये पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास पाहता कुठेतरी वृक्ष लागवड करून पर्यावरण प्रदूषणमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, काही अज्ञात व्यक्ती हे होऊ देत नसल्याचे या प्रकारावरून लक्षात येते आहे.

- सुनंदा जाधव

विविध सामाजिक संस्था व वनीकरण विभागामार्फत लावण्यात आलेल्या या वृक्षांची चांगली वाढ झाली होती. मात्र अशा आगी लागून केलेली सर्व मेहनत वाया जात आहे. कोणीच सामाजिक जाणिवेतून या घटनेकडे पाहत नाही.

- भारती जाधव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरीत पडलेल्या दोघांना वाचविले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

रविवारची सुटी साधून काही महाविद्यालयीन युवक व युवती पांडवलेण्यावर ट्रेकिंगला गेले होते. मात्र, त्यातील एक मुलगा व मुलगी पंचवीस फूट खोल दरीत पडले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने या युवकांना वाचवले. या प्रकारामुळे या परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी पुरातत्व विभागाशी सुरक्षा रक्षकाबाबत पत्रव्यवहार करूनही विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पांडवलेणी येथे रविवारी सकाळी नितीन देशपांडे, प्रवीण चाकोले व अजय जाधव हे फिरायला गेले असताना त्यांना लेणी क्रमांक १ येथे सुमारे वीस ते पंचवीस फूट खोल एक मुलगा व मुलगी जखमी अवस्थेत पडलेले असल्याचे दिसले. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच जलद प्रतिसाद पथक, नियंत्रण कक्ष, अग्निशामक दलासह इंदिरानगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या विदुला दौलत पगार (१९, रा. पिंपळगाव बसवंत) व अरविंद वैद्यनाथन (२२, रा. प्रभूधाम, एचएएलजवळ, नाशिक) यांना सुखरूप खाली उतरविले. त्यानंतर या दोघाही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रेकिंगला गेलेल्या त्या तिघांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनीही या घटनेचे महत्त्व लक्षात घेत केलेल्या कारवाईमुळे दोघांचे प्राण वाचले. पांडवलेणी परिसरात दररोज अनेक नागरिक फिरायला जातात. सुटीच्या दिवशी येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी पुरातत्व विभागाने कायमस्वरुपी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होवूनही त्याची पुर्तता होत नसल्याचे दिसत आहे. याबाबत पोलीस आयुक्तांनीही अनेक पत्रव्यवहार केले असून या सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नाबाबत पुरातत्व विभाग गांभीर्याने बघत नसल्याचे समोर आले आहे. याठिकाणी आज सुरक्षा रक्षक असते तर निश्चितच हा अपघात घडलाच नसता असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

जागरूक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर जलदगतीने जलद प्रतिसाद पथकाने चांगले काम केल्याचे आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले. या जखमींना वाचविण्यासाठी इंदिरानगरचे वरिष्ठ पेालिस निरीक्षक नारायण न्याहाळदे, वाहतूक विभागाचे सहाय्यक निरीक्षक सुरेश भाले, जलद प्रतिसाद पथकाचे निरीक्षक टी. आर. नलावडे, एस. यू. हिरे यांच्यासह डी. आर. वाघ, पी. सी. पाटील, एस. जी. शर्मा, आर. टी. सिंग, व्ही. आर. वाघ, डी. व्ही. निकम, एस. यू. माळोदे, एन. ए. ढवळे, बी. बी. धरम, डी. एस. दातीर, एस. आर. निकम, आर. पी. बहिरम, एस. डी. सपकाळे, एस. आर. बुचडे, व्ही. ए. जाधव, ए. ए. भवर, एन. ए. शेख, एस. एम. कोळी या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सुरक्षाव्यवस्था गरजेची

पांडवलेणी परिसरात दररोज पर्यटकांची संख्या वाढत असतानाही या ठिकाणी आवश्यक सुविधा नाहीत. अनेकदा नागरिकांकडून मागणी होऊनही येथील समस्या सुटत नसल्याचे अनेकदा लक्षात आले आहे. तसेच धोकादायक असलेल्या भागाजवळ फलकसुद्धा लावलेले नसल्याने नवख्या पर्यटकांना किंवा ट्रेकिंग करणाऱ्यांना अडचणी येतात. येथे योग्य ती सुरक्षाव्यवस्था असण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

सुटीच्या दिवशी ट्रेकिंगला जाताना संरक्षणाच्या हेतूने नागरिकांनी आवश्यक साहित्य बरोबर ठेवणे आवश्यक आहे. सोबत प्रशिक्षक असावा. पुरातत्व विभागाला याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. आताही या घटनेनंतर तातडीने पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images