Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पवार-राज भेटीला महत्त्व देणार नाहीः भाजप

$
0
0

नाशिकः

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू असताना आम्ही या भेटीला महत्त्व देणार नाही, असं भाजपने म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली. कुणाला कुणाची गरज आहे. त्यांनाच विचारा, असं दानवे म्हणाले.

निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत आम्ही अजून विचार केलेला नाही. मित्रपक्ष सोबत राहिले पाहिजे ही भाजपाची इच्छा आहे, असं दानवे यांनी स्पष्ट केलं. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यापुढे देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करू. शेतकऱ्यांचे प्रश्न हताळण्यात भाजप यशस्वी झाला आहे, असा दावा दानेव यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मेडिकल कमिशनला ‘आयएमए’कडून विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (नॅशनल मेडिकल कमिशन) हे विधेयक जनता, गोरगरिब व्यक्ती यांच्या विरोधातील असून, सामान्य जनतेच्या आरोग्यास घातक आहे. हे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे, रुग्णांचा वैद्यकीय खर्च वाढविणारे असल्यामुळे आयएमएचा याला विरोध आहे. दिल्लीत होणाऱ्या डॉक्टर्स महापंचायतमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय कुमार यांनी केले.

आयएमएच्या भारत यात्रेनिमित्त शुक्रवारी (दि. १६) नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करणाऱ्या कार्यक्रमात समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना ते बोलत होते. याप्रसंगी आयएमएचे राज्यसचिव डॉ. पार्थिव संघवी, डॉ. निसार शेख, डॉ. विश्वेश अग्रवाल, डॉ. राजेश पाटील आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. सध्या वैद्यकीय व्यवसाय बिकट परिस्थितीतून जात असून, वैद्यकीय व्यवसायाशी निगडित अनेक प्रस्ताव पडून आहेत, असे डॉ. पार्थिव संघवी यांनी सांगितले. त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांवर बसत आहे. या विधेयकामुळे वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा खर्चिक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी प्रमोद सोळुंके, शुभम भोलाणे, पृथ्वीराज काळे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून निषेध व्यक्त केला.


धुळ्यातही निषेध

धुळे : सरकारने प्रस्तावित केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशनला धुळ्यातही आयएमए असोसिएशनतर्फे तीव्र निषेध दर्शविण्यात आला. या वेळी अॅलोपॅथीशी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीला जोडण्यात येऊ नये, अशी प्रमुख भूमिका संपूर्ण भारतातील अॅलोपॅथी डॉक्टरांनी घेतली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अजयकुमार, डॉ. संजय गोरे, डॉ. संतोष खडतरे उपस्थित होते. पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ. अजयकुमार यांनी सांगितले की, नॅशनल मेडिकल कमिशनला आयएमएचा तीव्र विरोध असून, जनतेतूनही सकारात्मक प्रतिसाद आहे. दि.२५ फेब्रुवारीपासून ही भारत यात्रा सुरू असून, त्यापुढेही ती अशीच सुरू राहणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचारदिरंगाई जैसे थे

$
0
0

कामगार रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक जिल्ह्यातील कामगार विमाधारकांना योग्य उपचार मिळावेत यासाठी केंद्र व राज्य सरकारने भव्य अशा कामगार विमा रुग्णालयाची उभारणी केली. याठिकाणी जिल्ह्यातून दररोज हजारो कामगार उपचारासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीतील या रुग्णालयात येतात. परंतु, या रुग्णालयात डॉक्टर, नर्स व सेवकांची संख्याच कमी असल्याने त्याचा अधिक भार इतरांना सहन करावा लागत आहे. यामुळे उपचारामध्ये दिरंगाईचा ठपका कामगारांनी ठेवला आहे.

सातपूर परिसरातील कामगार हे आपल्या उपचारासाठी येथे येतात. मात्र, रुग्णालय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामगारांवर उपचार करताना दिरंगाई होत आहे, असा आरोप कामगारांकडून केला जातो आहे. यावर, रुग्णांची संख्या बघता रुग्णालयात तत्काळ नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत सातत्याने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे कामगार विमा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका एस. एस. जवादे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

आरोग्य विभागाने लक्ष द्यावे

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑनलाइन परीक्षेतील केवळ २५ पॅरामेडिकल व नर्स यांची नियुक्ती डिसेंबर महिन्यात करण्यात आल्याचे जवादे यांनी सांगितले. परंतु, डॉक्टर व चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अगदी नगण्य असल्याने इतरांवर त्याचा अधिभार येत असल्याचे त्यांनी कबूल केले. आमदार सीमा हिरे, खासदार हेमंत गोडसे यांनीदेखील कामगार रुग्णालयात डॉक्टर, नर्स व सेवकांची भरती करण्याबाबत सातत्याने मागणी केली आहे. याकडे सरकारच्या आरोग्य विभागाने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

पाठपुरावा करूनही भरती नाहीच

सातपूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या कामगार विमा रुग्णालयात नोंदणीकृत विमाधारकांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. जिल्ह्यातून कामगार उपचारासाठी सातपूरला कामगार रुग्णालयात येत असतात. यामुळे कामगारांची मोठी गर्दी होत असते. कमी कर्मचारी संख्या व उपचार घेणारे कामगार शेकडोहून अधिक असल्याने विमा रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांवर रोजच अधिभार सहन करण्याची वेळ येत आहे. सद्यस्थितीत शंभर बेडचे असलेल्या कामगार रुग्णालयात केवळ १७० कर्मचारी संख्या आहे. प्रत्यक्षात अडीचशेहून अधिक कर्मचारी कामगार रुग्णालयाकडे सेवेत असण्याची गरज आहे. याबाबत वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करूनदेखील कर्मचारी भरले जात नसल्याने कामगारांना उपचारात त्रास सहन करावा लागतो.


कामगारांच्या मागणीनुसार केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे डॉक्टर व सेवकभरती करण्याची मागणी केली आहे. यात काही मेडिकल कर्मचारी भरण्यात आले असून, रुग्णालयात कर्मचारी संख्या कमी असल्याने त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. येत्याकाळात शंभर बेडचे कामगार रुग्णालय दोनशे बेडचे होणार आहे.

-हेमंत गोडसे, खासदार

लाखो कामगारांना आरोग्य सुविधा देणाऱ्या कामगार रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक आहे. परंतु, कमी कर्मचारी संख्या असतानादेखील कामगारांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो आहे.

-एस. एस. जवादे, वैद्यकीय अधीक्षिका, कामगार विमा रुग्णालय

रुग्णालयातील सद्यस्थिती

बेडची संख्या...........१००

कर्मचारी............१७०

आवश्यकता.......२५०च्यावर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक भान जपत ते चढले बोहल्यावर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गृहस्थाश्रम जितका आनंदाचा तितकाच जबाबदारीची जाणीव करून देणारा! विवाहवेदीवर चढण्यापूर्वी असलेली उत्सुकता, खर्चाची चिंता, प्रापंचिक चढाओढ यात सामाजिक जबाबदारीचा विचार क्वचितच होत असावा. मात्र इंकम टॅक्स विभागाचे सहायक आयुक्त स्वप्निल कोठावदे आणि भविष्य निर्वाह निधी विभागाच्या सहायक आयुक्त वर्षा पगारे यांनी आपल्या विवाह सोहळ्यात अवयवदान अन् रक्तदानाबाबत जनजागृती करीत एक नवीन संकल्पना समाजापुढे ठेवली. ही बाब विवाह सोहळ्यात मानपान, उधळपट्टी करणाऱ्यांना नक्कीच अंतर्मुख करणारी आहे.

दोघांना चांगली (सरकारी) नोकरी, मनासारखा पैसा, त्यातच मनाप्रमाणे विवाह… एखाद्या कांदबरीतील व्यक्तिरेखा वाटाव्यात अशा स्वप्निल कोठावदे आणि वर्षा पगारे या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा विवाह गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पार पडला. मूळचे नाशिकचे असलेले स्वप्निल हे आंध्र प्रदेश येथे, तर वर्षा या कर्नाटकामध्ये कार्यरत आहेत. नाशिक-पुणे हायवेवर पार पडलेला त्यांचा विवाह समारंभ मात्र सर्वत्र दिसतो तसा नक्कीच नव्हता. येथे होती डॉक्टरांची धावपळ तर नर्सेची वेळेत काम करण्याची धडपड. कार्यक्रमस्थळी डिजे नव्हता, पण रक्तदानासाठी उद्युक्त करणाऱ्या घोषणा वऱ्हाडी मंडळींना सामाजिक जबाबदारीचे भान करून देत होत्या. नवदाम्पत्याने स्वत: अवयवदानाचा अर्ज भरला. यापाठोपाठ ७०० जणांनी तशी इच्छा व्यक्त करीत आपल्या गेल्यानंतर कोणाचे तरी आयुष्य सुसहाय्य व्हावे म्हणून अर्ज दाखल केले. याच ठिकाणी ६२ जणांनी रक्तदान करून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले.

समाजाप्रती काहीतरी देणे आहे. या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न अवयवदानाच्या माध्यमातून करावा, अशी आमची दोघांची मनापासून इच्छा होती. त्यानुसार आम्ही विवाह अवयवदानाच्या जनजागृतीद्वारे करण्याचा ठरविला.

- वर्षा पगारे, नववधू



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डार्क इंटरनेटमुळे तरुणाई ड्रग्ज तस्करीकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कमलेश बस्तेच्या चौकशीकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. अवघा २० वर्षांचा संशयित आरोपी दोन वर्षांपासून हा उद्योग करीत असल्याचे समोर आले असून, डार्क इंटरनेटमुळे युवक ड्रग्ज तस्करीसह इतर अवैध व्यवसायांत अडकत आहे.

देशभरातील महानगरामंध्ये एलएसडी आणि एमडीएमए या महागड्या ड्रग्जची तस्करी करणाऱ्या संशयित कमलेशला १४ मार्च रोजी कोलकाता येथील नार्कोटिक्स कंट्रोल युनिटच्या पथकाने नाशिकमधून अटक केली. कमलेश सध्या कोलकाता येथे असून, नार्कोटिक्स कंट्रोल युनिटचे अधिकारी या गुन्ह्याचे पाळेमुळे शोधून काढत आहेत. नाशिकमधून दोन वर्षांपासून कमलेश हा उद्योग चालवत होता. त्यामुळे या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी आपले लक्ष या प्रकरणावर केंद्रित केले.

याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्याची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्ज तस्करी, मानवी तस्करी, बिटकॉइनचे व्यवहार यासह इतर अवैध कारवाया करण्यासाठी डार्क इंटरनेटचा वापर केला जातो. यात ठीकठिकाणांवरील मुलांना हेरून वेगवेगळी आमिषे दाखवून मोठे तस्कर आपल्या जाळ्यात ओढतात. मुलांना सहजतेने पैसा उपलब्ध होण्याचे मार्ग दिसले, की ते याकडे वळतात. त्या दृष्टीने काय उपाययोजना राबवणे शक्य आहे, याबाबत चाचपणी सुरू असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील संशयित सध्या कोलकाता नार्कोटिक्स कंट्रोल युनिटच्या ताब्यात असून, त्यांची चौकशी झाल्यानंतर स्थानिक पातळीवर पोलिस पुढील कार्यवाही करतील.

काय आहे डार्क इंटरनेट

डार्क इंटरनेट ही संकल्पना जागतिक स्तरावर गैरकृत्य करणारे गुन्हेगार वापरतात. सर्वसाधारण इंटरनेटप्रमाणे येथे सहजासहजी कोणीही प्रवेश करू शकत नाही. त्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर, कॉन्फिगरेशन अथवा प्राधिकरणाची गरज भासते. मित्राचा मित्र अशा पद्धतीने चेन नेटवर्किंगच्या माध्यमातून डार्क इंटरनेटचा वापर केला जातो. एकदा या चक्रात तरुण फसला की पुन्हा बाहेर पडणे अशक्य होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्या प्रभागात समस्यांचा डोंगर

$
0
0

वर्षपूर्ती सत्तेची- प्रभाग १

रामनाथ माळोदे, पंचवटी

प्रभाग एक हा परिसर गावठाण आणि नव्याने वाढत असलेल्या लोकवस्तीचा परिसर असून, या प्रभागातील समस्याही वाढत आहेत. नव्या वसाहतीत वाढ होत असताना त्या भागात मुलभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्याची गरज भासत आहे. नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या कामकाजाला एक वर्षपूर्ण झाल्यानंतरही प्रभाग एकच्या परिसरातील जुन्या समस्या तशाच आहेत.

प्रामुख्याने रस्त्यांची समस्या सर्वात जास्त प्रमाणात भेडसावत असल्याचे दिसते. अनेक रस्त्यांचे खडीकरण झालले असले तरी डांबरीकरण नसल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. म्हसरुळ-आडगाव हा डीपी रस्ता असूनही तो अत्यंत अरुंद आहे. अरुंद, वळणाचा आणि धोकेदायक असलेला हा रस्ता सध्या अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास गुजरातकडे जाणारी अवजड वाहतूक करणारी वाहने आडगावपासून या रस्त्याने वळविता येऊ शकतील. त्यामुळे शहरातील वाहतूक कमी होण्यास मदत होईल. सूर्यवंशी मळ्याजवळील पूलही दोन्ही बाजूने धोकादायक झालेला आहे.

म्हसरुळ गावठाण परिसरात विद्युत केबल टाकण्यात आलेल्या आहेत. तरीही विद्युत पोलवरील तारांचे जाळे अजूनही तसेच आहे. आळंदी कालव्याचा रस्ता डांबरीकरण करण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागातील मळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यांवर पथदीप नसल्यामुळे चोऱ्या, घरफोड्या यांची भीती येथील रहिवाशांच्या मनात कायम घर करून असते. पौराणिक महत्त्त्व असलेल्या सीता सरोवराच्या सुशोभीकरणाचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. म्हसरुळ सार्वजनिक वाचनालयाच्या समोरच कचराकुंडी आहे. मांसविक्री केली जात असल्यामुळे या भागातील दुर्गंधी त्रासदायक ठरत आहे. महिलांच्या सुलभ शौचालयाची दुरवस्था झाली आहे. बोरगड भागातील नव्याने झालेल्या वसाहतीचे रस्ते अजूनही कच्चे आहेत. कलानगर परिसरात नव्याने झालेल्या बांधकामांच्या ठिकाणचे कच्चे रस्ते त्रासदायक ठरत आहेत. येथे सध्या सफाई करण्यासाठी कामगार येत आहेत. गोळा केलेला कचरा येथेच जाळण्यात येत असल्यामुळे सर्वत्र धुराच्या समस्येला येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. मोकळ्या भूखंडांच्या जागी पाणी तुंबत असल्याने पावसाळ्यात ही समस्या गंभीर होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. घंटागाडी वेळेवर येते, बहुतांशी भागात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात येत आहे.

ही कामे प्रस्तावित

म्हसरुळ गजपंथ सोसायटी, फिटनेस सोसायटी, टी. बी. सॅनिटोरिअमलगतची वसाहत, वैदूवाडी, राजवाडा येथे पाइपलाइन टाकणे, जिजामाता उद्यान, शिवसमर्थ उद्यान, वृंदावन नगर उद्यान आदी ठिकाणी पथदीप सुरू करणे, म्हसरुळ येथील खुल्या जागेत पाथवे, गुलमोहर नगर येथे पाथवे, एकता नगर, बोरगड येथे संरक्षक भिंत, पाथवे, उद्यानांचा विकास आदी कामांना मंजुरी मिळालेली आहे. सुमारे १५ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणतात...

शहराची जबाबदारी सांभाळताना प्रभागाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. प्रभाग एकमधील पाणीपुरवठा, उद्यान, विद्युत, बांधकाम आदी विकासकामे मंजूर करण्यावर भर दिला आहे. अनेक कामांची वर्क ऑर्डर निघालेली आहे. ती कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील.

- रंजना भानसी, महापौर

अनेक विकासकामांना मंजुरी मिळालेली आहे. एलईडीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे पोल उभे असूनही त्यावर दिवे बसविता आले नाहीत. पावसाळ्यापूर्वी खडीकरण करण्यात आलेले रस्ते डांबरीकरण होणे गरजेचे आहे. प्रभागात १५ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

अरुण पवार, नगरसेवक

प्रभागात विविध विकासकामांना मंजुरी मिळालेली आहे. ही कामे पूर्ण करण्यावर प्रभागातील सर्व सहकारी नगरसेवक भर देत आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंजूर कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील.

- गणेश गिते, नगरसेवक

नागरिक म्हणतात...

म्हसरुळ येथील सीतासरोवराला पौराणिक महत्त्व असून, हे सरोवर दुर्लक्षित राहिलेले आहे. ठराविक भागातच पथदीप बसविण्यात आलेले आहेत. सुलभ शौचालयात स्वच्छता चांगल्या प्रकारे केली जात नाही. प्रभागात नव्या वर्षात नवीन असे काही मिळाले नाही.

- बाळासाहेब उखाडे, नागरिक

प्रभागात सर्वांगिण विकासासाठी अद्याप भरपूर वाव आहे. प्रभागाला महापौरपद लाभले आहे. त्या माध्यमातून प्रभागात चांगल्या योजना राबविण्याची संधी आहे. लोकप्रतिनिधींचा अनुभव आणि नवीन कल्पना यांची सांगड घालून नागरिकांच्या अपेक्षा जाणून काम केल्यास प्रभागाचा कायापालट करता येऊ शकेल.

- प्रवीण जाधव, नागरिक

--

प्रभागात समाविष्ट भाग - म्हसरुळ गावठाण, म्हसरुळ मळे परिसर, पेठरोड, गोरक्षनगर, टी. बी. सॅनिटोरियम, स्नेहनगर, प्रभातनगर, गुलमोहरनगर, एकतानगर, बोरगड, पुष्पकनगर, पोकार कॉलनी, कलानगर, गजपंथ सोसायटी आदी.

प्रभागाची लोकसंख्या - १८,३३६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून चॉपरने हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्ववैमनस्यातून तिघांनी मिळून एकाच्या घरात घुसून चॉपरने हल्ला केला. यात फिर्यादी युवकास हाताचे बोट कापले गेले तर त्याची भाचीही जखमी झाली. हा प्रकार दि. १६ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तुरेवाडा बेलदार लेन, रविवार कारंजा येथे झाली.

याप्रकरणी सतीश दशरथ तुरे (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल हिरालाल कुदळे (रा. मल्हार गेट चौकी पाठीमागे, रविवार कारंजा) असे संशयित आरोपीचे नाव असून, कुदळेसोबत आणखी दोन अनोळखी युवक होते. पूर्वीच्या भांडणाचा वाद उकरून तिघा संशयितांनी तुरे यांच्या घरात चॉपर घेऊन प्रवेश केला. या वेळी संशयितांनी तुरे याच्या हातावर वार केला. त्यात त्याच्या उजव्या हाताच्या बोटाजवळ कापले गेले. तर दुसरीकडे या मामाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तुरे यांच्या भाचीच्या हातालाही दुखापत झाली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, घटनेचा अधिक तपास हवालदार राठोड करीत आहेत.

दूधबाजारात युवकाची लुटमार

'नीट चालता येत नाही काय', असे म्हणत एका युवकाने दुसऱ्याला मारहाण करीत त्याच्या खिशातील पैसे काढून पोबारा केला. ही घटना दि. १६ मार्च रोजी दूधबाजारातील हॉटेल मुघल दरबारसमोर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी एका २२ वर्षांच्या अज्ञात युवकाविरोधात लुटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. शहेनशाह मुजाहिद हुसेन आलम (वय ३२, खडकाळी) याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने फिर्यादीस खाली पाडून बळजबरीने त्याच्या खिशातील एक हजार ७८० रूपये काढून पोबारा केल्याची नोंद आहे. घटनेचा अधिक तपास पीएसआय एस. जी. काळे करीत आहेत.

जुगारीला अटक

क्राइम ब्रँचच्या सेंट्रल युनिटसह भद्रकाली पोलिसांनी दोन ठिकाणी छापा मारून जुगाऱ्यांविरोधात कारवाई केली. यात जवळपास सहा जणांना अटक झाली. सेंट्रल युनिटने आपली कारवाई दि. १६ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास व्हिक्टोरिया पुलाजवळील दत्त मंदिराजवळ केली. याठिकाणी जुगार खेळणाऱ्या नासीर हुसेन शेख (वय ४२, पंचशीलनगर) याच्यासह दोघांना अटक करण्यात आली. संशयितांविरोधात पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार बी. व्ही. थेटे करीत आहेत. दरम्यान, भद्रकाली पोलिसांनी शनिवारी (दि. १७) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास तलावडी परिरसरातील नसीम हॉस्पिटलसमोरील पानटपरीजवळील मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या जावेद अब्दुल सत्तार (५६, वडाळागाव) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. संशयितांकडून जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक लवांड करीत आहेत.

२१ बाभळीचे झाडे तोडली

म्हसरूळ परिसरातील टी. बी. सॅनेटेरिअम या संस्थेच्या आवारातील तब्बल २१ काटेरी बाभळींचे झाडे बुंध्यापासून तोडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. ३ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी वसंत रघुनाथ ढुमसे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास हवालदार पगार करीत आहेत.

पाण्यात बुडून मृत्यू

नदीच्या पाण्यात बुडून एका २५ ते ३० वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी (दि. १७) मार्च रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास टाळकुटेश्वर पुलाजवळील नदी पात्रात हा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. ही व्यक्ती २५ ते ३० वयोगटाची असून, त्याने आत्महत्या केली की यामागे घातपात आहे, याचा तपास पंचवटी पोलिस स्टेशनचे हवालदार सी. डी. बोडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..अन् ‘गणेशा’ने ओढल्या बारा गाड्या!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर गावात सालाबादप्रमाणे पारंपरिक बारा गाड्यांची यात्रा उत्साहात पार पडली. गाड्या ओढताना नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने सर्वांना बघत येत नसे. त्यासाठी यंदा नगरसेविका सीमा निगळ यांनी स्क्रीनची व्यवस्था केली होती.

बारागाड्या ओढण्याचा मान निगळ घराण्याला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मंगेश प्रकाश निगळ यांना बारागाड्या ओढण्याचा मान मिळाला. यावेळी पोलिसांकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यात्रेला उपस्थित मान्यवरांचे नगरसेविका सीमा निगळ, यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष विजय भंदुरे, उपाध्यक्ष विलास घाटोळ व ग्रामस्थांनी स्वागत केले.

सन १७०० पासून सातपूर गावात मराठी दिनाच्या नववर्षात म्हणजेच गुढी पाडव्याला बारागाड्यांची यात्रा भरते. दोनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या बारा गाड्यांची यात्रा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक आलेले असतात. पाडव्याला दुपारनंतर त्र्यंबकरोडवर बारा गाड्या उभ्या करण्यात आल्या. गावातील महिलांनी गाड्यांची सायंकाळी पारंपरिक पूजा केली. दुपारी चार वाजता बारा गाड्या ओढणारे गणेशा (मंगेश) यांची नऊवार साडी परिधान करून सोन्यांच्या दागिन्यांनी मढवून गावातून मिरवणूक काढण्यात आली.

सायंकाळी सहा वाजता सातपूर एमआयडीसीत असलेल्या भवानी मातेच्या मंदिरात गणेशा दर्शनासाठी पोहचला. भवानी मातेची पूजा करून पुन्हा त्र्यंबकरोडवर लावलेल्या बारागाड्यांना गणेशाने प्रदक्षिणा घातली.

यानंतर गाड्यांची पारंपरिक पूजा करून गणेशाने बारा गाड्या ओढल्या. यावेळी या गाड्यांमध्ये अनेकजण बसले होते. गाड्या ओढल्यावर पुन्हा वाजतगाजत गणेशाची मिरवणूक गावातून शिवाजी चौकात पोहचली. यात्रेला आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. अपूर्व हिरे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सातपूरच्या प्रभाग सभापती माधुरी बोलकर, उपमहापौर प्रथमेश गिते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनसेचे तालुकाध्यक्ष रमेश खांडबहाले, नगरसेविका नयना गांगुर्डे, सुवर्णा मटाले, नगरसेवक मुकेश शहाणे, अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सातपूरचे राजेश आखाडे आदी उपस्थित होते. यात्रा समितीच्या वतीने शांताराम निगळ, गोकुळ निगळ,राजाराम पाटील निगळ, प्रकाश निगळ, सोपान बंदावणे, विनोद निगळ, पवन निगळ, लक्ष्मण घाटोळ, भरत घाटोळ, गोकुळ तिडके आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

पावसाच्या सरी

बारा गाड्या ओढणारा गणेशा भवानी मातेच्या मंदिरात दर्शसाठी गेला असता पावसाच्या तुरळक सरी पडल्या. काही वेळाने पुन्हा ढगाळ वातावरण जाऊन आकाश मोकळे झाल्याने भाविकांना यात्रेचा आनंद घेता आला.

जाळ्यातून यात्रा पाहण्याची वेळ

बारा गाड्यांची यात्रा बघण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक हजारोंच्या संख्येने आले होते. परंतु जागेअभावी पोलिसांच्या बॅरिकेडिंगच्या जाळ्यांतून मुलांनी बारा गाड्या यात्रेचा आनंद घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाण्यात आज राष्ट्रीय संत अधिवेशन

$
0
0

हिंदू धर्म संस्कृतीरक्षक संघाच्या वतीने आयोजन

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

हिंदू धर्म संस्कृतीरक्षक संघाच्या वतीने आज (दि. १९) येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव पटांगणावर चौथे राष्ट्रीय संत अधिवेशन आयोजित केले आहे. या राष्ट्रीय अधिवेशनात साधू-महंतांच्या उपस्थिती लाभणार असून, हिंदू धर्म संस्कृतीरक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वारकरी संप्रदायाचे महंत, पंडित यावेळी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा देवमाममलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांनी दिली.

अधिवेशनाचे अध्यक्षस्थान आयुर्वेदाचार्य महंत श्री श्री १००८ माधवानंद सरस्वती महाराज हे भुषविणार आहेत. आज (दि. १९) सकाळी दहा वाजता शिरपूरच्या श्रीराम मंदिराचे मठाधिपती महंत सतीशदास महाराज भोगें यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. धर्मवीर गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजेला ब्रह्मवृदंचा मंत्र जागर व वैदिकांची बैठक होणार असून, सांयकाळी पाच वाजेला भालचंद्र बागड व अरूणा बागड यांच्या हस्ते आचार्य जगतगुरू व यतीवर्यींचे पाद्यपूजन होईल. यानंतर अधिवेशनास सुरुवात होईल. महंत महानंदबाबा काल्हेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होईल. यानंतर भागवताचार्य बापूलालजी ठाकूर यांचे 'भक्तिसंगीत' व शिवाबापू ठाकरे यांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम होईल. अधिवेशनास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दादाजी सोनवणे, धर्मा सोनवणे, गंगाधर येवला, कौतिक सोनवणे, रमेश सोनवणे, विजय पाटील, रमेश देवरे, राजेंद्र भांगडिया, सुनील मोरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमित कुटुंबीयांना मिळावे हक्काचे घर

$
0
0

राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रशासनास सूचना

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील शासकीय जागांवर असलेल्या अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी पंचायत समितीस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून, अतिक्रमित म्हणवल्या जाणाऱ्या कुटुंबीयांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

शहरातील अग्रसेन भवन येथे आयोजित बैठकीत राज्यमंत्री दादा भुसे बोलत होते. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आमदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. १७) संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रांताधिकारी अजय मोरे, गटविकास अधिकारी आनंदराव पिंगळे, तहसीलदार ज्योती देवरे व तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी बैठकीत शासकीय जागांवर असलेल्या अतिक्रमणे नियामानुकूल करण्याचा शासन निर्णयाचे वाचन करण्यात आले. शासन नियमानुसार निवासी कारणासाठी केलेले अतिक्रमण कसे नियमानुकूल करता येईल व कोणत्या पद्धतीने याद्या तयार करता येतील याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी सर्व ग्रामपंचायतीचे २००० व २०११ चे नमुना नंबर ८ सील करून शासकीय जागेचे अतिक्रमणाचे सर्व नोंदी सील करण्यात आलेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात करवसुली जोरात

$
0
0

महापालिकेकडून मालेगावातील १८ मालमत्ता सील; ६४ नळजोडणी खंडित

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील थकीत कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाकडून व्यापक मोहीम राबविली जात असून, गेल्या आठ दिवसांत सुमारे तीन कोटी थकीत कर वसुली करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान १८ मालमत्तांना सील लावण्यात आले असून, ६४ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असल्याची माहिती कर उपायुक्त राजू खैरनार यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

गेल्या आठवड्यापासून महापालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी प्रशासनास थकीत कर वसुलीसाठी मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. यानंतर सहाय्यक आयुक्त राजू खैरनार यांच्याकडे कर उपायुक्त पदाचा पदभार देण्यात आला होता. खैरनार यांनी पदभार स्वीकारल्यावर ही मोहीम गतिमान झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी (दि. १७) दिवसभरात ४९ लाख ५८ हजार १९६ रुपये एवढी करवसुली झाली आहे, अशी माहिती कर अधीक्षक एकलाख अहमद यांनी दिली. यात सर्वाधिक २१ लाख ४५ हजार रुपये थकीत कर प्रभाग एकमधून वसूल झाला.

मोहीम अधिक कडक करणार

यासह शहरातील वेगवेगळ्या भागात कारखाने, गोडावून, व्यापारी गाळे अशा एकूण १८ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. मालेगाव महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे अवघ्या आठ दिवसांत पालिकेच्या तिजोरीत सुमारे ३ कोटी रुपयांची भर पडली असून, वसुलीची टक्केवारी सुमारे ५० टक्के एवढी झाली आहे. पालिकेकडून मार्च अखेर ७० टक्के वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, येणाऱ्या काही दिवसांत कर वसुलीची मोहीम अधिक कडक करण्याचे संकेत पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

पाच लिपिक निलंबित

आयुक्त संगीता धायगुडे यांनी पालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना वसुलीचे निश्चित उदिष्ट दिले असून, रोजच बैठकीद्वारे याचा आढावा घेतला जातो आहे. तसेच आयुक्त धायगुडे यांनी कर वसुलीत दिरंगाई करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये आतापर्यंत पाच लिपिकांना कर वसुलीत दिरंगाई केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे.

प्रभागनिहाय वसुली (रुपयांमध्ये)

प्रभाग ............. ............. वसुली

प्रभाग एक .............२१ लाख ४५ हजार

प्रभाग दोन .............१० लाख ५० हजार

प्रभाग तीन .............८ लाख ९२ हजार

प्रभाग चार .............८ लाख ७१ हजार १९६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिकांवर अस्मानी संकट

$
0
0

द्राक्ष बागाईतदारांची चिंता वाढली; गहू, कांद्यावर परिणामाची भीती

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या तीन ते चार दिवसांपासून बदललेल्या वातावरणाचा शेतीच्या पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषकरून या वातावरणाने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शक्यतेने निफाड तालुक्यातील द्राक्ष आणि गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई केलेली आहे. ढगाळ हवामानामुळे बागेत असलेले द्राक्ष काढणीसाठी उत्पादक घाई करीत असल्याने व्यापाऱ्यांकडून भाव पाडण्याचे पाहायला मिळत आहे. अचानक वातावरणात बदल झाल्याने निफाड परिसरात गेल्या दोन दिवसांत रात्री, पहाटे व सायंकाळी अशा वेळेत हलक्या पावसाच्या सरीही पडल्या.

निफाडला रविवारी (दि. १८) दुपारनंतर ढगाळ हवामान होते. या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. तर गहू आणि उन्हाळ कांदा काढणीला आलेला असल्याने असेच हवामान जर राहिले तर या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती आहे. सध्या द्राक्षाचे हार्वेस्टिंग सुरू आहे 30 टक्के द्राक्ष बागा अजूनही शिल्लक आहे त्यामुळे ज्यांच्या बागेत अजूनही द्राक्ष शिल्लक आहे त्यांचे धाबे दणाणले आहे , निफाड तालुक्यात यावर्षी कांद्याचीही लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे,कांदे काढणीला आहेत ,पोषण अवस्थेत असलेल्या कांदा पिकाच्या पातीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा पोषणात अडथळे येतील,व काढलेले कांदे जे शेतात आहेत तेही पावसात भिजल्याने नुकसान होईल,कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ व खर्चही वाढेल, गहू देखील काढणीला आहे गव्हाच्या ओंबीत पाणी साचल्याने खाली पडल्यामुळे गहू मशिनने हार्वेस्टिंग करता येणार नाही

द्राक्षावर 'चिकट्या'ची शक्यता

निफाड परिसरात पाऊस न होता असेच हवामान राहिले. तसेच वातावरणात दमटपणा राहिलास तर हार्वेस्टिंग स्टेजला असलेल्या द्राक्षावर चिकट्याचा प्रादुर्भाव होईल. द्राक्षाचे घड चिगट होऊन त्यांना चिकट्या रोगाची शक्यता बळावू शकते. अशावेळी कोणतेही औषध मारता न आल्याने द्राक्ष बागाईतदारांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होईल. निर्यातक्षम द्राक्ष पिकांवर परिणाम होईल त्यामुळे निर्यातही कमी होण्याची शक्यता आहे

निसर्गाचा लहरीपणा व वातावरणातील सतत होणाऱ्या बदलाने काढणीला आलेला गहू व कांद्याचे नुकसान होईल. तसेच हार्वेस्टिंगला असलेल्या द्राक्षाच्या घडात पाऊस झाला तर पाणी साचून सडघाण व द्राक्षमण्यांना तडे जातील.

-किरण बोचरे, द्राक्ष उत्पादक, देवगाव

ढगाळ हवामान अजून चार ते पाच दिवस राहणार असल्याने द्राक्षांना चिकट्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मात्र पाऊस झाला तर तो हलक्या स्वरूपाचा होईल, असे खासगी हवामान संकेतस्थळावर दिसत आहे. तरीही रिस्क न घेता द्राक्ष उत्पादकांनी हार्वेस्टिंग करून घेणे आवश्यक आहे.

-कैलास भोसले, चेअरमन, मध्यवर्ती विज्ञान समिती द्राक्ष बागायतदार संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वांजुळपाणीसाठी संघर्ष यात्रेस सुरुवात

$
0
0

चंदनपुरीपासून शुभारंभ; यात्रेद्वारे जनजागृती करणार

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गिरणा, मोसम नदीच्या पात्रात टाकून हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी वांजुळपाणी संघर्ष समितीने सातत्याने लावून धरली आहे. या मागणीसाठी व्यापक जनजागृती व्हावी व लोकसभागातून लोकचळवळ उभी राहण्यासाठी रविवार (दि. १८) पासून संघर्ष यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील खंडेराव महाराज मंदिरात वांजुळपाणी संघर्ष समितीतर्फे चंदनपुरीच्या सरपंच योगिता अहिरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून यात्रेस सुरुवात करण्यात आली.

वांजुळपाणी संघर्ष समितीतर्फे ही संघर्ष यात्रा रविवारी (दि. १८) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली असून, या यात्रेद्वारे लोकांना वांजुळपाणी प्रकल्प कसा जनहिताचा आहे, त्यातून होणारे फायदे, उपलब्ध होणारे पाणी याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये गावागावात जाऊन पत्रके, पथनाट्याद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे. येत्या दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता टेहेरे येथे संघर्ष यात्रेचा प्रथम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुभारंभप्रसंगी प्रा. के एन आहिरे, विश्वास देवरे, अॅड. शिशिर हिरे, अनिल निकम, अरुण पाटील, देवा पाटील, कुंदन चव्हाण, शेखर पगार, आर. डी. निकम यांनी भूमिका स्पष्ट केली. निखिल पवार यांनी आभार व्यक्त करीत टेहेरे येथील संघर्ष यात्रेस शेतकरी, व्यापारी, उद्योजक, कामगार व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या वेळी रविराज सोनार, दत्तू खैरनार, सुखदेव पाटील, विवेक वारुळे, प्रभाकर शेवाळे, यशवंत खैरनार, अनिल महाजन, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन बाजारात पन्नास कोटींची उलाढाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत शहरातील शेकडो नागरिकांनी रविवारी वाहन खरेदीचे स्वप्न साकार केले. वाहन खरेदीद्वारे शहरात तब्बल ५० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा व्यावसायिकांनी केला आहे. गृह आणि सोने खरेदीच्या ऑफर्सलाही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने बाजारपेठेला बूस्ट मिळण्यास मदत झाली आहे.

गुढीपाडव्याला नवीन वस्तूंच्या खरेदीला पसंती दिली जाते. आर्थिक गणिते जुळून आल्यानंतर वाहन खरेदीसाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्याचा निश्चय शेकडो वाहनप्रेमींनी केला होता. ऑटोगिअर शिफ्टस (एजीएस) प्रकारच्या कारच्या श्रेणीला मागणी अधिक असल्याने मुहूर्तावर मनपसंत वाहन घरी आणण्यासाठी अगदी आठ ते ११ आठवड्यांपासून वाहनांचे बुकिंग करण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कार खरेदीला २२ टक्के अधिक प्रतिसाद मिळाल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळपर्यंत खासगी वापरासाठी तसेच प्रवाशी वाहतुकीसाठीची अशी एकूण ७४२ वाहनांनी विक्री झाली. त्याद्वारे ३० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गतवर्षी नोटबंदीचा फटका वाहन खरेदीलाही बसला होता. गतवर्षी गुढीपाडव्याला ६०६ कारची विक्री झाली होती. त्याद्वारे २४ कोटी ५० लाखांची उलाढाल झाली होती. यंदा ही उलाढाल सहा ते सात कोटींनी वाढल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. विक्री झालेल्या वाहनांपैकी ३५ टक्के वाहने एजीएस प्रणालीतील असल्याची माहितीही विक्रेत्यांनी दिली.

मोटरसायकल विक्रीमध्येही यंदाच्या गुढीपाडव्याला दुपटीने वाढ झाली. रविवारी एक हजार ५४० मोटरसायकल्सची विक्री झाली. त्याद्वारे तब्बल नऊ कोटी ७५ लाख रुपयांची उलाढाल झाली. गतवर्षी केवळ ७९० मोटरसायकल्सची विक्री झाली होती. त्याद्वारे सुमारे पाच कोटींची उलाढाल झाली होती अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.

रिअल इस्टेटला बुस्ट

स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत गृह प्रकल्पांना भेट दिली. मनासारखे घर शोधतानाच बांधकाम व्यावसायिकांकडून देण्यात आलेल्या ऑफर्सचा लाभ घेण्यासही पसंती देण्यात आली. अनेकांनी नवीन घराचे बुकिंग केले तर काहींनी गृहप्रवेशाचा मुहूर्त साधला. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला बूस्ट मिळाला. शहरातील सराफी पेढ्यांमध्ये सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स देऊ केल्या होत्या. या ऑफर्सचा ग्राहकांनी लाभ घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने आठ म्हशींचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नांदूर शिवारातील औरंगाबाद रोडवरील पवन दूध डेअरीच्या लोखंडी पत्र्याच्या गोठ्यावर विजेची तार तुटली. त्याचा करंट गोठ्यात उतरला. याचा धक्का बसून गोठ्यातील आठ म्हशींचा मृत्यू झाला. त्यात गोठेधारकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

औरंगाबादरोडवर साहेबराव लोहोट यांची सिद्धीविनायक लॉन्सलगत पवन दूध डेअरी आहे. तेथे त्यांचा गाई व म्हशींचा गोठा आहे. या डेअरीच्या पत्र्याच्या शेडवरून विजेची वायर टाकण्यात आलेली आहे. ही वायर टाकीत असतानाच ती टाकण्यास लोहोट यांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विरोध केला होता. तरीदेखील ही वायर टाकण्यात आली.

रविवारी (दि. १८) सकाळी साडेआठच्या सुमारास या गोठ्यातील मजूर कैलास रहाटकर व विलास रहाटकर हे दोघे जनावरांना खाद्य टाकण्याची तयारी करीत होते. तेव्हा म्हशी एकदमच ओरडू लागल्या. त्याचवेळी पत्र्यावर वायर घासून त्याच्या ठिणग्या उडत असल्याचे दिसले. ते बघून विलासने धावत जाऊन विद्युत पुरवठा खंडित केला. गोठ्यावरील लोखंडी पत्र्याला ही वायर घासून त्यावरील प्लास्टिकचे आवरण निघून गेले. त्या वायरीतील करंट पत्र्यातून गोठ्यात उतरला. लोखंडी साखळ्यांना बांधलेल्या आणि अगदी खेटून उभ्या असलेल्या म्हशींना त्याचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला.

...म्हणून बचावल्या इतर म्हशी

या गोठ्यात सुमारे १०० म्हशी होत्या. ५० म्हशींची एक रांग अशा दोन रांगांमध्ये म्हशी लोखंडी साखळ्यांना बांधलेल्या होत्या. करंट बसलेल्या रांगेत आठ म्हशीनंतर पुढची एक म्हशीची जागा रिकामी होती. त्यामुळे पुढच्या म्हशी बचावल्या. या गोठ्यात १० मजूर काम करतात. गोठ्यात चारा देण्याचे काम सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या मजुरांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विद्युतपुरवठा खंडित केला. त्यामुळे पुढची दुर्घटना टळली. मृत्यूमुखी पडलेल्या म्हशी गाभण असल्याचे लोहोट यांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...अन् ‘हिमालयाची सावली’च झाली उपेक्षित!

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com
Tweet : bharvirkarPMT

'रायगडाला जेव्हा जाग येते', 'वेड्याचे घर उन्हात', 'जिथे गवतास भाले फुटतात', 'हिमालयाची सावली' अशा एकापेक्षा एक दर्जेदार नाटकांची श्रीमंती मराठी रंगभूमीला बहाल करणाऱ्या ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांचे ऋण नाशिककर अवघ्या १७ वर्षांच्या कालावधीतच विसरले आहेत. कानेटकरांची ९८ वी जयंती आज, २० मार्च रोजी असून त्यांच्या स्मरणार्थ एक छोटासा कार्यक्रम ठेवण्याचे दाक्षिणात्यही नाशिकमधील एकाही संस्थेने दाखवलेले नाही. ज्यांच्या लेखणीने कधी तरी 'मृत्यूही ओशाळला' होता, त्यांनाच आपले 'घर उन्हात' असल्याचा भास नाशिककरांनी दाखवला असल्याने रसिकवर्तुळात कमालीची नाराजी पसरली आहे.

ज्येष्ठ नाट्यलेखक वसंत कानेटकरांचा जन्म २० मार्च १९२० चा. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील ते रहिवासी. मराठीतील ख्यातनाम कवी गिरीश त्यांचे वडील होते. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या हंसराज प्रागजी ठाकरसी (एचपीटी) महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन करण्यासाठी कानेटकरांचे नाशिकमध्ये आगमन झाले. ते अखेरपर्यंत कुलकर्णी गार्डनजवळील 'शिवाई' बंगल्यात वास्तव्याला होते. त्यांनी महाराष्ट्राला अनेक नाटके बहाल केली. 'अखेरचा सवाल', 'अश्रूंची झाली फुले', 'एक रूप अनेक रंग', 'कधीतरी कोठेतरी', 'कस्तुरीमृग', 'गगनभेदी', 'गरुडझेप', 'गाठ आहे माझ्याशी', 'छू मंतर', 'प्रेमात सगळंच माफ', 'मला काही सांगायचंय' अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी व्यावसायिक व प्रायोगिक रंगभूमीला दिली. त्यांच्या अनेक नाटकांची पुस्तकेदेखील प्रकाशित झाली. कानेटकरांनी हिराबाई पेडणेकर यांच्या जीवनावर 'कस्तुरीमृग', बाबा आमटे यांच्या जीवनावर 'वादळ माणसाळतंय', इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या जीवनावर 'विषवृक्षाची छाया' आणि महर्षी कर्वे आणि बायो यांच्या जीवनावर 'हिमालयाची सावली' ही नाटके लिहिली. एकाच वेळी समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी लेखनकार्य केले. कुसुमाग्रज आणि कानेटकर या दोन्ही असामी नाशिकच्या आणि लेखनक्षेत्रात नावाजलेल्या, परंतु कुसुमाग्रजांनी त्यांचे अनुयायी निर्माण केले आणि कानेटकर मात्र त्यात यशस्वी ठरले नाहीत. कुसुमाग्रजांच्या प्रभावळीखाली कानेटकर झाकोळले गेल्याने त्यांना हवे ते आभाळ तेव्हाही मिळू शकले नाही. त्यामुळे केवळ १७ वर्षांतच नाशिककरांच्या स्मरणातूनही कानेटकरांनी एक्झिट घेतली. नाशिकच्या कला, सांस्कृतिक क्षेत्रातील एकाही संस्थेने त्यांच्या स्मृती जपण्याचे औदार्य दाखवलेले नसून रसिकांची याविषयी प्रचंड नाराजी आहे.

'शिवाई'चे नामोनिशाण नाही

कुलकर्णी गार्डनशेजारी कानेटकर यांचा 'शिवाई' नावाचा बंगला होता. त्यांचा बंगला म्हणजे रंगकर्मी आणि कलावंतांसाठी सांस्कृतिक केंद्र होते. मुंबईतून अनेक सांस्कृतिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती कानेटकरांच्या आश्रयाला येत आणि समृद्ध होऊन जात. कालांतराने हा बंगला पाडण्यात आला आणि त्याजागी कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारण्यात आले. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृती त्यांच्या वारसांनी जपल्या नाही. तोच न्याय कानेटकरांच्याही नशिबी आला. नाशिककरांच्या पुढाकाराने फाळके यांच्या बंगल्याखाली जशी स्मृतिस्थळाची जपणूक झाली, तशी कानेटकरांची व्हायला हवी, असेही रसिकांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपले सरकार केंद्र परवानगीची चौकशी करा

$
0
0

सीएससी सेंटरचालकांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात ८३ आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून, त्यांना कोणत्या निकषांच्या आधारे परवानगी देण्यात आली याची चौकशी करावी, अशी मागणी सीएससी सेंटरचालकांकडून करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना सोमवारी याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे, की सेतू कार्यालय होते, अशा ८३ जणांनाच आपले सेवा केंद्रांचे वाटप करण्यात आले आहे. महाऑनलाइनच्या जिल्हा व्यवस्थापकांना याबाबत विचारणा केली असता संबंधित केंद्रचालकांनी टार्गेट पूर्ण केल्याने त्यांनाच आपले सरकारचे केंद्र देण्यात आल्याचे सांगितले जाते. याप्रश्‍नी सीएससीचे जिल्हा व्यवस्थापक महेश देशमुख यांच्याकडे संबंधितांनी विचारणा केली. परंतु, ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. आपले सरकार केंद्रासाठी अर्ज केला असता, हेल्थ होमिओचे प्रत्येकी ९९९ रुपयांचे पाच सदस्य करण्यास सांगितले जाते. प्रत्येकी ११०० रुपयांचे पाच एम्बाईब सर्व्हीस रजिस्टर, पाचशे रुपयांचे पाच सीएससी बचत खाते तसेच डीजीमित्र सोसायटीची सदस्य होण्याची अट घातली जात आहे. टार्गेट पूर्ण करतानाच तुमचे व्यवहार वाढवा असा दबावही आणला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे यासर्व प्रकाराच्या चौकशीची मागणी शमसाद पठाण, अनिल गोसावी, दीपक गोसावी, नीलेश शिरोडे, राम लांबे, भूषण वाघ, प्रशांत कमळेकर आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोईंगच्या वादातून पोलिसास मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुचाकी उचलून नेवून कारवाई केली, या कारणातून संतप्त झालेल्या बँक मॅनेजरने पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. ही घटना जुन्या पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखा कार्यालयाच्या गेटवरच घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये संबंधित व्यक्तिविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामेश्वरराव तालुरी (रा. इंदिरानगर) असे संशयित बँक मॅनेजरचे नाव आहे. रविवारी दुपारच्या सुमारास हा घटनाक्रम सुरू झाला. तालुरी यांची स्कूटी नो पार्किंगमध्ये पार्क केलेली असल्याने वाहतूक शाखेकडील टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी ही दुचाकी टोईंग करून जुन्या पोलिस आयुक्तालयात आणली होती. दुचाकी उचलून नेल्याची माहिती मिळाल्यानंतर संतापलेल्या तालुरी यांनी वाहतूक शाखेचे कार्यालय गाठून स्कूटी आपल्या ताब्यात घेतली. टोईंग करून आणलेली वाहने दंडाची रक्कम भरल्यानंतरच बाहेर पडावीत यासाठी प्रवेशद्वारावर देखरेख ठेवण्यासाठी पोलिस कर्मचारी तैनात असतात. रविवारी ही जबाबदारी पोलिस कर्मचारी कडुबा मधुकर पाटील यांच्याकडे होती. गेटवर आलेल्या तालुरी यांना बाहेर पडण्यापूर्वीच पाटील यांनी दंडाच्या पावतीची मागणी केली. यातूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला. संतापलेल्या तालुरी यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवीगाळ करीत थेट पाटील यांच्या श्रीमुखात भडकावली. एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल केला तर मी बघून घेईन, अशी दमदाटीही केली. हा प्रकार पाटील यांनी वरिष्ठाच्या कानी घालून सरकारवाडा पोलिस स्टेशन गाठले. पाटील यांच्या तक्रारीनुसार पोलिस स्टेशनमध्ये गुह्याची नोंद करण्यात आली असून, संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

अशोकनगरला घरफोडी

मुलाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंब बाहेर गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकड आणि दागिने असा सुमारे ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सातपूर एमआयडीसीतील अशोकनगर भागात घडली असून, या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान भिमराव निकम (रा. संभाजीनगर, अशोकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निकम कुटुंबीय मुलाच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रात्री बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद रो-हाऊसचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ३० हजारांची रोकड आणि सोन्याचे कानातले असा सुमारे ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी दुपारी कुटुंबीय घरी परतल्यानंतर उघडकीस आली. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

लेखानगरला तरुणाची आत्महत्या

लेखानगर परिसरातील इंदिरा गांधी वसाहतीत २७ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला. या युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किसन अर्जुन धुतालमल (वय २७, रा. इंदिरागांधी वसाहत क्र.१) असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी अज्ञात कारणातून घरात कुणी राहुलने गळफास लावून घेतला होता. घटनेचा अधिक तपास हवालदार खांडेकर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्यूशय्येवर छेडले ‘त्यांनी’ अखेरचे सूर!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

या विश्वात जन्माला येणाऱ्या प्रत्येकालाच मृत्यू अटळ आहे. मृत्यूला सामोरे जाण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन मात्र वेगवेगळा असतो. काहींचा सकारात्मक तर काहींचा नकारात्मक असतो. जेलरोड येथील ह. भ. प. गेणू रुंजा अनवट यांचे परलोकी जाणेही मनाला चटका लावणारे आणि इतरांसाठी आदर्श असाच ठरला.

जेलरोड येथील अनवट बाबा (७६) हे वीज मंडळात ३० वर्षे सेवा करून निवृत्त झाले. संगीत हे ईश्वर आणि आत्मा यांच्याशी संवाद साधण्याचे माध्यम आहे, असे ते म्हणत. त्यांचे जीवनच संगीतमय झाले होते. त्यामुळे ते कधीच आजारी पडले नाहीत. लहानपणापासूनच संवादिनीची (हार्मोनियमची) प्रचंड आवड होती. कोणतेही प्रशिक्षण न घेता ते वारकऱ्यांमध्ये राहून उत्कृष्ट पेटी वाजवायला शिकले. नोकरी व संसाराचा गाडा ओढतानाही त्यांनी संगीताचा छंद जोपासला. नाशिकरोड परिसरात कोणताही सप्ताह असो, ते आवर्जून सेवा देत असत. त्यामुळेच भजनी मंडळात ते 'पेटी मास्तर' नावाने ओळखले जात असे. त्यांना समाजकार्याचीही मोठी आवड होती. गोरगरीबांची सेवा, अडल्या-नडलेल्यांची मदत हे त्यांनी जीवनकार्य मानले होते.

काही दिवसांपूर्वी त्यांना किडनीविकार झाला. मृत्यूची चाहूल लागूनही ते निर्विकार होते. असहाय्य वेदना होत असतानाही कुटुंबियांना त्यांनी त्या जाणवू दिल्या नाहीत. अखेर प्रकृती खालावल्यामुळे आठवडाभरापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कृत्रिमरित्या जेवण व श्वास द्यावा लागत असल्याने नाका तोंडाला आर्टिफिड व ऑक्सिजनचा पाइप लावला होता. ग्लानी येत असतानाही अनवट बाबांनी मुलांकडे पेटी वाजविण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टरांनी प्रकृती तपासून परवानगी दिल्यानंतर मुलगा संतोष व सचिनने रुग्णालयात पेटी आणली. हाताला सलाईनच्या सुया टोचू लागल्याने अनवट बाबांना पेटीचा भाता चालवणे जड जाऊ लागले. त्याही परिस्थितीत त्यांनी हरिभजन म्हटले. नंतर वेदना होऊ लागल्याने त्यांनी नात दीपिका व विद्या लोखंडे यांना भाता चालवायला सांगितले व भजन म्हटले. नंतर श्वास घेणे अवघड जाऊ लागल्याने दीपिकाने अभंग गायले. थोड्याच वेळात अनवटबाबा कोमात गेले व त्यांनी देहत्याग केला.

डॉक्टरांनाही अश्रू अनावर

अंत्यसंस्कारावेळीही त्यांच्या संगीतमय जीवनाचीच चर्चा होती. मृत्यूपूर्वी त्यांचा आत्मसंयम, सकारात्मक दृष्टोकोन पाहून त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. राकेश पाटील, डॉ. स्वप्निल साकला, डॉ. सचिन पाटील, डॉ. किरण कुमावत, डॉ. अशोक निरगुडे, डॉ. मोहन पटेल यांनादेखील अश्रू अनावर झाले. अनवट यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथपालांचे आज धरणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पदवीधर ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीबाबत विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील कार्यबल गटाने दिलेल्या निर्णयानुसार लेखाधिकारी यांनी ग्रंथपालांच्या कालबद्ध वेतन श्रेणीची वेतन निश्चिती केली आहे. या वेतनश्रेणीनुसार वेतन पथक कार्यालयाने वेतन सुरू करणे अपेक्षित असताना त्यांनी कार्यबल गटाने निश्चित केलेली कालबद्ध वेतनश्रेणी अमान्य केली आहे. वेतन पथकाच्या या अन्यायकारी कामकाजाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सलग्न ग्रंथालय शिक्षक विभागातर्फे आज मंगळवारी (दि. २०) दुपारी ३ वाजता वेतन पथक कार्यालयाचा निषेध म्हणून जिल्ह्यातील ग्रंथपाल धरणे आंदोलन करणार आहेत.

पदवीधर ग्रंथपालांच्या वेतनश्रेणीबाबत कार्यबल गटाने निर्णय दिला आहे. यानुसार ग्रंथपालांचे वेतन ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याबाबत विभागीय शिक्षणउपसंचालकांनी शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षक यांना आदेश दिलेले आहेत. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून वेतन सुरू न करण्याबाबतचा निर्णय वेतन पथक अधीक्षकांनी कायम ठेवल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संलग्न ग्रंथालय शिक्षक विभागाने केला आहे.

सहाव्या वेतनआयोगाच्या वेतनश्रेणीसाठी ग्रंथपालांची उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. ही याचिका न्यायालयाने मान्य केलेली आहे. या वेतनश्रेणीनुसार काही ग्रंथपालांना वेतन प्राप्त झालेले आहे. याशिवाय सेवानिवृत्ती वेतनही याच वेतनश्रेणीनुसार मिळत आहे. यात नाशिक विभागही अपवाद नाही. कार्यबल गटाने शासनाच्या परिपत्रकातील तरतुदींनुसार ग्रंथपालांना कालबद्ध वेतन श्रेणी लागू असल्याचा निर्णय दिलेला असून, याच वेतनश्रेणीनुसार लेखाधिकारी यांनी वेतन निश्चिती केली आहे. या वेतनश्रेणीनुसार वेतन सरू करण्यासाठी वेतन पथक कार्यालयाने ग्रंथपालांकडून रुपये १०० चे प्रतिज्ञापत्र करून घेतलेले आहे. तरीही वेतन पथक कार्यालयाचे अधीक्षकांनी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांचा अवमान करून त्यास केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप ग्रंथालय शिक्षक विभागाने केला आहे.

संचालकांचा प्रतिसाद नाही

यासंदर्भात यापूर्वीच पुणे संचालक कार्यालयाकडे वेतन पथक व शिक्षणाधिकारी कार्यालय यांनी मार्गदर्शन मागवले असता त्यास वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. ग्रंथपालांनी आवश्यक ते पुरावे वेतन पथक अधीक्षक यांना दिलेले असून, वेतन सुरू करण्याबाबत विनंतीही केलेली आहे. परंतु, त्यास त्यांचा प्रतिसाद नाही. या आंदोलनास ग्रंथालय शिक्षक परिषदेचे अध्यक्ष व याचिकाकर्ता ग्रंथपाल विलास सोनार, गंगाधर कोरडे, दिलीप घोगरे, प्रवीण गोऱ्हे, संजय पगारे शिक्षक परिषदेचे विभाग कार्यवाह दिलीप अहिरे, जिल्हाध्यक्ष दत्ता वाघे पाटील, संजय पवार, विनोद हिरे, संजय पाटील, प्रांत सदस्य गुलाब भामरे आदी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनास इतर शिक्षक संघटनांनीही पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रंथपालांनी या आंदोलनास उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथालय शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

'ग्रंथपालांना सहाव्या वेतन आयोगानुसार कालबद्ध वेतनश्रेणी विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील कार्यबल गटाने मंजूर केली आहे. लेखाधिकाऱ्यांनीही वेतननिश्चिती केलेली आहे. असे असतानाही वेतन पथक कार्यालयाच्या अधीक्षकांनी ग्रंथपालांना कालबद्ध वेतनश्रेणीनुसार वेतन देण्याचे प्रस्ताव फेटाळले आहेत. या मनमानी कारभाराविरोधात जिल्ह्यातील ग्रंथपाल धरणे आंदोलन करणार आहेत.

- विलास सोनार, अध्यक्ष, ग्रंथालय शिक्षक परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images