Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकला होणार आणखी एक उद्योगनगरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिकमध्ये अंबड व सातपूर येथे औद्योगिक वसाहतीला जागा शिल्लक नसल्यामुळे एमआयडीसीने मुंबई-आग्रा महामार्गावर विल्होळीजवळील राजूर बहुला येथे १४४ हेक्टर जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती एमआयडीसीचे जॉइंट सीईओ अभिषेक कृष्णा यांनी दिली.

नाशिकमध्ये अनेक मोठ्या उद्योजकांना गुंतवणूक करण्याची इच्छा असली तरी जागा शिल्लक नसल्यामुळे त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे एमआयडीसीने हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकलगत जागा घ्यावी व येथे भूखंड पाडावे अशी मागणी उद्योजकांनी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये एमआयडीसीमध्ये सातपूर औद्योगिक क्षेत्र ६२५.७३ हेक्टरमध्ये वसले असून, त्यात १२२२ भूखंड आहे. त्याचप्रमाणे अंबड येथील औद्योगिक वसाहत ५१५.५० हेक्टरमध्ये वसली असून, त्यात १६१६ भूखंड आहेत. पण, यातील एकही भूखंड नव्या उद्योगासाठी शिल्लक नाही.
जागा नसल्यामुळे गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये एकही मोठा उद्योग आला नाही. त्यामुळे मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करावी यासाठी ‘मेक इन नाशिक’सह विविध उपक्रम औद्योगिक संघटनेने केले. त्यानंतर अनेक उद्योगांनी गुंतवणूक करण्याची तयारीसुद्धा दाखवली. एमआयडीसीने जिल्ह्यातील इतर ठिकाणी जागा दाखवली. मात्र, त्या जागांवर उद्योग येण्यास उत्सुक नसल्यामुळे आता एमआयडीसीने ही नवीन जागा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पांजरापोळ जागेची मागणी
एमआयडीने पांजरापोळची जागा घ्यावी अशी मागणी उद्योजकांच्या संघटनेने केली. त्यावरही एमआयडीसीने विचार सुरू केला आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिकलगत मोठी जागा उपलब्ध होणार आहे.

तिसरी औद्योगिक वसाहत
शहरात सातपूर आणि अंबड अशा दोन औद्योगिक वसाहती आहेत. आता राजूर बहुला येथे नवी वसाहत निर्माण होणार असल्यामुळे ती तिसरी वसाहत ठरेल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्यासह रोजगार निर्मितीही होणार आहे. परिणामी ही बाब नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विकासाला पूरक ठरणार आहे. उद्योजकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रकची रुग्णवाहिकेला धडक; तीन ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार-दोंडाईचा रोडवरील धावडे गावाच्या शिवारातील एका हॉटेलसमोर ट्रकने १०८ रुग्णवाहिकेला धडक दिली. शनिवारी (दि. २४) झालेल्या या अपघातात तीन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे़ याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे़

नंदुरबार येथील १०८ रुग्णवाहिका (एमएच-१४, सीएल-१२३०) ही धुळे येथे दुरुस्तीसाठी आली होती़ रुग्णवाहिकेची दुरुस्ती झाल्यानंतर शनिवारी (दि. २४) धुळ्याकडून नंदुरबारकडे जात असताना दोंडाईचा-नंदुरबार रोडवरील धावडे गावाच्या शिवारातील हॉटेल श्यामसमोर सोयाबीन भरून येणारा मालट्रक (एमएच-१८, एए-५०६०) चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवत आणून रुग्णवाहिकेला समोरून धडक दिली़ या अपघातात भिकन बापू पवार (२३) रा़ तामसवाडी, ता़ पारोळा, जि. जळगाव, अल्लारखाँ अजीजभाई मखराणी (रा़ अक्कलकुवा, जि. नंदुरबार), अनिल पंडित गुरव (रा़ तळोदा) हे तिघे जागीच ठार झाले तर ट्रक चालक जखमी झाला़ त्याच्यावर दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ याप्रकरणी नंदुरबारचे जिल्हा व्यवस्थापक डॉ़ मनोजकुमार साहेबराव महाजन यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली़ पंचनामा करून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभाजकास मुहूर्त कधी?

$
0
0

दुभाजकास मुहूर्त कधी?

अशोकनगर रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील सातपूर भागातील अशोकनगर रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. त्यातच या रस्त्यावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत येथे दुभाजकांना मुहूर्त कधी मिळणार, असा प्रश्न वाहनचालकांसह रहिवाशांनी केला आहे.

अशोकनगर रस्त्यावर दोन दिवसांपूर्वीच रात्रीच्या वेळी दुचाकी चालकाला आयशरने जोरदार धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. घरातील एकुलता एक मुलगा अपघातात गेल्याने विश्वासनगर भागात शोककळा पसरली होती. यानंतर सभापती माधूरी बोलकर यांनी तत्काळ महिंद्रा कंपनीला पत्र देत मटेरिअल गेटमधून निघणाऱ्या वाहनांना योग्य दिशा देण्यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याची मागणी केली. तसेच रात्रीच्या वेळी वाहनांना किमान रिफ्लेक्टर लावण्याची सक्ती करावी व गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत, अशीही मागणी सभापती बोलकर यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे केली.

आरक्षित 'डीपी'रोड धूळ खात

त्र्यंबकरोडच्या वळणावरील समृद्धनगर ते श्रमिकनगरच्या शेवटच्या बस थांब्यापर्यंत अशोकनगररोडवर रोजच हजारो वाहनांची वर्दळ असते. महिंद्रा कंपनीचे मटेरिअल गेट अशोकनगरच्या मुख्य रस्त्यावर असल्याने कच्चा माल घेऊन येणारी वाहनांची संख्या हजारोंच्या घरात आहे. यामुळे रहिवाशी भागातून रोजच दुचाकी अथवा चारचाकी घेऊन जाणाऱ्या कामगारांना अडथळांचा सामना करावा लागतो. त्यातच महापालिकेने आरक्षित केलेला डीपीरोड महापालिकेच्या स्थापनेपासून धूळ खात पडून आहे. त्यातच अपघातांचे सत्र सुरूच असल्याने कट लागण्यावरून हाणामारीचे प्रकारदेखील होत असतात.

महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे

दोन दिवसांपूर्वीच्या अपघतानंतर या रस्त्यावर दूभाजक असणे आवश्यक झाले असून, त्याबाबत तातडीने विचार व्हायला हवा. याबाबत महापालिका सभागृहनेते दिनकर पाटील यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे रस्ता रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु, अद्यापही निधी उपलब्ध झाला नसल्याने दुभाजकांअभावी अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. याकडे महापालिकेच्या प्रशासनाने वेळीच लक्ष देत दुभाजक व गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरीत पडल्याने गिर्यारोहकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ट्रेकिंग करताना पाय घसरून दरीत पडलेल्या मुंबई येथील २७ वर्षांच्या गिर्यारोहकचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हेपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आमळीपर्वतावर घडली.

हेमेंद्र सुरेश अधरराव (वय २७, रा. श्रीकृष्णनगर, बोरीवली, मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या गिर्यारोहकचे नाव आहे. मुलुंड येथील चक्रम हायकर्स ही संस्था ट्रेकिंगचे कार्यक्रम आयोजित करते. या संस्थेत टीम लिडर म्हणून हेमेंद्र काम करीत होते. या संस्थेने २३ ते २५ मार्च या दरम्यान गडगड सांगवी येथील किल्ल्यावर ट्रेकिंग करण्याचा बेत आखला होता. यासाठी १७ जणांनी सहभाग नोंदवला होता. यासाठी तीन ग्रुप्स तयार करण्यात आले होते. त्यातील एका ग्रुपचे लिडर म्हणून हेमेंद्रकडे जबाबदारी होती. ट्रेकिंगसाठी सर्व फौजफाट्यासह २२ मार्च रोजी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दहेगाव येथे मुक्कामी थांबले होते. शनिवारी सकाळी ट्रेकिंग सुरू झाले. रस्त्यातील देवी मंदिरात सर्वांनी विश्रांती घेतली. डोंगर चढणाऱ्या ट्रेकर्ससाठी एक ठिकाण धोकादायक असून, तिथे अनुभवी गिर्यारोहक सर्वात पुढे जाऊन दोरी बांधून खाली टाकतात. त्या दोरीच्या मदतीने इतर गिर्यारोहक रस्ता पार करतात. हेमेंद्र ग्रुप लिडर असल्याने या ठिकाणी ते आपले काम सुरू करीत असताना एका ठिसूळ खडकावर त्यांचा पाय पडला. तोल गेल्याने तसेच सुरक्षात्मक इतर साधनांची मदत नसल्याने हेमेंद्र जवळपास २५० फूट खोल खाली दरीत कोसळले. दुर्दैवाने डोक्यास दुखापत झाल्याने हेमेंद्रचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच नाशिक येथील वैनतेय ग्रुप तसेच भोसला ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य तातडीने घटनास्थळी रवना झाले. ही माहिती दहेगावच्या गावकऱ्यांना समजताच त्यांनीही मदत केली. हेमेंद्र यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आता स्वच्छता सैनिक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील ओला व सुका घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारने दिलेला एप्रिलचा अल्टिमेटम पूर्ण करण्यासाठी महापालिकेने धावाधाव सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या घरातच ओला व सुका कचरा विलगीकरणासंदर्भात महापालिकेने राबविलेल्या मोहिमेला फारसे यश आले नसल्याने आयुक्तांनी याकामी आता थेट सरकारी व खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा फंडा शोधला आहे. कचरा विलगीकरणाची प्रक्रिया विद्यार्थ्यांमार्फतच कुटुंबातच बिंबवण्यासाठी शाळांमध्ये क्लिनलीनेस सोल्जरची (स्वच्छता सैनिक) निर्मिती केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना कुटुंबातील स्वच्छता व कचरा विलगीकरणासंदर्भातील प्रोजेक्ट दिले जाणार असल्याने घनकचरा व्यवस्थापनाला मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

राज्य सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले असून, केंद्राच्या धर्तीवर सुरू असलेल्या या अभियानांतर्गत ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण बंधनकारक केले आहे. त्यासाठी राज्य सरकारने एप्रिलची डेडलाइन दिली असून, शहरात ८० टक्के कचऱ्याचे विलगीकरण झाले नाही, तर अनुदान बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेने कचरा विलगीकरणाची मोहीम तीव्र केली असून, गेल्या दोन महिन्यांपासून आरोग्य विभागाकडून शहरात कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती केली जात आहे. शहरात सध्यस्थितीत केवळ २० टक्केच कचऱ्याचे विलगीकरण केले जात असून, आणखी ६० टक्के कचरा विलगीकरणाचे आव्हान आहे. महापालिकेने शहरातील कचरा विलगीकरणासाठी ३१ मार्चची डेडलाइन निश्चित केली होती. परंतु, जनजागृती होऊनही ही डेडलाइन पाळली जाण्याची शक्यता कमी आहे. कचरा विलगीकरणासाठी आयुक्तांनी घंटागाडी ठेकेदारांवरच जबाबदारी टाकली होती. परंतु, त्यातही फारसे यश येत नसल्याचे चित्र आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी ३१ मार्चनंतर ओला व सुका कचरा स्वतंत्र न आणल्यास कचरा न उचलण्याचा इशारा दिला आहे. तसेच, दंडात्मक कारवाईचेही फर्मान काढले आहे.

सक्ती करून घनकचरा व्यवस्थापनाची यशस्वी अंमलबजावणी होणार नसल्याने आयुक्तांनी आता शाळा व कॉलेजेसची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील खासगी व सरकारी शाळांमध्ये क्लिनलीनेस सोल्जर ही संकल्पना राबवली जाणार असून, विद्यार्थ्यांमार्फत घरांमध्ये ओला व सुका कचरा स्वतंत्र गोळा करण्याचे धडे दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये स्वच्छता व कचरा विलगीकरणासंदर्भात प्रोजेक्ट दिले जाणार असून, हा प्रोजेक्ट त्यांना आपल्या घरातूनच तयार करायचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळांमध्ये मार्कही दिले जाणार आहेत. लहान मुलांनीच आईवडिलांना कचरा विलगीकरणासंदर्भात प्रवृत्त केले तर, त्याचा प्रभाव चांगला होणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी बजेटमध्येच ही संकल्पना मांडली असून, ती येत्या शैक्षणिक वर्षापासून राबवली जाणार आहे. त्यामुळे घनकचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या रितीने होईल असा दावा केला आहे.

शाळांनाही सक्ती

शहरातील सर्वच शाळांना क्लिनलीनेस सोल्जर ही संकल्पना राबविण्याची सक्ती केली जाणार आहे. महापालिकेच्या शाळांपासून या प्रोजेक्टची सुरुवात केली जाणार असून, शहरातील खासगी व अन्य सरकारी शाळांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे. त्यासाठी शाळेतल्या शिक्षकांवर विशेष जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्यांच्याकडून प्लास्टिकमुक्तीचेही धडे दिले जाणार असल्याने शहरात स्वच्छतेची मोहीम जोमाने सुरू होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर नागरीच्या घोटाळ्याचा सूत्रधार अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य सूत्रधार सुरज प्रकाश शहा (वय ४७, रा. शेटे गल्ली, सिन्नर ) यास गुजरातमधून अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून शहा दिव दमण आणि गुजरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दडून बसला होता.

पतसंस्थेच्या २०१४ ते २०१६ लेखापरीक्षण अहवालात संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक तसेच इतर कार्यकारणी यांनी संगनमत करून संस्थेतील विनातारण कर्ज प्रकरणे, संस्थेचा कर्ज बोजा नोंद न केलेल्या मिळकती, कर्ज असताना देखील देण्यात आलेले निल दाखले, संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर केलेले कर्जवाटप, तसेच खोटे दस्तावेज तयार करून संस्थेची व ठेवीदारांची ४३ कोटी ४८ लाख ४१ हजार ८२२ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले होते. सनदी लेखापाल अजय राठी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिन्नर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीसह एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली असल्याने हा गुन्हा ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या पथकाने संचालक मंडळ, मॅनेजर व इतर काही असे मिळून १३ जणांना अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार शहा मात्र फरार होता. गुन्हा उघडकीस आल्यापासून म्हणजे तब्बल सात महिन्यांपासून शहा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सूचना केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी शहाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली होती. त्यानुसार अधीक्षक दराडे यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांनी तपास सुरू केला. याच आधारावर एक पथक गुजरात राज्यात रवाना करण्यात आले. २३ मार्च रोजी गुजरातमधील गिरसोमनाथ जिल्ह्यात अंजार, ता. ऊणा येथे दडून बसलेल्या शहाला अटक करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक आशिष आडसुळ, पोलिस नाईक प्रीतम लोखंडे, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र टर्ले, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, खांडेकर यांच्या पथकाने केली.

२५० लॉजेसची तपासणी

संशयित आरोपी शहाच्या शोधासाठी हे पथक आठ दिवसांपूर्वी गुजरातमध्ये पोहचले होते. गुजरातमधील विविध शहरे तसेच धार्मिक स्थळांवरील तब्बल २५० लॉजेस व धर्मशाळा तपासण्यात आल्या. गुजरात, राजस्थान तसेच दिव दमन असा सतत जागा बदलणारा सुरज शहा गुजरात व दिव दमण यांच्या सीमावर्ती भागात एका जैन धर्मशाळेत असताना पोलिसांच्या हाती लागला. पुढील तपासाकामी शहाला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्चस्ववादाने विकासकामांना ब्रेक

$
0
0

नाशिकरोड विभागात सर्वात जास्त निधी मिळूनही कामे नाही

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जास्तीत जास्त विकासकामे खेचून आणण्याचा प्रयत्न करणारे नगरसेवक, निवडणुकीनंतर वर्चस्ववादाची सुरू झालेली लढाई, पालिकेतील राजकारणाचा बळी पडल्याने विकासकामांना लागलेला ब्रेक, एकमेकांना पाण्यात बघण्याची लागलेली शर्यत अशी ओळख सध्या क्रमांक २० ची झालेली आहे.

नाशिकरोड विभागातील सर्व प्रभागांत सर्वात जास्त निधीची विकासकामे याच प्रभागात मंजूर झालेली आहेत. मात्र त्यातही काही कामांना ब्रेक लागल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातील नागरिकांनी भाजपला शंभर टक्के साथ दिली असली तरी या प्रभागातील भाजपच्याच काही नगरसेवकांना विरोधी पक्ष नेत्यांपुढे आपली गाऱ्हाणी मांडावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रभाग क्र.२० चा विस्तार पूर्णपणे शहरीभागात असून, या प्रभागात संभाजी मोरुस्कर आणि संगीता गायकवाड या दोन नगरसेवकांचा मोठा प्रभाव आहे. सीमा ताजणे यांची दुसरी टर्म असूनही त्यांचे अद्यापही चाचपडत प्रयत्न सुरू आहेत. तर अंबादास पगारे यांची नगरसेवकपदाची पहिलीच टर्म असल्याने त्यांचा गृहपाठ सुरू आहे. गेल्या वर्षभरात प्रभागात विकासकामे सुरू करण्यात अंबादास पगारे आणि सीमा ताजणे यांना भोपळाही फोडता आला नाही. तर संगीता गायकवाड यांचे प्रगतीपुस्तकावरही समाधानकारक गुण नोंदवलेले नाही. विकासकामांना ब्रेक लागल्याने त्यांनी सामाजिक उपक्रमांतून दांडगा लोकसंपर्क प्रस्थापित केला आहे. संभाजी मोरुस्कर यांनी मात्र काहीशी आघाडी घेतलेली असून, सर्वांत जास्त निधीची विकासकामांचे टेंडर झालेले आहे.

प्रभागात समाविष्ट भाग

जिमखाना वसाहत, आशानगर, विजयनगर, रामनगर, मोटवानी रोड, शांती पार्क, साने गुरुजी नगर, चंद्रमणी नगर, अजंठानगर, शिखरेवाडी, नेहरूनगर वसाहत, आयशर इस्टेट, बिटको कॉलेज परिसर, दत्तमंदिर असा मोठा विस्तार या प्रभागाचा आहे. या प्रभागात मध्यमवर्गीयांचा भरणा अधिक आहे. संजय गांधी नगर, महात्मा फुले नगर आणि जेतवननगर हा स्लम भागही यात समाविष्ट आहे.

लोकसंख्या : ४४,७६५

वर्षभरात झालेली कामे

प्रभाग २० 'ड' मध्ये शिखरेवाडी बॅडमिंटन हॉल शेजारी पाथवे व स्वच्छतागृह, रोझा कॉलनीसमोरील रस्ता काँक्रिटीकरण, झवेरी कॉलनीतील खुल्या जागेस कंपाऊंड, शिखरेवाडी बॅडमिंटन हॉलचे पत्रे बदलणे व विद्युतीकरण, फुलेनगर व संजय गांधी झोपडपट्टी येथे शौचालय, साने गुरुजी नगर व विद्यानगरी उद्यानात प्रकाशव्यवस्था, साने गुरुजी नगरातील खुल्या जागेवर स्टेज व पाथवे, सोमाणी गार्डनमध्ये गझिबो, 'अ' आणि 'ब' गटात एकही काम झालेले नाही. तर 'क' गटात प्रकाश नगर गार्डन दुरुस्ती, आयशर इस्टेट गार्डन दुरुस्ती ही कामे झालेली आहेत. तर शिखरेवाडी मैदान विकास, प्रकाश नगर जलवाहिनी, त्र्यंबक नगर गार्डन दुरुस्ती ही कामे सुरू आहेत.

मंजूर कामे

अ गट : प्रकाशनगर रस्ता दुरुस्ती व गंधर्वनगरी भुयारी गटार दुरुस्ती, ब गट : श्री कलानगर ओपन स्पेसमध्ये गार्डन विकसित करणे, ग्रीन जिम, टेनिस कोर्ट आणि बास्केटबॉल कोर्ट, क गट : तुळसा पार्क,पंजाब कॉलनी व स्नेहबंधन कॉलन रस्ता डांबरीकरण, ऑक्टोगोनस पोल दत्तमंदिर ते गुरुद्वारा रोड, लोणकर मळा उद्यान, ड गट : सहाणे मळा महिला स्वास्थ केंद्र, विद्याविहार कॉलनी महिला व्यायामशाळा, मनोहर गार्डन महिला अभ्यासिका, स्वयंसिद्धी महिला केंद्र विस्तारीकरण, देवळाली मनपा अभ्यासिका सोलर सिस्टिम, देवळाली महिला स्वास्थ केंद्र, जयभवानी रोड निसर्गोपचार केंद्र जॉगिंग ट्रॅक व कंपाऊंड वॉल, जेलरोड मनपा शाळा १११, ११३, व क्र ७ इमारत दुरुस्ती व रंगकाम, जेतवननगर शाळा क्र. ११० इमारत दुरुस्ती, केला शाळेलगत भाजी मार्केट ओटे, शिखरेवाडी कारंजा सुशोभीकरण, साने गुरुजी नगर ग्रीन जिम, शिखरेवाडी ग्रीन जिम, महिला स्वास्थ केंद्र दुरुस्ती, समाजमंदिर विद्युतीकरण, बेला डिसुझा रोड जलकुंभ, जिजामाता नगर ड्रेनेज लाईन, मालाणी भवन ड्रेनेज लाईन, पाटोळे मळा आरसीसी पाईप गटार, जेलरोड रस्ता दुभाजक सुशोभीकरण, झवेरी कॉलनी उद्यान ही कोट्यवधी रुपये खर्चाची कामे मंजूर असून, या प्रभागात प्रस्तावित कामांचीही संख्या मोठी आहे.

लोकप्रतिनिधी म्हणतात...

गेल्या वर्षभरात प्रभागाच्या गरजेनुसार विविध विकासकामे मंजूर करून घेतलेली आहेत. मात्र नगरसेवक निधी खर्च झालेला नाही. अजून मोठा कालावधी बाकी असल्याने लवकरच मंजूर कामे प्रत्यक्षात सुरू होतील.

-अंबादास पगारे, नगरसेवक

विविध विकासकामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. अद्याप एकही विकासकाम झालेले नाही. नगरसेवक निधीही अखर्चित आहे.

-सीमा ताजणे, नगरसेविका

काही विकासकामांना मंजुरी मिळालेली आहे.परंतु सध्या कामे थांबलेली आहेत.दोनच विकासकामे पुर्ण झालेली आहेत.काही विकासकामांचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे.

-संगीता गायकवाड, नगरसेविका

स्वच्छता, पाणीपुरवठा, ड्रेनेज, पेस्ट कंट्रोल या मुलभूत सुविधाविषयक कामे मार्गी लावली. आयुक्तांनी नव्याने केलेले बजेट नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारे असून, त्यात नद्यांचे शुद्धीकरण, सांडपाणी व्यवस्था, शहर बससेवा, एलईडी, खेड्यांचा विकास या योजनांना प्राधान्य दिले गेले आहे. त्यामुळे मंजूर कामे थोडी उशिरा पूर्ण होतील.

-संभाजी मोरुस्कर, नगरसेवक

नागरिक म्हणतात...

स्थानिक नगरसेवक प्रभागातील नागरिकांशी संपर्क ठेवून असतात. समस्या थेट मांडण्याचा विश्वास निर्माण झाला असून, सुरुवातीला सुरू केलेली कामे मात्र आता थांबली आहेत.

-आचल राजे, नागरिक

सध्याचे नगरसेवक दिलेल्या शब्दाप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्ट्रीट लाईट या मुख्य समस्या होत्या. परंतु, या समस्या तातडीने सोडविण्यात आल्या आहेत.

-शशिकांत अमृतकर, नागरिक

नगरसेवकांचा सामान्य नागरिकांची संपर्क आहे, मात्र विकासकामे झालेली नाहीत. यामध्ये पथदीप आणि रस्त्यांची समस्या मात्र कायम आहे. बहुतेक रस्ते खराब झालेले आहेत. वाळलेल्या झाडांकडेही दुर्लक्ष झाले आहे.

-सारिका सागर, नागरिक

प्रभागात विशेष विकासकामे झालेली नाहीत. पथदीपांची समस्या कायम आहे. काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीचीही आवश्यकता आहे. किरकोळ तक्रारींची दखल नगरसेवकांकडून घेतली जाते मात्र, पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.

-राकेश कुमावत, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर रस्ते ठरताहेत अपघातांचे केंद्र

$
0
0

अवजड वाहनांच्या वाहतुकीचा अडथळा

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई महामार्गावर उड्डाणपूल उभारल्यानंतर शहरातील सर्वच वाहनांना लगतच्या समांतर रस्त्याचा वापर करावा लागत आहे. हे सर्व समांतर रस्ते हे दुतर्फा करण्यात आले असले तरी हे रस्ते अपघाताला निमंत्रकच ठरत आहेत. या रस्त्यांवर कोठेही दुतर्फा असल्याचे फलक नसून, या रस्त्यांलगत वाढलेले अतिक्रमण याचे मुख्य कारण असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला. हा पूल उभारल्यामुळे लहान वाहनांबरोबरच अनेक मोठे व अवजड वाहनेसुद्धा सध्या समांतर रस्त्यावरून जात असतात. समांतर रस्ते दुतर्फा असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. शहरातील वाहनचालकांना हे समांतर रस्ते दुतर्फा असल्याचे माहित असले तरी बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनचालकांना याची कल्पना नसते. त्यामुळे वारंवार अपघात होत असतात. तसेच समांतर रस्ता आणि उड्डाणपूल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खुली जागा सोडण्यात आल्याने हे समांतर रस्ते अरुंद झाले आहेत.

अतिक्रमण हटविणे क्रमप्राप्त

मुख्यतः गोविंदनगर, भुजबळ फार्म चौफुली, कमोदनगर, लेखानगर याठिकाणी तर वारंवार अपघात होत असतात. समांतर रस्त्यांची रुंदी कमी असल्यानेच बऱ्याच ठिकाणी एकावेळी दोन गाड्या ये-जा करूच शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचबरेाबर समांतर रस्त्यालगत असलेल्या विविध व्यावसायिक व हॉटेल्सचे पार्किंगसुद्धा रस्त्यालगत असल्याने आधीच अरूंद रस्ते वाहतुकीस अजून छोटे होतात. त्यामुळे या समांतर रस्त्यालगत असलेले अतिक्रमणही हटविणे क्रमप्राप्त आहे. आजपर्यंत अनेक लहान मोठे अपघात या समांतर रस्त्यांवर झाले असून अनेकांनी यात आपले प्राणसुद्धा गमविले असल्याचे समोर आले आहे.

रस्त्यांबाबत फलक लावावेत

उड्डाणपूल आणि समांतर रस्ता यांच्या मधोमध खुली जागा सोडून त्यावर झाडे लावण्यात आली आहेत. काही ठिकाणी ही जागा सुशोभित केलेली दिसते तर काही ठिकाणी येथे कचरा व गवतच दिसून येते. त्यामुळे ही जागा कमी केल्यास समांतर रस्ते रुंद करण्यास मदत होऊ शकते. समांतर रस्ते हे दुतर्फा असल्याचे कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे पोलिसांनी किंवा महामार्ग प्राधिकरणाने ठिकठिकाणी हे रस्ते दुतर्फा असल्याचे फलक लावणेही अपेक्षित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यात्रोत्सवासाठी गड सज्ज

$
0
0

चैत्रोत्सवास आजपासून प्रारंभ

म. टा. वृत्तसेवा, कळवण

अर्धे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंग देवीचा चैत्रोत्सव आज (२५ मार्च) पासून सुरू होत आहे. सकाळी ७ ते ९ या कालावधीत जिल्हा न्यायाधीश व देवस्थानचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे, विश्वस्त, व्यवस्थापक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महापूजा होऊन यात्रोत्सवास प्रारंभ होईल.

कळवणचे प्रांताधिकारी अमित मित्तल, डीवायएसपी देवीदास पाटील, तहसीलदार कैलास चावडे, बीडीओ टी. एस. बहिरम, पोलिस निरीक्षक सुजय घाटगे आदींनी यात्रोत्सवात आवश्यक बाबींवर लक्ष केंद्रित केले असून, सर्वच खातेप्रमुखांना योग्य व आवश्यक सूचना दिल्या आहेत. यात्रोत्सवात सर्वांनी एकदिलाने काम करीत भाविकांना यात्रा सुलभ करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महावितरणच्या माध्यमातून २४ तास वीजपुरवठा व आवश्यकतेनुसार जनरेटरची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. गडावरील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या अस्तित्व एजन्सीमार्फत व ग्रामपंचायत तसेच देवस्थान ट्रस्ट स्वच्छता मोहीम राबवेल. ट्रस्टच्या माध्यमातून ५०० हंगामी कर्मचारी यात्राकाळात सेवा बजावतील. त्यांना विमा संरक्षणही देण्यात आले आहे. भाविकांचा सहा कोटींचा जनसुरक्षा विमा काढण्यात आला असून, सुरक्षिततेची काळजी घेतली आहे.

सप्तशृंग गडावर पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाच्या गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, उद्भवलेल्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी टँकरची सोय करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने पाच व देवस्थान ट्रस्टचे दोन भाविकांची तृष्णा भागविणार आहेत. दारुबंदीबाबत उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम हाती घेण्यात येणार आहे, असे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अहिरराव यांनी सांगितले. पोलिस यंत्रणेसंदर्भातील संपूर्ण माहिती डीवायएसपी देवीदास पाटील, पोलिस निरीक्षक सुजय घाटगे यांनी देत पोलिस यंत्रणा भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्पर आहे. प्रशासकीय स्तरावर प्रत्येक विभागाची माहिती मिळावी व यात्रोत्सवात योग्य समन्वय असावा म्हणून व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली.

खासगी वाहनांना बंदी

चैत्रोत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंग गडावर केवळ बस वाहतूक होणार आहे. खासगी वाहनांना यात्रोत्सव काळात बंदी घालण्यात आली आहे. देवी मंदिर २४ तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहील. सकाळी ११ ते रात्री १०:३० या कालावधीत देवस्थान ट्रस्टचे प्रसादालय भाविकांसाठी खुले राहणार आहे. तसेच २४ तास भक्तनिवास व्यवस्था तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २४ तास आरोग्यव्यवस्था उपलब्ध राहणार आहे.

चोख सुरक्षाव्यवस्था

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यात्राकालावधीत जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिसयंत्रणेसह देवस्थानचे ५० कर्मचारी, खासगी ५०, नागरी सुरक्षा यंत्रणेचे ४०, अनिरुद्ध अकॅडमीचे २००, पोलिस कर्मचारी १५०, होमगार्ड १५० असे एकूण ७५० जणांचा लवाजमा कार्यरत राहणार आहे. ७५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही यात्रोत्सवावर वॉच राहणार आहे.

पाण्याचा अपव्यय टाळावा, प्रशासनाला सहकार्य करीत स्वछता व प्लास्टिकमुक्त यात्रोत्सवासाठी भाविकांनी देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाला सहकार्य करावे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्क साधावा.

- डॉ. रावसाहेब शिंदे, विश्वस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्या दोन बहिणींचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देवघटनजीक असलेल्या गिरणा नदीच्या पांझण डावा कालव्यात शनिवारी दुपारी दोन चिमुकल्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला, तर एका बालिकेला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले.

वघट येथील नेहा संतोष आहिरे (वय १०) व भूमिका संतोष अहिरे (वय ६) असे त्या दोन मृत बहिणींची नावे असून, खुशी रवींद्र अहिरे (वय ८) बुडता बुडता वाचली. पांझण डाव्या कालव्यात दुपारी एकच्या सुमारास नेहा व भूमिकाची आई धुणीभांडी करण्यासाठी गेली होती. शाळा सुटल्यानंतर या तिघी जणी आईला भेटण्यासाठी कालव्याकडे गेल्या. खेळता खेळता शेवाळ असलेल्या भागात नेहा व भूमिकाचा पाय घसरला. त्यांचा हात धरून असलेली खुशीही पाण्यात ओढली गेली. वेगवान जलप्रवाहामुळे नेहा व भूमिका क्षणार्धात दिसेनाशा झाल्या. आईने आरडाओरड सुरू केल्यानंतर मासेमारीसाठी आलेल्या एकाने तिघींचा शोध घेतला असता खुशीला वाचवण्यात त्याला यश आले. मात्र, नेहा आणि भूमिकाचा बुडून मृत्यू झाला. दोघीही कळवाडी येथील अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये चौथी व पहिलीत शिक्षण घेत होत्या.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंकाईचे ऐतिहासिक राम मंदिर

$
0
0

मनमाड-येवला मार्गावरील अंकाई गावात अगस्ती ऋषींच्या नावाने व अंकाई टंकाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध डोंगरावर एका गुहेत अतिप्राचीन राम मंदिर आहे. परिसरातील ग्रामस्थांची श्रद्धा, विविध आख्यायिका, सुंदर मनोहारी परिसराची असलेली पार्श्वभूमी यामुळे हे राम मंदिर लक्षवेधी व सर्वदूर आकर्षणाचा विषय ठरत आले आहे. या राममंदिराला लाभलेला डोंगरांचा सहवास आणि साक्षात प्रभू रामचंद्रांचा आणि अगस्ती ऋषींचा या डोंगरावर कधी काळी पदस्पर्श झाल्याची इथल्या जनमानसात रुढ असलेली आख्यायिका यामुळे या राम मंदिराला एक वेगळे महत्व प्राप्त झाल्याचे दिसून येते.

येथील गुहेतील मंदिरात प्रभू राम, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरच्या देखण्या मूर्ती आहेत. त्यांची प्रतिष्ठापना वीस-पंचवीस वर्षांपूर्वी केल्याचे बोलले जाते. शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी, तसेच श्रावण महिन्यात अंकाई किल्ल्यावर भाविक, पर्यटकांची गर्दी असते. श्रावण महिन्यात तसेच श्रीरामनवमीला डोंगरावर यात्रा भरते.

श्रावण महिना व रामनवमीला येथे यात्रोत्सव होतो. पौराणिक दाखले, निसर्ग, डोंगराची साथ यामुळे डोंगरावरील हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते.

-लालबाबा साधू, पुजारी

संकलन : प्रशांत भरवीरकर, फणिंद्र मंडलिक, प्रवीण बिडवे, जितेंद्र तरटे, रामनाथ माळोदे, नवनाथ वाघचौरे, डॉ. बाळकृष्ण शेलार, संदीप देशपांडे, सुनील कुमावत, विजय बारगजे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जटायू अन् श्रीराम मंदिर

$
0
0

प्रभू रामचंद्र, शक्तीची देवता मारुती (हनुमान) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इगतपुरी तालुक्यात रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. सर्वतीर्थ टाकेद, श्रीक्षेत्र कावनई, तपोभूमी पंपासरोवर याबरोबरच घोटी, इगतपुरीसह अनेक ठिकाणी रामनवमीनिमित्त कीर्तन, प्रवचन, अभिषेक, महाप्रसाद यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होतात.

प्रभू रामचंद्र यांना सीतामाईला रावणाने लंकेला पळवून नेले हे इगतपुरी तालुक्याच्या भूमीतच समजल्याचे मानले जाते. सीतामाई अपहरणादरम्यान रामभक्त जटायूने रावणाचा प्रतिकार केला. परंतु, रावणाने त्याला जखमी केले. त्यावेळी जटायूने रामनावाचा धावा सुरू केला. सीतामाईच्या शोधात प्रभू रामचंद्र या भागातून जात असताना त्यांनी जटायूस पाहिले. तेव्हा जटायूने श्रीरामांना घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा श्रीरामांनी बाण मारून पृथ्वीवरील सर्वतीर्थ येथे बोलावले व जटायूला पाणी पाजले, अशी आख्यायिका आहे. येथे श्रीराम व जटायुचे भव्य मंदिर आहे. श्रीक्षेत्र कावनई, पंपासरोवर येथेही रामनवमी सोहळा उत्साहात होतो.

इगतपुरी तालुका हा भगवंत व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. श्रीक्षेत्र कावनई येथील कपिलधारा तीर्थावर श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.

- महंत रामनारायणदास फलाहारी महाराज, श्रीक्षेत्र कावनई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भवती महिलेला पेट्रोल ओतून पेटवले

$
0
0

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. गर्भपाताला नकार दिला म्हणून एका विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदर महिलेचा पती, दीर आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून हे तिन्ही आरोपी फरार आहेत. दरम्यान या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या सटाणा येथे काल मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. रुपाली कुमावत असं या पीडित महिलेचं नाव आहे. रुपाली पाच महिन्यांची गर्भवती होती. पती विलास कुमावत याने रुपालीला गर्भपात करण्यास सांगितलं. मात्र तिने नकार दिल्याने विलासने भाऊ योगेश कुमावतच्या साथीने रुपालीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात रुपाली ५५ टक्के भाजली. रुपालीची आई जवळच राहतात. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रुपालीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. रुपालीवर तिथे उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, सटाणा पोलिसांनी रुपालीचा पती विलास कुमावत याच्यासह दीर आणि सासऱ्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आणि रुपालीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जय श्रीराम’च्या घोषात निफाडला रामजन्मोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

'राम जन्मला ग सखे, राम जन्मला' गीतरामायणामधील या ओळींनी भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव निफाड येथील श्री माणकेश्वर चौकातील श्रीराम मंदिरात मोठ्या भक्तिपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला.

निफाड येथील श्रीराम मंदिरात रविवारी (दि. २५) मोठ्या अध्यात्मिक वातावरणात भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. या वेळी ह. भ. प. विष्णू महाराज मिरधे यांचे श्रीराम जन्मावर आधारित कीर्तन झाले. सकाळी ८ वाजता गोविंद कर्डीले, अमोल जाधव, साईनाथ शिंदे यांनी सपत्नीक महापूजा केली तर पद्माकर पाटील यांनी पौरोहित्य केले. त्याचबरोबर दुपारी १२ वाजता श्रीराम जन्माचा प्रसंग सादर झाला. जन्मोत्सवात उपस्थित हजारो भाविकांनी 'श्रीरामचंद्र भगवान की जय', 'सियावर रामचंद्र की जय' असा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला. या वेळी मंत्रपुष्पांजली आणि आरती करण्यात आली. येथील तरुण मित्रांनी एकत्र येऊन श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने हा सोहळा आयोजित केला होता. गुढीपाडव्यापासून या सोहळ्याला प्रारंभ झाला होता. दररोज श्रीराम पंचायतन मुर्तींना अभिषेक, दुर्गासप्तशती ग्रंथाचे पारायण तर सायंकाळी महाआरती आणि रात्री ७ ते ११ या कालावधीत रामायनाचार्य विष्णू महाराज मिरधे यांच्या श्रीराम कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम जन्मानंतर रामकथेचा समारोप होऊन हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानंतर सायंकाळी श्रीरामरथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देव एकच तर धर्म कशासाठी?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जगात ईश्वर आहे, तर तो लपून का राहतो, तो दिसत का नाही‌? जग ईश्वरनिर्मित आहे, ईश्वर प्रेमळ व दयाळू आहे, मग अत्याचार व दु:ख का, असे प्रश्न उपस्थित करीत ज्येष्ठ विचारवंत शरद बेडेकर यांनी जगात ईश्वर असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगितले. ईश्‍वर ही संपूर्णत: मानवनिर्मित कल्पना असून, ज्याच्या-त्याच्या आकलनशक्तीनुसार तिचे वर्णन करण्यात आले आहे. जगातील प्रमुख आठ धर्मांचे विचारही वेगवेगळे आहेत. ईश्‍वर एकच असेल तर त्याने निरनिराळ्या विचारांचे धर्म का निर्माण केले, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शहीद भगतसिंग स्मृतिदिनानिमित्त 'विवेकधारा'तर्फे कुसुमाग्रज स्मारक येथे नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बेडेकर बोलत होते. यावेळी त्यांनी काही धर्म पुनर्जन्म मानतात तर काही धर्म ते मानत नाहीत. हिंदू धर्मात स्त्री-देवता आहे. पण, इतर धर्मात त्या दिसत नाही. ईश्वर आपले रक्षण करतो, असे आपण मानतो. मग देशात एक हजार वर्ष परकियांनी राज्य कसे केले‌? तेव्हा आपले रक्षण का झाले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी देव स्वयंभू असणे शक्य नाही. विश्व स्वयंभू असायला हवे व ते आहे. त्यामुळे सत्याचा शोध घेणे आवश्यक आहे. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अनेक युक्तिवाद केले जातात. आम्ही स्वत: अनुभव घेतल्याचेही ते सांगतात. खरेतर मानवी मन एकाच गोष्टीचे वेगवेगळे अर्थ लावते. यावेळी त्यांनी आपण धार्मिक पुस्तके वाचून नास्तिक झाल्याचे सांगितले. या वाचनात सगळ्यात कठीण धर्म हिंदू असल्याचे लक्षात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याकडे ईश्वर प्राणीरुपात अवतार घेतो, असे सांगितले जाते. इतर देशांत का अवतार घेत नाही? त्याला काय भाषेची अडचण आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

निरीश्‍वरवादी व्हा

धर्म अस्तित्वात आहे म्हणजे ईश्‍वर आहेच, असा युक्तिवाद केला जातो. मात्र, पृथ्वीची निर्मिती कधी झाली, सजीवांची उत्क्रांती कशी झाली, हे विज्ञानाने स्पष्ट केले असून, त्यावर अद्याप जगभर अभ्यास सुरू आहे. आस्तिक लोक देवाच्या अस्तित्वाचा एकही पुरावा देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत सत्याचा शोध घेणे आवश्यक असून, ईश्‍वर व धर्माची निर्मिती मानवानेच केली असल्याचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. बहुतांश लोक दु:खात आधार मिळावा म्हणून ईश्‍वराचे अस्तित्व मान्य करतात. धर्मा-धर्मांतून परस्परविरोधी द्वेष निर्माण होत असल्याने देवधर्म सोडून निरीश्‍वरवादी, मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोनातून ऐहिक जीवन जगायला हवे, असेही ते म्हणाले. श्रद्धा नाकारणे ही नास्तिक्याची पहिली अट असून, ईश्‍वर नाकारणाऱ्या मात्र धर्म पाळणाऱ्या व्यक्ती खऱ्या नास्तिक नसल्याचेही बेडेकर यांनी सांगितले.

माणसांत द्वेषाची पेरणी

कॉ. किरण मोघे यांचे या मेळाव्या 'नास्तिकता आणि राजकारण' या विषयावर व्याख्यान झाले. त्या म्हणाल्या, मानवी इतिहासात आतापर्यंत धर्मसत्ता व राजसत्ता हातात हात घालून चालत आल्या असून, आता तर भांडवलशाहीने 'पर्यायी सत्य' वा 'प्रतिसत्य' अशी नवी संकल्पना उभी केली आहे. नोटाबंदी अपयशी झाल्यानंतरही ती योग्य असल्याचे सांगितले जाणे, हा त्याचाच प्रत्यय आहे. देशातील सणांचे दिवसेंदिवस होणारे उत्सवीकरण घातक असून, त्यातून भांडवलशाही पोसण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाला हिंदुराष्ट्र करण्याच्या प्रयत्नातून माणसांत द्वेष निर्माण केला जात असून, तो रोखण्याचे मोठे आव्हान उभे असल्याचेही त्या म्हणाल्या.

मुक्त संवाद

मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात गटचर्चेत मुक्त संवादाचा कार्यक्रम झाला. प्रारंभी स्नेहा जंगम यांनी नास्तिकत्वाच्या जाहीरनाम्याचे वाचन केले. प्रियदर्शन भारतीय यांनी सूत्रसंचालन केले. हरीश राहाणे यांनी प्रश्‍नोत्तर सत्राचे संचालन केले. अमित जोजारे यांनी मेळाव्यामागील भूमिका स्पष्ट करून आभार मानले. मेळाव्याला जिल्हाभरातून श्रोते उपस्थित होते.

निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

'विवेकधारा'तर्फे घेण्यात आलेल्या 'भगतसिंग यांचे देवधर्मविषयक विचार आणि आजची तरुणाई' या विषयावरील स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. प्रथम : प्रशांत कुलकर्णी, मनमाड, द्वितीय : अतुल काकडे, नाशिक, तृतीय : सोनल मते (मुंबई)Ḥ उत्तेजनार्थ : सुयोग झुटे, (नाशिक), प्राजक्ता पवार (पुणे), दिवाकर बडगुजर (जळगाव), राहुल खरात (पुणे), कोकिळा ढाके (पुणे) यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चैत्रात खळाळली गोदामाई

$
0
0

जिल्हा प्रशासनाने कोपरगाव, शिर्डीसाठी सोडले पाणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंत्रालयात कालवा सल्लगार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने रविवारी गोदावरी उजवा कालवा आणि डाव्या कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे. गंगापूर, वालदेवी, मुकणे आणि दारणा अशा चार धरणांमधून टप्प्या-टप्प्याने हे पाणी सोडण्यात येणार असून कोपरगाव, शिर्डी आणि रहाता परिसरातील रहिवाशांना पिण्यासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे.

गंगापूर धरणामधून रविवारी दुपारी पाण्याचे आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली. रामनवमीच्या दिवशी हे आवर्तन सोडण्यात आल्याने गोदावरी खळाळून वाहू लागली. गोदाघाटावरील गोदापात्रही पाण्याने भरून वाहू लागल्याने शहरवासीय आणि भाविकही सुखावले. गंगापूर धरणामधून ९०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. वालदेवी धरणातून रविवारी मध्यरात्री ६०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून मुकणे धरणातूनही तेवढेच पाणी सोडणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. दारणा धरणातून अत्यंत वेगाने नांदूर मध्यमेश्वर धरणात पाणी पोहोचते. त्यामुळे दारणातून सर्वात शेवटी आवर्तन सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. दारणा धरणातनू ७०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. कोपरगाव, राहातासाठी २५ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीसाठी हे आवर्तन सोडावे लागते. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आजपासून हे आवर्तन सोडण्यात आले. पुढील दोन तीन दिवस आवर्तन सुरूच राहणार असून नांदूर मध्यमेश्वर येथील बंधाऱ्यात ३० मार्चपर्यंत हे पाणी साठवून ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ते पुढे सोडण्यात येईल, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.

पाणीचोरी रोखणार

धरणसाठ्यांमधून सोडलेल्या पाण्याचा अवैध उपसा केला जाऊ नये याकरीता विद्युत पुरवठा खंडित करण्यासह गरज भासल्यास आवर्तनाच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त देण्याची तयारी देखील जिल्हा प्रशासनाने ठेवली आहे. वहन मार्गावर पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

रामनवमीसाठी पाणी सोडल्याचा दावा

'रिव्हर राईट'नुसार गंगापूर धरणाच्या पाण्यावर पहिला अधिकार गोदावरी नदीचा आहे. नदीला पाण्याचा हक्क मिळावा यासाठी तात्काळ पाणी सोडून नदी प्रवाहीत करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी देवांग जानी यांनी ९ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. पालकमंत्री गिरीश महाजन यांचेही या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनानुसार रामनवमीच्या दिवशी हे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदी पुन्हा खळाळून वाहू लागली आहे.

धरण .......... सोडण्यात आलेले पाणी

गंगापूर धरण.......... ९०० दशलक्ष घनफूट

दारणा धरण.......... ७०० दशलक्ष घनफूट

वालदेवी धरण........ ६०० दशलक्ष घनफूट

मुकणे धरण........ ६०० दशलक्ष घनफूट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घोटाळेबाज बाबूं’ना अभय!

$
0
0

vijay.mahale@timesgroup.com
Tweet : vijaymahaleMT

नाशिक : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) तब्बल १०० कोटी रुपयांच्या साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. प्रशासन मात्र मंत्र्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत या प्रकरणातील संशयित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे. संशयितांकडून पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता असतानाही त्यांची किमान बदली करण्याचेही औचित्य प्रशासनाने न दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यभरातील शासकीय आयटीआयसाठी दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणास उपयोगी ठरू शकतील अशी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी केली जाते. यात ड्रिल मशिन व लेथ मशिनसह अन्य यंत्रसामग्रीचा समावेश असतो. २०११ ते २०१४ या तीन वर्षांमध्ये अशी खरेदी करताना शासकीय निर्देशांचे पालन करण्यात आलेले नाही, तसेच या खरेदीत विशिष्ट ठेकेदारांना फायदा पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचा आरोप व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातूनच सरकारकडे करण्यात आला. तब्बल १०० कोटी रुपयांच्या या खरेदीत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे आयुक्त, सहसंचालकांसह राज्यभरातील निदेशक व कार्यासन अधिकारी अशा एकूण १८ जणांचा सहभाग असल्याचे या आरोपांमध्ये नमूद करण्यात आले. प्रशासकीय मान्यता नसतानाही यंत्रसामग्री खरेदीचा सपाटा लावणे, निकृष्ट दर्जाच्या व तांत्रिक स्पेसिफिकेशनशिवाय यंत्र स्वीकारणे, सरकारने निर्धारित केलेल्या निकषांची पायमल्ली करीत विशिष्ट पुरवठादारांना झुकते माप देणे, असे गंभीर आरोप करण्यात आले. या आरोपांची शासकीय पातळीवर प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यात तथ्य आढळून आल्याने या खरेदीची कृती ही गुन्हेगारी स्वरूपाची असून, संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, या खरेदीत झालेले नुकसान सरकारने वसूल करावे, तसेच पंजाबमधील आर. पी. इंजिनीअरिंग या पुरवठादार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे सरकारच्या २९ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या टिपणात नमूद केले आहे. त्यानुसार सरकारने चौकशी समिती स्थापन करून सखोल तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गैरव्यवहारात संशय असलेल्या अधिकाऱ्यांना हटविण्याच्या सूचना मंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी दिलेल्या आहेत. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे.

यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप

तत्कालीन संचालक व आयुक्त विजयकुमार गौतम, सहसंचालक अनिल जाधव, सहसंचालक (प्रशिक्षण) आर. आर. आसावा, तज्ज्ञ समिती सदस्य प्राचार्य विलेश संख्ये, शिल्प निदेशक डी. बी. तोडणकर (बोरिवली), शिल्प निदेशक बी. एल. पाकळे (कुर्ला), पूर्व पडताळणी सदस्य प्राचार्य एस. सी. राठोड (कोपरगाव), प्राचार्य पी. एन जयस्वाल, प्रशिक्षण अधिकारी आर. डी. धोत्रे (अकोले), प्राचार्य ए. बी. लोहार (मुरबाड), गट निदेशक डी. व्ही. जाधव, शि. नि. भोकरे, शिल्प निदेशक एम. डी. पवार (औंध, पुणे), निदेशक एम. पी. चव्हाण (अंबरनाथ) प्राचार्य एम. एस. चकोर (निफाड), शिल्प निदेशक के. बी. ठाकूर, गटनिदेशक पी. के. बडगुजर (कळवण) प्रशिक्षण अधिकारी जी. के. बोडके (नाशिक).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावर चैत्रोत्सवास सुरुवात

$
0
0

विधिवत पूजनासह भगवतीच्या पादुकांची पालखी मिरवणूक उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, कळवण

खान्देशची माहेरवाशीण व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तश्रुंग देवीच्या चैत्रोत्सवास रविवारी (दि. २५) प्रारंभ झाला. प्रधान जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, सप्तश्रुंग देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एम नंदेश्वर, बुके यांनी सकाळी ७ वाजता महापूजा केली. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्थ डॉ. रावसाहेब शिंदे, राजेंद्र सूर्यवंशी यांनी सपत्नीक व व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे तसेच सर्व विभागप्रमुख आदींनी यावेळी भगवतीची मनोभावे पूजा केली.

श्रीरामनवमीनिमित्त रविवारी (दि. २५) दुपारी बारा वाजेच्या सुमारास गडाच्या माथ्यावर असलेल्या श्रीराम मंदिरात विधिवत पूजन करण्यात आले. दुपारी ४ वाजता श्री भगवतीच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रविवार हा सुटीचा वार व चैत्रोत्सव सुरू होण्याचा पहिला दिवस असल्याने खान्देशसह गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातील देवीभक्तांनी गर्दी करीत देवीच्या चरणी आपली भक्ती अर्पण केली. कळवण तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा, पोलिस कर्मचारी, देवस्थानचे सर्व अधिकारी व कर्मचारी, गड ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी, राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगाराचे चालक, वाहक यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टिममार्फत भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी व्यवस्थित हाताळत आहेत.

नाशिकहून ७५ बसेसची व्यवस्था

संपूर्ण चैत्रोत्सव काळात खासगी वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने गडावर नेण्यास बंदी असून, नांदुरीहून कळवण आगाराच्या एकूण ६० बसेस अविरतपणे गडावर धावत आहेत. नाशिकहून ७५ बसेस तसेच जिल्ह्यातील इतर आगाराच्या बसेस भाविकांची ने-आण करण्यासाठी सज्ज आहेत. खान्देश हे श्री सप्तश्रुंग मातेचे माहेरघर असल्याने धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील लाखो भाविक चैत्रोत्सव काळात पायी गडावर जातात. त्यामुळे खासगी वाहनांना गडावर बंदी आहे.

४० हजार भाविकांनी घेतले दर्शन

चैत्रोत्सव सुरू झाल्याने कालच्या पहिल्याच दिवशी अर्थात रविवारी (दि. २५) जवळपास चाळीस हजार भाविकांनी माँ भगवतीचे दर्शन घेतले. २९ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत सलग सुट्या असून, दहावी व बारावीच्या परीक्षांची धामधूम संपल्यामुळे गडावर चैत्रोत्सव काळात दर्शनासाठी येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. टँकरच्या माध्यमातून पाण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. शिवाय गड ग्रामपंचायत च्या माध्यमातून अल्पदरात शुद्ध पाण्याचे एटीएम सुरू करण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच राजेश गवळी यांनी दिली. सप्तश्रुंग गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चप्पल स्टँड, लॉकर व्यवस्था तसेच नारळ फोडण्यासाठी मशनरी पहिल्या पायरीजवळ उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रशासकीय यंत्रणा सज्ज

.......यात्राकाळात १६ ठिकाणी बाऱ्या लावल्या

.......देवस्थानचे ६० कर्मचारी कार्यरत

.......ट्रस्टच्यावतीने २५ सुरक्षारक्षक

.......५ बंदूकधारी पोलिस प्रशासनासोबत कार्यरत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकी-खापरी धरणातून पाणी सोडणार

$
0
0

वाकी-खापरी धरणातून पाणी सोडणार

रखडलेले काम करण्यासाठी प्रयत्न

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालूक्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरलेल्या वाकी-खापरी धरणाचे काम यावर्षी पूर्ण झाले आहे. धरणाच्या कामानंतर यंदा पहिल्याच वर्षी धरणात अपेक्षित पाणीसाठा करण्याला होता. मात्र, धरणाचे गेटचे काही काम करण्यासाठी आज (दि. २६) महत्तम वेगाने धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी सोडल्याशिवाय उपयुक्त कामे करता येणे अशक्य असल्याने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाकी-खापरी धरणाचे सहाय्यक अभियंता हरिभाऊ गिते यांनी केले आहे.

पाणीप्रश्न सुटण्यासाठी वाकी-खापरी धरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असून, धरणाचा आपत्कालीन दरवाजा, सेवाद्वार आणि इतर अत्यावश्यक कामे करण्यासाठी हे पाणी सोडणे आवश्यक आहे, असे गिते यांनी पत्राद्वारे कळवले आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात यावे, असे ग्रामपंचायत कार्यालयांना सूचित केले आहेत. नदीपात्रातून अनधिकृत पाणी उपसा करण्यात येऊ नये, तसेच नदीपात्रात जाऊ नये, अशाही सूचना वाकी, कुर्णोली, आडवण, घोटीसह परिसरातील नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतींमार्फत ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत.

नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न सुटणार

वाकी-खापरी धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या धार्नोली, वाकी, कुर्णोली, आडवण, खंबाळे या गावातील शेतीला त्याचा फायदा होणार आहे. साधारणपणे हे पाणी मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार असल्याने घोटी गावाला त्याचा खूप फायदा होईल. यावर्षी वाकी धरणातील मुबलक पाणीसाठ्यामुळे धरणाच्या नदीकाठावरील एरवी फक्त भातशेती करणारे शेतकरी नगदी पिकाकडे वळले असल्याचे दिसून येते. यावर्षी धरणाच्या पाणीसाठ्यामुळे वाकी-खापरी नदीकाठी व पूनर्वसित असणाऱ्या भावली बुद्रुक, वाळविहिर, शिदवाडी, कोरपगाव, वाकी, कूर्णोली, आडवण, घोटी या गावांना दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. धरणामुळे सिंचन सुविधा मिळत असल्याने प्रगत शेतीसाठीचा पाणी प्रश्न वाकी धरणाच्या पाण्यामुळे सुटल्याचे दिसून येते.

वाकी-खापरी धरणाचे पाणी सोडण्यात येणार असल्याने उर्वरित कामे करता येतील. पाण्यामुळे शेतीला समृद्धता लाभणार आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या सूचनांचे अनुपालन करावे. पाण्याचा सुयोग्य वापर करावा.

- संजीव जाधव, कार्यकारी अभियंता, नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे

$
0
0

वरिष्ठ पातळीवरून मंजुरीनंतर कामास सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा बसस्थानकात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेडछाड करणे, महिलांचे मंगळसूत्र, बॅग, दुचाकी चोरी यासारखे प्रकार नेहमीच घडत असतात. त्यामुळे या भूरट्या चोरांसह टवाळखोरांवर वचक निर्माण करण्यासाठी सटाणा बसस्थानकात ९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मंजुरी वरिष्ठ पातळीवरून नुकतीच मिळाली असून, कामास प्रारंभ झाल्याची माहिती आगारप्रमुख उमेश बिरारी यांनी दिली आहे.

सटाणा बसस्थानक महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचे बसस्थानक म्हणून परिचित आहे. १३ फलाट असलेल्या या बसस्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून सीसीटीव्हि कॅमेरे बसविण्याची प्रवाशी व विविध संघटनेकडून मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर बस स्थानकात ९ नऊ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती आळा बसणार आहे.

चोर पकडण्यास पोलिसांना मदत

या बसस्थानकात नेहमीच पाकीट मारणे, महिलांचे मंगळसूत्र, पर्स, बॅग चोरीस जात होते. यासोबत कॉलेजियन विद्यार्थिनींना टवाळखोर नेहमीच छेड काढतात. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता या कॅमेऱ्यांनी अशा घटनांवर वचक ठेवता येणार असून, टवाळखोरांना चाप बसणार आहे. बसस्थानकातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. आजपर्यंत चोरी गेलेल्या दुचाकी एकही सापडली नाही. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोर पकडण्यास पोलिसांना मदत होणार आहे. सीसीटीव्ही बसविल्याने प्रवाशी संघटनेने स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images