Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

द्वारका चौकात उतरण्यास अवजड वाहनांना बंदी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी उड्डाणपुलावरून येणाऱ्या अवजड वाहनांना द्वारका चौकात उतरून पुण्याकडे मार्गस्थ होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुंबईहून नाशिकमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी घोटी सिन्नर मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

द्वारका चौकाला शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. परंतु, या चौकात वाहतुकीची कोंडी होते. स्वयंचलित सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिसांची नेमणूक, वळण रस्त्याचा वापर यासह अनेक प्रयोग करूनही वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकलेली नाही. आता द्वारका चौफुलीवर उतरून पुण्याकडे जाऊ पाहणाऱ्या अवजड वाहनांना मज्जाव करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सायंकाळी चार ते आठ या वेळेत घोटी-सिन्नर मार्गाचा वापर करावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

सकाळी दहा ते दुपारी बारा व सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत द्वारका चौफुली वाहतुकीसाठी धोकेदायक ठरू लागली आहे. त्यातून छोटे-मोठे अपघातही होत आहेत. त्यामुळे दुपारी चार ते रात्री आठ या चार तासांसाठी मुंबईकडून उड्डाणपुलाचा वापर करून रॅम्पने राष्ट्रीय महामार्गावर उतरणाऱ्या तसेच समांतर पुलाचा वापर करून द्वारका चौफुलीवरून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. तशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याऐवजी वाहनचालकांनी घोटी-सिन्नर मार्गाचा वापर करून पुण्याकडून मार्गस्थ व्हावे, असा उपाय सुचविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बजेटमध्ये त्रिसूत्रीला धक्का

0
0

बजेटमध्ये त्रिसूत्रीला धक्का

रद्द झालेली कामे पुन्हा सादर; बजेट २०३२ कोटींवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी त्रिसूत्री लावून २०१७-१८ या आर्थिक वर्षात कात्री लावलेल्या १३२ कोटींच्या विकासकामांचा पुन्हा २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये समाविष्ट करत सत्ताधाऱ्यांनी मुंढेंना पुन्हा दणका दिला. स्थायी समितीने मंजूर केलेली ११५ कोटी आणि महासभेने मंजूर केलेल्या १३२ कोटींमुळे बजेटमध्ये पुन्हा २४७ कोटीची वाढ झाल्याने यंदाचे बजेट हे दोन हजार ३२ कोटींवर जावून पोहचले आहे. महापौर रंजना भानसी यांनी गेल्या वर्षात त्रिसूत्रीमुळे रद्द झालेली कामे पुन्हा धरत, बजेटला मंजुरी दिल्याने आयुक्त आणि सत्ताधाऱ्यांमधील वादाची ठिणगी पडली आहे. दरम्यान, या बजेटमध्ये नगरसेवकांनी प्रभागांच्या कामांचा वर्षाव केला आहे.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या बजेटला मंजुरी देण्यासाठी महासभा झाली. त्यात स्थायी समितीच्या अध्यक्षा हिमगौरी आहेर-आडके यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बजेटमध्ये ११५ कोटींची वाढ करत, ४१ लाख रुपये शिलकीचे १८९९ कोटी ७४ लाखांचे बजेट महासभेला सादर केले. त्यात नगरसेवक निधीऐवजी प्रभाग विकास निधीसाठी ९१ कोटी ५० लाखांची वाढ करण्यात आली असून, सोबतच करदात्यांना दोन लाखांचा विमा, ई-टॉयलेट, स्पोर्टस कॉम्पेक्लस यांचा समावेश आहे. स्थायी समितीने सादर केलेल्या बजेटमध्ये गत वर्षात मंजूर केलेल्या कामांचा समावेश नसल्याबद्दल सर्वच नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. सुधारकर बडगुजर आणि प्रवीण तिदमे यांनी बजेटमध्ये त्रुटी असल्याचा आरोप केला. यावेळी अनेक नगरसेवकांनी आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या सूचना करण्यासह प्रभागातील कामांसदर्भात सूचनांचा वर्षावच महासभेत केला. भाजपसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष सर्वच नगरसेवकांनी प्रभागातील विकासकामांचा पाढा वाचत, त्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. महासभेत आपली विकासकामे धरली जावीत यासाठी नगरसेवकांनी गोंधळही घातला. सत्ताधारी आणि विरोधकातील तब्बल ४६ नगरसेवकांनी आठ तास चर्चा करत, आपल्या प्रभागातील कामांसाठी आग्रह धरला. आपल्याला बोलू दिले जात नसल्याबद्दलही नगरसेवकांनी गोंधळ घालत, भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु महापौरांनी प्रत्येक नगरसेवकाला बोलण्याची संधी देत, आयुक्तांसमोर नगरसेवकांच्या व्यथा मांडण्याची संधी दिली. परंतु आठ तासांच्या नगरसेवकांच्या सुचनांनतरही आयुक्तांनी नगरसेवकांनाच खरी खोटी सुनावत, उत्पन्नाची बाजू कमकुवत असल्याचे सांगत, निधी देण्यास नकार दिला.

२५७ कोटींची कामे रद्द केली, त्याचे दु:ख नसल्याचे सांगत, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी नगरसेवक हे प्रभागातील दैनंदिन कामांसाठीच निधी मागत असल्याचे सांगत, हा निधी प्रभाग विकास निधी म्हणून द्यावा अशी मागणी केली. गाळे आणि अभ्यासिकांबाबत लावलेले धोरण चुकीचे असल्याचे सांगत, त्यात दुरुस्ती करण्याची तसेच आयुक्तांच्या त्रिसूत्रीमुळे रद्द केलेली सर्व १३२ कोटींची कामे ही या बजेटमध्ये धरण्यात यावी, अशी मागणी केली. स्थायी समितीने सुचवलेल्या ११५ कोटींसह २४७ कोटींच्या बजेटवाढीला मंजुरी देण्याची मागणीही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही बजेटमध्ये व्हिजन नसल्याचे सांगत, नव्याने पर्यटनवृद्धी, वैद्यकीय महाविद्यालय, सीसीटीव्ही प्रकल्प, पार्किंगच्या प्रश्नाचे काय झाले, असा सवाल केला. तर सभागृहनेता दिनकर पाटील यांनी सदस्यांच्या सुचनांना अतंर्भाव करून उपसुचनांसह बजेटला मंजुरी देण्याची मागणी केली. त्यावर महापौरांनी आयुक्तांच्या भाषणाकडे तसेच सुचनांकडे दुर्लक्ष करत, गत वर्षाच्या बजेटमध्ये मंजूर झालेली; परंतु आयुक्तांनी त्रिसूत्रीमुळे रद्द केलेली १३२ कोटींच्या कामांचा नव्याने अंतर्भाव करत सुचनांसह मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्थायीसमितीच्या बजेटमध्ये पुन्हा २४७ कोटींची वाढ झाली असून, बजेट हे २०३२ कोटींपर्यंत पोहचले आहे. रिसीट नसल्याशिवाय नगरसेवकांची कामे करणार नाही, असा पवित्रा घेतलेल्या आयुक्त मुंढेंना पुन्हा सत्ताधारी भाजपने दणका दिल्याने पुन्हा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

सूचनांचा पाऊस

आयुक्त तुकाराम मुंढेंनी रद्द केलेली २५७ कोटींच्या रस्ते विकास योजनेबाबतची खदखद नगरसेवकांमध्ये दिसून आली. पाणीपुरवठा, सांडपाणी, रस्ते, प्रदूषणावर जोरदार नगरसेवंकानी मते मांडली. सभागृहात लोकप्रतिनिधींचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत असे सांगत, आयुक्तांकडून अभ्यासिका आणि वाचनालयांवरील कारवाईचाही विरोध करण्यात आला. माघासवर्गीयांचा निधी हा त्याच्या प्रभागाऐवजी अन्य प्रभागात खर्च केला जात असल्याबद्दलही नगरसेवकांनी जाब विचारला. प्रभागातील समस्या या नगरसेवकांनाच, सांगितल्या जातात, अधिकाऱ्यांकडे कोणी येत नाहीत असे सांगत, नगरसेवकांची कामे झाली पाहिजेत असा आग्रह यावेळी नगरसेवकांनी धरला. तसेच महापालिकेच्या काही मालमत्तांमधून आर्थिक उत्पन्न मिळू शकते, अशा सूचनाही केल्या.

कुत्र अन् वॉचमन

त्रिसूत्रीमुळे नगरसेवकांची सर्व कामे रद्द झाल्याने प्रभागात नागरिकांकडून सुरू असलेल्या कामांबाबतचा संतापाला महासभेत बांध फुटला. भाजपच्या प्रतिभा पवार यांनी आयुक्तांना महाबली हनुमानाची उपमा देवून आपण महाबली होवून काम करत असले तरी, सैन्याचाही विचार करण्याचा टोला लगावला. तसेच महापौरांना सीतेची उपमा देवून त्यांची हतबलता बोलून दाखवली. आमचे एक वर्ष वाया गेल्याचे सांगत, साहेब आमच्या घराबाहेर न कुत्र आहे ना वॉचमन, लोक थेट घरात येवून कामांबाबत जाब विचारतात, असे सांगून भाजपच्याच कारभाराचे वाभाडे काढले. तर शांताबाई हिरेंनी असाच संताप व्यक्त सत्ताधाऱ्यांसह आयुक्तानाही खरी खोटी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनसाखळी चोरीचे सत्र इंदिरानगरला सुरूच 

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार सोनसाखळी चोरीचे प्रकार होत असून, गेल्या आठवड्यात इंदिरानगरमध्ये झालेल्या सोनसाखळी चोरीनंतर आता पाथर्डी परिसरातील ज्ञानेश्वरनगर येथून रात्री महिलेच्या अंगावरील सोन्याची साखळी लुटण्याचा प्रकार घडला.

जवळपास दिवसाआड होणाऱ्या सोनसाखळी चोऱ्यांच्या घटनांबाबत पोलिसांनी सतर्क राहून खऱ्या अर्थाने खाकी वर्दीचा दरारा या भागात निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.  ज्ञानेश्वरनगर भागात राहणाऱ्या हेमलता शिवाजी साळुंके (वय ३३) या रात्री परिसरातील महिलांसह हॉटेल नैवेद्यमजवळून जात असताना समोरून दुचाकीवरून आलेल्या  एकाने साळुंके यांच्या गळ्यातील सुमारे आठ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओरबाडून पोबारा केला. दुचाकीवरून येणारा युवक भरधाव वेगाने असल्याने गाडीचा नंबरसुद्धा दिसला नसल्याचे त्यांनी फिर्यादित नमूद केले आहे. हा प्रकार झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. मात्र, दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी ठरला. या प्रकरणी साळुंके यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अशा प्रकारे सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असतानाही या चोरट्यांना अद्यापही जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गत आठवड्यात इंदिरानगर भागात झालेल्या चोरीचा तपास सुरू होतो ना होतो तोच दुसरी घटना घडल्याने पोलिसांनी या सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी जनजागृती सुरू केली असली, तरी चोरटे का पकडले जात नाहीत, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काच फोडून सहा लाख लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अशोका मार्गवरील आनंदवन अपार्टमेंट येथे उभ्या केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने सहा लाख ५० हजार रुपयांची रोकड लांबविली. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आली आहे. शिरीष राधेशाम गुप्ता (वय ४१, रा. आनंदवन अपार्टमेंट) यांनी इमारतीच्या पार्किंगमध्ये कार उभी केली होती. कारमध्ये पैसे ठेवून ते पाणी आणण्यासाठी घरात गेले. त्याचवेळी संशयित चोरट्याने कारची काच फोडून रोकड लांबविली. परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करून संशयिताचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस प्रवासात मोबाइल लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रात्रीच्या बसप्रवासादरम्यान प्रवाशाचा महागडा मोबाइल चोरट्यांनी लांबविल्याची घटना नुकतीच घडली.

या प्रकरणी दत्तात्रेय कृष्णाजी जोगळेकर (रा. मांगल्य बंगला, वडाळा-पाथर्डीरोड) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ते कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. शनिवारी रात्री शिवशाही बसमधून परतीचा प्रवास करीत असताना चोरट्यांनी त्याच्या शर्टच्या खिशातील महागडा मोबाइल चोरून नेला. ठक्कर बाजार बसस्थानकात बसमधून उतरल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

--

दोन मोटारसायकल चोरीस

शहरात दोन मोटारसायकल चोरीस गेल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. या प्रकरणी गंगापूर, तसेच सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहदेवनगर भागातील आकाश कृष्णा शिंदे (रा. श्रीसृष्टी अपार्टमेंट) यांची मोटारसायकल सोमवारी रात्री चोरट्यांनी चोरून नेली. त्यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. वाहनचोरीची दुसरी घटना बालाजी कोट भागात घडली. विराज जंगम (रा. गुरुपुष्यामृत सोसायटी, दिल्ली दरवाजा) यांची ९५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल रविवारी चोरट्यांनी लांबवली. ही घटना रात्रीच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आली आहे.

--

खिडकीतून लॅपटॉप लंपास

उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी टेबलवर ठेवलेला लॅपटॉप चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केशव वेदप्रकाश लखियानी (रा. श्रीकृष्ण रो-हाउस, पार्थ पॅलेस साईग्राम) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री घराची खिडकी उघडी असल्याची संधी साधत चोरट्यांनी सुमारे ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला.

--

पथदीपास ट्रकची धडक

नाशिकरोड : सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने नाशिकरोड उड्डाणपुलावरील पथदीपाच्या खांबास धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली. ट्रकचालक (एमएच २५, बी ७६०६) चालक फैजुद्दीन ताजुउद्दिन खादीवाले (वय ४३,रा. बसवाकल्याण,बिदर, कर्नाटक) याच्याविरोधात महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयातील शाखा अभियंता संजय कुलकर्णी यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या धडकेत महापालिकेच्या उड्डाणपुलावरील पथदीपाचा खांब आणि वायरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

--

मोटवानीरोड भागात एकाची आत्महत्या

जेलरोड : येथील मोटवानीरोड परिसरातील ५२ वर्षीय व्यक्तीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अनिल यशवंत पंडित (वय ५२, रा. राजगड सोसायटी, मोटवानीरोड, उत्सव मंगल कार्यालयामागे) यांनी घरात कोणी नसल्याचे बघून छताच्या पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्यांच्या नातेवाइकांच्या लक्षात येताच त्यांनी पंडित यांना बिटको रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पंडित यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.

(लोगो- क्राईम डायरी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच बजेट दोन हजार कोटींवर

0
0

आयुक्त आपल्याच बजेटवर ठाम, मुंढे भाजप संघर्ष वाढणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या बजेटवर तब्बल आठ तास चर्चा करीत बजेट २०३२ कोटी ५९ लाखांवर नेले आहे. परंतु, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांच्या मंथनावर मेहनतीवर पाणी फिरवत बजेट आयुक्तांचेच कायम राहणार असल्याचे ठणकावून सांगितले. यामुळे आयुक्त विरुद्ध सत्ताधाऱ्यांमधील संघर्षाच्या मुद्द्यात आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे. नगरसेवकांनाही खरीखोटी सुनावत रीसिट नसेल, तर कामे नाहीत असे सांगत नव्याने बारसे केलेल्या प्रभाग विकास निधीवरही आयुक्तांनी वरवंटा फिरवला.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या बजेटच्या मंजुरीसाठी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. बजेटला दुरुस्तीसह मंजुरी देण्यात आली आहे. महापौरांनी गेल्या वर्षी मंजूर झालेली परंतु, आयुक्तांच्या त्रिसूत्रीमुळे कात्री लावलेल्या १३२ कोटींच्या कामांचा बजेटमध्ये पुन्हा समावेश केल्याने यंदाचे बजेट हे २०३२ कोटी ५९ लाखांवर फुगले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या बजेटमध्ये तब्बल २४७ कोटींची वाढ झाल्याने आयुक्तांचाही तिळपापड झाला आहे. महापालिकेचे उत्पन्न हे १४०० कोटींपर्यंत असताना खर्च दोन हजार कोटींच्या पार कसा असा सवाल करीत स्थायी आणि महासभेच्या बजेटची अंमलबजावणी होणार नसल्याचे स्पष्ट शब्दात ठणकावले आहे. आपल्या सध्याच्या सवयी बदलण्याचा सल्ला देऊन सत्ताधाऱ्यांचीच कोंडी केल्याने आयुक्त आणि भाजपमधील दरी अधिकच वाढली आहे. नगरसेवकांच्या मागण्यांचा विचार करून व उत्पन्नाची साधने वाढविण्याच्या सल्ला देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाच आयुक्तांनी कोंडीत पकडत गल्लीबोळातून बाहेर येण्याचाही सल्ला दिला आहे. त्यामुळे स्थायी समिती आणि महासभेने आटापिटा करून फुगवलेला बजेटचा फुगा आयुक्तांनी महासभेतच फोडून टाकला आहे. पहिले वर्ष वाया गेल्याने अगोदरच चवताळलेल्या सत्ताधाऱ्यांसह विरोधक आयुक्तांच्या या कठोर पवित्र्यावर आक्रमक होण्याची शक्यता असून, महापालिकेत पुन्हा लोकप्रतिनिधी विरुद्ध मुंढे असा संघर्ष पहायला मिळणार आहे. आयुक्त आपल्याच बजेटवर ठाम राहिल्यास नवी मुंबईची पुनर्रावृत्ती नाशिकमध्ये लवकरच होण्याची शक्यता आहे.

- सविस्तर वृत्त...३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विचार, पंचांग

0
0

विचार

सिद्धीपर्यंत पोहोचणे अशक्य आहे. पण, सिद्धीच्या मागावर असताना श्रेष्ठत्व मात्र जरूर प्राप्त होते.

-विन्स लोम्बार्डी

--

पंचांग

रविवार, १ एप्रिल २०१८

भारतीय सौर ११ चैत्र शके १९४०, चैत्र कृष्ण प्रतिपदा सायं. ५.०४ पर्यंत, चंद्रनक्षत्र : चित्रा उत्तररात्री ५.५१ पर्यंत, चंद्रराशी : कन्या सायं. ५.४१ पर्यंत, सूर्यनक्षत्र : रेवती, सूर्योदय : सकाळी ६.३४, सूर्यास्त : सायं. ६.५१, चंद्रोदय : सायं. ७.४४, चंद्रास्त : सकाळी ७.१४, पूर्ण भरती : दुपारी १२.४४ पाण्याची उंची ४.५७ मीटर, रात्री १२.५४ पाण्याची उंची ४.५९ मीटर, पूर्ण ओहोटी : सकाळी ६.२३ पाण्याची उंची ०.४० मीटर, सायं. ६.३८ पाण्याची उंची ०.८७ मीटर

दिनविशेष : इस्टर डे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलरोडलाही मोहीम

0
0

जेलरोड : नाशिकरोड विभागातील दसक शिवारातील अतिक्रमण महापालिकेने हटवले. पाच प्रकरणांमधील दहा अनधिकृत बांधकामे मनपाने हटविली.

जेलरोडच्या सैलानीबाबा स्टॉपजवळील कोमल पार्क येथील  चाटवाला दुकानासमोरील लोखंडी अँगल व पत्र्याचे शेडचे बांधकाम, स्वामी समर्थ वडापाव सेंटरच्या इमारतीचे लोखंडी अँगल व पत्र्याचे शेडचे बांधकाम,  क्वालिटी ऑटो सेंटरचे पत्र्याचे शेडचे बांधकाम हटविण्यात आले. जेलरोडवरील धुमाळ कॉम्प्लेक्समधील विवेक धुमाळ यांचे सामायिक अंतरातील तसेच टेरेसवरील शेडचे बांधकाम काढण्यात आले. बिटको चौकातील पवन हॉटेलशेजारील सागर भामरे यांची टपरी हटविण्यात आली. जयभवानी रोडवरील पाटील कॉम्प्लेक्स येथील चेअरमन पाटील कॉप्लेक्स यांचे इमारतीच्या पार्कींगचे जागेतील पक्के रुमचे बांधकाम, मोगल हॉस्पिटलमागील अमृतभाई पटेल, माऊलीकृपा बंगल्याच्या भिंतीलगत असलेल्या खुल्या जागेतील पक्के बांधकाम हटविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महसूल ची रेकॉर्डब्रेक वसुली ; वसुलीचा टक्का शंभरी पार

0
0

(शुभवार्ता)

मालेगाव महसूलची

११० टक्के वसुली

फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महसूल विभागाने रेकॉर्ड ब्रेक सुमारे ११० टक्क्यांपर्यंत वसुली केली आहे. महसूल प्रशासन व पालिका प्रशासनाकडून विविध करांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम उघडण्यात आली होती. मार्च एण्डपर्यंत वसुलीचा टक्का वाढवा यासाठी पालिका व महसूल अधिकारी धावाधाव करीत होते. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत वसुलीचे काम सुरू होते. महसूल विभागाने सुमारे रेकॉर्ड ब्रेक वसुली केल्याची  माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे, तर पालिकेच्या कर वसुलीचा टक्काही ७० टक्क्यांपर्यंत गेला असल्याचे आयुक्त संगीता धायगुडे यांनी सांगितले. फटाक्यांची आतषबाजी करून रेकॉर्डब्रेक महसूल वसुलीचा आनंदोत्सव महसूल कर्मचाऱ्यांनी साजरा केला.

 तहसीलदार देवरे यांनी सांगितले, की सन २०१७-१८ ला मालेगाव महसूल हद्दीत १८.४३ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट होते. ते पार करून २०.१७ कोटींची  वसुली करण्यात विभागाला यश आले आहे. यंदा झालेल्या रेकॉर्ड ब्रेक महसूल वसुलीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन व निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रांत अजय मोरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच मंडल अधिकारी, तलाठी व सर्व सहकाऱ्यांनी टीम वर्कने काम केल्यानेच ही बाब शक्य झाल्याचे तहसीलदार देवरे यांनी नमूद केले. सायंकाळच्या सुमारास प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येथील तहसील आवारात जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी मिठाईचे वाटपही करण्यात आले.

मनपाकडून मुदतवाढ 

घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती मालेगाव मनपातर्फे देण्यात आली आहे. यापूर्वी घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या काळात मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. मनपाचे अधिकारी मागील महिनाभर घरोघरी फिरून वसुली करीत होते. ३० मार्चपर्यंत  घरपट्टी ६८.७५ टक्के, तर पाणीपट्टीची ५२.६९ टक्के वसुली झाली. आता वसुलीसाठी मुदतवाढ झाल्याने टक्केवारीत आणखी वाढ अपेक्षित आहे.

महसूल ची विभागवार वसुली

- जमीन महसूल- १० कोटी ८४ लाख

- ‎गौण खनिज- ५ कोटी ५१ लाख

- ‎शासकीय विभाग- ५ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघाला रोखण्यासाठी सेवा दलाची गरज: खैरनार

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देशातील सध्याची सामाजिक स्थिती बिघडत चालली आहे. सत्तांतर झाल्यामुळे आणि देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रोखण्यासाठी देशात आज राष्ट्र सेवा दलाची गरज आहे, असे प्रतीपादन सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश खैरनार यांनी केले.

राष्ट्र सेवा दलाला ६५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शुक्रवारी मालेगावी आयोजित ज्येष्ठ सेवा दल कार्यकर्त्यांच्या सत्कार सोहळ्यात खैरनार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख होते. यावेळी राज्य सचिव नचिकेत कोळपकर, सुनीता गांधी, राजाभाऊ अवसक, ॲड. भास्कर तिवारी, संतोष पवार, शिवराज सूर्यवंशी, स्वाती वाणी, विकास मंडळ आदी उपस्थित होते.

सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक स्वाती वाणी यांनी केले. संतोष पवार यांनी परिचय करून दिला. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना अल्लाउद्दिन शेख म्हणाले, सेवा दलाने संविधांतील धर्मनिरपेक्षतेचे तत्व अंगीकारले असून, वर्षानुवर्ष सामाजिक सलोख्याचे काम केले आहे. आजची देशातील परिस्थिती गंभीर आहे. अनेक सामाजिक समस्यांनी देश घेरला गेला आहे. अशा परिस्थिती सेवा दलाची भूमिका महत्त्वाची असून, सेवा दलाच्या शाखा व कार्यकर्ते वाढले पाहिजे. भविष्यातील तरुण सेवा दल कार्यकर्त्यांना ज्येष्ठ सेवा दल कार्यकर्त्यांचा सत्कार निश्चितच प्रेरणा देईल.

राष्ट्र सेवा दलात आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या चाळीस सेवादल कार्यकर्त्यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला. बाल सैनिकांनी सेवादल गिते सादर करुन प्रबोधन केले. अपश्‍चिम बरंठ यांनी सूत्रसंचालन केले. रविराज सोनार यांनी आभार मानले. प्रवीण वाणी, अशोक फराटे, किरण मोरे, जयेश शेलार यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. या सत्कार सोहळ्यास राष्ट्र सेवा दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सम-विषम’ असून अडचण, नसून खोळंबा

0
0

मटा मालिका- उदासीनतेचा भुर्दंड- ३

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : अरूंद रस्त्यावरील वाहतुकीस शिस्त लागावी म्हणून पोलिसांसह महापालिकेने शहरात दहापेक्षा अधिक भागात सम-विषम पार्किंग सुरू केली. दुर्दैवाने या नियमाचे पालन करण्याबाबत वाहनचालकांसह प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. व्यावसायिक यास खतपाणी घालत असल्याने पीकअवरमध्ये वाहतुकीचा पुरता बोजा उडतो.

शहरात एमजीरोड, देवळाली कॅम्प, भद्रकालीतील प्रमुख रस्ते, वकीलवाडी, गोळे कॉलनी यांसह इतर ठिकाणी सम-विषम पार्किंग सुरू केली आहे. नुकतेच पंडित कॉलनीतील रस्त्यावरही सम-विषम पार्किंग सुरू करण्यात आले. मात्र, नवीन आणि जुन्या अशा कोणत्याही ठिकाणी नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. दुचाकीसाठी राखीव असलेल्या ठिकाणी चारचाकी वाहने उभी केली जातात. याबाबत सूत्रांनी माहिती दिली की, सम-विषम पार्किंग अरूंद रस्त्यासाठी वापरली जाते. विशेषत: व्यावसायिक ठिकाणे असलेल्या अरूंद रस्त्यांवर एकाच बाजूला वाहने उभी राहिल्यास वाहतूक कोंडी होत नाही. तसेच व्यावसायिकांनाही ते फायद्याचे ठरते. मात्र, आजमितीस एमजीरोडसारख्या ठिकाणी व्यावसायिकच मोठी वाहने दुकानासमोर पार्क करतात. पर्यायाने ग्राहकांना मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करून पुढे जावे लागते. अनेक इमारतींना पार्किंगची सुविधाच नाही. पंडित कॉलनीत सध्या हाच अनुभव येत असून, वाहनांची संख्या ज्या गतीने वाढते आहे, त्या दृष्टीकोनातून नियोजन हाती घेणे आवश्यक असल्याचे मत संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केले. वाहतूक पोलिसांकडे वाहने टोइंग करण्यासाठी मोठी वाहने आहेत. परिणामी भद्रकाली, गोळे कॉलनीतील अरूंद रस्त्यांवरील नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होत नाही. वाहने उचलली जात नसल्याने नियमभंग करणाऱ्यांना वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर अशा बाबींचा फरक पडत नाही. पार्किंग, नो पार्किंग तसेच सम-विषम पार्किंग या तीन मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत महापालिका, पोलिस प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी एक येऊन काम केल्यास वाहतुकीबाबत उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांना उत्तर मिळू शकेल.

अध्यादेशावरच थांबते प्रक्रिया

नो पार्किंग, पार्किंग तसेच सम-विषम पार्किंगबाबत महापालिका आणि पोलिस आपल्या अधिकार क्षेत्रानुसार अध्यादेश जाहीर करतात. पण, त्यादृष्टीने आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याच्या कामास मोठा विलंब होतो. परिणामी, वाहनचालकही संबंधित नियमांचे पालन करण्यास तयार होत नाहीत. वास्तविक, वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले गेले नाही, तर स्मार्ट नाशिक ही संकल्पना पूर्णत्वास जाण्याची शक्यता धूसरच ठरते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल-ताशांच्या गजरात हनुमानाचा जयघोष

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भगवे ध्वज हाती घेतलेल्या महिला, वाजंत्रीचा ताल, ढोल-ताशांचा गजर आणि हनुमानाचा जयघोष करणाऱ्या गीतांचा तालावर नाचणारे भाविक अशा भक्तिमय वातावरणात शहर परिसरातून हनुमान जयंतीनिमित्त महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराजांतर्फे मिरवणूक काढण्यात आली.

हनुमानाची भव्य मूर्ती फुलांनी सजविलेल्या रथात ठेवण्यात आली होती. सुरुवातीला सोमेश्वरानंद महाराजांच्या हस्ते, मूर्ती पूजन, पुष्पहार अर्पण आणि आरती करण्यात आली. चौक मंडई येथून मिरवणुकीस सुरुवात झाली. भद्रकाली, दूध बाजार-बादशाही कॉर्नर-धुमाळ पॉइंट-सांगली सिग्नल-मेहेर-अशोक स्तंभ-रविवार कारंजा-मालेगाव स्टँड-रामकुंड येथे आल्यानंतर दुतोंड्या मारुती येथे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत पुढे डीजे, ढोल-ताशा पथक, ध्वज घेतलेल्या महिला, चित्ररथ आणि सोमेश्वरानंद महाराजांचा रथ यांचा समावेश होता. या मिरवणुकीचे मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडी रेकनेरचे दर जैसे थे!

0
0

शुभवार्ता

रेडी रेकनेरचे दर जैसे थे!

सर्वसामान्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बांधकाम क्षेत्रात मंदीचे सावट असल्यामुळे राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ न करता गेल्या वर्षीचे दर कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना त्यातून मोठा दिलासा मिळणार आहे. तर सर्वसामान्यांना घर खरेदी करण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहे.

गेल्या वर्षी राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सरासरी ५.८६ टक्क्यांची वाढ केली होती. या वाढीत ग्रामीण क्षेत्रात ७.१३ टक्के तर प्रभाव क्षेत्रात ६.१२ टक्क्यांची दरवाढ करण्यात आली होती. नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात ५.५६ टक्के, महापालिका क्षेत्रात ४.७४ टक्क्यांची वाढ केली होती. आता हेच दर या आर्थिक वर्षासाठी राहणार आहेत.

शहरनिहाय असे होते दर

गेल्या वर्षी अहमदनगरमध्ये रेडी रेकनरच्या दरांमध्ये ९.८२ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. तर नागपूरसाठी सर्वात कमी म्हणजे १.५० टक्के वाढ केली होती. मुंबईत ३.९५, ठाणे ३.१८, पुणे ३.६४, नाशिक ९.३५ टक्के वाढ करण्यात आली होती. आता हेच दर कायम राहणार आहे.

रेडी रेकनर म्हणजे काय?

जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी व्यवहाराच्या नोंदणीसाठी राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क आकारले जाते. त्यासाठी रेडी रेकनेरचे दर महत्त्वाचे असतात. दरवर्षी हे दर बदलले जाते. रेडी रेकनरमध्ये बांधकामाचा प्रकार, स्थळ यावरुन मालमत्तेचे दर कमी आधिक ठरवले जातात. त्यासाठी जमीन आणि इमारतीचे विभागनिहाय वार्षिक बाजारमूल्य ठरवले जाते. त्यालाच रेडी रेकनर म्हटले जाते.

निवडणुकांसाठी सबुरी

देशात लोकसभा निवडणुकांचे वारे सुरू झाले आहे. त्यामुळे सरकारने रेडी रेकनेरच्या दरात वाढ केली असती तर त्यातून ओरड झाली असती. त्यामुळे सरकारने सबुरीचा मार्ग स्वीकारत या दरात कोणतीही वाढ केली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला स्वस्त दरात घर उपलब्ध व्हावे यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे रेडी रेकनरच्या दरात वाढ केली असती तर त्याचा परिणाम झाला असता. त्यामुळे सरकारने दर जैसे थे ठेऊन सकारात्मक पाऊल उचलले. त्यामुळे सर्व सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल.

-अविनाश शिरोडे, बांधकाम व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रेशमाच्या रेघांनी’ प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद

0
0

'रेशमाच्या रेघांनी'

प्रदर्शनास प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कलेचा ध्यास आणि कलानिर्मितीची उर्मी माणसाला ऊर्जा देते. त्यातूनच नवनव्या कलाकृती निर्माण होतात. व्यावासायिक शिक्षण कोणतेही घेतले असले तरी कलेचा छंदच जगण्याचे साधन बनतो. सुवर्णा परांजपे यांनी अभियांत्रिकी शिक्षण घेतले असले तरी नंतरच्या काळात रेशमापासून त्यांनी सुंदर कलाकृती निर्माण केल्या. अशा कलाकृतींचे 'रेशमाच्या रेघांनी' हे प्रदर्शन नामदेव प्रासाद येथे भरविण्यात आले आहे.

गंगापूर रोडवरील विद्याविकास सर्कल चौकाजवळ नामदेव प्रासाद येथे हार्मनी आर्ट गॅलरीत हे रेशमाच्या रेघांनी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कलाउद्योजिका सुनंदा चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अधयक्षस्थानी विजया रवळगावकर होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून मानसी देशमुख उपस्थित होत्या. सुवर्णा परांजपे यांनी रंगबेरंगी मणी आणि सजावट साहित्य वापरून आकर्षक रांगोळ्या, शो पीस, किचेन्स व विविध देखण्या वस्तुंची निर्मिती केली आहे. या वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन १ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते १.३० व सायंकाळी ४.३० ते ८.३० दरम्यान सर्वांसाठी विनामू्ल्य खुले आहे. प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन हार्मनी आर्ट गॅलरीतर्फे राजा पाटेकर व प्रा. बाळ नगरकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैत्र पौर्णिमेनिमित्त देवी मंदिरांमध्ये गर्दी 

0
0

चैत्र पौर्णिमेनिमित्त

दर्शनासाठी गर्दी 

​देवळाली कॅम्प  : चैत्र पौर्णिमेचे औचित्य साधत रेस्ट कॅम्प रोडवर असणाऱ्या जागृत रेणुकामाता मंदिरात कविता व संदीप जाखडे यांच्या हस्ते मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. दरम्यान दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.  पहाटे मंदिराच्या कळसावर येथील पुजारी चिंगरे  कुटुंबियांच्या वतीने लाल ध्वज फडकविण्यात आला. दरम्यान भगूर येथील देशमुख परिवाराकडील रेणुका मातेच्या उत्सव मूर्तीची भेट करण्यासाठी येथे आणण्यात आली. येथील माळावरची देवी म्हणून जागृत देवस्थान असलेल्या महालक्ष्मी मंदिरात सोपान गडाख व पंढरीनाथ आडके  यांच्या हस्ते  महाआरती व महाप्रसादाचे वाटप  करण्यात आले.  यावेळी कळसावर  ध्वज फडकविण्याचा मान सूर्यवंशी कुटुंबियांना असून त्यांनी मंदिरावर भगवा ध्वज फडकविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चैत्रोत्सवाने फुलला सप्तशृंगगड…...

0
0

चैत्रोत्सवाने फुलला सप्तशृंगगड…...

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवानिमित्त शुक्रवारी गडावर कीर्तिध्वज फडकला. चैत्रोत्सव, या ध्वजाची मिरवणूक, तृतीयपंथीयांची छबीना मिरवणूक अनुभवण्यासाठी राज्यभरासह मध्य प्रदेश, गुजरात आदी ठिकाणचे सात ते आठ लाख भाविक दर वर्षी गडावर येतात. यंदाही चार दिवसांच्या उत्सवात असेच चित्र दिसून आले. त्याचा चित्रवत्ताद्वारे घेतलेला वेध…

छायाचित्रे : सतीश काळे

(चित्रवृत्त लीड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केटीवेअरसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागण्यासाठी नगरपरिषदेच्या हद्दीत आरम नदी पात्रात महालक्ष्मी मंदिराच्यामागे, जिजामाता उद्यानालगत व मोरेनगर हद्दीत केटीवेअर बांधण्यासाठी विशेष निधी द्यावा, अशी मागणी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आरम नदीपात्रातील नोटीफिकेशन शासनाने उठविल्यामुळे केटीवेअर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यानच्या काळात आरम नदीपात्रात या कामाचे ट्रायलही घेण्यात आले होते. परंतु सरकारी मापदंडात बसत नसल्यामुळे जास्त निधीची आवश्यकता असल्याचे सुचविण्यात आले होते. त्यामुळे या कामासाठी शासनाकडून विशेष निधी मिळण्यासाठी डॉ. भामरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेवून ही मागणी केली आहे.

आरम नदीवर केटीवेअर होण्यासाठी सटाणा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे व शहरातील शिष्ठमंडळांनी वेळोवेळी भामरे यांच्याकडे मागणी केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेवून विशेष निधी मंजूर करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस-१एप्रिल

0
0

वाढदिवस-१ एप्रिल

डॉ. हरीश आडके, प्राचार्य

अविनाश शिरोडे, इंजिनीअर

संजय चव्हाण, पदाधिकारी, शिक्षक सेना

बाजीराव कावळे, माजी अध्यक्ष, कादवा साखर कारखाना

एस. एच. बंब, सदस्य, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स

वीरेंद्र शाह, अध्यक्ष, प्रो-सिव्हिल इंजि. असो., मालेगाव

सुधाकर सोनकुसळे, कामगार नेते, बँक ऑफ महाराष्ट्र

रमेश कडलग, अध्यक्ष, वृत्तपत्र लेखक संघ

माधव जाजू, माजी अध्यक्ष, निपम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचे २७ एप्रिलला पुणे येथे जेलभरो

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सरसकट कर्ज माफी द्यावी, वीज बिल माफ करा, उत्पादन खर्चाच्या दीडपड भाव द्या, निर्यात बंदी उठवा यासह विविध मागण्यासाठी सांगलीहून निघालेली शेतकरी संघटनांची सुकाणू समितीची राज्यव्यापी हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागृती यात्रा रविवारी नाशिकमध्ये दाखल झाली. यावेळी सुकाणू समितीचे संयोजक व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी २७ एप्रिल रोजी पुणे येथे जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा केली.

सांगली येथून २३ मार्चला निघालेली शेतकरी जागृती यात्रा बेळगांव, कोल्हापूर, सिंधदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर येथून ती नाशिकला पोहचली. त्यानंतर ही यात्रा संपूर्ण राज्यभरात फिरून २७ मार्च रोजी पुणे येथे जाणार असून, तेथेच समारोप करुन हे जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. सरकारने दीड लाखाची कर्जमाफी देऊन धुळफेक केली. त्यात किचकट अटी टाकल्या त्यामुळे ही कर्जमाफी आहे की, कर्जवसूली असा प्रश्नही निर्माण झाल्याचे पाटील म्हणाले. एकीकडे सरकार उत्पादनात वाढ करण्याचे आवाहन करते व दुसरीकडे आहे त्या पिकाला भाव मिळत नाही. राज्यात सरकार बदलते पण धोरण तेच आहे. त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला आहे. ही धोरणे बदलावी यासाठी आता हा संघर्ष असल्याचेही रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

३२ वर्षात ७५ हजार आत्महत्या

राज्यात पहिली आत्महत्या १९८६ साली यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे यांनी आपल्या कुटुंबियांसह सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे केली. त्यानंतर ३२ वर्षात ७५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण, सरकार या आत्महत्येकडे गांभीर्याने बघत नसल्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्याचे काम ही यात्रा करणार आहे. या यात्रेत विविध मागण्यांबरोबरच विविध आंदोलनात हुतात्मा झालेल्यांचे अभिवादन केले जात असल्याची माहिती पाटील यांनी दिली. यावेळी सुकाणू समितीचे सुशीला मोराळे, राजू देसले, गणेश कदम, करण गायकर, प्रभाकर वायचले यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अभिवादन व सभा

शेतकरी जनजागृती यात्रा नाशिकला आल्यानंतर सकाळी हुतात्मा स्मारकला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभा घेण्यात आली. त्यावेळेस शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती. सोमवारी ही यात्रा नंदुरबारला जाणार आहे.

शिवडे येथे सभा

समृध्दी महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाला विरोध करुन राज्य सरकारचे लक्ष वेधणाऱ्या शिवडे येथेही यात्रा सायंकाळी ६ वाजता गेली. येथे सभा झाल्यानंतर जिल्ह्यातील या यात्रेचा समारोप झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चीनचे स्पेस स्टेशन भारतावर कोसळण्याची अफवा!

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

चीनचे स्पेस सेंटर रविवारी रात्री किंवा सोमवारी पहाटे मुंबईसह इतर शहरांत कोसळेल. यातून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत अनेक चर्चांना रविवारी उधाण आले होते. मात्र, चीनचे स्पेस सेंटर स्पेन, युरोप आणि साऊथ कोरिया या देशांच्या भागात कोसळणार आहे. यामुळे भारताला कोणताही धोका नाही. भारतात स्पेस सेंटर कोसळेल ही अफवा ठरली.

चीनचे टीयाँगाँग हे स्पेस सेंटर नाशिक, मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागातही कोसळेल, अशी शक्यता वर्तवणारे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे स्पेस सेंटर आज (२ एप्रिल) रोजी पहाटे पृथ्वीवर कोसळण्याची चिन्हे आहेत. यातील गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर या ठिकाणी हे स्पेस सेंटर कोसळण्याची चर्चा आहे. मात्र, स्पेस स्टेशनचा वेग पाहता ते नेमके कुठे कोसळेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. असे संदेश सोशल मीडियावर मिळत असल्याने दिवसभर वेगवेगळ्या अफवांना ऊत आला. मात्र, या संदर्भात नासा स्पेस एज्युकेटर्स अपूर्वा जाखडी यांना विचारले असता, त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितले. चीनने आपले स्वतंत्र स्पेस सेंटर अवकाशात पाठवले होते. हे सेंटर मार्चच्या शेवटी केव्हाही पृथ्वीवर कोसळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. यानंतर अनेक अफवांचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली. याचनुसार १ एप्रिल किंवा २ एप्रिल रोजी हे स्पेस सेंटर भारतात मुंबई, तसेच इतर भागात कोसळेल, असे मेसेज व्हायरल केले गेले. मात्र, स्पेस सेंटर कोसळण्याचा धोका स्पेन, युरोप आणि साऊथ कोरियालाच सर्वाधिक आहे. स्पेस सेंटरचा कंट्रोल खराब झाला असला तरीही ते समुद्रातच कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे त्या देशांतील मानवसृष्टीलाही याचा धोका होणार नाही, असे जाखडी यांनी स्पष्ट केले.

चीनचे स्पेस सेंटर कुठे कोसळेल, याकडे अनेकांचे लक्ष आहे. मात्र, या सर्व सेंटर्सचा अहवाल आणि वर्तवलेल्या शक्यतेनुसार भारताला कोणताही धोका नाही. वाऱ्यातील बदलता वेग लक्षात घेता चीनचे स्पेस सेंटर स्पेन, युरोप किंवा दक्षिण भागातील देशांत कोसळू शकते.

- अपूर्वा जाखडी, नासा स्पेस एज्युकेटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images