Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राष्ट्रवादीची सटाण्यात गांधीगिरी

$
0
0

म.  टा. वृत्तसेवा, सटाणा 

सटाणा-चौगाव रस्ताची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याबाब जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने मंगळवारी संतप्त नागरिकांसह सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या खड्ड्यांमध्ये रोपे लावून आंदोलन करण्यात आले. राजेंद्र सोनवणे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले.

सटाणा-चैगाव रस्ता अत्यंत खराब व निकृष्ट झाला आहे. या रस्यावरून दररोज हजारो नागरिक, शालेय विद्यार्थी प्रवास करतात. याच मार्गावर नववसाहत तयार होत आहे. हा रस्ता बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. मात्र या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कोणीही बोलायला तयार नाही. बांधकाम विभागाला याबाबत वारंवार सूचना, पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याने मंगळवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, बाजार समितीचे माजी  सभापती भिका नाना सोनवणे, रत्नाकर सोनवणे, माजी सरपंच केशव माडवडे, भास्कर सोनवणे यांनी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये रोपे लावून आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येवल्यात तासभर ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला 

कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी राज्यभरातील दलितांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी, आदी मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर 'घंटानाद' आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी सुमारे तासभर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली.

पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पगारे व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब आहिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कोरेगाव भीमा प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही संभाजी भिडे यांना सरकारकडून जावयाप्रमाणे वागणूक दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांनीच त्यांना क्लीन चीट दिली. दुसरीकडे येवला तालुक्याचे आमदार छगन भुजबळ यांना फक्त चौकशीच्या नावाखाली दोन वर्षांपासून तुरुंगात डांबून ठेवले आहे, असा आरोप संजय पगारे यांनी केला. आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुदाम पडवळ, फरीद शेख, अशोक मोहारे, कैलास वैद्य, संदीप गायकवाड, सुरेश गुजर, पोपट खडांगळे, आनंदा आहिरे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेसच्या भूखंडावर गवताला आग

$
0
0

शहरात ८७ नवीन केंद्रे -२

डीपीरोडचे भिजत घोंगडे -३

लोकसहभागावर तरलेले अक्षरब्रह्म वाचनालय -४

रायगड : एक स्वप्नानुभूती -५

अनामिक आजाराच्या संसर्गाची दहशत -६

--

प्रेसच्या भूखंडावर गवताला आग (फोटो)

जेलरोड : नाशिकरोड पोलिस ठाण्यामागील प्रेसच्या भूखंडावरील गवताला मंगळवारी दुपारी आग लागली. दोन आठवड्यांपूर्वी गोरेवाडी रस्त्यावर बांबूच्या वनात आग लावण्यात आली होती. हे दोन्ही प्रकार खोडसाळपणातून झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मेन गेटजवळ प्रेसचा मोकळा भूखंड असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत व पालापाचोळा आहे. दुपारी एकच्या सुमारास या ठिकाणी चारही बाजूला अचानकपणे गवताने पेट घेतला. त्यामुळे आगीचे व धुराचे लोट दिसत होते. रहिवासी इमारती या धुरामुळे झाकोळल्या गेल्या. महापालिका व प्रेसचे अग्निशामक दलाच्या तीन बंबांद्वारे सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले.

पंचवटीत दंडवसुली

पंचवटी : पंचवटी विभागातील हनुमानवाडी, मधुबन कॉलनी, मखमलाबादरोड आदी परिसरात आरोग्य विभागाच्या पथकाने ओला व सुका कचरा विलगीकरण आणि प्लास्टिक कॅरिबॅग वापरासंदर्भात पाहणी केली. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून २६ हजार ६८० रुपये दंड वसूल करण्यात आला. तीन नागरिकांकडून ओला व सुका कचरा विलगीकरण केला नसल्याने ५०० रुपयांप्रमाणे दीड हजार रुपये, तर दोन व्यावसायिकांकडून १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. पंचवटी सुपर मार्केटमध्ये १० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून पाच हजार रुपये दंड करण्यात आला. धनाईत लॉन्स येथे कचरा जाळल्याने पाच हजार रुपये दंड करण्यात आला. मोहिमेत विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक उदय वसावे, किरण मारू, आर. ए. शेख, दीपक गायकवाड, किरण काळे आदींनी सहभाग घेतला.

तिदमेंविरोधात गुन्हा

सिडको : शिवसेनेचे नगरसेवक बंटी तिदमे व मनसेचे कार्यकर्ते अक्षय खांडरे यांच्यात शिवाजी चौक परिसरात झालेल्या हाणामारीनंतर अंबड पोलिसांनी या दोघांविरोधात परस्परविरोधी तक्रार दाखल करून अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. या दोघांचे भांडण पूर्वीच्या वादातून झाले असले, तरीसुद्धा यात पूर्वी समोरासमोर निवडणूक लढविल्याचाच वाद असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सोमवारी रात्री नगरसेवक बंटी तिदमे, विजय लहामगे व राजेंद्र मोहिते यांनी अक्षय खांडरे यास शिवाजी चौक परिसरात बोलावून घेतले. या ठिकाणी तो आल्यानंतर त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर खांडरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याच प्रकरणात उज्ज्वला पाटील यांनीही पोलिसांत तक्रार देऊन चेतन यास अक्षय खांडरे यांनी मारहाण केल्याचे नमूद केल्याने पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

\B(पॉइंटर्स आणि थोडक्यात)\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षुल्लक पैशांच्या आमिषापायी गमावले २८ लाख!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहा रुपयाच्या पाच नोटा खाली पडल्याचे सांगत सहा ते सात चोरट्यांनी संगनमत करून तब्बल २८ लाख रुपयांची बॅग हातोहात लंपास केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास गंगापूर रोडवरील मॉडर्न कॅफेसमोरील सारस्वत बँकेत घडली असून, सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत.

कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ या दुकानातील कर्मचारी प्रशांत भास्कर वाणी (वय ३७) व त्यांचे तीन सहकारी नेहमीप्रमाणे दुकानाचे पैसे भरण्यासाठी मंगळवारी सारस्वत बँकेत आले. त्यांच्याकडे तब्बल ३३ लाखांची रोकड होती. यातील तीन कर्मचारी कॅशिअर काउंटरवर थांबून चलन भरत होते, तर वाणी यांच्या ताब्यात पैशांची बॅग होती. साधारणत: पाच लाख रुपयांची रोकड कॅशिअरने मोजून घेतली. उर्वरित पैशांची नाणेवारी करण्याचे काम सुरू असताना वाणी यांच्याजवळच उभ्या असलेल्या व्यक्तीने पैसे पडल्याचे सांगितले. वाणी यांनी २८ लाख ६४ हजार २६८ रुपये असलेली बॅग खुर्चीवर ठेवून दहा रुपयाच्या पाच नोटा उचलण्यासाठी वळले. पैसे गोळा करून पुन्हा खुर्चीकडे वळले असता, वाणी यांना पैशांची बॅगच गायब झाल्याचे लक्षात आले. याबाबत आरडाओरड सुरू होऊन बँकेचे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक सावध होईपर्यंत चोरटे तेथून पसार झाले. घटनेची माहिती समजताच पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त राजू भुजबळ, क्राइम ब्रँच युनिट एकचे निरीक्षक आनंदा वाघ, गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. डी. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरीचा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिस त्याआधारे चोरट्यांचा माग काढत आहेत. याबाबत बोलताना क्राइम ब्रँचचे सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांनी सांगितले, की घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्वरित नाकाबंदी करण्यात आली. या गुन्ह्यात सहा ते सात आरोपी सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. एकाने पैसे टाकले, दुसऱ्याने ही माहिती कर्मचाऱ्यास दिली आणि माहिती देणाऱ्यानेच काही सेकंदात बॅग लंपास केली. चोरट्याच्या इतर साथीदारांनी बॅग उचलणारा दिसू नये, यासाठी वाणी यांच्याभोवती कोंडाळे केले होते. चोरीच्या घटनेनंतर तीन संशयित विद्याविकास सर्कलकडे पायी गेल्याचे, तर उर्वरित रस्ता ओलांडताना सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट झाले आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेजदेखील तपासण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी गंगापूररोड पोलिस स्टेशनमध्ये कलम ४२०, ३४, तसेच ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गंगापूर पोलिस स्टेशनसह क्राइम ब्रँचचे तिन्ही युनिट चोरट्यांच्या मागावर आहेत.

५० रुपयांचे आमिष भोवले

अवघ्या ५० रुपयांचे आमिष दाखवून चोरट्यांनी २८ लाखांच्या रकमेवर डल्ला मारला. चोरट्यांनी दहा रुपयाच्या पाच नोटा खाली टाकल्या होत्या. एवढी मोठी रक्कम जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीने थोडीशी काळजी घेतली असती तर हा प्रकार टळला असता. शहरात यापूर्वी अशा पद्धतीने झालेल्या बॅग लिफ्टिंगच्या घटनांमध्ये असाच प्रकार झाला असून, आपल्याजवळ मोठी रक्कम असल्यास आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सुरक्षा रक्षकांच्या गप्पा

ही घटना घडली तेव्हा बँकेत सुरक्षारक्षक तैनात होता. बँकेत गर्दीदेखील होती. मात्र, सुरक्षारक्षक गर्दीतच काउंटरवर गप्पा मारत होता, असे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. वास्तविक गर्दीच्या वेळी, तसेच जास्त पैशांचा भरणा करणाऱ्या खातेदारांकडे सुरक्षा रक्षकांनी लक्ष ठेवायला हवे होते. सुरक्षारक्षक चौकस पद्धतीने मुख्य दरवाजावर काम करीत असता तर बॅग घेऊन जाणाऱ्या चोरट्याला अटकाव बसला असता. याबाबत बँकांना वेळोवेळी सूचना केल्या असल्या तरी बँकांचा निष्काळजीपणा कमी होत नसल्याची उद्विग्नता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांनी दिल्या बिझनेस टिप्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात प्रथमच मराठा उद्योजक लॉबीतर्फे जिल्हा मराठा उद्योजक मेळावा औरंगाबाद रस्त्यावरील वरदलक्ष्मी लॉन्समध्ये घेण्यात आला. यावेळी विविध उद्योजकांनी व्यवसायाच्या टिप्स दिल्या.

मेळाव्याचे उद्घाटन नगरसेवक उद्धव निमसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे, प्रदेश अध्यक्ष सुदर्शन झिंजुर्डे, प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल काळे, प्रदेश सरचिटणीस अमोल महाडिक, श्रावण दिवटे, नीलेश नेरे आणि श्रीओम पाटील उपस्थित होते.

व्यवसाय स्थापना, कर्ज, मार्केटिंग, येणाऱ्या अडचणी आदी विषयांवर अध्यक्ष बढे यांनी मार्गदर्शन केले. जैविक नॅपकिन्सची निर्मिती करणारे उद्योजक स्टेपअपचे संचालक स्वप्नील शिरसेकर यांनी उद्योगाची यशोगाथा मांडली. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यवसायातील यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही त्याला अमाप कष्ट लागतीलच, असे सांगितले. यावेळी अरविंद फाजगे पाटील, करूणा धामणे, संगीता हेगडे, प्रशांत देवरे, मानसी शिंदे आदींसह विविध उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची माहिती दिली. मेळाव्यास नाशिक जिल्ह्यासह धुळे, साक्री, संगमनेर, पुणे, मुंबई आदी भागातील समाजबांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेरणादिनानिमित्त आज व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिरमध्ये कै. वसंतराव पवार यांच्या जयंती दिनानिमित्ताने बुधवारी (दि. ४) प्रेरणा दिन साजरा करण्यात येत आहे. याच अंतर्गत 'इवलेसे रोप लाविलीये दारी. पोषक पालकत्व' या विषयावर डॉ. वृशिनीत सौदागर यांचे व्याख्यान होणाार आहे.

मुलांच्या शारीरिक, मानसिक व शिक्षण विषयक समस्यांवर पालाकांचे ते समुपदेशन करणार आहेत. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी (दि. ४) सकाळी ९ ते साडेअकरा या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पालकांना आहाराविषयक पुस्तिका दिली जाणार आहे. तसेच आजारांवर घरगुती प्राथमिक उपचारांची माहिती असणार आहे. या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीस हजारांची सिडकोत दंडवसुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

महापालिकेकडून सध्या ओला व सुका विलगीकरण करून न देणाऱ्यांबरोबरच प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी सिडको विभागाने चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिडको विभागात ओला व सुका कचरा विलगीकरण करून देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर आता महापालिकेतर्फे असा कचरा वेगळा न करून देणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी आरोग्य विभागाने दहा जणांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड केला. त्याचबरोबर ज्या व्यावसायिकांनी कचरा वेगळा करून दिला नाही, अशा व्यावसायिकांना प्रत्येकी दहा हजार रुपये दंड करण्यात आला आहे. सिडकोतील तीन व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई स्वच्छता निरीक्षक बी. आर. बागुल, रविकिरण जाधव, अशोक दोंदे व दीपक लांडगे यांनी केली. प्लास्टिक वापरणाऱ्या एका व्यावसायिकालासुद्धा पाच हजार रुपये दंड करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.  या तीनही ठिकाणच्या कारवाईत डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, स्वच्छता निरीक्षक आर.आर. पवार, आर. जाधव, आर.डी. मते, स्वामी अभंग, रावसाहेब रुपवते, सुभाष इंगळे, राजू गायकर, बाळासाहेब जेजूरकर आदींनी सहभाग घेतला.

(अँकरशेजारी सिंगल)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा विलगीकरणासह पाठवा आपला सेल्फी

$
0
0

यतीश भानू, आरटीओ ऑफिस, पेठरोड

--

कचरा विलगीकरणासह पाठवा आपला सेल्फी

शहरात दि. १ एप्रिलपासून ओला आणि सुका कचरा विलगीकरण करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक घरापासून ते व्यावसायिकांपर्यंत साऱ्यांनाच आता कचरा विलगीकरण करणे क्रमप्राप्त झाले आहे. याचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर राहावे, कचऱ्याचा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला जावा यासाठीच ओला आणि सुका कचरा विलगीकरण करणे आणि तो घंटागाडीत देणे आवश्यक बनले आहे. आपणही ओला आणि सुका कचरा विलगीकरण करण्यास प्रारंभ केला असेल, तर त्याचा सेल्फी आम्हाला पाठवू शकता. हा सेल्फी mataanashik@gmail.com या इ मेल आयडीवर तातडीने पाठवा. कचऱ्याचे विलगीकरण करून आपण सुंदर आणि स्वच्छ नाशिकसाठी हातभार लावू या!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीई प्रवेशासाठी आज अखेरची मुदत

$
0
0

१,१४७ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क प्रक्रियेच्या (आरटीई) पहिल्या सोडतीत ३००१ विद्यार्थ्यांची नावे लॉटरी पद्धतीने जाहीर करण्यात आली होती. यातील १८११ विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेश झाले असून अद्याप ११४७ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे.

आरटीई प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बुधवारी (दि. ४) अखेरची मुदत आहे. मुदतीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी या फेरीतून अपात्र ठरणार आहेत. दरम्यान, ३००१ या विद्यार्थी संख्येतून ४३ विद्यार्थी कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे अपात्र ठरली आहेत. गरजू व वंचित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'आरटीई' ही प्रक्रिया महत्त्वाची असून अनेक विद्यार्थ्यांना यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी मिळते. या प्रक्रियेची पहिली सोडत गेल्या महिन्यात काढण्यात आली असून त्याची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यामध्ये १,१४७ विद्यार्थी बाकी असून अनेक पालकांनी आवडीची शाळा न मिळाल्याने प्रवेशाकडे दुर्लक्ष केल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट कार्ड वाटपास पुन्हा प्रारंभ

$
0
0

जुन्या आरसी बुकधारकांनाही परिवहन विभागाचा दिलासा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागील तीन वर्षांपासून बंद झालेले वाहनांचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी बुक) स्मार्ट कार्डद्वारे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे कागदी आरसी बुक बाळगणाऱ्या वाहनधारकांनाही नवीन आरसी बुक मिळणार आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने २००७ मध्येच डिजिटल युगात प्रवेश करीत स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात केली होती. मात्र, खासगीकरणातून सुरू झालेले हे काम कंत्राटदाराशी निर्माण झालेल्या वादामुळे साधारणत: तीन वर्षापूर्वी बंद झाले होते. त्यामुळे या काळात कागदी आरसी बुकचे वाटप करण्यात आले. त्यातही अनेकदा कागदाची कमतरता असल्याने आरसी बुक वेळेत मिळत नव्हते. बराच विलंब होत असल्याने वाहनमालक त्रस्त झाले होते. ही कोंडी फोडून आरटीओने पुन्हा डिजिटल आरसी बुकची वाट धरली. मंगळवारी पहिल्याच दिवशी ३३ स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात दरवर्षी लाखापेक्षा अधिक वाहनांची नोंदणी होते. स्मार्ट कार्डद्वारे मिळणारे आरसी बुक टिकाऊ आणि सोयीचे ठरते.

पूर्वीपेक्षा किंमत स्वस्त

२००७ ते जवळपास २०१५ या काळात स्मार्टकार्ड घेणाऱ्यांना ३९४ रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता कंत्राटदार बदलला असून नव्या तंत्रज्ञानामुळे छपाईचा खर्चही कमी झाला आहे. त्यामुळे यापुढे या कार्डसाठी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. कार्डमध्ये केलेल्या काही बदलांमुळे शुल्क कमी केल्याची माहिती 'आरटीओ'तील सूत्रांनी दिली. नवीन नोंदणी झालेल्या वाहनांसाठी आरसी बुक स्मार्ट कार्डच्याच स्वरूपात मिळणार असून, जुन्या वाहनधारकांनाही एक अर्ज व शुल्क भरून नवीन कार्ड घेता येणार आहे.

ही सुविधा

नवीन स्मार्टच्या दोन बाजू असून, पुढील बाजुस व्हिज्युअल रेडीएबल झोन (व्हीआरझेड) असणार आहे. पुढील बाजुची माहिती डोळ्यांना दिसू शकते. तर कार्डची मागील बाजू मशिन रेडीएबल झोन (एमआरझेड) आहे. भविष्यात पुढील बाजू अस्पष्ट झाली तरी, मागील बाजूस असलेली माहिती मशिन्सच्या सहाय्याने स्पष्ट होणार आहे. आता सध्या पोलिस तसेच 'आरटीओ'कडे असे मशिन्स उपलब्ध नाहीत. मात्र, स्मार्ट कार्डचा वापर वाढल्यास अशा मशिन्स या विभागासाठी उपलब्ध करून देण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रकुलमध्ये सुवर्णवेध घेण्यास भारत सज्ज

$
0
0

सुवर्णवेध घेण्यास भारत सज्ज

आज गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेचे बिगुल वाजणार

वृत्तसंस्था, गोल्ड कोस्ट

áटोकियोत २०२०मध्ये होणारे ऑलिम्पिक, त्याआधी, यावर्षी होत असलेली आशियाई क्रीडा स्पर्धा यादिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी पहिले पाऊल पडते आहे ते गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे होत असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या माध्यमातून. ४ ते १५ एप्रिल या कालावधीत सुमारे १८ क्रीडा प्रकारांसाठी ७१ देशांचे खेळाडू या चार वर्षांनी आयोजित सोहळ्यात सहभागी होत आहेत. ग्लासगोतल्या राष्ट्रकुल स्पर्धेतले अपयश धुवून काढत भारतीय खेळाडूंना दिल्लीतल्या घवघवीत यशाची पुनरावृत्ती करायची आहे.

भारताच्या २१८ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असून स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडू राहत असलेल्या ठिकाणी सापडलेल्या सुयांमुळे भारतीय खेळाडूंवर संशयाची सुई होती. मात्र, हा वाद आता मागे पडला असून, आजपासून (बुधवार) सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेला संपूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यास भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. भारताला यावेळी २५ ते ३० सुवर्णपदकांची अपेक्षा आहे.

भारताला सर्वाधिक पदकांची अपेक्षा आहे ती नेमबाजांकडून. नुकत्याच झालेल्या सीनियर आणि ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. हीना सिद्धू ही २५ मीटर पिस्तूल, १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सहभागी होत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत तिने तीन सुवर्णपदके मिळवली होती. १६ वर्षीय मनू भाकरच्या कामगिरीकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. जितू रायला सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. अॅथलेटिक्समध्ये भारताची आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही. गेल्या वर्षीच्या तीन पदकांपेक्षा या वेळी अॅथलेटिक्स चांगली चमक दाखवतील, असा विश्वास भारताकडून व्यक्त करण्यात आला आहे. यात सुवर्णपदकाची अपेक्षा आहे, ती २० वर्षीय भालाफेकपटू नीरज चोप्राकडून. बॅडमिंटनमध्ये भारताची भिस्त पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत यांच्यावर असणार आहे. बॉक्सिंगमध्ये मेरी कोम, सरीता देवी, विकास कृष्णन हे भारताला निश्चित पदक मिळवून देतील, अशी त्यांची तयारी झाली आहे. कुस्तीत भारताच्या पथकात सुशीलकुमार, साक्षी मलिक, विनेश फोगट अशी मोठी नावे आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूकडून (४८ किलो) सर्वाधिक अपेक्षा आहेत. त्याव्यतिरिक्त हॉकी, स्क्वॉश, जिम्नॅस्टिक्स, टेबलटेनिस अशा खेळांकडूनही भारताला अपेक्षा आहेत. भारताला प्रमुख आव्हान असेल ते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड कॅनडा, न्यूझीलंड, द. आफ्रिका, स्कॉटलंडच्या खेळाडूंचे.

स्पर्धास्थळ : गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया

स्पर्धा कालावधी : ४ ते १५ एप्रिल

भारताचे खेळाडू २१८

भारताची ध्वजवाहक : पी. व्ही. सिंधू

एकूण २७५ सुवर्णपदके

६,६०० पेक्षा जास्त खेळाडू

७१ देश

१८ क्रीडाप्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची मुख्यमंत्र्यांकडे दाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नव्या मालमत्तांसंदर्भात लागू केलेल्या पाचपट रेटेबल व्हॅल्यूच्या निर्णयासह जुन्या मिळकतींच्या रिक्त जमिनीवर लावलेल्या करामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकही धास्तावले आहेत. हा निर्णय भाजपच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवास्तव घरपट्टीवाढीच्या आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली.

महापालिकेत परंपरेचे पालन होताना दिसत नसल्याचे सांगत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन यावर तोडगा काढायला हवा होता, असे सानप यांनी स्पष्ट केले. करवाढीच्या या निर्णयाशी भाजप सहमत नसल्याचे सांगत दहा दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कैफियत मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त मुंढेंनी महापालिकेने मिळकत सर्वेक्षणात नव्याने आढळून आलेल्या ५८ हजार मिळकतींसह नव्याने निर्माण होणाऱ्या मिळकती, वाढीव बांधकामे, वापरात बदल, भाडकेरू व जमिनी आदींचे करयोग्य मूल्य अर्थात, घरपट्टी आकारणीचे दर १ एप्रिलपासून ४० पैसे प्रतिचौरस मीटरवरून २ रुपयांपर्यंत वाढविले आहेत. १ एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या या दराने निवासी वापराच्या इमारतींच्या मूल्यांकन दरात पाच पटींपर्यंत, तर अनिवासी अर्थात, व्यावसायिक मालमत्तांच्या मूल्यांकन दरात चौपट वाढ करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रातील मोकळे भूखंड आणि इमारत, सोसायटी, बंगल्याला लागून असलेल्या व बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी सोडलेल्या रिकाम्या जमिनीवरही आता घरपट्टी लागू करण्यात आली आहे. या निर्णयावरून भाजपमध्ये अस्वस्थता परसरली असून, शिवसेना आक्रमक झाली आहे. आयुक्तांच्या या निर्णयांवरून माध्यमांना टाळणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या करवाढीविरोधात अखेर तोंड उघडत भाजपमधील अस्वस्थता बोलून दाखविली. महापौर रंजना भानसी यांनी कर आणि दरवाढ करण्याचा अधिकार महासभेला असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवण्याची विनंती आयुक्तांना केल्याचे यावेळी सांगितले. आम्ही नागरिकांसोबत असून, नागरिकांना त्रास होणार नाही, असा निर्णय घेणार असल्याचे भानसी यांनी स्पष्ट केले. अधिकार आयुक्तांचे असले, तरी हा विषय महासभेवर येणे आवश्यक होते. परंतु, असे झाले नसल्याने आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कामकाजच चुकीच्या दिशेने

आमदार बाळासाहेब सानप यांनी महापालिकेत परंपरेने कामकाज होत नसल्याचे सांगत कामकाजच चुकीच्या दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्रित येऊन निर्णय घेतले पाहिजेत. शहर अगोदरच विकासाच्या बाबतीत मागे पडले आहे. त्यामुळे यावर धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. या निर्णयाशी भाजप सहमत नसून, आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले. मोकळ्या भूखंडांवर करवाढीचे डॉकेट महापौर असताीनाच मंजूर केले होते. त्यात फक्त रिकाम्या भूखंडांचाच समावेश होता. परंतु, आता सरसकट सगळ्या जमिनीवर कर लावणे योग्य नसल्याचे सांगत शहरहिताच्या विरोधातील निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आठ-दहा दिवसांत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन याबाबत तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धोरणात्मक निर्णयासाठी हा विषय महासभेवर येणे अपेक्षित होते. परंतु, आयुक्तांनी आपल्याच अधिकारात असल्याचे सांगत महासभेला टाळले आहे. आम्ही या निर्णयाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत.

-रंजना भानसी, महापौर

महापालिकेत सध्या परंपरेने कामकाज होत नसल्याचे चित्र आहे. करवाढीच्या या निर्णयाशी आम्ही सहमत नसून, याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहोत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रित निर्णय घ्यावेत.

-बाळासाहेब सानप, आमदार तथा शहराध्यक्ष, भाजप

महापालिकेने वाढविलेली करवाढ अन्यायकारक आहे. शेती, इमारती व बंगल्यानजीकच्या जमिनीवर घरपट्टी लावणे अयोग्य आहे. यासंदर्भात प्रशासन, महापौर व सरकारला करवाढ मागे घेण्याचे आवाहन करणार आहे. प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.

-सीमा हिरे, आमदार

(फोटो)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन विषयांत नापास; विद्यार्थिनीची आत्महत्या

$
0
0

नाशिक : सिडकोतील कालिका पार्क परिसरात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मयुरी सोनावणे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. तीन विषयांत नापास झाल्याने आलेल्या नैराश्यातून मयुरीने आपलं आयुष्य संपवलं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राहत्या घरी मंगळवारी रात्री ओढणीने गळफास लावून मयुरीने आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील मराठा कॉलेजमध्ये मयुरी कला शाखेच्या प्रथम वर्षात शिकत होती. तीन विषयांत नापास झाल्याने ती निराश होती. याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर अवघड गेल्याने आत्महत्या

$
0
0

सिडकोतील एस.वाय. बी.कॉमच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा सिडको

शिक्षण क्षेत्रात सुरू असलेली स्पर्धा, पालकांचे दडपण अन् शैक्षणिक क्षेत्रात आलेले अपयश किंवा अपयश येऊ शकते या विचाराने अनेक विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक दडपणाने होणाऱ्या या आत्महत्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. याच दडपण अन् नैराश्यातून सिडकोतील कालिकापार्क परिसरातील एका युवतीने पेपर अवघड गेल्याने आत्महत्या करीत आपला जीवनप्रवास संपवला.

सिडकोतील कालिका पार्क येथील मयुरी राधाकृष्ण सोनवणे (वय १८, रा. १ श्रीशा रेसिडेन्सी, कालिकापार्क) ही युवती उत्तमनगर येथील वावरे कॉलेजमध्ये एस.वाय. बीकॉमचे शिक्षण घेत होती. मयुरीचे मागील वर्षाचे चार विषय बाकी असल्याने तिने नुकतीच त्या विषयांचीही परीक्षा दिली हेाती. हे चारही पेपर तिला अवघड गेल्याचे समजते. मंगळवारी रात्री आईवडील नातेवाईकांकडे गेले असता घरात कोणीही नसताना मयुरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री आई वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मयुरीचे वडील हे महिंद्रा कंपनीत, तर भाऊ आयटी कंपनीत नोकरीला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पालकांचे दडपण, मुलांची आवड व शिक्षण क्षेत्रातील स्पर्धा याचा विचार पालकांनी करून चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. एखाद्या शाखेत आवड नसेल, तर अनेक ठिकाणी करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे पाल्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधून मार्ग काढल्यास असे प्रकार होणार नाहीत.

- प्रा. दिलीप शिंदे, प्राचार्य, वावरे कॉलेज

शिक्षणाबरोबरच प्रत्येक व्‍यक्‍तीत काही ना काही गुण असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. जगातील ८५ टक्‍के यशस्वी लोक हे शिक्षणापेक्षा स्वतःच्या गुणांवर यशस्वी झाले आहेत, तर केवळ १५ टक्‍केच शिक्षणाच्या जोरावर यशस्वी झाले आहेत. केवळ कमी मार्कस्‌ मिळाले म्हणून आत्महत्या हा पर्याय नाही.

- हेमंत पाटील, इन्सपायर ट्रेनिंग सेंटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीसाठी ‘त्याने’ संपवले स्वत:ला!

$
0
0

नांदायला पाठवत नसल्यामुळे आत्महत्या

सासू-सासरा, पत्नीचे फोटो अंगावर चिटकवून घेतला गळफास

आत्महत्येपूर्वी मोबाइलमध्ये चित्रीकरण

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

माहेरी गेलेल्या पत्नीला सासरचे लोक नांदायला पाठवत नसल्याने आलेल्या नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने सासू-सासरे आणि मेहुण्याचे तसेच, पत्नीचे फोटो अंगाला चिटकवले. सासरचे लोक आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून ठेवल्यानंतर त्याने गळफास घेत या जगाचा निरोप घेतला.

रूपेश उत्तम जाधव (वय २८, रा. खंडेवस्ती, मोशी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा सटाणा (जि. नाशिक) येथील होता. त्याचे आई-वडील गावीच असून, त्याचे चुलते त्याच्या शेजारीच राहतात. दोन-तीन वर्षापूर्वी नाशिक येथील एका मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते. दोन महिन्यांपूर्वी कार्यक्रमानिमित्त त्याची पत्नी माहेरी गेली ती परत आलीच नाही. रूपेश हा तिला आणण्यासाठी सासूरवाडीला गेला होता. मात्र, पत्नीला सासरच्या मंडळींनी पाठवले नाही. त्यामुळे तो निराश होता. या नैराश्यातूनच त्याने गळफास घेतला.

-

मोबाइलमध्ये दडलंय काय?

पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी रूपेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच त्याने स्वतःच्या अंगाला सासू-सासरे-पत्नी आणि मेहुण्याचे फोटो चिटकल्याचे आढळून आले. पोलिसांना त्याच्या खोलीत त्याचा मोबाइल सापडला. त्यामध्ये माझ्या मृत्यूस सासू-सासरे आणि मेहुणा जबाबदार असल्याचे त्याने म्हटल्याचे समजते. तशी माहिती घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी दिली. मात्र, रूपेश याचा मोबाइल लॉक असल्याने तो उघडल्यावरच संपूर्ण माहिती उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक - प्रचार थंडावला

$
0
0

प्रभाग क्र.१३ चा

प्रचार थंडावला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ 'क' च्या पोटनिवडणुकीचा जाहीर प्रचार बुधवारी थंडावला. या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. या प्रभागातील मनसेच्या जेष्ठ नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणुक घेण्यात आली. त्यात मनसेकडून अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या डॉ. स्नेहल संजय चव्हाण आणि भाजपाच्या विजया हरिष लोणारी या उमेदवारांमध्ये तिंरगी लढत आहे.

गेल्या आठ दिवस शिवसेना, मनसे, भाजपच्या उमेदवारांनी घरोघरी प्रचारावर भर दिला. त्यानंतर प्रचाराच्या अंतिम दिवशी शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली. अपक्ष उमेदवार अवंतिका घोडके यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा दिला आहे. मनसे, शिवसेना आणि भाजपसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या तीनही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार आहे.

मतदानाकरीता प्रशासनाने ७० व्होटिंग वोटिंग मशिन्स उपलब्ध केले आहेत. त्यातील ९ मशिन राखीव ठेवले जाणार आहेत. ६ एप्रिल रोजी मतदान होवून ७ एप्रिलला गंगापूररोडवरील शिवसत्य कला व क्रीडा मंडळाच्या मैदानावर मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकविरोधातील मोहीम तीव्र

$
0
0

जेलरोड : महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयातर्फे प्लस्टिक विरोधी मोहिमेला वेग देण्यात आला आहे. प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

या कारवाईत अनेक हातगाडीवाल्यांवर दंडाची कारवाई करण्यात आली असून, दुकानांची तपासणीही महापालिका कर्मचाऱ्यांनी सुरू केली आहे. नाशिकरोड आरोग्य विभागाने ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत कॅरीबॅग तपासणीसाठी मोहीम हाती घेतली होती. तीन दिवसांत प्लास्टिक कॅरी बॅग, कचरा वर्गीकरण, अस्वच्छता अशी कारवाई झाली. यातून ५३,४२० रुपये दंड वसूल करण्यात आला. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, विजय जाधव, राजू निरभवणे आदी ही मोहीम राबवित आहेत. वरील कालावधीत प्लास्टिक कॅरी बॅगच्या चार केसेस करण्यात येऊन २० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. कचरा वर्गीकरणाच्या ३७ केसेस होऊन १८,५०० चा दंड करण्यात आला. अस्वच्छताप्रश्नी २१ केसेस करण्यात आल्या. त्यातून १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्यांदा उद्घाटनाचा प्रशासकीय फार्स

$
0
0

तिसऱ्यांदा उद्घाटनाचा प्रशासकीय फार्स

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील ग्रामीण रुग्णालयाला सन २०१५ मध्ये सिंहस्थात उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. या रुग्णालयाद्वारे सध्या सेवाही सुरू आहे. मात्र सलग तीनवेळा नियोजन करूनही अद्याप या रुग्णालयाचे उद्घाटन झालेले नाही. वास्वविक जर रुग्णांना सेवा मिळत आहे, तर हा प्रशासकीय खटाटोप कशासाठी असा सवाल आता उपस्थित होत आहे. तसेच याआधीही दोनवेळा उद्घाटनाचा फार्स करण्यात आला मात्र मुहूर्त काही लागला नाही. आता गुरुवारी पुन्हा एकदा उद्घाटनाचे नियोजन करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारी दुपारी उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत येत आहेत. आतापर्यंत उद्घाटनाची ही तिसरी वेळ आहे. याआधी १६ ऑगस्ट २०१७ रोजी डॉ. सावंत यांचा दौरा ठरला होता. तेव्हाही युद्धपातळीवर तयारी झाली. मात्र सावंत यांचा दौरा रद्द झाला. या रुग्णालयात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत ५० हजार बाह्य रुग्ण तपासण्यात आले. तसेच पाच हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. सिंहस्थापूर्वी येथे ३० खाटांची सोय होती, आता नवीन इमारतीसह ५० खाटा असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र दुसाणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किनारा’वर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मुंबई नाक्यावर असलेल्या हॉटेल किनाराचे बांधकाम नष्ट केले आहे. नासर्डी नदीपात्रात भराव टाकून हॉटेलचे काम अनधिकृतपणे उभारले असल्याने महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.

नासर्डी नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून भराव टाकत किनारा हॉटेलच्या जागामालकाने अतिक्रमण केल्याल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. या हॉटेलमध्ये एका नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या नेत्याचीही भागीदारी असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या अतिक्रमणाकडे कानाडोळा केला जात होता. महापालिकेच्या वतीने शहरात गेल्या महिनाभरापासून अतिक्रमणविरोधी मोहीम जोरदारपणे सुरू आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांना हटविण्याबरोबरच इमारतीच्या सामासिक अंतरात उभारलेली अनधिकृत बांधकामे काढण्याची मोहीम सुरू आहे. याअगोदर दहीपुलावर असलेली एक इमारत काढण्यात आली होती. याचवेळी किनारा हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चर्चिला जात होता. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन पथकाने मुंबई नाक्यावरील हॉटेल किनारावर मोर्चा वळवला. सुरुवातीला अतिक्रमित काम स्वत:हून काढून घ्यावे, असे महापालिकेच्या वतीने जागामालकास सांगण्यात आले. परंतु, त्यांनी बांधकाम काढले नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने वेग घेतला असून, तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पक्की बांधकामे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

बंदोबस्तामुळे थांबले होते काम

हे अतिक्रमण याअगोदरच काढण्यात येणार होते. परंतु, पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याने हे काम थांबले होते. अतिक्रमण विभागाला बुधवारी पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर नंदिनी नदीपात्रात भराव टाकून उभारलेले हॉटेल किनारा हटविण्यास सुरुवात झाली. विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सदर मोहीम राबविण्यात आली. यावेळी जागामालकाने पथकाशी वादही घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, पथकाने आपल्या कारवाईला सुरुवात केली.

मालकाचे पालिकेला निवेदन

या हॉटेलचे मालक प्रताप गायकवाड यांनी महापालिकेला निवेदन दिले असून, शेजारील हॉटेलचे मालक गजानन शेलार यांनी हेतूपुरस्सर तक्रार करून व्यवसायास बाधा आणल्याचे म्हटले आहे. याबाबत नगरसेवक गजानन शेलार यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुलेट मिळाली, जवानांचे काय?

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील रेल्वे सुरक्षा बलाला (आरपीएफ) गस्तीसाठी नवीन बुलेट मिळाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढला असला, तरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अधिकारी मात्र चिंतेत आहेत. नाशिकरोड स्थानकातून महिन्याला ४५ हजार गाड्या धावतात. दिवसाला पंधरा हजार आणि महिन्याला लाखो प्रवासी प्रवास करतात. या सर्वांची सुरक्षा आरपीएफच्या ३६ जवानांच्या खांद्यावर आहे.

प्रवाशांसह रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करणे, स्थानकातील व रेल्वेतील गुंडगिरीला आळा घालणे आदी जबाबदारी आरपीएफची आहे. हे जवान स्थानकाबरोबरच गाड्यांमध्येही गस्त घालतात. लूटमार, गुंडगिरी करणाऱ्यांना धडा शिकवतात. प्रवाशांच्या समस्या सोडवतात. कर्तव्य बजावणे सुलभ जावे यासाठी भुसावळ विभागातील नाशिकरोडसह, मनमाड, भुसावळ, चाळीसगाव, अकोला, खंडवा अशा सतरा रेल्वेस्थानकातील आरपीएफना नव्याकोऱ्या बुलेट देण्यात आल्या आहेत.

हद्दीमध्ये वाढ

नाशिकरोडच्या या सुरक्षाबलाची हद्द इगतपुरीपासून ओढ्यापर्यंत होती. आता कसबे सुकेणे व खेरवाडीचा भागही समाविष्ट करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण यांनी 'मटा'ला दिली. पूर्वी ही हद्द दोनशे किलोमीटर होती आता ती २४१ किलोमीटर झाली आहे. एक डझनपेक्षा जास्त स्थानके त्यात आल्याने जवानांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांना गस्तीसाठी बुलेट दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रकने संसरीजवळ रेल्वे गेटला धडक दिली होती, तर त्यानंतर मोटारसायकल गेटला धडकली. अशावेळी जवानांना लवकर पोहचता यावे यासाठी बुलेट उपयोगी आहे. चेन पुलिंग, लूटमार, प्रवाशी गाडीतून पडणे, घातपात आदी प्रसंगीही बुलेट उपयोग पडत आहे.

मनुष्यबळ कमी

नाशिकरोडच्या आरपीएफ कार्यालयात ५१ अधिकारी व कर्मचारी होते. हे मनुष्यबळ ८१ करावे, असे पत्र जुबेर पठाण यांनी प्रशासनाला दिले. मात्र, झाले उलटेच. देवळालीतील लष्कराचे महत्त्व वेगळेच आहे. ते लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी देवळाली येथे मेल एक्सप्रेसही थांबू लागल्या आहेत. त्यामुळे आरपीएफचे नवीन दूरक्षेत्र देवळालीत सुरू झाले. आरपीएफचे अकरा कर्मचारी तिकडे देण्यात आले. त्यामुळे ३६ कर्मचारीच नाशिकरोडला उपलब्ध आहेत. कमी मनुष्यबळातच अडीचशे किलोमीटर हद्दीतील बारा रेल्वेस्थानके व परिसरात गस्त घालावी लागत आहे. धावत्या रेल्वेगाडीतही जवान द्यावे लागतात. दोन गाड्यांवर देखरेखीची पूर्ण जबाबदारी येथील आरपीएफवर आहे. त्यात पाच जवान द्यावे लागतात. साप्ताहिक सुटी, रजा, आजारपणामुळे सर्व ३६ जवान उपलब्ध होतीलच असे नाही. नाशिकरोड स्थानकात पार्किंगवर लक्ष ठेवण्यासाठी जवानच नाहीत. मोठ्या साहेबांची अध्येमध्ये व्हिजिट असते, तेव्हाही मनुष्यबळ लागते. अपेक्षा, ताणतणाव, गुन्ह्यांचे प्रमाण भरपूर आणि मनुष्यबळ तोकडे अशा परिस्थितीत आरपीएफचे जवान लढत आहेत.

नाशिकरोड रेल्वेस्थानकातील मनुष्यबळ कमी आहे, हे खरे आहे. येथील पार्किंग, कायदा सुव्यवस्था हे प्रश्नही गंभीर आहेत. रेल्वेप्रवाशी व गाड्यांची संख्याही वाढत आहे. उपलब्ध मनुष्यबळात आरपीएफ जवान कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत.

- जुबेर पठाण, वरिष्ठ निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images