'जीपीआरएस'ला स्थगितीचे साकडे म. टा. वृत्तसेवा, पंचवटी देशातील सर्व व्यावसायिक वाहनांना जीपीआरएस पॅनिक बटण ही प्रणाली बंधनकारक केली आहे. मात्र, ती खर्चिक आणि अन्यायकारक असल्याने तिला स्थगिती द्यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेने प्रादेशिक परिवहन विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. साधारण वाहनमालकांना ही प्रणाली आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. स्थानिक बाजारपेठेत ती उपलब्ध नाही. सध्यस्थितीत तिचा काही उपयोग नाही. कारण, आपल्याकडे त्यासाठी कंट्रोल रूमच उपलब्ध नाही. यापूर्वी वाहनमालकांनी पूर्वीचे जीपीआरएस किट लावलेले आहे. मात्र, पॅनिक बटण नाही ते किट मान्य करून पॅनिक बटण लावून घेण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. १ एप्रिलपासून वाहनांचे पासिंग थांबल्याने वाहनधारकांचे नुकसान होण्यासह सरकारचा महसूलही बुडत आहे. हा कायदा रद्द करावा अथवा त्याला स्थगिती मिळावी. नवीन कायदे बनविण्यापूर्वी किंवा अमंलात आणण्यापूर्वी पूर्ण देशातील लोकल आरटीओकडून संघटनांशी त्याविषयी चर्चा करावी. त्यात योग्य ते बदल करून मगच ते अंमलात आणावेत आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर लोखंडे, उपाध्यक्ष ब्रिजमोहन चौधरी, योगेश दुसाने आदी उपस्थित होते. -- उघड्यावर कचराफेक थांबेना म. टा. वृत्तसेवा, सातपूर शहर स्वच्छ राखण्यासाठी महापालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, असे असतानादेखील काही व्यक्तींकडून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरविण्याचे काम केले जात आहे. अशोकनगरच्या भाजीमंडईबाहेर असाच प्रकार होत आहे. येथे उघड्यावर कचरा टाकला जाऊ नये याकरिता ड्रम ठेवण्यात आले. परंतु, या ड्रमच्या बाहेरच कचरा टाकला जात असल्याने रस्त्यांवरून जाणारे व परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नेहमीच उघड्यावर घाण, कचरा टाकू नये असे प्रबोधन केले जात असतानाही अशी उघड्यावर कचराफेक सुरूच असल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी रमेश गाजरे यांनी सांगितले. ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी घाण, कचरा टाकणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. पती व पत्नी कामावर जात असलेल्या कुटुंबांकडून, तसेच अन्य काही कुटुंबांकडून असा उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. रोजच घंडागाडी कर्मचाऱ्यांकडून उघड्यावरील कचरा संकलित केला जातो. परंतु, रात्रीच्या वेळी पुन्हा घरातून फेरफटका मारण्यासाठी जाणारे कचरा टाकत असतात. आपल्या परिसरातील रहिवाशांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उघड्यावर घाण, कचरा टाकू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट