Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

उपोषणास स्थानिकांचे पाठबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूररोड भागातील आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या भाजीबाजारातील व्यावसायिकांना नवीन नियमानुसार जागा द्यावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला शुक्रवारी स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शविला. येथील भाजीबाजरप्रश्नी आता तातडीने निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षाही परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.

आकाशवाणी केंद्राजवळ नव्याने होत असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये आमच्या हक्काची जागा आम्हाला द्या, अशी मागणी गंगापूररोडवरील भाजीविक्रेत्यांनी केली असून, त्यांनी सुरू केल्ल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकही शुक्रवारी रस्त्यावर उतरले. उपोषणाचा शुक्रवारी चौथा दिवस होता. हे आंदोलन तीव्र होत असून, जोपर्यंत याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले. या भाजीबाजारातील विक्रेत्यांची कैफियत ऐकून घेण्यासाठी सकाळपासूनच नेत्यांची रीघ लागली होती. परंतु, एकाही नेत्याने याबाबत ठोस भूमिका घेतली नाही. विक्रेत्यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. मात्र, भाजीबाजाराचा प्रश्न माझ्या कारकीर्दीत निर्माण झालेला नाही. त्यामुळे मी याबाबत काहीही बोलणार नाही, अशी भूमिका आयुक्तांनी घेतल्याचे समजते.

'भीख मांगो' आंदोलन

गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू असून, विक्रेत्यांच्या घरात चूल पेटलेली नाही. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी भीख मांगो आंदोलन केले. रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांकडून भीक मागितली जात होती. त्यामुळे याप्रश्नी निर्णय होत नसल्याने नागरिकांकडूनदेखील सखेद आश्चर्य व्यक्त केले जात होते.

आमदारांचा मध्यस्थीचा प्रयत्न

आंदोलनाच्या ठिकाणी आमदार प्रा. देवयानी फरांदे आल्यानंतर त्यांनी याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. जागामालक, विकसक व महापालिकेचे अधिकारी यांना दूरध्वनी करून याबाबत विचारणा केली. मात्र, विकसक बाहेरगावी असल्याने त्याबाबत बोलणी होऊ शकली नाही. यावेळी रविवारी बैठक घेऊन याबाबत निश्चित तोडगा काढला जाईल, असे आमदार फरांदे यांनी सांगितले. बाजीबाजार प्रश्नी आपण तुमच्या पाठीशी आहे. मात्र, सध्या सुरू असलेले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी आंदोलकांना केली. मात्र, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे आमदारांना माघारी फिरावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुयारी वाहनतळाला विरोध; १५ ला बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने अशोकस्तंभ ते गडकरी चौकापर्यंत स्मार्ट सिटीअंतर्गत नुकतीच स्मार्ट रोडची घोषणा केलेली आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम, सीबीएस येथे संकल्पित दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याची घोषणा केली आहे. या वाहनतळाला क्रीडा संघटनांनी विरोध केला असून, यावर १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियममधील फुटबॉल असोसिएशनच्या कार्यालयात बैठक होणार आहे. जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना, क्रीडा संस्था, तसेच क्रीडा संघटक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी स्टेडियम हे मैदान कायमस्वरूपी फक्त खेळासाठी उपलब्ध ठेवावे, असे निर्देश असतानासुद्धा नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध असलेले एकुलत्या मैदानावर भुयारी वाहनतळाचा घाट घातला जात आहे. त्यामुळे या भुयारी वाहनतळाला क्रीडा संघटनांनी विरोध केला आहे. सर्व जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींनी सभेला उपस्थित राहून छत्रपती शिवाजी स्टेडियम बचाव या मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक शाहू खैरे, खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख, फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, सचिव अर्जुन टिळे, क्रीडा संघटक अविनाश खैरनार, आनंद खरे, उमेश आटवणे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करयोग्य मूल्य दर २० पैशांवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करवाढीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह शहरातील शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेऊन रस्त्यावर उतरत आंदोलनाची भाषा केली होती. शहर विकास आराखडा कृती समितीच्या नेतृत्वाखाली शहरातील २३ खेड्यांमधील शेतकरी एकवटत असताना आयुक्त मुंढेंनी वाढता जनक्षोभ लक्षात घेत दोन पावले माघारी येण्याची भूमिका घेतली आहे. शहरातील मोकळ्या भूंखडावरील करयोग्य मूल्य दर ४० पैशांवरून २० पैशांवर आणला आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आयुक्त मुंढे यांनी निवासी ३३, अनिवासी ६५ तर औद्योगिक मालमत्ता करामध्ये ८२ टक्के वाढीचा प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. परंतु, महासभेने हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आयुक्त मुंढेंनी त्यांच्या अधिकारात मालमत्ता कराच्या करयोग्य मूल्य दरात वाढ करण्याची अधिसूचना जाहीर केली. नव्या मालमत्तांचे करयोग्य मूल्य पाच पट वाढविण्यासह शहरातील जमीन, मोकळे भूखंड, पार्किंग, इमारती व बंगल्यांचे सामासिक अंतरासह इंच इंच जागेवर कर लावण्याची घोषणा केली होती. शहरातील संपूर्ण शेती क्षेत्र कराच्या कचाट्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

कर निम्म्यावर

मुंढे यांनी शहरातील मोकळ्या भूंखडावरील करयोग्य मूल्य ३ पैशांवरून ४० पैशांवर नेला होता. त्यामुळे एक एकर जमिनीला तब्बल १ लाख ३७ हजार रुपयांची कर आकारणी होणार होती. यामुळे शेतकऱ्याचा संताप अधिकच वाढला होता. परंतु, जमिनीवरील करयोग्य मूल्य आयुक्तांनी निम्म्यावर अर्थात ४० पैशांवरून २० पैशांवर आणत जनआंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे नाशिककरांना ५० टक्के दिलासा मिळाला असला तरी, त्यांना कर हा भरावाच लागणार आहे. त्यामुळे कमी केलेल्या करयोग्य मूल्यामुळे महापालिकेचे उत्पन्न घटणार असले तरी, शेतकऱ्यांना कर मात्र द्यावाच लागणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदयात्रेद्वारे प्लास्टिकबंदीचा जागर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लास्टिकच्या विळख्यातून मानवाची मुक्तता व्हावी यासाठी तीन पर्यावरणप्रेमींनी प्लास्टिकबंदीचा प्रचार व प्रसार करीत एक हजार किलोमीटरची हिमालय पदयात्रा करण्याचा संकल्प केला आहे. या तिघांमध्ये पुण्याचे माधव बडवे, अहमदनगरमधील अकोलेचे तात्यासाहेब देशमुख, तर नाशिकचे देवळाली व्यापारी बॅँकचे संचालक श्रीराम त्र्यंबकराव गायकवाड यांचा समावेश आहे.

या यात्रेच्या संकल्पनेबाबत श्रीराम गायकवाड म्हणाले, की २०१३ मध्ये मी नर्मदा परिक्रमा केली. ती तीन हजार किलोमीटरची होती. ती करीत असतानाच हिमालयाची पदयात्रा करायची असा निश्चय केला. यापूर्वी ही यात्रा माझे आजोबा कै. गबाजी बाबा यांनी पूर्ण केली होती. हिमालयात पर्यटक अनेक ठिकाणी प्लास्टिकचा कचरा टाकून जातात. त्यामुळे ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणी प्लास्टिकबंदीचा संदेश पोहोचवणार आहे. जेथे जेथे पर्यटक भेटतील त्यांना प्लास्टिक वापरू नका, असा संदेश आम्ही देणार आहोत. या पदयात्रेंतर्गत १० ते ११ हजार फुटांवरून प्रवास करावा लागणार असून, घनदाट अरण्यातूनही मार्गक्रमण करावे लागणार आहे. बेभरवशाचे वातावरण व वाढती थंडी याचाही मुकाबला करावा लागणार आहे. या ठिकाणी तीनही ऋतू एकाच ठिकाणी अनुभवायला मिळणार असल्याने त्याअनुषंगाने तयारी केली आहे. सर्व सामान घेताना त्याचे वजन जास्त होऊ नये याचीदेखील खबरदारी घेतली आहे. या पदयात्रेतून सामाजिक संदेश देत निर्सगाचे चमत्कार बघण्याची, तसेच हिमालयातील जीवनमान अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. या यात्रेतून ट्रेकिंग, आध्यात्मिक अनुभव व सामाजिक बांधिलकी या तिन्हींचा मेळ साधला जाणार आहे. ज्या गावांमध्ये मुक्काम असेल, तेथील शाळांमध्येही प्लास्टिकबंदीचा प्रचार करणार असून, मुलांना प्लास्टिक न वापरण्याबाबत धडे देणार आहोत, असेही ते म्हणाले.

असा असेल यात्रामार्ग

या एक हजार किलोमीटरच्या हिमालय पदयात्रेला हरिद्वारहून प्रारंभ होणार असून, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, व बद्रिनाथ असा त्यांचा प्रवास राहणार आहे. पदयात्रेत हे तिघेही दररोज ३० किलोमीटर पायी चालणार आहेत. नाशिकरोड स्थानकाहून हे तिघेही शुक्रवारी सकाळी रवाना झाले. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्यांना निरोप देण्यासाठी हजर होते.

सर्वत्र प्लास्टिकबंदीचा जागर होत असताना आपणही खारीचा वाटा उचलावा, या निश्चयाने ही पदयात्रा सुरू केली आहे. आमच्या प्रबोधनाने एका व्यक्तीने जरी प्लास्टिक वापरणार नाही, असा निश्चय केला तरीही आमची यात्रा सफल झाली, असे मी म्हणेन.

-श्रीराम गायकवाड, पर्यावरणप्रेमी

(तीन पासपोर्ट फोटो आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करधाडीवरून स्थायीत वादंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील नवीन मालमत्तांच्या करयोग्य मूल्यदरात पाचपट वाढ करण्यासह शेतीक्षेत्रावरही कर लादण्याच्या प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाचे तीव्र पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. आयुक्तांच्या या एकतर्फी करवाढीचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. प्रस्तावित करवाढ रद्द न झाल्यास प्रशासनाविरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशाराच सदस्यांनी दिला. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा हा निर्णय असल्याचे दिनकर पाटील यांनी सांगत शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशारा यांनी दिला. आयुक्त मुंढे यांच्या या निर्णयाविरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचा निर्धार स्थायी समितीने व्यक्त केला आहे.

स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणे करवाढीच्या निर्णयाचे पडसाद उमटले. महापालिका क्षेत्रातील शेतीक्षेत्रावरही मालमत्ता कराची आकारणी करण्याच्या मुंढे यांच्या निर्णयावर स्थायी समितीने तीव्र आक्षेप नोंदविला. उद्धव निमसे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाची भूमिका जनतेत संभ्रम निर्माण करणारी असून, या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एक एकर क्षेत्रासाठी मालमत्ता करापोटी लाखाची रक्कम भरण्याची वेळ आली तर शेतकऱ्यांनी ती द्यायची कोठून, असा सवाल केला. यावर शेतजमिनीवरील करआकारणीबाबत सभापती आहेर-आडके यांनी उपायुक्त दोरकूळकर यांना खुलासा करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात मालमत्ता कराचे एकरी मूल्य नमूद नसल्याचे सांगत जमिनींवरील कर योग्य मूल्य योग्यच असल्याचा दावा दोरकूळकर यांनी केला. जमिनींवरील ४० पैसे प्रतिचौरस फूट करयोग्य मूल्य वार्षिक नव्हे तर, मासिक असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केल्याने स्थायीत सदस्यांचा संताप अनावर झाला. आपल्या प्रभागातील शेतकऱ्यांच्या जमिनी आधीच अंबड औद्योगिक वसाहतीत गेल्या असताना आता उर्वरित जमिनींवर मालमत्ता कराचा नांगर फिरविण्याची तयारी प्रशासनाने केली काय, असा संतप्त सवाल भागवत आरोटे यांनी केला. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा हा निर्णय असल्याचे दिनकर पाटील यांनी सांगत शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशारा दिला. या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांच्या शिष्टमंडळामार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल, असेही पाटील, पुष्पा आव्हाड यांनी सांगितले. चर्चेअंती मनपाने मोकळ्या जमिनींवर लागू केलेला मालमत्ता कर शेतीक्षेत्रावरही आहे की केवळ ले-आऊट झालेल्या जमिनींवर याबाबतचा लेखी खुलासा प्रशासनाने पुढील सभेत करावा, असे आदेश सभापती आहेर-आडके यांनी दिले.

शिवसेनेची मुंढेंना ऑफर

करवाढीच्या या निर्णयावर शिवसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकशी नाळ जुळलेली नसल्यामुळेच परसेवेतील अधिकारी नाशिककरांवर अन्यायकारक करवाढ लादत असल्याचा आरोप संतोष साळवे यांनी केला. मंढेंनी करवाढ लादण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रतिएकरी ७५ हजार रुपये द्यावेत आणि जमिनींचे हवे ते करावे, अशी ऑफर प्रवीण तिदमे यांनी दिली. तर शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांवर दुदैवी प्रसंग कोसळल्याचे नमूद करत समीर कांबळे यांनी प्रशासनाने लागू केलेल्या या 'सुल्तानी' कराचा निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट वळूंना मिळाले १७ तासांनंतर जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात नेहमीच रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर आढळतो. यातील काही जनावरे आक्रमण होऊन त्यांच्यात झुंजही होतात. शुकवारी मात्र मोकाट दोन वळूंवर त्यांच्यातील झुंज जीवावर बेतली. रामसेतू परिसरातील नागरिक, नगरसेवक व अग्नीशामक दलाच्या मदतीने या दोन्ही वळूंना १७ तासांच्या प्रयत्नानंतर वाचविण्यात आले.

शहरातील रामसेतू परिसरातील राममंदिराच्या वरील बाजूस असलेल्या विहिरीत गुरुवारी रात्रीपासून पडलेल्या दोन वळूंना शुक्रवारी दुपारी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दोन्ही वळूं मंदिर परिसरात फिरत होते. त्यांच्यात अचानक झुंज सुरू झाली. त्यातील एकाचा पाय घसरला, सो सुमारे ३० फूट खोल विहिरीत कोसळला. त्याला बघत असताना दुसरा वळूंही विहिरीत कोसळला. परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली तेव्हा बराच अंधार झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती नगरसेवक मदन गायकवाड, गोरक्षक सुभाष मालू, राजेंद्र शेलार व अग्निशामक दलास दिली. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत त्या दोघा वळूंची बाहेर काढण्यासाठी अग्नीशामक विभागाचे प्रयत्न सुरू होते; मात्र अंधार असल्याने त्यांना यश आले नाही. शुक्रवारी पहाटेपासून पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले. क्रेन मशिनद्वारे दुपारी तीनच्या सुमारास दोघा वळुंना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पशु वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोघा वळूंना गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर दोन्ही वळूंना सोडून देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्मदाची यशोगाथा पुस्तकरुपात

$
0
0

पुढील महिन्यात होणार प्रकाशन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या सरदार सरोवर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने पंचसूत्रीद्वारे केलेले कार्य संपूर्ण देशासाठी उल्लेखनीय ठरले आहे. त्यामुळेच या प्रयत्नांना कॉफी टेबल पुस्तकाच्या रुपात शब्दबद्ध केले जाणार आहे. 'यशदा'च्या माध्यमातून त्याचे काम सुरू असून येत्या महिन्याभरातच या पुस्तकाचे प्रकाशन होईल, अशी माहिती नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे सदस्य तथा पर्यावरणतज्ज्ञ डॉ. अफ्रोज अहमद यांनी 'मटा'ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

सरदार सरोवर प्रकल्प गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला. या प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यापूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अनेक अटी-शर्थी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या चारही राज्यांना घातल्या. या अटींची पूर्तता होते आहे किंवा नाही याची तपासणी नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाकडून वारंवार केली जात आहे. त्यानुसार चारही राज्यात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला असल्याचे प्राधिकरणाचे सदस्य डॉ. अहमद यांनी सांगितले आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने पंचसूत्रीद्वारे कृती आराखडा तयार केला. त्यात वृक्षलागवड, पाणलोट क्षेत्रावरील काळजी, जैविक विविधतेचे संरक्षण, बाधित गावे व पाड्यांना आरोग्य सुविधा आणि मत्स्यपालन या पाच मोहिमांचा समावेश आहे.

प्रकल्पात जाणाऱ्या घनदाट जंगलाच्या मोबदल्यात पडिक जमिनीवर दुप्पट वृक्षलागवड आणि महसूली जमिनींवरही दुप्पट वृक्षलागवडीचे महाराष्ट्र सरकारने निश्चित केले. त्यानुसार यवतमाळ, नांदेड, नागपूर, जालना, औरंगाबाद, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वृक्षलागवड करण्यात आली. अक्कलकुवा येथे ६० तर औरंगाबाद जिल्ह्यात ५० हेक्टरवर घनदाट जंगल साकारण्यात आले आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे. त्यामुळे प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा होण्याची शक्यता होती. म्हणूनच या क्षेत्रात विविध ठिकाणी बंधारे बांधण्यासह विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या. जैविक विविधतेच्या संगोपनासाठी तोरणमाळ परिसर संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी दुर्मिळ असा पिंगळा (आऊलेट) आणि गिधाड (व्हल्चर) यांचा अधिवास वाढला आहे. पुनर्वसन केलेल्या गावे आणि पाड्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी मोबाइल युनिट, आरोग्य बोट आदी सुविधा करण्यात आल्या. तर, स्थानिक आदिवासींना रोजगार निर्मितीसाठी मत्स्य व्यवसाय विकसित करण्यात आला. हे सारे प्रयत्न अतिशय यशस्वी ठरले आहेत. एखाद्या विकास प्रकल्प साकारताना पर्यावरणाची कशी काळजी घेतली जाते आणि कृती आराखड्याद्वारे किती मोठे काम उभे राहू शकते, याचा वास्तुपाठ महाराष्ट्राने घालून दिल्याचे डॉ. अहमद यांनी सांगितले आहे. त्यामुळेच ही सारी यशोगाथा आता पुस्तकरुपात बद्ध होत आहे. पुण्यातील 'यशदा'च्या वतीने त्याचे काम केले जात असून पुढील महिन्यात हे कॉफीटेबल बुक प्रकाशित होईल, अशी माहिती डॉ अहमद यांनी दिली आहे.

नर्मदा प्रकल्पा संदर्भात महाराष्ट्राचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरावे असे हे कार्य असल्याने ते एकत्रित स्वरुपात मांडावे अशी सूचना करण्यात आली. हे कॉपी टेबल बुक अन्य राज्यांना विकास प्रकल्प साकारताना मोलाचे ठरेल.

- डॉ. अफ्रोज अहमद, सदस्य, नर्मदा नियंत्रण प्राधिकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पसायदान’तर्फे व्यक्तिमत्व विकासाचा धडे

$
0
0

विद्यार्थ्यांसाठी २ मेपासून शिबिराचे आयोजन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शालेय परीक्षा संपल्या की शहरी भागातील मुलांसाठी सशुल्क उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जात असते. मात्र ग्रामीण भागातील मुलांसाठी अशा शिबिरांचे आयोजन होत नाही. याचा विचारातून तालुक्यातील कंधाणे येथील पसायदान प्रतिष्ठानतर्फे ९ वर्षापासून 'आध्यात्मिक व्यक्तिमत्व विकास' या मोफत उन्हाळी शिबिराचे आयोजन केले जात आहे. यंदा देखील २ ते १६ मे दरम्यान झोडगे येथील संदीप कला महाविद्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गांगुर्डे यांनी दिली.

शिबिर प्रवेशासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. या शिबिरातून विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना अध्यात्मिक संस्कार व त्याचसोबत व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले जात असतात. योगासन, प्राणायाम, संतांची ओळख, वादन, गायन, क्रीडा, कीर्तन, पाठांतर अशा विविध दिनचर्येतून मुलांच्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला जाणार आहे. शिबिराचे ठळक वैशिष्ठ म्हणजे विद्यार्थ्यांना पंधरा दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने ऐकायला मिळणार आहेत. पुस्तकांची गोडी लागावी म्हणून 'पुस्तक मैत्री' हा उपक्रम घेतला जाणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गांगुर्डे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जलसंवर्धन व वृक्षारोपण उपक्रम

उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना पाण्याचे व पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जलसंवर्धन विषयावर मार्गदर्शन केले जाणार असून, विद्यार्थ्यांनी येताना १०० बिया सोबत आणण्याच्या असून त्यांचे बीजारोपण व वृक्षारोपण देखील केले जाणार आहे. प्रतिष्ठान या वृक्षांचे संगोपन करेल. यासह क्षेत्रभेट, वनभोजन व बालकीर्तनकार महोत्सव देखील होणार आहे.

तज्ज्ञांच मार्गदर्शन

शिबिरात तहसीलदार ज्योती देवरे (स्वतःला कसे घडवावे?), डॉ. मनिषा कापडणीस (आध्यात्म आणि आरोग्य), डॉ. संजय शिंपी (जोडूनिया धन), निवृत्ती गायकवाड (आध्यात्म आणि आधुनिक काळ), गोकुळ अहिरे (जलसंधारण), प्रेमकुमार अहिरे (निसर्ग संवर्धन), बाळासाहेब शिरसाठ (काळ्या मातीशी जोडू नाते), सुनील आहेर (व्यवसाय मार्गदर्शन), डॉ. सुनिता भामरे (संवाद आणि समुपदेश), डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे (निसर्गाशी जोडू नाते), किशोर जाधव (अभ्यासातून व्यक्तिमत्व विकास), कमलाकर देसले (आयुष्यात थोडं वेगळं), अरुण पाटील (शासकीय योजना आणि विद्यार्थी), डी. बी. देशमुख (खेळातून शिक्षण) आदी वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात ३

$
0
0

नाशिकरोड परिसरात

बंदोबस्त तैनात

नाशिकरोड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकरोडला मुख्य मिरवणुकीत २० चित्ररथ सहभागी होणार असून, ग्रामीण भागातही सहा स्वतंत्र चित्ररथांची मिरवणूक निघणार आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समितींकडूनही उत्सवाची तयारी झाली आहे. मुख्य मिरवणुकीवर पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्याचीही नजर असेल. पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक निरीक्षक मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, प्रभाकर रायते, वाहतूक शाखेचे निरीक्षक संजय वांबळे आदींनी मिरवणूक मार्गाची शुक्रवारी पाहणी केली. शहरात ७५ होमगार्ड जवान, राज्य राखीव दलाची एक तुकडी, पोलिस मुख्यालयाचे ६०, गुन्हे शाखेचे २५, आर्थिक गुन्हे शाखेचे पाच, तर स्थानिक पोलिस ठाण्याचे १०० कर्मचारी व अधिकारी बंदोबस्तासाठी शहरात तैनात करण्यात आले आहेत. स्वयंसेवकांची टीमही पोलिसांच्या मदतीसाठी उभारण्यात आली आहे.

रसवंतीला पसंती

देवळाली कॅम्प : उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने नाशिक शहर व परिसरातील रसवंतिगृहांत घुंगरू वाजू लागले आहेत. नाशिक पुणे-महामार्गावर बैलाच्या साह्याने पारंपरिक रसवंतिगृहे सुरू आहेत. अनेकांचा कल या रसवंतिगृहांकडे दिसून येतो आहे. नाशिकसह परिसरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे रसवंतिगृहांची संख्याही वाढली आहे. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने घाण्याचा उपयोग केला जात आहे, तर बहुतांश ठिकाणी इंजिनावर रसवंतिगृहे सुरू आहेत. उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळण्यासाठी रसवंतिगृहांकडे नागरिकांची पाऊले वळत आहेत. अनेक वाहने या रसवंतिगृहांसमोर आवर्जून थांबतात. बैलाच्या मदतीने सुरू असलेल्या रसवंतिगृहांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.

​​देवळालीत ​कोकीळ कुजन

देवळाली कॅम्प : देवळालीकरांची सकाळ कोकिळेच्या मंजूळ कुजनाने होत आहे. देवळाली कॅम्प परिसरातील हिरव्यागार वनराईमुळे येथील झाडांवर विविध पक्ष्यांचा सहवास नेहमीच असतो. हिरव्या दाट वृक्षराजींमध्ये कोकिळेच्या मंजूळ सुरांनी देवळालीकरांची सकाळ प्रसन्न होत आहे. कॅम्प परिसरातील दाट वटवृक्ष व कडुनिंबातून येणारा कोकिळेचा मंजूळ स्वर सर्वांना भुरळ घालत आहे. श्रावण महिन्यापर्यंत तिचे हे कुजन कानी पडते. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही घरटी बांधत नाही. मादा कोकीळ कावळ्याच्या घरात अंडी घालते. वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम कोकीळ पक्ष्यांवर होत असल्याने दिवसेंदिवस कोकिळेची संख्या घटत आहे. मात्र, देवळाली कॅम्प परिसरात कोकिळेचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.

'आंदोलनाची वेळ

आल्यास तुमच्यासोबत'

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महापालिकेकडून घरपट्टीसह विविध मिळकतींवर लावण्यात येणाऱ्या करांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या शहर विकास आराखडा अन्याय निवारण समितीला आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. या संदर्भात लवकरच आम्ही सर्वच आमदार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. मात्र, आंदोलन करावे लागले तर त्यात आम्हीही सहभागी होऊ. ही करवाढ कोणत्याही सत्ताधाऱ्याने केली नसून, प्रशासनाने केल्याचे प्रतिपादन आमदार सीमा हिरे यांनी केले.

पाथर्डी फाटा येथे शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने मेळावा झाला. त्या वेळी आमदार हिरे बोलत होत्या. मेळाव्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपल्या सूचना मांडून प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर या करवाढीचे खापर फोडले. मात्र, हा लढा कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून, कृती समितीचे काम हे अराजकीयदृष्ट्या सुरू असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी बोलताना नगरसेवक गजानन शेलार यांनी सांगितले, की ही करवाढ केवळ शेतकऱ्यांवरच केली नसून, शहरातील प्रत्येक इंचन् इंच जागेवर आहे. त्यामुळे याची माहिती सर्वसामान्यांना मिळाली पाहिजे. जनतेवरही हा कर अन्यायकारक असून, त्यांना या आंदोलनात सहभागी करून घेतले पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते नाना महाले यांनी महापालिकेला उत्पन्नाची अनेक साधने असून, त्यांनी केंद्र किंवा राज्य सरकारकडे निधी मागितला पाहिजे. सामान्यांवर करवाढ करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्‍त केले. यावेळी दत्ता गायकवाड, शिवाजी चुंभळे, ॲड. नितीन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक सुदाम डेमसे, भगवान दोंदे, दिलीप दातीर, उन्मेष गायधनी, तानाजी जायभावे, तानाजी फडोळ, लक्ष्मण मंडाले, रंजन ठाकरे, मनोहर बोराडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅम्पमधील रस्ते डांबरीकरणाची मागणी

$
0
0

कॅम्पमधील रस्ते डांबरीकरणाची मागणी

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्पमध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेल्या भूमिगत गटारींच्या कामामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळा आणि पुढील महिन्यापासून सुरू होणारा रमजान महिना लक्षात घेता कॅन्टोन्मेंट प्रशासनाने त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राशीद सय्यद यांनी केली आहे. देवळालीच्या आठही वॉर्डांत सुरू असलेल्या भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्ते गेल्या वर्षीपासून खोदून ठेवण्यात आले आहेत. त्यावर फक्त मुरूम टाकून रस्ते सुरळीत करण्याचे काम केले जात आहे. मात्र, पुढे सुरू होणारा पावसाळा व रमजान पर्व लक्षात घेत मशीद परिसरासह आठही वॉर्डांमधील रस्ते त्वरित डांबरीकरण न केल्यास निषेध मोर्चा काढण्यात येईल. या प्रकरणी छावा संघटना पदाधिकारी व नागरिक बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर प्रदीप कौल व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून निवेदन सादर करणार आहे. पंधरा दिवसांत डांबरीकरणाबाबत लेखी आश्वासन दिल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याचे सय्यद यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकर जयंती - मुक्तीभूमीआंबेडकर जयंती - मुक्तीभूमी

$
0
0

धर्मांतराच्या घोषणेमुळे 'मुक्तीभूमी' नावारुपास

संजय लोणारी, येवला

१३ ऑक्टोबर १९३५ ची येवला शहरातील सायंकाळ, अस्पृश्यांची मुंबई इलाखा सभा आणि या सभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण व त्यांनी त्यात 'मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही' अशी हादरा देणारी केलेली धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा म्हणजे भारतीय इतिहासात लिहिलं गेलेलं एक महत्त्वाचे पान. बाबासाहेबांनी येवल्यातील ज्या मैदानवर ही धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली ती सध्याच्या येवला कोर्टाजवळील जागा म्हणजेच 'मुक्तीभूमी'. त्यामुळेच बाबासाहेबांच्या जीवन वाटचालीतील दादरची 'चैत्यभूमी' व नागपूरची 'दिक्षाभूमी'सह येवल्यातील या 'मुक्तीभूमी'ला बौद्ध बांधवासह आंबेडकरी जनतेच्या जिवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ला येवल्यातील सभेत केलेली धर्मांतराची घोषणा ही तत्कालीन समाजव्यवस्थेला मोठा धक्का समजला गेला होता. जागतिक पातळीवर या घटनेची नोंद होतानाच घोषणेमुळे तत्कालीन धर्मसंस्थाने देखील हादरली होती. परिवर्तनवादी विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या घोषणेचे स्वागत केले होते. तर अनेकांनी विरोधही देखील केला होता. तरीही केलेल्या संकल्पापासून जराही न ढळता वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास करून बाबासोहबांनी पुढे १४ ऑक्‍टोबर १९५६ रोजी लाखो समाजबांधवांसह नागपुरात बौद्ध धम्माचा स्वीकार केला. येवल्यात १३ ऑक्‍टोबर १९३५ ला दुपारी दोनला 'मुंबई इलाखा दलितवर्गीय परिषद' भरली होती. या परिषदेचे वक्ते होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. सभेतील आपल्या दीड तासाच्या भाषणात त्यांनी 'हिंदू म्हणून मी जन्माला आलो, हिंदू म्हणून मी मरणार नाही' अशी गर्जना केली होती. त्यांनी केलेल्या या धर्मांतराच्या घोषणेला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व मिळाले. म्हणूनच धर्मांतराची घोषणा केली, ती जागा म्हणजेच येवला शहरातील सध्याच्या कोर्ट इमारती जवळील मैदान. हे मैदान 'मुक्तिभूमी' नावाने ओळखले जाते. या घोषणेमुळे मुक्तिभूमी बौद्ध धर्मियांचे तीर्थस्थानच बनले आहे. येथे धर्मांतराची घोषणा केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास करून तब्बल तब्बल २१ वर्षांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर १४ ऑक्‍टोबर १९५६ ला लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची धम्मदीक्षा दिली. त्यामुळेच येवला हा धर्मांतराचा पाया, तर नागपूर हा कळस मानला जातो. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या येवल्यातील याच 'मुक्तिभूमी'वर दरवर्षीच्या १३ ऑक्टोबरला धर्मांतर घोषणेचा वर्धापनदिन साजरा केला जातो. तेव्हापासून प्रत्येक वर्षी १३ ऑक्‍टोबरला येथे भव्य स्वरूपात कार्यक्रम होतात. देशभरातून बौद्ध बांधव येथे येतात. लाखो भीमसैनिक या भूमीवर नतमस्तक होतात. बरोबरच बाबासाहेबांची जयंती असो की बुद्ध पौर्णिमा ही मुक्तीभूमी आंबेडकरी जनतेच्या पावलांनी गजबजून जात असते.

--

येवल्यात अस्पृश्यांची सभा

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या येवला शहर या मुख्यालयात १३ ऑक्टोबर १९३५ रोजी संध्याकाळी अस्पृश्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या परिषदेपुढे बोलताना, अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते असे काही अभ्यासक सांगतात. येवल्यातील घोषणेनंतर बाबासाहेबांनी लागलीच धर्मांतर केले नाही. त्यांनी हिंदू धर्मात सुधारणा होण्याची वाट पहिली. दोन दशके उलटूनही बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या सुधारणा दृष्टीक्षेपात न आल्याने त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरच्या 'दीक्षाभूमी'वर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

----

७८ वर्षांनंतर 'मुक्तीभूमी'ला झळाळी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतराच्या घोषणेमुळे नावारूपास आलेल्या येवल्यातील मुक्तीभूमीचे रुपडे तब्ब्ल ७८ वर्षांनी पालटले ते राज्य शासनाने टाकलेल्या पावलांमुळे. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांनी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने तब्ब्ल साडेचौदा कोटींचा निधी उपलब्ध करून देताना या मुक्तीभूमीला खऱ्या अर्थाने झळाळी मिळाली. मुक्तीभूमीवरील ३.३० हेक्टर जागेवर उभारल्या गेलेल्या वास्तू सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दाद देखील देऊन जातात. ५० फूट उंचीचा भव्यदिव्य गोलाकार असा विश्वभूषण स्तुप, तळमजल्यावरील विपश्यना हॉल, टॉयलेट ब्लॉक, क्रांती स्तंभ, पाठशाळा, कार्यशाळा, ज्ञानभवन व भिक्कू निवास, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, बगीचा व त्यातील हिरवीगावर हिरवळ, लँड स्केपिंग, स्तूप व परिसर उजळून टाकणारे दीप, पथदिवे, स्तुपाच्या आतील बाजुस दोन्ही मजल्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व चळवळीवर प्रकाशझोत टाकणारी अनेक भिंतीशिल्पे, भगवान गौतम बुद्धांचा पंचधातूपासून खास बनविलेला तीन टन वजनाचा आसनस्थ पुतळा, स्तूपाच्या बाहेरील डॉ. आंबेडकर यांचा भव्य असा पूर्णाकृती ब्रॉंझचा पूर्णाकृती पुतळा मुक्तीभूमीचे सौंदर्य खुलवून जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तरी ८३ टक्के जमीन करधाडीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील शेतकऱ्यांच्या जनरेट्यापुढे नमते घेत आणि उभ्या राहणाऱ्या जनआंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कराच्या जाचातून हरित पट्ट्यातील १७ टक्के जमीन वगळली असली तरी, ८३ टक्के पिवळ्या पट्ट्यातील जमिनीवरील करआकारणी कायम ठेवली आहे.

विशेष म्हणजे विकास आराखड्यातील ८३ टक्के पिवळ्या क्षेत्रातही जवळपास ३५ टक्के क्षेत्र हे शेतजमीन असल्याने आयुक्तांच्या चलाखीने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे शेतकरी अन्याय कृती निवारण समितीसह सत्ताधारी भाजप आणि विरोधीपक्ष शिवसेना संपूर्ण करमाफीवर कायम राहिले आहेत.आयुक्तांचा प्रयत्न हा शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारा असल्याने सत्ताधाऱ्यांनी महासभेत हा विषय मांडण्याची तयारी सुरू केली असून, समितीने जनआंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन मिळकतींच्या करयोग्य मूल्यदरात चार ते पाच पटीपर्यंत वाढ करताना शेतीक्षेत्रावरही कर लादण्याच्या आयुक्त मुंढे यांच्या अन्यायकारक निर्णयाचे तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. शहरातील जमिनीवर करयोग्य मूल्य हे ३ पैशांवरून ४० पैशांवर नेले होते. त्यामुळे सत्ताधारी भाजपविरोधी पक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसेने या करवाढीला तीव्र विरोध केला होता. मुंढेंच्या या निर्णयाविरोधात सत्ताधारी भाजपच मैदानात उतरले होते. शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या माध्यमातून जनआंदोलनाची तयारी सुरू झाली होती. त्यामुळे शुक्रवारी तुकाराम मुंढे यांनी नरमाईची भूमिका घेत, हिरव्या पट्ट्यातील शेतजमीन ही कराच्या आकारणीतून वगळल्याची घोषणा केली होती. तसेच जमीनीवरील करयोग्य मूल्य हे ४० पैशांवरून २० पैशांवर आणत आंदोलनाची व संतापाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुंढेंच्या या चलाखीमुळे दिलासा देणारे चित्र उभे राहिले असले तरी, त्यांच्या शब्दच्छलामुळे शेतकऱ्यांमध्येच फूट पडणार असल्याचे चित्र आहे.

तुकाराम मुंढेंनी हरितक्षेत्रातील शेती करातून वगळली असली तरी, हे क्षेत्र विकास आराखड्याच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ १६.९८ टक्के एवढेच आहे. शहरात सद्य:स्थितीत १६.९८ टक्के हिरवा पट्टा तर उर्वरीत ८३.०२ टक्का जमीन ही पिवळ्या पट्ट्यात आहे. पिवळ्या पट्ट्यातही ४७.९९ टक्के क्षेत्र हे निवासी वापराचे आहे. त्यामुळे जवळपास ३५ टक्के जमीन ही पिवळ्या पट्ट्यातील रिक्त आहे. यातील बिल्डरांच्या जमिनी १० टक्के असल्या तरी जवळपास २५ टक्के क्षेत्रावर आजही शेती होत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या निर्णयाने शहराभोवतालच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी, बहुतांश शेतकरी अजूनही कराच्या जाचात कायम राहिले आहेत. तसेच करयोग्य मूल्य हे २० पैशांवर आले असले तरी, एक-एका क्षेत्रावर जवळपास ६० हजारांपेक्षा जास्त कर आकारणी होणार असल्याने शेतकरी या करवाढीने भरडलाच जाणार आहे. त्यामुळे आयुक्तांच्या चलाखीने १७ टक्के शेतकरी सुखावले असले तरी, उर्वरित क्षेत्रातील शेतकरी मात्र जात्यातच अडकले असल्याने करवाढीचा वाद कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांची कोंडी

पिवळ्या पट्ट्यातही सध्या मोठ्या प्रमाणावर शेती केली जात आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे पिवळ्या पट्ट्यातही शेतजमिनीवर मोठी करआकारणी होणार असल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी सुरू होणार आहे.एकरी ६० हजारापेक्षा जास्त कर देणे शेतकऱ्यांना देणे शक्य नसल्याने त्यांच्याकडे आहे, ती जमीन विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बिल्डरांनी शेतकऱ्यांवर जाळे टाकण्यास सुरुवात झाली असून मुंबई, पुण्यातील बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा दाखवून त्यांच्याकडून जीपीओ करण्याचे प्रयत्न बिल्डरांकडून सुरू झाले आहेत. त्यामुळे करवाढीने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी सुरू झाली आहे.

भाजप आक्रमक

दरम्यान तुकाराम मुंढें करवाढीवरून बॅकफूटवर आले असले तरी, सत्ताधारी भाजप मात्र आक्रमक झाले आहे. भाजपने आयुक्तांना घेरण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने कोणते पक्ष आणि नगरसेवक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी १९ तारखेला विशेष महासभा बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवरील करवाढ मागे घेण्यात यावी आणि सामासिक अंतरावरील करवाढही मागे घेण्यासाठी भाजप आग्रही आहेत. भाजपच्या दोन आमदारांनी करवाढी विरोधातील आघाडी कायम ठेवली असून महासभेत आयुक्तांना नगरसेवकांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे.

शहरात जेथे जथे शेती होते, तेथे घरपट्टीचा कर आकारला जाऊ नये अशी भाजपची भूमिका आहे. आयुक्तांच्या निर्णयाने शहरातील शेतकरीही आत्महत्या करतील. त्यामुळे या निर्णयाला आमचा तीव्र विरोध असून संपूर्ण करवाढ माघे घेण्याची मागणी आहे. जमीनीवर ले-आउट पडल्यास कर आकारणी करावी. आमचे आंदोलन कायम आहे.

- बाळासाहेब सानप, आमदार, भाजप

शिवसेनेचा संपूर्ण करवाढीला विरोध आहे. आजच्या निर्णयाने फार फरक पडणार नाही. महासभेत आम्ही या करवाढीचा सत्ताधाऱ्यांसह आयुक्तांना जाब विचारणार आहोत. भाजपच्या सर्व आमदारांनीही या करवाढीसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी. कोणत्याही परिस्थिती ही करवाढ माघे घेण्यास आम्ही सत्ताधाऱ्यांसह आयुक्तांना भाग पाडणार आहोत.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता

आयुक्तांचा आजचा निर्णय हा तोडा फोडा आणि राज्य करा असा आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये भेदभाव निर्माण झाला असून, शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही. पिवळ्या पट्ट्यातील शेतकऱ्यांचा व भूखंडधारकांवरील संकट कायम आहे. त्यामुळे आमचे जनआंदोलन कायम राहणार असून ते अधिक तीव्र करण्यात येईल.

उन्मेश गायधनी, समन्वयक, अन्याय निवारण कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहाण भागविण्यासाठी धावताहेत टँकर

$
0
0

जिल्ह्यात २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टंचाईग्रस्त गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणावर होऊनही आणि नाशिक या योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात आघाडीवर असूनही अनेक ठिकाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अशा दुष्काळग्रस्त गावांमधील ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्याद्वारे भागविण्यात येत असून, गतवर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत यंदा सुमारे दुप्पट टँकर मंजूर करण्यात आले आहेत.

उन्हाळा तीव्र होत असताना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामस्थांना विशेषत: महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामपंचायतींकडून जिल्हा परिषदेकडे टँकरची मागणी होऊ लागली आहे. टँकर मंजूर करण्याबाबत सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी आखडता हात घेतल्याच्या तक्रारी ग्रामपंचायती तसेच स्थानिक लोकप्रतिनिधिंकडून केल्या जात होत्या. परंतु आजमितीस जिल्ह्यात तब्बल २२ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यात १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. यंदा २२ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

येवल्यात पाणी टंचाईच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. येथील २६ गावे आणि एक वाडी अशा २७ ठिकाणी ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्याखालोखाल बागलाण तालुक्यात आठ गावे आणि एका वाडीमध्ये सात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सिन्नर तालुक्यात यंदा काहीशी समाधानकारक परिस्थिती असली तरी दोन गावांमधील रहिवाशांची एका टँकरद्वारे तहान भागविली जात आहे. पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने चालू वर्षात आतापर्यंत सहा विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. त्यापैकी पाच विहिरी बागलाणमधील तर एक विहीर मालेगावातील आहे. गेल्यावर्षी १३ एप्रिल रोजी जिल्ह्यात १७ गावे आणि चार वाड्या अशा २१ ठिकाणी १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र यंदा अधिक टँकर सुरू आहेत. टँकरच्या मागणीचा प्रस्ताव आल्यास तो तत्काळ मंजूर करा, असे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याने येत्या काही दिवसांत गावोगावी पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढेल अशी शक्यताही व्यक्त होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी मालेगावीमहिलांचा मेणबत्ती मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जम्मू कश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात व उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ येथील काँग्रेसच्या माजी महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रात्री मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.

मुलींवर झालेल्या बलात्काराचा निषेध करण्यासाठी शहरातील अशोक लॉज ते गांधी पुतळा दरम्यान मोर्चा निघाला. मार्चात सहभागी महिलांच्या हातात 'भाजप के दरिंदो से बेटी बचाव', 'बलात्कारी विधायक को फांसी दो', 'मोदी योगी की सरकार बंद करो यह अत्याचार', असे फलक होते. यावेळी अनेकांनी हातात पेटत्या मेणबत्त्या होत्या. मोर्चात शेख यांच्यासह अनिता अवस्थी, फैजुल्ला रिजवान, जैबुन्निसा मुस्तफा, नूरजहा मुस्तफा, फातमा हरून आदींसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस कमिटीत प्रतिमापूजन

$
0
0

काँग्रेस कमिटीत प्रतिमापूजन (फोटो)

नाशिक : काँग्रेस कमिटीत शहर काँग्रेस आणि महिला काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत प्रत्यक्षात येण्याच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत. सध्या देशात निर्माण झालेल्या जातीपातीच्या राजकारणाने देशाचे नुकसान होत असल्याचे मत काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी व्यक्त केले. शहराध्यक्ष शरद आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश सचिव अश्विनी बोरस्ते, महिला शहराध्यक्षा वत्सलाताई खैरे,ज्युली डिसूझा, चारुशीला काळे, लक्ष्मण जायभावे, बबलू खैरे, उद्धव पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...अन् सुटला वाजवडचा पाणीप्रश्न

$
0
0

सोशल नेटवर्किंगकडून पाणी प्रकल्पाचे लोकार्पण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सोशल नेटवर्किंग फोरम जलाभियानांतर्गत पेठ तालुक्यातील वाजवड गावाला टँकरमुक्त करणारी पाणी पुरवठा योजना गावकऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाड्याचा पाणी प्रश्न सोडविल्यानंतर पेठ तालुक्यातील वाजवड गावाचे ग्रामस्थ फोरमच्या पदाधिकाऱ्यांना भेटले आणि गावाची समस्या मांडली. त्यानंतर गावाची प्रत्यक्ष पाहणी करून फोरमच्या सदस्यांनी फेब्रुवारीत वाजवडचे काम हाती घेतले. अतिशय दुर्गम भागात असलेल्या दरीतील विहिरीपर्यंत वीज पोहोचवण्याचे तसेच डोंगर चढणीतून पाइपलाइन आणण्याचे काम करून अखेर वाजवडकरांच्या दारात पाणी पोहोचविण्यात सोशल फोरमला यश मिळाले. या प्रकल्पाचे गावातील ज्येष्ठ महिलांच्या  हस्ते लोकार्पण करण्यात आले.     

अतिशय डोंगराळ प्रदेशात वसलेले वाजवड हे गाव उंचावर वसलेले आहे. पाण्यासाठी गावात प्रचंड हाल आहेत. कधीतरी टँकर येतो. दरीत असलेल्या विहिरीतून डोंगर पायवाटेवरून पाणी आणावे लागते. ही परिस्थिती पाहून इंजिनिअर प्रशांत बच्छाव आणि भूगर्भ शास्रज्ञ डॉ. जयदीप निकम यांनी त्या विहिरींची पाणी क्षमता तपासली. आणि तेथून पाइपलाइनने गावात पाणी आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गावात पाण्याची टाकी बांधण्याची जबाबदारी ग्रामपंचायतने घेतली. सोशल मीडियावर गावाची परिस्थिती पोस्ट करताच प्रतिसाद मिळाला. डॉ. अप्पासाहेब पवार, डॉ. पंकज भदाणे, डॉ. विकास गोर्हे, डॉ. आनंद तांबट, डॉ. रवींद्र शिवदे यांनी ५० हजार रुपयांची मदत दिली. त्यानंतर डॉ. माधवी गोरे मुठाळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवी मुंबई येथील एम. जी. एम. मेडीकल कॉलेजच्या १९९८ बॅचने एक लाख रुपये दिले. उर्वरित निधी सोशल नेटवर्कर्सच्या देणगीतून उभा राहिला. अशा प्रकारे केवळ अडीच लाख रुपयांत वाजवडचा पाणीप्रश्न सुटला.

सोशल नेटवर्कींग फोरम सातत्याने आदिवासी ग्रामीण भागातील गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवत आहे. लोकसहभाग वाढल्यास अजून काही गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याचा आमचा मनोदय आहे.

प्रशांत बच्छाव,

सदस्य, सोशल नेटवर्कींग फोरम.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयुक्त, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नेहरू गार्डन परिसरातील व्यावसायिकांना हटवू नये, असे कोर्टाचे आदेश असताना महापालिकेने १२ एप्रिल रोजी कारवाई केली. यामुळे कोर्टाच्या आदेशाचा अवमान झाला असून, आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी श्रमिक हॉकर्स सेनेने केली आहे. मागणीचे निवेदन भद्रकाली पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे.

शहरात सध्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू असून, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बंदोबस्तात नेहरू गार्डन येथील तीन हातगाड्या व इतर साहित्य जप्त केले. या वेळी महापालिकेचे विभागीय अधिकारी नितीन नेर, जयश्री सोनवणे यांच्यासह ५० कर्मचारी होते. मात्र, या कारवाईमुळे कोर्टाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा दावा श्रमिक हॉकर्स सेनेचे अध्यक्ष सुनील बागूल यांनी केला आहे. २०१७ मध्ये मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या एका रिट पिटिशनमध्ये हायकोर्टाने या व्यावसायिकांना नैसर्गिक बाजारपेठ असल्याने हटवू नये, असे आदेश पारित केले होते. महापालिकेने स्ट्रीट वेंडर्स अॅक्ट २०१४ आणि प्रोटेक्शन ऑफ लाइव्हलिहूड अँड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट अॅक्ट व्हेडिंग नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या कारवाईमुळे कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असून, महापालिकेने या प्रकरणी फेरीवाला समितीलाही विश्वासात घेतले नव्हते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांसह अतिक्रमण विभागाचे उपायुक्त, पश्चिम, तसेच पूर्व विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी बागूल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेने या प्रकरणी भद्रकाली पोलिसांशी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्नास मालमत्तांचा लिलाव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बड्या थकबाकीदार मालमत्ताधारकांना आणखी एक झटका देण्याची तयारी सुरू केली असून, जप्तीच्या नोटिसा देऊनही थकबाकी न भरणाऱ्या पन्नास मालमत्तांचा पहिल्या टप्प्यात जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील जाहीर नोटीस व अधिसूचना दोन दिवसांत काढली जाणार असून, २५ एप्रिल रोजी या मालमत्तांचा लिलाव होणार आहे.

महापालिकेने आतापर्यंत ४१३ बड्या थकबाकीदार मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा दिल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. दरम्यान, काँग्रेस भवनवरही लिलावाची टांगती तलवार असून, थकबाकी भरण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी आठवडाभराचा अवधी मागून घेतला आहे. महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करासह पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी मोहीम तीव्र केली होती. जवळपास ९० हजार थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्याच्या नोटिसा दिल्या असून, बड्या थकबाकीदारांची थेट मालमत्ताच जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत प्रथमच मालमत्ता कराची थकबाकी ९० कोटींच्या आसपास वसूल झाली आहे. नियमित मालमत्ता कर भरणाऱ्यांनी थकबाकी भरली असली, तरी वर्षानुवर्षे नोटिसा देऊनही थकबाकी न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर महापालिकेने डोळे वटारले होते. नोटिसा बजावूनही दाद न देणाऱ्या या बड्या संस्था आणि व्यक्तींच्या मालमत्ता आता थेट जप्त केल्या जात आहेत.

महापालिकेने आतापर्यंत शहरातील ४१३ बड्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. हायकोर्टाच्या आदेशान्वये मालमत्ता 'सील' करता येत नसल्याने त्यांच्यावर जप्तीच्या नोटिसा बजावल्या असून, यामध्ये बड्या संस्था आणि व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांना थकबाकी जमा करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या मुदतीपर्यंत या संस्था किंवा व्यक्तींनी थकबाकी जमा केली नाही, तर थेट या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याचा कायदेशीर अधिकार महापालिकेला आहे. महापालिकेने या बड्या संस्था, तसेच व्यक्तींना नोटिसा दिल्यानंतर यातील जवळपास शंभर मालमत्ताधारकांनी कोट्यवधींची थकित रक्कम महापालिकेकडे जमा केली आहे. परंतु, अजूनही मोठ्या प्रमाणावर बडे थकबाकीदार असल्याने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया महापालिकेच्या मूल्य व कर निर्धारण विभागाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात जप्त केलेल्या ४१३ पैकी शहरातील पन्नास मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याची अधिसूचना महापालिका दोन दिवसांत काढणार आहे. येत्या २५ तारखेला या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.

महापालिकाच घेणार कब्जा!

मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्यात येणाऱ्यांमध्ये मोठ्या संस्थांसह शहरातील बड्या व्यक्तींचाही समावेश आहे. मालमत्ता जप्त केली, तरी त्यासाठी लिलावात बोली येत नसल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पुढील पर्याय म्हणून महापालिकेकडून अशा मालमत्तांवर स्थायी समितीच्या अधिकारात महापालिकेचे नाव लावून एक रुपया बोली लावून त्यांचा कब्जा घेतला जाणार आहे. त्यामुळे अशा मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले आहे.

काँग्रेस भवनवरील संकट कायम

महापालिकेने जप्तीची कारवाई केल्यानंतर 'सावाना'ने आपली थकबाकी भरली आहे. परंतु, काँग्रेस भवनकडे अजूनही २६ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या २७ मार्च रोजी काँग्रेस भवनावरही जप्तीची कारवाई करण्यात आली होती. काँग्रेस भवनलाही २१ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, तोही पूर्ण होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात काँग्रेस भवनाचाही लिलाव करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांनी महापालिकेकडे पुन्हा आठवडाभराची मुदत मागितली आहे. त्यासंदर्भातील पत्रही उपायुक्तांना देण्यात आले आहे. त्यामुळे तूर्तास पहिल्या टप्प्यातील लिलावातून काँग्रेस भवन सुटले असले, तरी त्यावरील लिलावाचे संकट कायम आहे.

--

जप्त केलेल्या मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्यासाठी २१ दिवसांचा अवधी देण्यात आला होता. त्यातील काहींनी थकबाकी भरली आहे. परंतु, अजूनही काही थकबाकीदारांनी थकबाकी जमा न केल्याने पहिल्या टप्प्यात येत्या २५ एप्रिल रोजी पन्नास मालमत्तांचा जाहीर लिलाव केला जाणार आहे.

-रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त, कर संकलन व मूल्यनिर्धारण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोलो बोलो जय भीम...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डीजेवर वाजविली जाणारी भीमगीते... त्यावर बेभान होऊन नाचणारे अबालवृद्ध... एकच साहेब बाबासाहेब... बोलो बोलो जय भीम... अशा घोषणा देत भीमसैनिकांनी मिरवणुकीचा आनंद लुटला. आकर्षक चित्ररथ, जिवंत देखावे अन् डोळ्यांचे पारणे फेडणारी रोषणाई यामुळे मिरवणुकीची रंगत वाढली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती शहर आणि जिल्ह्यात जल्लोषात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी विविध संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला, तसेच प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले भीमसैनिक आणि आणि निळ्या साड्यांतील महिला, युवती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून, तसेच होर्डिंग्जद्वारे शुभेच्छा देत जयंतीचा आनंद द्विगुणित करण्यात येत होता.

दर वर्षीप्रमाणे यंदाही शहरातील पारंपरिक मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. वाकडी बारव येथून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार जयंत जाधव, प्रा. देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, माजी महापौर विनायक पांडे, शिवसेनेचे महेश बडवे यांच्यासह लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी साडेपाचला मिरवणुकीला सुरुवात झाली. आकर्षक चित्ररथ, त्यावर केलेली नेत्रदीपक रोषणाई, डीजेचा दणदणाट, त्यावर थिरकणारी तरुणाई यामुळे यंदाही जल्लोषमय वातावरण पाहावयास मिळाले.

चित्ररथांनी वेधले लक्ष

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोठा राजवाडा येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीसाठी २० मंडळांनी नोंदणी केली होती. गतवर्षी हीच संख्या २३ होती. फुले, तसेच रोषणाईने सजविलेले चित्ररथ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. त्यावर भगवान गौतम बुद्ध, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. वाकडी बारवमार्गे निघालेल्या या मिरवणुकीमध्ये शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. डोक्यावर निळा फेटा, सफेद सलवार कुर्ता, निळ्या, तसेच पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान करून महिला व तरुणी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या. ढोल-ताशांचा गजर अन् डीजेच्या दणदणाटात मिरवणूक मार्गस्थ झाली. भद्रकाली, मेनरोडमार्गे शालिमारला पोहोचलेल्या या मिरवणुकीचा रात्री उशिरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप झाला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ, निरीक्षक मंगलदास सूर्यवंशी आदींनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले होते.

या मंडळांनी नोंदवला सहभाग

मिरवणुकीमध्ये भीमशक्ती मित्रमंडळ, राहुल मित्रमंडळ, धम्मजागृती सांस्कृतिक युवा मंच, सम्राट बहुउद्देशीय संस्था, विद्रोही दलित पँथर, राहुलवाडी सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळ, उत्कर्षनगर मित्रमंडळ, संत कबीरनगर सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळ, शिवशक्ती मित्रमंडळप्रणीत त्रिशरण मित्रमंडळ, श्री बालाजी मित्रमंडळ, सिद्धार्थ मित्रमंडळ, शिवराज मित्रमंडळ, दीपक डोके फ्रेंड सर्कल गंजमाळ, त्रिशरण सांस्कृतिक मंडळ, भीमक्रांती मित्रमंडळ आदी सहभागी झाली होती. काही रथांवरील डॉ. आंबेडकरांची, तर काही रथांवरील गौतम बुद्धांची मोहक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. आकर्षक चित्ररथांसाठी यंदा प्रथमच पोलिसांच्या वतीने बक्षीसही ठेवण्यात आले होते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली अतिक्रमण निर्मूलन कारवाई करीत गरिबांना उद्ध्वस्त करू नका, असे आवाहन करणारा चित्ररथावरील देखावाही नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. सहभागी मंडळांपैकी आठ मंडळांनी डीजे लावला होता. वीजतारांना स्पर्श होऊन अनुचित घटना घडू नये याकरिता वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा-कॉलेजांमध्ये धर्माधिष्ठित शिक्षण देण्याची गरज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आजच्या तरुण पिढीने राष्ट्राचा विचार करावा, असे वाटत असल्यास शाळा-कॉलेजांमध्ये धर्माधिष्ठित शिक्षण दिले पाहिजे. आज कुणी राष्ट्राचा विचार करावयास तयार नाही. देवाजवळ मागताना मी, माझे या विषयावरच सर्व जण मागत असतात. मात्र, कधी तरी माझा हिंदू धर्म शिखरावर जावा म्हणून कुणी मागते का? त्यासाठी अभ्यासक्रमात हे शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन नारदीय कीर्तनकार विवेक नरहरी गोखले यांनी केले.

श्रीरंग अवधूत शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित प. पू. भाऊ महाराज स्वर्गे व्याख्यानमालेप्रसंगी 'श्री दत्त संप्रदाय' या विषयावर गोखले बोलत होते. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात ही व्याख्यानमाला सुरू आहे.

गोखले म्हणाले, की परमेश्वराने प्रत्येकाला विहित कर्म दिलेले आहे. त्यानुसारच आचरण व्हायला हवे. हे विहित कर्म करणे म्हणजे धर्म. कर्तव्याचे पालन म्हणजे धर्म. आणि कर्म कशासाठी तर चित्त शुद्ध व्हावे म्हणून. अध्यात्म हे अदृश्यरीत्या पाठिंबा देण्यासाठी आहे. सीमेवर जवान लढतात; परंतु त्यांच्या पाठीशी अध्यात्म ठामपणे असते.

चैतन्याविषयी बोलताना गोखले म्हणाले, की चैतन्य अनेक जन्माच्या व कर्मांच्या संस्कारामुळे काळवंडलेले असते. आतमध्ये नित्य मुक्त चैतन्य आहे; परंतु ते झाकोळले गेले आहे. त्यामुळे चित्ताच्या शुद्धीसाठी उपासना केली पाहिजे. जपजाप्य, तीर्थाटन हे चित्ताच्या शुद्धीसाठी असते. परमार्थ हा उथळपणे करण्याचा विषय नाही. तो अतिसूक्ष्मपणे हाताळण्याचा विषय आहे. गुरूस्थानाविषयी बोलताना गोखले म्हणाले, की आपण जेव्हा एखाद्या गुरूस्थानावर जातो तेव्हा आपण त्यांना पाहू शकलो नाही तरी ते आपल्याला पाहत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे आशीर्वाद मागून घ्यावयाचा असतो. परमार्थासाठी तरलता पाहिजे, सूक्ष्मता पाहिजे, अधिकाधिक सूक्ष्माकडे गेले पाहिजे, असा विचार केल्यानंतर आपल्याला पहिल्या पायरीपर्यंत जाता येते.

आजचे व्याख्यान

विषय : श्री दत्त महत्त्व

वक्ते : विवेक नरहरी गोखले

स्थळ : डॉ. कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images