Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कलाविष्कारांनी बहरला तामिळ संगम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि...' या गणेशवंदनेस भरतनाट्यमच्या सादरीकरणाची साथ देत ज्योती प्रिया यांनी सादर केलेला नृत्याविष्कार, तामिळनाडूच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणारे कलाविष्कार आणि तामिळी हास्य कलाकारांनी अफलातून सादरीकरणाने आणलेली रंगत, अशा वातावरणामुळे 'तामिळ संगम' हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी उत्तरोत्तर बहरत गेला.

जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, नवी मुंबईचे आयुक्त एन. रामास्वामी, उपायुक्त अंदू सेल्वम, संदीप विद्यापीठाचे कुलगुरू एन. रामचंद्रन, कर्नल पेरियार स्वामी प्रमुख पाहुणे होते. तामिळ नववर्षाच्या स्वागतासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नाशिकमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून तामिळी कुटुंब निवासाला आहेत. या सर्व कुटुंबांचे एकत्रीकरण व्हावे, परस्पर संवाद वाढावा या उद्देशाने तामिळ बांधवांच्या वतीने तामिळ संगम या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम झाला. शहर आणि जिल्हाभरातून तामिळ बांधवांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. या वेळी तामिळनाडूमधील विख्यात हास्य कलाकार वाडिवेल गणेशन यांच्या हास्यविनोदाच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

नाशिकच्या विकासात योगदान

पर्यावरण, प्रशासन, उद्योग, सामाजिक क्षेत्र आदी क्षेत्रांमध्ये विशेष योगदान तामिळी बांधवांनी देऊन नाशिकच्या विकासालाही हातभार लावल्याचे गौरवोद्गार या वेळी उपस्थित मान्यवरांनी काढले. नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासाठी तामिळ बांधवांनी विशेष प्रयत्न केले आहे. याशिवाय येथील औद्योगिक विकासासाठीही त्यांनी विशेष योगदान दिल्याचा उल्लेख मान्यवरांनी मनोगतात व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्रिरत्न जयंती

$
0
0

नाशिक : स्टेप फाऊंडेशन, नाशिक व छत्रपती विचार मंच यांच्यामार्फत पाटील पार्क, सातपूर- अंबड लिंक रोड, चुंचाळे शिवार येथे समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम झाला. समाजातील जातीय तेढ कमी होऊन सर्वांनी एकोप्याने राहावे व समाजातील अंधश्रद्धा झुगारून सशक्त समाज निर्माण व्हावा यावर शाहिरी गीतांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्री भ्रूणहत्या, सर्वसामान्यांना शिक्षण बेरोजगारी या सामाजिक विषयावर भाष्य करणारी गीते याप्रसंगी साजरी करण्यात आली. गोकुळ मेदगे, सचिव दीपक देवरे, राहुल भगुरे, विशाल गायकवाड, सनी बंदावणे, गोल्डी पाटील, रोशन मेदगे, आकाश काळे, तुषार बंदावणे, बबलू जगताप, गणेश नवगिरे, बबलू जगताप, राहुल अहिरे, सचिन हागवणे, नीलेश हागवणे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशमुख महाविद्यालयातडॉ. आंबेडकर जयंती

$
0
0

नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'आधुनिक भारताच्या विकासाचे प्रतिमान' या विषयावर प्रा. डॉ. विजयकुमार वावळे यांचे व्याख्यान झाले.

प्रा. भास्कर नरवटे यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेब जनसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून सर्वांनी त्यांचे लेखन वाचले पाहिजे. त्यांचे विचार जाणून घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. प्रमुख वक्ते डॉ. विजयकुमार वावळे यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. आंबेडकर हे एक विकासपुरुष होते. डॉ. आंबेडकरांनी प्रतिगामी पद्धतीने कररचना निर्माण केली होती, असे विचार त्यांनी मांडले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना पांढरे अध्यक्षस्थानी होत्या. प्रा. संदीप गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. जीवन सोळंके यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूर, इगतपुरीत बेकायदा मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ड्राय डे घोषित झाल्याची संधी साधत विक्रीसाठी बेकायदा मद्यसाठा साठवून ठेवणाऱ्या इगतपुरी आणि सातपूरमधील तिघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. या कारवाईत मारुती कारसह तब्बल दोन लाखांहून अधिक देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई भरारी पथक क्र. १ ने केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी सर्व पथके सतर्क केली होती. त्यानुसार भरारी पथक क्र. १ चे निरीक्षक प्रवीण मंडलिक यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी बुधवारी इगतपुरी तालुक्यातील गंभीरवाडी येथे छापा टाकला. त्या वेळी भाऊराव पिचड याच्या घरात तब्बल ७० हजारांचा बेकायदा विदेशी मद्यसाठा आढळला. दुसऱ्या घटनेत सातपूर परिसरातील प्रबुद्धनगर येथे मयूर नामदेव लोहारे आणि वैभव बाळू साबळे (दोघे रा. वाल्मीकनगर) या दोघांना बेकायदा मद्यसाठा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. हे दोन्ही संशयित शुक्रवारी कारमधून मद्याची वाहतूक करताना आढळले. त्यांच्या ताब्यातून कार आणि मद्यसाठा असा एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक माधव तेलंगे, जवान विष्णू सानप, वीरेंद्र वाघ, विलास कुवर, सुनील पाटील, विजेंद्र चव्हाण, गौरव तारे आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भवती महिला कैदी रुग्णालयातून पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मालेगाव येथील शायदा शफिक पठाण (वय ३०) या गर्भवती महिलेला पोट दुखत असल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत ही महिला शुक्रवारी दुपारी सिव्हिलमधून फरार झाली असून, तिची सर्वत्र शोधाशोध सुरू आहे. तिचा शनिवारी सायंकाळपर्यंत ठावठिकाणा लागला नाही. पोलिसांनी या प्रकरणी प्रसूतितज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेला माहिती दिली असून, तिचे छायाचित्रही ठिकठिकाणी वितरित करण्यात आले आहे.

मालेगाव येथील शायदा आणि तिच्या पतीवर हत्येचा आरोप असून, नोव्हेंबर २०१७ मध्ये दोघांना अटक करण्यात आली होती. अटक झाली त्या वेळी शायदा गर्भवती होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे मालेगावच्या पवारवाडी पोलिसांनी या दोघांना १८ नोव्हेंबर २०१७ रोजी नाशिक सेंट्रल जेलमध्ये धाडले. शायदाला अरबाज हा दोन वर्षांचा मुलगा आहे. शायदाने १२ एप्रिल रोजी पोट दुखत असल्याची तक्रार केली. त्यानुसार सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जेलमध्ये येऊन तिची तपासणी केली. गर्भपिशवीचे तोंड उघडण्यास सुरुवात झाली असल्याने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार जेल प्रशासनाने शायदा आणि अरबाजला पाठवले. अॅडमिट झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे डॉक्टरांनी शायदाचे सिझर करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया कधी करायची हे १३ एप्रिल रोजी निश्चित होणार होते. दरम्यान, शायदा सतत अरबाजबरोबर खेळत होती. वार्डाबाहेर जाणाऱ्या अरबाजाला ती परत घेऊन येत होती. बराच वेळ हा खेळ सुरू होता. सुरुवातीला लक्ष देणाऱ्या जेल प्रशासनाच्या महिला कर्मचारी यामुळे थोड्या निर्धास्त झाल्या. याचाच फायदा उचलत शायदा अरबाजला घेऊन पसार झाली. या प्रकरणी छाया भाकरे या तुरुंग रक्षक महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले, की तिची परिस्थिती फार दूर जाण्यासारखी नाही. कधीही तिचे बाळंतपण होऊ शकते. यामुळे गायनॅकोलॉजिस्ट सोसायटीला याबाबत माहिती देण्यात आली असून, विविध हॉस्पिटलमध्ये तिचा तपास सुरू आहे. या प्रकरणी मालेगावच्या पवारवाडी पोलिस स्टेशनलाही माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमाला विरोध, तरुणीच्या कुटुंबावर हल्ला

$
0
0

नाशिकरोड : प्रेमसंबंधांना विरोधाच्या कारणावरून सिन्नर फाटा येथील दोन कुटुंबांत वाद होऊन तरुणीच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींनी हल्लेखोरांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सिन्नर फाटा येथील स्टेशनवाडीत किराणा दुकान चालवितात. त्यांच्या शेजाऱ्यांच्या नातेवाइकासोबत दोन आठवड्यांपूर्वी फिर्यादीची मुलगी गेली होती. नंतर फिर्यादीने तिला परत आणले होते. त्यावरून शनिवारी मध्यरात्री दीड वाजता हाणामारीचा प्रकार घडला. तक्रारीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकरांना अपेक्षित घटना लागू झाल्यास देश महासत्ता

$
0
0

डॉ. संजय जाधव यांचे प्रतिपादन

म. टा.खास प्रतिनिधी, नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी घटना लागू झाल्यास देश महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. अजूनही आपण जाती वाटलेलो आहोत, बलात्कार झालेल्या स्त्रीची जात पाहिल्यानंतर मोर्चे कुणी काढायचे हे ठरते, ही आपल्या देशाची शोकांतिका आहे, असे विचार डॉ. संजय जाधव यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या डॉ. आंबेडकर जयंतीप्रसंगी व्यक्त केले.

कादंबरीकार राकेश वानखेडे, कवी अॅड. अशोक बनसोडे, कवी काशिनाथ वेलदोडे प्रमुख पाहुणे होते. या वेळी राकेश वानखेडे म्हणाले, की महापुरुषांच्या जीवनातील ठळक घटना घेऊन त्यांचे चरित्र कथन केले जाते. मात्र, महापुरुष त्याहून व्यापक विचार व कार्य करीत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र समकालाशी संबंधित सांगण्याची आज सर्वाधिक अपेक्षा आहे. समाजाच्या उन्नतीसाठी ती गोष्ट महत्त्वाची ठरेल.

ग्रंथ सचिव बी. जी. वाघ यांनी प्रास्ताविक केले. सावानाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, सहाय्यक सचिव अॅड. भानुदास शौचे, अर्थसचिव शंकरराव बर्वे, बालभवन प्रमुख संजय करंजकर, वसंत खैरनार, उदयकुमार मुंगी, देवदत्त जोशी, माजी अध्यक्ष मधुकर झेंडे, प्रभाकर धात्रक, शशिकांत राऊत, शारदा गायकवाड, सुधीर खैरनार, श्याम पाटील, प्रशांत केंदळे, श्याम दशपुत्रे, श्यामराव वराडे, नंदू वराडे, अशोक पाटील आदी उपस्थित होते. प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती निवारणासाठी आराखडे तयार करण्याचे निर्देश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा उन्हाच्या झळा अधिक तापदायक ठरतील असे वर्तविले जात असले तरी पाऊसही जोरदार होईल, असा अंदाज व्यक्त होऊ लागला आहे. सरासरीएवढा किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू केली आहे. आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासह दरडप्रवण क्षेत्रही निश्‍चित करण्याचे निर्देश तालुका स्तरावर देण्यात आले आहेत.

नाशिकवर सर्व ऋतू मेहेरबान असतात हे सातत्याने अनुभवास येते. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रचलित असलेल्या नाशिकमध्ये उन्हाळाही तेवढाच तापदायक असतो. मुसळधार पाऊस नाशिककरांना झोडपून तर काढतोच; परंतु पुराच्या रूपाने निसर्गाचे रौद्र रूपही दाखवून देतो.

गेली दोन वर्षे जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असून, त्याने सरासरीही ओलांडली आहे. गेल्या वर्षी ११३ टक्के एवढा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला होता. यंदाही सरासरीएवढा किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात असून त्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात नाशिकसह, दिंडोरी, निफाड या तालुक्यांना पुराचा अधिक धोका असतो. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांसह अन्य तालुक्यांमध्येही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास काय खबरदारी घ्यावी, कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तीन पानाची चेकलिस्टच तालुक्यांना वितरित केली आहे. त्यानुसार तालुका प्रशासनाला माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये बाधित होऊ शकणारी पूरप्रवण गावे, वाड्या- वस्त्यांची यादी करावी, तेथील रहिवाशांची माहिती संकलित करावी, या भागांना जोडणारे कच्चे व पक्के रस्ते कोणते, रस्त्यांवरील पूल यांचीही सद्य:स्थिती या आराखड्यांमध्ये नमूद करावी लागणार आहे. आपत्ती निवारणासाठी तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीची यादीही आराखड्यामध्ये समाविष्ट करणे अभिप्रेत आहे. अशी साधनसामग्री हाताळू शकतील अशा जवळपासच्या तज्ज्ञ व्यक्तींची नाव, पत्ता व त्याचा संपर्क क्रमांकही आवर्जून घ्यावा लागणार आहे.

हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा निश्चिती

पूरबाधित ठिकाणांवरील रहिवाशांसाठी सुरक्षित निवारे, त्यांच्यासाठी जेवण, तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करणे, आपत्तीत हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅडसाठीची जागा निश्‍चित करणे, पूरस्थितीत वैद्यकीय मदत देणारे पथक, जीवरक्षक, शोध व बचाव पथके तयार करण्याबाबतही तालुका स्तरावर सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १० जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. ही शक्यता गृहीत धरून तालुका प्रशासनाला आराखडे सादर करण्यासाठी मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त आराखड्यांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख रामदास खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ते बदल केले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन गोडावूनला मालेगावी आग

$
0
0

लाखोंचे साहित्य खाक

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील दोन वेगवेगळ्या भागात शनिवारी मध्यरात्री व दुपारी लागलेल्या आगीच्या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. सुदैवाने या दोन्ही आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्नीशमन दलाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

शहरातील सटाणा नाका भागातील शिवरोडवरील हरी ओम टेंट हाऊसच्या गोडावूनला शनिवारी मध्यरात्री १.३० वाजता भीषण आग लागली. अश्विनी अनिल भावसार यांच्या मालकीचे हे गोडावन असून आजूबाजूला अनेक रहिवासी असल्याने आग पसरण्याची भीती होती. रात्री मोठे धुराचे लोट व आग दिसू लागल्याने हा प्रकार नागरिकांना लक्षात आला. गोडाऊनमध्ये नुकतेच लग्नसमारंभसाठीचे सजावट साहित्य खरेदी करून ठेवण्यात आले होते. मात्र भीषण आगीत हे सगळे साहित्य जाळून खाक झाले. सुमारे २५ ते ३० लाखाचे साहित्य या आगीत जाळून खाक झाल्याचा अंदाज आहे.

अग्निशामक विभागास माहिती मिळताच आग विझविण्यासाठी ४ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक अधिकारी संजय पवार यांच्यासह शकील अहमद, मनोहर तिसगे, शफिक खान, जीवन नाहीरे, प्रकाश भोसले आदी कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पहाटे साडे चार वाजता अग्निशामक दलास आग विझविण्यात यश आले. यासाठी ४ बंबांनी १० ते १२ फेऱ्या केल्या. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गोडावूनही खाक

सटाणा नाका परिसरातील आग आटोक्यात आली तोच शनिवारी दुपारी मुंबई आग्रा महामार्गावर असेलल्या स्टार हॉटेल मागील प्लास्टिक गोडावूनला आग लागली. इरफान खान नसीम खान असे यांचे हे गोडावून आहे. गोडावून बाहेरील ओपन स्पेसमध्ये असलेल्या प्लास्टिकला आग लागल्याने धुराचे लोट आकशात दिसत होते. अग्निशामक विभागास माहिती मिळताच आग विझवण्यासाठी बंब दाखल झाले. सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक - घरकुल योजनेचा आढावा व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे

$
0
0

घरकुल योजनेचा

आढावा 'व्हीसी'द्वारे

जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. गिते घेणार माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरी व ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेबाबत १७ एप्रिल रोजी तालुकास्तरावर सर्व लाभार्थ्यांसह आढावा सभा घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी तालुकास्तरीय यंत्रणेला दिले आहेत. सर्व १५ तालुक्यात या आढावा बैठका होणार असून, डॉ. गिते व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत.

सिंचन विहिरी व घरकुल योजना विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेण्यात येत आहे. योजनेबाबत या बैठकीसाठी गट विकास अधिकारी, उप अभियंता, शाखा अभियंता, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, ग्रामसेवक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, ग्राम रोजगार सेवक, संबंधित लाभार्थी यांनी उपस्थित राहावयाचे आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावरून तालुक्यांसाठी नेमून दिलेले संपर्क अधिकारी यांनी तालुक्यास उपस्थित राहून आढावा घ्यायचा आहे.

दरम्यान, ज्या लाभार्थ्यांची कामे पूर्ण होऊनही अदयाप लाभ मिळाला नसेल, निधी उपलब्ध असूनही देण्यास टाळाटाळ केली जात असेल, अशा लाभार्थ्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेताना आपल्याकडे थेट तक्रार करावी असे आवाहनही डॉ. गिते यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघंबा शेरमाळ योजनेस पाच कोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील वाघंबा शेरमाळ डोंगर हद्दीतील पाणी पश्चिम वाहिनीद्वारे अरबी सुमद्रात वाहून जात होते. हे पाणी अडवून ते तापी तुटीच्या खोऱ्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पात वळविण्यात यासाठीच्या नियोजित वाघंबा शेरमाळ डोंगर वळण योजनेस आदिवासी उपयोजनेच्या अंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.

बागलाण तालुक्यातील पश्चिमेकडील डोंगर रागांतुन मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी गुजरातकडे वाहून जाते. या पाण्याचा वापर स्थानिकांसाठी व्हावा यासाठी आमदार चव्हाण यांनी प्रयत्न केले. आता हे सर्व पाणी पाणी हरणबारी धरणात जावून मिळणार असल्याने हरणबारी लाभक्षेत्रातील गावे व मोसम खोऱ्याला या पाण्याचा लाभ मिळणार आहे. परिसरातील सिंचन व बिगर सिंचनास अतिरीक्त पाणी उपलब्ध हेाणार असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी दिली. आगामी काळात हरणबारी उजवा कालव्यातून वाढीव कालवा पारनेर-सातमानेपर्यंत या पाण्याचा उपयोग व्हावा, यासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यांचाही पाठपुरावा सुरू असल्याचे चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य प्रवक्तेपदी जगताप

$
0
0

स्वाभिमानी 'शेतकरी'च्या

राज्य प्रवक्तेपदी जगताप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नुकतीच देहू येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष यांची दोन दिवस खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या राज्य कार्यकारिणीत काही राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांची खांदा पालट करण्यात आली. त्या बदलात नाशिक जिल्हा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व कवी संदीप जगताप यांना संघटना व पक्ष याचा राज्य प्रवक्ता या पदावर नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्रातील नामवंत ग्रामीण कवी, शेतकरी संपात अग्रेसर असणारे नाशिक जिल्ह्यातील चिंचखेड येथील संदीप जगताप यांनी काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला होता. त्यांच्यावर खा. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी पक्षाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली होती.

जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करताना अतिशय सूत्रबद्द केलेलं संघटनेचं काम, शेतकरी समस्यांचा असलेला सखोल अभ्यास, प्रभावी वक्तृत्व, कवी, लेखक म्हणून राज्यभर असलेली ओळख व ठामपणे घेतलेल्या शेतकरी हिताच्या भूमिका या सगळ्यांचा विचार करून खा. राजू शेट्टी यांनी संदीप जगताप यांच्या वर संघटना व पक्ष याची प्रसार माध्यमात अधिकृत भूमिका मांडण्यासाठी व अजून राज्यभर संघटनेच्या प्रचार प्रसारासाठी राज्य प्रवक्ता म्हणून निवड केली. तसेच या निवडीमुळे राज्यकार्यकारणी समितीचे सदस्यही ते झाले.

अतिशय कमी वयात व चळवळीचा कमी अनुभव असताना माझ्यावर खा. राजू शेट्टी व इतर सर्व सन्मानीय पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जी जवाबदारी सोपवली. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे, असे प्रतिक्रिया संदीप जगताप यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मी नाशिककर’च्या झेंड्याखाली लढा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात दोन पावले मागे येत हरित क्षेत्रातील शेती करातून वगळण्यासोबतच पिवळ्या पट्ट्यातील जमिनीवर करयोग्य मूल्य ४० पैशांऐवजी २० पैसे करून करवाढीच्या आंदोलनाची तीव्रता कमी केली आहे. परंतु, आयुक्तांच्या या निर्णयानंतरही करवाढीविरोधात तयार झालेल्या शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीने या अन्यायकारक, बेकायदेशीर, सुलतानी करवाढीविरोधात व्यापक जनआंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी 'मी नाशिककर' या झेंड्याखाली सर्वांना एकत्रित केले जाणार असल्याची माहिती कृती समितीचे सल्लागार उन्मेश गायधनी यांनी दिली.

दरम्यान, या करवाढीविरोधात महापौर रंजना भानसी यांनी येत्या गुरुवारी (दि. १९) महासभा बोलावली असून, त्याद्वारे प्रशासनाची कोंडी केली जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या करवाढीच्या निर्णयाविरोधात शहरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना होती. त्यामुळे आयुक्तांनी त्याची तीव्रता कमी करण्यासाठी दोन पावले माघारी येत हरित पट्ट्यातील शेतजमीन वगळत, तसेच पि‌वळ्या पट्ट्यातील जमिनीच्या करात ४० पैशांवरून २० पैशांची कपात केली आहे. परंतु, नव्या मालमत्तांचे वाढवलेले पाच करयोग्य मूल्य कायम ठेवले आहे. परिणामी पिवळ्या पट्ट्यातील शेतीवरील कर कायम राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी या करवाढीविरोधात यापूर्वी स्थापन झालेल्या शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या झेंड्याखाली लढा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे असून, उन्मेश गायधनी सल्लागार आहेत. समितीत एका सरचिटणीसासह नऊ सदस्य आहेत. महापालिका आयुक्तांनी नव्यानेच जी अन्यायकारक, बेकायदेशीर, सुलतानी करवाढ केली आहे, त्याविरोधात जनजागृती करण्याचे आणि त्यातून व्यापक जनआंदोलन उभे करण्याचे शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीने ठरविले आहे. करवाढीविरोधातील जनआंदोलनाचे नियोजन आणि त्याची रुपरेषा शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समिती ठरवीत आहे. करवाढीविरोधातील या जनआंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींचे शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समिती स्वागतच करते. सर्वांनी कृती समितीच्या आंदोलनात सहभागी होऊन नाशिककरांना न्याय मिळवून देण्यासासाठी आपले राजकीय झेंडे बाजूला ठेवून केवळ 'मी नाशिककर' या नात्याने सहभागी व्हावे, असे आव्हान कृती समितीतर्फे करण्यात येत आहे.

--

महासभेत वादंगाची चिन्हे

करवाढीमुळे भाजपविरोधातील असंतोषाची धग कमी करण्यासाठी सत्ताधारी भाजपने येत्या गुरुवारी (दि. १९) तातडीने विशेष महासभा बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या करवाढीच्या निर्णयाला भाजपचा विरोध असला, तरी महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपलाही असंतोषाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने महापौरांनी १९ रोजी सभा बोलावली आहे. त्यामुळे या सभेत वादंग होण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांकडून याबाबत प्रशासनाला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानेही तयारी सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात चिमुकलीचा मृत्यू

$
0
0

वरवंडी येथे अज्ञात वाहनाने दिली धडक

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुटीत मामाच्या गावाला वरवंडी (ता. देवळा) येथे आलेल्या वार्शी (ता. देवळा) येथील आठ वर्षांच्या चिमुकलीचा रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. या अपघातामुळे वरवंडी व वार्शी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वरवंडी येथे तत्काळ गतिरोधक बसविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वार्शी येथील इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेली माधुरी धनाजी पवार (वय ८ वर्षे) ही उन्हाळी सुटी लागल्याने शनिवारी वरवंडीला आपल्या कुटुंबियांसह आली होती. रस्ता ओलांडत असताना माधुरीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने माधुरी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. गंभीररित्या जखमी झालेल्या माधुरीला अधिक उपचारासाठी कळवण येथे येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मयत माधुरीच्या अपघाती निधनाने वार्शीसह वरवंडी येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अज्ञात वाहनाधारका विरोधात देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर माधुरीवर वार्शी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. माधुरीच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.

वरवंडी हे गाव देवळा-कळवण रस्त्याच्या कडेला आहे. गाव रस्त्याच्या एका बाजूला व शिवार दुसऱ्या बाजूला असल्याने विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ता ओलांडताना सतत काळजी घ्यावी लागते. या रस्त्यावर सतत अपघात होतात. त्यामुळे वरवंडीच्या दोन्ही बाजूंना तत्काळ गतिरोधक बसविण्यात यावेत.

-किशोर चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठाण पुनर्विकासावर प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील सर्वांत जुन्या गावठाण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासह या भागाचा कायापालट करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महापालिकेच्या नव्या मालमत्ताकराच्या धोरणामुळे येथील पुनर्विकास योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. नव्या करयोग्य मूल्य दराने येथील घरपट्टी ही वाढल्याने या भागाचे नूतनीकरण आणि वापरात बदलाचे प्रयत्न फसणार आहेत. महापालिकेच्या या अवाजवी करवाढीमुळे या भागात भाजपविरोधी वातावरण तयार होत असून, त्याला हवा देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित आंदोलनाची तयारी केली आहे.

सध्याचे जुने नाशिक आणि पंचवटीचा काही भाग हा गावठाणात येतो. मूळ नाशिक अशी आपली ओळख हा भाग अजूनही जपून आहे. शहरातील व्यापाराचे व पर्यटनाचे केंद्र आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल याच भागात होते. शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना या भागातील समस्या मात्र कायम आहेत. अरुंद रस्ते, जुनी वाडे, पडकी घरे, रस्ते आदी प्रश्न या भागात आहेत. या भागाच्या पुनर्विकासासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अनेक जणांनी तर आपले घर सोडून या भागातून काढता पाय घेतला आहे. जुने व पडीक वाडे, घरे दुरुस्तीसाठी पुरेशी जागा नसल्याने, तसेच वाढीव चटई क्षेत्र मिळत नसल्याने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. येथील जुन्या वाड्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून भाडेकरूंमुळे न्यायालयात प्रलंबित आहे. याच कारणामुळे जुने नाशिक व गावठाण भागात मोठे रस्ते व्हावे, पार्किंगसाठी पुरेशी जागा मिळावी, तसेच वाढीव चटई क्षेत्र मिळून मिळकती विकसित करण्याच्या दृष्टीने क्लस्टर डेव्हलपमेंट ही संकल्पना पुढे आली. त्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राज्य व केंद्र सरकार, तसेच महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. लोकप्रतिनिधीही मंत्रालयात बैठकींवर बैठकी घेत आहेत. असे सर्व चित्र असताना महापालिकेच्या नवीन कर धोरणामुळे या सर्व कार्यावर पाणी फिरणार आहे. या भागातील बहुतांश घरे भाडेतत्त्वावर आहेत. सात ते दहा रुपयाने अनेक भाडेकरू आजही या ठिकाणी वास्तव्य करतात. नवीन मालमत्तांचे करयोग्य मूल्य हे ५० पैशांवरून दोन रुपये, तर अनिवासीचे सात रुपयांपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे पुनर्विकास करताना येथील नागरिकांना अव्वाच्या सव्वा घरपट्टीचा सामना करावा लागणार आहे. सध्या गावठाण भागाला ३०० ते एक हजारांपर्यंत घरपट्टी आहे. मात्र, नव्या करवाढीने घरपट्टीत पाच ते दहा पट वाढ होणार आहे. त्यामुळे पुनर्विकासाला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे.

आंदोलनाचे नियोजन

नव्या करवाढीमुळे येथील पुनर्विकास रखडण्याची शक्यता असल्याने करवाढीविरोधात असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांनी या संदर्भात प्रयत्न सुरू केले असून, या करवाढीविरोधात लोकांना जागरूक केले जाणार आहे. गा‌वठाणातील रहिवाशांचा लवकरच मेळावा आयोजित केला जाणार असून, मोठ्या आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सायकलस्वार श्रमिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घरकाम, तसेच इतर ठिकाणी काम करणाऱ्या व या कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करणाऱ्या महिलांचा नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे श्रमिका सायकल रॅलीचे आयोजन करीत यथोचित सन्मान करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या या रॅलीत सुमारे ६० श्रमिक महिलांनी सहभाग नोंदविला. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे नाशिक शहरात गेल्या १० वर्षांपासून सायकल चळवळ राबविण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवीत सायकलिंगचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.

महात्मानगर क्रिकेट मैदान ते शांतुशा लॉन्स, गंगापूररोड अशा मार्गावर शनिवारी सकाळी ७ वाजता श्रमिका सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीनंतर या विशेष आमंत्रित श्रमिकांचा सन्मान करून त्यांचा नीलेश जाजू यांच्या सखी सारीजकडून भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे मार्गदर्शक हरीश बैजल, अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, वैभव शेटे, आदी सदस्य उपस्थित होते.

लीलाबाई राजपूत (वय ५८) गेल्या चाळीस वर्षांपासून सायकल चालवीत काम करण्याच्या ठिकाणी पोहोचतात. यावेळी लीलाबाईंनी सांगितलेला अनुभव असा, की त्या काळात सायकल वापरण्यामुळे अनेक वेळा त्यांनी समाजातील प्रवृत्तींचा सामना केला. आजही मुले नोकरीला आहेत. आई सायकलवर कामाला जाते याची मुलांनाही लाज वाटते. मात्र, मोटारसायकल वापरण्याची ऐपत असूनही गेल्या अनेक वर्षांपासूनच्या सवयीमुळे सायकल चालवीत काम करण्यास जाण्याची वेगळीच मजा असल्याचे त्यांनी सांगितले. त्या घरोघरी जाऊन मसाज करण्याचे काम त्या करतात.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध नाश्त्याचे पदार्थ सायकलवर विकणाऱ्या गौरी पटवर्धन यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. घरकाम करून आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या व कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करणाऱ्या अनेक महिला श्रमिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या घटकांना सायकल चळवळीत सामावून घेण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. या श्रमिका सायकल रॅलीसाठी गौरी समाजकल्याण संस्थेच्या रोहिणी नायडू यांचे आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.

दरम्यान, नाशिकमध्ये सुरू असलेल्या सायकल चळवळीला गती देण्यासाठी आता पुढचे पाऊल म्हणून नाशिक शहराच्या विविध दहा विभागांत दहा प्रमुख आणि कमिट्यांची नियुक्तीही यावेळी करीत त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. शहरातील दहा प्रमुख विभागांत एका प्रमुखाच्या नेतृत्वाखाली पाच किंवा अधिक कमिटी मेंबर्सची टीम सायकलिंगच्या प्रचार व प्रसाराचे काम करेल.

पंढरपूरसाठी ऑनलाइन नोंदणी

नाशिक सायकलिस्टतर्फे पंढरपूर सायकलवारीसाठी फेसबुक इव्हेंटद्वारे ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. दि. १३ ते १५ जुलैदरम्यान निघणाऱ्या या पंढरपूर सायकलवारीमध्ये श्रमिका सायकल रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनीही नोंदणी केली असून, सायकल वापरणाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने यात सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शनिवारी 'सायकल विथ कमिशनर'

नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांनी हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. यावेळी नाशिकमध्ये सुरू असलेल्या सायकल चळवळीची माहिती मुंढे यांना देण्यात आली आणि 'वॉक विथ कमिशनर' या नवी मुंबईत गाजलेल्या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 'सायकल विथ कमिशनर' असा उपक्रम घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. मुंढे यांनी तात्काळ त्यास होकार दिला. येत्या शनिवारी (दि. २१ ) सकाळी ६.३० ते ८.३० वाजेदरम्यान सायकलवर गोल्फ क्लब येथे येऊन ते नागरिकांशी संवाद साधतील.

(अँकर) फोटो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढविरोधात बैठक

$
0
0

करवाढविरोधात बैठक

पंचवटी : शेतजमिनीवर कर लादण्याच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी पुढील आंदोलनाची भूमिका ठरविण्यासाठी आज, रविवारी (दि. १५) सकाळी ९ वाजता आडगाव येथे शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीस आडगाव, मानूर, नांदूर आदी परिसरातील शेतकरी उपस्थित राहतील.

म्हसोबा महाराज यात्रा

पंचवटी : म्हसोबा महाराज यात्रोत्सव आज, रविवारी (दि. १५) म्हसोबा पटांगणात होणार आहे. त्यानिमित्त सकाळी श्रींचा अभिषेक व महापूजा, सायंकाळी सवाद्य मिरवणूक व महाप्रसाद, दशावतारी सोंगे व बोहाडा आदी कार्यक्रम होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीविरोधात १७ ला वकिलांची बैठक

$
0
0

नाशिक : महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात नाशिक बार असोसिएशन सरसावली आहे. बार असोसिएशन आणि नाशिक विकास आराखडा अन्याय निवारण कृती समिती यासाठी एकत्र आली असून, या संदर्भात विचार करण्यासाठी १७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जिल्हा न्यायालयातील लायब्ररी हॉलमध्ये बैठक होणार आहे. महापालिकेने नुकतेच मालमत्तेवर, तसेच शेतजमीन मिळकतींवर मोठा कर वाढवला आहे.

निशा शिराळचे यश

नाशिक : जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या 'गणेशोत्सव : काल, आज आणि उद्या' या विषयावरील शालेय निबंध स्पर्धेत सर्व शाळांमधून यश मिळवणाऱ्या वैदेही उर्फ निशा गुलाबराव शिराळ या विद्यार्थिनीचा पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सत्कार केला. वैदेही महापालिकेच्या देवळाली येथील शाळा क्रमांक १२७ मध्ये आठवीत शिक्षण घेते. या वेळी वैदेहीच्या पालकांसह विलास चाबूकस्वार, विलास काळे उपस्थित होते.

सत्कार समारंभ

नाशिक : नाशिक बार असोसिएशनचे सभासद अॅड. मिलिंद निकम, अॅड. शिवाजी थापेकर, अॅड. मुग्धा गांगुर्डे, व अॅड. विजय शितोळे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अॅड. वैशाली भोसले या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या असून, या सर्वांचा नाशिक बार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा सोहळा १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा कोर्टातील जुनी लायब्ररी हॉलमध्ये होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्टोन्मेंटच्या सीईओंची बदली

$
0
0

कॅन्टोन्मेंटच्या सीईओंची बदली

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात गत तीन वर्षांपासून मुख्य कार्यकारीपदावर असलेले विलास पवार यांची जोधपूर येथे डिफेन्स इस्टेट ऑफिसरपदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी तेजपूर येथील डिफेन्स इस्टेट ऑफिसर अजय कुमार पदभार स्वीकारणार आहेत. तोपर्यंत औरंगाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार बी. नायर यांच्याकडे येथील कार्यभार देण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयातील प्रिन्सिपल डायरेक्टर डिफेन्स इस्टेट यांच्यामार्फत तसा आदेश नुकताच स्थानिक यंत्रणेला प्राप्त झाला आहे. देशभरातील एकूण १७ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी देवळालीच्या विकासात मोठी भर घालताना भूमिगत गटार योजना, रखडलेली कामगार भरती, यूपीएससी व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका, शालेय विद्यार्थ्यांकरिता अटल टिकरिंग लॅब यांसारख्या विविध योजना, शहरातील सर्व एलईडी, आनंदरोडवरील क्रीडा संकुल, शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या फ्री होल्ड केसेस मार्गी लावणे, कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांच्या घरांना शौचालये, आठवडेबाजार अतिक्रमण व काँक्रिटीकरण,उर्दू शाळेचा प्रश्न, हायड्रॉलिक फायर ब्रिगेड, साठेनगरचा रस्त्यांचा प्रश्न, सर्व देयके व करप्रणाली ऑनलाइन करणे, तसेच प्रशासकीय कामकाज संपूर्णपणे संगणकीकृत करणे आदी कामे मार्गी लावली. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत केंद्र व राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांनी बोर्डाला मिळवून दिला होता.

----

थोडक्यात

--

'प्रेस सोसायटी'स चार कोटींचा नफा

जेलरोड : नाशिकरोड प्रेस कामगारांच्या आयएसपी सोसायटीला २०१७-१८ या वर्षात तीन कोटी ९१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष जगदीश गोडसे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जुंद्रे, सचिव विष्णू जगताप यांनी दिली. संचालक भगवान मोरे, गणेश काळे, राजेंद्र चंद्रमोरे, साहेबराव गाडेकर, हिरामण आव्हाड, रमेश जाधव, संदीप गांगुर्डे, मंगला खर्जुल, सुनंदा कडाळे आदी उपस्थित होते. गोडसे म्हणाले, की ३१ मार्च २०१८ अखेर भागभांडवल १९.९६ कोटी असून, खेळते भांडवल १९७.९५ कोटी आहे. सभासद संख्या २,६९८ असून, स्वनिधी २७.०६ कोटी आहे. १५७.२७ कोटींच्या सभासद ठेवी जमा असून, ९६.२६ कोटी कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. एनपीए शून्य टक्के, तर सीडी रेशो ५४ टक्के आहे. संस्थेने तरलतेपोटी ६४.८० कोटींची गुंतवणूक केली आहे. संस्थेचा सीआरआर १.७९ टक्के असून, आज संस्था बँक कर्जमुक्त आहे. चालू वर्षात सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचे नियोजन आहे. संस्था स्थापनेपासून संचालक मंडळाने व्यवसायवृद्धी व सभासद समाधानासाठी नवनवीन योजना राबविल्या आहेत. दरवर्षी गणेशोत्सव, गुणवंत विद्यार्थी सत्कार होतो. सभासदांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. सभासदांच्या मागणीचा विचार करून कर्जमर्यादा १० लाखांवरून १५ लाखांपर्यंत करण्यात आली आहे.

---

पॉइंटर्स

--

वेध एमएच-सीईटीचे -२

भाजीविक्रेत्यांना नोटीस -३

आमची सोसायटी आमची शान -४

बालमित्राच्या भेटीची ओढ -५

फोनमधील स्मार्ट रहस्य -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंथेटिक ट्रॅकची धूळधाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील धावपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवित असल्याने भविष्यात त्यांना आणखी 'गती' मिळावी यासाठी बनविण्यात आलेल्या आडगाव नाका परिसरातील सिंथेटिक ट्रॅकला सध्या चक्क जॉगिंग ट्रॅकचे स्वरूप आले आहे. असंख्य नागरिक येथे जॉगिंगसाठी अनधिकृतपणे घुसखोरी करीत असल्याने कोट्यवधी रुपये खर्चाच्या या सिंथेटिक ट्रॅकची धूळधाण झाल्याची भावना क्रीडाप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुलात तयार करण्यात आलेल्या या सिंथेटिक ट्रॅकवर दररोज सकाळी शेकडोंच्या संख्येने नागरिक अनधिकृतपणे घुसखोरी करून जॉगिंग करताना दिसून येत आहेत. मात्र, तरीही या ट्रॅकची जबाबदारी असलेले प्रशासन सुस्त असल्याचे दिसून येत आहे. या मैदानाचे प्रवेशद्वार बंद असतानादेखील त्यावर चढून शेकडो नागरिक येथे सर्रास घुसखोरी करीत आहेत. त्यांच्याकडून होणाऱ्या बेलगाम वापरामुळे या सिंथेटिक ट्रॅकवर धूळ, खडे पसरत असल्याने हा ट्रॅक सुरू करण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.

नाशिकचे नाव सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतने अॅथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे. मात्र, त्यानंतरही नाशिकमध्ये खेळाडूंना पुरेशा सुविधा मिळत नसल्याची ओरड सातत्याने केली जात होती. नाशिकमधील धावपटूंना सिंथेटिक ट्रॅकवर सराव करण्यासाठी थेट मुंबई-पुण्याला धाव घ्यावी लागत होती. ही गरज ओळखून आडगाव नाका येथील विभागीय क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला. हा ट्रॅक तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्र वापरण्यात आलेले आहे. मात्र, तयार झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या ट्रॅकचा दुरुपयोग सुरू झाला. या ठिकाणी परिसरातील लहान मुले खेळण्यासाठी येऊ लागली. जॉगिंगसाठी येणाऱ्यांचाही हा ट्रॅक जणू अड्डाच झाला आहे. परिणामी कोट्यवधी रुपये खर्चाच्या या ट्रॅकची धूळधाण झाली आहे. मात्र, तरीही प्रशासन याबाबत मौन बाळगून आहे. येथील समस्यांसंदर्भात विभागीय क्रीडा अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यावेळी या ट्रॅकचा वापर फक्त खेळाडूंसाठीच व्हावा, असे ठरविण्यात आले. मात्र, तसे घडले नाही. काही काळापूर्वी या ठिकाणी हास्य क्लबदेखील सुरू करण्यात आला होता. मात्र, खेळाडूंनी वेळीच आक्षेप घेतल्याने तो बंद झाला. मध्यंतरी या ठिकाणी आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यावेळी खेळाडूंसोबत आलेल्या शिक्षकांनीही ट्रॅकवर नाचत धुडगूस घातला होता.

सहा कोटींचा खर्च

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आलेला हा सिंथेटिक ट्रॅक चारशे मीटर लांबीचा असून, त्यात आठ लेन आखण्यात आलेल्या आहेत. अॅथलेटिक्सच्या ट्रॅकप्रमाणेच सिंथेटिक टेनिस कोर्टचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. या सर्व कामासाठी सहा कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. मात्र, पुरेशा दक्षतेअभावी हा खर्च वाया जातो की काय, अशी धास्ती क्रीडाप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बंद प्रवेशद्वारावरून घुसखोरी

विभागीय क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकच्या ठिकाणी सुरक्षारक्षकच नेमलेले नसल्याने येथील बंद प्रवेशद्वारावरून घुसखोरी करून तेथे सिंथेटिक ट्रॅकवर जॉगिंग करणाऱ्या नागरिकांना कोणाकडूनही मज्जाव केला जात नाही. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना वेळीच रोखले नाही, तर कोट्यवधी रुपये खर्चाच्या या ट्रॅकचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

एकमेव ट्रॅक धोक्यात

शहरातील अनेक खेळाडू मातीच्या ट्रॅकवर सराव करतात. परंतु, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर सरावासाठी सिंथेटिक ट्रॅकची गरज भासते. नाशिकमध्ये हा एकमेव सिंथेटिक ट्रॅक आहे. हा ट्रॅकच खराब झाला, तर नाशिकमधील खेळाडूंचे कधीही न भरून येणारे नुकसान होऊ शकेल, अशी भावना खेळाडून आणि क्रीडाप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकमधील धावपटूंसाठी हा एकमेव सिंथेटिक ट्रॅक आहे. त्याचे नुकसान होऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे. यासंदर्भात काही काळापूर्वी बैठक झाली होती. परंतु, या समस्येबाबत तोडगा निघालेला नाही. खेळाडूंच्या भविष्याचा विचार करून त्वरित निर्णय व्हावा, अशी अपेक्षा आहे.

-मोनिका आथरे, धावपटू

(लीड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images