Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

निफाड ड्रायपोर्टचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड कारखान्याच्या पडिक जागेत ड्रायपोर्ट उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. निफाड साखर कारखान्याच्या कर्जमुक्तीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मान्यता दिली असून, जेएनपीटी ड्रायपोर्टसाठी कारखान्याची पडिक जागा उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात जिल्हा बँकेला १०५ कोटींचे मुद्दल देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

जिल्हा बँकेचे कारखान्यावर १५९ कोटींचे कर्ज आहे. वनटाइम सेटलमेंट करून १२९ कोटी एवढी रक्कम कारखान्याकडून येणे बँकेला अपेक्षित आहे. जेएनपीटीला ड्रायपोर्टसाठी जागा हवी असल्याने त्यांनी १०५ कोटी रुपये देऊन ही जमीन घेण्याची तयारी दर्शविली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., प्रांताधिकारी महेश पाटील, डॉ. प्रशांत पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, जेएनपीटीचे नीरज बन्सल आदी उपस्थित होते. कारखान्याने १०५ कोटी रुपये मुद्दल घेऊन हा विषय मार्गी लावल्यास बँकेची रक्कमही मिळेल व ड्रायपोर्टचा मार्गही मोकळा होईल, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली. बैठकीनंतर बन्सल यांनी कारखान्याच्या जमिनीचे मूल्यांकन आधार समजून घेतले व मान्यता दिली. हा प्रस्ताव जेएनपीटी बोर्डाच्या व मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

कारखान्यावर राहणार २४ कोटींचा बोजा

वनटाइम सेटलमेंटनुसार जिल्हा बँकेला १२९ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. परंतु, जेएनपीटीने जागेसाठी १०५ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरीत २४ कोटी रुपयांच्या वसुलीचा प्रश्न कायम राहातो. १०५ कोटी रुपयांच्या मोबदल्यात कारखान्याची १०८ एकर जागा ड्रायपोर्टच्या कामासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. परंतु, उर्वरित २४ कोटी रुपयांचा बोजा कारखान्यावर कायम राहील अशी माहिती जिल्हा बँकेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे या २४ कोटी वसुलीचा प्रश्न कायम राहणार आहे.

निसाकावरील कर्जाची एकरकमी कर्जफेड करताना जिल्हा बँक निसाकाच्या जमिनीचे टायटल क्लिअर करून देणार असल्याचे ठरले आहे. त्यामुळे ही तांत्रिक बाब असून, ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आतापर्यंत शासकीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने ट्रायपोर्ट आणि निसाका लवकर सुरू होईल यासाठी आम्ही आशावादी आहोत.

- सुरेशबाबा पाटील, भाजप नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महालक्ष्मी यात्रोत्सवात बारागाड्या ओढल्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

म्हसरुळचे ग्रामदैवत असलेल्या महालक्ष्मी यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मंगळवारी झाला. यात्रेनिमित्ताने अभिषेक, महापूजा, महाप्रसाद आणि बोहड्याचा कार्यक्रम रंगले.

म्हसरुळ येथील महालक्ष्मी देवीचे मूळ स्थान हरसूलजवळील गडदावणे येथील आहे. त्यामुळे यात्रेपूर्वी तेथे जाऊन दरवर्षीप्रमाणे तेथील देवीचा मानसन्मान करण्यात आला. सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत अभिषेक व महापूजा करण्यात आली. दुपारी होमहवन करण्यात आले. सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. मोंढ बाबा यांनी दरवर्षीप्रमाणे या बारा गाड्या ओढल्या. त्यानंतर महालक्ष्मी रथाची मिरवणूक काढण्यात आली. रात्री बोहाड्याचा कार्यक्रम झाला. यात्रा समितीचे अध्यक्ष अशोक बुरुंगे, सोमनाथ वडजे, रुंजा मोराडे, कैलास मोराडे, वाळू शिंदे, भाऊसाहेब बोंबले, रघुनाथ गुंजाळ, राजू सातकर आदींनी आयोजन केले. मंदिराला रंगरंगोटी आणि रोषणाई करण्यात आली आहे. खेळणी, खाद्यपदार्थ आणि पूजा साहित्य यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची दुकाने थाटण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदिरात गुरुवारी (दि. १९) रोजी सकाळी आठ वाजता हजेरीचा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावचा पारा ४२.२ अंशांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सूर्य आग ओकू लागल्याने नाशिक शहरासह मालेगावकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मालेगावचा पारा दिवसागणिक चढतच असून, बुधवारी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे. नाशिकच्या तापमानाचाही पाराही ३८.८ अंशांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे दिवसभराच्या उकाड्याने नाशिककरही घामाघूम होत आहेत.

मालेगाव शहरात दिवसेंदिवस उन्हाच्या तडाख्यात चांगलीच वाढ होत आहे. बुधवारी मालेगावचे कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. उन्हाचा पारा ०.२ अंशाने वाढला आहे. उन्हाचा पारा चाळीशीच्या पुढेच राहत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. वाढत्या उन्हामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. येत्या आठवडाभर उन्हाचा तडाखा असाच कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

मालेगावची तापमान नोंद

दिनांक कमाल तापमान

१३ एप्रिल ४०.८

१४ एप्रिल ४२.०

१५ एप्रिल ४२.०

१६ एप्रिल ४२.०

१७ एप्रिल ४२.०

१८ एप्रिल ४२.२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईसाठी सकाळची विमानसेवा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना प्रतीक्षा असलेली सकाळची मुंबई विमानसेवा शुक्रवारपासून उपलब्ध होणार आहे. एअर डेक्कन कंपनीच्या वतीने सकाळी सहा वाजता ओझरहून मुंबईसाठी सेवा सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून खंडित झालेली विमानसेवा सुरू झाली आहे. उन्हाळी पर्यटनाच्या माध्यमातून सेवेला मोठा प्रतिसाद मिळण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात एअर डेक्कन कंपनीने नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक ही सेवा सुरू केली. डिसेंबरच्या अखेरीस सुरू झालेली ही सेवा गेल्या महिन्यात खंडित झाली. पायलटची अनुपलब्धता आणि तांत्रिक कारणामुळे खंडित झालेली ही सेवा आता पुन्हा सुरू झाली आहे. येत्या शुक्रवारपासून (२० एप्रिल) मुंबईसाठी पहाटे सहा वाजेची सेवा उपलब्ध होणार आहे. मुंबई विमानतळावर टाइम स्लॉट उपलब्ध होत नसल्याने यापूर्वी ही सेवा सकाळी साडेअकरा वाजता होती. मात्र, नव्या वेळापत्रकात नाशिकसाठी पहाटेचा स्लॉट उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजता ओझरहून निघणारे विमान अवघ्या पन्नास मिनिटांमध्येच मुंबई विमानतळावरील टर्मिनल एकवर पोहचणार आहे. या सेवेमुळे नाशिककरांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. पहाटेच मुंबई गाठता येत असल्यामुळे तेथून देशांतर्गत आणि परदेशातील सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे उद्योजक, व्यापारी, डॉक्टर तसेच सातत्याने विमान प्रवास करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २० एप्रिलपासून सेवा सुरू होईल, असे कंपनीने जाहिर केले होते. पण, सर्व प्रकारची उपलब्धता झाल्याने आम्ही पुणे व मुंबई ही सेवा सुरू केली आहे, असे एअर डेक्कन कंपनीने सांगितले आहे. येत्या ३० जूनपर्यंत कंपनीने सेवेचे वेळापत्रक जाहिर केले आहे.

बुकिंगसाठी ऑफर

सेवा खंडित झाल्याने ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी आणि बुकिंग चांगले व्हावे या उद्देशाने कंपनीने ऑफर दिली आहे. अवघ्या पाचशे रुपयांत तिकिट बुक करण्याची संधी काही भाग्यवंतांना मिळणार आहे. या ऑफरला प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

असे आहे वेळापत्रक

ठिकाण- प्रस्थान-ठिकाण-आगमन

ओझर-६.००-मुंबई-६.५० (सकाळी)

मुंबई-४.५५-ओझर-५.४५ (सायंकाळी)

ओझर-६.०५-पुणे-६.४५ (साय़ंकाळी)

पुणे-७.०५-ओझर-७.४५ (रात्री)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरणपोळी, मांड्यांचा गोडवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

अक्षय तृतीयेसाठी रेडिमेड मांडे, पुरणपोळीला चांगली मागणी होती. रेडीमेड वस्तूंवर भर दिला जात असल्याने आजही पुरणपोळी व मांड्यांना बाजारात मागणी असल्याचे दिसून आले. सिडको व इंदिरानगर परिसरात अनेक महिला बचतगटांनी पुरणपोळी व मांड्यांची विक्री केल्याचे दिसून येत असून या व्यवसायातून परिसरात लाखो रूपयांची उलाढाल झाल्याची चर्चा आहे.

अक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणपोळी, आमरस या विशेष महत्त्व असल्याचे सांगण्यात येते. यंदा करा केळीबरोबरच सिडको व इंदिरानगर परिसरात अनेकांनी पुरणपोळी व खापरावरचे मांडे विक्रीचे स्टॉल लावल्याचे दिसून आले. वीस रुपयांना एक पुरणपोळी व पन्नास रुपयांना एक मांडा यापद्धतीने विक्री सुरू असल्याचे दिसून आले. तसेच परिसरातील मिठाईच्या दुकानांमध्येसुद्धा सकाळपासूनच पुरणपोळीची खरेदी होत असल्याचे दिसत आहे. पुरणपोळी ही सर्वच दुकानांमध्ये उपलब्ध असली तरी खापरावरचे मांडे मात्र काही ठराविक ठिकाणीच दिसून येत होते. सिडकोतील काही महिलांनी तर आधीपासूनच ऑर्डर घेतलेल्या असल्याने ऐनवेळी आलेल्यांना मांडे उपलब्ध नसल्याचे सांगावे लागले. राजीवनगर येथे सुद्धा यंदा या खापरावरच्या मांड्यांची चांगलीच विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच यंदा पावसाळ्यापर्यंत आमरसाबरोबर खाण्यासाठी खापरावरचे मांडे उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकाच्या कारची तोडफोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जेलरोड येथील माजी नगरसेवक कन्हैय्या साळवे यांच्या कार व दुचाकीची २० ते २५ युवकांनी बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तोडफोड केली. त्यांचा मुलगा व त्याच्या मित्रावरही हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याआधी याच टोळक्याने एकलहरे रोडवरील पानपट्टीचालकावर प्राणघातक हल्ला केला. जुन्या वैमन्स्यातून हे दोन्ही हल्ले झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. घटनेमुळे तणावाचे वातावरण होते.

कन्हैय्या साळवे यांचा आरंभ महाविद्यालयाशेजारी कंथक हा बंगला आहे. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास साळवे हे बाहेरून आल्यावर वरच्या खोलीत आरामासाठी गेले. गेटमध्ये त्यांचा मुलगा आशिष व त्याचा मित्र उभे होते. त्याचवेळी तलवारी, कोयते, हॉकी स्टीक घेऊन दुचाक्यांवर २० ते २५ युवक आले. त्यांनी प्रथम साळवे यांच्या सियाझ सुझूकी कारच्या (एमएच १५ जीडी ९९९२) काचा फोडून आत बिअरच्या बाटल्या टाकल्या. नंतर दुचाकीची (एमएच १५ ईडब्लू १६०२) मोडतोड केली. नंतर त्यांनी आशिषवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी साळवे कुटुंबातील संगीता साळवे यांनी एका हल्लेखोराचा शर्ट पकडला. नागरिक जमा होऊ लागल्याने हल्लेखोर फरार झाले.

साळवे यांच्या घरावर हल्ला करण्याआधी सातच्या सुमारास एकलहरे रोडवरील गजानन रावसाहेब थोरात (वय २९) याच्या पानटपरीवर जाऊन टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर गेल्यानंतर नागरिकांनी गजाननला जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तो बेशुध्द असून आयसीयूमध्ये आहे. उपनगर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या श्वानाने ठेवले कुटुंब ओलिस!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

चोर-दरोडेखोरांनी आपला कार्यभाग साधण्यासाठी सामान्यांना ओलिस ठेवण्याच्या घटना ऐकिवात येतात. पण, एका भटक्या श्वानाने एका घराचा ताबा घेत तब्बल चार तास एका कुटुंबाला ओलिस ठेवल्याचा चमत्कारिक प्रकार सातपूरमध्ये पहायला मिळाला.

नाशिक शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मोठा आहे. सातपूर भागातही मोकाट श्वानांमुळे रात्री, अपरात्री येणाऱ्या कामगारांना त्रास सहन करण्याची वेळ येते. सातपूरच्या मौले हॉल शेजारील संदीपनगर य़ेथील भिला कोठावदे यांच्या घराचा ताबा एका भटक्या कुत्र्याने घेतला. तब्बल चार तास भिला कोठावदे यांच्या घराच्या कपाऊंडमध्ये पहारा देत या कुत्र्याने ठाण मांडल्याने कुटुंबीयांना घरातच कैदेत राहण्याची वेळ आली. हा कुत्रा बाहेर निघायचे नावच घेत नसल्याने शेजारी-पाजाऱ्यांनीही त्याला हटविण्याचे प्रयत्न केले. काठीच्या सहाय्याने त्याला धमकावले. मात्र तरीही कुत्रे बधले नाही. कुत्रे पिसाळलेले आहे की काय, या शंकेने त्याच्या अंगावर गरम, थंड पाणीही टाकून पाहिले. मात्र, तरीही कुत्रे जागचे हटेना. अखेर सायंकाळी कामावरून घरी परतलेल्या सचिन कोठावदे व त्यांच्या मित्रांनी मोठ्या मुश्किलीने या कुत्र्याला बाहेर हाकलून लावले. ग्रामीण भागातून शहरात आलेला हा कुत्रा घाबरलेला असल्याने त्याने या घरात ठाण मांडल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे घरातील मुलांची मात्र भीतीने गाळण उडाली होती.

लोकप्रतिनिधींची अनास्था

शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना व अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याच्या घटना घडत असतानाही लोकप्रतिनिधी मात्र याबाबत फारसे काही करताना दिसत नाहीत. शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबाखरेदी जोरात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर किरकोळ बाजारात फळांचा राजा आंब्याच्या खरेदीस नागरिकांचा समाधानकारक प्रतिसाद दिसून आला. आंब्याची आवक बाजारात कमीच असल्याने सर्व प्रकारच्या आंब्याचे दरही प्रतिकिलोस शंभर रुपयांच्या वरच राहिले.

काल बुधवारी अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी सकाळपासुनच गर्दी दिसून आली. नैवेद्यासाठी फळांचा राजा आंब्याला विशेष महत्त्व असते. त्यामुळे घरोघरी आंबाखरेदी होते. त्यानुसार बुधवारी फळबाजारात नागरिकांची आंबा खरेदीसाठी गर्दी झाली होती. आंब्याची आवक तशी कमीच असल्याने किरकोळ बाजारात आंब्याचे प्रतिकिलोचे दरही चढेच राहिले. सर्वच प्रकारच्या आंब्यांचे दर प्रतिकिलोस शंभर रुपयांपेक्षा जास्तच दिसून आले. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस या दोन्ही आंब्यांचे दर तर अडीचशे रुपयांपर्यंत होते. या आंब्यांची आवकही खूपच कमी दिसून आली.

किरकोळ बाजारातील दर प्रतिकिलो

रत्नागिरी हापूस- २२०

देवगड- २५०

बलसाड केशर - १६०

जुनागड केशर- १८०

लालबाग -१२०

पायरी - १२०

बदाम- १५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपबाजार समितीत कांदा लिलावास प्रारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सिन्नर फाटा मार्केटमध्ये व्यापारी, शेतकरी आणि बाजारसमिती व्यवस्थापनाच्या समन्वयामुळे कांदा लिलावास प्रारंभ झाला आहे. यापूर्वी असा समन्वय राहिला असता तर दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले कांदा लिलाव बंद पडले नसते. शेतकरी हितासाठी यापुढे मात्र कोणाचीही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी माजी सभापतींना नाव न घेता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी बुधवारी दिली.

अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सिन्नर फाटा उपबाजार समितीच्या आवारात खुल्या पद्धतीने कांदा लिलावास प्रारंभ झाला. याप्रसंगी शिवाजी चुंबळे बोलत होते. आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस या मार्केटमध्ये कांदा लिलाव होणार असून, शेतकऱ्यांना रोख पैसे मिळणार आहेत. या मार्केटमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांसाठी निवासव्यवस्थेची सुविधा लवकरच उभारली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बंद असलेले गाळेही व्यापारीवर्गाला लवकरच दिले जातील, असे त्यांनी आश्वासन दिले. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या भाजीपाला मार्केटलाही नागरिक व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील भाजी विक्रेत्यांना बाजार समिती जागा देण्यास तयार असल्याचे पालिका प्रशासनाला लेखी कळविले असल्याची माहिती याप्रसंगी उपसभापती संजय तुंगार यांनी दिली. सिन्नर फाटा येथे डेली मार्केट सुरू करण्याचा बाजार समितीचा प्रयत्न असल्याचेही तुंगार यावेळी म्हणाले. याप्रसंगी अशोक खालकर, राजाराम धनवटे, संचालक प्रवीण नागरे, व्यापारी लालचंद दळवी यांनीही मार्गदर्शन केले.

पहिल्याच दिवशी ९०० रुपये भाव

अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर सिन्नर फाटा उपबाजारसमिती आवारात खुल्या पद्धतीच्या कांदा लिलावास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ५० किलोच्या २००० हजार गोणी कांदा शेतकऱ्यांनी विक्रीस आणला. या कांद्याचा बोली पद्धतीने लिलाव झाला. कमाल ९०० रुपये तर किमान ४५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.सरासरी ६५० रुपये दर मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी पिस्तूलासह कुख्यात गुंडाला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चॉपरने वार करून चायनीज व्यावसायिकाला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात फरार संशयित तुकाराम दत्तू चोथवे याला गुन्हे शाखा एकच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मखमलाबाद नाका येथील ड्रीम कॅसल चौकात रोशन कटारे या चायनीज व्यावसायिकाकडे चोथवे व त्याच्या साथीदारांनी १७ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता चार हजार रुपयांची खंडणी मागितली होती. नकार दिल्याने कटारे यांच्यासह विनोद ठाकरे यांच्यावर चॉपरने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोथवे त्याच्या साथीदारांसह गंगाघाटावरील गौरी पटांगणावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक या परिसरावर लक्ष ठेऊन होते. चोखवेसह त्याचा साथीदार नीलेश दौलत खांदवे (२७, रा. मखमलाबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटरसायकल, गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे असा ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रवीण उर्फ समीर सुरेश हांडे यांच्या खून प्रकरणातही चोथवे आरोपी असून ५ जून २०१७ रोजी तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला. त्याला पुन्हा जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बियॉण्ड द क्लाउडस’चे नाशिकला शूटिंग

$
0
0

मटा विशेष

माजिद माजिदींसोबत काम करण्याची मिळाली संधी

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

आपण ज्याला गुरूस्थानी मानतो त्यांच्याबरोबर आयुष्यात एकदा तरी काम करायला मिळावे अशी इच्छा असते. चित्रपट क्षेत्रात तर अत्यंत बुद्धिवादी माणसे काम करतात, ज्यांना मैलाचे दगड म्हणता येईल अशांसोबत काम करण्याचे स्वप्न असते; परंतु ते सत्यात उतरले तर... नाशिकची रंगकर्मी सुहास जाधवच्या बाबतीत असे झाले. तिला चक्क सुप्रसिद्ध दिग्दर्शक, शोमन माजिद माजिदींसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिच्या आयुष्यातील तो सोन्याचा क्षण ठरला.

माजिद माजिदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले इराणी चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि पटकथाकार. माजिदींच्या वैविध्यपूर्ण चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्दर्शकाबरोबर काम करणे हे बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. हिंदी, मराठीचा गंध नाही, इंग्रजी भाषाही तोडकी मोडकी येणारे परंतु प्रचंड व्हिजन समोर असेलेले इराणी भाषिक माजिदी स्वत: नाशिकला येतात काय आणि त्यांच्या आगामी 'बियॉण्ड द क्लाउडस' या चित्रपटातील पोलिस कॉन्स्टेबलच्यया भूमिकेसाठी मराठमोठ्या नाशिकच्या सुहास जाधवची निवड करतात काय, हे सारेच अनपेक्षित सुहासच्या बाबतीत घडले आणि नाटकांमध्ये भूमिका करणारी सुहास इतक्या बिगबजेट चित्रपटाचा हिस्सा होऊ शकली.

'बियॉण्ड...' चे चित्रीकरण बहुतेक मुंबईत झाले आहे. कारण ही कथा मुंबईची आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये मुंबई पाहिली असली, तरी माजीद माजिदी यांनी निवडलेली लोकेशन्स अनोखी आहेत. रिअल लोकेशन्सवर चित्रीकरण झाले आहे. नाशिकलाही जेलरोड येथे जेलमध्ये दोन दिवस त्यांनी चित्रीकरण केले. सुहास जाधवने यात पोलिस कॉन्स्टेबलचा अभिनय केला असून प्रवीण काळोखे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मंजुळा' या एकांकिकेत केलेल्या पोलिसाच्या अभिनयाचा यासाठी तिला फायदा झाला.

माजिद माजिदी यांचे चार चित्रपट यापूर्वी मी पाहिलेले होते; मात्र त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा सगळेच चित्रपट पाहिले. त्यांची काम करण्याची पद्धत... अशा सगळ्याच गोष्टी पाहिल्या. ते ग्रेट डिरेक्टर आहेत. त्यांचे व्हिजन खूप मोठे आहे. कथा सांगण्याची त्यांची पद्धत चांगली आहे.

- सुहास जाधव, रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरे कुटुंबीय राष्ट्रवादीच्या वाटेवर?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

देशात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात मोदीलाटेत हिरे कुटुंबातील माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, आमदार अपूर्व हिरे व अद्वय हिरे हे भाजपवासी झाले होते. आता मात्र संपूर्ण हिरे कुटुंब पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून, २१ रोजी शनिवारी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात हिरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा शहर व तालुक्यात सुरू आहे.

राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सातत्याने अद्वय हिरे पक्षात सक्रिय राहिले होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे आपण मालेगाव बाह्य मतदार संघासाठी तिकिटाची मागणी केल्याचेदेखील अनेकवेळा त्यांनी बोलून दाखवले होते. भाजपच्या अनेक कार्यक्रमांत हिरे कुटुंबीय एका व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले होते. अद्वय यांच्या सक्रियतेने भाजपला मोठे बळ मिळाले होते. मात्र, आता संपूर्ण हिरे कुटुंबीय राष्ट्रवादीत म्हणजे स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याने भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

भुजबळांशी मतभेद संपुष्टात

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याशी असलेल्या राजकीय मतभेदांतून हिरे कुटुंबाने भाजपची वाट धरली असली तरी आता भुजबळ व हिरे कुटुंबातील हे मतभेद संपुष्टात आले आहे. भुजबळ सध्या तुरुंगात असल्याने राष्ट्रवादी पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून, हिरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नक्कीच पक्षाला मोठे बळ मिळणार असल्याचे बोलले जाते आहे. दि. २१ रोजी तालुक्यातील कौळाणे येथील फाट्यावरील राधिका लॉन्स येथे हिरे समर्थकांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात हिरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचार विनिमय होणार असून, त्यास समर्थकांनीदेखील दुजोरा दिला आहे. याबाबत अद्वय हिरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी प्रवेशाची घाई नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव/नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी कोणतीही तातडी आलेली नाही, त्यामुळे लगोलग राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा कोणताही विचार नसून कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करुनच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी मटाशी बोलतांना केला. भारतीय जनता पक्षात जीव गुदमरत आहे, ही केवळ आमचीच नव्हे तर अनेकांची मनस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे, पण पक्ष सोडण्याबाबात अद्याप काहीही विचार झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात मोदीलाटेत हिरे कुटुंबातील प्रशांत हिरे, आमदार अपूर्व हिरे व अद्वय हिरे हे भाजपवासी झाले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून हिरे कुटुंबीय व भाजप नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने हिरे मंडळी दुरावले आहेत. अपूर्व हिरे यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्याच्या दृष्टीने तेथे काम करायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्यात व विद्यमान भाजप आमदार सीमाताई हिरे यांच्यात संघर्ष सुरू झाला. संघटनात्मक पातळीवर पदाधिकारी नियुक्तीवरुन उभयतांत वाद झाल्यानंतर पक्षाने अपूर्व हिरेंना दुर्लक्षित करण्यास सुरुवात केली. अशातच त्यांनी शिक्षक मतदार संघातून यापुढे निवडणूक न लढविता नाशिकमधून लोकसभेची जागा लढविणार असल्याचे जाहीर केले. भाजपने उमेदवारी द्यावी, दिली नाही तरी आपण लढणारच असे जाहीर करून त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशाही सुरू केल्यानंतरच खरे तर हिरेंचे भाजपमधील अवतारकार्य संपल्याचे स्पष्ट झाले होते. अलिकडे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसचे जयंत पाटील यांनी हिरेंच्या घरी भेट दिल्यानंतर हिरेंच्या घरवापसीची चर्चा नव्या जोमाने सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशांत हिरे यांच्याशी संपर्क साधला असता, असा काहीही निर्णय झालेला नाही हे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार व पाटील यांनी राष्ट्रवादीत काम करण्याबाबत विचारणा केली, हे खरे असले तरी कार्यकर्त्यांशी विचार करुन निर्णय घेऊ असे आपण स्पष्ट केल्याचेही हिरेंचे म्हणणे आहे. भुजबळांशी तीव्र मतभेद झाल्यामुळेच हिरेंनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेतला होता. आता तर हिरेंनी भुजबळांची थेट कारागृहात जाऊन भेट घेतल्याने ती कटुता राहिलेली नसल्याने पवारांनीही आग्रह धरला असल्याचे सांगितले जाते. पक्षात येताना भाजपने जो उत्साह दाखविला, मानमरातब दिला तो अलिकडे राहिलेला नाही. किंबहुना दुर्लक्ष करणे, अनेक कार्यक्रमांना टाळणे असे वर्तन सुरू झाल्याने तूर्तास आम्ही शांत राहण्याचे ठरविले आहे.

शनिवारी मांडणार भूमिका

येत्या शनिवारी(दि. २१) कौळाणे रस्त्यावरील राधिका लॉन्स येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात आपण भूमिका स्पष्ट करू व तेथे होणाऱ्या विचारमंथनातून पुढील निर्णय घेऊ असेही ते म्हणाले. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सातत्याने अद्वय हिरे पक्षात सक्रिय राहिले होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे आपण मालेगाव बाह्य मतदार संघासाठी तिकिटाची मागणी केल्याचे देखील अनेकवेळा त्यांनी बोलून दाखवले होते. भाजपच्या अनेक कार्यक्रमांत हिरे कुटुंबीय एका व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले होते. अद्वय यांच्या सक्रियतेने भाजपला मोठे बळ मिळाले होते. मात्र, आता संपूर्ण हिरे कुटुंबीय नाराज झाल्याने भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस बॅण्डच्या धूनवर बडी दर्गा उरुस सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतातील सर्वधमिर्यांचे श्रद्धास्थान असलेल्या बडी दर्गाच्या उरुसला बुधवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. १२ दिवस सुरू राहणाऱ्या या उरुससाठी पीर सय्यद सादिकशहा हुसेनी वक्फ ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उरुस २९ एप्रिलपर्यंत सुरू रहाणार असून यावेळी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उरुसच्या पहिल्या दिवशी पोलिस विभागाच्या वतीने पोलिस बॅण्डच्या धूनवर मानाची पहिली चादर चढविण्यात आली. ही चादर भद्रकाली पोलिस स्टेशन मधून सायंकाळी साडेसात वाजता गाजत बडी दर्गा येथे आणण्यात आली. त्यानंतर आठ वाजता पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते चादर चढविण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पिरजादे पंच कमिटीच्या वतीने पोलिस आयुक्त व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. रात्री १० वाजता संदलचा कार्यक्रम झाला. यावेळी कबरीला चंदनाची पावडर लावून मानाची चादर चढवण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या भाविकांना ट्रस्टच्या वतीने मलिदा आणि नानकटाईच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

उरुसच्या कालावधीत रोज सायंकाळी सहा वाजता कुराण पठण करण्यात येणार असून साडेसहा वाजता दुवा पठण केले जाईल. हे सर्व कार्यक्रम फईम नसुमुद्दीन पिरजादे, अलीम रुकनुद्दीन पिरजादे, अन्सार खलील पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून रोज सायंकाळी हाजी वसीम पिरजादे व हाफिज अंजुम पिरजादे यांच्याकडून दुवा पठण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदी शंकराचार्य विलक्षण प्रज्ञावंत

$
0
0

लक्ष्मीकांत जोशी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणताही समाज एका विचारधारेला मानतो. या विचारधारेतून समाजाचे विकसन होत असते. सनातन वैदिक धर्माची परंपरा आपल्याला लाभली आहे. परंतु, आदी शंकराचार्य हे केवळ धर्मप्रसारक नव्हते तर त्यांनी धर्म आपल्या आचरणात कसा आणावा याची दृष्टी दिली. विलक्षण प्रज्ञावंत असे त्यांचे व्यक्तित्व होते, असे प्रतिपादन लक्ष्मीकांत जोशी यांनी केले.

शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागाच्या वतीने आदी शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय जगद्गुरू आदि शंकराचार्य चरित्र निरुपण, चिंतनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेला बुधवारी प्रारंभ झाला. यावेळी लक्ष्मीकांत जोशी बोलत होते. श्रृती, स्मृती, सदाचार, आत्मज्ञान या आचार लक्षणांना आचार्यांनी व्यावहारिक रुप दिले. शंकराचार्य म्हणजे भगवान शंकराचा अंश होते. त्यांचे कुटुंब हे वैदिक परंपरांना मानणारे होते. भगवान शंकरानी शंकराचार्यांच्या आई-वडिलांना म्हटल्याप्रमाणे शंकराचार्य हे सर्वज्ञ होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी मल्याळम भाषेतील रामायणाचे वाचन केले होते, अशी माहिती जोशी यांनी दिली.

वेद, उपनिषदे याचा अभ्यासही लहान वयातच त्यांनी केला. वयाच्या आठव्या वर्षी चारही वेदांमध्ये आचार्य पारंगत होते. हे ज्ञान ते इतरांनाही देत. त्यामुळे गुरू वयाने लहान व शिष्य मोठे असे चित्र तेव्हा होते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जोशी यांनी शंकराचार्य यांच्या जीवनातील विविध बाबी उदाहरणासह स्पष्ट केल्या. ही तीन दिवसीय व्याख्यानमाला २० एप्रिलपर्यंत सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आंब्याची निर्यातवारी लांबणीवर

$
0
0

एप्रिल अखेरिस अमेरिकासह युरोपात जाणार आंबा

म. टा. वृत्तसेवा, निफाड

परतीचा पाऊस, ओखी वादळाचा परिणाम यामुळे आंब्याचा मोहोर गळाल्याने गेल्याने उत्पन्नात ३० ते ३५ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे या वर्षी निर्यातक्षम आंबे उपलब्ध न झाल्याने परदेशात निर्यात करण्याची प्रक्रिया १० ते १५ दिवस लांबणीवर पडली आहे.

कोकणातील हापूस आंबा सन २००७ पासून लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून विकिरण प्रक्रिया करून अमेरिकेसह इतर युरोपीय देशात निर्यात केला जातो. मागील वर्षी ४ एप्रिलपासून १२ जूनपर्यंत निर्यात सुरू होती. यावर्षी मंगळवार, बुधवारपासून ही निर्यातीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु निर्यातक्षम आंबे उपलब्ध नसल्याने या वर्षीची निर्यात १० ते १५ दिवस लांबणीवर पडली आहे. अवकाळी पाऊस व ओखी वादळाचा परिणाम झाल्याने आंब्याचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे या वर्षी निर्यात नियोजित वेळेत सुरू झाली नाही. मात्र २५ ते २६ एप्रिल दरम्यान ही प्रक्रिया सुरू होईल, असे लासलगाव येथील प्रक्रिया प्लांटचे मशिन ऑपरेटर असलेले संजय आहेर यांनी सांगितले.

परतीचा पाऊस, ओखी वादळामुळे बहुतेक ठिकाणी आंब्याच्या बागांना फटका बसला. खास करून कोकण पट्ट्यात या पावसाचा आणि वादळाचा विपरित परिणाम झाला. बहरलेली आंब्याची झाडे पावसामुळे झोडपली गेली. मोहोर गळून पडल्यामुळे फळधारणाही कमी झाली आणि त्याचे चक्रही बिघडले. त्यामुळे दरवर्षी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह परदेशातील बाजारात 'गोडवा' पेरणारा आंबा यंदा अजून तयार झालेला नाही. साहजिकच निर्यातीवर त्याचा प्रतिकूल पिरणाम झाला असून, आंब्याची परदेशवारी जरा लांबणीवर पडली आहे. मात्र आता आंबा येत्या दहा त पंधरा दिवसात परदेशात निर्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेतही यामुळे आंब्याचा पुरवठा कमी झाला आहे. साहजिकच मागणी जास्त असल्याकारणाने आंब्याचे दरही वाढले आहेत. बुधवारी अक्षय्य तृतियेनिमित्त स्थानिक बाजारपेठेतही आंबा भाव खात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोड रोमियोवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिला फेसबुकवरून अश्‍लिल छायाचित्र पाठविणाऱ्या रोड रोमियोवर आडगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. कुणाल प्रकाश रामराजे (वय २६, रा. देवळाली कॅम्प) असे या संशयिताचे नाव आहे.

नांदूर नाका परिसरात राहणाऱ्या युवतीचा कुणाल २१ मार्च ते १६ एप्रिल दरम्यान वारंवार पाठलाग करीत होता. त्यानंतर पीडित तरुणीच्या फेसबुक अकाउंटवर बनावट अकाऊंटद्वारे अश्‍लिल फोटो पाठवून त्याने शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइलच्या बनावट साहित्याची विक्री

विविध कंपन्यांच्या मोबाइलचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर सरकारवाडा पोलिसांनी फसवणुकीसह कॉपीराइट कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सरकारवाडा पोलिसांनी महात्मा गांधी रोडवरील चामुंडा आणि ओम साई मोबाइल शॉप या दुकानात मंगळवारी (दि.१७ ) दुपारी अडीचच्या सुमारास ही कारवाई केली.

चामुंडा मोबाइल आणि ओम साई मोबाईल शॉपमध्ये मोबाइलचे बनावट साहित्य विक्री केली जात असल्याची तक्रार मयूर राजेंद्र धुमाळ (वय २९, रा. कोल्हापूर) यांनी केली होती. त्यानुसार शहानिशा करून सरकारवाडा पोलिसांनी दोन्ही दुकानात छापा टाकून ९५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये मोबाइलचे डिस्प्ले, टचपॅड, बॅटरी, विविध ऍक्सेसरीजचा समावेश आहे. बनावट साहित्य कंपनीच्या कमी किंमतीत विक्री करून कंपनीसह ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी बाबुराव लाचाराम चौधरी (वय ३५, रा. उदय कॉलनी) व सुजरपाल सिंग स्वरुपसिंग राठोड (वय २८, रा. उदय कॉलनी) या दोघा दुकानचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तडीपार गुंडास अटक

जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणाऱ्या तडीपार गुंडाला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. पंकज मुरलीधर नरवाडे (वय ३०, रा. संत कबीरनगर) असे या संशयिताचे नाव आहे. पंकज यास दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तरीही तो संत कबीरनगर परिसरात फिरताना आढळून आला. गंगापूर पोलिसांनी मंगळवारी (दि. १७) सकाळी साडेआठच्या सुमारास त्याला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा पूर

$
0
0

सर्वाधिक प्रतिक्रिया मिळालेली बातमी

एटीएम कोरडी; कर्नाटकात मात्र 'पैशांचा पूर'!

देशाच्या विविध भागांत एटीएम कोरडी पडली असताना कर्नाटकात पैशांचे घबाड सापडले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत ३१.५५ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

मटा अॅप डाउनलोड करा app.mtmobile.in

मिस्ड् कॉल द्या 1800-103-8973

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात वेदमंत्रांचे, शांतीसुक्ताचे पठण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येथील परशुराम प्रतिष्ठान व अखिल ब्राह्मण समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान विष्णूचा सहावा अवतार व ब्राह्मण समाजाचे आद्य पुरुष भगवान परशुराम यांची जयंती बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विविध कार्यक्रम झाले.

शहरातील विठ्ठल मंदिर सभागृहात सकाळी साडेआठ वाजता सुरेश जोशी यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अमित पाटील व प्रदीप धुमाळ यांनी वेदमंत्रांचे, शांतीसुक्ताचे पठण यावेळी करण्यात आले.

ब्राह्मण समाजावर सुरू असलेला अघोषित बहिष्कार, अन्याय व अत्याचार लक्षात घेता संघटनांचे महत्त्व गरजेचे असल्याची भावना यावेळी याप्रसंगी चंद्रशेखर जोशी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी अखिल ब्राह्मण समाज मंडळ येवला अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, दिलीप पाटील, सतीश संत, श्रीपाद जोशी, डॉ. महेश्वर तगारे, विपुल धुमाळ, अक्षय पाठक, प्रशांत गांधी, जयंत केंगे, विशाल शिखरे, राम कुलकर्णी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’लाही परीक्षार्थींचा तपासणीशी सामना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कडक नियमावली लागू केल्याने जेईई परीक्षेला विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आल्यानंतर आता 'नीट'साठीही विद्यार्थ्यांना तपासणीचा सामना करावा लागणार आहे. येत्या ६ मे रोजी सकाळी १० ते १ या वेळेत ही परीक्षा देशभरात पार पडणार आहे.

मेडिकल प्रवेशांसाठी 'सीबीएसई'कडून घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेसाठी मोठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ठराविक पद्धतीचाच पोषाख परिधान करण्याबरोबरच पेन, पेन्सिल, पाण्याची बाटली, शूज घालणे यावर बंदी घालण्यात आली आहे. हे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे.

मेडिकल कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट ही परीक्षा देणे बंधनकारक आहे. दर वर्षी 'सीबीएसई'कडून ही परीक्षा घेण्यात येते. यंदा नीट परीक्षेचे अॅडमिट कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर परीक्षेसाठीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या कठोर नियमावलीमुळे विद्यार्थ्यांना 'नीट'चा अभ्यास करण्याबरोबरच परीक्षेला जाताना काय घालावे, याचा विचार करणेही आवश्यक झाले आहे. या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांचे कपडे हे फिकट रंगाचेच असावेत, मुलींच्या कपड्यांवर एम्ब्रॉयडरी नसावी, अर्ध्या बाह्यांचेच कपडे असावेत, अशा अनेक नियमांचा यात समावेश आहे. परीक्षेच्या तारखेत व वेळेत कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही, असेही 'सीबीएसई'कडून जाहीर करण्यात आले आहे. ५ जून रोजी परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे

या वस्तूंना परवानगी

स्लीपर, कमी हिलची सॅण्डल्स, हाफ टी शर्ट, शर्ट, ट्राऊजर, जीन्स, नंबर असलेला चष्मा, सलवार, कुर्ती, टॉप (अर्ध्या बाह्या)

- -

या वस्तूंना बंदी

बूट, पूर्ण बाह्यांचा शर्ट, टी शर्ट, घड्याळ, ब्रेसलेट, बांगड्या, नेकलेस, चेन, हेअर क्लिप, मोठे रबर, साडी, बुरखा, टोपी, कुर्ता, पायजमा, गॉगल, स्टेशनरी, गॅजेट्स, पेन, पेन्सिल, पाण्याची बाटली, हॅण्डबॅग, दप्तर.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images