Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फसवणूक प्रकरणी तीन वर्षे कारावास

$
0
0

सैन्य दलात नोकरी लावण्यासाठी उकळले होते पैसे

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जिल्ह्यातील अनेक तरुणांना सैन्य दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीस येथील न्यायालयाने शुक्रवारी तीन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार दंडाची शिक्षा सुनावली. जिल्ह्यातील अनके बेरोजगार तरुणांची या प्रकरणात फसवणूक झाल्याने या निकालाकडे लक्ष लागून होते.

ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१४ दरम्यान आरोपी अविनाश उर्फ शेखर महादू महाले (रा. मेहुणे, ता. मालेगाव) याने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून सुमारे १ लाख ते ६ लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेतली होती. बेरोजगार तरुण व त्यांच्या कुटुंबीयांनी नोकरी लागेल या आशेने वेळोवेळी मागेल ती रक्कम देऊनदेखील आरोपीने नोकरी लावून न दिल्याने या तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या मुलास नोकरी लावून देतो म्हणून जगन्नाथ तुकाराम सावळे (रा. चिंचवे, ता. मालेगाव) यांच्याकडून १ लाख ८५ हजार रुपये आरोपीने घेतले होते. मात्र मुलास नोकरी न मिळाल्याने व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सावळे यांनी आरोपीविरोधात वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पंचवीस साक्षी नोंदवल्या

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक स्वनिल नाईक यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी वकील गिरीश पवार यांनी कामकाज पहिले. सुनावणी दरम्यान एकूण २५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या गेल्या. अखेर शुक्रवारी न्यायालयाने या प्रकरणी आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार दंड व दंड न भरल्यास ४ महिन्यांची सश्रम कारावास शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे फिर्यादी सावळे यांनी न्यायालयात सरकार पक्षाला पूर्णपणे साहाय्य न केल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितानुसार तक्रार दाखल करण्याचे आदेश सहायक अधीक्षक मालेगाव यांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस पाटील रोखणार वाहनचोरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर तसेच तालुका ठिकाणावरून चोरी केलेले वाहन छोट्यातील छोट्या गावांमध्ये अगदी कमी किंमतीत विक्री केले जाते. वाहनखरेदी करणाऱ्यास कमी किंमतीत वाहन मिळणे हेच महत्त्वाचे असल्याने तो कागदपत्रांना गांभिर्यांने घेत नाही. त्यामुळे चोरट्यांचे फावते. वाहनचोरी रोखण्यासाठी हा सर्वात मोठा अडसर असून, असे प्रकार रोखण्यासाठी गावातील पोलिस पाटील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पोलिस आयुक्तांनी तसे आदेश पाच जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे रजेवर असून, त्यांचा पदभार पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शहर पोलिस दलाची क्राइम मीटिंग शुक्रवारी सकाळी झाली. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सदर बैठकीस हजर राहण्याचे आदेश दिले होते. या बैठकीत चेन स्नॅचिंग, घरफोडी, वाहनचोरी अशा गुन्ह्यांबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. विशेषत: चोरट्यांची मोडस ऑपरेडीबाबत चर्चा झाली. अनेकदा शहर पोलिसांनी अटक केलेल्या वाहनचोरटा नाशिकसह इतर जिल्ह्यात वाहन विक्री करताना सापडतो. तर, नगर जिल्ह्यातील चोरटे नाशिकमध्ये येऊ वाहनविक्री करतात. त्यामुळे या बैठकीचे विशेष महत्त्व होते.

याबाबत पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले, की शहरी भागातून चोरी झालेल्या वाहनांची ग्रामीण भागात अथवा दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवर अगदी कमी किंमतीत विक्री होते. गावात दाखल होणाऱ्या संशयास्पद वाहनांची पोलिस पाटलांना सहज माहिती मिळू शकते. पोलिस आणि पोलिस पाटील यांनी एकत्रित काम केल्यास वाहनचोरी आणि चोरीच्या वाहनांची विक्री यास प्रतिबंद बसू शकतो. आजच्या बैठकीत गुन्हेगारांच्या मोडस ऑपरेडींबाबत सखोल चर्चा झाली. यात नाशिकमध्ये घडलेले काही गुन्हे इतर जिल्ह्यातही त्याच पद्धतीने झाल्याचे समोर आले. चोरटे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पोहचतात. काम आटोपले की पुन्हा आपआपल्या ठिकाणी पोहचतात. आजच्या बैठकीतून अशाच चोरट्यांचा मागोवा घेण्यात आल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्या संरक्षणासाठी मानवांशी संवाद महत्त्वाचा

$
0
0

वन्यजीव जीवशास्त्रज्ञ निकीत सुर्वे यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माणसांची संवाद साधता येतो मात्र बिबट्यांशी संवाद साधता येत नाही त्याकरता माणसांनीच एकमेकांसी संवाद साधून बिबट्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन वाइल्ड लाइफ कॉन्सर्वेशन सोसायटीचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ निकीत सुर्वे यांनी केले. राज्य सरकारच्या वनविभागाच्या वतीने झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

उंटवाडी येथील वनसंरक्षक कुटी येथे माणूस व बिबट्या यामधील परस्पर संबंध या विषयावर कार्यशाळा झाली. यावेळी निकीत सुर्वे यांनी दोघांमधील संबंध उपस्थितांना उलगडून सांगितले. ते म्हणाले, बिबटे हे मनुष्यवस्तीजवळ प्रामुख्याने आढळतात. पाळीव प्राणी हे बिबट्यांचे भक्ष आहे. ज्या ठिकाणी पाळीव प्राण्यांचे वास्तव्य असते अशा ठिकाणी बिबटे हमखास पहायला मिळतात. उसाचा मळा एकदा लावल्यानंतर दोन वर्षे त्याकडे कुणी पहात नाही. ही जागा बिबट्यासाठी सुरक्षित असल्याने याच शेतात बिबटे रहातात. ऊस कापणीला येतो तेव्हा बिबट्याची पिले त्या ठिकाणी आढळतात. सापडलेली पिल्ले माणसे आपल्याजवळ बाळगतात. परंतु, ही पिल्ले पुन्हा त्या ठिकाणी ठेवून दिल्यास बिबट्याची मादी त्यांना आपल्या ठिकाणी घेऊन जाते.

ज्या भागात बिबट्यांचा वावर आहे अशा ठिकाणी लहान मुलांना एकटे सोडू नये. तसेच सोबत बॅटरी व मोबाइल बाळगावा. तसेच ज्या ठिकाणी घाण आहे त्या ठिकाणी कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. या कुत्र्यांचे भक्षण करण्यासाठी बिबटे येत असतात. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माध्यामांनी वार्तांकन करताना काय काळजी घ्यावी, याबद्दल रणजीत जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पश्चिम विभागाच्या मुख्या वनसंरक्षक टी. ब्युला एलील मती, डॉ. एस. सीवा बाला यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मादी बिबट्या अधिक आक्रमक

बिबट्याची मादी हे नरापेक्षा जास्त आक्रमक असते. बिबट्या पिलांना कुणी शिक्षण देत नाही ते आपल्या आईकडूनच शिक्षण घेतात. दोन वर्षांपर्यत आई त्यांचा सांभाळ करते; त्यानंतर त्यांना सोडून देते. दोन वर्षानंतर मादी पुन्हा दुसऱ्या पिल्लांना जन्म देते. हे चक्र असेच सुरू रहाते, अशी माहिती निकीत सुर्वे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉक विथ कमिशनर आज ‘रंगणार’

$
0
0

तक्रार व सूचनांचा पडणार पाऊस

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या शनिवारी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या मातोश्रींची प्रकृती बिघडल्यामुळे स्थगित झालेला 'वॉक विथ कमिनशनर' हा उपक्रम आज (२८ एप्रिल) होणार आहे. सकाळी साडेसहा वाजता गोल्फ क्लब मैदानावर हा पूर्वनियोजित कार्यक्रम होणार असून, प्रशासनाच्या वतीने या उपक्रमाची तयारी करण्यात आली आहे. ज्या नागरिकांना आयुक्तांकडे तक्रार किंवा सूचना करायची आहे, त्यांना टोकन घ्यावे लागणार आहे. 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमाविरोधात मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे.

नवी मुंबईत आयुक्त तुकाराम मुंढेंनी जनतेशी संवाद साधण्यासाठी 'वॉक विथ कमिनशनर' हा उपक्रम सुरू केला होता. तेथे हा उपक्रम चांगलाच हिट झाला होता. नाशिकमध्ये आल्यानंतर मुंढेंनी हा उपक्रम सुरू करण्याचे सूतोवाच केले होते. परंतु, प्रथम पालिकेला शिस्त लावण्याचे काम सुरू केल्याने हा उपक्रम सुरू होऊ शकला नाही. परंतु, आयुक्तांच्या करवाढीच्या निर्णयाने शहरभर वातावरण ढवळून निघाले आहे. आयुक्त मुंढे यांनी केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात होणाऱ्या महासभेपूर्वीच २१ एप्रिल रोजी हा उपक्रम आयोजित केला होता. त्याची सर्व तयारीही झाली होती. परंतु, शनिवारी सकाळी मुंढेंच्या मातोश्रींची प्रकृती बिघडल्याने हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तेव्हाच आयुक्तांनी २८ रोजी हा उपक्रम घेण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार प्रशासनाने तयारीही केली होती. परंतु, आयुक्त सुटीवर जाणार असल्याचे वृत्त आल्याने संभ्रम निर्माण झाला होता. प्रशासनाने पाठविलेल्या संदेशानुसार आज, शनिवारी हा उपक्रम होणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या तक्रारी व सूचना घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मनसेकडून तक्रार

आयुक्तांच्या 'वॉक विथ कमिनशनर' या उपक्रमासंदर्भात मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, या कार्यक्रमाने आचारसंहिता भंग होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा उपक्रम रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या उपक्रमामुळे भाजपला फायदा होणार असून, महापालिकेचा आर्थिक खर्चही होत असल्याचा दावा भवर यांनी केला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘छत्रपतींच्या विचारांचे अनुकरण हवे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

जातपात विसरून आपण भारतीय म्हणून एकत्र आले पाहिजे. स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण जीवनात करणे आवश्यक असून शिवाजी महाराज व्यक्‍ती नव्हे तर विचार असल्याचे प्रतिपादन शिवचरित्रकार मुग्धा थोरात यांनी केले.

माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना थोरात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विलास पोतदार आणि ब्रिजमोहन चौधरी उपस्थित होते. यावेळी थोरात म्हणाल्या की, शिवाजी महाराजांच्या विचारांचे जीवनात अनुकरण केले पाहिजे. महाराजांच्या नावाने टिळे लावून किंवा नाव घेऊन त्यांच्यासारखे होता येणार नाही. महाराजांनी १८ पगड जाती एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी कोणताही जाती भेद केलाच नाही. स्वराज्य स्थापन करणे हाच उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्याच पद्धतीने आपणही जीवनात उद्दिष्ट ठेवूनच काम केले पाहिजे. सध्या विविध महापुरुषांना विविध जाती-धर्मांनी वाटून घेतले आहे. मात्र ते चुकीचे असून कोणत्याही जाताची विचार न करता केवळ भारतीय म्हणून आपण वागले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक व्याख्यानमालेचे अध्यक्ष किरण सोनार यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय नंदकुमार दुसानीस यांनी करून दिला, तर प्रकाश काळे यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान - यशस्वी जीवनासाठी संमोहनशास्त्र

वक्ते - डॉ. शैलेंद्र गायकवाड

वेळ - ६.३०

स्थळ - स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान, जुने सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानाला ‘अभय’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

न्यायालयाच्या आदेशावरून मुख्य रस्तालगत पाचशे मीटरच्या आत येणारी मद्यविक्रीची दुकाने व बार आणि हॉटेल्स बंद करण्यात आली होती. त्यात अशोकनगर भागातील एकमेव मद्याचे दुकान पाचशे मीटरच्या पुढे असल्याने बंद होण्यापासून वाचले होते. हे दुकान बंद करण्यासाठी स्थानिकांनी वर्षभरापूर्वी आंदोलन छेडले होते. मात्र, अजूनही हे दुकान सुरूच असल्याने या दुकानाला 'अभय' मिळाल्याचीच चर्चा परिसरात होत आहे.

पाचशे मीटरच्या निर्णयानंतर सातपूर भागात हे एकमेव मद्यविक्रीचे दुकान राहिल्याने रोजच सायंकाळी ग्राहकांच्या रांगाच रांगा या दुकानाबाहेर लागत होत्या. त्यामुळे स्थानिक महिलांनी एकत्रित येत हे मद्याचे दुकान तात्काळ बंद करावे, अशी मागणी उत्पादन शुल्क विभागाकडे केली होती. नव्याने मुख्य रस्त्यापासून दुकानाची मोजणी करण्याची मागणीही महिलांनी केली होती. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलांच्या समक्ष मुख्य रस्त्यापासून मद्य दुकानापर्यंतची मोजणी केली. यात पाचशे मीटरच्या पुढे हे मद्याचे दुकान येत असल्याचे उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी महिलांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, तरीही येथील मद्यपींचा त्रास होत असल्याने हे दुकान बंद करण्याची मागणी परिसरातून सातत्याने केली गेली. रोजच ग्राहकांची गर्दी उसळत असल्याने महिलांनी दुकानच हटविण्यासाठी पुढाकार घेत आंदोलन छेडले होते.

पोलिसी कारवाई अपुरी

दरम्यान, काही महिन्यांनंतर मुख्य रस्त्यालगत असलेली मद्याची दुकाने व बार आणि हॉटेल्स सुरू करण्याचा निर्णय सरकाने दिल्याने अशोकनगर येथील मद्यविक्रीचे दुकान हटविण्याचे आंदोलन थंडावले आहे. पोलिसांकडून रोजच मद्यविक्रीच्या दुकानाच्या परिसरात उघड्यावर मद्य पिणाऱ्यांवर कारवाई केली जाते. गुरुवारी (दि. २६) रात्री नऊ वाजेच्या सुमारासही पोलिसांनी या मद्य दुकानाच्या परिसरात दाखल होत उघड्यावर मद्य पिणाऱ्यांवर कारवाई केली. मात्र, अशा प्रकारची कारवाई अपुरी ठरत असून, मद्यपींमुळे नाहक त्रास होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

नियमानुसार सरकारचा मद्यविक्रीचा परवाना घेऊनच व्यवसाय करीत असल्याने दुकान हटविण्याचे कारणच काय, असे मत दुकानचालकांनी व्यक्त केले आहे. उत्पादन शुल्क व पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमांनुसारच मद्यविक्रीचा व्यवसाय केला जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. सर्वच मद्याची दुकाने व हॉटेल्स सुरू झाल्याने बंद काळात उसळत असलेली गर्दी आता होत नसल्याचा दावाही त्यांनी केला.

लोगो : वर्षभरानंतर...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

घरकुल योजनेमध्ये घरे मिळालेली असतानाही गौतमनगर भागातच राहणाऱ्यांच्या घरांची अतिक्रमणे शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आली. सुरुवातीला नागरिकांनी या ठिकाणी महापालिकेच्या पथकाला तीव्र विरोध केला. परंतु, कोणत्याही विरोधाला न जुमनात महापालिकेने ज्यांना घरे मिळाली आहेत, त्यांची अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

महापालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरूच असून, महापालिकेने उभारलेल्या घरकुलांमध्ये घरे मिळूनसुद्धा अनेक जण अतिक्रमित वसाहतींमध्येच राहत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे महापालिकेने यापूर्वी वडाळा गावात राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेप्रमाणे शुक्रवारी गौतमनगर भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. गौतमनगर भागात महापालिकेचे पथक जाताच स्थानिक नागरिकांनी त्यास विरोध करून अतिक्रमण काढता येणार नाही, अशी भूमिका घेतली. मात्र, महापालिकेच्या पथकासह पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना बाजूला करून ज्यांना घरे मिळाली आहेत, अशांची अतिक्रमणे काढली. बराच काळ वाद झाल्याने या ठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने येथील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान-३ फास्ट न्यूज

$
0
0

दोघे चोरटे गजाआड

नाशिकरोड : रेल्वे ट्रॅक्शन येथील गोदावरी सभागृहातून चोरीस गेलेली ९५ हजार ५०० रुपयांची म्युझिक सिस्टीम चोरट्यांसह ताब्यात घेण्यास नाशिकरोड पोलिस ठाणे गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे. या चोरी प्रकरणी सिक्युरीटी मॅनेजर परमेश्वर कुचबिहारी दुबे यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली होती. या चोरी प्रकरणी पोलिसांनी रवी सुरेश पवार (वय २२) रा. दसक आणि दीपक उर्फ स्नू गोरख मोरे (वय २०) रा. सिद्धार्थनगर, एकलहरे या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यातील सहा स्पिकर, दोन एम्प्लिफायर, एक लाइव्ह मिक्सिंग कन्सोल आणि चार एलईडी बल्ब असा ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोदाघाट बहर

$
0
0

गोदाघाटावर गर्दी

जेलरोड : जेलरोड येथील गोदाघाटावर उन्हाळ्यामुळे सायंकाळी फिरण्यास येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जेलरोडला नांदूर आणि दसक असे दोन गोदाघाट आहेत. कुंभमेळ्यात घाटांचे विस्तारीकरण करून त्यांची कामे करण्यात आल्याने ते फिरण्यासाठी योग्य झाले आहेत. नांदूर घाटावर महादेव मंदिर आहे. येथे मराठी चित्रपटाचे चित्रिकरण झाले होते. सायंकाळी शांत व थंडगार वातावरण असल्याने फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नदीला पाणी सोडल्यावर पोहणाऱ्या मुलांची संख्या वाढते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा राहुल

दुर्दैव! मुलगी अंगावर पडल्यानं वडिलांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

'खेळ कुणाला दैवाचा कळला, दैव लेखणा कुणाला टळला' या गीताच्या बोलाप्रमाणेच सर्व घडत असते. कुणाच्या बाबतीत काय घडेल, हे कुणालाही सांगता येत नाही. अशीच एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना नाशिकला घडली. पाचव्या मजल्यावरून मुलगी खाली पडली, पण ती ही थेट तिच्या जन्मदात्याच्याच अंगावर... यात तिच्या वडिलांना प्राण गमवावे लागलेच, पण ती सोळा वर्षीय मुलगीही गंभीर जखमी झाली आहे.

सामनगाव रोडवरील जयप्रकाशनगर येथील अश्विनी कॉलनीत गुरुवारी रात्री इमारतीच्या पाचव्या मजल्यावर हळदीचा कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम बघण्यासाठी सुनंदा विजय गोदडे (वय १६) ही गेली होती. सुनंदाचा तोल गेल्याने ती थेट पाचव्या मजल्यावरून खाली पडली. या इमारतीच्या खालीच तिचे वडील विजय किसन गोदडे उभे होते. सुनंदा वडील विजय गोदडे यांच्या डोक्यावरच पडली. यामुळे गंभीर मार लागून विजय गोदडे जागीच बेशुद्ध झाले, तर सुनंदाही गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर जखमी विजय आणि त्यांची मुलगी सुनंदा या दोघांना तत्काळ महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून गंभीर जखमी असलेल्या विजय गोदडे यांना नाशिकला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सुनंदा गंभीर जखमी असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनमुळे जयप्रकाशनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीअभावी रखडले ‘मॉडेल’ चौकांचे सुशोभीकरण

$
0
0

शहरातील १७ चौकांचे भवितव्य अधांतरी

- पोलिसांनी आखलेल्या पहिल्या कामाचा टप्पा अपूर्ण

- लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाकडूनही दुर्लक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर रोडवरील शरणपूर पोलिस चौकीजवळील सिग्नलचा चेहरामोहरा बदलण्याचे काम निधीअभावी थंडावले असून, महापालिकेची उदासीनता आणि पैशांच्या टंचाईमुळे उर्वरित १७ चौकांच्या कामांचेही भवितव्य अधांतरी आहे.

परदेशात असतात असे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे, लेन कटिंगच्या खुणा यासह विविध प्रकाराचे साईन बोर्ड अशा प्रकारे सुविधा त्र्यंबकरोडवरील शरणपूर पोलिस चौकी सिग्नलवर निर्माण करण्याचे काम मागील वर्षी हातात घेण्यात आले. लोकसहभागातून हा मॉडेल सिग्नल बनवून त्यानंतर पोलिस जवळपास १७ चौकांचे काम हाती घेणार होते. वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते, त्यावेळी अनेकदा वाहनचालक झेब्रापट्टाच दिसत नसल्याचे किंवा इतर साईन बोर्ड नसल्याच्या तक्रारी करतात. यामुळे पोलिस तसेच वादाचे प्रसंग उद्भवतात. अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम महापालिका करीत असते. मात्र, कधीतरी तांत्रिक अडचणींमुळे अशी कामे वेळेत होताच असे नाही. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी लोकसहभागातून ठिकठिकाणावरील १७ चौकांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. या कामासाठी लागणारा निधी लोकसहभागातून उपलब्ध करण्यात येत होता. विशेषत: लोकप्रतिनिधींच्या निधीचा यासाठी वापर होणार होता. यासाठी पोलिस उपायुक्त तसेच सहायक पोलिस आयुक्त आणि पोलिस निरीक्षकांना जबाबदारी सोपविण्यात आली. सुरुवातीस शरणपूर पोलिस सिग्नल असलेल्या चौकाकडे पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. झेब्रा क्रॉसिंग पट्टे, येलोनेट मारण्यासह, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी फूट प्रिंट असलेला झेब्रापट्टा आखण्यात आला. लेन कटिंगच्या नियमांकडे वाहनचालकांनी लक्ष पुरवावे, यासाठी तिथे तशी डिझाइन करण्यात आली. एक मॉडेल चौक म्हणून येथे सुविधा निर्माण झाल्यानंतर शहरातील उर्वरित १७ ठिकाणी काम हाती घेण्यात येणार होते. दुर्दैवाने पोलिसांनी सुरू केलेल्या पहिल्याच कामांच टप्पा पूर्ण होत नाही. लोकसहभागात लोकप्रतिनिधींच्या वर्गणीचा वाटा महत्त्वाचा होता. दुसरीकडे महापालिका प्रशासनही काही सुविधा पुरवित होती. आता दोन्ही मार्ग बंद झाले आहेत.

काम बंद करण्याचा पर्याय शिल्लक

पैशांची उपलब्धता हा कळीचा मुद्दा ठरत आहे. टप्प्याटप्प्याने पैसे उपलब्ध झाले की पहिले काम प्रभावित होते. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून काम हाती घ्यावे लागते. हे असेच सुरू राहिल्यास काम बंद करणे एवढाच एक पर्याय समोर असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवेतूनच खरा माणूस व्यक्त होतो

$
0
0

संत साहित्याचे अभ्यासक यशवंत पाठक यांचे प्रतिपादन

राम खुर्दळ, निवृत्ती शिंदे, सुनंदा पवार यांचा रोटरी सेवा पुरस्काराने सन्मान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सेवा ही वृत्ती आहे, सेवेतूनच माणूस खरा व्यक्त होतो. आज बहुतांश घरांत संवाद कसा साधायचा याचे वर्ग घ्यावे लागतात, हे दुर्दैव आहे. माणसातला माणूसपण हरवून गेला आहे. जगण्याचा आनंद सेवेतून व्यक्त होतो. सेवा ही माणसाला माणुसपणासह जवळ आणते, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक यशवंत पाठक यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने सामाजिक, कला आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राम खुर्दळ, निवृत्ती शिंदे आणि सुनंदा पवार यांना संत साहित्याचे अभ्यासक यशवंत पाठक यांच्या हस्ते रोटरी सेवा पुरस्कार (व्होकेशनल अवार्ड) देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल, सचिव मनिष चिंधडे, रवींद्र महादेवकर उपस्थित होते. यावेळी यशवंत पाठक यांनी 'एक आनंद साधना सेवा' या विषयावर संवाद साधला. ते म्हणाले, की ज्या देशात गड, किल्यांचे संवर्धन चांगल्या प्रकारे होते, त्या देशाची प्रगती उत्तम होते. यात महाराष्ट्र अग्रेसर असून, याचा प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा. संसाराची यशस्वीता जाणिवेतूनच व्यक्त होते. सेवेचा आशय भक्त झाल्याशिवाय कळत नाही असेही त्यांनी नमूद केले. यावेळी पाठक यांनी प्रत्येकाने सेवाभाव जपण्याची आवश्यकता असल्याचे सांगून आनंदी जगण्याच्या अनेक टिप्स उपस्थितांना दिल्या. प्रारंभी सुधीर जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिलीपसिंग बेनिवाल यांनी प्रास्ताविक केले. वैशाली रावत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. श्रीया कुलकर्णी, मंथ लीडर सुधीर जोशी, वैशाली रावत आदींनी विशेष परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुटवडनगर भागात स्वच्छता मोहीम

$
0
0

खुटवडनगर भागात स्वच्छता मोहीम (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ च्या नगरसेविका हर्षदा गायकर यांनी खुटवडनगर भागातील चाणक्यनगर येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत स्वच्छता मोहीम राबविली. चाणक्यनगर येथील महादेव मंदिर व स्वाध्याय केंद्र परिसरातील स्वच्छता करण्यात आली. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पालापाचोळा साचला होता. त्यामुळे मंदिर परिसरात अस्वच्छता पसरली होती. या पार्श्वभूमीवर नागरिक व आरोग्य कर्मचाऱ्यांना सोबत घेत या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याचे नगरसेविका गायकर यांनी सांगितले.

---

(थोडक्यात)

सातपूरवासीयांचे पत्रकांद्वारे हिवतापासंदर्भात प्रबोधन (फोटो)

सातपूर : महापालिकेच्या सातपूर विभागातर्फे जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नागरिकांचे पत्रकांद्वारे हिवतापाविषयी प्रबोधन करण्यात आले. डेंग्यूसंदर्भातही विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, उन्हाळ्यात पाणी साचविताना काय काळजी घ्यावी याबाबत मलेरिया विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती देत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त दिवस पाण्याचा साठा करून ठेवू नये, असे आवाहन विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे यांनी केले आहे.

--

चाळीस हजारांवर दंड

जेलरोड : प्लास्टिकचा वापर आणि नियमबाह्य कचराफेकप्रकरणी नाशिकरोड विभागात दि. १९ ते २६ एप्रिलदरम्यान चाळीस हजारांवर दंड वसूल करण्यात आला. सुभाषरोडच्या कटारिया हार्डवेअरने विहितगाव येथे प्लास्टिकमिश्रित कचरा टाकला होता. त्यात दुकानाच्या पावत्या सापडल्याच्या आधारे महापालिकेने त्यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला. शिखरेवाडी, सावरकर उड्डाणपूल परिसर आदी ठिकाणीही कारवाई करण्यात आली आहे. विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी ही माहिती दिली.

--

गोदाघाटावर वाळू उपसा (फोटो)

जेलरोड : जेलरोड येथील गोदावरी घाटावर महापालिकेने स्वच्छता मोहीम राबविली. सध्या नदीत पाणी नाही. पुलाच्या पश्चिमेकडील भागात काळे पाणी साचलेले आहे. पुलाच्या पूर्वेकडील भागात नांदूर घाटावरच पाणी वाहते आहे. दसक घाटावर पाणीच नसल्याने वाळूचे बेकायदेशीर उत्खनन होत आहे. यासंदर्भात कारवाई होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

--

जिमखान्यावर गर्दी

जेलरोड : नाशिकरोड प्रेसच्या जिमखान्यावर सकाळी व सायंकाळी जॉगिंगसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिमखाना परिसरात घनदाट झाडी आहेत. प्रेसच्या आवारात जुन्या काळातील बंगले आहेत. झाडांमुळे हवाही थंड असते. त्यामुळे येथे व्यायामप्रेमींची गर्दी होत आहे. लहान मुलेदेखील येथे विविध क्रीडाप्रकारांचा आनंद लुटताना दिसत आहेत. येथील स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लिंगायत संघर्ष’चा उद्या मागण्यांप्रश्नी महामोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध प्रलंबित मागण्यांप्रश्नी लिंगायत संघर्ष समितीतर्फे रविवारी (दि. २९) नाशिक महसूल विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आदी ठिकाणच्या लिंगायत समाजबांधवांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.

लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी, जातींना अल्पसंख्याक दर्जा मिळावा, उर्वरित पोटजातींना इतर मागासवर्गीय दर्जा मिळावा, जंगम समाजातील माला, बेडा, बुडगा या जातींना मागासवर्गीय दाखले मिळावेत आदी प्रमुख मागण्यांसाठी नाशिकरोड येथील पासपोर्ट कार्यालयाजवळून सकाळी १० वाजता हा मोर्चा निघणार आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात येईल. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, विविध समित्या व नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी झालेल्या बैठकीत मोर्चा शांततेत काढण्याचे आवाहन करण्यात आले.

युवा मंचातर्फे शहरात येणाऱ्या तीनही रस्त्यांवर स्वागत कक्ष उभारण्यात येणार असून, वाहनतळ, राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मोर्चाला आलेल्यांनी परत जाताना कोणत्या मार्गांनी जावे याचेदेखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रुग्णवाहिका, तसेच अग्निशामक दलाचे बंब, फिरते शौचालय, कचरा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था यासंदर्भात नियोजन करण्यात आले. सुमारे ३५० स्वयंसेवक हे कामकाज पाहणार आहेत. हा मोर्चा दत्त मंदिर सिग्नल, बिटको पॉइंट व नाशिकरोड पोलिस स्टेशनमार्गे महसूल आयुक्तालयावर जाणार आहे. मोर्चामुळे वाहतुकीला व नागरिकांना अडथळा होऊ नये अशी खबरदारी घेण्याच्या, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नये आदी सूचना स्वयंसेवकांना देण्यात आल्या आहेत. मोर्चामध्ये फक्त मोजक्या घोषणा देण्याचे ठरले आहे. मोर्चेकऱ्यांसाठी पासपोर्ट कार्यालयाच्या तळमजल्यावर भोजनव्यवस्था केलेली असून, दुसरी भोजनव्यवस्था आयुक्त कार्यालयाजवळ केली आहे. तीन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. ३०० स्वयंसेवक कचरा संकलनासाठी कार्यरत राहणार आहेत. लिंगायत धर्मातील गवळी, बुरुड, ककैया जंगम आदी पोटजातींचे सुमारे एक लाख समाजबांधव उपस्थित राहतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. लिंगायत संघर्ष समिती व महामोर्चाचे नेतृत्व ओमप्रकाश कोयटे, समन्वयक अनिल चौघुले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर दंदणे, सचिव दुर्गेश भुसारे व अॅड. अरुण आवटे करणार आहेत.

-------------------

\B

लिंगायत महामोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात (सुधारित)

\B

((यापूर्वी दिलेली बातमी घेऊ नये. हीच घ्यावी))

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इमारतीवरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू

$
0
0

पंचवटी : हिरावाडी येथे सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामात फरशी बसविणाऱ्या प्रदीपसिंग (वय २५, रा. गोकुळधाम, कमलनगर, हिरावाडी, पंचवटी) हा मजूर इमारतीवरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हा मजूर नेमका कसा पडला या विषयीची कळू शकले नाही. पंचवटीत पोलिस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाद्यसवयी वेळीच बदला

$
0
0

डॉ. तात्याराव लहाने यांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आजची जीवनशैली ही सेलिब्रेशन प्रकारातील झाली आहे. घरामध्ये वावरताना एक जीवनशैली व घराबाहेर वावरताना दुसरी जीवनशैली असे चित्र हमखास दिसून येते आहे. या जीवनशैलीत बदललेली खाद्यपद्धती हा सर्वात मोठा भाग आहे. आजच्या पिढीचा जंक फूडकडे ओढा वाढला आहे. यामुळे आजारांमध्ये वाढ झाली असून सोळा, सतरा वर्षांच्या मुलांचे हृदयविकारांनी मृत्यू होत असल्याची उदाहरणे समोर येतात. हे चित्र भयावह असून ते बदलण्यासाठी खाद्यसवयी वेळीच बदलल्या गेल्या पाहिजे, असे जे. जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.

के. के. वाघ शिक्षणसंस्था संचलित के. के. वाघ पॉलिटेक्निक कॉलेजतर्फे तीन वर्षांपासून कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मृती व्याख्यानमाला होते. व्याख्यानमालेचे ३६ वे पुष्प डॉ. लहाने यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारी झालेल्या व्याख्यानप्रसंगी डॉ. लहाने म्हणाले, की बदलत्या जीवनशैलीमुळे आज डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत विविध आजार बळावले आहेत. ४२ टक्के आजार हे केवळ जीवनशैलीमुळे होत आहेत. कुटुंबातील नवरा व बायको दोघेही नोकरी करीत असल्याने पारंपरिक खाद्यसंस्कृती लोप पावत आहे. हॉटेलिंगकडे कल वाढला आहे. तेलकट, मसालेदार पदार्थांमुळे जिभेला चव येत असली तरी त्यातून शरीराला काहीही पोषणमूल्ये मिळत नाही. जंक फूडमध्ये शरीरात कधीही पचन न होणारा फॅट जमा होतो त्यामुळे शरीराचे नुकसान होते. तसेच कॅन्सर, हृदयरोग, त्वचेचे रोग, दात किडणे, लठ्ठपणा, नैराश्य, मधुमेह असे आजारही वाढतात. वनस्पतीजन्य पदार्थांचे, भाजी भाकरीचे सेवन निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त असून ते खाण्याचा सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यूरोलॉजिस्ट डॉ. राहुल बाविस्कर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. के. वाघ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रकाश कडवे यांनी केले. त्यांनी या व्याख्यानमालेचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे विश्वस्त समीर वाघ, चांगदेव होळकर, वाघ इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य केशव नांदूरकर आदी उपस्थित होते.

शरीराची गरज ओळखा

जंक फूडमुळे शरीराला नुकसान होत आहे. चवीने खाण्यापेक्षा शरीराची गरज ओळखून शरीर निरोगी ठेवेल असे अन्न खा, असा सल्लाही डॉ. लहाने यांनी दिला. तसेच जवसाची चटणी, आंबाडी, मोड आलेले लसून, दही, बटाट्यांऐवजी रताळे, उकडलेल्या भुईमूगाच्या शेंगा, आलं हे शरीरासाठी फायदेशीर असल्याचेदेखील ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरपट्टी आता जुलैपूर्वीच भरा

$
0
0

दोन टक्के शास्तीचा कालावधी घटवला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने करवाढीपाठोपाठ नाशिककरांना आणखी झटका दिला असून, घरपट्टी उशिरा भरल्यानंतर लावण्यात येणाऱ्या दोन टक्के शास्तीची मुदत घटवली आहे. एप्रिलमध्ये घरपट्टीची बिले वाटप केल्यानंतर नागरिकांना घरपट्टी भरण्यासाठी सप्टेंबरची मुदत देण्यात येत होती. घरपट्टी भरली नाही, तर ऑक्टोबरपासून घरपट्टीच्या थकीत रकमेवर दोन टक्के शास्ती लावली जात होती. परंतु, आता सप्टेंबरची ही मुदत महापालिकेने जूनपर्यंत आणली आहे. जूनपूर्वी बिल भरले नाही, तर जुलैपासूनच दोन टक्के अतिरिक्त शास्ती बिलावर लागू होणार आहे. त्यामुळे नवे वादळ उभे राहण्याची शक्यता आहे.

महापालिका प्रशासनाकडून नव्या मालमत्तांच्या करात भरमसाठ वाढ करण्यासोबतच जुन्या मालमत्तांच्या सामासिक अंतर, शेती मोकल्या भूखंडांवरही सुलतानी करवाढ केली होती. मात्र, महासभेने अवाजवी करवाढ फेटाळून लावत स्थायी समितीच्या अठरा टक्के करवाढीला मंजुरी दिली. त्यामुळे मुंढेंनी आपल्या अधिकारात अधिसूचना काढत वाढ केली होती. त्यावरून शहरात संताप सुरू झाल्याने महासभेने त्याला स्थगिती दिली आहे.

करवाढीचा एक शॉक थांबत नाही तोच कर विभागाने नवीन दणका नाशिककरांना दिला आहे. यापूर्वी घरपट्टीची देयके ही एप्रिलमध्ये ग्राहकांना वाटप केल्यानंतर ही बिले भरण्यासाठी सप्टेंबर आणि ३१ मार्चपर्यंतची मुदत असायची. दोन टप्प्यात घरपट्टी देयकांचे वाटप केले जात असल्याने सहामाही पद्धतीने देयके भरले जात होती. सहा महिन्यांत देयक भरले नाही, तर थेट दोन टक्के शास्ती प्रतिमाह लावली जात होती. परंतु, महापालिकेने यात बदल केला असून, ही मुदत आता सहा महिन्यांऐवजी तीन महिने घटवली आहे. त्यामुळे तीन महिन्यांत घरपट्टीची रक्कम भरली नाही, तर थेट दरमहा दोन टक्के शास्ती लागू होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त भुर्दंड पडणार आहे.

१८ टक्के वाढीचाही संभ्रम

विविध कर विभागाकडून १८ टक्के दरवाढीनुसार नागरिकांना सहामाहीचे देयके वाटप केले जात आहे. नागरिकांनी वाढीव देयकांचा अभ्यास करताना साधारण १८ टक्के वाढ गृहित धरून हिशेब लावण्यास सुरुवात केली आहे. त्यात एक हजार रुपये घरपट्टी असेल, तर १८ टक्क्यांनुसार १८० रुपये वाढीव रकमेची नोंद होणे अपेक्षित आहे. परंतु, नागरिकांच्या घरपट्टीवर मात्र ३५० ते ४०० रुपये अतिरिक्त आल्याने आयुक्तांनी १८ टक्के करवाढीचा नेमका अर्थ कसा लावला याची विचारणा नगरसेवकांना होत आहे. प्रशासनाकडून करयोग्य मूल्यावर १८ टक्के वाढ केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे १८ टक्के करवाढीचाही संभ्रम वाढला आहे. भाजपने या करवाढीचा नव्याने अभ्यास सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींचे उपोषण स्थगित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जळगाव जिल्ह्यातील आदिवासींवर वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप करून या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत व वनाधिकार कायद्यानुसार जमिनी मिळाव्यात या मागण्यांसाठी येथील विभागीय आयुक्तालयासमोर उपोषणास बसलेल्या आदिवासींनी आपले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे घेतले.

उपायुक्त रघुनाथ गावडे यांच्याशी या उपोषणकर्त्या आदिवासी बांधवांची चर्चा झाल्यानंतर येत्या २ मे रोजी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांसोबत या मागण्यांप्रश्नी बैठक घेण्याचा निर्णय झाला. जळगाव जिल्ह्यातील वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी वन कायद्याचे उल्लंघन करून आदिवासींना विस्थापित केले असल्याचा आरोप या उपोषणकर्त्या आदिवासींनी केला होता. वनाधिकाऱ्यांनी काही आदिवासींना मारहाण करून बेघर केल्याचाही आरोप या उपोषणकर्त्यांनी केला. या आदिवासींना बेघर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. वनाधिकार कायद्यानुसार जमीन पट्टा धारण करण्याचा अधिकार या आदिवासींना देण्यात यावा. या मागण्या मान्य होत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील आदिवासींनी सामूहिक आत्मदहनाचा इशाराही दिला होता.

उपोषणाकडे शासकीय अधिकाऱ्यांनी ढुंकूनही न पाहिल्याने शुक्रवारी दुपारी या उपोषणकर्त्या आदिवासींनी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला आणि प्रशासनास चर्चा करण्यास भाग पाडले. हा प्रश्न जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असल्याने येत्या २ मे रोजी जळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी झालेल्या चर्चेत उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी दिल्यानंतर या आदिवासींनी आपले उपोषण मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धीसाठी भूसंपादनाची सक्ती

$
0
0

कायद्यामध्ये दुरुस्ती; लवकरच अध्यादेश

- नव्या दुरुस्तीनुसार जमीन भूसंपादन करताना ७० टक्के शेतकऱ्यांच्या संमतीची अट शिथिल

- भूसंपादनाला विरोध झाल्यास व न्यायालयात दाद मागितली तरी काम पुढे नेणे शक्य होणार

- भूसंपादन कायद्यान्वये संपादन केल्यास शेतकऱ्यांना चारपटच मोबदला मिळणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृद्धी महामार्गाकरिता २०१३ च्या भूसंपादन कायद्यामध्ये दुरुस्तीला राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी थेट खरेदीने जमिनी देण्यास शेतकरी तयार नसतील, तर या कायद्यान्वये प्रशासनाला भूसंपादन करता येणार आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच निघणार असून, त्यामुळे नाशिकसह राज्यभरातील १० जिल्ह्यांमधील जमीन अधिग्रहणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना पाचपटऐवजी चारपटच मोबदला मिळणार असल्याने ही अधिसूचना प्रसिध्द होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी आर्थिक मोबदल्याचा लाभ पदरात पाडून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सुमारे ७१० किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या जमिनींची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारने थेट खरेदी प्रक्रियेचा अवलंब केला असून, जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना लगेचच आर्थिक मोबदलाही मिळू लागला आहे. परंतु, या महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा अजूनही तीव्र विरोध आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. नाशिक, ठाणे, औरंगाबादमध्ये विरोधाची धार तीव्र असून, सिन्नर तालुक्यातील शिवडेसह काही गावांमध्ये संयुक्त मोजणीचे कामही अद्याप होऊ शकलेले नाही. प्रकल्पाला होणारा विरोध आणि त्यातून प्रत्यक्ष काम सुरू करण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन सरकारने २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार जमीन अधिग्रहणासाठी पुढाकार घेतला. परंतु, या कायद्यानुसार भूसंपादन करतानाही सामाजिक आघाताच्या अभ्यासाची तरतूद असते. या प्रकल्पामुळे कोणाचे नुकसान होणार का, नेमके काय आणि किती नुकसान होणार याचा अभ्यास करणे, प्रकल्पाच्या कामासाठी ग्रामसभेची मान्यता घेणे अनिवार्य ठरते. ही एकूणच प्रक्रिया वेळखाऊ असल्याने सामाजिक आघात अभ्यास ही तरतूद वगळावी, अशी विनंती राष्ट्रपतींना करण्यात आली होती. त्यानुसार भूसंपादन कायद्यातील दुरुस्तीला राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली. नव्या दुरुस्तीनुसार समृद्धीसाठी जमीन भूसंपादन करताना ७० टक्के शेतकऱ्यांच्या संमतीची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे अशा कायद्यान्वये भूसंपादनाला कुणी विरोध केला आणि न्यायालयात दाद मागितली तरी बाधिताच्या नुकसानभरपाईची रक्कम न्यायालयात जमा करून प्रकल्पाचे काम पुढे घेऊन जाणे शक्य होणार आहे.

समृद्धीसाठी थेट खरेदीद्वारे जमीन संपादित करताना जमिनीच्या किमतीच्या पाचपट मोबदला बाधित शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. मात्र, भूसंपादन कायद्यान्वये संपादन केल्यास शेतकऱ्यांना चारपटच मोबदला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार असलेल्या २५ टक्के रकमेचे नुकसान होणार आहे.

नुकसान टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यात सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये कौटुंबीक वाद, भाऊबंदकी यामुळे जमिनी संपादित करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र आहे. परंतु, भूसंपादन कायद्यातील दुरुस्तीमुळे या अडचणी दूर करणे शक्य होईल, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जाऊ लागला आहे. अधिग्रहणाअभावी रखडलेल्या जमिनीबाबतचे प्राथमिक नोटीफिकेशन तयार केले जाईल. तसा प्रस्ताव पुढील आठवड्यात सरकारकडे देण्यात येईल. या अधिसूचनेवर हरकती नोंदविण्यासाठी साधारणत: २१ दिवसांची मुदत मिळेल. त्यानंतर ही अधिसूचना अंतिम होणार असल्याने साधारणत: महिनाभरानंतर भूसंपादन कायद्यान्वये जमीन संपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे. तोपर्यंत थेट खरेदीने भूसंपादनाची कार्यवाही सुरू राहणार असून, शेतकऱ्यांनी थेट खरेदीने जमिनी देऊन स्वत:चे आर्थिक नुकसान टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images