Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पायाभरणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

वारकरी संप्रदायाचे आद्यसंस्थापक संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर जीर्णोद्धार पायाभरणी शनिवारी करण्यात आली. महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, ट्रस्ट अध्यक्ष संजय धोंडगे हे सपत्नीक तर विश्वस्त ललीता शिंदे, जिजाबाई लांडे आपल्या पतींसह पुजेसाठी बसले होते. जवळपास तासभर पूजाविधी झाला. सुरज शिखरे, मंदिराचे पुजारी जयंत गोसावी यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. यावेळेस विश्वस्त रामभाऊ मुळाणे, पंडित कोल्हे, पुंडलिक थेटे, त्र्यंबकराव गायकवाड, पवन भुतडा, डॉ. धनश्री हरदास, अविनाश गोसावी आदींसह मधुकर लांडे, महंत संपतदास धोंगडे, शंकरानंद सरस्वती, माजी अध्यक्ष मुरलधीर पाटील, वसंतराव घुले आदींसह वारकरी भक्त उपस्थित होते.

काळ्या पाषाणातील मंदिर

संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर आहे. मंदिर गर्भगृह दगडी बांधकामातील आहे. या मंदिराचा सद्य स्थितीला असलेला कळस आणि शिखर सिमेंट बांधकामाचे आहे. गर्भगृह आणि समाधी यांचे उंचीचे गुणोत्तर शास्त्राने बांधलेले आहे. त्यास कोणत्याही प्रकारे धक्का न लावता गर्भगृहाचे बाजुस पाच फुट रूंदीच्या कलाकुसर असलेल्या काळ्या पाषाणाच्या भिंती बांधण्यात येत आहेत. त्यावर मूळचे सिमेंटचे शिखर काढून तेथे दगडाचे शिखर बांधण्यात येणार आहे. हे सर्व काम २ कोटी ६० लाख रुपयांचे असून, पनवेल येथील श्रीहरी तिडके यांना याचा ठेका देण्यात आला आहे. याकरिता कोल्हापूर येथून दगड मागविण्यात आला आहे. मंदिराचे काम सुरू झाले असून, त्यानंतर सभामंडप व परिसराचा विकास करण्यात येणार आहे.

शहरातील नागरिकांची अनुपस्थिती

हजार वर्षांचा इतिहास निर्माण करेल असे मंदिर शिल्प उभे राहत आहे. मात्र या कार्यक्रमाला शहरातील ग्रामस्थांची अल्प उपस्थिती होती. या कामाबाबत शहरातील नागरकांना माहितीच दिली जात नाही असे सांगण्यात येते. तसेच काहींना निमंत्रण देवूनही ते उपस्थित राहत नाही, अशी शहरात चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जीवावर उठले प्लास्टिक कारखाने

$
0
0

मालेगावकरांचे आरोग्य धोक्यात; आगीच्या घटनांमुळे प्रदूषण वाढले

तुषार देसले, मालेगाव

शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने प्लास्टिक कारखाने, गोदाम यांना भीषण आग लागल्याचा घटना घडल्या. येथील अग्निशामक दलाच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे या आगीच्या वेगवेगळ्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्याने जीवित हानी टळली. मात्र या घटनांमुळे शहरातील बेकायदेशीर प्लास्टिक कारखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणत्याही परवान्यांशिवाय सुरू असलेल्या या कारखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरातील अक्सा कॉलनी भागात मंगळवारी एका प्लास्टिक, गिट्टी कारखान्यास लागलेल्या आगीने भीषण रूप धरणे केले होते. यात यंत्रमाग कारखाना व फर्निचरचे गुदाम जळून खाक झाले. अग्निशामक दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने आसपासच्या नागरिक वस्तीत आग पसरली नाही. मात्र प्लास्टिकला लागलेल्या आगीने परिसरात दुर्गंधी व धुराचे साम्राज्य पसरले होते. उन्हाळ्यात तापमान उच्चांक गाठत असल्याने प्लास्टिक ज्वलनशील असल्याने अशा घटना सातत्याने घडत असतात. मात्र या प्लास्टिक कारखान्यांना परवानगी नसतांना यास नक्की कोणाचे अभय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहर परिसरात गेल्या चार महिन्यात १७५ आगीच्या घटना घडल्या. यातील २४ घटना या प्लास्टिक कारखाने व गोदामांना आग लागल्याच्या आहेत. यातील बहुतांशी घटना या उन्हाचा तडाखा वाढल्यापासून घडल्या. शहरातील पूर्व भागात द्याने, म्हाळदे शिवार, अक्सा कॉलनी आदी परिसरात शंभराहून अधिक असे बेकायदेशीर प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करणारे कारखाने असून, यामुळे शहरात मोठ्या प्रमाणत प्रदूषण होते. शहराच्या चारही बाजूने या प्लास्टिक कचऱ्याचा विळखा वाढत आहे. त्यावर प्रक्रिया करताना होणाऱ्या वायू व जलप्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आगीच्या घटनेमुळे तर त्यात अधिकच भर पडत असून अनेक कारखाने नागरिक वस्त्यांना लागून असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. पालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाने अशा कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

कारखान्यांना नोटिसा

अग्निशामक विभागाकडून अशा बेकायदेशीर १०० कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पोलिस, महावितरण व पाणीपुरवठा विभागाला देखील याबाबत कळविण्यात आले आहे. संबंधित कारखान्यांना वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अग्निशामक अधिकारी संजय पवार यांनी दिली.

१६ कोटींचे नुकसान वाचवले

येथील अग्निशामक विभागाकडून शहर व परिसरातील आगीच्या घटनानंतर तत्काळ उपाययोजना करण्यात येते. गेल्या चार महिन्यात १७५ आगीच्या घटना घडल्या. यात २ कोटी ७० लाखांचे नुकसान झाले. तसेच वेळीच उपाययोजना केल्यामुळे १६ कोटी २५ लाखांची संपत्ती वाचविण्यात अग्निशामक दलास यश आले. यात सहा प्राण्यांचा देखील प्राण वाचविण्यात आला असल्याची माहिती अधिकारी पवार यांनी दिली.

शहर व तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर प्लास्टिक कारखान्यामुळे मोठे वायूप्रदूषण होत आहे. यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, घशाचा कर्करोग असे आजार होत आहेत. कारखान्यात प्रक्रिया न झालेला प्लास्टिक इतरत्र पसरत असल्याने नद्या प्रदूषित होत आहेत. यास महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे खुले अभय मिळाले असून, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. हे कारखाने शहराच्या बाहेर एमआयडीसीत स्थलांतरित करावित.---निखील पवार, सामाजिक कार्यकर्ते

४ महिन्यात १७५ आगीच्या घटना

२४ घटना प्लास्टिक कारखान्यांच्या

२ कोटी ७० लाखांचे नुकसान

१०० कारखान्यांना नोटीस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज्यराणी’ला डबे जोडण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला एक चेअरकार आणि पासधारकांसाठी एक असे दोन जादा डबे जोडावेत, त्याचप्रमाणे नाशिक शहराजवळ असलेल्या पाडळी स्थानकाचा विकास करावा, अशी मागणी इंटेग्रेटड पॅसेंजर असोसिएशनतर्फे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नाशिकवरून मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी, अधिकारी कामानिमित्त मुंबईला अप-डाऊन करीत असतात. त्यात पंचवटीने जाणारे प्रवासी अधिक आहेत. मात्र, पंचवटीला प्रशासकीय उदासीनतेमुळे कायमच उशीर होत असल्याने शासकीय कार्यालयांत जाणाऱ्यांचा कायमच लेटमार्क पडतो. पर्यायाने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. राज्यराणी गाडीला जादा डबे लावल्यास प्रवाशांची मोठी सोय होईल व जादा प्रवासी प्रवास करू शकतील. त्याचप्रमाणे नाशिक-इगतपुरीदरम्यान असलेल्या पाडळी स्थानकाचा विकास करून काही गाड्यांना या ठिकाणी थांबा देण्याचा विचार करावा. नाशिक-इगतपुरी महामार्गावर शहरापासून सुमारे २० ते २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाडळी या स्थानकाचा विकास करून त्या ठिकाणी भुसावळ विभागाच्या गाड्यांना थांबा दिल्यास नाशिककर रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. यामुळे दररोज आठ तास प्रवास करणाऱ्यांच्या प्रवाशांच्या वेळेत दोन ते अडीच तासांची बचत होऊ शकेल. नाशिकरोड ते पाडळी हे अंतर पंचवटी एक्स्प्रेससाठी ७.०५ ते ७.४० इतके आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी शहरातून केवळ २० ते २५ मिनिटे लागतात. म्हणजेच पंचवटी एक्स्प्रेस पकडण्यासाठी नाशिक शहरातून जाणाऱ्या प्रवाशांना सकाळी ६ ऐवजी ७ वाजता घराबाहेर पडणे शक्य होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोजमापावरून वादाने कर्मचाऱ्यांना पिटाळले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मिळकतीच्या मोजणीसाठी गेलेल्या महापालिकेच्या घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना मिळकतधारकांनी पिटाळून लावल्याचा प्रकार शुक्रवारी पंचवटीत घडला. महापालिकेच्या नवीन दराने घरपट्टी आकारणीच्या निर्णयाला शहरातील नागरिकांकडून तीव्र विरोध असतानाच महापालिकेने आता नव्या-जुन्या मिळकतींचे मोजमाप सुरू केले आहे. त्यामुळे करवाढीवरून चिडलेल्या नागरिकांच्या रोषाला महापालिका कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने मात्र असा प्रकार झाला नसल्याचा दावा केला आहे.

नवीन मिळकतीच्या करयोग्य मूल्य दरात पाच ते सहापटींपर्यंत वाढ करण्याच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयामुळे नाशिक शहरात आगडोंब उसळला आहे. केवळ मिळकतींच्याच नव्हे, तर मोकळ्या भूखंडांवर विशेषत: शेतजमिनींवरही मालमत्ता कर आकारण्याच्या मुंढे यांच्या निर्णयामुळे शहरातील नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात अन्याय निवारण कृती समितीच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभे राहिल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकजूट दाखवत ही अन्यायकारक करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रशासनाने आचारसंहिता भंगाचा बागुलबुवा निर्माण करीत कारवाईची भीती दाखविल्याने महापौरांनी महासभेचा ठराव अद्याप प्रशासनाला पाठविलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नाशिककरांवर करवाढीचे संकट कायम राहिले आहे. करवाढीचा वाद कायम असताना नवीन करवाढीनुसार घरपट्टी आकारणीसाठी प्रशासनाने मिळकतींची मोजणी सुरू केली आहे. त्यात जुन्या-नव्या मिळकतींचाही समावेश आहे. पंचवटीतील एका इमारतीच्या मोजणीसाठी शुक्रवारी महापालिकेच्या घरपट्टी विभागातील कर्मचारी गेले असता नवीन दर अमान्य असल्याचे सांगत या कर्मचाऱ्यांना संबंधित मिळकतधारकांनी पिटाळून लावल्याचा प्रकार घडला. यातून नवीन करवाढीविरोधात सर्वसामान्यांमधील संतापाची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे.

---

घरपट्टी आकारणीसाठी इमारतींची मोजणी करणे ही महापालिकेची नियमित प्रक्रिया असून, ती दर वर्षी सुरूच राहते. महापालिकेचे कर्मचारी या मोजणीसाठी गेले असावेत. मात्र, तेथे वाद झाल्याची माहिती आपल्याकडे नाही.

-रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त (कर), महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री स्वामी समर्थांचा जयघोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टची श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेचे यंदा २२ वे वर्ष असून, या पालखीचे शनिवारी नाशिकरोड येथे आगमन झाले. ही पालखी आज, रविवारी (दि. ६) शहरात दाखल होणार आहे.

जेलरोड येथील शिवाजीनगर समाजमंदिरात पालखीचे आगमन झाले असून, तेथे पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. आज, रविवारी सकाळी दहाला ही पालखी इंदिरानगर परिसरात विसावा घेईल. तेथे आशा नागरे यांच्या वतीने चहापान दिले जाणार आहे. दुपारी १२ वाजता ही पालखी भाभानगरमध्ये पोहोचेल. तेथे भारती कुक्कर यांच्या वतीने महाप्रसाद वाटप होईल. सायंकाळी सहाला शालिमार येथील नेहरू गार्डनपासून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. धुमाळ पॉइंट-मेनरोड-बोहरपट्टी-सराफ बाजार-जिजामाता चौक-दहीपूल असा पालखीचा मार्ग असून, तीळभांडेश्वर लेनमधील दुर्गा मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम राहणार आहे.

सोमवारी (दि. ७) सकाळी आठ वाजता तेथे लघुरुद्र पूजन होईल. दुपारी १२ ते ३ दरम्यान महाप्रसाद वाटप होईल. सायंकाळी सहा वाजता पालखी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, भांडीबाजार येथे मुक्कामी येणार असून, तेथे महाप्रसादाचे वाटप होणार आहे. मंगळवारी (दि. ८) सकाळी दहाला द्वारका, माणेकशानगर येथे राहुल जगताप यांच्याकडे महाप्रसाद वाटप होईल. सायंकाळी पाचला ही पालखी गंगापूररोडवरील पंपिंग स्टेशन परिसरात पोहोचेल. सुयोजित गार्डन, दत्त चौक येथे भाऊ महाराज खैरनार यांच्याकडे मुक्काम व महाप्रसाद राहणार आहे. बुधवारी (दि. ९) सकाळी दहाला रामवाडी येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात संतोष पोळ गुरुजी यांच्याकडे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी चारला तेथून पालखी मार्गस्थ होईल. पंचवटी कॉलेजवळ प्रवीण मुनोद यांच्याकडे रसपानाचा कार्यक्रम होईल. तेथून ही पालखी पिंपळगाव बसवंतकडे मार्गस्थ होईल, अशी माहिती मंडळाचे नाशिकचे विश्वस्त जगदीश पाटील, श्यामराव तांबोळी यांनी दिली. पालखी सोहळा यशस्वीतेसाठी नितीन दंडगव्हाळ, बळिराम चांडोले, शिवाजीराव अंडे, संदीप खैरनार, बाळासाहेब बत्तासे, पंकज चांडोले, प्रशांत गाडगीळ, किरण कापुरे, सागर तांबोळी, युवराज पाटील, आदिनाथ पाटील, श्रीरंग कुलकर्णी, मकरंद जोशी, पुरुषोत्तम कुलकर्णी, डॉ. प्रवीण कोडिलकर, राजेश शिंगणे, राकेश ठक्कर, संतोष पोळ, राहुल जगताप, गणेश खिरकाडे, मिलिंद खाडे, अभिजित तांबोळी, शंभूराज अंडे, श्रीकांत भामरे, राजू खरोटे, तेजस चांडोले आदी प्रयत्नशील आहेत.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात...सिंगल

$
0
0

सातपूरच्या रस्त्यांवर जनावरांचा ठिय्या (फोटो)

सातपूर : महापालिकेच्या सातपूर विभागाने रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे थेट जमा करून कोंडवाड्यात टाकली होती. परंतु, आजही असंख्य जनावरे रस्त्यांवर ठाण मांडत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. अशोकनगरला कॉलनीरोडवर वारंवार जनावरांकडून असा ठिय्या दिला जात असल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

चित्रपटनिर्मिती कार्यशाळा

पंचवटी : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखेतर्फे आज, रविवारी ( दि. ६) सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत चित्रपटनिर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पं. पलुस्कर सांस्कॄतिक भवन, इंद्रकुंड, पंचवटी येथे होणाऱ्या या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.

प्लास्टिक जप्ती मोहीम (फोटो)

सातपूर : सरकारने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. नाशिक शहरातदेखील महापालिकेच्या आरोग्य विभागाक़डून प्लास्टिकचा वापर टाळावा याकरिता जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, काही विक्रेत्यांकडून प्लास्टिकचा वापर केला जात असल्याने महापालिकेच्या सातपूर आरोग्य विभागाकडून जप्ती मोहीम राबविण्यातआली. मोहिमेत प्रभारी स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे, चिंतामण पवार यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

000

'शिखर स्वामिनी'तर्फे पोलिस कृतज्ञतादिन

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस जागरूक असणाऱ्या पोलिस बांधवांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या शुक्रवारी (दि. ११) नाशिकरोड व शहरातील पोलिस ठाण्यांना भेट देऊन पोलिस कृतज्ञता दिन साजरा केला जाणार आहे. शिखर स्वामिनी संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती नगरसेविका संगीता गायकवाड यांनी दिली. नागरिक आणि पोलिस यांच्यातील सुसंवाद वाढावा, शहरातील वातावरण सकारात्मक व्हावे, यासाठी हा उपक्रम होणार आहे.

---

खेळाडू, पालकांची आरोग्य तपासणी

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिकरोड येथील शैक्षणिक संकुलातील क्रीडा प्रबोधिनीतर्फे समर कॅम्पमध्ये सहभागी सर्व खेळाडु आणि त्यांच्या पालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने येथील श्रीमती र. ज. चौहान गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावर विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात १८५ खेळाडू सहभागी झाले होते. त्यात १०५ मुलींचाही सहभाग होता. या सर्व खेळाडू आणि त्यांच्या पालकांसाठी क्रीडा प्रबोधिनीतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. हर्बल लाइफ न्यूट्रिशनचे राहुल सदाशिव आणि सिद्धेश गामणे यांनी या खेळाडूंची आरोग्य तपासणी केली. खेळाडु व पालकांना त्यांच्या आरोग्य तपासणीचे रिपोर्टही शिबिरस्थळीच देण्यात आले. या शिबिराचे आयोजन क्रीडा प्रशिक्षक प्रद्युम्न जोशी, कैलास आरोटे, सुचेता रामराजे, जयश्री पाटील, ज्ञानेश्वरी सानप आदींनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साईनगर येथे नर्मदा महापुराण

$
0
0

साईनगर येथे नर्मदा महापुराण

पंचवटी -  साईनगर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण आणि नर्मदा महापुराण सुरू करण्यात आले आहे. नगरसेविका प्रियंका माने, रुची कुंभारकर, धनंजय माने, विलास कोरगावकर आदींच्या उपस्थितीत वीणापूजन, ग्रंथ पूजन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. नर्मदा परिक्रमा करणारे दशरथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होत आहेत. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय कीर्तन महोत्सवास सुरुवात

$
0
0

राष्ट्रीय कीर्तन महोत्सवास सुरुवात

१५ मेपर्यंत भाविकांची मांदियाळी

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पंचवीस वर्षांनंतर नाशिक शहरात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सव व संगीत रामायण कथेच्या कार्यक्रमाला शनिवारी (दि. ५) स्वामी सागरानंद महाराज सरस्वती यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सुरुवात करण्यात आली. हा महोत्सव मंगळवार (दि. १५) मेपर्यंत राजे संभाजी स्टेडियम येथे सुरू राहणार आहे.

विश्वशांती वैष्णव धर्मसोहळ्याअंतर्गत या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी शनिवारी, ध्वजारोहण, घटस्थापना व विणापूजन करण्यात आले. या वेळी ह. भ. प. शिवराम म्हसकर, आचार्य महामंडलेश्वर विठ्ठलनाथ द्वाराचार्य, डॉ. रामकृष्णदास लहवतीकर, गोविंद महाराज गोरे, संजय महाराज धोंगडे, आमदार सीमा हिरे, बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे, नगरसेविका कावेरी घुगे, गोकुळ घुगे, प्रज्ञा पाटील, रत्नाकर चुंबळे, राहुल साळुंखे, सुदाम कोंबडे आदींसह समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कीर्तन महोत्सवाच्या कार्यक्रमात दररोज पहाटे ५ ते ७ वाजेदरम्यान काकड भजन, सकाळी ८ ते १० वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते दुपारी १२ वाजेदरम्यान विविध शिबिरे होणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात संगीत रामकथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ८ ते ११ या वेळात कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राजे संभाजी स्टेडियम परिसरात मांडव उभारण्यात आला असून कार्यक्रमाच्या अखेरीस काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टिळकवाडीत सात लाखाची घरफोडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल सात लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना टिळकवाडी भागात घडली. त्यात दहा हजारांच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन सुकदेव शेळके (रा. शदिप सोसा. दौलत बंगल्यासमोर, टिळकवाडी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. १ ते ३ मे या कालावधीत शेळके कुटुंबी बाहेरगावी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच बेडरूममधील कपाटात ठेवलेले दागिने आणि रोकड असा सुमारे सहा लाख ९७ हजाराचा ऐवज चोरून पोबारा केला.

--

भाडेकरूस मारहाण

घरभाड्याच्या कारणातून भाडेकरूस तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना महात्मानगर भागात घडली. या प्रकरणी घरमालक दाम्पत्य सतीश सावंत, श्वेता सावंत यांच्यासह एजंट सचिन केल्हे आदींविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

जुगल कांतीलाल पटेल (२३ रा. तिलकरोड, घाटकोपर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पटेल आणि त्यांच्या भागीदार व्यावसायिकाने त्र्यंबकरोडवरील महात्मानगर भागातील शिवम अपार्टमेंटमधील सांवत दाम्पत्याच्या मालकीचा फ्लॅट भाडेतत्वावर घेतला आहे. त्याबाबत रितसर करारनामा करण्यात केला. या फ्लॅटमध्ये पटेल वास्तव्यास असताना शुक्रवारी सावंत दांम्पत्याने येवून पटेल आणि त्यांच्या भागीदाराशी दरमहा देण्यात येणाऱ्या घरभाड्याच्या कारणातून वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी एजंट केल्हे यानेही तुम्ही येथे कसे राहतात, तेच बघतो अशी धमकी देत पटेल यांना मारहाण केली. तसेच संशयितांनी दोघा भागिदाराना आपल्या घरात जाण्यास मज्जाव केला. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

--

दोघा भावांना मारहाण

मित्राचा पत्ता विचारणाऱ्या तिघांनी मिळून दोघा भावांना बेदम मारहाण केली. ही घटना इंदिरानगर भागात घडली असून, यात संशयितांनी दोघा भावांच्या डोक्यात बिअर बाटली फोडल्याने दोघे जखमी झाले. या प्रकरणी पंकज सोनवणे आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज चव्हाण (३२ रा. कृष्णकुंज अपार्ट. गोविंदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुरज आणि त्यांचा भाऊ अमेय हे दोघे गुरुवारी रात्री इंदिरानगर परिसरातील विश्वास बँकेसमोरून जात असतांना ही घटना घडली. पंकज सोनवणे आणि त्याच्या दोन साथिदारांनी चव्हाण बंधूचा रस्ता अडवून श्याम वानखेडे यास मारायचे आहे. त्याचा पत्ता सांग, अशी विचारणा केली. तसेच थेट हल्ला चढविला. या घटनेत दोघा भावांच्या डोक्यात बिअर बाटल्या फोडण्यात आल्याने दोघे जखमी झाले असून, या झटापटीत सुरज यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाइल गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

--

गोवंश प्राण्यांची सुटका

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या दोन गायींसह गोऱ्ह्याची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी आवेश इब्राहिम शेख (रा.नाईकवाडीपुरा) या संशयितास अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाईकवाडीपुरा भागातील अजमेरी मस्जीद पाठीमागे गोवंश जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकून बांधून ठेवलेल्या दोन गायींसह गोऱ्ह्याची सुटका केली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक लवांड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालढकलीमुळे रखडली ग्रामविद्युत व्यवस्थापक योजना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड 

ग्रामविद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी राज्य सरकारच्या ऊर्जा व ग्रामविकास विभागाने घेतला होता. मात्र, या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या नियमावलीवर ग्रामविकास विभाग व महावितरण कंपनी यांच्यात गेल्या वर्षभरात एकमत न झाल्याने हा महत्त्वाकांक्षी निर्णय बारगळल्यात जमा आहे.

या निर्णयानुसार नियुक्त करावयाच्या ग्रामविद्युत व्यवस्थापकपदाच्या सेवा-शर्तींच्या अटींवरील वाटाघाटी फिस्कटल्याने ही योजना जवळजवळ बासनात गुंडाळली गेली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात अवघ्या ५० ग्रामपंचायतींनी या योजनेला प्रतिसाद देत आपले प्रस्ताव पाठविले असून, हे सव प्रस्तावही महावितरणकडे धूळ खात पडले आहेत.

तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावात वीजपुरवठा व्यवस्थापनासाठी ग्रामविद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या ऊर्जा व ग्रामविकास विभागाने गेल्या वर्षी जाहीर केला होता. या निर्णयानुसार ग्रामविद्युत व्यवस्थापकपदाचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महावितरणने जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींना केले होते. मात्र, महावितरणच्या या आवाहनाला नाशिक परिमंडळातील नाशिकसह मालेगाव आणि अहमदनगर या तिन्हीही सर्कलमधून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षभरात अवघे ५० प्रस्ताव महावितरणकडे आले आहेत. मात्र, हे सर्व प्रस्ताव धूळ खात पडून आहेत.

तांत्रिक मुद्यांचा अडथळा

'एक गाव, एक ग्रामविद्युत व्यवस्थापक' या योजनेनुसार नेमल्या जाणाऱ्या ग्रामविद्युत व्यवस्थापकांचे प्रशिक्षण, वेतन, अपघात व विमा, नुकसानभरपाई या आणि आणखी काही मुद्द्यांवर ग्रामविकास विभाग व महावितरणमध्ये गेल्या वर्षभरात निर्माण झालेल्या वादावर एकमत होऊ शकलेले नाही. परिणामी ही योजना ठप्प पडली आहे. ग्रामविद्युत व्यवस्थापकाची नियुक्ती संबंधित ग्रामपंचायतीनेच करावयाची होती. असमाधानकारक काम किंवा काही अपरिहार्य कारणास्तव ग्रामविद्युत व्यवस्थापकाचे काम रद्द करण्याचे अधिकारही संबंधित ग्रामपंचायतींकडेच राहणार होते. महावितरणची 'फ्रँचाइजी' म्हणूनच संबंधित ग्रामपंचायती काम करणार होत्या व 'ग्रामविद्युत व्यवस्थापक' त्याचे प्रतिनिधित्व करणार होते. ग्रामविद्युत व्यवस्थापक निवडीचे निकष, निवड पद्धती, वेतन याबाबतची नियमावलीही राज्याच्या ग्रामविकास खात्याने वर्षभरापूर्वीच झालेल्या निर्णयानुसार जाहीर केली होती. मात्र, तरीही काही तांत्रिक मुद्द्यांवर गेल्या वर्षभरात एकमत न झाल्याने आजवर या योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.

लोगो : वर्षभरानंतर 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालक मंडळ बरखास्त करा

$
0
0

मालेगाव बाजार समितीविरोधात प्रहार संघटनेचे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील व्यापाऱ्यांनी तालुक्यातील पाचशेहून अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दोन कोटींहून अधिकची रक्कम थकवली आहे. याप्रकरणी सहकार विभागाकडून संचालक मंडळ बरखास्तीची नोटीस देखील बजावण्यात आली आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या नाकर्तेपणामुळेचे शेतकऱ्ंयावर ही वेळ आली असून, संचालक मंडळ बरखास्तीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले.

प्रहार संघटनेचे शेखर पगार, देवा पाटील आदींच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त होत आपल्या भावना व्यक्त केल्या. संचालक मंडळ, प्रशासन व व्यापाऱ्यांनी मिळून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी बाजार समिती दोषी आहे. भविष्यात देखील हेच संचालक मंडळ कारभार पाहत राहीले तर हे प्रकरण दाबून टाकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपनिबंधक यांनी तत्काळ संचालक मंडळ बरखास्तीची कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा शेतकरी मोठे आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे यांना देण्यात आले. शेतकऱ्यांची थकीत रक्कम संचालक मंडळाकडून वसूल करून शेतकऱ्यांना द्यावे, सहकार खात्याने राजकीय दबाव झुगारून संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात विलास गुडे, शिवाजी सूर्यवंशी, किरण गवळे, चंदू शेवाळे, कल्याण शेवाळे, निवृत्ती जाधव आदींसह प्रहार संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते .

नाशिक येथे बैठक

उपनिबंधकांच्या कार्यालयात प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आल्याने बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यांनतर उपनिबंधक कार्यालयाकडून आंदोलकांना पत्र देण्यात आले. १४ मे रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक येथे संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोपनीय अहवालासाठी फॉर्म उपलब्ध

$
0
0

गोपनीय अहवालासाठी फॉर्म उपलब्ध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने सुधारीत गोपनीय अहवाल नमुना उपलब्ध करून दिला असून, त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेने सर्व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. राज्यात अद्याप कोणत्याही जिल्ह्यात सुधारीत गोपनीय अहवालाचे फॉर्म उपलब्ध नसताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगली येथील शासकीय मुद्रणालयशी संपर्क साधून जिल्ह्यासाठी २० हजार गोपनीय अहवालाचे फॉर्म उपलब्ध करून घेतले. त्यानंतर हे फॉर्म अचूक भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात शनिवारी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सदरचे प्रशिक्षण दिले. सुधारीत शासन निर्देशानुसार तालुकास्तरावरील व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना गोपनीय अहवाल भरणेबाबत सविस्तर प्रशिक्षण देऊन तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून गोपनीय अहवाल भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोट

प्रशासकीय कामाकडे अधिक लक्ष दिले असून, जिल्हा कोणत्याही बाबतीत मागे राहू नये यासाठी विहीत कालमर्यादेत काम पूर्ण करण्याकडे भर दिला आहे. त्यानुसार आढावा बैठकींचे आयोजन करून सर्व प्रलंबित बाबींचा निपटारा करण्याचे नियोजन केले आहे.

डॉ. नरेश गिते, सीईओ, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीविक्रेत्यांच्या जागी जडीबुटीवाले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदाघाटावरील जुन्या भाजीबाजारात भाजीविक्रेत्यांना बसण्यास महापालिकेने मनाई केली आहे. ही जागा मोकळी करण्याच्या दृष्टीने येथील भाजीबाजार उठविण्यात आलेला असला, तरी जडीबुटीवाल्यांनी ही जागा व्यापली आहे.  त्यामुळे महापालिकेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची भावना परिसरातून व्यक्त केली जात आहे.

गोदाघाटावरील भाजीविक्रेत्यांसाठी गणेशवाडी येथे भाजीमार्केट बांधण्यात आलेले आहे. मात्र, या भाजीमार्केटविषयीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दुसरीकडे जुन्या भाजीबाजाराच्या मोकळ्या जागेपैकी काही जागेवर मात्र जडीबुटी विक्रेत्यांनी ठिय्या मांडला असून, दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतच आहे.

गोदाकाठाचे सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने जुन्या भाजीबाजाराची जागा मोकळी करण्यात आलेली आहे. सध्या या जागेतील काही भागात वाहने पार्क केली जात आहेत, तसेच बऱ्याचशा मोकळ्या जागेत भिकाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. दिवसा भिकाऱ्यांच्या पिशव्या, वस्तू आदी साहित्य या जागेवरच ठेवले जाते. रात्रीच्या वेळी या जागेचा झोपण्यासाठी वापर केला जात आहे. खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर त्याचा कचरा बहुतांश वेळा येथेच पडून राहतो. या भागात स्वच्छता ठेवली जात नाही. अशी अवस्था असलेल्या या जागेत सुलभ शौचालयाच्या पश्चिमेला असलेल्या जागेत जडीबुटीवाल्यांनी पाल टाकून त्यांच्याकडे असलेली जडीबुटी विक्रीसाठी ठेवली आहे. विविध प्रकारचे शंख, खेळणी यांचेही पाल टाकून पथारीवाले येथे गर्दी करू लागले आहेत. हा परिसर मोकळा ठेवायचा असेल, तर अशा पथारीवाल्यांचा या भागातील ठिय्या हटविला पाहिजे, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅरिकेड्सवरून जुंपली

$
0
0

बॅरिकेड्सवरून जुंपली

आक्रमक रिक्षाचालकांपुढे रेल्वे प्रशासनाची माघार; मध्यरात्रीचे नाट्य

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारातील रिक्षा स्टॅन्ड बॅरिकेड्स लावून ते बंद करणार नाही, असे स्पष्ट आश्वासन सायंकाळी सहा वाजेला देणाऱ्या रेल्वे प्रशासनाने रात्री दोन वाजता अचानक बॅरिकेड्स लावले. हे समजताच संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी सामूहिक आत्महत्येची धमकी देत प्रशासनाला हे बॅरिकेडस काढण्यास भाग पाडले.

नाशिकरोड स्थानकप्रमुख आर. के. कुठार, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण यांनी शुक्रवारी, रात्री अडीच वाजेला सुनील वाघ स्थापित नाशिकरोड रिक्षाचालक मालक युनियनचे अध्यक्ष किशोर खडताळे, अनिल शिंदे, मोहम्मद सय्यद, रमेश दाभाडे, रामा साळवे, दिनेश कंठक, संजय गांगुर्डे, अनिल पवार, राजू चंद्रमोरे, शिवा जाधव, चंद्रकांत गायकवाड, प्रकाश जगताप, मोती उबरानी यांच्याशी चर्चा केली. भुसावळच्या वरिष्ठांकडून बॅरिकेडिंगचे आदेश देण्यात आल्याने त्यांच्या आदेशांचे पालन करीत आम्ही बॅरिकेडिंग केल्याचे कुठार यांनी स्पष्ट केले. परंतु, रिक्षाचालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच हे बॅरिकेड्स काढण्यात आले.

'पोटावर पाय देऊ नये'

नाशिकरोड रेल्वे स्थानक आवारात दीडशे रिक्षाचालक ३५ वर्षांपासून रिक्षाचालक व्यवसाय करीत आहेत. स्थानकाबाहेर दोनशे रिक्षा व टॅक्सीचालक आहे. त्यामुळे व्यवसाय करणे अवघड झाले आहे. त्यातच स्थानकातून रिक्षाचालकांना हटवून 'ओला' आणि 'ऊबेर' या खासगी टॅक्सी कंपन्यांना जागा देण्याचे रेल्वेचा प्रस्ताव आहे. त्यातून रेल्वेला महसूल मिळणार असून, प्रवाशांना चांगली सेवा मिळणार असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी भुसावळ विभागाने टेंडर काढले होते. परंतु, रिक्षाचालकांना हे समजताच त्यांनी आक्रमक भूमिका घेत रेल्वेला माघार घ्यायला लावली. सिन्नर फाटा येथील प्लॅटफार्म चारवर मोठी जागा आहे. तेथे कंपन्यांना जागा द्यावी, आमच्या पोटावर पाय देऊ नये, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे.

खासदारांच्या आदेशाला केराची टोपली?

रिक्षाचालकांना प्रतिबंधासाठी स्थानक आवारात दोन महिन्यांपूर्वी बॅरिकेडस रेल्वेने लावली. शुक्रवारी, पुन्हा बॅरिकेड्स लावणार असल्याचे समजल्यावर रिक्षाचालक सायंकाळी स्थानकप्रमुख कुठार यांना भेटले. त्यांनी बॅरिकेडिंग करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, रात्री दोन वाजेनंतर बॅरिकेडिंग सुरू झाल्यावर किशोर खडताळे रिक्षाचालकांसह तेथे आले. रिक्षा स्टॅन्ड रेल्वेच्या मालकीचा असला तरी तेथे रिक्षाचालकांशी चर्चा केल्याशिवाय खिळाही ठोकायचा नाही, असे खासदार गोडसेंसमेवत झालेल्या बैठकीत ठरले होते. मग बॅरिकेड्स कशाला लावतात, खासदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवता का, असा सवाल करून रिक्षाचालकांनी प्रखर विरोध केला. सर्वांनी सामूहिक आत्महत्येची धमकी दिल्यावर प्रशासनाने हे बॅरिकेड्स काढले.

रेल्वेच्या विनंतीला मान देऊन कुंभमेळ्यात आम्ही महिनाभर धंदा बंद ठेवून तोटा सहन करतो. साधूसंताना मोफत सेवा देतो. रुळावरील मृतदेह उचलतो. स्थानकात बाळंत झालेल्या महिलेला, रेल्वेतून पडलेल्यांना तसेच रुग्ण प्रवाशांना आम्ही रुग्णालयात नेले आहे. आमचे सहकार्य असताना रेल्वेने आम्हाला हटवू नये.

-किशोर खडताळे, रेल्वे युनियन अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांचे डांबरीकरण १५ मेपासून

$
0
0

देवळालीत भूमिगत गटारींच्या कामांना प्राधान्य

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली शहरात सुरू असलेल्या  भूमिगत गटारींच्या  कामामुळे रस्त्यांची संपूर्णपणे वाताहत झाली आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत या गटारींची जोडणी करण्यात येऊन  खोदलेल्या सर्व ठिकाणी डांबरीकरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक भगवान कटारिया यांनी दिली आहे.

 देवळालीत खासदार निधीतून भूमिगत गटारींचे  काम  सुरू असून, यामुळे शहरांतर्गत असलेले सर्व रस्ते खोदण्यात आल्याने रस्ते वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत आहे. गेल्या दीड वर्षांपासून या समस्येने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यांनी याबाबत लोकप्रतिनिधींनाही सांगितले. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी याबाबत आगामी पावसाळा लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून  कॅन्टोन्मेंट प्रशासनाला रस्ते सुधारित करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार येत्या १५ मे पासून या रस्त्यांची डांबरीकरणाची कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित ठेकेदारामार्फत देण्यात आली आहे. यामध्ये ज्या-ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहे तेवढाच परिसर डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील हौसन रोड, मिठाई स्ट्रिट, महालक्ष्मी मंदिर, शिंगवे बहुला मुख्य रस्ता, दस्तगीर बाबा रोड,मेन स्ट्रिट, नूर व्हिला परिसर आदी भागात मुख्य गटारींची जोडणी करण्याचे काम सुरू आहे.   

पाईप टाकण्याचे काम सुरू 

देवळालीच्या गटारी या रस्त्यांच्या मधून टाकण्यात आल्या होत्या. यामुळे रहिवाशांच्या घरातून येणारे दूषित पाणी सोडण्यासाठीचे साईड चेंबर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी पॉलीथिलॅन या डबल वॉल कॅरोगटेड  टेक्नॉलॉजी असलेल्या ६ इंच पाईपचा वापर करण्यात आला आहे. याद्वारे मुख्य गटारवाहिनीला पाईप जोडण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही ठेकेदाराने सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थानिक पातळीवर निर्णय घ्या!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याच्या सहा विधान परिषद निवडणुकीत पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात तीन मतदारसंघात आमचे संख्याबळ जास्त असल्यामुळे आम्ही उमेदवार दिले आहेत. या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपले संबंध, मैत्री व ऋणानूबंध बघून मतदारांशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ज्या तीन मतदारसंघात आमचे उमेदवार नाहीत. त्या ठिकाणी परिस्थिती बघून शिवसेनेच्या स्थानिक स्वराज्य पदाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीसाठी रविवारी (दि. ६) उद्धव ठाकरे नाशिकला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीत भाजप सोबत युती आहे का, या प्रश्नाला थेट उत्तर न देता शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर आम्ही युती करणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आमची भाजपबरोबर अगोदर युती आहे. त्या ठिकाणी आम्ही शब्द पाळणार असल्याचेही ते म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत शिवेसना व भाजपची युती झाल्याची चर्चा असली तरी ती अधिकृत जाहीर न केल्यामुळे संभ्रम निर्माण झालेला असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा नाही

आगामी निवडणुकीत आम्ही भाजपबरोबर युती करणार नसल्याचे जाहीर झाल्यानंतर एकमेकांविरुद्ध असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. आमची आता युती नसणार असल्याचे स्पष्ट दिसू लागल्यानंतर त्यांना आनंद झाला. मात्र जनतेने त्यांचा १५ वर्षांचा कारभार बघितला आहे. त्यामुळे त्यांना त्याचा कोणताही फायदा होणार नाही, असेही ते म्हणाले.

भुजबळ, खडसेंबाबत 'नो कॉमेंटस'

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला. तर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना एसीबीने क्लीन चिट दिली. त्यावर उद्धव ठाकरे यांना शिवसेनेची प्रतिक्रिया विचारल्यानंतर यावर बोलणे टाळले. या वेळी त्यांनी फक्त जे आहे ते जनतेच्या समोर असल्याचे सांगत अधिक वक्तव्य केले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुसज्ज अभ्यासिकेने दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

  देवळाली कॅम्प परिसरातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या   वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वरूपाची  अभ्यासिका कॅन्टोन्मेंट बोर्डाने सुरू केली आहे. कॅम्पसह परिसरातील ग्रामीण भागात ही एकमेव अभ्यासिका  उपलब्ध  झाल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी या सुसज्ज अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत.

​वडनेररोडवर  वॉर्ड क्रमांक २३ मध्ये नगरसेवक सचिन ठाकरे व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांनी ६५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्यावर वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अभ्यासिका सुरू झाली.  देवळालीसह ग्रामीण भागातील १०० मुले व ४० मुली या अत्यल्प दरातील अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत ​. येथे १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून, पुरेसे टेबल, खुर्च्या, कपाटे, पडदे, मुला-­मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आदी सुविधाही उपलब्ध आहेत.  बोर्डातर्फे दिवसातून दोन वेळा येथे स्वच्छता केली जाते. पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र फिल्टरची सुविधा आहे.  विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेबाहेर जेवणास बसण्यासाठीही सोय करण्यात आलेली आहे.

वायफाय सुविधेचे नियोजन

तीन  वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार येथे रुजू झाले तेव्हा केवळ अभ्यासिकेचा मजला  बांधून तयार होता.  मात्र, तेथे बसण्यासाठी ना खुर्च्या ना टेबल होते. अशा  सुविधांची वानवा असताना बोर्डाच्या बैठकीत  या भागाचे  नगरसेवक व तत्कालीन उपाध्यक्ष  सचिन ठाकरे  यांनी पवार यांच्याशी चर्चा करीत सर्व सुविधांयुक्त अभ्यासिका उभारून फेब्रुवारी २०१६ मध्ये तिचे लोकार्पण केले. येथे लवकरच विद्यार्थ्यांसाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आपण रुजू होतानाच शहरातील आरोग्य व शैक्षणिक सेवांसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या अभ्यासिकेलाही प्रधान्य राहील.

-अजय कुमार , सीईओ, कॅन्टोन्मेंट बोर्ड

येथे वायफाय सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, जेणेकरून संदर्भ शोधणे सहज व सोपे होणार आहे. स्पर्धा परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरणेही सुकर होईल.

-स्वप्निल गायकवाड, विद्यार्थी 

अभ्यासिकेचा परिसर शांत असल्याने येथे कुठलाही त्रास जाणवत नाही. शिवाय परिसरात झाडे असल्याने गारवाही चांगला राहतो. त्यामुळे अभ्यासाला प्रेरणा मिळते.

-प्रिया  कापसे, विद्यार्थिनी 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी धावाधाव...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

लोकवस्तीचा विस्तार होत असलेल्या हिरावाडीसारख्या भागात माजी नगरसेवक राजेंद्र नवले यांच्या संकल्पनेतून नवरंग सार्वजनिक वाचनालयांतर्गत लोकनेते डॉ. दौलतराव आहेर अभ्यासिका सुरू करण्यात आली. दाट लोकवस्तीच्या भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एकांत मिळण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासिकेत सुविधा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी येथे भर उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्थाच नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.

या अभ्यासिकेत सकाळपासून सायंकाळपर्यंत अभ्यासासाठी येऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांना घरून येताना आणलेले बाटल्यांमधील पाणी पुरेसे ठरत नसल्यामुळे त्यांच्यावर पाण्याची इतरत्र शोधाशोध करण्याची वेळ आली आहे. नवरंग वाचनालयात पिण्याच्या पाण्यासाठी माठ ठेवण्यात आलेला आहे. मात्र, वाचनालयाची वेळ मर्यादित असल्यामुळे वाचनालय बंद झाल्यानंतर तेथील पिण्याचे पाणी मिळत नाही. ही वेळ नेमकी दुपारची भर उन्हाची असते. या वेळेत तहान जास्त प्रमाणात लागत असल्यामुळे पाण्याची कमतरता भासते. घरून येताना पाण्याच्या बाटल्या भरून आणल्या, तरी त्या कमी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना परिसरात शोधाशोध करून पाणी आणावे लागते. रोज पाणी मिळतेच असे नाही. त्यामुळे अभ्यासिकेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था माठ, पाण्याचे जार किंवा कूलर बसून करावी अशी मागणी होत आहे.

नवरंग सार्वजनिक वाचनालयाच्या जागेत ही अभ्यासिका सुरू करण्यात आलेली आहे. अभ्यासिकेच्या पश्चिमेला छोटेसे उद्यान, मंदिर आणि पूर्वेला वाहन पार्क करण्याची जागा आहे. इमारतीच्या भोवती संरक्षक जाळी आहे. तळमजल्याच्या भागात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावरही व्यवस्था आहे. सर्वच भागात साधारणतः ७५ विद्यार्थी बसू शकतील अशी व्यवस्था आहे. क्षमता शंभरपेक्षा कमी असली, तरी त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या अभ्यासिकेत प्रवेश देण्यात आलेला आहे. शिफ्टनुसार अभ्यासिकेचा वापर करावा, असाही विचार विद्यार्थ्यांपुढे मांडण्यात आला होता. तो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपुरता ठीक आहे. मात्र, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत त्यांना शिफ्टनुसार अभ्यासिकेचा वापर करणे सोयीचे ठरणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

स्वच्छतागृहात अस्वच्छता

अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था असली, तरी तेथील स्वच्छतेच्या बाबतीत फारशी काळजी घेतली जात नाही. विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर येथील स्वच्छता केली जाते. येथे स्वच्छता नियमितपणे करणे गरजेचे आहे. रात्री दहा वाजता अभ्यासिका बंद केली जाते. त्यावेळी बाहेरील दिवेही बंद केली जातात. त्यामुळे बाहेर अंधार पडतो. येथे पथदीप बंद असल्यामुळे या अंधाराचा विद्यार्थ्यांना त्रास होतो. येथील पथदीप सुरू करण्यात यावे. एलईडी दिवे लावण्यात यावेत, अशीही मागणी होत आहे.

पंख्यांची संख्या अपुरी

हिरावाडीसह पंचवटीतील आठ ते दहा किलोमीटरच्या परिसरातून विद्यार्थी या अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी येतात. दहावीच्या विद्यार्थ्यांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी येथे अभ्यास करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारच्या वेळी वाढणाऱ्या उन्हामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उष्णतेचाही त्रास सहन करावा लागत आहे. येथे पंख्यांची व्यवस्था असली, तरी ती उन्हाळ्याच्या काळात ती अपुरी पडत असल्याने उन्हाचा त्रास जाणवत असल्याचे विद्यार्थी सांगतात.

हिरावाडीतील मोकळ्या जागेत शांत वातावरणात असलेल्या या अभ्यासिकेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

-राहुल देसले, विद्यार्थी

...

या अभ्यासिकेत पंख्यांची संख्या कमी असल्यामुळे उन्हाळ्यात त्रास होते. ही संख्या वाढविण्यात यावी. वॉशरुमची स्वच्छता नियमित होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरते. अभ्यासिका बंद केल्यानंतर बाहेरचे दिवेदेखील बंद होतात. या परिसरातील पथदीप सुरू केल्यास ही समस्या दूर होईल.

-जयदीप फुंदे, विद्यार्थी  

----

मटा मालिका

'परीक्षा' अभ्यासिकांची

डॉ. दौलतराव आहेर अभ्यासिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कौशल्य विकासाद्वारे मिटवावेत कौटुंबिक वाद’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शब्दांचा योग्य अर्थ काढण्याचे आणि वाद हाताळण्याचे कौशल्य जाणीवपूर्वक विकसित केल्यास कौटुंबिक स्तरांवरील वाद-विवाद मिटवता येऊ शकतात, असे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीष सुळे यांनी येथे केले.

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिकरोड येथील कौटुंबिक न्यायालयात शनिवारी मध्यस्थी जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित पक्षकार आणि त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करताना डॉ. सुळे बोलत होते. सुसंवादाचे महत्त्व त्यांनी याप्रसंगी सोदाहरण स्पष्ट केले. बोलण्यातील आरोह-अवरोह वाद निर्माण होण्यास कसा कारणीभूत असतो, याविषयीदेखील त्यांनी माहिती दिली. एकतर्फी संवादाला फाटा देण्याचाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

कौटुंबिक कलहामुळे मानसिक आजार जडणे, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडणे अशा प्रकारचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. काही बाबींत तडजोडीचा मार्ग अवलंबल्यास नाती टिकण्यास हातभार लागू शकतो, असे प्रतिपादन नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश कविता ठाकूर यांनी केले. डॉ. ऋचा सुळे यांनीही यावेळी स्लाइड शोद्वारे कौटुंबिक कलहामुळे मनुष्य जीवनावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करून सांगितले. या कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांतील पक्षकार, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. समुपदेशक नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. शिरीष पाटील यांनी आभार मानले.

मध्यस्थांमार्फत मिटवावा दावा

कौटुंबिक स्तरावरील विवाद सुसंवादाने कुटुंब अथवा न्यायालयीन स्तरावर सामोपचाराने मिटविल्यास पक्षकारांचा वेळ व खर्चात बचत होते, पक्षकारांना स्वमताने निर्णय घेता येतो, दोन्ही पक्षकार दावा जिंकल्याचा फायदा होतो, असे मत या प्रसंगी ॲड. अजित छल्लाणी यांनी व्यक्त करून मध्यस्थांमार्फत दावा मिटविण्याचे आवाहन केले.

-------------------

दहशतीला आळा बसण्यास सुरुवात

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शहरातील सर्वाधिक संवेदनशील व गुन्हेगारीत अग्रेसर म्हणून ओळख असलेल्या अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टिप्पर गँगवर झालेल्या कारवाईनंतर आता परिसरात दहशत निर्माण करून खंडणी मागणाऱ्या प्रणव बोरसे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर सिडकोतील गुन्हेगारीला आळा बसण्यास सुरुवात झाल्याची चर्चा परिसरात होत आहे.

सिडको परिसरात काही वर्षांपूर्वी टिप्पर गँगची दहशत निर्माण झाली होती. दिवसाढवळ्या हाणामाऱ्या, खंडणी मागणे, गाड्या जाळणे यांसारखे प्रकार या गँगकडून सुरू होते. शुभम पार्क येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात एक कोटीची लूट केल्यानंतर पोलिसांनी तपास करून या गँगच्या सर्वच सदस्यांना जेरबंद केले होते. त्यामुळे सिडकोतील गुन्हेगारीला काही प्रमाणात अटकाव निर्माण झाल्याचे दिसत होते. मात्र, या गँगव्यतिरिक्‍तही काही गुन्हेगार परिसरात सर्रासपणे फिरत असल्याने गुन्हेगारी कमी होत नसल्याचे दिसत होते. त्यातील प्रणव बोरसे याची दहशत सिडको परिसरात विशेषतः कामटवाडे, डीजीपनगर या भागात निर्माण होत असल्याचे दिसत होते. बोरसे याचेवर अंबड पोलिस ठाण्यात सुमारे ३६ गुन्हे दाखल असून, त्यात खंडणी मागण्याचे प्रकार सर्वाधिक होते. एका गुन्ह्यात जेलमध्ये असताना बोरसे याने डीजीपीनगर परिसरातील एका डॉक्‍टरकडेसुद्धा खंडणी मागितल्याचा गुन्हा अंबड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला हेाता. त्याचबरोबर या परिसरातील एका पेट्रोलपंपावर, एका हॉस्पिटलमध्ये त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागितल्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत. पूर्वी मनसेत असलेले व सध्या भाजपावासीय झालेल्या एका राजकीय नेत्याकडेसुद्धा त्याने खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असतानाही नगरसेवक दिलीप दातीर यांच्यावर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी त्याला शिक्षा झाली आहे. सिडकोतील दहशतीला या निकालामुळे आळा बसणार असल्याची चर्चा परिसरात होत आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सिडकोतील गुन्हेगारी कमी होत असली, तरी अजूनही सिडकोत तयार होत असलेल्या लहान-मोठ्या गँगवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा : विद्यार्थी अन् पालकांचीही...

$
0
0

नाशिकमधील वीस परीक्षा केंद्रांवर रविवारी हजारो विद्यार्थ्यांनी 'नीट' परीक्षा दिली. या परीक्षेसाठी शहर आणि जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यांमधूनही विद्यार्थी व पालक नाशिकमध्ये आले होते. परीक्षा केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी होती. सीबीएसईच्या सूचनांनुसार परीक्षा केंद्रांच्या बाहेरच परीक्षार्थींना नियमबाह्य वस्तू सोडाव्या लागल्या. यावेळी परीक्षा केंद्रांच्या परिसरात सॅक, स्कार्फ आणि इतर वस्तूंचे ढीग जमा झाले होते. परीक्षार्थींसोबत असलेल्या पालकांनी परीक्षा केंद्राच्या आवारात उन्हाच्या तडाख्यात तीन तास कसेबसे काढले. अनेकांनी सावलीचा आश्रय घेतला असला, तरीही पालकांचीही उन्हाच्या काहिलीने चांगलीच दमछाक झाली. परीक्षार्थींच्या उपस्थितीमुळे शहरातील अनेक रस्त्यांवर दुपारी एकच्या सुमारास काही वेळ वाहतूक कोंडीही झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images