Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आजचा दिवस माघारीचा

$
0
0

अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांच्या भूमिकेकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांना माघारीसाठी सोमवार (दि. ७ मे) पर्यंत मुदत देण्यात आली आहे. छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात पाच उमेदवार असून, माघारीनंतर कितीजण उमेदवारीवर ठाम राहतात याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, त्यावरच ही लढत दुरंगी होणार की तिरंगी हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

विधान परिषदेचे आमदार जयवंत जाधव यांच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजी सहाणे यांनी तर शिवसेनेच्यावतीने येवल्यातील नरेंद्र दराडे यांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा आखाडा अधिक तापण्याची शक्यता आहे.

निवडणुकीपूर्वीच अर्ज छाननी प्रक्रियेत सहाणे यांनी दराडे यांना धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला. परंतु, छाननीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडींनंतर दराडे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडून वैध ठरविण्यात आला. परिणामी, निवडणुकीपूर्वीच दराडे यांना गारद करण्याचा सहाणे यांचा मनसुबा धुळीस मिळाला. त्यामुळे दराडे आणि सहाणे यांच्यामध्ये 'कांटे की टक्कर' होणार हे उघड असले तरी परवेज मोहम्मद युसुफ कोकणी यांनीही अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने तिरंगी लढत होण्याचीदेखील शक्यता आहे.

आज दुपारनंतर चित्र स्पष्ट होणार

कोकणी यांनी अपक्ष अर्ज भरला असला तरी त्यांचे भाजपमधील नेत्यांशी घनिष्ट संबंध आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी सर्वपक्षीयांशी सलोखा निर्माण केला आहे. कोकणी यांनी माघार घेतली तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्येच आमदारकीसाठी रस्सीखेच होईल. परंतु, कोकणी यांनी निवडणुकीतील आपले आव्हान कायम ठेवले तर मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा नेमका कोणाला मिळतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कोकणी यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न होऊ शकतात. परंतु, कोकणी बॅकफुटवर येणार की निवडणुकीत दंड थोपटून प्रचाराला लागणार हे आज स्पष्ट होणार आहे. याखेरीज छाननीत देवळा येथील अशोक देवराम आहेर आणि नाशिक तालुक्यातील लहवित येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण गायकवाड यांचेही अर्ज वैध ठरले असून, तेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ६४४ मतदार या निवडणुकीमध्ये पसंती क्रमानुसार मतदान करू शकणार आहेत. त्यामुळे एकेका मतासाठी उमेदवारांना कडवी झुंज द्यावी लागणार असून, आज दुपारनंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोड वसंत व्याख्यानमाला

$
0
0

वसंत व्याख्यानमाला : नाशिकरोड

निरोगी दिर्घायुषाचे उलगडले रहस्य

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जगाला आनंद द्या, तुम्हाला आनंद मिळेल. चांगले विचार करा. विचारांमध्ये देव असतो. अपेक्षा कमी करा. सतत हसतमुख रहा. निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालल्यास दीर्घायुषी व्हाल, असे प्रतिपादन कोल्हापूरचे डॉ. स्वागत तोडकेर यांनी केले.

नाशिकरोड बँकेच्या वसंत व्याख्यानमालेत तोडकर यांनी घरगुती उपचारांवर पाचवे पुष्प गुंफले. तोंडात कोमट पाणी ठेवून आंघोळ केल्यास थायरॉईड तर गाजराचा रस १५ दिवस घेतल्यास कॅन्सर बरा होतो. सकाळ-सायंकाळी लसनाची पाकळी खाल्यास हृदयविकार दूर होतो. सडपातळ होण्यासाठी मीठपाण्याने आंघोळ करा. खसखस-खडीसाखर तीन दिवस एक चमचा दिवसातून पाचवेळा घेतल्यास गुडघे व कंबर दुखी थांबते. थंड दूधाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यास नेत्रविकार दूर होतात, अशा टिप्स डॉ. तोडकर यांनी दिल्या. तसेच रोज ताक प्यायल्यास मन शांत होते. चेहऱ्याचे तेज वाढते. कॅलशियम वाढविण्यासाठी पालक सूप प्यावे. पिताशयातील खडे काढण्यासाठी तीन दिवस कारले रसाचे पाच चमचे प्या. त्यावर कोमट पाणी प्या. कडूलिंब रस १५ दिवस घेतल्यास शरीरातील जंतू गायब होतात. घोरणे थांबविण्यासाठी तूप कोमट करुन नाकात दोन थेंब टाका. रोज आंबा पान खाल्यास पोटविकार दूर होतात. उष्णता घालविण्यासाठी उंबराच्या पानांचा रस घ्या. पिंपळ पान रस १५ दिवस घेतल्यास गर्भाशयातील गाठी नाहीशा होतात. तुळस पान चेचून लेप लावा, सुंदर व्हाल. शरीर व स्नायू मजबूतीसाठी सीताफळ खा, असे सल्लेही त्यांनी दिले.

सकाळी चालण्यामुळे श्वसनाचे विकार दूर होतात. रक्त पातळ होते. दूध, दही, ताक रात्री टाळल्यास वातविकार होत नाहीत. तीन ते चार मोरावळे दहा मिनीटे उकळून ते पाणी लावल्यास केस गळती थांबते. रात्री जेवण कमी करुन गाजर, काकडी खाल्यास पोटाचे विकार कमी होतात. डोके दुखी थांबण्यासाठी चिमुटभर मीठ अर्धा मिनीट जिभवर ठेवून ग्लासभर पाणी प्यावे. आघाडाचे तुरे मीठाच्या पाण्याने धुवावेत. दोन वाटी पाण्यात उकळून गाळू सलग पंधरा दिवस प्यावे. तीन वर्षे असे केल्यास वय दहा वर्षांनी कमी दिसते, असेही डॉ. तोडकर यांनी सांगितले.

..

सयाजीराव हे युगपुरुष

जेलरोड : भारतात जातीपातीचे राजकारण प्रचंड वाढले आहे. अशावेळी लोककल्याणकारी काम करणाऱ्या माणसांची तीव्र गरज आहे. असे व्यक्तिमत्व लाभलेले महाराज सयाजीराव गायकवाड काळाच्याही पुढे पाहण्याची दृष्टी असणारे युगपुरुष होते. जात-धर्म-पैशापेक्षा माणूसच महत्त्वाचा आहे, एकमेकांशी बंधूभावाने वागावे, असा त्यांचा संदेश होता. त्यांचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल केल्यास समृद्धी व शांती नांदेल, असे प्रतिपादन साहित्यिक बाबा भांड यांनी केले.

नाशिकरोड देवळाली बँकेच्या वसंत व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना ते बोलत होते. 'सयाजीराव गायकवाड-नवभारताचे निर्माते' हा त्यांचा विषय होता. सुजाता हिंगे अध्यक्षस्थानी होत्या. भांड म्हणाले, की सयाजीराव गायकवाड यांनी सतत प्रजाकल्याणाचा व समाजसुधारणेचा ध्यास घेतला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याबाबत म्हटले आहे की, सयाजीरावांनी केलेले कायदे हे त्या काळात युरोप, अमेरिकेपेक्षाही प्रगत होते. तर महात्मा गांधींनी सयाजीरावांबाबत म्हटले आहे की, अस्पृश्यांसाठी शिक्षणाचा तसेच अस्पृश्यता दूर करणारा कायदा करणारे सयाजीराव हे पहिले व्यक्तिमत्व होते. शेती, उद्योग, संस्कृती, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात सयाजीरावांचे योगदान उल्लेखनीय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फिजिक्स’ ने मारले, ‘बायो’ ने तारले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सीबीएसईच्या वतीने वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली 'नीट' (नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) शहरातील केंद्रांवर सुरळीत पार पडली. शहरातील २० केंद्रांवर या परीक्षेसाठी परीक्षार्थी व पालकांची सकाळपासूनच लगबग पहायला मिळाली. या परीक्षेत 'फिजिक्स' विषयाचा काठिण्यस्तर जास्त होता, तर बायोलॉजीची प्रश्नपत्रिका या तुलनेत सोपी असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

गेल्या वर्षी शहरात 'नीट' परीक्षेच्या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी सूचनांचे पालन न केल्याने बराच गोंधळ उडाला होता. पण जुन्या अनुभवातून धडा घेत यंदा या नियमावलीविषयी झालेली जागरुकता आणि विद्यार्थ्यांनी केलेले सूचनांचे काटेकोर पालन यामुळे शहरात 'नीट' परीक्षा सुरळीत पार पडली. उत्तर महाराष्ट्रात या परीक्षेसाठी नाशिकसह नगर आणि जळगाव या शहरांमध्ये केंद्रांची व्यवस्था होती. नाशिक विभागातून सुमारे १२ हजारांवर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी रविवारी सकाळी ७.३० वाजेपासून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येत होता. सकाळी ९.३० नंतर परीक्षा केंद्रातील प्रवेश थांबविण्यात आले. केंद्रात प्रवेश करताना नियमावलीनुसार विद्यार्थ्यांना जवळचे अतिरिक्त साहित्य केंद्राबाहेरच जमा करावे लागले. याशिवाय कपडे आणि दागदागिन्यांचे निकषही कसोशीने तपासले गेले. परीक्षार्थी परीक्षागृहात गेल्यानंतर पालकांनी केंद्राच्या परिसरातील सावलीत आश्रय घेतला.

\Bफिजिक्स कठीण

\Bनीट प्रवेश परीक्षेसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन विषय होते. यात फिजिक्स व केमिस्ट्री या विषयांवर प्रत्येकी ४५ आणि बायोलॉजी या विषयावर ९० बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले. तीनही विषयांचे १८० प्रश्न मिळून एकूण ७२० गुणांसाठी परीक्षा घेण्यात आली. निगेटिव्ह मार्किंग लागू होती. चुकीच्या एका उत्तरास एक गुण वजा केला जाणार आहे. केमिस्ट्रीचा काठिण्यस्तर मध्यम तर बायोलॉजीचा कमी होता. फिजिक्सच्या पेपरला गणिती कॅल्क्युलेशन्सला विद्यार्थ्यांना वेळ पुरला नसल्याच्या प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी दिल्या. जे विद्यार्थी मूळ सीबीएसई बोर्डातून होते त्यांना तुलनेने ही परीक्षा सोपी गेली. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमाचा संदर्भ घेणाऱ्यांना परीक्षेत फायदा झाला.

यंदाच्या 'नीट' च्या प्रश्नपत्रिकेत फिजिक्सचा पेपर विद्यार्थ्यांना आव्हानात्मक वाटला. यातील समीकरणे सोडविताना वेळेशी स्पर्धा करावी लागली. या तुलनेत बायोलॉजी पेपरबाबत विद्यार्थी समाधानी आहेत. यंदा वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांमध्येही भर पडल्याने 'कट ऑफ' घटण्याची शक्यता आहे.

- अमित ओक, 'नीट' मार्गदर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर बोलण्यास नकार

$
0
0

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर बोलण्यास नकार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर मिळाल्यानंतर ते राष्ट्रवादीला रामराम ठोकून पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील, या चर्चेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलण्यास नकार दिला. अजून त्यावर मत व्यक्त करत नाही, असे सांगत त्यांनी पत्रकारांनी विचारलेला हा प्रश्न टोलवला.

नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील लोकसभानिहाय आढावा बैठकीसाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत ते भुजबळांच्या विषयावर काही बोलतील ही सर्वांची अपेक्षा होती. पण, त्यांनी या विषयावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. विधान परिषदेची निवडणूक सुरू असताना शिवसेनेपुढे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आव्हान तयार केले आहे. त्यात या निवडणुकीवर जामीन मिळाल्यामुळे भुजबळ इम्पॅक्ट होऊ शकतो असेही बोलले जात आहे. पण, या विषयावर सावध प्रतिक्रिया देऊन ठाकरे यांनी गुढही वाढवले. शिवसेनेत पुन्हा घेणार नाही असेही ते बोलले नाही. त्यावर मत व्यक्त करत नाही, असे सांगून त्यांनी प्रश्न टोलवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडगाव जलकुंभाजवळ पाण्याचा अपव्यय सुरूच

$
0
0

आडगाव जलकुंभाजवळ पाण्याचा अपव्यय सुरूच (फोटो)

पंचवटी : उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची कमतरता भासत असतानाच आडगाव जलकुंभाजवळ जलवाहिनीला गळती लागली असल्याने तेथून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील गळतीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येऊन ते अर्धवट सोडून देण्यात आल्यामुळे पाणी दूरवर वाहून जात आहे. येथील पाणीगळती रोखण्यासाठी जलवाहिनी दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

--

सुविधांची मागणी

जेलरोड : दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या नाशिकरोड बसस्थानकात पिण्याचे पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनाही पाणी मिळत नाही. त्यांना रेल्वेस्थानकाचा आधार घ्यावा लागतो. बसस्थानकात प्रवाशांसाठी स्वच्छतागृह व शौचालयदेखील नाही. पोलिस चौकीशेजारी सुलभ शौचालय आहे. तेथे पैसे मोजून प्रवाशांना गरज भागवावी लागते. एसटी प्रशासनाने येथे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची सोय करावी, अशी मागणी होत आहे.

---

स्वच्छतागृहांची दुरवस्था (फोटो)

देवळाली कॅम्प : येथील रेस्ट कॅम्प रोडवरील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. येथील देवी मंदिर परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या स्वच्छतागृहांमधून मलमूत्र जाण्यासाठी कोणतीही सोय करण्यात आलेली नसल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या काही स्वच्छतागृहांचे पाइप चुकीच्या पद्धतीने गटारींमध्ये सोडून देण्यात आलेले आहेत.

--

पवारांच्या उपस्थितीत मेळावा

जेलरोड : छत्रपती संभाजीराजे जयंतीनिमित्त जेलरोड येथे येत्या १४ तारखेला सायंकाळी सहा वाजता सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. जेलरोड येथील छत्रपती शिवाजी पुतळ्यामागील संत ज्ञानेश्वर मंदिराच्या मैदानावर हा कार्यक्रम होईल. सरचिटणीस योगेश निसाळ, नाशिकरोड कार्याध्यक्ष राजाभाऊ जाधव, प्रफुल्ल पाटील, जयप्रकाश गायकवाड, नीलेश पेनमहाले संयोजन करीत आहेत.

--

गुणवंतांचा सत्कार

जेलरोड : नाशिकरोड येथील एलआयसी शाखेत विमा प्रतिनिधी संघटनेतर्फे विमा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा नुकताच सत्कार करण्यात आला. विमा व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श विमा प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विमा कर्मचारी आणि प्रतिनिधींसाठी दंत चिकित्सा शिबिर झाले. शाखाधिकारी उत्पल हलदार, संजय देशपांडे, डी. एस. पगारे, डॉ. योगेश साळुंके, शत्रुघ्न कांगणे, सुनीता अहिरे यांच्यासह अधिकारी व विमा प्रतिनिधी उपस्थित होते.

--

व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर (फोटो)

जेलरोड : नाशिक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व एकलहरेतील एनटीपीएस स्पोर्ट्स क्लबतर्फे व्हॉलीबॉलचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर झाले. तीस खेळाडूंनी त्यात सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला. उपमुख्य अभियंता सुनील इंगळे, जिल्हा प्रशिक्षक राजेश क्षत्रिय, क्रीडाशिक्षक मधुकर वाघ, प्रकाश पवार, सारंग येवले, प्रशिक्षक मनोज म्हस्के, बंडू जमधडे, अभिषेक सोनवणेआदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमान पुन्हा चाळिशीकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. गत आठवड्यात ३७ ते ३८ अंशांवर स्थिरावलेला तापमानाचा पारा रविवारी (दि. ६) पुन्हा ३९ अंशांच्या पुढे गेला. जिल्ह्यात तापमानाची पुन्हा चाळिशीकडे वाटचाल सुरू असून, मालेगावकरांना मात्र अजूनही उन्हाच्या असह्य झळा सहन कराव्या लागत आहेत.

यंदाच्या उन्हाने उत्तर महाराष्ट्रातील रहिवाशांना घाम फोडला आहे. मालेगावात रविवारी (दि. ६) ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. अहमदनगर आणि जळगावमध्येदेखील एवढ्याच कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तुलनेने थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये थोडी बरी स्थिती आहे. गत आठवड्यात जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३७ ते ३८ अंशांच्या दरम्यान होता. रविवारी मात्र, तापमानात काहीशी वाढ झाली. कमाल तापमान ३९.३ तर किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस ऐवढे नोंदविले गेले. नाशिकमध्ये तापमान पुन्हा चाळिशीकडे सरकत असून, येत्या दोन दिवसांत ते चाळिशी गाठेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ताकाम अखेर लागले मार्गी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड परिसरातील मुक्तिधाममागील धोंगडेनगरच्या रस्त्याचे काम अखेर पूर्ण झाले असून, अनेक दिवसांपासून होणारी गैरसोय टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुक्तिधाममागील महापालिकेच्या शाळा क्रमांक १२५ शेजारून पुढे गेल्यावर एक रस्ता आनंदनगरकडे, तर दुसरा पश्चिमेकडे धोंगडेनगरकडे जातो. त्यातील धोंगडेनगरच्या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. त्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. या रस्त्यावरून जाताना धुळीचा त्रास वाहनचालकांना, तसेच परिसरातील व्यावसायिक व रहिवाशांनाही होत असे. धोंगडेनगरमार्गे पुढे जगताप मळा, जय भवानीरोड, तरणतलाव आदी ठिकाणी जाता येते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढली आहे. आता रस्ता दुरुस्त झाल्याने सर्वांचीच गैरसोय टळणार आहे.

इतरत्रही रस्ते चकाचक

जेलरोडच्या इंगळेनगर चौकातून कॅनॉलरोडकडे जाणारा रस्ता खराब होता. त्याचेही नुकतेच डांबरीकरण करण्यात आले. हा रस्ता अनेक दिवसांपासून अर्धवट तयार करून ठेवण्यात आला होता. मुक्तिधामसमोरील मशीद परिसरातील रस्त्याचीही दुरवस्था झाली होती. जागोजागी खड्डे पडले होते. वास्को चौकापर्यंत रस्ता उखडलेला होता. या रस्त्याचेही नुकतेच डांबरीकरण करण्यात आले. परंतु, या रस्त्यांची कामे अपेक्षित दर्जानुसार झाली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिम्नॅस्टिक शिबिरास वैद्यनगरमध्ये सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आणि वैद्यनगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १३ मेपर्यंत आयोजित जिम्नॅस्टिक शिबिराचा प्रारंभ पुणे महामार्गावरील पाटीदार भवन शेजारील व्यायामशाळेत झाला.

शिबिरासाठी वैद्यनगर, काठे लेन, बोधलेनगर, अशोका मार्ग, द्वारका, भाभानगर, मुंबईनाका, पखालरोड, तपोवन लिंक रोड, इंदिरानगर, अंबड, कामठवाडा, उंटवाडी, गोविंदनगर, सातपूर, पंचवटी, गंजमाळ, अशोकस्तंभ, नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प येथून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला असून ८१ मुले व ६४ मुली असे १४५ जणांनी शिबिरात सहभागी झाले आहेत. या शिबिरासाठी आलेल्या सर्व पालकांचे व मुलांचे वैद्यनगरमधील ज्येष्ठ नागरिक अरुण गांगुर्डे यांनी स्वागत केले. प्रशिक्षक रोहित वाघ यांनी आलेल्या पालकांना खेळाची व शिबिराची माहिती दिली. तसेच शिबिरास मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाल्यामुळे ६ ते ७ आणि ७ ते ८ या दोन बॅचेसमध्ये प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. याठिकाणी चांगले जिम्नॅस्टिक सेंटर तसेच परिसर मोठा असल्याचे 'मटा'मुळे माहिती झाल्याचे अनेक पालकांनी सांगितले. 'मटा'चे तसेच या कार्यक्रमाचे कौतुकही केले. याप्रसंगी वैद्यनगर परिसर व ग्राउंडवर रंगबेरंगी कपडे परिधान केलेल्या मुलांच्या किलबिलाटामुळे अतिशय उत्साहपूर्ण वातावरण होते. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष देविदास पाटील, दत्तात्रय शिरसाट, नितीन काळे, राजू पटेल, नितीन गांगुर्डे, भूषण महाजन, विनीत बिडवई, मनोज जोशी, दिनेश पटेल, शारीक सैय्यद, शाम सोनवणे, जगदीश रघुवंशी आदि उपस्थित होते.

लोगो : मटा मीडिया पार्टनर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंडांवर कारवाई करा

$
0
0

गृहराज्य मंत्र्यांचे पोलिस आयुक्तांना आदेश

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

 गुंडांपासून बचावासाठी नाशिकरोड येथील भाजपचे माजी नगरसेवक कन्हैय्या साळवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातल्याच्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वृत्ताची गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी तात्काळ दखल घेतली. याप्रकरणी चौकशी करून तात्काळ अहवाल देण्याचे आदेश त्यांनी शहर पोलिस आयुक्तांना रविवारी दिले.

कन्हैय्या साळवे यांच्या घरावर काही दिवसांपूर्वीच स्थानिक गुंडांच्या टोळक्याने दगडफेकीसह गाडीची तोडफोड करून त्यांच्या कुटुंबीयांवर कोयता उगारल्याची घटना घडली होती. या हल्ल्यानंतर दोन आठवडे होऊन गेल्यावरही हल्लेखोरांना शोधण्यात स्थानिक पोलिसांना अपयश आले. त्यामुळे साळवे यांनी सुरक्षेसाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले होते.

साळवे यांच्या जेलरोडवरील सानेगुरुजीनगरातील घरावर १८ एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास नवाज उर्फ बाबा शेख, अक्षय नाईकवाडे या सराईत गुन्हेगारांनी त्यांच्या साथीदारांसह दगडफेक करून घरासमोर उभ्या असलेल्या कारची तोडफोड केली होती. यावेळी या सराईत गुन्हेगारांनी साळवे यांच्या कुटुंबीयांवर कोयता उगारत ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेपूर्वी या दोघा सराईत गुन्हेगारांनी सिन्नर फाटा येथे गजानन थोरात या पानस्टॉलचालकावर कोयत्याने हल्ला केला होता. या दोन्हीही घटनांची पोलिसांत नोंद झाली होती. मात्र, दोन आठवडे उलटूनही हल्लेखोरांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आल्याने साळवे यांनी या गुंडांपासून बचावासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाकडे धाव घेतली. तत्पूर्वी त्यांनी शहर पोलिस आयुक्तांकडे पोलिस संरक्षणाचीही मागणी केली होती.

तात्काळ अहवाल सादर करा

कन्हैय्या साळवे यांच्या मागणीचे 'मटा'मधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल राज्याच्या गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी स्वतः घेतली असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश नाशिक शहर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना दिले आहेत. या प्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवालही तात्काळ सादर करण्याचे या आदेशांत नमूद करण्यात आलेले आहेत. गृह राज्यमंत्र्यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे आता शहर पोलिसांना कन्हैय्या साळवे यांच्या घरावर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या व आजवर मोकाट फिरणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रभावी पोलिसिंग करावे लागणार आहे. बाबा शेख आणि अक्षय नाईकवाडे या सराईत गुन्हेगारांचा नगरच्या गुंडांच्या टोळीशी संपर्क असल्याची चर्चा आहे. परिणामी नाशिक पोलिसांना त्या दिशेनेही तपास करावा लागणार आहे.

मोकाट गुंड होणार गजाआड

नाशिकरोड व उपनगर या दोन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत काही दिवसांपासून गावठी पिस्तुल, तलवारी सापडणे, हल्ले होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. यातील काही गुन्ह्यांतील सराईत आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत. परंतु आता मोकाट फिरणारे गुंड लवकरच पुन्हा गजाआड झालेले दिसण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

लोगो : मटा इम्पॅक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हास्याचे उसळले फवारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हास्य योगाचा प्रसार व प्रचार व्हावा या निमित्ताने व जागतिक हास्य दिनाचे औचित्य साधून हास्ययोग समन्वय समितीच्या वतीने रविवारी प. सा. नाट्यगृहात विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाला आलेले नागरिक विविध वेषभूषा करून हजर होते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा झाली. यातील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रसन्न, गोदापार्क, एकदंत, शिवानंद, ओमनगर असे विविध हास्य क्लबचे साधक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. हास्य योगाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलात 'नको औषध नको गोळ्या, हसत हसत वाजवा टाळ्या', 'चेहरा ठेवा हसरा, दुखाला हो विसरा', 'आधे घंटे की हँसी, दिन भरकी खुशी' अशा घोषणा लिहिलेले फलक धरण्यात आले. रॅली प. सा. नाट्यगृह, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, टिळक पथ मार्गे पुन्हा प. सा. नाट्यागृहाजवळ विसर्जित करण्यात आली. या‌वेळी ओमनगर हास्य क्लबच्या वतीने चित्ररथ तयार करण्यात आला. मनशक्ती स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा झाल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मखमलाबाद येथील एकदंत हास्य क्लबचे सभासद शंकरराव सोमवंशी यांना हास्य श्रीमान तर नाशिकरोड येथील प्रथमेश हास्य क्लबच्या सदस्या सुशीला टाटिया यांना हास्य श्रीमती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवगीरी हास्यक्लबचे ९६ वर्षीय सभासद डॉ. मुकुंद फाटक यांना हास्य योगी हा पुरस्कार देण्यात आला. इंदिरानगर येथील स्वच्छंदी हास्यक्लबच्या ७० वर्षीय सभासद नीलिमा बोबडे यांना हास्य योगिनी पुरस्कार देण्यात आला. हेमा ठाकूर व सीताराम दीक्षित यांना मरमोत्तर हास्य रत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी कार्यध्यक्षा डॉ. सुषमा दुगड यांच्यासह नगरसेवक सतीश सोनवणे, अॅड. शाम बडोदे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलरोड, इंदिरानगरला स्वामी समर्थांचा जयघोष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टची स्वामी समर्थ पालखी परिक्रमा नाशिकमध्ये दाखल झाली असून जेलरोड येथील शिवाजीनगर समाजमंदिरात मुक्काम केल्यानंतर रविवारी ती इंदिरानगरकडे रवाना झाली.

पालखी जेलरोडच्या शिवाजी मंदिरात आली. तेथे महाआरती झाल्यानंतर पुरुषोत्तम कुलकुर्णी यांच्यावतीने महाप्रसाद देण्यात आला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी केली. जेलरोड येथे २१ वर्षांपासून ही पालखी येत आहे. रविवारी सकाळी दहाला पूजा, अभिषेक झाल्यावर पालखी इंदिरानगर परिसरातील आशा नागरे यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाली. कृपासिंधू फाउंडेशनतर्फे १२ मे रोजी सायंकाळी पाचला दादासाहेब गायकवाड सभागृहात अनंत कोटी श्री स्वामी समर्थ नाटक होईल. राजन कोठारकर यांचे दिग्दर्शन आहे. नाटकाच्या प्रवेशिकेसाठी ८४११९११००० या मोबाइलवर संपर्क साधावा.

भाविकांचा उत्साह

इंदिरानगर : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या गजरात इंदिरानगर परिसर दुमदूमून गेला. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने सुरू झालेल्या पालखी परिक्रमाचे इंदिरानगर परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे यंदाही इंदिरानगर येथील आशा नागरे यांच्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे आगमन झाले. परिसरातील रस्त्यांवर रांगोळ्या काढण्यात आल्या. पालखीचे स्वागत करण्यासाठी महिलांची गर्दी केली. सकाळी आशा नागरे व मंगेश नागरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले. पालखीने दुपारी नाशिक शहराच्या दिशेने प्रस्थान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विभागातील दोन शाळा ‘ओजस

$
0
0

जूनपासून प्रशिक्षण होणार सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग यांच्यातर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांची निवड राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तेरा शाळांची यादी राज्य शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली असून नाशिक विभागातील दोन शाळांचा यात समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोये गाव व नंदुरबारमधील आंतरराष्ट्रीय निवासी शाळा, तोरणमाळ (ता. धडगाव) या शाळांची यात निवड करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्यातर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळांमधून १०० शाळांची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा म्हणून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा दर्जा आपल्या शाळेला प्राप्त व्हावा, यासाठी ३७८ शाळांनी अर्ज केले होते. त्यातून निवड परिषदेत सहभागी झालेल्या १०६ शाळांमधून उत्कृष्ट कामगिरी असलेल्या १३ शाळांची 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळा' म्हणून अंतिमत: निवड करण्यात आली आहे.

'ओजस' बनवणार 'तेजस'

ओजस शाळा म्हणून निवड झाल्यानंतर या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर ओजस शाळा इतर निवडक शाळांपर्यंत हा उपक्रम पोहोचवणार असून त्यांना 'तेजस' आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देण्यात येणार आहे.

सिंगापूर, जपानची शिक्षणपद्धतीचा मिळणार लाभ

ओजस आंतरराष्ट्रीय शाळांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता थेट सिंगापूर, जपान, चीन, दक्षिण कोरिया या देशांमधील शिक्षण पद्धतीचा लाभ मिळणार आहे. प्रशिक्षणावर आधारित शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थी केवळ घोकमपट्टीपर्यंत मर्यादित राहणार नाही, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाने कलेच्या पातळीवर यावे

$
0
0

स्वानंद बेदरकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कलेतील सात्विकपण कळण्यासाठी समाजाने कलेच्या पातळीवर येणे आवश्यक आहे, जोपर्यंत समाज या पातळीपर्यंत येत नाही तोपर्यंत कला समजणे अशक्य आहे. जो समाज कलेच्या पातळीवर जाऊन विचार करतो त्याचा विकास हा प्रगल्भतेच्या दृष्टीने होतो, असे प्रतिपादन 'शब्दमल्हार'चे संपादक स्वानंद बेदरकर यांनी केले.

प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने डिसुझा कॉलनीत वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. मंडळाच्या सभागृहात बेदरकर यांनी रविवारी 'कला आणि समाज' या विषयावर व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफले. कला कलावंताला आत्मविश्वास देते आणि तो आत्मविश्वास आपल्या कलेतून कलाकार समाजाला देत असतो. समाज आणि कला यांचे परस्पराश्रय नातं समोर उभं राहणं आवश्यक आहे. नातं हा शब्द महत्त्वाचा असून समाजाचं जोपर्यंत कलेशी नातं निर्माण होत नाही तोपर्यंत समाजाची उन्नती तितक्यास तितकी या पद्धतीने होईल. कलेच्या बाबतीत होणारी देवाणघेवाण अलौकिक असून त्याचा लाभ घेण्यासाठी समाजाने आपल्याला कलेच्या प्रगल्भ पातळीवर नेले पाहिजे, असेही बेदरकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ गायक अरुण दाते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा. प्रदीप देवी यांनी परिचय तर चंद्रकांत जामदार यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. यावेळी अनंत साळी, अरविंद कोराले, मृदुला पिंगळे, कल्पना कुलकर्णी, मंगला चौधरी आदी उपस्थित होते.

वसंत व्याख्यानमाला : डिसुझा कॉलनी .......... फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिदुर्गम भागात ४५० वॉटर प्रोजेक्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री सत्य साई सेवा संघटनेने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात आतापर्यंत ४५० वॉटर प्रोजेक्ट बसविले असून दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यासाठी आणखी काही प्रोजेक्ट हाती घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. संघटनेतर्फे मोफत वैदिक सुक्त पठण मार्गदर्शन वर्ग होणार झाले. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आराधना महोत्सवात करण्यात आले.

अनेक वर्षांपासून श्री सत्य साई सेवा संघटना अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. या कार्याची व्याप्ती देशभर पसरली असून नाशिकमध्ये ग्रामीण भागातील रहिवाशांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागात पेयजल प्रकल्प राबविण्यावर आणि अशा प्रकल्पांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. कुपोषित मुलांपर्यंत पोषन आहार पोहोचविणे, आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोन मोबाइल व्हॅनद्वारे आरोग्य सेवा पुरविणे यासारखे उपक्रम संघटना राबविते. या उपक्रमांची व्याप्ती वाढविण्याचा मानस संघटनेने व्यक्त केला आहे. आराधना महोत्सवांतर्गत महानारायण सेवेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सात हजार अन्न पाकिटांचे वाटप झाले. संघटनेतर्फे वेळोवेळी वैदिक सूक्त पठणाचे प्रशिक्षण दिले जाते. विनामूल्य दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन शाम जोशी, देवकी अय्यंगार आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवड तंत्रनिकेतनचे प्राचार्य अहवालात अपात्र

$
0
0

संचालकांकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याचा प्राचार्यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील चांदवड येथील श्री हिरालाल हस्तीमल जैन तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्यच या पदासाठी अपात्र असल्याची माहिती एका तक्रारदाराच्या तक्रारीनंतर समोर आली आहे.

याबाबत दाखल असलेल्या तक्रारीवर नाशिकच्या तंत्रशिक्षण सहसंचालकांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालात संबंधित प्राचार्य अपात्र असल्याचा अभिप्राय सहसंचालकांनी दिला आहे. मात्र, या मान्यतेबाबतचा प्रस्ताव दीर्घकाळापासून संचालकांकडे प्रलंबित असल्याने पदाच्या अपात्रतेचा निष्कर्ष थेटपणे काढता येणार नाही, असा दावा प्राचार्य सी. आर. नानावटी यांनी केला आहे.

या प्रकरणाचे तक्रारदार चांदवडच्या श्री हिरालाल हस्तीमल जैन तंत्रनिकेतन या संस्थेत उदय वायकोळे हे प्राध्यापक पदावर नोकरीस होते. पण मंजुरीच्या मुद्द्याहून आपल्याला डावलण्यात आले आहे, या भावनेतून मंजुरी प्रकरणाबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी 'पीएम पोर्टल'द्वारे केली होती. या तक्रारीनंतर १ जानेवारी २०१८ मंत्रालय कक्ष अधिकाऱ्यांनी तंत्रशिक्षण संचालकांना या प्रकरणी पत्र पाठवून खुलासा विचारला. यावर संचालक कार्यालयाने तंत्रशिक्षणच्या नाशिक सहसंचालकांना चौकशीचे आदेश दिले होते. सहसंचालकांनी यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून २४ जानेवारी २०१८ रोजी चौकशी केली. या चौकशीच्या ९ एप्रिल २०१८ रोजी दिलेल्या अहवालात या तंत्रनिकेतनचे प्राचार्य सी. आर. नानावटी हे पात्र नसल्याचे सहसंचालकांनी या अहवालात नमूद केल्याचे तक्रारदार उदय वायकोळे यांनी म्हटले आहे. उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या तत्कालीन शासन निर्णयानुसार प्राचार्य या पदासाठी थेट नामनिर्देशनाने नियुक्तीची पात्रता एम. ई. व पाच वर्षांच्या अनुभवाची होती. चौकशी समितीने योग्य ती चौकशी केल्याचे सहसंचालकांनी या अहवालात म्हटले आहे.

प्राचार्य पदासह इतर पदांचा मान्यतेचा प्रस्ताव सन २०१२ पासून तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांकडे प्रलंबित आहे. संबंधित चौकशी समितीचा अहवाल हा संचालकांकडे सादर होऊन याबाबत योग्य शहानिशा करून ते अंतिम आदेश देतील. त्यामुळे हे प्रकरण प्रलंबित असताना पदाच्या अपात्रतेबाबत त्वरित काहीही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

सी. आर. नानावटी, प्राचार्य, श्री हिरालाल हस्तीमल जैन तंत्रनिकेतन, चांदवड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रकच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

ट्रकने पिता-पुत्राच्या दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात ८५ वर्षीय पित्याचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना मनमाड-नांदगाव मार्गावर पानेवाडी शिवारात रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली आहे.

नांदगाव तालुक्यातील बेजगाव येथील कारभारी रुंजा लहाने (वय ८५) हे मुलगा राधाकिसन यासह धोटाने येथे दुचाकीवरून जात होते. पानेवाडी येथे मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात कारभारी लहाने यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर राधाकिसन लहाने (वय ४०) हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी भार्डी येथील योगेश मार्कंड या ट्रकचालकास अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीला दीडपट हमीभाव देणे गांभीर्याने घेण्याची गरज

$
0
0

डॉ. अजित नवले यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतीला दीडपट हमीभाव हा जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे. तो गांभीर्याने घेण्याची गरज आहे. दीडपट हमीभाव व शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपल्याला कोणत्या प्रकारचे अन्न खाण्यास भाग पाडत आहे याची कल्पनादेखील आपण करू शकत नाही. कमी भावाने भाजीपाला विकत घेणे, अथवा फुकटचीच अपेक्षा करणे यामुळे आपण शेतकऱ्याला विष बनवायला भाग पाडतो आहे असे प्रतिपादन डॉ. अजित नवले यांनी केले.

वसंत व्याख्यानमालेचे सहावे पुष्प 'शेतीमालाला दीडपट हमीभाव वास्तव आणि शक्यता' या विषयावर डॉ. नवले यांनी गुंफले. गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे. डॉ. नवले म्हणाले, की आपल्या ताटात आज जे वाढून येत आहे, ते विष आहे याची आपल्याला कल्पना आहे का? शेतीमालाची अशी दुर्देवी अवस्था होण्याचे कारण १९५१ मध्ये आहे. त्यावर्षी जी पंचवार्षिक योजना आली त्यात स्पष्टपणे शेतकऱ्याची उत्पादन क्षमता वाढवा; मात्र त्याचे उत्पन्न वाढू देऊ नका असे नमूद केलेले आहे. शेतकरी गरीबच राहिला पाहिजे अशी व्यवस्था फार आधीपासून करून ठेवण्यात आलेली आहे. राज्यकर्ते तर नेहमी शेतीव्यवस्थेच्या विरोधातच उभे राहिले आहे. त्यांनी कधीही शेतीला प्राधान्य दिले नाही त्यामुळे आज ही गत झाली आहे. कांद्याला, उसाला, कापसाला, सोयाबिनला, दूधाला भाव मिळत असताना सरकारने पूर्ण ताकदीनिशी शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी प्रयत्न केला असेही डॉ. नवले म्हणाले.

आजचे व्याख्यान

वक्त्या : अनुराधा प्रभूदेसाई

विषय : ऋणानुबंध सैनिकांशी : कारगील शौर्यगाथा

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

वसंत व्याख्यानमाला : पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बी. एड. सीईटीसाठी ९ मेपर्यंत करा अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारतर्फे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमासाठी बी. एड. सीईटी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी ९ व १० जून रोजी बी. एड. सीईटी होणार आहे. या परीक्षेचा निकाल १५ जून रोजी निकाल जाहीर होईल. या सीईटीसाठी विद्यार्थ्यांना येत्या ९ मेपर्यंत प्रवेश अर्ज करता येईल. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी अनिवार्य असणार आहे. दोन वर्षाच्या पूर्णवेळ नियमित अभ्यासक्रमासाठी ही सीईटी राज्य सरकारकडून घेण्यात येते. www.dhepune.gov.in आणि www.mahacet.org या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांना सीईटीचा अर्ज भरता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजा उद्विग्न

$
0
0

दिंडोरी, सिन्नरसह नांदगावात आत्महत्येच्या तीन घटना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत. पोलिस दप्तरी या घटनांची नोंद झाली असली तरी जिल्हा प्रशासनाला मात्र एकाच घटनेचा प्राथिमक अहवाल प्राप्त झाला आहे. उर्वरित घटनांचे अहवाल सोमवारी प्राप्त होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली असून जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३३ झाली आहे.

कर्जबाजारीपणा, नापिकीसारख्या संकटांशी झुंज देण्यात यश येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढीस लागते आहे. व्यथित शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांवर तोडगा मिळत नसल्याने ते जीवनयात्रा संपविण्याचा टोकाचा विचार करीत आहेत. दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील शेतकरी पद्माकर कारभारी आवारे (वय ३५) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.५)उघडकीस आली. याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. रविवारी (दि. ६) दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास लक्ष्मण कारभारी साबळे (वय ६८, रा. भोकणी) या शेतकऱ्याचा मृतदेह पांगरी शिवारातील विहिरीमध्ये आढळून आल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली आहे. साबळे हे दुपारी तीन वाजेपासून घरातून बेपत्ता होते. दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. नांदगाव तालुक्यातील चांदोरा येथील एका शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचे समजते. जिल्हा प्रशासनाकडून याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली असली तरी नांदगाव पोलिसांच्या दप्तरी अद्याप नोंद नसल्याची माहिती उपनिरीक्षक गवारे यांनी दिली. या घटनेची नोंद झाली तर ती चालू वर्षातील नांदगाव तालुक्यातील शेतकरी आत्महत्येची पहिली घटना ठरेल.

३३ कुटुंबांवर नरकयातना

याच आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे लुखा नामदेव भोर (वय ४५) या शेतकऱ्याने विषप्राशन करून तर कृष्णा भिला सूर्यवंशी (वय ३६, रा. खालप, ता. देवळा) यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन करण्यासाठी एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकरी सन्मान अभियान सुरू केले असताना याच काळात जिल्ह्यात पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याच्या क्लेषदायक घटना पुढे आल्या आहेत. १ जानेवारी ते ६ मे २०१८ या काळात जिल्ह्यात तब्बल ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर नरकयातना सोसण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या

तालुका आत्महत्येच्या घटना

निफाड ५

बागलाण ४

सिन्नर ५

दिंडोरी ५

मालेगाव ४

देवळा ३

चांदवड २

येवला २

नाशिक १

इगतपुरी १

नांदगाव १

एकूण ३३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीट पार पडली; लक्ष्य एमएच सीईटी

$
0
0

गुरूवारी होणार परीक्षा; नाशिकमधून ५१ हजार परीक्षार्थी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकरच्या वतीने घेण्यात येणार एमएच सीईटी २०१८ ही परीक्षा गुरूवारी (१० मे) रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी नाशिकमधून सुमारे ५१ हजार परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत. नाशिकमध्ये ६० केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल. विभागात परीक्षेच्या नियोजनासाठी १४४ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या परीक्षेचा निकाल ३ जून रोजी जाहीर होणार आहे. रविवारी 'नीट' परीक्षा पार पडल्यानंतर आता परीक्षार्थ्यांचे पूर्ण लक्ष्य एमएच सीईटी परीक्षेवर केंद्रीत झाले आहे. 'जेईई' आणि 'नीट' या परीक्षा दिल्यानंतरही 'एमएच सीईटी' ला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नाशिक जिल्ह्यात मोठी आहे.

एमएच सीईटीचे प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी ते डाऊनलोड करून त्याची प्रिंट घ्यावी , असे आवाहन तंत्रशिक्षण संचलनालयाने केले आहे. एमएच सीईटी या परीक्षेसाठी फिजिक्स, मॅथ्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी या चार विषयांचा समावेश असणार आहे. अभियांत्रिकी शाखेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यातील मॅथ्स विषयाला सामोरे जावे लागेल.

राज्यात सव्वाचार लाख विद्यार्थी

एमएच सीईटी या परीक्षेसाठी यंदा राज्यातून ४ लाख ३५ हजारांपेक्षा अधिक परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे. दिलेल्या पूर्वसूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यांचे पालन करावे, असे आवाहन तंत्रशिक्षण संचलनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images