Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कश्यपी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड/सिडको

रविवारी सुटीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा कश्यपी धरणात बुडून मृत्यू झाला. प्रशांत तायडे असे त्या तरुणाचे नाव आहे. याबाबत हरसूल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रशांत हा नवीन नाशिक सिडकोतील कामठवाडे परिसरात वास्यव्यास होता.

रविवारी प्रशांत व त्याचे चार मित्र कश्यपी धरणाला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये बसले होते. धरणाच्या बॅकवॉटरला एका हॉटेलमध्ये जेवनाचा आस्वाद घेतल्यानंतर पाच तरुण सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास पाण्यात उतरले. यावेळी प्रशांतला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. अंधार झाल्याने पाण्यात बुडालेल्या प्रशांतला शोधणे अवघड झाले. अखेर सोमवारी सकाळी साडेसात वाजता त्याचा मृतदेह सापडला. संबंधित हॉटेल हटविण्याची मागणी जलसिंचन विभागाने अनेकदा पोलिसांकडे केली होती. परंतु याकडे पोलिसच लक्ष देत नसल्याचा आरोप जलसिंचन विभागाकडून केला जात आहे.

प्रशांत हा सिडकोतील अभियंता नगर भागात राहत होता. तायडे कुटुंबीय हे मूळचे भुसावळचे आहे. प्रशांतचे वडील हे ठाणे येथे वनखात्यात वनपाल या पदावर आहेत. प्रशांत हा गार्गी महाविद्यालयात बी.एससी वाईन टेक्‍नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षाला होता. सध्या महाविद्यालयाला सुट्या आहेत व घरचेही गावाला गेले आहेत या संधीचा फायदा घेवून तो आपल्या मित्रांसह धरणावर गेला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेमविवाह केलेल्यानवविवाहितेचे अपहरण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गुजरात येथील कच्छ जिल्ह्यातील मांडवी तालुक्यातील तरुणाने एका तरुणीशी प्रेमविवाह केला. तिला घेऊन तो तरुण नाशिकला आला असता शनिवारी (दि. ५) रोजी रात्री या नवविवाहितेला रासबिहारी लिंक रोड येथून चार अज्ञात संशयितांनी मारहाण करून तिचे अपहरण केल्याची घटना घडली. कुटुंबाकडून प्रेमविवाहास विरोध झाल्याने हा प्रकार घडल्याचा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. मोबाइल लोकेशनच्या आधारे संशयीतांचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

गुजरात येथील रोकन पोकार याने एका तरुणीशी प्रेमविवाह केला. त्यानंतर त्यानं तिच्यासह नाशिक गाठले. दिंडोरी रोडवरील लामखेडे मळ्यात राहणाऱ्या नयन रंगानी या मित्राकडे हे दोघे आले. शनिवारी (दि. ५) रोजी रात्री साडेदहा वाजता रोकन पोकार व त्याची पत्नी दुचाकीवरून रासबिहारी लिंक रोडवरील मानेनगर येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. साईश्रद्धा पेट्रोल पंपाच्या कॉलनी रोडकडे जात असताना दोन अज्ञात संशयीत पायी आले. या संशयीतांच्या मागून एक लाल रंगाची कार आली. पायी येणाऱ्या संशयितांनी रोकन पोकारला अडूवन त्याला खाली पाडले. नंतर चार संशयितांनी त्याच्या पत्नीला पकडून कारमध्ये बसवून तिचे अपहरण केले. म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये चार अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवनाच्या संघर्षाला माणूसकीचा सुगंध!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दानाला विशेष मोल असल्याने तीर्थक्षेत्री भिक्षेकऱ्यांची संख्या वाढण्यास वेळ लागत नाही. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात दाखल होणाऱ्या भिकाऱ्यांची अनेक कुटूंबेच आता प्राचीन तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिक नगरीत वसली आहेत. अपरिहार्यतेने भिक्षेकऱ्यांच्या हाती आलेले भिक्षापात्र काढून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे.

सोमवारी सकाळपासून शहराच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून भिक्षेकरी शोधून आणून त्यांच्या स्वच्छतेपासून तर समुपदेशनापर्यंत उपक्रम राबविण्यात आले. महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा न्यायालय, 'चाकं शिक्षणाची', सिव्हिल हॉस्पिटल, चाइल्ड लाइन, बालकल्याण समिती यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. 'भिकारीमुक्त नाशिक' उपक्रमाला सुरुवात झाली सोमवारी सकाळी ७ वाजेपासून. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तेरा टीमने हा उपक्रम पार पाडला. सिग्नल, उड्डाणपूल, रस्त्याच्या कडेला, नदीकिनारी बसलेल्या, झोपलेल्या भिकाऱ्यांना कार्यक्रमात जेवायला जायचे आहे, असे आमिष दाखवून १६४ भिकाऱ्यांना गोळा करून पोलिस हेडक्वार्टर बॅरेक नंबर १७ येथे नेण्यात आले. यामध्ये अठरा वर्षांच्या आतील ६५ व १८ वर्षांपुढील ९९ व्यक्तींचा समावेश होता. बॅरेकमध्ये आणल्यानंतर कटिंग, अंघोळ अशी शारीरिक स्वच्छता करून सिव्हिल हॉस्पिटलला आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना जेवण देण्यात आले. सक्षम फाउंडेशन या संस्थेकडून यावेळी कपडेवाटप करण्यात आले. आजूबाजूला पोलिसांचा गोतावळा पाहून भिकाऱ्यांना आपल्याला येथे का आणले आहे, याची पुरती कल्पना येऊन चुकली होती. त्यामुळे बॅरेकच्या बाहेर पडण्याची त्यांची धडपड पोलिस, सामाजिक कार्यकर्त्यांसमोर आव्हान निर्माण करणारी होती. पोलिसांच्या कारवाईची धास्ती घेत शंभरपेक्षा जास्त भिकाऱ्यांनी रस्त्यावरूनच धूम ठोकली. नाशिक भिकारीमुक्त करण्यासाठी महिन्यातील एक दिवस हा उपक्रम शहरात राबविण्यात येणार आहे.

\Bआम्ही भिकारी नाही..

\B'आम्ही भिकारी नाही', 'नातेवाईकांकडे आलो आहोत', 'आमच्या बाबाचं दहावं आहे उद्या', 'येथे ठेवण्यापेक्षा फाशी देऊन टाका', अशी असंबद्ध बडबड करीत पोलिसांकडे सोडविण्यासाठी विनवणी केली जात होती. शिवाय, दरवेळी भिकाऱ्यांना पकडले की त्यांना सोडविण्यासाठी आधारकार्ड, शाळेचा दाखला आदी सरकारी कागदपत्रांसह त्यांचे प्रमुख दाखल होत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाण्यांत मिळणार कायदेविषयक सल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पोलिस ठाण्यात येणाऱ्यांना योग्य कायदेविषयक सल्ला व वकिलाची मदत मिळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये स्थानिक पोलिस ठाण्यांत जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत मोफत सेवा देण्याकरिता दोन व्यक्तींची निवड करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरण सचिव न्यायाधीश सुधीर बुके यांनी दिली.

कायद्याविषयी बहुसंख्य नागरिकांत अजूनही अज्ञान दिसते. त्यामुळे त्यांना पोलिस ठाण्यात आल्यानंतर काय करावे, ते समजत नाही. महिलांवर होणारे अत्याचार त्या बोलून दाखवत नसल्याने त्याचा फायदा संशयितास मिळत असतो. बालकांसह वृद्धांवरदेखील अत्याचार होत असल्याने अशा अत्याचार पीडितांना या सेवेचा लाभ मिळू शकणार आहे.

पंचवटी पोलिस ठाण्यात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, निरीक्षक (गुन्हे) विजय धमाळ आदी उपस्थित होते.  न्यायाधीश बुके म्हणाले, की नागरिकांना कायद्याचे अज्ञान असल्याकारणाने नेमके काय दाखल होत आहे याची कल्पना नसते. अशावेळी तक्रारदारास सविस्तर व योग्य माहिती मिळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या ठिकाणी दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे नियुक्ती केलेले विधी सेवक तक्रारदार व येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे काम करणार असून, त्यांच्याकडील रजिस्टरमध्ये तशी नोंद करतील. महिला, बालक, वृद्ध व ज्यांचे उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे अशांना गरज पडल्यास वकिलांमार्फत मोफत देण्यात येणार आहे. यासोबत कायदेविषयक मोफत सल्ला सर्वांना देण्यात येणार आहे. परंतु, आर्थिक फसवणूक अथवा गुन्ह्यातील व्यक्तीस यातील एकही सेवा मिळणार नसल्याचे न्यायाधीश सुधीर बुके यांनी सांगितले. 

तक्रारदार व्यक्तीस गुन्ह्याकडे न पाहता मदत देण्यात येईल. स्थानिक परिसरातील विधी सेवा देणारे विधी सेवक असल्याने, ते नागरिकांच्या परिचयाचे असणार असून, शहरासह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत सेवा दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दोनशे भिकारी ताब्यात

शहर भिकारीमुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोहीम सुरू करण्यात आली असून, सोमवारी पहिल्याच दिवशी सुमारे २०० भिकारी पकडण्यात आले. त्यातील काहींना काम करण्याची व शिक्षण घेण्याची इच्छाअसल्यास तशी व्यवस्था करण्यात येणार आहे. वृद्ध असल्यास अशांना वृद्धाश्रमात पाठविण्यात येणार आहे. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैन मंदिरात चैतन्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटररोडवरील श्री मुनिसुव्रत जैन स्वामी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. यावेळी शहा कुटुंबीयांच्या हस्ते महापूजा, कलशपूजन झाले. त्यानंतर कळसावर ध्वज उभारण्यात आला. अशा विविध कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात चैतन्य अवतरले होते.

या मंदिराच्या एकोणिसाव्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारपासून मंदिरात महापूजा, भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. संघपती कन्हैयालाल कर्नावट, डॉ. राजेंद्र मंडलेचा, डॉ. पूनमचंद ठोळे, संदीप कर्नावट, चेतन बोरा, संजय संचेती, विनय कर्नावट, नितीन पटणी, देवेन शहा, रौनक सुराणा, पारस संकलेचा, चिराग शहा, राजू बोथरा, सुनील बेदमुथा, हेमंत गायकवाड आदी उपस्थित होते. महेश शहा, गिरीश शहा, रौनक शहा, रोशनी शहा, पूर्वी शहा, पौर्णिमा शहा, तृप्ती शहा, तलोतानाबेन शहा, पूनमचंद शहा, वाडिवाल शहा यांच्या हस्ते कळसावर ध्वज उभारण्यात आला. दररोज श्री मुनिसुव्रत स्वामी व देवतांच्या मूर्तींची विविध फुलांनी सजावट करण्यात आली. रविवारी सकाळी परिसरातून शोभयात्रा काढण्यात आली. दुपारी मंदिर कळसाचे पूजन करून ध्वज चढविण्यात आला.

महापूजा करण्यात आली. भाविकांनी जयजयकार करीत फुलांचा वर्षाव केला. पूजा-आरती होऊन महाप्रसाद वाटप झाले. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होता.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिक आजारासाठी कीर्तन आवश्यक

$
0
0

डॉ. रामकृष्ण लहवीतकर यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, सिडको

मनुष्याला कोणताही आजार झाल्यावर तो डॉक्‍टरांकडे जात असतो. डॉक्‍टरांकडून शरीरावरील आजार बरा केला जात असला तरी मानसिक आजारातून मुक्‍तता मिळण्यासाठी कीर्तन, प्रवचन या गोष्टींचीच गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनी व्यक्‍त केले.

सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या विश्वशांती वैष्णव धर्म सोहळ्यातंर्गत आयोजित राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी बोलताना लहवितकर महाराज यांनी सांगितले की, आपल्या संस्कृतीचे रक्षण करणे ही आपलीच गरज आहे. धर्म, परंपरा, संप्रदाय, अस्मिता याची जपणूक करण्यासाठी कीर्तन व प्रवचन सोहळे झाले पाहिजे. अनेकदा कीर्तन किंवा प्रवचन हे वयस्कर व्यक्‍तींचे काम असल्याची भावना निर्माण केली जाते. मात्र याची गरज ही अबालवृद्धांना असल्याचे त्यांनी सांगितले.

युवकांनी आपल्या व्यस्त दिनशैलीतून थोडा वेळा किर्तन व प्रवचनासाठी काढलाच पाहिजे. धार्मिकता जपली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही अडचणीवर कशी मात करता येईल याची माहिती प्रत्येक संताने दिली असून, ते आत्मसात केले पाहिजे. जगत्‌गुरू तुकोबा महाराजांनी तर जीवन कसे जगता येते याचे विविध दाखले देऊन माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या कीर्तन महोत्सवात दररोज सकाळी दोन तास योगाचार्यांच्यावतीने योग शिबिर घेण्यात येत असून, याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

युवकांना मोबाइलपासून दूर करण्याची गरज

आजची तरुण पिढी ही मोबाइलमध्ये व्यस्त झाली असून, तिला त्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. माणूसच माणसाला ओळखत नसल्याने कीर्तनासारखे उत्सव आता कमी होऊ लागले आहेत. तरुणांनी एकत्र येऊन कीर्तनासारखे महोत्सवाचे आयोजन केले पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख इंदूरीकर यांनी केले. या वेळी त्यांनी सांगितले की, आजच्या तरुण पिढीमध्ये अध्यात्माची जाण निर्माण होण्याची गरज आहे. तरुण पिढी ही नकारात्मक भावनेकडे जात असून, त्यांना सकारात्मक भावनेकडे नेण्याची समाजाची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडला आज मेगा ब्लॉक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या नवीन पादचारी पुलाच्या कामामुळे रेल्वे स्थानकात मंगळवार सकाळपासून सायंकाळपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लग्नसराई व उन्हाळी सुट्यानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. रेल्वे पादचारी पुलासाठी मंगळवारी मेगा ब्लॉक निश्चित असून, या ब्लॉकमुळे भुसावळ मुंबई पॅसेंजर, मुंबई भुसावळ पॅसेंजर, मनमाड इगतपुरी शटल व इगतपुरी मनमाड शटल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शक्यतो ग्रामीण भागात जाणारे प्रवासी, छोट्या छोट्या रेल्वे स्थानकात जाणारे प्रवासी या रेल्वे गाड्यांनी प्रवास करतात. या गाड्यांना गर्दी देखील असते. पण याच गाड्या रेल्वेने सोमवारी रद्द केल्याने त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान मेगा ब्लॉक असला तरी इतर एक्स्प्रेस गाड्या सुरू असल्याने नाशिक, जळगाव, भुसावळ कल्याण आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना फारसा त्रास होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाबूं’ना बदल्यांचे गिफ्ट!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जानेवारीत राज्याच्या कृषी खात्यातील 'गट क' संवर्गातील पदोन्नतीवर झालेल्या ६० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा घोळ झाला आहे. त्यापैकी तब्बल २२ कर्मचारी अवघ्या तीन महिन्यातच पुन्हा मूळ स्थानी बदलून आले आहेत. यामध्ये नाशिक विभागातील नऊ जणांचा समावेश आहे.

बदलीनंतर पुन्हा तीन वर्षे बदली न करण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा आदेश आहे. परंतु, या आदेशाला कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. केवळ पदोन्नतीची बक्षिसी पदरात पाडून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाला अंधारात ठेवून या बदल्यांचा घाट घातल्याचे उघड झाले आहे.

जानेवारीत कृषी खात्याने गट संवर्गातील ६० कर्मचाऱ्यांची 'गट ब' संवर्गातील कृषी अधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली केली होती. यातील ४४ जणांची बदली मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील अमरावती व नागपूर महसूल विभागात झाली होती. मात्र, पदोन्नत्तीवर बदली झालेल्या या ६० पैकी २२ कर्मचाऱ्यांनी एप्रिलमध्ये पुन्हा आपल्या मूळ जागी बदली करून घेतली. वास्तविक एकदा बदली झाल्यानंतर तीन वर्षे संबंधित आस्थापनेवर संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्य बजावले पाहिजे, असा सामान्य प्रशासन विभागाचा आदेश आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून सामान्य प्रशासन विभागाच्या या आदेशालाच केराची टोपली दाखवली आहे.

'सामान्य प्रशासन'कडून चौकशीचे आदेश

कृषी खात्यातील 'गट क' संवर्गातील ६० कर्मचाऱ्यांना पदोन्नतीनंतर त्यांची लागलीच बदली होणार होती. ही बाब या सर्व कर्मचाऱ्यांना ज्ञात असूनही सर्वांनी पदोन्नतीचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी बदली आदेश स्वीकारले. मात्र, त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्येच या ६० पैकी २२ कर्मचाऱ्यांनी मराठवाडा आणि विदर्भाला रामराम ठोकला. या २२ जणांमध्ये नाशिक विभागातील नऊ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मराठवाडा व विदर्भात कर्तव्य बजावण्यास नाखूष असलेल्या विभागातील या नऊ कर्मचाऱ्यांसह राज्यातील उर्वरित कर्मचाऱ्यांची सामान्य प्रशासनाने दखल घेतली असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. नाशिक विभागातून एकूण १६ कर्मचाऱ्यांची पदोन्नतीवर बदली झाली होती.

यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

नावजानेवारीतील पदस्थापनासुधारित पदस्थापना
विष्णू आहेर (कृषी अधिकारी)पवनी (जि. भंडारा)पाटोदा (ता. येवला, जि. नाशिक)
मनोहर गाजरे (कृषी अधिकारी)सेलू (जि. वर्धा)भुसावळ (जि. जळगाव)
निंबा शिंदे (मंडल कृषी अधिकारी)चोपडा (जि. जळगाव)घोटी-१, (ता. इगतपुरी, जि. नाशिक)
संजय पाटील (मंडल कृषी अधिकारी)उरण (जि. रायगड)हरसूल-२ (ता. त्र्यंबक, जि. नाशिक)
अरविंद देसले (मंडल कृषी अधिकारी)लोणी (ता. राहाता, जि. नगर)चाळीसगाव-२ (जि. जळगाव)
अमृत पवार (मंडल कृषी अधिकारी)आमगाव (जि. गोंदिया)कुसुंबा (ता. जि. धुळे)
रवींद्र चौधरी (मंडल कृषी अधिकारी)सावली (जि. चंद्रपूर)कळंबू (ता. शहादा, जि. नंदुरबार)
नीलकंठ पाटील (मंडल कृषी अधिकारी)चिमूर (जि. चंद्रपूर)मंदाणे (ता. शहादा, जि. नंदुरबार)
कांतीलाल पाटील (मंडल कृषी अधिकारी)काटोल-१ (जि. नागपूर)कोरिट (ता. जि. नंदुरबार)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरवठा निरीक्षकांचेचगॅस कार्ड बनावट

$
0
0

गॅस योजनेच्या चौकशीच्या पहिल्याच दिवशी प्रकार उघड

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

उज्ज्वला गॅस योजनेत शहरातील झालेल्या अपहार उघडकीस आल्यानंतर सोमवारपासून याची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीच्या पहिल्याच दिवशी तत्कालीन पुरवठा निरीक्षकांच्या पत्नीच्या नावाचेच बनावट गॅस कार्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शहरातील गॅस एजन्सीद्वारे उज्ज्वला गॅस योजनेत खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवत काळ्या बाजारात सिलिंडर विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर तहसीलदार ज्योतीदेवरे यांनी याबाबत शहरातील एका गॅस एजन्सीची तपासणी केली. त्यात एजन्सी कार्यालयात व एका एजंटकडे एकूण १४० गॅस कार्ड आढळले. यामुळे उज्ज्वला योजनेच्या नावाने मोठा अपहार झाल्याचा संशय बळावला असून दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे

सोमवारी देवरे आणि पुरवठा निरीक्षक बी. जी. साबळे यांनी जप्त केलेल्या कार्डची चौकशी सुरू केली . त्यात पहिलेच कार्ड पूजा प्रशांत काथेपुरे यांचे नावे होते. हे कार्ड तत्कालीन पुरवठा निरीक्षक व विद्यमान मंडळ अधिकारी प्रशांत कथेपुरे यांचे असल्याचे लक्षात आले. तहसीलदार देवरे यांनी तत्काळ त्यांच्या पत्नी पूजा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता आपले गॅस कार्ड आपल्याकडेच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुरवठा निरीक्षकांच्याच नावाचे बनावट कार्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कार्डवर १५ ऑक्टोबर २०१६ पासून ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत दहा वेळा सिलेंडर विक्री झाल्याची नोंद आहे.

तसेच टोकडे येथील रेखा बाळू जाधव यांचे उज्ज्वला लाभार्थी म्हणून नाव व कार्ड आढळले आहे. टोकडे तलाठीमार्फत त्या खरच योजनेच्या लाभार्थी आहेत का याची चौकशी केली जाणार आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणात गॅस एजन्सीच्या कारभारानंतर येथील पुरवठा विभागाचा कारभार देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भांडणाची कुरापतकाढून हाणामारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

एरंडवाडी परिसरात मागील भांडणाची कुरापत काढून झालेल्या हाणामारीत कोयत्यांचा वापर केल्याने तीन जण जखमी झाले. रविवारी (दि. ६) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा घटना घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सागर रमेश अहिरे (रा. एरंडवाडी, पेठफाटा, पंचवटी) हा बाजार समितीत कामास असून रविवारी (दि. ६) रोजी मध्यरात्री एक वाजून १५ मिनिटाच्या सुमारास मित्र शुभम पगारे व जय देवगावकर हे दोघे दुचाकीवरून पेठफाटा येथे एका पान टपरीवर थांबले. या ठिकाणी महेश राजेंद्र थोरात आला. त्यांच्यात मागील भांडणावरून बाचाबाची सुरू झाली. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. सागर अहिरे याच्यावर कोयत्याचा वार करण्यात आले. शुभम पगारेच्या उजव्या हातावर जखम झाल्याची फिर्याद सागर अहिरे याने दिली आहे. तर सागर, शुभम व जय या तिघांनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याचे महेश थोरात याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुपयोगी वस्तू शिकण्याची बच्चेकंपनीला संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परीक्षा संपली, निकालही लागले, पण सूर्यदेव तापलेले असल्यामुळे लहानग्यांचे दिवसभर खेळणेही बंद झाले आहे, अशी अवस्था सध्या आहे. मुलांना नेमके कशामध्ये गुंतवायचे या विचारात पालकही आहेत. पालकांची हीच अडचण ओळखून 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'तर्फे बेसिक हँडिक्राफ्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ११ ते १५ मे या कालावधीत समाजमंदिर, प्रसन्न कॉलनी, इंदिरानगर येथे दुपारी ४ ते ७ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. सहा वर्षे ते १० वर्षे या वयोगटासाठी सकाळी १० ते दुपारी १, तर ११ वर्षे ते १६ वर्षे या वयोगटासाठी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत ही कार्यशाळा होईल. पूजा गवळे या आर्ट आणि क्राफ्टच्या वस्तू कशा तयार करायच्या याविषयीचे मार्गदर्शन करणार आहेत. काय कार्यशाळेत मुलांना नेमके काय शिकविण्यात येणार आहे, त्या वस्तूंचे प्रदर्शन ९ आणि १० मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी नावनोंदणीही करता येणार आहे. शिबिरानंतर शेवटच्या दिवशी स्पर्धा घेण्यात येणार आहे. 'मटा कल्चर क्लब'च्या सभासदांच्या मुलांसाठी प्रत्येकी १००० रुपये, तर इतरांसाठी १२०० रुपये अशी या पाच दिवसीय कार्यशाळेचे शुल्क आहे. शिबिरासाठी लागणारे साहित्यही या शुल्कात समाविष्ट आहे. अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर किंवा महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे संपर्क साधावा. कल्चर क्लबच्या सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्यावी.

...हे शिकण्याची मिळणार संधी

सकाळच्या बॅचमध्ये सहा वर्षे ते १० वर्षे वयोगटातल्या मुलांना बुक मार्कचे वेगवेगळे प्रकार, पपेटचे वेगवेगळे प्रकार, ग्रीटिंग कसे बनवायचे, त्याचप्रमाणे वॉल हँगिंग आणि डेकोरेशन करणे, पेपर बॅग आणि एन्व्हलप, बेसिक कॅलिग्राफी, चित्रकलेच्या माध्यमातून स्पेलिंग कसे लक्षात ठेवायचे याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सायंकाळच्या बॅचमध्ये म्हणजे ११ ते १६ वर्षे वयोगटातल्या मुलांना स्विंग कार्ड, पॉप अप ग्रीटिंग, एन्व्हलप बॉक्स, सरप्राइज बॉक्स, तसेच वॉलहँगिंग आणि डेकोरेशन, पेपर बॅगचे प्रकार, वारली पेंटिंग आणि बेसिक कॅलिग्राफीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

--

(किड्स कार्निवलचा लोगो वापरणे.)

(बातमीत कल्चर क्लब लोगो, फेसबुक, ट्विटर लिंक, क्यू आर कोड वापरावा.)

(अँकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसा आपला मालक बनणे धोकादायक

$
0
0

अर्थतज्ज्ञ प्रा. विनायक गोविलकर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैसा आपल्याकडे असणे ही बाब सुखावह असली तरी पैसा आपला मालक बनणे धोकादायक आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थाचे चार प्रकार सांगण्यात आले आहेत. यात आपल्याकडे अर्थ या पुरुषार्थाला विशेष महत्त्व आहे. धर्मावर आधारित कामपूर्ती करून अर्थाकडून मोक्षाकडे जावं, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ प्रा. विनायक गोविलकर यांनी केले.

प्रौढ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने डिसुझा कॉलनीत वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. मंडळाच्या सभागृहात प्रा. गोविलकर यांनी सोमवारी 'श्रीलक्ष्मीचे अध्यात्म' या विषयावर व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंफले. अनेक अर्थतज्ज्ञ सांगतात, की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली पण आपला देश आर्थिक दृष्टीकोनातून अद्याप मागे आहे. याला कारण आपली संस्कृती आहे. श्रीमंत होणे, पैसे मिळवणे असे दाखले आपल्या संस्कृतीत मिळत नाहीत. अनेकांना असे वाटते की मोक्ष मेल्यावरच मिळतो पण तसे नसून जीवंतपणीसुद्धा मोक्ष अनुभवता येतो. सुख, आनंद, समाधान या वेगळ्या बाबी आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. जीवनाचं अंतिम उद्दिष्ट्य स्वर्गात जाणं हे नाही, हेदेखील लक्षात घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

प्रा. प्रदीप देवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर डॉ. शरद पाटील यांनी आभार मानले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी, स्मिता कुलकर्णी, मार्तंड पिंगळे, मृदुला पिंगळे, कल्पना कुलकर्णी आदी उपस्थित होते.

वसंत व्याख्यानमाला : डिसुझा कॉलनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९४ टक्के तक्रारींचा निपटारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या इ कनेक्ट अॅपला नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत ६८ हजार नागरिकांनी ते डाऊनलोड केले असून, ९४ टक्के तक्रारींचा निपटारा झाला आहे.

महापालिकेने जास्तीत जास्त तक्रारींचा निपटारा करण्यासाठी एनएमसी इ कनेक्ट अॅप सुरू केले असून, या अॅपमुळे तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निवारण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने दि. १ मार्चपासून हे अॅप सुरू केले. या अॅपमध्ये विभागानुसार तक्रार दाखल करण्याची सोय करून देण्यात आली. त्याचप्रमाणे कोणत्या खात्याची तक्रार आहे ती त्याच खातेप्रमुखाकडे जाईल, अशी तजवीजदेखील करण्यात आली आहे. या अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत ५ हजार ५२६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ५ हजार १९४ तक्रारींचे निराकारण करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत ३२२ तक्रारींचे निराकरण करणे बाकी आहे. दाखल तक्रारींपैकी ९४ टक्के तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. त्यातील ८१ तक्रारी या पुन्हा ओपन करण्यात आल्या असून, २१ तक्रारी या ७ दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या आहेत. प्रलंबित असलेल्या तक्रारींमध्ये अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या ८६, घनकचरा व्यवस्थापनाच्या ४६, विद्युत विभागाच्या ३३, भटकी कुत्री आणि आरोग्य २६, पाणीपुरवठा २५, बांधकाम, २३, मलनिस्सारण २०, गार्डन, १७, नगररचना १५, पावसाळी कामे १२ आदींचा समावेश आहे. महापालिकेच्या स्मार्ट सिटी अॅपपेक्षा या इ कनेक्ट अॅपला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. स्मार्ट सिटीचे अॅप ५२ हजार लोकांनी डाऊनलोड केले होते, तर एनएमसी इ कनेक्ट अॅप हे आतापर्यंत ६८ हजार लोकांनी डाऊनलोड केले आहे. या अॅपमुळे आपण दाखल केलेल्या तक्रारींचे काय झाले हे समजण्याची सोय असल्याने अनेक नागरिक याच अॅपचा उपयोग करीत आहेत.

विभागनिहाय तक्रारी अशा

सर्वांत जास्त तक्रारी विद्युत विभागाच्या आहेत. या विभागात पथदीप सुरू नसणे, लाइट फुटले आहेत अशा प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे. विद्युत विभागाच्या एकूण १ हजार १८१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या खालोखाल अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापनच्या ७६२, पाणीपुरवठा ७०३, बांधकाम विभाग ५५९, भटके कुत्रे आणि आरोग्य ३९१, गार्डन ३३९, मलनिस्सारण ३१५, पार्किंग १५१, नगररचना ९४ अशाप्रकारच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीराजाच्या पदरी जुलै अखेरपर्यंत प्रतीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात ९० टक्के गावांमध्ये सातबारा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचा ढोल जिल्हा प्रशासन बडवित असले तरी जिल्ह्यातील ७६ गावांचेच सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन वितरित होऊ शकले आहेत. ऑनलाइन सातबारांच्या दुरुस्तीचे काम २० मेपर्यंत पूर्ण केले जाईल, असा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, सर्व गावांमधील सातबारा उतारे केव्हापर्यंत ऑनलाइन मिळू शकतील याची कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्याने बळीराजाच्या पदरी प्रतीक्षा करण्याशिवाय पर्यायच नाही.

सातबारा उतारे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेकदा तलाठ्यांचे पाय धरावे लागतात. कधी तलाठी भेटतच नाही तर कधी त्याच्याकडून अडवणूक होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असतात. असे प्रकार घडू नयेत आणि शेतकऱ्यांना सरकारच्या गतिमान व लोकाभिमुख कारभाराचा प्रत्यय यावा, यासाठी सरकारने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून राज्यात एक मेपासून सातबारा उतारा ऑनलाइन देण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ऑनलाइन सातबाराबाबतचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला. परंतु, अजूनही नाशिकमध्ये ऑनलाइन सातबारा वितरण कासवगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील १,८९८ गावांमध्ये सातबारा संगणीकरण व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यापैकी १,७७८ गावांमधील सातबारा दुरुस्ती पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. उर्वरित गावांचे काम २० मे पर्यंत संपविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

नाशिक, निफाड व मालेगाव तालुक्यात सातबारा उताऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातही नाशिक शहर आणि तालुक्यात एकाच उताऱ्यावर अधिक जणांची नावे असल्याने नोंदणीची प्रक्रिया क्लिष्ठ ठरते आहे. मालेगाव आणि निफाडमध्येही अशीच स्थिती आहे. परिणामी येथील कामे पूर्ण होण्यास जुलै महिना उजाडण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

डिजिटल स्वाक्षरीला अवधी

जिल्ह्यात साडेबारा लाखांहून अधिक सातबारा उतारे आहेत. कागदपत्रांची संख्या दीड कोटींच्या जवळपास आहे. सातबारा उतारे दुरुस्ती काम पूर्ण झाले तरी सातबारावर डिजिटल स्वाक्षरीसाठी वेळ लागणार आहे. सद्यस्थितीत केवळ १२ हजार २३८ सातबाऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी झाल्याचे समजते. त्यामुळे घरबसल्या ऑनलाइन सातबारा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टची श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेचे यंदा २२ वे वर्ष असून या पालखीचे नुकतेच शहरात आगमन झाले आहे. ही पालखी, पादुकांसह सोमवारी दुर्गा मंगल कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आली. यावेळी भाविकांनी 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'चा जयघोष केला.

या पालखीने रविवारी इंदिरानगर परिसरात विसावा घेतला. तेथे आशा नागरे यांच्यावतीने चहापान देण्यात आले. भाभानगरहून भारती कुक्कर यांच्यावतीने महाप्रसाद होऊन सायंकाळी ही पालखी शालिमार येथील नेहरू गार्डनपासून मिरवणुकीने धुमाळ पॉईंट-मेनरोड-बोहोरपट्टी-सराफ बाजार-जिजामाता चौक-दहिपूल या मार्गाने तिळभांडेश्वर लेनमधील दुर्गा मंगल कार्यालयात आली. याठिकाणी पालकी मुक्कामी होती. सोमवारी सकाळी आठ वाजता तेथे लघू रुद्र पूजन, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता पालखी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भांडीबाजार येथे मुक्कामी आली. याठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी नाशिकचे विश्वस्त जगदीश पाटील, शामराव तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन दंडगव्हाळ, बळीराम चांडोले, शिवाजीराव अंडे, संदीप खैरनार, बाळासाहेब बत्तासे, पंकज चांडोले, प्रशांत गाडगीळ आदी परिश्रम घेत आहेत.

द्वारका, गंगापूर रोडला आज दर्शन

पालखी मंगळवारी (दि. ८) सकाळी दहा वाजता द्वारका, माणेकशॉनगर येथे राहुल जगताप यांच्याकडे महाप्रसाद वाटप होणार आहे. सायंकाळी पाचला पालखी गंगापूर रोडवरील पंपिंग स्टेशन परिसरात पोहोचेल. सुयोजित गार्डन दत्तचौक येथे भाऊ महाराज खैरनार यांच्याकडे मुक्काम व महाप्रसाद असणार आहे. बुधवारी (दि. ९) सकाळी दहाला रामवाडी येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात संतोष पोळ गुरूजी यांच्याकडे महाप्रसादाचे वाटप होईल. पालखी दुपारी चारला मार्गस्थ होईल. पंचवटी कॉलेजवळ येथे प्रवीण मुनोद यांच्याकडे रसपानाचा कार्यक्रम होईल. तेथून ही पालखी पिंपळगाव बसवंतकडे मार्गस्थ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉक्टरांची टंचाई, रुग्ण बेहाल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या शहरातील सर्वांत मोठ्या बिटको रुग्णालयात डॉक्टरांची टंचाई निर्माण झाल्याने रुग्ण बेहाल झाले आहेत. एका पाठोपाठ एक सुरू असलेली डॉक्टरांची गळती आणि अधूनमधून निर्माण होणारा औषधांचा तुटवडा या दोन समस्यांनी बिटको रुग्णालयातील रुग्णसेवा सलाईनवर असल्याची स्थिती आहे.

बिटको रुग्णालय शहरासह आजूबाजूच्या तालुक्यांतील ग्रामीण भागातील रुग्णांची लाइफलाइन आहे. मात्र, या रुग्णालयात डॉक्टरांची नेहमीच टंचाई राहिलेली आहे. महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या रुग्णालयाची पाहणी केल्यावर काही प्रमाणात येथील कारभार सुधारला होता. मात्र, प्रशासनातील वर्चस्ववाद, वरिष्ठांकडून आणि रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना मिळणारी वागणूक आदी कारणांनी नऊ-दहा महिन्यांपूर्वीच त्वचारोगतज्ञ डॉ. सदानंद नायक यांनी राजीनाम दिला होता. चार महिन्यांपूर्वी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रिया राजहंस यांनीही राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच फिजिशियन डॉ. दिलीप गरुड निवृत्त झाल्याने त्यांचे पदही आता रिक्त झालेले आहे. याशिवाय दंतरोगतज्ज्ञ डॉ. विशाल जाधव हे नियमित डॉक्टर एमडीएस या उच्च शिक्षणासाठी एक वर्षाच्या दीर्घ रजेवर गेलेले असल्याने या रुग्णालयात दंतरुग्णांवर उपचारच होत नाहीत. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. पलोड यांच्याकडे कथडा रुग्णालयातील अपंग प्रमाणपत्र केंद्राचा अतिरिक्त कारभार असल्याने ते बिटकोत पूर्णवेळ उपलब्ध नसतात. डॉ. अनुप कुमट आणि डॉ. प्रशांत भुतडा या डॉक्टरांची सेवा मानद तत्त्वावर मिळत असल्याने काही प्रमाणात रुग्णांच्या समस्या सुसह्य होत आहेत. या रुग्णालयात वारंवार औषधांची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध होत नसल्याने बहुतांश औषधे खासगी मेडिकलमधून खरेदी करण्याची वेळ येत आहे.

महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेचे कामकाज सुरू आहे. सध्या फिजिशियन, त्वचारोगतज्ज्ञ, डेंटिस्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ ही पदे रिक्त आहेत. मात्र, औषधांचा तुटवडा नाही.

-डॉ. राजेंद्र भंडारी, वैद्यकीय अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालक घालणार खासदारांना साकडे

$
0
0

रिक्षाचालक घालणार खासदारांना साकडे (फोटो)

जेलरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारातील रिक्षा स्टँड बॅरिकेड्स लावून बंद करणार नाही, अशा आश्वासनानंतरही रेल्वे प्रशासनाने बॅरिकेडिंग लावण्याचा प्रयत्न केल्याने रिक्षाचालक धास्तावले आहेत. या प्रकरणी मध्यस्थी करणारे खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा भेटणार असल्याची माहिती नाशिकरोड रिक्षाचालक मालक युनियनचे अध्यक्ष किशोर खडताळे, अनिल शिंदे, मोहम्मद सय्यद, रमेश दाभाडे यांनी दिली. आक्रमक पवित्रा घेत रिक्षाचालकांनी रेल्वे प्रशासनाने रात्री दोन वाजता लावलेले बॅरिकेडिंग लगेचच काढायला लावले.

पथदीप बंद

नाशिकरोड : येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरील बहुतांश पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने या उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी अंधारातूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. महापालिकेच्या विद्युत् विभागाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.या उड्डाणपुलावरील पथदीप बंद असल्याने या उड्डाणपुलावर किरकोळ अपघातही होत असतात.बहुतांश पथदीपांच्या वायरी तुटलेल्या असून, डीपीही उघड्या पडलेल्या आहेत.त्यामुळे येथील पथदीपांचे वायरिंगही धोकादायक बनले आहे.

भिकाऱ्यांनी काढला पळ

पंचवटी : भिकारीमुक्त शहर करण्यासाठी रामकुंड परिसरातील भिकाऱ्यांना पकडण्यासाठी सोमवारी सकाळी पोलिस आले असता काही भिकाऱ्यांनी तेथून पळ काढला. भिकाऱ्यांची धरपकड करताना रामकुंडावरील दहा भिकारी पोलिसांच्या हाती लागले. या भिकाऱ्यांची इतरत्र व्यवस्था करताना शिक्षण, रोजगारनिर्मिती करण्याचा प्रयत्न होणार आहे.

अवजड वाहतूक सुरूच

जेलरोड : जेलरोडवर अवजड वाहनांना प्रतिबंध असल्याचा दुसरा फलक आता नांदूर नाक्यावर चित्रासह लावण्यात आला आहे. मात्र, तरीही वाहनचालक या रस्त्याने अवजड वाहने नेत आहेत. बिटको चौकात असा बोर्ड दोन वर्षांपूर्वी लावण्यात आला होता. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. तीन महिन्यांपूर्वी दोघांचा ट्रक अपघातात मृत्यू झाल्यानंतर प्रशासन जागे झाले व आता नांदूर नाक्यावर नो एन्ट्रीचा फलक लावण्यात आला आहे. तरीही गॅस व ज्वालाग्राही पदार्थांचे टँकर व अन्य अवजड वाहनेनी या मार्गाने धावत आहेत.

संगीतव्यवस्था हवी

जेलरोड : महापालिकेच्या शाळा क्रमांक १२५ मागील जॉगिंग ट्रॅकवरील आल्हाददायक वातावरणामुळे सकाळी व सायंकाळी येथे जॉगिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या ट्रॅकवर पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि संगीत यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. येथे पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करावे, ट्रॅकच्या उत्तरेकडील भागात बसणारी प्रेमीयुगुले, तसेच आडबाजूला मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

--

माहितीपुस्तिका गुरुवारी -२

पाण्यासाठी प्रवाशांची पळापळ -३

अवास्तव शुल्कवाढीने भुर्दंड -४

हृदयरोग : धोका टाळता येतो -५

परफेक्ट नातं म्हणजे काय? -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडक्रॉस दिनानिमित्त आज मोफत शिबिर

$
0
0

नाशिक : जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त मंगळवारी (दि. ८) रेडक्रॉस, टिळक पथ, रविवार कारंजा येथे सकाळी १० ते १२ या वेळेत विविध आरोग्य शिबिर होणार आहे. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत अस्थिरोग निदान व हाडांचा ठिसूळपणा तपासणी तर नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रतपासणी शिबिर होईल. शिबिराच्या ठिकाणीच सकाळी ९ ते ११ या वेळेत नावनोंदणी होणार असल्याची माहिती रेडक्रॉसचे सचिव मेजर पी. एम. भगत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यशाळेतून शेतकऱ्यांनाजोडधंद्याचा कानमंत्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

शेतशिवारात राबराब राबणाऱ्या बळीराजाला शेतीउन्नतीसह शेतीपूरक जोडधंद्याची साथ लाभावी अन् त्यातून त्याचे आर्थिक जीवनमान उंचावले जावे यासाठी शासनाच्या दिशानिर्देशानुसार कृषी विभाग व 'आत्मा'ने संयुक्तरित्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर उपक्रम कार्यक्रम हाती घेतला आहे. याच उपक्रमांतर्गत येवला तालुक्यात झालेल्या किसान कल्याण कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्याने शेतीपूरक जोडधंद्याची कास धरावी यासाठी येवल्यात तालुका कृषी कार्यालयाच्या कृषी चिकीत्सालय प्रशिक्षण हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शेतकरी जनजागृतीपर कार्यशाळेत कृषी विभागाच्या अधिकारी व मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रगतीच्या दृष्टीने मोलाचा कानमंत्र दिला. येवला प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले.या कार्यशाळेत कुंदेवाडी (निफाड) येथील गहू संशोधन केंद्राचे डॉ. एस. डी.पाटील यांनी 'कापुस लागवड तंत्रज्ञान व गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन' या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. नाशिक येथील मत्सव्यवसाय विभागाचे एस. वाय. भोई यांनी 'मत्सशेती व मत्सविभागाच्या विविध योजना' यावर प्रकाशझोत टाकला. पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एस. नाशिककर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या, तर पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत वास्ते यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांकडे लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजप’चा भाव वधारला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या निवडणुकीत सोमवारी माघारीनंतर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यामुळे भाजपचा भाव वधारला आहे. शिवसेनेतर्फे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीतर्फे अॅड. शिवाजी सहाणे व जिल्हा विकास आघाडीतर्फे परवेझ कोकणी हे तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजपने अद्याप आपली भूमिका स्पष्ट न केल्यामुळे या निवडणुकीतील संभ्रम कायम आहे.

विधान परिषदेच्या नाशिकसह सहा जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपकडून अनेक पदाधिकारी इच्छुक होते. पण, नाशिकची जागा शिवसेनेकडे केल्यामुळे भाजपचा हिरमोड झाला. राज्य पातळीवर झालेल्या अघोषित युतीत शिवसेनेने तीन मतदारसंघांत उमेदवार उभे केले, तर उर्वरित तीन जागी भाजपचे उमेदवार आहेत. सध्या भाजपच्या गोटात असलेले जिल्हा बँकेचे संचालक परवेझ कोकणी यांनी अपक्ष अर्ज दाखल करीत जिल्हा विकास आघाडीतर्फे ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या उमेदवारीला भाजपने मात्र अद्याप कोणताही अधिकृत पाठिंबा न दिल्यामुळे संभ्रम कायम आहे.

३२३ मतांची आवश्यकता

विधान परिषद निवडणुकीसाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे जिल्ह्यातील १५ सभापती मतदार आहेत. ६४४ मतदार असलेल्या या निवडणुकीत विजयासाठी ३२३ मतांची आवश्यकता लागणार आहे. पण, तिरंगी लढतीमध्ये हा आकडा आता मतांच्या विभागणीवर अवलंबून राहणार आहे.

असे आहे पक्षीय बलाबल

शिवसेनेकडे २११ मतदार असून, राष्ट्रवादी व काँग्रेसची एकत्रित संख्या १७१ आहे. त्यामुळे उर्वरित २६२ मतदारांचा कोणताही अधिकृत उमेदवार नाही. त्यात भाजपकडे १६७ मते असून, त्यांना पक्षाने आदेश दिल्यानंतर ते कोणाला मत देतात हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे ९५ मते ही विविध छोट्या पक्ष व अपक्षांची आहेत. ती कोण आपल्या पारड्यात टाकून घेतो यावरही बरेच काही अवलंबून आहे.

सर्वांना बंडखोरीची भीती

लढत तिरंगी होत असल्याने सर्वच उमेदवारांना बंडखोरीची भीती आहे. या निवडणुकीत पक्षातंर्गत गटबाजीमुळे कागदावर दिसणारी मते प्रत्यक्षात पडतील का, याबाबत साशंकता आहे. त्यात पैशाचे गणितही या निवडणुकीत गडबड करणारे असल्यामुळे आकडेमोड करणाऱ्यांचा गोंधळ वाढला आहे.

भाजपासह इतर पक्षांतील मतदारांचा आपणास पाठिंबा आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यास स्थानिक आमदार मिळणार असल्याने एकजुटीने प्रयत्न होत आहेत.

-परवेझ कोकणी, अपक्ष उमेदवार

भारतीय जनता पक्षाचा कोणताही आदेश नाही, सूचना नाही. पक्ष सांगेल तसे काम करावे लागेल. तीस वर्षांच्या राजकारणात असे पहिल्यांदाच घडले. आमचा कोणताही अधिकृत उमेदवार नाही.

-बाळासाहेब सानप, आमदार तथा शहराध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images