Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

तिरंगी लढतीने रंगत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणातून दोन अपक्ष उमेदवारांनी सोमवारी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, यंदा तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. आमदारकीसाठी शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले असून, आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा प्रारंभ होत आहे.

विधान परिषद निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने रंग भरू लागले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीसाठी सोमवारचा दिवस निवडणूक आयोगाने निश्चित केला होता. त्यामुळे निवडणुकीचा आखाडा कोण सोडणार आणि कोण पाय घट्ट रोवून झुंज देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सकाळी १० ते दुपारी तीन ही अर्ज माघारीची मुदत होती. दुपारी अडीचपर्यंत अर्ज माघारीसाठी कोणीही उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकला नाही. परंतु, अडीच वाजता काँग्रेसपुरस्कृत अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि पाठोपाठ देवळा विकास आघाडीचे अशोक आहेर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. दुपारी तीन वाजता अर्ज माघारीची मुदत संपूनही या दोघांव्यतिरिक्त अन्य कुणी अर्ज माघारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकले नाही. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांनी आपले आव्हान कायम ठेवले असून, ही तिरंगी लढत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.

प्रचारासाठी तेरा दिवस

निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी सर्वच उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. प्रचाराला यापूर्वीच सुरुवात झाली असली, तरी प्रतिस्पर्धी कोण असणार याचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. त्यामुळे मंगळवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ फुटणार आहे. एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी उमेदवारांनी रणनीती आखली असून, जिल्ह्यातील ६४४ मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना केवळ १३ ते १४ दिवसांचा अवधी मिळणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचे संकेत मिळू लागल्याने भाजपमधील नेत्यांचे निकटवर्ती मानले जाणारे कोकणी माघार घेतील, असा कयास बांधला जात होता. परंतु, कोकणी यांनी माघार न घेतल्याने ही निवडणूक तिरंगी होईल हे स्पष्ट झाले आहे.

--

आघाडीबाबतचा निर्णय झाला नव्हता. त्यामुळे पक्षाच्या सूचनेनुसार अपक्ष अर्ज दाखल केला. आता आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार या निवडणुकीतून माघार घेत असून, आघाडीचा धर्म पाळून राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार आहोत.

-ज्ञानेश्वर गायकवाड, माघार घेणारे अपक्ष अर्जदार

--

अपक्ष उमेदवारी करणारे परवेज कोकणी माझे मित्र आहेत. आपण माघार घ्यावी यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यांना सहकार्य व्हावे यासाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे. कोकणी यांच्या गळ्यात विजयाची माळ पडावी याकरिता देवळा नागरी विकास आघाडीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत.

-अशोक आहेर, माघार घेणारे अपक्ष अर्जदार

--

\Bलोगो : विधान परिषद निवडणूक\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पिवळ्या पट्ट्याची डेडलाइन!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाहनचालक, व्यापारी यांच्यासह पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेल्या एम. जी.रोड ते मेहेर सिग्नल रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदल सोमवारपासून सुरू झाला आहे. त्याची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर होत असून, दोन्ही बाजूंना पिवळ्या पट्ट्याच्या आत वाहने लावण्याची डेडलाइन वाहनधारक सकारात्मकतेने पाळताना दिसून आले.

शहराच्या मुख्य बाजारपेठेचा भाग असलेल्या एम. जी.रोडवरील बहुतांश इमारतींसाठी पार्किंगची सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांसह ग्राहकांना आपली वाहने रस्त्यावरच पार्क करावी लागतात. मुळात अरुंद रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यातच या रस्त्यावर शहर बसदेखील धावत असल्याने दर काही तासांनी या रस्त्यावर कोंडी होत असल्याची स्थिती असते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सम-विषम पार्किंग येथे सुरू केले होते. त्यानुसार एम. जी.रोडच्या उत्तरेस सम तारखेस चारचाकी, तर दक्षिणेस दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली होती. विषम तारखेस या उलट परिस्थिती होती. मात्र, या व्यवस्थेला व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी नेहमीच छेद दिला. सम-विषम पार्किंगऐवजी सोयीच्या ठिकाणी वाहने पार्क करण्यावर वाहनचालकांनी भर दिला. त्यामुळे येथे नवीन येणाऱ्या वाहनचालकांमध्ये संभ्रम होतो. त्यातच येथून वाहन टोइंग झाल्यानंतर नागरिक आणि टोइंग कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतात. गेल्या काही महिन्यांपासून वादांचे प्रमाण वाढलेच होते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर येथील पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला.

...तर होणार कारवाई

एम. जी.रोडवरील सांगली बँक सिग्नल ते मेहेर सिग्नलदरम्यान रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पिवळ्या पट्ट्यांच्या आतील बाजूस सर्व प्रकारच्या दुचाकी व चारचाकी वाहनांना (अवजड वाहने वगळून) पार्किंग खुले करण्यात आले आहे. एम. जी.रोडवरील पिवळ्या पट्ट्यांच्या बाहेर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने पार्क होणाऱ्या वाहनांवर नो पार्किंग नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. या बदलाबाबत सोमवारी सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने पार्क करता येत असल्याने वाहनचालकांमध्ये समाधान दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैनिक नागरिकांसाठी प्राणांची आहुती देतात

0
0

अनुराधा प्रभूदेसाई यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील आपण सर्वजण सीमेवर तैनात असलेल्या कर्तव्यतत्पर सैनिकांमुळे सुखाने राहू शकतो. सीमावर्ती भागात सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला तो वेळप्रसंगी स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन करत असतो. आपण सर्वजण घरांमध्ये सुखाने झोपत असतो तेव्हा हे सैनिक हाडे गोठवणाऱ्या थंडीमध्ये डोळ्यात तेल घालून सीमेवर खंबीरपणे उभा असतो, असे प्रतिपादन लक्ष्य फाउंडेशनच्या अनुराधा प्रभूदेसाई यांनी केले.

वसंत व्याख्यानमालेत सोमवारी 'ऋणानुबंध सैनिकांशी : कारगील शौर्यगाथा' या विषयावर अनुराधा प्रभूदेसाई यांच्या ओघवत्या मनोगताने उपस्थित प्रेक्षकवर्ग भारावून गेला. गोदाघाटावरील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे. प्रभूदेसाई म्हणाल्या, की आपले हे सैनिक कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात, त्यांची दिनचर्या कशी असते याचा साधा विचारही कधी आपल्या मनाला शिवत नाही. ते जर सीमेवर नसतील तर, आपले काय होईल, अशा या सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा सहानुभूतीने विचारही आपण करत नाही. या जवानांचे जगणे बघितले की आपण किती क्षुद्र विचार करतो याची जाणीव होते आणि आपली मान खाली जाते…. सीमेवरच्या जवानांची अंगावर काटा आणणारी चित्तर कथा प्रभूदेसाई यांनी पोटतिडकीने मांडली. …

सीमेवरील विशेषत: काश्मीरमधील सीमेलगत तैनात असलेल्या सैनिकांचे जीवन पाहिले की थक्क व्हायला होते. जीवन कसे जगायला हवे हे या सैनिकांकडून अजून शिकायला हवे असेही प्रभूदेसाई यांनी आवर्जून सांगितले. आपल्या मुलांना सैन्याचे क्षेत्र निवडू द्या असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने पालकांना केले. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये सीमेवरच्या जवानामुळे आपण सुरक्षित आहोत, हा विचार तरी कधी आपल्या मनात येतो का? कोणता क्रिकेटपटू निवृत्त झाला किंवा नट-नट्यांच्या गॉसिपच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होतात आणि या बातम्या आपण सर्वचजण मोठ्या आवडीने वाचतो. पण, आज किती विद्यार्थ्यांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे माहीत आहेत, असा सवाल यावेळी प्रभूदेसाई यांनी उपस्थितांना केला. प्रारंभी उत्तमराव ढिकले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंचावर माजी शहर अभियंता सुनील खुने, शेखर ढिकले यांची उपस्थिती होती.

आजचे व्याख्यान

वक्ते : यजुर्वेंद्र महाजन

विषय : स्पर्धा परीक्षांची निवड व तयारी कशी करावी?

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

वसंत व्याख्यानमाला : पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता सुरक्षेसाठी २०५ हॉर्न नष्ट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलिसांनी रोड रोलरच्या सहाय्याने तब्बल २०५ हॉर्न नष्ट केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कारवाई दरम्यान पोलिसांनी हे हॉर्न जप्त केले होते. वाहनधारकांनी ध्वनी प्रदूषणाचाही विचार करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

काही महिन्यांपासून शहर पोलिसांच्या वतीने ध्वनी प्रदूषणाबरोबरच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रदूषणकारी हॉर्नवर कारवाई केली जात होती. विविध वाहनांवरील हे हॉर्न पोलिसांनी जप्त केले होते. रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप पोलिस मुख्यालयात सोमवारी झाला. याप्रसंगी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याचवेळी रोड रोलरच्या खाली हे सर्व २०५ हॉर्न नष्ट करण्यात आले. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. अनावश्यक आणि बेकायदा असलेले हे हॉर्न वाजवू नयेत. किंबहुना असे हॉर्न वाहनांना बसवूच नयेत, 'नो हॉकिंग' संकल्पना राबवावी, असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले.

फोटो आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपक मंडळातर्फे कार्यशाळा

0
0

पंचवटी : दीपक मंडळ सांस्कृतिक विभाग, नाशिकच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी, १० मे ते ९ जून दरम्यान नाट्य शिक्षण कार्यशाळा होणार आहे. यात कथाकथन, अभिनय, लेखन, दिग्दर्शन, आवाज, रंगभूषा, संगीत, नेपथ्य आदी विषयावर अभ्यास आणि सादरीकरण केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी गुरुवारी (दि. १०) सायंकाळी साडेसहा वाजता शौनकाश्रात, कपालेश्वर मंदिरामागे, पंचवटी येथे उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षकारांच्या हाती झटपट निकाल

0
0

अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा झिरो पेंडन्सीच्या दिशेने

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक विभागात अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा वेगाने केला जात आहे. वर्षभरात विविध शाखांतील तब्बल ३ हजार २१९ प्रकरणे निकाली काढून राज्यात अव्वल कामगिरी करण्यात आली. अप्पर आयुक्त जोतिबा पाटील यांनी झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोझल प्रक्रियेला प्राधान्य दिल्याने पक्षकारांच्या हाती झटपट निकाल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अप्पर आयुक्त पाटील यांच्याकडे एप्रिल २०१७ पूर्वीची अपिल शाखेची १ हजार ४२९, ग्रामपंचायत अपिलांची ३११, जिल्हा परिषद कर्मचारी अपिले १६३, राष्ट्रीय महामार्ग ३ लवादाची १ हजार ६१३, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० लवादाची ५३३ आणि जि. प. पंचायत समितीची ४ अशी एकूण ४ हजार ५३ प्रकरणे प्रलंबित होती. यातील बहुतांश प्रकरणे २००७-०८ या वर्षांपासूनची होती. एप्रिल २०१७ नंतरही अपिल शाखेत १ हजार १८, ग्रामपंचायत अपिले ७१, जिल्हा परिषद कर्मचारी अपिले १७२, राष्ट्रीय महामार्ग ३ लवादाची ११८, राष्ट्रीय महामार्ग क्रम ५० लवादाची १०२ अशी नव्याने १ हजार ४८१ प्रकरणे दाखल झाली होती. शिल्लक ४ हजार ५३ आणि नव्याने दाखल १ हजार ४८१ अशा एकूण ५ हजार ५३४ प्रकरणांपैकी वर्षभरात अप्पर आयुक्तांनी तब्बल ३ हजार २१९ अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळविले. शिल्लक २ हजार ३१५ प्रकरणांत वर्षानुवर्षे निकालाची प्रतीक्षा असलेल्या प्रकरणांची संख्या कमी झाली आहे.

इ-डिस्निकवरही आघाडी

राज्यातील सर्व महसूल विभागांतील अर्धन्यायिक प्रकरणांचे निकाल ऑनलाइन उपलब्ध होण्यासाठी सरकारने इ-डिस्निक संगणकीय प्रणाली सुरू केली आहे. अप्पर आयुक्तांकडील सर्व अर्धन्यायिक प्रकरणांचे निकाल या इ-डिस्निक प्रणालीवर निकालाच्या दिवशीच अपलोड केले जातात. त्यामुळे नाशिक विभागाने इ-डिस्निक कामकाजातही राज्यात आघाडी मिळवली आहे. इ-डिस्निक प्रणालीमुळे दावेदारांना त्यांच्या दाव्याचा निकाल घरबसल्या ऑनलाइन उपलब्ध होण्यास मदत झाली असून त्यांच्या खर्चात बचत होऊन वेळेचा अपव्ययही थांबला आहे.

अर्धन्यायिक प्रकरणांची निर्गती आता झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोझल तत्वानुसार सुरू आहे. गेल्या दहा वर्षांपासून प्रंलंबित दावे वर्षभरात निकाली काढले आहेत. शासनाचे गतिमान आणि पारदर्शी धोरणाच्या अंमलबजावणीचे लक्ष्य साध्य झाले आहे. नागरिकांनाही वेळेत न्याय मिळण्याची अपेक्षा असते. सर्व निकाल शासनाच्या इ-डिस्निक संगणकीय प्रणालीवर उपलब्ध करून दिलेले आहेत.

- जोतिबा पाटील, अप्पर आयुक्त, नाशिक विभाग

अर्धन्यायिक प्रकरणांची स्थिती (मार्च २०१८ पर्यंत)

शाखा..........दाखल प्रकरणे..........निकाली प्रकरणे..........शिल्लक प्रकरणे

अपिल शाखा..........२,४४७....................२,०४१..........४०६

ग्रामपंचायत अपिले......३८२.......................३३०..........५२

जि. प. कर्मचारी अपिले..........३३५..........३०३..........३२

लवाद एन. एच. ३..........१,७३१..........३८२..........१,३४९

एन. एच. ५०..........६३५..........१६०..........४७५

जि. प. / पं. स...........४..........३..........१

एकूण..........५,५३४..........३,२१९..........२,३१५

लोगो : शुभवार्ता / चर्चा तर होणारच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोंडात अंडी उबविणारे मासे

0
0

काही मासे आपल्या अंड्यांचे, पिलांचे संगोपन तथा काळजी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने घेतात. काही मासे तर चक्क आपल्या तोंडातच अंडी उबवतात. मादीने अंडी घातल्यानंतर नर या अंड्यांवर शुक्राणू टाकून फलित करतो. ही फलित अंडी नंतर मासे आपल्या तोंडात घेऊन त्यांना उबविण्याचे काम करतात. यामुळे शत्रूपासून अंड्यांचे रक्षण होते आणि त्यांना ऑक्सिजनयुक्त पाणी मुबलक प्रमाणात मिळते. अंड्यांतून बाहेर आलेली पिले घशात ठेवली जातात. पाच आठवड्यांपर्यंत मातापिता पिलांची काळजी घेतात. या काळात त्यांना उपवास घडतो. त्यांना अन्न घेता येत नाही. काही सूक्ष्मजीव, प्लवक, शेवाळवगैरे अन्न म्हणून घेतात. सिक्लिड जातीचे मासे, समुद्रातील मांजर मासे आपल्या तोंडात अंडी उबवितात. ही अंडी उबविण्याचे काम फक्त नरालाच करावे लागते. गुहेत राहणारे काही अंध मासेदेखील तोंडातच अंडी उबवितात. कल्ल्यांच्या आच्छादनाखाली मासे अंडी ठेवतात व उबवितात आणि आपला वंश पुढे चालू ठेवतात.

-डॉ. किशोर पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वर्गीय नर्तक

0
0

अतिशय सुरेख, सुंदर व परीसारखा दिसणारा स्वर्गीय नर्तक (पॅरेडाइस फ्लायकॅचर) हा पक्षी बुलबुलच्या आकाराचा, पण २५ ते ३० सेंटिमीटर लांबीची शेपटी असलेला असतो. प्रौढ नर रुपेरी पांढरा असतो. त्याची शेपटीची पिले लांब फितीसारखी असतात. डोके काळे चकचकीत असून, त्यावर चकचकीत काळ्या रंगाचा तुरा असतो. मादी व बालक नर वरून तपकिरी रंगाचे व खालून राखट पांढऱ्या रंगाचे असतात. त्यांच्या काळ्या डोक्यावर लाल रंगाचा तुरा असतो. मादीला लांब शेपटी नसते. परंतु, बालक नरास तपकिरी रंगाची लांब शेपटी असते. दाट राई, बागा, नाल्याभोवतालची झाडे, बांबूंच्या जंगलात तो राहतो. हा पक्षी शहरात घरांभोवतालच्या गर्द झाडीमध्येही आढळतो. हे पक्षी साधारणपणे जोडीने असतात. हा पक्षी कीटकभक्षी आहे. उडणाऱ्या कीटकांना पकडण्यासाठी नर उंचावर कोलांट्या घेताना दिसतो. माशा, डास, फुलपाखरे इत्यादी कीटक हे त्यांचे अन्न असते. हे पक्षी कोळीष्टकांनी गुंफलेली पातळ गवताची पाती व धागे यांचे सुबक वाटीच्या आकाराचे घरटे बांधतात.

-बाबासाहेब गायकवाड, निवृत्त वनाधिकारी

चला, ओळखूया पक्षी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी ‘समाधाना’त प्रशासन अपयशी

0
0

१५ महिन्यांमध्ये तब्बल ५७६ आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक विभागात जानेवारी २०१७ ते मार्च २०१८ या १५ महिन्यांमध्ये नापिकी, कर्जबाजारीपणा आणि इतर कारणांनी तब्बल ५७६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत पोचलेल्या शेतकऱ्यांना समाधान योजनेच्या माध्यमातून परावृत्त करता येऊ शकते, याचाच जणू महसूल विभागाला विसर पडला आहे. या योजनेत समुपदेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाने मानसिक आधार द्यायचा असतो. नाशिक विभागात समाधान योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करून महसूल विभागाने बळीराजाला वाऱ्यावर सोडले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना वैफल्य आणि नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समाधान योजना राबविली जाते. नापिकी, कर्जबाजारी, अस्मानी संकट अशा अडचणींमुळे दरवर्षी शेतकरी वर्ग संकटात सापडत असतो. यातील काही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. अशा शेतकऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वर्षानुवर्षे वाढतच आहे. शेतकऱ्यांना मानसिक आधार मिळावा व त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी राज्यात समाधान योजना महसूल विभागामार्फत राबविली जाते. यात गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे तसेच या योजनांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांचे समुपदेशन केले जाते. संकटकाळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी सकारात्मक भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी समाधान योजना राबविणे अपेक्षि आहे. मात्र, या योजनेचा नाशिक विभागातील महसूल खात्याला विसरच पडलेला आहे. गेल्या वर्षभरात समाधान योजनेची विभागातील कोणत्याही जिल्ह्यात अंमलबजावणी झाली नाही. एका अर्थाने विभागातील शेतकरी बांधवाला महसूल खात्याने मानसिकदृष्ट्या वाऱ्यावर सोडले आहे. याचा परिणाम शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांत वाढ होण्यावर झाला असण्याची शक्यता आहे.

"शेतकरी आत्महत्या अधिक असलेल्या मराठवाडा सारख्या भागात समाधान योजना राबविली जाते. नाशिक विभागात तिची अंमलबजावणी होत नाही. महसूल अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने समाधान कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. येत्या काळात विभागातील सर्व जिल्ह्यांत समाधान योजनेंतर्गत कार्यशाळांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

- डॉ. दिलीप स्वामी, उपायुक्त, महसूल, नाशिक विभाग

शेतकरी आत्महत्येचा वाढता विळखा (जानेवारी २०१७ ते मार्च २०१८)

जिल्हा.............शेतकरी आत्महत्या......अपात्र प्रकरणे.........शासकीय लाभार्थी

जळगाव....................१८६.................४२......................१०३

नगर........................१६७.................८०.......................७०

नाशिक....................१२७...................५७......................६२

धुळे..........................९१...................२८......................६०

नंदुरबार.......................५....................१........................३

एकूण.......................५७६................२०८....................२९८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्राची जागा

0
0

-प्रणव प्रशांत चंद्रात्रे, इयत्ता तिसरी, किलबिल हायस्कूल

0000

प्रश्न एकदा, उत्तर दोनदा

१) विस्तवावर भाजलेला २) पाण्यातील वाहन ३) डोळ्यात घालतात

उत्तर

१) भाजका २) जहाज ३) काजळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबापुराण

0
0

आमराईतून बाजारात

आंबे आले बाजारात

ठेल्यावरती, दुकानांत

पाटी अन् पेटीत

आंबे विकणारे

येऊन बसले ऐटीत

लालबाग, केशर, हापूस, पायरी

कोणतेही विकत घेऊन जा घरी

जेवायला बसली अंगतपंगत

ताटाल्या वाटीत आमरसाची रंगत

मँगो आइस्क्रीम, लस्सी नि कुल्फी

खाताना काढूया पाहुण्यांबरोबर सेल्फी

आम्रखंड, बर्फी, शेक नि शिरा

आंब्याच्या पदार्थांवर रोज ताव मारा

गोड आंब्याच्या फोडी केल्या मस्त

सोनू, शेरू, बंटीबरोबर झाल्या फस्त

आंब्याची पोळी घातली ताटात

सुकण्याआधीच गेली पोटात

आंबा पुरवतो जिभेचे लाड

लावूया आंब्याचे एक तरी झाड

संपला सीझन पळाला आंबा

परत हवाय? मग वर्षभर थांबा...

-संध्या दीक्षित, नाशिक

--

बालकविता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासकीय बदल्यांसाठी पारदर्शी धोरणाची निकड

0
0

कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी पदोन्नती घेत अवघ्या तीन महिन्यांत मूळ स्थानी बदली करून घेतल्याने त्यांना एकप्रकारे बदल्यांचे 'गिफ्ट'च मिळाले आहे. सरकारने बदल्यांच्या बाबतीत एक निश्चित धोरण आणले पाहिजे. बदल्यांमध्ये पारदर्शकता असायला हवी. गेल्या काही वर्षांत बदल्या हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले असल्याने याबाबत चौकशी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. सरकारने यासंदर्भात निर्धारित केलेले सध्याचे धोरण कुचकामी ठरत असल्याचेच या प्रकारामुळे अधोरेखित झाले असल्याने त्याचा पुनर्विचार करून तज्ज्ञांच्या समितीमार्फत नवी धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

तात्काळ कारवाई व्हावी

सरकारी नोकरांसाठी बदल्या हा जिव्हाळ्याचा विषय असतो. परंतु, या बदल्यांबाबत नेहमीच घोळ होत असतात. सरकारच्या कोणत्याही विभागातील बदल्या म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण ठरत आहेत. कृषी खात्यातील बदल्यांचे ताजे प्रकरणदेखील त्याचाच एक भाग म्हणावे लागेल. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी.

-प्रशांत अहिरे

धोरण निश्चित करावे

एखाद्या ठिकाणाहून बदली झाल्यानंतर पुन्हा तीन वर्षे बदली न करण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा आदेश आहे. या आदेशाला मात्र सर्रास केराची टोपली दाखविली जाते. इच्छित स्थळी बदली व्हावी यासाठी सर्वच विभागांत भ्रष्टाचार सुरू आहे. बदली नको म्हणूनदेखील अनेकांना खिसा खाली करावा लागतो. बदल्यांबाबतीत पारदर्शक धोरण निश्चित करावे.

-संदीप दिघे

...तर पदोन्नतीच नाकारावी

केवळ पदोन्नतीचा लाभ पदरात पडून घेण्यासाठी बदली स्वीकारणे आणि त्यानंतर पुन्हा मूळस्थानी बदली होणे हे सगळेच संशयास्पद आहे. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. मुळात बदल्यांच्या बाबत एक सुसूत्रता असायला हवी. मात्र, ती नसल्यामुळेचा असे प्रकार घडताना दिसून येतात. सरकारने अशा प्रकरणांत पदोन्नती नाकारणे जास्त योग्य राहील.

-हेमराज निकम

अनागोंदी अधोरेखित

बदल्यांचे भूत नेहमीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर बसलेले असते. अनेक वेळा तर चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून बदली केली जाते. कृषी विभागातील प्रकार मात्र उलट झाला आहे. केवळ पदोन्नती पदरी पाडून घेण्यासाठी बदली स्वीकारली जाते आणि अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा बदली करून घेतली गेली. यावरून अनागोंदी सुरू असल्याचे दिसते.

-अभिजित देसले

वरिष्ठ स्तरावर व्हावी चौकशी

कृषी खात्यात बदल्यांचा झालेला घोळ उघडकीस आला असून, या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. अवघ्या तीन महिन्यांत बदली होतेच कशी, हा खरा प्रश्न आहे. सामान्य प्रशासन विभागासदेखील यात अंधारात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यात वरिष्ठ स्तरावरून काही चुकीचे घडत आहे का, याचीदेखील वरिष्ट स्तरावरून चौकशी झाली पाहिजे.

-किशोर हिरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंबरची करावी दुरुस्ती

0
0

नवीन सीबीएस

चेंबरची करावी दुरुस्ती

नवीन सीबीएस परिसरातील प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असलेले गटारीचे चेंबर फुटले आहे. परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक गैरसोय सहन करावी लागत आहे. संबंधित यंत्रणांनी येथे दुरुस्ती करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी.

-संदीप कापरे

लोहोणेर

निवारा शेडअभावी गैरसोय

नाशिक-नंदुरबार हायवेवर लोहोणेर येथे एसटी महामंडळाच्या बसेस थांबतात. पण, येथे प्रवाशांसाठी निवारा शेडच नाही. त्यामुळे प्रवाशांना उन्हातच थांबावे लागत आहे. या थांब्यावर कायमच मोठ्या संख्येने प्रवासी थांबत असल्याने येथे निवारा शेड उभारण्याची आवश्यकता आहे.

-विलास भालेराव

देवळाली कॅम्प

विजेच्या खांबाची दुरवस्था

देवळाली कॅम्प येथील नागझिरा नाल्यासमोरील पीरबाबा दर्ग्याजवळचे हे दृश्य आहे. येथील विजेचा खांब गंजलेला आहे. त्यामुळे येथे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना नम्र विनंती आहे, की त्यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून दुरुस्तीकाम करावे.

-संदीप कटारे

महात्मानगर

सुशोभीकरण रखडले

महात्मानगर परिसरात रस्त्यावर सुशोभीकरण प्रकल्प असे लिहून ठेवलेले आहे. परंतु, तेथे मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याची स्थिती दिसून येत आहे. याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नाशिकचे हसू होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व महापालिका यंत्रणेने यासंदर्भात तातडीने उपाय योजावेत.

-भारत भुरे

कसारा

रेल्वेने कारवाई करावी

कसारा येथून लोकलने मुंबईला जाण्याचा योग नुकताच आला. या प्रवासादरम्यान अनेक उणिवा दिसून आल्या. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे लोकलमध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करण्याऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. हे जीवघेणे ठरणारे आहे. त्यामुळे यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी.

-जय जोशी

पाटीलनगर

बालसंस्कार शिबिरांची निकड

पाटीलनगरमधील स्वामी समर्थ केंद्रात एकदिवसीय उन्हाळी बालसंस्कार शिबिर नुकतेच झाले. या शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. पोलिसांनीही यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अशी शिबिरे अधूनमधून घेतल्यास निश्चितच मुलांवर सुसंस्कार बिंबविले जाऊ शकतील, असे वाटते.

-सौरभ अमृतकर

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरवाड्याच्या माधवकडे नाण्यांचा ‘खजिना’

0
0

शिवराईपासून अनेक दुर्मिळ नाण्यांचा अनोखा संग्रह

म. टा. वृत्तसेवा निफाड

सध्या भारतीय चलनात मोठ्या चलनी नोटांचा बोलबाला आहे. त्यामुळे चलनी नाण्यांना फारसे कोणी संग्रही ठेवत नाही. आगपेटीत नाणी भरून अप्रुप जपणारे मुलेही आजकाल कुठे दिसत नाही. मात्र शिरवाडे येथील किराणा व्यावसायिक माधव मनोहर चिंचोळे यांनी शिवराईपासून दुर्मिळ नाणी गोळा करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्याकडे आजही शिवकालीन, ब्रिटीशकालीन अशी विविध प्रकारची दुर्मिळ नाणी आहेत. जिल्ह्यातील नातेवाईक, आप्तेष्टांकडून त्यांनी आतापर्यंत बरीच नाणी संकलीत केली आहेत.

लहान मुलांना या संग्रहातून ते इतिहासकालीन चलनाची माहिती देतात. शालेय तसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दुर्मिळ चालनाविषयी माहिती घ्यावी, असा त्यांचा आग्रह असतो. माधव चिंचोळे यांचे वडील मनोहर चिंचोळे यांना देखील चलनातील नाणी व नोटा जमविण्याचा छंद होता. त्यांनी तो काही वर्षे जपला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत माधव चिंचोळे यांनी देखील ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे.

त्यांच्या संग्रहात शिवकालीन चलन शिवराई, आणे, सन १९६१चे २ पैसे, ५ पैसे, सन १९७१ चे कमळाचे चित्र असलेले १०, २० पैसे, सन १९६२ चा नया पैसा, सन १९६९ चे १० पैसे, पितळी २० पैसे, सन १९४४ चा २ आणा, स्वातंत्र्यानंतरचे पहिलेच १९४७ चे वाघाचे चित्र असलेले नाणे, सन १९६२चा १ नया पैसा, २५, ५० पैसे व १ रुपयाची अनेक प्रकारची नाणी, कारलोसचा फोटो असलेले पोर्तुगालचे नाणे, सन १८५८ चा विक्टोरिया राणीचा फोटो असलेला व इस्ट इंडिया कंपनीचा उल्लेख असलेला वन क्वार्टर आणा, सन १९४४ व १९४७ चा जॉर्ज वी किंग एम्बरॉरचा फोटो असलेले २ आणे व १ रुपया, सन १९२५, १९५६, १९५३चे नाणे, सन १९६३चे २ नये पैसे, अॅल्युमिनिअमचे ५, १०, २० पैसे, सन १९८६ चे मत्स्य उद्योगाचे नाव व दुसऱ्या बाजूला मासे पकडताना कोळी व होडीचे चित्र असलेले ५० पैशाचे नाणे, बैल व औतकरी असलेला नेपाळचा २ रुपया, सन १९८४ चा इंदिरा गांधींचा फोटो असलेला व आकाराने मोठ्ठा असलेला ५ रुपयाचा शिक्का, सालाचा उल्लेख नसलेली आकाराने मोठी असलेली १० रुपयाची नोट, सन १९७८ साली मनमोहनसिंग वित्तसचिव असतांना त्यांच्या सहीची १ रुपयांची नोट अशी बरीच नाणी व नोटा संग्रही आहेत.

लहान मुलांना जुन्या नाण्यांमधून आपला इतिहास व संस्कृती माहीत व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे ही दुर्मिळ नाणी मी जपून ठेवली आहेत. शिवकाळातील नाण्यांमुळे विद्यार्थ्यांना शिवकाळ देखील माहिती होऊन इतिहासाची आवड निर्माण होईल. -माधव चिंचोले, संग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळेगाव बंधाऱ्यात पोहणाऱ्यांची मनसोक्त डुबकी

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

थंडीत राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद होणाऱ्या निफाड तालुक्यात उन्हाळ्यातही तापमानाने उच्चांक गाठला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. हिवाळ्यात ४ डिग्री तर आणि उन्हाळ्यात थेट ४० डिग्रीपर्यंत तापमान वाढत असल्यामुळे असह्य होणारा उकाडा कमी व्हावा यासाठी लासलगाव-पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील खाणगाव परिसरात खडक माळेगाव बंधारा येथे पोहणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. दोन पोहणाऱ्या हौशी व्यक्तींपासून सुरू झालेला स्विमिंग ग्रुप आता दीडशे लोकांचा समूह बनला आहे. सकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत या बंधाऱ्यात मनसोक्त डुंबणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

उन्हाळ्यात नदी, तलावात मनसोक्त पोहायला अनेकांना आवडते. ग्रामीण भागात नद्या आणि बंधाऱ्यांमध्ये पूर्वी पाणी असल्याने उन्हाळ्यात पोहणाऱ्यांची मजा असायची. परंतु आता ठिकठिकाणी झालेले बंधारे, धरणे, तलावांमुळे खळखळ नद्या कोरड्या पडल्या आहेत. उन्हळ्यात तर तलावही कोरडे पडल्यामुळे पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील स्विमिंग पूलमध्ये गर्दी होत आहे. मात्र तेथे असलेले पाणी, होणारी गर्दी यामुळे सगळ्यांनाच संधी मिळते असे नाही. त्यातच लासलगाव शहरात पोहण्यासाठी स्विमिंग पूलच उपलब्ध नाही. त्यामुळे पोहण्याचा व्यायाम करण्यासाठी लासलगाव शहर व परिसरातील डॉक्टर इंजिनीअर, शिक्षक, पत्रकार, शेतकरी व व्यापाऱ्यांनी एकत्र येत स्विमिंग ग्रुपची स्थापना केली आहे. शहरापासून १० किलोमीटरवर लासलगाव-पिंपळगाव बसवंत मार्गावर खाणगाव परिसरात खडक माळेगाव बंधारा येथे जात आहेत. येथे पोहोण्याचा मनसोक्त आनंद सध्या हा ग्रुप घेत आहे.

योग्य साहित्याचा वापर

बंधाऱ्यामध्ये पोहणे हे धोक्याचे असते. मात्र या स्विमिंग ग्रुपच्या वतीने येथे येणाऱ्या प्रत्येक सदस्याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. योग्य त्या साहित्यांचा वापर या ग्रुपच्या वतीने करण्यात येत आहे. उन्हाळ्यात वाढती गर्दी लक्षात घेता पोहण्यासाठी येणाऱ्यांना प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शनही केले जात आहे. पोहायला येणाऱ्यांसाठी या ग्रुपने पोशाखही सक्तीचा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘​​एसव्हीकेटी’मध्ये उद्या माजी विद्यार्थी मेळावा

0
0

देवळाली कॅम्प : येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात गुरुवारी (दि. १०) सकाळी १० वाजता कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होणार आहे. प्राचार्य डॉ. विजय मेधने यांनी ही माहिती दिली. महाविद्यालयात अधिकृत माजी विद्यार्थी महासंघाची स्थापना करण्यात आली असून, महाविद्यालयाप्रति असलेली जबाबदारी स्वीकारून अधिकाधिक माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थित राहावे. यावेळी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देण्याची संधी लाभणार आहे, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

अक्षय हिरेंची निवड (फोटो)

नाशिक : त्रिमूर्ती चौकातील रहिवासी अक्षर हिरे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या (नागपूर) नाशिक शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष चेतन कासव यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. त्यांच्या नियुक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक मेंढी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निशिकांत काशीकर आदींनी स्वागत केले आहे.

बीज संकलनाचा संकल्प

देवळाली कॅम्प :   येथील आनंदरोड परिसरातील दर्शन अॅकॅडमी  शाळेच्या  सर्वच विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या  उन्हाळ्यात  बीज संकलनाचा संकल्प केला आहे. संकलित केलेले बीज परिसरात टाकून वृक्षवाढीसाठी हातभार लावण्यात येणार  आहे. वड, पिंपळ, जांभूळ, सीताफळ, चिंच, बोर, आंबा यांसारख्या वृक्षबीजांचा प्राधान्य देण्यात येणार असून, शाळेतर्फे गड, किल्ले, रस्त्यांच्या कडेने, ओसाड माळरानावर असे बीज असलेले गोळे  टाकण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाळ्यात त्यातील बी रुजून झाडे उगवतील. या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संगीत यंत्रणेची गरज

जेलरोड : महापालिकेच्या शाळा क्रमांक १२५ मागील जॉगिंग ट्रॅकवरील आल्हाददायक वातावरणामुळे सकाळी व सायंकाळी येथे जॉगिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या ट्रॅकवर पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि संगीत यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. येथे पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करावे, ट्रॅकच्या उत्तरेकडील भागात बसणारी प्रेमीयुगुले, तसेच आडबाजूला मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

(थोडक्यात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नसराईनंतर कांदा गडगडणार?

0
0

सध्याच्या दराबाबतही शेतकऱ्यांमध्ये नाराजी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ६०० ते ६५० असे सरासरी भाव टिकून आहेत. सध्या उन्हाळ कांद्याची मार्केटमध्ये आवक असून, अपेक्षेप्रमाणे भाव नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र लग्नसराई संपल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कांदा आवक वाढेल, अशी शक्यता बाजार समित्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आवक वाढल्याने भावही घसरण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचा लाल कांदा संपला असून आता फक्त उन्हाळ कांद्याचीच आवक जिल्ह्यातील लासलगावसह सर्वच बाजार समितीत होत आहे. लग्नसराई सुरू असल्याने काही प्रमाणात आवक मंदावली असली, तरीही भाव मात्र गेल्या १५ ते २० दिवसापासून स्थिर आहेत. जिल्ह्यात लासलगाव आणि पिंपळगाव या दोन बाजार समितीत कांद्याची आवक मात्र टिकून आहे. रोज २५ ते ३० हजार क्विंटलची आवक या ठिकाणी होत आहे.

मंगळवारची आवक (क्विंटलमध्ये)

पिंपळगाव २४ हजार ९७५

लासलगाव १४ हजार ६६०

उमराणे २० हजार

चांदवड १५ हजार ७००

सायखेडा ४६००

विंचुर ७ हजार

दिंडोरी २५००

निफाड २६९१

साठवणुकीकडे लक्ष

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याला मंगळवारी कमीत कमी ३००, जास्तीत जास्त ९६१ (पिंपळगाव बाजार समिती) व सरासरी ६२५ ते ६७५ रुपये असा भाव होता. लासलगाव येथे नाफेडने ३२५ क्विंटल कांदा खरेदी केला ८०० रुपये किमान, जास्तीत जास्त ८७५ रुपये तर सरासरी ८२० रुपये प्रति क्विंटलला भाव नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याला होते. उन्हाळ कांदा हा टिकायला चांगला असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीकडे कल आहे. कांदा चाळींमधे कांदा साठवण्याचे काम काही शेतकरी करीत आहेत. तर काही ठिकाणी अजूनही शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. १५ मेपर्यंत लग्नसराई असल्याने कांदा आवक कमी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूल होईना खुला...

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

 नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी गावाजवळ दारणा नदीपात्रात कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या पुलावरील वाहतुकीला वृक्षतोडीबाबत न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमुळे लागलेला 'ब्रेक' गेल्या वर्षभरापासून कायम आहे. परिणामी हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला होऊ शकलेला नाही.

दारणा नदीपात्रात ब्रिटिशकालीन आर्च ब्रिज प्रकारातील दगडी पूल आहे. या पुलाचे आयुर्मान संपलेले असल्याने नाशिक-पुणे महामार्गाच्या नुकत्याच झालेल्या रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामात येथे नव्याने चौपदरी पूल उभारण्यात आलेला आहे. या नव्या पुलाच्या उभारणीसाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्चही झालेला आहे. मात्र, अद्यापही या पुलाची एक बाजू सार्वजनिक वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने येणारी सर्व वाहतूक जुन्या दगडी पुलावरूनच सुरू आहे. वास्तविक हा पूल पूर्ण होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र, तरीही हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.

२३६ झाडांचा प्रश्न

 नाशिक-पुणे महामार्गाच्या सिन्नर फाटा ते चेहेडी गाव यादरम्यानच्या अंतरातील २३६ विविध प्रकारची झाडे तोडावी लागणार आहेत. या वृक्षतोडीस वृक्षप्रेमींनी उच्च न्यायालयात हरकत घेतली असून, ही याचिका गेल्या काही वर्षांपासून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत या याचिकेवर अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत येथील पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाणार नाही. या याचिकेच्या संदर्भाने येथील झाडे तोडण्यासंदर्भात अहवाल देण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने नुकतीच नागपूरच्या 'निरी' या संस्थेवर टाकली आहे.

'निरी'च्या अहवालानंतर निर्णय

आता 'निरी'मार्फत या ठिकाणच्या २३६ झाडांचे जैवविविधतेचे महत्त्व, कार्बन डायऑक्साइड कमी करण्यात त्यांचा वाटा, नवीन  पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला न झाल्याने येथील जुन्या व अरुंद पुलावरून सुरू असणारी वाहतूक व त्याद्वारे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण याचा अभ्यास 'निरी' करणार आहे. हा अहवाल उच्च न्यायालयात सादर झाल्यावर त्यावर अंतिम निकाल येणार आहे .त्यानंतर वृक्षतोडीस मान्यता मिळाल्यानंतर वृक्ष तोडले जाणार असून, त्यानंतरच दारणा पुलाची दुसरी बाजू सुरू करण्याचा अडथळा दूर होऊन हा पुल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता सी. आर. सोनवणे यांनी दिली.

लोगो : वर्षभरानंतर...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपुऱ्या जागेने गैरसोयीत भर

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरातील कामगार वस्तीचा विचार करून येथील मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र जागा मिळावी या हेतूने सावतानगर येथे उभारण्यात आलेल्या मुला-मुलींच्या स्वतंत्र अभ्यासिकांत विद्यार्थी संख्या वाढत आहे. परिणामी सध्याची जागा अपुरी पडत असून, मुलांना मुलींच्या अभ्यासिकेतील एका भागात बसावे लागत असल्याने या दोन्ही अभ्यासिकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

सावतानगर येथे असलेल्या या दोन्ही अभ्यासिकांचा कारभार परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाकडून चालविला जात असून, या अभ्यासिकेतून यंदा वीस विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात आले. सिडकोतील सावतानगर येथे बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या नावाने मुला-मुलींसाठी दोन स्वतंत्र अभ्यासिका उभारण्यात आल्या आहेत. या अभ्यासिकांच्या इमारतीही स्वतंत्र असून, अभ्यासिकांत पुरेशा मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. सावतानगरसह परिसरातील असंख्य विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासाला येत असले, तरी आता ही अभ्यासिका अपुरी पडत असल्याने काही विद्यार्थ्यांना मुलींच्या अभ्यासिकेतील एका भागात बसावे लागत आहे. त्यामुळे या दोन्हीही स्वतंत्र अभ्यासिकांची जागा वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या अभ्यासिकेचा कारभार परिसरातील श्री साई समर्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे बघितला जातो. या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना आवश्यक ती पुस्तके उपलब्ध असून, या अभ्यासिकेचे काही नियम बनविण्यात आले आहेत. मात्र, या नियमांची अंमलबजावणी होत असली, तरी ती पूर्णपणे होते की नाही, त्यासाठी या ठिकाणी पूर्णवेळ व्यवस्थापकांची नेमणूक होण्याची गरज व्यक्त होत आहे.

पिण्याच्या पाण्याचा अभाव

या अभ्यासिकेत ९२ विद्यार्थी एकाच वेळेस अभ्यास करू शकतात, तर ७६ विद्यार्थिनीही अभ्यास करू शकता. ही संख्या परिसरातील लोकसंख्येच्या मानाने अगदी कमीच असून, वाढत्या विद्यार्थी संख्येचा विचार करून या अभ्यासिकेसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे. अभ्यासिकेच्या लगतच जलकुंभ असला, तरी अभ्यासिकेत मात्र पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे.

गुणवंतांचे मिळावे मार्गदर्शन

सिडकोतील इतर अभ्यासिकांच्या तुलनेत या ठिकाणी चांगल्या सुविधा आहेत. येथे दर वर्षी विविध तज्ज्ञांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र, या अभ्यासिकेतून चांगल्या पदांवर गेलेल्या विद्यार्थ्यांचेही मार्गदर्शन या ठिकाणी मिळावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली असून, दरमहिन्याला किमान एका व्याख्यात्याचे मार्गदर्शन या ठिकाणी मिळणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त करण्यात आहे.

वर्षभरापासून या ठिकाणी अभ्यासाला येत आहे. या ठिकाणी बऱ्याच सुविधा असल्या, तरी अजूनही काही सुविधा असणे अपेक्षित आहे. अभ्यासिकेची देखरेख योग्य प्रकार ठेवण्यात येत असून, वाहनतळासाठीही जागा उपलब्ध आहे. येथील वातावरणही प्रसन्न असते.

-श्‍वेता अहिरे, विद्यार्थिनी

तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येथे येत आहे. अभ्यासला पूरक असे वातावरण येथे असून, पूर्णपणे शांतता असते. तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते. मात्र, येथे पिण्याच्या पाण्याची सोय योग्य पद्धतीने केली पाहिजे.

-समाधान लहामगे, विद्यार्थी

२०१६ पासून या अभ्यासिकेचा कारभार पाहत असून, येथे विविध प्रकारची पुस्तके, स्थानिक वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. मागणीनुसारही पुस्तके दिली जातात. जास्तीत जास्त मार्गदर्शक आणण्याचा आमचा प्रयत्न असतो.

-नाना निकम, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ

--

मटा मालिका

'परीक्षा' अभ्यासिकांची

ठाकरे अभ्यासिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माल वाहतूक करताना ई-वे बिल असणे गरजेचे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उद्योजक, व्यापाऱ्यांनी आपल्या उत्पादनाची, मालाची वाहतूक करताना आपल्या जवळ ई-वे बिल ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ई-वे बिल बनविताना पुरेशी काळजी घेणेही आवश्यक आहे. एकदा बिल बनले, तर त्यात बदल करणे अशक्य असल्याची माहिती वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त संजय पोखरकर यांनी सोमवारी आयमा रिक्रिएशन सेंटर येथे दिली.

सरकारचा उद्देश नुसता टॅक्स जमा करणे नसून, सर्वांना या सिस्टिममध्ये आणण्याचा आहे. सरकारचे याद्वारे उत्पन्न वाढले तर कराचे प्रमाण कमी होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. अंबड इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)ने उद्योजक व आस्थापनांतील कर्मचारी यांच्यासाठी ई-वे बिल कार्यप्रणालीवर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी वस्तू व सेवा कर विभागाचे संजय पोखरकर, आयमाचे सीए चेतन बंब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांचा आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या चर्चासत्राच्या आयोजनाबाबत बोलताना आयमाचे अध्यक्ष अहिरे यांनी आयमा उद्योजकांसाठी विविध प्रकारच्या चर्चासत्रांचे आयोजन करीत असते. ई-वे बिलविषयी उद्योजकांना सखोल ज्ञान मिळावे, यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

स्लाइड शोद्वारे माहिती

चर्चासत्रात सीए चेतन बंब यांनी स्लाइड शोद्वारे ई-वे बिल कशाप्रकारे बनवायचे, वाहतूकदारांची माहिती कशाप्रकारे ठेवायची, बदल कसा करावयाचा, ४० किलोमीटर अंतरापर्यत ई-वे बिल पार्ट बीची आवश्यकता नाही याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रश्नोत्तरांद्वारे उपस्थितांचे शंकानिरसनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images