Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिकमध्ये शांतता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औरंगाबाद येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीचे पडसाद नाशिकमध्ये उमटू नये यासाठी पोलिसांकडूनही खबरदारी घेण्यात आली. शहराच्या काही भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला. परंतु, नाशिककरांनीही शांतताप्रियतेचा परिचय दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. औरंगाबाद येथील मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून दोन गटांमध्ये दंगल उसळली. त्यामध्ये ३० जण जखमी झाले तर दोघांचा मृत्यू झाला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही पोलिसांनी सकाळी सहा वाजेपासूनच शहरातील काही भागांत पोलिस बंदोबस्त तैनात केला. नाशिकरोड, उपनगर, भद्रकाली, जुने नाशिक, पंचवटी परिसरात प्रत्येकी २५ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार्यालयाअभावी परवड

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जेलरोडची लोकसंख्या, नवीन इमारती, व्यापार, संस्थांची संख्या वाढल्यानंतरही येथे टपाल कार्यालय सुरू झालेले नाही. १९८० च्या लोकसंख्येच्या तुलनेत नेमलेले पोस्टमनच येथे काम करतात. त्यातील काही निवृत्तही झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना उशिराने टपाल मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. वास्तविक नाशिकरोड कार्यालयात सर्वांत जास्त टपाल जेलरोडचे असते. त्यामुळे जेलरोडला टपाल कार्यालयाची मागणी होत आहे.

नाशिकरोड टपाल कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की जेलरोडची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाच वर्षांपूर्वी तेथे टपाल कार्यालयासाठी प्रयत्न केले होते. मात्र, परवडणाऱ्या दरात जागाच मिळाली नाही. ती मिळाली, तर टपाल कार्यालय नक्की सुरू होऊ शकेल.

जेलरोडला भारत प्रतिभूती आणि नोटांचे मुद्रणालय आहे. दोन्हीमध्ये मिळून चार-पाच हजार कामगार आहेत. त्यातील बहुतांश जेलरोडला राहतात. जेलरोडला डझनभर शाळा आहेत. तीस वर्षांपूर्वी जेलरोडच्या गोदावरी नदीवर जाण्यास लोक घाबरायचे, आता जत्रा हॉटेल चौकाच्या पलीकडे लोकवस्ती झाली आहे. जेलरोडची लोकसंख्या व विस्तार वेगाने होत आहे. मात्र, त्या तुलनेत बऱ्याच सुविधांचा अभाव दिसत आहे.

नाशिकरोडला उपनगर, नेहरूनगर, देवळालीगाव, सीएनपी प्रेस येथे टपाल कार्यालय आहे. नाशिकरोड कार्यालयात सर्वांत जास्त टपाल जेलरोडचे असते. जेलरोडचा विस्तार मोठा आहे. एकलहरे, पवारवाडी, राजराजेश्वरी, भारतनगर, टाकळीरोडवरील आढाव मळा, लोखंडे मळा, गोसावी मळा आदी परिसर जेलरोड भागात येतो. या भागात नवीन वसाहती होत आहेत. इमारती होत आहेत. त्यामुळे टपाल कार्यालयाची गरज वाढली आहे.

यासंदर्भात नाशिकरोडचे पोस्टमास्तर सुधाकर जाधव म्हणाले, की पाच-सहा वर्षांपूर्वी जेलरोडच्या नेते व समाजसेवकांशी बोलणी करून आम्ही तेथे टपाल कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा महापालिका किंवा सामाजिक संस्थेची जागा कमी दरात मिळाली नाही. आताही तीच समस्या आहे. जेलरोडला टपाल कार्यालय झाले, तर पोस्टमनची पायपीट कमी होईल. टपाल वाहण्याचा प्रश्नही सुटू शकेल.

पोस्टमनची होतेय कसरत

जेलरोडची लोकसंख्या वाढल्याने टपाल वाटप करताना पोस्टमनच्या नाकीनऊ येत आहेत. सायकलवर एवढ्या मोठ्या परिसरात टपाल बटवडा करणे अवघड जाते. जेलरोडसाठी नऊ पोस्टमन नियुक्त आहेत. पोस्टमनने दररोज १२ ते १५ किलोमीटर फिरणे अपेक्षित आहे. मात्र, जेलरोडच्या पोस्टमनला ३० किलोमीटरपर्यंत फिरावे लागते. एकाकडे दरदिवसाला सातशे टपाल वाटपासाठी असतात. जेलरोडला टपाल कार्यालय उघडल्यास रोजचा टपाल वाहण्याचा त्रास वाचेल, तसेच नांदूर, मानूर, दसक, पंचक आदी परिसरालाही लाभ मिळू शकेल.

रोजंदारीवरीबाबत उदासीनता

टपाल खात्यात १९८० पासून भरतीच झालेली नाही. नाशिकरोड कार्यालयात १९८० मध्ये २५ पोस्टमन होते. आता लोकसंख्या अनेक पटींनी वाढली, तरी पोस्टमनची संख्या तेवढीच आहे. उलट त्यातील अनेक निवृत्त झाले आहेत. त्यामुळे दोनशे रुपये रोजावर माणसे भरून टपाल वाटप केले जाते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. बेरोजगार उत्साहाने येतात. तथापि, टपाल वाटपाचे अवघड काम दोन दिवस केल्यानंतर त्यातील अनेक जण गायब होतात. परिणामी टपाल साचत जाते. त्यामुळे निवृत्त टपाल कर्मचाऱ्यांचीही मदत प्रसंगी घ्यावी लागते. मनुष्यबळ कमी व काम जास्त असल्याने पोस्टमनला सुटी घेता येत नाही. ते आजही सायकलवरच टपाल वाटतात. नाशिकरोडला वीस भाग आहेत. त्या तुलनेत पोस्टमन कमी पडतात. बहुसंख्य नवीन इमारतींत लेटर बॉक्स नसतात. इमारती चढून व सायकल चालवून पोस्टमनची दमछाक होत आहे.

जेलरोडची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. दूरपर्यंत लोकवस्ती झाली आहे. या नागरिकांना नाशिकरोडच्या मुख्य टपाल कार्यालयात जावे लागते. त्यात वेळ, पैसा, श्रम खर्ची पडतात. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांचे व अन्य टपाल वेळेत मिळत नाही. हे लक्षात घेऊन येथे तातडीने टपाल कार्यालय सुरू करावे.

-गुड्डू शेख, नागरिक

(फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेकडून नुकसानभरपाई मिळण्याचा निर्णय दिलासादायक

0
0

रेल्वे प्रवासात गाडीत चढताना किंवा उतरताना अथवा प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्यास रेल्वे प्रशासनाने नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. प्रवाशाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचे कारण रेल्वे देऊ शकत नाही, हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असतात. त्यामुळे रेल्वेला आपल्या जबाबदारीपासून दूर पळता येणार नाही. नैसर्गिक मृत्यू आल्यास मुद्दा वेगळा असला, तरीही रेल्वेच्या माध्यमातून अपघात झाल्यास रेल्वेने आर्थिक मदत करणे हे रेल्वेचे कर्तव्यच आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

प्रशासनाला राहावे लागेल तत्पर

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वेतून सुखकारक व आरामदायी प्रवास सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन पुरेशी काळजी घेण्यास तत्पर राहील. अपघात व अन्य कारणांमुळे प्रवासी जखमी होण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाला यापुढे अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

-बाबुलाल मोरे

रेल्वे प्रशासनाची भूमिकाही योग्य

रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४२ ए नुसार आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:हून केलेली इजा गुन्हेगारी कृत्य, नशा आणि वेडेपणाच्या भरात केलेले कृत्य अशा स्थितीत प्रवाशांचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास रेल्वे प्रशासनाने संबंधिताला भरपाई देणे बंधनकार नाही, हा निर्णय न्यायालयांनी परस्परविरोधी निकाल दिले, तरी अत्यंत योग्य वाटतो.

-प्रवीण बागड

चुकीचा पायंडा पडण्याची भीती

रेल्वे रूळ ओलांडणे हा अपराध असतानादेखील अनेक प्रवासी, महिला दररोज ही चूक जाणते व अजाणतेपणातून करीत असतात. त्यांना कोणतीही इजा, अपघात झाल्यास रेल्वेने नुकसानभरपाई द्यावी हे जरा अतिच झाले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा प्रकारांमुळे चुकीचा पायंडा पडू शकेल. त्यामुळे कायद्याची पायमल्ली होईल असे वाटते.

-शिवा सोनवणे

'त्यांना' भरपाई देणे चुकीचेच

रेल्वे प्रशासनाची चूक नसली, तरी अपघात किंवा तत्सम दुर्दैवी घटनेते रेल्वेने भरपाई देणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयावर भाष्य करणे अयोग्य आहे. मात्र, तरीही रेल्वे प्रशासनाची कोणतीही चूक नसताना अपघातग्रस्त व जखमी झालेल्या संबंधित प्रवासी-व्यक्तीला नुकसानभरपाई देणे चुकीचे वाटते.

-निंबा राणे

जबाबदारीपासून दूर पळता येणार नाही

रेल्वे गाडीत चढताना किंवा उतरताना इजा किंवा मृत्यू झाल्यास रेल्वेने भरपाई देणे बंधनकारक असल्याचा न्यायालयाचा निर्णय अत्यंत योग्य आहे. रेल्वेने उत्तम दर्जाच्या सुविधा दिल्यास निश्चितपणे प्रवाशांना अपघात, घातपातांपासून दूर राहणे शक्य आहे. रेल्वेच्या चुकीला रेल्वेच जबाबदार असल्याने जबाबदारीपासून दूर पळता येणार नाही. त्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

-शरद अमृतकर

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आवाज’ अखेर बंद

0
0

मालेगावात डीजेवर पोलिस पथकाची कारवाई

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात सुरू असलेली लग्नसराई आणि त्यामुळे वाजत असलेले कर्णकर्कश डीजेंमुळे ध्वनीप्रदूषण विषयक निर्देशांची सर्रास पायमल्ली होत आहे. डीजेच्या वाढत्या

आवाजावर मात्र पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने शनिवारच्या अंकात 'आवाज वाढव डीजेला पोलिसांचे अभय' या मथळ्याखाली परखड वृत्त प्रकाशित करताच आधी कारवाईला टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी थेट लग्नमंडप गाठत डीजेवर कारवाई केली. उशिरा का असेना पोलिसांनी कारवाई केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी या त्याचे अभिनंदन केले आहे.

अपर पोलिस अधीक्षक पोद्दार यांच्या पथकाने ही कारवाई केली. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबत दिलेल्या निर्देशानुसार शहरातील ही पहिलीच कारवाई आहे. सोयगाव सबस्टेशनरोडवरील सूर्यवंशी लॉन्स व मंगल कार्यालय हे थेट नागरी वसाहतीत असल्याने सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळे येथे वाजणारा डीजे नागरिकांसाठी रोजचीच डोकेदुखी झाली होती. शहरात अन्यत्र देखील सर्रासपणे रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश आवाजाचे डीजे, वाजंत्री वाजविली जात आहे. तिकडेही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी आता मालेगावकर करीत आहेत.

कायद्याचे उल्लंघन होत असताना डीजेंवर पोलिस प्रशासनाकडून आजवर एकही करवाई झाली नव्हती. अखेर सोयगाव परिसरातील नागरिकांनी पोलिस उप अधीक्षक अजित हगवणे यांच्याकडे दोन वेळा लेखी तक्रार केली. मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी शुक्रवारी अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रार केली होती. पोद्दार यांनी ध्वनीप्रदूषणाची गंभीर दखल घेत विशेष पोलिस पथकाला या भागातील वाद्यांची ध्वनीपातळी मोजण्याच्या सूचना केल्या. नियमांची पायमल्ली होत असल्यास वाद्य जमा करण्याचे आदेश दिले होते. या पथकाचे पोलिस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, हवालदार देवीदास निकम, पोलिस शिपाई नीतेश खैरनार, अभिजीत साबळे, नवनाथ सूर्यवंशी यांच्या पथकाने घटनास्थळी डीजेची ध्वनीपातळी नोंदवली. यावेळी ध्वनीपातळी ११३ डेसिबल इतकी नोंदवली गेली. रहिवाशी क्षेत्रातील सामान्य ध्वनीपातळीपेक्षा हा आवाज दुप्पट व आरोग्यास घातक असल्याने पथकाने याचा पंचनामा करीत डीजे व वाद्य साहित्य जप्त केले.

'फुल बरसताच' डीजे जप्त

मंगल कार्यालय परिसरात पोलिस कारवाईचा अंदाज आल्याने पोलिस पोहाचण्याआधीच डीजे व वाद्य बंद झाले. परंतु मंगलाष्टक सुरू होण्याआधी

'बहारो फुल बरसाओ' गे गाणे वाजले आणि डीजे अडचणीत आला. या गाण्याचीच ध्वनीपातळी ११३ डेसिबल इतकी नोंदवली गेल्याने इतर वेळी किती ध्वनीप्रदूषण होत असेल याचा अंदाज पोलिस पथकाला आला आणि अखेर डीजे जप्त झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पीड ब्रेकरला ‘स्टॉप’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात सद्य:स्थितीत चारशेच्या वर स्पीड ब्रेकर्स असताना नव्याने तेवढ्याच नवीन स्पीड ब्रेकर्सची मागणी होत आहे. मात्र, महापालिकेकडून आहे त्याच स्पीड ब्रेकर्सची आवश्यकता तपासली जाणार आहे. महापालिकेत नव्याने स्थापन झालेल्या 'अर्बन मोबिलिटी सेल'च्या पहिल्याच बैठकीत नव्याने स्पीड ब्रेकर्स टाकण्यासाठी रोड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीची (आरटीए) परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. याशिवाय यापूर्वी शहरात असलेल्या स्पीड ब्रेकर्सचीही आवश्यकता तपासण्याचा निर्णय घेण्यात आला असून आरटीएची परवानगी नसलेले स्पीडब्रेकर्स हटवण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यामुळे शहरातील स्पीड ब्रेकर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे.

शहरातील वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने नव्याने 'अर्बन मोबिलिटी सेल'ची स्थापना करण्यात आली असून, त्याची पहिली बैठक आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. या बैठकीत वाहतूक पोलिस उपायुक्त, आरटीओ, महावितरण, न्हाईचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासह द्वारका येथील वाहतूक कोंडी फोडण्यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत पायी चालणे व सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, मनपा स्तरावर शहर बस वाहतुकीचे व्यवस्थापन करणे, ठराविक मार्गांना एकेरी अथवा दुहेरी वाहतुकीत बदल करणे, विविध चौकांतील सिग्नल यंत्रणा व पादचाऱ्यांसाठी सिग्नल यंत्रणा उभारणे, स्पीड ब्रेकर्सबाबत धोरण ठरविणे, विविध चौकांचे सुशोभीकरण अशा विषयांवर चर्चा झाली. यावेळी, शहर वाहतूक पोलिस शाखेने रस्ते व फूटपाथवर पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी, अधिकृत रिक्षा थांबे निश्चित करून त्यात रिक्षांची संख्या निश्चित करावी, द्वारका चौफुलीवरील अवैध थांबे रोखावेत, शहरात आवश्यकतेनुसार 'नो व्हेईकल झोन' निर्माण करावेत, निवडक रस्त्यांवर एकेरी वाहतूक करावी, रिक्षांना मीटरिंग व्यवस्था कार्यान्वित करावी, शहरातील मंगल कार्यालये-लॉन्स समोरील अनधिकृत पार्किंगवर सक्तीने कारवाई करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले. शहरात बॅरिअर फ्री व वापरास अनुकूल पादचारी मार्ग निर्माण करण्याचे काम लवकरात लवकर हाती घेण्याचे प्रस्तावित असून, शहर बससेवाही कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या बैठकीत स्पीड ब्रेकर्सच्या संख्येबाबतही चर्चा झाली. शहरात सध्या साडेचारशेच्या आसपास स्पीड ब्रेकर असून, अजूनही तेवढ्याच स्पीडब्रेकर्सची मागणी पोलिस आणि महापालिकेकडे आहे. परंतु, स्पीड ब्रेकर्सची संख्या नियंत्रित असावी आणि स्पीड ब्रेकर्स हे रोड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीने मान्यता दिलेलेच असावेत, अशी भूमिका आयुक्तांनी मांडली. यापुढे आरटीएच्या मान्यतेशिवाय स्पीडब्रेकर्स मंजूर करू नयेत आणि सध्याच्या स्पीडब्रेकर्सची आवश्यकता तपासण्याचे आदेश दिले. त्यामुळे शहरातील स्पीड ब्रेकर्सची संख्या कमी होणार आहे.

पादचाऱ्यांसाठी १५ सेकंद

शहरातील सर्व सिग्नलवर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी सिग्नल निर्माण करणे व विविध चौकांत, सिग्नल, रस्ता क्रॉसिंग, अधिकृत रिक्षा थांबे येथे महापालिकेमार्फत पट्टे मारणे, कॅट आय लावणे, फलक लावणे आदी सूचना यावेळी करण्यात आल्या. प्रत्येक सिग्नलवर पादचाऱ्यांसाठी कमीत कमी १५ सेंकदांची वेळ रस्ता ओलांडण्यासाठी असावी, असा प्रस्तावही यावेळी सादर करण्यात आला. त्यावर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

द्वारकेवरील भुयारी मार्ग सुरू

द्वारका चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्याच्या विषयावरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. येथील भुयारी पादचारी मार्ग त्वरित वापरायोग्य करण्यासाठी संपूर्ण मार्ग स्वच्छ करून त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या. त्यानुसार तेथे फलक लावणे, प्रवेशद्वाराजवळील परिसर स्वच्छ करणे, अतिक्रमण हटविणे आदी कामेही करण्यात येणार आहेत. याशिवाय, मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवरील पथदीप लावण्याबाबतही सूचित करण्यात आले. बाजारपेठांमधील दुकानांच्या समोरील अतिक्रमण हटवण्याचे आदेशित करण्यात आले. त्यानुसार शनिवारी द्वारका भुयारी मार्गाची स्वच्छता हाती घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिल महाजन पुन्हाचौकशीच्या फेऱ्यात

0
0

प्रशासनाकडून विभागीय चौकशी प्रस्तावीत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कारवाईचा बडगा सुरूच ठेवला असून, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अग्निशमन दल विभागाचे प्रमुख अनिल महाजनांच्या अडचणी वाढल्या आहे. शासन आदेश दडवल्याप्रकरणी गेल्या महिन्यात मुंढेंनी महाजन यांना एक लाखाचा दंड ठोठावला होता. पाठोपाठ आता अग्निसुरक्षा दाखल्यांची अपूर्ण माहिती ठेवणे आणि कामात अनियमीतता केल्याचा ठपका ठेवत, त्यांची विभागीय चौकशी आयुक्तांनी प्रस्तावित केली आहे. त्यामुळे महाजनांची निवृत्ती संकटात सापडली आहे.

बेशिस्त आणि भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा सपाटा आयुक्त मुंढेंनी सुरुच ठेवला आहे. आतापर्यंत आयुक्तांनी एक डझन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर अनेकांच्या चौकशा प्रस्तावित केल्या आहेत. आयुक्तांच्या या कारवाईच्या फेऱ्यात महाजनही अडकले आहेत. राज्य शासनाने अग्निशमन शुल्क आकारण्यास मनाई करणारे पत्रक महाजन यांनी दडवून ठेवत, ते वेळेत महासभेला सादर न केल्यामुळे आयुक्तांनी गेल्या महिन्यात त्यांना एक लाख रुपये दंडात्मक कारवाई केली होती. तरीही महाजनांविरोधातील तक्रारी सुरू होत्या. आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अग्निशमन विभागासंदर्भात माहिती मागविली होती. सन २००८ नंतर १२९५ पैकी ५१४ ना हरकत दाखल्यांची प्रकरणे कशी रखडल्याचे समोर आले होते. याच प्रकरणांमध्ये अग्निशमन दल व नगररचना विभागाकडे प्रलंबित असलेल्या दाखल्यांच्या संख्येत तफावत आढळून आली. यासंदर्भात महाजन यांना कारणे दाखवा नोटीस बजावताना सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेशही दिले होते. परंतु महाजन यांनी मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगत वेळ मारून नेली होती. तसेच खुलासाही वेळेत सादर केला नाही. त्यामुळे आता प्रशासनाने विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांसमोर फाईल सादर केली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या सहीनंतर त्यांची विभागीय चौकशी सुरू होणार आहे. महाजन हे पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे महाजनांची निवृत्ती संकटात सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचे लक्ष कलचाचणी अहवालाकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कलमापन चाचणीचा अहवाल शनिवारी जाहीर करण्यात आला. राज्यातील १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. तर विभागातील २ लाख १० हजार ७१४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यांचे लक्ष आता अहवालाकडे लागले आहे. www.mahacareermitra.in या वेबसाइटवर एसएससी बैठकीचा क्रमांक टाकून विद्यार्थ्यांना कल अहवाल पाहता येणार आहे.

करीअरच्यादृष्टीने विद्यार्थ्यांचा कल ओळखता यावा, त्याला कोणत्या क्षेत्रात रस आहे, हे जाणून घेणे सोपे व्हावे यासाठी कलमापन चाचणी सुरू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील ९६ हजार १८२ विद्यार्थी, धुळे जिल्ह्यातील ३० हजार २४९, जळगाव जिल्ह्यातील ६३ हजार १०२ विद्यार्थी, नंदूरबारमधील २१ हजार १८१ विद्यार्थी

असे उत्तर महाराष्ट्रातील एकूण २ लाख १० हजार ७१४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष आता अहवालाकडे लागले आहे. तर सोमवारी (१४ मे) जिल्ह्यातील समुपदेशकांना अहवालाविषयी सूचना देण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील परिस्थिती समजू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लिनीअर अल्जेब्रा’ची १८ ला पुनर्परीक्षा

0
0

पुणे विद्यापीठ परीक्षा मंडळाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एसवायबीएससीचा 'लिनीअर अल्जेब्रा' या ई-मेल अकाऊंट हॅक करून फोडण्यात आलेल्या पेपरची पुन्हा परीक्षा होणार आहे. येत्या १८ मे रोजी ही परीक्षा घेण्यात येईल, असा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. मात्र हा निर्णय केवळ नाशिक शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणी ई मेल अकाऊंट हॅक करून पेपर फोडल्याचा आरोप असणारे विद्यार्थी आदेश चोपडे आणि चिन्मय अटराव्हलकर यांच्याबाबत पोलिसांचे तपासकार्य पूर्ण झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. त्या विषयाच्या पुनर्परीक्षेबाबतची सूचना विद्यापीठाने वेबसाईटवर जाहीर केली आहे. शुक्रवारी या दोघा संशयित विद्यार्थ्यांना न्यायालयापुढे सादर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत पुन्हा वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली होती. ही मागणी फेटाळत न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनासाठी अर्ज केला होता. या दोघांचा जामीन अर्ज मंजूर झाल्याने सध्या त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास अहवाल आणि विद्यार्थ्यांवर होणारी कारवाई याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

--

केवळ नाशिकसाठीच निर्णय

पुनर्परीक्षेचा हा निर्णय केवळ नाशिक शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. यामुळे विद्यार्थ्यांना लिनीअर अल्ज्रेबाची पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेलिकनच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील वादग्रस्त ठरलेला व राजकीय नेत्यांचे भांडवल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेलिकन पार्कवरून आता पुन्हा एकदा राजकारण होण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसत आहे.

सिडकोच्या प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनी महापालिका प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम या पार्कच्या जागेसाठी दिलेला असतानाच स्थानिक नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आयुक्‍तांनी या पार्कच्या जागेची पाहणी करावी, अशी मागणी करणारे पत्र दिले आहे. एकंदरीतच पेलिकन पार्कच्या जागेवरून केवळ राजकारणच होत असून, मागील पंधरा वर्षांपासून बंद पडलेल्या जागेचा आता कचरा डेपो हाऊनही राजकीय नेते फक्‍त स्वतःच्या नावासाठी या जागेचे भांडवल करीत असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

मध्यंतरीच्या काळात अनेकांकडून प्रयत्न झाल्यानंतर आता सिडको सभापतिपदाचे सूत्रे हर्षा बडगुजर यांनी स्वीकारल्यानंतर पेलिकनचा प्रश्न सोडविण्याचे आस्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन पंधरा दिवसांत ही जागा स्वच्छ करून या जागेचा वापर सुरू करावा अन्यथा स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर पुन्हा श्रेयवादाचा मुद्दा पुढे आल्याने नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आयुक्‍तांना पेलिकन पार्कसंदर्भात पत्र दिले. पेलिकन पार्कसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून, या पार्कच्या विकासासाठी आयुक्‍तांनी लक्ष द्यावे व पार्कची पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.

या मागणीमुळे पेलिकनच्या जागेवरून केवळ राजकीय भांडवल केले जात असल्याचे समोर येत आहे. आपण किंवा आपल्या पक्षाने ही जागा खुली केली यासाठीच सर्वांची धडपड सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आपापसातील हेवेदावे व श्रेयवाद बाजूला ठेवून या पार्कच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे, असे मत सिडकोवासीयांनी व्यक्‍त केले आहे.

जागा वापरात आणा...

मागील सहा ते आठ महिन्यांपासून पेलिकनच्या प्रश्नावर कोणीही बोलत नव्हते. आता मात्र सभापती बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन या पार्कचा पाठपुरावा सुरू केल्यावरच नगरसेवक शहाणे यांनी आयुक्‍तांना हे पत्र दिले आहे. त्यामुळे केवळ श्रेयवादासाठी हे सर्व सुरू असल्याचे सिडकोवासीयांच्या लक्षात येऊ लागले असून, कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही व्यक्‍तीने यासाठी पुढाकार घ्यावा, पण ही जागा वापरात आणावी, अशी अपेक्षा सिडकोवासीय व्यक्त करीत आहेत.

(मलापालिकेची इमेज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांचे मौन, शिवसेनेला चिंता

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या मतदानाला आता अवघा आठवडा शिल्लक राहिला असून, शिवसेना आणि भाजप युतीमधील संस्पेन्स कायम आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी कोणालाच पाठिंबा नसल्याचा खुलासा केला असतानाही, भाजपचे नेते नरेंद्र दराडेंच्या प्रचारापासून लांब आहेत. त्यातच पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही युतीबाबत मौन बाळगले असून, नेत्यांना अद्याप आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेची धडधड वाढली आहे. राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांनी जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच शनिवारी अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पालघर लोकसभा मतदारसंघात सेनेने भाजपला शह देण्यासाठी उमेदवार रिंगणात उतरविल्याने युतीत संघर्ष निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम नाशिक विधानपरिषदेच्या जागेवर झालेला आहे. नाशिकमध्ये भाजपने अद्याप पुरेसे पत्ते उघड केलेले नाहीत. भाजपच्या मतांवरच शिवसेनेच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे शिवसेनेचे लक्ष लागले असतानाच, भाजपने संभ्रमावस्था कायम ठेवली आहे. स्थानिक भाजपने पालकमंत्री गिरीश महाजन निर्णय घेतील असे जाहीर करून त्यांच्या कोर्टात चेंडू टाकला. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनीही भाजपने उमेदवार दिलेला नाही वा कोणास छुपा पाठिंबादेखील दिलेला नसल्याचे सांगत संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून होते. मात्र, शुक्रवारी मुक्कामी दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री महाजन यांनीही मौन बाळगले. स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी पालकमंत्री महाजन यांची भेट घेतली. मात्र या भेटीत पालकमंत्री महाजन यांनी कोणतीही भूमिका मांडली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्याबाबत कोकणी समर्थकांचाही संभ्रम वाढला आहे.

कोकणी भुजबळांच्या दरबारात

दरम्यान अपक्ष उमेदवार व भाजपस्नेही परवेझ कोकणी यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. यावेळी कोकणी आणि भुजबळ यांच्यात दहा मिनिटे गुप्तगू झाले. भुजबळांनी आपल्यालाही आशीर्वाद दिल्याचा दावा कोकणी यांनी केला आहे. आपण भुजबळांसोबत २० वर्ष काम केले असून भुजबळांनी निवडणुकीसंदर्भात माहिती जाणून घेतल्याचे त्यांनी सांगितले. कोकणी आणि भुजबळांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून भाजपचे नेते व जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर हे उघड उघड कोकणी यांचा प्रचार करीत आहेत.

सहाणें युतीच्या गडात

राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी शुक्रवारी शहरात सर्वपक्षीय नगरसेवकांच्या गाठी भेटी घेतल्यानंतर शनिवारी पेठ, सुरगाणा, दिंडोरी येथील मतदारांची भेट घेतली. यावेळी सहाणेंच्या सोबतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते. सहाणे यांनी आघाडीच्या मतदारांसोबतच शिवसेना आणि भाजपच्या मतदारांच्याही गुप्त भेटी घेतल्या. त्यामुळे भाजप व सेनेच्या नेत्यांची चिंता वाढली आहे. शनिवारी सायंकाळी सहाणेंनी शहरातील नगरसेवकांच्या एका हॉटेलात भेटीगाठी घेतल्या. त्यात भाजप व सेनेच्या नगरसेवकांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या मैदानात वाहनांचा शिरकाव

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगारवस्ती असलेल्या सातपूर कॉलनी भागात जिजामाता शाळेचे महापालिकेचे एकमेव मैदान आहे. परंतु, या मैदानात दुचाकींचा शिरकाव होत असल्याने परिसरातील मुलांना येथे खेळणे त्रासदायक बनले आहे.

मोठे असलेले हे मैदान अगोरच खोका मार्केटच्या उभारणीमुळे अरुंद झाले आहे. आता त्यात वाहनांचाही शिरकाव होत असल्याने या मैदानाला लोखंडी गेट बसविण्यात यावे, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.

सातपूर एमआयडीसीत कारखान्यांचे मोठे जाळे पसरल्यामुळे लोकवस्ती झपाट्याने वाढली. त्यामुळे येथे रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आदी सुविधा दिल्या जात असल्या, तरी मुलांना खेळण्यासाठी मैदानाच नसल्याने नाराजी व्यक्त होते. जिजामाता शाळेच्या जागेवर मैदानाची उभारणी करण्यात आली. परंतु, मैदानालगतच खोका मार्केट बांधण्यात आल्याने हे मैदान अरुंद झाले आहे. त्यातच या मैदानातून दिवसभर दुचाकींची वाहतूक होत असल्याने खेळणेदेखील अवघड झाले आहे. महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी या मैदानाच्या प्रवेशद्वारावर लोखंडी गेट उभारावे, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, हे शाळेचे मैदान असल्याने महापालिकेने येथे संरक्षक भिंत उभारत लोखंडी गेट लावले होते. परंतु, मैदानाची स्वच्छता करताना प्रवेशद्वाराचे गेटच गायब झाले. त्यामुळे मैदानाचे लोखंडी गेट गेले कुठे, असा प्रश्न खेळाडू उपस्थित करीत आहेत.

अगोदरच अरुंद असलेल्या या मैदानात दुचाकींचा शिरकाव होत असल्यामुळे खेळणेची अवघड झाले आहे. याप्रश्नी महापालिका व स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेत मैदानाला लोखंडी गेट बसविण्याची गरज आहे.

-सागर सोनवणे, खेळाडू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तब्बल ९८ जोडप्यांचे एकाच वेळी शुभमंगल

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

लांबलचक उभारलेला मंच, त्यावर ठेवण्यात आलेले चौरंग, त्यावर कलशाची केलेली मांडणी, समोर बसलेले वधू-वर,  मंगलाष्टके सूर अशा मंगलमय वातावरणात सामूदायिक विवाह सोहळा झाला. वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालताच केवळ टाळ्या वाजवून आशीर्वाद आणि शुभेच्छा वधू-वरांपर्यंत पोहचविण्यात आले. 

महाराष्ट्र राज्य धर्मदाय आयुक्त शिवकुमार दिघे यांच्या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त व कर्जबाजारी शेतकरी, गरीब कुटुंबीय यांच्या मदतीसाठी हा सामूहिक विवाह सोहळा रविवारी (दि. १३) चोपडा लॉन्स येथे उत्साहात झाला.

मंगळसूत्र प्रदान, सात प्रतिज्ञा, आणि सप्तपदी झाल्यानंतर या सामूहिक विवाह सोहळ्यात ९८ वधू-वरांचा विवाह झाला. नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून वधू-वर या सोहळ्यात सहभागी झाले. प्रारंभी दोन विवाह बौद्ध पद्धतीने करण्यात आले. मिलिंद गांधी यांनी लिहिलेले प्रेरणा गीत सादर करण्यात आले. ज्ञानेश्वर कासार व गीता माळी यांनी या प्रेरणा गीतांचे गायन केले.  काठियावाड यांनी वराना सूट आणि करंजी देवस्थानाने वधूना साड्या दिल्या. भालचंद्र शास्त्री शौचे यांनी पौरोहित्य केले. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परग्रहावरील जीवसृष्टीचा छडा लावू

0
0

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा आशावाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

माणसाच्या शरीरात कार्बनिक रेणू असतात, त्यांनाच डीएनए म्हणतात. पृथ्वीच्या बाहेरील वातावरणात असे कार्बनिक रेणू आहे का याचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयत्न झालेत. परग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, लवकरच या जीवसृष्टीचा छडा लावू असा आशावाद ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी जागवला.

वसंत व्याख्यानमालेच्या वतीने यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर आयोजित व्याख्यानमाला शृंखलेत 'पृथ्वीपलीकडे जीवसृष्टीचा शोध' या विषयावरील डॉ. नारळीकर बोलत होते. रविवारी व्याख्यानमालाचे तेरावे पुष्प होते. डॉ. नारळीकर म्हणाले की, कार्बनिक रेणुचे काही पार्टस अंतराळातील ढगांमध्ये सापडतात का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच त्याबाबत काहीतरी निकाल हाती येणार आहे. १९५० च्या सुमारास आपण पृथ्वीव्यतिरिक्त कुठे जीवसृष्टी आहे का, हा प्रश्न विचारायला लागलो. माझ्या गुरूंनी हा शोध लावला होता, की ढगांच्या पोकळीत कार्बनिक रेणू असतात. म्हणजेच जीवसृष्टी आहे; परंतु त्यांचा तो शोध कुणीही मान्य केला नाही. अनेक दैनिकांनी त्यांचा तो शोध साभार परत पाठवला. अनेक नियतकालिकांकडूनही रेड सिग्नल आल्यावर आपणच त्यावर पुस्तक लिहू म्हणून त्यांनी 'द ब्लॅक क्लाउड' नावाचे पुस्तक लिहिले. ही कादंबरी आजही वाचनीय आहे. त्यानंतर अंतराळातील अनेक रेणू शास्त्रज्ञांनी शोधून काढले. परग्रहांवर जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता आहे. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत जाण्यास ५० तास लागतात. प्रकाशाला तेथपर्यंत पोहोचायला सव्वा सेकंद लागतो. एका ताऱ्यापर्यंत प्रकाश पोहोचायला साडेचार वर्षे लागतात, तर माणसाला तेथे पोहोचायला १ लाख वर्षे लागतील. परत यायला १ लाख वर्षे लागतील असे दोन लाख वर्षांनी तेथे जीवसृष्टी आहे का, हे आपल्याला समजू शकेल; परंतु तोपर्यंत सांगण्यासाठी व ऐकण्यासाठी कोण जिवंत राहील, असेही मिश्किलपणे डॉ. नारळीकर म्हणाले.

आपण ताऱ्यांशी माहितीची देवाणघेवाण करू शकतो. रेडिओ मेसेजच्या माध्यमातून आपला मेसेज तेथपर्यंत पोहोचायला साडे चार वर्षे लागतात व उत्तर यायला साडे चार वर्षे लागतील. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न झाले असल्याचे डॉ. नारळीकर म्हणाले. प्रारंभी मधुकर झेंडे यांनी मूळचंदभाई गोठी यांच्या स्मृतींना उजाळा दिला. अरुण शेंदुर्णीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुनील कुटे यांनी डॉ. नारळीकर यांचा परिचय करून दिला.

आजचे व्याख्यान

वक्ते : सोपान वाटपाडे

विषय : शिवचरित्र : आधुनिक समस्यांवर शिवचरित्रात उपाय

स्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाट

वसंत व्याख्यानमाला : पंचवटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिढा आज सुटण्याची अपेक्षा

0
0

पोलिस, कामगार आयुक्तालय, जिल्हाधिकारी अन् विद्यापीठ प्रशासनाची बैठक

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासनासमोर मांडलेल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कामगार संघटनेने घेतला आहे. साखळी उपोषणास बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या तुकडीतील आणखी दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती उपोषणामुळे खालावली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विषयाबाबत आज (१४ मे) संबंधित सर्व अधिकारीवर्गाची बैठक होणार आहे. या संभाव्य बैठकीतून हा तिढा सुटण्याची अपेक्षा कर्मचारीवर्गास लागली आहे.

समान काम व समान वेतन आणि कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी १ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू करण्याच्या पाच महिने अगोदरपासून या मागण्यांबाबत संघटना व विद्यापीठ प्रशासन यांच्यात संघर्ष सुरू आहे. उपोषणास बसलेल्या कर्मचाऱ्यांचा कायदा आणि सुव्यवस्थेस कुठलाही अडसर नसल्याने पोलिस प्रशासनाकडून उपोषण चिरडण्यासाठी दबाव टाकला जाऊ नये, असेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तीन दिवसांपूर्वी रात्री उशिरा पोलिसांच्या तुकडीने उपोषणकर्त्यांना उपोषणस्थळाहून हटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यास कडाडून विरोध केल्याने पोलिस माघारी फिरले होते.

अगोदर विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन नंतर घूमजाव केले नसते, तर उपोषणाचा प्रश्न चिघळला नसता असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आज होणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या संभाव्य बैठकीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

उपोषण सनदशीर मार्गाने

या प्रश्नी सीटूचे राज्य सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे, तानाजी जायभावे, काँग्रेस नेते शरद अहेर यांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांची भेट घेऊन उपोषण सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने सुरू असल्याचे सांगितले. पोलिस हे आंदोलन दडपत असल्याचा आरोपही यावेळी संघटनेच्या नेत्यांनी केला. याप्रश्नी कामगार उपायुक्तांनीही विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्र पाठवून याप्रश्नी समन्वयाने तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रमय जाणिवांचं आख्यान

0
0

चित्रकार पॉल क्लीचं प्रसिद्ध वचन आहे, 'चित्रकला कशाचंही वर्णन किंवा स्पष्टीकरण करत नाही. ती स्वयंभू कला आहे!' हा विचार नेमका या चित्रकृती पाहताना येतो. मनाच्या आत गजबजणारा अनुभव रंगरेषेतून आकार घेऊन समोर येतो व अभिरुचीची नवी दृश्यभाषा तयार करतो.

कोलाज : राजू देसले

--

महाराष्ट्रातील ज्येष्ठ चित्रकारांच्या निवडक कलाकृतींचे प्रदर्शन पु. ना. गाडगीळ सन्सतर्फे नाशिकमध्ये सुरू आहे. यातील थोर चित्रकारांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींनी, विचारांनी नवा चित्रप्रवाह निर्माण केला आहे आणि आपल्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर नेला आहे. 'अबीर गुलाल रंग महाराष्ट्राचे' नावाचं हे चित्रप्रदर्शन. यात म. वि. धुरंधर, एस. एल. हळदणकर, वा. गो. कुलकर्णी, पी. ए. धोंड, सदानंद बाकरे, प्रभाकर बरवे, प्रभाकर कोलते, शंकर पळशीकर, ए. ए. आलमेलकर, एन. एस. बेंद्रे, माधव सातवळेकर आदी चित्रकारांची चित्रे लावण्यात आली आहेत.

चित्रांतील आशय, विचार, रंगलेपण यावर विलक्षण प्रभुत्व असलेले हे चित्रकार अनुभवाच्या एका समृद्ध जाणिवेकडे आपल्याला नेतात आणि अभूतपूर्व चित्रानुभव देतात. या प्रदर्शनातील अनेक चित्रकारांनी जगभरातील कलेचा अभ्यास केला, शिक्षण घेतले आणि त्यातून आपली स्वतंत्र शैली निर्माण केली, ही प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट आहे.

चित्रकार पॉल क्लीचं प्रसिद्ध वचन आहे, 'चित्रकला कशाचंही वर्णन किंवा स्पष्टीकरण करत नाही ती स्वयंभू कला आहे!' हा विचार नेमका या चित्रकृती पाहताना येतो. मनाच्या आत गजबजणारा अनुभव रंगरेषेतून आकार घेऊन समोर येतो व अभिरुचीची नवी दृश्यभाषा तयार करतो. या चित्रांतून चित्रकारांनी आपल्या परंपरेचा उत्कट आविष्कार प्रकट केला आहे आणि त्यांना जे सांगायचं आहे ते नेमकेपणानं मांडलं आहे. मानवी अनुभवातलं कलातत्त्व अवगत करण्याच्या प्रवासातलं हे रूप आहे, असं म्हणावयास हरकत नाही. ही चित्रं आणि आजचा समकाल याचं काही नातं आहे का? आज जगण्याची मूलभूत संकल्पनाच बदलून गेली आहे. सर्वच पातळ्यांवर टोकाचा बदल समोर आला आहे. परस्परविरोधी वास्तव आणि वर्तमानाचं विस्कळीत आख्यान यांची जुळवाजुळव करण्यात माणूस पुरता गुरफटून गेलाय. त्याचा शोध घेण्यास ही चित्रं भाग पडतात. कलावस्तू ही मनातली सौंदर्यवादी भावना गतिमान करते हाच अनुभव इथं येतो.

कसदार कलानिर्मितीतून कलाप्रवाहाची रुजवात करण्याचे काम प्रामुख्याने या चित्रकारांनी केले. आपल्या आजूबाजूचा समाज, त्याचे प्रश्‍न आणि आपले सत्त्व मांडण्याचा प्रयत्न चित्रांतून केला. दृश्य कलेविषयी जनसामान्यांची प्रगल्भता वाढविण्यासाठी प्रयत्नांचा हा एक भाग म्हणावा लागेल. त्याची ही सुरुवात होती. कला जगतातील बदलांना हे चित्रकार कसे सामोरे गेले आणि त्यातून आपले वेगळेपण कसे जपले त्याची जाणीव इथं होते. कलानिर्मिती ही निष्ठापूर्वक करण्याची कला आहे, त्याचाच हा प्रत्यय आहे. चित्राच्या अर्थाच्या पलीकडे मुक्ततेचा शोध घेण्याची प्रक्रिया सुकर आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी रसिकाला विचार करायला लावणारी चित्रे खरा आनंद देतात. अशाप्रकारच्या कलाकृती भारतीय चित्रकारांनी निर्माण केल्या आहेत. चित्रांत प्रयोग केले आहेत. त्यातूनच चित्रकलेला स्वतंत्र अधिष्ठान आलं.

शाश्‍वत कलामूल्यांचा शोध आणि प्रयोगशीलता या द्वंद्वातून कलेचा प्रवास सुरू असतो. नव्या अनुभवांचा लख्खपणा आणि परंपरा यांची सांगड घालून नवे भान देणारा कलाविष्कार रसिकांची दृश्य-संवेदना टोकदार करत जातो आणि समाजाला जागं करत जातो. हेच चित्रमय आख्यान ही चित्रं देतात.

लेखक कवी व प्रसिद्ध समीक्षक आहेत.

प्रतिक्रियेसाठी nashik.letters@gmail.com

(आवाजच्या जागेवर वापरणे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रेल्वे पोलिसांकडून ‘नागपूर’चे विभाजन

0
0

औरंगाबाद विभागात मनमाड, नाशिकचा समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रेल्वेतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने रेल्वे पोलिसांच्या नागपूर विभागाच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून नव्याने औरंगाबाद विभाग तयार केला आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षकपदाची नवनिर्मिती करून मनमाड व जालना येथे उपविभागीय पोलिस अधिकारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

या बदलामुळे आता मनमाड विभागात नाशिकरोड, मनमाड, इगतपुरी, भुसावळ, चाळीसगांव, शेगांव, नंदुरबार या रेल्वे पोलिस स्टेशनचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे औरंगाबादच्या पोलिस अधीक्षकपदी नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या अधीक्षकपदाच्या ३ पैकी १ पदावरील अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.

नव्याने निर्मित झालेल्या औरंगाबाद विभागातील जालना उपविभागात औरंगाबाद, नांदेड व परळी वैजनाथ रेल्वे पोलिस स्टेशनचा समावेश होणार आहे. रेल्वेमध्ये गुन्हे व इतर गोष्टी रोखण्यासाठी राज्य सरकारनेच रेल्वे पोलिस असतात; त्यांना 'जीआरपी' म्हटले जाते. तर रेल्वेच्या मालमत्तेचे जतन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलचे जवान असतात, त्यांना 'आरपीएफ' म्हटले जाते. राज्यात लोहमार्ग मोठ्या प्रमाणात असला तरी त्याचे विभाग मुंबई ,पुणे व नागपूर येथेच होते. त्यामुळे आता औरंगाबाद हे नव्याने होणार आहे. त्यामुळे कामकाज करणे सुद्धा रेल्वे पोलिसांना सोपे जाणार आहे. या अगोदर नागपूर रेल्वे विभागात विदर्भासह मराठवाडा, नाशिक, खान्देश व अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग होता. तर मनमाड विभागात उपअधीक्षकपद अगोदरपासून असले तरी त्याचे कार्यक्षेत्र खूप मोठे होते. त्यामुळे ते आता कमी करण्यात आले आहे.

अकोला उपविभाग

नागपूर येथील विभागातून अकोला उपविभागाची सुद्धा नवनिर्मिती करण्यात आली असून त्यात अकोला, वर्धा, बडनेरा पोलिस स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांस्कृतिकी जोड..

0
0

गायन : १९ मे शनिवार

कार्यक्रम : लहान मुलांचे बहारदार गायन

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह, टिळकरोड, शालिमारजवळ

दिनांक : शनिवार, १९ मे

वेळ : सायंकाळी ५ वाजता

ठळक विशेष : ए. जी. म्युझिक अॅकॅडमी प्रस्तुत पाच ते १५ वर्षे या वयोगटातील सुमारे ३० जणांचा चमू जवळपास २० गाणी सादर करणार आहे. यात बहुतांश जुन्या काळातील नावाजलेल्या गाण्यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे आयोजन अविनाश गांगुर्डे आणि निर्मिती विनया गांगुर्डे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लब सदस्यांनी अनुभवली डेझर्टची गोडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्यात थंडगार खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. त्यात डेझर्ट म्हणजे लहानांसोबत मोठ्यांचाही आवडता पदार्थ. या पदार्थाचे वेगवेगळे प्रकार घरच्याघरी बनवता याव्यात, यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे 'डेझर्ट मेकिंग' वर्कशॉप तिडके कॉलनीतील ऋग्वेद हॉल येथे रविवारी झाला.

डेझर्ट घरच्या घरी नेमके कसे बनवावे, याची अनेकांना माहिती नसते. बाहेर हॉटेल, केकशॉपमध्ये मिळणारे चविष्ट डेझर्ट घरी बनवता यावे, अशी इच्छा नसली तरी तंत्र माहित नसल्याने ते प्रत्यक्षात उतरत नाही. महिलावर्गाची हीच अडचण ओळखून हा वर्कशॉप घेण्यात आला. यात ट्रिपल पुडिंग, रसमलाई मूज शॉट्स, कॉफी क्रिम पॅनाकोटा, मँगो मूज असे डेझर्टचे विविध प्रकार यावेळी विवेक सोवनी यांनी शिकवले. डेझर्टवर आकर्षक सजावट कशी करावी, फळांच्या चवी डेझर्ट बनविताना कशाप्रकारे लक्षात घ्यावे, आदीविषयक माहितीही यावेळी सांगण्यात आली. त्यामुळे वेगवेगळ्या चवी चाखण्याचा आनंद आता घरच्या घरीच लुटता येणार आहे.

फोटो : पंकज चांडोले

बातमीत कल्चर क्लब लोगो, फेसबुक, ट्विटर लिंक, क्यूआरकोड वापरावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन्स क्लबतर्फे मोफत पायरोपण शिबिर

0
0

२६ व २७ मे रोजी मालेगावी आयोजन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील लायन्स क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या वतीने मोफत कृत्रिम पायरोपण शिबिराचे २६ व २७ मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. शिबिरार्थींच्या निवास व भोजनाची व्यवस्थादेखील क्लब करणार आहे. या शिबिराचा जास्तीत-जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख सचिन जोशी यांनी केले आहे.

क्लबने पत्रकार परिषद घेऊन शिबिराची माहिती दिली. पोलिओ, अपघात आदी कारणास्तव अनेकांना अपंगत्व येते. पाय गमावलेल्या तसेच इतर समस्यांनी त्रस्त रुग्णांना जयपूर फूटसाठी जयपूर, अहमदाबाद आदी ठिकाणी जाऊन उपचार घेण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येतो. अनेकांना तो पेलवत नाही. त्यामुळे अशा गरजू रुग्णांच्या सेवेसाठी क्लबने आठ वर्षांपूर्वी असेच शिबिर घेतले होते. त्याचा १७५ रुग्णांना लाभ झाला होता. त्याच अनुभवातून पुन्हा शिबिर घेतले जात आहे. साधारण २०० रुग्णांचा सहभाग लक्षात घेऊन त्यादृष्टीने नियोजन केले असल्याचे जोशी यांनी सांगितले.

संगमेश्‍वरातील वर्धमान शिक्षण संस्थेने शिबिरासाठी नवीन इमारत उपलब्ध करून दिली आहे. त्यात पोलिओ कॅलिपर्स, सिंगल स्टीक, सर्जिकल बूट, कुबड्या व एसएस बेल्टचे मोफत वाटप केले जाईल. दि. २६ मे रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत नोंदणी व पूर्वतपासणी केली जाईल. त्यानंतर तत्काळ आवश्यकतेनुसार जयपूर फूट आदी साहित्य निर्मिती करण्यात येऊन वाटप करण्यात येईल, असे जोशी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लिनिअर अल्जेब्रा’ साठी सोळाशे पुनर्परीक्षार्थी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पेपरफुटीमुळे एसवायबीएससीचा 'लिनिअर अल्जेब्रा' या ई-मेल अकाऊंट हॅक करून फोडण्यात आलेल्या पेपरची पुन्हा परीक्षा होणार आहे. येत्या १८ मे रोजी ही परीक्षा घेण्यात येईल, असा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. मात्र हा निर्णय केवळ नाशिक शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. या पेपरसाठी नाशिक जिल्ह्यातून सुमारे १६०० परीक्षार्थी असणार आहेत.

विद्यापीठाच्या या सूचनेमुळे संबंधित विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यासाच्या उजळणीवर भर दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी ई-मेल अकाऊंट हॅक करून पेपर फोडल्याचा आरोप असणारे विद्यार्थी आदेश चोपडे आणि चिन्मय अटराव्हलकर यांच्याबाबत पोलिसांचे तपासकार्य पूर्ण झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. त्या विषयाच्या पुनर्परीक्षेबाबतची सूचना विद्यापीठाने वेबसाइटवर जाहीर केली आहे. शुक्रवारी या दोघा संशयित विद्यार्थ्यांना न्यायालयापुढे सादर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत पुन्हा वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली होती. ही मागणी फेटाळत न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यानंतर त्यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनासाठी अर्ज केला होता. या दोघांचा जामीन अर्ज मंजूर झाल्याने सध्या त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास अहवाल आणि विद्यार्थ्यांवर होणारी कारवाई याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images